लेखांक ४६ : गंगई चे शतायुषी धुरंधरदास महाराज ,मनोरम मुआर घाट आणि जबरेश्वराचा जबर अनुभव

नर्मदा सीनियर संगम पार करून काठाचा सुंदर पायमार्ग पकडला . थोड्याच वेळात रेल्वेचे दोन पूल लागले . एक जुना लोखंडी होता तर एक नवीन मनोऱ्यासारखा काँक्रीटचा होता . जबलपूरला येताना माझी रेल्वे याच पुलावरून आली होती . आणि परिक्रमेपूर्वीचे नर्मदा मातेचे पहिले दर्शन मला याच पुलावरून झाले होते . दोन्हीही पूल अतिशय सुंदर आणि बघण्यासारखे आहेत 
जबलपूर जवळील रेल्वे चा जुना आणि नवा पूल
 पुला जवळ एका मंदिराचे अवशेष दिसतात
एका पुलावरून दिसणारा दुसरा पूल . नर्मदे वरून रेल्वेचे फारसे पूल गेलेले नाहीत .
हे संग्रहित फोटो पुलावरचे असले तरी मी दोन्ही पूल खालून पार केले
पुलावरून एखादी रेल्वे जाताना पहावी अशी इच्छा मनात आली ,आणि लगेचच एक पॅसेंजर गाडी धडधडत वरून निघून गेली . आपण रेल्वेमध्ये बसलेलो असतो तेव्हा आपल्याला फार काही दिसत नाही . परंतु खालून पाहताना लक्षात येत होते की प्रत्येक खिडकी मधून माणसे नर्मदा मातेला नमस्कार करत होती ! पैसे फेकत होती , फुले फेकत होती !
पुलावरून जाणारी रेल्वे इतकी लहान दिसते !
 श्रद्धेची ताकद किती असते बघा ! तिथे खाली पाण्यात लोहचुंबक टाकून पैसे गोळा करणारी मुले दिसतात . परंतु आजवर कोणालाही डोक्यात वरून फेकलेले नाणे लागले आहे असे ऐकीवात नाही ! मी रेल्वेतून जेव्हा हा फुल पार केला तेव्हा नरसिंहपूर भिकमपूर अशी स्थानके लागली होती .आणि मग हा पूल आला होता . असो .  
आज मला समोरच्या तटावरून खूप सारे परिक्रमा वासी जाताना दिसले .सगळे मिळून ५० - ६० जण तरी असतील . यातील बहुतांश लोक पुढे कुठेतरी एकत्र मुक्काम करणार होते . 
 भीकमपुर येथील समोरच्या तटावरून चाललेला एक परिक्रमावासी . मागे शेतात काम करणारी माणसे आणि निघालेला परिक्रमावासी यांच्यातील फरक नजरेला तत्काळ कळतो .
आम्ही मात्र दोघेच जण होतो .मी आणि माझी नर्मदा मैया ! क्रमांक एक ची जोडी ! प्रथम दिवसापासून सतत सोबत !काय अप्रतिम ठिकाण निवडले होते नर्मदा मैयाने माझ्यासाठी !आणि ती वेळ तरी किती सुंदर ! नववर्ष आणि जबलपूर चा ग्वारी घाट ! ही क्रमांक दोन ची जोडी ! मला समोर जे लोक दिसत होते त्या सर्वांनी ओंकारेश्वर येथून परिक्रमा उचलली होती आणि इथून पुढे पलीकडच्या तटावर मला अशीच गर्दी दिसणार होती . सुरुवातीचे काही दिवस लोक खूप उत्साहाने नर्मदा परिक्रमा चालतात . नर्मदेचा समुद्र संगम अर्थात विमलेश्वर अथवा बमलेश्वर येथे पोहोचेपर्यंत मात्र बऱ्याच लोकांना याची काठिण्य पातळी लक्षात येते आणि ते हळूहळू गळू लागतात . परंतु तोपर्यंत असलेल्या आश्रमांना फार मोठ्या प्रमाणात परिक्रमावासींची सेवा करावी लागते . काही काही आश्रमांमध्ये तर हजार हजार परिक्रमावासी एका रात्री मुक्कामाला असतात . अडीचशे तीनशे हा आकडा तर अगदी सहज पार होतो . इतक्या लोकांना सेवा देताना थोडीफार गैरसोय होऊ शकते . तसेच स्वच्छतेचा प्रश्न देखील निर्माण होतो . त्यामुळे माझे असे स्पष्ट मत आहे की कुठल्याही एका अनवट घाटावरून तुमची परिक्रमा अशा वेळी सुरू करा ज्यावेळी तिथे कोणी नसेल . माझा जाईल तिथे यथोचित आदर सत्कार आणि स्वागत झाले याचे कारण बहुतांश वेळा मी एकटाच होतो . एका माणसाची सेवा करायला समोरच्या माणसाला फारसा ताण येत नाही . चार-पाच लोक असले की शक्यतो शिधा दिला जातो आणि करून खा म्हणून सांगितले जाते . परंतु एका माणसाचे जेवण कुठेही कसेही मिळू शकते . त्यामुळे बरेचदा मला गृहस्थी लोक जेवायला घरी घेऊन जात आणि मी मुक्कामाला आश्रमात असे . इथून पुढे बेलखेडी गाव लागते .या गावापासून पुढे अगदी समुद्र येईपर्यंत नर्मदेमध्ये बेसुमार वाळू उपसा चालतो . अगदी नारळाच्या करवंटीने पाटी पाटी वाळू काढणाऱ्यांपासून ते भले मोठे अजस्त्र आकाराचे जबडे असलेले जेसीबी लावून मोठमोठ्या हायवा किंवा डंपर मधून वाळू उपसणारे कंत्राटदार असोत . या सर्वांचा येथे सुळसुळाट दिसतो . असो .
आज मी खूप चाललो . कारण मैय्याचे विस्तीर्ण पात्र ,सखल गाळ प्रदेश व सुखद गारवा सारेच अनुकूल होते ! खूप आनंदी वातावरण होते ! माझे मन अतिशय शांत झालेले होते ! समोरच्या तटावरून जाणाऱ्या परिक्रमावासींना मोठ्या आवाजात नर्मदे हर असा आवाज दिला की ते तिकडून पुन्हा नर्मदे हर म्हणत यातला आनंद घेत पुढे चाललो होतो . पुढे पुढे मात्र नर्मदे काठी केलेली शेती त्रासदायक ठरू लागली . पात्रापासून लांब शेती करणे वेगळे आणि अगदी नर्मदेच्या पाण्यामध्ये शेती करणे वेगळे . इथे काही शेतकऱ्यांनी अगदी नर्मदेच्या पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने रोपे लावली होती . पुढे झाशी घाट दिसू लागला . इथे शेतकऱ्यांनी फुकट मिळते म्हणून २४ तास पाणी शेतात सोडून दिले होते . शेत भरून ते पाणी पुन्हा नदीत जात होते . परंतु त्यामुळे झालेल्या चिखलगाळामुळे चालताना खूप त्रास होत होता . कोणी आपल्या शेतातून जाऊ नये म्हणून मुद्दाम हे सर्व केले आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती होती . झाशी घाटाच्या अलीकडे एका शेतकऱ्याने मोठे तारेचे कुंपण घालून मार्ग अडवला होता . 
मी कसा बसा आत मध्ये शिरलो . परंतु समोर झाशी घाट दिसतो आहे आणि मध्ये मजबूत तारेचे कुंपण आडवे घातलेले आहे पाहून इतका वेळ शांततेने आणि आनंदाने चालणाऱ्या माझ्या रागाचा पारा क्षणात अनावर झाला . मला इतका राग कधी येत नाही . परंतु त्या दिवशी काय झाले माहिती नाही ! दुर्दैवाने तो शेतकरी समोर आला आणि मला म्हणू लागला "ये मेरी जमीन है ।तू बाहर निकल । " मेरी जमीन हा शब्द ऐकल्या ऐकल्या माझ्या तळपायाची आग मस्तकालाच गेली . आणि मी त्याला म्हणालो अरे ही नर्मदा मातेची जमीन आहे . आणि मी नर्मदा मातेचा मुलगा आहे . असेल हिम्मत तर अडवून दाखव . तुझ्या शेतातूनच जाणार ! आणि काही कळायच्या आत वेगाने पळत येऊन त्याने तार कुंपणासाठी गाडलेले जे सिमेंटचे खांब होते त्याला मी जोरात लाथ घातली . माझ्या लाथेने ओल्या मातीमध्ये गाडला गेलेला तो खांब तिरका झाला . त्यावर मी चढलो आणि तो खांब माझ्या वजनाने पूर्णपणे आडवा झाला . तो खांब आडवा झाल्याबरोबर बाकीचे सर्व खांब तिरके झाले . मी एक एक करून लाथा घालून सर्व खांब आडवे पाडले . अशा पद्धतीने नर्मदे काठी एक राजमार्ग तयार झाला ! माझा तो रुद्रावतार पाहून शेतकरी अक्षरशः पळून गेला ! घाटावर स्नान करणारे लोक हा प्रकार पाहत होते . तिथे उभा राहून मी ओरडू लागलो , "कान खोलकर सुनना सबलोक ।यह नर्मदा मैया की जमीन है । अपनी जगह सिर्फ शमशान मे है । मैया चाहे तो पुरी जमीन खा ले । "
झाशी घाटाजवळचे हेच ते शेत जिथे मी क्रोधाग्नी अनुभवला
 झाशी घाट चा पूल
 नर्मदेचे निवळ शंख पाणी आणि झाशीघाटचा पूल
 झाशी घाट
 झाशी घाटावर अशी वर्दळ नेहमी असते . इथे काही लोक भजी खात बसलेले मी पाहिले .पुढे त्याचा संदर्भ येईल .
मी पुढे चालू लागलो आणि माझी मलाच स्वतःची लाज वाटू लागली . मी असा कसा काय वागलो ? माझे मलाच कळेना ! षडविकारांवर विजय मिळवण्याकरता आपण नर्मदा परिक्रमा करतो आणि इथे तर माझा क्रोध हा विकार इतक्या मोठ्या प्रमाणात उफाळून आला ! की मी समोरच्या शेतकऱ्याचे नुकसान करून टाकले !  मला खूप वाईट वाटू लागले . आणि एक निवांत जागा बघून मी पाठ टेकून आकाशाकडे पाहत राहिलो . समोर वाहणाऱ्या नर्मदेला मी विचारले की असे कसे काय झाले ? त्यावर माझ्या मनामध्ये स्फूर्तीरूपाने तिने उत्तर दिले . हे उत्तर म्हणजे माझे स्वतःचे विचार नक्कीच नव्हते कारण मी खरोखर त्या अवस्थेमध्ये नव्हतो . तो शेतकरी बरेच दिवस येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना त्रास देत होता . माझी जागा आहे ,माझी जमीन आहे ,असे सांगून तिथून लोकांना परत उलटे पाठवायचा . त्याला आज ना उद्या कुठल्यातरी रूपाने धडा शिकवण्याची नर्मदा मातेची इच्छा होती . नर्मदे काठी जे काही घडते ती तिची इच्छा असते . मी वरती लिहिले आहे त्याप्रमाणे माझा अतिशय आनंदी आणि शांत भाव त्यादिवशी होता . त्याचे क्षणात क्रोधामध्ये रूपांतर होणे अशक्य होते . परंतु नर्मदा मातेला कदाचित त्या माणसाला धडा शिकवायचा होता म्हणून तिने माझा वापर करून घेतला . नाहीतर लोकांच्या समोर उभा राहून अधिकार वाणीने असे काहीतरी मी ओरडून सांगेन हे अशक्य आहे ! ते देखील तिने माझ्याकडून करवून घेतले ! सारेच अगम्य आहे .अलौकिक आहे आणि तर्कातीत आहे .
मैयाच्या मनामध्ये आले की ती सर्व जमिनीवर ताबा मिळविते .  हे वाक्य किती खरे आहे हे आत्ता गुगल नकाशा वरील फोटो पाहिल्यावर लक्षात आले . झाशी घाटाचा हा पूल नर्मदेच्या पुरामध्ये संपूर्ण बुडून जातो .
झाशी घाट पुलावरून वाहणारी नर्मदा मैया
महापुरामध्ये झाशी घाट पुलावरून दिसणारे नर्मदेचे रौद्र रूप
मी नर्मदा मातेकडे पाहिले तर ती हसते आहे असे जाणवले ! तिचा खळखळाट खळखळून हसणाऱ्या तरुणीसारखा भासत होता . खजील होऊन मी आकाशाकडे एकटक पाहू लागलो . इतक्या मला आकाशातून काही विमाने जाताना दिसली . गंमत म्हणून पडल्या पडल्या मी विमाने मोजली . सुमारे दहा पंधरा मिनिटे मी पडलो असेन . तेवढ्या वेळात वीस एक विमाने माझ्या डोक्यावरून गेली . इतके एअर ट्राफिक फार कमी ठिकाणी असते . मुंबई विमानतळावर दर मिनिटाला एक विमान उतरते . ही गती त्याहून अधिक होती . याच्यावरून मी अंदाज लावला की हा दिल्लीचा हवाई मार्ग असणार . कारण भारतातील सर्वाधिक विमाने दिल्ली विमानतळाकडे जातात . यापूर्वी दोन वेळा मी विमानातून नर्मदेचे दर्शन घेतलेले आहेत . आणि क्षणात माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ! कारण विमानातून हे नर्मदेवरचे रेल्वेचे पूल वगैरे स्पष्ट दिसतात ! 
 विमानातून नर्मदा दर्शन
याचा अर्थ विमानातून मी जो प्रदेश पाहिला होता आज त्याच प्रदेशात मातीत झोपून मी विमाने पाहत होतो ! मला मोठी मौज वाटली !   मला एका गोष्टीचे मोठे आश्चर्य देखील वाटले . आपण म्हणतो की आकाश अमर्याद आहे . परंतु सर्वच विमाने अगदी आखून दिल्याप्रमाणे एकाच रेषेतून जात होती . याचा अर्थ विमानांचेही राष्ट्रीय विहंगम महामार्ग असणार ! असो .
पुढे इमली घाट ,करुआ घाट पार करून बेलखेडी गावातील महादेव मंदिराचे दर्शन घेतले .
प्राचीन महादेव मंदिर
अद्भुत शिवलिंग
सिद्ध घाटावरील हनुमान जी आणि सेवादार साधू
अशी छोटी मंदिरे आणि घाट मैयाकाठी हजारोंनी आहेत
या भागातील पायांना सुखद परिक्रमा मार्ग
इथून पुढचा मार्ग बऱ्यापैकी निर्मनुष्य होता . जिथे जिथे मानवी वावर कमी आढळतो तिथे तिथे प्रचंड प्रमाणात पक्षी जीवन आढळते . नर्मदे काठी इथून पुढे मला भरपूर पक्षी पाहायला मिळाले .पाणकोंबड्यांची संख्या आता वाढली होती .
 जांभळी पाणकोंबडी
टिटव्यांची संख्या देखील वाढली . चक्रवाक बदके कमी झाली पण भुरे बगळे ,पांढरे बगळे सुरू झाले .
 ( ब्ल्यू रिव्हर हेरॉन ) भुरा बगळा
बलाकांच्या अर्थात बगळ्यांच्या वरील सर्व जाती नर्मदे काठी आढळतात
टिटवीच्या आवाजाने नर्मदा काठ कायम दुमदुमत असतो . काठाने जाणाऱ्या परिक्रमावासींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न हे पक्षी नेहमी करतात .
निसर्ग वाचनाची उपजत आवड असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने उघड्यावर टिटवी ने घातलेली अंडी नक्की सापडतात .तुम्ही अंड्यांच्या जितक्या जवळ जाल तितक्या टिटव्या आक्रमक होतात . त्यांच्या वर्तनावरून घरटे शोधणे सोपे जाते .
 ससाणे होते . भारद्वाजही होते . परीट पक्षी देखील खूप दिसले . आता मोठमोठे पाण कावळे दिसू लागले .
नर्मदा खंडामध्ये सर्वत्र आढळणारा कोकील वर्गीय भारद्वाज पक्षी
धुळे आपटल्यासारखी शेपटी आपटणारा परीट पक्षी
पाण कावळ्याच्या या सर्व प्रजाती नर्मदेमध्ये आढळतात
पाणकावळे पाण्यातून केवळ डोके वर काढून पोहताना साप चालला आहे असा भास होतो .
 आज नर्मदा मातेमध्ये मी एक सुंदर विरोळा साप देखील पाहिला .
वरील सर्व छायाचित्रे संग्रहित . आंतरजालावरून साभार
आश्चर्य म्हणजे अमरकंटकच्या कुंडामध्ये पाहिलेला भव्य मासा वगळतात अजून पर्यंत तरी मला एकही मासा नर्मदेमध्ये दिसलेला नव्हता . हे फार मोठे आश्चर्य मानले पाहिजे .कारण नर्मदा ही माशांसाठी प्रसिद्ध आहे . कदाचित मी अतिशय काठावरून चालत असल्यामुळे माझ्या पावलांची चाहूल लागून किंवा मला पाहून ते खोल आत जात असावेत . परंतु इथे असलेल्या पाणपक्ष्यांची संख्या पाहता १००% इथे भरपूर मासे होते . असो . हे सर्व सौंदर्य पहात चालताना हळूहळू मनामध्ये विविध विचार येऊ लागले .एक क्षणभरच नर्मदेचे स्मरण सुटले आणि मनातील नामस्मरणाची माला थांबली .इतक्यात काही कळायच्या आत धप्पकन आपटलो . पाच-सहा फूट खोल खड्ड्यामध्ये पडलो . डावा गुडघा चांगलाच बडवला गेला . डोळ्यातून टचकन पाणी आले . क्षणात भानावर आलो . पुन्हा नर्मदेचा गजर केला . आणि जप सुरू केला . जरा जरी जप थांबला तरी मैय्या अशी शिक्षा तत्काळ देते . पाय घसरतो . कधी मुरगळतो . किंवा रस्ताच भटकतो . आज मात्र नर्मदेने मला फार मोठी शिक्षा दिली . मला डाव्या पायाने अक्षरशः चालता येईना . त्यामुळे मी तिच्यावर रागावलो . गुडघा टेकता सुद्धा येत नव्हता इतका तो दुखत होता . मी नर्मदेवर चिडून तिला म्हणालो ,एक क्षणभरच तुझा विसर पडला तर इतकी मोठी शिक्षा कशाला देतेस ? आता मला पुढचे पाऊल देखील टाकता येत नाही . गरिबाने चालावे तरी कसे तुझ्या काठाने ? ते काही नाही . तूच मला बरे कर . असे म्हणून गुडघाभर पाण्यामध्ये जाऊन उभा राहिलो . मला असे जाणवले की माझ्या गुडघ्याला वळसा मारून वाहणारे नर्मदा जल त्यातील वेदना वाहून नेत आहे . बाहेर आलो तो संपूर्ण वेदना मुक्त होऊनच ! पुन्हा एकदा नर्मदेचा जयजयकार केला आणि मार्गस्थ झालो .पायाची वेदना तर गेलीच परंतु पायाला न भूतो न भविष्यती अशी गती प्राप्त झाली .रायखेडी नावाच्या गावातील रायखेडी घाट ओलांडून पुढे सिद्ध घाट येथील हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे निघालो .
या भागातील नर्मदा मैया

पुढे बाराच्या सुमारास गंगई गावात पोहोचलो . इथे एक अति भव्य वडाचे झाड आणि पुरातन देवालय होते .  इथे दादाजी उर्फ धुरंधर दासजी महाराज नामक अतिशय प्रेमळ अशा शतवर्षीय संतांचा आश्रम आहे . लहान मुले , कुत्री , मांजरे सर्वांना इथे अभय आहे व जे हवे ते मिळते .मुले तर बाबांसोबत मित्रासारखी वागत .जे हवे ते उचलून घेत .बाबाही मुलांना फार जीव लावत .मलाही बाबांनी प्रेमाने चहा पाजला . 
धुरंधर दास जी महाराजांच्या आश्रमातील भव्य वटवृक्ष
आश्रमाचे प्रवेशद्वार .समोर एक गवताची कुटी आहे .त्याच्यापुढे महाराजांचे निवासस्थान आहे . 
स्वतःच्या देहापेक्षा अधिक लांबीच्या जटा असलेले शतवर्षीय संत श्री धुरंधर दास जी महाराज
यांच्या आश्रमामध्ये एक जाड जूड तरुण साध्वी बसलेली होती . हिच्या सर्व गप्पा अन्न आणि अन्नपदार्थ या भोवती फिरत होत्या . हिला आज भजी आणि वडे खायची इच्छा झाली त्यामुळे तिला बाबांच्या शिष्याने आलू बोंडे आणि भजी करून खायला घातली . मी देखील भोजन प्रसाद घ्यायला बसलो होतो . मला चार पोळ्या , भात आमटी आग्रहाने खाऊ घातलेच .शिवाय भजी आणि वडे खायला घातले ! सकाळी झाशी घाटावर भजी खाताना माणसे पाहिल्यावर मनात तमिळनाडू मध्ये हॉटेलमध्ये मिळतात तशी भजी खाण्याची सूक्ष्म इच्छा झालेली होती ती नर्मदा मातेने अशा पद्धतीने पूर्ण केली ! नर्मदा म्हणाली खा किती खातोस पाहूया ! साधू आग्रहाने वाढत राहिला आणि पोटाला तडस लागेपर्यंत भजी खाल्ली !आता पुढे एक देखील पाऊल टाकणे अशक्य आहे असे मला जाणवले .त्यामुळे बाहेर बनविलेल्या गवताच्या कुटीमध्ये जाऊन तिथे आधीच टाकून ठेवलेल्या गादीवर अंग टाकले .आश्रमामध्ये मोठ्या आवाजात रामायण लावून ठेवले होते ते ऐकता ऐकता कधी डोळा लागला कळलेच नाही . सुमारे तास दोन तास मी झोपलो असेन . परिक्रमेत अशा पद्धतीने प्रथमच मी दुपारच्या भोजनानंतर वामकुक्षी केली .उठल्यावर गडबडीने पुढे निघालो . आज केवळ पंधरा-सोळा किलोमीटर अंतरच चाललो होतो . चालण्याचे अमूल्य दोन तास मी झोपेमध्ये दवडले . आश्रम सोडला आणि पुढून फिरून न येता वाळूच्या ढिगार्‍यावरून पांदीत उडी मारत खाली उतरलो . पायांना पुन्हा गती दिली . पुढे पुन्हा गंगाई घाट लागला . बेलखेडा घाट लागला . सूर्य हळूहळू अस्ताला जाऊ लागला . तो पाहात जमनी अथवा मुंआर घाटावर पोहोचलो . स्नान केले .एका भक्ताने पन्नास रुपये दक्षिणा दिली .तिथे एक जॅकवेल होती आणि उंच टेकाडावर एक आश्रम व कुटी होती . कुटी मधून एका साधून आवाज दिल्यामुळे वर गेलो . वरती जाणारा रस्ता प्रचंड चढाचा आणि चिखलाने माखलेला अतिशय निसरडा होता .तिथे दोन चार साधू आधीच गप्पा मारत बसले होते .एक बंगाली साधू होता .त्याची नवीनच परिक्रमा होती .इथे दोन-तीन टप्प्यांवर बांधकामे होती . एक बंकर वजा खोली परिक्रमावासींच्या निवासासाठी खाली बांधली होती . तिथे मी सामान ठेवून आसन लावले . माझ्या शेजारी तो तरुण बंगाली होता . माझी बंगाली भाषा ऐकून तो खूप खुश झाला . मी रवींद्र संगीतातील गाणी म्हणून दाखवल्यावर तर तो पाया पडायचाच बाकी होता ! शेपटी सारखा तो माझ्यासोबत फिरू लागला ! इथे दिल्लीचा एक तरुण साधू सेवा देत होता . तसा तो परिक्रमेमध्येच होता परंतु या स्थानावरचा साधू बाहेर गेल्यामुळे त्याला मागे ठेवून गेला होता . या साधूला बहुतेक स्वयंपाक पाण्याचा प्रचंड कंटाळा होता .त्यामुळे त्याने सदाव्रत घेऊन स्वतः करून खा असे मला सांगितले . याने दाढी मिशा देखील ठेवलेला नव्हत्या. मी स्वयंपाकाच्या तयारीला लागणार इतक्यात मोटरसायकल वरून परिक्रमा करणारे महेश्वर चे एक दाम्पत्य तिथे आले . कृष्णकांत नारायण जोशी ( पंडितजी ) असे त्यांचे नाव होते . त्यांचा महेश्वर जिल्हा खरगोन येथे सप्तमातृका आश्रम नावाचा आश्रम होता .त्यांचा मुलगा गोपाळ जोशी याचा क्रमांक त्यांनी मला लिहून दिला . त्यांनी मला सांगितले की तुम्ही स्वयंपाक करू नका आम्ही करतो आहोत . खाली अजूनही काही परिक्रमावासी आहेत हे मी सांगितल्यावर त्या सर्वांचाच स्वयंपाक त्या काकूंनी अतिशय प्रेमाने आणि आनंदाने केला . त्यांनी टिक्कड आमटी करून भरपूर खायला घातली . हे दांपत्य जगन्नाथ कुंटे यांना ओळखत होते .जगन्नाथ कुंटे अर्थात संन्यास आश्रम धारण केल्यावरचे अवधूतानंद स्वामी यांनी त्यांच्या परिक्रमेदरम्यान या दांपत्याची भेट सुद्धा घेतलेली होती .त्याखेरीज ओंकार कुंटे म्हणून पुण्यातील एक परिक्रमावासी यांचा चांगला मित्र होता असे त्यांनी मला सांगितले . आज या दांपत्याला भेटून मला जगन्नाथ कुंटे यांची झालेली भेट स्मरली . त्यांच्या परिक्रमे वरील एका व्याख्यानाला मी पूर्वी गेलेलो होतो . एका मागोमाग एक सिगरेट पेटवत नर्मदा मैया च्या आठवणी सांगणारे कुंटे चांगले स्मरणात राहिले होते .त्यांच्या पुस्तकातील आठवणी मध्ये सतत ताक प्यायला मिळाल्याचा उल्लेख असायचा . परंतु अजून तरी मला नर्मदे काठी कुठे ताक प्यायला मिळाले नव्हते .असा विचार मी करत होतो इतक्यात दिल्लीचा साधू तांब्याभर ताक घेऊन बाहेर आला . आणि म्हणाला मी काहीच करून खायला घातले नाही असे तू कोणाला सांगायला नको म्हणून मी तांब्याभर ताक बनवले आहे ! घे !  थंडी खूप असल्यामुळे अन्य कोणालाच ताप नको होते त्यामुळे सर्व ताक मीच प्यायलो ! नर्मदेची लीला अगम्य आहे ! 
इथे शेकोटी करून अजून एक परिक्रमावासी बसला होता . त्याला अपघात झाल्यामुळे अपंगत्व आले होते .तरीदेखील तो गाडीवरून परिक्रमेला निघाला होता .त्याच्याशी थोडेसे बोलून घाटावर आलो .शेजारी असलेल्या जॅक वेलवर जायला एक पुल केलेला आहे . इथून घाटावरचे दृश्य खूपच सुंदर दिसते .
इथे संध्याकाळी नर्मदेची सुंदर आरती होते . हा घाट फार सुंदर आहे . इथे समोरच्या तटावर वाळू उपसण्याचे मोठे काम चालते . बाकी सर्वत्र झाडी आहे . इथे नर्मदा एक सुंदर झोकदार वळण घेते आणि खळाळत वाहते . त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात धुक्याची निर्मिती होते .
घाटावर उतरण्याचा मार्ग अतिशय धोकादायक आणि निसरडा होता . त्यामुळे हळूहळू अंदाज घेत उतरलो . नर्मदा महाआरती समितीचे कार्यकर्ते आले होते .त्यांनी नुकताच इथे पक्का घाट बांधला आहे असे सांगितले .लवकरच घाटावर गाड्या येतील अशी व्यवस्था ते करणार होते . घाटावर एक छोटेसे नर्मदा मंदिर होते . पाणी उथळ असल्यामुळे इथे खूप लोक स्नानासाठी येतात .जबलपूर जिल्ह्यातील हे शेवटचे गाव आहे . इथून पुढे नरसिंहपूर जिल्हा सुरू होतो . वाचकांच्या दर्शनाकरता घाटाची काही रूपे संकलित छायाचित्रांच्या रूपाने दाखवीत आहे .
 मुँआर घाट
समोरच्या तटावरून मुआर घाट असा दिसतो .जॅकवेल तिचा पूल आणि उजव्या हाताला उंच टेकडीवर आश्रम दिसत आहे .घाटावर लागलेल्या दोन गाड्यांच्या वर तिरका मातीचा उतार देखील दिसतो आहे . बगरई येथील कारागिरांनी बनविलेली संगमरवरी जलहरी आपल्याला दिसते आहे .
पर्व काळामध्ये आणि उत्सव प्रसंगी मुआर घाटावर स्नानासाठी प्रचंड गर्दी असते
दुर्गा पूजेला मुआर घाटावर विसर्जित केले जाणारे घट.ही रोपे पुढे जाऊन उगवतात आणि चांगल्या बीजाचा सर्वत्र प्रसार होतो .सोबत स्वच्छ नर्मदा जल .
उत्सवामध्ये नर्मदे मध्ये सोडले जाणारे दिवे फारच मनोहर दिसतात ! यातील तुपाच्या वाती नंतर मासे खाऊन टाकतात . पूर्वी कणकेचे दिवे करून पानावर सोडले जायचे ती अधिक योग्य पद्धत होती .आज-काल वरील चित्र दाखविल्याप्रमाणे प्लास्टिकचे आवरण असलेले द्रोण /दिवे येतात जे पर्यावरणासाठी घातक आहेत .
 मुआर घाट
नर्मदा महाआरती मंडळांने बांधलेला प्रेक्षा सज्जा
मुआर घाटावरून पहाटे दिसणारे नर्मदेचे रम्य रूप
नेहमीप्रमाणे पहाटे लवकर जाग आली . सत्यजित दत्त नावाचा तो बंगाली परिक्रमावासी थांब म्हणत होता परंतु मी हळूहळू चालत ये असे त्याला सुचवून पुढे निघालो . निघताना दिल्लीच्या साधूने गरमागरम चहा करून पाजला . तो ताज्या घट्ट दुधाचा चहा फारच अप्रतिम होता ! आज वसंत पंचमीचा दिवस होता .त्यामुळे काठावर पहाटेपासून लोकांची रीघ लागलेली होती .मी नर्मदेला साष्टांग नमस्कार केला . परंतु बहुतेक सर्वांसमोर मी तिला नमस्कार केलेला तिला आवडले नसावे . त्यामुळे उठून वळलो आणि ठसकन पायाच्या नडगीला एक पायरी लागली आणि नडगी फुटून रक्ताची धार वाहू लागली . आधीच मरणाची थंडी आणि त्यात आता हे नवे दुखणे उद्भवले की काय असे वाटले . परंतु नर्मदा मातेनेच दिलेले असल्यामुळे कणभरही दुखले नाही . समोरचे दृश्य पाहून सर्व वेदना विरघळून गेल्या ! प्रचंड धुक्यामध्ये नर्मदा हरवली होती ! सूर्य थोड्या वेळाने उगवला तरीदेखील त्याचे बिंब एका पांढऱ्या ठिपक्यासारखे दिसत होते . चालताना ताज्या ताज्या गव्हाच्या अंकुरांवर साचलेल्या दवाने सर्व जखम धुवून टाकली आणि पाय खडखडीत बरा झाला ! मैयाचे म्हणणे इतकेच असावे की आपली भक्ती अशी सर्वांसमक्ष दाखवू नकोस ! सार्वजनिक ठिकाणी तुम्ही प्रेयसी वरचे प्रेम कधी उघडपणे व्यक्त करून पहा ! लगेच एक फटका मारला जातो ! तसेच काहीतरी इथे घडले . असो .आज न भूतो न भविष्यती असे धुके सर्वत्र दाटले होते .शेजारी शांत वाहणारा प्रवाह अचानक काही काळ खळखळून वाहत होता व त्यातून या दाट धुक्याची निर्मिती अविरतपणे होत होती . हे धुके इतके दाट होते की श्वासालाही जाणवत होते . त्याने सूर्याला पूर्णपणे गिळंकृत करून टाकले होते . अक्षरशः स्वर्ग ! शेजारी खळाळून वाहणारी रेवामाई .पण धुक्याच्या दाट पडद्याआडून .कुठून कुठे चाललोय काहीच कळत नव्हते . थंडीमुळे सर्वच स्तब्ध झालेले .अद्भुत शांतता ! परिक्रमेतील पहाटेचा प्रवास सर्वोत्तम असतो तो याचसाठी ... आता पुढे लागणार होते ब्रह्मकुंड नावाचे तीर्थक्षेत्र . राक्षसांचा विजय झाल्यामुळे पराभूत झालेल्या सर्व देवांना ब्रह्मदेवाने याच घाटावर तपश्चर्येसाठी बसविले होते . अशी कथा नर्मदा पुराणामध्ये आहे . अतिशय पवित्र असा हा घाट आहे . इथे नर्मदा वळण घेत असल्यामुळे घाट खोल पाण्यामध्ये आहे . इथे दोन तरुण महिला शंकराला अभिषेक करत होत्या . मी आल्यावर दोघींनी माझे पाय दूध आणि पाण्याने धुतले . दोघींना मनापासून आशीर्वाद देऊन पुढे चालायला लागलो . खरे तर गृहस्थी माणसाला अशा प्रकारांची सवय नसते . परंतु अशावेळी तुम्ही तुम्ही राहत नाही तर तुमच्या देहाचा ताबा नर्मदा माता घेते . अशाप्रसंगी ती तुमच्याकडून काय काय करून घेईल याचा काहीही नेम नसतो . वाचकांना दर्शन व्हावे म्हणून ब्रह्मकुंडाची काही चित्रे सोबत देत आहे .
पवित्र आणि खोल ब्रह्मकुंड घाट . या घाटावर मी नर्मदा मातेच्या पातळीवरून चालत चालत  हातातील दंड पाण्यामध्ये बुडवत आलो ,वर दिसणाऱ्या चबुतऱ्यावर दोघींनी माझे पाय धुतले आणि मग तिथून खाली उतरून तसाच पुढे गेलो . 
 स्वच्छ पवित्र नर्मदाजल
 ब्रह्मकुंड घाटावरील मंदिरे
येथे सर्व देवांनी तप केलेले असल्यामुळे बऱ्याच देवता आढळतात
 त्यातील राम मंदिर
 हनुमानजी ब्रह्म कुंड
ब्रम्ह कुंडाचे दर्शन घेऊन जमिया गावातून पुढे सिद्ध घाट नावाचा घाट पाहिला . एका महा भव्य वटवृक्षाखाली प्राचीन मंदिरे आहेत . यानंतर बुधघाट लागतो . हे बुधगाव नावाचे गाव आहे . येथे बुधग्रहाने तपश्चर्या केली होती अशी श्रद्धा आहे . अभीरामदास नामक उत्तर प्रदेशातील अयोध्येचा एक साधू इथला मठ सांभाळत होता . त्याने मला सदाव्रत दिले . वाटीभर तांदूळ आणि वाटीभर डाळ देवून खिचडी करून खायला सांगितले . मी एका कोपऱ्यात चूल बनवून लाकडे गोळा करून खिचडी शिजायला लावली .चुलीवर मी एकट्या पुरती खिचडी केली होती परंतु अचानक तीन-चार परिक्रमावासी आले . त्यांनी स्वयंपाक करण्यास नकार दिला . मग त्या सर्वांना थोडी थोडी खिचडी वाढली . मी घासभरच खाल्ली . इथे थोडीशी वादावादी झाली . मला चुलीवर स्वयंपाकाची फारशी सवय नसल्यामुळे खिचडी थोडीशी खालून लागली होती . त्यावर आलेल्या चौघांपैकी एक म्हातारा मला बोलला . परंतु मला अपेक्षित नसताना अभिरामदास महाराज माझा पक्ष घेत त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला ! अखेरीस मी सर्वांना शांत केले आणि जेवायला वाढले .सर्वजण तृप्त होऊन झोपी गेले . इथे ताडाची काही झाडे होती . पूर्वी तमिळनाडू मध्ये असताना माझ्या एका मित्राच्या सोबतीने मी दहा हजार पेक्षा अधिक ताडाची झाडे तिकडे लावली होती . तो तामिळनाडूचा राज्यवृक्ष आहे . परंतु त्या झाडाबाबत इथल्या लोकांना काहीच माहिती नव्हती . मी आश्रमातील जमलेल्या सर्व लोकांना त्या झाडाची इत्थ्यंभूत माहिती सांगितली . सर्वांना खूप आनंद वाटला . कारण हे निरुपयोगी झाड आहे असे वाटून ते तोडण्याचे नियोजन चालले होते ते आता बारगळले . इथे आलेल्या एका ग्रामस्थांनी माझे काही फोटो काढले . माझ्याकडे फोन नाही सांगितल्यावर मी दिलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी फोटो पाठवून दिले . बुध घाटाचे काही फोटो खालील प्रमाणे .
बुध घाट येथील आश्रम
इथे राहणाऱ्या अभिरामदास साधूने माझे चांगली परीक्षा पाहिली .
इथे पूर्वी एक प्राचीन मंदिर अस्तित्वात होते याचे अवशेष आपल्याला सहज दिसतात . मंदिराच्या कळसाचा आमलक व त्यावर ठेवलेली मारुतीची मूर्ती .
बुध घाटावरील काही देव . डावीकडे ताडाच्या एका झाडाचे खोड दिसते आहे .
बुध घाटावर काढलेला प्रस्तुत लेखकाचा फोटो
बुध घाटावरून दिसणारे नर्मदेचे विहंगम दृश्य
बुध घाटावरील ताडाचे झाड व सोबत प्रस्तुत लेखक
                      ॐ बुधाय नमः ।
मी बुध घाटावर अन्य परिक्रमा वासींना माझ्या घासातला घास काढून दिला खरा . परंतु नर्मदा मातेला सर्वांची कशी काळजी असते पहा ! .पुढच्याच सांकल गावामध्ये दोन ठिकाणी मला भोजनप्रसाद मिळाला ! या घाटाचे पौराणिक नाव शांकर घाट असे आहे कारण इथे आद्य शंकराचार्यांना त्यांच्या गुरुंनी गुरु दीक्षा दिली होती अशी मान्यता आहे . शंकराचार्य दक्षिण भारतातून आले ते थेट या घाटावर आले इथूनच त्यांनी नर्मदा नदी ओलांडली आणि पलीकडच्या तटावर असलेल्या गुफेमध्ये तपश्चर्या केली . त्यामुळे शांकर असे नाव पडलेला हा घाट .त्याचा अपभ्रंश होऊन लोक आता साकल घाट असे म्हणतात . इथे मी काठाकाठाने जात असताना काही लोकांनी एका टेकाडावरून मला आवाज दिला . वरती एक साधू नुकताच नर्मदे किनारी येऊन राहिला होता . त्याच्या आगमना प्रित्यर्थ गावकऱ्यांनी भंडारा ठेवला होता . साधू साठी एक मोठी कुटी गावकऱ्यांनी बांधली होती . साधू महाराजांचे दर्शन घेऊन मी भोजन प्रसाद घेतला आणि पुढे निघालो . पुढे नर्मदा वळण घेते तिथे वाळूचा मोठा किनारा आहे .या ठिकाणी एक त्याच गावातला युवक नर्मदा परिक्रमा उचलत होता त्यामुळे त्याने कढाई ठेवली होती . ती सुरू असतानाच एक परिक्रमावासी आला हा शुभ शकुन मानून त्या सर्वांनी खाली बसवून माझे पूजन केले आणि मला देखील पुन्हा एकदा जेवायला वाढले ! त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका उत्साही युवकाने माझे फोटो सेशन केले ! परंतु माझ्याकडे फोन नाही कळल्यावर मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिले . 
 सांकल घाटावर प्रस्तुत लेखक . इथे समोरून हिरन नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते . पुढे शेर नावाची देखील एक नदी आहे ! हा फोटो पाठवताना त्या मुलानेच एडिट करून अक्षरे टाकलेली आहेत .
परिक्रमा वासीला दिलेल्या नवीन कपड्याचा बॉक्स शेजारी पडलेला आहे .
नर्मदे काठी भक्त मंडळी पांढरा व लाल झेंडा लावतात .
ही वाळू भट्टी सारखी तापलेली असते .
सावली वरून तुम्हाला वेळेचा अंदाज येईल . 
या परमपवित्र स्थानावर काही वेळ घालवायला मिळाला हे माझे भाग्य ! नर्मदा मातेला सर्व काळजी असते ! मागे देखील ब्रह्म घाटाजवळ एका अतिशय गरीब शेतकऱ्याने मला अंगावरचे एखादे वस्त्र द्या असे सांगितले . मी त्याला माझ्या जवळील एक वस्त्र शाल वगैरे देऊन टाकले . नंतर पुढे आल्यावर मला कळाले की त्या घाटावर वस्त्रदानाचे फार महत्त्व आहे ! नर्मदा माता अशा पद्धतीने जिथे जिथे जे जे करणे आवश्यक आहे तिथे ते ते माझ्याकडून करून घेत होती .सर्व आपोआप घडते .
काय अद्भुत योगायोग आहे पहा ! मी हा प्रसंग लिहीत असताना माझ्या सद्गुरूंनी नेसलेले अंग वस्त्र प्रसाद स्वरूप घेऊन एक भक्त आत्ता थोड्याच वेळापूर्वी घरी आले आणि त्यांनी ते वस्त्र मला अर्पण केले ! थोडक्यात माझ्याजवळ असलेले वस्त्र पुन्हा माझ्याकडे आले ! जय हो माई की ! जय सद्गुरु ! 
 सांकल च्या पुढे खूप चालल्यावर महादेव पिपरिया नावाचे गाव आले . या गावामध्ये शिरण्यापूर्वी अद्भुत अनुभव आला . इथे मैया दोन शाखांमध्ये विभागते आणि डावीकडे वळत तीव्र उजवे वळण घेते . त्यातली उजवीकडची शाखा विस्तीर्ण , उथळ आणि हळू आहे . तर डावीकडची शाखा अरुंद , अति खोल आणि अति वेगवान आहे . जिथे जिथे मैया असे वळण घेते तिथे ती वाळूचा किनारा उभा कापत जाते . मला याचा अजून फारसा अंदाज आलेला नव्हता . आपल्या डोक्यात एकच गणित असायचे की किनारा सोडायचा नाही . त्याप्रमाणे एकही ठिकाणी जाता जाता माझा मार्ग संपला . समोर वाळूचा उभा किनारा आणि खाली खोल नर्मदा मैया . आता मागे देखील जाता येणार नाही आणि पुढे देखील जाता येणार नाही अशा परिस्थितीत अडकलो असताना अचानक एक माकड माझ्यावरून तोच कडा वेगाने पार करत पुढे निघून गेले . त्याची गती बघून मला पुढे जाण्याची युक्ती कळाली . मी प्रत्येक पाऊल स्थिर करायचा प्रयत्न करत होतो त्यापेक्षा वेगाने पावले टाकत गेले की वाळूचा खंड तुटायच्या आत पुढे जाता येत होते . तसा मी झरझर गेलो आणि तो टापू पार केला गेला ! पुढे पुन्हा एकदा तसेच वळण आले . हे तेच वळण जिथे नर्मदा वेगाने आणि खोल वाहते . हिमालयातून गंगा खाली येताना कोणी पाहिली असेल तर तिची कशी गती असते तशा पद्धतीने इकडे नर्मदा वाहते . इथे छोट्याशा वळणावर भरपूर शिवलिंगांचा खच पडला होता . ती पहात पहात मी पुढे जात होतो इतक्यात माझे लक्ष नर्मदेच्या काठावर बसलेल्या एका वेडसर बाई मुळे तिकडे गेले . तिचे नाव द्रौपदी होते . तिने लहान मुली सारखा फ्रॉक घातला होता . आणि पाण्यात खेळत बसली होती . दुरून पाहिले तर लहान मुलगी आहे असे वाटायचे . जवळ गेल्यावर कळायचे की ही चांगली सत्तरी पंचाहत्तरीची ची म्हातारी आहे . मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला परंतु ती वेडसर आहे असे माझ्या लक्षात आले . मी तिला विचारले पुढे रस्ता आहे का ? ती म्हणाली " जाओ । जाओ । सीधा जाओ । मैय्या है । जाओ । " मी जिथून इथे पोहोचलो तो रस्ताच नव्हता आणि ही वेडसर बाई इथे पोहोचली आहे म्हणजे कुठलातरी रस्ता असणार आणि तो पुढचाच रस्ता असेल असे वाटून मी पुढे चालायला लागलो . तसेही नर्मदे काठी कोणत्याही मातारामने काहीही सांगितले तरी ते नर्मदेनेच सांगितले असे मानून ऐकायचे असा दंडक मी स्वतःला घातलेला होताच .पुढे चालत राहिलो .
हळूहळू पायाखालची पायवाट अरुंद होत गेली आणि वाळूचा उभा कडा लागला . दोन पावलांची पायवाट हळूहळू एका पावलाची झाली . थोड्यावेळाने मातीची उभी भिंत समोर आणि खाली प्रचंड वेगाने वाहणारी नर्मदा माई असे चित्र दिसू लागले . आता मला पुढे पाऊल टाकण्यासाठी जागाच नव्हती त्यामुळे मी एक पाऊल ठेवण्यासाठी असलेल्या जागेवर उभा राहिलो .इथून पुढे जायला रस्ता दिसत नव्हता .आणि मागे परत जावे तर वळता येणे शक्य नव्हते अशा जागेवर मी उभा होतो .नर्मदेचे पात्र माझ्यापासून खाली पाच-सहा फूट होते .अति प्रचंड वेगाने आवाज करत नर्मदेचे पाणी वाहत होते . त्या पाण्याचा खळखळाट अतिशय भयानक वाटत होता .  आता पुढे कुठे जावे ? कसे जावे ?असा विचार करत मी उभा होतो .क्षणभर मी असा देखील विचार करून पाहिला की चक्क पात्र मध्ये उडी मारावी आणि पोहत हा टापू पार करावा . परंतु पाण्यामध्ये खडक असण्याची शक्यता होती ज्यांनी माझा कार्यक्रम केला असता .इतक्यात मला काही कळायच्या आतच माझ्या पायाखाली असलेला मातीचा तो छोटासा तुकडा तुटला आणि मी थेट पात्रामध्ये पडलो ! चांगला कमरे एवढ्या पाण्यामध्ये बुडालो ! आता मी नर्मदेमध्ये वाहून जाणार इतक्यात माझ्या असे लक्षात आले की माझ्या डाव्या हातामध्ये कुठल्यातरी झाडाचे मूळ अडकलेले आहे . मी चटकन ते घट्ट पकडले . माझ्या उजव्या हातात काठी होती . तो दंड आपोआप फिरून खाली गेला आणि माझ्या पायाखाली डाव्या हाताला असलेल्या मातीच्या भिंतीमध्ये जोरात घुसला . त्यामुळे माझ्या दोन्ही हातांना आता चांगला आधार मिळाला . एका हातात औदुंबराचे मूळ आणि दुसऱ्या हातात माझ्या पायाखाली जाऊन रुतलेला दंड त्याचा आधार होता . परंतु पाण्याच्या गतीमुळे माझे पाय पाच-सहा फूट पुढे गेले होते ! काही केल्या ते मला जवळ घेता येईनात इतका पाण्याला वेग होता . माझे सामान आणि कमरेपर्यंत मी पूर्णपणे भिजलो होतो . मला क्षणभर काय करावे काही सूचेना . चक्क सर्व सोडून नर्मदेमध्ये उडी मारावी असा देखील विचार केला . परंतु त्या परिस्थितीमध्ये दंड मागे राहिला असता आणि दंड तर सोडायचा नसतो .  मी जोरात नर्मदेला हाक मारली .इतक्यात माझ्या लक्षात आले की पाय सरळ मागे येत नसले , तरी डावीकडे मातीच्या भिंतीवर हळूहळू मी चढलो तर पाय वर जात आहेत आणि पाण्यातून बाहेर पण निघत आहेत . कल्पना करून पहा ! माझ्या डाव्या हातात औदुंबराचे मूळ आहे . उजव्या हातात काठी घट्ट पकडलेली आहे . आणि या दोघांच्या आधारे मी प्रतिघटीवत् ( अँटीक्लॉकवाईज ) गतीने मातीच्या  भिंताडावर उलटा वर जातो आहे . एक क्षण मी खाली डोके वर पाय अशा स्थितीमध्ये आलो . माझे दप्तर डोक्याच्या खाली लटकले . आणि काही कळायच्या आत मी मागच्या बाजूला पाय टाकले . जिथे बरोबर दोन पावले मावण्या इतकी जागा होती ! पायाखाली काहीतरी टोचले म्हणून पाहिले तर एक सुंदर शिवलिंग तिथे होते ! ते उचलून चटकन मी उलटा मागे पळालो ! दंड तिथेच खोचलेला होता तो मी जागेवर उपसून काढला ! ओले दप्तर मी काढून टाकले ! आणि त्या वाळूमध्ये उताणा पडून राहिलो ! एका मोठ्याच प्रसंगातून नर्मदेने मला वाचविले होते !
हीच ती जागा जिथे वर वर्णन केलेला प्रसंग घडला .हा फोटो समोरच्या घाटावरून काढलेला आहे .अलीकडे दिसते आहे ती नर्मदेची मोठी आणि शांत शाखा आहे . मी पलीकडच्या अरुंद वेगवान शाखेमध्ये पडलो .
याच ठिकाणी वरील प्रसंग घडला . आता रस्ता कसा निमुळता होत गेला होता ते आपल्या लक्षात येईल आणि पाण्याचा प्रवाह कसा वेगवान झाला आहे ते देखील दिसेल . 
 मी मला मिळालेले शिवलिंग निरखून पाहू लागलो ! मला अगदी जसे हवे होते तसे हे शिवलिंग होते ! हे संगमरवराचे होते परंतु याच्यामध्ये मिश्र दगड होता . याच्यामध्ये नैसर्गिक त्रिपुंड्र काढलेले होते . एक छोटासा त्रिशूळ देखील होता ! मला जे हवे ते मिळाले होते ! परंतु ते मिळण्यासाठी नर्मदेने फार मोठी परीक्षा घेतली . काठावर पास होणे कशाला म्हणतात ते मला त्या क्षणी कळले ! नाहीतर बुडालोच होतो ! किमान वाहवत तरी नक्की गेलो असतो ! त्या शिवलिंगाला मी पुढे  परिक्रमा संपल्यावर ओंकारेश्वर मध्ये जलहरी विकत घेतली .आपल्या दर्शनाकरता त्याचे फोटो टाकत आहे .
हेच ते महादेव पिपरिया घाटावर मिळालेले शिवलिंग .यातली खालची जलहरी आणि नागोबा नंतर ठेवलेला आहे . इथून पुढे संपूर्ण परिक्रमेमध्ये मी या शिवलिंगाची पूजा केली . नीट पाहिले असता तुम्हाला आडवा त्रिशूल उजव्या बाजूला दिसेल .
या शिवलिंगावर अनेक  शुभचिन्हे अंकित आहेत . पहाल तितके ओम याच्या मध्ये सापडतात . त्रिपुंड्र आणि त्रिशूळ स्पष्टपणे दिसतात . डोक्यावर जटाभार बांधल्यासारखी नक्षी पण आहे . पुढे अनेक संतांनी हे शिवलिंग पाहिले आणि त्याचे तोंड भरून कौतुक केले ! सर्वांनी एकमुखाने याचे नाव नर्मदेश्वर असेच ठेवले ! 
नर्मदेश्वर झोळी मध्ये ठेवला आणि शांतपणे शेतातील मार्ग पकडून महादेव पिपरीया गावात आलो .या गावामध्ये मोठी जत्रा भरली होती . माझे सर्व कपडे भिजलेले होते . मला बघून लोक हसू लागले .मला देखील माझे स्वतःचेच हसू येत होते . फार मोठ्या प्रसंगातून नर्मदेने वाचवले ! तिचा जयजयकार ! तोच जयजयकार करत गावातील धर्मशाळा गाठली . वाटत काही लोकांनी मला अडवले आणि सांगितले तुम्ही या गावात राहू नका . वसंत पंचमीचा मेळा असल्यामुळे कोणीही ताळ्यावर नाही .तसेच आज पोलीस मेळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत कारण करोनाची पुन्हा लाट आली आहे .  अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खायला कोण देणार ? मी म्हणालो जिच्यासाठी निघालो आहे तिला माझ्या पोटाची काळजी आहे . तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही . अखेरीस आज तुम्हाला उपाशीच झोपावे लागणार असे आग्रहपूर्वक सांगत त्या माणसाने मला धर्मशाळा दाखवली . धर्मशाळा कसली ती ? जणू काही सार्वजनिक कचरा पेटी होती ! बाजारातील सर्व कचरा तिथेच टाकण्यात आला होता . आत मध्ये प्रचंड धुळ होती . मी एक झाडू तयार केला आणि कचरा झाडू लागलो . प्लास्टिकच्या बाटल्यांचा तर खच पडला होता . सुमारे अर्धा तास स्वच्छता करून मी माझे आसन लावले . या धर्म शाळेची काही चित्रे आपल्याकरता सोबत जोडत आहे .
महादेव पिपरिया येथील धर्मशाळा
डावीकडे दिसणाऱ्या दारातून आत जाऊन त्या खोलीमध्ये मी माझे आसन लावले . कारण आत्ता जिथे निळे आसन लावलेले दिसत आहे तिथे व्यापारी दुकाने लावून बसले होते .
इथेच स्वयंपाक करून खाण्याची सोय म्हणजे चूल दिसत होती . 
मी शांतपणे आसन लावून बसलेलो असताना गावातील एक मनुष्य आत मध्ये आला आणि माझ्यासमोर बसला . हा मनुष्य माझी चौकशी करू लागला . कुठून आलो कसा आलो वगैरे विचारताना मी ओला कसा झालो हे देखील त्याने विचारले . मला सापडलेले शिवलिंग मी त्याला दाखवले . तो मनुष्य भलताच खुश झाला ! आणि म्हणाला आपली हरकत नसेल तर कृपया आपण माझ्या घरी आज मुक्काम करावा . तसाही आज बाजाराचा दिवस असल्यामुळे आणि वसंत पंचमीचा मेळा असल्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत विश्रांती मिळणार नाही . मी माझा बोरिया बिस्तर उचलला आणि त्याच्या मागे चालू लागलो . मध्ये महादेवाचे एक सुंदर मंदिर लागले . मी त्यांना म्हणालो की आपण आधी देवाचे दर्शन घेऊ मगच घरी जाऊ . 

महादेव पिपरिया घाटावरील मेळा
धर्म शाळेकडून मंदिराकडे येणारा घाट रस्ता . समोर नर्मदा मैया
जबरेश्वर महादेव मंदिर समोर समूह
 मंदीराचे आवार
देवालयाचे हे छोटेसे प्रवेशद्वार बघून कोणाला अंदाज येऊ शकेल की आत मध्ये काय ठेवलेले आहे
 ?
मुख्य मंदिर छोटेसे होते . अंधाऱ्या दरवाजातून आत प्रवेश केला मात्र माझे डोळेच दिपले ! कारण समोर सात-साडेसात फूट उंचीचे महादेवाचे शिवलिंग होते ! इतके मोठे शिवलिंग मी आजवर कोठेच पाहिलेले नव्हते ! म्हणजे तसे तंजावरच्या बृहदिश्वराचे शिवलिंग किंवा अलीकडे जग्गी वासुदेव यांनी कोइंबतूर येथे आश्रमात स्थापन केलेले ध्यानलिंग ही आकाराने मोठी शिवलिंगे मी पाहिलेली आहेत . परंतु ती मानवनिर्मित आहेत . नैसर्गिक नाहीत .हे निसर्गनिर्मित शिवलिंग होते !
जबरेश्वर महादेवाचे दर्शन घेताना प्रस्तुत लेखक . कपडे अजूनही संपूर्ण ओले आहेत ! मागे पडलेली शिवलिंगाची सावली पहावी !
 स्वयंभू जबरेश्वर महादेव
हे स्थान अत्यंत जागृत आहे .
हे शिवलिंग  सुमारे दोन अडीच फूट जमिनीमध्ये गाडलेले आहे . याची एकूण उंची साडेसात फूट आहे .
अत्यंत भयानक प्रवाहतही जिची अजिबात भीती वाटली नाही अशी ही भीतीहारी नर्मदा मैया आहे ! आणि तिच्या काठी असलेल्या या जबरेश्वराची कथा देखील अद्भुत आहे ! मला घेण्यासाठी आलेल्या सदृहस्थांचे नाव होते हनुमत् सिंह घोषी (ठाकूर) . महादेव पिपरिया या गावाचे नाव पूर्वी फक्त पिपरीया होते . पिंपरीच्या झाडावरून पडलेले हे सर्वसामान्य नाव . पुढे गावातील एका मनुष्याला स्वप्नामध्ये येऊन महादेवांनी दृष्टांत दिला . त्यांनी सांगितले इथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या एका डोंगरावर मी आहे . मला इकडे घेऊन ये . याने सुरुवातीला दुर्लक्ष केले .परंतु पुन्हा पुन्हा स्वप्न पडू लागल्यावर तो शोध घेण्यासाठी त्या डोंगरावर गेला . त्याने भरपूर शोधले परंतु त्याला काही शिवलिंग सापडले नाही . मुळात तो एक इंचापासून एक फुटापर्यंत आकाराची शिवलिंगे शोधत होता . त्याच्या स्वप्नातही आले नसेल की त्याला दृष्टांत देणारे देव "महा"देव आहेत ! अखेरीस महादेवांनी स्वतः तो डोंगर सोडून रोज थोडे थोडे अंतर चालायला सुरुवात केली ! अर्थात गावातील गुराखी पाहायचे की रोज हे शिवलिंग थोडे थोडे गडगडत पुढे पुढे येत राहिले . उतार संपेपर्यंत शिवलिंग आले परंतु पुढे चढावर देखील ते आपोआप चढू लागले ! अखेरीस आत्ता त्याची जी जागा आहे तिथे आल्यावर ते स्थिर झाले ! त्यानंतर लोकांनी आजूबाजूला मंदिर बांधले . जबर म्हणजे मोठा म्हणून या महादेवाचे नाव जबरेश्वर ठेवले ! ही कथा ऐकत हनुमंत सिंग यांच्या घरी गेलो .हे सद्गृहस्थ अत्यंत भाविक होते . यांनी ओसरी मध्येच माझ्यासाठी एक स्वतंत्र खोली मला दिली . शेणाने सारविलेली ही खोली अत्यंत उबदार होती . माझा शिवलिंगाचा प्रसंग ऐकून त्यांच्या अंगावर काटा आला . कारण ती जागा त्यांना चांगली माहिती आहे . त्या म्हातारीचे नाव द्रौपदी आहे हे यांनीच मला सांगितले . मी केलेल्या वर्णनावरून त्यांनी तिला ओळखले . परंतु ती तिथे कधीच नसते हे देखील त्यांनी मला सांगितले . ती कसे बोलत होती हे मी बोलून दाखवल्यावर ते मनापासून हसू लागले ! मी तिची हुबेहूब नकल करत होतो असे त्यांना वाटले . असो . रात्री अतिशय उत्कृष्ट असे घरगुती भोजन मला मिळाले . हनुमंत सिंह नावाप्रमाणे व्यासंगी होते . त्यांचा शास्त्रांचा खूप चांगला अभ्यास होता . अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते तसेच त्यांचे पाठांतर देखील चांगले होते . आणि या सर्वां उपर नर्मदे काठी राहिल्यामुळे त्यांना माणसे ओळखण्याची खूप चांगली कला अवगत होती . मी गावात आल्याचे कर्णोपकर्णी त्यांच्या कानावर पडले .तसे ते धर्मशाळेमध्येच सदावर्त आणून देतात . परंतु त्यांना काय वाटले कोणास ठाऊक . त्यांनी मला घरी बोलावले . साधू लोक मात्र कटाक्षाने गृहस्थी लोकांच्या घरामध्ये राहायला जात नाहीत . मला हा नियम सुरुवातीला माहिती नव्हता . परंतु सुदैवाने मोहन साधूने परिक्रमेत कसे वागावे वगैरे सांगितले असल्यामुळे माझ्या हातून कुठलीही चूक किंवा प्रमाद कधीच घडला नाही . गृहस्थांच्या घरी राहायला न जाण्याची अनेक कारणे असतात . सर्वात महत्त्वाचे म्हणजे बरेचदा गृहस्थलोक त्यांच्या दुःखांचा पाढा साधूकडे वाचून दाखवतात . आता तुम्ही आपण होऊन जो संसार पत्करला आहे त्याला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे ?तो कसा का असेना निभावणे हेच मुख्य कर्तव्य नाही का ! असे साधूंचे म्हणणे असते .जे रास्त देखील आहे . असो . रात्री हनुमान सिंह रामायण भजनाला जाणार होते . मी भजनाला येणार का असे त्यांनी मला विचारले . मी मोठ्या आनंदाने होकार दिला ! रात्री अकराच्या सुमाराला ते मला घेऊन गेले . गावातीलच एकाच्या घरामध्ये भजन होते . तिथे क्रमाक्रमाने पेटी , ढोलक ,झांजा , टिमकी ,चिपळ्या ,चिरैया नावाचे एक अद्भुत वाद्य आणि माझे तोंड असे सर्व एकेक करून वाजविले ! चिरैया म्हणजे लाकडाची एक चिमणी असते जी लाकडी पंख आपटून खूप सुंदर आवाज करते ! 
इथे अमरावतीच्या पिंपळखुटा आश्रमातील धीरज नावाच्या सेवेकर्यांसारखा हुबेहूब दिसणारा एक मुलगा भेटला . रामायण भजन बरच काळ चालले . मला भजनात रस आहे हे कळल्यावर त्यांनी वेळेचे काही बंधन ठेवले नाही ! एका भजनकऱ्याने काही फोटो काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. ते आपल्यासाठी देत आहे .
महादेव पिपरीया गावामध्ये रामायण भजन करताना प्रस्तुत लेखक . सोबत ग्रामस्थ मंडळी .पंतप्रधान आवास योजनेतील साध्या घरामध्ये अगदी माईक वगैरे लावून रात्रभर भजन चालले होते ! मी सध्या चंडा वाजवतो आहे .
भजनातील अजून एक क्षण
भजन संपल्यावर त्यांनी माझा सत्कार करून खांद्यावर पांघरलेली शाल मला दिली . आज सकाळीच मी अजूनही प्रचंड थंडी असूनही माझी शाल एका शेतकऱ्याला दिली होती . लगेच मैयाने परतफेड केली . हाच तो मुलगा जो धीरज भाऊ सारखा दिसत होता . 
पहाट होताना हनुमंत सिंह आणि मी पुन्हा घरी परतलो .आता पुन्हा झोपण्याचा प्रश्न नव्हताच . त्यामुळे मी स्नान वगैरे आटोपून घेतले . हनुमंत सिंह यांनी मला नर्मदा मैया ठेवण्यासाठी खांद्याला लटकवायची एक छोटीशी पिशवी दिली . त्यांनी सांगितले की शुल्कानी च्या झाडीमध्ये जाताना नर्मदा मैया त्या छोट्या पिशवीमध्ये ठेवणे . म्हणजे जरी मोठ्या झोळीची लूट झाली तरी फरक पडणार नाही . ही पिशवी पुढे मला अत्यंत कामाला आली . घरातील सर्वांचे आभार मानून नर्मदे हर केले . इथे त्यांच्या घराबाहेर एक मुका मनुष्य उभा होता . तो काल मी आल्यापासून माझ्याकडे पाहत होता . तो मला घाटापर्यंत रस्ता दाखवायला आठवणीने आला . त्याला बोलता येत नव्हते परंतु त्याचा भाव मला कळला . मी जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलेले दिसले . मी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचे डोळे पुसले . त्याच्या अश्रूंचा बांध फुटला .त्याला बोलता येत नव्हते . परंतु त्याला ही एकच भाषा कळत होती .प्रेमाची भाषा . मुका असल्यामुळे सारे जण त्याला हिणवत असणार हे तर उघडच होते . परंतु त्याचे ते हमसून हमसून रडणे पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले . मी त्याची मिठी सोडवली . आणि नर्मदा मातेकडे हात करून तिला मिठी मार ,तीच तुला तारणार आहे असे खुणेनेच त्याला सांगून माझे डोळे पुसत पायांना गती दिली . अत्यंत वेगाने पुढचा मार्ग पकडला . सोबत साक्षात " नर्मदेश्वर महादेव " विराजमान होते !



लेखांक सेहेचाळीस समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर