लेखांक ६१ : खरा रेवाभक्त कृषक रामदयाळ कीर आणि नर्मदेच्या नाभी स्थानचा पागल बाबा आश्रम
नर्मदेच्या नाभीस्थानाच्या जवळ मी आता पोहोचत होतो . नेमावर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नर्मदेचे नाभी स्थान म्हणून ओळखले जाते . ते उत्तर तटावर आहे . मधोमध नर्मदेची नाभी आहे . नाभी म्हणजे नाभीकुंड आहे . आणि दक्षिण तटावर हंडीया गाव आहे . भाविक भक्त नर्मदा नाभीचे दर्शन घेण्यासाठी नावेने जातात परंतु परिक्रमावासींना नर्मदेच्या मध्यापर्यंत प्रवेश करायला परवानगी नाही . तर हा परमपावन परिसर जवळ येत असल्यामुळे हळूहळू आश्रमांची संख्या वाढत जाते . आता देखील काठाने चालताना मी एका मागोमाग एक गावे मागे टाकत होतो तसेच अनेक आश्रम देखील मागे टाकले .गोयद गाव सोडल्यावर अजनई ,सुरजना ,बगलातर , मनोहरपुरा , भमोरी अशी गावे पार केल्यावर हंडीया येते . या संपूर्ण भागामध्ये नर्मदेचा किनारा अतिशय मजेशीर आहे .म्हणजे सलग एकसंघ रेषेमध्ये नर्मदा वाहत नसून अतिशय कातरलेला कुरतडलेला किनारा आहे .कधी कधी नर्मदा जलाची पातळी वाढून ती विस्तृत पात्र धरून वाहते .परंतु पाणी उतरल्याबरोबर मोठे मोठे खड्डे तयार होऊन त्यात पाणी साचून राहते व आजूबाजूला वाळूचे रस्ते तयार होतात . त्यामुळे नक्की मूळ पात्र कुठले हे बरेचदा लक्षात येत नाही . इतके छोटे छोटे तलाव तयार झालेले असतात . विशेषतः मी अगदी किनारा धरून चालत असल्यामुळे मी बरेचदा फसलो . बरेच चालल्यावर लक्षात येतसे की डावीकडे एक मोठा तलाव साचून राहिलेला आहे आणि तो पोहत पार करता येणे शक्य नाही कारण त्यात गाळ असायचा . मग पुन्हा त्या तलावाच्या काठाने उलटे चालायचे आणि किनारा पकडायचा . परंतु त्यामुळे मानवी वावर नसलेल्या अनेक जागा पाहायला मिळाल्या . जिथे वाळूचा उपसा चालत नाही तिथे तिथे प्रचंड पक्षी जीवन पाहायला मिळाले . कारण या टापूतील वाळू माफियांमुळे बराचसा भाग पक्षांसाठी निरुपयोगी ठरलेला आहे . दिसायचे तिथे एकदम शंभर शंभर पाणकावळे दिसायचे . तिथेच मोठाले बगळे पण असायचे . बाकी वाळू उपसा असेल तिथे शुकशुकाट असायचा . भुरा बगळा सारख्या काही पक्षांनी मात्र मोठ्या हिमतीने मानवासह राहण्याचे सहचर्य उत्तम पैकी आत्मसात केलेले आहे .
या भागातील नर्मदा पात्राचे किती विविध प्रकार आढळतात हे आपल्याला कळावे म्हणून खालील छायाचित्र पाहावीत . ही सर्व याच भागातील गुगल नकाशावरून साभार घेतलेली आहेत .
तशा गडबडीमध्ये देखील लोकांनी शेती करणे काही सोडले नव्हते . उलट वाळू उपसा करणाऱ्या लोकांच्या जाण्या येण्यामुळे शेताचे नुकसान होऊ नये म्हणून चांगली मजबूत कुंपणे सर्वत्र घातलेली दिसत होती .
कुंपण ओलांडून जाण्यापेक्षा मनुष्य स्वाभाविकच बाहेरून पुढे मार्गस्थ होतो . परंतु त्यामुळे मैय्याचा सहवास तुटतो याची कल्पना शेतकऱ्यांना बरेचदा नसते ! इथून पुढे तर एका अतिशय विचित्र समस्येला तोंड द्यावे लागले . ती समस्या होती मानवी विष्ठेवर घोंगावणाऱ्या घर माशांची जिल्हा इंग्रजी मध्ये कॉमन हाऊस फ्लाय असे म्हणतात . ग्रामीण भाषेत तिला अतिशय अश्लाघ्य परंतु योग्य शब्द आहे . गूमाशी .
या माशा चालताना प्रचंड त्रास देतात . सतत तुमच्या डोक्याभोवती कानाभोवती नाका भोवती उडत राहतात . त्यांचा आवाज इतका त्रासदायक असतो की आपले लक्ष विचलित होते . शिवाय त्या संधी मिळताच कुठेतरी बसायचा प्रयत्न करतात . यांना सतत हाताने हाकलून हात दुखायचा . एका हातात दंड असायचा . अखेर मी तो दंड गोल फिरवायला सुरुवात करायचो . त्याने थोडाफार फरक पडायचा परंतु या पुन्हा हजर ! त्यांना घालवण्याचा एकही खात्रीशीर उपाय मला सापडला नाही . मी हातामध्ये उपरणे घेऊन त्यांनी माशा वारायचो . बरं यांची संख्या इतकी प्रचंड होती ती सलग चार-पाच किलोमीटर वेगळ्या वेगळ्या माशा तुमच्या मागे लागायच्या . पूर्वी एका प्रकरणांमध्ये मी मानवी विष्ठे संबंधित विस्तृत विवेचन केलेले आहे . त्यातील नियम न पाळल्याचा हा परिणाम होता . या माशा नेमक्या ठराविक भूभागातच आढळायच्या . कुठल्याही गावाजवळ कधी इतक्या माशा सापडल्या नाहीत जितक्या माशा तात्पुरत्या वस्तीजवळ सापडायच्या .उदाहरणासह सांगतो . खालील नकाशा पहा . सुरजना गावानंतर बाकुल नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते .
चित्रात उजवीकडे वाहणारी नर्मदा माता आहे . डावीकडे उंच टेकाडावरील शेती आहे . मध्ये वाळूचा किनारा दिसतो आहे . समोर बाकुल नदी नर्मदेला येऊन मिळालेली दिसते आहे . उजवीकडे वाळूचे ढिगारे उपसण्याचे काम चालू आहे आणि ती घेऊन येणाऱ्या नावांची गर्दी दिसत आहे . त्यानंतर वाळू वाहून नेणारे डंपर , हायवा ,ट्रॅक्टर आदींची रांग दिसते आहे . आणि त्यानंतर इथे काम करणाऱ्या कामगारांची तात्पुरती घरे ,झोपड्या , राहुट्या दिसत आहेत .
प्रश्न वाळू उपसणे हा नव्हता . परंतु या वाळू उपसणाऱ्या हजारो कामगारांनी योग्य पद्धत न अवलंबता केलेल्या शौच विसर्जनामुळे हा संपूर्ण पट्टा हागणदारीयुक्त झाला होता . कामगार, त्यांच्या बायका, आई-वडील ,मुले असे सर्वच जण इथे ओळीने माळा लावत होते . त्यावर घोंघावणाऱ्या करोडो माशा अक्षरशः बेजार करून सोडत होत्या . शेवटी मी अक्षरशः संपूर्ण चेहरा उपरण्याने झाकून चालायला सुरुवात केली . या लोकांचे प्रबोधन केले तर हा प्रश्न सुटणार आहे . एकंदरीतच या विषयाचे व्यापक राष्ट्रीय प्रबोधन होणे आवश्यक आहे . ज्यांना या क्षेत्रामध्ये काही सामाजिक कार्य उभे करायचे आहे त्यांना प्रचंड संधी आहे . हेच मलमूत्र खड्डा करून त्यात विसर्जित करून माती लोटून दिली तर अतिशय सुपीक खताचे काम करणार आहे . शिवाय त्यातून रोगराईचा होणारा फैलाव सुद्धा थांबणार आहे . एकंदरीत इथून मोठ्या कष्टाने कसाबसा मार्ग शोधून पुढे जात असतानाच शेतकऱ्यांनी आडवी घातलेली कुंपणे प्रचंड त्रास देत होती . मनापासून अशा शेतकऱ्यांबद्दल वाईट वाटू लागले . हे खरे आहे की परिक्रमावासी आजकाल काठाने जात नाहीत . परंतु हे देखील तितकेच खरे आहे की अशा पद्धतीने घातलेल्या अशास्त्रीय , अतार्किक आणि त्रासदायक कुंपणांमुळे परिक्रमावासी तिकडून जाणे टाळतात . असो .
एखाद्या रणरणत्या वाळवंटातून जाताना अचानक समोर एखादा थंडगार पाण्याचा झरा यावा तसे काहीसे वाटावे अशी एक पाटी समोर दिसली . त्यावर लिहिले होते , "नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा वासी कृपा करके मेरे क्षेत्र में अपने चरणों की धुली झाडे ।आपके चरण स्पर्श से मेरा खेत पावन हो जायेगा । " नुसती पाटी लावली नव्हती तर शेतातून जाण्यासाठी बाण वगैरे काढून सुंदर पायवाट बनवली होती जिच्या दोन्ही बाजूंनी सुंदर फुलझाडे लावली होती . हा अतिशय स्वर्गीय अनुभव होता ! त्या शेतातच उभे राहून नर्मदा मातेला प्रार्थना केली की या शेतकऱ्याला उदंड आयुष्य मिळू दे आणि त्याच्या पुढील सर्व पिढ्यांचे कल्याण होऊ दे ! शेतातून बाहेर पडल्या पडल्या वाळू वाल्यांच्या झोपड्या सुरू होत होत्या . त्यातल्या एका म्हाताऱ्या स्त्रीला मी विचारले की माताराम हे कुणाचे शेत आहे ? तेव्हा तिने रामदयाळ कीर असे मालकाचे नाव सांगितले . परंतु तो तर गावाला गेला असून दोन दिवसांनी परत येईल हे देखील तिने सांगितले . काय झाले असे विचारल्यावर मी तिला सांगितले की त्याने शेतामध्ये केलेली सुंदर मार्गक्रमणा एका परिक्रमावाशाला फार आवडली आणि त्याने तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिले आहेत असे त्याला सांगा . असे मी सांगेपर्यंत समोरून मोटरसायकल वरून एक साधारण पन्नास पंचावन्न वर्षाचा मनुष्य येताना दिसला त्याबरोबर माताराम म्हणाली हे काय रामदयाळ कीर स्वतः येत आहेत ! मला पाहून त्यांनी गाडी थांबवली आणि नर्मदे हर केले . आपण गावाला गेला होता ना ? असे विचारल्यावर तो म्हणाला की जाणार होतो . परंतु अचानक असे वाटले की आज नको उद्या जावे म्हणून मी परत माघारी आलो . प्रत्यक्षात याची भेट व्हावी अशी मनापासून इच्छा निर्माण झाली होती ती मैयाने पूर्ण केली .दुसरे काय ! मी त्यांचे मनापासून आभार मानले आणि त्यांना सांगितले की आपण आपल्या शेतातून परिक्रमावासी जावेत म्हणून जे काही प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे मी अतिशय प्रभावीत , अचंबित व तितकाच आनंद झालेलो आहे ! तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करणारी ही कृती तुमच्या हातून घडलेली आहे ! त्याला देखील खूप आनंद झाला आणि त्याने चहा पिऊन जाण्याची विनंती केली . वाळू उपसा करणाऱ्या लोकांना चहा विकणारी एक छोटीशी झोपडी वजा टपरी तिथे होती . तिथे आम्ही दोघे चहा पीत बसलो . रामदयाळ ने त्याची कथा थोडक्यात मला सांगितली .तो देखील पूर्वी इतर शेतकऱ्यांप्रमाणे माझी जमीन , माझे शेत वगैरे करत असे . एकदा एका नागा साधूने, ह्याने साधूला अडवल्यावर त्याचे प्रबोधन केले आणि तिथून पुढे त्याची बुद्धी पालटली . त्याने ज्या दिवसापासून परिक्रमा वासी आणि पर्यायाने नर्मदा मैया ला जाण्यासाठी त्याच्या शेताचे दरवाजे खुले केले ,त्या दिवसापासून त्याची अतोनात प्रगती झालेली आहे . केवळ शेती करणारा हा मनुष्य आता स्वतःचे दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीज , काही नावा आणि काही वाळू उपसणारे कामगार इत्यादी गोष्टींचा मालक झालेला आहे . ही सर्व मैयाची कृपा आहे असे तो मानतो . कोणी परिक्रमावासी योगायोगाने या शेतातून गेलाच तर त्याने कृपया मोबाईलवर या रामदयाळ कीर या सद्गृहस्थाची मुलाखत घेऊन तिचा नर्मदा खंडामध्ये प्रसार करावा . ज्यामुळे इतर शेतकरी देखील यातून प्रेरणा घेतील . कारण अशा पद्धतीने परिक्रमावासींचे फलक लावून पायघड्या घालून , स्वागत करणारा हा पहिला व शेवटचा शेतकरी मला भेटला . असो .याला नर्मदेहर करून पुढे निघालो .
इथून थोडेसे पुढे आलो आणि एका आश्रमाने घातलेले कुंपण लागले . शेतकरी कुंपण घालून मार्ग अडवितात हे समजून घेण्यासारखे होते . परंतु आश्रमाने स्वतःसाठी खाजगी घाट निर्माण केलेला पाहून फार वाईट वाटले . इथे मी अक्षरशः गुडघाभर पाण्यात शेवाळलेल्या दगडांमध्ये जीव धोक्यात घालून तो घाट ओलांडला . इथून पुढे नेमावर पर्यंत म्हणजे हंडीया नेमावर पूल लागेपर्यंत अनेक आश्रमांची निर्मिती झालेली आहे . मी परमहंस आश्रमात चहा घेऊन पुढे निघालो . अडगडानंद महाराज म्हणून एक संत आहेत . यांनी यथार्थ गीता नावाचे पुस्तक लिहिलेले असून मी ते पूर्वी वाचलेले आहे आणि मला काही फारसे भावले नाही हे स्पष्टच सांगतो . विनाकारण गीतेत सर्वधर्मसमभाव घुसविण्याचा प्रयत्न या पुस्तकांमध्ये अश्लाघ्यपणे केलेला दिसतो आणि तो केविलवाणा ठरतो . सर्वधर्मान् परित्यज्य माम् एकम् शरणम् व्रज । असे सांगणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला आपण सर्व धर्म समभावाचा उपदेश करणे हे हास्यास्पदच नाही काय ? अर्थात हा अडगडानंद महाराजांचा आश्रम आहे हे मला नंतर बाहेर गेल्यावर कळाले . इथून पुढे अनेक सुंदर सुंदर आश्रम आहेत .
मी काही तेथे थांबलो नाही . परंतु वाचकांना त्या आश्रमांची माहिती असावी आणि कोणी चुकून माकून परिक्रमेला गेलेच तर हे आश्रम आवर्जून पाहता यावेत म्हणून त्यांची थोडक्यात माहिती इथे देऊन ठेवत आहे .
दक्षिण भारतीय शैलीचा विशेषतः केरळ राज्यातील शैलीचा प्रभाव येथे जाणवतो त्यामुळे भरपूर लाकूड जांभा खडक वापरला आहे .
इथून काठाने बरेच अंतर पुढे गेल्यावर पुन्हा एक सुंदर आश्रम लागतो .श्री शिव करुणा धाम अन्नक्षेत्र असे त्याचे नाव आहे .
हे नागरशैलीतले एक महादेवाचे मंदिर असून नर्मदेच्या अगदी काठावर असल्यामुळे जाताना दिसतेच .
सुंदर कोरीव काम केलेले दगडी मंदिर आणि भव्य त्रिशूल लक्ष वेधून घेतात
कल्पांत काळी सुद्धा ' न मृता ' होणारी म्हणून नर्मदा असे हिचे नाव पडले आहे , हे सांगणारा रेवा पुराणातील श्लोक
चालता चालता दिवस मावळ तिकडे गेला आणि नर्मदा मातेचे नाभीकुंड मधोमध दिसू लागले . इथे नर्मदा मातेचे पात्र भलतेच विस्तीर्ण दिसत होते . कुठे ते अत्यंत खोल तर कुठे अतिशय उथळ होते . नर्मदा काठी आतापर्यंत असलेला कुरतडल्या सारखा असमान किनारा एकदम हिरवा गार गवताचा झाला . आणि पुन्हा नाभीकुंडापाशी खडकांची दाटी दिसू लागली . नर्मदा पात्राच्या मधोमध पांढऱ्या रंगाचे नाभी कुंड दिसत होते . याचा अर्थ अमरकंटक पासून नर्मदा मातेचा मध्यबिंदू आज तिने गाठून घेतला होता ! मोठ्या आवाजात नर्मदेचा जयजयकार केला ! तिला साष्टांग प्रणिपात केला . आणि आता आधी स्नान आटोपून घ्यावे आणि मगच आश्रम शोधावा असे ठरविले . काठावर बसून आनंदाने स्नान केले . आणि एका गुराख्याला विचारले की इथे कुठला आश्रम आहे ? त्याने सांगितले या गावांमध्ये भरपूर आश्रम आहेत परंतु तुम्ही पागल बाबा आश्रमात जा . पागल बाबा हे नाव मला मजेशीर वाटले आणि मी चौकशी करत निघालो . नाभीकुंडापासून जवळच पागल बाबांचा आश्रम होता .डाव्या हाताला नर्मदा मंदिर होते . मध्ये एक ओढा वाहत आला होता आणि मागे पेडीघाट राम मंदिर होते .
नर्मदा नदीच्या मधोमध दिसणारे नाभी कुंड , त्यानंतर दिसणारा हंडीया नेमावर पूल आणि खाली काठावरचा पागल बाबा आश्रम व समोरील हिरवेगार मैदान
याचा अर्थ मी स्नान केले तो पेडीघाट होता . हिरव्यागार झाडीमध्ये एका डोंगरावर लपलेला पागल बाबा आश्रम उंचच उंच जिन्या वरून खुणावत होता . धावतच वरती गेलो आणि छोटासाच परंतु नीटनेटका आश्रम पाहून मन प्रसन्न झाले . इथे ओसरी मध्ये झोळी टेकवली आणि समोर बसलेल्या एका वयस्कर महाराजांनी नर्मदे हर म्हणत स्वागत केले . हा संपूर्ण परिसर नक्की कसा आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून गुगल नकाशावरील काही सुंदर चित्रे सोबत जोडत आहे . नर्मदा परिक्रमे मधील हे एक अत्यंत महत्त्वाचे पवित्र ठिकाण आहे .
नर्मदा मातेच्या मधोमध असणारे नाभिकुंड . इथे केवळ नावेनेच जाता येते . मध्यभागी नाभीच्या आकाराचे शिवलिंग आहे .दुर्दैवाने परिक्रमावासी येथे जाऊ शकत नाहीत . परंतु आपण अवश्य दर्शन घ्यावे !
डावीकडे हंडीया नेमावर पूल दिसतो आहे आणि खाली हंडिया घाट दिसतो आहे . उजवीकडे हिरवेगार गवताचे मैदान आणि नर्मदे मध्ये दिसणारे खडक .
हे चित्र उत्तर तटाच्या बाजूने घेतलेले आहे आणि आपण दक्षिण तटावरून चालत आहोत . पुढे नर्मदा समुद्राकडे कशी वाहत जाते ते येथे दिसते आहे
या चित्राच्या मधोमध दिसणारे पांढरे शुभ्र नाभीकुंड .हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला नर्मदेचे पात्र किती विस्तीर्ण आहे याची कल्पना यावी .समोरच्या झाडीमध्ये पागल बाबा आश्रम लपला आहे .
तिकडून नर्मदा आपल्याकडे येते आहे .समोरच्या तटावरून आपण चालत निघालो आहोत .मध्ये एका पुलाचे काम चालू आहे पहा .
पागल बाबा आश्रमामध्ये पागल बाबा नावाच्या संतांची संजीवन समाधी होती .गेल्यावर ज्यांनी माझे स्वागत केले ते अगरवाल बाबाजी इथे सेवेसाठी म्हणून राहतात . त्यांचे वय सुमारे ८० वर्षाचे आहे . परंतु तरीदेखील कितीही परिक्रमावासी आले तरी ते अतिशय मनोभावे त्यांची सेवा करतात आणि त्याच्या बदल्यात इथले जे पुजारी आहेत ते शर्माजी यांना सांभाळतात .अगरवाल बाबांनी मला पागल बाबा या नावाचा रंजक इतिहास सांगितला .कुंभमेळ्यासाठी प्रयागराज संगमावर निघालेले काही साधू एकदा नागपूरला एका धनिकाकडे थांबले .त्याने साधूंची मनोभावे सेवा केली . त्याच्या सेवेवर प्रसन्न होऊन तुला हवा तो वर माग असे साधू महाराज म्हणाले असता , "अब्जावधीची संपत्ती सांभाळायला मला वारस नाही " असे ते धनिक म्हणाले . "पुत्रवान् भव । " असा आशीर्वाद देऊन साधू पुढे निघून गेले . पुढच्या कुंभमेळ्यासाठी जेव्हा हा जथा पुन्हा इथे आला तेव्हा धनिक महाराजांना तीन मुले झालेली होती . त्यातील धाकटा पुत्र तू आम्हाला दे असे साधू महाराजांनी सांगितले . आता लौकिक अर्थाने पाहायला गेले तर इतकी सारी अब्जावधी रुपयांची संपत्ती असून हा मुलगा साधू झाल्यामुळे लोक त्याला पागल बाबा म्हणू लागले ! त्या पागल बाबांची ही समाधी होती .
इथे शर्मा नामक एक तेजस्वी ब्राह्मण कुटुंब सर्व व्यवस्था पाहते . त्यांना परम आणि भास्कर नावाची दोन मुले होती आणि रक्षा शर्मा नावाची त्यांची आते बहीण देखील शिक्षणासाठी तिथेच राहिली होती .मुले अतिशय हुशार चुणचुणित आणि आश्रमकर्तव्यदक्ष होती . मुले माझ्याशी गप्पा मारत बसली . त्यांनी मला तो संपूर्ण परिसर फिरवून दाखवला . इथून मैयाचे सुंदर दर्शन होत होते . मया मध्ये पाण्याचा पाईप टाकून थेट मोटर लावून पाणी खेचायची व्यवस्था यांनी केलेली होती .त्यामुळे उद्या सकाळी नळी खालीच आंघोळ करा असे त्यांनी मला सांगितले . अगरवाल बाबांनी तीन वर्षे तीन महिन्यात तेरा दिवसाची परिक्रमा पूर्ण केलेली होती . ते देखील त्यांच्या परिक्रमेमधील अनुभव मला सांगत बसले . मला महादेव पिपरिया येथे सापडलेले शिवलिंग मी त्यांना दाखवल्यावर त्यांना अतोनात आनंद झाला ! त्यांनीच मला त्याच्यावर असलेले त्रिपुण्ड्र आणि त्रिशूल वगैरे शोधून दाखविले . आणि याचे नाव आज पासून नर्मदेश्वर आहे असे मला सांगितले . हे शिवलिंग अतिशय दुर्लभ असून कोणालाही देऊ नकोस असे त्यांनी मला आवर्जून सांगितले . त्या रात्री आश्रमामध्ये मी एकटाच होतो . अतिशय सुग्रास भोजन मला देण्यात आले . मुलांचे वडील तिथे नव्हते कारण जवळच एका डोंगरावर मंगळ देवाचे भव्य मंदिर यांनी बांधले आहे तिथे ते गेले होते .परंतु मुलांनी वडिलांची कमतरता भासू दिली नाही .
मी मुक्काम केलेली पागल बाबांची ओसरी . समोर नर्मदा मैया आणि नळीने इथपर्यंत आणलेले नर्मदा जल .इथे भिंतीवर कोरलेली अर्धशिल्पे मोठी मजेशीर होती . बासरी वाजवणारा कृष्ण ऊस खातो आहे की काय असे वाटत होते !
आश्रमामध्ये एक पांढरा रंगाचा कुत्रा होता त्याची आणि माझी चांगली गट्टी जमली . संपूर्ण नर्मदा खंडामध्ये कुत्र्याला कुत्ता कोणीही म्हणत नाही तर भैरव असे म्हणतात . घराच्या बाहेर भुंकून आवाज करतो अर्थात बही रव करतो म्हणून तो भैरव . काही लोक या नावाचा संबंध काळभैरवाच्या वाहनाशी देखील लावतात . असे अनेक भैरव तुम्हाला परिक्रमेमध्ये मार्गदर्शन करतात हे मात्र खरे . अग्रवाल बाबा अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचे खुमासदार स्वभावाचे होते आणि त्यांचे डोळे अतिशय सुंदर होते . भल्या पहाटे उठून मी नळी खाली आंघोळ केली . स्नान पूजा आटोपून शांत बसून राहिलो .
आश्रमाच्या मागे काहीतरी गडबड चालू आहे असे मला वाटल्यामुळे मी मुलांना विचारले असता त्यांनी सांगितले की आश्रमाच्या भिंतीला लागूनच दोन मोठ्या कबरी आहेत . आश्रमाच्या गच्चीवर सुंदर अश्वारूढ मूर्ती होती .हे जृंभेश्वर होते . ही मूर्ती पाहण्यासाठी वर गेल्यावर मला मागे असलेली थडगी दिसली .
मुल्ला दो प्याजा नामक रचना करणाऱ्या अकबराच्या दरबारातील अब्दुल हसन नावाच्या कुण्या इसमाची ही मजार होती . परंतु दो नावाचा फायदा घेत दोन कबरी ठोकल्या होत्या .
अगरवाल महाराजांना या कबरींबाबत काहीच कल्पना नव्हती . अर्थात ते अपेक्षित देखील होते . सर्वसाधारण हिंदू मनुष्य शक्यतो चौकसपणे आजूबाजूला काय घडते आहे याची माहिती ठेवायचा प्रयत्न करत नाही .कालाय तस्मै नमः । रात्री उशिरा शर्मा पुजारी देखील आले आणि माझी आवर्जून भेट घेऊन मगच झोपायला गेले .
सकाळी अगरवाल बाबांनी मला चहा करून दिला आणि मग मी नर्मदे हर केले !
इथून पुढे नर्मदेचा किनारा सोडावा लागतो असे मला सांगण्यात आले होते . त्यामुळे मला मनापासून आतोनात दुःख होऊ लागले होते . कारण पुनासा नावाचे नर्मदा नदीवरील सर्वात मोठे धरण इथून पुढे लागते . आणि त्याचा विस्तार इतका अवाढव्य , आडवा तिडवा आणि अजस्त्र आहे की परिक्रमा मार्ग असा शिल्लकच राहिलेला नाही . अत्यंत जड अंत:करणाने हंडीया घाटावर नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार घातला आणि साश्रु नयनांनी तिच्याकडे पाठ फिरवली . आता पुढील पाच दिवस तिचे दर्शन दुरापास्त होणार होते .
लेखांक एकसष्ठ समाप्त ( क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा