लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर
देव नदी नावाची परमपवित्र नदी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडते .तिच्या एका काठावर गुजरात तर दुसऱ्या काठावर महाराष्ट्र आहे . याच नदीच्या नर्मदा संगमावर शूलपाणेश्वराचे पुरातन मंदिर होते असे मला स्थानिकांनी सांगितले . हे गाव महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आहे . त्यामुळे मंदिराचे पुनर्वसन करावे लागणार हे लक्षात आल्यावर महाराष्ट्र सरकारने नवीन मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते . परंतु तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मंदिरासाठी जागा न दिल्यामुळे नरेंद्र मोदी यांनी हे मंदिर गुजरात मध्ये पळवले आणि गोरा कॉलनी या गावामध्ये भव्य दिव्य मंदिर पुनर्निर्माण करून दाखविले . नर्मदे काठचे हक्काचे एक अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र अशा रीतीने महाराष्ट्राने गमावले . आज सकाळपासून मी सुमारे ३५ किलोमीटर चाललो होतो . देव नदीचा सुखद सहवास डाव्या हाताला होता . महाराष्ट्राची भूमी सोडून पलीकडे जावे असे वाटतच नव्हते ! असे वाटायचे की हाच काठ पकडून थेट नर्मदा मैयाचा किनारा गाठावा ! परंतु देव नदी अतिशय खडतर मार्ग क्रमणा करत नर्मदार्पण होते . त्यामुळे अखेरीस तिला ओलांडलेच . आणि कणजी या गुजरात मधील पहिल्या गावामध्ये आलो !
महाराष्ट्रातील वडफळी ते गुजरात मधील लाल रंगाने अंकित कणजी या गावांमध्ये जाताना देव नदीच्या काठाने करावा लागणारा प्रवास या नकाशात आपल्याला दिसेल . पुढे देव नदीचा नर्मदा संगम देखील दिसत आहे . ( सौजन्य गुगल नकाशा . गुगल नकाशातील बहुतांश भारतीय नावे चुकीच्या प्रकारे लिहिलेली असतात . इंग्रजीतून लिप्यांतर केल्यामुळे या चुका होतात . रोमन लिपी ला तिच्या मर्यादा आहेत . किमान आपल्याला माहिती असलेली नावे आपण बदलत जावीत . तशी सुविधा उपलब्ध आहे . असो)
कणजी गावामध्ये येताच एका मोठ्या मोबाईल टॉवर ने स्वागत केले . गेल्या बऱ्याच दिवसात असा मोठा टॉवर कुठेच पाहिला नव्हता . मी मोबाईल सोबत नेलाच नव्हता त्यामुळे माझा काही प्रश्न नव्हता परंतु मुक्कामावर असलेले परिक्रमावासी रेंज नाही रेंज नाही असे रडताना मी नेहमी ऐकत असे . गुजरात राज्यामध्ये येताच पहिलीच खूण विकासाची ग्वाही देणारी दिसली तो म्हणजे हा मनोरा ! रस्त्यांचा दर्जा देखील अचानक कैक पटीने सुधारलेला जाणवला . मला तर काही ग्रामस्थांनी असे सांगितले की सीमेवरचे रस्ते आणि विकास कामे गुजरात सरकार अधिक प्राधान्याने चांगली आणि सर्वोत्तम करून ठेवते ज्यामुळे इतर राज्यातील लोकांना गुजरातचा हेवा वाटावा . नर्मदा मातेला साक्षी ठेवून सांगतो की हे सर्व गुजरातचे वर्णन जे काही आता इथून पुढे येणार आहे ते सर्व केवळ जे दिसले तेवढेच लिहिणार आहे . मी कुठल्याही एका व्यक्तीचा अथवा संस्थेचा प्रचारक किंवा प्रवक्ता नाही . परंतु प्रामाणिकपणे जे डोळ्यांना दिसते आहे ते नाकारण्याचा नतद्रष्टपणा देखील करणार नाही . अलीकडे आपल्याकडे एक नवीन टूम निघालेली आहे . इतर राज्यातील लोकांना किंवा इतर राज्यांना हिणवणे किंवा कमी लेखणे हे भूषणाचे मानले जाते . परंतु तसे करण्यातून कुठला हेतू साध्य होतो हे मला माहिती नाही . आपले असे आहे . जे आहे ते आहे . मग कोणाचेही असो .कसेही असो . तर पायांना त्रास देणारा खडे खुडे पसरलेला महाराष्ट्रातला रस्ता देवनदी ओलांडल्याबरोबर अतिशय सुरेख , स्वच्छ , सुंदर झाला . पायांना सुखदायक झाला . महाराष्ट्रातील कंत्राटदाराने कदाचित थोडेफार कमी पैसे खाल्ले असते तर त्याला देखील असाच रस्ता बनविता येणे शक्य होते . परंतु त्यात त्याचा दोष कमी आहे कारण त्याला रस्त्याचे काम मिळाल्यावर त्यातील एक मोठा हिस्सा वरती पाठवावा लागतो अशी व्यवस्था गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात कार्यरत आहे . रस्त्याची कामे घेणारे काही कंत्राटदार मित्र माझ्या परिचयाचे आहेत त्यामुळे मी सांगतो आहे त्यात तथ्य आहे . मी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये देखील राहिलेलो आहे . तिथे देखील दृष्ट लागावे असे रस्ते आहेत . मध्यप्रदेश तर त्याच्या रस्त्यांसाठी प्रसिद्ध आहेच . परंतु अलीकडे उत्तर प्रदेश आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये देखील अतिशय सुंदर रस्ते माझ्या पाहण्यात आले . देवभूमी उत्तराखंड इथले रस्ते तर अक्षरशः स्वर्गीय वाटावेत अशा दर्जाचे बनवण्यात आलेले आहेत . त्यामुळे स्वर्ग भूमी , देवभूमी अशी त्या राज्याची ओळख जरा देखील लांछनास्पद होणार नाही याची काळजी ते रस्ते घेतात . महाराष्ट्रामध्येच रस्त्यांच्या नावाने जरा वेगळा प्रकार आढळतो . रस्त्याची रुंदी जितकी कागदावर दाखवली आहे तितकी जमिनीवर असेलच याची खात्री देता येत नाही . एक फूट जरी रस्ता कमी केला तरी किलोमीटरच्या हिशोबाने टनावारी माल वाचवता येतो . 'साईड पट्ट्या ' नीटच केल्या पाहिजेत असे बंधन घालणारी यंत्रणा महाराष्ट्रात नाही . त्यामुळे परिक्रमे मध्ये जीव मुठीत धरून या 'साईड पट्टी 'वरून चालताना पायांचे प्रचंड हाल होतात . गुजरात मध्ये आल्याबरोबर सुंदर , रोड रोलर मारून सपाट केलेल्या खडे विरहित साईड पट्ट्या दिसू लागल्या .खड्डे विरहित रस्ता आणि खडे विरहित बाजू पट्टे पाहून फार बरे वाटले !
याच गावातील देव नदीवरील एका पुलाचे प्रातिनिधिक चित्र पहा ! डावीकडचा सिमेंट मध्ये पक्का केलेला रस्त्याचा किंवा पुलाचा भाग गुजरातच्या हद्दीतला आहे . उजवीकडे कच्चा राहिलेला व वाहून निघालेला भाग महाराष्ट्राच्या हद्दीतील आहे . मला मात्र देव नदीचा स्पर्श हवा होता व स्नानही करायचे होते . त्यामुळे . . .
देव नदीचे पात्र याच ठिकाणी मी ओलांडले . आपला महाराष्ट्र हिरवागार आणि सुजलाम सुफलाम आहे परंतु गुजरात मात्र उघडाबोडखा आहे हे तुम्हाला नकाशात पाहिल्यावर सुद्धा लगेच लक्षात येईल .
माझे स्वागत करणारा हाच तो मनोरा . मी बारावी शास्त्र शिकल्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड रेडिओ इंजिनिअरिंग नावाचा भारतातील पहिला इलेक्ट्रॉनिक्स चा कोर्स होता तो पूर्ण केलेला आहे . त्यामुळे अशा काही तांत्रिक बाबी दिसल्या की तिथे थांबून मी नीट निरीक्षण करायचो किंवा योग्य तंत्रज्ञांकडून माहिती घ्यायचो . हा रिलायन्स जिओचा टॉवर होता . 5G Ready होता .
महाराष्ट्रातल्या बहुतांश गावांना गुजरात मधील टॉवर्स ची रेंज येते .
हनुमान मंदिरासमोर टॉवर दिसतो आहे . मध्ये मैदान आहे आणि लाल चिन्हाने अंकित सांसूभाई तडवी यांचे घर आहे .
या कणजी गावाला लागून घनदाट असे शूलपाणेश्वर अभयारण्य आहे . लाल चिन्ह म्हणजे आपला आश्रम आहे .
याच गावात अजून एक परिक्रमा आश्रम आहे . परंतु कुलदीप ने सांगितल्यामुळे मी सांसूभाई तडवी यांच्याकडे आलो .
गुजरात मधल्या या जिल्ह्याचे नाव "नर्मदा" असेच असून नर्मदा जिल्ह्यातला देडियापाडा नावाचा हा तालुका आहे . किती भाग्यवान आहेत ते लोक जे सांगतात की आम्ही नर्मदा जिल्ह्यात राहतो !
या गावात सान्सुभाई साराभाई तडवी नावाचे रंग अवधूत महाराजांचे निस्सीम भक्त नर्मदा परिक्रमावासियांची मनोभावे सेवा करतात . यांची इथे ओळीने एक दोन घरे आहेत . त्यातील एक घर त्यांनी परिक्रमावासींसाठी राखीव ठेवले होते . श्री रंगा आश्रम नावाने परिक्रमावासींची सेवा करणारा आश्रम ते चालवितात . समोर मोहाची दोन मोठी झाडे होती . मैदानामध्ये मुले क्रिकेट खेळत होती . केवळ कटी वस्त्र गुंडाळलेले सान्सु भाई तडवी सामोरे आले आणि त्यांनी प्रेमाने स्वागत केले .सुंदर अशा झोपडीमध्ये आसन लावण्याची सूचना त्यांनी मला केली . इथे बाहेर बसण्यासाठी एक सारवलेला कट्टा केला होता . त्यावर बसून मी क्रिकेट खेळणारी मुले आणि मोहाची फुले वेचणारी बालके यांच्या लीला पाहू लागलो . मोहाच्या फुलांचा बहर सगळीकडे आलेला होता . ती वेचण्याचे काम घरातील सर्व लहान थोर मंडळी करतात . त्यासाठी शाळेला सुद्धा दांडी मारली जाते . तशाही या परिसरातील शाळा नावापुरत्याच आहेत . खरे शिक्षण मुलांना निसर्गच देत असतो . मोहाच्या फुलांना एक विशिष्ट मंद सुवास येतो . ही फुले सडवून त्याची दारू केली जाते . जी आबालवृद्ध सर्वजण पितात . होळीचा सण झाल्यावर पुढील महिनाभर हा वृक्ष फुले गाळतो .मोहाच्या झाडाची गंमत अशी आहे की या झाडाची लागवड करता येत नाही . सध्या जी काही झाडे आहेत ती फार पूर्वीपासून लावण्यात आलेली आहेत . परंतु मोहाचे नवीन झाड लावण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरलेले आहेत .ते झाड आपण होऊन उगवले तरच उगवते . मोहाची फुले वेचायचे काम भल्या पहाटे चालू होते .
घरातील सर्व मंडळी मोठ्या मोठ्या साड्या घेऊन किंवा टोपल्या घेऊन फुले वेचायचे काम करतात . ही फुले वाळवून साठवून ठेवली जातात . ही फुले त्या भागातील दुकानदार लोक विकत घेतात . आणि दारू बनवणारे लोक दुकानदाराकडून मोहाची फुले विकत घेतात . त्यासाठी भट्टी बनवून दारू गाळली जाते .
मोहाचे झाड हे अतिशय औषधी आहे आणि आयुर्वेदामध्ये त्याला महत्त्वाचे स्थान आहे . मोहाच्या फळांचे तेल काढले जाते . आदिवासी लोक स्वयंपाकामध्ये किंवा देवापुढे दिवा जळताना हेच तेल वापरतात . याला एक विचित्र वास येतो . परंतु नंतर तो सवयीचा होतो . मोहाच्या फळाला टोळी असे म्हणतात . मोहाची ताजी ताजी फुले खाल्ल्यावर खूप छान लागतात . एकदा फुले गळून पडायला लागली की अक्षरशः खाली पाय ठेवायला जागा उरणार नाही इतकी फुले पडतात .
(सर्व छायाचित्रे सौजन्य विकिपीडिया )
सान्सुभाई तडवी यांचा मुलगा विनोद हा अतिशय हुशार आणि वडिलांसारखाच पराकोटीचा सज्जन मनुष्य आहे . वडील तर साक्षात संत आहेत . श्रीरंग अवधूत महाराजांची शिकवण त्यांच्या रक्तारक्तात भिनलेली आहे . या परिसरातील आदिवासी समाजामध्ये सहज आणि उपजत पणे आढळणारा आक्रमकपणा किंवा थोडासा तापट स्वभाव यांचा लवलेशही मला या दोघांच्या वागण्यात जाणवला नाही . नुकतेच हे लिखाण सुरू केल्यावर विनोद कडून काही फोटो प्राप्त झाले ते आपल्यासाठी खाली जोडत आहे . विनोद तडवी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असून गावामध्ये शाखा सुद्धा लावतो .
डावीकडून मुक्कामासाठी आलेले परिक्रमावासी , विनोद , त्याची पत्नी , मुलगा , वडील सान्सुभाई तडवी आणि मातोश्री .
घराच्या जमिनीवर केलेले सुंदर नक्षीकाम आणि कोरीव खांब व त्यावरील रंगकाम हे सर्व प्रत्येक आदिवासी घरामध्ये पाहायला मिळते ! इथून पुढे गुजराती पद्धतीच्या साड्या नेसायला सुरुवात होते .
नुकतेच तडवी कुटुंबीयांनी घराच्या मागे असलेल्या जागेमध्ये एका नवीन परिक्रमावासी आश्रमाचे बांधकाम सुरू केलेले आहे . या बांधकामाची काही छायाचित्रे विनोद भाई यांनी मला पाठवली ती आपल्यासाठी जोडत आहे .
या आदिवासी कुटुंबाचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे तरी देखील हे लोक नर्मदा परिक्रमा वाशी यांसाठी प्रचंड सेवा कार्य करतात . एकही परिक्रमावासी यांच्या गावातून उपाशी जाऊ देत नाहीत . घरातील चार लोकांचा स्वयंपाक करून थकणाऱ्या शहरी स्त्रिया कुठे आणि अचानक भोजनासाठी येऊ घातलेल्या ४० अनोळखी लोकांचा स्वयंपाक करणारी एखादी आदिवासी स्त्री कुठे ! एखाद दिवशी हे करणे ठीक आहे परंतु रोजच अशा प्रकारचे सेवा कार्य स्वीकारणे ही काही साधी गोष्ट नाही मित्रांनो ! पडवी यांच्या घरामध्ये चालू असलेल्या अन्नदानाचा एक व्हिडिओ विनोद भाई ने मला पाठवला तो आपल्यासाठी सोबत जोडत आहे .
आपल्याला देखील या सेवा कार्यामध्ये सहभागी व्हायचे असेल तर कृपया विनोद तडवी याच्याशी संपर्क साधावा ही विनंती . विनोदाचा पत्ता व क्रमांक खालील प्रमाणे आहे .
श्री विनोद सान्सुभाई तडवी
श्री रंग आश्रम कणजी , पोस्ट डुमखल तालुका डेडियापाडा, जिल्हा नर्मदा , गुजराथ
संपर्क : ९६३८३७९७५७
At kanji po.dumkhal. ta . dediya pada dist.narmda . Sri. ranga ashram kanji po.9638379757
अधिक मोठ्या अक्षरात दिसावे म्हणून झूम केलेले चित्र . शुलपाणीच्या झाडीमध्ये विषम परिस्थितीत सेवा देणाऱ्या या सर्व आदिवासी बांधवांना आपण खंबीर आधार दिला पाहिजे असे फार वाटते .
(कृपया दान केल्यानंतर त्याची माहिती जर कळवली तर ती ब्लॉग वर टाकलेल्या यादीवर अपडेट करता येते . हेतू इतकाच की इतरांना ते पाहून प्रेरणा मिळावी व कुठे अधिक गरज आहे त्याची माहिती मिळावी)
मी माझी पूजा वगैरे आटोपून घेतली आणि बाहेर येऊन खेळणाऱ्या मुलांच्या बाललीला पाहू लागलो . दहा वर्षाच्या आतील या मुलांनी मला हसवून हसवून अक्षरशः लोळवले ! आपल्या मर्कटलीला कोणीतरी पाहत आहे हे पाहिल्यावर त्यांना जोर चढत होता . माझ्या अक्षरशः पोटात दुखायला लागले इतके त्या मुलांनी हसवले . आदिवासी मुले मुळात निर्भय असतात . त्यामुळे त्यांचे खेळ अतिशय बिनधास्त आणि धांगडधिंग्याचे होते . यांना पडण्याचे ,लागण्याचे भय नसते . आपल्याला कोणी काय म्हणेल याची देखील चिंता फिकीर ते करत नाहीत ! सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग ! याची बाधा त्यांना झालेली नसते त्यामुळे कुठल्याही खेळाचा आनंद लहान मुले घेऊ शकतात ! विजयातही आनंद ! पराजयातही आनंद !कारण विजय पराजय महत्त्वाचा नाहीच !त्यांच्या खिजगणतीत देखील हे काही नाही . मुख्य गाभा आहे आनंद मिळवणे ! शेवटी विनोदने या मुलांना पळवून लावले . यानंतर विनोद आणि मी बराच वेळ बोलत होतो . विनोदने मला या भागात सुरू असलेल्या विविध सेवा कार्यांची रीतसर माहिती दिली . या भागात काय काय आव्हाने आहेत हे देखील त्याने उदाहरणासह सांगितले . आदिवासी समाजामध्ये विशेषतः तडवी लोकांमध्ये धर्मांतरणाचे पेव अलीकडे फुटले आहे . महाराष्ट्रातील तडवी समाज इस्लाम धर्माकडे आकृष्ट झालेला आहे . गुजरात मध्ये ख्रिस्तीकरण जोरात आहे . या लोकांनी परधर्म स्वीकारला तरी आदिवासी परंपरा सोडलेल्या नाहीत . त्यामुळे अजून थोडेसे प्रयत्न केल्यावर ते मूळ धर्माकडे परत येऊ शकतात . परंतु थोड्याच वर्षांमध्ये हळूहळू त्यांच्या आदिवासी परंपरा सुटत जाणार हे निश्चित आहे .
मुळात आदिवासी हे इतर भारतीय लोकांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत अशी चुकीची संकल्पना त्यांच्या डोक्यात बसविण्याचा प्रयत्न अनेक शक्ती गेली अनेक दशके करत आहेत . असेच वातावरण राहिले तर नक्षलवादाला पोषक अशी मनोभूमिका इथल्या लोकांची बऱ्यापैकी आधीच तयार झालेली आहे तिला खत पाणी मिळेल आणि भारताला अजून एक अंतर्गत शत्रू निर्माण होईल हे निश्चित आहे . या लोकांना फार काही मोठ्या अपेक्षा नाहीत . त्यांना त्यांच्या रितीरिवाजांचे पालन करून सुखेनैव जगू देणे इतकेच सरकारला करायचे आहे . जंगलाला हे लोक देव मानतात . अगदी मोहाच्या झाडाला सुद्धा देव मानतात . प्रत्येक गोष्टीमध्ये देव पाहण्याची ही अतिशय परमपवित्र अशी संस्कृती आहे .
भारतामध्ये कुठेही गेलात तरी थोड्याफार फरकाने सर्वत्र हीच संस्कृती आढळते . भाषा बदलतात परिभाषा बदलतात परंतु संस्कार बदलत नाहीत . इथे शूल पाणीच्या झाडीमध्ये काय काय महत्वाची कामे करणे गरजेचे आहे यावर माझे आणि विनोद चे भरपूर चर्चा केल्यावर एकमत झाले . इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे निर्वनीकरणाचा . सरकारी धेंडांना हाताशी धरून काही स्वार्थी व्यापारी लोकांनी इथली लाकडे विकत घेण्याची टेंडर्स जिंकली आणि अक्षरशः दहा ते वीस वर्षांमध्ये सगळे डोंगर उघडे बोडके करून टाकले . जी झाडे उगवण्यासाठी निसर्गाला शेकडो वर्षे लागतात ती काही वर्षातच पूर्णपणे भादरली गेली . या भागाचे फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की इथे झाडे नावाचे पदार्थ शिल्लक नाहीत . मी गेले आठवडाभर या भागाचे जे काही निरीक्षण करत होतो त्यातून माझ्या असे लक्षात आले की या भागाचे पुनर्वनीकरण शक्य आहे . याबाबतीत माझा थोडासा अभ्यास आहे जो मी विनोदला देखील सांगितला आणि तोच आपल्याकरताखाली मांडतो . कुठे ना कुठे नक्की कामाला येईल .माझ्या दक्षिण भारतातील तमिळनाडू येथील वास्तव्यामध्ये मी आणि माझे एक मित्र , प्राध्यापक पांडियन दोघांनी मिळून तमिळनाडू मधून नामशेष होत चाललेल्या ताडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता . सुरुवातीला बीज गोळे बनवणे असा उपक्रम मी एकट्यानेच चालू केला . नंतर मला कळाले की पांडियन देखील त्याच्या पातळीवर हेच करत आहे . मग दोघांनी एकत्र येऊन हळूहळू काम सुरू केले . त्याला इतका भरघोस प्रतिसाद मिळाला की लवकरच त्याला एका जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले . मी आणि माझा सहा वर्षाचा मुलगा आम्ही दोघांनी मिळून केवळ साडेदहा हजार ताडाची झाडे लावली यावरून तुम्ही आमच्या कामाचा आवाका लक्षात घ्यावा . एकूण लावलेला झाडांची गणती करता येणे अशक्य आहे .
ताडाचे झाड आम्ही का निवडले याचे कारण म्हणजे तो तमिळनाडूचा राज्य वृक्ष आहे . शिवाय त्याला पाणी फार कमी लागते आणि त्याचा उगवण्याचा दर चांगला आहे . १०० बियांपैकी ९५ नक्की उगवतात . या झाडाची पूर्ण वाढ व्हायला चाळीस वर्षे लागतात . सध्या शेतकरी लोकांकडे इतका संयम नसल्यामुळे आहे तीच झाडे शंभर दोनशे रुपयाला लाकडासाठी तोडायला द्यायची पद्धत इथे सुरू झाली . त्यातून या झाडाची फार मोठ्या प्रमाणात कत्तल झाली . याला अजून एक धर्मांतरणाचा देखील कंगोरा आहे . ताडाच्या झाडावर चढणारी पणै एडी नाडार नावाची एक जमात तिथे आहे . पणै मरम म्हणजे ताडाचे झाड. या लोकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केल्यामुळे त्यांना चर्च कडून आयते पैसे मिळू लागले आणि त्यामुळे त्यांनी ताडाच्या झाडावर चढणे सोडून दिले . त्यामुळे देखील या झाडाचे मिळणारे लाभ कमी होऊ लागले आणि लोकांनी झाडे तोडणे पसंत गेले . सुदैवाने ताडाची हीच झाडे या भागात देखील चांगली उगवत आहेत असे माझ्या लक्षात आले . या झाडाचे प्रत्येक भाग कामाला येतात . तमिळ साहित्य जगात सर्वात जुने मानले जाते कारण ते ताडाच्या पानावर लिहिले गेले आणि ताडपत्री चे आयुष्य २००० पेक्षा अधिक वर्षे असते . कागदाला इतके आयुर्मान नसते . याची निरा तर औषधी आहेच परंतु याच्या निरे पासून गुळ तयार केला जातो तो देखील खूप पौष्टिक आणि त्यामुळेच महाग आहे .तमिळनाडूमध्ये याला करपट्टी असे म्हणतात. प्रत्येक गोष्ट उपयुक्त असणारा हा एक कल्पवृक्ष आहे . शिवाय यावर पक्षी घरटी करतात त्यामुळे पक्षांच्या विष्ठेतून होणारा बीज प्रसार वाढतो . या झाडाची सावली फारशी पडत नसल्यामुळे आजूबाजूला झाडे उगवतात . आणि त्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळतो . असेच काहीतरी कार्य या भागात सुरू करता येणे शक्य आहे असे मला वाटते .जिज्ञासूंसाठी आम्ही आधी केलेल्या कामाचे काही फोटो सोबत जोडत आहे .विनोदला त्याच्या मोबाईलवर मी हे सर्व दाखवले कारण याचा एक ब्लॉग मी करून ठेवला होता . तो इथे कामाला आला . आपल्याला ही शेवटी याची लिंक देऊन ठेवतो .
सुरुवातीला दिवस-रात्र मी हे गोळे वळत बसायचो नंतर मात्र मी सायकलवर चालणारे एक यंत्र बनवले याच्या सहाय्याने हे गोळे फार पटपट बनू लागले .
बीज गोळे बनवणे हा देखील नंतर मुलांचा आवडता छंद बनून गेला ! नुसत्या बिया टाकल्या तर किडा मुंगी त्या बिया काजू बदाम खाल्ल्याप्रमाणे खाऊन टाकतात . म्हणून शेण आणि मातीमध्ये कालवून त्याचे गोळे करावे म्हणजे किड्यांना ते खाता येत नाहीत .
स्थानिक शेतकरी आम्हाला खूप मदत करायचे . सुरुवातीला ते आमच्याकडे संशयाने पाहायचे परंतु आमचा शुद्ध हेतू लक्षात आल्यावर त्यांनी आम्हाला थंडगार पाणीच काय घरचे गरमागरम जेवण आणून द्यायला सुद्धा सुरुवात केली !
तमिळनाडूतल्या अनेक शाळा आमच्या कामांमध्ये सामील झाल्या ! त्या आम्हाला विद्यार्थी शिक्षक गाड्या इत्यादी सर्व काही पुरवू लागल्या .
अक्षरशः शेकडोंच्या संख्येने स्थानिक आदिवासी आणि ग्रामस्थ वृक्ष लागवडी मध्ये सहभागी होऊ लागले आणि मोठ्या मोठ्या जेवणावेळी झडू लागल्या !
ज्या माडकुलम नावाच्या तलावामध्ये उभा राहून आम्ही हा फोटो काढला आहे त्याच तलावात सुमारे नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच पाणी साठले !
तमिळ मध्ये माडु म्हणजे गाय . प्रथमच पाणी साठल्यामुळे या तलावामध्ये आंघोळीसाठी गाय बैल येऊ लागले ! मुळात गाई बैलांच्या अंघोळीसाठी हा तलाव चोलराजांनी बांधला होता . त्याचे पुनरुज्जीवन आमच्या वृक्ष लागवडीमुळे च झाले असा ग्रामस्थांचा ठाम समज झाला .
आज आम्ही लावलेली सर्व झाडे उत्तम पैकी वाढलेली आहेत . तिथे जाऊन पाहायची गरज नाही कारण गुगल नकाशा वर ती दिसू लागली आहेत !
होय ! आमचे चिरंजीव सुद्धा घरण्याच्या परंपरेनुसार पट्टीचे पोहणारे आहेत आणि उपजतच पाण्यावर झोपायला शिकलेले आहेत !
इकडे डावरा किंवा पावरा अशी आदिवासी जमात आहे तशी तिकडे देवर नावाची जमात आहे . या जमातीतील आमच्या मदती करता आलेल्या स्वयंस्फूर्त माता भगिनी !
तमिळनाडूमध्ये चोळ राजाने बांधलेले पुरातन बंधारे आहेत .त्याच्या उतारावर आम्ही ताडाची झाडे लावायचो ज्यामुळे ते बंधारे मजबूत व्हायचे . आणि त्यातून झिरपणारे पाणी अडून साठू लागायचे .
विसर्जनाच्या दोनच दिवस आधी तलावाची पातळी अचानक वाढली आणि विसर्जन करण्यापुरते पाणी आम्हाला मिळाले ! या बिया पुढे योग्य वेळी उगवल्या असणार .
विविध महाविद्यालय शाळा येथे जाऊन मी आणि पांडियन यांनी लोकजागृती केली आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे अनेक गट आम्हाला सामील झाले .
आपण जर कार्य आरंभले तर समाज प्रतिसाद देतो असा माझा तमिळनाडू मधील कार्याचा अनुभव आहे . भाषा प्रांत जात-पात संस्कृती याचा कुठलाही अडसर मला या कामांमध्ये आला नाही .
आहे आणि अत्यावश्यक आहे .
समर्थ रामदास स्वामी म्हणतात ,
वन्ही तो चेतवावा रे ।
चेतविताची चेततो ।
प्रयत्नु जाणिजे तैसा ।
वाढविताची वाढतो ॥
वृक्ष लागवड , वनीकरण ,पुनर्वनीकरण
या विषयाची ज्यांना आवड आहे अशा लोकांनी त्यावेळी मी बनवलेला एक छोटासा ब्लॉग अवश्य पहावा .
Seedballsproject.blogspot.com
असो .
तर महाराष्ट्रातील वन प्रदेशात जी काही झाडांची बेसुमार कत्तल झालेली आहे तशी आता हळूहळू या भागांमध्ये सुरू झालेली होती . या भागातील थोडीफार झाडे शिल्लक दिसतात ती लवकरच नष्ट होऊन इथले डोंगर सुद्धा महाराष्ट्रासारखेच उघडे बोडके होण्याची शक्यता आहे हे मी विनोदला सांगितल्यावर त्याने देखील तसे इथे देखील सुरू झाल्याचे मान्य केले . आणि यावर काहीतरी करूयात असे त्याचे मत पडले .
( दिनेश फोदला पावरा देखील या कामासाठी एका पायावर तयार झालेला आहे . नुकतीच तो पुण्याला आल्यावर मी त्याची भेट घेतली होती आणि या विषयावर आमची चर्चा झाली .)
निर्वनीकरण कसे होते हे लक्षात येण्यासाठी माथासर नजीकच्या गावातीलच हा फोटो पहावा . शेतीसाठी असा डोंगर साफ केल्यावर हळूहळू जंगल मागे मागे सरकू लागते .
शून्यातून मार्ग निर्माण करताना देखील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते . त्या प्रमाणात झाडांची पुनर लागवड केली नाही तरी देखील निर्वनीकरण सुरू होते . शूलपाणीच्या झाडीमध्ये रस्ते तयार करण्याचे काम सुरू असल्यामुळे अशा प्रकारचे दृश्य तुम्हाला अनेक ठिकाणी दिसते .
असो .
रात्री आमटी भात खाल्ला आणि सान्सु भाई यांच्याबरोबर सत्संग घडला . इथून पुढे गुजरात प्रांतामध्ये तुम्हाला रंग अवधूत महाराज उर्फ बापजी यांचे अनेक शिष्य आढळतात . इतके दिवस बाबाजी किंवा महाराज अशी जी संबोधने आम्ही ऐकत चाललो होतो त्याचे गुजरात मध्ये आल्यावर रूपांतरण दादाजी ,दद्दाजी किंवा बापूजी मध्ये होऊन जाते . बापूजी बापजी एकच .
अतिशय विषम परिस्थितीमध्ये देखील केवळ धर्माची सेवा आणि गुरु आज्ञे चे पालन म्हणून सान्सूभाई हे सेवा कार्य चालवत आहेत .हे अतिशय गौरवास्पद आहे . धर्मांतरण कशामुळे होते लक्षात घ्या मित्रांनो . जर सेवा कार्य करणाऱ्या आदिवासी माणसाच्या पाठीशी बहुसंख्य समाज उभा राहतो हे लक्षात आले तर कोणीही धर्मांतरण करणारच नाही उलट सर्वजण सेवा कार्य करू लागतील . प्रत्यक्षामध्ये इथे असे होते की सेवा कार्य करणारी माणसे अधिक गरीब होत जातात आणि अन्य धर्म स्वीकारणाऱ्या माणसांना मात्र त्या त्या धार्मिक स्थळावरून काही पैसा नित्य नियमाने मिळू लागतो ज्यामुळे लोकांना त्यांचे जीवन अधिक सुरळीत आणि सोपे वाटू लागते . या भागातील धर्महानी रोखणे अशा रीतीने आपल्या हातात आहे . आपण मौजमस्ती चित्रपट आउटिंग यावर जो काही पैसा खर्च करतो त्यातील काही टक्के जरी रक्कम अशा गरीब आदिवासी लोकांना सेवा कार्याकरिता दान करता आली तर त्यांना दहा हत्तींचे बळ लाभणार आहे ! विचार करा मित्रांनो ...
पहाटे लवकर उठून सर्व आटोपून मी या सज्जन कुटुंबाचा निरोप घेतला .आता मात्र मी नदीच्या पातळीवरून पुन्हा एकदा उंचच उंच डोंगराच्या पातळीवर चढू लागलो होतो . त्यामुळे अखंड जंगल आणि अखंड चढ लागला . मला विनोदने जंगलातील चटकट सांगितला होता . परंतु नेहमीप्रमाणे कुठल्यातरी गोष्टीचे निरीक्षण करत चालताना मी पुन्हा एकदा भटकलो आणि अतिशय बेकार अशा जंगलामध्ये खूप वेळ फिरलो ! परंतु त्यामुळे जिथे माणूस कधीच जात नाही अशा अनेक जागा मला पाहायला मिळाल्या आणि तिथे असलेले विविध प्रकारचे दगड विविध प्रकारच्या वनस्पती आणि विविध प्रकारचे पशुपक्षी कीटक आदि मला पाहायला मिळाले ! शिवाय अशाच एका चुकीच्या टोकावर पोहोचल्यावर मला नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन झाले !
उजवीकडच्या खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र आणि गुजरातची सीमारेखा दिसेल . तिथे कणजी गाव आहे . तिथून खाल ,सुरपाण वगैरे गावे पार करत संपूर्ण डोंगररांगा चालत चालत माथासर गाव गाठावे लागते .
सुरपाण हे गावाचे नाव बहुतेक शूलपाणेश्वर वरून पडले असावे . या भागातील जंगल चांगले होते आणि प्रचंड खडकाळ डोंगर होते . डोंगरामधील खडक हे स्फटिकाकृती अथवा काटकोनात कापल्यासारखे चौकोनी होते . अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर क्यूआर कोड सारखे होते ! त्याचे कपचे पायाला टोचायचे . इथल्या जंगलामध्ये मी जेव्हा फसलो तेव्हा दाट झाडीमुळे खाली वाकून चालावे लागले . हातपाय दोन्ही बऱ्यापैकी फाटून निघाले . परंतु परिक्रमेमध्ये झालेल्या जखमा लगेच बऱ्या होतात . कारण रक्ताभिसरण सुधारलेले असते . आणि रक्तातील शर्करा सतत जळत असते .
हे जंगल संपूच नये असे वाटत होते ! कारण इथे हवा खूप चांगली होती . नर्मदे वरून येणारे वारे वासावरून लगेच जाणवत होते ! शेजारीच ती आहे याची कल्पना देत होते !
अलीकडे इथले डोंगर देखील महाराष्ट्रासारखे उघडे बोडके पडू लागलेले आहेत . पशूंसाठी चारा निर्माण करणाऱ्या मूरघास , हत्तीघास , हायड्रोपोनिक्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या लोकांनी इथे येऊन इथल्या पशुपालकांना नवीन खाद्य तंत्र शिकवली तर यांचे डोंगरावर उगवणाऱ्या गवतावरील अवलंबित्व कमी होऊन जाईल असे वाटते .
एक मोठी टेकडी उतरून अचानक एका खिंडीपाशी आलो . एका ओढ्याला लागून कच्ची पायवाट उजवीकडे खाली गेली होती . मला या पायवाटेचे विनाकारण आकर्षण वाटू लागले . मी तिथेच काही काळ थांबून राहिलो . थोड्यावेळाने एक आदिवासी डोंगरावरून आला आणि त्याने मला त्या वाटेची माहिती सांगितली . हीच पायवाट जुन्या शूलपाणेश्वराच्या मंदिराला जायची ! या वाटेवरून कुठले कुठले संत महात्मे गेले असेल कल्पना करून पहा ! अगदी मार्कंडेय मुनींपासून ते २० -३० वर्षांपूर्वी पर्यंत होऊन गेलेल्या अनेक दृष्ट्या युगपुरुषांचे पाय या पायवाटेवरून गेलेले होते ! इथून जुने मंदिर चार किलोमीटर आत होते . आणि आता ते जलमग्न झालेले आहे त्यामुळे दर्शन होत नाही . क्षणभर वाटले की आपण आत मध्ये जाऊन दर्शन घेऊन यावे . परंतु आदिवासीने मला ते धोकादायक असल्याचे सांगितले . ही वाट गेली अनेक वर्षे बंद झालेली असल्यामुळे आणि मध्ये काही गुहा वगैरे असल्यामुळे हिंस्र श्वापदांचे वसती स्थान झालेली आहे . इथे आत मध्ये एक बंगाली साधू चातुर्मासाकरता राहिले होते . स्वामी हिरण्मयानंद असे त्यांचे नाव होते . यांना मोलगीचे भिलाशेठ नावेने शिधा आणून द्यायचे .शिधा म्हणजे तांदूळ डाळ आणि तेल. एका निरांजनाला चार वाती लावून त्या ते प्रज्वलित करत असत आणि त्यावर चार दगड ठेवून कमंडलू ठेवून देत . त्यात नर्मदा जल टाकून एक मूठ तांदूळ एक मूठ डाळ टाकून देत . आणि भजन करत बसत . बरोबर एक तास झाला की खिचडी तयार होत असे . त्यावरच त्यांनी चातुर्मास काढला . असे लोक आजही आहेत यावर विश्वास ठेवण्यास नर्मदाखंड तुम्हाला भाग पाडतो ! या पायवाटेला मी साष्टांग नमस्कार केला . तिथल्या धुळीमध्ये लोळण घेतली .
संत पाऊले साजिरी । गंगा आली आम्हावरी ।
जेथे उडे रजधुळी ।तेथे करावी अंघोळी ॥
असे तुकोबारायांचे वचन सार्थच आहे .
खिंड ओलांडून पुढे निघालो . आता पुन्हा जंगलाचा मार्ग चालू झाला . खाली एका रस्त्याचे काम चालू आहे असे दिसत होते . झरवानी ते माथासर रस्ता बनवण्याचे काम सरकारने हातात घेतले होते .त्यासाठी आणलेली यंत्रसामुग्री धडा धडा आवाज करत जंगलातील शांततेचा भंग करत होती . थोड्यावेळाने माथा सर गाव लागले . गावातील लोकांनी दूर एका डोंगराकडे हात केला आणि तिथे असलेल्या नागा बाबाच्या आश्रमात जाऊन रहा असे मला सांगितले . रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मोठे मोठे दगड पसरण्यात आले होते . त्यावरून चालता येणे अशक्य होते . त्यामुळे मी जंगलातील मार्ग पत्करला . मोठा डोंगर चढून आल्यावर समोर एका झोपडीचे सुंदर असे दर्शन झाले ! शुद्ध मातीमध्ये बनविलेली सुंदर अशी ती झोपडी होती ! नर्मदे हर असा आवाज दिल्याबरोबर एक तरुण स्त्री बाहेर आली आणि तिथे मला झोपडीच्या आत मध्ये कप्पा करून बनवलेल्या एका खोलीमध्ये नेले . आसन लावण्याची सूचना करून ती भोजन प्रसादी बनविण्यासाठी निघून गेली . जेसलगिरि बाबा नाम धारण करणाऱ्या एका भिल्ल साधूंचा हा आश्रम होता . बाबांनी संन्यास घेतलेला असला तरी आपल्या पूर्वाश्रमीच्या कुटुंबीयांसोबत ते इथे राहत होते फक्त बाबांची राहण्याची कुटी वेगळी होती .आणि त्यांच्या घरातील लोक त्यांना परिक्रमावासींची सेवा करण्यामध्ये येथे खूपच मदत करत होते . उदाहरणार्थ आता त्यांची मुलगी स्वयंपाकाला लागली होती . पत्नी समोर असलेल्या टाकीमध्ये पाणी भरत होती . होय इथे खालील एका झऱ्याचे पाणी भरून टाकीमध्ये आणून ओतावे लागत होते . सरकार इथे बोरवेल मारून देणार आहे असे बाबाजींनी मला सांगितले . या आश्रमाचे काही फोटो गुगल नकाशावर सापडले ते आपल्या माहितीकरता जोडत आहे .ते पहावेत .म्हणजे आपल्याला या परिसराची आणि आश्रमाची कल्पना येईल .
हाच तो जैसलगिरी बाबा संचालित नित्यानंद आश्रम माथासर तालुका डेडियापाडा जिल्हा नर्मदा राज्य गुजरात
आश्रमाच्या आजूबाजूला प्रचंड झाडी आहे आणि कुठेही एकही घर नाही हे आपल्या लक्षात येईल . आता नकाशामध्ये जो रस्ता दिसतो आहे तो त्यावेळी निर्माण झालेला नव्हता तर त्याचे काम चालू होते .
लाल रंगाने दाखविलेला माथासर आश्रम आहे इथून नर्मदा मैया किती जवळ आहे हे आपल्याला नकाशा झूम आऊट केल्यावर लक्षात येते . माथा सर हा शेवटचा सर्वोच्च बिंदू आहे त्यानंतर सरदार सरोवर धरणापर्यंत सारा उतारच आहे .
शुलपाणेश्वर अभयारण्य आपण आता पार केले आहे हे तुम्हाला नकाशा पाहिल्यावर लक्षात येईल .
सुदैवाने येथे मला कुठल्या हिंस्र श्वापदाचा सामना करावा लागला नाही . मला ते दिसले नाहीत तरी त्यांना मी दिसलो असणार हे निश्चित आहे !
बडवाणी पासून इथे येईपर्यंत आपण किती अंतर तोडले हे आपल्याला वरील नकाशा पाहिल्यावर लक्षात येईल .खाली महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे शिरपूर शहादा दोंडाईचा ही महत्त्वाची शहरे दिसत आहेत . पांढऱ्या रंगाची तुटक सीमारेषा पहावी ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा डोक्यासारखा भाग स्पष्ट दिसेल .
नित्यानंद आश्रम नक्षत्र अशी पाटी देखील लावलेली दिसत आहे .
या भागामध्ये रस्ते व्हावेत की न व्हावेत या प्रश्नाचे उत्तर अजूनही मला मिळालेले नाही . इथे मुळात रस्तेच नव्हते तेव्हा देखील परिक्रमावासी जातच होते . परंतु रस्ता झाल्यामुळे आता कोणालाही इथेपर्यंत सहज पोहोचता येते . या रस्त्याने या भागात समृद्धी आली तर ठीक आहे परंतु या भागातील समृद्धी लुटण्यासाठी या रस्त्याचा वापर झाला तर मात्र ते अत्यंत दुर्दैवी ठरेल . उदाहरणार्थ या भागामध्ये वनीकरण करण्यासाठी ट्रक भरून झाडे आली तर रस्त्याचा नक्कीच वापर होईल .परंतु या भागातील लाकडे वाहून नेण्यासाठी रस्त्याचा वापर झाला तर हा रस्ता वरदान न ठरता शाप ठरेल . कुठल्याही गोष्टीचा वापर वरदान म्हणून करून घ्यायचा का शाप म्हणून करून घ्यायचा हे आपल्या हातात असते . इथल्या स्थानिक आदिवासी लोकांना हे रस्ते करणे फारसे भावलेले दिसत नाही . कारण वर्षानुवर्षे त्यांच्या जीवनशैलीमध्ये रस्ता नावाच्या प्रकाराला स्थानच नव्हते . बहुतांश लोकांकडे आजही कुठलेही वाहन नाही त्यामुळे ते त्यांच्या घरातून बाहेर कुठेतरी वाहन घेऊन जातील अशी शक्यता फार कमी आहे .उलट त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या मात्र आता वाढणार आहे आणि त्यांचा हेतू काय आहे आणि त्या हेतूची शुद्धता किती आहे यावर आता या रस्त्याचे सर्व भवितव्य अवलंबून राहणार आहे . जमिनींची खरेदी विक्री व्यवहार करणारे लोक इथे घुसले की इथल्या भूमिपुत्रांची वाट लागलीच म्हणून समजावे . देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची दलाली करणारे दलाल आणि जमिनीचे सौदे करणारे दलाल यांच्यामध्ये मला फारसा काही फरक वाटत नाही . कारण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला जसे आईचे स्थान दिलेले आहे तसेच भूमीला देखील माता मानले जाते . मुळात जमिनीची मालकी आपल्याकडे कधीच येऊ शकत नाही . काही काळापुरते एखाद्या जमिनीच्या तुकड्याचे पालकत्व तुम्ही निभावू शकता परंतु सर्वकाळ एखाद्या भूमीचे स्वामी तुम्ही झाले आहात असे होणे शक्य नाही कारण निसर्गच तुम्हाला तशी परवानगी देत नाही . त्यात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या भागात येणारे रस्ते गुजरात मधून इकडे येतात आणि गुजराती लोकांची सरासरी व्यापारी मनोवृत्ती लक्षात घेता या भागात पुढे स्थानिक भूमिपुत्र विरुद्ध उपरे असे द्वंद्व उभे राहण्याची अतिशय दाट शक्यता मला वाटते आहे . सरकारने लवकरात लवकर याच्या मध्ये लक्ष घालून इथल्या जमिनी बाहेरच्या लोकांना विकत घेता येणार नाहीत असा काहीतरी कायदा या संपूर्ण आदिवासी क्षेत्रापुरता करावा हेच उत्तम राहणार आहे . किमान स्थानिक लोकांनी आपापल्या ग्रामपातळीवर असे ठराव करून घ्यावेत अन्यथा जी अवस्था मुळशी वेल्हा भोर सासवड पुरंदर या पुण्यातल्या तालुक्यांची झालेली आहे तशी अवस्था तिकडे झाल्याशिवाय राहणार नाही . असो .
हाच तो अतिशय सुंदर असा नित्यानंद आश्रम . मागच्या बाजूला जो भराव घातलेला आहे तिथे देखील परिक्रमावाशांसाठी राहण्याची कुटी निर्माण करण्याचे काम मी गेलो तेव्हा सुरू झालेले होते .
नित्यानंद आश्रम माथा सर . घनघोर अरण्यामध्ये असे भगवे झेंडे फडकताना दिसले की मनाला जो काही आनंद होतो तो शब्दात वर्णन करता येण्यासारखा नाही .
या झोपडी मध्ये डाव्या बाजूला जेसलगरी बाबांचे कुटुंबीय राहतात आणि उजव्या बाजूला केलेल्या खोलीमध्ये परिक्रमावासी उतरतात .
मी या आश्रमामध्ये पोहोचलो तेव्हा हा रस्ता अस्तित्वात नव्हता तर केवळ जंगल सर्वत्र पसरलेले होते त्यामुळे हे चित्र पाहून मला वेगळेच काहीतरी वाटते आहे . अरण्यातील पायवाट्याने या आश्रमा पर्यंत तेव्हा यावे लागले होते . कालाय तस्मै नमः ।
भिल्ल संत महंत जैसलगिरी महाराज अतिशय निष्ठेने हा आश्रम चालवीत आहेत . साध्या जंगलात सापडणाऱ्या वनस्पती आणि मातीचा वापर करून हा सुंदर आश्रम उभा करण्यात आलेला आहे .
हा आश्रम वगळता आजूबाजूला कुठेही आश्रम किंवा विसावा स्थळ सुद्धा नाही . त्यामुळे प्रत्येक परिक्रमावासी किमान विश्रांतीसाठी तरी येथे थांबूनच पुढे जातात .
आश्रमाच्या भोवती बाबांनी सुंदर अशी छोटी बाग केलेली आहे आणि नर्मदा परिक्रमा मार्गाचा एक उपयुक्त नकाशा देखील इथे लावलेला आढळतो .
माझ्यासारख्या परिक्रमेची शून्य माहिती घेऊन निघालेल्या माणसांना अशा नकाशाचा अत्यंत फायदा होत असतो .
झोपडी आतून इतकी थंडगार आहे की काही विचारू नका ! मी देखील याच झोपडीमध्ये काही काळ शांतपणे पडलो होतो . स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत ही झोपडी , मैय्या आणि मी असे तिघेच इथे होतो खूप छान वाटले होते .
हे आहेत जेसलगिरी महाराज . पूर्वाश्रमीचे भिल्ल समाजातील एक सद्गृगृहस्थ . उंची पुरी सडसडीत अंगकाठी , तेजस्वी कृष्णवर्ण , आदिवासी लोकांमध्ये अभावाने आढळणारे धारदार सरळसोट नाक , शुभ्र पांढरी टोकदार दाढी , अंगावर परिधान केलेली भगवी वस्त्रे आणि आलेल्या परिक्रमावासींशी अतिशय प्रेमाने बोलण्याची पद्धत हे सारे कायमचे मनात कोरले गेले .
या आश्रमामध्ये सतत काही ना काही कार्यक्रम आयोजित केले जातात . अशाच एका कन्या पूजनाप्रसंगी घेतलेले संग्रहित छायाचित्र .
स्थानिक आदिवासी लोकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आश्रमामध्ये नेहमी केले जाते . जनसंपर्क हा जेसलगिरी बाबांचा प्राण आहे .
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता रममाण होतात .
कन्या पूजनाचे कार्यक्रम भारतात पुन्हा एकदा सर्वत्र सुरु व्हावेत असे वाटते . कारण त्यामुळे कन्या किती महत्त्वाच्या आहेत याचे महत्त्व त्यांच्या आई-वडिलांना पडते आणि कन्यांना देखील आपण पूज्य आहोत त्याज्य नाही हे लक्षात येते .
या आदिवासी विभागामध्ये जितके अधिक प्रमाणात धार्मिक कार्यक्रम होतील तितके या सर्वसामान्य भोळ्या भाबड्या लोकांचे परधर्माकडे आकर्षण कमी होत जाईल . धर्म परिवर्तन करणारी माणसे अशा गरीब बिचाऱ्या आदिवासी लोकांना अतिशय अल्प मोबदल्यामध्ये धर्म परिवर्तन करण्यासाठी प्रवृत्त करतात असे लक्षात येते .
अशावेळी सद्धर्माचा आधार घेऊन भगवी वस्त्रे धारण केलेल्या जैसलगिरी बाबांसारख्या महाराजांना आपण एक समाज म्हणून भरघोस पाठिंबा दिला पाहिजे ज्यामुळे या आदिवासी लोकांना लक्षात येईल की भगव्या वस्त्राचे मोल काय आहे .
या भागातील तरुण सुद्धा आश्रमाशी जोडले गेलेले आहेत . इथे आता रस्ता पोहोचल्यामुळे चांगल्या लोकांनी लवकरात लवकर इथे पोहोचणे आवश्यक आहे अन्यथा दुष्ट शक्ती इथे पोहोचण्यासाठी योग्य संधीची वाटच पाहत होत्या .
बाबांच्या कुटुंबीयांनी मला पोटभर जेवू घातले . सावलीमध्ये क्षणभर पडा असे सांगितले परंतु पडले की आळस वाढतो त्यामुळे मी उन्हामध्येच पुढे निघण्याचा निर्णय घेतला : शूलपाणीच्या झाडीचा हा शेवटचा टप्पा होता . आतापर्यंत जेवढे म्हणून डोंगर मी चढलो होतो ते सर्व डोंगर आज उतरणार होतो . ज्यांना डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याचा सराव आहे त्यांना माहितीच आहे की डोंगरावर चढण्यापेक्षा उतरणे अधिक कष्टदायक असते . पाठीवर असलेल्या प्रचंड ओझ्यामुळे तो सर्व दाब गुडघ्यांवर येऊन कुर्च्या चांगल्या दबल्या जातात . आणि गुडघे बोलू लागतात . परंतु थोडेसेच पुढे आल्यावर असे काही दृष्य दिसले की ज्याने भान हरपून गेले !
बाबांच्या कुटुंबीयांनी मला पोटभर जेवू घातले . सावलीमध्ये क्षणभर पडा असे सांगितले परंतु पडले की आळस वाढतो त्यामुळे मी उन्हामध्येच पुढे निघण्याचा निर्णय घेतला : शूलपाणीच्या झाडीचा हा शेवटचा टप्पा होता . आतापर्यंत जेवढे म्हणून डोंगर मी चढलो होतो ते सर्व डोंगर आज उतरणार होतो . ज्यांना डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याचा सराव आहे त्यांना माहितीच आहे की डोंगरावर चढण्यापेक्षा उतरणे अधिक कष्टदायक असते . पाठीवर असलेल्या प्रचंड ओझ्यामुळे तो सर्व दाब गुडघ्यांवर येऊन कुर्च्या चांगल्या दबल्या जातात . आणि गुडघे बोलू लागतात . परंतु थोडेसेच पुढे आल्यावर असे काही दृष्य दिसले की ज्याने भान हरपून गेले !
लेखांक नव्वद समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 प्रतिक्षेत आपल्या माईच्या
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाDandvat!!!!! Narmada maatela aani tumchya karyaala.
उत्तर द्याहटवाniyamit vachak ahe. atyant sundar pravahi lekhan.
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाNarmade Har!
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाvery nice
उत्तर द्याहटवा