लेखांक ६४ : रामपुरीचा मुक्काम , अजूनच मोठी तवा नदी आणि चारखेडा-मांडला अरण्य

अमृता सारख्या त्या ताकाची चव मुखामध्ये राखत आज अक्षरशः वेड्यासारखा चालत सुटलो . एका शेतातून काहीतरी हलते आहे असे मला दिसले .लक्षपूर्वक पाहिले असता एक काळवीट उड्या मारत पळताना दिसले . 
थोड्याच वेळात काळवीटांच्या एक कळपच उड्या मारत मारत या शेतातून त्या शेतात पळाला .रस्त्यावरून अक्षरशः काळवीट हवेत उडते आहे की काय असे वाटावे इतक्या उंच उड्या मारत होते . काळवीटे इतकी उंच उडी का मारतात हे अजूनही कळलेले नाही ! सरळ पळता येत असून विनाकारण उंच उड्या मारत पळतात . गवताच्या बाहेर येऊन शत्रू दिसणे हा एक उद्देश आहे परंतु इथे एवढ्या उंचीचे गवतच नाही !
बिश्नोई समाज आणि काळवीट यांचे अतूट नाते आहेत . धर्मामुळे प्राण्यांचे आणि पर्यावरणाचे रक्षण होणे अशी संकल्पना असलेला हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे .
( सर्व छायाचित्रे संग्रहित )
 बिश्नोई समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या समाजाचा लोगो वापरला जातो त्यात देखील हरीण आहे . 
अभिनेता सलमान खान ने काळवीटाची शिकार केल्यावर ते प्रकरण बिश्नोई लोकांनी कसे शेवटाला नेले होते हे सर्वांनी पाहिले आहेच . असो .
आता एक मोठा डांबरी मार्ग लागला होता . आणि कित्येक किलोमीटर या रस्त्याने चालण्या शिवाय पर्याय नव्हता . या रस्त्यावरून अतिशय वेगाने जड वाहनांची वाहतूक सुरू होती . परिक्रमावासींसाठी अत्यंत धोकादायक मार्ग ! तरी देखील लोक आजूबाजूला न बघता रस्त्याच्या वरून चालायला पाहत होते . मी वाहतुकीच्या नियमाप्रमाणे विरुद्ध बाजूने आणि रस्त्याच्या बाजूला मोकळ्या सोडलेल्या मार्गीकेतून चालत राहिलो . खडे ,खडी , काचा ,काटे सारेच पायासाठी अत्यंत वेदनादायक होते . त्यात रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचे प्रदूषण पहिल्यांदाच अनुभवत होतो . धुराने जीव गुदमरत होता . मी असे ठरविले की विक्रमी वेगाने चालत हा घाणेरडा टापू एकदाचा संपवून टाकायचा . हा मध्य प्रदेश मधला राज्य महामार्ग क्रमांक १५ होता . खिरकीया , पोखरणी , धनोरा , दगडखेडी , धारूखेडी , बोथिया खुर्द अशी गावे पार करत रामपुरी पर्यंत आज मला पोहोचायचे होते . नर्मदेचे पाणी उजव्या हातालाच होते परंतु दिसत नव्हते .
जुलाबामुळे पोट रिकामे झाले होते . आणि ताकामुळे नवीन ऊर्जा प्राप्त झाली होती . त्यात उपवास असल्यामुळे बाकीचे काही खाल्ले नव्हते . इतर गाड्या टाकी फुल केल्यावर चांगले ॲव्हरेज / मायलेज  देतात परंतु आपली पायगाडी मात्र टाकी रिकामी गेल्यावर चांगली पळते असा माझा अनुभव आहे . अतिशय सुसाट वेगाने मी चालत होतो . मध्ये काही परिक्रमावासी दिसायचे त्यांना मागे टाकून मी पुढे जायचो . 
अचानक एका झाडावर ओळखीची पिशवी लटकवलेली दिसली . ही सात्यकी रायची पिशवी होती . शेतामध्ये तो एका झाडाखाली झोपलेला दिसला . हा टप्प्याटप्प्याने गाडी वर बसून प्रवास करत होता . त्याला न जागे करता मी पुढे गेलो .परंतु भरपूर चालल्यामुळे पाय खूप गरम झाले होते . इतक्यात एका उसाच्या शेताला पाणी सोडलेले दिसले त्या पाण्यामध्ये पाय सोडून पाटाच्या काठावर बसून राहिलो . पायामधील सर्व थकवा क्षणात निघून गेला . पाणी पिऊन पाहिले असता मैयाची चव लागली . याचा अर्थ मैय्या इथून खूपच जवळ असणार होती ! नुसते तिचे स्मरण केल्यावर अंगात शक्ती आली आणि उठून पुढे चालायला लागलो ! महामार्गावर जाणारे गाडीवान दादा तुम्हाला गाडी बाजूला घेऊन विचारतात की कुठे सोडायचे आहे का वगैरे . काही परिक्रमावासी या प्रलोभनाला बळी पडतात . परंतु मी कधीच बळी पडलो नाही . ज्यांना मुळात परिक्रमा उरकायची असते ते असे शॉर्टकट नक्कीच स्वीकारतात . मला तसली काही घाई नव्हती . जे करण्यासाठी आलो ते व्यवस्थितच केले पाहिजे . मी तर म्हणतो नर्मदा परिक्रमेला येऊन घराच्या आठवणी काढण्यापेक्षा घरात बसून नर्मदेची आठवण काढलेली कधीही श्रेष्ठ आहे ! काही करून तुमचे मन तिच्या चरणाशी लागले पाहिजे बास ! आता सुद्धा पाटाच्या पाण्याने ते काम केले होते ! मी कुठेही गेलेली नाही तुझ्या सोबतच आहे हा आश्वासक संदेश घेऊन ते पाटाचे पाणी माझ्यापर्यंत आले होते ! इथे मध्ये एका दुकानदाराने आवाज दिला आणि शीतपेय प्यायला बोलावले . या ठिकाणी एक सायकल वरून चाललेला परिक्रमा वासी भेटला . त्याला थांबवले आणि माझ्या ऐवजी हे पेय त्याला द्या असे दुकानदाराला सांगितले . मला आज काहीही खायचे नव्हते . या माणसाचे नाव दयानंद स्वामी असे होते . पाणीदार डोळे होते . भाग्यनगर (हैदराबाद ) इथून निघालेला हा इसम सायकल वरती संपूर्ण भारतभ्रमण करत होता . ज्यात प्रामुख्याने चारधाम , बारा ज्योतिर्लिंगे , १०८ दिव्य दैसम , सप्तपुरी असे सर्व नियोजित होते . त्यातलाच एक टप्पा म्हणून नर्मदा परिक्रमा करण्यासाठी तो आला होता .नर्मदा परिक्रमा मार्गाच्या आसपास पाच ज्योतिर्लिंगे आहेत असे तो म्हणाला . त्याच्या फोनवर त्याने आमचा एक सेल्फी काढला . आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
सायकलवर भारत तिर्थाटणाला निघालेले भाग्यनगर येथील तेजस्वी साधू दयानंद स्वामी .
याला तेलुगु सोडून अन्य कुठलीही भाषा येत नव्हती .तरी देखील भारत भ्रमण शक्य आहे हे ह्याने सिद्ध करून दाखवले .कारण भारतामध्ये आजही माणसाची भाषा , भूषा न बघता भावमात्र बघितला जातो .
आज पायांना गती आली होती ती जाऊ नये म्हणून मी फारसा थांबत नव्हतो . एकदा चालता चालता तुम्ही थांबलात की पायातले गतीने चालू असलेले रक्ताभिसरण विस्कळीत होते . आणि मग सगळी गडबड होते . आज संध्याकाळ झाली तरी काही केल्या मुक्कामाचे कुठले ठिकाणच सापडेना . राज्य महामार्ग असल्यामुळे आजूबाजूला फारशी वस्ती सुद्धा नव्हती . छोट्या मोठ्या नद्या तेवढ्या पार करत होतो . अखेरीस अंधार पडू लागल्यावर अमरावतीच्या बाबाने चालविलेला एक आश्रम लागला . हे गाव होते रामपुरी . बाबांच्या कानपूर लाईन मध्ये गडबड होती . अर्थात हे माझे वाक्य नाही हे ते स्वतः सगळ्यांना सांगत होते ! कानपूर लाईन मध्ये गडबड आहे याचा अर्थ कानाने ऐकायला येत नाही . बहिरे असले तरी बाबा अतिशय बोलके होते .यांचा स्वभाव अतिशय मोकळा , निर्मळ तितकाच बोलका होता . यांचे नाव बाबा मंगलनाथ जी महाराज . गावकऱ्यांनी एका सामायिक जागेमध्ये यांना दोन खोल्या आणि पडवी बांधून आश्रम काढून दिला होता . माझ्या आधी बरेच परिक्रमावासी येऊन इथे उतरलेले दिसले . 
त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझ्या लक्षात राहिलेले लोक म्हणजे सौ . रंजना विकासराव पाटील या मूळ जळगावच्या माताराम . त्यांचा निवास सध्या पुनावळे येथे होता . त्यांची पायी परिक्रमा आता संपत आली होती .त्यामुळे त्यांना शेवटचे काही दिवस सोबत देण्यासाठी त्यांचे पती विकासराव पाटील साहेब हे स्वतः आले होते . हे स्वतः एका सरकारी यंत्रणेमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होते .वेळात वेळ काढून ते आले होते . पत्नीला अशी खंबीर आणि सक्रीय साथ देणारी माणसे फार कमी पाहिली . त्या मातरम देखील इतक्या बाणेदार की स्वतःचे थोडे देखील सामान साहेबांच्या पाठीवर देत नव्हत्या. धन्य ती जोडी ! तानाजीराव पडवळ नावाचे मुपो धानोरे तालुका येवला जिल्हा नाशिक इथले एक परिक्रमा वासी होते . हे डोक्यावर पनामा हॅट घालून चालायचे त्यामुळे माझ्या चांगले लक्षात राहिले ! स्वभावाने एकदम दिलखुलास व आनंदी होते . पाटील दांपत्य आणि तिथे जमलेले सगळे परिक्रमावासी यांच्यासोबत छान गप्पा झाल्या . सुदैवाने परिक्रमे मध्ये असताना परिक्रमेतले अनुभव कोणी एकमेकांना फारसे सांगत बसत नाही . सर्वांना आता पुढे काय याची चिंता अधिक असते . मग एखादा जरी पूर्वी त्या मार्गाने गेलेला परिक्रमावासी भेटला की त्याच्याभोवती सर्वांचा गराडा जमा होतो ! मग त्या परिक्रमावासी ला कोण भाव प्राप्त होतो ! विशेषतः साधू लोक सतत परिक्रमा करत असतात . त्यामुळे त्यांना लोक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतात . तुम्ही कुठला प्रश्न विचारता यावरून तुम्ही 'मुरलेले ' परिक्रमावासी आहात की नवीन आहात हे लगेच कळते . इथे बाहेर अंगणामध्ये एक पार होता डावीकडे बोरवेल ची नळी काढून ठेवली होती . लागेल तेव्हा मोटर चालू करून गरम पाणी उपलब्ध व्हायचे . मंगलनाथ जी महाराजांनी सर्वांना आग्रहाने सुंदर असे जेवण वाढले . अंगणातच पंगती बसल्या . स्थानिक ग्रामस्थ बाबाच्या मदतीला यायचे . सगळीकडे थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसते . आपला नोकरी धंदा किंवा शेतीची कामे आटोपून रात्री मदतीसाठी काही ग्रामस्थ येतात . 
आश्रमासमोरील पाटी
 आश्रमाचे प्रवेशद्वार
 आश्रमातील परिक्रमावासी निवास
 शिवमंदीर
 अंगणात बसलेल्या भोजनाच्या पंक्ती
पहाटे मोटर चालू करून मस्त गरम पाण्याने अंघोळ केली .गरम पाणी म्हणजे आपण घरी वापरतो तसे गरम नव्हे . फक्त ते रात्रभर साचलेल्या गार पाण्यापेक्षा कमी गार असते म्हणून त्याला गरम म्हणायचे ! इतकेच ! आज लवकर निघालो . आजवरचे विक्रमी अंतर मी चाललो . दिवस संपेपर्यंत साधारण ४८ किलोमीटर भरले होते . जिथे मैया समोर दिसत नाही तिथे आपोआप माझी गती वाढायची . वाटेमध्ये भेटलेल्या सर्व लोकांनी मला सिंगाजी महाराजांची समाधी जमल्यास अवश्य पहा असे सांगितले होते . ही समाधी तशी एका बाजूला धरणाच्या एका काठावरील शाखेच्या मधोमध होती त्यामुळे शक्यतो तिकडे कोणी जात नसे . परंतु मला आतून खूप आकर्षण वाटत होते म्हणून मी गेलो . तसे पाहायला गेले तर महाशिवरात्र तीन दिवसावर येऊन ठेपली होती . आणि मी पायांना थोडीशी अधिक गती दिली असती तर ऐन महाशिवरात्रीला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला पोहोचणे मला शक्य होते . मी सरासरी वीज बावीस किलोमीटर चालत असलो तरी अजून थोडासा ताण देऊन ३५ ते ४० किलोमीटर रोज चाललो असतो तर ११० / १२० किलोमीटर अंतर सहज पार केले असते . अलीकडच्या काळात परिक्रमेची जी गती वाढलेली आहे त्या गतीचा विचार केल्यास देव दिवाळीला जे लोक परिक्रमा उचलतात त्यांची परिक्रमा बरोबर महाशिवरात्रीच्या आसपास ओंकारेश्वर येथे समाप्त होते . त्यामुळे आता बरेचसे परिक्रमा वासी , जे मला मुक्कामांवर भेटत होते , त्या सर्वांची परिक्रमा संपत आलेली होती . मी एकमेव असा अध्ये मध्ये परिक्रमा चालू केलेला मनुष्य होतो . सिंगाजी बाबा समाधीकडे जाण्यासाठी डांबरी सडकेने जायचे असेल तर फारच लांबचा रस्ता होता . परंतु इथे अतिशय निबिड अरण्यातून जाणारा एक जबरदस्त शॉर्टकट देखील होता . इथे एकच अडचण होती . जंगलामध्ये अनेक रस्ते असल्यामुळे माहितगार मनुष्य सोबत असल्याशिवाय त्या रस्त्याने जाता येणे अशक्य होते . त्यामुळे या भागात कोणी देखील परिक्रमावासींना या शॉर्टकट बद्दल सांगत नसे . कधी कधी चौकस बुद्धी कामाला येते ती अशी . मला भेटणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांशी गप्पा मारताना मी आवर्जून काही शॉर्टकट वगैरे आहेत का वगैरे विचारून घेतसे . " कोणाला सांगू नका . तुम्हाला म्हणून सांगतो . " वगैरे पद्धतीने मग असे शॉर्टकट मला कळून जायचे . इथून मी एकटाच झपाझप चालत एका नदीपाशी आलो . या नदीचे नाव देखील तवा असेच आहे . परंतु आधी पाहिलेली तवा नदी हिचे पिल्लू वाटावे इतके मोठे पात्र या नदीने धारण केलेले होते ! प्रत्यक्षात धरणाचे पाणी उलटे शिरल्यामुळे ही नदी जणूकाही एखाद्या समुद्रासारखी भासत होती . इथून पुढचा मार्ग मी अतिशय नीट समजून घेतला होता . रामपुरी सडियापाणी , छनेरा किंवा नया हरसुद , चारखेडा ,तवा ,शेजला ,मांडला ,करोली ,सोनगाव , गहलेगाव व सिंगाजी समाधी . आता पुन्हा फिरून गुगलवर जेव्हा मी हे सारे मार्ग बघतो तेव्हा मला आश्चर्य वाटते . कारण स्थानिक लोकांशी बोलून माझ्या डोक्यामध्ये जो एक नकाशा तयार व्हायचा तो वास्तवातील नकाशाशी बऱ्यापैकी जुळणाराच आहे . कुठलाही नकाशा नसताना लोकांनी हे शॉर्टकट मार्ग कसे शोधून काढले असतील ! तारखेडा गावामध्ये सिंगाजी बाबा यांचे गुरु मनरंगी गिरी स्वामी यांची समाधी होती . हरसुद नावाचे गाव पुरामध्ये बुडाल्यामुळे छनेरा या गावांमध्ये त्याचे पुनर्वसन झाले होते .हे गाव बऱ्यापैकी मोठे होते . छोटे शहरच म्हणा ना ! त्यामुळे लोक याला नया हरसूद म्हणायचे . पुढे तवा नदीच्या काठावर एक फुलपाखरू उद्यान साकारले होते . आकर्षक प्रवेशद्वार आणि आत मध्ये केलेल्या हरितगृहामध्ये फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणाऱ्या वनस्पती लावल्या होत्या . नर्मदे हर हर या पुस्तकाचे लेखक जगन्नाथ कुंटे यांचा मुलगा कृष्णमेघ कुंटे याने लहानपणी मला फुलपाखरे कशी वाढवता येतात हे प्रात्यक्षिका सह शिकवले होते . मी त्याच्या मार्गदर्शनाखाली सुमारे वीस एक फुलपाखरे घरी तयार केली होती ! तयार करायची म्हणजे काय तर फुलपाखरू ज्या झाडावर अंडी घालते ती अंडी घरी नेऊन एका बरणीत ठेवून द्यायची आणि त्यातून आळ्या बाहेर आल्या की रोज त्या झाडाची ताजी ताजी पाने आणून त्या आळीला खायला घालायची . अळीचे पुरेसे खाऊन झाले किती कोश तयार करते या कोशाचे नीट संरक्षण करायचे . आणि त्यातून फुलपाखरू बाहेर आले की ते सोडून द्यायचे . निसर्गामध्ये सुद्धा हे होतेच परंतु बरेचदा फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी लागणारी झाडे शिल्लक न राहिल्यामुळे रस्त्याच्या कडेला किंवा मानवी वावर असलेल्या ठिकाणी फुलपाखरे अंडी घालू लागली आहेत .अशी झाडे अनेकदा माणसाकडून अनवधानाने तुटतात किंवा मुंग्या ,किडे ,पक्षी यांचे लक्ष  जाऊन आळ्या फुलपाखरू होण्यापूर्वीच त्यांच्या भक्ष्य स्थानी पडतात . प्रत्येक फुलपाखराचे ठरलेले झाड असते त्यावरच ते अंडी घालते . एक मादी अनेक अंडी घालते व शक्यतो पानाच्या खालच्या बाजूला तिळाप्रमाणे दिसणारी छोटी अंडी चिकटलेली आढळतात . यातून आळी बाहेर आल्यावर प्रत्येक फुलपाखराच्या प्रजातीनुसार त्यांचा पाने खाण्याचा कालावधी वेगळा वेगळा असतो तसेच प्रत्येक अळीचा सर्वात मोठा आकार देखील वेगवेगळा असतो .अंडे फुटून , आळी बाहेर येऊन ,इवलीशी आळी लहानाची मोठी होऊन ,तिचे फुलपाखरू होताना पाहणे , व त्याला पुन्हा निसर्गात मुक्त करणे , ही खूप मनोरंजक व आनंददायक प्रक्रिया असते .असो .
त्यामुळे मी हे फुलपाखरू उद्यान आत जाऊन पाहण्याची तसदी घेतली नाही . परंतु ज्यांना आवड आहे त्यांनी अवश्य पहावे . 
तवा नदीच्या काठावरील फुलपाखरू उद्यानाचे आकर्षक प्रवेशद्वार .मागे तवा नदी दिसते आहे .
फुलपाखरू उद्यानाचा अंतर्भाग
तवा नदीच्या विस्तीर्ण पात्रावरून जाणारा हरसूद मुंदी पूल .आपल्याला हा पूल पार करायचा आहे .
हा नकाशा पाहिल्यावर तुम्हाला या संपूर्ण भागाचा भूगोल लक्षात येईल . नकाशाच्या अगदी खाली बटरफ्लाय पार्क दिसते आहे . इथून छोटासा पूल दिसतो आहे त्यावरून आपण तवा नदी ओलांडणार आहोत . डावीकडे एक पूल दिसतो आहे तो रेल्वेचा आहे .आता एकदम वरती या आणि पाण्यामध्ये असलेली सिंगाजी महाराजांची समाधी बघा . इथपर्यंत जाण्यासाठी चारखेडा मंडला जंगल आपल्याला पार करायचे आहे . मध्ये असंख्य ओढे नाले नर्मदेला येऊन मिळत आहेत . त्यामुळे मार्ग फसवा कठीण आणि श्वापदांचे भय असलेला देखील आहे .
हा पुलच सुमारे एक किलोमीटर लांबीचा आहे . याच्यावरून आपल्याला किती चालायचे आहे त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता !
तवा नदीच्या जलाशयामध्ये विहार करणारी एक नौका .यावरून तुम्हाला जलाशय किती विस्तीर्ण आहे याचा अंदाज यावा . तवा नदी म्हणण्यापेक्षा नर्मदेचे उलटे शिरलेले पाणीच जास्त आहे .
परंतु खरोखरीच हा रस्ता अतिशय सुंदर आणि स्वर्गीय अनुभव देणारा होता . या रस्त्याने चालताना फारच मजा आली ! अशा जंगलातून एकटे चालण्याची मजा काही औरच असते ! दरम्यान या पुलावर मला काही मराठी परिक्रमा वासी भेटले . संजय माऊली खापरकर नावाचे आळंदीचे एक अतिशय सात्विक परिक्रमावासी होते , ज्यांची ही तिसरी परिक्रमा चालू होती ! त्यांनी मोठ्या प्रेमाने माझी चौकशी केली . त्यांच्यासोबत गणपतराव भावसार म्हणून पिंपळे गुरव पुणे येथे राहणारे एक वयोवृद्ध परिक्रमा वासी होते . परंतु ते चांगले चालत होते . यांच्यासोबत एक मध्यप्रदेश मधीलच दांपत्य चालत होते . या पुलावर भावसार काकांच्या फोनवर मी सेल्फी फोटो काढला आणि तो मित्राच्या तोंडपाठ क्रमांकावर पाठवण्यात आला . 
चित्रात डावीकडून संजय माऊली खापरकर मध्य प्रदेश मधील दाम्पत्य आणि गणपतराव भावसार पुणे यांचे सोबत प्रस्तुत लेखक .
मागे दूरवर पसरलेला तवासागर . मध्ये तयार झालेल्या तात्पुरत्या बेटावर नावेतून जाऊन शेती केली जात होती . 
ही सर्व माणसे मला याच ठिकाणी का बरं भेटावीत ? याच्यामागे मैय्याचे नियोजन होते .
ऊन किती कडक आहे याचा अंदाज छायाचित्रातून तुम्हाला येईल . रात्रभर प्रचंड थंडी आणि दुपारी कडक ऊन . 
इथूनच सरळ ओंकारेश्वरला जाण्याचा सडक मार्ग होता . हे सर्व लोक आता न थांबता सडक मार्गे थेट ओंकारेश्वर गाठणार होते . कारण महाशिवरात्र आणि परिक्रमेची समाप्ती हा योग कोण बरं सोडेल ! परंतु मला तर सिंगाजी बाबांची समाधी बघायची इच्छा देखील निर्माण झाली होती . या निर्जन रस्त्यावर मी कोणाला विचारावे ? इतक्यात काही क्षणापुरतेच संजय माऊली खापरकर मला भेटले . ते बरोबर अशा ठिकाणी मला भेटले जिथून जंगलातील शॉर्टकट चा मार्ग सुरू होत होता . त्यांच्या पूर्वी तीन परिक्रमा झालेल्या असल्यामुळे त्यांना या सर्व प्रकारांची आणि मार्गाची माहिती होती . त्यांनी मला खात्रीशीरपणे सांगितले की रोज जर मी ४० किलोमीटर पेक्षा अधिक चालायचेच अशी तयारी ठेवली ,तर मी आरामात ओंकारेश्वरला सर्व दर्शने करत करत  येऊ शकतो . गुरु किती महत्त्वाचा असतो हे परिक्रमे मध्ये पदोपदी लक्षात येते . ज्याने आधी तो मार्ग चोखाळला आहे अशा माणसाचे मार्गदर्शन तुम्हाला आश्वस्त करते ! या चौघांना नर्मदे हर करून मी लवकरच जंगलातील मार्ग पकडला ! 
या संपूर्ण भागात बऱ्यापैकी दाट अरण्य होते .गाव सोडले तर बाकी सर्व झाडी असायची .
अरण्य खूपच सुंदर होते . . डावीकडे अरण्यातच हा आश्रम आहे असे लक्षात आले . क्षणभर विसावा घ्यावा म्हणून आत मध्ये गेलो . आत मध्ये बसलेल्या परिक्रमावासींनी तोपर्यंत आवाज दिलेला होताच . आश्रम फारच रम्य होता . आश्रम म्हणजे काय तर पत्र्याची कुटी आणि धुनी प्रदीप्त केलेली! इथे आखाड्याचे काही साधू राहत होते . त्यांनी कोरा चहा पाजला . 
 हाच तो अरण्य आश्रम
 भस्मधारण केलेला , पायात घुंगरू असलेला , डोक्यावर जटाभार असलेला , केवळ लंगोटी नेसलेला , धुन्यावर टिक्कड बनवणारा दशनामी आखाड्याचा साधू . हे चित्र याच आश्रमातील परंतु अन्य वेळी अन्य कोणीतरी काढलेले आहे .
असे साधू जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनसोक्त गांजा ओढला जातो . गृहस्थांनी अशा ठिकाणी शक्यतो जाऊ  नये असे साधूच सांगतात .कारण हे कर्म गृहस्थाश्रमास पूरक नाही . मारक आहे . 
चहा पिल्याने तरतरी आली आणि भरपूर चालायचे आहे याची कल्पना असल्यामुळे अधिक वेळ न थांबता सामान उचलले .अगदी निश्चिंतपणे आणि निर्भयपणे मी त्या वनात घुसलो ! सिंगाजी बाबा , मै आ रहा हु !अशी आरोळी देखील गमतीने ठोकली ! कमी उंचीची खुरटी झाडे होती . झाडी विरळ होती परंतु एकसंध होती . डाव्या हाताला दूरवर शेती दिसत होती . हळूहळू संपूर्ण वनातला मार्ग सुरू झाला . इथे वन्य श्वापदे असल्याच्या खाणाखुणा दिसत होत्या . त्यांनी इथेच तथा विखुरलेली हाडके ,त्यांची विष्ठा ,केस पाहत पाहत पुढे चालत होतो . इथे गाईंची अतिशय सुंदर पोकळ शिंगे मला सापडली होती . परंतु ओझे नको म्हणून मी ती सोबत घेतली नाहीत . अन्यथा अशा शिंगाला चांदीचे कोंदण करून अभिषेक पात्र अतिशय उत्तम पद्धतीने बनवता येते . काही लोक या शिंगापासून तुतारी देखील बनवितात . साधारण जंगलाच्या मध्यभागी आल्यावर मला माणसांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला . माझ्यापुढे चाललेले तीन परिक्रमावासी एका ठिकाणी मार्ग सुचत नसल्यामुळे थांबले होते . सिहोर या मध्य प्रदेश मधल्या गावातले एक दांपत्य होते आणि काशीच्या मणिकर्णिका घाटावरचा एक तरुण साधू होता . जंगलाच्या मधोमध असलेल्या या चौकामध्ये पाच रस्ते येऊन मिळत होते . आणि कुठल्या मार्गाने जायचे हे या तिघांना कळत नव्हते . सुमारे अर्धा तास ते इथेच बसले होते . पुढे चुकीच्या मार्गाने जाऊन चार-पाच तास भटकण्यापेक्षा अर्धा एक तास थांबलेले परवडते हे अनुभवच तुम्हाला शिकवतो . काय करावे असा प्रश्न सर्वांना पडला होता . माझ्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर होते ! नर्मदे हर असा पुकारा मी केला . इतक्यात जंगलातून देखील नर्मदेहर असा आवाज आला ! एक गुराखी दोनच मिनिटांमध्ये तिथे दाखल झाला . त्याने आम्हाला त्याच्या गावातून जाणारा पुढचा मार्ग व्यवस्थित दाखवला .  आम्ही सर्वजण त्याने सांगितलेल्या खानाखोना लक्षात ठेवत मांडला गावात येऊन पोहोचलो .इथे यायचे एकमेव कारण होते ते म्हणजे पुढचा मार्ग गावातील कोणाकडून तरी समजावून घेणे . गाव म्हणजे चार-पाच घरांची विरळ वस्ती होती . इथे बसून पाणी प्यायलो आणि पुढचा मार्ग समजावून घेतला . मध्ये दोन-तीन मोठ्या नद्या आडव्या येणार होत्या . मला एकट्याला चालायचे आहे हे मी काशीच्या साधूला समजावून सांगितले आणि पुढे निघालो . सिहोर चे दांपत्य मला थांबवायचा प्रयत्न करत होते . अखेरीस एका नदीपर्यंत मी त्यांच्यासोबत चाललो . या नदीवर ती खूपच रम्य असा धबधबा होता . इथे हे तिघे रमले . त्यांनी कपडे वगैरे धुवायला काढले . त्या संधीचा फायदा घेऊन मी तिथून पोबारा केला ! हे सर्व तुम्हाला ऐकायला थोडेसे विनोदाचे वाटत असेल  खरे , परंतु कोणी थांब असा आग्रह धरल्यावर तो मोडता येणे आणि तोही अशा जंगलामध्ये , हे फार कठीण काम असते . त्यामुळे अशावेळी गुपचूप सटकलेले अतिउत्तम असते ! नदी मात्र खरोखरच खूप सुंदर होती . मी एकटा असतो तर नक्की तिथे काही काळ थांबलो असतो . आता अचानक शेती सुरू झाली . शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने त्याच्या घराचा पत्ता सांगितला आणि तिथे जाऊन बसा .मी मागून घेतो असे सांगितले . शेतामध्येच बांधलेले सुंदर घर होते . अंगणामध्ये आसन लावून मी बसून राहिलो . आज सकाळपासून पोटात फार काही गेलेले नव्हते . आणि चालणे देखील खूप झाले होते . त्यामुळे इथे बसल्यावर खूप बरे वाटले . थोड्यावेळाने तरुण शेतकरी आला . याचा मोठा भाऊ आणि हा असे दोघेच त्या घरात राहत होते . आई वडील वारले होते आणि दोघांच्या बायका यांना सोडून निघून गेल्या होत्या . सुमारे चाळीस एकर क्षेत्राला कुणीही कायदेशीर वारस हे निर्माण करू शकले नव्हते . गृहलक्ष्मीचा वास घरामध्ये नसल्यामुळे मोठे घर असूनही भकास , उदास वाटत होते . दोघांनाही आपल्या चुकांची आता जाणीव झालेली होती आणि सुधारण्याची तयारी होती . मी थोडा वेळ बसून त्यांच्या सर्व प्रश्नांना यथामती उपाय सुचविले . समुपदेशन असे म्हणा फार तर . आणि त्यांनी दिलेला भोजन प्रसाद ग्रहण करून पुढे निघालो . त्यांच्या जमिनीला कायदेशीर वारस निर्माण होणे आवश्यक होते . चाळीस एकर क्षेत्र मालकीचे असल्यामुळे दुसरे लग्न होण्यास दोघांनाही काहीही अडचण येणार नव्हती . बदल यांना करायचा होता तो होता मशागतीमध्ये . या भागातले लोक मनाने खूप निर्मळ असल्यामुळे अगदी दिलखुलास बोलतात . तुमचा परिचय नाही , वगैरेंची आहे अशी कुठली भूमिका त्याला आडवी येत नाही .
आता मला वेध लागला होता सिंगाजी महाराजांच्या समाधीचा ! एक मोठी नदी आडवी आली . आणि ती पार केल्यावर सिंगाजी महाराजांच्या समाधीचा रस्ता दिसू लागला ! सिंगाजी महाराज हे नर्मदा खंडातील एक अतिशय जागृत प्रकरण आहे ! अंधार होता मी दयाधाम आश्रमात पोहोचलो . ४८ किलोमीटर चालणे झाल्यामुळे आता एकही पाऊल टाकायची शक्ती उरली नव्हती . आश्रमातील अधिकारी स्वामी चंद्रानंद महाराज म्हणून होते . त्यांना नमस्कार केला आणि विचारले कुठे आहे सिंगाजी महाराजांची समाधी ? ते म्हणाले आपण आता नदीच्या काठावर आहोत .  असेच सरळ रेषेत दोन एक किलोमीटर चालत नदीपात्रामध्ये गेले की बाबांची समाधी आहे ! बापरे म्हणजे आज चालण्याचे अर्धशतक होणार तर ! पाय बोलायला लागणार त्याच्या आधीच झटकन उठलो आणि समाधीच्या दिशेने मार्गस्थ झालो ! जय सिंगाजी ! नर्मदे हर !



लेखांक चौसष्ठ समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर