लेखांक ७१ : नर्मदाष्टकाची जन्मभूमी मोरटक्क्याची चिदंबर गुहा अन् टोकसरची मण्यार

नर्मदे वरील दोन-तीन पुल इथून दिसू लागले .त्यांच्या दिशेने चालत राहिलो . रस्ता मार्ग लोहमार्ग आणि कॅनॉलचे पाणी घेऊन जाणारा पूल असे हे पुल आहेत . पैकी लोहमार्ग हा भारतातील एकमेव मीटरगेज मार्ग शिल्लक राहिला आहे . लवकरच त्याचे देखील ब्रॉडगेज होणार आहे . ही रेल्वे अतिशय सुंदर आहे . माझ्या लहानपणी सर्वत्र अशाच रेल्वे होत्या हे मला आठवते .


  मोरटक्का येथील नर्मदेवरील पूल

                मीटरगेज रेल्वे पूल 

दोन्ही पूल एकाच दृष्टीक्षेपात 





पुलावरून नर्मदेचे दर्शन घेण्याचे भाग्य परिक्रमा वासीना लाभत नाही परंतु ते दर्शन काहीसे असे असते
पुलाच्या खालून जाण्याचा मार्ग शक्यतो असा खडतर असतो
 किनाऱ्याचा मार्ग पकडून चालत राहिलो . वाटेमध्ये अनेक आश्रम दिसत होते परंतु आम्ही कुठे थांबलो नाही . या आश्रमांमध्ये अनेक साधू आहेत . । संत आहेत . अनेक महंत आहेत . परिक्रमेमध्ये तुम्हाला सर्वच ठिकाणावरील सर्व माणसे भेटतील असे नसते . तुमच्या नशिबामध्ये जी माणसे आहेत तेवढी तुम्हाला भेटतात . बरेचदा तुम्ही सकाळी निघालात की थोड्याच अंतरावर अजूनही आश्रम असतात जे तुम्ही टाळून पुढे जाता . तुमच्या मागे कुठेतरी मुक्काम केलेला परिक्रमावासी कदाचित या आश्रमात मुक्कामाला थांबत असतो . त्यामुळे कोणीही असा खात्रीने दावा करू शकत नाही की मी नर्मदा खंड संपूर्ण पाहिला आहे . काही ना काही पाहायचे राहूनच जाते . त्यामुळे जे काही तुम्ही स्वतः अनुभवले तेवढाच नर्मदाखंड तुम्हाला माहिती असतो . त्याच्याशिवाय देखील भरपूर घडामोडी येथे घडत असतात . विशेषतः ज्या परिक्रमावासिनी एकापेक्षा जास्त परिक्रमा केलेल्या आहेत त्यांना प्रकर्षाने हा अनुभव येतो की दरवेळी परिक्रमा नवीन काहीतरी आश्चर्यकारक असे काहीतरी समोर घेऊन येते ! दरवेळी नवीन माणसे भेटतात . नर्मदा परिक्रमा ही अशी मजेशीर आहे .असो . इथे मध्ये कुठेतरी आश्रम असलेल्या अशाच एका तरुण साधूने गूगल नकाशावर खूप सुंदर फोटो टाकले आहेत . ते आपल्यासाठी इथे जोडतो आहे
  त्वदीय पादपंकजम् नमामि देवि नर्मदे
 ॐ नमः शिवाय
नर्मदे काठचा सूर्योदय आणि सूर्यास्त हे चुकवू नये असेच असतात ! 
वाटेत तुम्हाला घडणाऱ्या प्रत्येक देवतेच्या दर्शनाने तुमची जन्मजन्मांतरीची पापे जळून जात असतात .
नर्मदा खंडातील लहान मुले देखील मोठ्या भक्ती भावाने परमेश्वराची भक्ती उपासना पूजा अर्चना करताना दिसतात .
साधू जीवनासाठी तर नर्मदे सारखा प्रांत नाही !
आम्ही चालत चालत मोरटक्का हे गाव गाठले . या गावातही अनेक आश्रम आहेत . त्यापैकी बहुतांश परिक्रमावासी हे भक्तराज महाराजांच्या आश्रमामध्ये राहतात . परंतु मला तिथे एका मंदिराचे बांधकाम सुरू आहे असे दिसले . तयार मंदिरे आपल्याला अनेक दिसतात परंतु बांधकाम सुरू असलेले मंदिर पाहण्याची गंमत काही वेगळीच आहे ! उत्कंठेपोटी मी तिथे गेलो असता मला असे लक्षात आले की हे राजे राजेश्वरी धाम नावाचे मंदिर त्रिपुरा सुंदरी देवीला समर्पित आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने हे बांधकाम चालू होते .  इथे संपूर्ण मंदिराचे बांधकाम कोण पाहते आहे असे मी विचारल्यावर मला कैलास जी आवले नामक एका सद्गुरूस्थांचा क्रमांक देण्यात आला . मंदिर निर्मितीचे अंदाजपत्रक साधारण दोन कोटी पर्यंत जात होते . मी तिथे उपस्थित असलेल्या एका शुभम जोशी नामक गुरुजींच्या मोबाईलवरून कैलासजींना फोन लावला . हे बडवाह येथे एका बँकेमध्ये नोकरी करत असत . आता देखील ते बँकेमध्ये होते . बँक मंदिरापासून नऊ किलोमीटर लांब होती . ते मला म्हणाले की तुम्ही तिथेच थांबा मी आत्ता तुम्हाला भेटायला आलो आणि बरोबर वीस मिनिटांमध्ये कैलास जी आवले हातातली सर्व कामे टाकून स्वतः तिथे जातीने हजर झाले ! मंदिर निर्माणा प्रति त्यांच्या असलेल्या या तळमळीचे मला प्रचंड कौतुक वाटले . त्यांनी मला त्या संपूर्ण परिसराची माहिती दिली . जयपुर येथून लाल दगड ते मागवत होते . माझे यासंदर्भातील जे काही संपर्क आहेत ते सर्व त्यांना मी दिले . हेतू इतकाच की कमी खर्चामध्ये भव्य दिव्य मंदिर उभे राहावे . मी गेलो तेव्हा मंदिराचे काम अजून पूर्ण झाले नव्हते . परंतु आता गुगल नकाशावर पाहिले असता मंदिर पूर्ण झाल्याचे दिसते . हा संपूर्ण परिसरात अतिशय ऊर्जा युक्त होता . कैलास जी आवले मला या परिसराबद्दल माहिती सांगू लागले .भालचंद्रजी शास्त्री भारती नावाचे गोळवलकर गुरुजी यांचे मित्र तिथे राहत होते .इथे असलेल्या एका तळघर वजा गुफेमध्ये त्यांनी आयुष्यभर साधना केली . गुहेला चिदंबर गुहा असे स्थानिक लोक म्हणतात .  होय गुफा नाही गुहा असेच म्हणतात ! भालचंद्र जी मराठी होते आणि गोळवलकर गुरुजी देखील मराठी . त्यामुळे चिदंबर गुहा असे शुद्ध मराठी नाव या गुहेला देण्यात आले . गोळवलकर गुरुजी देखील अत्यंत निस्पृह असल्यामुळे त्यांनी या जमिनीतील एकही गुंठा स्वतःच्या नावे न ठेवता संपूर्ण जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे करून टाकली . पुढे संघाच्या रचनेतून इथे एखादे भव्य मंदिर उभे करावे असे ठरले . त्या मंदिराला लागूनच भक्तनिवास आणि मोठे सभागृह देखील बांधण्यात आले . चिदंबर गुहेचा देखील जीर्णोद्धार केला गेला . कैलास जी यांनी एवढे सर्व कार्य उभे केलेले असून देखील त्यांचा नम्रपणा पहा ! अजून काही सूचना अभिप्राय असतील तर आवर्जून सांगा असे ते मला म्हणाले . गेले अनेक दिवस माझ्या डोक्यामध्ये जो विषय घोळतो आहे तो मी इथे कैलास जी यांच्याशी बोललो . सुदैवाने माझ्या परिक्रमेच्या सुरुवातीच्या काळात मला मोहन साधू भेटल्यामुळे माझ्याकडून परिक्रमेमध्ये सहज होऊ शकणाऱ्या अनेक चुका झाल्या नाहीत . परंतु बहुतांश परिक्रमावासी ओंकारेश्वर येथूनच परिक्रमा उचलत असल्यामुळे आणि त्यानंतरचा पहिला मुक्काम बहुतेक वेळा मोरटक्का इथेच पडत असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या परिक्रमावासींची संख्या अत्यंत म्हणजे अत्यंत जास्ती असते . अशावेळी या सर्व लोकांना एखाद्या छोट्याशा चल चित्रपटाच्या माध्यमातून नर्मदा परिक्रमे मध्ये काय करावे आणि काय करू नये , कसे वागावे आणि कसे वागू नये ,कसे बोलावे आणि कसे बोलू नये ,कसे चालावे आणि कसे चालू नये , हे सर्व जर प्रशिक्षण दिले गेले तर त्याचा संपूर्ण परिक्रमे दरम्यान परिक्रमा आणि काठावरील रहिवाशांना अतिशय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही . माझी ही कल्पना कैलासजींना अतिशय आवडली . त्यासाठी लागणाऱ्या बहुतांश गोष्टी इथे तयार होत्या . एखाद्या भिंतीवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून हा चित्रपट दाखवता येण्यासारखा होता . तसेच इथे अतिशय भव्य सभागृह आणि खुर्च्या वगैरे व्यवस्था आधीपासून होती . या कामामध्ये कुठलीही मदत लागली तर मला कधीही सांगा असे मी कैलाजींना सांगितले . अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी नेहमीच उपलब्ध असते ,त्यामुळे त्याची गरज नसते हे मला माहिती होते . परंतु मी माझा भाव प्रकट केला इतकेच . कैलास जी येईपर्यंत शुभम जोशी या तेजस्वी तरुण गुरुजीने आम्हाला चिदंबर गुफा दाखवली . तळघरामध्ये अतिशय निरव शांतता होती . तिथे अक्कलकोट स्वामींची एक मूळ तसबीर होती . तिचे वजन किमान ४० किलो असावे इतकी ती जड होती . इथे स्वामी मुक्कामी येऊन गेलेले आहेत असे गुरुजींनी मला सांगितले . या गुहेमध्ये अनेक संत महात्मे राहून साधना करून गेलेले होते . त्यातील सर्वात प्रमुख नाव म्हणजे आद्य शंकराचार्य होय . त्यांनी या गुहे मध्ये राहून काही काळ साधना केली होती . याच काळात त्यांना नर्मदाष्टक हे अजरामर काव्य स्फुरले होते असे या भागात मानले जाते . इथे त्यांचा देखील फोटो होता . ही गुहा शंकराचार्यांना दाखवली कुणी असे विचारल्यावर मला गुरुजींनी सांगितले की शंकराचार्यांचे गुरु गुरुगोविंदपादजी महाराज यांची मांधात पर्वतावर गुहा आहे तसेच ते इथेही ह्या गुहेमध्ये येऊन राहायचे व त्यामुळेच त्यांनी आद्य शंकराचार्यांना ह्या गुहेत साधना करायला सांगितले . गुरुजी सांगत होते तसा अंगावर काटा येत होता ! जे नर्मदाष्टक परिक्रमावासी रोज म्हणतात आणि मी देखील काठाने चालताना बरेचदा जे मोठ्याने म्हणायचो ,त्या स्तोत्राची ही जन्मभूमी आहे या कल्पनेनेच अंग शहरून गेले !  गुहा अतिशय सुंदर आणि ऊर्जेने भारलेली होती आत मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांची देखील एक मूर्ती होती . अक्कलकोट स्वामी हे नेहमीच त्यांच्या भक्तांना प्रचिती देत असतात . मला आज इथे स्वामींनी दर्शन दिले तसे काल मौनी बाबा आश्रमामध्ये विश्रांती घेत असताना अक्कलकोट स्वामींच्या मराठी गाण्यांची एक सीडी तिथे मला सापडली ! त्यातील सर्व गाणी मला पाठ होती . त्यामुळे त्या सीडीवरील नाव वाचावे आणि ते गाणे मी गायला सुरू करावे ,अशा तऱ्हेने स्वामींची गाणी गात गात इथपर्यंत आलो होतो ! आणि आज लगेच स्वामींनी दर्शन दिले ! या परिसराची काही चित्रे आपल्या माहिती करता देत आहे .
श्री राजराजेश्वरी मंदिर मोरटक्का
इथेच बसून आम्ही गप्पा मारल्या
मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झालेले आहे
श्री राजेश्वरी माता त्रिपुरा सुंदरी देवी

इथे अजून एक गंमत अशी झाली की शुभम जोशी गुरुजी बंगाली बाबुला म्हणाले की तू कपाळाला काहीच का लावत नाहीस ? बंगाली बाबू ने उडवा उडवी चे उत्तर दिल्याबरोबर स्वतः शुभम जोशी यांनी त्याच्या कपाळावर सुंदर असा चंदनाचा टिळा लावून कुंकवाचा नाम ओढला . आणि त्याला कुंकवाचे , तिलक लावण्याचे महत्त्व समजावून सांगितले . त्याने देखील महत्त्व समजल्यासारखे केले आणि बाहेर गेल्याबरोबर नाम पुसून टाकला ! अशा लोकांना शक्यतो आपण एकटे किंवा वाऱ्यावर सोडून देतो . परंतु माझे मत थोडेसे विपरीत आहे . जो आधीचाच भक्त आहे त्याच्यावर डोके फोड करण्यापेक्षा जो अभक्त आहे त्याला भक्तिमार्गाला लावणे हे अधिक कौशल्याचे आणि कठीण काम आहे . त्यामुळे ह्या मुलासोबत बराच वेळ चालून मी त्याच्याशी विविध सामाजिक , धार्मिक , आंतरराष्ट्रीय ,राजकीय विषयांवर चर्चा करायचो आणि त्याची मते अधिक सकस आणि सरस ठरावीत यासाठी त्याला वास्तविक परिस्थितीचे भान द्यायचो . मला त्यात कितपत यश आले हे मला जाणून घ्यायचे नसून , माझ्याकडून निष्क्रियता त्यागून काही प्रयत्न झाले हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे .  फळाची आशा न धरता जर असे सर्वच सज्जन कर्म करू लागले तर दुर्जनांची मती पालटायला वेळ लागणार नाही .समर्थ म्हणतात ,
गतीकारणे संगती सज्जनांची। 
मती पालटे सूमती दुर्जनाची ।
शुभम जोशी गुरुजींच्या संगतीमुळे काही काळ का होईना बंगाली बाबूंची मती पालटली होती ! असो
इथून पुढे निघालो आणि किनारा पकडला .
आज काठाने चालताना सर्वत्र चिखल लागत होता . चिखल होण्याचे कारण म्हणजे नर्मदेच्या काठावर असलेल्या शेकडो पाणी उपसणाऱ्या मोटर्स ! या पंपांच्या जोडामधून आणि पाणी वाहून नेणाऱ्या नळ्यांच्या जोडांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सांडायचे . प्रचंड काटेरी जंगले देखील या भागात होती . बाभळीच्या काट्यांचा भडिमार झालेला सगळा परिसर होता ! तमिळनाडू मध्ये वृक्षांवर काम करणाऱ्या माझ्या एका डाव्या समाजसेवी मित्राने मला सांगितले होते की पूर्वी रशियन विमाने भारतावरून फिरून कुबाभूळ या झाडाच्या बिया सर्वत्र फेकत असत . त्यांचा हेतू इतकाच होता की त्यामुळे भारतातील सुपीक जमिनीचे प्रमाण कमी होत जावे . किंवा सुपीक जमीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कष्टामध्ये वाढ व्हावी . आज भारतभर प्रवास करताना जेव्हा बाभळीची वनेच्या वने दिसतात तेव्हा लक्षात येते की हा हेतू यशस्वी झालेला आहे . असो . पाण्याच्या मोटर जड असतात त्यामुळे त्यांना नेणे आणणे सोपे जावे म्हणून तोफे सारखे गाडे केलेले या भागात आढळतात . हे गाडे उंच असल्यामुळे याच्यावरती मोटरचा सहा इंची किंवा चार इंची पाईप तिरका वर चढत जातो आणि तो पार करता येणे अवघड होऊन जाते . तसेच या पाईपला छिद्रे पडलेली असतात किंवा फाटलेला असतो किंवा जोड असतो तिथून प्रचंड पाणी गळत असते . कधी कधी पंधरा-वीस फूट उंचीच्या चिळकांड्या उडत असतात . हे पाईप आणि मोटर पर्यंत वीज नेणाऱ्या वायर्स पाहून  काळजीपूर्वक चालावे लागते . यामध्ये जरा जरी हलगर्जीपणा झाला तरी चुकीला माफी नाही ! कधी कधी या पद्धतीने झालेला चिखल १०० - २०० मीटर पर्यंत पसरलेला असायचा . त्यातून मग अतिशय सावधपणे चालावे लागायचे . पुढे बडा आली अथवा अली बुजुर्ग नावाच्या गावापासून खरगोन जिल्हा चालू झाला .खंडवा जिल्ह्यामध्ये मुबलक चिखल होता .खरगोन जिल्ह्यात त्याचे प्रमाण कमी झाले . इथे आगे रस्ता नही है हे वाक्य आता तोंडपाठ करून टाकले होते . जो भेटेल तो सांगायचा बाबाजी आगे रस्ता नही है । परंतु मी जेव्हा माझा निश्चय सांगायचो की मला काठानेच चालायचे आहे तेव्हा मात्र लगेच रस्ता सांगितला जायचा . रस्ता सांगितला जायचा म्हणजे काय तर फक्त गावांची नावे जाणून घ्यायची . रस्ता तर सोपाच आहे ! नर्मदेचा काठ ! पुढे एका सिताराम बाबांचा आश्रम लागला . छोटा बंगाली सुद्धा माझ्या मागे येतच होता . या आश्रमामध्ये तीरथदास महाराज नावाचा एक स्त्रैण साधू होता . या गावाचे नाव होते कटार . इथे सुंदर असे स्नान केले आणि भोजन केले . आता हळूहळू उकाडा वाढतो आहे असे लक्षात आले . आईच्या मायेने साधूने जेवायला वाढले .आश्रम अतिशय सुंदर होता आणि शांत निवांत होता . तिथे एक वयोवृद्ध माताजी सेवा करताना दिसल्या . मैया चे पाणी उपसून नळ तयार केला होता . नळी काळी असल्यामुळे ती उन्हा मध्ये प्रचंड तापत होती आणि त्यामुळे नळाला गरम पाणी येत होते . तिथे मी मस्तपैकी आंघोळ करून घेतली . साडेतीन वाजता पुढे निघालो . या कटार गावामध्ये अनेक आश्रम आहेत . करपात्री महाराजांचा आश्रम , गणेश दास महाराजांचा आश्रम ,निरंजन आखाड्याचा आश्रम ,नर्मदा सेवा आश्रम असे अनेक आश्रम येथे पाहायला मिळतात . ज्या आश्रमामध्ये परिक्रमावासी आधी पोहोचतो किंवा ज्या आश्रमातून त्याला बोलावणे येते तिथे जाण्याचा योग त्या त्या परिक्रमावासीच्या नशिबामध्ये असतो . एकदा एखाद्या आश्रमात तुम्ही आसन लावले की दुसरीकडे कोणी जात नाही . इथे गणेश दास बाबा नावाचे एक अगडबंब साधू राहतात . हार्मोनल डिसऑर्डर मुळे अर्थात संप्रेरकांच्या अनियमिततेमुळे आलेला अति स्थूलपणा या महाराजांनी आपल्या अखंड साधनेने , नामस्मरणाने आणि तपाचरणाने खुजा करून दाखविला आहे .
सदा हसतमुख गणेश दास महाराज
पंचाग्नी साधना करताना गणेश दास महाराज
श्री गणेश दास महाराज कटार
इथून पुढे मला एक सामाजिक वास्तव लक्षात येऊ लागले ते नमूद करून ठेवतो . या संपूर्ण परिसरामध्ये वनवासी आदिवासी बांधवांचे बाहुल्य आहे . या लोकांना नर्मदा मातेला देवी न मानता जलदेव नावाचा दुसरा देव उभा करून त्याच्या मागे लावण्याचे षडयंत्र काही डाव्या चळवळीतील कार्यकर्ते इथे करत आहेत . लवकरच इथल्या मुलांमध्ये नक्षलवादाविषयी प्रेम निर्माण होऊन ते नक्षलवादी चळवळीमध्ये सामील होऊ शकतात अशी परिस्थिती तिथे वावरताना मला जाणवली . यावर वेळीच उपाययोजना करून या मुलांना राष्ट्रनिर्मितीच्या मूळ प्रवाहात आणणे अतिशय आवश्यक आहे . अन्यथा पुन्हा एकदा विनाकारण संघर्ष उभा राहणार हे निश्चित आहे . प्रस्थापित वर्णांमध्ये संघर्ष उभा करून त्या निमित्ताने सरकारच्या नाकी दम आणून सरकार कसे नाकर्ते आहे हे सिद्ध करून दाखवणे , व्यवस्था कशी कामाची नाही हे पटवून सांगणे आणि देशातील सत्ता ,प्रस्थापित सत्ता असे म्हणूयात फार तर , तिला उलथवून टाकून डाव्या विचारांचे राज्य आणणे ही मोडस ऑप्रेंडी प्रत्येक देशामध्ये अगदी याच पद्धतीने राबवली जाते , तशी इथे देखील राबवली जात आहे . सामाजिक आस्था असणाऱ्या लोकांनी या भागामध्ये येऊन कार्य करणे अतिशय अत्यावश्यक आहे .  जय जलदेव ,जय बडा देव वगैरे पाट्या तुम्हाला इथल्या तरुणांच्या गाड्यांवर दिसतात . त्या देवांना विरोध नसून त्या देवांच्या आडून होणाऱ्या राष्ट्रविघातक आणि राष्ट्र विभाजक विचारांच्या प्रचार प्रसाराला हा विरोध आहे . असो .त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे मध्यंतरी जगद्गुरु नरेंद्रनाथ महाराज नाणीज यांचा एक आश्रम होता आणि अक्कलकोट स्वामींना समर्पित एक आश्रम होता . परंतु अजून उजेड असल्यामुळे चालत राहिलो . 


अक्कलकोटस्वामी मठ
इथून पुढे किनाऱ्याने चालता चालता टोकसर नावाचे गाव आले आणि तिथला भव्य दिव्य आश्रम पाहून डोळे दिपले ! निर्विवाद पणे हा नर्मदे काठी असलेल्या अनेक मोठ्या आश्रमांपैकी एक आहे . इथे अतिशय व्यवस्थित पद्धतीने परिक्रमावासींचे आगत स्वागत आणि व्यवस्थापन केले जाते .त्यासाठी जनकल्याण समितीने खूपच भव्य दिव्य असा आश्रम उभा केला असून त्याची अत्यंत सुंदर व्यवस्था लावलेली दिसते . इथे अनेक मंदिरे असून औरस चौरस पसरलेला मोठा हॉल आहे ,ज्याच्यामध्ये अनेक परिक्रमावासी विश्रांती घेऊ शकतात . मागच्या बाजूला चक्क बांधलेले संडास आहेत ! भोजनाची देखील अप्रतिम व्यवस्था आहे . गौतमेश्वर महादेवाचे मंदिर आहे आणि गोमुख घाट आहे . परिक्रमावासींच्या निवासासाठी बांधलेल्या सभागृहातील खांब अतिशय सुंदर आहेत .परिसरामध्ये अतिशय सुंदर उद्यान निर्माण केलेले आहे . या आश्रमामध्ये आधी मी एकटाच होतो . नंतर तिथे छोटा बंगाली आला .त्याशिवाय अमरकंटकच्या जंगलात माझ्यासोबत असलेला भूषण स्वामी देखील इथे भेटला . आणि एक ओडिया तरुण परिक्रमावासी भेटला ,जो सुशिक्षित होता .उच्च विद्या विभूषित होता . परंतु खास नर्मदा परिक्रमा काय असते त्याचा अनुभव घेण्याकरता परिक्रमेला निघालेला होता . याने उशिरा परिक्रमा चालू केली असल्यामुळे त्याला पुढे एकट्याला चालावे लागणार होते . मी त्याला परिक्रमा कशी असते वगैरे सर्व माझ्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न केला . मोहन साधूने मला जे काही सांगितले होते त्याचा मला प्रचंड फायदा झाला होता . तेच डोक्यात ठेवून मी त्याला सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असे थोडेफार केले . याचे नाव होते मिलन प्रधान . या घाटावर अतिशय सुंदर असा नर्मदा अंतर्गत स्विमिंग पूल तयार करण्यात आला होता ! म्हणजे एक असा चौकोनी खोल चौथरा तयार केला होता जिथे पाणी शांत व्हायचे आणि पोहता यायचे ! अनेक तरुण-तरुणी येथे पोहण्याचा आनंद घेताना दिसले . सर्व मंदिरांची दर्शने करून भव्य दिव्य सभागृहातील एका पंख्याखाली आसन लावले . 

हाच तो टोकसर चा गोमुख घाट 

घाटाच्या बाजूला नैसर्गिक दगडाला ओलांडत नर्मदेची एक शाखा आलेली आहे . तिच्यावर पूल केला असून त्यामुळे छोटासा जलतरण तलाव तयार झालेला आहे .

या पुलावरून दगडावर जाता येते किंवा थेट पाण्यात उडी मारता येते . 


परंतु दगडावर जाऊन उडी मारण्याचा आनंद काही वेगळाच आहे !
लहान थोर सर्वजण हा आनंद सतत घेतात !

अर्थात परिक्रमावासी या दगडावर जाऊ शकत नाहीत परंतु आपल्या माहितीकरता हे संग्रहित फोटो जोडत आहे .

परिसर अतिशय सुंदर अशा उद्यानांनी भरलेला आहे .

अतिशय कलाकुसर पूर्ण आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने रंगविलेल्या खांबांनी परिक्रमावासी निवास सभागृह बांधण्यात आलेले आहे .

गौतमेश्वर महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे

गौतमेश्वर महादेव

सुंदर यज्ञशाळा

 परिक्रमा वासी निवास सभागृह

नर्मदा पात्रातून दिसणारा आश्रम आणि मंदिराचा विस्तीर्ण परिसर

या भागातील नौका

या रैन बसेरा इमारती पुढेच मण्यार साप धरला
ओडिया परिक्रमावासी मिलन प्रधान
याने परिक्रमेसाठी सर्व आधुनिक साधने आणली होती . मी त्याला माझ्या परीने नियम समजावून सांगितले की गॉगल वगैरे परिक्रमेमध्ये चालत नाही . पुढे हा किती दिवस चालला काही कळाले नाही . परंतु एकट्याने इतक्या उशिरा परिक्रमा चालू करणे ती देखील उन्हाळ्याच्या सुमारास , हे सोपे नक्कीच नाही .  त्या रात्री एक गमतीशीर परंतु भीतीदायक प्रकार घडला .  खूप दिवसांनी भेटल्यामुळे भूषण स्वामींच्या आणि माझ्या आत्मीय गप्पा रंगल्या होत्या . सतत चालल्यामुळे शांत बसायला पायांना नको वाटते . त्यामुळे भूषण मला म्हणाला की चल आपण बाहेर फेरफटका मारता मारता गप्पा मारू ! एखादी गोष्ट कशी तुम्हाला बोलावून तिच्याजवळ आणते याचे हे उदाहरण बर का ! तिन्ही सांजा झाल्या होत्या आणि चांगलाच अंधार पडला होता . पायाखाली समोर आजूबाजूला काय आहे काहीही दिसत नव्हते . इतक्यात चालता चालता माझे समोर लक्ष गेले आणि मी भूषण ला बाजूला ढकलले ! एक क्षणभर त्याला राग आला ! मी त्याला म्हणालो पटकन तुझा मोबाईल काढ आणि बॅटरी लाव ! त्या विजेरीच्या उजेडामध्ये सळसळत जाणारा काळाकुट्ट पूर्ण वाढ झालेला अतिविषारी मण्यार साप दिसला ! भूषणने मगाशी अक्षरशः त्या सापावर पाय टाकला असता ! गंमत म्हणजे आम्ही दोघेही अनवाणी होतो ! इतक्या अंधारामध्ये तो काळा साप मला कसा काय दिसला काय माहिती ! परंतु भूषणचा पाय खाली पडता पडता मी त्याला ढकलला आणि त्यामुळे तो थोडासा हेलपाटला . परंतु जेव्हा त्याने तो विषारी साप पाहिला तेव्हा त्याला हायसे वाटले की आपला प्राण वाचला 
विषारी मण्यार अथवा कॉमन क्रेट सर्पाचे संग्रहित चित्र
 त्या सापाने अजून कोणाला दंश  करू नये , आणि विषारी सर्प म्हणून त्याला कोणी मारून टाकू नये म्हणून मी त्याला हळूच उचलला . एका पिशवीमध्ये तात्पुरता भरला . आणि शेजारी असलेल्या जंगलामध्ये सोडून दिला . सर्पमित्र अनिल खैरनार , राजाभाऊ शिर्के , अमित गाडेकर , संजय जोशी यांच्याकडून प्रत्यक्ष आणि सर्पमित्र राम नाना भुतकर , आनंद चिट्ठी , निर्झरा चिट्ठी यांच्याकडून अप्रत्यक्ष पणे घेतलेल्या ज्ञानाचा अशा रितीने परिक्रमेमध्ये फायदा झाला . मण्यार हा सर्प शक्यतो मध्यरात्री संचार करतो . त्यावेळेस त्याला पकडता येणे अशक्य असते . आत्ता त्याची संचाराची वेळ नसल्यामुळे हालचाली थोड्याशा मंदावलेल्या होत्या . परंतु तो प्रसंग भूषण स्वामी आणि माझ्या चांगल्या लक्षात राहील ! इथे भोजनगृहामध्ये सुंदर अशी टेबल खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे ! परिक्रमेमध्ये गजानन महाराज आश्रम सोडल्यावर इथेच टेबल खुर्च्या पाहिल्या ! सेवेकरी अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने भरपेट जेवायला वाढत होते ! संपूर्ण परिक्रमेमध्ये सर्वत्र तुम्हाला ताजे ताजे गरमागरम अन्न वाढले जाते ! एक वेळ घरी आपले शिळे खाणे जास्त होते , परंतु परिक्रमेमध्ये शिळे खाण्याची वेळ येत नाही . रात्री आम्ही सर्वजण गप्पा मारत पाठ टेकली . राम कुटीमध्ये रात्री गाणी ऐकणारा साधू माझ्या दंडाला घाबरून कसा जंगलात पळून गेला याची कथा बंगाली बाबूला अतिरंजीत वाटायची .परंतु प्रत्यक्ष साक्षीदार आज उपस्थित असल्यामुळे मी भूषणलाच तो प्रसंग सांग , असे सांगितल्यावर त्याने संपूर्ण किस्सा बंगाली बाबूला ऐकवला आणि त्याची खातरजमा झाली . दरम्यानच्या काळात कुठे कुठे काय काय पाहिले , कुठे कुठे कोण कोण भेटले ,याची उजळणी करत आणि देवाणघेवाण करत हळूहळू निद्रादेवीला आधीन झालो .
 टोकसर आश्रमाचा माझ्या वहीतील शिक्का
हा परिक्रमेतला बासष्ठावा मुक्काम ठरला . दिनांक होता ४ मार्च २०२२ .



लेखांक  एक्काहत्तर समाप्त (  क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर