लेखांक ४५ :गरम पाण्याची झरिया , डोलोमाईटच्या खाणी आणि भीकमपूरचा सीनियर संगम
सिद्धन बाईंचा आश्रम सोडला आणि अतिशय अप्रतिम असा चार किलोमीटर लांबीचा जंगल मार्ग लागला . तुरळक खुरटी झाडी होती परंतु वन्य जीवन मुबलक असल्याच्या खुणा सगळीकडे दिसत होत्या . या वनामध्ये एक भयाण शांतता होती . सर्वत्र पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगड गोट्यांचा खच पडला होता . माती कमी आणि खडक जास्त असल्यामुळे झाडे फार उंच वाढत नव्हती . या भागात कोल्हे लांडगे खूप होते . त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा जाणवत होत्या . हळूहळू मातीचा रंग पांढरा होत गेला . पायाखाली सापडणाऱ्या खड्यांचे दगड आणि दगडांचे खडक झाले . आजूबाजूला मोठमोठे खड्डे दिसू लागले . आणि इतक्यात एका प्रचंड स्फोटाने माझे कान हादरून गेले . मी चटकन खाली बसलो . एखाद्या भूसुरुंगाचा हा स्फोट होता . एरवी चित्रपटांमध्ये आपण असेच स्फोट पाहतो .परंतु खऱ्या आयुष्यात मी प्रथमच तो अनुभवत होतो . मी स्फोटाच्या दिशेने चालू लागलो . आणि अचानक समोर एक भव्य दिव्य संगमरवराची खाण आली . या खाणीमध्ये दगड काढण्याकरता असे स्फोट केले जातात . आता माझ्या लक्षात आले की मागे मी पाहिलेले मोठे खड्डे म्हणजे बंद पडलेल्या खाणी होत्या . नर्मदेचा काठ दिसत होता आणि पलीकडच्या काठावर एक फार मोठा विद्युत उपकेंद्र ( सबस्टेशन ) प्रकल्प दिसत होता.
भेडाघाट पासून काठाकाठाने लागलेला निर्मनुष्य जंगल मार्ग .समोरच्या तटावरील भव्य हिरापूर बांदा विद्युत उपकेंद प्रकल्प . झाडीच्या मधोमध लालपूरचा आश्रम .
या खाणींविषयी माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली . परंतु आत मध्ये खोल यंत्रे उतरलेली होती आणि मला खाली उतरणे शक्य नव्हते . त्यामुळे मी पुढे मार्गस्थ झालो . आता जंगलामध्ये लालपुर नावाच्या गावाच्या हद्दीमध्ये असलेली एक साधू कुटी दिसू लागली . इथे एक हात लुळा असलेला जटाधारी साधू दिगंबर अवस्थेमध्ये फिरत होता . तोच आश्रमाची सर्व व्यवस्था पाहत असे . आश्रम छोटासा परंतु नीटनेटका होता .राम मंदिर हनुमान मंदिर अशी स्थाने होती . इथून जवळच गरम पाण्याचा एक झरा आहे असे मला साधूने सांगितले . याला सिद्ध झरिया असे म्हणतात .
जबलपूर जिल्ह्यातला लालपूर आश्रम नागा साधूंचा आहे
आश्रमातील एक शिव मंदिर . या परिसरामध्ये संगमरवर मुबलक उपलब्ध असल्यामुळे जलहरी , मूर्ती तसेच फरशीसाठी सर्वत्र संगमरवर वापरलेला आढळून येतो . जयपुर किंवा राजस्थान मध्ये सापडणाऱ्या संगमरवरापेक्षा हा थोडासा हलक्या दर्जाचा असतो
आश्रमामध्ये सामान ठेवून गरम पाण्याच्या झर्यावर अंघोळ करून येण्याचे मी ठरविले . समोर उताराची एक वाट जंगलामध्ये जात होती तिने चालत झरा गाठला . अतिशय शुद्ध नितळ अशा पाण्याचा छोटासा झरा तिथे होता . पाणी खरोखरच गरम होते . विशेषतः सकाळची थंडी पडलेली असल्यामुळे ते पाणी अधिकच गरम वाटत होते . त्या पाण्याने झर्याच्या बाजूला बसून मनसोक्त आंघोळ केली . इतक्यात तिथे एक तरुण परिक्रमावासी आला . हा रात्री आश्रमामध्ये मुक्कामी थांबला होता .याचे नाव योगेश राऊत होते आणि तो जालन्याचा होता . त्यानेही स्नान केले . दोघे पुन्हा आश्रमामध्ये आलो . साधूने गरमागरम काळा चहा पाजला . योगेश २७ वर्षाचा होता . परिक्रमेमध्ये आल्यावर शक्यतो तंबाखू , गुटखा ,बिडी ,सिगरेट इत्यादी व्यसने कायमची सोडणारे अनेक जण मला भेटले होते . परंतु या पठ्याने मात्र मुळात निर्व्यसनी असून इथे येऊन बिडी व गांजा ओढायची विद्या आत्मसात केली होती . त्याबाबत मी त्याचे प्रबोधन करण्याचा तोकडा प्रयत्न करून पाहिला . परंतु त्याला इतकी जबरदस्त तलफ यायची की विचारू नका . मुळात तुम्हाला व्यसनाच्या नादाला लावणारे लोक तुम्ही नवीन असल्यावर तुमची फार काळजी घेतात तसेच सर्वत्र याचे होत होते . जे म्हणाल ते मिळते आहे म्हटल्यावर हा पठ्ठ्या तरी कशाला शांत राहतो ! बाकी तो युवक मनाने खूप चांगला होता . त्याचे वय इतके अल्लड होते की काहीतरी वेगळे करून पाहायची उर्मी शांत बसू देत नव्हती . मुळात साधू गांजा का पितात हे आपण समजून घेतले पाहिजे . गांजा हे एक असे आयुर्वेदिक औषधी द्रव्य आहे जे तुमच्या मेंदूकडे जाणाऱ्या सर्व संवेदना क्षीण करते . साधूंचे जीवन मुळातच खूप कठीण आहे . त्यामुळे चालल्यामुळे होणारे श्रम ,पायांचे दुखणे , शरीर अवघडणे , तहानभूक या सर्व संवेदना मेंदूकडे अत्यंत क्षीण होऊन जातात . आणि त्यामुळे साधूची वृत्ती सदैव शांत राहण्यास मदत होते . प्रथमच गांजा ओढणाऱ्या माणसाला हे खूप भारी वाटते ! त्याला असे वाटू लागते की माझे सर्व शरीर हलके झाले आहे . माझ्या सर्व वेदना नाहीशा झाल्या आहेत ! मला खूप शांत शांत वाटते आहे ! या भावना साधनेतून अथवा ध्यानावस्थेतून आणता येऊ शकतात .परंतु गांजाच्या सेवनाने आयत्याच मिळतात त्यामुळे माणसाला छान वाटू लागते . गांजा ओढून साधू इकडे तिकडे न फिरता शांत एका जागी बसून भजन करत असतात . तासंतास एका जागी बसून ते ध्यानधारणा साधना करतात . त्यामुळे त्यांनी गांजा ओढणे हा एक वेगळा विषय आहे .साधू गांजा शोधण्यासाठी कुठे लांब जात नाहीत तर त्यांच्या आश्रमाच्या भोवतीच एखादे झाड लावून ठेवलेले असते . शक्यतो झेंडूची खूप झाडे दिसली की नीट पाहायचे त्यामध्ये एखादे गांजाचे एखादे झाड लपवलेले असते . कारण दोघांची पाने सारखीच दिसतात . हे सर्व साधूने करणे खरोखरीच क्षम्य आहे .परंतु संसारी पुरुषांनी त्याच्या नादाला लागणे याच्यासारखे घातक काही नाही . कारण गांजा अगदी तुमच्या पुनरुत्पादक क्षमतेवर देखील परिणाम करतो . अनेक साधूंनी मला सांगितले की गांजा ओढल्यावर काम वासना पूर्णपणे नष्ट होऊन जाते . हे साधूसाठी सर्वोत्तम आहे . परंतु गृहस्थी माणसासाठी याहून घातक काय असेल ? हे सर्व योगेश ला समजावून सांगितले आणि मी त्याला नर्मदे हर केले . जाताना नागा साधूने मला माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला . इच्छुकांनी कवडीलाल राय यांच्याशी संपर्क अवश्य करावा . परिक्रमावासींची अतिशय विषम परिस्थितीमध्ये असूनही येथे सोय केली जाते .
इथून पुढे पुन्हा एकदा निर्मनुष्य टापू सुरू झाला .पुन्हा एकदा कानावर स्फोटांचे आवाज आणि मोठमोठ्या यंत्रांचे आवाज पडू लागले . इथून पुढे नर्मदे काठी संगमरवरी दगडाच्या खूप खाणी आहेत .
नशिबाने इथे उत्खनन करण्याचे कंत्राट मिळालेला मुख्य मनुष्यच मला तिथे भेटला आणि त्याने मला सर्व माहिती दिली . खरे तर हा हलक्या प्रतीचा संगमरवर असून याला डोलोमाईट असे म्हणतात . ६० टक्के कॅल्शियम कार्बोनेट आणि ४० टक्के मॅग्नेशियम कार्बोनेट असलेला हा खडक . याचा बांधकामासाठी फारसा उपयोग होत नाही . मोठमोठे स्फोट करून खडक जमिनीपासून वेगळा केला जातो त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून जवळच्या पावडर फॅक्टरी मध्ये हे दगड नेले जातात ४२५ रुपये टन असा त्याचा भाव त्यावेळी तरी होता .हीच पावडर पुढे पावडर पासून संगमरवरी दिसणाऱ्या मूर्ती करणारे लोक किंवा फेस पावडर बनवणाऱ्या कंपन्या वापरतात . याच माणसाने खाणीपाशी माझे काही फोटो देखील काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले .
लालपुर गावाजवळची डोलोमाईटची खाण
"फेस पावडर " च्या खाणीपाशी उभा प्रस्तुत लेखक !
कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेट मिळून बनतो नर्मदा काठावरचा डोलोमाईट दगड
त्यामुळे इथून पुढे तुम्ही कुठल्याही कंपनीची फेस पावडर लावाल तेव्हा शक्यता आहे की तुम्ही नर्मदा काठची माती आपल्या गालावर चोळत आहात !
४२५ रुपये प्रति १००० किलो भावाने खरेदी करून तुम्हाला तीच फेस पावडर विकताना कॉस्मेटिक कंपन्या किती नफेखोरी करतात याचा अंदाज घ्या माता-भगिनींनो !
(आजकाल तरुणांसाठी देखील तथाकथित सौंदर्यप्रसाधने मोठ्या प्रमाणात मिळत आहेत . आणि युवक त्याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत . त्यामुळेच अशा सर्व तरुणांना सांगू इच्छितो , मी उभ्या आयुष्यात कधीही तोंडाला पावडर फासलेली नाही याचे समाधान आहे ! चेहेऱ्या वरचे तेज आत खोलवर लागलेल्या ध्येयाच्या आगीतून प्राप्त होत असते . असो) हा खडक खरोखरीच अतिशय मऊ होता आणि अगदी हाताने सुद्धा याचा चुरा होत होता . या संदर्भातील एक कथा समोरच्या तटावर आल्यावर एका साधूने मला सांगितली . नर्मदेला आडवा आलेला हा पहाड तिच्या विनंतीवरून नरम झाला आणि तिला मार्ग करून देता झाला अशी ती कथा आहे . इथून पुढे बगरई नावाचे एक गाव लागले . बगरई गावामध्ये संगमरवरा पासून मूर्ती करणारे अनेक कारागीर राहतात .या मूर्ती फार काही सुबक रेखीव नसतात परंतु तरीदेखील जवळपासच्या खेड्यातील लोक त्या खरेदी करतात . या परिसरातील बहुतांश मंदिरांमध्ये मला याच गावातील लोकांच्या मूर्ती आढळल्या . विशेषतः नर्मदे मध्ये मिळणारी जी विविध शिवलिंगे आहेत त्याखाली ठेवण्याच्या जलहरी इथे उत्तम बनवितात . इथे चालता चालता एका घरातून मला आवाज दिला आणि चहा पिण्यासाठी आत बोलावले . हे घर देखील एका मूर्तिकाराचे होते आणि आश्चर्य म्हणजे घरातील सर्व मराठीमध्ये बोलताना दिसले ! वरील घरातील सर्व मूर्तिकार बहुतांश वेळ मूर्ती कामासाठी महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये राहत होते . त्यामुळे त्या सर्वांना मराठी चांगली येत होती . किसन बर्मन असे त्या मूर्तिकाराचे नाव होते व त्याची मुले देखील उत्तम मूर्तिकार होती . ज्यांना कुणाला मंदिर बनवायचे असेल त्यांना मी मूर्ती कलेमध्ये आणि कोरीव कामांमध्ये सहाय्य करू शकतो असे त्यांनी सांगितल्यामुळे त्याच्या क्रमांकासोबत मी एक फोटो त्याच्या मुलाला काढायला लावला आणि माझ्या मंदिर बांधकामाची आवड असलेल्या मित्राला पाठवून देवविला .
इच्छुकांनी मूर्तिकला किंवा मंदिर निर्माण किंवा कोरीव काम यासाठी वरील क्रमांकावर अवश्य संपर्क करावा .अत्यंत विषम परिस्थितीमध्ये राहून या मूर्तिकारांनी आपली कला जिवंत ठेवलेली आहे .
विशेषतः आपल्या गावातील शिवलिंगासाठी जलहरी हवी असेल तर इथल्या दगडापासून ती चांगली बनते . असो . या बर्मन कुटुंबीयांचे एक गुरु आहेत असे त्यांनी मला सांगितले . त्यांचा पुढे आश्रम असून त्यांचे दर्शन अवश्य घ्या असे देखील सांगितले . यांना मौनी बाबा असे म्हणत . कधीकाळी कोणी मौनव्रत केले असले तर त्या साधूला आयुष्यभर मौनी बाबा असे नाव पडते . सध्या ते बोलत असतात परंतु आपल्याला प्रश्न पडतो की बोलतात मग मौनी बाबा कसे ? अशा शंकांचे निरसन मी थेट त्या साधूला विचारूनच करत असे . त्यामुळे मनात शंका राहत नाहीत . बर्मन कुटुंबीयांची रजा घेऊन मी पुढे निघालो आणि साधारण झाडीझुडपातून जाणाऱ्या एका रस्त्यात समोरून तेच मौनी बाबा मोटरसायकलवर आले ! थांबून त्यांनी मला नर्मदे हर केले . ते तिलवारा घाटावर काही कामानिमित्त निघाले होते . परंतु पुढे त्यांचा आश्रम असून तिथे जाऊन भोजन प्रसाद अवश्य घेण्याची विनंती त्यांनी मला केली . सकाळी निघतानाच ते स्वयंपाक करून निघाले होते . त्यांना नर्मदा माता आतून प्रेरणा देत असते की आज अमुक अमुक लोकांचा स्वयंपाक कर . आज त्यांच्या आश्रमामध्ये कोणीच मुक्कामाला नसल्यामुळे ते स्वतःपुरता स्वयंपाक करणार होते परंतु नर्मदा मातेने अजून एक दोन जणांचा स्वयंपाक करण्याची सूचना त्यांना केली . त्यामुळे मला बघताच त्यांना खूप आनंद झाला . मी किसन बर्मनला भेटून आलो हे सांगितल्यावर त्यांना अजून बरे वाटले .तो त्यांचा अतिशय लाडका शिष्य होता . आणि मी जंगलातील आणि किनाऱ्याच्या मार्गाने चालतो आहे हे ऐकून देखील त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले ! पुढे बराच वेळ चालल्यावर त्यांचा आश्रम लागला . आश्रम एका टेकडावर होता . छोट्याच जागेमध्ये बऱ्यापैकी बांधकाम केले होते . अलीकडेच त्यांनी परिक्रमावासींच्या निवासाची मोठी सोय केली आहे असे गुगल नकाशावर पाहिल्यावर माझ्या लक्षात आले .
आश्रमामध्ये एक माताराम सेवेकरी होती . तिने भोजन प्रसादी संपली आहे असे मला सांगितले . शक्यतो गरीब सेवेकरी महिला आश्रमातील उरलेसुरले अन्न घरी नेऊन आपल्या मुलाबाळांना खाऊ घालतात .त्यामुळे त्यांचे असे सांगणे समजून घेण्यासारखे आहे .परंतु मी जेव्हा तिला सांगितले की सकाळी तिलवारा घाटावर जाण्याच्या आधी मौनी बाबांनी स्वतः दोन लोकांचा अधिकचा स्वयंपाक करून ठेवलेला आहे ,तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले ! अशाच ठिकाणी चमत्काराचा जन्म होतो ! तिला मनोमन असे वाटले की मी कोणी चमत्कारी साधू आहे . परंतु लगेचच तिला मी मध्ये मला बाबा कसे भेटले वगैरे सर्व प्रसंग सांगितला आणि तिने भोजनासाठी बसण्याची विनंती केली . इतक्यात योगेश देखील तिथे आला .एका माणसाचा स्वयंपाक होता . आम्ही दोघांनी मिळून दोन टिक्कड आणि चटणी खाल्ली . माझ्याकडे थोडासा गुळ होता तो देखील मी त्याला टिक्कड सोबत खाण्यासाठी दिला .
आश्रमाचे काही फोटो आपल्याकरिता देत आहे .
इथेच बसून आम्ही भोजन प्रसाद घेतला .आणि आम्हाला वाढणारी हीच ती माताराम . डावीकडे भगव्या रंगात कॅमाफ्लाज झालेले मौनी बाबा दिसत आहेत !
हेच ते संत कैलास भारती जी अथवा मौनी बाबा
वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मातारामने दिला
पुढे कुठेही जवळपास आश्रम नव्हता . त्यामुळे खूप चालायचे आहे हे लक्षात आल्यामुळे विश्रांती न घेता मी तेथून नर्मदे हर केले .
दुपारच्या भोजनापर्यंतची चाल हिरव्या रंगाने दाखवली आहे . आणि संध्याकाळच्या मुक्कामापर्यंतचे चालणे लाल रंगाने दाखविले आहे . यावरून मी किती गतीने आणि कसे चाललो असेल याचा तुम्हाला अंदाज यावा . हे सर्व अंतर किमान २५ किलोमीटर आहेच .
थोडे अंतर गेलो आणि ग्रामस्थांनी सांगितले की इथे मध्ये एक रामकुंड आहे ते ओलांडायचे नसते . कारण त्या कुंडामध्ये नर्मदेचा वास आहे . त्यामुळे पुन्हा थोडे अंतर उलटे आलो आणि जंगलामध्ये असलेल्या रामकुंडापाशी पोहोचलो . इथेच स्नानाचे फार महत्त्व आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनसोक्त स्नान केले ! सकाळी नर्मदेमध्ये केलेले एक स्नान !त्यानंतर गरम पाण्याच्या झऱ्यावर दुसरे स्नान !आता हे तिसरे स्नान ! अशा पद्धतीने परिक्रमेमध्ये अनेक स्नाने घडत असतात . सरासरी चार स्नाने सहज घडतात ! कारण मला नर्मदेचे जे रूप आवडायचे अशा एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी मी आनंदाने पुन्हा एकदा मनसोक्त स्नान करून घेत असे ! स्नानाचा एक फायदा असा असतो की तुम्हाला अतिशय ताजेतवाने वाटते आणि पुढे चालण्यासाठी खूप जास्ती शक्ती ऊर्जा मिळते ! उपाशीपोटी किंवा कमी खाल्लेले असताना देखील चालणे अधिक होते . आज स्नानही घडले होते आणि एकच टिक्कड खाल्लेला असल्यामुळे पोट देखील रिकामे होते . त्यामुळे आज नर्मदेचा किनारा पकडून भरपूर चालायचे असा संकल्प केला ! पायांनी गती घेतली आणि नर्मदा जलाशी स्पर्धा करत पुढचा मार्ग पकडला ! या भागात अतिशय समृद्ध पक्षी जीवन आहे . मैय्याचे येथील रूप नितांत सुंदर आहे !भव्य पात्र ! पात्रामध्ये रेती ,माती , कधी दगड गोटे ! आता तर संगमरवराचे शंकर अर्थात शिवलिंग देखील सापडू लागले ! हिरवे , केशरी , काळे , पांढरे , रंगीबेरंगी , चमकदार धातूचे , अभ्रकाचे असे शेकडो पाषाण ! सर्व टोकविरहित , गुळगुळीत ! भेडाघाटातून वाहून आणलेला चुना वाळूमध्ये कालविला जाऊन नैसर्गिक रित्या सिमेंट तयार व्हायचे आणि त्यापासून या दगड गोट्यांचे मोठमोठे स्लॅब जणूकाही नर्मदा मैयाने बनविले होते ! हेच स्लॅब पाच ते दहा फूट रुंदीचे असायचे ! अनेक वर्षांपासून पात्रामध्ये पडून ते तिरके तारके झालेले असायचे . याच्यामध्ये देखील असंख्य जुने आकर्षक दगड गोटे सापडायचे .परंतु ते काढता येणे कठीण होते कारण खरोखरच खूप टणक सिमेंट तयार झालेले होते . अशा स्लॅब वरून चालताना अक्षरशः सिमेंटच्या स्लॅब वरून चालतो आहोत असे वाटायचे . महापुरामध्ये वाहत येऊन आडवे तिडवे एकमेकांवर चढलेले स्लॅब पाहून नदीच्या ताकदीची कल्पना यायची !
या चित्रांमध्ये नीट पाहिले असता मी वरती वर्णन केलेले मोठे मोठे स्लॅब पात्रात आडवे-तीडवे पडलेले दिसत आहेत .
कधी लाल भडक पाषाण व त्याला मैयाने पाडलेली असंख्य छिद्रे ! त्यात छोटे छोटे गोटे वर्षानुवर्षे फिरून तयार झालेले रांजणखळगे ! मैया कधी शांत तर कधी कृद्ध ! काठावरती हिरवीगार शेते !सर्वत्र मजाच मजा ! आनंदी आनंद !
सिद्ध कुटी, घुघरा , मूरकटिया , धरती कछार , भडपुरा अशी गावे ओलांडत भिकमपूरच्या अटरिया नावाच्या भागात पोहोचायचे माझे नियोजन होते .वाटेमध्ये मनुष्यवस्तीमध्ये दिसणारे कोंबडे नर्मदे हर आवाज द्यायचे हे तुम्हाला मागे देखील मी सांगितले आहे ! इथे एक अजून वेगळाच गडी त्यात सामील झाला ! रामकुंडा जवळ कस्तुरी नावाची एक पोपटीण पाळलेली होती . जी नर्मदे हर म्हण म्हटले की नर्मदे हर म्हणायची ! अगदी सुस्पष्ट ऐकू येईल असे तिचे उच्चार होते ! नर्मदे हर म्हणायची ,राम राम म्हणायची !
सुदैवाने कस्तुरीचा एक व्हिडिओ मला युट्युब वर सापडला ! अन्यथा काही अतिचिकित्सक वाचकांना ही वल्गना वाटली असती !
धरती कछार गावा पाशी एका साधू कुटीमध्ये चहा बनवून पिलो .पुन्हा तिथे स्थानिक गांजा प्रेमी जमल्यावर हळूच काढता पाय घेतला .अन्यथा साधू मला तिथेच राहा असे म्हणत होता . व ती जागा अतिशय जबरदस्त होती . मैयाच्या काठावरील एका उंच पर्वताचे ते टोक होते आणि समोर मोर कटीसारखी वळलेली नितांत सुंदर नर्मदा मैया दिसत होती ! त्यामुळे या गावाला मूरकटिया असे नाव होते ! साधूने मला सांगितले की इथे नर्मदा माता मोरा च्या कटी सारखी दिसते म्हणून या गावाचे नाव मोरकटी पडलेले आहे . मी नकाशामध्ये मोराच्या आकाराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला असता मला खालील दोन आकार आढळले . आपल्या माहिती करता देत आहे .
मुरकटिया येथील नर्मदा मैया . आधी आपण मोराचा आकार शोधून पहा .न सापडल्यास मला सापडलेला आकार खाली पहा !
मोराची कंबर अतिशय नाजूक असते . त्यामुळे चालताना ती खूप झोकदार दिसते . तशी नर्मदा माता इथे वाहते ,म्हणून या गावाचे नाव मोरकटी पडलेले आहे . अपभ्रंश होऊन लोक आता त्याला मुरकुटिया म्हणतात .
बरेच अंतर गेल्यावर दूरवर कुठेतरी नर्मदा पुराण सुरू होते त्याचा आवाज ऐकू येऊ लागला . त्या आवाजाचा वेध घेत पुढे पुढे चालू लागलो . बऱ्यापैकी पायपीट केल्यावर भीकमपुर नावाच्या गावामध्ये पोहोचलो . इथे सनैर , सनीयर किंवा सीनियर नावाची नदी नर्मदार्पण होते . आज खूपच चालणे झाले होते . त्यामुळे मुक्कामाचे ठिकाण सापडले रे सापडले की पाठ टेकायची असे ठरवून चालत होतो . परंतु इकडे मात्र सारा गाव कथा ऐकण्यासाठी जमला होता ! त्यामुळे पाठ टेकणे वगैरे राहिले बाजूला , सर्वांसोबत मंडपामध्ये बसून कथा ऐकू लागलो . कथा सुरू असताना कोणी परिक्रमावासी आला तर त्याला कथावाचक व्यासपीठावरूनच नमस्कार करतात . अशी पद्धत इथे सर्वत्र आढळते आणि याचा मी खूप वेळा अनुभव घेतला . कथाकार या प्रकाराला शुभ शकुन मानतात . परिक्रमावासी फक्त एक वाहक असतो परंतु त्याच्या पाठीवर नर्मदा मैया असते त्यामुळे त्याच्या रूपाने साक्षात नर्मदा मैया कथा ऐकायला आली असे मानले जाते . लवकरच नर्मदा जयंती साजरी होणार होती त्या निमित्ताने ही आठवड्याभराची कथा चालली होती . मी मंडपामध्ये येताच सर्व ग्रामस्थांनी मिळून जोरदार आवाजात नर्मदेचा जयजयकार केला . गावातील तरुण उत्साही कार्यकर्त्यांनी लगेच गर्दीतून वाट करत मला पहिल्या रांगेत आणून बसविले . गावातील लहान मुले मोठ्या उत्सुकतेने माझ्याकडे पाहू लागली . शहरातली मुले जसे कार्टून बघतात तशाच त्यांच्या नजरा मला वाटल्या ! तुमचे लक्ष वेधून घेण्यासाठी लहान मुले तऱ्हे तऱ्हेच्या माकड चेष्टा करतात ! कथा वाचकांनी एक पायरी पुढे जात मला व्यासपीठावर आमंत्रित केले . मी देखील त्यांच्या विनंतीला मान देऊन वर जाऊन एका कोपऱ्यात बसलो . कथा उत्तम सुरू होती . कथाकार चांगले विद्वान होते . त्यांचा मूळ संस्कृत संहितेचा अभ्यास चांगला होता . कथा संपल्यावर खाली एक छोटीशी खोली होती तिकडे कथा वाचकांसाठी विशेष नाष्टा ठेवला होता . तिथे ते स्वतः मला घेऊन गेले . खोलीमध्ये बसल्या बसल्या आमची शास्त्र चर्चा सुरू झाली . कथावाचक ब्राह्मण समाजाचे होते हे त्यांनीच मला आधी सांगून टाकले . तसेच ते कुठल्याही जातीपातीच्या लोकांनी कथा ठेवली तर आवर्जून जातात आणि कथा करतात हे देखील त्यांनी मला सांगितले . त्यांच्या ठायी प्रचंड विद्वत्ता असून देखील पराकोटीची नम्रता होती ती मला फार भावली . तिथे एका कोपऱ्यामध्ये काही माताराम रात्रीचा स्वयंपाक करत होत्या . बाहेर सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक सुरू होता . तर आत मध्ये केवळ कथा वाचकांसाठी बिन कांदा लसणाचा स्वयंपाक सुरू होता .त्यांनी माझ्यासाठी देखील त्यांच्यासोबत भोजन बनवण्याची विनंती केली . गावातील मोजकी प्रतिष्ठित मंडळी त्या खोलीमध्ये येऊन गप्पा मारत बसली होती . खोली साधीच होती त्यात प्रचंड पसारा पडला होता आणि खाली गाद्या अंथरलेल्या होत्या. पाय दुखत असल्यामुळे मी वज्रासन घालून बसलो होतो . कथा वाचकांचा भाचा त्यांनी सोबत आणला होता जो संस्कृत संहिता वाचून दाखवायचा .एका कार्यकर्त्याने तिथे आमचा फोटो काढला आणि माझा मोबाईल नंबर विचारला . माझ्याकडे फोन नाही हे कळल्यावर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवून दिला .
डावीकडून कथावाचक ज्यांना या भागामध्ये कथा व्यास असे म्हणतात , मध्ये प्रस्तुत लेखक ,उजव्या हाताला कथाव्यासांचा भाचा .
कथाकारांनी पायी नर्मदा परिक्रमा करणेची इच्छा व्यक्त केली .
अंधारी खोली , अपुरा उजेड आणि सर्वसाधारण कॅमेरा असला तरी कथाकारांचा नर्मदे प्रती असलेला भाव या तीनही चित्रातून लक्षात येईल .
पुरी भाजी चे उत्तम भोजन झाले . सोबत खीर देखील वाढली गेली . कथाकार अतिशय अल्प भोजन घेत असत . मला मात्र भरपूर चालल्यामुळे चांगली भूक लागत असे . मी खाताना संकोच करतो आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आग्रहाने पोटभर खाऊ घातले . तृप्त अंत:करणाने नित्याप्रमाणे "अन्नदाता सुखी भव । " असा आशीर्वाद देत उठलो आणि व्यासपीठाकडे गेलो . तिथले दृश्य पाहून काय बोलावे तेच कळेना ! इतका वेळ तल्लीन होऊन नर्मदा पुराण ऐकणारा तो सर्व समुदाय चित्रपटातील धांगडधिंगा गाणी लाऊन डीजे लावल्याप्रमाणे नाचत होता ! त्यात मुले व स्त्रिया देखील मागे नव्हते हे विशेष ! मी आलो आहे हे पाहिल्यावर मुले अजूनच चेकाळली . माझ्या पुढे येऊन लोळून वगैरे नाचू लागली . त्यांचे ते चाळे पाहून गावातील मोठी मंडळी येऊन त्यांना बदडू लागली ! एकंदरीत या सगळ्याच प्रकाराला एक वास येत होता ! होय यातील बहुतांश लोक दारू पिलेले होते ! खेड्या पाड्या मध्ये आजही सार्वजनिक उत्सव म्हणजे हमखास मदीरा पिऊन तिथे जायचे अशी प्रथा या भागात दिसते . १५ - १६ वर्षाच्या वयाच्या पुढील मुलांनी देखील चोरून ढोसली आहे हे लक्षात येत होते . हा सर्व प्रकार बघणे असह्य झाल्यामुळे मी तिथून माझे सामान उचलले .इतक्यात एक बारीक साधू वजा दिसणारा मनुष्य धावत माझ्या दिशेने आला . याने कमरेला अर्धी लुंगी गुंडाळली होती आणि दाढी वाढवलेली होती . याच्या चेहऱ्यावर आश्वासक हास्य होते . रंग गोरापान होता . त्याने मला मागच्या बाजूला असलेल्या धर्म शाळेमध्ये राहण्याची विनंती केली . ही धर्मशाळा ब्रिटिशांच्या काळात १९०४ साली बांधलेली एक मजबूत इमारत होती . आकार अतिशय छोटा होता परंतु बांधकाम फारच सुबक होते .इथे एक शिलालेख देखील होता . संपूर्ण चुना आणि दगडांमध्ये बांधकाम होते . मुख्य म्हणजे बाहेर प्रचंड थंडी असून आत मध्ये चांगली ऊब होती . आत मध्ये जेमतेम एक माणूस झोपेल इतकी रुंदी आणि दहा माणसे झोपतील इतकी लांबी होती . भिंती चांगल्या चार चार फूट जाडीच्या होत्या .
आत मध्ये बाहेरील आवाज खूप कमी ऐकू येत होता . एका कोपऱ्यामध्ये आसन लावून मी माझे पूजन आटोपून घेतले आणि झोपण्याची तयारी करू लागलो . ज्याला सांगीतिक कान आहे अशा व्यक्तीला एक संगीत चालू असताना दुसरे काही गाता किंवा ऐकता येतच नाही ! तसे माझे झाले . मी पाठ टेकली मात्र सर्वत्र एकच धावपळ सुरू झाली ! संगीत बंद करून आयोजकांनी माईक हातामध्ये घेतला आणि गोळा झालेल्या सर्व मुलांना घरी हाकलून दिले . माइक वर मोठ्या आवाजात " बाबाजी सो रहे है । सब अपने अपने घर जाओ । " असे सांगण्यात येत होते ! प्रत्यक्षात मी झोपतो आहे याचे निमित्त करून त्या कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करायचा होता आणि पुढे त्यांचा वेगळा डाव रंगणार होता ! थोड्याच वेळात एका भव्य लाकडाच्या ओंडक्या भोवती शेकोटी करून सारे बसले आणि उखाळ्या पाखाळ्या करत सार्वजनिक सोमरसपान सुरु झाले . मी दमलेलो असल्यामुळे मला डोळा लागला .त्या रात्री एक मजाच झाली ! दहा-बारा तद्दन बेवडे लोक आत मध्ये आले . आणि मला उठवून म्हणाले महाराज आपली हरकत नसेल तर आम्ही इथे भजन करू का ? आता यांना अडवणारा मी कोण ? आणि त्यात मला भजनाची विशेष आवड आहे . त्यामुळे मी म्हणालो मी देखील तुमच्यासोबत भजन करतो . सगळी टोळी आत मध्ये आली आणि जोरदार भजन सुरू झाले . सर्वजण दारू आणि गांजाच्या नशेमध्ये तुन्न होते . यांच्यामध्ये तो मघाशी मला आत मध्ये आणून सोडलेला साधू तेवढा शुद्धीवर होता ! तारवटलेले डोळे , जड झालेल्या जीभा आणि त्यातच रामायण भजन सुरू झाले ! हळूहळू त्यांच्यातील एक एक गडी आडवा पडत होता . बाकीचे जागे असल्याचा आव आणून तारेतच भजन करत होते . हा प्रकार पाहून माझी हसून हसून मुरकुटी वळली ! मी हसून हसून लोळतो आहे हे देखील त्यांना कळत नव्हते इतके सर्वजण तारेमध्ये होते ! मी सुरुवातीला ढोलक वाजवत होतो . परंतु पेटीवाला पेटीवरच पडल्यावर मी पेटी वाजवायला घेतली ! त्यानंतर ढोलक वाला ढोलकावर पडला ! मी आणि तो साधू वजा इसम खूप हसलो ! त्याचे नाव चेतराम मेहरा भगत असे होते . हा मनुष्य किती अवलिया होता हे मला त्या क्षणी नाही कळाले . पुढे या माणसावर स्वतंत्र प्रकरण येणार आहे ! अखेर रात्री दोन तीन वाजता सगळ्याच विकेट पडल्या ! मग मी देखील झोपलो . नित्याप्रमाणे पहाटे चार वाजता मला जाग आली . रात्रभर नाचून ग्रामस्थ मुले वगैरे सारे मंडपातच झोपी गेले होते . एक मोठा लाकडाचा ओंडका रात्रभर पेटत पडला होता त्याचा शेक घेत थोडावेळ मी बसलो . त्यातून भयानक उष्णता येत होती . मग पहाटे दोन्ही हात तुटलेले परंतु तसेच कोष्ठाला कातडी च्या आधारे लटकत ठेवून काम करणारा असा एक तरुण साधू परिक्रमावासी मला बोलवायला आला . तो धर्म शाळेच्या मागे राहत होता . त्याने माझ्यासाठी चहा केला होता . तो त्याचे हात अतिशय कौशल्यपूर्वक वापरत असे . मी हाताचे काही शस्त्र कर्म का करून घेतले नाही ? असे विचारल्यावर तो म्हणाला ,आपले भोग आहेत ते भोगून संपवायचे ! याला दोन्ही हात वर उचलता येत नव्हते कारण ते सांध्यातून निखळले होते . परंतु हाताला पकड मजबूत होती . एक हात गुडघ्याजवळ घेऊन त्याच्या साह्याने दुसरा हात उचलून त्याने तो तिसरी वस्तू ताब्यात घ्यायचा ! त्याचे ते कौशल्य व शास्त्र वचननिष्ठा पाहून मी त्याला मनोमन साष्टांग नमस्कार केला ! उजाडता क्षणी धर्मशाळेचे टेकाड उतरायला सुरुवात केली . हा संपूर्ण वाळूचा टिला होता आणि तीव्र घसरडा उतार होता . तो धावतच उतरलो कारण सर्वत्र वाळूच वाळू होती त्यामुळे थांबताही येत नव्हते आणि पडण्याची भीती सुद्धा वाटत नव्हती . मोठ्या प्रमाणात वाळू घेऊन वाहणारी सीनियर नावाची नदी खूप विस्तीर्ण पात्रासह वाहत होती . गुडघाभर पाण्यातून तिला पार केले आणि नर्मदेचा काठ धरला .
सैनीर अथवा सिनीयर नदी . इंग्रजी मधील सीनियर या शब्दाचा हिच्या नावाशी काही एक संबंध नाही . तशी ही सीनियर नदी नर्मदेला ज्युनियरच आहे !
लेखांक पंचेचाळीस समाप्त (क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवाVery good articles, the effort taken for the details are very evident which elevates the reading experience. More details about spiritual discussions will be very useful.
उत्तर द्याहटवा