लेखांक ८८ : खुंटामोडी , भारतातील सर्वात मोठी काठीची होळी आणि मोलगीचे भिलाशेठ

धडगाव सोडले आणि कडक उन्हातून डांबरी रस्त्याने चालू लागलो . हा अजूनही शूलपणीच्या झाडीचाच परिसर चालू होता . उन्हाचा तडाखा प्रचंड होता . वाटेमध्ये अतिशय विरळ वस्ती आहे . कोणीही मराठी बोलत नव्हते . पूर्वी मी सांगितले त्याप्रमाणे हा तीनही राज्यांमध्ये विस्तारलेला संपूर्ण आदिवासी प्रदेश आहे . इथे अनेक स्थानिक भाषा आहेत .मध्य प्रदेशामधील हिंदी भाषा ,त्यानंतर नेमाडी बोली , शूल पाणीच्या झाडीच्या सुरुवातीला बोलली जाणारी पावरा आदिवासी लोकांची पावरी बोली , त्यांच्याहून थोडेसे मागास अथवा दुय्यम मानले जाणारे भील आदिवासी आहेत त्यांची भील अथवा भिलोरी बोली आहे . पावरा आणि भील यांच्यात रोटीबोटी व्यवहार सहसा होत नाहीत . (ही सर्व मला स्थानिक लोकांनी दिलेली माहिती मी लिहीत आहे . यात माझे स्वतःचे काहीही नाही . वस्तुस्थिती मांडणे हे माझे कर्तव्य आहे . ) पावरा आदिवासींचे प्राबल्य मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांच्या सीमांवर आहे . धडगाव पासून अक्कलकुवा पर्यंत कमी उंचीचा डोंगराळ प्रदेश आहे इथे भिल्ल लोक जास्त राहतात त्यामुळे भिलोरी भाषा जास्त चालते . भिलट नावाची अजून एक बोली आहे असे मला सांगण्यात आले . इथून अजून थोडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये खाली उतरले की अतिशय गरीब अवस्थेमध्ये राहणारे आदिवासी भिल्ल लोक आहेत जे अहिराणी भाषेमध्ये बोलतात . जसजसे आपण गुजरातच्या जवळ जातो तसे निआरी अथवा नियारी नावाची भाषा बोलली जाते .गुजरातच्या सीमेवर धाणका नावाची एक भाषा देखील आहे ! शिवाय गुजराती भाषा तर त्या लोकांना येतेच . महाराष्ट्राची सीमा रेखा असल्यामुळे इथल्या सर्व लोकांना मराठी देखील समजते . इंग्रजी शिक्षणाच्या अतिरेकामुळे आजकाल सर्वांना इंग्रजी देखील कळते आहे . अजूनही काही बोली या भागात आहेत .आता या पट्ट्यातील लोकांना किती भाषा येतात मोजून पहा !
न्याहीली , बंजारा , काकावाडी , कोटली , बारोटी , निमाडी / लिंबाडी , पावरी , भील , राठवा /राठली , मराठी , अहिराणी , गुजराथी , हिंदी , निदारी , धाणका ! 
 मला असे अनेक बहुभाषिक लोक इथे भेटले ! बहुभाषिकत्व हे भारताचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिलेले आहे ! भाषावार प्रांतरचना केल्यामुळे जरी भाषा वैविध्य कमी झाले तरी अजूनही पूर्णपणे संपलेले नाही ! असो .
मित्रांच्या भेटीमुळे चालायला उशीर झाला होता त्यामुळे पायांना गती देऊन चालत राहिलो .  धडगाव सोडल्यावर बऱ्याच गावांच्या हाती लागल्या . रोषा माळ , हरणखुरी , उमराणी खुर्द ,जमानवाही , सुरवाणी , सोण बुद्रुक, मोजरा ,खानबरा ही गावे पार करत कुंडल गावामध्ये आलो . या संपूर्ण काळामध्ये उजव्या हाताला डोंगरांची एक सुंदर रांग माझी साथ करत होती . 
ही डोंगर रेषा बराच वेळ तुमची साथ करते . तुम्ही किती चालले आहात हे तुमच्यासमोर आता कुठला डोंगर आहे त्यावरून कळते .
या भागात ताडाची झाडे दिसतात दिसतात
होळीमध्ये लावण्यासाठी ताडाचे खोड वापरले जाते त्यामुळे ताडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते . मोहाच्या दारू सोबतच ताडी देखील या भागात पितात .
पुढे कुंडल नावाचे गाव लागल्यावर एका आदिवासीने मला आवाज दिला . इला सोमा पाडवी नावाचा हा भिल्ल आदिवासी मनुष्य परिक्रमावासींची मनोभावे सेवा करत होता . मी चालत होतो तो महाराष्ट्र राज्य  महामार्ग क्रमांक एक होता ! आणि त्या महामार्गाला लागूनच थोडेसे आत चालत गेल्यावर त्याचे घर होते . तिथेच झाडाखाली सावली व निवारा करून त्याने छोटासा आश्रम नुकताच उघडला होता . त्यावेळी त्याच्या कुवतीनुसार तो परिक्रमावासींना चहापान व बालभोग देण्याचे सेवा करत असे . मला अतिशय सुंदर असा काळा चहा त्याने पाजला . तोडके मोडके मराठी बोलत होता . या आश्रमाची काही छायाचित्रे गुगल नकाशावर मिळाली ती आपल्यासाठी जोडत आहे .
राज्य महामार्ग क्रमांक एक ने आपण आलो आणि डावीकडे वळलो की आश्रम येतो .
राहत्या घराच्या शेजारीच त्याने एक नवीन बांधकाम केलेले आहे .
अंगणामध्ये देखील पहुडण्याची सोय केलेली आहे
आश्रमात बसल्यावर महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक एक असा दिसतो .
 इला सोमा पडवीने माझ्या वहीमध्ये मारून दिलेला शिक्का .  त्यावरील मजकूर वाचायचा प्रयत्न करूयात . 
जय बडा देव राणी काजल माता देव मोगरा माँ नर्मदा अन्नक्षेत्र कुंडल . ता. अक्राणी जि. नंदुरबार
Public trust स्थापना दिनांक 13 .9. 2018 रजिस्ट्रेशन नंबर ई/24
इथून महामार्गाने ओसाड माळरानावरून बरेचसे अंतर चालल्यावर खुंटामोडी नावाचे गाव येते . या गावापासून थोडासा उतार चालू झाला असे माझ्या लक्षात आले . हा भाग उन्हाळ्यामध्ये अतिशय ओसाड आणि पावसाळ्यामध्ये हिरवागार असतो . आत्ता चालताना मला ऊन अक्षरशः भाजून काढत होते . आधीच तापलेला डांबरी रस्ता त्यात आजूबाजूला सावली देणारे एकही झाड नाही . हे चित्र काही फारसे आश्वासक नाही . रस्ता बांधताना ज्याप्रमाणे त्याच्यावर डांबर टाकावेच लागते हा एक अनिवार्य भाग आहे त्याप्रमाणे प्रत्येक दहा-पंधरा फुटावर एक झाड लावलेच पाहिजे असा अनिवार्य कार्यक्रम सरकारने केला तरच आपले रस्ते चालण्यासाठी सुसह्य होतील . त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य देखील वाढते आणि धूप सुद्धा कमी होते . 
हा भूभाग कसा आहे हे आपल्या लक्षात यावे म्हणून काही छायाचित्रे गुगल नकाशाच्या सौजन्याने टाकत आहे .
हीच ती डोंगररांग जी अखंड आपल्या उजव्या हाताला आपली साथ करत असते . ही नुसती डोंगरांची रांग नसून हिच्या खालूनच नर्मदा मैया वाहते आहे त्यामुळे ही रांग आपल्याला आश्वस्त करते की तुम्ही योग्य मार्गाने चाललेले आहात .
महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक एक अतिशय ओसाड प्रांतातून जातो . वाटेमध्ये एकही झाड नसल्यामुळे अखंड चालत राहावे लागते . पुन्हा एकदा सांगतो की महामार्गाने चालताना नेहमी विरुद्ध बाजूने अर्थात उजव्या हाताने चालावे . त्यामुळे तुम्हाला न दिसणारे वाहन तुमच्यापासून दुरून निघून जाते आणि जवळून जाणारे वाहन तुम्हाला दिसत राहते . गाड्यांचे नियम चालणाऱ्या माणसांसाठी लागू होत नाहीत .
या भागातील डोंगर इतके रिकामे आहेत की तिथे अशा प्रकारे गाडी देखील चालवता येते ! मध्ये कुठलाच अडथळा येत नाही !
दूरवर एकाही महावृक्षाची सावली दिसत नाही . ज्यांना वृक्ष लागवड क्षेत्रात काम करायचे आहे अशा लोकांसाठी हा परिसर नंदनवन आहे .
या भागातील आदिवासी लोक त्यांच्या गाड्या कुठूनही कुठेही घालतात . याहा मोगा असे गाडीवर लिहिलेले असते . महाराष्ट्रातील अक्कलकुवा तालुक्यामध्ये येणाऱ्या देवमोगरा या गावांमधील मोगा आई ही त्यांची देवी आहे . याहा म्हणजे आई .
ही नदी खालून अखंड आपल्याला साथ करत असते . हिचे पात्र कोरडे पडलेले होते परंतु अखंड डाव्या हाताला दिसत होते .
खुंटामोडी पठाराच्या उताराची सुरुवात जिथे होते अगदी त्या ठिकाणी डाव्या हाताला एक अतिशय सुंदर आश्रम दिसला .तसेही दुपारपासून मी सुमारे १५ किलोमीटर चाललो होतो त्यामुळे इथे थांबावे असा विचार केला . स्थानिक भिल्ल आदिवासी मनुष्य संन्यास घेऊन नागा बाबा झाला आहे . आपलीच पूर्वाश्रमीची जागा त्याने या आश्रमासाठी दान केलेली असून तो स्वतः देखील आश्रमातच राहतो आणि परिक्रमावासींची सेवा करतो . भुसावळ जळगाव येथील लोक देणग्या गोळा करून हा आश्रम चालवीत आहेत . तीन वर्षांची परिक्रमा करणारे पाटील नावाचे अतिशय तेजस्वी दांपत्य या आश्रमामध्ये काही काळ सेवेकरिता म्हणून थांबलेले होते . त्यांनी अतिशय प्रेमाने माझे स्वागत केले आणि आश्रमामध्ये कुठेही राहण्याची मुभा दिली . मी एकटाच मुक्कामी असल्यामुळे या आश्रमामध्ये काळ खूप आनंदात व्यतीत झाला . आश्रम अतिशय सुंदर रीतीने सजविलेला होता . अगदी महामार्गावर दुतर्फा उत्तम जातीची देशी झाडे लावलेली असून त्यांच्या संरक्षणासाठी जाळ्या व हिरव्या रंगाचे शेडनेट लावण्यात आले होते . प्रत्येक झाडाला क्रमांक देण्यात आला होता . असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते . आश्रम म्हणजे छोटेसे कौलारू घर होते ज्याच्या अंगणामध्ये सुंदर बगीच्या तयार करण्यात आला होता तसेच वरांडा देखील अतिशय चकाचक व स्वच्छ ठेवला होता . परिक्रमावासी वरांड्यात अंगणात हॉलमध्ये किंवा शेजारी बांधलेल्या शेणाने सारवलेल्या खोलीमध्ये असे कुठेही मुक्काम करू शकत होते .
पाटील पती-पत्नी उच्च कोटीचे साधक होते . त्यांच्यासोबत मी त्यांच्या खोलीमध्ये उभे राहून आरत्या स्तवने कवने वगैरे म्हटली . इंदोर चे नाना महाराज तराणेकर यांची करुणात्रिपदी आम्ही एकत्र म्हटली .हे माझे परात्पर गुरु होत . दोघांनाही मला भेटून खूप आनंद वाटला . मला देखील दोघांचा एकत्र परिक्रमा करण्याचा निर्णय खूप आवडला . आयुष्यभर आपण सतत कोणाला कोणासाठी राबत राहतो . गरजेपेक्षा अधिक वाढविलेला संसार चालविण्यासाठी काही ना काही खटपट करावी लागते . अशी खटपट करण्यातच उभे आयुष्य निघून जाते . आणि आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा आपले जगायचे राहून गेले आहे याची जाणीव आपल्याला होते तोपर्यंत शरीराने साथ देणे सोडून दिलेले असते . मग आपण ठरवतो की आता पुढच्या जन्मात नक्की हवे ते करू ! परंतु असे अनेक जन्म जातात आणि आपण मात्र आला दिवस ढकलत राहतो ! याला थोडासा फाटा देत हात पाय हलत आहेत तोपर्यंत सर्वकाही पुढच्या पिढीच्या हातामध्ये सोपवून स्वतःच्या शोधासाठी असे रानावनात भटकणे आणि त्यावेळी आपल्या जीवनसाथीची देखील साथ सोबत असणे या परते भाग्य ते दुसरे काय ! म्हणूनच सहकुटुंब अर्थात पती-पत्नी जोडीने नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्याचे मानले गेलेले आहे . सदर लिखाण वाचून एका जरी दांपत्यास एकत्र नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा निर्माण होईल तरी या लेखन प्रपंचाचे सार्थक झाले असे मानावयास हरकत नाही ! एकत्र परिक्रमा करण्याचे फायदे तोटे या विषयावर मी या दोघांशी सविस्तर चर्चा केली . यात नकारात्मक काही सापडलेच नाही ! उलट आपल्या जीवनसाथीची एक वेगळी ओळख इथे तुम्हाला निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही याची खात्री नर्मदा मैया आपल्याला देते !  प्रत्येक माणसाला वाटत असते की आपण कमावतो आहोत म्हणून घर चालले आहे किंवा आपण कष्ट करत आहोत म्हणून सर्व होते आहे . परंतु प्रत्यक्षामध्ये परमेश्वराला प्रत्येक जीवाच्या पोटाची काळजी लागलेली आहे . आणि जो तुम्हाला चोच देतो तोच चारा देखील देतो . हा एक अतिशय खात्रीपूर्वक सिद्ध झालेला सिद्धांत आहे . त्यामुळे अतिशय निश्चिंतपणे आपण बाहेर पडावे कारण 
जन पळभर म्हणतील हाय हाय । मी जाता राहील कार्य काय । हेच सत्य आहे . 
आज ना उद्या प्रत्येकाला मृत्यू येणार हे शाश्वत सत्य आहे . समर्थ रामदास स्वामी दासबोधातल्या मृत्यू निरूपण समासात म्हणतात 
अवचिते काळाचे म्हणीयारे । मारीत सुटले येकसरे । नेऊनी घालती पुढारे । मृत्युपंथे ॥
होता मृत्याची अटाटी । कोणी न घालू सकती पाठी । सर्वत्रास कुटाकुटी ।मागे पुढे होत असे ॥
ओघाने विषय निघालाच आहे म्हणून सांगतो . दासबोध या ग्रंथातला दशक तिसरा समास नववा म्हणजे मृत्यू निरूपण समास होय . हा समास प्रत्येकाने आवर्जून वाचावा . रामदासी संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे की कुठलीही व्यक्ती मृत्यू पावल्यावर तिच्या मृतदेहापुढे या समासाचे प्रकट वाचन केले जाते . मी आजवर किमान ३०० मृतदेहांपुढे या समासाचे वाचन केलेले आहे . हा समाज याच प्रसंगी का वाचायचा याचे कारण असे आहे की त्याचा अर्थ निर्वाणप्रसंगी जितका खोल कळतो तितका एरव्ही कळत नाही . समर्थ या समासामध्ये जे काही बोलत आहेत ते तुमच्यासमोर घडलेले किंवा निश्चेष्ट पडलेले असते त्यामुळे तुम्हाला लगेच खात्री पटते . आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट एकदा गेल्यावर पुन्हा मिळू शकते परंतु एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही . त्यामुळे जर मनामध्ये नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा असेल तर जरा देखील विलंब न करता ताबडतोब त्याचे नियोजन करावे . आणि नियोजन इतकेच आहे की सोबत काहीही न घेता थेट मैया चा किनारा गाठावा . पुढची सर्व सोय मैया लावून देते . माझा एक तरुण मित्र ज्याचे वय केवळ ३३ वर्षाचे आहे तो या ब्लॉगचे नित्य वाचन करायचा आणि त्याने अनेकांना हा ब्लॉग वाचायला प्रवृत्त केले . परंतु दुर्दैवाने नुकतेच अचानक त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात निधन झाले . तो मला नेहमी म्हणायचा की माझी नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे . आता त्याचा देह पडला आहे परंतु इच्छा शिल्लक आहे त्यामुळे ही इच्छा पूर्ण करण्याकरता त्याला पुन्हा एकदा जन्म मिळणार हे निश्चित आहे . आपल्याला देखील नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होत असेल तर ती कुठल्याही मागील जन्मातील इच्छा सुद्धा असू शकते . त्यामुळे तिचा अनादर न करता  मैयाच्या काठावर रुजू व्हावे हे सर्वश्रेष्ठ ! शुभस्य शीघ्रम् ! आतापर्यंत नर्मदा परिक्रमेचे जे काही यथार्थ वर्णन मी नर्मदा मातेच्या कृपेने करू शकलो आहे त्यावरून आपल्याला कल्पना आली असेल की ही परिक्रमा जितक्या कमी वयात आपण करू तितके उपकारक आहे आणि जितका उशीर करू तितका नर्मदा मातेच्या डोक्याला होणारा ताप आपण वाढवत असतो . परिक्रमेतील असे अनेक मार्ग आहेत की जिथून कदाचित पुन्हा जायला सांगितले तर मी जाणार देखील नाही कारण शरीर त्या ठिकाणी साथ देईलच याची खात्री देता येत नाही . दरवर्षी असे अनेक मार्ग तुमच्यासाठी अगम्य होत जाणार आहेत त्यामुळे संपूर्ण परिक्रमा आगम्य होण्यापूर्वीच आपण उचललेली काय वाईट आहे ! परिक्रमे संदर्भात एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यावे ते म्हणजे कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा संशोधन करायच्या भानगडीत पडू नये .नर्मदा परिक्रमा करण्यासाठी कुठल्याही मार्गदर्शकाची गरज नाही .कारण ती स्वतः मार्ग दाखवते. नर्मदा मैया प्रत्येकासाठी व्यक्तिगत पद्धतीने परिक्रमेचे आयोजन स्वतः करीत असते ! अमुक ठिकाणी गेलेच पाहिजे किंवा अमुक ठिकाणीच मुक्काम केला पाहिजे असा कुठलाही नियम परिक्रमेमध्ये ग्राह्य नाही . जिथे मैया नेईल तिथे जावे आणि जिथे मैया ठेवील तिथे राहावे इतकी परिक्रमा सोपी आहे . असो . 
अशा अनेक साधक बाधक चर्चा पाटील कुटुंबीयांशी झाल्यावर मी नागा बाबांचे पाय पकडले . त्यांच्याशी देखील भरपूर गप्पा मारल्या . शक्यतो संन्यासी आपल्या पूर्वाश्रमीची संपत्ती सोडून देतात परंतु इथे बाबांनी आपली पूर्वाश्रमीची जमीन मुलांकडूनच दान स्वरूपात घेतली होती हे पाहून मला मोठी मौज वाटली . पत्नी व मुलांशी संपर्क मात्र त्यांनी ठेवलेला नाही हे देखील लक्षात घ्यावे .  या आश्रमातील बगीचा सुंदर होता . मी झाडांना पाणी घातले आणि अगदी प्रत्येक झाडाचे सूक्ष्म अवलोकन केले . मला त्यात खूप आनंद मिळाला . अतिशय सुग्रास असे भोजन पाटील काकूंनी बनवले होते . खूप दिवसांनी घरगुती महाराष्ट्रीय पद्धतीचे भोजन जेवायला मिळाले ! अर्थात हे केवळ भोजन नसून भोजन प्रसाद असल्यामुळे चवीचा फारसा काही विषय नव्हता परंतु महाराष्ट्राची चव वेगळी जाणवली हे मात्र खरे ! या आश्रमाचे काही फोटो आपल्या अवलोकना करता देत आहे . सौजन्य अर्थातच गुगल नकाशे .
धडगाव या तालुक्याचे जुने नाव आक्राणी असे आहे . ही आश्रमाची पाटी . पलीकडे झाडांच्या संरक्षणासाठी केलेल्या जाळ्या पहा .
आश्रमाची व्यवस्था पाहणाऱ्या सेवाकर्मी नर्मदा भक्तांचे क्रमांक
आश्रम अतिशय सुंदर आहे .
इथे समोर दिसणाऱ्या खोलीमध्येच मी आसन लावले होते .
हेच आदिवासी नागा बाबा आहेत जे या आश्रमाचे संचालक आहेत .
आश्रमाच्या बाहेर सुंदर पद्धतीने लावण्यात आलेली झाडे आणि त्याच्याभोवती घातलेल्या जाळ्या
आश्रमाच्या बाहेर इथून पुढे शूलपाणीची झाडी संपेपर्यंत प्रत्येक गावांमधील अंतर लिहिलेले आहे . हे फारच उपयुक्त आहे . 
आश्रमाच्या याच स्वच्छ वरांड्यावरील कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो . इथे समोर भिंतीवर लावलेला नर्मदा परिक्रमा मार्गाचा नकाशा देखील उपयुक्त आहे . 
गप्पा मारत रात्री उशिरापर्यंत बसल्यामुळे झोपायला थोडासा उशीरच झाला . त्यामुळे सकाळी चांगलाच उशिरा उठलो . परिक्रमेत प्रथमच इतक्या उशिरा उठलो असेन . सगळे आटोपून निघायला साडेनऊ वाजले. झपाझप चालू लागलो . आजूबाजूला सर्व डोंगराळ परिसर च होता . पावसाळ्यामध्ये हा सर्व परिसर हिरवागार असतो .
पावसाळ्यामध्ये हा परिसर काहीसा असा दिसतो
आत्ता हिरवेगार दिसणारे डोंगर प्रत्यक्षामध्ये वाळलेल्या गवताने पिवळे धमक पडले होते .
या भागात ताडाची बरीच झाडे मी पाहिली .
इथल्या घरांच्या कुंपणामध्ये देखील ताडाच्या झावळ्यांचा वापर केला जातो . आपल्यापैकी जे कोणी रामेश्वरम आणि कन्याकुमारीला जाऊन आले आहेत त्यांना ताडाच्या झावळ्यांची कुंपणे आठवत असतील पहा .
इथून बरेच अंतर चालल्यावर दुपारी गौतम तडवी नावाच्या एका आदिवासी सेवाधारीने मला अडविले आणि भोजन प्रसाद घेण्याकरिता घरी नेले ! कोणीतरी असे आपल्याला आडवावे असे भूक लागल्यावर फार वाटत असते ! नर्मदा मैया ला ते बरोबर कळते आणि ती कोणालातरी प्रेरणा देते ! हे काठी नावाचे गाव होते . या गावातील होळी जगप्रसिद्ध आहे . विशेषतः ही होळी तिच्या भव्य दिव्य आकारासाठी आणि उंचीसाठी प्रसिद्ध आहे . या गावच्या होळीची काठी सर्वात मोठी असते म्हणून गावाचे नाव काठी पडले आहे असे मला सांगण्यात आले . ही होळी देखील नुकतीच संपन्न झाली होती परंतु होळीची धग अजून शिल्लक होती त्यामुळे त्या होळीचे दर्शन आणि भस्म प्रसाद मला मिळाला .
गौतम तडवीकडे पहिल्यांदाच गरमागरम चुलीवरची ज्वारीची भाकरी आणि पालेभाजी खायला मिळाली . खप्परमाळला मी वाळलेली भाकरी खाल्ली होती . महाराष्ट्रात आल्यावर भाकरी मिळालीच पाहिजे असे ते समीकरण आहे ! माझी आजी नेहमी एक म्हण सांगायची . घरातून बाहेर पडताना नेहमी एक भाकरी खाऊन बाहेर पडावं . एक गिरनारी ।भरवसा भारी । अर्थात एकच भाकरी खाऊन तुम्ही बाहेर पडलात तरी त्याच्यावर तुम्ही दिवसभर भरवसा ठेवू शकता ! परिक्रमेतील प्रथम ज्वारीची भाकरी खाऊन थोडा वेळ गौतमशी गप्पा मारल्या आणि पुढे निघालो .
 गौतम तडवी काठी
याच माऊलीने भाकरी बडवली
गौतम ची तडवीची झोपडी . गाडीची पूजा करताना त्याची कन्या . गाडीवर याहा असे लिहिले आहे . याहा म्हणजे आई . याहा मोगा अर्थात देव मोगरा आई
गौतम पाडवीने माझ्या वहीमध्ये मारून दिलेला शिक्का .
 माँ नर्मदा सेवा निवास 
अन्नक्षेत्र काठी (गौतम पाडवी )
 तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार 
मोबाईल नंबर ९३०९४३४८६३
(मोबाईल क्रमांक सुद्धा देवनागरी लिपी मध्ये छापलेला पाहून मला खूप बरे वाटले ! परंतु तरीदेखील नंबर हा इंग्रजी शब्द घुसवलाच ! )
काठी या गावातील होळी प्रसिद्ध का आहे ? कारण इथे सर्वच मोठे मोठे असते . सजावट करून येणारे आदिवासी लोक मी प्रत्येक गावात पाहिले परंतु या गावातील लोकांचा सजावटीचा जो आकार आहे तेवढा मोठा आकार तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही ! दहा दहा पंधरा फूट उंचीची सजावट डोक्यावर केली जाते ! भोपळ्यांची संख्या देखील वाढते ! सजावट कलाकुसर देखील सुंदर असते ! इथल्या होळीला राजवाडी होळी असे देखील म्हणतात . इथली काठी खरच खूप मोठी असते . होळीचा आकार अजस्त्र असतो . होळीसाठी होणारी गर्दी देखील विक्रमी असते .
आपण काठीवरून चाललोच आहोत आणि नुकतीच होळी झालेली आहे तर थोडेफार त्या होळीचे दर्शन देखील घेऊयात ! 
काठीची होळी ज्या क्षणी पेटते तो क्षण ! आगीशी खेळणे हा आपल्या धर्माचा अविभाज्य भाग राहिलेला आहे . कारण मुळात आपण सर्व अग्नीचे उपासक आहोत .
काठी ची राजवाडी होळी . आगीशी इतके खेळूनही आजवर कधीही इथे कुठलीही दुर्घटना झालेली नाही .
ओघाने विषय निघाला आहे म्हणून सांगतो .मी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना लाईफ सेव्हर आणि फायर वॉर्डन अर्थात अग्निशमन आणि प्राण संरक्षण हे दोन्ही कोर्स पूर्ण केले होते . याचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते . त्यामुळे कंपनीच्या विविध इमारतींचे फायर ऑडिट करणे किंवा फायर मॉक ड्रिल करणे वगैरे कामे आम्ही करायचो . आमचे सर्वांचे एकत्र ट्रेनिंग चालू होते . केरळ मधून आलेला एक ख्रिस्त प्रभावित ट्रेनर आम्हाला हे सर्व शिकवत होता . शिकवता शिकवता त्याने सांगितले की भारतातल्या आगींचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मातील दिवे ,अगरबत्ती आणि कापूर हे आहेत . आणि त्याच्या या वाक्यावर सर्वांनी टाळ्या वाजवल्या होत्या . मला हे खटकले मी हात वर केला आणि बोलण्यासाठी उभा राहिलो . मी त्याला प्रश्न विचारला की आग विझवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी कुठल्या ते सांग . त्याने सांगितले पाणी आणि अलार्म . 
 मग जर अग्नि शामन शास्त्रामध्ये अग्नी विझविण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पाणी आणि घंटा अथवा अलार्म आहे तर हिंदू धर्मामध्ये देखील कुठल्याही देव्हाऱ्यामध्ये धूप आणि दीप प्रज्वलित करण्यापूर्वी कलश ,शंख आणि घंटा पूजणे अनिवार्य आहे. आपल्या देव्हाऱ्यामध्ये देखील आपण तेल वात , तुप वात , कापूर वगैरे अग्नी प्रज्वलित करतो परंतु तत्पूर्वी कलश पूजन , घंटापूजन आणि शंख पूजन करून हे सिद्ध करतो की आपल्याकडे अग्निशमन यंत्रणा सुसज्ज आहे . यातील एकही गोष्ट नसेल तर देवाची पूजा केली जात नाही याचा अर्थ दिवा पेटवला जात नाही . माझ्या या वाक्याबरोबर सर्वजण उठून टाळ्या वाजवू लागले ! कारण मनोमन कोणालाच त्या ट्रेनर चे हे वाक्य पटले नव्हते परंतु  त्यांच्याकडे शास्त्रीय उत्तर नसल्यामुळे आणि सर्वधर्मसमभावाचा किडा भुणभुण करत असल्यामुळे त्यांना टाळ्या वाजवाव्या लागल्या होत्या . यानंतर मी त्या ट्रेनरला विचारले की घरातील देव्हाऱ्यातील दिव्यामुळे आग लागली आहे अशा किती घटना तुला ज्ञात आहेत त्याची कृपया मला लेखी माहिती द्यावी . यावर तो निरुत्तर झाला . मी त्याला सांगितले की इथून पुढे अशी चुकीची माहिती ट्रेनिंग मध्ये कृपा करून शिकवू नये . उलट हिंदू धर्मामध्ये अग्निशमन यंत्रणा सहज कशी गोवलेली आहे हे मात्र तो शिकवू शकतो . त्याने देखील इथून पुढे हे उदाहरण देण्याचे मान्य केले . जाता जाता त्याला मी खोट्या प्लास्टिकच्या ख्रिसमस ट्री मध्ये लावलेल्या विद्युत दिव्यांच्या वायर्स लूज झाल्यामुळे स्पार्किंग होऊन कशा आगी लागू शकतात याची उदाहरणे दिली . आणि भारतातील आगींचे मुख्य कारण शॉर्टसर्किट हेच आहे हे त्याच्या मुखातून वदवून घेतले ! असो .
काठीच्या होळीची आग अजूनही धगधगत होती इतकी ती होळी मोठी असते . 
इथले भुते मोठे रेखीव असतात .पंचम जॉर्ज आणि व्हिक्टोरिया राणी यांचे छाप असलेले जुने चांदीचे रुपये वापरून केलेले दागिने त्यांच्या गळ्यामध्ये असतात .
डोक्यावर घातलेल्या टोप्यांचा आकार आणि कंबरेला अडकवलेले भोपळे यांची संख्या हळूहळू वाढू लागते . कमरेला एक विशिष्ट प्रकारचा झटका देत घुंगरांचा आणि भोपळ्यांचा सुरेख आवाज काढला जातो .
टोप्यांचा आकार हळूहळू मोठा होऊ लागतोच पण उंची देखील वाढू लागते !
गगनचुंबी उंचीच्या या टोप्या पाहणे मोठे मौजेचे असते ! इतकी मोठी टोपी घालून हे लोकं चालतात कसे देवमोगाच जाणे !
काठीच्या होळीची काठी किती उंच असते पहा !
काठीच्या राजेवाडी होळीचे पुन्हा एकदा दर्शन घेऊन पुढे जाऊयात . 
इथून थोडेसे अंतर पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक आश्रम होता . डाव्या हाताला लावलेली माय नर्मदा ही पाटी पाहून भरून आले . कारण आतापर्यंत नर्मदा मैया , नर्मदा माई हेच शब्द ऐकत होतो .परंतु माय हा अस्सल मराठी शब्द वाचायला मिळाला आणि खूप बरे वाटले !
चित्रामध्ये महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक एक दिसत आहे . उजवीकडे मागे इमारत दिसत आहे ते आदिवासी विद्यार्थ्यांचे शासकीय वस्तीगृह आहे .त्याच्या अलीकडेच आपला आश्रम आहे .
हे आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह आहे
हा आहे मोलगीचा आश्रम . विश्व हिंदू परिषदेचे कार्य करणारे भिलाशेठ म्हणून आहेत ते हा आश्रम चालवितात .
आश्रम साधाच परंतु नीटनेटका आहे .
तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस चालणारी परिक्रमा करणारे मूळचे यवतमाळ येथील ओंकार दास नामक तरुण साधू या आश्रमामध्ये त्यावेळी सेवा देत होते .
मी यांना भेटलो तेव्हा त्यांची दाढी आणि जटा इतक्या वाढलेल्या नव्हत्या. आश्रमाच्या पुढचे कुंपण देखील नव्हते . तसेच आश्रमाची एकच खोली बांधलेली होती आता दोन दिसताहेत .
या ही आश्रमाच्या बाहेर शूल पाणीच्या झाडीतून बाहेर पडेपर्यंतची अंतरे लिहिलेली आहेत . मी राहिलो तेव्हा ही अंतरे लिहिलेली नव्हती . इथे अन्नक्षेत्र असा एक शब्द लिहिलेला आपल्याला दिसेल . अन्नक्षेत्र किंवा ज्याला मराठीमध्ये अन्नछत्र असे म्हणतात इथे बना बनाया अर्थात तयार भोजन मिळते . सरावृत अथवा सदाव्रत असे जिथे लिहिलेले असते तिथे सदावर्त अर्थात भोजनासाठी लागणारा शिधा दिला जातो व आपल्याला करून खावे लागते . 
आज-काल बहुतेक आश्रमामध्ये तयार भोजन दिले जाते . फार क्वचित एखादा परिक्रमावासी असा असतो की जो तयार भोजन घेत नाही तर शिधा स्वीकारून स्वतः बनवून खातो . मला संपूर्ण परिक्रमेदरम्यान असे करणारे एक दोन लोकच भेटले . अन्न अजिबात न शिजवता खाणारा एक साधू देखील भेटला होता . तो कुठल्याही प्रकारचे एक मूठच धान्य भीक्षेत घ्यायचा . असे चार-पाच मुठी वेगळे वेगळे धान्य कमंडलू मध्ये नर्मदा जलात भिजत घालायचा . आणि साधारण धान्य फुगले किंवा मोड आले की जाता येता मूठमूठ खायचा . हे प्रकृतीसाठी अति उत्तम !  असो . 
इथे शुकलाल नावाचा एक स्थानिक भिल्ल परिक्रमावासी होता ज्याने १३ महिन्यांची परिक्रमा उचलली होती . ओंकार दास साधू नवीन नवीनच साधू जीवनामध्ये आलेला होता . अशावेळी त्याला भिलाशेठ सारखा मार्गदर्शक मिळाला ही फार मोठी गोष्ट आहे . भिलाशेठ हा जरी गृहस्थ असला तरी देखील त्याला अनेक वर्षांपासून नर्मदा परिक्रमावासींची सेवा करण्याचा दांडगा अनुभव आहे . मी असे अनुभवले की संपूर्ण नर्मदा खंडामध्ये कुठल्याही साधूला भिलाशेठचे नाव माहिती नाही असे सहसा होणार नाही . इथे येणाऱ्या तसेच काठाने चालणाऱ्या कुठल्याही साधू संतांची सेवा करण्याची संधी भिलाशेठ सोडत नाहीत . पुढे उत्तर तटावर मला दादू दयाल संप्रदायाचे एक मौनी बाबा भेटले होते . पूरणदास जी महाराज असे त्यांचे नांव होते . इस १५४४ ते १६०३ म्हणजे साधारण एकनाथ महाराजांच्या काळामध्ये होऊन गेलेले हे एक संत होते . यांना मानणारा एक साधू संप्रदाय आहे . या मौनी बाबांनी जगदीश मढी आश्रमामध्ये आपले सोळा वर्षाचे मौन सोडले होते . यांनी १८ वर्षाची कठीण परिक्रमा चालवली आहे . ते जिथे कुठे मुक्काम करतात तिथे एक मंदिर उभे करतात . आतापर्यंत त्यांनी अनेक मंदिरे उभी केली . एकलबारे ,जागेश्वर , जबलपूर , गौगच्छाघाट अशा ठिकाणी त्यांनी महादेवाची मंदिरे उभी केलेली आहेत . परंतु लाडवी या गावांमध्ये ते मुक्कामी असताना त्यांनी तत्काळ उभे केलेले तत्कालेश्वर महादेवाचे मंदिर मी स्वतः पाहिले आहे . या साधूंनी भिलाशेठ म्हणजे साक्षात संत असल्याचे मला सांगितले . कुठेही कोणीही परिक्रमा वासी अडचणीमध्ये असला की त्यासाठी सर्वप्रथम भिलाशेठ धावून जाणार हे नर्मदा खंडामध्ये सर्वांना माहिती आहे . ही केवळ ऐकीव माहिती नसून याची अनुभूती मी स्वतः नुकतीच घेतलेली देखील आहे . तो प्रसंग देखील अखेरीस सांगतो . परंतु तत्पूर्वी भिलाशेठ यांनी मदत केलेल्या अजून एका साधू ची माहिती सांगतो . गवाली नावाच्या गावामध्ये चातुर्मासासाठी राहिलेल्या हिरण्मयानंद नावाच्या एका बंगाली साधूंना रोज नावेतून शिधा पोहोचवण्याचे काम भिलाशेठ करत असत . पावसाळ्यामध्ये शूलपाणीच्या घनदाट अरण्यामध्ये साठलेल्या सरदार सरोवराच्या भयंकर पाण्यामधून छोट्या नावेने रोज जाणे ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो . या साधूंचे नियम कडक असल्यामुळे ते फक्त एक पेलाभर जेवण करायचे . मुठभर डाळ आणि मूठभर तांदूळ कमंडलू मध्ये ठेवून खाली पणतीला चार वाती लावायचे आणि गॅसच्या शेगडी सारखी ती पणती कमंडलू खाली ठेवून द्यायचे . नर्मदा जल भरल्यावर एक तासभर जप करायचे . तासाभरात मंद आचेवर खिचडी तयार व्हायची . तिचे भक्षण करून हे राहत असत . अशा रीतीने संपूर्ण नर्मदा खंडामध्ये कोणीही साधू असेल ज्याला काही मदत हवी आहे त्याच्या मदतीकरता आपल्या खिशाचा विचार न करणारा धावणारा कार्यकर्ता म्हणजे भिलाशेठ होय ! ओंकार दास साधू कडून मी भिलाशेठ यांच्या बद्दल खूप ऐकले होते त्यामुळे त्यांना भेटण्याची उत्कंठा लागली होती . परंतु आज काठी गावातील होळी असल्यामुळे त्यांच्या घरी पाहुण्यांचा प्रचंड राबता होता . ओंकार दास साधूने त्यांना फोन करून सांगितले की असा असा एक पुण्याचा परिक्रमावासी आपली भेट घेऊ इच्छितो तेव्हा तशामध्ये देखील वेळ काढून ते मला भेटण्यासाठी आले . आणि मला पुरेसा वेळ देऊन माझ्याशी भरपूर गप्पा मारून मग रात्री उशिरा ते घरी निघून गेले . हे एका खऱ्या कार्यकर्त्याचे लक्षण आहे . 
१०मार्च २०२४ रोजी नर्मदा खंडामध्ये कधीही घडत नाही अशी एक दुर्दैवी घटना मंडला परिक्षेत्रामध्ये घडली . महाराज पूर जवळ घाघा आश्रमातून सकाळी निघालेले मनमाड नाशिक येथील दांपत्य शालिनीताई आणि विश्वनाथराव अजसे यांना साल्हे दांडा या गावाकडे सडक मार्गाने जाताना दारू पिऊन आलेल्या एका मिनी ट्रक ड्रायव्हरने जोरदार धडक दिली . आणि त्यात दुर्दैवाने त्या माताराम चा जागेवरच मृत्यू झाला . विश्वनाथराव गंभीर जखमी झाले . ही घटना घडल्या बरोबर पोलिसांनी सर्वप्रथम भिलाशेटला फोन केला आणि या दोघांच्या कुटुंबीयांचा क्रमांक त्यांच्याकडून मिळविला . प्रत्येक परिक्रमावासीला भिलाशेठ लक्षात ठेवतात हे पोलिसांना देखील आता माहिती झालेले आहे . त्यामुळे ताबडतोब यांच्या दोन्ही मुलांना संपर्क करून पोलिसांनी बोलावून घेतले आणि पुढील कार्यवाही केली . नर्मदा खंडामध्ये अशा घटना अजिबात घडत नाहीत . ही पहिलीच दुर्दैवी घटना कानावर पडलेली आहे . त्यामुळे कृपया घाबरून जाऊ नये . परंतु सांगण्याचा मथितार्थ इतकाच की भिलाशेठ प्रत्येक परिक्रमावासीकडून त्याची सविस्तर माहिती त्यांच्या वहीमध्ये लिहून घेतात . त्याचा असा फायदा वेळोवेळी होतो . 
मी स्वतः नुकताच याचा अनुभव घेतला . माझ्याकडे फोन नाही हे माहिती झाल्यावर भिलाशेठ यांनी मला कुठल्यातरी मित्राचा संपर्क क्रमांक लिहून ठेवायला सांगितले . त्याप्रमाणे मी माझ्या एका मित्राचा क्रमांक तिथे लिहून ठेवला होता . २६ मार्च २०२४ रोजी भिलाशेठ यांचा माझ्या मित्राला फोन आला आणि त्यांनी माझा क्रमांक पाठवण्यास मित्राला सांगितले . मित्राने माझी परवानगी घेऊन त्यांना क्रमांक पाठवला . त्यांनी मला भाष करून सांगितले की पुण्यातील एक परिक्रमावासी रावेरखेडी जवळ बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडलेला आहे . तो काहीही बोलत नसून त्याचा किंवा त्याच्या नातेवाईकांचा शोध लावायचा आहे . त्याच्या खिशामध्ये ब्रह्मचैतन्य भक्त निवास हिंजेवाडी असे लिहिलेली चिट्ठी सापडली . या एका चिठ्ठी वरून सुमारे ३०-३५ ठिकाणी फोन लावत अखेरीस त्या मुलाचा तपास लावण्यात मला मैय्याच्या कृपेने यश आले ! सदर आश्रम अजून बांधून झालेला नव्हता . परंतु त्याला रिव्ह्यू देणाऱ्या एका गायकाच्या कॅसेट कंपनीच्या मालकाकडून गायकाचा क्रमांक मिळवून आश्रम चालविणाऱ्या ग्वाल्हेर स्थित काकांचा क्रमांक मिळवून सनावद येथील सरकारी रुग्णालयाबाहेरील मेडिकल वाल्याचा क्रमांक मिळवून ॲम्बुलन्स वाल्याचा क्रमांक मिळवून खरगोन च्या सरकारी दवाखान्या बाहेर मोबाईल शॉप चालवणाऱ्या माणसाचा क्रमांक मिळवून त्याद्वारे खरगोन सरकारी दवाखान्याचा क्रमांक मिळवून त्या परिक्रमावासी वर उपचार करणाऱ्या निवासी डॉक्टरांचा क्रमांक मिळविला ! आणि दरम्यान संन्यास घेण्याचे वेड डोक्यात घेतलेला हा तरुण आयसीयू मधून पळून देखील गेला ! परंतु योग्य वेळी पोलिसांना तो सापडला आणि पुन्हा एकदा या परिक्रमावासी सोबत चालणाऱ्या काही अन्य परिक्रमावासींचा क्रमांक मिळवून अशा बऱ्याच भानगडी करत अखेरीस सो*** ***डे नावाचा लोणंद सातारा येथील ,अतीशय हुशार ,इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेला , गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रहित असा हा परिक्रमावासी ,त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यामध्ये सुखरूपपणे दिला गेला ! तो सुखरूप पणे घरी पोहोचल्याचे त्याच्या जिवलग मित्राने मला कळविले आणि मगच मी आणि भिलाशेठने मोकळा श्वास घेतला ! अशी तळमळ असलेला भिलाशेठ सारखा एखादाच कार्यकर्ता असतो . याच प्रसंगामध्ये एक विपरीत अनुभव देखील मला आला .बिर्ला नावाच्या व्यक्तीने याला सर्वप्रथम एडमिट केले होते असे कळल्यावर त्याला मी फोन लावला असता त्यांनी मला विचारलं की हा तुमचा कोण लागतो ज्या करता तुम्ही इतकी तळमळ करत आहात ? मी सांगितले की तो नर्मदेला आई मानतो आणि मी देखील नर्मदा मैया म्हणतो म्हणजे आम्ही दोघे परिक्रमा वाशी भाऊ भाऊ आहोत ! शिवाय माझ्यावर दुर्दैवाने असा काही प्रसंग नर्मदे काठी आला असता तर समोरच्या व्यक्तीने काय केलेले मला आवडले असते तेच मी आता करत आहे .  आणि तसेही एका आई-वडिलांच्या दृष्टिकोनातून विचार करून पहा की त्यांचा तरुण तडफदार हुशार मुलगा जर असा कोणी पळवत असेल तर ते योग्य आहे काय ? 
विषय निघालाच आहे म्हणून या निमित्ताने एका गंभीर विषयावर थोडेसे भाष्य करतो . या संपूर्ण प्रकरणामध्ये मला असे लक्षात आले की अजून साधनेमध्ये तुलनेने कच्चेपणा असलेल्या तरुणांना भुलवून साधू बनवण्याची खुमखुमी काही नवसाधुंना ( ? ) असते .यांना साधू तरी कसे म्हणावे . हे तर आयता हक्काचा शिष्य , स्वयंपाकी , हरकाम्या मिळवण्याची संधी साधू पाहत असतात .  तरी अशा लोकांपासून सर्वांनीच सावध राहावे . योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप होत असतात त्यासाठी अट्टाहास करायची गरज नसते . तुम्हाला खायची इच्छा झाली आहे म्हणून झाडावरील कैरीचा अंबा होत नसतो . त्याला पाड आला की पिकलेला आंबा आपोआप गळून पडत असतो . तसेच साधू जीवनाचे देखील आहे . 
असाच पिकलेला आंबा म्हणजे मोलगीचे भिलाशेठ आहेत !
 शूलपाणेश्वराच्या झाडीतील मोलगी येथील भिला शेठ , त्यांचा भाचा , आणि ओंकार दास महाराजां समवेत प्रस्तुत लेखक . हा मोबाईल भिला शेठ यांचाच होता .
सर्वांच्या चेहऱ्यावरून ते किती दमलेले आहेत ते आपल्याला दिसत असेल तरीदेखील केवळ एक परिक्रमावासी आपली आठवण काढतो आहे हे जाणून स्वतः मला भेटायला येऊन मला इतका वेळ दिलात त्याबद्दल भिला शेठ तुमचे खूप खूप आभार !

नर्मदा खंड अशा अद्भुत नररत्नांची खाण आहे . इथले पाणी , इथले माती , इथली हवा यांचा गुणच वेगळा आहे . नर्मदा खंडाचा परिस स्पर्श झालेल्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहात नाही . नराचा नारायण करते ती नर्मदा ! वाल्याचा वाल्मिकी करते ती नर्मदा ! भोग्याचा योगी करते ती नर्मदा ! एका सर्वसामान्य भिल्लाचा , परिक्रमावासींसाठी आधारस्तंभ ठरलेला भिलाशेठ करते ती नर्मदा !  हर हर नर्मदे ! नर्मदे हर हर ! 





लेखांक अठ्ठयाऐंशी समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. “योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी आपोआप होत असतात त्यासाठी अट्टाहास करायची गरज नसते.”

    खरंय.
    घाई नडते.
    बहुतांशी देवळांमधे असलेले कासव हेच सांगत असते की,
    लांबचा पल्ला आहे सावकाश जा.
    _/\_

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर