लेखांक ६२ : अति विस्तीर्ण पुनासा धरणामुळे बदललेला मार्ग आणि बावरचे आनंदस्वामी

नर्मदा नदीवर अनेक छोटी मोठी धरणे आहेत. अमरकंटक इथे घातलेले छोटेसे बांध सोडून द्या .परंतु ज्याला खरोखरच धरण म्हणता येईल असे पहिले धरण म्हणजे बर्गी बांध आहे . ज्याला राणी अवंतीबाई बांध असे नाव आहे . त्यानंतर पुनासा गावातील पुनासा धरण किंवा इंदिरा सागर आहे . ओंकारेश्वर येथे देखील छोटेसे धरण आहे . त्यानंतर बांधून अर्धवट पडलेले परंतु कार्यान्वित न झालेले लेपा धरण आहे . आणि नर्मदा बचाव आंदोलनामुळे जगप्रसिद्ध केले गेलेले सरदार सरोवर धरण हे एक धरण आहे . एकूण लहान मोठी तीस धरणे नर्मदेवर आहेत . आता या प्रमुख धरणांचे उपग्रह नकाशे मी खाली जोडत आहे . आणि ते जोडताना मी स्केल अर्थात अंतर एकाच एककात ठेवलेले आहे .त्यामुळे तुम्हाला आकाराची तुलना करायला सोपे जाईल . या सर्व नकाशांचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की पुनासा धरण हे किती अजस्त्र आणि भव्य दिव्य आहे .
 बर्गी धरण
ओंकारेश्वर धरण
सरदार सरोवर धरण
 पुनासा धरण
स्थापत्य अभियंते आणि जिज्ञासू यांच्यासाठी धरणांची तांत्रिक माहिती देतो आहे ज्यामुळे तौलनिक अभ्यास सोपा जाईल .

सरदार सरोवर धरणाची भिंत १२१० मि लांब व १६३ मि उंच आहे . याचा पाणीसाठा सुमारे ८८००० चौरस किमी मध्ये पसरलेला असून पाण्याची विसर्ग क्षमता ३० लक्ष  क्युसेक इतकी आहे .  ३३४ टीएमसी पाणीसाठा असलेले हे धरण १४५० मेगावॅट विद्युत निर्मिती करू शकते . (सर्व आकडे सरदार सरोवर धरणाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेले आहेत )

जबलपूर जवळचे बर्गी धरण ६९ मिटर उंचीचे असून त्याची भिंत सुमारे साडेपाच किलोमीटर लांबीची आहे . साडेचौदा हजार चौरस किलोमीटर विस्तार आणि
१३८ टीएमसी पाणीसाठा असलेले हे धरण असून १०५ मेगवॅट विद्युत निर्मितीची याची क्षमता आहे .

पुनासा धरण ९२ मीटर उंच असून त्याची भिंत ६५३ मिटर रुंद आहे . ४३२ टीएमसी पाणीसाठा असणारे हे धरण ६१६४२ चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे . 
१००० मेगावॅट विद्युत निर्मितीची क्षमता या धरणाची आहे .
तुलनेने नगण्य आकाराचे असूनही ओंकारेश्वर धरण देखील ५०० मेगावॅट वीज तयार करू शकते , याला तिथला मैयाचा भौगोलिक उतार व प्रताप कारणीभूत आहे .
आकडेवारीचाच खेळ बघायचा झाला तर पुनासा धरणाचा पृष्ठभाग साधारण हजार चौरस किलोमीटरचा आहे . आणि सरदार सरोवर केवळ ३०० चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे . त्यातही सरदार सरोवर धरण अतिशय खोल अशा दऱ्यांमध्ये पाणी साठवते तर पुनासा धरण हे पसरलेल्या शेतजमिनी आणि सुमारे ४०००० हेक्टर वनक्षेत्र खाऊन पाणी साठवत आहे . त्यामुळे याचा विस्तार फारच आडवा-तिडवा भासतो . तूर्तास पुनासा धरण हे भारतातील सर्वात जास्त जलधारण क्षमता असलेले धरण मानले जाते . असो .
तर या धरणामुळे नर्मदा मातेचा काठ सोडून हंडिया गावातून मार्ग बदलावा लागतो . अर्थात हा मार्ग देखील काठाकाठानेच आहे परंतु नर्मदा मातेचे अखंड होणारे दर्शन मात्र इथे होत नाही . त्यासाठी चार-पाच दिवस चालावे लागते . तसे हे अंतर आठवड्याभराचे किंवा दहा दिवसाचे आहे . परंतु इथून पुढे माझ्या पायांना काय झाले मला कळाले नाही परंतु प्रचंड गतीने हे अंतर माझ्याकडून मैयाने कापून घेतले . तिच्या काठावरून चालताना टंगळमंगळ करणारी पावले ती दिसत नाही म्हटल्यावर चौपट गतीने चालू लागली ! 
 हांडिया घाट व पूल
हांडिया घाट चढल्याबरोबर डाव्या हाताला एक अतिशय प्राचीन शिवालय आहे . जिथे हंडीया चा पूल सुरू होतो अगदी त्याच बिंदूला हे देवालय असून याची स्थापना कुबेराने स्वतः केली आहे अशी मान्यता आहे .
पूल संपताना डाव्या हाताला मंदिर दिसू लागते . केशरी कमान म्हणजे हंडया घाटाचे प्रवेशद्वार आहे .
हे मंदिर प्राचीन व संरक्षित स्मारक आहे
श्री ऋद्धनाथ असे या महादेवाचे नाव आहे . मंदिर छोटेसेच असले तरी अतिशय सुंदर वास्तुकलेचा नमुना आहे . 
सुबक सुंदर रिद्धनाथ महादेव मंदिर हंडीया
 ॐ रिद्धनाथाय नमः ।
इथे काही काळ दर्शन वगैरे केले . शिवमहिम्न , शिवमानस पूजा , शिवपंचाक्षर स्तोत्र आदि शिवस्तुती गायली आणि पुढे मार्गस्थ झालो . खूप दिवसांनी प्रथमच डांबरी रस्ता दिसत होता . नर्मदेच्या काठावरील मऊशार थंडगार मातीतून चालणाऱ्या पायांना हा कडक तापलेला डांबरी रस्ता अजिबात आवडत नव्हता . नर्मदा समांतर असलेल्या एका रस्त्याने चालत राहिलो . बरेच अंतर चालल्यावर डाव्या हाताला डोंगरावर मंगळ नाथाचे मंदिर दिसू लागले . काल मी मुक्काम केला त्या शर्मा पुजाऱ्याने हे मंदिर उभे केले होते . तिथे दर्शन घेऊन पुढे जा असे त्याने सांगितले होते . डोंगर खडा व कठिण होता . दुरून डोंगर साजरे !  डोंगरावरील हिंडोलनाथ बाबा / मंगळनाथ बाबा
वर जाण्यासाठी खडा चढ आहे
 खडकांचा रंग वेगळाच आहे .
मंगळनाथाचे नूतन शिवलिंग अतिशय सुंदर ,भव्य आणि वैचित्र्यपूर्ण आहे . याची जलहरी त्रिकोणी आकाराची आहे .
डोंगरा वरून समोर दिसणारी नर्मदा मैया आणि डोंगरावरचा भव्य त्रिशूल
डोंगरावरील मंदिर
निर्मनुष्य डांबरी रस्त्याने चालताना अचानक एका माणसाने हाक मारली .नर्मदे हर केले आणि चहा पिण्यासाठी घरी चलण्याची विनंती केली . याचे नाव सत्यनारायण धनगर असे होते .धनगर हे आडनाव इथे सर्वत्र लावतात. मांगरुल नावाच्या गावामध्ये याच्या घरी सुरेख चहा त्याने पाजला . मांगरोल नावाचे एक गाव पुढे नर्मदे काठी लागते ते वेगळे आणि हे वेगळे .इथपासूनच नर्मदेमध्ये मगरी चालू होतात . महाराष्ट्रा मध्ये देखील या नावाची गावे आहेत . मंगरूळपीर किंवा मंगरूळ दस्तगीर अशी दोन गावे विदर्भामध्ये आहेत . मेंगलोर असे आपण ज्याला म्हणतो ते कर्नाटकातील कारवार प्रांतातील गाव ,त्याचे मूळ नाव मंगळुर असेच आहे . उर म्हणजे गाव .पूर म्हणजे शहर . मंगळाचे गाव म्हणून मंगळूर . इथले मांगरुल त्याच शब्दाचा अपभ्रंश असावा असा माझा अंदाज आहे . सत्यनारायण धनगराने मला पुढील सर्व रस्ता समजावून सांगितला . त्याने मला सांगितले की जर मी त्याने सांगितलेला मार्ग घेतला तर आज रात्रीच्या मुक्कामापर्यंत मी बावर नावाच्या गावाला देखील पोहोचू शकतो . इथे त्याचे मेहुणे माणेकचंद यांनी आनंद स्वामी नावाच्या एका महाराजांना आश्रम उभा करून दिलेला होता. मार्ग असा होता मांगरूल इथून सातातलाई ,जामुनी ,पचोला , कचबेडी ,पाचातलाई , सोनतलाई ,बावर .भरपूर चालत मी रातातलाई गावामध्ये आलो . रातातलाई गावामध्ये एका टेकडीवर समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती आहे .
समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेला मारुती राता तलाई
उत्तर भारतामध्ये मारुतीला बालाजी असे म्हणतात आणि त्याचा अतिशय सुंदर असा साजशृंगार करण्याची पद्धत इथे आहे
इथे प्रेम पटेल नावाच्या एका जमीनदाराने मला चहा पिण्यासाठी घरी नेले . कुठल्याही घरात जाताना मी पादत्राणे बाहेर काढून ठेवत असे . तसे मी बूट काढल्याबरोबर फाटलेल्या मोजातून बाहेर आलेले माझ्या पायाचे अंगठे त्याने पाहिले . आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला ! त्याने मुलाला एवढेच सांगितले की काल जी गोष्ट आपल्याला नको होती आणि तरी देखील आपण विकत घेतली ती आतून घेऊन ये .त्याच्या मुलाने धावतच आत मध्ये जाऊन नवे कोरे मोजे माझ्यासाठी आणले . पटेल सांगू लागला की काल बाजारासाठी ते हरदा शहरात गेले होते . शॉपिंग करताना हे नवे कोरे अडीचशे रुपयांचे उंची मोजे त्याने विनाकारण घेतले . मॉलच्या काउंटरवर त्याने हे मोजे परत सुद्धा केले . परंतु पुन्हा त्याला काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी ते मोजे ठेवून घेतले . आज माझे पाय बघितल्या क्षणी त्याला आठवले की हे मोजे बहुतेक या माणसासाठीच आपल्याला मैय्याने दिले ! मी मोजे घातल्यावर ते चांगले नडगीपर्यंत पोहोचत होते . कापड जाड होते आणि थंडी वाजत नव्हती . 
 प्रस्तुत लेखकाचे जुने फाटू लागलेले मोजे
 नर्मदाभक्त प्रेम पटेल , गाव रातातलाई यांनी दिलेले अप्रतिम मोजे

उत्कृष्ट दर्जाचे ते मोजे दिल्याबद्दल मी प्रेम पटेल यांचे आभार मानले . आणि पुढे निघालो . 
चालता चालता दुपार झाली आणि पोटात कावळे ओरडू लागले . इतक्यात रस्त्यावर समोरच एका पाटीने लक्ष वेधून घेतले .
दिवाणजी जाट यांचे जय मा नर्मदा अन्नक्षेत्र
दिवाणजी जाट नावाचे एक शेतकरी आणि त्यांचे भाऊ दोघे मिळून त्यांच्या शेतावरती परिक्रमावासींना रोज भोजन प्रसाद देत असत . शेतातच छोटासा मांडव टाकून अतिशय सुंदर विश्रांतीची व्यवस्था त्यांनी केलेली होती . दोघे भाऊ स्वतः स्वयंपाक करायचे आणि सर्वांना जेवायला वाढायचे . आता देखील तिथे आधीच काही परिक्रमावासी येऊन थांबले होते . बंगाली बाबूंची ताटातूट झाली होती आणि एकटा सात्यकी रॉय तिथे पोहोचला होता . सर्वांना बटाट्याची भाजी ,टिक्कड , लोणचे ,पापड असे सुंदर जेवण जाट बंधूंनी दिले .
स्वतःच्या खिशातून खर्च करून हे लोक अन्नदान करतात ही फार मोठी गोष्ट आहे . 
अन्य एका मार्गावर लावलेली त्याच अन्नक्षेत्राची पाटी
दिवाणजी जात बंधू आणि त्यांनी शेतातच तयार केलेली सुंदर कुटी
या जाट बंधूंचा स्वतःचा हार्वेस्टर होता . मी इतके दिवस मैया काठच्या छोट्या छोट्या शेतांच्या तुकड्या मधून चालत असल्यामुळे ट्रॅक्टर सुद्धा पाहिलेला नव्हता . परंतु इथे जमिनीवर मोठी मोठी शेती असल्यामुळे हार्वेस्टर नावाचे राक्षसी यंत्र वापरले जाते . यातील बरेचसे हार्वेस्टर पंजाब मधून इथे हंगामा पुरते येतात आणि भरपूर कमाई करून परत पंजाबला निघून जातात . परंतु जाट बंधूंनी डोके लावून स्वतःचा हार्वेस्टर विकत घेतला होता . त्यातून त्यांना पुरेसे उत्पन्न मिळत होते असे ते म्हणाले . फक्त या क्षेत्रामध्ये पंजाबी लोकांची एकाधिकारशाही असून एखादा सुटा भाग मिळवायचा झाला तर फार मिनतवाऱ्या कराव्या लागतात असे देखील त्यांनी सांगितले . भोजन झाल्यावर थोडीशी विश्रांती घेतली आणि पुढे खूप चालायचे आहे हे लक्षात घेऊन निघण्याचा निर्णय घेतला . आता सगळा फुफाट्याचा मार्ग लागला होता . इथून चालताना मध्येच एका घराच्या दाराला असलेल्या छोट्याशा फटी मधून एक छोटी मुलगी बाहेर आली आणि खाऊ मागू लागली . मी तिला खाऊ दिला . नंतर तिचा छोटा भाऊ आणि आई देखील बाहेर आले .मी पुढे निघून गेलो .सात्यकी ने त्या घराचा फोटो काढून फेसबुक वर टाकला होता तो आपल्यासाठी टाकत आहे . परिक्रमेमध्ये पाहिलेले घर आणि घर ,मंदिर आणि मंदिर , आश्रम आणि आश्रम , झाड आणि झाड , पार अन पार जसा आहे तसा आठवतो हे एक मोठे आश्चर्यच आहे ! सुदैवाने मी रोजनिशी लिहीत असल्याचा देखील मला फायदा झाला . परंतु 'ग्राफिकल किंवा पिक्चोरियल मेमरीअसल्याचा हा परिणाम असावा . असो .
हाच तो मातीने भरलेला रस्ता आणि त्यावर मला खाऊ मागणारी छोटी मुलगी . सोबत तिचा भाऊ आणि तिची आई .
पुढे जाणाऱ्या फुफाट्याच्या रस्त्याचा सात्यकीने काढलेला फोटो . तो परिक्रमा करत नसल्यामुळे हातामध्ये दंड बाळगण्या ऐवजी त्याने अशी 'ट्रेकिंग स्टिक ' आणली होती . परिक्रमे मध्ये अशा काठीला परवानगी नसते किंबहुना असे समजा की ही काठी काही कामाची नसते . किमान काना एवढ्या उंचीचा दंड हवाच . 
मी माझ्या नियमानुसार एकटा चालत पुढे निघून गेलो होतो . इकडे मागून एक बैलगाडी जोरात येते आहे असं मला आवाज आला . म्हणून मी घाईने बाजूला झालो आणि बघतो तर काय बैलगाडी मध्ये स्वतः सात्यकी रॉय विराजमान झालेला आहे ! त्याने गाडी थांबवायला लावली आणि मला म्हणाला चल हा गाडीवाला देखील बावरपर्यंत चालला आहे . मी त्याला सांगितले की परिक्रमे मध्ये वाहनाने जायचे नसते त्यामुळे तू पुढे जा मी काही येणार नाही . मग सात्यकी ने एक डोके लावले . तो मला म्हणाला तुझे ओझे गाडीत ठेवायला दे आणि तू चालत ये . मी तसेही नर्मदा मातेची ,पूजा साहित्याची आणि पुस्तकांची एक वेगळी झोळी करून ती गळ्यामध्ये लटकवायचो . ती शबनम पिशवी आणि दंड हाच खरा परिक्रमेचा ऐवज होता . त्यामुळे बाकीचे जड सामान व गोळा केलेली दगडी शिवलिंगे असलेली झोळी मी बैलगाडीमध्ये ठेवून दिली . नर्मदा माता नेहमी आपल्या सोबतच ठेवायची असते. गाडीवान मुलगा अतिशय तरुण होता .तो विकत घेतलेला नवीन बैल दाखवण्याकरता सासरेबुवांकडे निघाला होता . याचा जुना बैल शर्यतीमध्ये पळणारा होता . त्याच्यासोबत नवीन बैलाला पळण्याचा सराव देखील व्हावा हा देखील त्याचा आजच्या प्रवासा मागचा एक हेतू होता . दोन्ही बैल अतिशय चपळ आणि चंचल होते . त्याने गाडी हाकली आणि मी गाडीच्या मागे चालायला सुरुवात केली . साधारण पंधरा-वीस किलो वजनाची पिशवी पाठीवरून उतरल्यामुळे मला जणू काही पंख फुटले आहेत असे वाटू लागले होते ! चालताना इतके हलके यापूर्वी कधीच वाटले नव्हते ! या बैलांची एक गंमत होती ! चालताना माझी गती जरा जरी वाढली तर ते देखील गती वाढवायचे . काही केल्या ते मला पुढे जाऊ देत नव्हते . त्या गाडीवाल्या मुलाने मला सांगितले की तुम्ही एक प्रयोग करून बघा . कितीही वेगाने यांच्या पुढे जाऊन दाखवा .  असे म्हणता क्षणी मी वेगाने धावायला सुरुवात केली . क्षणाचाही अवधी न दवडता दोन्ही बैलांनी वेगाने धाव घेतली . मागे बसलेला सात्यकी पार आडवा झाला ! ओरडू लागला ! तरी ते थांबले नाहीत ! शर्यतीमध्ये बैल काय वेगाने पळतात याचा अनुभव मी त्या दिवशी जवळून घेतला . त्या बैलांना भयानक वेग होता . ते संपूर्ण अंतर मी जवळपास धावतच पूर्ण केले . कारण बैलगाडी पुढे गेली म्हणून मी बैलगाडीला गाठायला जावे तर बैल पुन्हा पळायला लागायचे ! शेवटपर्यंत त्या बैलांनी मला पुढे जाऊ दिले नाही ! आज पाठीवरील भार हलका झाल्यामुळे प्रचंड गतीने चाललो आणि खूप मोठे अंतर तोडले . मधली गावे पार करताना काही ठिकाणी लोकांनी आम्हाला चहा पाजला . तिथे या बैलांना देखील हिरवा चारा आणून टाकायचे . आणि गाडीवाल्या मुलाला देखील चहा मिळायचा .  बैलांना बादली बादली पाणी प्यायला मिळायचे . नर्मदा मातेच्या सोबत चालणाऱ्या प्रत्येकाची सेवा नर्मदा खंडामध्ये होतेच होते ! या बैलांसोबत मी सुमारे २५ किलोमीटर तरी पळालो असेन . ते देखील दुपारचे जेवण विश्रांती वगैरे सर्व झाल्यानंतर . ती बैलगाडी आली नसती तर आज कुठल्याही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचता येणे मला अशक्य होते . कारण मी ज्या गतीने आज चाललो त्या गतीने बैलगाडी नसताना अजिबात चाललो नसतो . समोर एखादे ध्येय दिसत असले की ते गाठण्यासाठी माणसाला गती प्राप्त होते  .ते ध्येय जितके कठीण तितकी गती अधिक ! वाटेमध्ये जामली नामक गावामध्ये एक आश्रम लागला .  या भागात परिक्रमावासींची फारशी सेवा करणाऱ्या संस्था आश्रम वगैरे नाही आहेत . त्यामुळे जे काही मोजके आश्रम आहेत तिथे आवर्जून लोक तुम्हाला थांबवतात . या आश्रमामध्ये चहा पिऊन झाल्यावर सात्यकीने बैलगाडी चालवायचा प्रयत्न केला आणि मी त्याचा फोटो काढला .
 हीच ती बैलगाडी . डावीकडचा नवा बैल व उजवीकडचा जुना बैल . गाडीवर बसलाय तो सात्यकी रॉय . मागे बाणाने दाखवलेली प्रस्तुत लेखकाची झोळी . डावीकडे उभा गाडामालक व त्याचा मित्र तसेच सेवादार ग्रामस्थ . हे छायाचित्र प्रस्तुत लेखकाने काढलेले आहे . 
हीच ती जीवा शिवाची बैल जोड ! प्रस्तुत लेखकाला जालीकट्टू च्या बैलांचा तलावामध्ये व्यायाम घेण्याचा सराव आहे . तो अनुभव इथे अनोळखी बैल हाताळताना कामाला आला !

इथून बैलगाडा मालक निघून गेला . त्याने जाताना माझे खूप कौतुक केले . तो म्हणाला शक्यतो परिक्रमावासींना बसा म्हणलं की ते गाडीत बसतातच . मी गाडीमध्ये अजिबात बसणार नाही भले २५ किमी पळावे का लागेना , असा माझा निग्रह त्याला आश्चर्यकारक वाटला . परंतु यात कौतुकास्पद खरंच काही नव्हतं . परिक्रमेमध्ये आपण चालण्यासाठीच आलेलो आहोत . हे सतत आपल्या चित्तामध्ये घोटत राहावे . या निमित्ताने मला सर्वांनाच एक सांगावेसे वाटते ,परिक्रमा करताना असा मोह अनेक वेळा होऊ शकतो की आपल्याला मनुष्य विचारतो आहे तर त्याच्या गाडीवर बसायला काय हरकत आहे . कोण पाहणार आहे ? असे तुम्हाला कधीही वाटू शकते . कोण पाहणार आहे ,या प्रश्नाचे उत्तर आहे , नर्मदा मैया पाहणार आहे ! ती सर्वसाक्षी ,सर्वव्यापी आहे . त्यामुळे थोडाफार गाडीने प्रवास करून किंवा आपले सामान पुढे पाठवून देऊन आपण मागे निवांत चालत येऊन परिक्रमा करू नये . मी चालताना पूर्ण वेळ माझ्या झोळीवरचा माझा हात काढलेला नव्हता . सोबत कमी सामान ठेवण्याचे महत्त्व काय आहे हे देखील मला त्या दिवशी कळले आणि इथून पुढे मी जमेल तितके सामान कमी कमी करत गेलो . 
जामली गावातील हेच ते जंभेश्वर नर्मदा सेवा आश्रम अन्नक्षेत्र
बरोबर सूर्य अस्ताला जात असताना बाबर किंवा बाबरच्या आशीर्वाद मध्ये मी पोहोचलो होतो जंगलामध्ये असलेला सुंदर असा आश्रम आहे सत्यनारायण धनगर यांचे मेहुणे माणिकचंद यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा आश्रम उभा केलेला आहे अतिशय शांत , सुंदर , प्रशस्त आणि पवित्र आश्रम होता . इथे कपिलेश्वर महादेवाचे मंदिर होते आणि आनंद स्वामी नावाच्या संन्यासी महाराजांची निवासाची खोली होती . आश्रमाला संपूर्ण भिंत होती कारण जंगली श्वापदाचे भय होते . गेल्या गेल्या डाव्या हाताला स्वामीजी दरबार लावून बसायचे ती जागा होती . उजव्या हाताला पहिल्या मजल्यावर त्यांची सुंदर अशी खोली होती . समोर महादेवाचे मंदिर होते . कपिल मुनींनी तपस्या केली म्हणून कपिलेश्वर महादेव .  त्याच्या शेजारी डाव्या हाताला परिक्रमावासींची उतरण्याची दोन मजली अतिशय सुंदर आणि प्रशस्त व्यवस्था होती . मी गेलो तेव्हा मोर्शी चा एक परिक्रमावासी आधीच येऊन उतरला होता . त्याचे काहीतरी वाचन चालू होते . आणि तो बऱ्यापैकी माणूसघाणा होता . त्यामुळे मी त्याच्याशी न बोलता स्वच्छ हात पाय तोंड धुवून आश्रम पाहायला बाहेर पडलो . आणि हो एक सांगायचे राहिले ! आपला बंगाली बाबू जामली आश्रमातच राहिला ! २५ किलोमीटर धावणाऱ्या बैलगाडी मध्ये बसून तो खूप थकला होता ! त्यामुळे पुढचे पाच किलोमीटर त्याने टाळले आणि मागेच मुक्काम केला ! या उलट माझ्या पायांना अशी गती प्राप्त झाली होती की ती बैलगाडी थांबली नसती तर अजून दहा किलोमीटर नक्की गेलो असतो ! माणसाला प्रगती करण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी नेहमी एका आलंबनाची अथवा आधाराची गरज असते हे अगदी खरे आहे ! 
चला तुम्हाला आश्रम फिरवून आणतो .
वरील नकाशा मध्ये दिसणारा निळा झेंडा म्हणजे जंगलाच्या मधोमध असलेला आपला बावरचा आश्रम असून नर्मदा मातेच्या जलसाठ्यापासून तो किती जवळ आहे हे आपण पाहू शकता . 
आश्रमातील कपिलेश्वर महादेव मंदिर . 
कपिलेश्वर महादेव
महादेव
श्री कपिल महामुनी
गणपती बाप्पा आपल्या वडिलांची पूजा करताना
आश्रमामध्ये असे सेल्फी पॉइंट तयार केलेले आहेत
मध्यभागी झाडाचा एक पार आहे आणि नागोबा आहे .डाव्या हाताला पांढरी टाकी दिसते आहे त्याच्या शेजारी दिसणाऱ्या इमारतीमध्ये मी मुक्काम केला होता . 
डावीकडे हनुमंतांच्या छोट्या मंदिराच्या मागे परिक्रमा वासी निवास
आश्रमातील हनुमान जी
संध्याकाळी आश्रमामध्ये आरती होती . इथे एक खूप मोठा शंख होता . मी आजपर्यंत अनेक शंका वाजवले परंतु इतका सुंदर शंख पाहिला नव्हता . सलग एक मिनिट तो शंख आरामात वाजवता यायचा . संपूर्ण आरती संपेपर्यंत मी तो शंख वाजवण्याचा पुरेपूर आनंद घेतला ! रात्री गावातील सेवादार लोकांनी येऊन अप्रतिम खिचडी बनवून खायला घातली . त्यानंतर महाराजांसोबत सत्संगाला बसलो . आनंद स्वामी अतिशय तेजस्वी संन्यासी होते आणि अतिशय गोड आवाजामध्ये भावपूर्ण गाणी गायचे . त्यांनी खूप मार्गदर्शन केले आणि भरपूर गाणी सुद्धा म्हटली . यांचे मार्गदर्शन घ्यायला खूप लोक यायचे . इथून पुढे हळूहळू वनवासी लोकांचे प्रमाण वाढत जाते . त्यामुळे त्यांच्याकडे येणारे भक्त देखील बहुतांश वनवासी किंवा बिश्नोई समाजाचे असायचे . महाराज अतिशय शांतपणे सर्वांना उत्तरे द्यायचे . महाराजांनी मला वरती नेऊन त्यांची कुटी दाखवली .पुस्तके दाखवली . मी खाली आल्यावर मंदिरातील शिष्य मंडळी मला सांगू लागली की महाराज वरती कोणालाच घेऊन जात नाहीत .
आश्रमातील महाराजांच्या कुटीकडे जाणारा जिना आणि महाराजांची कुटी
महाराज अतिशय शांत ,सात्विक ,विद्वान आणि अभ्यासू होते . त्यांची शांतता ही वादळानंतरची शांतता होती असे जाणवत होते ! खूप शोधूनही मला त्यांचा फोटो सापडला नाही यावरून त्यांची विरक्ती लक्षात यावी . त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टींचे चिंतन करत झोपी गेलो . सकाळी भल्या पहाटे उठून मागे असलेल्या जंगलामध्ये डोल डाल आटोपून आलो . जंगल फारच भयानक होते . प्राण्यांचा वावर असल्याच्या खुणा जाणवत होत्या . मी चुकीच्या वेळी तिथे गेलो होतो परंतु पर्याय नव्हता . शेजारीच गावाची वस्ती असल्यामुळे जंगलात जाण्याशिवाय पर्याय नव्हता . इथे एक बंद पडलेली शाळा देखील दिसली . आश्रमात असलेल्या टाकीखाली आंघोळ केली . पूजा वगैरे आटोपून आनंद स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन पुढचा मार्ग पकडला . आज खिरकिया या गावांमध्ये पोहोचायचे असे माझे नियोजन होते परंतु नर्मदा मातेच्या मनात काहीतरी वेगळेच होते . तो दिवस कायमचा लक्षात राहिला .



लेखांक बासष्ठ समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर