लेखांक ८४ : खतरनाक खप्परमाळ आणि भमाण्याचे भाविक मान्याभाई पावरा

 महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेचा हा प्रदेश . इथल्या लोकांची शेती दोन्ही राज्यामध्ये आहे . त्यामुळे घरातील मतदान देखील कोणाचे मध्य प्रदेशात तर कोणाचे महाराष्ट्रात होते .इथे मुली देताना जवळपासच्या गावातच देतात .एका गावातील सर्व मुले मुली स्वतःला बहिण भाऊ मानतात . दिनेश पावरा चा मी निरोप घेतला आणि खप्परमाळचा पहाड चढायला सुरुवात केली . सुरुवातीला मला वाटले की हा पहाड किरकोळ आहे . परंतु जसा चढू लागलो तसे लक्षात आले की हा पहाड चढणे वाटते तितके सोपे नव्हते ! पायाखालची पाय वाट अतिशय अरुंद अशी होती . वाटाण्याच्या आकाराच्या मुरुमाच्या गोल गरगरीत खड्यांनी भरलेली होती . प्रत्येक पावलाला पाय सटकत होते . पायवाट उताराच्या दिशेला तिरकी होती . काठी देखील रोवली जात नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात छोडे खडे सर्वत्र होते . सोसाट्याचा वारा चालणे अजून कठीण करत होता . कुठेही आधार घेण्यासाठी एकही झाड नव्हते . मध्येच एक झाड सापडले तर अक्षरशः मी त्या झाडावरती पाच मिनिटे बसून राहिलो !   इथे डावीकडे उजवीकडे फुटलेल्या अनेक पायवाटा होत्या . नशीब मला दिनेश पावराने कुठली खूण दिसली की कुठल्या पायवाटेला वळायचे ते आधीच सांगून ठेवले होते . नाहीतर मी कधीच तोरणमाळला पोहोचलो असतो ! नशिबाने डोंगरदर्‍यामध्ये भटकंती करायची सवय असल्यामुळे आणि अशी भटकंती करताना दिशा भान जागृत ठेवायची देखील अनुभव सिद्ध सवय असल्यामुळे माझ्या डोक्यात कुठल्या दिशेला जायचे आहे ती दिशा अतिशय पक्की होती . परंतु चुकून-माकून एखाद्या व्यक्तीचे दिशाभान अशा ठिकाणी हरपले तर खरोखरच खूप कठीण आहे कारण गुरांच्या आणि स्थानिक लोकांच्या हजारो पायवाटा तुम्हाला सर्वत्र दिसतात .

हाच तो डोंगर आणि डोंगराला आडव्या सुरकुत्या पडलेल्या दिसतात ना , ह्याच त्या पायवाटा ! मोजा किती पायवाटा आहेत !
वरती थोडी सपाटी लागली तिथे एक घर होते . घरात कोणी नव्हते परंतु बाहेर ठेवलेल्या माठातले थंडगार पाणी प्यायलो . खूप बरे वाटले . आता भयंकर चढ संपला होता . हा चढ ज्यावरून पायाने चालणे देखील आपल्याला कठीण वाटते तिथून दिनेश आणि गावातले तरुण मोटरसायकल घेऊन खाली उतरतात ! इथल्या लोकांना भय म्हणजे काय ते माहितीच नाही ! गाडीचा ब्रेक देखील हे लोक फारसा वापरत नाहीत . कारण शहरात जसे अनेक वेळा समोर अडथळा आल्यामुळे थांबण्याचे प्रसंग आपल्यावर येतात तसे इकडे येतच नाहीत ! चलते रहो ! भगाते रहो ! बऱ्याच वेळा ब्रेक दाबल्यामुळेच गाड्या सटकतात . असो .
या ठिकाणी आता उत्तम महाराज समर्पण सेवा समिती नावाने उत्तम महाराजांचा आश्रम सुरू झालेला आहे . मी चाललो तेव्हा म्हणजे २०२२ साली हा माळ पूर्णपणे मोकळा होता .हे उत्तम महाराज म्हणजे मूळचे अमरावती भागातील मराठी संत असून वयाने अतिशय तरुण आहेत . माझ्या साधारण दहा ते पंधरा दिवस आधी ते परिक्रमेला निघालेले होते . आणि मी जिथे जिथे जायचो तिथे त्यांच्या स्वागतासाठी लागलेले शब्दशः हजारो फलक पाहायचो . यांच्यासोबत सुमारे शंभर सव्वाशे शिष्य मंडळी देखील पायी परिक्रमा करत होती . महाराज उत्तम कथाकार असल्यामुळे ते जिथे जातील तिथे राजकारणी लोक त्यांचे प्रचंड स्वागत करायचे ! त्यानिमित्ताने महाराजांनी प्रवचनामध्ये त्या राजकारण्यांचा उल्लेख करावा अशी त्यांची भाबडी आशा ! महाराजांचे वय ४५ असावे . स्थानिक लोक सांगत की हे भारतीय जनता पक्षाला उपकारक आहेत . अनेक ठिकाणी महाराजांना सोयीचे जावे म्हणून फलक वगैरे लावलेले होते त्याचा फायदा माझ्यासारख्या एकटे चालणाऱ्या परिक्रमावासीला व्हायचा . 
 महामंडलेश्वर श्री ईश्वरानंदजी ब्रह्मचारी अर्थात उत्तम स्वामी महाराज पंचाग्नी आखाडा
परिक्रमेमध्ये आपल्या भक्तांसोबत चालताना उत्तम महाराज
अलीकडच्या काळामध्ये नर्मदा खंडामध्ये प्रसिद्ध पावलेल्या आणि राजकीय वजन असलेल्या महंतांपैकी हे एक आहेत एवढे निश्चित . कारण प्रत्येक राजकारणी यांचे उंबरे झिजवताना दिसतो . 

बुधनी , मंदसौर , (दोन्ही मध्य प्रदेश ) बासवाडा (राजस्थान ) , राजपीपला (गुजरात ) ,हरिद्वार ( उत्तराखंड )अशा ठिकाणी महाराजांचे आश्रम आहेत . त्यात या महाराष्ट्रातील आश्रमाची आता भर पडली .
या उत्तम महाराजांच्या आश्रमामध्ये राहण्याचा योग पुढे उत्तर तटावर आला . त्यावेळी त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात . सध्या आपल्याला रात्रीच्या मुक्कामाचे ठिकाण शोधायचे आहे . आणि संध्याकाळ होत आलेली आहे . थोडे अंतर चालल्यावर मला रस्ता दिसू लागला . या रस्त्यावर एक झोपडी होती जिथे नर्मदा परिक्रमावासींची सेवा केली जाते असा फलक लावलेला होता ! माझ्या जीवात जीव आला ! चला एकदाचे पोहोचलो ! आणि आनंदाने त्या घरापाशी जाऊन नर्मदे हर चा पुकारा केला . परंतु आतून काही आवाज आला नाही . मग मला धीर गंभीर ढोलाचा आवाज ऐकू आल्यामुळे लक्षात आले की घराच्या मागे सर्वजण ढोल वाजवत आहेत . मागच्या बाजूला बांधलेल्या गोठ्यामध्ये मी गेलो . गावातील सर्व तरुण मंडळी मिळून ढोल वादनाचा सराव करत होती . इथे सेवा देणारा सेवाधारी शेजारीच उभा होता . मी त्याला विचारले की मला ढोल वाजवायला परवानगी आहे का ? त्याने सांगितले आम्ही कोणाला ढोल वाजवायला देत नाही . कारण हे वाद्य चुकीचे वाजवायला परवानगी नाही . इतक्यात बाहेरून कोणीतरी परिक्रमा वासी आला आहे हे पाहून सर्व मुले वाजवायची थांबली होतीच . मी त्यांना नकरसिंग सोलंकीच्या घरी मी ढोल कसा वाजवला ते सांगितले . गंमत म्हणजे या भागातील सर्वच लोक सर्व लोकांना नावाने ओळखतात . पूर्वी मी ढोल वाजवला आहे हे कळाल्यावर त्याने मला वाजवायला परवानगी दिली . मी देखील डोक्यात बसलेला, अतिशय पक्का बसलेला तो ताल चालू केला आणि सगळ्या मुलांना आनंद झाला ! कारण तो त्या सर्वांचा आवडता ताल आहे ! साधारण १५ मिनिटे आम्ही वादन केले असेल . इतक्यात मला सेवाधारीने थांबवले आणि सांगितले की महाराज सूर्यास्त होत आहे तुम्ही लवकर पुढे निघून जा नाहीतर अंधार पडेल ! क्षणात माझ्या पायाखालची जमीन सरकली ! पुढे निघून जा ? "पुढचे मुक्कामाचे ठिकाण किती अंतरावर आहे ? " मी विचारले . " फक्त दोन किलोमीटर आहे महाराज . " सेवाधारीने सांगितले . "एखादा शॉर्टकट वगैरे आहे का ? " प्रथेप्रमाणे मी त्याला विचारले . "शॉर्टकटने गेल्यावरच दोन किलोमीटर आहे आणि रस्त्याने गेला तर चार किलोमीटर आहे . " सेवाधाऱ्याने सांगितले . मी ताबडतोब काढता पाय घेतला . इतक्यात त्याच्या बायकोने चहा आणून दिला . तो पटापट घेऊन पुढे निघालो . एवढ्यात एक मनुष्य धावतच माझ्या मागे आला आणि त्याने मला सांगितले की महाराज शहाणे असेल तर शॉर्टकटच्या नादी लागू नका . डांबरी रस्त्याने चालायला लागा . परंतु आता अंधार पडणार होता त्यामुळे लवकरात लवकर पोहोचावे या दृष्टीने मी शॉर्टकटचा मार्ग निवडला . डोंगराच्या उताराच्या बाजूने अतिशय छोटी अरुंद पायवाट होती . त्या पायवाटेने मी काही अंतर गेलो आणि लक्षात आले की पायवाटेवरूनच एक छोटीशी दरड कोसळलेली आहे . त्यामुळे तेवढ्या भागातील पायवाट खचलेली होती . हे अंतर साधारण चार-पाच फूट होते . त्यानंतर पुन्हा सुरळीत पायवाट दिसत होती . नेमकी ही डोंगराची वळलेली सोंड होती . कदाचित मी वेगाने चालत आलो असतो आणि एकच मोठी उडी मारली असती तर पलीकडच्या पायवाटेवर पोहोचलो असतो . परंतु चुकून माकून माझा पाय सटकला असता तर मात्र डाव्या हाताला दोनशे तीनशे फूट खोल दरी होती ! इथे मी सुमारे अर्धा तास थांबलो होतो . मला असे वाटायचे की कदाचित मला ही पायवाट पार करता येईल . परंतु नेमकी उडी मारायच्या वेळी मन कच खायचे . असे खूप वेळा झाले . मला अक्षरशः घाम फुटु लागला . कारण आता खरोखरच अंधार होणार होता . त्यापूर्वी मला भमाणा हे पुढचे गाव गाठणे अतिशय आवश्यक होते . काही केल्या मला तो टापू पार करता येईना . तो भाग किती कठीण होत आहे आपल्याला कळावे म्हणून मी गुगल नकाशा वर ते वळण शोधून काढले .
 उजव्या हाताला दिसते आहे ते सेवाधारीचे घर आहे . डावीकडे लाल मार्कर आहे तिथे मी अडकलो होतो . तीच जागा आता जरा अधिक जवळून पाहुयात .
या नकाशात दिसणाऱ्या पायवाटेने उजवीकडून डावीकडे आपल्याला जायचे आहे . परंतु वरती जे झाड आहे तिथून दरड सटकलेली आहे . त्यामुळे लाल मार्करच्या अलीकडे पाच फुटाचा पांढरा उभा पट्टा उठलेला आहे पहा ! तोच टप्पा पार करता येईना ! चुकून सटकले तर खाली दरी कशी आहे पहा ! 
बरे कोणाला विचारावे तर इथे कोणी दिसत सुद्धा नव्हते .अखेरीस मी विचार केला की यापूर्वी आपल्याला कोणी सल्ला दिला होता ? त्या माणसाने जाऊ नको असे सांगितले आहे . याचा अर्थ मैय्याची ती इच्छा आहे म्हणून आता आपण परत फिरावे . परंतु माझे दुसरे मन मला सांगू लागले की ही भीतीपोटी मी काढलेली पळवाट आहे . प्रचंड वैचारिक द्वंद्वा मध्ये मी जिथे केवळ एकच पाऊल कसेनुसे ठेवता येईल अशा पायवाटेवरती असहायपणे उभा होतो . ते अंतर खरोखरीच फार काही अधिक नव्हते . परंतु चुकून उडी चुकली तर मात्र फार मोठी किंमत मोजावी लागणार होती . कठीण प्रसंग आलेला आहे आणि निर्णय घेता येत नाही . हातात वेळ देखील कमी आहे . अशावेळी माणसाने काय केले पाहिजे ? नर्मदे हर ! अखेरीस मी एक युक्ती चालवली . माझ्या हातातील काठी हलक्या हाताने पकडली . आणि नर्मदा मातेचे वैखरीमध्ये जोरात स्मरण करून तिला सांगितले की मैया या काठीचे टोक तु ज्या दिशेला नेशील त्या दिशेने मी चालायला सुरुवात करणार आहे . आता निर्णय तुझ्या हातात आहे . इतक्यात एक वाऱ्याची हलकीशीच झुळूक आली आणि काठी उलटी फिरुन मागच्या दिशेला गेली . क्षणाचाही विलंब न लावता मी उलटा फिरलो आणि धावत सुटलो ! हे थोडे आधी का नाही सुचले गं मैया तुला ? असा विचार करत मी धावत पुन्हा त्याच सेवाधारीच्या कुटी पाशी आलो . 
हीच ती कुटी
सेवाधारी वागरा ठुमला पावरा . या सर्वांना खालील तीन फोटोमध्ये दाखविलेल्या व्यक्ती लागेल तशी मदत करतात असे मला कळाले . अशी मदत ते बऱ्याच ठिकाणी करतात . एकूण १३ ठिकाणी करतात असे देखील कळाले .
महाराष्ट्रातील भादल गावामध्ये देखील ही मदत काळूराम वर्मा यांच्या माध्यमातून केली जाते . मी हा टप्पा नदीपात्रातून पार केल्यामुळे डोंगरावर असलेल्या काळुराम वर्मा यांच्या घरी गेलो नाही .
नकरसिंह सोलंकी याच्या घरी देखील अशीच पाटी मी पाहिली होती . या सर्व सेवादारांचे मनापासून आभार मानले पाहिजेत .

इथे जमलेले काही ग्रामस्थ माझ्याकडे पाहून हसू लागले ! त्यांना खात्री होती जणू की मी परत येणार आहे ! आणि समजा मी परत आलो नसतो तर ? तर त्यांना खात्री होती की मी दरीमध्ये कुठेतरी पडलेला असेन ! त्यांच्याशी बोलल्यावर मला कळाले की ही दरड नुकतीच कोसळलेली असून इथून हे लोक देखील पलीकडे जायची हिम्मत दाखवत नाहीत ! मला एकंदरीत या असहकार प्रकाराचा राग आला आणि मी पुढे निघालो . चारच किलोमीटर चालायचे आहे असा विचार करून मी झपाझपा पावले उचलायला सुरुवात केली .
मी तिथे गेल्यावर जी एकंदरीत परिस्थिती पाहिली होती त्यावरून मला काय सुरू आहे याचा अंदाज आला होता . तिथे काही स्वच्छ आंघोळ घातलेली बकरी आणि कोंबड्या मधोमध आणून बांधलेले होते . होळीचा सण सुरू असल्यामुळे आज त्यांचे गाव पातळीवरचे प्रीती भोजन होते . त्यामुळे कोंबड्या आणि बकरे वगैरे कापून मस्तपैकी चिकन मटण आणि दारूचा बेत सगळ्या गावाने आखलेला होता . अशाप्रसंगी परिक्रमावासी ला हे सर्व पाहायला लागू नये अशी त्यांची प्रामाणिक इच्छा होती . परंतु मला हे जर त्यांनी नीट समजावून सांगितले असते तर मी आनंदाने पुढे गेलो असतो . परंतु आधीच दारूच्या नशे मध्ये असलेले हे सर्व लोक मला काही सांगू शकले नाहीत . आणि त्यांनी माझी थोडक्यात बोळवण केली . मी तो रस्ता वेगाने उतरू लागलो . अतिशय घातक आणि तीव्र उतार होता . रस्ता नवीन केलेला असल्यामुळे त्याच्यावरती प्रचंड खडी पडलेली होती . या रस्त्याने एकही गाडी जात नव्हती कारण हा रस्ताच मुळी नवीन झालेला होता . अंधार पडायला सुरुवात झाली होती . मला पायाखालचा रस्ता मुश्किलीने दिसत होता . या भागात वन्य श्वापदे अगदी लीलया फिरतात . त्यांची बाहेर पडण्याची वेळ झालेली होती . माझ्या डाव्या हाताला एक उंचच उंच पहाड होता तर उजव्या हाताला खोल दरीतून एक नदी वाहत होती . या डोंगराला भरपूर सोंडा होत्या आणि प्रत्येक सोंडे वरती रस्त्याने एक झोकदार वळण घेतलेले होते . समोरचा रस्ता अक्षरशः मला शंभर मीटर वर दिसायचा . परंतु तिथपर्यंत जाण्यासाठी आडवी-तिडवी अनेक वळणे पार करत जावे लागायचे . मध्ये खोल दरी होती . या रस्त्याने मला अक्षरशः रडवले ! काही केल्या हा रस्ताच संपे ना ! मला क्षणभर वाटले की मला चकवा लागला की काय ! उतारा चा वापर करून मी अक्षरशः पळू लागलो . डांबर कमी वापरल्यामुळे निकृष्ट दर्जाचा रस्ता झालेला होता त्यातून सटकलेली खडी पायाला प्रचंड टोचत होती . पळताना त्यावरून पाय सटकत होते . जंगलाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती . फक्त माझ्या धपधप पळण्याचा आवाज , रस्त्यावर आपटणाऱ्या काठीचा आवाज आणि फुललेल्या श्वासांचा आवाज डोंगरावरून परावर्तित होऊन माझा मलाच ऐकू येत होता . सर्वत्र किर्र अंधार पडला होता . अर्थात काही वेळाने पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर आला आणि त्याने बरीच मदत केली . परंतु डावीकडचा पहाड या चंद्राची सावली रस्त्यावर पाडायचा ! या नागमोडी रस्त्याची वळणे किती होती खालील नकाशामध्ये पहा !
वरील चित्रामध्ये सेवाधारी ची कुटी दिसते आहे . लाल रंगाचा मार्कर आहे तिथून मी परत फिरलो होतो आणि राखाडी रंगाने दाखवलेला रस्ता पहा कसा नागमोडी आहे ! नाग सुद्धा इतके वळल्यावर मोडून जाईल ! 
मी आपला चालतो आहे ! चालतो आहे ! काही केल्या रस्ता सरेना ! कितीही चालले तरी अजून वळणे येतच राहिली ! वर दाखविलेला रस्त्याचा टप्पा केवळ काही टक्क्याचाच आहे . संपूर्ण रस्ता पाहिला तर तुम्हाला अंदाज येईल की किती चालावे लागले त्या रात्री ! होय रात्रच झाली होती आता ! चार किलोमीटर अंतर तर मी कधीच तोडले होते . त्याच्या दुप्पट चालून देखील भमा णा तर सोडा एकही गाव किंवा एकही घर किंवा एकही मनुष्य मला दिसेना ! आजूबाजूला कुठे मानवी वस्ती असल्याची चिन्हेच नव्हती ! सर्वत्र घनघोर अंधार ! डोळ्यात बोटे घातली तरी दिसणार नाही असा अंधार पडला होता . मी केवळ पायाखाली वाजणाऱ्या खडीचा अंदाज घेत चालत होतो . आता मला दिनेश पावराचे शब्द आठवू लागले . त्याला कदाचित पुढे काय काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज आधीच आलेला असणार होता . म्हणून त्याने कोणाचेही नाव न घेता मला फक्त इथेच राहा असा शहाजोग सल्ला दिला होता . परंतु मी मात्र स्वतःची बुद्धी लावून पुढे चालायला लागलो होतो . ह्या माणसाने मला चार किलोमीटर अंतर कुठल्या फूट पट्टीने मोजून सांगितले आहे हेच मला लक्षात येईना ! साधारण साडेपाच सहा वाजता मी सेवाधारी कुटिया सोडून खप्परमाळाचा उतार पकडला होता . आता अंधार पडून देखील दोन तास होऊन गेले होते , तरी मी चालतच होतो ! परिक्रमेच्या नियमानुसार सूर्यास्त झाल्याबरोबर तुम्ही जिथे आहात तिथे थांबणे आवश्यक असते . परंतु इथे कुठेही थांबणे शक्यच नव्हते . कारण रस्त्याचा तीव्र उतार अजूनही सुरूच होता आणि वळणे वळणे सामोरी येतच होती . अशाप्रसंगीच तर तुमच्या सर्व साधनेची , संयमाची आणि सत्वाची परीक्षा असते ! मी या परिस्थितीचा आनंद घ्यायचे ठरविले ! आणि मोठ्या आवाजात भजने गात नर्मदा मातेचे नामस्मरण करत उतरत राहिलो . रात्रीचे आठ साडेआठ वाजून गेले असावेत . दूरवर मला एका घराचे दिवे मिणमिणताना दिसले .  आता मला या घाटाची सवय झाली होती . हे काय इथेच समोर तर आहे ! असे वाटून दिसणारा रस्ता किंवा पदार्थ साधारण दोन किलोमीटर दूर असायचा ! आत मध्ये गेलेली खोलगट वळणे हे टिचभर अंतर शतपटीने वाढवायची ! माझ्या मनात एका क्षणात त्या माणसाबद्दल राग उफाळून यायचा ! दुसऱ्या क्षणी माझे विवेकी मन त्याला समजावून सांगायचे की अरे नर्मदा परिक्रमा कशासाठी करायची ? अशा किरकोळ उद्वेगांना जिंकण्यासाठी तर तिचे प्रयोजन आहे ना !

गाडीने ५१ मिनिटाचे अंतर गुगल दाखवत आहे . म्हणजे चालत किती असेल गणित काढा ! अखंड चालतच होतो ! 

मला हे अंतर चालायला हरकत काही नव्हती . परंतु सकाळपासून मी हा उभा पहाड चढलो होतो . त्यात एका भाकरीवर सगळा कार्यक्रम सुरू होता . त्यामुळे पायातील बळ हळूहळू संपत चालले होते . तो मिणमिणणारा दिवा असलेले घर देखील दोन चार किलोमीटर लांब निघाले . तिथे आवाज दिल्यावर एक मनुष्य बाहेर आला आणि त्याने सांगितले समोर दिवा चमकतो आहे तिथेच आश्रम आहे ! हा दिवा त्या घरापेक्षा अधिक लांब चमकत होता त्यावरून मी अंतराचा अंदाज बांधला ! अजून बरेच चालायचे होते ! 
शांतचित्ताने चालत राहिलो . मध्येच उफाळून येणारे उद्वेग दाबत राहिलो . अखेरीस व्यवस्थित रीतसर जिला रात्र म्हणता येईल अशी रात्र सुरू झाल्यावर मी एका घरापाशी आलो . उजव्या हाताला रस्त्याच्या खाली खड्ड्यामध्ये एक घर होते . घर म्हणजे कुटीच . मी दारात उभे राहून नर्मदे हर असा आवाज दिला . आतून धावतच एक मनुष्य बाहेर आला . वय साधारण साठ असावे . चटपट्याची चड्डी घातली होती आणि उघडाच होता . हे होते मान्या भाई पावरा ! मी आत्ता कुठून आलो याचे त्यांना आश्चर्य वाटले ! त्यांनी अतिशय आदरपूर्व घरामध्ये बोलावले . गोठ्यामध्ये आसन लावून एक परिक्रमा वासी झोपला होता . मला पाहताच तो उठला . बघतो तर हा विशाल जवंजाळ होता ! तो विशाल आहे हे देखील मला कळत नव्हते इतका अंधार त्या गोठ्यामध्ये होता ! आवाजावरून मी ओळखले ! मला पाहताच तो आनंदाने उठला आणि आम्ही दोघांनी एकमेकांना आनंदाने कडकडून मिठी मारली !  मी एवढ्या रात्री कसा काय आलो याचे त्याला आश्चर्य वाटू लागले . मान्या भाई ने विचारले की आपली भोजन प्रसादी झालेली आहे काय ? मी सांगितले की दुपारी फोदला पावरा यांच्याकडे एक भाकरी खाल्ली आहे . त्याने सांगितले थोडाच वेळ द्या तुम्हाला लगेच गरमागरम भोजन प्रसादी करून वाढतो . आणि धावतच आत मध्ये गेले . स्वयंपाकाची सूचना देऊन ते बाहेर आले आणि आम्ही तिघे अंगणामध्ये गप्पा मारत बसलो . मला इतका उशीर कसा काय झाला याची उत्कंठा दोघांनाही लागली होती . मी त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला . खरे सांगायचे तर मी इतका चाललो होतो की नक्की किती चाललो आणि कुठून कुठपर्यंत आलो याचे काहीच भान मला राहिलेले नव्हते . जे अंतर चार किलोमीटर आहे असे मला सांगण्यात आले होते ते प्रत्यक्षामध्ये १७ किलोमीटर आहे असे मला मान्या भाई ने सांगितले . मला हे अंतर सांगणाऱ्या माणसाचा प्रचंड राग आला . चार किलोमीटर अंतर ? चाराचे सहा होऊ शकते अगदी आठ सुद्धा होऊ शकते . अगदी चौपट केली तरी १६ किमी भरते . इतका कमी आकडा सांगून या माणसाने काय साध्य केले असेल ? उत्तर सरळ होते . संध्याकाळी पाच वाजता जर त्यांनी मला सांगितले असते की तुम्हाला अजून १७ किलोमीटर चालायचे आहे तर कुठलाही मनुष्य चालायला तयार झाला नसता . आणि मुक्कामाची गळ घातली असती . परिक्रमावासी मुक्कामी थांबला आहे म्हटल्यावर बकरे कापणे कोंबडी कापणे ती शिजवणे दारू पिणे या त्यांच्या सर्व नित्य कर्मावर गदा आली असती . त्यामुळे चक्क खोटे बोलून त्यांनी मला पुढे पाठवून दिले . मान्या भाईला या प्रकारचे खूप वाईट वाटले आणि त्याने समस्त आदिवासी समाजातर्फे माझी माफी मागितली . मी दोन्ही हात त्यांच्या खांद्यावर ठेवून त्यांना म्हणालो की कृपया त्यांनी असे काही बोलू नये . ठीक आहे . जे झाले ते झाले . विशाल कधीचाच भोजन करून आडवा झाला होता . मी येईपर्यंत त्याची एक झोप सुद्धा झाली होती .  झालेल्या प्रकाराचे आम्हाला तिघांनाही हसू येऊ लागले ! माझ्या मनात पुन्हा पुन्हा या घटने विषयी राग उफाळून यायचा . आणि तो आला रे आला की मी स्वतःला समजावून सांगायचो की खरे पाहायला गेले तर तू असे काय केले आहेस त्या सेवाधारी मनुष्यासाठी? की ज्या करता त्याने तुझी म्हणाल ती सेवा करावी ? जी सेवा मिळते आहे ते भगवंताचे उपकार समज आणि शांतपणे प्राप्त परिस्थितीला सामोरा जा . प्रत्येक वेळी या विवेकाचा विजय होत होता ही माझ्यासाठी आनंदाची बाब होती ! विशेषतः विशालशी बोलताना माझा राग बाहेर यायचा आणि मान्या भाई यांच्याशी बोलताना विवेक जागृत व्हायचा ! असा कटू अनुभव संपूर्ण परिक्रमे दरम्यान पहिल्यांदाच आल्यामुळे आणि परिक्रमेचा नियम तोडून रात्री उशिरापर्यंत मला चालावे लागल्यामुळे थोडीशी मनाची घालमेल होत होती इतकेच . अखेरीस गरमागरम भात आणि आमटीचा भोजन प्रसाद घेतला . त्यांच्या मुलीने अतिशय तत्परतेने सर्व भोजन वगैरे वाढले . तिच्या शिक्षणाविषयी चौकशी करून तिला शिकत राहण्याचा फुकटचा सल्ला दिला . भोजनप्रसाद झाला आणि बाहेर आलो .इतक्यात रस्त्यावरून माणसांचे जथेच्या जथे चालताना दिसू लागले . नक्की काय प्रकार सुरू आहे विचारल्यावर लक्षात आले की बिलगावची होळी बघायला हे लोक रात्रीच निघाले होते ! रात्रभर चालून सकाळी बिलगावात पोहोचणार होते . दिवसभर चालून माझ्या पायांना अशी गती प्राप्त झाली होती की मला देखील वाटले की सामान उचलावे आणि या लोकांसोबत चालू लागावे ! परंतु अतिशय विवेकी असलेल्या विशालने मला थांबवले आणि सांगितले की तुझी इतकीच इच्छा असेल तर आपण पहाटे लवकर निघूयात परंतु आता तू विश्रांती घे .  अखेरीस त्याच्या विनंतीला मान देऊन मी गोठ्यामध्येच त्याच्या शेजारी आसन लावले आणि पाठ टेकली . पडल्या पडल्या मी मान्या भाई पावरा यांच्या बद्दल विचार करू लागलो . इतका सज्जन ,शांत , सुस्वभावी , नम्र , ऋजु , मृदुभाषी, सात्विक आणि भाविक मनुष्य मी त्या संपूर्ण शूलपाणीच्या झाडीमध्ये अजून पर्यंत तरी पाहिला नव्हता . त्यांचे मनापासून आभार व्यक्त करत झोपी गेलो . विशालने मोबाईलवर पहाटे पाच वाजता चा गजर लावून ठेवला होता . आमची चर्चा झाल्याप्रमाणे ह्या मोबाईलचा वापर फक्त वेळ बघण्यासाठी करण्याचे त्याने ठरविले होते . अन्यथा त्या फोनचा फोन म्हणून काहीच उपयोग तो करत नव्हता . ही गोष्ट फारच अभिनंदनीय होती ! 
पहाटे विशालचा गजर वाजला . परंतु त्यापूर्वीच मी आन्हीके आटोपून बसलेलो होतो . मान्या भाई पावरा आमच्यासोबत अंगणातच झोपला होता . त्याने वहीमध्ये जाताना सही शिक्का दिला . 
परिक्रमेतला ७५ वा मुक्काम भमाणा येथे घडला .दिनांक होता १७ मार्च २०२२
शिक्क्यावरचे शब्द
नर्मदे हर , माँ रेवा अन्नक्षेत्र ,भमाना , तालुका धडगाव ,जिल्हा नंदुरबार , महाराष्ट्र .
 श्री मान्या भाई पावरा
(ता.क. : नुकतीच (२९ / ९ / २०२४ ) रोजी मान्या भाई पावरा यांची पुन्हा एकदा भेट घडली . दिनेश सोबत त्यांना खास भेटायला गेलो होतो . त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली जाणवली . दिसायचे प्रमाण कमी झाले असून सतत चक्कर येते असे म्हणाले . त्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांनी कृपया खालील खाते क्रमांकावर मदत पाठवून द्यावी व आपल्या ईमेल आयडी वर कळवावे म्हणजे त्यांना तसे सांगता येते . )



श्री मान्याभाई फुगऱ्या पावरा यांच्या खात्याची माहिती


श्री मान्या भाई फुगऱ्या पावरा यांचे पुनर्दर्शन घेताना प्रस्तुत लेखक सोबत दिनेश पावरा


भमाणा येथील आश्रमासमोर मान्या भाई पावरा आणि प्रस्तुत लेखक पुनर्भेटी दरम्यान

आलेला प्रत्येक दिवस पहिल्या दिवसापेक्षा अधिक रंजक आणि अधिक घडामोडींचा ठरावा असेच नियोजन नर्मदा मातेने केलेले होते , हे लवकरच माझ्या लक्षात आले ! तो दिवस मोठा मजेशीर ठरला ! 





लेखांक चौऱ्यऐंशी समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. लेखांत ८४ ओपन होत नाही. त्यामुळे मान्याभाई पावरा यांच्या बँक खाते क्रमांक समजला नाही.
    आई नर्मदे हर बाबाजी 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर