लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा
वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
स्नान पूजा आटोपून नक्करसिंगचे घर सोडले . हे सर्वजण शेतातच रात्रभर झोपले होते . तिथे यांचे काहीतरी चालू आहे ते दिसले . सर्वजण मिळून मोहाची दारू गाळत बसले होते . बाबाजी तुम्ही इकडे येऊ नका , मीच तिकडे येतो असे म्हणत नकरसिंग आला . परंतु वाटेत मी पाहिलेल्या सगळ्या भट्ट्यांचे पत्ते त्याला सांगितल्यावर तो फारच अचंबित झाला . त्याच्या लक्षात आले की मी संपूर्णपणे काठाने आलो आहे . या भट्ट्या अशा ठिकाणी उभ्या केलेल्या असतात जिथून कोणीच जात नाही . एकंदरीत दारूची भट्टी हा माझ्यासाठी नवीन प्रकार नाही इतकेच मला त्याला सांगायचे होते . याला काहीतरी द्यावे असे फार वाटत होते . तसे निघताना मी घरातल्या मुलांना गोळ्या खाऊ आणि पैसे वाटले होते . परंतु नकरसिंगला देण्यासारखे काही नव्हते . माझ्या असे लक्षात आले की तो पायामध्ये बूट घालून फिरत आहे . हे रबरी बूट अत्यंत गरम होणारे होते . त्यामुळे मी त्याला वेदांत विला आश्रमात मला मिळालेल्या चपला देऊ केल्या . आधी त्याला विचारले कारण मी त्या पादत्राणांचा वापर करीत अनेक नद्यानाले ओलांडले होते . त्याने सांगितले या माळावर कुठलीही गोष्ट वाया जात नाही . त्यामुळे तुम्ही बिनधास्त मला चपला द्या . तसेही नर्मदे काठी फिरलेल्या चपला पवित्रच आहेत असा त्याचा भाव बघून मला फार बरे वाटले . नकरसिंग ने अतिशय कष्टपूर्वक इथून पुढे खप्परमाळपर्यंतचा सगळा मार्ग सुरेख चुन्याच्या बाणांनी रेखित केला होता . नंतर माझ्या असे लक्षात आले की त्याने बाण मारताना ते अत्यंत हुशारी पूर्वक अशा पद्धतीने मारले होते की सोप्यात सोपा मार्ग सापडावा आणि वाटेतील प्रत्येक दुकानाजवळून ,घराजवळून तो मार्ग जावा . जेणेकरून त्या लोकांना परिक्रमावासींकडून , आणि परिक्रमावासींना त्यांच्याकडून चार गोष्टी प्राप्त होतात . त्याचा हा विचार मला आवडला . परंतु हे लक्षात आल्यावर मात्र मी बाणांचा फारसा भरवसा न धरता स्वतःला भावणाऱ्या शॉर्टकट मार्गाने चालत राहिलो . अर्थात हे मार्ग बऱ्यापैकी धोकादायक होते परंतु बाणांना धरून चालणाऱ्या परिक्रमावासीला मात्र कोणालाही कुठेही चौकशी करावी लागणार नाही अशी व्यवस्था त्याने करून ठेवली होती . बरे हे काम तो दरवर्षी करायचा . कारण इथे दिसणारा निसर्ग पावसाळ्यामध्ये आपले रूप पालटतो . दगडांवरचे बाण पुसले जातात . किंवा शेवाळ्याने झाकले जातात . या भागातील निसर्ग पावसाळ्यामध्ये कसा असतो हे पाहिल्यावर तुम्हाला या प्रदेशाला शुलपाणीची झाडी का म्हणतात ते लक्षात येईल ! गुगल नकाशावरून काही सुंदर अशी पावसाळी दृश्य मला या भागाचा शोध घेताना सापडली ती आपल्यासाठी सोबत जोडत आहे .
दऱ्या अशा खोल आहेत . परंतु थोडे धाडस केल्यावर खाली उतरायला मार्ग सापडत होते . कृपया परिक्रमेमध्ये अशा मार्गांचा अवलंब करू नये अशी सर्वांना प्रार्थना आहे .एवरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण यांच्याकडून फर्ग्युसन कॉलेजच्या टेकडीवर प्रस्तरारोहणाचे प्रारंभिक धडे प्रस्तुत लेखकाने घेतलेले आहेत . त्यामुळे अशी वेडी साहसे करू धजावलो . परंतु सर्वांनी जाता येण्यासारखा हा मार्ग निश्चितपणे नाही .
ढगांचे साम्राज्य आणि मुसळधार पाऊस ! दिसायला हे दृश्य छान असले तरी केवळ पावसावर शेती अवलंबून असलेल्या आदिवासी बांधवांसाठी इथला प्रत्येक पाऊस अत्यंत महत्त्वाचा असतो . अतिवृष्टी आणि अनावृष्टी हे दोन्ही त्यांच्यासाठी अत्यंत घातक असते . पर्यावरणामध्ये होणारे मोठे बदल त्यांना परवडणारे नसतात .
इथे अशी उभी सरळ सोट वाढणारी झाडे जास्त आहेत . अधून मधून घरे दिसतात . सर्वच घरांमध्ये परिक्रमावासींची सेवा होते असे नाही . उलट ठराविक एक दोन लोक आहेत ज्यांच्या घरी परिक्रमावासींची व्यवस्था होते . बाकीच्या लोकांची गरिबी नजरेत भरणे इतकी सुस्पष्ट असते . त्यामुळे या भागातून जाताना कोणाकडे कशाची याचना करू नये असे सुचवावेसे वाटते . कारण तुम्हाला नाही म्हणणे त्या व्यक्तीसाठी कष्टदायक असते .
एक आदर्श आदिवासी घर कसे असते पहा . केवळ विटा आणि मातीच्या साह्याने रचलेली भिंत असते . सिमेंटचा वापर केलेला नसतो . दारं खिडक्या इत्यादीसाठी लाकूड न वापरता फांद्यांचेच शिवलेले तट्टे वापरतात . डावीकडे पिण्याच्या पाण्याचे मेज आणि त्यावर मातीत गाडून ठेवलेले माठ दिसत आहेत . त्याच्यावर सोलर बसवलेला आहे . . उजवीकडे सौर दिव्याचा खांब आहे जो अंगणातील उजेडासाठी आहे . हे सर्व वीज वगैरे अलीकडे आलेले आहे . अंगणात पांढऱ्या रंगाचा बाज ठेवलेला आहे . त्यावर घरमालक झोपतो . बाकी घर आतून रिकामेच असते . उजवीकडे गोठा दिसतो आहे . कौलांची शाकारणी केलेली आहे .
पूर्वी या भागातील लोकांचे जीवन इथे असलेल्या धार्मिक पर्यटनामुळे सुरक्षित होते . अर्थात नर्मदेमध्ये जलमग्न झालेल्या अनेक मंदिरांमध्ये जाण्यासाठी भाविक याच मार्गाने यायचे . त्यातून रोजगार निर्माण व्हायचे .
परंतु आता मात्र सर्व काही जलमग्न झालेले आहे आणि पुन्हा त्याचे अवतरण होण्याची शक्यता मावळत चाललेली आहे .
शूल पाणीच्या झाडीमध्ये अतिशय प्राचीन मंदिरे होती याचे अवशेष आजही तिथे काठावर सापडतात . शास्त्रोक्त पद्धतीने या मंदिरांचे जतन किंवा पुनर्स्थापन करता येणे शक्य होते . आजही पाण्याखाली ही सर्व मंदिरे सुस्थितीमध्ये आहेत इतके त्यांचे बांधकाम उत्तम दर्जाचे आहे .
धरण बांधणे या विषयाला माझा विरोध नाही . परंतु ते बांधताना जलमग्न होणाऱ्या तीर्थक्षेत्रांची पुरेशी काळजी किंवा दखल घेतली गेली नाही हे देखील खरे आहे .
आता हे पाणी इतके खोल साठलेले आहे की तिथे काहीच करता येणे शक्य नाही .
महाराष्ट्र राज्य हे धरणांच्या बाबतीत संपूर्ण भारतामध्ये सर्वात अग्रेसर राज्य राहिलेले आहे . जलसंधारण तज्ञ असे मानतात की महाराष्ट्रामध्ये आता नवीन धरण उभे करण्यासाठी जागाच शिल्लक नाही इतकी धरणे आणि लघु पाटबंधारे बांधून झालेले आहेत . परंतु ही सर्व धरणे जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक धरणामध्ये एक तरी महत्त्वाचे पौराणिक मंदीर जलमग्न झालेले आहे . वर्षातून काही दिवसांसाठी असे एखाद्या मंदिर पाण्याच्या बाहेर आले तर लोकांना चमत्कार वाटतो . परंतु इतके सुंदर मंदिर पाण्याखाली जाणे हाच एक मला मोठा चमत्कार वाटतो . त्यासाठी कोणी कोणी कसे कार्य केले आहे याचा अभ्यास इतिहासामध्ये घुसून करता येणे सहज शक्य आहे .
पळसनाथाचे मंदिर हे एक प्रसिद्ध उदाहरण याबाबत देता येते
उजनी धरणामध्ये बुडविल्या गेलेल्या या प्रसिद्ध मंदिराला बुडण्यापासून वाचवणे सहज शक्य होते असे आपल्याला नकाशा पाहून देखील कळते . परंतु त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत .
उजनी धरणामध्ये बुडविल्या गेलेल्या या प्रसिद्ध मंदिराला बुडण्यापासून वाचवणे सहज शक्य होते असे आपल्याला नकाशा पाहून देखील कळते . परंतु त्या दृष्टीने काही प्रयत्न केलेले दिसत नाहीत .
हे मंदिर किती सुंदर आहे हे पाहिल्यावर आपल्याला नक्कीच अशी शंका येऊ लागते की इतके सुंदर मंदिर जलमग्न कसे काय होऊ दिले जाते ? का याच्यामागे काही निश्चित हेतू आहे ? किंवा मंदिराचे अस्तित्व इतके नगण्य मानले गेले आहे की त्याच्या असण्या नसण्याने काही फरक पडू नये असे वर्तन आपल्या हातून घडले आहे ? विचार करून पहावा लागेल हे नक्की .
इतकी वर्षे पाण्याखाली राहून देखील या मंदिराची वीटदेखील हललेली नाही . अजूनही अशा पुरातन मंदिरांचे संवर्धन आणि संगोपन शक्य आहे .
धरण परिसरातील खोली वाढविण्यासाठी गाळ उपसला जातो त्याचा वापर करून अशा काठाजवळ असलेल्या मंदिरांसाठी सीमा भिंत उभे केल्यास ही मंदिरे वाचू शकतात .
असेच एक प्रसिद्ध मंदिर आहे वाघेश्वराचे . पवना नदीच्या काठावरील हे मंदिर कायमचे जलमग्न झालेले आहे .
यातील पहिला क्रमांक GPay वर आहे असे मला दिनेशने सांगितले . रेंज नसल्याने इथे फोन लागत नाही याची कृपया नोंद घ्यावी . दिनेश चा क्रमांक देखील सोबत देत आहे . त्याची पत्नी व अडीच वर्षाचा मुलगा गावीच राहत आहेत .मी घरी गेलो तेव्हा ते लेकरू सहा महिन्याचे होते !
मंदिर वाचवणे शक्य आहे हे परिसर पाहून आपण हे सांगू शकता . परंतु त्यासाठी लागणाऱ्या इच्छाशक्तीचा अभाव आपल्याकडे आहे हे मान्य केलेच पाहिजे .
भोरच्या भाटघर धरणामध्ये देखील असेच एक कांबरेश्वर नावाचे मंदिर जलमग्न झालेले आहे आणि अजून देखील भक्कम उभे आहे .
दरवर्षी ते पाण्याबाहेर येते आणि सांगते की मी अजूनही शाबूत आहे . अजून तरी मला वाचवा . एक एक दगड काढून दुसऱ्या ठिकाणी नेऊन माझी पुन्हा उभारणी करा .
गोदावरी आणि प्रवरा नदीच्या संगमावरील मुक्तेश्वर महादेव सिद्धेश्वर महादेव घटेश्वर महादेव आणि संगमेश्वर महादेव ही मंदिरे देखील अशीच जायकवाडी धरणाच्या डूबक्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक आणली गेल्यासारखी दरवर्षी बुडवली जातात . थोडीशी बांधबंधिस्ती करून ही सर्व मंदिरे वाचवून एक अप्रतिम पर्यटन क्षेत्र म्हणून याचा विकास करता येणे शक्य आहे .
सिद्धेश्वर मंदिर किती पुरातन आहे आणि इथला राजा हत्तीवर बसून दर्शनासाठी कसा यायचा याची शिल्पेच मंदिरामध्ये कोरलेली आहेत ही शिल्पे देखील जलमग्न होतात . भविष्यात या देशाच्या राजाला या मंदिरामध्ये पाणबुडीत बसून जावे लागेल की काय ?
शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेल्या या मंदिरांचे संवर्धन करणे किंवा पुनर्व निर्माण करणे खरोखरीच इतके अवघड कार्य आहे काय ?
ही सर्व मंदिरे मी स्वतः पाहिलेली आहेत म्हणून त्यांचे उदाहरण दिले . याखेरीज मला माहिती नसलेली हजारो मंदिरे आहेत जी दरवर्षी धरणाच्या पाण्यात बुडवली जातात . मनात शंकेची पाल चुकचुकते . की हे सर्व धर्म बुडविण्यासाठी मुद्दाम तर नाही ना केलेले ?
अशा पद्धतीने मंदिर बुडल्यावर आत मध्ये जाऊन येथे नित्य पूजा कोणी करू शकेल काय ?आपल्याला काय झाले आहे कळत नाही . किमान आपल्या परिसरातील अशा मंदिरा बाबत आपण आवाज का उठवू शकत नाही ? स्थानिक लोकप्रतिनिधीला वेठीला का धरू शकत नाही ?
आपण इतके पुरोगामी झालो का , की आपल्या जन्मदात्याला व त्यांच्या संस्काराला देखील मागे टाकले ? छोटेसेच का होईना किमान एक मंदिर बांधून पहावे . म्हणजे या तळमळीचा अर्थ आपल्या लक्षात येईल .
विकासाची कास आपण निश्चितपणे धरली परंतु धरणांचे भूमिपूजन करण्याची जितकी राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडे होती तितकी इच्छाशक्ती या पौराणिक वारशा चे जतन करण्याची अजिबात नाही हे मान्यच करावे लागेल .
आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही .
काही लोक नर्मदा बचाव आंदोलनाचे समर्थन याबाबतीत करतील . तोही मुद्दा स्पष्ट करून टाकतो . नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये विशेषत्वाने डुबग्रस्त लोकांना जमिनी देणे हा विषय महत्त्वाचा होता . मंदिरे वाचविणे किंवा त्यांचे पुनर्वसन हा विषय या आंदोलनाच्या अजेंड्या मध्ये प्राधान्याने कुठेच नव्हता . मी स्वतः या आंदोलनाचा भाग राहिलेलो असल्यामुळे आपणास हे खात्रीपूर्वक सांगत आहे . त्या काळातील नर्मदा जलमग्न झालेल्या एकाही पुरातन मंदिराचा असा फोटो तुम्हाला सापडत नाही यात सर्व आले . परंतु एक गोष्ट छाती ठोकपणे सर्वांना सांगतो . सर्वांना म्हणजे या देशाच्या आणि संस्कृतीच्या शत्रूंना प्रामुख्याने सांगतो . तुम्ही कितीही तीर्थक्षेत्रे बुडवा . कितीही श्रद्धास्थाने जलमग्न करा . नर्मदा माता पवित्र आहे आणि पवित्रच राहील . तिच्या ज्या भूमीला किनाऱ्याचा मान प्रदान करेल तिथे नवे नवे प्रासाद उभे राहतील . नवनवी मठ मंदिरे निर्माण होतील . आणि ही अभेद्य संस्कृती टिकून राहील . अगदी नर्मदेच्या प्रवाहासारखी .
आज द्वारका जलमग्न झालेली असली तरी देखील या देशाच्या पंतप्रधानाला अर्थात राजाला पाणबुड्याचे कपडे घालून तळाशी जाऊन तिचे दर्शन घ्यावे लागते ! असा असतो तीर्थ महिमा ! तो कालातीत आहे . अक्षुण्ण आहे . अभेद्य आहे . अडूबनीय आहे .
शूलपाणीच्या झाडीमध्ये जी लुटालूट व्हायची त्याचा अभ्यास केल्यावर आपल्याला असे जाणवते की लूटमार करणारे लोक प्रामुख्याने कोळी किंवा केवट समाजातील असायचे . हे ते लोक होते ज्यांचा उदरनिर्वाह संपूर्णपणे नर्मदे काठी होणाऱ्या धार्मिक पर्यटनातून चालत असे . परंतु ही तीर्थस्थानेच जलमग्न झाल्यामुळे या लोकांपुढे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही . अजूनही नवीन धरणे आपल्या देशामध्ये भविष्यामध्ये होणार आहेत . ती बांधणाऱ्या अभियंत्यांनी कृपया एवढेच लक्षात घ्यावे की डुबक्षेत्रामध्ये एखादे पुरातन मंदिर तर बुडत नाही आहे ना ते पाहून त्याची बांधबंधिस्ती करावी . उदाहरणार्थ समर्थ रामदासांचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांची समाधी डोणगाव येथे शिवछत्रपतींच्या स्नुषा सकवार बाई साहेबांनी बांधलेली आहे . हे पुरातन मंदिर कल्याण सागर जलाशयामध्ये बुडणार होते . परंतु प्रचंड प्रमाणात भराव वगैरे घालून मंदिराचे रूपांतर एका बेटात करण्यात आले आणि मंदिर वाचविले गेले . थोडक्यात इच्छाशक्ती असेल तर हे सर्व करता येणे शक्य आहे .
भूम परांडा जवळील डोमगाव येथील कल्याण स्वामींचे समाधी मंदिर धरणात बुडण्यापासून पद्धतशीरपणे वाचवण्यात आलेले आहे .
सांगायचे तात्पर्य इतकेच आहे की नर्मदा खंडामध्ये असलेल्या विविध धरणांमध्ये अक्षरशः हजारो मंदिरे जलमग्न झालेली आहेत . भविष्यामध्ये असे काही होऊ नये याची काळजी आपण सर्वांनीच एक भक्त म्हणून घ्यायला काय हरकत आहे ? आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपण पाण्याचा जपून वापर केला तरी देखील आपण ही पाण्यात बुडणारी मंदिरे वाचवू शकतो . हे वाक्य ऐकायला अतिशयोक्तिपूर्ण वाटेल परंतु ढळढळीत सत्य आहे . कारण एक समाज म्हणून आपण पाणी जपून वापरायला सुरुवात केली की अशा प्रकारच्या धरणांची गरजच हळूहळू कमी होत जाणार आहे . ओघाने विषय आला आणि मनापासून बोलावासा वाटला म्हणून थोडासा विस्तार केला त्याबद्दल क्षमा असावी .
तीव्र उताराचा डोंगर उतरत एका नदीच्या पात्रामध्ये मी आलो . नकरसिंगने आधीच सांगितले होते की या नदीचा एक काठ मध्य प्रदेशामध्ये आहे तर दुसरा किनारा महाराष्ट्रामध्ये आहे ! महाराष्ट्राच्या बाजूला उंचावर एक घर दिसत होते . त्याला मी जोरात मराठी मध्ये बोलून विचारले की हा महाराष्ट्र आहे का ? परंतु त्या माणसाला मराठी येत नव्हते ! ते जाऊ द्या ! इथून साधारण ८० किलोमीटर परिसरामध्ये कोणीही मराठी बोलताना आढळले नाही ! सर्वत्र पावरी ,बिलोरी, भिलड , अहिराणी अशा आदिवासी लोकांच्या भाषाच बोलल्या जातात असे आढळले . याचा अर्थ या संपूर्ण भागाची विभागणी आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झाली त्यावेळी तीन भागांमध्ये जाणून-बुजून करण्यात आली ! काही भाग गुजरात मध्ये काही भाग महाराष्ट्रामध्ये आणि काही भाग मध्य प्रदेश मध्ये ठेवण्यात आला . त्यामुळे आदिवासी लोकांची राजकीय एकी भंग पावली आणि ते कधीच एकत्र येणार नाहीत याची सोय तत्कालीन राजकारणी लोकांनी करून ठेवली ! खरे पाहायला गेले तर या संपूर्ण भागाचे मिळून काही जिल्हे करता आले असते जे एकाच कुठल्यातरी राज्यामध्ये सुरक्षित राहिले असते . कारण तीनही राज्यांमध्ये या भागातील नागरिकांची संस्कृती समानच आहे . एक खासदार नसल्यामुळे या लोकांचा आवाज देशपातळीवर फारसा उठत नाही .
सर्वच राजकीय पक्षांना या भागातील उमेदवार आदिवासी समाजातील द्यावा लागतो . महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये हिना गावित या खासदार आहेत . आणि त्यांचा शुलपाणीच्या झाडीतील आदिवासी लोकांशी चांगला संपर्क आहे असे लक्षात येते . याच परिसरातील एका गावामध्ये आलेल्या हिना गावित यांचे संग्रहित छायाचित्र . मागे उभ्या असलेल्या आदिवासी स्त्रियांच्या दंडातील वक्राकार वाकी पहाव्यात . तीनही राज्यातील स्त्रिया असेच दागिने घालतात !
या भागामध्ये येऊन शहरी लोक मदतीचे वाटप वगैरे करत असतात . परंतु खरे पाहायला गेले तर या लोकांना भौतिक वस्तूंची गरज नसून स्वाभिमानाची , सन्मानाची , समान वागणुकीची गरज आहे .
निसर्ग यांना पुरेसे शिक्षण देत असतो . आपण यांना काय शिकवणार ! आपणच त्यांच्याजवळ राहून खूप काही शिकू शकतो !
मुळात आदिवासी वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कार्याबाबत माझे काही स्पष्ट मत झालेले आहे . आपण शहरांमध्ये जे शिक्षण घेतो ते या भागातील मुलांना देण्याचा अट्टाहास किंवा दुराग्रह करणे म्हणजे या मुलांचे आणि पर्यायाने परिसराचे कायमचे नुकसान करण्यासारखे आहे . याच परिसरामध्ये आणि याच भागातील संसाधने वापरून ते उत्तम प्रकारे जीवन कसे जगू शकतील याचे शिक्षण खरे म्हणजे त्यांना मिळणे आवश्यक आहे . यांना ट्रिग्नोमेट्री शिकवणे म्हणजे एखाद्या उत्तम गायिकेला विणकाम शिकवण्यासारखे आहे . माझ्या एका मित्राने काही वर्षांपूर्वी बारा मावळातील दुर्गम गावामध्ये जाऊन तिथल्या मुलांना अभ्यास करता यावा म्हणून सौरदिवे वाटले होते . त्यामुळे मुलांनी दिव्याच्या उजेडात अभ्यास केला की नाही माहिती नाही परंतु मुले लवकर झोपायची बंद झाली आणि त्यामुळे ती आता उशिरा उठतात , अशी तक्रार पालकांनी माझ्याजवळ केलेली मला आठवते ! तसेच काहीसे हे आहे ! त्यामुळे या भागातील लोकांना मदत करण्याची इच्छा आपल्याला असेल तर ती स्वागतार्हच आहे . फक्त आपल्याला इतकीच काळजी घ्यायची आहे की आपल्या शहरातील गरजा वेगळ्या आणि या भागातील गरजा वेगळ्या ! बास ,इतके गणित डोक्यात बसले तरी पुरेसे आहे ! असो .
मी नदीमध्ये उतरलो . नदीचे पात्र चांगलेच रुंद होते . दोन्ही बाजूंनी डोंगर असलेली ही नदी . खोल दरी मधून वाहत होती . पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाल्यामुळे साधारण दहा टक्के ते वीस टक्के भागातूनच पाणी वाहत होते . बाकी खडकाळ जमिनीमध्ये एकतर पाणी साठले होते किंवा शेवाळे देखील वाळून गेलेले होते असा सर्व भाग होता . चालताना काळजीपूर्वक चालावे लागत होते . कारण प्रचंड निसरडे खडक नदी मातेच्या उदरामध्ये होते . मी या नदीचे पाणी प्यायलो . त्याला महाराष्ट्राचा वास येत होता ! महाराष्ट्राची चव त्या पाण्याला जाणवत होती . नदी आटलेली असल्यामुळे पाणी जड आणि क्षारयुक्त होते . शेवाळे देखील भरपूर होते . एरवी असे वास येणारे पाणी जर मी प्यायलो असतो तर हटकून आजारी पडलो असतो . परंतु नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला नर्मदा मातेने विशेष शक्तीच जणू काही दिलेली असते . तिचा वापर करून तुम्ही असे प्रसंग लीलया टाळता . वैद्यकीय दृष्ट्या पाहायला गेले तर उत्तम हवेमध्ये ,उत्कृष्ट सात्विक आहार घेत , दीर्घश्वसन करत ,भरपूर चालल्यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक्षमता कैक पटीने वाढलेली असते . त्यामुळे एरवी सहज तुम्हाला होणारे कुठलेही रोग इथे मात्र सहजासहजी होत नाहीत . त्यावर शरीर लगेच काम करते . सतत चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण अखंड व वेगाने चालू असते . त्यात आपली फुफ्फुसे ताजा प्राणवायू रक्तात सतत मिसळत असतात . आणि पोटामध्ये निरंतर सर्वजंतुशर्मदा नर्मदा जलाचे प्राशन सुरू असते ! आधी व्याधी अर्थात शारीरिक व मानसिक सर्व रोगांचे उपाय करणारी नर्मदा माता समोर वाहत असते ! शरीरातील आणि मनातील सर्व मल सतत बाहेर फेकला जात असतो . शब्दशः लिटर्समध्ये घाम प्रतिदिवशी गाळला जातो . अशाप्रसंगी तुम्हाला काही आजार वगैरे झाले तर ते आश्चर्यच मानले पाहिजे ! मी माझ्या आजवरच्या आयुष्यातील माझा सर्वाधिक फिटनेस किंवा सर्वात तंदुरुस्त अवस्था परिक्रमेदरम्यानच अनुभवली ! तशी शक्ती ,तशी ऊर्जा , तशी ताकद ,तशी हिंमत यापूर्वी कधी प्राप्त झाली नाही व अजूनही होईल याची शाश्वती नाही . नर्मदा मातेची कृपा अपरंपार आहे . या नदीच्या पात्रामध्ये पूर्ण वेळ मी एकटाच चालत होतो . एखाद्या भयपटाचे चित्रीकरण करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी ती जागा होती ! जंगली श्वापदे पाणी पिण्यासाठी जलस्त्रोतावर येतात हे माहिती असल्यामुळे मी अत्यंत सावधपणे पावले टाकत होतो . नदीतील क्षारामुळे सगळे दगड पांढरे फटक पडले होते . धरणाची पाणी पातळी वाढली की ही नदी खूप भरून वाहते असे मला सांगण्यात आले होते . आणि तशा खुणा दोन्ही बाजूच्या दगडी भिंतींवर दिसत होत्या . केवळ वन्यश्वापदांचे आवाज वगळता इथे दुसरे काहीच नव्हते . उकाडा सुरू झाला होता . तीनही बाजूने दगड असल्यामुळे मी चांगला तापलो होतो . एके ठिकाणी खोल डोह सापडल्यावर त्यात आंघोळ करून घेतली . या नदीचे फोटो मला सापडले नाहीत परंतु याच भागातील अन्य एका नदीचे फोटो खाली टाकतो यावरून तुम्हाला ती झरकल नावाची नदी कशी होती याचा अंदाज येईल . खालील चित्रात दिसणाऱ्या नदीपेक्षा मी चाललो ती नदी बरीच मोठी होती . व साधारण अशीच होती .
या भागातील एका नदीच्या काठी बसलेला आदिवासी मनुष्य . असे कोणीतरी भेटावे असे मला फार वाटे परंतु त्या दिवशी कोणीच भेटले नाही .
चहुबाजूने दगड तापले होते आणि त्यातून येणारे अश्म उष्णतामान ज्याला इंग्रजीमध्ये रॉक रेडिएशन म्हणतात ते भाजून काढत होते .सुदैवाने नदीपात्रातून चालता येईल एवढा रस्ता सर्वत्र मिळत होता . हा प्रवास अतिशय संस्मरणीय असा होता !
समोर दिसणारा अभेद्य पहाड ही आपली महाराष्ट्र भूमी आहे या कल्पनेने अतिशय आनंद होत होता . खड्या आवाजात मी म्हटलेली महाराष्ट्र गीते त्या दरी खोऱ्यामध्ये दुमदुमत होती !
महाराष्ट्रातील भादल गाव या नदीच्या वरती होते . तिथे देखील परिक्रमावासींची सेवा करणारे एक आदिवासी कुटुंब आहे . परंतु एवढे कठीण कातळ चढून वरती जाणे माझ्या जीवावर आले होते त्यामुळे मी पुढे पुढे चालत राहिलो . तसेही महाराष्ट्राचे पाणी पिऊन पोट भरले होतेच ! या मातीची चवच न्यारी आहे हेच खरे ! या नदीचे पाणी वास्तवात आटलेले होते . महाराष्ट्रातल्या तापी खोऱ्यातील कुठल्यातरी धरणातील पाणी सोडल्यामुळे मला हे पाणी दिसत होते . मी नदी पात्रातून चालत असल्यामुळे सर्वात खालच्या पातळीवर होतो . आणि आता मला खप्पर माळ गाठायचा होता जे महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ याचे जुळे भावंड आहे . तोरणमाळ आणि खप्पर माळ दोन्ही एकाच उंचीचे माळ असून दोहोंमध्ये केवळ ३२ किलोमीटर अंतर आहे . याचा अर्थ आता अखंड चढणे क्रमप्राप्त होते . आजपर्यंत नर्मदे काठी अनेक प्रकारचे खडक पाहिले . पण महाराष्ट्रातील काळ्य कभिन्न बेसाल्ट खडकाची मजा कुठल्याच दगडात नाही !
इथे चहूबाजूंनी उंचच उंच खडक असल्यामुळे सुंदर प्रतिध्वनी निनादत होते . काळया छातीवरी कोरली अभिमानाची लेणी । पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी ! या महाराष्ट्र गीताच्या ओळी खड्या आवाजात म्हणत होतो आणि चहूबाजूनी त्याचे प्रतिध्वनी निनादत होते ! हा खडा पहाड चढण्याचे जीव घेणे साहस करण्यासाठी मला प्रचंड ऊर्जा देणारे हे शब्द होते ! सरळ पायवाटेने जाण्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र देशाला मिठी मारत ,आलिंगन देत ,चुंबन घेत खडी पहाडी भिंत चढत होतो ! खात्री होती की ही भूमी आपल्याला सोडणार नाही ! जय जय महाराष्ट्र माझा ! गर्जा महाराष्ट्र माझा ! या भूमीचे उपकार कुठल्या शब्दात मानावेत ? जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते असे सर्व जपणारी भारत वर्षातील एकमेव भूमी म्हणजे माझा महाराष्ट्र ! अगदी अस्तंगत होत चाललेली नर्मदा परिक्रमा देखील पुनरुज्जीवीत करण्याचे महन्मंगल कार्य याच मराठी मातीने केलेले आहे ! परिक्रमा मार्गावरील लोक मराठी परिक्रमावासींना काहीही म्हणोत , परंतु आज सर्वाधिक नर्मदा परिक्रमावासी हे या महाराष्ट्राच्या भूमीतूनच येतात हे सर्वजण एकमुखाने मान्य करतात ! महाराष्ट्र ज्या विषयांमध्ये हात घालतो ती गोष्ट सर्वोत्तमच होते ! मी तर असे देखील ऐकले की नर्मदा मातेवरील सरदार सरोवर धरणाची भिंत महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये होती . परंतु कागदोपत्री फेरफार झाल्यावर आता ती भिंत गुजरातच्या हद्दी मध्ये दिसते आहे . त्यावर जगातील सर्वात मोठा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभा केला खरा परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो पुतळा गुजरातकडे पाठ करून माझ्या महाराष्ट्राकडेच पाहत आहे ! जेव्हा जेव्हा भारतावर संकट आले तेव्हा तेव्हा सर्वप्रथम तिच्या रक्षणासाठी उभा राहिला तोच हा महाराष्ट्र ! जेव्हा जेव्हा या भारत देशाला मागास म्हणून हिणविले गेले तेव्हा तेव्हा प्रगतीची सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करून दाखविणारा तोच हा महाराष्ट्र ! साक्षात परमात्मा म्हणून जन्म घेतलेल्या भगवान श्रीकृष्णाला कौंडिण्यपूरच्या रूपाने सासुरवाडी म्हणून निवडावासा वाटला तोच हा महाराष्ट्र ! १४ वर्षे वनवासातील सर्वाधिक काळ जिथे प्रभू रामचंद्रांनी कंठला तोच हा महाराष्ट्र ! परमेश्वरी अवतार परशुरामाला विसावा घ्यावासा वाटला तोच हा महाराष्ट्र ! भारतीय सैन्य दलांमध्ये आजही ज्याचा दबदबा आहे तोच हा महाराष्ट्र ! आंतरराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणूक करण्यासाठी भारतामध्ये आल्यावर सर्वप्रथम ज्याचे स्मरण होते तोच हा महाराष्ट्र ! संपूर्ण भारत वर्षातील सर्वात समृद्ध संत परंपरा असलेला तोच हा महाराष्ट्र ! भारतावर आक्रमण केलेल्या डच , फ्रेंच , इंग्रज , वलंदेज , पोर्तुगीज , हबशी , सिद्दी , आदिलशहा , निजामशहा ,कुतुबशहा ,इमादशहा , बरीदशहा ,मोगल अशा प्रत्येक परकीय आक्रमकाला आपल्या अधिपत्याखाली यावेसे वाटायचा परंतु कधीच त्यांच्या गुलामगिरी मध्ये न पिचलेला तोच हा महाराष्ट्र !
या सर्वांना पुरून उरणारा , गाडून टाकणारा शिवछत्रपती रुपी महापुण्यपुरुष जन्माला घालणारा तोच हा महाराष्ट्र !
मोडेन पण वाकणार नाही , स्वधर्मा मध्ये मरण पत्करेन पण परधर्माला शरण येणार नाही , अशा बाण्याने हसत हसत मृत्यूला कवटाळणाऱ्या महापराक्रमी परमप्रतापी एकमेवाद्वितीय शंभू छत्रपतींचा जन्मदाता तोच हा महाराष्ट्र ! अटकेपार भगवा झेंडा फडकवणाऱ्या बाजीरावाचा लाडका तोच हा महाराष्ट्र ! इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारकांची सेना उभी करणारा तोच हा महाराष्ट्र ! अखंड भारत भ्रमण करून आल्यावर समर्थ रामदास स्वामींनी राहण्यासाठी निवडला तोच हा महाराष्ट्र ! अखंड भारतातील अगणित तीर्थक्षेत्रे पाहिल्यावर कृष्णा तटाकी विसावलेल्या समर्थ रामदास स्वामींनी संदेश दिला ,
आहे तितुके जतन करावे ।
पुढे आणखी मेळवावे ।
महाराष्ट्र राज्य करावे ।
जिकडे तिकडे ॥
अशा महान राष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊल ठेवताना माझी मनस्थिती काय झाली होती हे शब्दात वर्णन करता येणे खरोखरच कठीण आहे . म्हणूनच नर्मदा मातेने आपल्या महाराष्ट्राच्या डोक्यावर तिचा हात ठेवलेला आहे ! तो आशीर्वादाचा हात आहे ! तो कृतज्ञतेचा हात आहे ! तो एका आईचा हात आहे ! भारताचा नकाशा काढून महाराष्ट्राकडे पहा ! तुम्हाला नर्मदा मातेने महाराष्ट्राच्या डोक्यावर ठेवलेला हात नक्की दिसेल !
झुंजे महाराष्ट्र हा ।
रेवा ही कर मस्तकी फिरवुनी ।
आशिष देते पहा ॥
कपाळी महाराष्ट्राची माती धारण केली . त्या पवित्र मातीची चिमूट जिभेवर टाकली . महाराष्ट्राच्या भूमीवर शहरलेल्या अंगाने पाऊल टाकले . आणि वेगाने पर्वत चढत धावडी गावामध्ये आलो . इथे एक झोपडी दिसली . इनेश खेरसिंग पावरा नावाचा तरुण मुलगा मला सामोरा आला . "नर्मदे हर बाबाजी ! चहा घेणार का ? " शुद्ध मराठी भाषेतले ते शब्द ऐकले आणि डोळ्यातून कृष्णा गोदावरी प्रकट झाल्या ! इनेशला देखील माझा भाव लक्षात आला ! आणि तो मला म्हणाला ! "महाराष्ट्रातल्या मराठी येणाऱ्या पहिल्या घरामध्ये तुमचं स्वागत आहे बाबाजी ! या बसा ! इथे असं आसन लावा !" ते शब्द कानावर पडल्यावर जो काही आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही . यापूर्वी अनेकांशी अनेक भाषांमध्ये बोललो ! पण मातृभाषेचे , मातृस्तन्याचे जे अमृतत्व आहे ते अन्यत्र कसे जाणवणार ! ते एकमेवाद्वितीय असेच आहे ! इनेशचे शिक्षण नर्मदा बचाव आंदोलनाच्या जीवन शाळेमध्ये झाले होते . या शाळेमध्ये महाराष्ट्रातून येणारे चळवळीतले कार्यकर्ते मराठी भाषेतून शिक्षण द्यायचे . त्याच्या परिणाम स्वरूप या भागातील नवीन पिढीला मराठी भाषा चांगली लिहिता वाचता बोलता येते . घरी हे लोक पावरी भाषेतच बोलतात . इथली सर्वच मुले पुढील शिक्षणासाठी मध्यप्रदेश किंवा गुजरातमध्ये न जाता महाराष्ट्रा मध्ये जाणे पसंत करतात . जळगाव ,धुळे , शिरपूर , फैजपूर , शहादा यांना जवळ पडते आणि बडवाणी पेक्षा आधुनिक आहे असे वाटते . आणि ते खरे देखील आहे . मी चालत पार केलेल्या त्या भव्य नदीने अशा रीतीने महाराष्ट्राचा संपर्क मध्यप्रदेशशी तोडून टाकलेला आहे ! इनेश कडून मी जीवन शाळेबद्दल भरपूर माहिती मिळवली . अजूनही या शाळा सुरू आहेत . इथे राहून स्वतःचे जीवन समर्पित करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक आहे . अशा सर्वस्व अर्पण केलेल्या निस्पृह ,निरागस ,निरलस , सेवाभावी कार्यकर्त्यांचा वापर आपल्या स्वतःच्या वैचारिक कंडांना शमविण्यासाठी वापरणाऱ्या दांभिक ,दुतोंडी , परराष्ट्रपोषित , परजीवी नेतृत्वाचा करावा तितका निषेध थोडा आहे . असो . नर्मदा माता सर्व पाहते आहे !
किती सुंदर शाळा आहे पहा ! अशा शाळेत शिकायला मिळणे हे किती भाग्याचे आहे ! फक्त अशा शाळेतून विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण मिळावे इतकी माफक अपेक्षा आहे ! नसलेली दुःखे त्यांच्या डोक्यामध्ये घालून त्यांच्या सुखी जीवनाचा विध्वंस करू नये इतकीच काळजी शाळा चालकांनी घ्यायची आहे .
या मुलांचे सामर्थ्य अपरंपार आहे ! तुम्ही शिकविले नाही तरी नर्मदा मैया त्यांना खूप काही शिकवतेच आहे ! अशी स्वयंअध्ययनातून घडलेली तेजस्वी एतद्देशीय पिढीच देश तारू शकते . परदेशी विचारांच्या शिळ्या शिक्षणावर पोसलेली आंग्लभाषाबटीक पिढी फार फार तर अन्य देशांचा तथाकथित उद्धार करेल !
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे झाले तर
जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।
हा व्यर्थ भार विद्येचा !
तिच्या अर्थात भारतमातेच्या उद्धारासाठी कामाला येणार नसेल तर माझे उच्चशिक्षण , सारे व्यर्थ आहे !
गुणसुमने मी वेचियली या भावे ।
की तिने सुगंधा द्यावे ।
माझ्या गुणांच्या सुगंधाने माझी मातृभूमी सुगंधित व्हावी यासाठीच हा गुणसमुच्चय आहे !
इनेश हा तरुण मला खूप आवडला . त्याचा परिसराचा देखील चांगला अभ्यास होता . मुख्य म्हणजे तो स्वतःच्या मेंदू ने विचार करणारा मुलगा होता . याने दिलेला काळा चहा अप्रतिम होता . सकाळपासून चालून आलेला थकवा या चहाने पळून गेला . मी निघाल्यावर याने त्याच्या फोनवर माझ्यासोबत फोटो काढला आणि मित्राच्या फोनवर पाठवून दिला .
महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मराठी बोलणारा जो पहिला युवक भेटला त्या इनेश खेरसिंग पावरा सोबत प्रस्तुत लेखक धावडी गावामध्ये . उन्हाचा तडाखा आपल्या लक्षात येईल . मागे दिसणाऱ्या डोंगराच्या उंचीवर मला जायचे होते . हा निंबालपाडा होता .
याच गावातील अजून दोन तरुण मला इथे आवर्जून येऊन भेटले . . पुढे मी निघून गेल्यावर त्यांनी इनेश कडून माझ्या मित्राचा क्रमांक घेतला आणि त्याच्यावर दोन फोटो पाठवून दिले ते देखील खाली जोडत आहे .
हा इथल्या आदिवासींचा उत्सवाचा फेटा आहे . रंगीबेरंगी झालर डोक्याला गुंडाळलेले लोक सर्वत्र दिसतात . डावीकडचा पेवसिंग आहे आणि उजवीकडचा निर्मल आहे . दोघेही भाबरीचेच आहेत .या दोघांशी देखील भरपूर गप्पा मारल्या .
भंगुरई सणाची गावामध्ये सुरू असलेली लगबग . सुंदर नक्षीकाम केलेली दिमडी . ही टिमकी सारखी काडीने वाजवायची इथे पद्धत आहे . निर्मल गावचा हिरो आहे ! इथल्या मुलांच्या केशरचना मजेशीर असतात . साध्या कात्रीने एकमेकांचे केस मुले कापतात .
इथून मी इनेश चा निरोप घेतला आणि पुढे निघालो .डोंगरातून जाताना मला आलेला एक हृदयस्पर्शी अनुभव सांगायचाच राहिला . भादलच्या पुढे रस्त्याचे काम सुरू आहे . जिथे अजिबात रस्ता नाही असा डोंगर फोडत पोकलेन मशीन हळूहळू पुढे सरकत होते . दुरून पाहिल्यावर मला तिथे एक विचित्र प्रकार दिसला म्हणून मी त्या यंत्राजवळ गेलो . दोन छोटी मुले जी मोठमोठ्याने रडत होती दिसेल तो दगड उचलून जेसीबी वर फेकत होती . मी चॉकलेट घेऊन त्यांच्या दिशेने गेलो . परंतु मला पाहून ती अजूनच घाबरली आणि वेगाने दरीमध्ये उतरली . दोघेही पूर्ण उघडे होते . एकाचे वय सहा वर्षे तर एक आठ वर्षाचा असेल . मला पाहून त्यांनी अजून खोल दरीमध्ये उतरू नये म्हणून मी त्यांच्यापासून लांब गेलो . त्यांनी पुन्हा दरीतूनच जेसीबी वर दगड फेकायला सुरुवात केली . त्यांच्या त्या इवल्याशा दगडाने त्या राक्षसी यंत्राला काहीही फरक पडत नव्हता . परंतु नक्की काय प्रकार झाला आहे हे जाणून घेण्यासाठी मी जेसीबी जवळ गेलो आणि चालकाला यंत्र थांबवण्याची सूचना केली . तो देखील मशीन बंद करून लगेचच बाहेर आला . आणि माझ्याशी चक्क मराठी मध्ये बोलू लागला . हा धुळ्याचा मुलगा होता आणि चालक म्हणून या यंत्रावर इथे आला होता . धडगाव पासून भादलला जोडणारा रस्ता बनविण्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून चालू होते . त्याची कारवाई हा बिचारा करत होता . त्याने मला सांगितले की चार-पाच किलोमीटर ही मुले त्याच्या मागावर आहेत . आणि अखंड दगडांचा वर्षाव करत आहेत . हा मुलगा आदिवासी असल्यामुळे त्याला मुलांची भाषा देखील कळत होती . मी त्याला सांगितले की त्याने पावरी भाषेत बोलून मुलांना जवळ घ्यावे आणि त्यांना काय होते आहे विचारावे . त्याच्याजवळ मुलांना देण्यासाठी खाऊ सुद्धा दिला . त्यांनी खाऊ तर घेतला नाहीच परंतु ते त्याला म्हणू लागले , " आमचा डोंगर तू का खातो आहेस ? आमच्या डोंगराला तू भोक का पाडतो आहेस ? आम्ही तुला उचलून फेकून देऊ ! " पहा !
कशी आहे आदिवासींची निसर्गाप्रती निष्ठा ! आपण ज्या डोंगरावर राहतो , ज्याच्यावर खेळतो बागडतो त्याला कोणी ओरखडे मारतो आहे या कल्पनेनेच त्या मुलांना दुःखावेग आलेला होता . निसर्गावर इतके प्रेम करणाऱ्या या आदिवासींना नर्मदा मातेने भाऊ न मानावे तर काय मानावे ! मला त्या मुलांचे खूप कौतुक वाटले . मी त्या मुलाला काही काळ काम थांबवण्यास सांगितले . आणि त्या मुलांची क्षमा मागण्यास देखील सांगितले . अर्थातच हे सर्व आपल्या मानवी वृत्तीला लक्षात घेता खोटेच होते ! परंतु तरीदेखील ती मुले रडत रडतच परतली . या एका घटनेने मला आदिवासी आणि निसर्ग यांच्यातले अतूट नाते जे कळले ते हजारो पुस्तके वाचून कळले नसते . आपण ज्याला विकास म्हणतो तो खरोखरच विकास आहे का ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे . बाह्य संकल्पनांचे अनुशीलन आणि अनुकरण करताना आपण त्यातला आपला गाभा सोडता कामा नये . अन्यथा ते अंधानुकरण ठरेल . इथे बनविलेल्या रस्त्याने आदिवासी कोठेही जाणार नसून "लँड माफिया " मात्र आवर्जून आपल्या उंची गाड्यातून येथे येणार आहेत आणि जमिनींचे सौदे करणार आहेत .आपण नक्की कुठल्या दिशेने जातो आहोत याचे आत्मचिंतन काही ठराविक काळाने पुन्हा पुन्हा करणे अत्यंत अत्यावश्यक आहे ते याचसाठी .असो .
डोंगर चढून सपाटीवर आलो . हेच खप्पर माळचे पठार होते . इथून संपूर्ण शूलपाणीचा परिसर अतिशय सुंदर दिसत होता . इथून पुढे अजून एक खूप मोठा आणि उंच कठीण डोंगर चढायचा होता . त्यानंतर उतार चालू होणार होता . परंतु तो चढण्याची शक्तीच अंगात उरलेली नव्हती . प्रचंड भुकेची आग पोटात पडलेली होती . एका झोपडीतून एक म्हातारा बाहेर आला . आणि मला खुणेनेच त्याने जवळ बोलावले . मला आत मध्ये बसण्याची सूचना केली . म्हातार बुवांचे डोळे अतिशय करारी होते . नजर भेदक होती . झुपकेदार मिश्या होत्या . सडसडीत देहयष्टी होती . फक्त एक चट्ट्या पट्ट्याची चड्डी घातलेली होती . नजर सांगत होती की हा मनुष्य सामान्य नाही . असामान्य आहे . "नर्मदे हर महाराज " मी म्हणालो . " किती मूर्ती आहेत ? " मराठीत आलेल्या प्रश्नामुळे मी खुश झालो . " मी आणि मैया आम्ही दोघेच आहोत "मी उत्तरलो . म्हातारबुवा काही केल्या हसत नव्हते . त्यांचा चेहरा खरोखरच कृद्ध होता ! आयुष्यभराच्या अनुभवाच्या सुरकुत्या त्या करारी चेहऱ्याला समृद्ध करत होत्या . भेदक नजर समोरच्या माणसाची न बोलताच परीक्षा करत होती. फोदला मामांनी स्वतः तीन वर्षे तीन महिने तेरा दिवसांची नर्मदा परिक्रमा केलेली होती . त्यामुळे परिक्रमावासींचे जीवन कसे असते याची त्यांना चांगली कल्पना होती . त्यातूनच त्यांनी वाटेने जाणाऱ्या परिक्रमावासींना सेवा देण्यास सुरुवात केली . यांचा आवाज अत्यंत करारी , थोडीशी उद्दाम भासू शकेल अशी भाषा , इथल्या परिसरातील भाषेमध्ये सहजपणे उगवलेल्या शिव्या , परंतु अत्यंत निर्मळ मन असा एकंदरीत प्रकार होता . यांच्या मिशा आणि शरीर यष्टी पाहून राहुन राहुन भिडे गुरुजींची आठवण यायची . अगदी तशीच अंगकाठी आणि ठेवण होती . यांचा मुलगा दिनेश म्हणून होता . नंतर तो मला भेटला . मी घरी गेलो तेव्हा फोदला मामा एकटेच घरी होते . त्यांनी मला एक कडक आणि अतिशय मोठी ज्वारीची भाकरी आणून दिली . त्यावर लाल मिरचीच्या वाटलेल्या तिखटाचा गोळा आणि सुकी रानभाजी दिली . दिवसभर चालून थकलेल्या शरीराला ते अन्न अक्षरशः अमृता समान भासले ! फोदला मामा अतिशय गरिबीत राहत होता . तरीदेखील आपल्या घासातला घास परिक्रमावासीला आवर्जून देत होता . हे करण्यासाठी फार मोठे काळीज लागते . आज तरी मी एकटाच होतो . परंतु एरवी इथे खूप मोठ्या संख्येने परिक्रमा वासी येतात . त्यातील कोणालाही फोदला मामा उपाशी जाऊ देत नाही . अलीकडेच दिनेश शी माझा पुन्हा एकदा संपर्क झाला आणि त्याने माझ्या विनंतीवरून त्याच्या घरातील सेवेचे काढलेले काही फोटो मला पाठवले . ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
अत्यंत भेदक नजर असलेले फोदलामामा गारद्या पावरा . ग्राम भाबरी / धावडी खप्परमाळ महाराष्ट्र
दिनेश फोदला पावरा . हा मामांचा मुलगा .अतिशय हुशार आहे आणि उत्तम मराठी बोलतो .
बीए पर्यंत शिक्षण झाल्यामुळे परदेशी परिक्रमावासींशी सुद्धा तो तोडका मोडका संवाद साधू शकतो ! होय परदेशातील अनेक लोकांनी आतापर्यंत नर्मदा परिक्रमा केलेली आहे ! जागो भारत जागो ! हा अमेरिकेतील एक परिक्रमा वासी होता .
माझी भाकरी खाऊन झाली . तोपर्यंत दिनेश तिथे आला . माझ्या परिक्रमेची व्यवस्थित चौकशी त्याने केली . त्याच्या मोबाईलवर त्याने आमच्या तिघांचा एक फोटो काढला . घरी आलेल्या परिक्रमावासींचे अधून मधून तो फोटो काढत असायचा . त्याप्रमाणे माझ्याबरोबर देखील एक आठवण म्हणून त्याने फोटो काढला .
माझ्याकडे तो फोटो पाठवणे त्याला शक्य नव्हते कारण खप्परमाळा चा उंच पहाड चढल्याशिवाय इथे रेंजच येत नाही . त्यामुळे मी त्या फोटोचा नाद सोडून दिला होता . परंतु परवा अचानक दिनेशने कुठून तरी माझा क्रमांक मिळवला आणि मला फोन केला . तो नोकरी शोधण्यासाठी सध्या पुण्यामध्ये आलेला आहे . त्यानंतर त्याने मला सर्व फोटो ई-मेल केले . आपल्या माहिती करता ते फोटो सोबत जोडत आहे .
मामांची काटक तब्येत पहा !
दिनेशच्या ई-मेल ला मी केलेला रिप्लाय . याच्या पलीकडे या कुटुंबाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही .
दुर्दैवाने दिनेशने फोनवर एका अतिशय दुःखद बातमी दिली . त्यादिवशी आमचे हे फोटोसेशन चालू असताना दिनेशची आई तिथे आली . मी जी भाकरी खाल्ली होती ती याच माऊलीच्या हातची होती . तिच्या हाताची चव त्या भाकरी मध्ये उतरलेली होती . मी त्यांना पायावर डोके ठेवून नमस्कार केला होता . दिनेशने सांगितलेली बातमी ऐकली आणि माझे मन सुन्न झाले . महिन्याभरापूर्वीच या माऊलीचे खप्परमाळ येथेच रक्ताच्या उलट्या करीत दुःखद निधन झाले . त्यांना टी बी झाला होता . इथे कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा पोहोचू शकत नाही . साधी मोबाईलची रेंज यायची असेल तर एक फार मोठा पहाड चढून जावे लागते . तेव्हा कुठे ठराविक टोकावर पोहोचले की एक काडी रेंज येते . अशा परिस्थितीमध्ये त्या माऊलीवर कुठलाही उपचार फोदला मामा करू शकले नाहीत . ज्या नदीतून मी वर आलो होतो तिथेच खाटेवर बांधून देह नेला जातो आणि हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात . जो चढ एकट्याने चढताना माझे पाय लटलट कापत होते तो उतार चौघेजण खाटेवरचा जड देह घेऊन कसे उतरत असतील ? फक्त कल्पना करून पहा .म्हणजे तुम्हाला हे आदिवासी कुठल्या पदार्थाचे बनले आहे त्याची कल्पना येईल .
मला ही बातमी ऐकून आतोनात दुःख झाले . ही माऊली अतिशय खंबीरपणे परिक्रमा वाशींची सेवा करत असे . दिनेशने मला पाठवलेले खालील फोटो पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे दोघे मिळून किती सेवा करत होते .
फोदला गारद्या पावरा यांचे साधेसुधे घर पहा . घरात कपाट नसून एका बांबूवर कपडे टाकलेले आहेत आणि त्यावर दव पडू नये म्हणून प्लास्टिक अंथरले आहे . समोर ठेवलेली बाज स्वतः घरीच तयार केलेली आहे . घराच्या सारवलेल्या जमिनीवर सुंदर असे नक्षीकाम यांनी स्वतःच केलेले आहे . या घरामध्ये काहीच नाही . फक्त नर्मदा परिक्रमा वासींचे आतोनात अगत्य आहे .
भोजन प्रसादी वाढून देखरेख करताना फोदला मामा
फोदला मामांच्या कुटीमध्ये विसावलेले साधू संत
हीच ती माऊली जिने अक्षरशः हजारो लाखो परिक्रमा वासींवर तिच्या उपकारांची आणि कृपेची सावली धरली होती .तिच्या अवेळी निघून जाण्याने फोदला मामांचा खंबीर आधार हरपला आहे .
आपणास खरोखरीच या कुटुंबाच्या मार्फत नर्मदा परिक्रमा वासींना काही अन्नदान वगैरे मदत करायची असेल तर मामांच्या जी पे क्रमांकावर संपर्क साधावा . माझ्या वहीमध्ये मी तो लिहून घेतला होता . आपणही नोंदवून ठेवावा .
यातील पहिला क्रमांक GPay वर आहे असे मला दिनेशने सांगितले . रेंज नसल्याने इथे फोन लागत नाही याची कृपया नोंद घ्यावी . दिनेश चा क्रमांक देखील सोबत देत आहे . त्याची पत्नी व अडीच वर्षाचा मुलगा गावीच राहत आहेत .मी घरी गेलो तेव्हा ते लेकरू सहा महिन्याचे होते !
जी पे क्रमांक :७४४७७२१४९१ (7447721491)
फोदला गारद्या पावरा : ६३५६४८५८७५ 6356485875
निलेश फोदला पावरा : ९४२२९२५२८४
+91 94229 25284
फक्त मदत केल्यावर ती भाबरीमध्ये पोहोचेल याची दक्षता घेण्याची विनंती करावी . किंवा आज-काल नंदुरबार मार्गे या गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे असे कळते . तोरणमाळ मार्गे येथे गाडीने जाता येते . किंवा अजून एका प्रकारे आपण यांना मदत करू शकतो . या भागामध्ये अतिशय सुंदर असा धूप किंवा गुग्गुळ मिळतो . रानावनामध्ये फिरून हा डिंक गोळा करावा लागतो . दिनेश कडे कायम हे गुग्गुळ विक्रीसाठी उपलब्ध असते . आपण ते विकत घेऊन घरी किंवा जवळपासच्या मंदिरामध्ये किंवा आपल्या आप्तेष्टांना वाटू शकतो . पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था दिनेश करू शकतो असे मला त्याने त्या दिवशी सांगितले होते . हा लेख लिहीत असतानाच दिनेश पावरा याची पुण्यामध्ये भेट झाली ! कामाच्या शोधासाठी तो पुण्यामध्ये आलेला आहे . त्याने अजून एक भयप्रद बातमी दिली . अतिशय निवडून पारखून त्याने २१००० रुपयाचा एक सुंदर बैल आणला होता जो नुकताच पट्टेरी वाघाने दावणी सह तोडून पळवून नेला . त्यामुळे त्याला मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे . त्यात आईच्या जाण्यामुळे परिस्थिती थोडीशी नाजूक आहे .
आपल्या घासातला घास अत्यंत विषम परिस्थितीमध्ये परिक्रमावासींना भरविण्याचे मोठे काम हे कुटुंब करत आहे .
सुदैवाने दिनेशने योग्य वेळी माझ्याशी संपर्क केला त्यामुळे ही सर्व छायाचित्रे आपल्याला दाखवू शकलो . मैयाची लीला अपरंपार आहे . केशरी लुंगी गुंडाळलेले फोदला मामा आणि त्यांच्या शेजारी लाल शाल गुंडाळलेली ती माऊली . समोर दिनेश ची भावंडे . ही एकूण आठ भावंडे आहेत .
हे घर पूर्णपणे सार्वजनिक झालेले आहे . इथे यांचे स्वतःचे काहीही नाही . सर्व काही परिक्रमा वासींसाठीच आहे .
सकाळी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणारे परिक्रमावासी . गमतीचा भाग असा आहे की इथून पुढचा टप्पा हा नर्मदा परिक्रमेतील सर्वात कठीण टप्पा आहे . व तो पार केल्या केल्या महाराष्ट्राकडे जाणारी डांबरी सडक लागते . इथून बरेचसे परिक्रमा वासी आपापल्या घरी निघून जातात . परंतु फोदला मामाला मात्र अशा सर्वांची देखील सेवा करावीच लागते !
फोदला मामाच्या कुटीमध्ये विसावलेले परिक्रमा वासी . स्वतः मात्र त्यांच्या सेवेमध्ये तत्परपणे उभा असलेला मामा . स्वतःची सुंदर अशी परिक्रमा झालेली असल्यामुळे खरे तर हे सर्व करण्याची त्यांना काहीही गरज नाही . परंतु हा महात्मा हे पुण्याचे काम करत आहे हे आपले सौभाग्य आहे !
मुलांच्या मागे उतरत्या छपराची कुटी दिसते आहे ती पाहून ठेवा . इथेच मी माझे सामान ठेवले होते .
निघताना दिनेशने या कुटीमध्ये माझा फोटो काढला . अचानक मागून फोदला मामा खिडकीमध्ये प्रकट झाला . त्याची भेदक नजर पाहून तुमच्या लक्षात येईल की पूर्वी हेच भिल्ल लोक धनुष्यबाण घेऊन अशा भेदक नजरेने समोर आल्यावर परिक्रमावासींची भितीने काय गाळण उडत असेल !
कडकडीत दुपार झालेली होती . इतक्या गरीब गृहस्थीला आपल्या मुक्कामाचा त्रास द्यायला नको असा विचार करून मी सामान उचलले आणि पुढे निघालो . फोदला मामाने मला डोंगरावर चढण्याचा रस्ता कसा आहे व त्यात काय काय धोके आहेत हे नीट समजावून सांगितले . दिनेशने जाता जाता त्याचे छोटेसे दुकान मला दाखवले . गुग्गुळ देखील पाहिला . त्याच्या सहा महिन्याच्या बाळासाठी खाऊ आणि यथाशक्ती काही मैय्याचा प्रसाद ठेवून डोंगर उरावर घेतला . हा पहाड मला वाटला त्याच्यापेक्षा अधिक भयंकर निघाला ! म्हणतात ना दुरून डोंगर साजरे ! आज मैय्याने माझ्यासाठी काय परीक्षा मांडून ठेवली आहे याची मला कल्पनाच नव्हती . ती रात्र लक्षात राहिली . . .
लेखांक त्र्याऐंशी समाप्त (क्रमशः )
परिक्रमेला गर्भवासाची उपमा अतिशय ह्रद्य आहे.नर्मदामैय्याचा महिमा अपरंपार आहे.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर वर्णन आहे परिक्रमेचे..
उत्तर द्याहटवातुमच्याबरोबर माझी ही मानस परिक्रमा सुरू आहे असे वाटते. ब्लॉग वाचताना दुसर्या विंडो वर नर्मदा परिसराचे map open केले की अशी परिक्रमा ही अनुभवता येते. खूप सुंदर अनुभुती आहे ही. खूप खूप धन्यवाद आणि असेच वर्णन लिहिण्यासाठी शुभेच्छा 👍👍
माझ्या मुलाने मागच्या वर्षी पायी परिक्रमा केली होती. त्याने त्याचे लोकेशन मला शेअर केलेले होते.
हटवातो सकाळी उठला की मी गुगल मॅप उघडून बसायचो. ५० फूट उंचावरून मार्ग आखत रहावयाचो. वाटेत लागणाऱ्या सर्व देवळांचे आश्रमांचे फोटो पाहात रहावयाचो. मुलगा मुक्कामी पोहोचला की मग संगणक बंद करायचो. खरच वेगळा अनुभव होता तो.
प्रत्यक्ष परिक्रमेचा अनुभव केवढा मोठा असेल याची कल्पनाच करता ये नाही.
आपल्या चिरंजीवांच्या कर्तुत्वाला आणि आपल्या दातृत्वाला साष्टांग दंडवत ! शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी !
हटवा