लेखांक ४० : स्वर्गीय सहस्रधारा आणि पाटणचे भयाण जंगल

सूर्यकुंडामध्ये गायलेल्या रामायणाचे स्वर कानामध्ये रुंजी घालत होते . एक एक चौपाई म्हणत पावले टाकत होतो . त्या नादातच सकवाह गाव पार केले .त्यानंतर पूर्व मंडला गाव संपले आणि समोर बंजर अथवा बंजारा नावाची नदी आडवी आली . इथे ते आजोबा आणि बनकर काका नदी पार करण्यासाठी थांबलेले दिसले . नदी खोल होती आणि तिच्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत एक फुटभर व्यासाचा लोखंडी पाईप टाकलेला होता . गमतीचा भाग म्हणजे या लोखंडी पाईप वरून चालतच नदी पार करावी लागत होती . नदीचे पात्र सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचे होते . चार पावले लोखंडी पाईप करून चालणे वेगळे आणि इतके अंतर चालणे वेगळे .या नळ्यावरून चालताना पाय सटासट सटकत होते . आधी थोडेसे उथळ पात्र असल्याने पाण्यातून चालत आल्यामुळे पादत्राणे भिजलेली असत .त्यामुळे पाईप ओला होऊन गुळगुळीत पृष्ठभागावरून अधिकच सटका सटकी होत असे .मी देखील चालताना मला एका क्षणी अशी भीती वाटू लागली की माझा तोल जाणार आहे ! मी विचार केला की जर माझी ही अवस्था होत आहे तर या दोन वयोवृद्ध माणसांची कशी अवस्था होत असावी ? ते काही नाही . या दोघांना नदी पार करायला लावून मगच आपण पलीकडे जायचे असा निश्चय मी मनोमन केला . त्यात बनकर काकांना मधुमेहाचा त्रास आहे याची मला कल्पना होती . मी पुन्हा माघारी आलो आणि काकांना आधी जायला सांगितले . काकांना मी धीर दिला आणि खाली न बघता लोखंडी पाईप वरून तोल सांभाळत चालायला सांगितले . परंतु साधारण मध्ये आधे गेल्यावर त्यांचे पाय लटलट लटलट कापायला लागले आणि आता ते नदीमध्ये पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली . तिथे काही गोंड आदिवासी मुले सेल्फी काढत उभी होती . मी ओरडून त्यांना आवाज दिला की काकांना पकडा . परंतु त्यांनी तो प्रकार हसण्यावारी नेला . आता काका नदीमध्ये पडणार इतक्यात मी साधारण वीस फूट अंतर अत्यंत वेगाने , त्या पाईप वरूनच पळत गेलो आणि काकांना पकडले ! काकांचा तोल जाता जाता वाचला आणि त्यांनी मला मिठी मारली . त्यानंतर माझा हात धरून शांतपणे मी त्यांना संपूर्ण नदी पार करवली . त्यानंतर पुन्हा उलटा चालत आलो आणि आजोबांना देखील नदीच्या पलीकडे घेऊन गेलो . हा नळ्या वरील प्रसंग खरोखरच खूप थरारक होता ! त्या आनंदा प्रीत्यर्थ बनकर काकांनी बंजर नदी पार केल्यावर मला गरमागरम चहा पाजला ! हा परिसर अतिशय सुंदर असा आहे . मंडला हा जिल्हा म्हणजे अखंड भारत मंडलाचे मध्य स्थान आहे हे आपण मागील एका लेखांमध्ये पाहिले . त्याचाही मध्यबिंदू म्हणाल तर हा संगम होय ! इथे नर्मदेने एक अतिशय झोकदार वळण घेतलेले आहे . फार कमी ठिकाणी ती अशी वळणे घेते . बरोबर त्या वळणाच्या जागी गोंड राजाने बांधलेला बुर्ज किल्ला आहे . हा किल्ला मराठ्यांपासून संरक्षणासाठी त्याने बांधला अशी इतिहासामध्ये नोंद आहे . बंजारा नदीच्या बाजूला नर्मदेचा जो तट आहे तिथे एक सुंदर राधाकृष्ण मंदिर असून समोरच्या तटावर मांडला किल्ला दिसतो . बंजारा नदी पार केल्यावर महाराजपुर नावाचे गाव लागते जे आता मंडला गावाचा भाग झाल्यासारखे आहे . इथे दुर्गा देवी राणीचा एक सुंदर किल्ला होता . इथे एक भव्य व सुंदर राम मंदिर आहे ते पाहून पुढे आलो . वाचकांच्या आनंदाकरिता वरील परिसराची छायाचित्रे खाली देत आहे . 
रम्य सुंदर बंजारा / बंजर नदी
हाच तो धोकादायक लोखंडी नळा . यावरूनच बनकर काका पडता पडता वाचले .वरती गंधासारखे वळण घेते आहे ती नर्मदा मैया . तिच्या पलीकडच्या तटावर मांडला किल्ला आणि खाली बंजारा / बंजर नदी दिसते आहे .
डावीकडून आजोबा आणि बनकर काका . बंजर नदी पार करण्यापूर्वी काढलेले चित्र
बंजारा अथवा बंजर नदीचा उगम कान्हा व्याघ्र अभयारण्यामध्ये होत असून तिच्या काठावर समृद्ध वन्यजीवन आहे . बंजर = बनचर = वनचर अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे . वाघ , हरणे ,गवे असे सर्व प्राणी इथे आढळतात .
मंडला शहराला लाभलेले नर्मदेचे अद्भुत सान्निध्य लक्षात घ्यावे . सूर्यकुंड धाम ते बंजर - नर्मदा संगमाचा रस्ता इथे दिसतो आहे . 
नर्मदेच्या काठावरील सुंदर भव्य राधाकृष्ण मंदिर
राधाकृष्ण मंदिरातून दिसणारे नर्मदेचे सुंदर वळण आणि मधोमध मंडला किल्ला
डावीकडे मंडला किल्ला . उजवीकडून येणारी बंजर नदी . समोर पांढरे राधाकृष्ण मंदिर .
मंडला किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज नरेंद्र शाही बुर्ज
नरेंद्र शाही बुरुजाचा इतिहास . मराठ्यांसाठी अभिमानास्पद असणारा असा हा इतिहास आहे .
नर्मदेने मराठ्यांचा भरपूर इतिहास पाहिलेला आहे .
अठराशे अठरा साली वडगाव मावळच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि संपूर्ण भारत इंग्रजांच्या घशात गेला . त्याचवेळी हा किल्ला देखील इंग्रजांनी ताब्यात घेतला . यावरून मराठ्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घ्यावे . गोंड राजाने मराठ्यांना साथ दिली असती तर चित्र वेगळे असते . 
बुरुजाच्या बाजूने दिसणारे राधाकृष्ण मंदिर
  नरेंद्रशाही बुर्ज
हा किल्ला सध्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीमध्ये येतो
संगमावर मोठ्या संख्येने दिसणारे सीगल पक्षी
महाराजपुर घाट
नर्मदे काठचा सूर्योदय
चहा पिल्यावर माझ्या विनंतीनुसार बनकर काका आणि आजोबा पुढे निघाले . माझ्या पायातील जबलपूर मध्ये घेतलेल्या कॅनव्हास च्या बुटाच्या फाटून पार चिंध्या झाल्या होत्या . आता त्यातून रस्त्यावरील खडा आणि खडा माझ्या पायाला जाणवत होता .इतका त्याचा सोल झिजून पातळ झाला होता . माझ्याजवळ दक्षिणेचे दोन तीनशे रुपये साठलेले होते . महाराज पूर हे मोठे गाव आहे . मंडला शहराचेच उपनगर म्हटले तरी चालेल . इथून पुढे जबलपूर शिवाय मोठे गाव लागणार नव्हते . जबलपूर देखील उत्तर तटावर आहे दक्षिण तटावर वस्ती अजिबात नाही . त्यामुळे महाराज पूर मध्येच नवीन पदत्राणे घेण्याचा निर्णय घेतला . रामाचे दर्शन घेऊन झाल्यावर गल्लीबोळातून फिरत फिरत एका छोट्याशा चपलांच्या दुकानामध्ये आलो . ज्याने एका स्थानिक कंपनीचे परंतु चांगल्या दर्जाचे बूट मला दाखविले . याची किंमत सुमारे आठशे रुपये होती . परंतु परिक्रमेमध्ये असल्यामुळे त्याने माझ्याकडून पैसे घेण्यास नकार दिला ! खूप आग्रह केल्यावर मात्र त्याने केवळ तीनशे रुपये घेतले ! गमतीचा भाग म्हणजे माझ्या खिशात तेव्हा केवळ तीनशे रुपयेच होते ! त्याची खरेदी किंमत तेवढी त्याने माझ्याकडून आकारली . त्याच्या दुकानासमोरच एक कचरापेटी होती . तिथे त्याने मला जुने बूट टाकून द्यायची विनंती केली . परंतु ही कृती माझ्या जीवावर आली . ज्या बुटांनी गेले २५ दिवस अव्याहतपणे मला साथ दिली त्यांना असे अचानक उकिरड्यावर टाकून देणे मला बरे वाटले नाही . त्या बुटाची आठवण म्हणून मी त्याच्या नाड्या काढून घेतल्या . आणि त्या नाड्यांनी मी माझी फोम ची गादी बांधायला सुरुवात केली . या नाड्यांनी मला जवळपास शेवटपर्यंत साथ दिली . एका कुंपणाच्या भिंतीवर मी ते बूट ठेवून दिले आणि पुढे चालायला लागलो . नवीन बूट निळ्या रंगाचे होते आणि फारच सुंदर दिसत होते ! तसेच ते माझ्या पायाच्या मापाचे असल्यामुळे पायाला अधिक सोयीचे वाटत होते .
परिक्रमेसाठी वापरलेला पहिला कॅनव्हास चा बूट
२५ दिवसांनी त्याची झालेली अवस्था
महाराजपुर येथे मिळालेला नवा कोरा निळा बूट 
मला आधी वाटले होते की पहिलाच कॅनव्हास चा बूट संपूर्ण परिक्रमा मला पुरेल . परंतु मला खरोखरीच ठाऊक नव्हते की परिक्रमा संपूर्ण होईपर्यंत पंधरा पादत्राणे मला वापरावी लागणार आहेत ! पहिल्या कॅनव्हास च्या बुटा इतका पुढे कुठलाच बूट टिकला नाही ! सरासरी दहा-बारा दिवसांमध्ये माझी पादत्राणे माना टाकत होती ! कदाचित काठावरील मार्ग थोडासा कठीण असल्यामुळे असे होत असावे . किंवा कदाचित माझी चाल देखील थोडी भारदार असावी . परंतु पादत्राणे वेळोवेळी लागत , मिळत आणि फाटत गेली हे मात्र खरे . असो .
आता मध्ये थोडीफार गावे होती आणि त्यानंतर नर्मदेचे नितांत सुंदर रूप जिथे पाहायला मिळते अशी सहस्रधारा होती . परिक्रमा एकट्याने करण्याचे काही फायदे असतात याची मला जाणीव इथे एका प्रसंगामुळे झाली . आजोबा आणि बनकर काका एकत्र चालत होते . तसे दोघांचे काही फारसे जवळचे संबंध नव्हते . परंतु दोघांनी एकत्र परिक्रमा चालू केल्यामुळे दोघे एकत्र चालत होते . पैकी आजोबांना प्रत्येक गोष्टीची खूप घाई असायची . आणि बनकर काकांची अशी इच्छा असायची की आपण आलो आहोत तर प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घेत पुढे जावे . यावरून त्या दोघांमध्ये सतत गमतीशीर वाद विवाद व्हायचे ! आताही तसेच झाले . मला उजव्या हाताला नर्मदेचा घनगंभीर आवाज येऊ लागला ! आणि माझ्या लक्षात आले की इथे काहीतरी वेगळे रूप बघायला मिळणार आहे . म्हणून मी निघालो आणि माझ्या मागे बनकर काका सुद्धा येऊ लागले . परंतु आजोबांना मात्र पुढे जाऊन आश्रम गाठण्याची घाई झाली होती . इथे दोघांची थोडीशी बाचाबाची झाली आणि आजोबा एकटेच पुढे निघून गेले आणि बनकर काका माझ्यासोबत नर्मदेचे नितांत सुंदर रूप पाहण्याकरता सहस्र धारे पाशी आले ! सहस्र धारा म्हणजे नर्मदेचे पात्र अचानक हजारो शाखांमध्ये विभागले गेलेले आहे ! नर्मदा उंचावरून समुद्रसपाटीकडे प्रवाहित होताना मधील दगडांचे अनेक थर पार करते . त्यातील मंडला जवळचा दगडांचा हा थर पार करताना ती अक्षरशः सहस्र खंडित होते ! या प्रत्येक प्रवाहाचा एक धीर गंभीर नाद निर्माण होतो ! आणि सुमारे एक किलोमीटर रुंदीचे हे पात्र विस्तारलेले असताना अचानक या सर्व धारा नष्ट होऊन नर्मदा केवळ बारा फुटातून वाहू लागते ! एक किलो मीटर पात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा जोर केवळ त्या बारा फुटांवर लागतो आणि प्रचंड खळखळाट करत नर्मदा खाली झेपावते ! हे दृश्य इतके नयन रम्य आहे की विचारू नका ! हे दृश्य ज्याने पाहिले तो खरोखरच धन्य होय ! आवाजाचा वेध घेत मी आणि बनकर काका त्या दृश्यापाशी पोहोचलो ! ते दृश्य पाहून आम्ही दोघेही स्तिमित होऊन गेलो ! आजोबांनी किती मोठे दर्शन हुकवले आहे याचे काकांना वाईट वाटू लागले . आम्ही दोघेही तिथे सुमारे तासभर बसलो असू ! विविध प्रकारे आम्ही नर्मदेची स्तुती करू लागलो ! आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या नर्मदाष्टकापेक्षा अधिक चांगली स्तुती कोण करू शकणार ! त्यामुळे बनकर काका नर्मदाष्टक म्हणू लागले . आणि मी अतिशय धोकादायक वाटणाऱ्या बिंदू वरती जाऊन नर्मदेच्या दर्शनाचा , नाद श्रवणाचा आणि दंडाने ते खळाळते पाणी उडवत स्पर्शाचा आनंद घेऊ लागलो ! बनकर काकांनी या प्रकाराचा एक छोटासा व्हिडिओ घेतला . कालांतराने त्यांनी माझ्या मित्राच्या क्रमांकावर तो पाठवून दिला . आपल्या सर्वांकरिता तो सोबत जोडत आहे . नर्मदेच्या एक किलोमीटर पात्रातील सर्व मासे या बारा फुटातून झेपावतात त्यामुळे इथे कोळ्यांना भरपूर मासे सापडत राहतात . खालील व्हिडिओमध्ये देखील आपल्याला एक कोळी बांधव मासे पकडत बसलेला दिसेल . इथे शांत निळ्याशार नर्मदा जलाचे रूपांतर शुभ पांढऱ्या स्फटिक सम तुषारां मध्ये झालेले दिसते !


वरील नकाशा मध्ये नर्मदा मातेवरील सहस्र धारा दिसत आहे आणि अतिशय रुंद असे पात्र कसे १२ फुटातून झेपावते आहे ती जागा देखील लाल मार्कर ने सुचित केली आहे . वरील व्हिडिओ नेमका याच जागी बसून घेतलेला आहे .आता पुन्हा व्हिडिओ पाहिल्यास लक्षात येईल . 
 सहस्रधारा मंडला
 असे अक्षरशः हजारो जलप्रपात इथे आहेत
 स्वच्छ पवित्र सहस्रधारा
चातुर्मास वगळता सहस्रधारा अशी नयनरम्य दिसते
चातुर्मासातील अर्थात पावसाळ्यातील तिचे रूप मात्र भयावह असते !
सहस्रधारेपाशी बनकर काकांनी काढलेला फोटो
सहस्रधारे पाशी बसलेले बनकर काका
सहस्रधारेचे भव्य दिव्य स्वरूप आणि त्यापुढे कःपदार्थ प्रस्तुत लेखक
नर्मदे वरून वाहणारा मुक्तिदायक मुक्त वारा भात्यात भरून घेताना प्रस्तुत लेखक ... सावलीमध्ये बनकर काका . 
नर्मदेचे निर्मळ जळ ,तिच्या  काठची ओलसर मऊ लुसलुशीत हिरवळ किंवा मऊशार वाळू ... सारेच सुखदायक , आल्हाददायक !

इथे नर्मदेचे ते सुंदर रूप न्याहाळताना बनकर काकांचा कमांडलू तिथेच राहिला . सुमारे दोनेक किलोमीटर पुढे आल्यावर त्यांना आठवले . मी ताबडतोब माझी झोळी त्यांच्याजवळ दिली . एका झाडाखाली त्यांना बसवले . आणि पुन्हा पळत त्यांचा कमंडलू आणायला गेलो . खरे तर याने माझे चालणे वाढणार होते . परंतु नर्मदेचे ते सुंदर स्वरूप पुन्हा एकदा बघायला मिळावे म्हणून मी गेलो होतो ! असा स्वार्थ देखील त्या परमार्थामध्ये होता . मी पळतच कमंडलू घेऊन आलो . काकांना फार आनंद वाटला . तुला मी एक नवीन कमंडलू घेऊन देणार असे वचन त्यांनी दिले . दुर्दैवाने पुढे तशी संधी आम्हाला कधी मिळाली नाही . परंतु काकांना माझा स्वभाव खूप आवडला . त्या दिवशी चालताना त्यांनी मला चार अनुभवजन्य सल्ले देखील दिले . त्यांनी आयुष्यभर मोठ्या पदावर सरकारी नोकरी केल्यामुळे त्यांना लोकसंग्रह आणि लोकांची परीक्षा चांगली होती . त्यांच्याकडून चार व्यावहारिक सल्ले शिकत आम्ही पुढचा मार्ग पकडला . एका झाडाखाली आजोबा झोपलेले दिसले . पुन्हा काका त्यांना बोलू लागले की तुम्ही इथे येऊन झोपा काढल्यात त्यापेक्षा तिथे येऊन नर्मदेचे दर्शन घ्यायला पाहिजे होते . इथून पुढे चार विविध आश्रम होते असे कानावर आले होते . एक गोशाळा होती एका टेकडीवर नग्न अवस्थेत राहणाऱ्या नागालँड येथील साधूचा आश्रम होता तिसरे एक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात हनुमान मंदिर होते आणि तिथे रामजी महाराज म्हणून मूळचे नाशीक चे साधू राहत होते आणि चौथा एका साध्वी शामप्रिया उर्फ मैय्यांचा नितांत सुंदर असा आश्रम होता . या दोघांना चालून थकवा आल्यामुळे ते पहिल्या आश्रमामध्ये थांबले . मी हळूच पुढे सटकलो आणि थेट शेवटचा म्हणजे त्या माताजींचा आश्रम गाठला . इथे एक माताजी प्रमुख असून त्यांच्या सर्व शिष्या हा आश्रम सांभाळत होत्या . पुरुषांनी ठेवलेली स्वच्छता आणि स्त्रियांची स्वच्छता यात नेहमीच फरक पडत असतो . त्यामुळे हा आश्रम अतिशय टापटीत नीटनेटका स्वच्छ आणि सुंदर दिसत होता ! विशेषतः फुलांची अतिशय सुंदर बाग येथे केलेली होती आणि भिंतींना देखील खूप छान पद्धतीने रंग दिलेला होता .या आश्रमाची काही चित्रे नकाशावर सापडली ती आपल्याकरता टाकत आहे .
माताजींच्या आश्रमातील सुंदर रंगकाम केलेले यज्ञकुंड
शेणाची इतकी चोख आणि गुळगुळीत तुळतुळीत लिपाई पुताई आणि इतके सुरेख रंगकाम अन्यत्र कोठेही पाहायला मिळाले नाही .
साध्वी शामप्रिया प्रेरित सद्गुरु घाट आश्रम सहस्रधारा मंडला . सर्वांनी अवश्य पहावा असा एक आदर्श आश्रम !
वर दुसऱ्या चित्रात भगवी भिंत दिसत आहे त्याच ठिकाणी मी आसन लावले आणि माताजींना नमस्कार केला . माताजींनी माझी सर्व चौकशी करून घेतली . आणि कुठेही आसन लाव असे मला सांगितले . इतक्यात नाशिकचा एक साधू तिथे आला . माताजीं शी गप्पा मारता मारता त्याने माझी चौकशी केली . आणि तो माझ्या मागे लागला की मी त्याच्या मंदिरामध्ये यावे . मुक्कामासाठीच यावे ! आता माझी कुचुंबणा झाली . इकडे हा आश्रम मला फारच आवडला होता . आणि तिकडे हा साधू एकटा राहत असून माझ्या सहवासाची भिक्षा मागत होता . तो अक्षरशः गयावया करून मला विनवणी करू लागला . मला संकोचल्यासारखे झाले . मी माताजी ना विचारले की आपण निर्णय द्यावा . त्या म्हणाल्या जशी तुझी इच्छा . सर्व मठ आपलेच आहेत.  इतक्यात माताजींच्या दोन तरुण शिष्या तिथे स्वयंपाकासाठी येऊन बसल्या आणि माझी चौकशी करू लागल्या . मी झटक्यात निर्णय घेतला आणि मातृ स्वरूप असलेल्या त्या तिघींच्या पाया पडून लगेचच माझे सामान उचलले .आणि साधूच्या मागे निघालो . परिक्रमेमध्ये खरे तर पुढे गेल्यावर मागे जायचे नसते . परंतु साधूच्या अति आग्रहास्तव मला २०० मीटर उलटे चालावे लागले . एका जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शेजारी मारुतीचे मंदिर बांधले होते . मंदिराचा स्लॅब धोकादायक पद्धतीने तिरका झालेला होता . भिंतींना तडे गेले होते व हा सर्व प्रकार एकंदरीत इतका भयंकर होता की कुठल्याही क्षणी तो स्लॅब कोसळला असता . स्ट्रक्चरल ऑडिट अर्थात बांधकामाची पाहणी केली असता माझ्या लक्षात आले की या बांधकामाला उभे खांब घेतलेले नव्हते तर चार भिंतींवर हा स्लॅब टाकला होता ! त्या वास्तू विशारदाला मी मनोमन साष्टांग नमस्कार घातला ! केवळ नर्मदेची कृपा आणि हनुमंताची इच्छा म्हणून ते मंदिर टिकले होते ! बरे त्या भोळ्या भाबड्या साधूला याची काहीच कल्पना नव्हती . मी जेव्हा त्याला सर्व दाखवले तेव्हा तोही घाबरा- घुबरा झाला ! मंदिराला लागून एक छोटीशी झोपडी बांधून साधू राहत होता . बाबा गेली आठ वर्षे इथे सेवा देत होते . बाबा तसे बरे होते परंतु फार भावनिक होते .वय ४५ ते ५० असावे . संसारीच व्हायचा पण चुकून ब्रह्मचारी राहिलेला साधू ! त्यांना गप्पा मारायची भारी हौस होती . आणि या किनाऱ्याच्या मार्गावरून जास्ती लोक जात नसल्यामुळे त्यांची भावनिक उपासमार होत होती . त्यामुळे त्यांनी माताजींशी संगनमत करून मला मिळवले होते ! 
हेच ते भिंतीवर भिंतीवर स्लॅब टाकलेले मारुती मंदिर !डावीकडे शाळेचे इमारत तर उजवीकडे उतरत्या छपराची साधूची कुटी व त्या शेजारी नर्मदा माता दिसत आहे .
आश्रमा समोरचे नर्मदा मातेचे शांत स्वरूप
रात्री साधूने सुंदर पद्धतीने मातीच्या मडक्यामध्ये बटाट्याची भाजी आणि गरमागरम पुऱ्या केल्या ! दुसऱ्या एका मडक्यामध्ये दम बिर्याणी बनवली ! त्याच्या हाताला खूप चव होती आणि भोजन अतिशय सुग्रास बनविले होते ! मोठ्या आनंदाने आम्ही दोघांनी तो प्रसाद ग्रहण केला . साधूने एक चिचुंद्री पाळली होती . हाक मारल्या बरोबर ती आली आणि प्रसाद घेऊन पुन्हा निघून गेली . साधू थांब म्हणला की ती थांबायची आणि पळ म्हटलं की पळून जायची . मला या प्रकारची फार मौज वाटली . साधूने संपूर्ण परिसराची भरपूर माहिती मला सांगितली . आसपासचे लोक कसे आहेत व साधू लोकांशी कसे वागतात ते देखील मला सांगितले . शेजारचा संपूर्ण महिलांचा आश्रम देखील किती कठीण पद्धतीने चालविला जातो ते मला सांगितले . लोचटपणा करणारे अनेक पुरुष भक्त आहोत असे दाखवून द्या आश्रमात येतात असे साधूचे म्हणणे होते . परंतु माताजींना माणसाची चांगली पारख असून त्या चुकीच्या माणसाला दारात देखील उभे करत नाहीत हेही त्यांनी सांगितले . डोंगरावरील नागालँड येथील साधू बद्दल देखील त्याने भरपूर माहिती सांगितली . हा दिगंबर अवस्थेमध्ये राहत असल्यामुळे तिथे शक्यतो महिला परिक्रमावासी जात नाहीत असे याचे म्हणणे होते . तसेच त्याला उत्तम इंग्रजी बोलता येते त्यामुळे सुशिक्षित परिक्रमावासी तिकडे अधिक जातात हे देखील त्याने सांगितले . एकंदरीत साधू बहुचक अर्थात बहुतेक ठिकाणची माहिती राखणारा होता. त्या रात्री फार भयानक थंडी पडली . साधू त्याच्या कुटीमध्ये झोपला होता व मी मात्र त्याचा आग्रह मोडून मारुतीरायासमोर आसन लावले होते . मायेचा त्याग करण्याकरता परिक्रमे मध्ये आल्यावर अति माया काय कामाची ! हा साधू माझ्याशी गप्पा मारताना इतका रंगून गेला होता की आता आठवडाभर मी जायचे नाही असे त्यांनी जाहीर करून टाकले ! मी देखील मौनं सर्वार्थ साधनम् या मंत्राचा वापर करत काहीच बोललो नाही ! आणि मनोमन पुढचा बेत आखून ठेवला . शेजारी असलेल्या विस्तृत सहस्रधारे मुळे थंडी मी म्हणू लागली . दोन्ही ब्लॅंकेट देखील पुरत नव्हती अशी थंडी पडली होती . अर्धवट झोपेतच ती रात्र गेली . पहाटे लवकर उठून डोल डाल स्वच्छ निर्मळ नर्मदाजलात स्नान वगैरे आटोपून पूजा करून दाराचा आवाज न करता हळूच नर्मदे हर केले ! साधूने मला सांगितले होते की सकाळी तो माझ्यासाठी चहा नाश्ता वगैरे करणार आहे परंतु त्याच्या मायेमध्ये अडकण्यात मला अजिबात रस नव्हता . कदाचित माझ्या निघून जाण्यामुळे त्याला वाईट वाटले असावे परंतु त्याला माझा निरुपाय होता . रामजी महाराज मला आशा आहे की आपण मला उदार अंत:करणाने क्षमा केली असेल .मी निघालो खरा परंतु प्रचंड धुक्यामध्ये वाट हरवली होती .इतके धुके मी परिक्रमेमध्ये पहिल्यांदाच अनुभवत होतो . चार पावलांच्या पुढचे दिसत नव्हते मग मैया दिसणे तर फारच दूरची गोष्ट . मी एक भौगोलिक निरीक्षण केले ते म्हणजे असे की जिथे जिथे नर्मदेच्या पाण्याला खळखळाट आहे तिथे त्या गरम पाण्यातून येणाऱ्या वाफाचे धुक्यामध्ये रूपांतर व्हायचे आणि घनदाट धुके पसरायचे . इथे हजारो ठिकाणी नर्मदेच्या पाण्याला खळखळाट असल्यामुळे प्रचंड धुक्याची निर्मिती कायम होत असावी . तशाच परिस्थितीमध्ये आणि कडाक्याच्या थंडीमध्ये चालत घाघा नावाचे गाव गाठले इथून पुढे अहमदपूर मार्गे सुरजपुरा - पाटण असा जंगलातला एक शॉर्टकट होता असे मला कळले होते .चालत असताना एका दुकानदाराने चहा प्यायला बोलावले . इंग्रजी वाय आकाराची दोन लाकडे जमिनीत ठोकून त्याच्यावर एक आडवा ओंडका टाकलेले बाकडे तिथे तयार केलेले होते . या भागात सर्वत्र अशीच बैठक व्यवस्था आढळते .तिथे शांतपणे बसलो असताना एक गुजराती महात्यागी साधू आणि एक बुटकीशी वयस्कर मराठी बाई तिथे आले . हा साधू बोलायला अतिशय हुशार होता .गुजराती असला तरी त्याला बऱ्याच भाषा बोलता येत होत्या . मी महाराष्ट्रातला आहे हे कळल्यावर त्याने घडाघड ज्ञानोबा तुकोबांचे अभंग म्हणायला सुरुवात केली ! आज एकादशी होती . त्यामुळे कुठे काही खायला मिळणे अशक्य होते . त्या दुकानदाराने मूठभर शेंगदाणे दिले .मला सध्या भूक नसल्यामुळे मी ते सोबत ठेवून दिले .या गुजराती महा त्यागी सोबत असलेली स्त्री एका मोठ्या समूहासोबत परिक्रमेसाठी निघाली होती परंतु सर्वांचे चालणे वेगवान असल्यामुळे हिला एकटीला मागे टाकून सर्वजण पुढे निघून गेले होते . त्या बिचारीला हिंदी भाषा सुद्धा बोलता येत नव्हती आणि तिच्याकडे मोबाईल देखील नव्हता त्यामुळे तिची फारच कुचुंबणा होत होती . अशा परिस्थितीमध्ये तिने नर्मदेचा धावा केला की माझी परिक्रमा काहीतरी करून पूर्ण कर . आणि तिला हे साधू महाराज भेटले . मी पुढे चालायला लागलो .एक मोठे झाड पाहून त्याच्या खाली महा त्यागी आणि ती माताराम असे बसले होते . महा त्यागीने मला आवाज दिला आणि तिकडे येऊन बसण्याचे फर्मान सोडले . परिक्रमेमध्ये शक्यतो साधूचा उपमर्द कोणी करत नाही . शाळेमध्ये मुले जसे मास्तरांचे किंवा हेडमास्तरांचे ऐकतात अगदी त्याच पद्धतीने नर्मदा परिक्रमे मध्ये परिक्रमा वाशी साधूंचे त्यागींचे आणि महा त्यागींचे शांतपणे ऐकून घेतात . मी झाडाखाली बसल्यावर त्याने मला सफरचंद खायला दिली . आज ग्यारस है l खा लो । असे त्यांनी मला सांगितले .एकादशीला हिंदीमध्ये ग्यारस असे म्हणतात . त्याच्याजवळ असलेला अजून बराच उपवासाचा माल त्याने काढला आणि आम्ही तिघांनी तो फस्त केला . मागे महाराजपुरच्या अलीकडे एका गुऱ्हाळे वाल्याने मला ताजा ताजा गुळाचा खडा दिला होता तो आणि शेंगदाणे मी काढले आणि तिघांनी मिळून खाल्ले .इथे पुन्हा साधूशी गप्पा झाल्या तेव्हा असे कळाले की हा साधू त्याच्या गुरुशी भांडून आश्रमातून बाहेर निघाला .आणि वाटेत ही स्त्री भेटल्यावर तिच्यासोबत उरलेली संपूर्ण परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्णय त्याने घेतला . बाईंची उंची पाच फूट देखील नव्हती त्यामुळे तिचे सर्व सामान देखील हा वेळोवेळी उचलायचा आणि तिला खूप मदत करीत होता . या साधू बद्दल वरकरणी पाहता कोणाचाही गैरसमज होणे शक्य आहे .परंतु मला याचा शेवटी एक खूप जबरदस्त अनुभव आला तो योग्य वेळी लिहेन . साधू अखंड गांजा पीत होता . मी त्याला विचारले , " महाराज आप महा त्यागी कहलाते हैं ना ? तो फिर आपने इस गांजा पीने की आदत का त्याग क्यों नहीं किया ? " मोठ्याने हसत साधू म्हणाला , " देख बेटा । जिसने गांजा छोडा वह त्यागी है । परंतु तेरे मन में यह जो गांजा के प्रति घृणा है ,हमने उसे घृणा का ही त्याग किया कर दिया है ।इसलिए हम महां त्यागी है । " या उत्तरावर मी निरुत्तर झालो. 
पुढे ओंकारेश्वर ला हे दोघे मला पुन्हा भेटले .आणि तिकडे एक अद्भुत अनुभव मला आला तो त्या प्रकरणात लिहीनच . परंतु त्यावेळी त्या दोघांची नावे मला कळली .या माताराम ज्या होत्या , त्यांचे नाव होते नंदा पावशे . नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावटा हे त्यांचे गाव होते . आणि त्यांच्यासोबत असलेल्या साधू महाराजांचे नाव ते महात्यागी रामकरणदासजी महाराज . मंडला जिल्ह्यामध्ये देवगाव संगमाजवळ घुगरी इथे यांचा आश्रम होता . तसेच मंडला मध्येच महाराजपुर येथे संत तुलसी निवास राम जानकी आश्रम नामक एक आश्रम बोनट नदीच्या काठावर होता . त्याची व्यवस्था देखील हेच पाहायचे .
दोघे विश्रांती घेत पहुडले आणि मी पुढे निघालो .
या भागातून मला लवकरात लवकर पुढे सटकणे आवश्यक होते कारण हे प्रचंड जंगल होते आणि याला लागून अनेक मोठे मोठे व्याघ्र प्रकल्प होते . आपल्याला कल्पना यावी म्हणून मी या अरण्य प्रदेशाला जोडून असलेल्या व्याघ्र  प्रकल्पांचा नकाशा सोबत जोडत आहे . हे सर्व व्याघ्र प्रकल्प इथून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत . 
व्याघ्र प्रकल्पांची नावे हिरव्या रंगात दर्शवली आहेत .
पेंच आणि भांडार रेंज व्याघ्र प्रकल्प देखील या वनाला लागून होता .
सुरजपुरा या गावापासून नर्मदेचे विस्तीर्ण पात्र सुरू होत होते आणि बर्गी धरणामुळे आलेला फुगवटा इथून पुढे चालू झाल्यामुळे नर्मदेच्या काठाने चालण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला होता . 
नर्मदा परिक्रमेच्या पुस्तकांमध्ये देखील बर्गी धरणामुळे इथून पुढे काठाचा मार्ग नसल्याची ठळक नोंद आहे .
लाल रंगात दिसते आहे ते सुरजपुरा गाव . सुरजपुरापासून पाटण पर्यंत संपूर्ण वनक्षेत्र होते व मध्ये मानवी वस्ती अजिबात नव्हती . या वनामध्ये सर्व प्रकारची वन्य श्वापदे होती .
या जंगलातील मार्गाचा अवलंब फारसे परिक्रमावासी करत नाहीत . त्यापेक्षा सरधोपट डांबरी सडकेने ते थेट जबलपूर गाठतात . मी घाघा गावामध्ये आलो आणि एका रमणीय तलावाच्या काठावर बसून राहिलो . चालून चालून पुन्हा एकदा भूक लागली होती . भरपूर वाटले तरी शेंगदाणे आणि गुळ शिल्लक होते ते तिथे बसून एक एक करून चावून चावून खाल्ले . समोर पक्षांच्या अनेक जाती दिसत होत्या . त्यातले मला कुठले पक्षी ओळखता येतात असे मी पाहत होतो . फलाहारी अर्थात उपवासाचा फराळ करताना समोर इतके सुस्वरे कूजन करणारे पक्षी असावेत हे मला स्वर्गीय वाटत होते ! नर्मदे काठचे पक्षी या विषयावर खरे तर एक वेगळे पुस्तकच होईल ! अगदी आद्य शंकराचार्यांनाही नर्मदाष्टकात या पक्षांचा उल्लेख टाळता आलेला नाही !  पक्षी लक्ष कुजितम असे ते म्हणतात . त्याप्रमाणे खरोखरीच लक्षावधी पक्षी इथे आहेत . सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे । असे ते म्हणतात ते चक्रवाक पक्षी देखील इथे खूप आहेत . याला मराठीमध्ये ब्राह्मणी बदक असे म्हणतात . इंग्रजीमध्ये रुडी शेल्ड डक असे नाव आहे .नर्मदेमध्ये एकंदरीतच मासे मगरी देखील भरपूर आहेत . असंख्य कीटक आहेत . या भागात मला राखी धनेश हुप्पो अथवा हुदहुद पक्षी बरेच दिसले .नीलकंठ ही मुबलक प्रमाणात दिसले .खंड्या पक्षाच्या सर्व जाती इथे तुम्हाला बघायला मिळतात . कॅमाफ्लाज होणाऱ्या तांबूस डोंगरी चिमण्या तर अगदी खूप आढळतात .तुम्ही अगदी जवळ जाईपर्यंत ह्या दिसत नाहीत व आपण जवळ गेलो की भुर्रकन उडून जातात . त्यांच्या त्या एकदम उडून जाण्यामुळे माणूस दचकतो . टिटव्या भरपूर आहेत . बदके मुबलक आहेत .
बगळ्याच्या सर्व जाती आहेत .स्थलांतरित पक्षी देखील मोठ्या प्रमाणावर येतात . हॉर्नबिल , स्पून बिल , सर्व प्रकारचे गाय बगळे ,पिवळे बगळे ,भुरे बगळे , पाण कोंबड्या ,वेगळ्या दिसणाऱ्या साळुंख्या , तांबट , सुतार , असे सर्वच पक्षी दिसले . डोमकावळे ,कावळे , चिमण्यांचे तर २०० -२०० चे थवे दिसायचे . छोटे आणि मोठे पाणकावळे देखील भरपूर होते . घारी ,गरुड , ससाणे ,घुबडे देखील पाहिली . फक्त मोर आणि गिधाड तेवढे दिसले नाही .पुढे गुजरात पासून मोर देखील मुबलक दिसले . 
नर्मदेमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारा चक्रवाक पक्षी .Rudy Shelduck ,,, ब्राह्मणी बदक
हे आपली चाहूल लागल्यावर मजेशीर आवाज काढतात .
राखी धनेश अथवा  gray hornbill हा पक्षी देखील येथे आढळून येतो
 हुप्पो किंवा हुडहुड / हुदहुद पक्षी
अखेरीस मनुष्यवस्ती संपली आणि जंगल चा रस्ता सुरू झाला . हे अरण्य खरोखरच खूप घनदाट होते . सागवानाची झाडे अधिक प्रमाणात होती . पायवाटा जवळपास नव्हत्याच . परिक्रमावासींसाठी मार्गदर्शन करणारे फलक किंवा चिन्ध्या देखील लावलेल्या नव्हत्या. फक्त तुम्हाला रस्ता सांगणाऱ्या माणसाने हाताने दाखवलेली दिशा लक्षात ठेवायची आणि चालत राहायचे एवढेच काम होते . एक गमतीशीर प्रयोग आपणास स्वतः करून पहा . खाली दाखवलेल्या नकाशावर गुगल नकाशे मध्ये जा आणि झूम इन करून कुठलीतरी एक दिशा धरून चालत रहा .बघा तुम्हाला गाव सापडते का ! जर नकाशावर ठराविक गावात पोहोचणे इतकं अवघड आहे तर प्रत्यक्षात किती कठीण असेल याची कल्पना करून पहा . 
हेच ते पाटणचे जंगल जे एका दमात पार करायचे होते . चुकला की संपला !
या जंगलामध्ये असंख्य ओढे नाले आडवे आले होते .
ते पार करण्याकरता थोडेसे डावीकडे उजवीकडे गेले की मुख्य वाट सुटून जायची . असा मी खूप वेळा या वनामध्ये भटकलो . परंतु नर्मदेचे स्मरण केले की मार्ग सापडायचा . हा धगधगीत स्वानुभव आहे . या जंगलामध्ये खूप सारे स्फटिक सापडत होते . इथे थोडेफार मोकळे माळरान लागले की त्यावर स्पटिकांसारख्या रंगीबेरंगी दगडांचा अक्षरशः खच पडलेला असायचा . हे सर्व स्फटिक इतके सुंदर होते की पाहतच बसावेसे वाटायचे !गारगोट्यांचे इतके नानाविध प्रकार मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते . या भागात पूर्वी घडलेल्या काही भौगोलिक हालचालीमुळे किंवा जमिनीतील उष्णतेमुळे तिच्या पोटातील मूलद्रव्यांचे स्फटिकीकरण झाले असावे .  थोड्यावेळाने मला एक जोडपे असलेले परिक्रमावासी भेटले . त्यांच्या पुढेमागे काही काळ चाललो . नंतर ते दोघेही दिसायचे बंद झाले . मी पुढे निघून गेलो .
संध्याकाळ होता होता मी त्या जंगलातील संपूर्ण वाटचाल पूर्ण केली आणि पाटण नावाच्या गावामध्ये येऊन पोहोचलो . गावामध्ये एक दुर्गा मंदिर होते तिथे दर्शन घेऊन मी कट्ट्यावर बसलो . शेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे काही लोक ग्रामस्थांची ग्रामसभा घेत होते . सभा संपल्यावर सर्वजण माझ्याकडे आले . मी त्यांना मला आलेले काही सामाजिक अनुभव आणि माझी निरीक्षणे सांगितली जी त्यांना राजकारणाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरली असती . त्यांनी पुन्हा काही प्रमुख गावकऱ्यांना बोलावले आणि माझ्यासमोर एक पुन्हा छोटी सभा जणू काही सुरू झाली . त्यांनी मला माझे स्वानुभव बोलण्याची विनंती केली . आपल्या देशाची प्रादेशिक अखंडता टिकून राहावी यासाठी आपण सर्वांनी एक समाज म्हणून एकसंध राहणे कसे आवश्यक आहे व त्यामध्ये फूट पाडणारे घटक कसे दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत हे त्यांना मी उदाहरणांसह पटवून दिले आणि लोकांना देखील ते पटले . या भागामध्ये काही आदिवासी पक्ष असून भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला विरोधी असे वातावरण येथे आहे . 
अशा पद्धतीचे प्रचार साहित्य तिथे तुम्हाला सहज सापडते .
गोंड आदिवासींचे राज्य सर्वत्र व्हावे असा प्रचार करणारी गोंडवाना गणतंत्र पार्टी म्हणून एक पक्ष इथे कार्यरत आहे .
मध्यप्रदेशचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे . तसेच त्यांचे विरोधक असलेले काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी देखील आपल्या तिसऱ्या पत्नीला सोबत घेऊन पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे . मध्यप्रदेश मधील राजकारणामध्ये नर्मदेचे इतके महत्त्व आहे की इथल्या राजाला देखील तिला शरण जावेच लागते . असो . राजकीय विषय अनुषंगाने आला म्हणून सांगितला . अधिक विषयांतर नको . 
इथे शेजारी एक दुकान होते . त्याला मी विचारले की दुर्गा मंदिरामध्ये मुक्कामाची सोय होऊ शकते का . त्याने मला काही काळ मंदिराच्या बाहेर बसायची विनंती केली व गावातून कोणीतरी किल्ली घेऊन येईल असे सांगितले . आज एकादशी असल्यामुळे पोटात अन्नाचा कण नव्हता . समोरून एक तरुण आला आणि त्याने विचारले की बाबाजी तुम्ही दूध पिणार का ? मी होकार दिल्यावर तो दूध आणायला निघाला . चार पावले गेल्यावर पुन्हा मागे आला आणि म्हणाला नाहीतर तुम्ही स्वतःच माझ्या घरी चला तिथे बसूनच दूध पिऊ या . मला घरी घेऊन गेल्यावर त्याने माझ्यासमोर देशी गाईचे शुद्ध धारोष्ण दूध काढले आणि गरम गरम दूध प्यायला दिले ! आश्चर्य म्हणजे ती गाय चार लिटर दूध द्यायची . त्या दिवशी तिने साडेपाच लिटर दूध दिले त्यामुळे मी तांब्याभर दूध पिऊन सुद्धा अर्धा लिटर अधिकचे दूध उरले . तो धार काढत असताना मी गाईला आंजारत गोंजारत होतो त्याचा हा परिणाम असावा . इथल्या प्राण्यांना देखील नर्मदा परिक्रमा कळते की काय कोण जाणे ! कारण तुम्ही कुठल्याही परिक्रमा वाशीला हे विचारून पहा ! गावातून जाताना घरात चरणारे कोंबडे तुम्हाला नर्मदे हर असा आवाज देतात ! म्हणजे ते म्हणतात कुकू चुकू हेच ! परंतु आपल्याला मात्र नर्मदे हर ऐकू येते कारण आपण विचारांनी आचारांनी नर्मदामय झालेले असतो .
असो . मी पुन्हा दुर्गा माता मंदिराच्या ओसरीवर येऊन बसलो . इथे समोरच एक ऑनलाईन दुकान होते .याचा अर्थ भारत सरकारने दिलेल्या सर्व ऑनलाईन सुविधांचा लाभ इथून घेता येतो असे दुकान एका तरुण वनवासी मुलाने चालू केले होते . मी किल्ल्यांची वाट पाहत बसलेलो  होतो ,तेव्हा गावातील एक मनुष्य माझ्या शेजारी येऊन गप्पा मारू लागला . इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्याने मी कसा माणूस आहे याचा अंदाज घेतला . मी आज कुठे मुक्काम करणार आहे वगैरे त्याने सर्व मला विचारून घेतले . परिक्रमा कशासाठी सुरू केली ? कशी काय सुरू आहे ? वगैरे चौकशा देखील करून घेतल्या . मी त्याला सांगितले की ऑनलाईन दुकान चालवणाऱ्या मुलाने मला दोन पर्याय सांगितले आहेत . एक संजय यादव नावाचा कोणी मनुष्य शेजारी असलेल्या कोकाटोला गावामध्ये परिक्रमा वाशींची सेवा करतो आणि दुसरे म्हणजे हे दुर्गा माता मंदिर आहे . मी मात्र मंदिरामध्येच राहतो कारण गृहस्थी माणसाच्या घरात राहण्यात मला फारसा रस नाही . वगैरे आमचे बोलणे चालू होते . आधी त्याने संजय यादव या माणसाला खूप शिव्या घातल्या . आणि तो मनुष्य अतिशय वाईट असल्याचे मला सांगितले . मी त्या माणसाला इतकेच म्हणालो की हे पहा हा संजय यादव कोण आहे त्याला मी ओळखत नाही . परंतु जर तो परिक्रमा वाशींची सेवा करतो आहे तर याचा अर्थ तो नक्कीच अतिशय सहृदय मनुष्य आहे आणि त्याला शिव्या घालण्यापेक्षा त्याच्यासारखे काहीतरी कार्य आपण करावे ते अधिक चांगले .माझ्या या उत्तरावर तो मनुष्य खुश झाला आणि म्हणाला , " बाबाजी मै ही संजय यादव हूँ। और अभी आपको मेरे घर चलना ही होगा । आपके सामने दूसरा कोई विकल्प है ही नहीं । क्योंकि मंदिर का पुजारी शहर गया है । इसलिए चाबी नहीं मिलेगी । " मी त्याच्याकडे पाहतच राहिलो ! माणसाची परीक्षा घेण्याची ही त्याची अजब पद्धत पाहून मला मजा वाटली . नंतर त्याने सांगितले की तो ग्रामसभेमध्ये देखील उपस्थित होता आणि त्याने मी काय बोललो तो विषय देखील ऐकला . त्याला एकंदरीत कल्पना आली होती की आता या परिक्रमावासीला घरी न्यावे लागणारच आहे परंतु तत्पूर्वी हा नक्की कसा मनुष्य आहे याची परीक्षा त्याने त्याच्या पद्धतीने करून घेतली इतकेच ! मी क्षणभर विचार केला की जर मी कुठलाही अनुभव नसताना केवळ ऐकीव अनुमानाने संजय यादव या माणसाला शिव्या घातल्या असत्या तर माझी आज काय अवस्था झाली असती ? तो कुठल्याही प्रकारे त्याची ओळख न सांगता निघून गेला असता . आणि मी मात्र घर का ना घाट का अशा अवस्थेमध्ये त्या कट्ट्यावर झोपून राहिलो असतो ! म्हणूनच आयुष्यामध्ये अनुमानापेक्षा अनुभवाला अधिक महत्त्व द्यावे हेच बरे ! असो .
इथून संजय यादव चे घर जवळच होते आणि योगायोग म्हणजे त्याचा सख्खा धाकटा भाऊ प्रदोष कुमार यादव हा कालच त्याची नर्मदा परिक्रमा आटोपून घरी परत आला होता ! शेतामध्ये यांचे मोठे वाडा वजा घर होते भरपूर गुरेढोरे होती . आणि परिक्रमावासींच्या निवासाकरिता यांनी एक स्वतंत्र बांधकाम केलेले होते .
हात पाय धुऊन मी त्या खोलीमध्ये गेलो असता तिथे आधीच एक ओडिया परिक्रमावासी झोपलेला मला दिसला . हा उडिया मनुष्य तापाने फणफणला होता .त्याच्याशी अधिक बोलल्यावर असे लक्षात आले की हा एक महात्मा असून जगन्नाथ पुरीला याचा स्वतःचा मठ आहे . याचे नाव सनातन दास होते . याचा बाया बाबा आश्रम वृंदावन येथे देखील निवास असायचा .
तो तीन-चार दिवस झाले इथेच मुक्कामी होता . त्याच्या आजारपणामुळे त्या खोलीला एक आजारी वास येत होता . याच्या तापाची थोडीफार बाधा मला देखील होणार याची मानसिक तयारी ठेवूनच मी त्याच्या शेजारी आसन लावले . हे त्याला खूप बरे वाटले कारण गेल्या काही दिवसात तो आजारी आहे कळल्यावर लोक पुढे निघून जात होते किंवा बाहेर आसन लावत होते . मुळात ज्याच्या नशिबात जे ठेवलेले आहे ते व तेवढेच त्याला मिळते यावर माझे दृढ श्रद्धा असल्यामुळे अशा किरकोळ मरणा बिरणाला आपण कशाला भ्यायचे ! कोरोना जागतिक महामारीच्या काळामध्ये देखील मी मास्क वगैरे न लावता खुशाल कोविड केंद्रामध्ये जाऊन रुग्णांच्या शेजारी झोपून त्यांची शुश्रुषा केली होती आणि तरी देखील मला साधी सर्दी देखील झाली नव्हती . आता देखील याची थोडीफार शुश्रुषा करावी असा विचार डोक्यात ठेवूनच मी शेजारी आसन लावले होते . 
यादवांचे हे एकत्र कुटुंब होते आणि घरामध्ये भरपूर मुले होती . बाल सुलभ उत्कंठेनुसार एक एक करून हळूहळू आत येऊ लागले आणि कोण नवीन बाबाजी आला आहे हे पाहू लागले ! त्यांचे ते चमकणारे डोळे आणि डोळ्यातील आश्चर्य मिश्रित भिती पाहून मला फार मौज वाटत होती ! परंपरेनुसार मी एकेकाला त्यांची नावे विचारली आणि काय शिकत आहेत वगैरे माहिती घेतली . "बाबाजी आपको मेरा ड्रॉइंग बुक दिखाए? " एका छोटी ने विचारले . हो म्हणताच पळतच जाऊन तिची वही घेऊन आली . माझी चित्रकला जरा बरी आहे असे लोक म्हणतात त्यामुळे मी तिच्या वहीमध्ये भरपूर चित्र काढून दिली . मुले भलतीच खुश झाली ! याच्यामध्ये शिवोम नावाचा एक मोठा मुलगा होता आणि बारावी नंतर पुढे काय असा प्रश्न त्याला पडला होता . त्याला देखील माझ्या परीने मी मार्गदर्शन केले . अजून एक मोठी ताई होती तिला देखील पुढील शिक्षणाबाबत काही सांगितले .  रामजी , संतोषी उर्फ सरस्वती ,शिवोम , दिव्या , नेहा अशी या मुलांची नावे होती .
मुलांनी पळत जाऊन बाबांचा फोन आणला आणि काही फोटो काढले . माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्यांनी ते पाठवून दिले . मुले माझ्या इथून हलेचनात ! त्यांचे वडील येऊन त्यांना तीन वेळा सांगून गेले की बाबाजी चालून दमले आहेत त्यांना विश्रांती घेऊ दे .परंतु मुले काही माझा पिच्छा सोडेनात ! मी देखील यादव यांना सांगितले की हरकत नाही मुले काहीतरी चांगलेच ऐकत आहेत . ऐकू द्यावे . त्याचवेळी मी मुलांकडून त्या भागातील भूगोलाबद्दल ,इतिहासाबद्दल ,संस्कृतीबद्दल देखील जाणून घेत होतो . शक्यतो लहान मुलांची मते ही पूर्वग्रहदूषित नसतात . त्यामुळे ती आवर्जून घेत जावीत . 
संतोषी , शिवोम , रामजी , नेहा ,दिव्या आणि प्रस्तुत लेखक

मी सुचविल्याप्रमाणे शिवोम ने पुढे खरोखरीच अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि जबलपूरला राहून तो शिकू लागला . त्याला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना काही अडचणी आल्या , इंग्रजी भाषेची अडचण आली ,तसेच वस्तीगृहामध्ये राहताना देखील अडचणी आल्या .त्या प्रत्येक वेळी त्याने मला आवर्जून फोन केला आणि सल्ला घेतला . परिक्रमा संपल्यावर देखील त्याने आठवणीने माझ्याशी संपर्क ठेवला याचे मला कौतुक वाटते . कारण परिक्रमेदरम्यान तर आमचा संपर्क होण्याची शक्यताच नव्हती . परंतु माझ्या ज्या मित्राच्या क्रमांकावर त्याने फोटो पाठवले होते त्याच्या संपर्कात राहून त्याने माझा नवीन क्रमांक मिळविला आणि पुन्हा संपर्क प्रस्थापित केला . विशेषतः मुलांनी घरापासून लांब राहण्याला घरातील मोठ्या माणसांचा विरोध होता त्यांचे देखील प्रबोधन मी त्या रात्री केले आणि त्याच्या अभियांत्रिकी प्रवेशाचा मार्ग थोडासा सुकर झाला . त्या रात्री देखील खूप थंडी पडलेली होती . शिवोम मला एका कोपऱ्यात बनवलेल्या चुलीपाशी घेऊन गेला . हा कोपरा कायम गरम असायचा आणि शेक घेण्यासाठीच या भागाची निर्मिती करण्यात आली होती . तिथे शेकता शेकता आम्ही दोघांनी भरपूर गप्पा मारल्या . रात्री त्यांनी मला भरपूर दुधात केलेली साबुदाण्याची खीर खाऊ घातली . रात्री यादव यांचे वडील आणि दोघे बंधू यांच्यासोबत अंगणामध्ये गप्पा मारत बसलो . संजय यादव हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता . त्या भागामध्ये तो शाखा लावायचा . झोपण्यासाठी खोलीमध्ये गेल्यावर उडिया साधूशी गप्पा मारत पाठ टेकली .तुम्ही पुरीला आलात की आमच्या आश्रमात नक्की या असे आग्रहाचे आमंत्रण त्याने दिले .तो अतिशय तरुण होता .साधारण ३० - ३५ वय असावे . सकाळी लवकर उठून अंधारातच जंगलामध्ये जाऊन डोल डाल आटोपून आलो .पूर्वी यादव कुटुंबीयांना या विषयामध्ये अतिशय कटू अनुभव आले होते . काही परिक्रमावासी , विशेषतः महिला अंधारात शेजारच्या घरांच्या  दारामध्ये वगैरे जाऊन दाराच्या तोंडालाच विष्ठा टाकून येत . त्यामुळे शेजारीपाजारी यादव कुटुंबीयांना खूप बोलू लागले होते .काही काळ याच कारणासाठी त्यांना सेवा देणेदेखील बंद करावे लागले होते . परंतु नंतर त्यांनी प्रबोधनाचा मार्ग स्वीकारला . माझे त्यांनी विशेष आभार मानले . परंतु पहाटेच्या अंधारामध्ये जंगलात मला कसे वाटले याचा अनुभव मी त्यांना न सांगणेच पसंत केले ! आता मी निघण्याची तयारी करू लागलो परंतु यादव कुटुंबीयांनी मला थांबवले आणि द्वादशीचे भोजन करून जाण्याची विनंती केली . पुढे जवळपास कुठलेही गाव किंवा आश्रम नव्हता . पुन्हा थोडाफार जंगलातील रस्ता होता . यांच्या घरातून नर्मदा मैयाचे सुंदर दर्शन होत होते ! दूरवर तिचे पाणी छान चमकत होते ! यादवांचे अतिशय संपन्न आणि सुसंस्कृत कुटुंब होते . शेती हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता . प्रदोष कुमार यादव ने जाताना मला एक खतरनाक शॉर्टकट रस्ता सांगितला . या रस्त्याने चालत जाताना दोन-तीन मोठी घनदाट जंगले पार करावी लागत होती . परंतु जवळपास तीन दिवसांचे चालणे वाचून एकाच दिवसात मी पुढे पोहोचत होतो .मध्ये कुठेही परिक्रमा वासींची सेवा होत नाही . कारण हा रुळलेला परिक्रमेचा मार्गच नाही . तर हा मार्ग केवळ स्थानिक ग्रामस्थ येण्या जाण्यासाठी वापरतात .घरातून निघालो आणि शेतामध्ये काम करणारे संजय यादव आणि शिवोम भेटले . मला बरगावच्या आश्रम शाळेमध्ये मिळालेली छत्री मी इथे यादव ला देऊन टाकली . तसाही तिचा वापर केलाच नव्हता . तुका म्हणे घालू तयावरी भार इतकेच तिचे काम होते ! यादव कुटुंबीय डोळ्यात पाणी आणून निरोप घेताना दिसले . खूप कमी काळात ते माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने जोडले गेले की मैयाची कृपा . परंतु तुम्हाला तर आता माहितीच आहे ! आपले ठरलेले आहे ! कुठल्याही मायेत न अडकता सटकायचे ! तसाच सटकलो आणि सुसाट वेगाने जंगलच्या दिशेने चालत सुटलो . नर्मदे हर !



लेखांक चाळीस समाप्त (क्रमशः)

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर