लेखांक ६३ : ब्रिजेश बिश्नोईचे अश्व आणि किशनगोपाल यादवचे ताक
जंगलातील मार्ग पकडला आणि झाडांवर दिसणारे बाण बघत चालायला सुरुवात केली . इथे परिक्रमा वासींना सोयीचे जावे म्हणून बरेच ग्रामस्थ काहीतरी खाणा खुणा करून ठेवत असतात . कधी झाडांना झेंडे लावतात कधी काटेरी फांद्यांमध्ये चिंध्या अडकवतात तर कधी असे बाण ठोकतात .
इथून जवळच बीवर गुफा अर्थात जमिनीखाली असलेल्या विवरातली मोठी गुहा आहे . इथे अनेक लोक दर्शनासाठी जात असतात . परंतु मी आता नाव बंद होण्याच्या आत समुद्र गाठण्याच्या तयारीला लागलो होतो .तरीदेखील त्या गुहेबद्दल मी सगळी माहिती स्थानिक लोकांकडून मिळवली . तशीच एक गुहा जवळपास होती ती देखील मला एकाने दाखवली परंतु ती खूपच लहान होती .
बावर च्या बीवर गुहेत शिरण्याचा भयप्रद मार्ग
पर्यटकांची आणि भक्तांची इथे कायम गर्दी असते
" बावर बीवर " सोडून मी पुढे निघालो . आता वेगाने चालत खिरकिया हे गाव गाठायचे हे डोक्यात होते . या नावाचे रेल्वे स्टेशन येताना लागले होते . तसेच इथे धुक्यामुळे रेल्वे न दिसल्यामुळे रेल्वे खाली येऊन एक परिक्रमा वासी 'खतम ' झाला अशी अफवा देखील उत्तर तटावर असताना ऐकली होती .
या गावांमध्ये जाण्यापूर्वी चौकडी नावाचे गाव लागते .इथे रजनीश बिश्नोई नावाच्या एका सद्गृहस्थाने मला आवाज दिला . आणि चहा पिण्यासाठी घरी बोलावले . अंगणातच त्याने मला बसण्यासाठी आसन दिले .
या गावांमध्ये जाण्यापूर्वी चौकडी नावाचे गाव लागते .इथे रजनीश बिश्नोई नावाच्या एका सद्गृहस्थाने मला आवाज दिला . आणि चहा पिण्यासाठी घरी बोलावले . अंगणातच त्याने मला बसण्यासाठी आसन दिले .
नर्मदाभक्त श्री रजनीश बिश्नोई चौकडी खिरकया
बोलता बोलता त्याचे नाव बिश्नोई आहे कळल्यावर मी त्याला सांगितले की परिक्रमे मध्ये मला अमरकंटकच्या अलीकडे ब्रिजेश बिश्नोई नावाचा एक परिक्रमावासी भेटला होता . तो नेमका याचा चांगला मित्र व लांबचा नातेवाईकच निघाला . रजनीशने लगेचच ब्रिजेश ला फोन लावला . मी तिथे आलो आहे हे कळल्याबरोबर ब्रिजेशने मला सांगितले की आता मी पुढे जायचे नाही तो मला भेटायला येतो आहे . कारण त्याचे गाव इथून जवळच होते . ब्रिजेश बिश्नोई याने त्याचे गाव हारदा आहे इतकेच मला सांगितले होते परंतु बाकीची माहिती त्याने सांगितली नव्हती . याच्या गावाचे नाव सालाबेडी असे होते . महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर अमरावती नजीक सालबर्डी नावाचे एक गाव आहे . मला अशा एकसमान गावाच्या नावांची फार मजा वाटते . असो . थोड्याच वेळात खरोखरच ब्रिजेश आला . याने आल्या आल्या मला नमस्कार केला आणि कडकडून मिठी मारली ! त्याला मला भेटून आतोनात आनंद झाला होता . आता इथून असाच घरी चल म्हणून तो माझ्या मागे लागला .परंतु परिक्रमेच्या नियमानुसार मैयाला घेऊन उलटे चालायचे नसते . ब्रिजेशच्या स्वतःच्या तीन परिक्रमा झाल्या होत्या . माझी ही पहिलीच परिक्रमा सुरू होती . कधी पूर्ण होईल किंबहुना पूर्ण होईल का नाही ते देखील मला माहिती नव्हते . त्यामुळे तो सांगेल ते ऐकणे मला भाग होते . त्याने सांगितले की परिक्रमेचा नियम असा आहे की नर्मदा मातेची कुपी एखाद्या ठिकाणी स्थानापन्न करून तुम्ही आजूबाजूला फिरू शकता तिथे तुम्हाला परिक्रमेचे नियम लागू होत नाहीत . परंतु जिथे मैय्या ठेवली आहे तिथपासून पुढे पुन्हा तिला घेऊन मात्र तुम्हाला चालावेच लागते . त्याने मला सांगितले की तुझे सर्व सामान आणि नर्मदा माता इथे रजनीशच्या घरी देवघरामध्ये ठेव . त्याला कोणीही हात लावणार नाही व ते सर्व साहित्य सुरक्षित राहील . आपण पटकन माझ्या घरी जाऊन परत येऊ . त्याप्रमाणे मैयाची क्षमा मागून तिला रजनीश बिश्नोई च्या देवघरात स्थापन करून ब्रिजेश सोबत निघालो . आता तुम्ही म्हणाल की इतके काय महत्त्वाचे काम लागले होते यासाठी मला जावे लागले ? तर ब्रिजेशने शंभू आणि भोला नावाचे दोन नवीन अश्व घेतले होते . ते दाखवण्याकरता तो मला घेऊन जात होता . हे दोन्ही अश्व अजून त्यांच्या घरी फारसे रुळलेले नसल्यामुळे सांभाळताना थोडा त्रास देत होते . ब्रिजेशला माझ्याकडून उत्तर हवे होते की हे अश्व ठेवावेत की विकावेत . त्यासाठी ते मला दाखवणे आवश्यक होते . हा विषय त्याने मागे आम्ही त्याची परिक्रमा चालू असताना भेटलो होतो तेव्हा देखील सांगितला होता . हा तोच गट होता जे सहा जण , सोबत आणलेल्या एका पंडित जी च्या गाडीवर सर्व सामान लादून स्वतः रिकामे चालत असत . त्यामुळे यांच्या पायांना जबरदस्त गती होती . जोगी टिकरिया या गावापासून आम्ही विलग झालो होतो . इथे मी रस्त्यावर चालताना ब्रिजेश बिश्नोई याने माझा एक व्हिडिओ सुद्धा घेतला होता . त्याचा दुवा आपल्यासाठी टाकत आहे .
यात प्रस्तुत लेखकाची जी चाल दिसते आहे त्याच्यापेक्षा बरोबर दुप्पट वेगाने बिश्नोई कुटुंबीय चालत असत . त्यांच्यापैकी ब्रिजेश सर्वात उंच होता . तसेच तो शालेय जीवनापासून खेळाडू राहिला होता . त्यामुळे त्याची चाल अधिकच वेगवान असायची . असो .
घरी गेल्याबरोबर त्याने त्याचे दोन्ही अश्व मला दाखविले . याचा मोठा भाऊ आणि वडील देखील घोड्यांचे शौकीन होते . ते देखील आले . हे दोन्ही घोडे चावणारे किंवा चिडके आहेत असे त्याचे म्हणणे होते . परंतु मला मात्र त्या घोड्यांनी अतिशय प्रेम दिले . ते दोन्ही अश्व माझ्याशी प्रेमाने का वागत आहेत हे मी शास्त्रशुद्ध पद्धतीने या तिघांना सांगितले . दोन्ही घोडे फारच सुंदर होते . विकण्याचा प्रश्नच नव्हता . याच्याकडे एकूण तीन घोडे ,याच्या मामाकडे पाच घोडे आणि यांच्या शेजारील गावामध्ये प्रत्येक घरामध्ये दोन तीन , दोन तीन घोडे होते . निमगाव ,सालाबेडी , जांभळी ,चौकडी ,खिडकीया , गोयत ही सर्व गावे घोड्यांसाठी प्रसिद्ध आहेत असे मला ब्रिजेशने सांगितले . यातील गोयत गावातील जाट -बिश्नोई वादाचा मजेदार किस्सा मी तुम्हाला राणी घोडीच्या प्रकरणात सांगितलाच आहे . जाती व्यवस्था ही आपल्या देशापुढची समस्या नसून जातीभेदाचे पालन करणे ही खरी समस्या आहे . असो . यातील एक घोडा मालकांना फारसा प्रतिसाद देत नव्हता . मी साधारण दीड दोन तास त्यांच्या घरातील मोकळ्या अंगणामध्ये घोड्याला प्रशिक्षण दिले . बोलावल्यावर मालकाकडे जाणे ,थांब म्हटल्यावर थांबणे , चल म्हणल्यावर चालणे , लगाम न धरता मालकाच्या मागोमाग चालणे , नमस्कार करणे अशा बऱ्याच गोष्टी मी बघता बघता त्या सुरेख अश्वाला शिकविल्या . ब्रिजेशचे वडील आणि वडील बंधू हे सर्व बारकाईने आणि कौतुकाने पहात होते . त्यावेळी ब्रिजेश ने काढलेले काही फोटो आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
ब्रिजेश बिश्नोई सोबत प्रस्तुत लेखक त्याच्या घरी . ब्रिजेश अतिशय हुशार , नम्र , तेजस्वी , सहृदय ,धडपड्या व धडाडीचा तरुण होता . अन्य अनेक स्थानिक परिक्रमावास्यांनी मला घरी बोलवले होते . परंतु मी कोणाच्या घरी गेलो नव्हतो .
नवीन आश्वापुढे जाताना अचानक त्याला हात लावायचा प्रयत्न करू नये नाहीतर तो चावा घेतो किंवा लाथ घालतो . हळूहळू त्याच्या अंतःकरणाचा ठाव आपल्याला घ्यायचा आहे .
हे सर्व प्रकार करताना शंभू घोडा डोके मारायचा किंवा पाय मारायचा परंतु मला मात्र त्याने सर्व काही शांतपणे करू दिले .
शंभू माझा अंदाज घेत होता .अजूनही त्याची मान ताठ होती .आणि कान टवकारलेले होते . हे सर्व करताना अतिशय सावध राहावे लागते .कुठल्याही क्षणी तुम्हाला पळून जाता येईल अशी जागा आधीच हेरून ठेवायची असते .
वरील तीनही फोटो नीट पहा .घोड्याच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये एक भवरा असतो . माझी स्थिती न हलवता मी आधी त्या भवऱ्याच्या खाली ,मग भोवऱ्यावर आणि नंतर भवऱ्याच्या वर चुंबन घेतले आहे याचा अर्थ तितका घोडा खाली झुकतो आहे .
हाच तो क्षण असतो जेव्हा घोड्याला मोकळे सोडायचे असते . त्याला मोकळे सोडल्याबरोबर घोडा माझ्या मागोमाग लहान बाळासारखा चालू लागला . यापूर्वी त्याला मोकळे सोडले की तो संपूर्ण वाड्यामध्ये फिरून गोंधळ घालायचा. वाडा खूप मोठा होता . वाड्यामध्ये अजून घोडे आणि गाई म्हशी गुरे होती .यांचे एकत्र कुटुंब होते . असा मस्ती करणारा घोडा इतर प्राण्यांना लाथा मारत सुटतो . अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांसाठी पण हे धोकादायक होते . मी हळूहळू त्याला संपूर्ण अंगण फिरवून आणले . मी त्याला अजिबात धरले नव्हते तो माझ्यामागे शेपटासारखा चालत होता . आता मी ब्रिजेशच्या बाबांना बाहेर बोलवले आणि त्यांना कडकडून मिठी मारली . खूप वेळ त्यांना मिठी मध्ये धरले . त्यांना हळूच कानात सांगितले की हलू नका तुम्ही सुद्धा माझ्या पाठीवरून हात फिरवा .शंभूला कळले पाहिजे की आपण दोघे मित्र आहोत . आणि मग बाबांना सांगितले की तुम्ही आता चालायला लागा . शंभुने माझ्याकडे पाहिले मी त्याला हाताने जा अशी खूण केल्याबरोबर तो बाबांच्या मागे चालू लागला . संपूर्ण वाडा बाबा फिरून आले आणि त्यांच्या मागे शंभू चालत राहिला . हा प्रकार पाहून त्यांना अतिशय आनंद झाला ! याच गुणी घोड्याला ते विकायला निघाले होते . प्राणी चांगले किंवा वाईट नसतात . आपण त्यांच्याशी कसे वागतो त्यानुसार त्यांचे वागणे बदलते . माणसांची तऱ्हा तरी काय दुसरी आहे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात पेरीले ते उगवते । बोलण्यासारखे उत्तर येते । तरी मग कर्कश बोलावे ते ।काये निमित्ये ।।
घोड्याची सतत चाबूक फटके आणि आरडाओरडा या स्वरूपात संवाद साधला तर तो तुम्हाला लाथाच घालणार . नशीब या प्राण्यांना माणसासारखी शत्रुत्वाची टिकाऊ स्मृति नसते . तिथून आम्ही आमचा मोर्चा भोला कडे वळवला . हा तर नुसता नावाचा भोला आहे . पक्का डँबीस आहे ब्रिजेश मला सांगू लागला .
प्रत्येक मनुष्याचा स्वभाव वेगळा असतो अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक अश्वाचा देखील वेगळा स्वभाव असतो आणि प्रत्येकाला हाताळताना वेगळी वेगळी पद्धत अवलंबावी लागते .
हळूहळू त्या द्वाड भोलाला देखील मी माझ्या टप्प्यामध्ये आणला .
त्याच्याकडे माझे लक्ष नाही असे दाखवत मी त्याला व्यवस्थित हाताळत राहिलो . पहिल्याच भेटीत नवीन माणसाला घोडा इतक्याजवळ कधीच येऊ देत नाही . त्यासाठी अश्व मानसशास्त्राचा अभ्यास आणि खूप घोडे हाताळण्याचा सराव याशिवाय दुसरा सोपा मार्गच नाही .
मस्ती करतो , डोके मारतो म्हणून भोलाला गळ्याला पट्टा बांधून ठेवलेले आहे पहा . त्या बंधनाच्या जवळ राहणे हे त्याच्यासाठी सुखाचे आहे . म्हणजे तो त्याचा कंफर्ट झोन आहे . शरण आलेला अश्व त्याचा कम्फर्ट झोन सोडून तुमच्या मागे यायला बघतो .सोबतच्या चित्रांचे निरीक्षण केल्यावर तुमच्या ते लक्षात येईल .
हे सर्व मुद्दाम तपशीलवार बारकाईने सांगतो आहे याचे कारण तुम्हाला लक्षात यावे की हे किती गहन शास्त्र आहे .
अर्थात आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे असेच आहे . तुम्ही जितक्या खोलात जाऊन अभ्यास कराल तितके ते शास्त्र तुम्हाला अधिक उलगडत जाते . आणि खरी मजा तेव्हा येते जेव्हा तुमच्या लक्षात येते की अशी अनेक खोलवर गेलेली शास्त्रे कुठे ना कुठे एकमेकांना पूरक ठरतात . म्हणजे उदाहरणार्थ अश्व मानसशास्त्राचा सखोल अभ्यास असलेला मनुष्य हा बाल मानसशास्त्रज्ञ देखील असू शकतो . कारण लहान मुलांची मानसिकता आणि घोड्याची मानसिकता यात खूप साम्य आहे . जेव्हा भोला किंवा शंभू अंगणात पळून उड्या मारायचे तेव्हा सर्वांना दहशत बसायची . परंतु ते दहशत माजवण्यासाठी पळत नसून लहान मुले जशी आनंदाने बागडतात त्यातला त्यांचा तो प्रकार असायचा . त्यांना रोज तो करू द्यावा असे मी सुचवले . त्यासाठी शेतामध्ये एखादे गोल पिट बनवावे अशी सूचना देखील केली . ओघानेच शेतात जाण्याचा विषय आला . ब्रिजेशच्या बंधूंची खूप इच्छा होती की मी शंभूला रेवाल नावाची घोड्याची एक चाल आहे ती व्यवस्थित शिकवावी . शेवटी घर ते शेत आणि शेत ते घर असे काही काळ मी शंभूला सुंदर रपेट करवली . माझ्यासोबत आत्ता मैय्याची शिशी अर्थात बाटली नसल्यामुळे हे करता येणे शक्य होते आणि शास्त्र संमत होते . शंभू आणि भोला हे फक्त ब्रिजेशच्या भावाचे ऐकायचे बाकी कोणाला ते दाद लागू देत नव्हते . मी अजूनही काही मौलिक सूचना या तिघांना केल्या . गोल पीट बनवण्याची जागा निश्चित केली . परिक्रमा संपली रे संपली की मी इथे येऊन कितीही दिवस राहावे आणि सर्व अश्वांना प्रशिक्षित करावे . मामांचे पाच अश्व देखील इकडे मागवून घेऊ . असे ब्रिजेशने मला सांगितले . दरम्यान शेतात येण्यापूर्वी घरी गरमागरम तुपाचा भडिमार असलेले अप्रतिम जेवण आग्रहपूर्वक त्यांनी मला खाऊ घातले होते . इतका आग्रह फार क्वचित पाहायला मिळतो . क्षमतेच्या वर भोजन केल्यानंतर मध्ये पुरेसा वेळ जाऊ न देता घोडेस्वारी केल्यामुळे माझ्या पोटाचे काय होणार याची मला कल्पना आलेली होतीच . कारण घोडेस्वारी हा पूर्णपणे पोटाचा खेळ आहे . घोडा चालवताना तुमच्या पोटाची जितकी हालचाल होते तेवढी अन्य कुठल्याही अवयवाची होत नाही . एखादा झेंडा फडकावा त्याप्रमाणे तुमच्या पाठीचा मणका फडकत असतो . त्यामुळे होणाऱ्या परिणामांची तयारी ठेवूनच हे सर्व केले होते . आज सुमारे सतरा अठरा किलोमीटर चालणे आणि ही घोडेस्वारी झाली होती . ब्रिजेशने पुन्हा नक्की या असे आग्रहाचे आमंत्रण देऊन मला चौकडीमध्ये आणून सोडले . आता रजनीशची पाळी होती ! तो ब्रिजेशचाच भाऊ ! त्याने देखील मला अतिशय आग्रह करून सुग्रास भोजन अक्षरशः आकंठ जेवू घातले !
या प्रेमाच्या अतिरेकाचा काय परिणाम होणार याची मला पुरेपूर कल्पना होती . रोज घोडेस्वारी करणाऱ्या माणसाला काही होत नाही .परंतु खूप दिवसांनी अचानक घोड्यावर बसले की पोटातील सर्व मळ फेकून देण्याची रचना कार्यरत होते . त्यात परिक्रमेमुळे मला भोजनाची शाश्वती आणि निश्चित वेळ राहिलेली नसल्यामुळे शरीराने एक ठराविक प्रमाणात मल कायम साठवून ठेवण्याची प्रवृत्ती धारण केली होती . तो रिझर्व स्टॉक आज ढवळून निघाला होता . त्यात ही दोन प्रमाणाबाहेर झालेली भोजने ! त्यामुळे उलटी किंवा जुलाब यातील एका मार्गाने सर्व बाहेर फेकणे शरीरासाठी क्रमाप्राप्त होते . आणि तेच झाले . न भूतो न भविष्यती असे जुलाब मला सुरू झाले ! नशिबाने मी नर्मदेच्या काठाने चालत नव्हतो . परिक्रमेचे सर्व नियम पाळताना तुम्हाला काहीही त्रास होत नाही . परंतु फक्त एकदा मैया पासून थोडेसे लांब गेलो की लगेच तिने झटका दाखवला ! पहाटे गरम पाण्याने स्नान केले . आणि खूप दिवसांनी पक्क्या बांधलेल्या संडासामध्ये डोल डोल करताना लक्षात आले की आजचा दिवस अवघड असणार आहे . चहा घेऊन पुढे निघालो . आजचा दिवस जुलाबांचाच होता . काही ठराविक अंतर गेलो की पोटात गडबड व्हायची आणि एखादी मोकळी मोक्याची आडोशाची जागा ,जिथे भरपूर पाणी आहे , अशी नेमकी शेजारी असायची . तसेही काल वाटेत एका माणसाने बुंदी खायला दिली होती ती थोडीशी खराब झालेली होती असे मला वाटले . परंतु जुलाब काही थांबायचं नाव घेईनात हे मात्र खरं . संपूर्ण परिक्रमेत प्रथमच हा त्रास मला होत होता . कारण संपूर्ण परिक्रमेत प्रथमच मी मैयाला थोडेसे अंतर दिले होते . या संपूर्ण वाटचालीमध्ये पाच ते सहा वेळा तीव्रतम जुलाब झाले . आज नेमकी वैष्णव एकादशी होती . त्यामुळे वाटेत कोणीही चहापाणी काहीही विचारत नव्हते . कडक उपवास आणि अखंड जुलाब यामुळे अंगातले सारे बळ निघून गेले आणि त्यात नेमके आजच संपूर्ण डांबरी रस्त्याने चालायचे होते .खिरकिया गावाचे रेल्वे फाटक ओलांडले . जबलपूर स्थानकाला येताना इथूनच माझी रेल्वे गेली होती हे मला आठवले . रेल्वेच्या काठाने सुद्धा इच्छा नसताना एक दोन डोलडाल घडल्या . उन्हाचा तीव्र कडाका जाणवत होता . पोटात अन्नाचा कण नव्हता . आणि उरलेसुरले सगळे जुलाबा वाटे निघून गेले होते . आता रेल्वेला समांतर असा एक मातीचा फुफाट्याचा रस्ता लागला होता . अंगातील बळ गेल्यामुळे एका सरळ रेषेत चालणे देखील मला अवघड झाले होते . मी मागे वळून माझी मातीत उठलेली पावले बघायचो तर ती एखाद्या दारुड्या सारखी आडवी-तिडवी उठलेली असायची . आता एक नवीनच प्रकार सुरू झाला . अचानक माझ्या जठरामध्ये ,आतड्यामध्ये आग लागली आहे असे वाटू लागले इतकी आग होऊ लागली . असे मला यापूर्वी कधी झाले नव्हते . पोटात भडकलेली ती आग वेदनादायक होती . डोक्यावर सूर्य आग ओकत होता . वेगाने चालत पुढचे गाव गाठावे किंवा एखादा आश्रम गाठावा आणि तिथे पडून राहावे असे ठरवून मी वेग वाढवू लागलो . परंतु पायातले संपूर्ण बळच निघून गेले होते . कालच एखाद्या शूरवीरा सारखा घोडेस्वारी करणारा मी आणि आज स्वतःच्या पायावर धड चालताही न येणारा मी ,ही माझी एकाच दिवसात झालेली अवस्था पाहून माझी मलाच दया आली . माझ्याकडे बिस्किटांचा पुडा होता .माझे एक मन मला सांगू लागले की जाऊ दे एकादशी वगैरे . ती बिस्किटे खा , म्हणजे पोटाला बरे वाटेल . बिस्किटांचा पुडा हातात घेतला . परंतु तेवढ्यात माझा निग्रह अजून पक्का झाला . मी विचार केला की देव आपली परीक्षा बघतो आहे . सर्व काही सुरळीत असताना नियम कोणीही पाळेल . परंतु विपरीत परिस्थितीमध्ये नियम पाळण्याला विशेष महत्त्व आहे . त्यामुळे मी ती बिस्किटे खाल्ली नाहीत . आणि तसाच पाय खरडत चालू लागलो . तसे चालणे फार काही कष्टदायक वाटले नसते .परंतु अखंड जुलाब होत असल्यामुळे शरीरातील सगळे प्राणच निघून गेले होते . त्यात परिक्रमेमध्ये शौचसंमार्जन किंवा लघुशंका केल्यावर काय काय करून मग नर्मदा मातेची पिशवी पुन्हा धारण करायची याची कडक नियमावली ठरलेली आहे .ती सर्व मी कायम पाळत असे . त्यामुळे स्वच्छ हातपाय धुवून प्रतिकात्मक स्नान करून मगच पुढे जावे लागायचे . आश्चर्य म्हणजे हा रस्ता इतका निर्मनुष्य होता की आजूबाजूला कोणीही दिसत नव्हते . आता पोटातील आग तोंडातून बाहेर पडते की काय असे वाटू लागले . मी मनापासून नर्मदा मातेचा धावा केला . नर्मदे हर ! मैया चुकलो ,मला क्षमा कर ! काल तुला एकटीला ठेवून मी ब्रिजेश कडे जायला नको पाहिजे होते . मला माफ कर . पुन्हा अशी चूक करणार नाही . हौसे खातर परमेश्वर अंतरलेला परवडणार नाही . नर्मदे हर !नर्मदे माझी पीडा हर !
इतक्यात माझ्या शेजारी एक सायकल येऊन थांबली . सायकल वरचा माणूस उतरला आणि त्याने सायकल मेन स्टैंड वर लावली . याच्या तोंडाला मास्क लावलेला होता . आणि या माणसाचे डोळे अतिशय सुंदर आणि पाणीदार होते . सायकलच्या मागच्या कॅरिअरला याने दोन किटल्या अडकवल्या होत्या . प्रत्येकी दीड ते दोन लिटर ची ती किटली असावी . मला तो म्हणाला , " बाबाजी अपना गिलास निकालो । बढीया मही पाओ ।" नर्मदा खंडामध्ये ताकाला मही म्हणतात . मला थोडासा संकोच वाटला . "आप मही बेचने के लिए ले जा रहे हो ना ? " मी विचारले . "अरे उसकी चिंता आप मत करो । हम ग्वाले है । दूध दही मही मे नहाते है । " "क्या नाम है आपका ? और कहा रहते है ?" उपजत चौकस बुद्धीनुसार मी त्याला प्रश्न केला . "हमरा नाम किसनगोपाल यादव है। वैसे हम इस रास्ते से कभी जाते नही । आज पता नही क्यू लगा इस रास्ते से जाते है ।और आप दिखे । " तोपर्यंत मी ग्लास काढला होता आणि त्याच्यामध्ये याने सुंदर असे दाट घट्ट ताक ओतायला सुरुवात केली . ताकावरती भरपूर लोणी देखील तरंगत होते . " खाओ खाओ ।माखन भी खाओ । इससे आपका पेट भी ठीक हो जायेगा । " ते ताक मी प्यायलो आणि अक्षरशः स्वर्गात पोहोचलो ! इतके सुंदर ताक मी आजवरच्या आयुष्यात प्यायलो नव्हतो ! काय ती चव ! काय तो स्वाद ! अक्षरशः मी अमृत पितो आहे असा मला भास झाला ! माझे पहिला पेला ताक गटागट पिऊन झाले ! त्या माणसाला खूप आनंद झाला ," और पीओ । जितना जी मर्जी चाहे पीयो ! " असे म्हणत त्याने पुन्हा ताकाचा पेला भरला . लोण्याचा एक मोठा गोळा पेल्यामध्ये पाडत तो म्हणाला , " बचपन मे हम ये माखन चुराके खाते थे । मैया पूछती । किसने माखन खाया ?
और हम कहते थे । मैने नही खाया ! " मला सुरदासाचे ते भजन आठवले आणि मी लगेच ती ओळ गायलो , " रे मैय्या मोरी , मै नही माखन खायो ! " दोघेही हसायला लागलो . ते अमृता समान लोणी आणि ताक पोटात गेल्यावर पोटाला एकदम थंडावा मिळाला . थंडपणाची ती लहर अगदी मेंदूपर्यंत गेली .त्याने आग्रहाने अजून थोडे ताक ओतले आणि म्हणाला , " मैया को कोई क्या फसाए ? मैय्या है वह । सब जानती है । उसको सब पता रहता है । अपना बेटा किधर क्या कर रहा है । " मी त्याचे मनापासून आभार मानले आणि बिस्कीट चा पुडा त्याला देऊ केला . तो नाकारत यादव म्हणाला , " मेरी एकादशी होती है । " ताकाची चव अजून तोंडातून जात नव्हती . पेल्यामध्ये तळाशी जमा झालेले दोन चार थेंब सुद्धा मी पुन्हा एकदा पिऊन घेतले ! आता पेला आणि पार्ले जी चा पुडा झोळी मध्ये ठेवावा म्हणून मी मागे वळलो आणि दप्तरामध्ये दोन्ही गोष्टी ठेवल्या . झोळी खांद्यावर घेतली आणि बघतो तो काय ! माझ्या आजूबाजूला समोर कोणीच नाही ! हा इतक्या वेगाने कसा काय निघून गेला असेल ? असा विचार करून मी धुळीने भरलेल्या रस्त्यावर त्याच्या सायकलच्या चाकांच्या खुणा दिसतात का पाहू लागलो . परंतु त्या संपूर्ण रस्त्यावर माझी एकट्याची पावले सोडून अजून कुठल्याही खुणा उठलेल्या नव्हत्या. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या . अरे किमान सांगायचेस तरी ! हृदयातून त्याने साद दिली . तुला सांगितले की रे ! तुझ्या लक्षात नाही आले ! आणि खरोखरच माझे पोट दुखते आहे हे अजून कोणालाच माहीत नव्हते ! याने पोटासाठी हे चांगले आहे हे कसे काय सांगितले असेल ? सारेच अनाकलनीय होते . परंतु जुलाबाने गळून गेलेले माझे शरीर पुन्हा एकदा ताजेतवाने , तरतरीत आणि जणू काही झालेच नव्हते असे निश्चितपणे झाले होते ! तोंडातली ती अमृताची चव अजूनही जात नव्हती ! मी पुन्हा एकदा पेला काढून पाहिला . त्याला ताकाचा जराही अंश चिकटला नव्हता आणि वासही येत नव्हता . एरव्ही ताकाचा वास व ओशटपणा कितीही भांडे घासले तरी जाता जात नाही . हा सर्व प्रकारच अगम्य होता . चालण्यासाठी दहा हत्तीचे बळ आल्यासारखे झाले . थोडे अंतर चालल्याबरोबर एकाने उपवासाचा चिवडा , द्राक्षे आणि केळी आणून दिली . ती न खाता तशीच ठेवून दिली . साक्षात अमृताची चव तोंडात होती .ती मला घालवायची नव्हती . कानामध्ये अखंड त्याचे आश्वासक स्वर घुमत होते , " मैय्या है वह । सब जानती है । "
और हम कहते थे । मैने नही खाया ! " मला सुरदासाचे ते भजन आठवले आणि मी लगेच ती ओळ गायलो , " रे मैय्या मोरी , मै नही माखन खायो ! " दोघेही हसायला लागलो . ते अमृता समान लोणी आणि ताक पोटात गेल्यावर पोटाला एकदम थंडावा मिळाला . थंडपणाची ती लहर अगदी मेंदूपर्यंत गेली .त्याने आग्रहाने अजून थोडे ताक ओतले आणि म्हणाला , " मैया को कोई क्या फसाए ? मैय्या है वह । सब जानती है । उसको सब पता रहता है । अपना बेटा किधर क्या कर रहा है । " मी त्याचे मनापासून आभार मानले आणि बिस्कीट चा पुडा त्याला देऊ केला . तो नाकारत यादव म्हणाला , " मेरी एकादशी होती है । " ताकाची चव अजून तोंडातून जात नव्हती . पेल्यामध्ये तळाशी जमा झालेले दोन चार थेंब सुद्धा मी पुन्हा एकदा पिऊन घेतले ! आता पेला आणि पार्ले जी चा पुडा झोळी मध्ये ठेवावा म्हणून मी मागे वळलो आणि दप्तरामध्ये दोन्ही गोष्टी ठेवल्या . झोळी खांद्यावर घेतली आणि बघतो तो काय ! माझ्या आजूबाजूला समोर कोणीच नाही ! हा इतक्या वेगाने कसा काय निघून गेला असेल ? असा विचार करून मी धुळीने भरलेल्या रस्त्यावर त्याच्या सायकलच्या चाकांच्या खुणा दिसतात का पाहू लागलो . परंतु त्या संपूर्ण रस्त्यावर माझी एकट्याची पावले सोडून अजून कुठल्याही खुणा उठलेल्या नव्हत्या. माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या . अरे किमान सांगायचेस तरी ! हृदयातून त्याने साद दिली . तुला सांगितले की रे ! तुझ्या लक्षात नाही आले ! आणि खरोखरच माझे पोट दुखते आहे हे अजून कोणालाच माहीत नव्हते ! याने पोटासाठी हे चांगले आहे हे कसे काय सांगितले असेल ? सारेच अनाकलनीय होते . परंतु जुलाबाने गळून गेलेले माझे शरीर पुन्हा एकदा ताजेतवाने , तरतरीत आणि जणू काही झालेच नव्हते असे निश्चितपणे झाले होते ! तोंडातली ती अमृताची चव अजूनही जात नव्हती ! मी पुन्हा एकदा पेला काढून पाहिला . त्याला ताकाचा जराही अंश चिकटला नव्हता आणि वासही येत नव्हता . एरव्ही ताकाचा वास व ओशटपणा कितीही भांडे घासले तरी जाता जात नाही . हा सर्व प्रकारच अगम्य होता . चालण्यासाठी दहा हत्तीचे बळ आल्यासारखे झाले . थोडे अंतर चालल्याबरोबर एकाने उपवासाचा चिवडा , द्राक्षे आणि केळी आणून दिली . ती न खाता तशीच ठेवून दिली . साक्षात अमृताची चव तोंडात होती .ती मला घालवायची नव्हती . कानामध्ये अखंड त्याचे आश्वासक स्वर घुमत होते , " मैय्या है वह । सब जानती है । "
लेखांक त्रेसष्ठ समाप्त ( क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक
दंडवत स्वीकारावा बाबाजी.. निशब्द झाले आहे.. फार फार पुण्यवान आहात.
उत्तर द्याहटवाForwarded to respective spirit
हटवाआम्हाला वाचतांना लक्षात आले की हा श्रीकृष्ण आहे. तुम्हाला भुरळ पडली. पण काय नशीब प्रत्यक्ष श्रीकृष्ण दर्शन झाले. तुम्हाला साष्टांग दंडवत.
उत्तर द्याहटवाForwarded to respective deity
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवासाष्टांग दंडवत मैयाला, गोपाळकृष्णाला आणि तुम्हालाही 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाNishabda 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाश्री गोपालकृष्ण भगवान की जय। नर्मदे हर। जय हो बाबाजी।
उत्तर द्याहटवापुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवाkhupach sundar anubhuti! Tumhi kharokhar bhagyavan ahat. Tumachya apar punyaimule ani sanchitamuleach atishay khadtar parantu titkich anubhutipurna parikrama tumachya hatun purna zali! Narmade Har!
उत्तर द्याहटवा