लेखांक ६५ : नर्मदेत ८० फूट खोल असूनही कोरडी राहिलेली श्री सिंगाजी महाराज समाधी

श्री सिंगाजी महाराज समाधी . मध्ये दिसणाऱ्या गोल मंदिराच्या खाली ८० फूट जमिनीवर समाधी आहे . आजूबाजूला पुनासा धरणाचा सखोल फुगवटा आहे .
श्री सिंगाजी महाराज यांची समाधी हे नर्मदा खंडातील अनेक आश्चर्यांपैकी एक आश्चर्य मानले जाते . या समाधीची कथा मोठी अद्भुत आहे . पुनासा धरण जेव्हा झालेले नव्हते , तेव्हापासून ही समाधी अस्तित्वात आहे .कुठलेही धरण बांधून झाले की आधी पाणी साठविले जाते , अंदाज घेतला जातो ,आणि मग टप्प्याटप्प्याने त्याची उंची वाढवली जाते .अशाच एका टप्प्यामध्ये ही समाधी जलमग्न होणार हे स्पष्ट झाले . परंतु स्थानिक ग्रामस्थांनी त्याला फार विरोध केला . ग्रामस्थांच्या विरोधामुळे धरणाचे काम थांबले . केवळ स्थानिक लोक नव्हे तर संपूर्ण मध्यप्रदेश मधील लोक सिंगाजी बाबांना मानतात . ही समाधी आता धरणाच्या डूबक्षेत्रामध्ये जाणार हे लोकांना मान्य नव्हते . अखेरीस लोकांशी बोलणी करण्याकरता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतः हेलिकॉप्टरने समाधीच्या परिसरामध्ये आले . त्यांना भेटण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमला . त्यांनी लोकांना समाधी पेक्षा पाणीसाठा वाढणे कसे आवश्यक आहे वगैरे समजावून सांगायचा प्रयत्न केला . सरकार काही निर्णय मागे घेण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते . अखेरीस काहीही निर्णय न होता शिवराज सिंह चौहान निघाले . परंतु काही केल्या त्यांचे हेलिकॉप्टर चालूच होईना ! सगळ्या लोकांनी सिंगाजी महाराजांचा एकच जयजयकार केला ! त्यावेळी भेटीसाठी आलेल्या काही साधू संतांनी शिवराज सिंह चौहान यांना असे सांगितले की बहुतेक सिंगाजी महाराजांची अशी इच्छा नाही की ही समाधी बुडावी . तरी तुम्ही त्यांना साकडे घाला की तुमची समाधी मी वाचवतो आणि काय होते पहा . त्याप्रमाणे शिवराज सिंह चौहान उतरून पुन्हा समाधीच्या दर्शनाला गेले आणि सांगितले की काहीतरी तांत्रिक उपाय वापरून आपली समाधी मी वाचवेन . असा संकल्प सोडला रे सोडला की इकडे हेलिकॉप्टर सुरू झाले ! ही घटना लाखो लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेली आहे ! त्या काळामध्ये हे वृत्त फार प्रसिद्ध झाले होते . त्यानंतर अतिशय तज्ञ अभियंते बोलून मध्य प्रदेश सरकारने समाधीच्या भोवती अतिशय जाड मजबूत अशी ऐंशी फूट उंचीची विहीर बांधली . आता आपण जे मंदिर पाहतो आहोत ते या ८० फूट उंचीच्या विहिरीचे टोक आहे ! मूळ समाधी अजूनही मूळ जमिनीवरच आहे ! नर्मदा खंडातील अनेक मंदिरे तीर्थक्षेत्रे समाधी या सर्व धरणांमध्ये जलमग्न झालेल्या असताना केवळ सिंगाजी महाराजांची समाधी मात्र अजूनही कोरडी राहिलेली आहे ! या विहिरीच्या आतून खाली उतरायला पायऱ्या आहेत . रोज एक पुजारी या पायऱ्या उतरून खाली जाऊन समाधीची पूजा करून वर येतो . कल्पना करा जेव्हा तो खाली असतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला ऐंशी फूट उंचीचा पाण्याचा प्रचंड स्तंभ व त्याचा दबाव असतो . या मंदिरापासून दोन किलोमीटर लांबीचा पूल वजा रस्ता सरकारने बनवला आहे . 
आश्रमामध्ये आसन लावून सर्व सामान ठेवून मी समाधीकडे मार्गस्थ झालो . सकाळपासून ४८ किलोमीटर चालल्यामुळे पायाला हे दोन किलोमीटर चालायला काहीच अवघड वाटले नाहीत . हा मार्ग अतिशय सुंदर आणि रम्य आहे . दोन्ही बाजूंनी कठडे असून जिथवर नजर जाईल तिथवर पाणीच पाणी आहे ! इथे परिक्रमावासी जाऊ शकतात याची मी आधी खात्री करून घेतली . कारण हे मूळ नर्मदेचे पात्रच नाही . तवा नदीच्या पात्रातच ही समाधी आहे . धरणाचा फुगवटा प्रचंड असल्यामुळे नर्मदा जल आपल्याला चहुकडे दिसते इतकेच . मी किती अंतर चाललो असेल याचा अंदाज तुम्हाला यावा म्हणून आश्रमाची जागा ते सिंगाजी समाधी याची उपग्रह चित्रे सोबत जोडत आहे .
आश्रमातून निघाल्यावर मोठी बाजारपेठ लागते कारण हे आता एक पर्यटन स्थळ आणि तीर्थक्षेत्र झालेले आहे .वर्षाचे बाराही महिने येथे गर्दी राहते .
नकाशामध्ये दूरवर दिसणारी लाल खूण म्हणजे आश्रम आहे . हा मार्ग खूप सुंदर आहे ! धरणाचे पाणी कितीही उतरले तरी इतकी पातळी कायम राहते . 
समाधी पर्यंत गाडी रस्ता असल्यामुळे आणि गाडीतळ असल्यामुळे अतिशय वेगाने लोक या रस्त्यावरून गाड्या चालवतात . सांभाळून चालावे लागते . चालत शक्यतोवर कोणी जातच नाही असे मला लक्षात आले . दहा दहा रुपये घेऊन सोडणाऱ्या शेअर रिक्षा आहेत . 
सिंगाजी महाराजांविषयी . . .
समाधीचे प्रवेशद्वारावर बांधलेले मंदिर
मंदिराच्या खालच्या मजल्यावरून विहीर दिसते तर वरच्या मजल्यावर अशी प्रतिकात्मक समाधी आहे .
श्री सिंगाजी महाराज समाधी
रात्री मंदिर परिसर अतिशय आकर्षक रोषणाई ने उजळून निघतो .
दीपमाळ व स्नान घाटाकडे प्रवेश
मागे जिथवर नजर जाईल तिथवर नर्मदा जल च नर्मदा जल दिसते !

मी चालत समाधी मंदिरात पोहोचलो तेव्हा आरतीची वेळ झाली होती . आधी खालच्या मजल्यावर जाऊन समाधीच्या खोल विहिरीचे दर्शन घेतले . इथे सर्वसामान्य लोकांना जाऊ दिले जात नाही . परंतु परिक्रमावासी असल्यामुळे सगळीकडे तुम्हाला "स्पेशल स्टेटस "  मिळते . हा विशेष अधिकार किंवा ही "सुपर पावर " नर्मदा तुम्हाला केवळ तिचे नाव धारण केल्यामुळे देते . मी विहिरीच्या तोंडापाशी जाऊन जोरात नर्मदे हर असा पुकारा केला ! तो आवाज इतका गूढ रम्य पद्धतीने घुमला की विचारू नका ! प्रतिध्वनीच प्रतिध्वनी ऐकू आले ! नर्मदे हर ! हर हर महादेव ! जय सिंगाजी ! जय जय रघुवीर समर्थ !  अशा घोषणा देत मी तिथून वर आलो . 
 विहीरीतील मूळ समाधी
कडेने पुजाऱ्याला उतरण्यासाठी जिना आहे
सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार
परमपूज्य सिंगाजी बाबा यांची मूळ समाधी 
मी असा विचार केला की अजून आरती सुरू होते आहे तोपर्यंत नर्मदा स्नान करून यावे . कारण अंधार पडायला सुरुवात झाली होती . परंतु स्नानासाठी जाण्याचा मार्ग वेगळा बाजूने काढलेला होता . तो शोधून खाली जाईपर्यंत अंधार पडलाच . मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला सुंदर पायऱ्यांचा विस्तीर्ण घाट केलेला आहे . 
 सिंगाजी बाबा येथील स्नान घाट
अंधार पडल्यामुळे इथे माझ्या शिवाय कोणीच नव्हते . मी सुंदर पैकी त्या खोल पाण्यामध्ये उतरलो . पाणी अतिशय खोल होते . तळ लागतच नव्हता . आज बरोबर ५० किलोमीटर चालणे झाल्यामुळे तापलेल्या शरीराला नर्मदा जलाचा तो थंड स्पर्श अक्षरशः स्वर्गीय वाटत होता ! मी पाण्यावर लाथा मारून पोहत नसे ,तर पद्मासन घालून झोपून टाकत असे . पाणी अतिशय खोल असल्यामुळे त्या खोलीचा एक वेगळा आवाज कानाला ऐकू येतो तो मला येत होता . इथे पाण्यामध्ये लोखंडाचे बार रोवलेले होते . त्यातल्या एका बारमध्ये माझा दंड फसवून मी पडून राहिलो .
खूप दिवसांनी मातृभेट झाल्यामुळे असा पडून राहिलो ! असा अर्धा तास शांतपणे पडलो होतो .(नर्मदेतीलच अन्य एका ठिकाणी पहुडलेला प्रस्तुत लेखक ,प्रातिनिधीक चित्र)
सर्वत्र अंधार होता . फक्त नर्मदा आणि मी ! इथून सिंगाजी महाराजांची समाधी अजून जवळ आली होती ! चाळीस एक फुटावर असेल ! माझ्या अंदाजाने सुमारे अर्धा पाऊण तास मी ते स्नान करत होतो ! बाहेर यायची इच्छाच होत नव्हती . अतिशय निरव शांतता ! खूप कष्ट करून जेव्हा तुम्ही असे शांत पडता तेव्हा मिळणारी शांतता काही वेगळीच असते ! आणि अचानक माझ्या शेजारी धप् करून मोठा आवाज झाला ! बहुतेक एखादी मोठी मगर आली असावी असे वाटून मी पटकन बाहेर आलो ! आणि नर्मदा माईला हाक मारली . नर्मदे हर !इतक्यात वरून मंदिराचा वॉचमन धावत खाली आला ! तो मला म्हणाला अहो बाबाजी एवढ्या अंधारात इथे काय करता ? मी त्याला सांगितले की बरेच दिवस माझे नर्मदा स्नान राहिले होते ते करतो आहे . तो म्हणाला बरे झाले तुमचा आवाज मी ऐकला नाही तर मी आता कुलूप लावून निघालो होतो . इथे कोणालाही सहजासहजी येता येणार नाही अशी तटबंदी केलेली आहे . त्यामुळे तो कुलूप लावून गेला असता तर मला तिथेच रात्र काढावी लागली असती . नशीब एक हॅलोजन दिवा तरी वरती लावलेला होता . मी त्याला पाण्यामध्ये झालेल्या मोठ्या आवाजाबाबत विचारले . इथे मगरी वगैरे आहेत का ? त्याने सांगितले की मगरी तर आहेतच . परंतु त्या फारशा दिसत नाहीत .  परंतु इथले वैशिष्ट्य म्हणजे इथे फार मोठे मोठे मासे आहेत . तीन फूट ,चार फूट ,पाच फूट लांबीचे मासे आहेत ! माझा काही विश्वास बसेना .  तो म्हणाला थांबा तुम्हाला दाखवतो . असे म्हणून त्याने खिशातून साखर फुटाणे काढले आणि पाण्यात फेकले . त्याबरोबर पाण्यामध्ये हालचाल सुरू झाली . आणि अक्षरशः पाच पाच फूट लांबीचे मोठे मोठे मासे उड्या मारू लागले ! एवढे मोठे मासे मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते ! हे मासे एवढे मोठे कसे काय झाले हे विचारल्यावर त्याने मला सांगितले . मासा हा आयुष्यभर मोठा मोठा होत राहतो . परंतु तो पूर्ण मोठा होण्याआधीच माणसे त्याला पकडून विकून किंवा खाऊन टाकतात . या संपूर्ण परिसरामध्ये सिंगाजी बाबांच्या आदेशानुसार मासेमारीला बंदी आहे . त्यामुळे इथले मासे सुरक्षित राहिले असून त्यांचा आकार खूप मोठा झालेला आहे . असो . रखवालदार आणि मी तिथून बाहेर आलो . रखवालदार मला म्हणाला तुम्हाला बसायचं असेल तर बसा मी थोड्या वेळाने कुलूप लावतो . मला फार आनंद झाला ! आणि मी त्या एकांत किनाऱ्यावर नर्मदा मातेकडे पाहत बसून राहिलो .हळूहळू वारे सुटले . इथल्या पाण्याला समुद्रासारख्या लाटा येत होत्या . त्यांचा आवाज आणि बास ! तेवढाच आवाज ! आपोआप डोळे मिटले गेले .
 हाच तो अथांग किनारा आणि याच त्या लाटा .
 असा काही वेळ बसलो असेन . इतक्यात कोणीतरी हाक मारते आहे असा भास झाला म्हणून डोळे उघडले . माझ्यासमोर एक तरुण दाम्पत्य उभे होते . बाबाजी आपसे बात कर सकते है ? तरुणाने मला विचारले . "क्यू नही , बताइये ना " मी उत्तरलो . मी पाण्यामध्ये पडलो होतो तेव्हा माझ्या मागोमाग हे दोघे आले होते . आणि पूर्ण वेळ काठावर बसून होते . वॉचमनने बाहेर चला म्हटल्यावर हे बाहेर निघाले होते . परंतु मी अजून बाहेर कसा आलो नाही हे पाहायला पुन्हा आत आले होते . "आप पानी मे क्या कर रहे थे बाबाजी ? " "कुछ नही " मी म्हणालो . कारण मी पाण्यामध्ये खरोखरच काहीच करत नव्हतो . तुम्ही पाण्यावर पडलेले असताना जरा देखील काही केले की ते पाणी तुम्हाला क्षणात बुडवतो . अगदी डोक्यात कुठला विचार जरी आला तरी पाणी बुडवते . एखादा पाय हलवला एखादा हात हलवला तरी त्या दिशेला तुम्ही बुडता .काहीतरी कृती करण्याचा संकल्प मनात उठला तरी बुडायला सुरुवात होते . पाण्यावर तरंगण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे पाण्यात काहीच न करणे . त्याला जरा देखील विरोधच न करणे . कुठलाही संकल्प विकल्प न करणे .आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये देखील हेच तत्व आपल्याला तारते . जिथे आपण स्वतःहून काही कृती करायला जातो तिथे तुमचे बुडणे निश्चित असते . परंतु तुका म्हणे उगेची रहावे । होईल ते सहज पहावे । या भावामध्ये सतत राहिले की मात्र या भवसागरातून तुम्ही तरुन जाता . ते दोघे त्यांच्या शंका विचारत राहिले . मी माझ्या अल्प बुद्धीला सुचतील , पटतील अशी उत्तरे त्यांना देत राहिलो . इथून जवळच सप्तमोहिनी नावाचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे . हा पारकर आडनावाचा बिदिशा इथला अभियंता त्या प्रोजेक्टचा इनचार्ज होता . हा प्रकल्प खूप मोठा असून चालताना त्याच्या चिमण्या खूप लांबून दिसत होत्या .
सिंगाजी बाबा येथील सप्त मोहिनी औष्णिक विद्युत प्रकल्प
जबलपूरला येताना रेल्वेमधून देखील मी हा प्रकल्प पाहिला होता
अति भव्य औष्णिक भट्ट्या
हे दाम्पत्य अधून मधून सिंगाजी बाबांच्या दर्शनाला येत असे . मगाशी ते इथे येऊन बसले . आणि मला बघून क्षणभर दोघे घाबरले . परंतु माझी हालचाल होताना दिसल्यावर अर्धा तास काहीही न बोलता दोघे फक्त माझ्याकडे पाहत होते . त्यांना प्रश्न पडला होता की काहीही न करता कसे काय तरंगता येते . मी त्यांना म्हणालो की आपण बाहेर जाऊया . रखवालदाराला कुलूप लावायचे आहे . इतक्यात आरती सुरू झाली . मग आम्ही आरती केली . पुन्हा दोघे माझ्याशी गप्पा मारू लागले . यांना नर्मदा परिक्रमा याविषयी फारसे काहीच माहिती नव्हते . परिक्रमेची माहिती त्यांना दिली आणि दोघांनी तिथेच संकल्प केला की आम्ही दोघेही एकत्र नर्मदा परिक्रमा करू . पारकर ने त्याच्या मोबाईलवर एक फोटो काढून माझ्या मित्राकडे पाठवून दिला . विदिशा येथील रहिवासी विद्युत अभियंता श्री पारकर आणि प्रस्तुत लेखक , श्री सिंगाजी महाराज समाधी परिसरामध्ये 
पारकर हा अभियंता माझ्यासाठी आधुनिक पिढीचा प्रतिनिधी होता . त्याने विचारलेल्या सर्व शंका या आताच्या काम करून पैसे कमावणाऱ्या पिढीच्या प्रतिनिधीक शंका होत्या . दोघेही नवरा बायको सर्व काही सुस्थितीत असताना व सुसंपन्न असताना आयुष्यामध्ये काय कमी आहे याचा शोध घेत होते . आमच्या तास दोन तास चाललेल्या चर्चेतून त्यांचे बऱ्यापैकी समाधान झाले असावे . मी स्वतः देखील या अवस्थेतून गेलेलो असल्यामुळे त्याच्या सर्व शंकांची कारणमीमांसा करणे माझ्यासाठी सोपे होते . आणि मी उत्तर देण्यापेक्षा ज्याचे त्याचे उत्तर ज्याने त्याने स्वतः शोधलेले अतिउत्तम आहे हे माझे म्हणणे देखील त्याला पटले ! आयुष्यामध्ये जितक्या लवकर तुम्हाला हे प्रश्न पडतील तितक्या लवकर तुम्हाला उत्तर मिळण्याची शक्यता वाढत जाते . नाहीतर निवृत्त झाल्यानंतर देखील मी कसा कार्य करतो आहे हे दाखवण्याकरता काहीतरी खटपट करणारे आणि मन रिझवणारे म्हातारे लोक पाहिले की अक्षरशः त्यांची कीव येते . म्हणजे काय त्यांनी कार्यच करू नये का ? तर असे नाही . परंतु योग्य वेळी योग्य ते कर्म करावे . उदाहरणार्थ देह क्षीण झालेला असताना एका जागी शांतपणे बसून करता येण्याजोगी खूप साधने आहेत . नेमक्या अशा वयात उपरती होते आणि लोक नर्मदा परिक्रमेसारख्या कठीण उपक्रमासाठी बाहेर पडतात . आयुष्यभर माझे घर ,माझी मुले , माझी बायको ,माझा नवरा , माझे नातेवाईक , माझे मित्र म्हणून सांभाळलेली ,जपलेली ,वाढवलेली ,पोसलेली लोकं जेव्हा खरा रंग दाखवतात , तेव्हा खूप उशीर झालेला असतो . अशा वयामध्ये परिक्रमा करणाऱ्या लोकांचा त्रास मग नर्मदा मैय्या स्वतः सहन करते .परिक्रमावासींचे सरासरी वय पाहिले तर साठ ते सत्तरच्या आसपास आहे . क्वचितच एखादा तरुण तुम्हाला परिक्रमा करताना दिसेल . तरुण साधू परिक्रमावासी खूप दिसतात . परंतु तरुण गृहस्थाश्रमी मात्र परिक्रमेमध्ये जवळपास दिसत नाहीतच . या जगात आपले काय आहे आणि आपले काय नाही याचा जितक्या लवकर तुम्हाला उलगडा होईल ,तितक्या लवकर प्रगतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला आणि सुकर होईल या शंकाच नाही . सिंगाजी महाराजांना पुन्हा एकदा साष्टांग दंडवत केला आणि आश्रमाकडे परत निघालो . दरम्यानच्या काळात आलेले जवळपास सर्व लोक निघून गेले होते . आणि या संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही कडांचा वापर करून कोळ्यांनी विणलेली जाळी मला अडवू लागली . या दोन किलोमीटर मध्ये मी कमीत कमी २०० तरी जाळी तोडली असतील ! इतक्या कमी वेळामध्ये कोळी इतकी जाळी कशी काय विणतात काय माहिती !
सिंगाजी बाबा समाधी परिसर शंभर एकराचा आहे
सुंदर असा जोड पूल
 पुलावरील मधले टापू
 डाव्या हाताला खाली पाणी संपले आणि जमीन लागली . परंतु पूल अजूनही सुरू होता . इतक्यात खाली बांधलेल्या एका तंबू मधून कोणीतरी मला आवाज दिला , "नर्मदे हर बाबाजी ! नीचे आव ! "
मी खाली जाऊन पाहिले तर दोन साधू त्या तंबूमध्ये राहत होते . मला भोजन प्रसादी घेणार का असे त्यांनी विचारले . मी त्यांना दयाधाम आश्रमामध्ये उतरल्याचे सांगितले . साधू म्हणाला तुम्ही एक काम करा थोडेसे खाऊन घ्या . तिकडे अन्न मिळेल किंवा नाही याची शाश्वती नाही . नर्मदेच्या काठावर बसून आपले डोके लावायचे नसते ! त्यामुळे त्याने दिलेले भोजन मी प्रसाद म्हणून स्वीकारले . त्याने देखील फार आग्रह नाही केला एकदाच वाढून दिले . हे दोघे साधू भारतभ्रमण करत होते . हे ठिकाण आवडले म्हणून तंबू लावून मुक्काम केला होता . त्यांनी सांगितले की पाण्याची पातळी वाढल्यावर हे संपूर्ण क्षेत्र डूब मध्ये जाते . प्रसाद घेता घेता दोघांकडून साधू जीवनाचे अनेक मनोरंजक किस्से ऐकले . त्यांना देखील माझा स्वभाव आवडला आणि ते म्हणाले तुम्ही आधी सिंगाजी बाबाला आला असता तर तुम्हाला इथेच मुक्कामी ठेवून घेतले असते . पुढे जायची गरज पडली नसती .परंतु परिक्रमेमध्ये एकदा लावलेले आसन शक्यतो हलवायचे नसते त्यामुळे मी त्या दोघांचा निरोप घेतला . आश्रमामध्ये भरपूर गोंधळ चालला होता . जिकडे पहावे तिकडे कॉलेजची मुले मुली खेळताना बागडताना दिसत होती . मध्यप्रदेश मधल्या विविध कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एनएसएस चे शिबिर येथे चालू होते . विशेष म्हणजे याच्यात ५० अंध मुलांचा देखील एक समूह होता . मुले म्हणजे आपला जीव की प्राण ! आपसूकच काही मुले माझ्या भोवती गोळा झाली . माझा एकंदरीत अवतार पाहून त्यांना मौज वाटत होती . इथे एक पार होता . त्या पारावर आमची मैफल जमली .अंध मुलांशी गप्पा मारून त्यांना नर्मदा कशी जाणवते ते समजून घेतले . बहुतेक सर्वांना तिचा आवाज ओळखीचा वाटतो . रव म्हणजे आवाज आणि म्हणूनच नर्मदेचे एक प्रमुख नाव रेवा हेच आहे .रवा करणारी म्हणून रेवा . इतर मुलांकडून मी त्यांचे काय काम चालू आहे सर्व समजून घेतले . मुले स्वतः स्वयंपाक करून जेवणार होती . आता कुठे ते तयारीला लागले होते . त्यांनी परिक्रमावासींना सुद्धा आम्ही जेऊ घालू असे सांगितल्यामुळे दहा-बारा परिक्रमावासी बिचारे ताटकळले होते . माझी मैयाने चांगली सोय केली होती . एक टिक्कड पोटात गेल्यामुळे थोडासा आधार होता . बाकीचे परिक्रमावासी मात्र बिचारे जेवण सुरू होण्याची वाट बघत झोपी गेले . 
 हीच ती करुणाधाम धर्मशाळा , सिंगाजी बाबा .
अंगणामध्ये झाड दिसते आहे त्याच्या पारावर मी मुक्काम केला आणि समोरच्या मैदानात मुलांचे कार्यक्रम चालू होते
 हीच ती नकाशामध्ये लाल मार्कर ने दाखवलेली खोली
मुलांना अर्थातच स्वयंपाकाची तयारी करणे ,जेवण बनवणे , वाढणे यापैकी कशाचाच अनुभव नसल्यामुळे सगळाच सावळा गोंधळ उडाला होता ! खरे म्हणजे इथे अन्नक्षेत्र चालविण्याची जबाबदारी उज्जैन येथून आलेले सेवाराम आणि बाबूलाल या दोन मावस बंधूंनी उचललेली होती .या दोघांची पूर्वी परिक्रमा झालेली असून आता ते सेवा कार्य देत होते . परंतु मुलांनी सांगितल्यामुळे आज त्यांची चूल बंद होती .मुलांचे हास्य विनोद गप्पा टप्पा सुरू होते . मुलांचे सोबत शिक्षक कोण व किती आहेत याची माहिती घेऊन त्यांना देखील भेटून आलो . रात्री मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता . त्यापूर्वी मुलांचे एकत्रीकरण होणार होते . तेव्हा मी मुलांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हे समजून सांगावे अशी विनंती शिक्षकांनी मला केली . परंतु हा अधिकृत कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वीच मला गराडा घातलेल्या मुलांनी माझ्याकडून बरीच माहिती काढून घेतली होती ! आत मध्ये काही परिक्रमावासी उतरलेले होते . इथे एक परिक्रमावासी खूप दिवसांपासून राहत आहेत असे मला कळले . सिंगाजी बाबांचे दर्शन घेऊन ते देखील आले . मूळचा कुडाळ इथला असलेला परंतु सध्या बोरिवली मध्ये राहणारा आणि परिक्रमे मध्ये असलेला शैलेश कांबळे नावाचा हा युवक होता . याची ही दुसरी परिक्रमा चालू होते . पहिली परिक्रमा खूप गडबडीत झाल्यामुळे आता दुसरी परिक्रमा निवांत करूया असा विचार करून त्याने ही परिक्रमा उचलली होती . आमच्या गप्पा सुरू झाल्या . पहिल्या परिक्रमेमध्ये तुमच्या पुण्यातलाच एक माणूस माझ्यासोबत होता असे तो म्हणाला . नाव विचारले असता त्याने वैभव दळवी असे नाव सांगितले . आणि याचे पुण्यामध्ये केशकर्तनालय आहे हे देखील सांगितले . क्षणात माझी ट्यूब पेटली ! अरे हा तर तोच मनुष्य ज्याने मला केस कापताना विचारले होते की तुम्ही परिक्रमा केली का ! मी त्याला विचारले की त्याला फोन लाव आणि विचार की तू आतापर्यंत नर्मदा परिक्रमा करण्याचा सल्ला किती गिऱ्हाईकांना दिला आहे . त्याने लगेचच वैभवला फोन लावला . नर्मदे हर झाल्यावर शैलेशने विचारले अरे तू कधी तुझ्या कुठल्या गिऱ्हाईकाला परिक्रमा कर म्हणून सांगितले होतेस काय ? वैभव आठवू लागला . फोन लाऊड स्पीकर वर होता त्यामुळे मी सुद्धा ऐकत होतो . त्याला आठवले , " अरे हा ! एक दाढी मिशावाला घाऱ्या डोळ्याचा बाबा आला होता एकदा . आपला रेगुलर कस्टमर नव्हता . असाच दुकानात घुसलेला . मी त्याला का कुणास ठाऊक ,उगाच म्हणालो की तू नर्मदा परिक्रमा कर ! मैया ने बोलून घेतलं माझ्या कडून . परत काही आला नाही . का रे शैल्या ? तुला काय पडलंय त्याचं ? " मी फोन हातात घेतला आणि म्हणालो , "वैभव शेठ नर्मदे हर ! " " नर्मदे हर ! कोण ? कोण बोलतंय ? " " तोच ! घाऱ्या डोळ्याचा कस्टमर ! " मी एवढे बोललो मात्र तिकडे वैभव दळवीच्या आनंदाला पारावर उरला नाही ! "काय सांगताय ! तुम्ही परिक्रमे मध्ये आहात ? " "हो दादा . तुमच्या मुखातून नर्मदा मैयाने निरोप धाडला .मग आपण ऐकायला नको का ? तिने पूर्वी पण अनेक लोकांच्या मुखातून निरोप धाडला होता . पण मीच ऐकायला उशीर केला .ती असं काही करू शकते याच्यावर विश्वास नव्हता ना माझा ! " "तुम्ही परत आले की मला नक्की भेटा . काही लागलं तर मला फोन करत जा" "वैभव दादा मी सोबत फोन आणलेला नाही . पण तुम्हाला तुमच्या सांगण्यावरून मी परिक्रमा उचलली आहे हे सांगायची मनोमन इच्छा होती . म्हणून शैलेश दादा कांबळे भेटले ! मैय्याची लीला अगाध आहे ! " "मी तुम्हाला दुकानांमध्ये केस कापताना माझे परिक्रमेतले किस्से सांगत होतो बघा , तेव्हा माझ्यासोबत एक बाबाजी होता असे म्हटले ना ,तो हाच बाबाजी ! आता विचारा त्याला काय काय किस्से आहेत ! " "होय आमच्या गप्पा काय आज रात्रभर संपतील असे वाटत नाही ! आणि आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो की मी परिक्रमा संपल्यावर माझे केस ओंकारेश्वरला न कापता , नर्मदेच्या प्रत्येक कुंडामध्ये स्नान केलेले ते केस तुमच्या दुकानामध्ये येऊनच कापणार ! मैय्याला तुम्ही पण सांगून ठेवा , मी पण सांगतो ! " तेवढ्या मध्ये मी माझी परिक्रमा पूर्ण व्हावी याची तजवीज करून घेतली ! 
तोपर्यंत इकडे मुलांचे एकत्रीकरण झाले . त्यांच्यापुढे थोडा वेळ नर्मदा परिक्रमा म्हणजे काय या विषयावर थोडेसे हास्य विनोदाच्या अंगाने परंतु पुरेसे गांभीर्य त्यांच्या मनात उत्पन्न होईल अशा पद्धतीने बोललो . एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले तर दुसरीकडे जेवणाच्या पंगती बसल्या . थोडाफार भोजन प्रसाद इथे सुद्धा घेतला . आणि आत मध्ये झोपायच्या ऐवजी पारावरतीच पडल्या पडल्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहत राहिलो . शैलेश कांबळे आणि माझ्या गप्पा रात्रभर सुरू होत्या . तो बरेच दिवस इथेच राहिला होता . पुढे देखील वैभव दळवी ला भेटलो की आमचा शैलेश ला फोन व्हायचा . तो विविध प्रसिद्ध आणि चांगल्या आश्रमांमध्ये सेवा करण्यासाठी राहत होता . वैराग्य ही गोष्ट मोठी मजेशीर असते . एकदा ती तुमच्या मध्ये भिनली की तुम्हाला तिच्या परिणामांपासून सुटका मिळवणे अवघड असते . वैराग्याचा स्पर्श न झालेल्या लोकांना समोरचा नक्की काय करतो आहे कळत नाही . असे का करतो आहे ते देखील कळत नाही . परंतु आज नाहीतर उद्या बौद्धिक , मानसिक , भावनिक प्रगती झाल्यावर तो या टप्प्यावर येणार असतो हे निश्चित . पहाटेच्या सुमाराला आम्ही दोघे झोपलो . आज उघड्यावर झोपून देखील थंडी फारशी वाजली नाही हे विशेष . पहाटे सर्व आटोपून चंद्रानंद स्वामींच्या सोबत थोडा वेळ गप्पा मारल्या . सेवाराम आणि बाबूलाल या दोघांनी आग्रहाने बालभोग घेऊन जायला सांगितले त्यामुळे ताजा ताजा बालभोग खाल्ला आणि प्रस्थान ठेवले कारण आज देखील मी ३५ ते ४० किलोमीटर चाललो असतो तर महाशिवरात्रीला ओंकारेश्वरला पोहोचता येणे शक्य होते असे मला वाटत होते . बाकी नर्मदेची इच्छा ! नर्मदे हर !


लेखांक पासष्ठ समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर