लेखांक ९१ : सरदार सरोवराची भिंती आणि जगातील सर्वात भव्य दिव्य "ऐक्यमूर्ती " statue of unity

शूलपाणीच्या जंगलातून चालण्याचा आनंद मिळालेल्या आमच्या काळातील काही लोकांच्या परिक्रमा , या शेवटच्या परिक्रमा ठरल्या . कारण आता सगळीकडे डांबरी रस्ते झालेले आहेत .झाडीच्या प्रत्येक गावातून आता डांबरी सडकांचे बांधकाम पूर्ण झालेले आहे असे नकाशा पाहिल्यावर लक्षात येते . मी देखील माथासर येथून निघाल्यावर संपूर्ण जंगलातून चाललो . परंतु आता माथासर ते झरवानी पक्का रस्ता झालेला दिसतो आहे . जंगलातील वाटा तुडवत चालत होतो . आजूबाजूला झाडी असल्यामुळे फारसे काही दिसत नव्हते . अजूनही डोंगरांचे चढ-उतार सुरू होते . बरेच अंतर चालल्यावर डावीकडे एक कुटी वजा आश्रम दिसू लागला . इथे देखील अर्धा मुर्धा रस्ता खणून ठेवला होता याचा अर्थ इथून रस्ता जाणार हे लक्षात येत होते . हा गजानन महाराज आश्रम होता . इथे कोणीतरी मराठी संचालक भेटणार हे लक्षात आले आणि आनंद वाटला ! 


संत श्री गजानन महाराज आश्रम झरवानी


गुजराती लोक गजानन चा उल्लेख नेहेमी गजानंद असाच करतात !
आश्रम आता खूप छान झालेला दिसतो आहे
आम्ही गेलो तेव्हा असा साधा होता
इथे सर्व परिक्रमा वासी आवर्जून थांबतात

क्षणभर विश्रांती घेतात आणि मगच पुढे जातात
मी मात्र या पायऱ्यां पाशी बसून राहिलो होतो आणि चहा घेतल्यावर पुढे निघून गेलो

याही आश्रमामध्ये स्थानिक आदिवासी मुलांसाठी भरपूर उपक्रम आणि अन्नदान वगैरे चालते . रस्त्याचे काम सुरू असलेले मागे दिसत आहे .

गजानन महाराजांचे इथे अधिष्ठान असल्यामुळे मराठी परिक्रमाशींना खूप आनंद वाटतो . गजानन महाराजांच्या भक्तांची मोठी संख्या आपल्या महाराष्ट्रात असून गजानन विजय पोथी नित्य वाचणारे अनेक भक्त आहेत . 

आदिवासी बहुल भागात असूनही या आश्रमाशी स्थानिक आदिवासी जोडले गेले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि हेच आश्रमांचे अतिशय महत्त्वाचे असे कार्य आहे . 
या आश्रमामध्ये परिक्रमा पूर्ण झालेले एक जोडपे सेवेसाठी थांबले होते  . शिवाय एक वयस्कर आजोबा देखील हा आश्रम सांभाळत होते . यांनी मस्तपैकी चहा पाजला . इथे एक रामकृष्ण आश्रमाचा कानडी भाषाच बोलता येणारा परिक्रमावासी पोहोचला होता . माझे मित्र जेव्हा मला भेटायला आले होते तेव्हा वाटेमध्ये हा भटकताना मला दिसला होता . मला आणि माझा मित्र अनिल पावटेला कानडी भाषा येत असल्यामुळे आम्ही त्याला जाण्याचा योग्य मार्ग सांगितला होता . हा देखील इथे बसलेला सापडला . याचे नाव अशोक कुमार होते आणि हा मंगलोर येथील रामकृष्ण मठाचा शिष्य होता .
सेवाधारी आजोबा आणि परिक्रमावासी दांपत्य इथेच मुक्काम करण्याचा आग्रह करत होते परंतु अजून दिवस थोडासा बाकी होता आणि आता सर्व उतारच होता त्यामुळे पुढे चालावे असे ठरविले . इथून पुढे रस्त्याचे काम चालू आहे तसेच चालत जावे असे सर्वांनी मला सांगितले परंतु ते पायासाठी अत्यंत कष्टदायक होते कारण मोठे मोठे खडक फोडून सगळीकडे पसरण्यात आले होते आणि अक्षरशः पाय ठेवायला सुद्धा जागा शिल्लक नव्हती . झरवाणी पासून थेट धरणाच्या भिंतीवर जाणारा एक चटकट आहे असे मला विनोद तडवी ने सांगून ठेवले होते , ते माझ्या पक्के डोक्यात होते . अखेर थोडेसे डोंगर माथ्यावर आलो आणि समोरचे दृश्य पाहून भान हरपून गेले ! दूरवर सरदार वल्लभभाई पटेल यांची भव्य दिव्य मूर्ती अक्षरशः एखादा मनुष्य उभा आहे अशी दिसत होती ! हे अंतर १२ - १५ किलोमीटर पेक्षा जास्त असावे . तरीदेखील ती भव्य दिव्य मूर्ती दिसत होती ! थोडेसे पुढे गेल्यावर एक घर लागले तिथून चटकट कसा आहे ते पुन्हा एकदा समजून घेतले आणि कोणालाही न विचारता थेट घुसलो . इथे परिक्रमावासींना जायला स्थानिक ग्रामस्थांनी आघोषित बंदी केल्यासारखे आहे .कारण रस्ता कठीण असल्यामुळे आणि परिक्रमाशींना वाटेत काही झाल्यास ग्रामस्थांनाच धावपळ करावी लागत असल्यामुळे इथून कोणालाही ते जाऊ देत नाहीत . तर अतिशय लांब पडणाऱ्या सडक मार्गाने चालायला भाग पाडतात ! त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवत मी पटकन आत घुसलो आणि पळत सुटलो . तीव्र उतार सुरू झाला . खाली अतिशय घनदाट जंगल दिसत होते आणि त्याच्यामध्ये हा उतार शिरत होता . 

सोबतचे चित्र नीट पहा ! तुम्हाला नर्मदा मातेच्या पात्राच्या मधोमध सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसेल !

दिसत नसेल तर थोडे झूम करून पाहूया ! आता तुम्हाला लक्षात येईल की मूर्तीचा आकार किती मोठा आहे ! 
ही मध्ये दिसणारी सर्व जंगले आता मला पार करायची होती ! इथून मूर्ती जवळ आहे असे वाटते परंतु कितीही चालले तरी मूर्ती पाशी आपण पोहोचतच नाही इतकी ती भव्य दिव्य आहे ! 

याच डोंगरावरून सरदार सरोवर प्रकल्पाचे असे दर्शन होत होते ! दुर्दैवाने या मार्गाने परिक्रमावासींना कोणी जाऊ देत नसल्यामुळे हे भव्य दिव्य आणि सुंदर दर्शन पाहण्यापासून बहुतांश परिक्रमावासी वंचित राहतात . सदर चित्र पावसाळ्यातले असून ढगांची पातळी किती खाली आली आहे हे आपल्या लक्षात येईल .
इथे अतिशय घनदाट असे अरण्य सर्वत्र पसरलेले आहे . शूलपाणीची झाडी कशी असावी ? तर ही अशी असावी ! 
शेजारीच असलेले झरवाणी गाव असे उघडे बोडके होते
आदिवासींची तुंगाई माता नावाची देवी इथे आहे खाली मातीचे करून ठेवलेले बैल इथे जागोजागी ठेवलेले आढळतात .


 तुंगाई माता मंदीर हा या भागातील सर्वोच्च बिंदू आहे . इथून सर्वच परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते . 


इथून पुढे डोंगरातून वाहणारे अनेक ओढे नाले असून त्याच्यावर सुंदर असे धबधबे सुद्धा आहेत .
बिनधास्त उडी मारणारा आदिवासी मुलगा पहा !


दुपारच्या उन्हाचा दाह शमविण्यासाठी आदिवासी मुले इथे हमखास पोहताना आढळतात . माकडे बरी म्हणायची अशा सराईत पणे उड्या ही मुलं मारतात


वरील नकाशा मध्ये तुम्हाला धरणाची भिंत ऐक्यमूर्ती (statue of unity)आणि तुंगाई माता मंदिर या त्रिकोणाची कल्पना येईल . इथून पुढे मात्र अतिशय तीव्र उतार आहे आणि घनघोर अरण्य लागते .आपल्याला साधारण मूर्तीच्या जवळ बाहेर पडायचे आहे .

खाली उतरताना वाटेमध्ये एक दोन छोट्या वस्त्या लागल्या . परिक्रमा मार्गातील गुराढोरांना परिक्रमा वासींना पाहण्याची सवय असते त्यामुळे ते तुम्ही काठी घेऊन आलात तरी ती बिथरत नाहीत परंतु या भागातून एकही परिक्रमा वासी जात नसल्यामुळे मला बघितल्यावर जनावरे बिथरत आहेत असे माझ्या लक्षात आले . मोटा थवडीया नावाचे गाव मध्ये लागले . पुन्हा इथले लोक देखील मी रस्ता चुकलो आहे वगैरे मला सांगू लागले . परंतु विनोदने सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा नदी कुठे आहे पाहून त्या दिशेला जंगलामध्ये घुसलो ! आणि गायब झालो ! माझी अदृश्य होण्याची गती पाहता पाहणाऱ्या कुणाला तरी हा चमत्कार सुद्धा वाटू शकला असेल ! काही सांगता येत नाही ! परंतु मी इतकी घाई करत होतो कारण मला इथून कोणीतरी परत पाठवावे अशी माझी इच्छा नव्हती . दुसरा मार्ग फारच कंटाळवाणा आणि लांबचा होता हा मार्ग मात्र नर्मदा मैय्याचे दर्शन घेत घेत जाणार होता .

मी ज्या पायवाटाने जंगलात शिरलो ती रस्त्यासारखी मोठी होती आणि मला गुगल वर सापडली .


एका गावामध्ये मी शिरलो जिथून सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसत होती . तिथल्या एका तरुणाने माझे फोटो काढले . या चित्रात झोपडीच्या शेजारी हिरवे झाड आहे त्याच्या बाजूला लगेच काळी मूर्ती दिसत आहे पहा !


या चित्रामध्ये माझे बोट त्या मूर्तीच्या अधिक जवळ गेलेले आहे . 
वर्तुळामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती दिसत आहे .

कितीही चालले तरी त्या मूर्ती पासूनचे अंतर कमीच होत नव्हते ! ही मूर्ती नरेंद्र मोदी यांनी अलीकडे उभी केलेली आहे . आणि अशी एखादी मूर्ती किती दिशादर्शक असू शकते हे मला त्या दिवशी चालताना कळाले . तुम्ही वाट चुकूच शकत नाही कारण दिशा भटकली की लगेच मूर्ती शोधायची आणि त्या दिशेला चालायला लागायचे इतके सोपे गणित होते . भरमसाठ झाडी व्यापलेल्या या भागातून चालताना दरीमध्ये उतरले की मूर्ती गायब व्हायची . आणि डोंगर चढला की दिसू लागायची . इथे थवडिया नदीचे पात्र अतिशय मोठे आणि भयानक आहे . प्रचंड मोठा खडकांना कापत ही नदी इथे वाहते आहे . चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अतिशय जबरदस्त अशी ही जागा आहे . इथे काही ठिकाणी तर इतकी भयानक आहेत की तुम्हाला वरून खाली पहायची देखील भीती वाटते . एका खडकाळ दरीमध्ये असेच काहीतरी झाले . तिथे खाली पाण्याचा खोल डोह होता जिथे प्रचंड आरडाओरडा मला ऐकू येऊ लागला . जणूकाही चार-पाच जण मिळून एखाद्या माणसाला बुडवून मारत आहेत असा तो आवाज होता .मी त्या दिशेला निघालोच होतो इतक्यात एक वेगळाच प्रकार घडला . मी ज्या पायवाटेने वेगाने तिकडे निघालो होतो त्याच्यावरती एक दगड होता . पायवाटेला दोन शाखा फुटल्या होत्या . एक त्या दगडी दरीकडे चालली होती आणि एक जंगलाकडे चालली होती . माझा पाय नकळत त्या दगडावर पडला आणि मी वेगाने जंगलाकडे जाणाऱ्या पायवाटे वरती घसरलो . नुसता घसरलो नाही तर उतारामुळे चांगला दहा पंधरा फूट खाली गेलो . पुन्हा वर चढायचा प्रयत्न केला असता पुन्हा पुन्हा घसरलो . मग माझ्या लक्षात आले की मी तिथे जाऊ नये अशी मैयाची इच्छा आहे . वेळोवेळी अनेक साधूंनी मला सांगितलेले बोध स्मरले की नर्मदे काठी चालताना तिथे चाललेल्या घटनांमध्ये आपण स्वतः काही ढवळाढवळ करायला जाऊ नये .साक्षी भावाने पाहत पुढे निघावे . कारण या भागातील आदिवासी लोकांची एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे . एक समाज म्हणून अतिशय प्रगल्भ असा हा समुदाय आहे . एक साधे उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल . या भागातील आदिवासी समुदायांमध्ये अशी प्रथा आहे की कोणीही विवाहबाह्य संबंध ठेवायचे नाहीत . मग त्यावर दुसरी काही मात्रा नाही का ? तर तिथे असा नियम केलेला आहे की एखाद्या माणसाला अजून एखादी स्त्री आवडू लागली तर त्याने थेट तिच्याबरोबर विवाह करावा जो समाजामध्ये मान्य धरला जातो . शिवाय इथे विवाह केल्यावर दोन्ही पक्ष निम्मा निम्मा खर्च करतात . संपूर्ण घरामध्ये आणि गावामध्ये स्त्रियांचीच सत्ता चालते हे पाहता एकापेक्षा अधिक स्त्रिया करणारा पुरुष हा फारच महापुरुष समजला जातो . काही तीन स्त्रिया असलेले आदिवासी मी पाहिले तर काहींना सात स्त्रिया देखील होत्या . हे सर्वजण एकाच घरामध्ये गुण्यागोविंदाने राहतात . आपल्या शहरी मनाला कदाचित हा प्रकार पटणारा नाही परंतु लाखो वर्षांच्या उत्क्रांती नंतर या निर्णयाप्रत हा समाज आलेला आहे . हेतू हाच आहे की जे काही करायचे आहे ते उघड उघड करा . या नियमाला फाटा देत कोणी लपून-छपून काही प्रकरणे केली तर मात्र त्याला आदिवासी बांधवांच्या नियमानुसार कठोरातले कठोर शासन केले जाते . शिवाय मागे मी एकेक ठिकाणी सांगितले त्याप्रमाणे एकाच गावातील सर्व मुले मुली स्वतःला भावंडे मानतात . 

अशा पद्धतीने उघड उघड गळ्यात गळे घालून सुंदर असा नृत्याविष्कार करणारे तरुण-तरुणी तुम्हाला अनेक प्रसंगी दिसू शकतात आणि हे एक समाज म्हणून या भागातील आदिवासी लोकांनी जणु अनिवार्य केलेले आहे असे जाणवते. त्यामुळे लहानपणापासूनच इथल्या मुलांच्या मनामध्ये कुठलेही छुपे आकर्षण शिल्लक राहिलेले नसते आणि केवळ निखळ प्रेम सर्वत्र दिसते . शहरांमध्ये मात्र याच्या विपरीत दृश्य दिसते .(वरील नृत्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चैनल वर टाकलेला आहे तो सर्वांनी येथे पाहावा . ढोलाचा धीर गंभीर आवाज तुम्हाला मोहित करेल )

अशा प्रकारच्या शासन व्यवस्थेतून मी जात असल्यामुळे तिथे मध्ये पडून काही बोलण्याचा संबंधच नव्हता . त्यामुळे मैय्याने ढकलून दिलेल्या मार्गाने मी शांतपणे उतरत राहिलो आणि थोडे पुढे गेल्यावर नदीपात्रात उतरलो . तत्पूर्वी एका झोपडी मध्ये एका अत्यंत तरुण स्त्रीने मला सुंदर असा चहा करून पाजला . तिची एकंदर देह प्रकृती पाहता ती आदिवासी कुटुंबातील वाटत नव्हती . मी अधिक काही तपास न करता चहा पिऊन तिथून पुढे मार्गस्थ झालो . परंतु इतक्या जंगलामध्ये एकच झोपडी कुठून आली आणि त्यामध्ये इतर आदिवासींसारखी न दिसणारी धडधाकट बांध्याची ती तरुणी कुठून आली असा विचार मी बराच वेळ करत राहिलो . मला त्यावेळी त्या अमृतातुल्य चहाची खरोखर गरज होती हे मात्र खरे . असो .
नदीचे पात्र खडकांनी भरलेले होते . अनेक ठिकाणी उड्या मारत प्रस्तर उतरत खाली खाली निघालो होतो .

झरवाणी पासून मी जसा निघालो तसा बहुतांश काळ या नदीच्या काठाकाठानेच किंवा नदीपात्रातूनच मला चालावे लागत होते . सुदैवाने नदी जवळपास आटलेली होती त्यामुळे चालताना फारसा त्रास होत नव्हता .परंतु तरीदेखील पायाखाली असलेल्या दगडामुळे फार लक्षपूर्वक चालावे लागत होते . जितका मोठा दगड तितका तो अस्थिर असतो हे कायम लक्षात ठेवावे . या संपूर्ण टप्प्यामध्ये एकही मनुष्य मला कुठे दिसला नाही . या भागामध्ये जंगली श्वापदांचा प्रचंड वावर आहे याच्या खुणा जागोजागी दिसत होत्या . हिंस्र प्राण्यांची विष्ठा लगेच लक्षात येते . त्याच्यामध्ये हरणाचे भेकराचे सशाचे किंवा वानराचे वगैरे केस हाडे इत्यादी आढळतात . तसेच ती विष्ठा किती ओली आहे यावरून प्राणी किती जवळ आहे त्याचा देखील अंदाज बांधता येतो . अगदी नुकतीच विष्टा करून प्राणी गेला असेल तर त्यातून अक्षरशः उष्णता बाहेर पडताना जाणवते . थंडीच्या काळात वाफा दिसतात . अशावेळी मात्र फार सावधपणे चालावे लागते . कुठेही न थांबता सरळ आपल्या मार्गाने निघून जाणे हा सर्वोत्तम उपाय असतो कारण तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लपून बसलेल्या श्वापदाचे बारीक लक्ष असते . मी माझ्या आयुष्यभर केलेल्या भटकंतीमध्ये असे प्रसंग वारंवार अनुभवले आहेत की ज्यामध्ये हिंस्र वन्य श्वापद माझ्या अगदी जवळ असताना मी तिथून सटकलेलो आहे .
टेंबे स्वामी यांचे मूळ गाव माणगाव म्हणून कोकणात सावंतवाडी जवळ आहे .तिथे त्यांची ध्यानाची गुहा जंगलामध्ये आहे . त्या गुहेच्या वर असलेल्या दगडावर मी ऊन खात पडलेला असताना एकदा पट्टेरी वाघ माझ्या मागे येऊन बसला होता . प्रत्यक्षामध्ये ती त्याची जागा होती . त्याने खूप वेळा मला सावध केले परंतु मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतो .कारण मी शांतपणे डोळे मिटून पडलो होतो . अखेरीस आतून निघ असा आवाज आल्यामुळे मी तिथून खाली उतरलो आणि शंभर पावले गेलो नाही इतक्यात त्याच्या डरकाळ्या मला ऐकू आल्या . त्या दिवशी मी दत्तप्रभूंच्या कृपेने थोडक्यात वाचलो होतो . अजून एका प्रसंगी पुण्यातून चालत शिवथर घळी मध्ये जाताना आंबेनळी नावाची एक पायवाट आहे आणि गोप्या घाट नावाची दुसरी पायवाट आहे . त्याच्या मधून एक तिसरीच वाट मी शोधून काढली होती तिथे एक बिबट्या माझ्या मागे लागला होता . मागे लागला म्हणजे त्याने फक्त त्याच्या हद्दीच्या बाहेर मला हाकलण्याचा प्रयत्न केला होता . मी अतिशय वेगाने ती वाट उतरून अक्षरशः त्याच्या हद्दीतून पळून गेल्यामुळे त्याने मला काहीही इजा केली नाही . याप्रसंगी समर्थांनी मला वाचवले ! 
कर्नाटकामध्ये देखील खूप सुंदर जंगले आहेत . त्यातली बरीचशी मी पालथी घातलेली आहेत . दांडेली अभयारण्य ,बंदीपूर अभयारण्य ,नागरहोळे अभयारण्य ,गिरसाप्पा अभयारण्य , शबरीमला अभयारण्य ही माझी काही आवडती अभयारण्ये आहेत . यातील दांडेली मध्ये भटकत असताना मी एका जंगलातील 'व्ह्यू पॉइंट ' वर गेलो असताना माझ्याबरोबर मागे येऊन विष्ठा करून एक बिबट्या पळून गेला होता ! त्यावेळी त्या बिंदूपासून माझ्या जीप पर्यंत मी कसा आलो हे माझे मला माहिती आहे ! शबरीमाला मध्ये तर वाघांचा सुळसुळाट आहे . इथे अय्यप्पा स्वामीची जी उपासना केली जाते त्या पद्धतीने महिनाभर राहून मी देखील अय्यप्पाच्या दर्शनाला जाऊन आलेलो आहे . हा संपूर्ण मार्ग जंगलातून जातो . इथे रजस्वला स्त्रियांना बंदी असण्याचे महत्त्वाचे कारण इथे असलेला वाघांचा वावर हेच आहे . वाघांना वासाचे खूप चांगले ज्ञान असते त्यामुळे केवळ या एका मंदिरामध्ये हा नियम कठोरपणे पाळला जातो . रजोनिवृत्ती झालेल्या स्त्रिया व छोट्या छोट्या कन्यका मोठ्या प्रमाणात ही यात्रा करताना दिसतात .


अय्यप्पा मंदिरातील पूजेद्वारे अय्यप्पाचे व्रत स्वीकारताना प्रस्तुत लेखक . ठिकाण तिरुप्परंकुण्ड्रम तमिळनाडू .


नारळाला छिद्र पाडून त्यात साजूक तूप भरून बंद करून तांदुळामध्ये तो ठेवला जातो आणि तो ठेवलेली पै अथवा पिशवी डोक्यावर घेऊन चालत हे व्रत करायचे असते . या काळात महिनाभर एकभुक्त राहून अनवाणी चालत जमिनीवर झोपायचे असते .


या काळात कायम काळी किंवा निळी लुंगी घालायची असते . आणि चटईवर झोपायचे असते .


माझ्या पूजा सामानाच्या काळ्या पिशवीवर त्यावेळी मी फक्त पांढऱ्या रंगाने काढलेले अय्यप्पाचे चित्र .

भारतामध्ये होणाऱ्या (कुंभमेळ्या व्यतिरिक्त ) कुठल्याही धार्मिक यात्रांपैकी सर्वात मोठी यात्रा म्हणजे या अय्यप्पाची यात्रा च असते . अक्षरशः कोटींच्या संख्येने दरवर्षी केरळमध्ये या यात्रेसाठी हिंदू भाविक जमत असून देखील या भागातील धर्मांतरण रोखण्यात आपल्याला यश आलेले नाही इतका आपला समाज अतिसहिष्णू आहे . या यात्रेच्या मार्गामध्ये एक मोठी मशीद पडते तर जाणारा प्रत्येक भाविक त्या मशिदीला सुद्धा मनोभावे नमस्कार करतो हे दृश्य प्रस्तुत लेखकाने स्वतः अनुभवलेले आहे . धार्मिक सौहार्दाचा इतका परिपोष जगातल्या अन्य कुठल्याही देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही . असो . ओघाने विषय निघाला म्हणून सांगितले .
इथून थोडेसे पुढे जंगलातूनच गेलो असताना काही अंतरावर एक डांबरी रस्ता लागला आणि त्यावरून काही आदिवासी मुले चालत येताना दिसली . हा कुठला विचित्र प्राणी दिसतो आहे असा विचार करत त्यांनी माझ्यासोबत काही फोटो काढून घेतले . त्याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मूर्ती सोबत देखील काही फोटो त्यांनी काढले आणि मी सांगितलेल्या क्रमांकावर पाठवून दिले .


अजूनही सरदार वल्लभभाई पटेल यांची ही मूर्ती कित्येक किलोमीटर लांब होती . इथून मूर्तीचे अंतर किमान तीन ते पाच किलोमीटर असावे . 


या आदिवासी मुलांनी मोठ्याच हौसेने वेगवेगळ्या ठिकाणी मला वेगवेगळ्या अवस्थांमध्ये उभे करून भरपूर फोटो काढून घेतले ! मी हातातला दंड फार क्वचित प्रसंगी खाली टेकायचो आणि बहुतांश वेळ असा आडवा धरायचो त्यामुळे मी जिथे पकडले आहे तिथे उष्णतेमुळे तो वाकडा झालेला आपल्याला लक्षात येईल .


मला बिजासन नजिक मिळालेले नवीन बूट या चित्रामध्ये दिसत आहेत . सर्वत्र पानगळ झालेली दिसत आहे . वन खात्याने लोकांनी रस्ता सोडून वनात शिरू नये म्हणून सगळीकडे असे तार कंपाउंड लावलेले आहे . 


जगात एकच देव आहे असे दर्शविणारी ही खूण एकेश्वरवादी लोक कायम करत असतात . परंतु मी मात्र तशी खूण करत नसून हा पहा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा अशा  अर्थी बोट दाखवत आहे . :D


सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आणि माझा आकार एकच दिसावा असा या मुलांचा प्रयत्न चालला होता . त्यासाठी त्यांनी बरेच फोटो काढून पाहिले . त्यातल्या त्यात हा फोटो जवळ जाणारा आहे .


अखेरीस अंधार पडतो आहे मला पुढे जाऊ द्या अशी विनंती केल्यावर मुलांनी मला सोडले .

इथून पुढे चालताना पुन्हा एकदा अरण्यमार्ग लागला . नदीपात्रातून पुन्हा एकदा चालावे लागले . आता मात्र एका डोंगराच्या मागून सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा फारच मोठा दिसू लागला . तो इतका मोठा होता की डोंगराएवढे त्याचे डोके दिसत होते . हे वल्लभभाई पटेल मूर्ती प्रकरण फारच भव्यदिव्य आहे हे जवळ गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही . जंगलातील पानगळ झालेल्या पायवाटांवरून प्रचंड तंगड तोड केल्यावर अखेरीस ही नदी नर्मदा मातेला जिथे मिळते त्या संगमावरती जाऊन मी पोहोचलो . इथे एक पूल बांधलेला होता . आता नियमानुसार डावीकडे वळून चालायचे होते . परंतु मला सरदार सरोवर धरणाची भिंत बघायची होती जी इथून फक्त दोन किलोमीटर उजवीकडे होती . आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता या घनदाट अरण्यातून मोदींनी बांधला होता . त्यामुळे भिंत पाहून मग डावीकडे गोरा कॉलनी गावाकडे प्रस्थान ठेवावे असा विचार मी केला . डाव्या हाताला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा इतका मोठा दिसत होता की वर बघताना मान दुखत होती. इथे रस्त्याच्या दुतर्फा उत्तम असे बागबगीचे तयार करण्याचे काम चालू होते .नळीने झाडांना पाणी घालण्याचे काम चालू होते . त्यातीलच दोन माळी मला बघून नर्मदे हर असे ओरडले ! आणि पाया पडण्याकरता आले . मी देखील दोघांना नमस्कार केला . यांनी माझे काही फोटो इथे काढले .


झाडांना पाणी घालणारे वनमाळी बुवा . या संपूर्ण प्रकल्पामध्ये केवळ स्थानिक आदिवासी लोकांनाच नोकऱ्या मिळालेल्या आहेत . आणि त्यांच्या आयुष्याचे कल्याण गुजरात सरकारने केलेले आहे .


सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या मूर्तीच्या अगदी उजव्या हाताला सरळ रेषेमध्ये असलेल्या या बिंदूवर माळीबुवांनी भरपूर फोटो काढले .


या भागामध्ये बहुतेक सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखी 'पोझ ' देऊन पुतळ्यासोबत फोटो काढण्याची पद्धत आहे असे मला जाणवले .


रस्त्याला किती तीव्र उतार आहे हे आपल्याला फोटो पाहिल्यावर लक्षात येईल .


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या पुतळ्याच्या आतून वरती जाणारी लिफ्ट अथवा उद्वाहक असून त्याद्वारे आपण हृदय स्थानी निर्माण केलेल्या एका प्रेक्षा गॅलरीमध्ये जातो जिथून नर्मदा मातेच्या जलाशयाचे अत्यंत विहंगम असे दर्शन होते . 


दप्तराच्या मागे लटकणारे कापड म्हणजे दुपारी धुवून वाळत घातलेला लंगोट आहे . कपडे धुऊन झाले की सुकविण्याची वाट न
 बघता अशा रीतीने मागे झोळीला बांधून मी चालायला लागतसे . चालताना कपडे वाळून जात .


या रस्त्यावर केवळ देशी-विदेशी पर्यटकांना  पाहण्याची सवय माळी लोकांना होती . परिक्रमावासी प्रथमच दिसल्यामुळे त्यांना अप्रूप वाटत होते आणि त्यांनी भरपूर फोटो काढून घेतले


आता लवकरच अंधार पडणार आहे तरी कृपया मला मार्गस्थ होऊ द्या म्हणजे एखादा आश्रम गाठता येईल अशी विनंती मी त्यांना केल्यावर त्यांनी मला जाऊ दिले .

 त्यांनी हे देखील सांगितले की इथे कुठलेही परिक्रमा वासी कधीच येत नाहीत . सर्वजण बहुतेक करून गोरा कॉलनी गावामध्ये थेट उतरतात . ते इथून बरेच लांब होते . आज उजेडात मी तिथे पोहोचेन का नाही हे देखील मला माहिती नव्हते . परंतु आल्यासरशी सरदार सरोवर धरणाचे जवळून दर्शन घेण्याची मला इच्छा होती . इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी अशी अति भव्य अक्षरे रस्त्याच्या कडेला उभी आलेली आहेत जी समोरच्या तटावरून खूप छान दिसतात . हॉलीवुड अशी अक्षरे लिहिलेला डोंगर आपल्या डोळ्यासमोर असेल त्याहीपेक्षा भव्य दिव्य अशी ही अक्षरे गुजरात सरकारने उभी केलेली असून त्या प्रत्येक अक्षराची उंची एखाद्या पाच दहा मजली इमारती एवढी आहे . या अक्षरा समोरून जाताना अक्षरशः आपण फार खुजे आहोत असे वाटते परंतु समोरच्या तटावरून पाहिले असता ही अक्षरे अतिशय लहान आणि गोंडस दिसतात .

हीच ती अक्षरे ! मी किती घनदाट जंगलातून आलो आहे ते तुमच्या लक्षात येईल . त्यामुळेच या मार्गाने परिक्रमावासींना स्थानिक लोक जाऊ देत नाहीत . परंतु मार्ग निश्चितपणे आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे .


सरदारजींच्या पुतळ्याच्या हृदयातून काढलेले हे फोटो आहेत . उजवीकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी लिहिलेली पांढरी अक्षरे आहेत त्याच्या मागून चालत मी भिंतीपर्यंत गेलो होतो . आणि पुन्हा उलटा येऊन गोरा कॉलनीच्या दिशेला गेलो होतो . 
ही अक्षरे फार मोठी असून मागे असलेले अरण्य देखील घनदाट आहे . अक्षरांच्या मागून चालताना हे नक्की काय प्रकरण आहे ते कळत नाही इतके ते भव्य दिव्य आहे . हे चित्र समोरच्या तटावरून काढलेले आहे . 


मूर्तीच्या मानाने भिंत आणि ती अक्षरे किती लहान दिसत आहेत हे तुम्हाला या चित्रांमध्ये लक्षात येईल तसेच आता तुम्हाला मी किती उंच डोंगर उतरून आलो आहे ते देखील लक्षात येईल . हे चित्र मूर्तीच्या मागच्या बाजूने समोरच्या तटावरून काढलेले आहे . मूर्तीची गुजरातकडे पाठ असून महाराष्ट्राकडे तोंड केलेले आहे . मूर्ती ज्या चबुतऱ्यावर उभी आहे तीच मुळी एक भव्य दिव्य इमारत आहे . 
मूर्तीपर्यंत जाण्यासाठी समोरच्या तटावरून एक पूल बांधलेला आहे . परिक्रमावासी दोन्ही तटावरून या मूर्तीच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत कारण हे नर्मदा मातेच्या पोटामध्ये असलेले एक बेट आहे आणि तिथे गेल्यास परिक्रमा खंडित होते . . 
इथे सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती समोरून छान दिसेल असा एक व्ह्यू पॉइंट बनवण्यात आलेला असून तिथे सुंदर असा बगीचा केला आहे व उभे राहून फोटो काढता येतील अशी व्यवस्था केलेली आहे .

मी इथे गेलो तेव्हा दिल्लीवरून आलेली एक तरुण youtuber मुलगी Vlog बनवत होती . तिने मला विनंती केली की मी तिला मुलाखत द्यावी . त्याप्रमाणे तिने आणि तिच्यासोबत आलेल्या कॅमेरामनने माझी नर्मदा परिक्रमा या विषयावर छोटीशी मुलाखत घेतली . पुढे त्या मुलीने ती कुठल्या चॅनेलवर टाकली किंवा नाही याची मला काही कल्पना नाही .परंतु त्या मुलीने तिच्या मोबाईलवर माझे काही फोटो काढले आणि ते मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले ते फोटो मात्र सोबत जोडत आहे . मी काही चॅनल कुठले वगैरे विचारण्याच्या भानगडीत पडलो नाही . कारण मुळात मी स्वतः युट्युब वर संशोधन वगैरे करून परिक्रमा उचललेली नव्हती तर केवळ नर्मदा मैयाच्या भरवश्याने सर्व चालू होते .
 दिल्लीच्या youtuber मुलीने काढलेले फोटो
सायंकाळ झाली होती आणि लवकरच अंधार पडणार होता .


याही मुलीच्या फोटोग्राफरने मला वल्लभभाई पटेल यांच्यासारखे उभे राहायला सांगितले . त्याने तर माझ्या खांद्यावरचा पंचा देखील त्यांच्याप्रमाणे ठेवून घेतला !

कोणी कितीही नक्कल केली तरी देखील मूळ व्यक्तीची सर आपल्याला येणे शक्य आहे काय ! आज आपण जो काही उर्वरित अखंड भारत बघतो आहोत त्याचे सर्वस्वी श्रेय श्री वल्लभभाई पटेल या लोहपुरुषाला जाते .कारण त्यांनी जर हैदराबाद जुनागड काश्मीर सारखी संस्थाने भारतामध्ये वेळच्यावेळी विलीन करून घेतली नसती तर आपल्या देशाचे अजून अनेक तुकडे व्हायला वेळ लागला नसता . त्यांचे हे अभूतपूर्व कार्य बघूनच बहुतेक नर्मदा मातेने आपल्या एका बेटावर त्यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभा करण्यासाठी जागा बहाल केली !  हा पुतळा असंख्य छोट्या छोट्या तुकड्यांना जोडून बनविलेला आहे . प्रत्यक्षामध्ये या पुतळ्याच्या आत मध्ये लोखंडाचा एक मोठा सांगाडा किंवा इमारतच उभी केलेली आहे आणि त्याच्यावरती जागोजागी वल्लभभाई पटेल यांच्या मूर्तीचे तुकडे जोडण्यात आलेले आहेत . मूर्तीच्या हृदयस्थानी असलेल्या सज्जावरून नर्मदा मातेचे फारच सुंदर दर्शन होते असे ऐकले आहे .अजून प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नाही आणि परिक्रमे मध्ये तर पाहायला परवानगी देखील नाही . या पुतळ्या विषयी थोडक्यात माहिती जिज्ञासूंसाठी खाली देत आहे .

सरदार वल्लभ भाई पटेल यांची मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती आहे. नर्मदा मातेच्या पाण्यापासून ही २४० मीटर उंच असून त्यात ५८ मीटर उंचीचा चबुतरा अर्थात एक भली मोठी इमारतच आहे. गुजरात मध्ये १८२ विधानसभा मतदारसंघ आहेत त्याप्रीत्यर्थ या मूर्तीची उंची १८२ मीटर ठेवण्यात आलेली आहे.  मूर्ती आतून पोकळ असून भाला मोठा लोखंडी सांगाडा अथवा इमारत उभी करून त्याला बाहेरून तुकड्यांमध्ये मूर्तीचे भाग जोडण्यात  आलेले आहेत . हे भाग बनविण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी नांगराचे फळ, कुदळ, फावडे, घण, हातोडे आदी पोलादी वस्तू गुजराथ सरकारला दान केल्या होत्या. त्या वितळवून एल अँड टी कंपनी ला कंत्राट देऊन ३००० कोट रुपये खर्चून हा प्रकल्प मोदींनी उभा केलेला आहे.  

इथून पुढे जाऊन धरणाची भिंत देखील बघून आलो. इथे अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावलेली आहे. 
धरणाला धोका असणे यांच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट मानवतेच्या आणि सर्वधर्मसमभावाच्या  गप्पा ठोकणाऱ्या देशासाठी असू शकत नाही. विचार करून पहा! असो. जिज्ञासूंसाठी धरणाची माहिती थोडक्यात देत आहे. 
‘नर्मदा खोरे विकास प्रकल्प’ या महायोजनेत ‘सरदार सरोवर’ व ‘नर्मदा सागर’ हे दोन मुख्य प्रकल्प आहेत. या योजनेंतर्गत नर्मदा व तिच्या ४१ उपनद्यांवर ३० मोठी, १३५ मध्यम आणि ३,००० लहान धरणे बांधण्याचे नियोजित आहे. या धरणाच्या जलाशयाचे क्षेत्रफळ ३७,००० हेक्टर असून धरणाला ३० दरवाजे आहेत. धरणाची लांबी १,२१० मीटर असून उंची १३९ मीटर (पायापासून १६३ मीटर, ५३५ फुट) आहे. सुरुवातीला ९३ हजार कोटी खर्चाचे अंदाजपत्रक असलेला हा महाप्रकल्प २०१७ मध्ये, साधारण ५६ वर्षानंतर, ६५ हजार कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला. या धरणांमुळे १८ लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून अनेक शहरे, उद्योग आणि ४,७२० खेड्यांना पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच १,४५० मेगावॅट वीज तयार होणार आहे. या धरणावरील वीजनिर्मिती केंद्राद्वारे एकूण निर्माण होणाऱ्या विजेतून मध्यप्रदेश ५७ टक्के, गुजरात २७ टक्के आणि महाराष्ट्र १६ टक्के असे वीजेचे वितरण करण्यात आले. याव्यतिरिक्त राजस्थानला पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी दिले जाते, असे सरकारी आकडेवारीमध्ये नमूद आहे. (सौजन्य : मराठी विश्वकोश )  



सरदार सरोवर प्रकल्पावरून काहूर माजवले गेलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनात मी महाविद्यालयीन जीवनात सक्रिय सहभाग घेतलेला असल्यामुळे माझे या विषयीचे मत एकांगी नसून अभ्यासातून आणि अनुभवातून आलेले आहे. मुळात हा प्रकल्प सरदार पटेल यांनी १९४५ साली मांडला होता व अंमलबजावणीस १९८३  साल उजाडले , इथेच मुख्य चूक झालेली आहे. १९४५ साली भारताची लोकसंख्या केवळ ३५ कोटीच्या घरात होती . आणि विस्थापित गावातील लोकसंख्याही त्याच प्रमाणात होती किंवा काही गावे तर वसलीच नव्हती. आता मात्र धरण पूर्ण झालेले असून पुनर्वसनही झालेले आहे. तसेच ३५०० रुपये तिकिटात विद्युत गाडीतून हा संपूर्ण प्रकल्प तुम्हाला दाखविणारे स्थानिक मार्गदर्शक देखील विस्थापित आदिवासीच आहेत.  तसेच इथला प्रत्येक कर्मचारी विस्थापित गावातील आहे. अशा अनेकांशी मी बोलल्यावर असे कळले की ते या नवीन जीवनात सुखी आहेत. दरमहा अमुक एक रक्कम खात्यात जमा होईल असे यांच्या स्वप्नातही कधी वाटलेले नव्हते. शिवाय ते काम करताहेत तो सारा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनविण्यात आलेला असल्यामुळे कामाचे वातावरणही यांना आवडणारेच आहे. असो.सरदार पटेल यांना साष्टांग नमस्कार केला आणि मुक्कामाच्या शोधात चालू लागलो. नर्मदा मातेवरून येणारे रेवागंधीत वारे मनाला सुखावीत होते. तिच्या केवळ एका दर्शनाने दिवसभराच्या कठीण वाटचालीचा शिणवटा क्षणात पळून गेला ! 
दुःख हर, कष्ट हर,पीडा हर ,वेदना हर, दैन्य हर ,क्लैब्य हर ,पाप हर, नर्मदे हर !! नर्मदे हर !!!

टिप्पण्या

  1. नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. सुरुवातीला ९३ हजार कोटी खर्चाचे अंदाजपत्रक असलेला हा महाप्रकल्प ५६ वर्षानंतर ६५ हजार कोटी रुपये खर्चून पूर्ण झाला. This is the biggest miracle!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वरील वाक्य जसेच्या तसे विश्वकोशातून उचलण्यात आलेले आहे . बहुतेक लेखकाला १३००० कोटी म्हणावयाचे आहे .

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर