लेखांक ८७ : धनाजे येथील होळी आणि मित्रांसोबत शूलपाणी झाडीत नर्मदा स्नान

टाकरखेडा आश्रमातून पाय हलत नव्हता . परंतु नर्मदा माता बोलावीत होती त्यामुळे आश्रमाची रजा घेतली आणि सर्वजण निघालो . परंतु दारातून बाहेर पडताच गाडी पंक्चर झाली आणि पुन्हा एकदा मी आणि चन्ने मामा आत स्वामींच्या समाधीपाशी जाऊन बसलो ! अखेरीस मुहूर्त लागला आणि आम्ही निघालो . या भागाचा भूगोल इतका विचित्र आहे की रस्ता चुकला तर तुम्ही या राज्यातून त्या राज्यात जाता . आमच्यापैकी अनिल गाडी चालवत होता आणि त्याचा अंदाज चुकल्यामुळे आम्ही खेतीया या मध्य प्रदेश मधल्या गावात जाऊन परत आलो . आम्ही सर्व मित्र एकत्र बसलो आहोत आणि मी गाडी चालवत नाही असे आयुष्यामध्ये पहिल्यांदाच घडत होते . कारण मला गाडी चालवण्याचा प्रचंड नाद असून कोणाच्याही बरोबर प्रवासामध्ये असलो आणि कोणाचीही कुठलीही गाडी असली तरी चालक मात्र नि:संशयपणे मीच असतो . माझ्या अनेक मित्रांच्या गाड्यांचे एकूण धावणे जेवढे झाले आहेत त्यातील त्यांच्यापेक्षा अधिक रनिंग मी केलेले आहे . उदाहरणार्थ वाल्हेकर आणि चन्ने मामा ! शहाद्यावरून धडगाव कडे जाताना अर्थात शूलपाणीची झाडी गाठताना खूप मोठे मोठे डोंगर पार करत गाडी धावते . राजू टेलर यांचे घर लहान असल्यामुळे धनाजे येथील आश्रमामध्ये माझ्या सर्व मित्रांनी राहावे असे ठरले. इथे अच्युतानंदन स्वामी परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी थांबले होते .स्वामीजी स्वतः सात वर्षाची जलहरी परिक्रमा करीत होते आणि त्या दरम्यानच इथे सेवेसाठी थांबलेले होते . सुभाष आप्पा पावरा नावाचा त्या गावचा सरपंच या संपूर्ण आश्रमाची व्यवस्था पाहतो . हा खासदार हीना गावित यांचा कार्यकर्ता आहे .स्वामींनी भरपेट भोजन प्रसाद बनवला व सर्वांना वाढला . माझ्या मित्रांसाठी आश्रम भोजन प्रसाद वगैरे सर्वच गोष्टी नवीन होत्या . आश्रमामध्ये अजूनही काही परिक्रमा वासी मुक्कामासाठी थांबलेले होते . आणि त्याच्यामध्ये अमर गिरी , राधेगिरी , प्रजापति पिता पुत्र यांचा देखील समावेश होता . हे सर्वजण मला ओळखत असल्यामुळे माझ्या मित्रांना आश्चर्य मिश्रित कौतुक वाटले . प्रत्यक्षामध्ये ही नर्मदा मातेची योजना होती ! माझ्या मित्रांना माझ्याबद्दल अभिमान वाटावा अशी परिस्थिती तिने मुद्दाम निर्माण केलेली होती ! भोजन प्रसाद झाल्यावर आम्ही सर्वजण मिळून आश्रमामध्ये बांधलेल्या दोन झोपड्यांमध्ये गप्पा मारत बसलो . आश्रमाची रचना अतिशय सुंदर रितीने केलेली होती . 
अंगणामध्ये भरपूर झाडे असल्यामुळे सावली होती . ठीक ठिकाणी बसण्यासाठी बाकडी ठेवली होती . बांबूचे तट्टे वापरून सुंदर कुटी बनवली होती . माझ्या मित्रमंडळींनी इथे भरपूर फोटोग्राफी केली ! 
एका प्रसन्न भावामुद्रेमध्ये जलहरी परिक्रमा करणाऱ्या विशाखापटणम येथील प्रजापती पिता-पुत्रांसोबत प्रस्तुत लेखक . दतवाडा येथील प्रबुद्धानंद स्वामींनी दिलेले नवीन वस्त्र मी परिधान केलेले आहे .

धनाजे आश्रमामध्ये पिता राजेश प्रजापती , पुत्र तनय प्रजापती आणि प्रस्तुत लेखक यांच्यासोबत सेल्फी काढताना अनिल पावटे .

 ह्याच त्या दोन कुटी जिथे परिक्रमावासींची निवासाची सोय केलेली आहे . मध्ये पत्र्याची पन्हाळ काढून पाणी जाण्याची सोय केलेली आहे . या चित्रामध्ये सर्वात डावीकडे पाठमोरे शामराव ढाणे उभे आहेत . त्यानंतर डावीकडून लुंगी घातलेले प्रशांत चन्ने,तनय प्रजापती ,राजेश प्रजापती , राधे गिरी , प्रस्तुत लेखक आणि बाळासाहेब वाल्हेकर .
डावीकडून क्रमशः श्री बाळासाहेब वाल्हेकर , प्रस्तुत लेखक ,राधे गिरी , राजेश प्रजापती , तनय प्रजापती , शामराव ढाणे , प्रशांतच चन्ने आणि अनिल पावटे .
वरील चित्रामध्ये डाव्या हाताला पिठाच्या गिरण्या झाकून ठेवलेल्या दिसत आहेत . 
या गिरण्यांचे वाटप खासदार हिनाताई गावित यांच्या हस्ते धडगाव किंवा आकरणी तालुक्यातील ५७ गावातील ५७ महिला बचत गटांना करण्यात आले होते . मध्यभागी गुलाबी वस्त्रामध्ये खासदार हिनाताई गावित . माजी जिल्हा परिषद सदस्य नीलिमा ताई सुभाष पावरा यांनी यासाठी पुढाकार घेतला होता . (संग्रहित छायाचित्र ) 
इथपर्यंत या परिक्रमा गटातील सर्वजण एकत्र होते.पुढे जलहरी परिक्रमा करीत असल्यामुळे प्रजापती पिता पुत्र दोघेच चालू लागले आणि राधेगिरी व अमर गिरी वगैरे विलग झाले .

मी यापूर्वी बिजासन , सेमलेट आणि बिलगाव ची होळी पाहिली होती . आज ती होळी धनाजे गावात होती ! त्यामुळे माझ्या मित्रांना पुन्हा एकदा सर्व आदिवासी परंपरा दाखवण्याचे भाग्य मला लाभले ! मी ताजे ताजे ज्ञान घेतलेले असल्यामुळे त्यांना माहिती सांगू शकत होतो . आश्रमा शेजारीच असलेल्या मोकळ्या मैदानावर होळीचा कार्यक्रम होता . आम्ही सर्वजण होळीचा कार्यक्रम बघण्यासाठी होळीच्या माळावर गेलो . हा कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक चालत येतात .पाठीवरती पिशवी बांधून त्यात खाण्यापण्याचे सामान कपडे वगैरे सोबत आणलेले असते. एका भव्य दिव्य मैदानामध्ये फुटभर खोलीचा गोल खड्डा करून त्यात होळी रचण्यात आली होती . मधोमध झाडाच्या झाडाचा बुंधा लावून त्यावर अतिशय उंच असा बांबू लावला होता . होळीची उंची प्रचंड होती . आणि ती अशा रीतीने रचण्यात आली होती की प्रज्वलित करता क्षणी एका क्षणात सर्व बाजूने पेट घेईल ! तसेच होळी पेटवल्या पेटवल्या त्यात अशा काही वनस्पती हेतूपुरस्सर लावल्या होत्या की ज्यातून प्रचंड प्रमाणात ठिणग्या उडायच्या ! हे दृश्य अत्यंत नयनरम्य असे होते ! एका क्षणात त्या होळीच्या ज्वाळा ऐंशी नव्वद फूट आकाशामध्ये झेपावल्या आणि सुंदर अशा ठिणग्यांची बरसात सुरू झाली !
होळीतून अशा प्रकारे ठिणग्या उडतात आणि मग जमलेले आदिवासी बांधव होळीच्या बाजूने सुंदर असे नृत्य करतात
या ठिणग्या फार उंच पर्यंत जातात . आणि होळी अतिशय कमी काळात जळून संपूर्ण नष्ट होते .
होळीची धग इतकी भयानक असते की तिच्या जवळपास देखील कोणी जाऊ शकत नाही .
होळी लावणारे आदिवासी बांधव ती इतक्या सुंदर पद्धतीने लावतात की जरा देखील धूर होत नाही .
या भागातील होळी कशी असते याची काही प्रतिनिधीक चित्रे आपल्या माहितीकरता जोडली आहेत .
या भागातील होळीचे वर्णन काय करावे !शब्द अपुरे आहेत !होळीचा सण साजरा करण्यासाठी गावातील परिसरातील झाडून सर्व माणसे आबालावृद्ध मैदानामध्ये जमलेले असतात . इथल्या प्रथेप्रमाणे सर्वांनी आकंठ मोहाची दारू पिलेली असते . ही दारू पिणाऱ्या लोकांनी सांगितले की इतर दारूपेक्षा या दारूची चव थोडीशी गोड असते . परंतु इतकी दारू पिलेली असूनही आणि झाडून सर्व स्त्री पुरुष एकत्र आलेले असूनही जरा देखील बिभत्स पणा न करता अखंड शांतपणे , शिस्तीने आणि एकाच तालात अक्षरशः ध्यानावस्थेमध्ये जाऊन सर्वजण झुलत ,नाचत असतात . त्यांच्या कमरेला बांधलेले भोपळे आणि घुंगरू यांचा आवाज सर्वत्र भरून उरलेला असतो . ढोलांचा धीर गंभीर आवाज वातावरणाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो . विशेषतः या आदिवासींचे पदलालित्य पाहण्यासारखे असते .एका तालात एका ठेक्यांमध्ये सर्वांचे पाय पडत असतात . स्त्री-पुरुष सर्वजण एकत्र एकमेकांच्या कमरेवर हात ठेवून नाचत असतात . परंतु कुठेही जरा देखील मर्यादा भंग होताना दिसत नाही . एक समाज म्हणून आपण भारतीय किती प्रगल्भ आहोत याचेच हे उत्तम उदाहरण आहे ! फिरणाऱ्या जुन्या जाणत्या आदिवासी लोकांकडे धनुष्यबाण ,फाल्या ,तलवार , काठी अशी शस्त्रे असल्यामुळे या जमावाला शिस्त लावण्यासाठी बाहेरच्या कुठल्या पोलीस फोर्स ची गरजच पडत नाही ! सर्व कार्यक्रम स्वयंशिस्तीने चालू असतो . सुभाष पावरा याने आमचे सर्वांचे अतिशय चांगले आदरातिथ्य केले . या समाजातील तुलनेने सधन असा तो मनुष्य आहे .त्याचा स्वतःचा पेट्रोल पंप देखील आहे . मैदाना शेजारील एका घरामध्ये पाहुण्यांची बसण्याची व्यवस्था केली होती . यावर्षी आम्हीच बाहेरचे होतो त्यामुळे आमचे सर्वांनी खूप चांगले आदरातिथ्य केले . मला होळीचा सण बघायचा आहे हे मी सांगितल्यावर स्वतः सुभाष पावरा मला घेऊन मैदानामध्ये आला . होळी पेटल्यावर काही क्षणातच तिच्या मधोमध रोवलेली ध्वज लावलेली बांबूची काठी खाली पडते . ती खाली पडू न देता वरच्या वरच झेलायची असते . आणि आम्ही चक्क ती झेलली ! ती खाली पडणे अपशकुनी मानले जाते . आदिवासी बांधवांचे गेर नामक नृत्य रात्रभर सुरू असते आणि होळी पहाटे पाच वाजता पेटते . आम्ही रात्रभर नृत्य पाहिले होते . आणि तासभर विश्रांती घेऊन पुन्हा एकदा मुख्य होळीचा कार्यक्रम पाहायला आलो होतो . ध्वज आणि बांबू झेलल्यावर मात्र अतिशय महत्त्वाचा विधी सुरू होतो . पाल किंवा पाल्या किंवा फाल्ल्या या शस्त्राने एकाच घावामध्ये हा बांबू छाटायचा असतो .समजा तुम्हाला असे वाटले की आपल्याला छाटायला जमणार नाही तर आपण आपली संधी सोडून द्यायची असते . गावचा कोतवाल एकेका व्यक्तीचे नाव पुकारतो आणि त्या व्यक्तीने पुढे जाऊन होळीला वंदन करून हातामध्ये फाल्या घेऊन एका घावामध्ये बांबू छाटायचा असतो . अर्धा मुर्दा छाटला गेलेला बांबू अपशकून मानला जातो . मला सर्वप्रथम त्यांनी बोलावले . त्यामुळे तुलनेने छोटा बांबू मला छाटायला मिळाला . नंतर मात्र बांबूचा आकार वाढत जातो तशी छाटायला लागणारी शक्ती आणि क्षमता अधिक लागते . माझ्या मित्रांना हे लोक बोलवत नव्हते कारण त्यांच्यामुळे अपशकुन होईल असे त्यांना वाटत होते . परंतु हे चारही मित्र जातिवंत ९६ कुळी मराठा असल्यामुळे त्यांना कुठल्याही जाडीचा बांबू सहज छाटता येणार याची मला खात्री होती . शेवटचा जाड बांबू जेव्हा आला तेव्हा दहा ते पंधरा लोकांनी न छाटता केवळ बांबूला नमस्कार करून फाल्या खाली ठेवला .परंतु माझ्या चारही मित्रांनी एक एक करून अतिशय सहज पणे तो प्रचंड जाडीचा बांबू एका घावात छाटला ! आदिवासी लोकांची चण लहान असते . त्यांच्यापुढे माझे सर्व मित्र चांगले धिप्पाड दिसत होते . हा विधी होईपर्यंत उजाडले होते . यानंतर कोंबडीचा बळी आणि नैवेद्याचा कार्यक्रम होता . तडफडणारी कोंबडी बघून मला वाईट वाटले . तमिळनाडूमध्ये वर्मक्कलै  नावाचे जे शास्त्र मी शिकलो आहे त्याच्यामध्ये प्राण्यांना हिप्नोटाईज किंवा शांत करता येते . इथे त्याचा वापर करता येतो का ते पाहूया असा मी विचार केला . कोंबडीला प्रेमाने कुरवाळले आणि तिच्या पाठीवरील दोन विवक्षित बिंदू दाबल्याबरोबर कोंबडी मूर्च्छा अवस्थेत गेली ! माझा तो प्रकार पाहून सगळे आदिवासी माझ्या भोवती गोळा झाले ! आणि पुन्हा एकदा करून दाखवायला गळ घालू लागले . मी कोंबडीला भानावर आणण्याचा बिंदू दाबल्याबरोबर कोंबडी जणू काही झालेच नव्हते अशा रीतीने इकडे तिकडे पाहू लागली . पुन्हा एकदा मी तिला शांत केले . इथे कोंबडीचा बळी देण्याची एक विकृत पद्धत आहे . विझत चाललेल्या होळीमध्ये जिवंत कोंबडीला फेकले जाते . होळीची धग इतकी असते की क्षणात कोंबडी पेट घेते ! तडफडू लागते आणि बघता बघता तिचा कोळसा होतो . परंतु यावेळी पहिल्यांदाच कोंबडी होळीमध्ये पडल्यावर शांत पडून राहिली .हे मला आदिवासी लोकांनीच सांगितले . मी त्यांच्यातल्या एकाला ते बिंदू शिकवून ठेवले . आणि इथून पुढे दरवर्षी जागृत अवस्थेतील प्राण्याचा बळी न देता सुप्त अवस्थेतील प्राण्याला होलिकार्पण करावे असे सुचवले . इथले आदिवासी लोक प्रचंड परंपरा पाळणारे असतात आणि त्याच्यामध्ये जराही बदल झालेला त्यांना चालत नाही .  परंतु हा बदल त्यांनी स्वीकारला हे मला आश्चर्यकारक वाटले . युट्युब वर तुम्हाला अशा रीतीने कोंबडीला हिप्नोटाइज करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ सापडतील . हे एक सर्वमान्य ,सर्वसामान्य शास्त्र आहे आणि यात कुठलाही चमत्कार नाही . असो .
नैवेद्य झाल्यावर तर्पण विधी असतो . एका छोट्याशा बाटलीमध्ये दारू भरलेली असते . बाटली सजवलेली असते . तिच्या तोंडावर बोट ठेवून थेंब थेंब दारू जमिनीला पाजायची असते . जमिनीमध्ये छोटासा खड्डा करून त्यात दारू टाकायची असते . त्यानंतर आदिवासी पुजारी तुम्हाला हरभऱ्याचे दाणे देतो ते जमिनीला वहायचे असतात . आणि नमस्कार करून झाला की अजून एक मानकरी बसलेला असतो तो तुम्हाला एका छोट्या ग्लासात दारू प्यायला देतो ! मी परिक्रमावासी असल्यामुळे त्यांनी मला दारू प्यायला दिली नाही इतकेच ! माझ्या सह माझ्या सर्व मित्रांनी ही पूजा केली . या प्रसंगाचा व्हिडिओ देखील मित्रांपैकी कोणीतरी चित्रित केला आहे तो सोबत जोडतो आहे .









हा सर्व विधी पाहिल्यावर आता आम्ही निघणार इतक्यात नटून थटून आलेली छोटी मोठी मुले संपूर्ण मैदानात दिसू लागली ! पांढऱ्या रंगाचे गोल चट्टेपट्टे संपूर्ण अंगावर त्यांनी काढले होते . बांबूच्या टोप्या घालून त्या रंगीबेरंगी कागदांनी सजवल्या होत्या . कमरेला घुंगरे भोपळे होते . हातात दिमड्या होत्या . (दिमडी हे एक गोलाकार चामड्याचे वाद्य असते ) . घुंगुर काठ्या नाचवत होते ! मुलांच्या आगमनाने त्या मैदानाला एक नवीन चैतन्य प्राप्त झाले ! रात्रभर त्या परिसराला आलेला गंभीरपणा एका क्षणात नाहीसा झाला ! माझ्या मित्रांनी त्या मुलांसोबत भरपूर फोटो काढून घेतले ! मुलांना देखील कोणीतरी बाहेरचे आपल्याला पाहायला आलेले आहे हे पाहून चेव चढत होता ! आपणही या दृश्यांचा आनंद घ्यावा ! 
 (संग्रहित छायाचित्र ) अशा रीतीने सुंदर रंगीबेरंगी दागिने घालून इथले तरुण व मुले सजतात .
कमरेला लावलेले भोपळे अतिशय सुंदर आवाज करतात ! हे भोपळे घालून होळी भोवती नाच केला जातो .
अंगावर काढलेले गोल बिबट्याची आठवण करून देतात . डोक्यावर उंचच उंच मोराच्या पिसांचा मुकुट घातलेला असतो . ढोलाचा धीर गंभीर आवाज घुमत असतो . हातातील दिमड्या आणि कंबरेची घुंगरे सुंदर नाद निर्माण करतात .
अलीकडच्या काळामध्ये नंदुरबार सातपुडा पर्वतरांगातील हा होलिकोत्सव पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनू लागला आहे . होळीसाठी मैदानावर उपस्थित लोकांची संख्या पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हा सण किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ! 
जमलेल्या मुलांसह सेल्फी घेण्याचा मोह बाळासाहेब वाल्हेकर यांना देखील आवरला नाही .
मुलांनी डोक्यावर घातलेल्या टोप्यांचे निरीक्षण करा ! प्रत्येकाची टोपी वेगळी असते ! प्रत्येक जण आपापले डोके लावून आपली टोपी अधिक उंच व अधिक आकर्षक कशी दिसेल याचा प्रयत्न करत असतो ! 
अनिल पावटे यांनी देखील या दिवशी खूप फोटो काढले !
प्रत्येक चित्र झूम करून पाहिल्यावर तुम्हाला सजावटीतील एक एक पैलू लक्षात येतील
हाच तो सेल्फी ! टोप्यांचे आणि काठ्यांचे किती सुंदर प्रकार आहेत पहा !
सजलेल्या मुलांसोबत प्रस्तुत लेखक आणि त्याचे मित्र . सोबत आदिवासी कार्यकर्ता . मुलाच्या हातातील तलवार पहा ! शस्त्र हा आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे ! 
श्री सुभाष आप्पा पावरा यांनी आम्हाला खूप प्रेम आणि सन्मान दिला ते या छायाचित्रांमध्ये सोबत दिसत आहेत .
श्री सुभाष पावरा यांच्यासमवेत प्रस्तुत लेखक
श्री सुभाष पावरा यांचे आदरातिथ्य आणि निरागस हास्य सदैव स्मरणात राहील !
नटलेल्या आदिवासी मुलांसोबत सेल्फी घेताना अनिल पावटे . सोबत श्री सुभाष पावरा आणि गावातील प्रमुख कार्यकर्ते . रात्रभर जागून कंटाळून आळस देणारा छोटासा मुलगा उजवीकडे दिसतो आहे !
 फाल्या हे कोयत्याच्या प्रजातीतले हत्यार हातामध्ये घेऊन सजलेल्या मुलांसोबत फोटो काढण्याचा मोह चन्ने मामांना सुद्धा आवरला नाही !मुलांच्या पायातली घुंगरे ,हातातल्या काठ्या , हातामध्ये घातलेले चांदीचे  अलंकार , गळ्यात बांधलेले रुमाल , आणि घातलेल्या साखळ्या , माळा ,अलंकार हे सर्वच पाहण्यासारखे आहे !
प्रत्येक माणसाकडे पहातच राहावे अशा प्रकारची सजावट त्याने केलेली असायची ! या भागातील प्रत्येक होळीमध्ये प्रत्येक माणसाने स्वतंत्र सजावट केलेली होती ! मानवी कल्पनाशक्तीला अंतच नाही हेच खरे ! 
अनिल ने देखील ढोल वादनाचा भरपूर आनंद घेतला ! त्याच्या शेजारी उभा प्रस्तुत लेखक . आणि गावातील सर्व बुत्यां सोबत आम्ही मित्रमंडळी . शामरावांच्या पलीकडे उभे असलेले आजोबा गावातील अतिशय प्रतिष्ठित व्यक्ती होते . 
काही फोटो पुन्हा पुन्हा टाकले आहेत असे आपल्याला वाटू शकेल परंतु हे सर्व फोटो स्वतंत्र आहेत आणि त्यात काही ना काही तरी वेगळे आपल्याला पाहायला मिळेल याची खात्री आहे म्हणून टाकले आहेत . सूर्योदय होता होता काढलेली ही सर्व छायाचित्रे आहेत .
एक एक चेहरा झूम करून पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की हे लोक रानावनात राहत असल्यामुळे किती भयानक दिसायचा प्रयत्न करतात ! हे सर्व अवतार मुळामध्ये हिंस्र प्राण्यांना घाबरवण्यासाठी केलेले आहेत . आता त्या पशूंपासूनचे भय फारसे शिल्लक राहिले नाही परंतु परंपरा शिल्लक आहे .


वादनामध्ये गुंग आदिवासी तरुण
भुत्या बनलेली लहान लहान मुले . सेल्फी काढायला लहान मुले सुद्धा तत्पर आहेत !
एकेक व्यक्ती झूम करून पहा ! 
पावरा आदिवासी बांधव गेर नृत्य करताना
होळीचे रंग !
आज-काल आदिवासी तरुण या पारंपारिक वेशासोबतच रंगीबेरंगी गॉगल आणि स्पोर्ट शूज घालू लागले आहेत . 
दोन काठ्या जमीनीत खोचून मध्ये देवता ठेवली आहे आणि तिला काचेच्या ग्लासात मोहाची दारू आणि अजून काही गोष्टींचा नैवेद्य दाखवला जात आहे . 
समोर दिसणाऱ्या काळया आगी मध्येच कोंबडीचा बळी दिला होता
पळसाची फुले पूजेचे पावित्र्य वाढवत आहेत

ही आपली माती ! हीच आपली संस्कृती !
सुभाष आप्पांचे सर्वांनी खूप आभार मानले . माझ्या मित्रांनी आश्रम चालविणाऱ्या सुभाष आप्पांना भरभरून देणग्या दिल्या . आणि होळीचा निरोप घेतला .
आता सर्वांना वेध लागले होते नर्मदा स्नानाचे ! सर्वांना घेऊन मी उदय नदीच्या नर्मदा संगमावर गेलो . इथे सरदार सरोवराचे पाणी उलटे आत शिरल्यामुळे प्रचंड पाण्याचा फुगवटा आहे . अतिशय खोल अशा या पाण्यामध्ये सर्वांनी बराच वेळ आनंदपूर्वक स्नान केले . त्यानिमित्ताने नर्मदे काठी चालण्याचा अनुभव सर्वांना घेता आला . इथे देखील चौघांनी यथेच्छ फोटोग्राफी केली ! मी त्रयस्थपणे या सर्व प्रकाराकडे पाहत होतो . जेव्हापासून माझे मित्र सोबत आले होते तेव्हापासून माझे नर्मदा मैय्याकडचे लक्ष जवळपास उडाले होते . इकडच्या तिकडच्या गप्पा , जुन्या आठवणी , हास्यविनोद , खेचाखेची हेच सर्व सुरू होते ! गंमत म्हणजे हे सर्व माझे अंतरंगी आणि आध्यात्मिक स्पर्श असलेले मित्र आहेत तरी देखील ही अवस्था ! म्हणूनच सर्वांना हात जोडून सांगतो मित्रांनो , की जोडीने परिक्रमा करत नसाल तर परिपूर्ण लाभ मिळण्यासाठी कृपया नर्मदा परिक्रमा एकट्यानेच करा ! सोबत कोणालाही घेऊ नका ! मैया सदैव आपल्या सोबत असतेच !
इथे एक केवट भेटला . तो बराच वेळ आमचे निरीक्षण करत होता . नंतर त्याला विचारले असता तो म्हणाला की मी मगरी गेल्या का ते पाहत होतो ! काल मी विशाल सोबत स्नान केले ती जागा इथून जवळच होती ! आणि तिथेच मगरींचा मुक्काम असतो असे मला त्या केवटाने सांगितले ! याचा अर्थ काल आम्ही दोघांनी मगरीं सोबत स्नान केले होते ! मी त्याला विचारले की मगर गेली कसे ओळखणार ? त्याने सांगितले की तुम्ही पाण्यामध्ये उतरले आहात . जर मगर असेल तर नक्की तुम्हाला खायला आली असती ! म्हणजे इथे मगरी आहेत हे सांगून आम्हाला सावध करण्याऐवजी मगरी आहेत का नाही ते पाहण्यासाठी आमचा जीव याने पणाला लावला होता ! हा प्रकार आठवून नंतर बराच वेळ सर्वजण हसत होतो ! 
या भागातील भव्य दिव्य नर्मदा पात्राचे दर्शन आपणही घ्या !
हाच तो केवट ज्याने आमच्या सहाय्याने मगरींचा तपास केला ! डावीकडून घनश्याम ढाणे ,अनिल पावटे , प्रशांत चन्ने, प्रस्तुत लेखक , केवट आणि बाळासाहेब वाल्हेकर . मागे दिसणारा नर्मदा मैया चा फुगवटा आहे . सर्वात दूर दिसणाऱ्या डोंगराच्या खाली मूळ पात्र आहे . 
इथे पाणी अतिशय खोल होते . सर्वांनी पोहण्याचा आनंद घेतला . परंतु परिक्रमावासींना पोहायला परवानगी नाही .त्यामुळे मी आपला शांतपणे पद्मासन घालून पाण्यावर पडून राहिलो ! मैयामध्ये असे पडून राहण्यातला आनंद काय वर्णावा ! आ हा हा !
प्रस्तुत लेखक आणि बाळासाहेब वाल्हेकर .मागे सर्वत्र दिसते आहे ती शुलपाणीची झाडीच आहे परंतु नावाला देखील एकही झाड शिल्लक नाही यावर आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे .
हा परिसर अतिशय निर्मनुष्य आणि शांत आहे . नर्मदा मैयाचे असे शांत , धीर गंभीर रूप पाहायला खूप छान वाटते .
नाव शूलपाणी ची झाडी आहे . आणि मागील डोंगरावर एकच झाड कसे बसे उभे आहे . भविष्यातील भारतातील वनांची अवस्था कशी होऊ शकते याची ही नांदी आहे . आपण वेळीच सावध होऊयात . आणि वनीकरण हातात घेऊयात .
आपल्याला जे काही फोटो पाहायला मिळत आहेत ती याच बाळासाहेब वाल्हेकर यांची कृपा आहे . त्यांचा क्रमांक मी झोळी वर लिहिलेला असल्यामुळे त्याच क्रमांकावर सर्व लोक फोटो पाठवायचे .
आमचे परममित्र इतिहासकार घनश्यामराव ढाणे
एक परिक्रमावासी!
या भागातून चालत परत येताना आम्ही वाटेत बरेच फोटो काढले ते देखील आपल्या करता सोबत जोडत आहे .
प्रस्तुत लेखक आणि प्रशांत चन्ने . शुलपाणीच्या जंगलातील झाडांची काय अवस्था आहे आणि झाडे नसल्यामुळे मातीची धूप कशी होत आहे हे कळावे म्हणून मुद्दाम येथे उभे राहून फोटो काढला .
वाटेत आडवा आलेला डोंगर चढताना प्रस्तुत लेखक चन्ने मामा आणि अनिल पावटे .
केवळ कल्पना करून पहा की याच डोंगरावर जर घनदाट झाडी असेल तर किती छान दिसेल !
आपण सर्वांनी मनावर घेतले तर हे करणे शक्य आहे .
केवळ एका झाडाने केलेला पालापाचोळा पहा . अशी अनेक झाडे लावली तर इथे पुन्हा एकदा सुपीक माती तयार होईल .
पावसाळ्यामध्ये जरी हे दृश्य स्वर्गीय दिसत असले तरी वर्षभर ते टिकणे आवश्यक आहे आणि शक्य देखील आहे . अजून फार उशीर झालेला नाही केवळ पन्नास वर्षेच गेलेली आहेत .
छायाचित्रांचा अतिरेक होत आहे त्याबद्दल क्षमस्व परंतु त्या निमित्ताने ही चित्रे संग्रहित होत आहेत म्हणून इथे टाकून ठेवत आहे . 
इथे उभे राहून आमची हीच चर्चा चालली होती की हे चित्र बदलण्यासाठी आपण काय काय करू शकतो . त्याची पहिली पायरी म्हणजे इथे असे उदासवाणे चित्र आहे याबाबत जनजागृती करणे ते या छायाचित्रांच्या निमित्ताने होत आहे .

आयटी क्षेत्रामध्ये एकत्र काम करताना माझे वरिष्ठ असलेल्या प्रशांत चन्ने यांनी एक सर्वर तयार केला होता . त्याला नर्मदा असे नाव दिले होते !
अभक्तांची मांदियाळी असलेल्या या क्षेत्रामध्ये आम्ही दोघेच थोडेसे समविचारी असल्यामुळे या  सर्व्हर बाबत फारसे कोणाला माहिती नव्हते आम्ही दोघेच त्याचा पुरेपूर वापर करायचो ! तेव्हा आम्ही स्वप्नातही अशी कल्पना केली नव्हती की आम्ही दोघे लवकरच असे कुठेतरी प्रत्यक्ष नर्मदा मातेच्या काठावर उभे असू किंवा भेटू ! 
बाळासाहेब वाल्हेकर देखील तरुणपणी साधू बनून भरपूर फिरलेले आहेत !
आमच्या वयामध्ये अंतर असले तरी आध्यात्मिक धारणा एक सारखीच असल्यामुळे मैत्रीचा पाया मजबूत आहे .
परंतु तरीही त्यांनी देखील कधी असा विचार केला नव्हता की मला भेटण्यासाठी त्यांना असे नर्मदेच्या काठावर कधीतरी यावे लागेल !नर्मदा मातेची लीलाच गमतीशीर आहे !
माझ्या सर्वच मित्रांना नर्मदा स्नानामुळे अत्यंत आनंद झाला होता ! विशेषतः माझी भेट होईल का नाही याची खरोखरीच शाश्वती त्यांना नव्हती त्यामुळे अगदी मी भेटलो नाही तर नर्मदा स्नान नक्की करायचे असे ठरवून ते सर्वजण आले होते .
आपल्या मित्राला तेही नर्मदा मातेच्या काठावर भेटून मित्राची छाती आनंदाने अभिमानाने फुगून न येईल तरच नवल !




या परिसरातले काही व्हिडिओ देखील पहा म्हणजे आपल्याला यथार्थ कल्पना येईल .





इथले स्नान वगैरे आटोपल्यावर आम्ही सर्वजण निघालो आणि धनाजे आश्रमातून बालभोग खाऊन स्वामींची रजा घेतली . निघताना सर्वांनी आश्रमाला भरघोस देणग्या दिल्या . मी येथूनच सर्वांचा निरोप घेतला आणि राजू टेलर यांच्याकडे आलो . माझी नर्मदा मैया आणि झोळी उचलली . राजू टेलर यांना दंडवत प्रणाम केला . आणि पुढील मार्गाकडे मार्गस्थ झालो ! इतका वेळ मित्रांच्या सहवासात घालवल्यावर पुन्हा एकदा एकट्याने चालताना खूप बरे वाटत होते ! गेले अडीच महिने एकट्यानेच चालत असल्यामुळे पुन्हा मूळ पदावर गाडी आली याचा आनंद झाला ! नर्मदा परिक्रमेचा मूलभूत नियम सर्वश्रेष्ठच आहे ! 
एक निरंजन , दो सुखी ! तीन मे खटपट , चार दुखी !
एक निरंजन !  
एकट्याने नर्मदा परिक्रमा करण्यात आला आनंद केवढा ?
हा पहा ! हा एवढा !!! 




लेखांक सत्याऐंशी समाप्त ( क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर