लेखांक ६६ : कापसाला विक्रमी भाव देणारी मुंदीची मंडी आणि भमोऱ्याची काळझोप

आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान ४० किलोमीटर चालले , तरच ओंकारेश्वरला महाशिवरात्रीला पोहोचता येईल हे मी माझ्या मनाला बजावून सांगत होतो .सिंगाजी महाराज समाधी पिपल्या माफी नावाच्या गावात आहे इथून निघाल्यावर भेंसावा , गोराडिया , मुंडी ,भमोरा , मोहद , कैनुद ,जलवा बुजुर्ग ,देवला , खूटला कला , अटूट खास , सूलगांव किमान इतकी गावे पार केली असती की मग ओंकारेश्वर ३० किलोमीटर राहणार होते .परंतु हे सर्व करताना वाटेतील तीर्थक्षेत्रे देखील पहायची होती. एखादे महत्त्वाचे स्थान सोडून तुम्ही पुढे गेलेले नर्मदा मातेला आवडत नाही असा अनुभव होता . त्यामुळे इथे मध्ये असलेले लोटेश्वर महादेवाचे तीर्थ पाहून पुढे जावे असा विचार करून मंदिरात गेलो . दर्शन घेऊन तीर्थप्रसाद घेऊन पुढे निघालो . 
श्री लोटेश्वर महादेव मुंदी
श्री लोटेश्वर महादेव मंदिर मुंदी . मंदिर अतिशय पुरातन व सुंदर आहे .
आज बहुतांश रस्त्याने चालायचे होते . मुंदी हे तुलनेने मोठे गाव आहे . मी आता खंडवा जिल्ह्यामध्ये होतो . प्रसिद्ध गायक किशोर कुमार हा याच गावातला . रस्त्याने चालता चालता नामस्मरण सुरू होते . काठाने चालताना एकसारखी लय मिळणे अवघड असते कारण पायाखालची जमीन सारखी बदलत असते . परंतु रस्त्याने मात्र एकाच गतीने आणि एकाच तालात चालता येते त्यामुळे नाम घेणे सोपे पडते . तालाचे ज्ञान असण्याचे काही फायदे आहेत परंतु काही तोटे आहेत त्यातला हा एक तोटा आहे . लय सापडल्याशिवाय नाम घ्यायला त्रास होतो . असो . मोहोड नावाचे गाव सोडल्यावर आणि लोटेश्वराचे महादेव मंदिर येण्यापूर्वी वाटेमध्ये एका पाटीने माझे लक्ष वेधून घेतले . मराठा हॉटेल अशी पाटी होती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे चित्र लावलेले होते . हॉटेल वाल्याने आत बोलवले . सद्दूभाई मराठा नावाच्या भाजप नगरसेवकाचे हे हॉटेल होते .हा मुंदी गावात राहात होता व गावाबाहेर हे हॉटेल चालवत होता . हे मूळचे मराठा होते परंतु आता घरामध्ये मराठी कोणाला येत नाही असे म्हणाला . परंतु तरीदेखील मराठ्यांच्या जाज्वल्य परंपरेचा त्याला अतिशय अभिमान होता असे त्याच्याशी बोलताना जाणवले ! मला देखील महाराष्ट्राबाहेर लांब कुठेतरी एखादा मनुष्य संभाजी महाराज , शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास अगदी मराठा या नावासह मांडताना पाहून खूप बरे वाटले ! त्याच्या मोबाईलवर काही फोटो त्याने काढले आणि माझ्या मित्राला पाठवून दिले . हा मित्र देखील जातिवंत मराठा असल्यामुळे फोटो पाहिल्यावर त्यालाही अभिमान वाटला आणि तो फोनवर बराच वेळ सद्दूभाईशी बोलला . तोपर्यंत मी चहा पिऊन पुढे मार्गस्थ झालो होतो . 
मराठा ढाबा मुंदी खंडवा
सददूभाई मराठा सोबत प्रस्तुत लेखक .
याचे नाव सदन मराठा होते परंतु लोक प्रेमाने सद्दू भाई म्हणायचे . आपल्या एंटायसर मोटर सायकलच्या विंड शील्डवर पण त्याने मराठ्यांचा गौरव करणारे स्टिकर लावले होते . 
हॉटेलच्या पाटीवर त्याने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज या दोघांची चित्रे गौरवाने लावली होती .
गुजरात व मध्यप्रदेशातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मराठ्यांचे राज्य राहिले होते . बडोद्याचे गायकवाड ,इंदोर चे होळकर , धार चे पवार , ग्वाल्हेरचे शिंदे , देवासचे घाटगे अशी प्रसिद्ध सरदार घराणी होती . या सर्वांनी मराठ्यांची तेजस्वी परंपरा जागृत ठेवली त्यामुळेच या भागातील धर्म टिकला ,मंदिरे वाचली आणि नर्मदा परिक्रमा सुरू राहिली .नर्मदेने महाराष्ट्राचे रक्षण केले आणि महाराष्ट्राने नर्मदा वाचवली . महाराष्ट्राच्या डोक्यावर शिरोरेखा मारल्याप्रमाणे नर्मदा वाहत असल्यामुळे आणि चातुर्मासात तिचे दुथडी भरून वाहणारे विराट स्वरूप शत्रूला पार करता येत नसल्यामुळे महाराष्ट्रावर आक्रमण होत नसे . शेष भारतातही जिथे जिथे मराठ्यांचे घोडे फिरले तोच भाग आज भारतामध्ये शिल्लक आहे . जम्मू काश्मीरमध्ये मराठे कधी थेट गेले नाहीत .तो भाग आज आपल्यापासून तुटू पाहतो आहे .तंजावर पर्यंत निर्विवाद सत्ता असून देखील केरळ मध्ये मराठ्यांची सत्ता नव्हती त्यामुळे तोही भाग देश विघातक कारवायांचे आश्रयस्थान बनला आहे . बंगाल प्रांत पादाक्रांत करण्यासाठी निघालेले मराठे , नागपूरकर भोसल्यांच्या अधिपत्याखाली कटक पर्यंत पोहोचल्यावर इंग्रजानी कलकत्ता शहराभोवती मराठा डीच अर्थात मराठ्यांच्या भीतीने खंदक उभा केल्यामुळे मराठे तिकडे गेले नाहीत आणि आज तो एक वेगळा देश झालेला आहे . शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन लचित बर्फुकन नी ईशान्य भारतात मुगलांचा पाडाव केला . परंतु तरीदेखील कामरूप अर्थात आसाम वगळता ईशान्य भारतातील राजकारणावर मराठ्यांचा फारसा प्रभाव न राहिल्यामुळे ईशान्य भारताचे वेगाने ख्रिस्तीकरण झाले . पंजाब प्रांत देखील मराठ्यांच्या ताब्यात असता तर पाकिस्तानात कधीच गेला नसता .या उलट आजच्या पाकिस्तानातील बलुचिस्तान हा प्रांत म्हणजे मुळात पानिपतच्या युद्धातून  अब्दाली ला पळवून लावताना त्या भागामध्ये स्थिरस्थावर झालेल्या मराठा व आता बुगती मराठा लोकांचा आहे .त्यामुळे त्यांनी पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलेले आहे . तात्पर्य मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक भारतीय माणसाला माहिती असणे आवश्यक आहे आणि तो भारतीय लोक तर सोडा साक्षात मराठी लोकांनाच माहिती नाही हे देखील पदोपदी परिक्रमेमध्ये जाणवले .सदन भाई मराठा याच्याशी बोलताना तोच मला म्हणाला की तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी शक्यतो कुठल्याच मराठी परिक्रमावासीना नसते . त्यांना हे माहितीच नसते की मध्य प्रदेश देखील कधीकाळी संपूर्णपणे मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता . आपल्याला शाळेमध्ये मराठ्यांचा इतिहास साकल्याने कधीही न शिकविण्याचा हा दुष्परिणाम आहे . नर्मदा परिक्रमा ही परंपरा जर टिकायची असेल तर त्यासाठी राजसत्ता देखील धर्मप्रेमी असणे अतिशय आवश्यक आहे . अन्यथा परिक्रमेची परंपरा बंद पडायला जरासा सुद्धा वेळ लागणार नाही ,हे मी लॉकडाऊन नामक हिडीस प्रकारावरून अमरकंटक इथे अनुभवले आहे . सुदैवाने नर्मदा परिक्रमेचे महात्म्य येथे सर्वच लोकांना माहिती असल्यामुळे ,अगदी काँग्रेसचे सर्वेसर्वा राहिलेले मध्यप्रदेश मधील एका राजघराण्यातील राजे , ज्यांना लोक प्रेमाने राजाजी किंवा डिग्गी राजा असे म्हणतात , ते दिग्विजय सिंग देखील १९० दिवसांची पायी परिक्रमा आपल्या तिसऱ्या पत्नीला सोबत घेऊन करून आलेले आहेत . त्यासंदर्भात मला नर्मदा मातेने एक सुरेख अनुभव देखील दिला आहे जो त्यावेळी सांगेन .शिवराज सिंह चौहान हे मी परिक्रमा केली त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी देखील बस मधून झंजावाती परिक्रमा केलेली आहे . त्यांचे गावी परिक्रमावासींची सेवा ते करतात . तसेच सुषमा स्वराज यांनी देखील एक परिक्रमा वासी सेवा केंद्र बांधलेले आहे . तात्पर्य नर्मदा परिक्रमेचे महात्म्य सध्या तरी सर्वच पक्ष मान्य करून आहेत . तसेच नर्मदा खंडातील महंतांना , साधूंना आणि संन्याशांना खिशामध्ये टाकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये अहमहमिका लागलेली असते हे मला पदोपदी जाणवले . असो . आज लिखाणामध्ये पदोपदी राजकारण डोकावते आहे कारण आजचा दिवस पूर्णपणे राजकारणी लोकांच्या सहवासातच गेला . नर्मदा मातेची इच्छा . दुसरे काय ! इथून दुपारचे भोजन देखील भाजपच्या एका नगरसेविका असलेल्या मातारामच्या घरीच घेतले . तत्पूर्वी एक गमतीशीर घटना घडली ! चालत जाताना अचानक मला तो रस्ता त्या गल्ल्या तो सगळा परिसर ओळखीचा वाटू लागला ! असे वाटू लागले की आपण येथे पूर्वी कधीतरी आलेलो आहोत ! याला फ्रेंच भाषेमध्ये déja vous देजा वू असे म्हणतात .थोड्यावेळाने उजवीकडे एक मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती दिसू लागली . आणि माझ्या गतस्मृती जागृत होऊ लागल्या ! तिथे असलेल्या वॉचमनची परवानगी घेऊन मी आत मध्ये गेलो आणि माझ्या लक्षात आले की , होय !ही तीच मंडई होती जिथे मी दहा वर्षांपूर्वी आलो होतो ! 

"लेलो लेलो ! मंदिर का कापूस लेलो !आश्रम का कपास लेलो! रोज पैसा कमाते हो आज पुण्य कमाओ ! जो जादा भाव देगा उसी को आशीर्वाद मिलेगा ! जो कम बोली लगाएगा ,भगवान उसका भी भला करेगा ! "

मला मीच तिथे उभा राहून ओरडत असलेला दिसलो ! होय दहा वर्षांपूर्वी इथे उभे राहून मी अगदी हेच केले होते ! आणि अगदी इथेच उभे राहून हे केले होते !
सविस्तर सांगतो . त्याचे काय आहे ,
इथून महाराष्ट्राची सीमा तशी जवळ आहे . धुळे नंदुरबार जळगाव शिरपूर हा परिसर इथून जवळ आहे . नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीच्या काठावर टाकरखेडा गावामध्ये माझ्या गुरूंची (परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर बडोदा ) समाधी आहे . दहा वर्षांपूर्वी ते देहामध्ये असताना मी एकदा तिथे काही कामानिमित्त गेलो होतो . आश्रमाला पाच एकर शेती दान म्हणून मिळालेली आहे . शिवा भाऊ नावाचे कोल्हापूर मधील एक शेतकरी ती सर्व शेती सांभाळतात . आणि त्याच भागातील काही तरुण भक्तमंडळी शेतीच्या अन्य कामांमध्ये स्वामींना मदत करायचे . उदाहरणार्थ फैजपूर येथील किशोर पाटील किंवा चिनावल येथील रवी पाटील असे तरुण शेतीचा माल बाजारात नेऊन टाकणे वगैरे कामासाठी मदत करायचे . 
 किशोर पाटील चिनावल आपल्या ट्रॅक्टर सोबत
त्या काळामध्ये महाराष्ट्रात कापसाला चांगला भाव मिळत नसे . आणि आश्रमाचा भरपूर कापूस निघाला होता . महाराष्ट्रामध्ये ३६०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटल भाव चालू होता . पाव किलो वजनाची जीन्स पाच हजार रुपयाला विकत घेणाऱ्या माणसाला हे गणित लवकर कळेल . विचार करा .तुमचा १०० किलो कापूस विकल्यावर छत्तीसशे रुपये मात्र मिळाले तर कसे वाटेल ! त्या काळात मध्यप्रदेश सरकार कापसाला चांगला भाव देते अशी वदंता होती . त्यामुळे आश्रमाचा कापूस विकण्यासाठी किशोर पाटील ट्रॅक्टर मध्ये भरून खंडव्याला निघाला . तो एकटाच जाणार आणि एकटाच येणार होता म्हणून त्याला सोबत म्हणून मी देखील निघालो . त्यात कापसाच्या ढिगार्‍यावर झोपून जाण्याचा आनंद काही वेगळाच होता ! प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा खूप लांबचा निघाला त्यामुळे मी कापसामध्ये खड्डा करून त्यात शिरून झोपून टाकले .खाली वर सर्वत्र कापूसच कापूस ! त्या काळात मुंदी बाजारात सर्वात जास्त भाव मिळायचा . जास्त म्हणजे किती ५२०० रुपये प्रतिक्विंटल ! परंतु तेवढा सुद्धा भाव भरपूर वाटेल अशी परिस्थिती होती . मी त्या दिवशी पहिल्यांदाच कापसाचा लिलाव कसा असतो ते पाहिले . व्यापारी यायचे . दलाल असायचे . शेतकऱ्यांना बाजूला उभे करायचे आणि कापसामधील दोष शोधून दाखवायचे . हा कापूस पांढराच नाही .याच्यामध्ये खूप कचरा आहे . हा थोडासा भिजलेला आहे . वगैरे वाटेल ते कारण सांगून कापसाचा भाव पाडून द्यायचे . वर्षभर राब राब राबून मेहनत करून स्वतःच्या घामाच्या आणि रक्ताच्या बळावर उगवलेला हा कापूस तिथेच टाकून परत जाणे शक्य नसल्यामुळे येईल तो भाव मान्य करून शेतकरी निमुटपणे घरी जायचा . मला या बाजाराची मोडस ऑपरेंडी लक्षात आली . सर्व शेतकरी तिथे पत्ते खेळत बसलेले असताना मी मात्र माझ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या कापसाची मागची दर्शनी बाजू होती ती स्वच्छ करायला सुरुवात केली . दोन तास राबून संपूर्ण आठ फूट बाय सहा फूट दर्शनी कापसातील कचऱ्याचा कण आणि कण मी बाजूला काढला . सर्व शेतकरी मला हसू लागले . ते म्हणाले अरे तू शहरातला मुलगा , तुला काय अक्कल आहे ! मी त्यांना इतकेच म्हणालो . तुम्हाला या कापसाला विक्रमी भाव नाही मिळवून दिला तर गुरूंचे नाव कोणाला सांगणार नाही . ते म्हणाले की अरे असा वरवर कापूस स्वच्छ करून काही उपयोग नाही .ते आत मध्ये हात घालून कापूस बाहेर काढतात आणि बघतात .हा प्रकार देखील मी पाहिलेला होता त्यामुळे मी एका ठिकाणी हात घालून कापूस बाहेर काढला तो स्वच्छ करून पुन्हा दाबला .आणि तिथे अशी जागा निर्माण केली की माणसाला हात घालायला सोपे जाईल . बाकीच्या ठिकाणी फळीने चोपून चोपून मी कापूस सपाट करून टाकला . शेजारच्या शेतकऱ्याच्या गाडीपाशी व्यापारी आले आणि अतिशय हीन दर्जाची शेरेबाजी करून त्याला कसाबसा ४५०० रुपये भाव दिला .तो बिचारा तोंड बारीक करून बसला .खरं पाहायला गेलं तर त्याचा धागा माझ्या कापसा हून अधिक चांगला होता .
  कापसाचा लिलाव झाला ती शेड
 झाले व्यापारी आमच्या गाडीपाशी आले . ते काही बोलणार इतक्यात मीच बोलायला सुरुवात केली ! 
"लेलो लेलो ! मंदिर का कापूस लेलो !आश्रम का कपास लेलो! रोज पैसा कमाते हो आज पुण्य कमाओ ! जो जादा भाव देगा उसी को आशीर्वाद मिलेगा ! जो कम बोली लगाएगा ,भगवान उसका भी भला करेगा ! "
पहिलीच बोली लागली पाच हजार ! दुसरी बोली लागली पाच हजार वीस रुपये ! मी ओरडतच म्हणालो "पुण्य की गिनती दस बीस मे मत करो । तुम सौ बोलोगे भगवान दो सौ देगा । तुम पाच सौ बोलोगे भगवान हजार देगा "
अशा पद्धतीने स्वतः मार्केटिंग करून विकणारा शेतकरी बाजारामध्ये पहिल्यांदाच दिसत असल्यामुळे दलाल आणि व्यापारी सुद्धा थोडेसे त्रस्त झाले होते . एक जण मला म्हणाला शेतकऱ्याने या लिलावात बोलायचे नसते . मी म्हणालो , " साल भर जो पसीना बहायेगा वही बोलेगा ! मेहनत की कमाई खाएगा वही चैन की नींद सोएगा !  आदमी का उगाया माल व्यापारी ले जायेगा । भगवान का उगाया माल भक्त ले जायेगा ।लगाव बोली ! किसको कितना पुण्य चाहिये ? " त्या व्यापाराने चिडून कापूस बाहेर काढला . त्याने बरोबर त्याच ठिकाणी हात घातला जिथे त्याने हात घालावा अशी योजना मी करून ठेवली होती ! आपला कापूस देखील स्वच्छ आहे हे पाहून त्याला काहीच बोलता येईना ! पुढची बोली लागली सहा हजार ! त्यानंतर साडेसहा हजार !त्यानंतर सात हजार आणि शेवटी सात हजार दोनशे ! त्या दिवशीची त्या बाजारातली ती सर्वाधिक बोली ठरली ! त्याच्या खालोखाल सर्वाधिक मिळाले होते पाच हजार एकशे रुपये .इतकी बोलींमध्ये तफावत होती . बरे पुढे गेल्यावर हा सर्व कापूस एकत्रच जिनिंग मिल मध्ये जात असे म्हणजे तसा या बोलींना काहीच अर्थ नसायचा !व्यापारी पुढे निघून गेल्यावर सगळे शेतकरी मला डोक्यावर घेऊन नाचू लागले ! त्यादिवशी मी सगळ्यांना चहा पाजला होता !  मला हा सगळा प्रसंग जणू काही आत्ताच घडून गेला आहे असा आठवू लागला ! 
शेतकऱ्यांना मी सांगितले , "वर्षभर तुम्ही इतकी मेहनत करता मग ज्या क्षणी माल विकला जाणार आहे त्या क्षणी तुम्ही मागे का राहता ? त्या क्षणी देखील तुम्ही बोलले पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या मालाचे मार्केटिंग करता आलेच पाहिजे ! पत्ते खेळत बसण्यापेक्षा थोडीशी मेहनत जर त्या दिवशी केली तर ती तुम्हाला खूप जास्ती फायदा मिळवून देऊ शकते . "सर्वांना हे म्हणणे पटले . अर्थात यासाठी आधी दलालशाही वरचे अवलंबित्व कमी करणे हे देखील आवश्यक आहे . परंतु अनेक वर्षांचे हितसंबंध असल्यामुळे नवीन बदल स्वीकारायला आपल्या इथली समाज व्यवस्था लवकर तयार होत नाहीये . त्यामुळेच मोदींनी केलेले तीन कृषी विषयक कायदे त्यांना विनाकारण विनाशर्त मागे घ्यावे लागले . कारण दलालांच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत . शेतकरी संघटित नाही आणि शेतकरी संघटनांच्या नावाखाली संघटित असलेले शेतकरी नाहीत ! शेतकऱ्याला संघटना काढून आंदोलन करायला वेळच नाही ! सगळीच गंमत आहे .शेतीचे आणि नर्मदेचे असे अभिन्न नाते आहे . असो ! नर्मदे हर ! 

उसाचे गुऱ्हाळे चालविणाऱ्या माणसाने मंडी ची कथा सांगितल्यावर काढलेला फोटो

या सर्व आठवणी ताज्या झाल्यावर मी बाहेर आलो आणि तो चहावाला कुठे दिसतो का ते पाहू लागलो . चहाच्या जागी उसाच्या रसाचे गुऱ्हाळे होते . त्याने मला उसाचा रस पाजला आणि मग मी पुढे निघालो . मुंदी गावामध्ये दुर्गा मातेचे एक मंदिर असून तिथे परिक्रमा वासी उतरतात आणि भोजन प्रसादी तिकडे आणून दिली जाते असे मला वाटेत अनेकांनी सांगितले . त्यामुळे मी दुर्गा माता मंदिरात पोहोचलो . पुजारी बुवांनी मला बसायला सांगितले आणि ते भोजन प्रसाद ज्या घरातून येतो त्या घरी वर्दी देण्यासाठी गेले . दुर्गा मातेचे मंदिर अगदी बाजाराच्या मधोमध बांधण्यात आले होते . 
ऐन बाजारपेठेतील श्रीदुर्गा माता मंदिर मुंदी
रात्री मंदिर आकर्षक दिसते
 श्रीदुर्गा माता
प्रचंड गर्दी बाजारात इकडून तिकडे चालली होती . इथे समोरच असलेल्या गोमाता कॉम्प्युटर या दुकानाने माझे लक्ष वेधले . आधुनिकीकरण आणि परंपरा याचा उत्तम मिलाफ मला त्या नावात आढळला !
अशा छोट्या छोट्या इमारतींची दाटी या गावात होती .
गौ माता कॉम्प्युटर्सची पाटी आपल्या ब्रँड अँबेसिडर अर्थात शुभंकरा सह ! 
पुजारी पुन्हा माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की आपण घरी जेवायला येता का ?काही परिक्रमावासी आणि साधू देखील गृहस्थी माणसांच्या घरामध्ये जात नाहीत . परंतु आपल्या नियमांचा इतरांना त्रास होतो आहे का याचा देखील विचार विवेकाने करावासा मला वाटला . माझ्या एकट्या करता सारे पदार्थ भरून वरून खाली आणण्यापेक्षा मी एकट्याने वर जाऊन बाहेर बसून पटकन चार घास गिळलेले कधीही सोयीचे होते . मी होकार दिला आणि अतिशय छोट्या जिन्याने वर जाऊन अशाच एका घराच्या बाहेर बसून राहिलो . हे घर तिथल्या एका भाजपा नगरसेविकेचे होते आणि त्या स्वतः स्वयंपाक करत होत्या . त्या मातेने फार प्रेमाने मला खाऊ घातले . दहा बारा , पंधरा वीस परिक्रमावासी असतील तर खाली भोजन नेऊन वाढणे सोयीचे असते असे त्या मातेने मला सांगितले जे योग्यच होते. मी देखील आज मला भरपूर चालायचे आहे असे सांगून तिथे (दुर्गा माता मंदिरात ) विश्रांती न घेता लगेचच पुढे प्रस्थान ठेवले . जाता जाता पंडितजींनी वहीमध्ये शिक्का दिला .
पंडित श्री भूपेंद्र शास्त्री ,माता मंदिर मुंदी जिल्हा खंडवा मा नर्मदा परिक्रमा सेवा मोबाईल ९९७७३५९७४७ . मी इथे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी जेवलो .
अतिशय वेगाने चालत निघालो होतो . माझा बूट पूर्णपणे झिजला होता . त्यात डांबरी रस्त्यावरून चालताना पायाखाली येणारा प्रत्येक खडा जाणवत होता ! इतके दिवस मी नर्मदा मातेचा किनारा पकडलेला असल्यामुळे खडे टोचण्याचे दुःख जाणवले नव्हते .परंतु आता मात्र पदोपदी पायाला त्रास होत होता . मनामध्ये बुटाबद्दल थोडासा विचार आला परंतु मी चालत राहिलो . नवीन बूट घेण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा लवकरात लवकर ओंकारेश्वर गाठणे हे माझ्यासाठी प्राधान्याचे होते . गावातून थोडासा बाहेर पडलो असेल इतक्यात एका माणसाने आवाज दिला . नर्मदे हर ! त्या सज्जनांनी मला मागून पळत येऊन गाठले . मला म्हणाले मुझे आपकी सेवा करने का कुछ मौका दिजीये । मी म्हणालो मुझे जल्द से जल्द ओंकार जी पहुचना है । इसलिये मुझे कुछ नही चाहिये । मै निकलता हु । या भागात ओंकारेश्वरला ओंकार जी असे पण म्हणतात . या माणसाचे नाव होते रामजी मुजमेर . जातीने ब्राह्मण होता . म्हणजे त्यानेच तशी ओळख करून दिली . अखेरीस तो मला म्हणाला की कमंडलू या जूते तो ले लीजिएगा बाबाजी । अब मना नही करना । मेरे मित्र की आंगे दुकान है । चलिये । आता माझा नाईलाज झाला आणि त्याच्या मागे मी चालू लागलो . पहिल्याच चौकात थोडे पुढे गेल्यावर डाव्या हाताला चपलांचे दुकान होते . याने मला आत मध्ये बसविले आणि दुकानदाराला सांगितले की बाबाजींसाठी सर्वात चांगला कुठला बूट आहे तो दाखव . मी सुरुवातीलाच त्याला सांगितले की माझ्याकडे वेळ कमी आहे . त्यामुळे कुठलाही एक साधा बूट किंवा चप्पल मला द्या आणि मोकळे करा . त्याने काढलेले सर्व बूट महागातले होते हे माझ्या लक्षात आले . मला रामजी मुजमेरला खड्ड्यामध्ये घालायचे नव्हते . त्यामुळे ज्याला लोफर म्हणतात तशी एक रबरी चप्पल मला सापडली ती स्वस्तात मस्त म्हणून मी निवडली . या नर्मदा परिक्रमेतील ते माझे सहावे पादत्राण ठरले ! पाचव्या बुटाने १३ दिवस साथ दिली .  मला खूप तहान लागली होती म्हणून मी त्याला पाणी मागितले . दुकानदार एक क्षणभर थांबला आणि रामजीच्या चेहऱ्याकडे बघू लागला . रामजी म्हणाला रुको मै पानी लेके आता हू । मी विचारले , काय झाले ? घरी पाणी नाही का ? दुकानाच्या मागेच घर होते .दुकानदार मला म्हणाला हम हरिजन है । हमारा पाणी आपको कैसे चलेगा ? मी म्हणालो अरे वा ! ये तो और भी अच्छी बात हुई ! हम भी हरीके जन है ! हरी का नाम लेके ही घर से निकले है । आप भी हरिजन ! मै भी हरिजन ! और क्या चाहिये पानी लाइये । चर्मकार रामाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रूधारा वाहू लागल्या . रामजी देखील डोळे पुसू लागले . त्याने मुलाला आवाज दिला आणि पाणी मागवले . मुलाने देखील तांब्याभर पाणी चांगले बर्फ टाकून आणून दिले . ते थंडगार पाणी पिल्यावर मला फारच बरे वाटले ! मी माझा कमंडलू दिला आणि तो देखील भरून घेतला . याने त्यात देखील बर्फाचे खडे भरले . मैया चा किनारा सोडल्यापासून गार पाणी मिळाले नव्हते . रामजी मुझमेर यांना देखील खूप आनंद झाला . चांभार दादाने मला दोन मोजे असेच ठेवा म्हणून दिले . त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितले की मोबाईल वर बाबाजींचा फोटो काढून ठेव . लोकांचा फोटो काढताना हात हलतो हे माहिती असल्यामुळे बरेचदा मीच त्यांच्या मोबाईलवर फोटो काढून त्यांना ठेवायला द्यायचो .तसा फोटो काढून मी त्याला दिला . त्याने माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
 मुंदी येथील चपलांच्या दुकानात प्रस्तुत लेखक श्री रामजी मुझमेर आणि चर्मकार बंधू

त्या सर्वांचे आभार मानून मी पुढे निघालो . रामजी मला म्हणाला तुमची हरकत नसेल तर थोडे अंतर तुमच्या सोबत चालू का ! मी त्याला म्हणालो की मला रस्ता सापडेल .काही गरज नाही . परंतु त्यांची परिक्रमा मार्ग थोडासा चालण्याची इच्छा होती .कारण माझ्यासोबत नर्मदा मैय्या होती ना ! म्हणून ! मी नकार देणारा कोण ? मग लगेच चला म्हणालो ! हा मनुष्य म्हणजे सात्विकतेचा परिपाकच होता ! इतका सज्जन माणूस आजकालच्या काळात टिकणे फार अवघड आहे ! त्यांनी मला विचारले मगाशी आम्ही दोघे का रडलो तुम्हाला लक्षात आले का ? मी नाही म्हटल्यावर त्यांनी जाता जाताच मला दूरवर उजव्या हाताला दिसणारे एक मंदिर दाखवले . हे सिंगाजी महाराजांचे शिष्य होते . बुखारदास महाराज .त्यांना एकदा गावातील एका हरिजन बाईने भाजी भाकरी आणून दिली .  महाराजांनी ती खाल्ली आणि ती बातमी बघता बघता गावात सर्वत्र पसरली . गावातील सर्व अन्य जातीचे लोक तिथे जमा झाले आणि बहिष्काराची भाषा करू लागले . महाराजांना सांगू लागले की तुम्ही चुकीचं वागलात . महाराज म्हणाले माझी चूक काय ते सांगा . लोक म्हणाले तुम्ही हरिजन बाईच्या घरचे जेवण जेवायला नको पाहिजे होते . महाराज म्हणाले ,हत्तीच्या ! एवढंच ना ! हे घ्या तिच्या घरचे जेवण !  असे म्हणून महाराजांनी आपल्या तोंडावाटे पोटात हात घातला आणि पोटातून भाजी भाकरी आहे तशी बाहेर काढली ! म्हणले आता तरी मी पवित्र झालो ना ? हा प्रकार बघून सर्वांची बोबडी वळाली आणि सर्वांना महाराजांचा अधिकार काय आहे ते कळाले . त्यावेळी महाराज सर्वांना सांगू लागले ही अरे आपण सर्वच जण हरीचे जन आहोत . त्यामुळे असा भेदभाव कधीही करू नका ! त्या दोघांना देखील माझे वाक्य ऐकल्यावर महाराजांची आठवण झाली . म्हणून डोळ्यात पाणी आले . आणि आत्तासुद्धा रामजी मुजमेर मला ते मंदिर दाखवण्याकरता म्हणून खास चालत आले होते . मी जागेवरूनच त्या महाराजांना साष्टांग नमस्कार घातला !
या संतांचे नाव बुखारदास बाबा असे होते . मुंदी गावाच्या बाहेर यांचे समाधी मंदिर आहे . 
बुखार दास बाबा समाधी मंदिर मुंदी
डावीकडचे बुखारदास महाराज आणि उजवीकडचे गुलाबदास महाराज
  असे अधिकारी सत्पुरुष आता फार कमी उरले आहेत . मला असे काही बोलायची बुद्धी झाली याचे कारण बुखारदास महाराजांची अतिशय जबरदस्त स्पंदने या संपूर्ण परिसरामध्ये आहेत . त्यांचाच तो प्रभाव होता . इथून मी रामजी महाराजांना रजा दिली कारण माझी गती गप्पांमुळे कमी होऊ लागली होती . त्यांनी देखील साश्रु नयनांनी मला पुढे पाठविले .
इथे एक अशी घटना घडली जिने पुन्हा एकदा एक परिक्रमावासी म्हणून माझी परीक्षा पाहिली ! थोडेसे अंतर चाललो असेन नसेन इतक्यात मला पुन्हा एकदा गार पाणी प्यायची इच्छा झाली . डोक्यावर खूप कडक ऊन होते . डाव्या हाताला गंगा मातेचे एक मंदिर दिसले .आज संध्याकाळपर्यंत मला तीस किलोमीटर चालायचे होते त्यामुळे एकदा पाणी पिऊन सुटावे ते थांबूच नये असा मी विचार केला . मंदिरात गंगेचे दर्शन घेऊन डाव्या बाजूला एका कोपऱ्यात टेकून बसलो . बर्फ टाकलेले गार पाणी पिण्याचा एक तोटा असतो की त्याने तहान भागत नाही आणि पुन्हा पुन्हा पाणी प्यावे असे वाटते . तसेही थोडे चालल्यावर कमंडलूतील पाणी उन्हाने गरम होणार होते . त्यापेक्षा ते गार गार आहे तोवर प्यावे असा विचार करून मी पाणी प्यायलो . गार पाणी पिण्याचा आनंदच काही वेगळा आहे ! तो गारवा थेट मेंदूपर्यंत पोहोचला ! मी तोंडावरून गार पाण्याचा एक हात फिरवला ! मग तर स्वर्गीय सुखाचा अनुभव येऊ लागला ! थंडगार वाऱ्याची झुळूक सुटली होती . मी डोळे मिटून त्या क्षणाचा आनंद घेतला .  बाहेर उन्हाचा तडाखा होता . डोळे मिटल्याबरोबर तो दाह देखील शांत झाला !
गंगामाता मंदिर मुंदी केनुद
इथेच डाव्या हाताला नर्मदा मातेचा फोटो दिसतो आहे त्याच्या आतील कोपऱ्यात मी बसलो होतो
... . . . . असेच काही क्षण गेले असतील . मला असे जाणवले की माझ्या मांडीवर काहीतरी वळवळते आहे . म्हणून मी डोळे उघडले . पाहतो तो काय ! सर्वत्र अंधार पसरलेला ! मला एक क्षणभर काहीच कळेना ! आत्ता इतके कडक ऊन पडले होते आणि अचानक अंधार कसा काय पडला ? आणि मांडीवर काय वळवळते आहे म्हणून पाहिले तर माझ्या मांडीवर एक तहाने बाळ होते ! माझ्या मांडीवर तहाने बाळ ठेवून एक बाई माझ्यासमोर हात जोडून उभी होती ! मी तिला नर्मदे हर केले आणि विचारले ये किसका बच्चा है ? ती म्हणाली मेरी पोती है । उसको पहली बार भगवान के दर्शन करने के लिए घर से बाहर लायी हू । आपके गोद मे डाला ताकी उसको परिक्रमा का पुण्य मिले । मी आजूबाजूला पडलेला अंधार पाहिला आणि तिला विचारले यह सब अंधेरा कैसे हो गया ? ती म्हणाली बाबाजी शाम हो गई है । यहा इसी समय अंधेरा हो जाता है । परंतु मला तर दुपारी मी इथे बसल्याचे स्मरत होते ! मी तिला सांगितले की मी दुपारी इथे बसलो होतो . ती म्हणाली , " मेरा सामने ही घर है । मै सुबह से देख रही हू । आप इधरही ध्यान लगाए बैठे हुए थे । " मी म्हणालो , " अगं बाई मग मला तू उठवले का नाहीस ! " ती म्हणाली , " ऐसे कैसे उठाते ! आपकी समाधी भंग हो जाती । वह पाप हम नही कर सकते । इसलिये आपको उठाया नही । " मला आता रडावे असे वाटायला लागले ! मी तब्बल ३० किलोमीटर मागे पडलो होतो ! आता ओंकारेश्वरला शिवरात्रीपर्यंत पोहोचणे अवघड आहे असे मला वाटू लागले . संपूर्ण दिवसभर मी जरा देखील न हलता आहे त्याच परिस्थितीमध्ये गाढ झोपून गेलो होतो .अगदी माझी मांडी देखील बदलली नव्हती . त्या बाईने माझ्या मांडीवर लेकरू आणून ठेवले म्हणून मी जागा तरी झालो नाही तर बहुतेक सकाळीच जाग आली असती ! मला माझ्या या तमोगुणी झोपेचा फारच राग आला ! गंगा मातेकडे पाहिले तर ती हसत होती ! दोन परस्पर विरोधी राजकीय पक्ष जसे एकमेकांचे उमेदवार पाडतात तसे या गंगा आणि नर्मदा मातेचे काय आहे की काय असे मला वाटायला लागले ! मैय्या ये तूने क्या कर दिया रे !  मी देखील इरेला पेटलो ! काय वाटेल ते करून पुढे जायचेच असे ठरवून मी चालायला लागलो ! थोडे अंतर गेल्यावर उजव्या हाताला एक बाल हनुमान मंदिर आले . मारुतीचे दर्शन घेत असताना आत मध्ये असलेला साधू मला म्हणाला यहा मुकाम नही हो पायेगा । आगे भमोरी गाव मे परिक्रमा वासियों की सेवा होती है ।मी त्या साधूला गंगामाता मंदिरात झालेला किस्सा सांगितला आणि आज रात्रभर मी चालणार आहे असे देखील सांगितले . त्याने मला सांगितले की रात्री या भागातून चालणे सोयीचे नाही . आणि परिक्रमेच्या नियमांमध्ये बसणारे देखील नाही .त्यामुळे भमोरी गावात मुक्काम करावा आणि सकाळी लवकर निघावे .
 साधूने मला आग्रहाने थोडा चहा पाजला आणि मी पुढे निघालो .
केनुद येथील बाल हनुमान मंदिर
बाल हनुमंताचे दर्शन घ्या .
थोडेसे अंतर चालल्यावर भमोरी गाव आले .भमोरेश्वर महादेवाच्या मंदिरात मी दर्शनासाठी गेलो . इथे यादव नावाचा एक शेतकरी होता त्याने त्याच्या घरी मला मुक्कामासाठी नेले . घर मंदिराच्या अगदी समोर रस्त्यावरतीच होते आणि मुक्काम अंगणात होता . 
जीर्णोद्धार झालेले भमोरेश्वर महादेवाचे मंदिर .मी गेलो तेव्हा या मंदिराचे काम सुरू होते
यादव यांचे छोटेसे दुकान , डेअरी असून परिक्रमावासीं ची सर्व सेवा ते करतात
यादव यांचे हेच घर आहे जिथे मी मुक्काम केला . मागे जे नवीन बांधकाम दिसते आहे तिथे छोटेसे अंगण होते जिथे मी झोपलो होतो .
या संपूर्ण प्रांताला नेमाड किंवा निमाड असे म्हणतात त्यामुळे येथे हिंदी भाषा कमी चालते व निमाडी भाषा जास्त चालते . हे यादव तीन भाऊ आणि त्यांची सहा मुले आणि एक मुलगी असा एकत्र परिवार होता . धाकटे अतुल आणि अनमोल खूपच हुशार होते ! सर्व मुले आल्यापासून मलाच चिकटून बसली ! लहान मुलांची जिज्ञासा मला फार आवडते !त्यांना सतत नवीन काहीतरी शिकायचे असते किंवा नवीन काहीतरी करून पहायचे असते ! अशी जिज्ञासा जोवर तुमच्या ठायी शिल्लक आहे तोपर्यंत तुम्ही लहान मूल आहात असे समजायला हरकत नाही ! त्यांनी मला निमाडी भाषा कशी बोलायची वगैरे सांगितले . त्याच्या मोबदल्यात मी त्यांना भरपूर चित्रे काढून दिली . आणि गप्पा मारत बसलो . घोड्यांचा विषय निघाल्यावर यांनी सांगितले की त्यांच्या पण गावामध्ये घोडा आहे .तोपर्यंत अनमोल धावत गेला आणि लखन यादव या माणसाला घेऊन आला . याच्याकडे स्वतःची घोडी होती. बिजली नावाची एक अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाची घोडी होती . हिला त्याने नाचायला आणि अलप करायला म्हणजे मागच्या दोन पायांवर उभे राहायला शिकवले होते . मला व्यक्तिशः घोड्यांना नाचवणे आवडत नाही .कारण तुम्हाला वाटते तो नाचत आहे .परंतु तो तुमच्या भीतीने हालचाली करत असतो . तो नाचण्यासाठी बनलेला प्राणी नाही . एखाद्या स्पेशल फोर्सेस मधल्या जवानाला भरतनाट्यम करायला लावण्या सारखे हे निंद्य आहे ! लखन लगेचच बिजलीला घेऊन आला . नाचकाम सुरु झाले . लखन यादव दारू पिला होता तरीदेखील घोडीला चांगली दामटवत होता . मला त्या मुक्या जनावराची फार दया आली . गावात अजून एक छोटीशी पांढरीच धनगरी घोडी होती . अशा घोड्यांना तट्टू म्हणतात . पण ही अडेल तट्टू होती . अडेलतट्टू हा शब्द अशाच घोड्यांसाठी वापरला जायचा .त्यातून मराठी भाषेत आला आहे .अडेल म्हणजे स्वतःला हवे ते करणारी . मालकाचे न ऐकणारी . "अडेल तट्टू आणि खोडेल जनावर , मारल्याशिवाय ऐकत नाही " अशी एक म्हण माझ्यासाठी माझी आजी नेहमी वापरायची ती मला या निमित्ताने आठवली ! असो . रात्री सुरेख असा भोजन प्रसाद घेतला आणि यादव बंधूंशी गप्पा मारत झोपी गेलो पहाटे शक्य तितक्या लवकर उठून निघायचे नियोजन होते .चार वाजताच जाग आली . सर्व आन्हीके आटोपून अंधारातच पाय उचलला . दोन दिवसांचे अंतर मला एका दिवसात चालायचे होते ! मी डोक्यात एकच गणित ठेवले ! आज कुठेही कशासाठीही थांबायचे नाही ! फक्त चालत राहायचे ! वेदांनी आपल्याला दिलेली ती आज्ञा आहे ! चरैवेति । चरैवेति ।
चर + इव + इति अर्थात चालत राहा . चालत राहा .थांबू नका ! पायांना गती दिली आणि स्वतःला सांगितले . आज एकादशी आहे . आता ओंकारेश्वर येईपर्यंत ,महाशिवरात्र होईपर्यंत ,
चरैवेति । चरैवेति ।


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर