लेखांक ४२ : निगरीचे बेळीलाल आणि ग्वारी घाट गुरुद्वार्‍यातील अनुभव

भयानक अशा बर्गी डाव्या कालव्याचे मुखदर्शन करून पुढे निघालो . समोर पाण्याचा दर्या उसळला होता तर पोटामध्ये आगडोंब उसळला होता . उजव्या हाताला खाली हाथी वाले दादा यांचा नर्मदा कुटी नावाचा एक आश्रम आहे असे मला भिंतीवरील मुलांनी सांगितले होते . त्या आश्रमाचा शोध घेत मी कालव्याच्या भिंतीवरून चालू लागलो . थोड्याच वेळात एक घाट रस्ता ओलांडून मी वळणावर असलेल्या त्या आश्रमामध्ये पोहोचलो . कालवा आणि नर्मदा मैया चे पात्र याच्यामध्ये हा आश्रम होता . इथून बर्गी धरणाचे दरवाजे खूप सुंदर दिसायचे . पावसाळ्यामध्ये तर बर्गी धरणाचे सर्व वीस दरवाजे उघडतात तेव्हा फार भयंकर दृश्य असते .
लाल खुणेने ने दाखविलेला नर्मदा कुटी आश्रम
हाथी वाले दादा यांचा नर्मदा कुटी आश्रम गर्द झाडीमध्ये लपलेला असून दोन्ही बाजूंनी नर्मदेच्या पाण्याचा खळखळाट इथे अखंड ऐकू येतो . एका बाजूने मुख्य पात्र तर दुसऱ्या बाजूने डावा कालवा .
 आश्रमामध्ये अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत .
पैकी या मोठ्या मंदिराच्या कट्ट्यावर मी आसन लावले
सवयीप्रमाणे आश्रम झाडून घेतला
आश्रमातील एक मंदिर 
आश्रमातील गणपती बाप्पा
आत मध्ये एक धुनी होती .तिथे एक सेवेकरी काम करत होता . मला पाहताच त्याने आनंदाने गरम गरम टिक्कड आणि भाजी वाढली . आज सकाळपासून खूप चालणे झालेले असल्यामुळे आनंदाने पोटभर जेवलो . सेवेकरी मनाला सावकार जीवा इथून दोन किलोमीटर पुढे कालवा संपतो . तिथून पक्का रस्ता लागतो जो जबलपूरला जातो . भोजन प्रसाद घेतल्यावर दोनच मिनिटे बसलो आणि कडक ऊन आहे तोवर चालून घेऊयात असा विचार करून नर्मदे हर केले . पुन्हा एकदा कालव्याचा मार्ग पकडला .. हा मार्ग अतिशय त्रासदायक होता .ना धड कच्चा ना धड डांबरी त्यामुळे अत्यंत खडे , खड्डे खुड्डे आणि असमान रस्ता होता . प्रत्येक पाऊल लक्ष देऊन टाकावे लागत होते .
आता केवळ दोनच किलोमीटर चालायचे आहे या विचाराने मी एकदम निवांत चालू लागलो.परंतु तासा दीड तासाने माझ्या असे लक्षात आले की हे अंतर संपतच नाही आहे . बरे वाटेत कोणीच भेटत नव्हते . आणि या मार्गाशिवाय पर्याय नव्हता कारण नर्मदे काठी प्रचंड दलदल आणि जंगल होते . नर्मदा मैया मला उजव्या हाताला खाली वाहताना दिसत होती . परंतु तिथवर जायला मार्ग नाही हे देखील दिसत होते . खूप अंतर असेच चालत राहिलो . मध्ये एक मनुष्य भेटला त्याने सांगितले आता फक्त सहा किलोमीटर चालायचे आहे . पुन्हा पावलांनी गती घेतली आणि चालत राहिलो . नाही म्हणायला डावीकडचा कालवा मात्र खूप सुंदर होता . त्यातही नर्मदा जलाचा तो विवक्षित रंग उतरला होता . पहिल्यांदाच माझ्या डाव्या हाताला पाणी वाहत आहे असे पाहत होतो . अन्यथा परिक्रमा सुरू केल्यापासून नर्मदा माई सतत माझ्या उजव्या हातालाच राहिलेली होती . त्यामुळे मेंदूला थोडेसे विचित्र वाटत होते . कालवा अतिशय रुंद होता मोठा नदी एवढा वाटत अनेक नद्या त्या कालव्याला ओलांडून वाहत होत्या मध्ये नदी आडवी आली की कालवा पुलावरून जायचा . इथे मोठे मजेशीर असे वॉटर / ॲक्वा डक्ट अर्थात भुयारी जल मार्ग तयार केले होते ज्याच्या वरून गाड्या जायच्या आणि खालून पाणी जायचे ! मी इथे बरेच खेळ करून पाहिले ! म्हणजे पाण्यामध्ये एखादी काडी टाकायची आणि पुलावरून पळत पुढे जाऊन काडीच्या आधी पोहोचायचे ! किंवा या डक्टला मध्ये मध्ये फटी ठेवल्या होत्या त्याच्यातून पाण्याचा आवाज कान लावून ऐकायचा ! किंवा त्यातून मोठ्या आवाजात नर्मदे हर म्हणायचे व तो आवाज आत मध्ये कसा घुमतो ते ऐकायचे ! अशाप्रकारे माझे बालपण जागृत करणारा हा कालवा होता ! परंतु काही केल्या संपत मात्र नव्हता !
 डाव्या कालव्यावरील टेमर नामक नदी ओलांडून देणारे एक्वा डक्ट जलपूल . रुंद कालवा पुलावर अरुंद झाल्यामुळे पाण्याची गती वाढते . 
 हळूहळू दिवस मावळतीकडे जाऊ लागला . परंतु कालवा काही संपायचे नाव घेईना . आता जबलपूर गाठणे मला अशक्य वाटू लागले .सुरुवातीचे दोन किलोमीटर आपण उगाचच टंगळमंगळ केली याचे शल्य वाटू लागले . अजूनही कालव्याचा मार्ग सुरूच होता . आता मात्र माझा संयम संपत चालला ! आपल्याला अंतर सांगता येत नसेल तर सरळ सांगावे ना की मला माहिती नाही . इतक्या मोठ्या अंतराला दोन किलोमीटर असे का सांगावे ? त्यामुळे माझे सगळेच गणित बिघडत चालले होते . काही ठिकाणी कालवा डोंगर फोडून वाहत होता . एक छोटी नर्मदाच जणूकाही माझ्या शेजारून वाहत होती ! मोठी नर्मदा हळूहळू लांब गेली होती परंतु मधून अधून दर्शन देत होती . नर्मदा कुठे आहे हे क्षितिजाकडे पाहिल्यावर लगेच कळायचे . अलीकडची झाडी गडद रंगाची व पलीकडची फिकट रंगाची दिसायची आणि मधल्या फटीमध्ये धुक्या सारखे नर्मदेचे बाष्प साठलेले दिसायचे . हा कालवा अजून धावतच होता . डावीकडे कालवा उजवीकडे खड्डा अशा अवस्थेत मधून चालण्याला पर्याय नव्हता . आणि मध्ये दगड गोटे खडे यांचा खच पडलेला . त्यामुळे पाय प्रचंड दुखायला लागले . साधारण १५ किलोमीटर अंतर चालल्यावर रेल्वेचा एक पूल लागला . याच्याजवळ प्रदीप साहू नावाचे एक सदृहस्थ भेटले जे सपत्नीक आपल्या बाईकवरून कुठेतरी निघाले होते . हे सालीवाडा किंवा सालीबाडा या जवळच्याच गावामध्ये परिक्रमा वाशांची सेवा करत . त्यांनी मला गावातील दुर्गा मंदिरामध्ये जाऊन बसण्यास सांगितले . त्यांना यायला उशीर होणार होता . परंतु अजून थोडासा उजेड होता त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार देऊन पुढे चालायला सुरुवात केली . अगली बार जरूर आना असे सांगून  माझ्या हातावर वीस रुपये दक्षिणा टेकवून पाया पडून दोघे निघून गेले . वाटेमध्ये परिक्रमावासींना जो नमस्कार केला जातो तो तुम्हाला नसून तुमच्या पाठीवर तुम्ही घेऊन चालत असलेल्या नर्मदा मैयाला असतो हे सतत ध्यानात ठेवावे लागते . नाहीतर केलेल्या परिक्रमेचे संपूर्ण अकाउंट खाली व्हायला वेळ लागणार नाही ! मध्ये शेतकऱ्यांनी मोठे मोठे काळ्या रंगाचे सहा इंची नळे टाकून कालव्यामधून थेट पाणी उचलले होते . ते ओलांडून चालावे लागत होते . हळूहळू माझ्या पायातील बळ कमी होऊ लागले . सूर्य अतिशय वेगाने मावळतीकडे धावतो आहे असे वाटू लागले . अजून जबलपूर सात आठ किलोमीटर दूर होते . वाटेत कुठलंह घर आश्रम मंदिर काहीही दिसेना .मुख्य म्हणजे हा कालवा तर दिसत होता परंतु याची आई नर्मदा मैया ती देखील कोठे दिसेना ! आता मात्र माझी मनस्थिती थोडीशी बिकट होऊ लागली ! पाण्याचा हा प्रभाव असावा ! सतत खडक कातळ पाहून सह्याद्री मधील मने जशी कठोर झालेली असतात तसे सतत ते पाण्याचे भव्य दिव्य रूप पाहून माझे मन अतिशय तरल ,विरल व चंचल झाले आहे असे मला वाटले . मोठ्या आवाजात नर्मदेला हाक मारली . इतक्यात उजव्या हाताच्या शेतातून एक छोटीशी मुलगी पळतच बाहेर आली . " नम्मदे हद बाबाजी " मुलगी बोबड्या आवाजात म्हणाली ! तिचे ते गोड रूप आणि गोड आवाज ऐकून माझा शिणवटा कुठल्या कुठे पळून गेला ! जणू काही तिच्या रूपाने साक्षात मैय्याच मदतीला धावून आली असे मला वाटते ! इतक्यात तिच्या मागून तिच्या पेक्षा एक दोन वर्ष मोठा असलेला एक मुलगा धावत आला . त्याने देखील मोठ्या आवाजात मला निर्भयपणे नर्मदे हर केले ! मी नर्मदे हर असे प्रत्युत्तर दिले . इतक्यात त्या दोघांना रागवण्याकरता आतून एक मनुष्य बाहेर पळत आला . आणि मला पाहून धावतच माझ्याकडे आला . चटकन वाकून त्याने मला नमस्कार केला . आणि माझे पाय धरले .मला म्हणाला आज तुम्ही इथून पुढे जायचे नाही . आज या गरीबाच्या झोपडीमध्येच तुम्ही मुक्काम करायचा ! खरे म्हणजे मला मुक्कामाचा प्रश्न पडलेलाच होता . म्हणूनच मी इतक्या वेगाने चालायचा प्रयत्न करत होतो . परंतु आता पाय काही साथ देत नव्हते . सकाळपासून जो अखंड उतार मी उतरत होतो त्याच्यामुळे गुडघे बाद व्हायची पाळी आली होती . पाणी नेहमी उतारा कडे वाहते . या नियमानुसार कालवा देखील अखंड उतरत होता . मी खाली वाकून त्याला उठवले आणि त्याच्या पाया पडलो .परस्परो देवो भव ! आज ३५ किमी अंतर सहज चाललो होतो . आणि वाटेत कुठे चहासुद्धा मिळालेला नव्हता . कुठेतरी विश्रांती घेणे अत्यावश्यक वाटत होते . या मनुष्याचे नाव केशवप्रसाद कुशवाहा असे होते . राणा प्रताप युद्धाच्या काळात कधी कधी गवतावर देखील झोपायचे . त्यांच्या त्यागाचे स्मरण म्हणून राजपूत लोक पुढे गादीवर झोपायच्या ऐवजी गवतावर झोपू लागले . सुखाची चटक लागून आपले ध्येय विसरू नये हे त्यामागचे कारण होते . परंतु काही शतके गेल्यावर जसे स्थैर्य आणि श्रीमंती आली तसे या लोकांनी पुन्हा गादीवर झोपणे चालू केले परंतु गवतावर झोपलो आहे हे शब्दशः सिद्ध व्हावे म्हणून गवताची एक काडी उशी खाली घेऊन झोपू लागले . कुश म्हणजे गवतावर झोपणारे म्हणून हे कुशवाह असे नाव पडले . याचे नाव केशव प्रसाद असले तरी याला सर्व निगरी गावातील लोक बेळीलाल म्हणून ओळखायचे .याची चाळीस एकर शेती तिथे होते . शेतामध्ये त्याने एक झोपडी बांधली होती .हा गावातच राहायचा परंतु शेतात काही काम असले तर इकडे राहायचा . 
डावीकडून वाहणारा नर्मदा डावा कालवा .पिवळ्या रंगाची बेळीलाल कुशवाहाची झोपडी . रस्त्याच्या डाव्या बाजूची नांगरलेली सर्व शेती त्याचीच आहे .

मी झोपडी मध्ये जाऊन बसलो . पंधरा बाय आठ फूट मापाची एक खोली होती . मागे पंधरा फूट बाय सात फुटाचे जागेत शेतीचे सर्व सामान ठेवलेले होते . बाहेर येऊन हात पाय धुतले . समोरच्या शेतातून एक तरुण कामगार स्त्री डोक्यावरून पदर घेऊन झरझर बाहेर पडली . बेळीलाल ने तिला काहीतरी सांगितले आणि ती निघून गेली . याने घरी निरोप पाठविला होता की तो आज इथेच मुक्काम करणार आहे . आणि त्याच्यासोबत एक परिक्रमावासी राहणार आहे . भोजनाची चिंता नसावी . मी पुन्हा कुटीमध्ये येऊन बसलो . शेणाने सारवलेली सुंदर कुटी होती . काड्या काटक्यांच्या भिंती होत्या . त्या देखील मातीने लिंपून त्याला काव मारली होती . बाहेर थंडी असली तरी आत मध्ये उबदार होते . शेतात काम करून थकल्यावर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी अशा झोपड्या शेतकरी उभ्या करतात . दोन्ही मुले माझ्या आजूबाजूला येऊन बसली ! त्या दोघांनी माझे प्रचंड मनोरंजन केले ! त्या मुलाचे नाव होते राजू रजक आणि त्याची धाकटी बहीण खुशी रजक . खुशी बोबडी होती . त्यामुळे ती काय बोलते आहे समजायचे नाही . परंतु राजू इतका समजूतदार होता की तिचे वाक्य संपते न संपते तोच तिला काय म्हणायचे आहे हे तो शुद्ध स्पष्ट हिंदीमध्ये सांगायचा .खुशीचे वय सहा वर्षे होते तर हा आठ वर्षाचा होता . " बाबाजी बाबाजी आप तहा था थहे थो ? " खुशीने मला विचारले . लगेच राजू म्हणाला " बाबाजी मेरी बहन तोतली है । वह पूछ रही है की आप कहा जा रहे हो ? " माझी हसून हसून पुरेवाट झाली ! तिचे तोतरे बोलणे ऐकून मला हसू येते आहे हे पाहिल्यावर तिला अजूनच चेव चढला ! आणि ती अजून जास्त तोतरे बोलू लागली ! बोलता बोलता दोघे माझ्या मांडीवर कधी येऊन बसले मलाच कळले नाही ! बेळीलाल त्यांना रागवू लागला ! "शैतानो ! उतरो नीचे ! घर भागो ! बाबाजी थक के आए है। उनको आराम करने दो । " मी त्याला म्हणालो की अरे राहू दे ! खरं सांगायचं तर पाय दुखत असल्यामुळे दोघे दोन बाजूला बसल्यामुळे पायाला आराम मिळतो आहे !आणि मला लहान मुले खूप आवडतात त्यामुळे दोघांना खेळू दे काय खेळायचे ते ! दोघांनी माझ्या दंडापासून पिशवीपर्यंत प्रत्येक गोष्ट उचकून पाहिली . एकादशीला खाण्यासाठी ठेवलेला थोडासा गुळ माझ्या पिशवीमध्ये होता तो मी त्या दोघांना दिला ! एखादे चॉकलेट मिळाल्यावर जसा आनंद होतो तसा आनंद दोघांना झाला . बेळीलाल म्हणाला , "बाबाजी ये दोनो दिखते है उतने प्यारे बच्चे नही है । बहुत बडे शैतान है ।इतना उधम मचाते है की पूछना मत । " मी म्हणालो अरे त्यांनी नाही दंगा करायचा तर मग कोणी करायचा ? आणि मला त्यांच्याशी गप्पा मारायला मजा येते आहे त्यामुळे असू दे ! मग मात्र बेळीलाल माझ्या समोर येऊन बसला . आणि सांगू लागला की हे आपलेच घर समजा . किती दिवस राहायचे आहे तेवढे दिवस राहा . काहीही कमी जास्त लागले तर मला सांगा . संकोच करू नका . या मार्गाने कोणी परिक्रमा वासी जात नाही . त्यामुळे त्याला सेवा करण्याचा मिळालेला हा अवसर सार्थकी लावावा ! मी त्याला सांगितले की खरे तर मला आज जबलपूरलाच पोहोचायचे होते . परंतु वाटेत कसे चुकीचे अंतर मला सांगितले गेले हे त्याला सांगितल्यावर तो हसायला लागला ! त्याने मला सांगितले , नर्मदा खंडामध्ये कधीही कोणीही सांगितलेल्या अंतरावर विश्वास ठेवायचा नाही ! फक्त दिशा विचारून घ्यायची . अंतराचा अंदाज आपणच लावायचा ! विशेषतः ज्या सेवेकऱ्याने मला अंतर सांगितले होते तो याच्या माहितीतला होता . मध्ये भेटलेला प्रदीप साहू देखील याचा मित्र होता . माझ्या येण्यामुळे त्याला अतिशय आनंद झालेला होता . आणि तो प्रत्येक वाक्यातून जाणवत होता . मला काय करू आणि काय नको असे त्याला झाले होते ! मी आलो आहे हे सांगून त्याने दोन-तीन मित्रांना बोलावून घेतले . बाबाजी आज आपण जेवायला काय करूया ? मी त्याला म्हणालो मला काहीही चालेल . तो म्हणाला तसे नाही 'तुम्ही जर पंचपक्वान्ने म्हणालात तर पंचपक्वान्ने करून खाऊ घालतो ! मी विचारत पडलो . पाचच मिनिटापूर्वी बसायला देखील जागा नसल्यामुळे ,आणि शेजारी एवढा मोठा कालवा असून देखील त्याच्यात उतरता येणे शक्य नसल्यामुळे पाणी पाणी करणारा मी , आणि आता मैया मला या शेतकऱ्याच्या रूपाने पंचपक्वान्ने देऊ करते आहे ! मी त्याला म्हणालो जे तुला योग्य वाटेल ते काहीही चालेल . इतक्यात तो मला म्हणाला , "बाबाजी आपने गक्कड भरता खाया है क्या ? " मी हे नाव पहिल्यांदा ऐकत होतो . माझा चेहरा बघून त्याने ओळखले आणि तो म्हणाला आज तुम्ही हा पदार्थ खाऊन बघाच .आणि तो देखील माझ्या हातचा खाऊन बघा ! हा आमच्या भागातला खास पदार्थ आहे ! आणि हा बनवायला फारसे कष्ट देखील लागत नाहीत ! शेतकरी लोक शेतामध्ये कष्ट करतात तेव्हा काम करता करता एका बाजूला आपोआप तयार होणारा हा पदार्थ आहे . गाईच्या शेणाच्या दहा-बारा मोठ्या गोवऱ्या घेऊन पेटवून ठेवायच्या . एकदा त्या धुमसल्या की चांगल्या लालबुंद होतात . तोपर्यंत इकडे एका दगडावर पाण्याने स्वच्छ करून मस्त कणिक मळायची . शेतातून दोन-चार वांगी , दोन टोमॅटो , चार-पाच कांदे , एखादा बटाटा तोडून आणायचा . आणि त्या पेटलेल्या गोवरी / शेणकुटाखाली हे सर्व ठेवायचे .इथे त्याला कंडा म्हणतात .मळलेल्या कणकेचे मस्त लाडवाच्या आकाराचे गोळे करायचे आणि ते गोळे या गोवऱ्यांवर टाकून द्यायचे . आणि भजन करत बसायचे . 
गक्कड भरता बनविण्याची पद्धत (संग्रहित छायाचित्र )
अधून मधून गोळे उलटे पालटे करायचे . अर्ध्या तासात सर्व तयार होते ! नंतर वरचे गोळे बाजूला काढून झटकून घ्यायचे . हे झटकायची एक पद्धत आहे . याच्यावर एका हातात ठेवून दुसऱ्या हाताने जोरात फटका मारायचा . त्याने राख निघून जाते आणि कडक झालेला गोळा फुटतो देखील . मग याला भरपूर गाईचे तूप लावून घ्यायचे. हा झाला गक्कड ! आता शिजलेली वांगी टोमॅटो कांदा वगैरे घ्यायचे आणि एका पातेल्यामध्ये हाताने कुस्करायचे . त्यात थोडेसे तिखट मीठ टाकायचे . वरून शेतातील ताजी कोथिंबीर पसरून द्यायची . झाला भरता तयार ! काही गोळे वेगळे बाजूला काढायचे . आणि त्यात भरपूर तूप आणि गूळ टाकून हाताने कुस्करायचे . हा झाला चुरमा किंवा मलिदा तयार !
अशा पद्धतीचा फक्कड गक्कड भरता आणि चुरमा बेळीलालने बघता बघता तयार केला ! बहात्तर गक्कड त्याने केले . आणि दहा गक्कडचा मलिदा बनवला .त्याचा मित्र दिलीप रजक देखील आला . माझे एक मित्र आहेत सुभाष पवार म्हणून . हा दिलीप रजक म्हणजे त्यांची झेरॉक्स कॉपी होता ! वागणे , बोलणे ,हसणे आवाज सर्व काही सुभाष पवार ! मला खूप आश्चर्य वाटले . शेकडो किलोमीटर अंतरावर दोन इतक्या एक सारख्या व्यक्ती कशा काय असू शकतात ! निसर्गाची कमाल आहे ! परंतु नर्मदे काठी अशी मला अनेक माणसे भेटली . माझ्या असे लक्षात आले की संपूर्ण भारतभर जितक्या म्हणून प्रकारची लोक आहेत त्यातील प्रत्येकाचे एक सॅम्पल नर्मदे काठी निर्माण करून ठेवलेले आहे ! हा दिलीप म्हणजे राजू उर्फ राजा आणि खुशी यांचा बाप होता . आणि मी तर अशा भ्रमात होतो की ही बेळीलालची मुले आहेत ! बेळीलाल चे वय साधारण ४५ वर्षे असावे . तो म्हणाला अहो बाबाजी माझी नातवंडे सुद्धा या पोरांपेक्षा मोठाली आहेत ! काय ? ? कसे काय शक्य आहे ?शहरी मनासाठी खरोखरीच आश्चर्यकारक गोष्ट होती ! याचे लग्न तेराव्या वर्षी झाले होते . आणि चौदाव्या वर्षी याला पहिली मुलगी झाली . तिसाव्या वर्षी हा आजोबा झाला . आणि आता नातवाचे लग्न लवकर झाले तर पन्नाशीच्या आसपास पणजोबा देखील होईल ! आणि तरीदेखील हा अजून अत्यंत सुदृढ आणि कार्यक्षम होता . आजही खेड्यामध्ये लवकर लग्न लावून दिले जाते . राजस्थानमध्ये तर आजही बालविवाह केला जातो . या प्रकारचे समर्थन करणे किंवा विरोध करणे यापेक्षा याचा उहापोह करणे आवश्यक वाटते . आजकाल विशेषतः शहरी सुशिक्षित नोकरी करणाऱ्या तरुण-तरुणीं मध्ये उशिरा लग्न करण्याचे प्रमाण वाढलेले आहे . आणि याच लोकांमध्ये घटस्फोटाचे आणि निःसंतान राहण्याचे प्रमाण देखील जास्त आहे . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उशिरा झालेले लग्न होय . निसर्गाने योग्य वयामध्ये माणसाला प्रेरणा दिलेली असते . सरकारचे कायदे काहीही सांगत असले तरी निसर्गाचे कायदे योग्य वेळी काम करतात . त्यामुळे साधारण बाराव्या तेराव्या वर्षी मुला मुलींमध्ये परस्पर आकर्षण निर्माण होऊ लागते . वैद्यकीय शास्त्रानुसार संतान प्राप्ती होण्याचे उत्तम वय देखील १८ ते २२ असे आहे . त्यानंतर स्त्रैण बीजाची गुणवत्ता कमी होत जाते आणि शुक्राणूंची संख्या व गुणवत्ता देखील घटत जाते . परिक्रमेमध्ये मला भेटलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीचे लवकर लग्न झाले होते व त्यामुळे त्यांचे संसार अत्यंत सुखाचे सुरू होते . लहान वयामध्ये असलेल्या लवचिकपणामुळे पती-पत्नीचे मन अधिक लवकर जुळते . उशीरा वयात लग्न झाले की जुळवून घेण्याचे प्रमाण कमी होत जाते व त्यामुळे खटके उडू लागतात . असो .तात्पर्य इतकेच की  बेळीलालचे लवकर लग्न झाल्यामुळे त्याचा मुलगाही लवकर हाताशी आला होता . ज्या वयात शहरातील काही मुले वधु वर सुचक मंडळामध्ये नाव नोंदवण्यासाठी विचार करू लागतात त्या वयात बेळीलाल च्या घरी आठ दहा गाई होत्या आणि त्यांच्या धारा काढून जबलपूरला दूध घालायला त्याचा मुलगा जायचा व आजही जातो .
बेळीलाल सर्व चाळीस एकर शेती पाहतात . दोन ट्रॅक्टर आहेत . भरपूर मोठा व्याप आहे . परंतु खाऊन पिऊन सुखी आहे . आपल्या घासातला घास काढून देण्याचे वृत्ती ,जी आताच्या काळात अत्यंत दुर्मिळ होत चालली आहे ती यांच्याकडे प्रचंड प्रमाणात होती . त्यामुळे परमेश्वराची अखंड कृपा यांच्यावर बरसत राहणार यात शंकाच नाही .  निगडीच्या ( निगरी आणि निगडी एकच . या भागात ड ला र म्हणायची पद्धत आहे ) पलीकडे नदीच्या काठावर बहुरी पार नावाचे याचे गाव आहे . मी इकडे मुलांना चित्रे काढून देत होतो . मुलांनी माझ्याकडून भरपूर चित्रे काढून घेतली . आता आपण नर्मदा मातेची पूजा आणि आरती करूया असे सांगून मी पूजा साहित्य काढले . इतक्यात छोटीशी खुशी माझ्यासमोर येऊन पाय जुळवून बसली . आणि म्हणाली मीच नर्मदा आहे ! माझी पूजा कर ! मला अतिशय आनंद झाला ! आणि त्यादिवशी मी नर्मदा मातेचे जल असलेली कुपी तिच्याच हातात देऊन तिचीच पूजा आणि आरती केली ! गक्कड भरता मलिदा यांचा तिला नैवेद्य दाखवून एकेक घास भरविला ! मला अतिशय आनंद होत होता ! रोज नर्मदा जल पिणारी ,नर्मदे वरून येणारा वारा हुंगणारी , नर्मदे मध्ये डुंबणाऱ्या आणि नर्मदेकाठचे हिरवेगार गवत खाणाऱ्या गाईचे दूध पिणारी आणि नर्मदेच्या काठी नर्मदा जलावर पिकलेली पिके खाऊन पुष्ट झालेली नर्मदा काठची सर्व माणसे साक्षात नर्मदास्वरूपच आहेत !त्यांच्या नसानसामध्ये कणाकणामध्ये नर्मदा भरलेली आहे ! नर्मदे काठच्याच स्मशानामध्ये राख बनून ही पुन्हा नर्मदापण होतात आणि पुन्हा नर्मदा खंडामध्येच कुठेतरी उगवतात ! 
हाच भाव मनामध्ये ठेवून मी खुशीची नर्मदा देवी म्हणून आरती पूजा केली ! "तुम्हारी परिक्रमा पूर्ण होगी । " असा आशीर्वाद मैया ने दिला ! यानंतर बेळीलालचे सर्व मित्र , दोन्ही मुले आणि मी असे गोल बसलो आणि सर्वांनी मध्ये ठेवलेल्या गक्कड भरत्यावर यथेच्छ ताव मारला ! एरवी यातले दोन गक्कड खाल्ले तरी पोट भरावे इतके ते जड असतात . परंतु त्या दिवशी भरपूर चाललेलो असल्यामुळे मी चांगले सात-आठ गक्कड खाल्ले . बेळीलाल तरीदेखील आग्रह करून वाढतच होता ! शेवटी चांगला ओंजळभर मलिदा देखील चेपला ! बोटातून अक्षरशः तूप ओघळत होते इतके तूप त्याने घातले होते ! "घरच्या देशी गाईचे तूप आहे बाबाजी , हवे तेवढे खा ! " त्याने सांगितले .  त्यादिवशी तडस लागेपर्यंत जेवलो ! त्याने सांगितले आता उठू सुद्धा नका इथेच आडवे व्हा ! त्या रात्री मुले घरी जायला तयारच होईनात मग त्यांचा बाप दिलीप त्यांना तिथेच सोडून घरी निघून गेला . विचार करून बघा आपण आपल्या मुलांना असे कोणाच्याही घरी पाठवू शकतो का ! आणि त्यातही एखादा बैरागी साधू वगैरे आला असेल ज्याची काहीही ओळख पाळत नाही तर तुम्ही तुमच्या मुलांना असे त्यांच्या हवाली कराल का ! नर्मदा खंडामध्ये हे सर्रास केले जाते आणि त्यामुळेच तिथल्या मुलांना खूप काही शिकायला मिळते आणि ती शहरातल्या मुलांपेक्षा ती अतिशय हुशार , चाणाक्ष असतात . शुद्ध मराठी भाषेमध्ये स्मार्ट असतात ! त्या रात्री थंडी फारशी वाजली नाही . एका लोखंडी घमेल्यामध्ये निखारे पेटवून कुटीमध्ये ठेवले होते . सकाळी लवकर उठलो . बहिर्दीशा आटोपून मोटरच्या चार इंची पाईपच्या भूमिगत गरमागरम पाण्याने स्नान केले . इथे बोअरचे पाणी देखील होते आणि कॅनॉल मधून पाणी देखील उपसले जायचे . परंतु कॅनॉलचे पाणी अतिशय गार असते . आणि बोअरचे पाणी गरम असते . दोन्ही ठिकाणचे पाणी आहे नर्मदेचेच . कारण याच्या शेताच्या दोन्ही बाजूने नर्मदा जल वाहते .एका बाजूने मुख्य नदी आणि एका बाजूने कालवा . असे फार कमी ठिकाणी पाहायला मिळते . तोपर्यंत बेळीलालने गरमागरम चहा केला ! घरच्या देशी गाईचे ताजे ताजे धारोष्ण दूध घेऊन दिलीप रजक आला होता . रजक म्हणजे धोबी . या भागामध्ये सर्रास जातीवरून आडनावे आहेत . रजक , केवट , नामदेव , कुशवाहा अशी आडनावे सहज दिसतात . आपल्याकडे देखील माळी , शिंपी , कुंभार , कोळी अशी काही जाती सूचक आडनावे आजही दिसतात तसाच हा प्रकार . तांब्याभर चहा त्याने माझ्यापुढे आणून ठेवला ! गंमत म्हणजे त्यातील अर्धा अधिक चहा मी खरोखर प्यायला . इतका तो सुंदर होता ! कालचे उरलेले गक्कड त्याने एका पिशवीत भरले आणि माझ्या सामानात कोंबले . मला खरे म्हणजे ते नको होते .त्यांचे प्रचंड वजन माझ्या पाठीवर झाले होते आणि मला ते नको होते . परंतु इतक्यात मला मोहन साधूने सांगितलेला नियम आठवला की परिक्रमेमध्ये कोणीही काहीही दिले की नाही म्हणायचे नाही , त्यामुळे निमुटपणे मी ते २४ गक्कड पाठीवरच्या झोळीत धारण केले ! - इथे अजून रहा असा बेळीलालचा आग्रह सुरू होता . परंतु मला पुढे चातुर्मास लागण्याच्या आत परिक्रमा संपवायची होती . त्यामुळे मी त्याला मनोमन नमस्कार करून त्याची रजा घेतली . नर्मदे हर ! मला सोडायला सर्वजण काही अंतर आले . पुढचा सर्व मार्ग त्यांनी मला सांगितला . इथून जवळच नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र ७ लागत होता . त्या मार्गाने थोडेसे गेल्यावर माणेगाव नावाच्या गावातून उजवीकडे वळले की जबलपूरच्या हद्दीमध्ये येणाऱ्या ग्वारी घाटाच्या समोर मी पोहोचणार होतो ! कालव्यामुळे घनदाट धुके पसरले होते . पुढचे काहीही दिसत नव्हते . पायासमोर दिसणारा मार्ग पकडून चालत राहिलो . इतक्यात गाड्यांच्या हॉर्न चे आवाज येऊ लागले . मोठ्या मोठ्या ट्रकचे चित्र विचित्र हॉर्न ऐकू येऊ लागले . इतके दिवस रानावनातील पशुपाखरांचे आवाज ऐकणारा मी , मला त्या आवाजाचा खूपच त्रास होऊ लागला . असे वाटले की या सर्वांचे हॉर्न एकाच वेळी बंद करावेत . गाड्यांच्या इंजिनचे आवाज आणि वेगाने जात असल्यामुळे येणारा टायर्स आवाज देखील कानाला त्रासदायक वाटत होता . या आवाजाची खरोखर माणसाला गरज आहे का असा प्रश्न पडला . प्रवास करणारे बहुतांश लोक का प्रवास करत आहेत हेच त्यांना माहिती नसते . हा निघाला , तो निघाला , म्हणून मी पण निघालो ,अशा स्वरूपाचे बहुतांश प्रवास असतात . असेनात . समोर आलेला महामार्ग फारच मोठा होता . किंवा मी इतके दिवस पायवाटा तुडवत असल्यामुळे मला तो फार मोठा वाटत होता . राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात असा याचा जुना रुळलेला क्रमांक आहे . नवीन नामांतरणानुसार याचा क्रमांक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४ झाला आहे .
याच महामार्गाने मानेगाव पर्यंत चालून उजवीकडे वळले की ग्वारी घाट येतो
दिवसभर मला साथ केलेला कालवा येथे सुटला आणि मी उजवीकडे वळलो .
वाटेमध्ये पलीकडच्या बाजूच्या एका ढाब्यामधून मला आवाज दिला गेला . एक ७५ - ८० वर्षाच्या आजीबाई ढाबा सांभाळ होत्या . त्यांच्या मुलाने गरम गरम सामोसे आणि चहा आणून दिला . तो घेऊन पुढे निघालो असता विरुद्ध बाजूने पुन्हा बोलावले गेले . तिथे पुन्हा चहा झाला . महामार्गावरून चालताना परिक्रमावासी लोकांनी नेहमी रॉंग साईड म्हणजे विरुद्ध बाजूने चालावे . असे केल्यामुळे त्यांना समोरून येणारी वाहने दिसतात . समोरून येणारा वाहन चालक तुमच्याकडे बघतो आहे का नाही ते देखील दिसते . आणि मागून येणारी वाहने तुमच्या पासून लांब राहतात . याच्या बरोबर विरुद्ध चालताना सर्व लोक दिसतात जे अत्यंत घातक आणि चुकीचे आहे . आपण कितीतरी वेगाने चाललात तरी शंभरच्या गतीने जाणाऱ्या वाहनासाठी तुम्ही स्थिर असल्यासारखेच असता . असो . इथे मानेगाव फाटा लागला जिथे यादव ढाबे वाला आहे . ढाब्याचा मालक राजू यादव स्वतः बाहेर आला आणि मला तिथे टाकलेल्या एका मोठ्या ओंडक्यावर घेऊन बसला . नोकराने चहा बिस्किटे आणून दिली . राजू यादव त्याच्या गुरुदेवांची माहिती आणि महती मला सांगू लागला . अत्यंत थोर विभूती मत्व असलेले त्याचे गुरुदेव होते . त्यांनी नर्मदा काठी कशी तपस्या केली आणि ते लोकांशी कसे वागायचे ,कसे बोलायचे इत्यादी बऱ्याच गोष्टी त्याने मला सुमारे तासभर सांगितल्या . राजू यादव आणि त्याचा भाऊ मिळून हा ढाबा चालवितात . राजू यादव यांचे वय साधारण ५० - ५५ असावे आणि वजन चांगले शंभर किलोच्या पुढे होते . परंतु एवढ्या भव्य दिव्य माणसाच्या डोळ्यात गुरुदेवांचे नाव घेता क्षणी अश्रू येताना पाहून मला खूप धन्य वाटले . इथून ग्वारी घाट जवळ होता . बहुतांश परिक्रमावासी इथून ग्वारी घाटाकडे न जाता थेट सरळ जातात . परिक्रमेच्या पुस्तकांमध्ये देखील तशी नोंद असते . 
परंतु मी मात्र नर्मदा मातेचा किनारा अजिबात न सोडण्याचा निश्चय मनोमन केला .
 चालताना मध्ये एखादे मोठे सावली देणारे झाड लागले की क्षणभर थांबत असे . इथे असाच एक भव्य वटवृक्ष होता आणि त्याच्या खाली मोठे मोठे कोरीव दगड होते . त्या दगडावर क्षणभर बसलो आणि डोक्याचा फेटा काढून ठेवला . परत निघताना हा फेटा मी क्षणात बांधत असे . मला सर्व प्रकारचे फेटे बांधता येतात . ग्वारी घाटामध्ये आता गुरुद्वारामध्ये जाणार होतो म्हणून मी असा विचार केला की आज पंजाबी पद्धतीचा फेटा बांधूया . त्यासाठी कोणीतरी फेटा धरणारा लागतो . तिथे खोचलेल्या एका त्रिशुळाचाच वापर करून मी फेटा बांधला . आणि पुढे निघालो . गुरुद्वारा बंद होता . मी नर्मदा मैया चा काठ पकडला आणि तिची भेट घेतली ! या काठाच्या बाजूला घाट वगैरे नव्हता तर संपूर्ण चिखल होता . एक पाच फुटाचा स्लॅब मात्र नर्मदेमध्ये उतरण्यापुरता केला होता . तो प्रचंड निसरडा होता . त्यातून हळुवारपणे पाण्यामध्ये उतरत सुंदर असे स्नान केले ! नर्मदा मैया मध्ये मी लहर आली की स्नान करून घ्यायचो ! समोर भव्य दिव्य असा ग्वारी घाट दिसत होता . आज मौनी अमावस्येचा दिवस होता . आणि मी बरोबर मागच्या अमावस्येला परिक्रमा चालू केली होती . याचा अर्थ आज ठीक एक महिना झाला होता आणि मी पुन्हा ग्वारी घाटासमोर आलो होतो ! हा घाट किती सुंदर आणि किती भव्य आहे हे या काठावरूनच पहावे !  स्नान करून मी पुढे जाणार इतक्यात काही भाविक नावेने आले आणि वरती गुरुद्वारामध्ये गेलेले दिसले . त्यांच्या पाठोपाठ मी देखील गेलो . समोरून गुरुद्वारा बंद असला तरी नर्मदा पार करून येणाऱ्या लोकांसाठी दर्शनासाठी उघडा होता . गुरुद्वारा मध्ये जाऊन मी गुरु ग्रंथ साहेबांचे दर्शन घेतले . इथे काही सेवादार शिख उभे होते परंतु कोणीही बोलत नव्हते . परिक्रमा वासींचे स्वागत करण्यासाठी हे लोक अनुत्सुक आहेत असे मला उगाचच जाणवले .  गुरुद्वारा अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर होता ! त्याची भव्यता ग्वारी घाटावरून देखील लक्षात येत होती . परंतु प्रत्यक्षात तो फारच सुंदर होता . पांढऱ्या शुभ्र रंगाच्या भिंती आणि मोठाले घुमट तसेच काचेची मोठी मोठी तावदाने आणि स्वच्छ सुंदर फरस बंदी ! मी संपूर्ण परिसर हिंडून पाहिला . इथे छोटेसे दुकान होते त्या शीख दुकानदाराने मला एक लोखंडाचे कडे भेट दिले . चमकणारे स्टीलचे कडे आजकाल मुले घालतात परंतु लोहा अर्थात लोखंडी कडे हेच खरे महत्त्वाचे असते . शिख पंथीय बांधवांच्या पाच ककारां पैकी हे एक महत्त्वाचे साधन आहे . कडा ,कंगी , केश ' कटारी , कच्छा हे ते पाच 'क'कार आहेत . असो . कोविड मुळे इथले लंगर बंद आहे . इथे भोजन प्रसाद मिळणार नाही तरी तुम्ही कृपया पुढे निघून जावे असे मला तिथल्या मुख्य पंच प्यारे शिखाने सांगितले . परंतु मी इथे भोजन प्रसाद घेण्यासाठी आलेलो नसून गुरु ग्रंथ साहेबांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे असे मी त्यांना सांगितले . आणि गुरूंची इच्छा असेल तर काहीही होऊ शकते अशी पुस्ती देखील जोडली . समोर दिसणाऱ्या ग्वारी घाटाचे अनिमिष नेत्रांनी मी दर्शन घेऊ लागलो . इतक्यात तिथे एक तरुण आला . आणि मोबाईल चालू करून माझी मुलाखत घेऊ लागला . त्याने घेतलेला व्हिडिओ  माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने पाठवून दिला . तो आपल्या करिता सोबत जोडत आहे .

या तरुणाचे नाव रणजीत सिंह असे होते आणि तो रोज जबलपूर येथून नावेने गुरुद्वारा मध्ये येत असे आणि लंगरची सेवा देत असे .
रणजीत सिंह यांनी गुरुद्वारापासून काढलेला ग्वारी घाटाचा फोटो . चित्रात प्रस्तुत लेखक . 
ग्वारी घाट हा नर्मदे वरील सर्वात मोठा आणि विस्ताराने लांबरुंद पसरलेला घाट आहे .मागे ब्लॅंकेट आणि वाळण्यासाठी लटकवलेला लंगोट दिसतो आहे .डोक्यावर पंजाबी पद्धतीचा फेटा नसला आहे .
रणजीत सिंह हौशी होता . त्याने विविध ठिकाणी उभे करून माझे भरपूर फोटो काढले . 
एका सरदारजीने दिलेले कडे मी हातात घातले आहे
मागे वाळत टाकलेला गमछा . समोर ग्वारी घाटावरचा न्हावी घाट . नर्मदा जलात सीगल पक्षी .
 ग्वारी घाटच्या भव्य गुरुद्वारा समोर मला उभे करून रणजितसिंह ने काढलेले फोटो
ह्या तरुणाने माझ्याशी बऱ्याच गप्पा मारल्या . परिक्रमा कशी असते ? त्याच्यामध्ये काय काय अनुभूती येतात ? वगैरे प्रश्न त्याने विचारायला सुरुवात केली . मी परिक्रमा सुरू करून आताशी एक महिना झाला होता . त्यामुळे फारसे अनुभव गाठीशी नव्हते . परंतु तरीदेखील त्याला एक अनुभव मला सांगावासा वाटला ,कारण तो त्याच्याच गावात मला आला होता . जबलपूर मधून बाहेर पडताना मला जिलेबी आणि पोहे खायची इच्छा झाली होती आणि तत्काळ मैयाने ती इच्छा पूर्ण केली होती हा अनुभव मी मागील एका लेखामध्ये सविस्तर सांगितलेला आहेच . तोच अनुभव मी त्याला सांगितला . इतका वेळ हसतमुख असणारा रणजीत सिंग एकदम गंभीर झाला आणि म्हणाला ठीक आहे ठीक आहे .तुम्हाला लंगर घ्यायचे असेल तर माझ्याबरोबर चला . तसे भाविकांसाठी लंगर बंद आहे परंतु रोज येणारे सेवा दार लंगर घेत आहेत . तुम्ही इतक्या लांबून आला आहात तर आमच्या लंगरचा अवश्य लाभ घ्या . पाचच मिनिटात तुम्हाला बोलवतो , असे सांगून लंगरची तयारी करण्याकरता तो पुढे निघून गेला . त्याने आवाज दिल्यावर मी आत मध्ये गेलो आणि जेवायला खाली बसलो . मोजके दहा-पंधरा लोक जेवत होते . सर्वजण पगडी घातलेले शीख होते आणि माझी देखील शिखांसारखी पगडी असल्यामुळे मी त्यांच्यात मिसळून गेलो होतो .  लंगर चा मेनू ठरलेला असतो . गरमागरम रोट्या , भाजी , आमटी आणि भात . इतकाच मेनू दररोज बनविला जातो . रणजीत सर्वांना वाढत होता . इतक्यात तिथे एक सरदारजी दोन मोठी खोकी घेऊन आला .  संग्रहित छायाचित्र

आणि त्याने मोठ्याने आवाज दिला , " ओय रणजीत पाजी सत श्री अकाल ! " "सत श्री अकाल पाजी । फर्माईये ! " सरदारने दोन्ही खोकी त्याच्या हातात देत सांगितले , " जरा ये तो चीजे लंगर मे बाट देना ।कोई दे के गया बाहर । " रणजीत ने खोकी घेतली आणि स्वयंपाक घरात गेला . आणि तिथून तो बाहेर जो आला तो पळतच आला आणि माझ्यासमोर येऊन खाली बसला ! त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि त्याने माझे पाय धरले होते . , " दादाजी मुझे क्षमा करना ! प्लीज मुझे माफ कर देना । मेरी बहुत बडी गलती हो गई । " त्याचे हे बोलणे ऐकून आणि वागणे बघून मला काहीच बोध होईना ! मी त्याला म्हणालो "लेकिन पाजी हुआ क्या है ? " तोपर्यंत माझे जेवण झाले होते आणि मी उठायच्या तयारीत होतो . तो म्हणाला , " रुकिये । अभी और प्रसाद आना बाकी है " इतक्यात आतून एक शीख सेवादार जिलेबी आणि पोहे घेऊन बाहेर आला ! आणि सर्वांना वाढू लागला ! होय त्या दोन खोक्यांमध्ये जिलेबी आणि पोहे होते ! मी पोटभर जिलेबी आणि पोहे पुन्हा एकदा खाल्ले ! जबलपूरचे आणि जिलेबी पोह्याचे काहीतरी वेगळेच नाते आहे असे मला वाटू लागले ! आता मी ताट घेऊन धुण्यासाठी जाणार इतक्यात रणजीत सिंह ने माझे ताट उचलले आणि पळत धुण्यासाठी निघून गेला . मी त्याच्या मागे धावलो की अरे माझे ताट मला धुवू दे . परंतु तोपर्यंत त्याने माझे ताट धुतले होते आणि ते वाळत घालून पुन्हा येऊन माझ्या पाया पडू लागला . आणि क्षमा याचना करू लागला . माझ्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे म्हणून मी त्याला घेऊन बाहेर गेलो आणि एका बाकड्यावर आम्ही दोघे बसलो . त्याला म्हणालो शांत हो .आणि सगळे मला नीट सांग .मला काहीच कळत नाही . तो मला म्हणाला (आमचे हिंदी संवाद होते .आपल्या माहितीकरता मराठीमध्ये अनुवादित करून सांगत आहे ) रणजीत म्हणाला की मी गेली बारा वर्षे दररोज न चुकता नर्मदा नदीचे दर्शन ग्वारी घाटावर घेतो आणि नावेने गुरुद्वारा यामध्ये घेतो आणि लंगरची सेवा करतो . इथून सर्व नावाडी आता मला ओळखतात . गेली बारा वर्षे लंगर मध्ये ठरलेला एकच एक मेनू आहे .त्यात कधीही बदल होत नाही . " " बर मग ?" मला अजूनही कोडे पूर्णपणे सुटलेले नव्हते . " त्याचे असे आहे बाबाजी , अगदी खरे खरे सांगतो . समोर नर्मदा मैया आहे मी खोटे बोलणार नाही . " " बोला " मी उत्तरलो . रणजीत सांगू लागला . की जेव्हा मी त्याला जिलेबी आणि पोहे मिळाल्याचा अनुभव सांगितला तेव्हा त्याला ते धगधगीत खोटे वाटले . त्याला असे वाटले की इतके चांगले अनुभव कथन करणारा हा परिक्रमा वासी अचानक काहीही खोटे नाटे सांगू लागला आहे . असे कुठे जिलेबी आणि पोहे मिळतात होय ? बरं जाऊ दे !आता दारात आलाच आहे तो , तर उपाशी पाठवण्यापेक्षा खायला घालून हाकलून द्यावा !  अक्षरशः असा विचार करून त्याने मला लंगरला बोलावले होते . परंतु मी सांगितलेले प्रत्येक वाक्य सत्य वचन असल्यामुळे त्याचा नर्मदा मैया ला राग आला असावा आणि तिने गेल्या बारा वर्षात पहिल्यांदा या लंगर मध्ये जिलेबी आणि पोहे वाढण्यासाठी पाठविले ! रणजीतला माहित आहे की लंगर मध्ये जिलेबी आणि पोहे कधीच वाढले जात नाहीत . परंतु त्या दिवशी कोणीतरी बाहेर असलेल्या सेवादार सरदारजीला जिलेबी आणि पोह्याची खोके हातात देऊन निघून गेले ! रणजीत आता रडू लागला आणि म्हणाला की माझी फार मोठी चूक झाली . मी तुम्हाला खोटे समजलो .याची मैयाने मला शिक्षा दिली . आणि लगेच अनुभूती देखील दिली . आता मला काहीतरी प्रायश्चित सांगा ! हा मोठा कठीणच प्रसंग माझ्यापुढे उभा राहिला . मी जे काही केलेलेच नाही त्याकरिता मी एखाद्या माणसाला प्रायश्चित्त सांगणारा कोण ? मुळात जिलेबी आणि पोहे मला खरोखर मिळाले होते इतकेच मी त्याला सांगितले होते . ते त्याला खोटे वाटले आणि आता खरे वाटत आहे यात माझा काय दोष ! मैया अशी कधी कधी आपल्याला लटकवून देते !आणि हसऱ्या चेहऱ्याने मजा बघत बसते .  मी त्याला म्हणालो की प्रायश्चित्त घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण तुला जरी माझे बोलणे खोटे वाटले होते , तरी मला त्याबद्दल काहीही आपत्ती नाही . त्यामुळे तुझ्या हातून काही चूक झाली आहे असेच मुळात मला वाटत नाही . तरी देखील काहीतरी प्रायश्चित्त मला सांगा असा तगादा त्याने लावला . आता या सरदारजीचे काय करावे मला काही कळेना ! इतक्यात तो म्हणाला की ठीक आहे !मीच सांगतो माझे प्रायश्चित्त ! मी संपूर्ण नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण करणार ! त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते . त्याचे हात जोडलेले होते . आणि नर्मदा मातेकडे पाहून तो क्षमा याचना करत होता . त्याच्या या संकल्पमुळे मला अतोनात आनंद झाला ! एखादा सरदारजी केवळ नर्मदे वरील प्रेमापोटी पायी परिक्रमा करतो हे किती आनंदाची गोष्ट आहे ! आणि नर्मदा देखील किती अवखळ आहे पहा ! आपल्या भक्ताचे ब्रीद राखण्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते याचा पुन्हा एकदा मला अनुभव आला आणि माझ्या देखील डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या . आम्ही दोघांनी कडकडून गळाभेट घेतली ! आणि मोठ्या आवाजात पुकारा केला नर्मदे हर ! कदाचित तो आवाज पलीकडे ज्वारी घाटावर देखील ऐकू गेला असावा ! मी पटापट पायऱ्या उतरत खाली आलो आणि चिखलाने भरलेला पुढचा मार्ग पकडला . एक अनुभव संपतो न संपतो तोच नर्मदा मातेने दुसऱ्या प्रसंगामध्ये मला ढकलले ! मी चालत होतो तो काठ अत्यंत उताराचा होता आणि केवळ एक बारीक पायवाट तिथे होती. डावीकडे खडा चढ आणि उजवीकडे तीव्र उतार . खाली नर्मदेचे खोल पात्र ! अशा त्या पायवाटेवर एक मरणासन्न गोमाता तडफडत पडलेली मला दिसली . ती नेमकी पायवाटेवर पडलेली असल्यामुळे मला खालून किंवा वरून जाता येत नव्हते . नीट पाहिले असता मला लक्षात आले की तिचा एक पाय तुटला आहे आणि त्यामुळे लुळा पडला आहे . ती गेले दोन-तीन दिवस इथेच पडलेली असावी कारण तिचे पोट खपाटी जाऊन हाडे वर आली होती . तिला इतकी भूक लागली होती की पडल्या पडल्या तिच्या तोंडाच्या टप्प्यामध्ये येणारे गवत उपटून खायचा ती प्रयत्न करत होती .संग्रहित छायाचित्र
एवढ्या मोठ्या देहाला इतके मुठभर गवत कसे काय पुरणार ? त्यामुळे उपासमार होऊन तिच्या अंगातील सर्व शक्ती क्षीण झाली होती आणि ती गलित गात्र होऊन हताशपणे पडलेली होती . मी विचारात पडलो की आता हिला काय खायला घालावे आणि कसे उभे करावे ? आजूबाजूला हिरवे गवत होते . परंतु चढ-उतार खूप असल्यामुळे पाय सटकला की थेट नर्मदार्पणमस्तु झाले असते ! इतक्यात मला आठवले की काल बेळीलालने केलेले गक्कड आज सकाळी त्याने सोबत बांधून दिलेले आहेत ! मी लगेचच झोळी खाली ठेवली . बरगड्या दिसू लागलेल्या त्या गाईच्या समोर गेलो . तिच्या डोक्यावरून हात फिरविला आणि तिच्या तोंडापुढे एक गक्कड धरला . तिने गप्पकन तो खाल्ला ! मला खूप आनंद झाला ! तिची देखील शेपटी हलू लागली ! मी अजून एक गक्कड तिला भरविला . बघता बघता तिने सर्व २४ गक्कड फस्त केले ! त्यानंतर मी तिला कमंडलू ने पाणी पाजले .पोटात अन्न आणि पाणी गेल्यावर तिला थोडीशी तरतरी आली आणि ती उठून बसायचा प्रयत्न करू लागली . मी लगेच तिला पाठीच्या बाजूने ढकलले आणि उठायला मदत केली . पोटात अन्न गेल्यामुळे तिला थोडीशी शक्ती आली असावी त्यामुळे ती देखील जोर लावून उठली आणि तीन पायावर चालू लागली ! आता मात्र मी तिची गळ्यातली दोरी पकडली आणि अतिशय सावकाश तिला त्या उताराच्या रस्त्यावरून बाहेर काढत पुढच्या घाटापर्यंत चालत नेले . पुढचा घाट म्हणजे शेजारीच असलेला एक काँक्रीटचा मोठा घाट होता आणि इथे एका ब्राह्मणाची मोठी गोशाळा होती . पूर्वी ग्वारी घाट प्रकरणामध्ये आपण नमामि देवी नर्मदे अशी जी मोठी अक्षरे पाहिली होती ती या गोशाळेमध्येच होती ! त्या गोशाळे मधील एक सेवक धावतच आला आणि अरे ही आमची गाय आहे असे म्हणून तिला घेऊन गेला .जाता जाता त्याने माझा एक फोटो काढला. नर्मदा मातेला तिच्या काठावर फिरणाऱ्या केवळ परिक्रमावासींच्या पोटाची काळजी नसते तर प्रत्येक जीव जंतूच्या पोटाची ती काळजी करते हे या प्रसंगाने सिद्ध झाले आणि माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले !  मला अतिशय आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात मी नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला ! काठावरती बसलेला एक तरुण मुलगा हे सर्व पाहत होता आणि त्याने माझे फोटो काढायला सुरुवात केली . नंतर त्याने माझ्याकडून माझ्या मित्राचा क्रमांक लिहून घेतला आणि त्या क्रमांकावर सारे फोटो पाठवून दिले . ते सर्व फोटो आपल्या माहिती करता इथे जोडत आहे .
हीच ती जागा जिथून थोडेसे मागे गोमाता पडलेली होती . समोर जबलपूरचा ग्वारी घाट दिसतो आहे .
गाय नेणाऱ्या सेवेकऱ्याने काढलेला फोटो .
मागे गवारी घाट ची प्रसिद्ध ओळख असलेल्या नावा
या चित्रात काय काय बघाल ? मी परिक्रमा सुरू केली तो घाट ,नर्मदा मातेचे पात्र ,सीगल पक्षी ,माझ्या पायातील नवे बूट ,माझ्या हातातील सरदारजी ने दिलेले लोखंडी कडे , डोक्यावर पंजाबी फेटा ,पोटाच्या कप्प्यात ठेवलेली छोटीशी डायरी , चालून चालून वाकलेला दंड ,माझे कमी झालेले वजन , आणि मनोमन सुरू असलेले नर्मदेचे भजन ! 

काठावरील एकाने फोटो काढायला सुरुवात केली
गाय प्रकरणामुळे भावविभोर होऊन नर्मदा मातेला मी घातलेला साष्टांग नमस्कार . 
ज्याला फोटोग्राफीच्या भाषेमध्ये कँडीड मोमेंट असे म्हणतात तशा या घटना आहेत . ज्याचा अर्थ समोरच्या माणसाचे लक्ष नसताना गुपचूप काढलेले फोटो ! नर्मदा मातेला असा नमस्कार वेळोवेळी करायचो . संपूर्ण शरणागती मध्ये जो काही आनंद आहे तो शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचा आहे !
नमस्कार करताना चे फोटो माझ्या  नकळत काढून झाल्यावर तो मनुष्य पुढे आला आणि त्याने अजून काही फोटो काढण्यासाठी पोज देण्याची मला विनंती केली ,ते हे फोटो .
हीच ती "नमामि देवि नर्मदे " अक्षरे जी रात्री सुंदर चमकतात ! समोर प्रस्तुत लेखक . मागे झेंडे लावले आहेत ती गोशाळा आहे .
प्रस्तुत लेखक , नर्मदा मैया आणि समोर ग्वारी घाट .डोक्यामध्ये महिनाभर आलेल्या अनुभवांचे काहूर दाटलेले ! या चित्रांमध्ये नीट पाहिल्यास तुम्हाला मध्ये स्थिर असलेला सरळ रेषेत वाहणारा नर्मदेचा खोल प्रवाह ,डोह दिसेल . हा मुख्य प्रवाह असून आजूबाजूला सर्व गाळ आहे .
इथून पुढे अचानक सर्व गर्दी नष्ट होऊन शांत रस्ता लागला . रस्ता म्हणजे नर्मदे काठी केलेल्या शेतांमधील छोटीशी पायवाट ! इथून पुढचा प्रवास अतिशय संस्मरणीय आणि रमणीय होता !



लेखांक बेचाळीस पूर्ण (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक










टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर