लेखांक ४७ : पिपरहाच्या यतींसोबत साजरी केलेली नर्मदा जयंती अन् आगे शेर है !

महादेव पिपरिया सोडल्यावर लांबच लांब वाळूचा किनारा लागला . त्यामुळे आज पायाखाली इतकी वाळू होती की चालताना दमछाक होत होती . पाणी सर्वत्र उथळ आणि पात्र अति रुंद होते . इथे काही ठिकाणी नर्मदेमध्ये वाळू उपसणारी मोठी मोठी यंत्रे लावलेली दिसतात . यांच्यामुळे नर्मदेच्या पात्राचा आकार काही काळ बदलून जातो .
या चित्रांमध्ये आतपर्यंत घुसलेले जे दिसते आहे ते वाळू उपसण्याचे यंत्र आहे .नर्मदेच्या पात्रात खोलवर जाऊन तिथली वाळू हे बाहेर काढते . नंतर जेसीबी वगैरेच्या साहाय्याने ही वाळू ट्रॅक्टर आणि हायवा मध्ये भरली जाते .
काही परिक्रमावासींचे असे मानणे आहे की नर्मदे काठी किती जरी वाळू असली तरी त्या खालून नर्मदेचा प्रवाह वाहत असतो त्यामुळे वाळू वरती पाऊल ठेवू नये . परंतु अशा पद्धतीने जर वाळू सोडून चालायचे ठरवले तर कधी कधी नर्मदा दीड दोन किलोमीटर दूर जाते . त्यामुळे वाळूचा किनारा आला रे आला की मी कितीही कष्ट होऊ देत परंतु नर्मदा जिथे सुरू होते त्या वाळूच्या किनाऱ्यावरून चालत असे . ही वाळू सकाळी फारच गार पडलेली असते आणि दुपारी फारच तापलेली असते . दोन्ही वेळा तिचा स्पर्श पायाला त्रासदायक असतो . तसेच ती प्रत्येक पावलाला तुमच्या शरीरातली निम्मी ऊर्जा काढून घेत असते . परंतु तरीदेखील आपला दंड नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये बुडत असतो त्यामुळे हे सर्व त्रास फारसे जाणवत नाहीत . कधी कधी असे किनारे वळणावळणाचे असतात त्यामुळे चालणे थोडेसे वाढते . वाढेना चालणे ! आपण थोडी इथे धावण्याची स्पर्धा करायला आलेलो आहोत ! आपण नर्मदा मातेचा अधिकाधिक सहवास घ्यायला आलेले आहोत . याच कारणासाठी सोबत कोणी साथीदार घेऊ नये . कारण तुमचा विचार त्याला किंवा तिला पटेलच असे नाही . एकटा जीव सदाशिव ! 
आणि 
एक निरंजन ! दो सुखी । तीन मे खटपट । चार दुखी ।
ही दोन सूत्रे नेहमी हृदयाशी बाळगावीत !
पायाखाली किती वाळू होती हे कळावे म्हणून आजच्या चालण्याचा नकाशा सोबत जोडतो .
यातील उजव्या हाताचे करंबेश्वर महादेव मंदिर म्हणजेच जबरेश्वर महादेव मंदिर . इथून ते गोकला गावापूर्वीच्या चिनकी घाटापर्यंत नर्मदा एका सरळ रेषेत वाहते त्यामुळे येथे वाळूच वाळू साठलेली आहे . हा संपूर्ण टापू प्रचंड वाळूचा आहे .हे अंतर किमान १५ किलोमीटर तरी आहे . पुढे वळणाजवळ छोटी धुवाधार नावाचा धबधबा असल्यामुळे तेथील पहाड वाळूला अडवतात . आणि एक नैसर्गिक धरण तयार होते .
चालता चालता वाटेमध्ये एके ठिकाणी गुऱ्हाळासाठी  उसाचा रस काढणारे यंत्र दिसले . शेतातच यंत्र लावले होते . त्याने आवाज देऊन रस प्यायला बोलावले . कमंडलू ने कंटाळा येईपर्यंत उसाचा रस प्यायलो ! इथून डाव्या हाताला गरारू गाव होते . थोडे अंतर चालल्यावर छोटासा गरारू घाट लागला . इथे अतिशय प्राचीन किल्ले वजा दोन मंदिरे आहेत . यांना मंदिर म्हणणे धाडसाचे ठरेल इतकी ती भव्य दिव्य आहेत ! यातील एक मंदिर शिवाचे आहे आणि एक मंदिर गरुडाचे आहे . मी आधी गरुडाचे मंदिर पाहिले कारण ते दूर आणि टेकडावर होते . परत येताना शिव मंदिर देखील पाहिले . 
 धुके पसरले आहे ती नर्मदा आहे . गरुड मंदिरातून शिव मंदिर व पलीकडे दिसणारी नर्मदा माई . 
 छोटासा गरारू घाट
 गरुड मंदिर 
 गरुड मंदिरावरून दिसणारे शिवमंदीर आणि नर्मदा मैया
 गरुड मंदिराचा असमान घुमट
हे सर्व बांधकाम पर्शियन शैलीचे होते .त्यामुळे एखाद्या मशिदीचे या मंदिरामध्ये रूपांतर केलेले आहे असे मला फार वाटले .दोन्ही मंदिरे थोड्याफार फरकाने अशीच होती .
 गरुड मंदिराची अभेद्य तटबंदी
 गरुड मंदिरातून दिसणारी नर्मदा माई . हे मंदिर कमी आणि टेहळणी मनोरा अधिक वाटते . .
पुढे मला या दिशेला जायचे आहे .
 शिव मंदिराच्या पायऱ्या
 शिव मंदिरातून दिसणारे गरुड मंदिर
 शिवमंदीर
 बम भोले !
 अजून एक शिवपिंडी
 या परिसरातील १००० वर्षे जुना महा वृक्ष
इथून पुढे काठाने जाताना काही काळ हिरवीगार शेती लागली .
परंतु लवकरच खोल नर्मदा जला पर्यंत पोहोचणारी काटेरी आडवी कुंपणे मार्ग अडवू लागली . अशी कुंपणे आली की मी शक्य असल्यास उडी मारून जात असे . अन्यथा त्यातील एखाद्या नाजूक भागावर आडवे लाकूड ठेवून त्यावर पाय रोवून पुढे जात असे . बरेचदा हे करताना किरकोळ जखमा होत . परंतु त्या चालता चालता बऱ्या  होऊन जात .
काही कुंपणे तर थेट मैया च्या पाण्यामध्ये शिरलेली असत . अशावेळी शांतपणे निरीक्षण केल्यावर एखादा कच्चा दुवा सापडायचा . जागा मालकाने स्वतःला ये जा करण्यासाठी एखादी छोटीशी जागा ठेवलेली असायची जी उचलून बाजूला करता यायची .एकंदरीतच ही कुंपणे परिक्रमेचा काठावरील मार्ग बंद पाडण्यास एक महत्त्वाचे कारण ठरलेली आहेत . 
चालता चालता दुपार झाली . पात्रातून डावीकडे बघितले तर एका टेकाडावर आश्रम आहे असे लक्षात आले . इथे गेल्यावर वातावरण खूपच पवित्र वाटले . इथे एक मोठी यज्ञशाळा लाकडापासून तयार केलेली होती . 
राधारमणदास साधूचा आश्रम आणि यज्ञशाळा
येथे पूर्वी एखादे भव्य मंदिर असावे असे सुचविणारे अवशेष तिथे सर्वत्र विखुरलेले दिसत होते .
एक तरुण साधू पंचाग्नी साधना करीत बसला होता . साधू जीवनामध्ये अतिशय कठीण मानली जाणारी अशी ही साधना आहे . या साधनेमध्ये बारा वर्षे साधूला भर दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर दोन तास स्वतःच्या चहू बाजूने अग्नि प्रज्वलित करून मध्ये तप करत बसावे लागते . वरून सूर्य आग ओकत आहे , आणि चहूबाजूनी अग्नीच्या झळा लागत आहेत अशी ही भयंकर कठोर साधना आहे . 
पंचाग्नी साधना करणारा साधू
कुंभमेळ्यामध्ये पंचाग्नी साधनेला बसलेले साधू .
त्यातील काही साधू तर डोक्यावर देखील निखारा ठेवतात .
भगवत् गीतेतील शीतोष्ण सुख दुःखेषु कूटस्थमचलं धृवं या वाक्याचे शब्दशः जगणे म्हणजे ही साधना !
समर्थ रामदास स्वामींनी हीच साधना थंडगार पाण्यामध्ये तासंतास उभे राहून केली होती .
नर्मदे काठी पंच अग्नी साधना करणारे अनेक साधू मला दिसले . त्या सर्वांना मी मनोभावे साष्टांग नमस्कार करत असे . 
तप या शब्दाचा शब्दशः अर्थ तापणे असा आहे . हे खरोखरीच मोठे तप आहे . त्याने खुणेनेच मला स्वतः स्वयंपाक करून खाण्याची सूचना केली . आश्रम खूप सुंदर होता . इथे एका झाडाच्या पारावर रेवा राम नावाचा आगाऊ म्हातारा बसला होता . 
 रेवाराम बसला होता तो पार आणि मागे स्वयंपाक घर
प्रत्येक गोष्टीची चेष्टा करण्याची त्याला सवय होती . परंतु त्याचा स्वभाव मनमोकळा असल्यामुळे आमची गट्टी जमली . त्याचे वय ८० ते ९० च्या दरम्यान असावे . तो गंमत कशी करायचा काही उदाहरणे सांगतो . तो मला म्हणाला की मी असा विचार केला की चला या साधूला खिचडी करून खाऊ घालू . तर हा बाबा आग पेटवून बसला आहे ! आता मी याला तर खाऊ शकत नाही ! कारण आग पुरेशी लांब आहे ! मग मी विचार केला की कोणीतरी परिक्रमा वासी येऊन आपल्याला खायला घालेल ! 
मी त्याला म्हणालो हरकत नाही मी आपल्यासाठी खिचडी बनवतो ! तो म्हणाला , " नाही नाही ! मी गंमत केली " परंतु तरीदेखील मी दोघांच्या नावाची खिचडी बनवली .
झाडाखाली बसून दोघांनी खिचडी खाल्ली . इतक्यात साधू उठले . ते मौनामध्ये होते . त्यांनी एका यज्ञाचे आयोजन केले होते त्याची आमंत्रणे द्यायला ते निघाले होते , असे मला खुणांनी सांगून ते निघून गेले . मी दुरूनच त्यांना मनोमन साष्टांग नमस्कार केला .या सिद्ध साधूंचे नाव राधारमणदास असे होते . जाताना आज मुक्काम कर असे खाणाखुणांनी मला आवर्जून सांगून गेले . रेवा राम देखील त्यांच्या खाणाखुणा अनुवादित करून मला सांगत होता . परंतु अजून अर्धा दिवस बाकी होता त्यामुळे पुढे जाण्याचा निर्णय मी घेतला . रेवा राम फुल गप्पाडदास होता . एखादा स्टॅन्ड अप कॉमेडियन होण्यासाठी लागणारे सर्व गुण त्याच्या ठायी होते . विशेषतः चेहऱ्यावरची एक रेषही न हलू देतात तो ज्या शिताफीने विनोद करायचा ते पाहून हसून हसून माझी पुरेवाट झाली ! उदाहरणार्थ त्याने मला विचारले तुला डुकरीया म्हणजे काय माहिती आहे का ? मी म्हणालो हो !  डुकराची मादी ! तो म्हणाला मला माहितीच होतं . तुम्ही मराठी माणसे इथे फसणार ! इथल्या स्थानिक भाषेमध्ये डुकरा म्हणजे नवरा आणि डुकरिया म्हणजे बायको ! परंतु हे सांगताना त्याचे कायीक हावभाव पाहून मी हसून हसून लोळलो ! मला खरे तर इथे मुक्काम करायला काही हरकत नव्हती .परंतु हा म्हातारा जर तिथे राहिला असता तर माझी हसून हसून वाट लागली असती ! जसे एखादा फलंदाज प्रत्येक चेंडूला षटकार मारतो तसे याचे चालले होते ! प्रत्येक वाक्यावर तो काहीतरी विनोद करायचा ! आमची फ्रिक्वेन्सी चांगली जुळली होती परंतु त्यामुळेच त्याची क्षमा मागून मी सामान उचलले . आणि नर्मदे हर केले ! या घाटाचे नाव बम्होरी घाट होते .
किनाऱ्याने चालू लागलो .
इथे तास दोन तास झाल्यावर मला सामनापूर या गावांमध्ये एक जयपूरचा साधू आणि त्याची आई भेटले .ते दोघे एक छोटीशी खोली घेऊन पांढरी शुभ्र वस्त्र घालून साधना करीत राहिले होते . या दोघांनी मिळून १९५१ ते १९५७ अशी प्रदीर्घ नर्मदा परिक्रमा केली होती .यांनी मोठ्या प्रेमाने मला चहा पाजला .त्या काळामध्ये परिक्रमा किती कठीण होती याचे अनुभव देखील सांगितले . पुढे निघालो . सामनापुरापूर्वी मेहगवा घाट नावाचा घाट लागला . इथे तीरथ दास लोधी आणि केशवदासजी त्यागी नावाचे सत्पुरुष भेटले .समोर केरपाणी नावाचे गाव होते .
 मेहगवा घाटावरून दिसणारी नर्मदा माई . अशी झेंडूची झाडी दिसली की ओळखायचे याच्यात मध्येच एखादे गांजाचे झाड आहे .
इथे उजव्या हाताला छोटी धुवाधार नावाचा धबधबा आहे . परंतु त्याचे अस्तित्व नर्मदेच्या पाण्याकडे पाहून जाणवत नव्हते . आता उमरिया गाव पार करून सगुण घाट आणि शेर नदीचा संगम गाठायचा असे माझ्या डोक्यात होते .बऱ्यापैकी अंतर काठाकाठाने चालल्यावर माझ्या कानावर भागवताचे शब्द पडू लागले . बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज अतिशय ताकतीचा होता . (अमरीश पुरी सारखा तो खर्जातला आवाज होता . ) अतिशय अधिकार वाणीने आणि शांतपणे भागवत कथा ते सांगत होते . नर्मदे काठी अतिशय शांतता असल्यामुळे अशा तऱ्हेने स्पीकरवर लावलेले आवाज फार दूरपर्यंत ऐकू जातात . त्या आवाजाने मला वेड लावले . मला तो आवाज ज्या कोणाचा आहे त्या व्यक्तीला बघण्याची इच्छा निर्माण झाली . ती व्यक्ती जे काही ज्ञान सांगत होती ते सर्व अगाध होते . वाणीमध्ये शुद्धता ,स्पष्टता होती . परंतु आवाजाला साधनेची धार होती . तो आवाज कानातून हृदयामध्ये करवत घुसावी तसा चिरत जात होता . मी किनारा सोडून त्या आवाजाच्या रोखाने शेतांमध्ये घुसलो . साधारण अडीच तीन किलोमीटर चालल्यावर पिपरहा नावाचे एक गाव आले . तिथे एका दुकानदाराला मी विचारल्यावर त्याने सांगितले की या रस्त्याने सरळ जा इथे ग्वारी नावाच्या गावात खेरा माई चा घाट आहे तिथे ही कथा चालू आहे . ग्वारी नावाचे हे तिसरे गाव ! मोठमोठे मातीचे ढिगारे कापत रस्ता तयार केला होता . त्या रस्त्याने मी थेट आश्रमामध्ये आलो . इथे एका भव्य सभागृहामध्ये ही भागवत कथा सुरू होती . भागवतकार विचारू लागले . " बताओ सज्जनो । भक्त कैसा होता है ? " त्यांनी हे वाक्य उच्चारायला आणि मी दारात जाऊन उभा रहायला एकच वेळ आली . माझ्याकडे हात करत स्वामीजी म्हणाले , " इसे कहते है भक्त । मैया की भक्ती मे निकल पडे है । ना घर की चिंता । ना खुद से लगाव । " सर्वजण वळून माझ्याकडे पाहू लागले . मला ओशाळल्यागत झाले . इतक्या "स्पेशल अटेंशन " ची सवय गृहस्थी माणसाला नसते . सर्वसामान्य जीवनामध्ये गृहस्थ हा सर्वात दुर्लक्ष करण्यायोग्य प्राणी म्हणूनच ओळखला जातो . याचे कारण त्याचे कर्म असते . स्वतःचे घर ,स्वतःचा संसार ,स्वतःची मुले सोडून जगासाठी , समाजासाठी , देशासाठी ,काही करण्याची इच्छा ,शक्ती ,क्षमता ,हीच तो गमावून बसलेला असतो . तो असतो मात्र एक " कॉमन मॅन " . मी पुढे जाऊन त्या भागवतकरांना नमस्कार केला . ते नुसते भागवतकार नव्हते तर भगवी वस्त्र धारण केलेले एक संन्यासी होते . त्यामुळे मी त्यांना साष्टांग नमस्कार करून "ओम नमो नारायणाय " अशी प्रार्थना केली . ते त्यांच्या आसनाशेजारी खुर्ची लावून बसण्याची सूचना मला करू लागले . परंतु मी नम्रपणे नकार देत खाली लोकांमध्ये जाऊन बसलो . भागवत कथा पुन्हा सुरू झाली . कसा खूपच अप्रतिम होती . एका मोठ्या व्यासपीठावर महाराज बसले होते . तिथे त्या  आश्रमाची त्रिसूत्री लिहिलेली होती .  सेवा सत्संग सुमिरन . कृपया कोणीही काहीही भेट चढवू नये अशी पाटी देखील लावलेली होती . याचा अर्थ संन्यासी महाराज काही घेण्यासाठी नव्हे तर देण्यासाठी आले होते हा त्यांचा सुस्पष्ट हेतू इथे व्यक्त होत होता . या संन्यासी महाराजांचे नाव होते स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी महाराज . सव्वा सहा फूट उंची . गोरापान वर्ण . गरुडा  सारखे बाकदार नाक , क्षौर केलेले .स्वच्छ नीटनेटकी भगवी वस्त्रे परिधान केलेली . चेहऱ्यावर मंद स्मित हास्य .आवाजामध्ये प्रचंड जरब . आणि सर्व काही मुखोद्गत .यांच्याकडे पाहता क्षणी कुठल्याही वयोगटाची कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती लगेच आकृष्ट झाली असती असे चुंबकीय व्यक्तिमत्व होते . ऋषिकेश येथील कैलास आश्रम हे त्यांचे गुरुस्थान . या आश्रमाला अजून नाव दिलेले नव्हते . नुकतेच नवीन बांधकाम झाले होते आणि हा पहिलाच कार्यक्रम तिथे चालू होता . सध्या या आश्रमाचे नामकरण श्रीहरी आश्रम ग्वारी घाट असे झालेले आहे असे नकाशावर दिसते .
श्रीहरी आश्रमाचे छोटी धुवाँधार धबधब्यापासूनचे सानिध्य दाखविणारा नकाशा .
इथे नर्मदेचे पाणी अतिशय शांतपणे परंतु अत्यंत वेगाने वाहत होते . वरून पाहताना नर्मदा शांत वाटायची पण प्रत्यक्षात पाण्याला ओढ खूप होती हे पाण्यात उतरल्यावर समजायचे .नर्मदेपासून काठावर काही शेती होती . तिथून वर उंच मातीच्या कड्यावर पुन्हा शेतजमीन चालू व्हायची तिथे हा आश्रम बांधला होता . 
आश्रमातून दिसणारी छोटी धुवाँधार च्या बाजूची नर्मदा .
याच सभागृहामध्ये भागवत कथा सुरू होती आणि याच दारातून स्वामींनी मला आत मध्ये घेतले
पुढे वाहत जाणारी नर्मदा माई
आश्रमामध्ये स्वामीजींसाठी बांधलेली षटकोनी कुटी . हिला तळघर असून तिथे ध्यान गुंफा आहे .इथे स्वामीजी कोणाला येऊ देत नाहीत . त्यांच्या मूळ पिंड एकांत प्रीय आहे .
स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी
आश्रमातील व्यासपीठ . एका भक्ता सोबत बसलेले स्वामीजी
स्वामींची हरियाणा मध्ये फार मोठी गोशाळा आहे .

हरियाणा येथील सिरसा गावानजीक दडबा कला या गावात श्रीकृष्ण प्रणामी गौशाला नावाची महाराजांची गोशाळा असून तिथे साडेचार हजार पेक्षा अधिक गाई सांभाळलेल्या आहेत .
महाराजांची अखंड भ्रमंती सुरू असते .

साधूच्या वयाचा अंदाज लावता येणे कठीण असते परंतु यांचे वय साधारण ६० च्या आसपास असावे असा मी अंदाज लावला .
स्वामीजी उच्च विद्या विभूषित असून यांना कोणीही कधीही कुठेही सहज भेटू शकते . कुठलाही बडेजाव करत नाहीत . 
भागवत कथा झाल्यावर माझे आसन मी त्याच सभागृहामध्ये एका कोपऱ्यात लावले . स्वामींनी रात्री पुन्हा गप्पा मारण्यासाठी येतो असे सांगितले . आश्रमामध्ये भागवत कथा सुरू असल्यामुळे खूप भक्तजन गोळा झालेले होते . विशेषतः स्वामींचे विविध प्रांतातील शिष्य तिथे उत्सव साजरा करण्याकरता गोळा झाले होते . त्यातील सर्व उत्सुक लोकांनी मला पकडले आणि नर्मदा परिक्रमेचे अनुभव सांगा म्हणून मागे लागले . हा अनुभव प्रत्येक परिक्रमा वासीला थोड्याफार फरकाने येतोच . अगदी या ब्लॉगचे मूळ देखील हाच प्रश्न आहे . तुमच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला काय अनुभव आले ? तुम्हाला अश्वत्थामा दिसला का ? या दोन प्रश्नांची उत्तरे देऊन घशाला कोरड पडल्यामुळे अखेरीस शेवटचा उपाय म्हणून हा ब्लॉग लिहायला घेतला आहे ! आता कुणी अनुभव विचारले की मी लिंक पाठवतो ! गमतीचा भाग सोडून द्या ! परंतु आमच्या गप्पा बराच वेळ चालल्या . इथे नागपूरचे एक गोव्रती आले होते . ते एका अन्य कार्यक्रमाकरिता मध्य प्रदेश मध्ये आले होते परंतु खास महाराजांना भेटायला इकडे येऊन गेले . यांचे कार्य विदर्भामध्ये खूपच प्रसिद्ध आहे . या आश्रमामध्ये सुद्धा काही सुंदर जातिवंत गायी होत्या . भोपाळ वरून आलेला एक आयटी सेक्टर मधला तरुण होता .याचे नाव आकाश दीक्षित होते . त्याशिवाय दिनेश दीक्षित नावाचे एक विद्वान आणि उच्च विद्या विभूषित गृहस्थ , जे भोपाल जवळच्या पानदेवरी या रायसेन जिल्ह्यातील गावातून आले होते , यांचा माझ्याशी विशेष स्नेह जुळला . दिनेश आपली पत्नी आणि छोटासा मुलगा पार्थ या दोघांना घेऊन आला होता . हा पार्थ शक्यतो कोणाकडे फारसा जात नसे . परंतु मी आल्यापासून तो जो मला चिकटला तो सोडेचना ! आई-वडिलांकडे सुद्धा जायला नाही म्हणू लागला ! त्याला माझ्यासारखे बनायचे होते ! त्यामुळे तो माझ्या मागे लागला की तुम्ही मला सुद्धा फेटा नेसवा ! इतक्यात तो पळत गेला आणि त्याच्या आईचा दुपट्टा घेऊन आला . मला म्हणाला याचा फेटा मला नेसवा ! मग त्या बालहट्टा पायी मी त्याला सुंदर असा फेटा नेसवला ! गंमत म्हणजे रात्री सुद्धा तो आई-वडिलांकडे झोपायला गेला नाही तर माझ्याच अंथरुणावर झोपला ! अखेर त्याचा डोळा लागल्यावर वडिलांनी उचलून नेले ! नर्मदा परिक्रमा करताना आपले मन निर्विचार झालेले असते . त्यामुळे मुलांच्या संवेदनशील मेंदूला फारशा मुंग्या येणारे विचार जाणवत नाहीत .त्यामुळे ते परिक्रमावासीकडे आकृष्ट होत असावेत . पार्थच्या वडिलांनी आमचा एक फोटो काढला . आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तोच हा प्रसंग ! 
 भोपाळ येथील छोटा नर्मदा भक्त पार्थ आकाश दीक्षित आणि प्रस्तुत लेखक .मागे दिसणाऱ्या व्यासपीठावरच महाराजांची कथा चालली होती .
तीन वर्षाचा पार्थ आणि त्याने आवर्जून डोक्यावर बांधून घेतलेला फेटा

इथे तात्पुरते संडास बाथरूम बांधण्यात आले होते . त्यामुळे मी माझे सर्व कपडे इथे धुऊन घेतले . साधारण दोन दिवसांनी कपडे धुतले जायचे . रात्रभर दोरीवर आणि नंतर अंगावर किंवा पाठीमागच्या झोळीवर टाकून वाळवायचो . संध्याकाळी स्नानासाठी खाली नर्मदेवर गेलो . वेगवान प्रवाहात मनसोक्त स्नान केले . वरवर पाहता पाणी शांत दिसायचे परंतु आतून खूप गती होती . इथे शेजारीच एका साधूची कुटी होती . हे महाराज गावात आल्यापासून साधूकडे गावकऱ्यांचे दुर्लक्ष झाले होते . त्यामुळे हा त्या महाराजांविषयी फार काही सकारात्मक बोलत नव्हता . परंतु मी त्याची समजूत काढली आणि महाराजांच्या मोठ्या कार्यामध्ये सामील होण्यासाठी त्याला विनविले . महाराजांच्या एका शब्दाखातर त्यांच्या एका भक्ताने ती सर्व जमीन त्यांना विकत घेऊन आश्रम बांधून दिला होता . शिवाय जमीन आणि आश्रम महाराजांच्या नावावर देखील केला होता . महाराजांच्या नावावर म्हणजे त्यांच्या गुरूंच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या नावावर .  तिवारी नामक एका अतिशय भाविक भक्ताने भागवत सप्ताहाच्या संपूर्ण आयोजनाचा खर्च उचलला होता तो व त्याची श्रद्धावान पत्नी दोघे मिळून सर्वांची आस्थेने विचारपूस करत होते . महाराजांच्या पूर्वाश्रमीचे काही नातेवाईक देखील इथे मुक्कामी आलेले मला दिसले . महाराज मात्र त्यांच्यामध्ये फारसा रस घेत नव्हते . अगदी महाराजांच्या मातोश्री देखील आल्या आहेत असे मला कळाले . परंतु महाराजांच्या वागण्यातून त्यांचे पूर्वाश्रमाचे नातेवाईक कोण आहेत याचा काही अंदाज येत नव्हता . इतकी तटस्थता त्यांनी साधली होती . इथे मोठी च जेवणावळ झाली . मला मोठ मोठ्या उत्सवांमध्ये गतीने वाढण्याची चांगली सवय आहे . त्यामुळे मी पहिल्या काही पंगती वाढून घेतल्या . शेवटी जेवायला बसलो . आश्रमा मधील पडेल ते काम मी करू लागलो . भांडी घासायला मदत केली . सभागृह स्वच्छ केले . सतरंज्या जाजम वगैरे झटकून आणले . महाराज हे सर्व पाहत होते . रात्री ते गप्पा मारायला आले . त्यांनी बराच वेळ गहन विषयांवर शास्त्र चर्चा केली . मी पूर्णवेळ फक्त श्रवण भक्ती केली .  महाराजांनी मला सांगितले ,उद्या आमच्या कथेचा शेवटचा दिवस आहे . तसेच नर्मदा जयंतीचा उत्सव आणि हवन देखील आहे तरी हे कार्यक्रम चुकवून पुढे जाऊ नये . काहीही करून उद्याचा एक दिवस मुक्काम वाढवावा . संपूर्ण परिक्रमेमध्ये मी एका रात्री शिवाय अधिक कोठे मुक्काम केला नव्हता . परंतु महाराजांच्या आज्ञार्थक विनंती पुढे माझा निरुपाय झाला . रात्री अंग टाकणार इतक्यात एका ट्रॅक्टर मध्ये मागे ट्रॉलीमध्ये बसून गावातील म्हाताऱ्या कोताऱ्या भजनासाठी आल्या ! मग काय ! मी लगेच उठून त्यांच्या भजनामध्ये सामील झालो ! भजनातला आनंद काही वेगळाच आहे !
माझे वडील भजनामध्ये तबला वाजवायचे .ते लहानपणापासून मला भजनाला घेऊन जायचे . त्यांचे मित्र श्री प्रकाश नातू म्हणून एक होते त्यांनी मला भजनाची प्रारंभिक ओळख करून दिली . हरिभक्तीपरायण साष्टे बाबा यांनी मला भजनाची गोडी लावली . त्यानंतर हरिभक्तीपरायण रायबा मालुसरे यांनी देखील माझ्या भजनाच्या आवडीला प्रोत्साहन दिले .
हभप रामचंद्र बुवा भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली लहानपणी काही कीर्तने देखील केली . 
 आयुष्यातील प्रथम कीर्तन झाल्यावर प्रस्तुत लेखक वय १० वर्षे
यावर कडी केली ती परम आदरणीय भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांचे स्वीय टाळ वादक श्री माऊली टाकळकर यांनी . हे मला नित्य त्यांच्या सोबत भजनाला घेऊन जात . त्यांचे भजन अतिशय तालासुरात असायचे . त्यामुळे तिथे मुक्त प्रवेश नव्हता . त्यांच्या सायकलच्या नळीवर बसवून ते मला सगळीकडे घेऊन जात ! माऊलींच्या कृपेने मला पंडितजींचा काही काळ सहवास देखील तरुण वयात लाभला . 
भारतरत्न पंडित भीमसेनजी जोशी यांच्या समवेत प्रस्तुत लेखक (साल साधारण १९९९ - २००० )
प्रस्तुत लेखकावर ताल संस्कार करणारे दोन गुरुवर्य . तालयोगी श्री संजय करंदीकर आणि ह भ प माऊली टाकळकर . 
योग्य वयात अशा दिग्गजांनी भजनाचे संस्कार केलेले असल्यामुळे ती आवड आयुष्यभर टिकली . पुढे भजन सम्राट पंडित अजित कडकडे किंवा संगीतकार यशवंत देव यांच्या कार्यक्रमांमध्ये देखील तालवाद्यांची साथ संगत करण्याची संधी प्रस्तुत लेखकाला मिळाली . 
संगीतकार यशवंत देव यांच्या समवेत त्यांचा वादक चमू .
प्रस्तुत लेखक त्यांच्या उजव्या हाताला पायाशी बसला आहे .
महाविद्यालयीन जीवनात हौसेखातर तलावाद्यांची साथ संगत करताना प्रस्तुत लेखक .
लहानपणी एका मंदिरात भजन करीत बसलेला प्रस्तुत लेखक
हातामध्ये विणा किंवा एकतारी आणि समोर सगुण रुपात देव असेल की भजनाला बहार येते ! 
वरील सर्व माहिती मी वाचकांना केवळ याच कारणासाठी देत आहे की आपल्याला त्यातून आपल्या मुलांना भजनाची आवड निर्माण करण्याची प्रेरणा मिळावी . भजनाची आवड अशी एका दिवसात येऊ शकत नाही हेच मला सांगायचे आहे . बहुतांश वेळा भजन चालू झाले की वैतागून उठून जाणारे परिक्रमा वासी मी पाहिले आहेत . तसेच तुम्हाला सहजासहजी कुणी त्यांच्या भजनामध्ये सहभागी करून घेऊ शकत नाही . त्यासाठी तुम्हाला तालाचे , सुराचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भजनाच्या भावाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक आहे . त्यासाठी अखंड श्रवणाला पर्याय नाही . त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला आजच भजनाची गोडी लावा . ती आयुष्यभर कामाला येते .विशेषतः म्हातारपणी कामाला येते .
जो उदात्त वारसा आपल्याला मागच्या पिढीने दिला ...
तो आपण पुढच्या पिढीला दिलाच पाहिजे ...

 पुढे मात्र मी संगीत क्षेत्रात वाहवत जाऊ शकतो असे जाणवल्यावर मी त्याचा नाद पूर्णपणे सोडला तो आजतागायत .आता मी फक्त देवाच्या भजना पुरते तोडके मोडके संगीत वापरतो. असो .  मी त्या महिलांच्या भजनामध्ये असाच तोडका मोडका ढोलक वाजवू लागलो . कोणीतरी अन्य मनुष्य भजनकर्यांमध्ये आला की त्यांना अजून जोश चढतो तसे काहीसे झाले . रात्री अडीच वाजेपर्यंत भजन चालले . सर्व माताराम खुश झाल्या आणि मला आशीर्वाद देऊन निघून गेल्या . मी पाठ टेकली . दरम्यान अजून काही परिक्रमा वासी आलेले मला दिसले . पहाटे लवकर उठून मी बाहेर आलो . इथे नर्मदेच्या बाजूला महाराजांनी एक धोकादायक जिना खोदून फक्त नर्मदा दिसेल अशी ध्यान गुफा तयार केलेली आहे . तिच्यामध्ये जाऊन बसलो . इथे खूपच जबरदस्त वाटत होते ! इथली स्पंदने फार भारी होती .
हीच ती ध्यान गुफा . मी बसलो तेव्हा देखील समोर असेच घनदाट धुके होते .
 थोड्या वेळाने उजाडल्यावर खाली नर्मदा स्नानासाठी गेलो . एका दगडावर कपडे काढून ठेवले आणि पाण्यामध्ये उतरलो . माझ्या मागोमाग आकाश दीक्षित देखील आला . मी पाण्यात उतरून स्नान कुठे करायचे याचा अंदाज घेत होतो . त्याने माझे फोटो काढायला सुरुवात केली . तसेच त्याने मी केलेल्या स्नानाचा एक छोटासा व्हिडिओ देखील घेतला . नंतर त्याने हा सर्व डेटा मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . आपल्या माहिती करता ते फोटो खाली देत आहे .
सुंदर पहाटे नर्मदा मातेच्या दर्शनाचा आणि स्पर्शाचा अनुभव येणारा प्रस्तुत लेखक . हा नर्मदा जयंतीचा दिवस आहे हे विशेष !
महादेव पिपरिया येथे मला हनुमत सिंह घोषी यांच्याकडून मिळालेली नर्मदा मैया ठेवण्याची मांजरपाठाची पांढरी पिशवी खांद्याला लटकवलेली दिसत आहे . पाणी प्रचंड गार होते . बाहेर देखील चांगलीच थंडी होती .
अखेर हिम्मत करून मी अजून खोल पाण्यामध्ये गेलो आणि स्नानाला सुरुवात केली . अशा थंड पाण्यामध्ये स्नान म्हणजे सूर्याला अर्घ्य देऊन केवळ तीन डुबक्या मारणे आणि बाहेर येणे .

आज माघ शुद्ध सप्तमी होती . नर्मदा मातेचा प्रकट दिन ! त्यानिमित्त सकाळी महाराजांनी हवन ठेवले होते आणि त्यानंतर आश्रमामध्ये मोठा भंडारा ठेवला होता .  पिवळ्या रंगाचे कपडे घातलेला एक तरुण साधू महाराजांना मदत करायचा . परंतु त्याला सर्व ताण झेपवत नव्हता असे मला वाटले . त्यामुळे मी देखील स्वयंपाकापासून पंगती वाढण्यापर्यंत प्रत्येक कामामध्ये सहभागी झालो . विशेषतः हलक्याफुलक्या थर्माकोलच्या पत्रावळी उडून नर्मदेमध्ये जाऊ नयेत म्हणून त्या गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम मी स्वतः वरती घेतले . स्वामी मला म्हणाले की परिक्रमा झाल्यावर इथे येऊन रहा आणि मग आपण आश्रमामध्ये काही सुधारणा करू . त्यांनी स्वतः संपूर्ण परिसर मला फिरवून दाखवला . अगदी त्यांची षटकोनी कुटी देखील त्यांनी मला आत मध्ये नेऊन तळघरापर्यंत नेऊन दाखवली . तळघरामध्ये ते साधनेसाठी बसत असत . जसे स्वयंपाक घर हा त्या स्त्रीच्या मनाचा आरसा असतो त्याप्रमाणे साधूची कुटी हा त्याच्या मनाचा आरसा असतो . जितके मन साधे ,सरळ , स्वच्छ तितकी कुटी साफसूफ आणि मोकळी असते . यांची कुटी तशी होती . स्वामींच्या भक्त परिवारामध्ये स्वामी नामक एक शिष्य होता . तो बराच वेळ माझ्यासोबत फिरत होता . डॉक्टर तिवारी नावाचे एक विद्वान गृहस्थ होते . शुक्ल म्हणून एक सज्जन होते . अवधेश नावाचा एक उत्साही तरुण होता . एकंदरीत सर्व चमू छान होता . यांना माझी गरज पडणार नाही अशी परिस्थिती होती !  नर्मदा जयंतीच्या निमित्ताने सुरेख याग झाला . यज्ञकुंड तयार करण्यापासून प्रत्येक कामात माझा सहभाग राहिला . खूप काही शिकायला मिळाले . सर्व भक्तांनी मिळून मला यज्ञकुंडाच्या समोर स्वामींच्या शेजारी बसविले .  नेमक्या अग्नीच्या ज्वाला माझ्याच दिशेने येत राहिल्या . मी शांतचित्ताने पंचाग्नी साधना करणाऱ्या साधूचे स्मरण करत ती धग सहन केली .  थंडी किंवा उष्णता या गोष्टी मनातून वाटणाऱ्या असतात . त्यांना मनातून काढून टाकले की त्यात त्रास देत नाहीत . इतक्यात यागाची एक मोठी ठिणगी उडून माझी छाटी थोडीशी जळाली आणि मांडीला चटका बसला ! हे पाहता क्षणी अतिशय सकारात्मक विचारसरणी असलेले स्वामीजी मला म्हणाले ! वा साक्षात अग्निदेवांनी येऊन तुझ्या मांडीवर थाप दिले की रे ! भाग्यवान आहेस ! अग्नि देवाचा प्रसाद मिळाला .तुझा याग सफल झाला ! मी मनात विचार केला अग्नी देवाने मिठी नाही मारली ते बरे झाले !  भोजने झाल्याबरोबर भागवत सप्ताह सुरू झाला . भागवत सप्ताह संपल्या संपल्या सर्वजण भजन करीत नर्मदे काठी गेले . आता इथे नर्मदा मातेची पूजा करायची ,तिची साडी चोळीने ओटी भरायची , तिच्यामध्ये दीप प्रदान अर्थात दिवे सोडायचे आणि आरती , नर्मदाष्टक तसेच नर्मदा चालीसा म्हणायचे असे ठरले होते . भजनाचा माइक आणि स्पीकर स्वामीजींनी माझ्या हातात दिला . नर्मदा मातेचा गजर आणि जयजयकार करत आम्ही सर्वजण खाली घाटावर गेलो . 
स्वामी सदाशिव नित्यानंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पिपरहा गावातील खेरामाई घाटावर नर्मदा जयंतीच्या दिवशी नर्मदा पूजनासाठी जमलेले भाविक गण . मग शुद्ध सप्तमी आंग्ल दिनांक सात फेब्रुवारी २०२२ . स्वामींच्या शेजारी फेटा घातलेला प्रस्तुत लेखक दिसत आहे .

मी गुडघाभर पाण्यामध्ये उतरून उभा राहिलो . माइक वर खणखणीत आवाजात नर्मदा मातेची आरती नर्मदाष्टक आणि नर्मदा चालीसा म्हटली . माता-भगिनी नर्मदा जलामध्ये दिवे सोडत होत्या ! ते दृश्य मोठे मनोहर होते ! साडीचोळी अर्पण करून नर्मदा मातेची पूजा करण्यात आली . स्वामीजींनी मला देखील आरती ओवाळायला दिली . मला सोडायला दिवे देखील त्यांनी दिले . अशा रीतीने नर्मदेमध्ये दिवे सोडण्याची माझी इच्छा त्या दिवशी पूर्ण झाली ! एकंदरीत ते वातावरण भारावलेले होते . नर्मदा मातेची स्तुती करताना कंठ भरून येत होता . एरवी इतरांचे ऐकून तिचे गुणगान करणे वेगळे आणि आता इतके अनुभव गाठीशी आल्यावर तिचा जयजयकार करणे यात फार मोठा फरक होता .


वरील व्हिडिओमध्ये काय काय पाहाल ? नर्मदेचे शांत दिव्य स्वरूप ! सुंदर मिणमिणणारे दिवे ! लोकांनी प्रवाहित केलेले नारळ गोळा करणारे डोंगावाले अर्थात नावाडी . उपस्थित जनसमुदाय . भगव्या वस्त्रा मध्ये आरती करणारे स्वामीजी . त्यांच्या उजव्या हाताला फेटा बांधून माईक हातात घेऊन उभा असलेला प्रस्तुत लेखक . नर्मदे प्रती जनसमुदायाचा भाव .

तो दिवस फार अविस्मरणीय आणि अप्रतिम होता . नर्मदा मातेने अशा रीतीने नर्मदा जयंती अतिशय शांतपणे साजरी करवून घेतली ! रात्री छान सत्संग झाला . स्वामीजी जेवायला मला सोबत घेऊन बसत आणि त्यांच्या ताटातील सर्व पदार्थ मलाही देत . तिथल्या मायेमध्ये फार काळ अडकणे चांगले नव्हते . नर्मदा जयंती देखील झालेली होती त्यामुळे मी तिथून पहाटे उठून गुपचूप निघालो . परंतु तिवारी काकांनी मला पाहिले व ते आले .त्यांनी मला एक उंची तलम धोतर व पाचशे रुपये दक्षिणा दिली .
स्वामीजींचे एक यूट्यूब चैनल मला सापडले . ते पाहिल्यावर असे लक्षात आले की सध्या स्वामीजी नर्मदा परिक्रमा करत आहेत . या परिक्रमेमध्ये त्यांचे समाजकार्य सुरूच आहे ! वाटेत भेटणाऱ्या युवकांचे व्यसन ते सोडवत आहेत . त्याची काही उदाहरणे .




 डॉक्टर तिवारी आणि शुक्ला मला सोडायला बरेच अंतर आले . हे गुरांचे डॉक्टर होते व अतिशय विद्वान होते . दोघे वळले आणि जोरात पाऊस सुरू झाला ! कालच स्वामींची आणि माझी चर्चा झाली होती की कुठलाही यज्ञ यशस्वी झाला की त्याचे फलस्वरूप थोडा तरी पाऊस पडतो . तसा तो पडला .त्या पावसाने मी उभा आडवा भिजलो . पायाखालच्या चिकट चिखलामुळे माझे बूट फाटले व एकंदर अवस्था वाईट झाली . जवळच असलेल्या सगुण घाटावर जाईपर्यंत सर्व सामान भिजून गेले होते . इतक्यात एक छोटा मुलगा तिकडे आला आणि म्हणाला , "बाबाजी बचके रहना ! संभल के जाना !आगे शेर है ! " मला त्याचा राग आला . आधीच पावसाने भिजवलेले आणि त्यात याची ही थट्टा मस्करी . तो पळून गेला आणि जाताना "सच मे आगे शेर है । " असे ओरडू लागला ! एखाद्याची चेष्टा कधी कुठे व किती करावी याला काही मर्यादा आहे की नाही ?  पुढे एक खोल नदी आडवी आली . दूरवर एक माणूस ती नदी पार होताना दिसला . तिथपर्यंत जाणे अशक्य होते कारण चिखलाचा उतार होता . इतक्यात एक बगळा उडत उडत आला आणि तो माझ्यासमोर नदीमध्ये उतरला आणि वाळूतून चालत पलीकडे गेला .त्या बगळ्या कडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की इथे नदी उथळ आहे . थोडा चिखल अधिक होता परंतु कसाबसा गुडघ्याएवढ्या पाण्यातून पार झालो . बगळा उडून गेला . 

माझ्या आदल्या दिवशी नावेची वाट पाहत उभे असलेले परिक्रमा वासी . बहुतांश परिक्रमा वासी शक्यतो शेर नदी नावेतून पार करतात .
वरील नकाशा बारकाईने पाहिल्यावर जिथे शेर नदी नर्मदेला मिळते तिथे वाळूचा एक छोटासा ढिगारा तयार झाल्याचे दिसते .  त्याच्यावरून बगळ्याने मला मार्ग दाखविला .
पलीकडे गेल्या गेल्या एक मोठी जॅकवेल ,एक झोपडी आणि हनुमंताचे मंदिर दिसले . सर्व सामान झोपडी मध्ये वाळत टाकले आणि पडून राहिलो . पाऊस काही थांबायचं नाव घेईना . मंदिर बंद होते . स्वामीजींनी मला काही पुस्तके सोबत दिली होती . पडल्या पडल्या मी ती पुस्तके वाचू लागलो . इतक्यात तिथली व्यवस्था पाहणारा एक साधू आला आणि त्याने मला मंदीर उघडून आत बसायला सांगितले . त्याने बालभोग खायला आणून दिला . बाल भोग म्हणजे नाष्टा किंवा अल्पोपाहार. पाऊस उघडला होता . नर्मदा जयंती साठी केलेली विद्युत रोषणाई उतरवण्याचे काम साधू करत होता . मी त्याला मदत केली . शिडी पकडणे . काढलेल्या माळा गुंडाळून ठेवणे . कर्णे उतरविणे . विद्युत सामानाचे वर्गीकरण करून ठेवणे अशी मदत मी त्याला केली . आणि नर्मदे हर करून पुढे निघालो . इतक्यात मला एक शंका आली म्हणून मी मागे वळलो आणि त्या साधूला दुरूनच ओरडून विचारले ' ," बाबाजी इस नदी का नाम क्या है ? " साधू स्वच्छतेसाठी कळसावर चढला होता . तिथून तो ओरडला
 ," शेर नदी ! "



लेखांक सत्तेचाळीस समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर