लेखांक ४८ : सतधारा , सूर्यकुंड आणि परमपवित्र बर्मान घाट

 शेर संगम घाटाचे नाव ग्वारी घाट असेच आहे . या ग्वारी घाटावर नर्मदा मातेला खूप मोठी साडी नेसवली होती . या काठावरून त्या काठावर मोठी केबल ताणून बांधलेली असते .त्यावर अग्निबाण लावून साडी सोडली जाते . पूर्वी धनुष्यबाणाने साडी सोडली जायची .

रेवा नावाच्या गुजराती चित्रपटामध्ये माहेश्वर घाटावर चित्रित झालेले नर्मदेला साडी नेसवण्याचे अलौकिक दृश्य

 काही ठिकाणी नावेने देखील साडी पलीकडे नेली जाते . या साडी नेसविण्याच्या विधीची छायाचित्रं वाचकांसाठी सोबत जोडत आहे .हा विधी खरोखरच बघण्यासारखा असतो .
माझ्या आधी तिथून काही परिक्रमा वासी गेले होते त्यांनी हे फोटो काढले होते . आत्ता त्यांच्याकडून मला ते प्राप्त झाले .  शेर संगम  घाटावर नर्मदा मातेच्या जयंती चा सुरू असलेला उत्सव . मी साधूला याच माळा काढण्यासाठी मदत केली होती . 
नर्मदा मातेला नेसविण्यात येणारी लांबच लांब साडी
पुढे पुढे पात्राची रुंदी जशी वाढत जाईल तसतशा साड्या देखील मोठ्या होत जातात . परंतु प्रत्यक्ष साडी नेसवलीच जाते .

अमरकंटकच्या जंगलामध्ये रामकुटी येथे नर्मदा मातेला नेसविलेली एकच पाचवारी साडी आपल्या स्मरणात असेलच ! तीच नर्मदा आता पहा किती मोठी झाली आहे !
होय !हे नर्मदा मातेचेच पात्र आहे !

नर्मदा मातेला साडी नेसवीतानाचा व्हिडिओ पश्चिम बंगाल येथून आलेल्या सात्यकी रॉय या परिक्रमावासीने घेतला होता तो इथे पहावा .

या भागातील नर्मदेचा काठ खूपच सुंदर आहे . हिरवीगार शेते ,सुखद गारवा आणि मधोमध वाहणारी हिरव्यागार रंगाची नर्मदा मैया . माझ्या आधी इथून गेलेल्या एका परिक्रमावसीने काढलेली काही चित्रे आपल्या माहिती करता देत आहे . पश्चिम बंगाल मधून आलेला हा युवक परिभ्रमण करत होता . त्याने काढलेली ही चित्रे आहेत .
नर्मदे काठी बहुतांश मार्ग असे शेतातून जातात . असा एक मार्ग शेतकऱ्याने मोकळा ठेवला तरी पुरेसे आहे .
विशेषतः दोन्ही बाजूने नर्मदा हिरवीगार असल्यामुळे डोळ्यांना फारच सुखावणारे असे दृश्य असते . 
कधी शेते ,कधी झाडेझुडपे कधी छोटीशी जंगले असा हा सर्व परिसर आहे .
मध्ये मध्ये वाळूचे किनारे तर नर्मदे काठी सर्वत्र असतात . ही वाळू इतकी सुंदर आणि वस्त्रगाळ आहे की समुद्रकिनारी देखील इतकी सुंदर वाळू मिळणार नाही ! 
मध्येच एखादा नावाडी , कोळी तेवढे दिसायचे .
नर्मदेची रुपे अशी क्षणाक्षणाला पालटत होती . शांत वालुकामय प्रवाह सोडून आता तिने हळूहळू खडकाळ स्वरूप धारण केले होते . हे मोठमोठाले खडक फोडून नर्मदा पुढे गेली कशी असेल हेही एक कोडेच आहे ! तिला प्रारंभिक मार्ग तिचे पिताश्री महादेवांनी करून दिला असावा असा माझा भाबडा कयास आहे ! 
इथे एका ठिकाणी मी सुमारे १०० पाणकावळे (इंडियन शॅग ) समूहाने शिकार करताना पाहिले ! अतिशय सुंदर पद्धतीने त्यांचे काम चालले होते . इथे पाण्याला अचानक गती येते . त्या गतीचा वापर करत सर्वजण एकदम उडायचे आणि अचानक पाण्यामध्ये शिरल्यावर माशांची  धावपळ व्हायची . नेमक्या या क्षणाचा वापर करून उरलेले कावळे पाण्यात सूर मारून शिकार करायचे . थोड्यावेळाने ते फील्डिंग लावायचे आणि मघाचे उपाशी पाणकावळे शिकार करायचे ! मी बराच वेळ त्यांची ही गंमत पाहत होतो . एखाद्या शिस्तबद्ध सैन्याप्रमाणे त्यांचा हा कार्यक्रम चालू होता .
 पाणकावळ्यांचा समूह
जसजसा नर्मदेच्या पात्राचा आकार वाढत जातो तसं तसे तिची वेगवेगळी भौगोलिक रुपे सुद्धा बघायला मिळतात . आता हळूहळू मध्ये आपल्याला छोटी मोठी बेटे दिसू लागतात . ही बेटे म्हणजे एक स्वतंत्र जीव संस्था आहे . कारण त्याच्या चहुबाजूने नर्मदा वाहत असते . त्यामुळे फारसा मानवी वावर तिथे नसतो . तिथले अरण्य हे अधिक घनदाट आणि तजेलदार वाटते . कारण तिथे कुणी लाकडे तोडायला जात नाही . किंवा चारा कापायला जात नाही . सुमारे नऊ दहा किलोमीटर अंतर चालल्यावर असेच एक बेट नर्मदेमध्ये दिसू लागले . आता सर्वत्र खडकच खडक लागला . एका अतिशय भव्य खडकाला पार करून नर्मदा येथे वाहत होती .
खडकांमधून वाहणारी नर्मदा माई
या वळणावर एक आश्रम लागला .
मा गौरी शारदा घाट नावाच्या या घाटाला आणि आश्रमाला बाहेरूनच नमस्कार करून पुढे पुलाकडे निघालो .
समोरच्या किनाऱ्यावर दिसणारा एकच अखंड खडक जो आहे त्यावरून मी चालत होतो .
इथे नर्मदेमध्ये खूप सारे दगड गोटे आढळतात .

इथे नर्मदा खडकांमुळे सात छोट्या छोट्या धारांमध्ये विभागली जाऊन वाहते म्हणून या स्थानाला सप्तधारा किंवा सतधारा असे म्हणतात .मी पूर्वीच सांगितले त्याप्रमाणे मध्य प्रदेशातील लोक स चा उच्चार श असा करत असल्यामुळे याला इथले स्थानिक लोक शतधारा असेच म्हणतात . परंतु प्रत्यक्षामध्ये सात धारा आपल्याला मोजता येतील इतक्या स्पष्टपणे दिसतात .इथे नर्मदे काठी अतिशय सुंदर असे दोन पूल आहेत . आणि पुढे नर्मदे काठचा सर्वात पवित्र मानला जाणारा बर्मान घाट आहे . 
या दोन पुलांपैकी जुना पूल खूप सुंदर आहे
इथे खडकाचे प्रस्तर खचून तिरके होऊन नर्मदेला मार्ग तयार झाल्याचे स्पष्ट दिसते .
पुलावरून दिसणारे घाटाचे दृश्य
इथेच खडकामुळे सात धारा तयार झालेल्या स्पष्ट दिसतात .हे तीर्थक्षेत्र पवित्र असल्यामुळे स्नानासाठी सदैव गर्दी असते .
नर्मदे काठी विशेष पौराणिक महत्त्व असलेली काही ठिकाणे आहेत . त्यातील हा एक महत्त्वाचा घाट .
 ब्रम्हदेवाने तपस्या केली म्हणून या घाटाचे नाव ब्रम्ह घाट . किंवा ब्रम्हा घाट . अथवा ब्रह्मांड घाट . ब्रम्हदेश शब्दाचा जसा अपभ्रंश होऊन तो बर्मा झाला तसे या ब्रह्मा घाटाचा अपभ्रंश होऊन तो बर्मान घाट झाला आहे . पुलाच्या अलीकडे एक छोटे बेट आहे . आणि पलीकडे मोठे बेट आहे ज्यावर ब्रह्मदेवाने तपस्या केली . त्यामुळे दोन्ही बाजूला बर्मान घाटच आहे . असे फार कमी ठिकाणी नर्मदेवर होते . समोरासमोरच्या दोन्ही घाटांची नावे शक्यतो वेगळी असतात .आता त्या बेटावर मोठे मंदिर आणि मारुतीची मूर्ती बसवलेली आहे . नर्मदेची जी शाखा डावीकडे वळते तिला सूर्यकुंड असे म्हणतात व ते अतिशय पवित्र कुंड आहे . इथे स्नान करण्यासाठी सदैव गर्दी असते . या घाटावर कायमच लोकांची झुंबड उडालेली दिसते .
वरील नकाशा पाहिल्यावर तुम्हाला या भागातील भूगोलाची स्पष्ट कल्पना येईल . या नकाशात नर्मदा खालून वरच्या दिशेला वाहत आहे . सुरुवातीला अंतरिक्ष नावाचे छोटेसे बेट आहे त्यानंतर दोन पूल आहेत . इथेच सप्तधारा दिसते आहे .त्याच्यापुढे ब्रह्मदेवाची तपोभूमी असलेले मोठे बेट दिसते आहे .प्रचंड वाळू पासून हे बेट तयार झालेले आहे . या बेटाच्या डावीकडून जी शाखा जाते ते गोलाकार सूर्यकुंड दिसते आहे . या मोठ्या बेटाच्या आजूबाजूच्या प्रत्येक घाटाला बर्मान घाट असेच नाव आहे . वरती अगदी शेवटी पुन्हा एक छोटासा पुल नर्मदेवर दिसतो आहे . यातला बर्मान नया पुल म्हणजे काश्मीर कन्याकुमारी महामार्ग आहे . अर्थात भौगोलिक दृष्ट्या देखील हा घाट महत्त्वाचाच आहे .

 सप्तधारे जवळील पुलाच्या इथे एक सुंदर आश्रम आहे . गोवंश कल्याण आश्रम चौगान किला असे या आश्रमाचे नाव आहे . ब्रह्मलीन संत विश्वंभरदास त्यागी जी महाराजनामक एका संतांनी इथे नर्मदा जयंतीला १०८ यज्ञ करण्याची परंपरा सुरू केली आहे . त्यांची शिष्या असलेली श्यामा दीदी नावाची एक तेजस्वी आणि तपस्विनी साध्वी ही परंपरा पुढे चालवीत आहे . मी आश्रमामध्ये गेलो तेव्हा तिथे यज्ञ सुरूच होते . यज्ञासाठी हजारो लोक तिथे जमले होते . एक अतिशय भव्य दिव्य यज्ञशाळा बनविण्यात आली होती . मोठमोठे मांडव घालून त्यामध्ये लोक बसले होते . आश्रमामध्ये साध्वी शामादीदी तिच्या धुनी पुढे गादीवर बसलेली होती . तिच्यासमोर अनेक साधुसंत येऊन बसत होते .गप्पा मारत होते . काही येत जात होते . मी आश्रमामध्ये सामान ठेवले . सूर्यकुंडावर जाऊन भर गर्दीमध्ये स्नान करून आलो . इथले पाणी फारच घाणेरडे होते . एका जागी साचलेले पाणी व त्यामध्ये हजारो लोक अंघोळ करत आहेत , कचरा टाकत आहेत असे दृश्य होते . परंतु कुठलाही विचार न करता मी तीन डुबक्या मारून स्नान करून वरती आलो . व तिथून तडक बाहेर निघालो व गर्दीपासून थोडे दूर बाजूला येऊन अंग पुसले . इथे बडोद्याचा एक परिक्रमावासी मुलगा कोणालातरी शोधतो आहे असे मला दिसले . इतक्यात त्याचे सहकारी देखील आले . अवधूत नावाचा वापी इथला एक तरुण मुलगा यांच्यामध्ये होता . याने युट्युब वर चॅनल चालू केले होते आणि तो लोकांच्या मुलाखती घेत असे . तो मला नर्मदेच्या बाजूला घेऊन गेला आणि त्याने माझी छोटीशी मुलाखत घेतली . पुढे त्याने ती युट्युब वर टाकली का नाही याचा काही तपास मला लागला नाही . तिथून मी निघालो आणि आधी यज्ञ शाळेमध्ये जाऊन यज्ञ नारायणाचे दर्शन घेऊन आलो . 
अतिशय सुंदर व भव्य दिव्य सात मजली यज्ञशाळा बनविण्यात आली होती . आत मध्ये एकाच वेळी १०८ दांपत्ये बसून यज्ञ करत होती . एक पुजारी माईकवर मंत्र सांगत होता . प्रत्येक यज्ञकुंडासमोर एक एक सहकारी पंडित बसलेला होता . सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध सुरू होता
संत श्री विश्वंभर दास त्यागी जी  महाराज . यांनीच ही यज्ञ परंपरा येथे सुरू केली .
आश्रमातील महाराजांची प्रतिमा आणि घातलेले मोठे मांडव , शामियाने
आपल्या धूनी पुढे बसून साधू संतांशी चर्चा करणाऱ्या साध्वी श्यामा दीदी .
या चित्रामध्ये भगवी लुंगी घालून मनुष्य बसला आहे बरोबर त्याच जागी श्यामा दीदींनी मला बसविले आणि माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या .
आश्रमामध्ये बाबांची सुंदर मूर्ती आहे . तिथेच अखंड रामनाम जप सुरू असतो . याच ठिकाणी आसन लावण्याची सूचना मला श्यामा दीदींनी केली .

मी आश्रमात गेल्या गेल्या आधी दीदींच्या पाया पडलो . त्यांनी मला शेजारी बराच वेळ बसवून घेतले . कुठून आलो वगैरे सर्व चौकशी केली . त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते . तसेच त्यांचे हास्य केवळ दैवी होते .
मला म्हणाली , " बाबा , बालभोग के लिये फलाहरी पाओ । शकरिया खात हो ? " मला त्याचा अर्थ कळेना . मग तिने मागविल्यावर माझ्या लक्षात आले की ते रताळे आहे . मी रताळे म्हटल्यावर ती हसायला लागली ! म्हणाली , " हा हा ! बराबर !आप मराठी लोक इसे रतालू बोलते है । रतालु ! ". दीदी ने माझ्यासाठी पपई आणि उकडलेले रताळे मागविले . मला सांगितले हा साधूचा आहार आहे , लक्षात ठेव . आणि खरोखरीच रताळे हे एक संपूर्ण आहार आहे हे तुम्हाला त्याच्या मधील घटक पदार्थ पाहिल्यावर लक्षात येईल . 
रताळ्यातील जीवनसत्वे . उपवासाला बटाटा - साबुदाण्या ऐवजी रताळे खाऊन पहा .
मी स्नान केले ती सूर्यकुंडाची जागा लाल खुणेने दाखवली आहे .
"या घाटाचे नाव सिद्ध कालिका घाट असे आहे . " शामा दीदी मला सांगू लागली .तिला भेटायला सतत नवीन नवीन माणसे येत होती . परंतु तिने मला बसवून ठेवले होते . थोड्या वेळाने तिथे गाडरवाडा येथील दीपक दुबेजी म्हणून सत्यसाईबाबांचे भक्त आले . गाडरवाडा हे ओशो चे जन्मगाव . हे बाबांचे एवढे निश्चित भक्त होते की त्यांचा मोबाईल नंबर मध्ये देखील सत्य साई बाबां ची जन्मतारीख होती . २३ । ११ । २६ . यांना हे आकडे सर्वत्र दिसायचे . अगदी यांच्या गाड्यांचे क्रमांक देखील हेच असतील याची काळजी ते घेत . उदा : MP 23 XY 1126 ! भक्तीचे किती वेगळे वेगळे प्रकार असू शकतात हे पाहून मला मौज वाटत होती . दीदी कट्टर हिंदुत्ववादी होत्या . त्यांना अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते देखील येऊन भेटत होते . आपल्याकडे असा एक सार्वत्रिक भ्रम पसरविला जातो की हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेले आहे . परंतु तसे अजिबात नसून साध्वी स्त्रियांना देखील एखाद्या साधू इतकाच मान सर्व लोक देतात हे मी स्वतः अनेक वेळा अनुभवलेले आहे . किंबहुना ती मातृशक्ती असल्यामुळे काकणभर अधिकच मान तिला समाज देतो हेच मी पाहिलेले आहे . साध्वी शामा दीदीचा दरारा आणि परिस्थितीवर तिचे कसे नियंत्रण होते हे पाहून मला बरे वाटले . तिच्या डोक्यावर भरपूर मोठा जटाभार होता . मी तिला महाराजांविषयी प्रश्न विचारले . आपल्या गुरुजींविषयी बोलताना ती भावुक झाली . केवळ त्यांच्या कृपेमुळेच तिच्या जीवनाचे सोने झाले आहे अशी तिची दृढ श्रद्धा होती . ती सांगू लागली , " जैसे ही गुरुजी ब्रह्मलीन हो गए ,सब लोग बोलने लगे ।अब तो श्यामा गई काम से ।अब सारी परंपराएं खंडित हो जाएगी । लेकिन आप ही मुझे बताएं भगवन् क्या श्यामा में इतनी ताकत है , जो इतना बड़ा सात मंजिला यज्ञ कुंड खड़ा करें ? इसके लिए मैं खास लखनऊ से कारीगर मंगाए है । लाखों रुपया खर्च किया है । इतनी ताकत इस श्याम दीदी में कहां है ? यह तो सब गुरु जी की कृपा है जो हमें प्रेरणा देते हैं । " तिचे ते शुद्ध हिंदी , वाणी वरचे प्रभुत्व आणि गुरूंच्या प्रती असलेला भाव यामुळेच असे भव्य दिव्य कार्य ती सहज उभे करू शकत होती . अजून बरेच मोठे मोठे प्रकल्प तिच्या डोक्यामध्ये होते . आत मध्ये स्वामींची समाधी होती . तिथे अखंड सीताराम नामस्मरण चालू असे .मी देखील मग तिथे बसून कधी ढोलक वाजवत , तर कधी पेटी वाजवत सीताराम चा जप केला ! सिताराम हा जप अनेक सुंदर सुंदर चालींमध्ये गाता येतो ! मी परिक्रमेमध्ये अनेक नव्या चाली शिकलो . इथे काही म्हाताऱ्या स्त्रिया येऊन जाऊन जप करायच्या . त्यासारख्या कुठे जात आहेत म्हणून मी मागे पाहिले तर तिथे टनावारी हवन सामग्री येऊन पडली होती . ती सर्व एकत्र करण्याचे काम चालले होते . मोठमोठ्या पातेल्यामध्ये शेकडो किलो हवन सामग्री होती . ती सर्व ओतणे ,एकत्र कालविणे हे शक्तीचे काम होते . मी लागलीच त्या कामाला लागलो . हवन सामग्रीतील सर्व घटक पदार्थ हे आयुर्वेदिक अथवा औषधी असतात त्यामुळे त्याचा अतिशय सुंदर असा वास सर्वत्र पसरला होता . सामग्रीची यादी पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल .
कर्पूर कचरी, बेलगिरी, फुलधावा, गुलाब पंखुरी, गिलॉय, वाच, तगर, आगर, नागरमोथा, नव ग्रह लकडी पावडर, जटामांसी, गुगल, लोबन पावडर आणि गोमय या साऱ्या आयुर्वेदिक औषधी आहेत .

हाताला होणारा त्या औषधींचा स्पर्श देखील सुखावह होता . नुसती हवन सामग्री कालवली तरी खूप ताजेतवाने वाटत होते . आज-काल परदेशामध्ये हजारो रुपये खर्च करून आरोमाथेरपी घ्यायला लोक जातात . आपल्या पूर्वजांनी याचा फार पूर्वी वापर करून घेतलेला आहे . साधे घरातील देवाला सुगंधी फुल वाहताना ,उदबत्ती / धूप ओवाळताना किंवा कापूर जाळताना जे काही सूक्ष्म वास आपल्या नाकात जातात ते दिवसभर आपल्या मेंदूला ताजेतवाने ठेवण्याचे काम करतात . आपल्यापैकी कोणी आयुर्वेदातील तज्ञ असतील तर ते यावर अधिक प्रकाश टाकू शकतात . मी असे ऐकले आहे की काही विशिष्ट मानसिक रोगांसाठी फुलांनी भरलेल्या खोलीमध्ये रुग्णाला ठेवले जाते . त्या सुगंधाचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो . असो .
हे सर्व करेपर्यंत भोजनाची वेळ टळून गेली होती . मी भोजनाची चौकशी करायला मागे गेलो तर स्वयंपाकाची मोठी मोठी भांडी घासायला सुरुवात झाली होती . भोजन संपले होते . थोडेफार भोजन शिल्लक होते . परंतु ते आचारी लोकांना जेवणासाठी लागणार होते . तिथे असलेले कोणी मला थोडेफार खाऊन जा वगैरे काही म्हणाले नाही .आपल्यामुळे कोणी उपाशी राहायला नको असा विचार करून मी भोजन प्रसाद न घेता पुन्हा समाधी पाशी आलो . श्यामा दीदीला नुसते सांगितले असते , तरी तिने पुन्हा स्वयंपाक करायला लावला असता हे माहिती असल्यामुळे मी शांत राहिलो . इथे आज मुक्काम करा असा सर्व सेवेकर्‍यांचा आग्रह हळूहळू होऊ लागला . ते पाहून कोणालाही न दुखवता हळूच तिथून काढता पाय घेतला .चिकूच्या बी प्रमाणे सटकणे याबाबतीत आता मी चांगला तज्ञ झालो होतो ! इथून पुन्हा सूर्यकुंडा मार्गे जावे लागणार होते . तसा मी निघालो . पोटामध्ये भूकेची आग पडलेली होती . हवन सामग्री कालवून कालवून चांगलीच भूक लागली होती . आता लवकरात लवकर पुढे जावे असा विचार करून मी पायांना गती दिली आणि इतक्यात एक जाडसर माणूस धावतच मला आडवा आला . त्याने माझे पाय धरले आणि मला विनवू लागला की आज आपण कृपया माझ्या हातचे भोजन करून पुढे जा . त्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही . मी शांतपणे त्याच्यामागे निघालो . इथे सूर्यकुंडामध्ये लोकांना पूजा पाठ करता यावेत म्हणून सिमेंटचे काही स्लॅब सरकारने घातलेले आहेत .
सूर्यकुंडावरचे पूजा मंडप
 इथे हा सोनी नावाचा सागर येथील परम साईभक्त मनुष्य आणि त्याच्या कुटुंबातील सुमारे पंधरा-वीस लोक नर्मदा स्नानासाठी आलेले होते . लहान मुले , बालके , तरुण-तरुणी आणि म्हातारे सर्व प्रकारचे लोक होते . सोनीने मला बसण्यासाठी आसन दिले आणि माझ्याशी बोलू लागला . मगाशी जेव्हा मी इथे स्नान करण्यासाठी आलो होतो तेव्हा हा सोनी काठावरती अनुष्ठान करत बसला होता . त्याचे डोळे मिटलेले होते . मी पाण्यामध्ये तीन डुबक्या मारून जेव्हा बाहेर आलो त्या नेमके त्याच क्षणी ह्याने डोळे उघडले . आणि त्याला असा भास झाला की साक्षात शंकर नर्मदेतून बाहेर येत आहे . सोनी सांगत होता आणि मी ऐकत होतो . त्या क्षणी सोनीने नमस्कार करण्याकरीता हात जोडले , डोळे मिटले आणि मनात संकल्प सोडला , की आता मी नैवेद्य दाखविन तो यांना खायला घालून मगच स्वतः खाईन . डोळे उघडून बघतोय तोपर्यंत मी गायब झालेलो !  प्रत्यक्षात मी मगाशी सांगितले तसे वेगाने त्या स्त्री पुरुषांच्या गर्दीतून बाहेर गेलो आणि लांब जाऊन अंग पुसले . शिवाय तिथे अवधूतने पकडून मला पुन्हा नर्मदे काठी नेले आणि व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली .. इकडे हा सोनी मला सैरभैर होऊन शोधू लागला . त्याला फार वाईट वाटले . म्हणून त्याने सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण भोजन प्रसाद खाऊन घ्या . मी काही आज जेवणार नाही . त्याप्रमाणे सर्वजण जेऊन तिथे निवांत पडलेले होते . हा सोनी बिचारा एकटाच उपाशी राहिला होता . इतक्यात पुन्हा मलाच येताना पाहून त्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या ! त्याने केलेल्या या संकल्पा मुळे नर्मदा मैय्याने तिकडे मला शिल्लक असूनही भोजन प्रसाद दिला नाही ! त्या उपासाचे कोडे आता मला उलगडले . सोनी मला म्हणू लागला , " तुम्ही आज मला भेटला नसता , तर मी उपाशी परत गेलो असतो . तरी कृपया माझ्या हातचे दोनच घास खा ! " मी त्याला सांगितले , " दोन घास नाही ! चांगले पोटभर खाऊ घाल ! खूप भूक लागली आहे ! " मी हे वाक्य बोलतात त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही ! त्याने लगेचच झोपलेल्या सर्वांना जागे केले आणि सर्वांना कामाला लावले ! पटापट गोवऱ्या पेटवून त्यामध्ये त्याने फक्कड असा  गक्कड भरता बनवला ! एका बाजूला चूल पेटवून त्यावर सुंदर अशी खिचडी बनवली ! भरपूर तूप घालून रसायन विरहित काळ्या गुळाचा चुरमा तयार केला ! हे सर्व करताना त्याच्या माझ्याशी अखंड गप्पा चालू होत्या . त्याच्याबरोबरच्या मुलांची माझी चांगली गट्टी जमली . त्या सर्वांना चार चांगल्या गोष्टी सांगत नैवेद्य होण्याची वाट पाहत बसलो . सर्व स्वयंपाक सिद्ध झाल्यावर सोनीने खरोखरच मला समोर बसवून देवाला दाखवतात तसा नैवेद्य दाखवला . आणि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा म्हणत एक एक घास मला भरवला . मला भरवला असे तरी मी का म्हणावे ? कोणाला भरविला हे आपण मंत्रामध्ये सांगतोच आहे ! प्राणाय स्वाहा ! तुझ्या मध्ये असलेल्या प्राणशक्तीला हा घास अर्पण ! प्रेताला कोणीही घास अर्पण करत नाही . कणकेचा गोळा तेवढा तोंडावर दाबून ठेवतात . परंतु तिथे प्राणाय स्वाहा असा मंत्र येत नाही . आपल्या शरीरामध्ये असलेले पंचप्राण हीच आपण त्या परमेश्वराचा अंश असल्याची महत्त्वाची खूण आहे ! सोनीचे डोळे पाणावले . मी माझ्या ताटातला पहिला घास कालवला आणि सोनीला भरवला ! दोघांनी अतिशय प्रेमपूर्वक आणि पोटभर जेवण केले ! सोनी चांगला खवय्या होता ! त्याचे वजन १०० किलोच्या आसपास असावे . वयाने मोठा असला तरी बालसुलभ स्वभाव असल्यामुळे आणि देवाच्या भक्तीमुळे गुटगुटीत बालकासारखा दिसायचा ! दोघेही भुकेने कडकडलो होतो . आणि दोघांची नर्मदा मातेने परीक्षा पाहिली होती ! त्यामुळे दोघेही तिचा जयजयकार करत प्रत्येक घासाचा आस्वाद घेत होतो ! त्या दिवशीचा भोजन प्रसाद अविस्मरणीय असाच होता ! भोजन प्रसाद झाल्यावर त्याने मला अजून एक विनंती केली . सागर मध्ये एक मोठे साईबाबांचे मंदिर बांधावे अशी त्याची इच्छा होती . त्याने खूप वेळा प्रयत्न केला परंतु त्याला यश येत नव्हते . तो म्हणाला  आज तुम्ही माझ्या वतीने संकल्प सोडा . तुमच्या संकल्पाला नर्मदा मैया लवकर यश देईल . त्याने सर्व पूजेचे साहित्य मला आणून दिले . आपल्याकडे या सर्व उपचार पूर्वक केलेल्या पूजेचा आपल्या अंतर्मनामध्ये खोल परिणाम होत असतो . नुसते "आज पासून तू माझी बायको " असे म्हणून केलेले लग्न आणि हजारो लोकांच्या समोर विधीपूर्वक केलेले लग्न यातील पहिल्या प्रकारचे लग्न मोडण्याची शक्यता अधिक असते . कारण त्यात फारसे कोणी साक्षीला नसते . याउलट हजारो लोक साक्षीला असताना आणि मोठे विधी विधान करून केलेला संकल्प अंतर्मनामध्ये अधिक खोल उतरतो , हे स्वाभाविक आहे . त्यामुळे त्याच्या इच्छे खातर मी थोडीफार नर्मदा मातेची पूजा करून त्याच्या वतीने संकल्प सोडला , " हे नर्मदा माते , मी तुझ्या परिक्रमेला निघालेलो असताना ,सूर्यकुंडावर मला हा सोनी नावाचा मनुष्य भेटलेला आहे . हा साई भक्त आहे आणि याला साईबाबांचे मंदिर उभे करायचे आहे अशी त्याची इच्छा त्यानी व्यक्त केलेली आहे . तरी तुला योग्य वाटेल ते कार्य याच्या हातून तू करून घेशील याबाबत मला काहीही शंका नाही . याच्या इच्छे खातर त्याचे मंदिर पूर्ण व्हावे असा संकल्प तुझ्या साक्षीने मी सोडत आहे . त्याला इच्छा देणारी देखील तूच आहेस आणि संकल्प सोडणारी देखील तूच आहेस . संकल्प पूर्णत्वाला नेणारी देखील तूच आहेस .   जे योग्य असेल ते , योग्य ठिकाणी ,सुयोग्य वेळी , योग्य व्यक्तीच्या हातून , योग्य प्रकारे घडो . नर्मदे हर ! "  सोनीला खूप आनंद झाला !  हे सर्व करेपर्यंत सूर्य मावळायला सुरुवात झाली होती . आता मी निघतो असे म्हणून सामान उचलू लागलो .त्याने निघताना माझ्यासोबत एक फोटो काढून घेतला . आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . 
सागर येथील साई भक्त श्री सोनी (सपत्निक ) आणि प्रस्तुत लेखक
निघता निघता मी त्यांना गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थी माणसाने कसे असावे याबाबत सदाशिव नित्यानंद गिरी स्वामींनी मला दिलेले हिंदी पुस्तक भेट म्हणून दिले .माझे ते सकाळीच वाचून झाले होते .
इथून पुढे पुन्हा खडकाळ नर्मदा होती .उजव्या हाताला मोठे बेट दिसत होते . त्या बेटावर प्रचंड वाळू साठलेली आहे . बेटाच्या मधोमध महादेवाचे मंदिर आणि हनुमंताची अतिभव्य मूर्ती आहे . 
बर्मन घाट बेटावरील हनुमान मूर्ती आणि मंदिर .या मंदिराच्या सोनेरी कळसाचे प्रतिबिंब नर्मदा जला मध्ये खूप सुंदर दिसते !
इथे लावलेली नमामि मात नर्मदे ही अक्षरे रात्री दुरून खूप सुंदर दिसतात .
मंदिर नर्मदा पात्राच्या मधोमध असल्यामुळे परिक्रमा वासीना येथे जाण्यास परवानगी नाही .संग्रहित छायाचित्र
बर्मन घाटावर पोहोचेपर्यंत अंधारून आले . इथे खाली बारा महिने मोठा मिळाला लागलेला असतो . त्यातील दुकानांचे तंबू , कचरा , गोंधळ पहात पुढे चालत होतो . निसर्ग प्रत्येक गोष्टीची स्वच्छता आपण होऊन ठेवत असतो . आणि मनुष्यप्राणी जिथे शक्य होईल तिथे अधिकाधिक कचरा करत असतो . नर्मदे काठी ही दोन्ही टोके अनेक वेळा बघायला मिळतात . माणसाला एवढे सुद्धा कसे काय कळत नाही की ज्या नदीला आपण पवित्र माता मानतो आहोत तिच्या काठावर आपण घाण करू नये ?  वाईट वाटते .असो . इथे स्वामी राम लखन दास महाराज प्रेरित शारदा मंदिर नावाची संस्कृत पाठशाळा आहे . ३० विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत आहेत .  चार आचार्य आहेत . एक प्रमुख आचार्य आहेत . डावीकडे एका उंच दगडी बांधकामावर पाठशाळा आहे . वरून मुख्य आचार्यांनी मला जोरात आवाज दिला ,"नर्मदे हर ! महाराज पधारीये । उपर आईये । " मी मोठ्या मोठ्या २५ -३० पायऱ्या एकाच दमात चढत आश्रम गाठला . परिक्रमेमध्ये अशा पायऱ्या आल्या की मला काय व्हायचे काय माहिती ! लहान मुले जशी पळत सुटतात तसे मी पळत चढायचो आणि पळत उतरायचो ! कदाचित हे केल्यामुळे पायाचे रक्ताभिसरण अचानक वाढून पायांना खूप आराम मिळायचा . त्यामुळे असेल .पण मजा यायची ! वरती आचार्यांसोबत अजून दोन मुले माझी वाट पाहत उभी होती . त्यांनी मला अगदी व्यवस्थित हात पाय धुण्याची जागा दाखवली तसेच आत मध्ये कुठे आसन लावायचे ते देखील दाखवले . आतापर्यंत आलेल्या अनुभवांपैकी हा एक वेगळा आणि सुखद अनुभव होता . कुणीतरी प्रत्येक ठिकाणी तुमच्या सोबत येत आहे आणि तुम्हाला मदत करत आहे ही भावना फार सुखावह असू शकते . विशेषतः कित्येक किलोमीटर तंगडतोड केल्यानंतर ! आत मध्ये एक मोठी धर्मशाळा होती . लांबच लांब अशा त्या खोलीमध्ये माझ्या आधीच पंधरा-वीस परिक्रमावासी येऊन बसलेले होते . 
आज मी थांबलो आहे तो बर्मान खुर्द अथवा छोटा बरमान घाट  होता . आपल्या महाराष्ट्रामध्ये गावांची नावे खालील प्रमाणे असतात . मुख्य गावाला बुद्रुक म्हणले जाते . त्याच गावाच्या एखाद्या छोट्याशा वस्तीला खुर्द म्हटले जाते . हे फारसी भाषेतून मराठी मध्ये आलेले शब्द आहेत . खुर्द म्हणजे खुर्दा
. अर्थात छोटासा तुकडा . मध्य प्रदेशामध्ये मुख्य गावाला खास म्हणतात . छोट्या गावाला खुर्द . किंवा कला म्हणतात . आपल्याकडे वाडी म्हणतात तशा अर्थी इकडे टोला हा शब्द वापरतात . 
हा आश्रम सांभाळणारे महाराज गुजराती होते . ते अगदी आसाराम बापूंसारखे दिसायचे . हे मी त्यांना सांगितल्यावर त्यांनी सांगितले की हे वाक्य त्यांना भेटणारा प्रत्येक मनुष्य त्यांना सांगतो ! गुजराती होते . पटेल बाबा असे त्यांचे नाव होते . पटेल म्हणजे जातीने क्षत्रिय असून संस्कृत पाठशाळा चालवत होते ,याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी . आज-काल संस्कृत या भाषेला एका विशिष्ट जातीशी बांधण्याचा वाईट खटाटोप काही लोक करत आहेत . असो . इथे राहणाऱ्या मुलांपैकी दोन मुले आळीपाळीने त्यांच्या मदतीसाठी थांबायची . मी बाबांची परवानगी घेऊन मुलांसोबत आत मध्ये जाऊन संपूर्ण पाठशाळा पाहिली . इथे सर्व जातीतील मुले राहून संस्कृत भाषेचे अध्ययन करत होती . सर्वच मुले गुण्यागोविंदाने राहत होती . पाठशाळेमध्ये अतिशय सुंदर अशी मंदिरे होती त्यांची पूजा अर्चा देखील विद्यार्थी करायचे . या मुलांशी मी बराच वेळ गप्पा मारल्या . त्यांच्या शंकांना उत्तरे दिली . माझे तोडके मोडके संस्कृत ज्ञान ,नानाविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून तपासून घेतले .आश्रमातील वातावरण अतिशय पवित्र होते . चातुर्मास करण्यासाठी हे एक अत्यंत आदर्श ठिकाण आहे .  रात्री पटेल बाबांनी सर्वांना आग्रह करून करून पोटभर जेवायला वाढले . यांनी एक परिक्रमा केलेली होती त्यामुळे परिक्रमावासींच्या जीवनाबद्दल यांना कल्पना होती . अतिशय प्रेमाने आदबीने प्रत्येकाची विचारपूस ते जागेवर जाऊन करत होते . त्यांचे व्यक्तिमत्व वरवर पाहताना अतिशय कठोर शिस्तीचे वाटत असले तरी प्रत्यक्षामध्ये ते अतिशय प्रेमळ आणि मवाळ मनुष्य होते . दर पाच मिनिटांनी ते घाटाच्या बाजूला जाऊन कोणी नवीन परिक्रमावासी येतो आहे का याचा अंदाज घ्यायचे .कोणी दिसलाच की ती दोन्ही मुले देखील त्यांच्या मदतीला जायची . आणि तिघेही आरडाओरडा करून हात वारे करून त्याचे लक्ष वेधून घ्यायचे आणि परिक्रमा वासीला वर बोलवायचे . इथून समोर नर्मदा मातेचे फार सुंदर दर्शन होते .रात्री तर हा परिसर फारच सुंदर झगमगाटाने नटलेला असतो . पहाटे लवकर उठून स्नान पूजा वगैरे आटोपून मी पुढे मार्गस्थ झालो . इथे बाहेर पडल्या पडल्या एक पूल आहे .पूल अतिशय अरुंद आहे .व याच्या आजूबाजूला सर्वत्र सतत मेळा लागलेला असतो .वर्षभर मेळा लावणाऱ्या या लोकांनी इथे जणू मुक्कामच ठोकलेला असतो . त्या लोकांनी इथून पुढचा अर्धा एक किलोमीटरचा सुंदर वालुकामय किनारा पुरता हागणदारी करून टाकलेला आहे . इथून चालताना अखंड नाक झाकावे लागत होते .खाली पाहिल्याशिवाय एकही पाऊल टाकता येणार नाही अशी परिस्थिती होती . हे सर्व व्यापारी लोक होते . यांना नर्मदेशी काहीही देणे घेणे नव्हते . पिढ्या न पिढ्या यांनी फक्त आणि फक्त व्यापारच केलेला आहे . परंतु ते पाहून फार वाईट वाटले . कोणी प्रशासकीय अधिकारी हा ब्लॉग वाचत असतील तर त्यांनी कृपया या भागामध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहे उभी करण्यासाठी आणि ती अनिवार्य करण्यासाठी काहीतरी कार्य करावे . मी संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जाणवलेल्या गोष्टींबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र परिक्रमा झाल्या झाल्या लिहिलेले आहेच . असो . इथून पुढे पुन्हा एकदा काठाने जाण्याचे मी ठरविले . पटेल बाबांनी काठाने जाऊ नको असे सांगितले होते तरी मी तो मार्ग निवडला . तो मार्ग इतका भयंकर होता की कल्पना देखील करता येणार नाही ! परंतु त्या भागा इतकी मजा देखील अन्यत्र कुठे क्वचित आली ! आता पुन्हा मला त्या मार्गाने जाल का असं म्हणून कोणी विचारले तर कदाचित मी नाही असे उत्तर देईन ! या सर्वच परिसराची आपल्याला कल्पना यावी म्हणून काही संग्रहित चित्रे खाली जोडत आहे .
याच शारदा मंदिराच्या पायऱ्या आहेत . आणि डावीकडे दिसणाऱ्या लोखंडी सज्जा पाशी उभे राहून पटेल बाबांनी मला आवाज दिला होता . 
समोरच्या बेटावरील नमामि देवी नर्मदे अक्षरे खूप सुंदर दिसतात . 
समोर दिसणारा मोठा ब्रह्मन् / बर्मान घाट . इथे पाणी किती खोल आहे याचा तुम्हाला अंदाज यावा म्हणून हे चित्र टाकले आहे ! जिथे जिथे वाळू असते तिथे तिथे नर्मदेच्या खोली विषयीचे तुमचे अनुमान फसतेच !
छोट्या बरमान घाटावर वर्षभर लागलेला मेळा

बर्मन घाटाला जोडणारा छोटासा पूल . आता आपण एक काम करूया . या पुलावर उभे राहून उजव्या हाताने घटीवत अर्थात क्लॉकवाईज गोल गोल फिरत या परिसराचे अवलोकन करूया . 
पुलावरून दिसणारी नर्मदा माता आणि समोर मोठा ब्रह्मन् / बरमान घाट . 
अजून थोडेसे उजवीकडे वळल्यावर आपल्याला मधले बेट दिसते आहे आणि अलीकडच्या छोट्या घाटावरील दुकाने दिसत आहेत . या बेटावर समोरच्या तटावरून नावेने जाता येते आणि अलीकडच्या तटावरून पाण्यातून चालत जाता येते . परंतु पर्यटकांना गुडघाभर पाणी असले तरी नावेतूनच नेले जाते . आणि पाणी फार खोल असल्याची बतावणी केली जाते ! 

आता आपल्याला आधी बेट , त्यानंतर सूर्यकुंडाकडून येणारी नर्मदेची शाखा दिसते आहे . आणि त्यानंतर या घाटावर लागलेली दुकाने दिसत आहेत . मागे पांढऱ्या रंगाचे मंदिर दिसते आहे तोच आपला शारदा आश्रम आहे .
आता समोर आश्रमाचा भव्य परिसर आणि दुकानांची गर्दी तसेच हा छोटासा पूल पुन्हा एकदा दिसतो आहे . त्याशिवाय ज्या तरुणांनी ड्रोन वरून हे सर्व चित्रीकरण केले आहे त्यांच गाडी देखील दिसते आहे .

अजून उजवीकडे वळल्यावर आपल्याला परिक्रमेचा पुढचा मार्ग दिसायला सुरुवात होते . सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया वयोवृद्ध परिक्रमावासिनी या मार्गाने जाण्याचे साहस करू नये . ज्यांना खरोखरीच काहीतरी मोठे साहसी कृत्य करण्याची आवड आहे अशा तरुणांनीच या मार्गाने जाऊन पहावे . इथे दिसणारा वाळूचा संपूर्ण किनारा घाणे घाण करून टाकण्यात आलेला आहे . 
इथून पुढे नर्मदा इतकी सुंदर दिसते . काठावर लोकांनी केलेली घाण आणि प्रदूषण स्पष्टपणे दिसते आहे . पुढे नर्मदा एक वळण घेते जिथे मी वर्णन केलेला खतरनाक टापू मला लागला .
मुद्दाम थोडेसे झूम करून तुम्हाला जंगलाचा तो टापू मी दाखवितो आहे जिथून किनाऱ्याने चालताना खूप धोकादायक मार्ग होता . किंवा सरळ असे म्हणा की तो मार्गच नव्हता ! 
हाच तो लाल रंगाने दाखविलेला काठाकाठाचा मार्ग आहे जो माझ्या कायमचा स्मरणात राहिला . अर्थात नर्मदे काठी असे मार्ग पुढे अनेक ठिकाणी मिळाले . परंतु हा पहिलाच असल्यामुळे लक्षात राहिला .
आत्ता गुगल नकाशा मध्ये पाहिल्यावर मला लक्षात आले की वरून खूप चांगला परिक्रमा मार्ग होता परंतु काठाने जाण्याच्या हट्टाहासामुळे मला नर्मदा मातेने खूप सुंदर अशी तिची रूपे मात्र निश्चितपणे दाखविली ! डाव्या हाताला झाडीच्या वर जी पांढरी रेषा दिसते आहे तो परिक्रमा मार्ग आहे परंतु मी मात्र खालून पाण्याच्या पातळीवरून चालत गेलो . हा एक अतिशय थरारक अनुभव होता . 
पटेल बाबांनी इथून रस्ता नाही आहे असे मला सांगितले होते . परंतु तिथे उभे राहून मी नेहमीप्रमाणे मैय्याला विचारले की रस्ता आहे का ? आणि मला असे वाटले की मैया हो म्हणते आहे ! म्हणून मी पुढे चालायला सुरुवात केली . इथून पुढे पाच किलोमीटर मैया अशा काही गतीने वाहते की डाव्या बाजूचा पूर्ण तट तिने कापून टाकला आहे . तो देखील उभा ! ५० ते १०० फुटाचे गाळाचे तट कापून समोरच्या तटावर मैया वाळू साठवीत वाहते .सर्वत्र असेच आहे . उजवीकडे वळताना मैय्या डावी बाजू कापते व डावीकडे वळताना उजवा तट चिरते . जिथे वळते त्या बाजूला उथळ वाळूचा भव्य किनारा तयार होतो . वर्षानुवर्षे मैया प्रवाह बदलत अशा तऱ्हेने वाहत आहे . इथे मात्र सलग पाच किलोमीटरचा तट तिने कापला होता . तिथून कोणीच जात नाही .काही जागा तर इतक्या दुर्गम होत्या की कुत्री देखील परत फिरल्याचे ठसे तिथे दिसत होते ! मध्ये मध्ये येऊन मिळालेले ओढे नाले यांनी अतिशय भयानक खोल दऱ्या तयार केल्या होत्या . अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये माणसांनी तिथे जाऊन परत उलटे फिरल्याचे बुटाचे ठसे दिसत होते . परंतु मैया सांगत होती , की चालत राहा चालत राहा ! आपल्या अंतर्यामी परमेश्वर स्फूर्ती रूपाने वास करत असतो . एका विशिष्ट तरल भावावस्थे मध्ये गेल्यावर आपल्याला ते संदेश स्पष्ट ऐकू येऊ लागतात .तसे काहीसे परिक्रमेमध्ये होते . शेवटी उभा कडा लागला . पात्राच्या कडेने चालू लागलो . तुफान चिखल ! बूट मोजे चिखलाने माखले ! पाय सटासट सटकू लागले . पण मी निर्धाराने चालत राहिलो . डावीकडील कडे सटकून वर जंगल होते त्या जंगलातील मोठमोठ्या झाडांची मुळे खाली लटकत होती . ती धरत धरत तर कधी गवताच्या काड्यांचा आधार घेत त्या जवळपास ९० अंशाच्या काटकोनाच्या मातीच्या कड्यावरून चालत राहिलो . संपूर्ण भार मागे पाठीकडे जात होता कारण पाठीवर मोठी झोळी होती . हाताने आधार घेतलेले गवत कधी कधी मुळापासून निघून येऊ लागायचे इतक्यात पुढचे काहीतरी सापडायचे . हे पुढचे वेळेवर सापडते आहे याचाच अर्थ जाण्या योग्य मार्ग आहे असे नर्मदेला म्हणायचे होते ! झोळीचा जरा जरी धक्का कुठल्या झाडाला लागला असता तरी मी पूर्णपणे खाली नर्मदेमध्ये पडलो असतो इतक्या नाजूक अवस्थेमध्ये वाटचाल सुरू होती . मुखाने अखंड नर्मदेचा गुजर चालू होता . दोन्ही पाय सतत खूप काळ तिरके तिरके   टाकल्यामुळे मैयाच्या बाजूने बूट माझ्या देहाचा पडून फाटून गेले होते . म्हणजे उजव्या पायातला बूट करंगळीच्या बाजूला फाटला होता तर डाव्या पायातला बूट अंगठ्याच्या बाजूला फाटला होता . समोर , आजूबाजूला , पात्रामध्ये , मागे , पुढे कोणीही नाही ! निर्मनुष्य ! फक्त कानावर नर्मदेचा आवाज पडतो आहे ! अशा स्वरूपामध्ये नर्मदेचे दर्शन करण्यासाठीच परिक्रमा केली पाहिजे ! अखेर परीक्षा पाहणारा तो टापू संपला व एक छोटासा घाट लागला . घाटाचे नाव तरी काय असावे ! बढीया घाट ! वा मैया बहोत बढीया ! असे म्हणून मी धावतच घाट चढलो ! गावातील काही तरुण अंघोळीसाठी खाली येत होते . ते बराच वेळ वरती एका पारावर गप्पा मारत बसले होते . त्यामुळे त्यांना मी कुठून आलो तेच कळेना ! त्यांनी मला अडवून विचारले की तुम्ही कुठून आलात ?मी जेव्हा सांगितले की मी नर्मदा मातेच्या किनाऱ्याने आलो तेव्हा त्यांना ते काही केल्या पटेना ! ते म्हणाले की कसे शक्य आहे ! तिथून तर येण्यासारखा मार्गच नाही ! परंतु मी आलो होतो हे खरे . आणि माझी एकंदर झालेली अवस्था बघता मी तिथूनच आलेलो आहे हे यांना देखील कळत होते . ऐन थंडीमध्ये मी घामाघुम झालो होतो आणि पाय नडगी पर्यंत चिखलाने बरबटलेले होते . इथून पुढे मात्र काठावरील मार्गच नसल्यामुळे गावातून पुढे जाऊन जंगल मार्ग धरला . मैया दिसत होती . वाटेत चालताना आगे कोनसा गाव आहे असे विचारत जायचो . एका इरसाल म्हाताऱ्याने , "आगे लांडिया गाव है । " असे मला सांगितले .
हे त्याच भागातील जंगल आहे
खूप चालल्यावर त्या गावात आलो . गावाचे नाव आंडिया असे होते . संपूर्णपणे यवन वस्ती असलेले गाव होते . तिथे कोणीही तुम्हाला नर्मदे हर म्हणत नाही . भविष्यातील भारताची ती एक छोटीशी झलक होती . सर्वत्र घाणीचे साम्राज्य होते .भयंकर दुर्गंधी पसरली होती आणि त्यात उघडी गटारे जी कुठेही आडवी- तिडवी रस्त्यावरून वाहत होती , त्यांची भर पडत होती . आधीच्या कुठल्याही आदिवासी गावात असे चित्र कधीच नव्हते . मघाशी सांगितलेल्या मार्गावरून चालताना माझी छाटी फाटली होती . इथे या गावामध्ये एका वळणावर शिंप्याचे घर आहे , त्याने हे दृश्य पाहिले . त्याने मला अंगणामध्ये उन्हामध्ये बसवून मस्तपैकी त्या धोतराला टाके मारून दिले . तोपर्यंत मला गरम गरम चहा देखील पाजला . त्याला पैसे देऊ केले असता त्याने घेतले नाहीत . आता पुढे सुंदर अशा नर्मदा किनाऱ्याने चालताना लिंगा घाट लागला . इथे भोजन प्रसाद घेऊन पुढे जा असे एका साधूने विनविल्यामुळे तिथे थांबलो . इथे मला काही अवली परिक्रमावासी भेटले जी पुढे बऱ्याचदा भेटत राहिले ! 



लेखांक अठ्ठेचाळीस समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर