लेखांक ४१ : कोरोठार , रामकुंडी , मेहेरतला आणि नर्मदेवरचे पहिले भव्य धरण बर्गी बाँध

शेतांच्या मधून गेलेला मार्ग पकडला आणि चालत चालक केदारपुर गाव गाठले . हा सिवनी जिल्हा सुरु होता . छत्तीसगड ,दिंडोरी ,मंडला ,शिवनी असे चार जिल्हे मी अमरकंटक पासून बाराच दिवसात पार केले होते .इथे नाक्यावर सोनू शर्मा आधीच येऊन बसला होता . एका दुकानदाराने मला पूजा साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचा रिकामा डबा दिला . हा डबा तंबाखूचा होता . परंतु चांगला टिकला . याच्यामध्ये ठेवल्यामुळे काडेपेटी हवाबंद रहायची. इथून पुढे संपूर्ण जंगलाचा मार्ग होता . 
जंगलातून जाताना अचानक मागून गाडीचा आवाज येऊ लागला . म्हणून मागे वळून पाहिले तर हिरव्या रंगाची एक जिप्सी गाडी येत होती . गाडी माझ्या शेजारी येऊन थांबली आणि आतील माणसाने आवाज दिला नर्मदे हर ! हे होते राजकोट गुजरात येथून परिक्रमेला निघालेले श्री प्रकाश कलोला जी . यांचा सर्जिकल इक्विपमेंट बनविण्याचा व्यवसाय होता . परंतु तरीदेखील वेळात वेळ काढून ते आपल्या जिप्सी गाडीमध्ये दोन ट्रेमध्ये बरेचसे सामान ठेवून परिक्रमेला निघाले होते . गाडीतच ते झोपत असत .गाडीला छप्पर वगैरे काहीही नव्हते . उघड्या गाडीतून जवळपास काठाकाठाने परिक्रमा करत ते आलेले होते . ऑफ रोडिंग चे सर्वात मोठे एक्स्पिडीशन ते ठरले असेल ! मला त्यांनी काही फळे खायला दिली आणि पुढे निघून गेले . काही अंतर गेल्यावर रस्ता लागत होता तिथे ते थांबलेले होते . तिथे मी त्यांचा क्रमांक नाव वगैरे लिहून घेतले . त्यांच्या मोबाईलवर त्यावेळी आम्ही एक सेल्फी काढला . आता लिहिताना त्यांची आठवण झाल्यावर त्या क्रमांकावर फोन केला असता त्यांनी तो फोटो ईमेलवर पाठवून दिला . तो आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
राजकोट येथील चतुष्चक्री परिक्रमावासी श्री प्रकाश कलोला जी . त्यांची हिरवी जिप्सी आणि मागे ठेवलेले शिधा , तंबू आदि सामान . 
प्रकाशजींना नर्मदे हर करून पौंडी गावातून पुन्हा एक शॉर्टकट पकडला आणि चालत राहिलो. प्रत्येक पावलाला नर्मदा मातेचे स्मरण करत चालायचे ,असे केल्याने तुम्ही किती चाललात ते लक्षात येत नाही . आज एका अनवट मार्गाने कुरोठार अथवा कोडोठार नावाच्या गावामध्ये पोहोचलो. गावातून एक मोठा ओढा वाहत होता व तो नर्मदेला जाऊन मिळत होता . गावाच्या अलीकडेच ओढ्याच्या काठावर एक आश्रम होता . एका साधूची समाधी , तिच्या जवळच तीस माणसांच्या कवेत मावेल असे एक अतिप्रचंड पिंपळाचे झाड , त्याची तुटलेली एक महावृक्ष सदृश्य फांदी व त्या फांदीमुळे उध्वस्त झालेला जुना आश्रम आणि समोर छोटासा नवीन आश्रम बांधलेला , शेजारी वाहणारा एक ओढा जो थेट नर्मदेमध्ये जाऊन मिळतोय असे याचे स्वरूप होते .
हाच तो भव्य अश्वत्थ वृक्ष आणि त्याची तुटलेली फांदी मागे दिसत आहे . समोर समाधी
तुटलेल्या फांदीमुळे उध्वस्त झालेला जुना आश्रम . जुना आश्रम आता वापरात नाही
नव्या आश्रमाची मुख्य इमारत (व्हीआयपी रूम !)
नर्मदेच्या अति भव्य पात्राच्या तुलनेत आश्रमाचे स्थान . शेजारी पार केलेला सघन वन प्रदेश .
लछनदास बाबा नावाचे एक साधू या आश्रमाची व्यवस्था पाहत होते . साधूचे वय सुमारे ७०-७५ असावे . हे साधू मनाने फार निर्मळ होते परंतु स्वभावाने अतिशय कर्मठ आणि कठोर होते . यांची अत्यंत कडक शिस्त होती . जरा देखील इकडचे तिकडे झालेले त्यांना चालत नसे . पादत्राणे सांगितले आहे त्याच ठिकाणी व शिस्तीतच लागली पाहिजेत असा त्यांचा अट्टाहास असायचा . या गुणाचा त्यांना फायदा देखील होत असावा . कारण मी या वास्तव्यामध्ये त्या साधूला शंख कसा वाजवायचा ते शिकविले .आणि त्यांना ते जमू देखील लागले .ते फार जास्ती शक्ती वापरत होते त्यामुळे शंख वाजत नसे परंतु जेव्हा मी त्यांना युक्ती शिकविली तेव्हा त्यांनी ती लगेचच आत्मसात केली . एका "पॅटर्न " मध्ये चालण्याच्या सवयीमुळे शंख वाजवण्याचा "पॅटर्न " अथवा पद्धती त्यांना लगेच कळली . असो .आश्रमामध्ये सर्वप्रथम मी पोहोचलो . थोड्या वेळाने सोनू शर्मा आला . त्यानंतर वासुदेव नावाचा एक अतिशय खवचट म्हातारा तिथे पोहोचला . पुढे नर्मदेवर पुनासा नावाचे मोठे धरण आहे त्याच्या शेजारी हा पुनासा गावातच राहायचा . म्हाताऱ्याने आयुष्यात सर्व गोष्टी करून पाहिल्या होत्या आणि आता अध्यात्म करून पहावे या विचाराने परिक्रमेला आला होता . पुढे दोन-तीन दिवस तो माझ्या मागे पुढे होता . ऐकायला कमी येत असल्यामुळे फोन स्पीकरवर टाकून बोलायचा . फोन उचलण्यापूर्वी मला सांगायचा , बायकोचा फोन आहे . दरवेळेस पलीकडून वेगळ्या स्त्रीचा आवाज यायचा . मी त्याला विचारले की दरवेळेस वेगळा आवाज कसा काय येतो आहे ? तर हसत हसत मला सांगायचा की बायकोच बोलते आहे , फक्त दुसऱ्या कोणाचीतरी ! इतका म्हातारा विक्षिप्त व परदारा लिप्त होता . सुंभ जळाला तरी अजून पीळ जळलेला नव्हता . माझ्या दृष्टीने यातली आनंदाची बाब इतकीच होती की हा बाबा व्यक्तिगत जीवनात काही का करेना परंतु नर्मदा परिक्रमा पायी करत होता .असो . तर लछन दास साधूने आम्हाला पिंपळाचे झाड ज्या खोलीवर पडले होते त्या पडक्या खोली मध्ये स्वच्छता करून राहायला सांगितले .पारावर काही ग्रामस्थ मंडळी येऊन बसली होती .खोलीमध्ये दगड विटा माती यांचा ढीग लागला होता आणि प्रचंड धूळ होती . वासुदेव म्हातारा आणि सोनू शर्मा दोघे या प्रकारामुळे चिडले . मी शांतपणे हातामध्ये खराटा घेतला आणि जेवढा भाग शक्य होता तेवढा झाडून स्वच्छ केला . कचरा उचलताना मला तिथे एक अग्नि कुंड आहे असा साक्षात्कार झाला . मग त्याच्यावरील दगड विटा बाजूला करून त्याच्यामध्ये मी अग्नी प्रज्वलित केला त्याबरोबर दोघेही तिथे आसन लावायला धावतच आले . मोक्याच्या जागा पटकावून दोघांनी आसन लावले . मला जागा शिल्लक राहिली नाही त्यामुळे मी पिंपळाच्या पारावर आसन लावले . नंतर दोघांना काय वाटले कोणास ठाऊक त्यांनी माझ्यासाठी थोडीफार जागा निर्माण केली आणि मग मी तिथे माझे आसन हलविले . तिघेही आगीचा शेक घेत मस्त गप्पा मारत बसलो . सोनू शर्मा बद्दल मी आधी सांगितलेच आहे त्याप्रमाणे तो अतिशय झपाझप चालायचा . माझी गती त्याच्या निम्म्याहून निम्मी होती . परंतु तरीदेखील आतापर्यंत बरेचदा तो मला भेटला याचा अर्थ आमचे ससा कासव शर्यती सारखे चालले होते . 
अगदी या आश्रमामध्ये येण्यापूर्वी देखील दुपारी चहा पिण्यासाठी बरेली आणि अंडिया गावातील एका धर्मशाळेमध्ये मला ग्रामस्थांनी नेले तर तिथे आधीच सोनू येऊन बसला होता . सेवेकरी तरुणाने आमच्या दोघांसोबत एक सेल्फी काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
बरेली गावातील सेवेकरी, प्रस्तुत लेखक आणि सोनू शर्मा
हाच तो आश्रम जिथे वरील छायाचित्र काढण्यात आले आहे
बरेली अंडिया परिक्रमावासी सेवा आश्रमाची समोरची बाजू
इथे एक छोटेसे नर्मदा माता मंदिर असून भिंतीवर रेखाटलेली नर्मदा माता देखील खूप सुंदर आहे
आश्रमातील नर्मदा मैया
असो . तर सांगायचे तात्पर्य इतकेच की कितीही वेगाने चालला तरी मध्ये थांबत असल्यामुळे सोनू शर्मा मागे पडत होता . कधी कधी फार जास्ती चालल्यामुळे आजारी देखील पडत होता व त्यात त्याचे एक-दोन दिवस जात होते . मला मात्र डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी पहिल्याच दिवशी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे मी निवांत आणि एका विशिष्ट गतीने , न थांबता , अखंडित चालत असल्यामुळे तुलनेने कमी त्रास होत होता आणि अंतर ही अधिक कापले जात होते . गप्पा मारता मारता त्या दोघांनी साधूला शिव्या घालायला सुरुवात केली . असे कुठे असते का ? परिक्रमा वासींना असे पडक्या खोलीमध्ये कधी कोणी झोपायला देईल का ? स्वतः साधू मात्र चांगल्या बांधलेल्या पक्क्या खोलीमध्ये राहतो आहे ! गंमत म्हणजे तो आम्हाला त्या खोलीच्या आत मध्ये देखील येऊ देत नाही ! स्वतःला कोण समजतो हा साधू ? असले ५६ साधू पाहिले !वगैरे वगैरे ! सोनू शर्मा साधारण चाळीशीचा शिडशिडीत तरुण होता आणि म्हातारा साठीचा होता . साठी बुद्धी नाठी ही म्हण मूर्तीमंत सार्थ करण्याकरताच त्याचा अवतार असावा असे एकंदरीत त्याचे वर्तन होते ! सोनू तसा स्वभावाने शांत आहे हे मला माहिती होते परंतु या म्हाताऱ्याने त्याला चांगलेच भडकवले . दोघे साधुशी भांडून आले ! आता तर साधूने निश्चय केला की यांना शक्य तितका त्रास द्यायचा ! आणि तो प्रत्येक गोष्टी करता त्यांना झापू लागला ! मला या सर्व गोष्टीची मोठीच मौज वाटत होती ! मनोमन मी मोहन साधूचे आणि पर्यायाने नर्मदा मातेचे आभार मानत होतो ! की मला खूप पूर्वी अशाप्रसंगी कसे वागायचे याचे प्रशिक्षण त्यांनी देऊन ठेवले होते ! जळणाची लाकडी संपली आहेत हे कळल्यावर साधूने एक भला मोठा ओंडका आणून पारावर ठेवला आणि त्या दोघांना कुऱ्हाडी आणून फोडायचे काम दिले . वासुदेव म्हातारा भलताच आळशी होता .त्याने कुऱ्हाडीला अजिबात हात लावला नाही . मग मी कुऱ्हाड हातात घेतली . साधूने करड्या आवाजात मला कुऱ्हाड खाली ठेवण्याचा आदेश दिला . मला म्हणाला तू अजिबात हात लावू नकोस कामाला . आल्या आल्या तू संपूर्ण पार झाडून घेतला आहेस आणि खोली देखील स्वच्छ केलेली आहेस . या दोघांना काहीतरी काम करू दे . नर्मदा मैया फुकट खायला घालत नाही ! मी खरोखरच आल्या आल्या पिंपळाच्या सर्व काड्या काटक्या गोळा करून पालापाचोळा वेगळा बिया वेगळ्या काटक्या वेगळ्या असे झाडून ठेवले होते . या प्रदेशामध्ये शेकोटी करण्याकरता असा लाकूडफाटा लागतोच हे मला आता माहिती झाले होते .आणि तसेही कुठल्याही नवीन जागी गेल्यावर तुम्हाला राहण्यासाठी योग्य अशी जागा निर्माण करावी लागते हे कुठल्याही किमान बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला देखील कळू शकणारे वास्तव आहे .त्यासाठी कुठल्या मोठ्या पुस्तक पंडिताची गरज नाही . असो . इतक्यात वासुदेव म्हाताऱ्याने एक मोठाच आगाऊपणा केला . एक भला मोठा ओंडकाच त्याने ढकलत ढकलत पडक्या खोलीकडे न्यायला सुरुवात केली . साधू त्याच्या खोलीतूनच ओरडून सांगू लागला ऐसी भूल मत करना !पछताओगे ! परंतु म्हातारा काही ऐकायला तयार नव्हता त्याने तो ओंडका नेऊन शेकोटीच्या एका बाजूला ठेवलाच ! त्याच्या मते आता काम सोपे झाले ! लाकूड फोडण्याची गरज नाही आणि काहीच नाही ! आम्ही तिघे पुन्हा गप्पा मारत बसलो . पुनासा भागातील नर्मदेची रूपे वगैरे म्हातारा सांगत होता . इतक्यात त्या अंधुक अंधारात मला काहीतरी काळे इकडे तिकडे पळते आहे असे वाटले . म्हणून मी विजेरीच्या प्रकाशात पाहिले तर साधारण अर्धा इंच आकाराचे काळे कुळकुळीत शेकडो विंचू त्या लाकडाच्या ओंडक्यातून उष्णता लागल्यामुळे भसा भसा बाहेर पडू लागले होते ! ओंडक्यातून खाली उतरताना ते एका रांगेत उतरत होते आणि खाली उतरले रे उतरले की विखुरले जात होते ! साधारण आठ आण्याच्या आकाराचे विंचू होते .
बरोबर याच आकाराचे आणि प्रकारचे ते विंचू होते .
 सर्व खोलीभर सामान भर आणि आसनभर विंचूच विंचू झाले ! तिघेही उठून उड्या मारायला लागलो ! आपापले सामान घेऊन बाहेर आलो . मी पळतच जाऊन साधूला ही वार्ता सांगितली . साधू शिव्या घालत बाहेर आला . आणि वासुदेव म्हाताऱ्याला झापू लागला . मैने बोला था मत ले जाना लकडी अंदर । अब भुगत लो परिणाम !
दोघेही जरा खजील झाले . साधूने सांगितले काळजी करू नका . ती विंचवाची पिले आहेत . थोड्याच वेळात ती आपापल्या जागी निघून जातील . तासाभराने आत मध्ये जा . लाकडाच्या आत असलेल्या पोकळीमध्ये विंचविणीने अंडी घातली असावीत . उष्णता पोहोचताच सारी पिले बाहेर आली इतकेच . आम्हा तिघांचे नशीब थोर की आम्हाला एकाही विंचवाने डंख मारला नाही ! मला ते विंचू दिसायला अजून थोडासा उशीर झाला असता तर नक्की एखादा तरी विंचू चावला असता ! आणि मग मी त्या सर्वांना नाथांचे विंचू चावला हे भारुड आठवले तसे कृती सकट म्हणून दाखविले . त्याचा गूढ अर्थ सांगितला . आणि त्या भारुडातील नाच पाहून सर्वांची हसून हसून पुरेवाट झाली ! इथून नर्मदेपर्यंत अंधारात जाता येणे शक्य नव्हते कारण मध्ये घनदाट अरण्य होते . त्यामुळे मागच्या ओढ्यावर जाऊन स्नान केले . पूजन केले आणि साधूला स्वयंपाकाला मदत करावी म्हणून उजव्या हाताला असलेल्या स्वयंपाक घरात गेलो . साधूने मला विचारले की तुला काय काय येते ? मी अजून शिकतो आहे असे सांगितल्यावर मला म्हणाला तू काहीच करू नको .फक्त बसून रहा . मी करतो माझ्याशी गप्पा मार . त्याचा कडक स्वभाव पाहता त्याला फिरून काही बोललेले आवडणार नाही हे माहिती असल्यामुळे मी मानेने होकार दिला आणि शांत बसून राहिलो . मी फक्त इतकेच म्हणालो की आपण गप्पा मारूयात परंतु त्या तुम्ही मारा आणि मी फक्त ऐकणार आहे . माझ्याजवळ असे काहीही नाही की जे तुम्हाला ऐकवून तुमचे कल्याण होईल . परंतु आपल्याजवळ असे भरपूर काही आहे की जे ऐकून माझे कल्याण निश्चितपणे होणार आहे ! माझ्या या उत्तराने साधू प्रसन्न झाला आणि त्याने अध्यात्माच्या अनेक संकल्पना मुळापासून मला समजावून सांगितल्या . परिक्रमेमध्ये आहे त्याचा लाभ घेत विविध महात्मे संत महंत यांना भेटून त्यांच्याकडून भरपूर ज्ञान गोळा करण्याची अनायासे आलेली संधी दवडू नकोस असे त्यांनी मला सांगितले . साधू डोळे मिटून बोलायचा . आणि बोलता बोलता परब्रम्ह वगैरे शब्द आले की क्षणभर त्याला ध्यान लागायचे . तो अतिशय शुद्ध , सात्विक , नैष्ठिक , अधिकारी सत्पुरुष होता असे पाहताक्षणी जाणवत होते . परंतु त्याच्या स्वभावामध्ये असलेली कडक शिस्त ही त्याच्या पूर्वाश्रमीच्या जीवनामुळे आणि सवयीमुळे आलेली होती . साधूंना शहाण्या माणसाने कधीही त्यांच्या पूर्वाश्रमाविषयी प्रश्न विचारू नयेत .त्यांना ते आवडत नाही . एखाद्या घटस्फोट झालेल्या माणसाला तुमचा घटस्फोट कसा झाला याचे एकदा वर्णन करून सांगा असे म्हटल्यासारखे ते आहे . साधू प्रत्येक गोष्टीमध्ये निष्णात , तरबेज , पटाईत होता . त्याने केलेले कणकेचे उंडे देखील एकसारखे गुळगुळीत व एका वजनाचे मापाचे होते . त्याने कणिक मळल्यावर एक कण देखील पिठी मागे शिल्लक राहिली नाही . त्याच्या पोळ्या इतक्या गोल होत्या की कर्कटक घेऊन काढल्या आहेत असे वाटावे ! आणि त्याने बनवलेल्या भाजीमध्ये देखील प्रत्येक गोष्ट तो मोजून मापून टाकत होता . ज्या माणसाला एका कृतीमध्ये परफेक्शन जमले त्याला तेच परफेक्शन दुसऱ्या कृतीमध्ये आणायला वेळ लागत नाही . साधूंना त्यांचे मानवी जीवन जगणे या प्रकारामध्ये परफेक्शन अर्थात सर्वोत्कृष्ट नियमितता प्राप्त झालेली असते . त्यामुळे शक्यतो ते सर्वच गोष्टी उत्तम करू शकतात . मुळात वैराग्य पत्करणे आणि निभावणे ही सर्वात अवघड गोष्ट असल्यामुळे त्याच्यापुढे अन्य सर्व गोष्टी किरकोळ आहेत . साधूने एक घोळ केला. त्याने मोजून आठच टिक्कड केले आणि माझ्या अंगावर काटाच आला ! समोरच्या तटावर असताना लुकडा सुकडा दिसणारा सोनू शर्मा किती टिक्कड खाऊ शकतो हे मी स्वतः पाहिले होते ! दहा-बारा टिक्कड तर तो आरामात खायचा ! पुनासा वाला वासुदेव म्हातारा देखील बुटका आणि जाडजूड होता . अशा प्रकारची ग्रामीण माणसे देखील शक्यतो दाबून जेवण करतात . आता साधूला हे दोघे काहीतरी बोलणार याची मला खात्री पटली .दोघे अत्यंत तोंडाळ होते . पुढचे वादविवाद कमी व्हावेत म्हणून भरपूर भूक लागलेली असून देखील मी साधूला आधीच सांगितले . की आज मला भूक नाही त्यामुळे मी एकच टिक्कड खाणार आहे .मला अगदी वाटलेच आणि त्याप्रमाणे साधू मला म्हणाला आधी का नाही बोललास एक टिक्कड कमी बनवला असता ना ! स्वभावाला औषध नाही हेच खरे ! आम्ही तिघे पाराखाली जेवायला बसलो आणि साधूने वाढायला सुरुवात केली . मी मुद्दाम छोटे छोटे घास घेऊन हळूहळू जेवत होतो . सोनू अर्ध्या पोळीचा एक घास करायचा . त्याचा टिक्कड संपताच त्याने साधूला आवाज दिला आणि टिक्कड मागवला . साधू म्हणाला , आता हा शेवटचा आहे यानंतर मिळणार नाही . दोघेही चिडून उठून उभे राहिले ! आणि भांडू लागले . एकच टिक्कड मिळेल याचा अर्थ काय ? त्यापेक्षा उपाशी तरी मारायचे आम्हाला ! मी दोघांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की अन्नाचा अवमान करू नये .जितके मिळाले आहे तितके आधी खाऊन घ्यावे . तर दोघे माझ्यावर भडकले . शेवटी मी साधूला एक उपाय सुचवला . मी एक पोळी खाल्ल्यामुळे सात शिल्लक होत्या . या दोघांना तीन-तीन द्याव्यात व साधूने देखील एकच खावी . अखेरीस दोघे खाली बसले आणि दोघांनी तीन तीन पोळ्या खाल्ल्या . मी साधूला पुन्हा टिक्कड बनवून देणार होतो परंतु त्याने नकार दिला .दहा दहा चपात्या पचवणाऱ्या या दोघांना अशाप्रकारे त्यारात्री अर्धपोटी राहावे लागले . रात्री आम्ही तिघे त्या पडक्या खोलीमध्ये झोपी गेलो . तास दोन तास गेले असतील . साधू हळूच पायाचा आवाज न करता माझ्याजवळ आला . आणि मला उठवून इशाऱ्याने त्याच्या मागे चालण्याची सूचना केली . मला काही कळेना की काय होते आहे . हा मला आत मध्ये बांधलेल्या स्पेशल व्हीआयपी रूममध्ये घेऊन गेला . व्हीआयपी रूम म्हणजे काय तर तिच्या भिंती पडलेल्या नव्हत्या इतकेच . परंतु दिवसभर बंदिस्त असल्यामुळे खोली थोडीशी उबदार होती . साधू बाहेर ओसरीवर झोपला आणि मी खोलीमध्ये दार ओढून घेऊन जमीनीवरच झोपलो . खूपच छान झोप लागली . परिक्रमेमध्ये मला काही सूचक स्वप्नं पडायची . म्हणजे काही विशिष्ट व्यक्ती स्वप्नामध्ये दिसायच्या .त्याची नोंद मी वहीत करून ठेवायचो . परिक्रमा संपल्यावर मी खात्री करून घेतली की अमुक अमुक दिवशी तुम्ही स्वप्नात आला होतात. तर नेमकी त्याच दिवशी त्या व्यक्तीने माझी इकडे आठवण काढलेली असायची . असे बऱ्याच जणांच्या बाबतीत खरे ठरल्यामुळे माझी नक्की कोणकोण आठवण काढत आहे हे देखील मला अनायासे कळत होते .असो . त्या साधूने असे मला आत मध्ये एकट्याला झोपायला बोलवावे हे मला पटलेले नव्हते .परंतु काही बोलायच्या आत तो झोपी देखील गेला . सकाळी लवकर उठून मी ओढ्यावर स्नान वगैरे आटोपून पूजा उरकून दोघे जागे व्हायच्या आत धूम ठोकली . पुन्हा या व्हीआयपी वागणुकीवरून होणारी वादावादी मला ऐकायची नव्हती . आज पुन्हा दोन-तीन जंगले पार केली . दूरवर गोरखपुर पावर प्लांट ची मोठी चिमणी दिसत होती . या चिमणी कडे पहात चालत राहिलो .
गोरखपूर औष्णिक विद्युत प्रकल्पाची चिमणी

या चिमणीची एक गंमत होती . कितीही चालले तरी ती चिमणी समोरच आहे असे वाटायचे . तिची उंची चांगली पाचशे - हजार फूट असावी . दीपस्तंभाकडे पाहत वाटचाल करणे याचा अर्थ मला त्या दिवशी कळला . जंगल निर्मनुष्य होते .मध्ये एक दोन घरे लागली . इथे एक मनुष्य झाडाच्या काडीने दात घासत होता . त्याने मला विचारले की तुम्हाला दात घासायला काडी हवी आहे का . ही रामफुल नावाच्या झाडाची काठी होती . त्याने घराजवळ नेऊन मला गरम पाणी आणि राम फुलाची काठी दिली . हा कबीर पंथी होता . कबीर पंथाचे लोक कुठल्याही मूर्ति पूजेच्या अवडंबरामध्ये न पडता कबीरांच्या विचारांनी चालण्याचा प्रयत्न करतात .यांच्या घरात किंवा दारात कबीरांचा फोटो लावलेला असतो हीच त्यांची खूण .हे लोक पांढरी वस्त्रे , पांढरा झेंडा वापरतात .हा या भागातील किराणा मालाचा दुकानदार होता . आधी त्याने बसण्यासाठी खुर्ची आणि त्यावर छान आसन टाकून व्यवस्था केली .त्याने मला चहा आणि पार्ले जी चा बिस्कीटचा छोटा पुडा आणून दिला . तिथे बसल्यावर खूप शांत वाटत होते . कारण सकाळी लवकर निघाल्यामुळे जंगलातून भरपूर चालणे झाले होते आणि थंडी अजून देखील जाणवत होती .इतक्यात सूर्य देवाने दर्शन दिले आणि छान उबदार वाटू लागले .बसल्या बसल्या त्याच्या मुलाने फोटो काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .कबीर पंथी माणसाच्या दारात बसलेला प्रस्तुत लेखक
या चित्रात मागे दिसणारी छोटीशी खिडकी म्हणजे याचे किराणा मालाचे दुकान होते .छोट्या खेड्यांमध्ये अशीच एक खिडकी दुकाने असतात .
या माणसाने मला पुढील मार्ग समजावून सांगितला .आजकाल शहरातील परिक्रमावासी गुगलचा वापर करून स्वतः मार्ग ठरवितात परंतु त्याच्यामुळे वाटेतील काही महत्त्वाचे ठिकाणे सुटू शकतात .गुगल वर अवलंबून राहण्यापेक्षा जर स्थानिक लोकांशी चर्चा केली तर खूप भारी , सोपे , वेगळे , अद्भुत आणि अनवट मार्ग मिळतात असा माझा अनुभव आहे . असो . असेच एक स्थान मला या माणसाकडून कळले व ते म्हणजे रामकुंडी नावाचे जलकुंड होते . वनवासामध्ये असताना स्वतः प्रभू रामचंद्रांनी या कुंडावर स्नान केल्याची आख्यायिका आहे . या परिसरात एक मोठे मैदान आणि छोटी मोठी अनेक मंदिरे तसेच मोठी मोठी झाडे होती .
अटरिया गावातील श्रीक्षेत्र राम कुंडी परिसर . गोल विहीर आणि तलाव येथे रामाने स्नान केले होते .तलावामध्ये बुडलेले मंदिर .विहिरी शेजारी साधू कुटी .
 कुंडामध्ये उतरायला बंदी होती परंतु दोरी बांधलेल्या प्ला 1स्टिकच्या डब्याने पाणी शेंदून काठावर आंघोळ करता येत होती . शेजारीच एक मोठा तलाव होता व त्यात स्त्रिया धुणे वगैरे धूत होत होत्या . मला काही लोकांनी सांगितले की तलाव म्हणजे रामकुंड आहे आणि काही लोकांनी सांगितले की विहीर वजा गोल टाके म्हणजे रामकुंड आहे . आपल्याकडून पुण्यस्नान चुकायला नको म्हणून मी दोन्ही ठिकाणी स्नान करून घेतले ! इतक्यात वासुदेव आणि सोनू शर्मा देखील आले . इथे एक दिगंबर साधू राहत असे . त्याने आम्हाला शिधा दिला आणि मैदानावरच मंदिराशेजारी एक छोटीशी चूल करून आम्ही तिघांनी स्वयंपाक करून भोजन केले . वासुदेव म्हातारा टिक्कड फक्कड बनवत होता ! आज या दोघांचे राज्य असल्यामुळे दोघांनी पोटभर खाऊन घेतले ! दिगंबर साधूला कशाचेच काही पडले नव्हते तिथे बांधलेल्या एका छोट्या खोलीतून जे लागेल ते घ्या आणि बनवून खा असे त्याने मला सांगितले . भोजन प्रसाद झाल्यावर मी साधूच्या पुढे काही काळ बसलो . अशाप्रसंगी जो काही सत्संग लाभतो तो फार मोलाचा असतो . काही साधू तुम्हाला ज्ञान देतात तर काही साधू तुमच्याकडून सध्या समाजात , देशात ,राज्यात काय सुरू आहे याचा कानोसा देखील घेतात . या साधूने माझ्याकडून बरीच माहिती मिळवली.
रामकुंडी येथील श्री हनुमान मंदिर
रामकुंडी तीर्थक्षेत्र परिसर . या मंदिरात मी कपडे धुऊन वाळत टाकले होते जोरदार वाऱ्यामुळे अक्षरशः पाच मिनिटात वाळले .
रामकुंडी येथील विहीर व तलाव दोन्हींचे दर्शन येथे होते आहे .
रामकुंडी मधील श्रीरामांच्या स्पर्शाने पवित्र जल
रामकुंडी परिसरातील भव्य वृक्ष . मागे पांढऱ्या रंगाची दिगंबर साधूची खोली .
तलावामध्ये मी अगदी याच जागी स्नान केले जिथे आता एक व्यक्ती स्नान करत आहे . (सर्व चित्रे गूगल नकाशावरून साभार )
दिगंबर साधूने  "अकेले परिक्रमा करना " असे सांगून मला निरोप दिला . माझ्यासोबतच्या दोघांचा राग रंग बहुतेक त्याने लगेच ओळखला असावा . इथून बाहेर पडल्यावर शेतातले रस्ते लागले . थोड्याच वेळात सोनू शर्माने देखील मला गाठले . इथे चौकोनी आकाराची शेते होती .त्यातून चालताना पुढे मागे डावीकडे उजवीकडे असे आम्ही होत राहिलो .या संधीचा फायदा घेत मी एकटाच पुढे निघून गेलो . इथल्या गावांची नावे मोठी मजेशीर आहेत . इथे एका गावाचे नाव ईश्वरपूर होते तर त्याच्या शेजारचे होते दुर्जनपूर . पनारझीर , जम्होडी , तुनिया , दिवारी आदि गावे पार करत मी चालत राहिलो . मार्ग संपूर्ण जंगलातला होता .हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली . सूर्य मावळू लागला . सूर्यास्तापूर्वी नर्मदेची आरती करणे आवश्यक असते . परंतु हा संपूर्ण जंगलाचा मार्ग होता आणि परिक्रमावाशांची कुठे सोय दिसत नव्हती . म्हणून मी उजवीकडे पाहिले असता इतके जबरदस्त दृष्य दिसले की मी स्वतःला विसरून गेलो ! बर्गी धरणाच्या फुगवट्यामुळे बाळसेदार झालेली नर्मदा मैया आणि तिच्यामध्ये मावळणारा सूर्यदेव ! आणि त्याच्या लाल भडक रश्मींनी आकाशात उधळलेला गुलाल आणि त्याचे नर्मदेमध्ये पडणारे प्रतिबिंब !
 मैयाच्या आरती करता गरज असते ती समोर मैया असण्याची आणि एक ज्योत असण्याची . मी लगेच एक दगड पाहून त्यावर बसलो . आणि मैया ला सांगितले की आता हा सूर्य हीच माझी ज्योत ! आणि मैया ची आरती सुरू केली !
ॐ जय जगदानन्दी,
मैया जय आनंद कन्दी,
ब्रह्मा हरिहर शंकर,
रेवा शिव हर‍ि शंकर,
रुद्री पालन्ती,
ॐ जय जगदानंदी।... ... ...
ही संपूर्ण परिक्रमेतली माझ्या सर्वात लक्षात राहिलेली आरती ! बघता बघता सूर्य मावळून गेला . आणि माझ्या असे लक्षात आले की माझ्यामागे कोणीतरी उभे आहे . वळून पाहिलं असता एक सद्गृहस्थ माझ्याकडे कौतुकाने पाहत होते . मला म्हणाले इथे नर्मदा मातेची आरती आपण का केलीत ? मी म्हणालो आरतीची वेळ टळून जाऊ नये म्हणून आरती करून घेतली . तसेही माझ्याकडे दिव्याची ज्योत नसली तरी सूर्याची ज्योत हीच मैयाची आरती ओवाळीत आहे अशी कल्पना करून मी आरती केली . तो म्हणाला इथे कुठेही परिक्रमावासींची सेवा करणारा कार्यरत आश्रम सध्या नाही . बर्गी गावामध्ये आश्रम आहे . परंतु तिथपर्यंत तुम्ही आता पोहोचू शकणार नाही . तुम्ही म्हणत असाल तर मी गाडीवर तुम्हाला तिकडे सोडतो . मी नम्रपणे परंतु स्पष्टपणे नकार दिला . मी म्हणालो जिचे नाव घेऊन निघालो आहे तिला काळजी ! आपण फक्त चालत राहायचे ! यावर खुश होऊन तो म्हणाला माझे नाव रामनाथ यादव . इथून पुढे पुढे गेल्यावर माझा मोठा बंगला आहे . तिथे आपण कृपया रहावे . आणि गाडीवर पुढे निघून गेला . मी अंधारातच झपाझप पावले उचलून चालू लागलो . थोडे अंतर गेल्यावर एका पडक्या शाळेतून वासुदेव म्हातारा मला हात करतो आहे असे दिसले ! हा बहुतेक गाडीवर तिथपर्यंत आला होता . एका पडक्या शाळेमध्ये त्याने मुक्काम ठोकला होता . मला प्रश्न पडला की आता रामनाथ यादव ला काय सांगावे ,इतक्यात शाळे शेजारच्याच बंगल्यातून स्वतः रामनाथ यादव बाहेर आले . मी त्यांना सांगितले की बंगल्यामध्ये राहण्यापेक्षा या शाळेमध्ये वासुदेव म्हाताऱ्या सोबत मी मुक्काम करत आहे . तो म्हणाला शेजारी धरण असल्यामुळे इथे थंडी खूप पडते तरी कृपया घरी चलावे . मला पुन्हा कालचा प्रसंग आठवू लागला . केवळ शहरी असून चांगले आणि नम्रपणे बोलतो आहे म्हणून लोक माझ्या बाबतीत दाक्षिण्य दाखवत आहेत आणि खेडूत ग्राम्य भाषेत बोलणाऱ्या वासुदेव म्हाताऱ्यावर सगळीकडे अन्याय होत आहे असे होऊ नये म्हणून मी स्पष्टपणे सांगितले की मी वासुदेव सोबतच इथे राहतो . तेच खरे तप ठरेल . जशी तुमची इच्छा . परंतु भोजन मात्र माझ्या घरचेच तुम्हाला घ्यावे लागेल ! असे त्याने निक्षून सांगितले . शाळेसमोर एक हापसा होता त्याच्यावरती स्नान वगैरे आटोपून घेतले.  आज मी आरती करणार नाही सांगितल्यावर वासुदेव महाराजांचे प्रवचन देखील ऐकले ! पडक्या शाळेच्या एका भिंतीच्या बाजूला आम्ही दोघांनी आसन लावले . त्याचे पुन्हा तसले फोन सुरू झाले . म्हातारा अतिशय गुलूगुलू बोलायचा . अखेरीस न रहावून मी वासुदेवाला स्पष्टपणे विचारले की " घरीं असोन सुंदरी जो सदांचा परद्वारी | बहुतांचे उचिष्ट अंगीकारी | तो येक मूर्ख || " असे का करतोस ? त्यावर त्याने मोठे विस्तृत उत्तर दिले. त्याच्यामते इंग्रजांनी बहुपत्नीकत्वाचा कायदा आणून ती मूळ भारतीय प्रथा बंद केली . आपल्या दोन-तीन पिढ्या पूर्वीपर्यंत बहुपत्नीकत्व समाजाला मान्य होते . खेड्यामध्ये आजही जितक्या अधिक स्त्रिया सांभाळू शकेल तितका त्या माणसाचा तो पुरुषार्थ मानला जातो . अर्थात हे सर्व भौतिक पातळीवर तो सांगत होता . परंतु तो ज्या भागात राहत होता त्या नेमाड प्रांतात हे अतिशय नित्याचे आहे असे त्याने मला सांगितले . त्यामुळे मनोमन मी त्याचे नाव नेमाडचा गेमाड असे ठेवून टाकले ! त्याची अखंड फोनाफोनी चालूच होती . मी त्याचे निरीक्षण करत होतो . त्याच्याकडे ना रूप होते , ना रंग होता ,ना प्रकृती होती , ना पैसा अडका होता , ना प्रॉपर्टी होती , ना वक्तृत्व होते . मग तरीदेखील इतक्या माता-भगिनी त्याला का भुलत होत्या ? तर त्याच्याकडे असलेला एकमेव गुण म्हणजे तो त्यांची सतत विचारपूस करत असे . कशी आहेस ? जेवलीस का ? तब्येत कशी आहे ? हे कसे चालू आहे ? ते कसे चालू आहे ? मुले कशी आहेत ? आज काय भाजी केली होती ? कुठल्या रंगाची साडी घातली ? वगैरे वगैरे . त्याच्या या शिळोप्याच्या गप्पांचा मला अक्षरशः वीट आला होता . परंतु त्याने माझा तो भाव ओळखून मला सांगितले की स्त्रियांना काहीच नको असते . त्यांना फक्त त्यांच्याकडे लक्ष देणारा कोणीतरी नर हवा असतो . सतत त्यांचे कौतुक करणारा कोणीतरी हवा असतो . अशा मनुष्या करता त्या कुठल्याही थराला जायला तयार होतात . त्याचे वागणे जरी मला पटत नसले तरी तो जे सांगत आहे ते त्याचे अनुभवजन्य बोल होते आणि त्याचे परिणाम देखील मी समोरच पाहत होतो . खरोखरीच माझ्या मनामध्ये विचार सुरू झाला की असे जर असेल तर मग आयुष्यभर लोक आपल्या जोडीदाराला छान राहता यावे , छान वाटावे ,म्हणून जे अहोरात्र कष्ट करतात आणि त्या कष्टांच्या नादात त्यांना वेळ तेवढा द्यायचे विसरून जातात त्याचे परिणाम किती गंभीर होत असतील ! नव्हे नव्हे होतातच ! आणि याचाच गैरफायदा वासुदेव सारखी माणसे घेताना दिसतात . मग जर सर्व माता-भगिनींनी एक सोपे सूत्र ठरविले की कुठल्याही परिस्थितीमध्ये असल्या अनावश्यक गोष्टींना , व्यक्तींना , अपेक्षांना आणि इच्छांना मनात थाराच द्यायचा नाही तर किती संसार सुखाचे होतील ! शहरामध्ये सध्या हे सर्वच ताळतंत्र बिघडल्याचे स्पष्टपणे जाणवते . नर्मदे काठी मात्र मी ज्या काही स्त्रिया बघत होतो त्या सर्व टोकाच्या पतिव्रता आणि गृहकर्तव्यदक्ष , धार्मिक , सात्विक , कष्टाळू , प्रेमळ तरीही अत्यंत हुशार , मर्यादशील ,सुशील ,लाघवी , कोणाशी कसे वागावे , कोणाशी कसे बोलावे , याचे सम्यक ज्ञान असलेल्या , विवेकी होत्या . त्याचे प्रत्यंतर लगेचच आले कारण रामनाथ यादव सपत्निक तेथे आमच्यासाठी गरमागरम जेवण घेऊन आले . त्या मातेने अत्यंत प्रेमाने आम्हाला आग्रह पूर्वक जेवायला वाढले . त्या दिवशीचे इतके अप्रतिम होते की काय सांगावे ! गरम गरम तुपातल्या पातळ रोट्या ! भाजी ,आमटी ,भात , दूध सर्वच अप्रतिम ! पोटभर जेवण झाल्यावर दोघे निघून गेले . आम्ही दोघांनी त्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिले ! बराच वेळ वासुदेव आणि मी त्या भोजनाचे कौतुक करत राहिलो . वासुदेव ची गाडी पुन्हा मूळ पदावर आली . त्याने मला ह्या पतीव्रतेचे उदाहरण देऊन सांगितले की अशी स्त्री आयुष्यात कधी चूक करणार नाही .मग कोण चुका करते ? तर हलक्या कानाच्या आणि हलक्या मनोवृत्तीच्या माता-भगिनी अशा चुका करतात . आता मी तर पडलो म्हातारा ! माझा कुठल्याच दृष्टीने यांना काहीच उपयोग नाही .परंतु तरीदेखील मी त्यांच्या मनातील एकलकोंडेपणा दूर करून त्या स्त्रीचा संसार वाचवण्याचे पुण्याचे काम करतो आहे ! कारण मी जर तिच्याशी गप्पा मारल्या नाहीत आणि तिचे मन मोकळे केले नाही तर नक्कीच कुठलातरी जवळपासचा फाल्तुक तरुण पुरुष ते काम करणार आहे आणि तिथे ती स्त्री फसणार आहे . म्हणून एक प्रकारे मी मोठे सामाजिक कार्य करत आहे . त्याचे हे उत्तर ऐकून मी हतबुद्ध झालो . नैतिकतेच्या कुठल्याच पुस्तकी व्याख्येमध्ये बसणारे हे वर्तन नव्हते परंतु ते अनुभव सिद्ध बोल होते एवढे मात्र नक्की . अखेरीस त्याची परवानगी घेऊन मी कूस बदलून झोपी गेलो . धरण शेजारीच असल्यामुळे भयंकर थंडी पडली होती . रात्री उठून वासुदेवने मध्ये जाळ करून ठेवला . त्याचा शेक घेत पहाटे जागा झालो . हातात घड्याळ किंवा सोबत मोबाईल नसल्यामुळे किती वाजले आहेत हे कळायची काही सोय नसायची . साधारण कोंबडे आरवत आहेत , पक्षांची किलबिल सुरू झाली आहे ,अशा काही खुणा पहाट झाल्याचे सांगायच्या . किंवा सर्वात सोपे म्हणजे आकाशातील तारे बघून मी वेळ ठरवायचो . रात्री झोपतानाच मी ध्रुवतारा कुठे आहे हे पाहून ठेवलेले असायचे . आणि सप्तर्षी किती कोनावर आहे ते देखील बघून ठेवायचे . ध्रुवताऱ्या भोवती एक पूर्ण चक्कर म्हणजे २४ तास . त्या हिशोबाने साधारण किती वाजले आहेत याचा अंदाज मी लावायचो आणि तो बरेचदा अचूक निघायचा . परिक्रमेमुळे माझे बायोलॉजिकल क्लॉक किती सुंदर पद्धतीने सेट झाले होते हे मला परिक्रमा संपल्यावर घरी परतल्यावर लक्षात आले . कारण पुढे कित्येक दिवस मला बरोबर ब्राह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे साडेतीन वाजता आपोआप जाग येत असे . त्यादिवशी देखील वासुदेव ला जागृत न करता मी हळूच पुढे सटकलो . त्याचे ते तथाकथित अनुभव सिद्ध तत्वज्ञान ऐकण्यात मला शून्य रस होता . त्याला तो एकच ध्यास आहे की काय असे त्याचे वर्तन होते . बहुतेक परिक्रमे ला गेल्यावर तरी म्हातारा सुधारेल अशा अपेक्षेने घरातल्या लोकांनी त्याला परवानगी दिली असावी . असो . अंधुक प्रकाशात मी डांबरी रस्त्यावरून पुढे निघालो . नर्मदा मैया माझ्या उजव्या हाताला होती . आमच्या दोघांच्या मध्ये घनदाट जंगल होते . आता तीव्र असा उतार सुरू झाला . हा उतार इतका भयानक होता की अक्षरशः पळावे लागत होते . पाठीवरचा बोजा आणि काठी वगैरे असल्यामुळे गती अजूनच वाढत होती . परंतु त्यामुळे हे अंतर फार वेगाने कापले गेले .आज जर मी याच गतीने चालत राहिलो असतो तर कदाचित मी जिथून परिक्रमा चालू केली त्या ग्वारीघाटापर्यंत पोहोचण्याचा योग आहे असा मला अंदाज होता .  जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती होत्या . आणि अधून मधून लोकांनी केलेली शेती दिसत होती . या शेतामध्ये घरातील सर्व लोक मिळून पाखरांना उडवून लावत आहेत असे दृश्य जागोजागी पाहिले . चांगली फलधारणा झालेल्या शेतापासून पाखरांना दूर ठेवण्यासाठी गोफणीने मोठे मोठे दगड भिरकावले जात होते . यातील एखादा दगड चुकून आपल्याला येऊन लागू नये अशी मी मैयाची मनोमन प्रार्थना केली ! कारण त्या शेतकऱ्यांना अर्जुनाप्रमाणे फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत होता ! अतिशय चित्रविचित्र आणि कर्णकर्कश्य भयानक आवाज काढून पक्षांना पळवून लावले जात होते . पक्षी देखील मोठ्या मोठ्या थव्यांनी इकडे तिकडे उडत होते . वर्षभर केलेल्या कष्टाचे पाणी होऊ नये म्हणून शेतकरी बांधवांची चाललेली ती तळमळ ती तगमग पाहून त्यांची खूप दया आली . शेतकऱ्यांचे जीवन कसे असते हे समजून घ्यायचे असेल तर नर्मदा परिक्रमा अवश्य  करावी . उलट माझे तर असे मत झाले आहे की ज्यांना कुणाला राजकारणामध्ये पडायचे आहे किंवा समाजकारणामध्ये पडायचे आहे अशा प्रत्येक माणसाने एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी म्हणजे आपले भारतीय जनजीवन कसे काय चालते याची यथार्थ कल्पना त्या व्यक्तीला येऊ शकते . कागदावर ग्वारी घाटाचे इथून अंतर ३३ किलोमीटर दाखविले होते . परंतु प्रत्यक्षात थोडे जास्त चालावे लागते असा माझा अनुभव होता . इथले लोक तुम्हाला जे अंतर सांगतात त्यात दोन तीन किलोमीटर वाढीव अंतर पकडावे लागते .फार क्वचित तो आकडा अचूक निघतो . असो . बरेच अंतर चालल्यावर बर्गी धरण लागले . इथून परिक्रमावासी सरळ निघून जातात परंतु मला ते भव्य धरण बघायचे होते . धरण म्हणजे एक अख्खा डोंगर चढावा लागतो ! तेव्हा कुठे तुम्ही भिंतीच्या पातळीला येता . आणि तो माझा निर्णय योग्य ठरला ! कारण इथून त्या धरणाचे इतके सुंदर दृश्य दिसत होते की विचारूच नका ! राणी अवंती लोधी जलाशय असे या जलाशयाला नाव दिलेले असून हा अतिशय विस्तीर्ण जलाशय होता . नजर जाईल तिथवर पाणीच पाणी ! 
 बरगी अथवा बर्गी धरण
डाव्या बाजूच्या काठाने चालत मी धरणापर्यंत पोहोचलो .

आतापर्यंत नर्मदा मातीची जी काही छोटी रूपे पाहिली त्या तुलनेत हे रूप फारच भयानक रुद्र आणि अतिप्रचंड होते. मी धरणाच्या काठाने चालायला सुरुवात केली . पाण्यापर्यंत जाता येत नव्हते इतका गाळ सर्वत्र पसरला होता . पुढे पाणी सोडल्यामुळे पाण्याची पातळी उतरली असावी . साधारण गुडघाभर गाळ सहज होता .
या भागातील गाळाचे संग्रहित छायाचित्र
या पाण्यामध्ये स्नानासाठी उतरता येतच नाही .
 समुद्रासारख्या लाटा येत होत्या . निळे शार पाणी काठाजवळ गढुळलेले दिसत होते .पुढे पुढे गाळ कमी होत दगड गोटे दिसू लागले .
काठाकाठाने मी बरेच अंतर चालल्यावर तिथे काही मुले पोहून झाल्यावर काठावरती मोबाईलवर काहीतरी पाहत बसलेली दिसली . त्यावेळी तिथे त्यांना मी दिसणे अपेक्षित नसावे . त्यातील एका मुलाने मला हाक मारून फोटोसाठी पोज द्यायची विनंती केली . नंतर माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने तो फोटो पाठवून दिला .
बर्गी धरणाच्या साठाक्षेत्रात प्रस्तुत लेखक
मागे दिसणारे सर्व डोंगर आणि जंगल पार करत मी इथपर्यंत आलो होतो .
ह्या मुलांना मी कोण आहे काय करतो आहे याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते आणि यांना नर्मदा परिक्रमे विषयी काहीच कल्पना नाही असे माझ्या लक्षात आले . मग मी त्यांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हे सांगू लागलो आणि ती मुले माझ्यासोबत काठाकाठाने चालू लागली . 
मोबाईल बघितल्यामुळे कसे शरीराचे नुकसान होऊ शकते आणि ब्रह्मचर्याची किती ताकद असते याबद्दल त्यांना मार्गदर्शन करून मी पुढे निघून गेलो . इथे काठावरती काही नावा नांगरलेल्या होत्या . प्रचंड गाळ असल्यामुळे धरणामध्ये उतरताच येत नव्हते . परंतु या मोठ्या आणि लांबच लांब नावांमुळे ती शक्यता निर्माण झाली . नावेचे एक टोक कोरड्या जमिनीवर होते तर दुसरे टोक नर्मदेमध्ये बुडलेले होते . नावे मध्ये चढून नावे मध्ये सर्वसामान काढून ठेवले आणि दुसऱ्या बाजूने अलगद नर्मदा मैया मध्ये उतरून यथेच्छ स्नान केले .
बर्गी धरणात नांगरलेल्या नावांचे संग्रहित चित्र
नर्मदेमध्ये समुद्रासारख्या लाटा पहिल्यांदाच अनुभवत होतो ! प्रचंड वारे असल्यामुळे पाण्यातून बाहेर आल्या आल्या अर्धा कोरडा होऊन गेलो . अंग पुसून आता धरणाच्या भिंतीवर चढू लागलो . ही भिंत खूप मोठी होती . आणि नर्मदेचा मूळ प्रवाह हा अजून बराच लांब होता . त्यामुळे त्या भिंतीवर थोडे अंतर चालल्याने परिक्रमा खंडित होण्याची भीती नव्हती . कारण अजूनही माझ्या उजव्या हाताला नर्मदा होती आणि डाव्या हाताला जमीन होती . फक्त फरक इतकाच होता की उजव्या हाताची नर्मदा अगदी जवळ होती आणि डाव्या हाताची जमीन कित्येक शे फूट खोल होती . या भिंतीवर दोन मुले रिल्स बनवण्यामध्ये व्यस्त होती . त्यातील एकाने मला येताना पाहिले आणि दोघे माझ्याशी बोलू लागले . यांना देखील नर्मदा परिक्रमा काय असते हे माहिती नव्हते असे माझ्या लक्षात आले . मी त्यांना तो विषय समजावून सांगितल्यावर त्यांनी आनंदाने माझ्यासोबत काही फोटो काढून घेतले . माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठविताना मात्र त्यांनी माझे एकट्याचे फोटो पाठवले . या भिंतीवरून दिसणारे नर्मदेचे स्वरूप अतिसुंदर अति भव्य आणि अति विशाल असे होते ! अक्षरशः शाई ओतल्यासारखा निळा रंग पाण्याला आला होता ! मी आजवर अनेक धरणे पाहिली होती परंतु इतके स्वच्छ पाणी कुठल्याच धरणात पाहिले नव्हते !
बर्गी धरणाच्या भिंतीवरून दिसणारे निळेशार नर्मदा पात्र
या भिंतीवरून किती अंतर चालल्यावर नर्मदेचा मध्यभाग येतो याचा मी अंदाज घेतला . आणि त्याच्या साधारण पाचशे मीटर आधीच उतरायचे ठरवले . सुदैवाने थोडेच अंतर चालल्यावर भिंतीवर ती लावलेले लोखंडी गेट लागले . त्याच्या अलीकडून मी भिंतीवरून धोकादायक पद्धतीचा उतार उतरून खाली आलो .
इथून डावीकडे वळले की पुढे मार्गस्थ होता येते .उजव्या हाताला नर्मदा नदी व तिचा काठ स्पष्ट दिसत आहे .
बर्गी धरणाच्या भिंतीवर या बिंदूपर्यंत सहज चालता येते . इथून पुढे शक्यतो जाऊ नये त्यामुळे परिक्रमा खंडित होण्याची शक्यता असते . इथून दिसणारे नर्मदेचे रूप नजरेमध्ये न मावणारे आहे .
लाल रंगाने दर्शविलेला नर्मदा मातेचा मध्यबिंदू असून डावा आणि उजवा असे दोन कालवे इथून निघतात . पैकी डावा कालवा ओलांडायला परवानगी आहे . कारण काही अंतर पुढे गेल्यावर तो नर्मदेला ओलांडून उजव्या हाताला निघून जातो . 
उतार उतरून खाली आल्यावर बरगी नगर नावाचे छोटेसे नगर वसविलेले आहे . धरण परिसरात काम करणाऱ्या कामगारांची घरे येथे आहेत . मी निवडलेला मार्ग हा नर्मदा नदीच्या अत्यंत काठाकाठाचा असा होता . परंतु बहुतांश परिक्रमावासी डांबरी सडकेने पुढे हर्दुली गावात जातात आणि तेथील नंदिकेश्वर महादेवाचे दर्शन घेतात .  धरणापेक्षा उंच असलेल्या एका टेकडीवर बांधलेल्या या भव्य मंदिरातून धरणाचा परिसर अत्यंत सुंदर दिसतो . 
हर्दुली गावातील श्री नंदिकेश्वर महादेव मंदिर शेजारी बर्गी धरण
खाली उतरल्यावर उंचच उंच झाडांच्या सावली मधून चालताना पुढे मला एक जलविद्युत प्रकल्प दिसू लागला . या प्रकल्पामधून आत मध्ये जाण्यास परिक्रमावासींना बंदी आहे . 
बरगी नगर जलविद्युत प्रकल्प
जलविद्युत प्रकल्पाच्या आतील मार्ग
मला इतक्या दूर आल्यासरशी हा विद्युत प्रकल्प बघायची मनोमन इच्छा होती . तसेही हा प्रकल्प काठावर असल्यामुळे परिक्रमे मध्ये काही अडथळा आणत नव्हता .परंतु ग्रामीण भागातील परिक्रमावासी कधीकधी मागचा पुढचा विचार न करता शौच विसर्जन वगैरे करतात तसेच घाण देखील करतात असा पूर्वानुभव असल्यामुळे या प्रकल्पामधून परिक्रमा वासींना अजिबात प्रवेश दिला जात नाही . दुसरे अजून एक कारण आहे परंतु ते मला थोड्या वेळाने कळले . योग्य वेळी सांगतो . आता आत मध्ये कसा प्रवेश करावा याचा विचार मी करत होतो आणि प्रकल्पाचे भव्य लोखंडी महाद्वार बंदच होते . आतून एक माणूस माझ्या दिशेने येत होता आणि बहुतेक इथे मार्ग नाही असे मला सांगत होता .
परंतु सुदैवाने त्या प्रकल्पाच्या महाद्वारापाशी मी यायला आणि आतून एक आलिशान गाडी बाहेर यायला एकच वेळ आली . या गाडीमध्ये प्रकल्पाचे चीफ इंजिनिअर साहेब बसले होते .तशी पाटीच गाडीवर लावलेली होती . मी हात करून गाडी थांबवली व त्यांनी काच खाली केली . मोठ्या साहेब लोकांशी कुठल्या भाषेमध्ये बोलल्यावर त्यांचे अंतकरण द्रवते याचा माझा थोडाफार अभ्यास होता . मी त्यांना म्हणालो , " excuse me Sir, my name is xyz. I am from abc City and I am an engineer by education. could you please allow me to have a walk through of your esteemed project ? I have heard a lot about it and I'm keen to watch it. It's possible with your permission only.I assure you that I will walk away immediately after seeing the campus" 
"Oh why not sir! It's my pleasure" असे म्हणत त्याने गेट उघडण्यासाठी आलेल्या इंजिनिअरला हाक मारली . आणि सांगितले , " ये महाराष्ट्र से बडे इंजिनियर साब आये है । इनको जरा अपना हायड्रो प्लांट दिखा लाना । सब कुछ दिखाना । चाय पानी नाश्ता सब खिलाना । " काच वर गेली आणि गाडी निघून गेली . जो इंजिनियर मगाशी मला हाकलायला पुढे येत होता तोच सर सर म्हणून माझ्यासोबत फिरू लागला . वरील प्रसंग ऐकायला गमतीशीर वाटतो . परंतु आजही आपला देश कसा गुलामगिरी मानसिकतेत जगतो आहे याचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे . इंग्रजीमध्ये बोलले की आजही आपल्या समाजातील बहुतांश लोकांना हा मनुष्य कोणीतरी खूप मोठा आणि उच्चशिक्षित आहे असा गैरसमज होत असतो . प्रत्यक्षात मी बोललेले वरील वाक्य कुठलाही शाळकरी मुलगा देखील बोलू शकला असता . परंतु त्याची फारशी शहानिशा न करता इंग्रजीमध्ये बोलले आहे म्हणजे सर्व सत्यच असणार असा समज इंजिनियर साहेबांनी करून घेतला आणि माझे काम झाले . हेच जर मी माझी शैक्षणिक ओळख लपवून एक परिक्रमावासी म्हणून विनंती केली असती तर कदाचित ती धुडकावली गेली असती . ज्याने त्याने विचार करून पहावा .असो . 
जबलपूर वरून येऊन जाऊन नोकरी करणारा तो एक जुनियर इंजिनियर होता . तो मला पुढे पुढे घेऊन जात असल्यामुळे वाटत असलेल्या कुठल्याही सिक्युरिटी गार्डने मला अडवले नाही . हे एक प्रतिबंधित क्षेत्र असून इथे फोटोग्राफी देखील प्रतिबंधित होती . जबलपूर हे मध्य प्रदेश मधील सर्वात मोठे शहर मानले जाते . इंदोर च्या जवळपास जाणारा आहे याचा विस्तार आहे . आणि इथून पुढे नर्मदेच्या काठावर प्रचंड गावे आहेत . त्यामुळे हे धरण अतिशय संवेदनशील मानले गेलेले आहे . याच्या एक दशांशाहून ही अधिक लहान असलेल्या पानशेत धरणाच्या फुटण्यामुळे पुणे शहराची काय वाहतात झाली होती हे आपण जाणतोच . (पानशेत धरण १० टीएमसी क्षमतेचे आहे तर बर्गी धरण १४० टीएमसी क्षमतेचे आहे ) त्यामुळे इथे इतकी कडक सुरक्षा असणे स्वाभाविक होते . हे धरण फुटले तर अर्धा मध्य प्रदेश वाहून जाईल . असो . 
जिज्ञासूंसाठी बर्गी धरणाची तांत्रिक माहिती

अभियंत्याने संपूर्ण प्रकल्प मला मोठ्या आस्थेने दाखवला . या परिसरामध्ये आलेला मी पहिला परिक्रमावासी आहे हे देखील त्याने मला सांगितले . आता मला उत्कंठा होती ती सर्वात महत्त्वाचा एक बिंदू बघण्याची ! जलविद्युत प्रकल्पाचे पाणी उंचावरून अतिशय वेगाने एका टरबाइन वर अर्थात लोखंडी चक्रावर सोडले जाते आणि त्याच्या गतीमुळे विद्युत निर्मिती होत असते . हे पाणी इतक्या भयंकर गतीने सोडले जाते की ते जितक्या उंचावरून येते तितक्याच उंच पुन्हा उडत असते . त्याचा आवाज प्रचंड कानठळ्या बसविणारा असतो . अजून तो परिसर शांत होता याचा अर्थ पाणी सोडलेले नव्हते . इंजिनीयरने मला सांगितले की मी एकदम योग्य वेळी आलेलो आहे आणि आता ते पाणी सोडण्यात येणार आहे . तो मला जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य बोगद्यापाशी घेऊन आला .मोठ्या आवाजात भोंगे आणि सायरन वाजू लागले . इंजिनीयरने मला सांगितले की कुठल्याही परिस्थितीमध्ये मला पाण्याच्या दिशेला जायचे नाही आहे. अन्यथा पाण्याच्या गतीमुळे निर्माण झालेले वारे आपल्याला पाण्यामध्ये खेचून घेते . अचानक ढग गडगडतात तसा गडगड आवाज येऊ लागला . आणि छातीमध्ये धडकी भरेल अशा पद्धतीचा उर दडपवणारा आवाज करत नर्मदा जलाचा एक भव्य प्रवाह त्या बोगद्यातून बाहेर आला ! हे दृश्य अतिशय अद्भुत परंतु तितकेच भयंकर होते !
या लोखंडी मार्गिकेवरून पाण्याच्या विरुद्ध बाजूने चालत मी पुढे गेलो . हा प्रवास अत्यंत चित्त थरारक होता .
 लोखंडी जिन्याचा एक मार्ग या बोगद्याच्या वरून पलीकडे जाऊन वळत होता . इंजिनीयर त्याच बाजूला थांबून राहिला कारण या पाण्यामुळे सर्वत्र मोठे तुषार उडून मोठाले ढग तयार झाले होते . आणि त्याच्यामध्ये भिजण्याची त्याची इच्छा नव्हती . मी हळूहळू पुढे सरकू लागलो आणि अक्षरशः माझ्या पायाखालून धडधड धडधड आवाज करत वाहणारे ते पाणी आता मला आत मध्ये खेचून घेत आहे असा मला भास झाला . हे पाणी इतके पांढरे शुभ्र होते की विचारू नका . तिथेच पाच मिनिटे उभे राहून मी त्या पाण्याकडे बघत राहिलो ! अक्षरशः ध्यान लागेल अशी ती अवस्था होती ! मन संपूर्ण निर्विचार झाले होते ! पंचमहाभूतांची ताकद किती अफाट आहे याची प्रचिती घेत होतो ! त्या पाण्यामध्ये आलेली कुठलीही वस्तू त्याने छिन्नभिन्न केली असती इतकी त्या प्रवाहामध्ये ताकद होती ! इकडून इंजिनियर मला ओरडून ओरडून सांगत होता की बाबाजी तिथे उभे राहू नका पुढे जा . परंतु मला त्याचा आवाज ऐकू येत नव्हता इतका त्या पाण्याचा आवाज होता . अखेरीस त्याने एका सुरक्षारक्षकाला माझ्या दिशेने पाठवले . तो बिचारा तुषारां मध्ये भिजत भिजत माझ्याकडे आला आणि मला पुढे जायची विनंती केली . त्याचेही बरोबर होते कारण धरणाच्या भिंतीवरून कोणी मी तिथे उभा आहे असा फोटो काढला असता तर त्याची नोकरी गेली असती . परंतु नर्मदा मातेचे हे असे अद्भुत स्वरूप मला तरी पुन्हा कधी बघायला मिळणार होते त्यामुळे निर्विचार अवस्थेमध्ये मी तिथे हातबुद्धपणे उभा होतो . पुढे गेल्या गेल्या डावीकडे वळून चालावे लागत होते . आणि इथे तर त्या पाण्याचे अजूनच भयंकर रूप बघायला मिळत होते . कारण जेवढ्या उंचावरून ते पाणी येते आहे जवळपास तेवढ्याच उंच ते पुन्हा उडी मारत होते . इथे काहीही दिसत नव्हते संपूर्ण ढग आणि तुषार होते ! मी संपूर्णपणे भिजून गेलो होतो ! 
 बोगद्यातून असे काहीसे पाणी येत होते
वाचकांना कल्पना यावी म्हणून मी कुठल्या मार्गाने चालत गेलो आणि त्या बोगद्याचे ठिकाण कसे होते हे दाखविणारा एक फोटो खाली जोडत आहे .
उजव्या हाताला दिसतो आहे तो बरगी धरणाचा राणी अवंतीबाई लोधी जलाशय . हिरव्या रंगाने दाखविलेल्या मार्गाने मी मार्गस्थ झालो . जलविद्युत प्रकल्पातून निघालेले पाणी अक्षरशः उपग्रहातून देखील दिसते आहे याच्यावरून त्याच्या आकाराचा अंदाज घ्यावा . वरच्या बाजूला धरणाचे उघडलेले दरवाजे दिसत आहेत . पुढे वाहणारी नर्मदा माई दिसत आहे .
या भागामध्ये छायाचित्रण प्रतिबंधित असल्यामुळे कुठेच या दृश्याची चित्रे मला आढळली नाहीत . मुळात हे दृश्य इतके भयकंपित करणारे असते की तिथे उभे राहून फोटो काढता येणे देखील शक्य नाही . तुषारां मुळे इथे मोठे इंद्रधनुष्य निर्माण झाले होते ! आणि मी ज्या मार्गाने चालत होतो तो पूर्णपणे चिखलमय झाला होता .बर्गी धरणाची उंची साधारण सत्तर मीटर अथवा दोनशे तीस फूट आहे . इतक्या उंचावरून पाणी येऊन आदळल्यामुळे पाण्याचा हा पांढरा शुभ्र प्रवाह खूप अंतर हवेतून उडत असतो . नंतर जेव्हा तो कालव्यामध्ये पुन्हा पडतो तेव्हा खाली आपटून पुन्हा तीस चाळीस फुटापर्यंत उसळतो . पुन्हा आपटतो पुन्हा उसळतो असे करत करत हळूहळू कालव्याचे पाणी स्थिर होते . इतक्या भव्य लाटा आयुष्यात कुठेच बघायला मिळणार नाहीत . हे दृश्य अत्यंत मनोहर होते ! नर्मदेच्या पाण्याचा सुगंध सर्वत्र पसरला होता ! माझ्या मनामध्ये हा प्रकल्प बघण्याची इच्छा यायला आणि प्रमुख अभियंता त्याच वेळी दारातून बाहेर पडायला हा अशक्यप्राय योगायोग जुळवून आणण्याचे सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्ये आहे ? जिच्यामध्ये आहे तीच अवखळ मुलीसारखी उड्या मारत पुढे निघाली होती ! हे तिचे केवळ एक टक्का जल होते ! ९९% जलाचा मुख्य प्रवाह अजूनही माझ्या उजव्या हातालाच होता ! हा डावा कालवा खूप मोठा आहे . पुण्यामध्ये मुठा नदीचे पात्र जेवढे आहे साधारण तेवढा हा कालवा आहे . बहुतांश परिक्रमावासी या कालव्याच्या पलीकडच्या तटावरून  प्रवास करतात . मला मात्र नर्मदा मातेने डाव्या कालव्याच्या या तटावरून प्रवास करण्याची सुसंधी  दिली होती . पलीकडच्या तटावर राणी अवंतीबाई लोधी हिचा सुंदर पुतळा आहे . 
डाव्या कालव्याच्या डाव्या हाताला असलेली राणी अवंती बाई लोधी हिची अश्वारूढ मूर्ती
ही मूर्ती तुम्हाला कोल्हापूरच्या ताराराणी मूर्तीची आठवण करून देते
राणी अवंतीबाई हिचा अल्प इतिहास
अशा पद्धतीने नर्मदेचे एक अतिशय वेगळे आणि विराट रूप मला तिने मला दाखविले ! आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या नर्मदाष्टकामध्ये पहिल्याच ओळीमध्ये तिचे जे वर्णन केले आहे ते इथे साकार स्वरूपात विलसत होते !
 
सबिन्दुसिन्धुसुस्खलत्तरङ्गभङ्गरञ्जितं ।
थेंबांच्या मोठ्या सागरासह वेगाने खाली पडत 
लाटांमध्ये रूपांतरित होत भंग पावणाऱ्या जलाने 
जी नटलेली आहे ,
द्विषत्सु पापजातजातकारिवारिसंयुतम् ।
द्वेषातून निर्माण होणाऱ्या पापाचे निर्मूलन करण्याचे 
सामर्थ्य असलेले पवित्र जल जिच्यामध्ये आहे ,
कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे ।
यमदूतांच्या मुळे निर्माण झालेल्या मृत्यूच्या भयाचे 
जी हरण करते
त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे ॥ १॥
अशा तुझ्या चरण कमलांना ,
हे नर्मदे देवी मी नमस्कार करतो !
त्या ठिकाणी उसळणारे तिचे खळाळते जल पाहून मग हृदयांतर्यामी वास करणारी सरस्वती देखील उफाळून येते आणि त्या नर्मदा मातेचे गुणगान करू लागते !

तुषारसागरे खळाळत्या जलात शोभते ।
धुवून द्वेषपाप हो जिचे सलील टाकते ।
मरावयास भीती त्या भयास पूर्ण भेदिते ।
नमू तुझ्या पदारविंदी माय देवी नर्मदे ॥



लेखक एक्केचाळीस समाप्त ( क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर