लेखांक ३९ : अखंड रामायण सेवा चाललेली मधुपुरीची मार्कंडेय तपोभूमी घोडाघाट

वाघाने मारलेल्या म्हशी बद्दल विचार करत पुढे चालत राहिलो . एवढ्या ताकदवान जनावराला लोळवून ठार करणारा वाघ किती शक्तिमान असेल याची कल्पनाच न केलेली बरी . आणि मुळात अशा वाघाच्या तावडीत मनुष्य प्राणी सापडला तर तो त्याचे किती हाल करू शकतो केवळ या विचाराने देखील अंगावर काटा आला !
मध्ये डाव्या हाताला एक डोंगर अखंड सोबत चालतो आहे असा भास होत होता . हा संपूर्ण डोंगर काळ्या रंगाच्या खडकांनी भरलेला होता .  पुढे गेल्यावर त्याच्या नावाची पाटी दिसू लागली . या डोंगराला काला पहाड असे म्हटले जाते . हे पर्यटकांचे खास आकर्षण असून या पहाडावरती अतिशय मोठ्या मोठ्या काळ्या रंगाच्या भव्य कातळ शिळांचा अक्षरशः खच पडलेला आढळून येतो . इथल्या राणीशी जोडलेल्या काही कथा देखील लोक या पहाडा विषयी बोलताना सांगतात . अतिशय वैचित्र्यपूर्ण असलेल्या या शिळा महाराणीच्या इशाऱ्यावर जागा सोडून हलत असत असे स्थानिक लोक मानतात. 
काला पहाड वरील भव्य शिळांचा खच (संग्रहित छायाचित्रे )
अशा प्रकारच्या शिळा भारतानंतर केवळ उत्तर आयर्लंड मध्ये आढळतात आणि या करोडो वर्ष जुन्या आहेत अशी पाटी इथे सरकारने लावलेली आहे . 
थोडेसे अंतर गेल्यावर दूरवर कुठेतरी रामायण वाचन चालू आहे असा आवाज येऊ लागला . हळू हळू हा आवाज मोठा होत गेला . सुमारे चार किलोमीटर अंतरावर हा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता . त्या परिसरामध्ये एवढी निरव शांतता होती की रामायणातील प्रत्येक शब्द कळत होता . त्या आवाजाच्या दिशेने चालायचे मी ठरविले . मजल दरमजल करता करता नर्मदेच्या काठावर असलेल्या मधुपुरी गावामध्ये पोहोचलो . इथे नर्मदा परिक्रमेचे प्रवर्तक महर्षी मार्कंडेय महामुनी यांनी तपस्या केलेला घोडा घाट आहे . या घाटावर एक घोड्याची मोठी मूर्ती स्थापित आहे . महादेवाचे पुरातन मंदिर आहे . मार्कंडेय मुनींनी स्थापन केलेले भव्य दिव्य शिवलिंग ,धूनी इथे आहे . तसेच हनुमान मंदिर देखील असून या हनुमानाच्या समोरच गेली ३३ वर्षे दिवस रात्र अखंड रामायण पारायण आणि अखंड ज्योतीचे तेवणे सुरू आहे . दिनांक आठ जुलै १९९० रोजी या २४ तास अखंड रामायण पाठाला इथे सुरुवात झाली . याच मंदिरामध्ये शेणाने सारवलेल्या बंदिस्त उबदार अशा एका लांबच लांब ओसरीमध्ये परिक्रमावासीयांची राहण्याची सोय केली जाते . पायाने अपंग असलेला एक सेवेकरी येथे रामायण देखील वाचत असे आणि परिक्रमावासींची सेवा देखील करत असे . याचे नाव लोधी असे होते . दोन्ही पायांनी अपंग होता व मोठा भाविक आणि सात्विक होता .इथे कोणीही बसून रामायणाचे वाचन करू शकतो परंतु रामायणाच्या वाचनामध्ये कधी खंड पडू नये म्हणून इथे चार सेवेकरी दीड हजार रुपये पगारावर ठेवलेले आहेत . मी असे ठरवले की ज्यावेळी कोणीही रामायण वाचायला तयार होत नाही अशावेळी आपण वाचावे . लोधी मला तखत देऊ करत होता परंतु ते नम्रपणे नाकारत मी एका कोपऱ्यामध्ये जमिनीवरच आसन लावले आणि नर्मदा मातेचे दर्शन करण्यासाठी निघालो.  सर्वप्रथम हनुमंताचे दर्शन घेतले . 
मधुपुरी गावातील दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिर
 ८ । ७ । १९९० से श्रीराम चरित मानस पाठ एवं अखंड ज्योती प्रारंभ
थोडेसे नर्मदे कडे गेल्यावर मार्कंडेय महामुनी स्थापित प्राचीन महादेव मंदिर लागले
शेजारीच श्री मार्कंडेय आश्रम आहे
या परिसरामध्ये नित्य वावर असलेल्या वाघोबांनी इथल्या मंदिरांमध्ये देखील स्थान पटकावले आहे . वाघाच्या या मूर्ती पाहून दुसरे वाघ मंदिराजवळ येत नाहीत असे मला एका साधूने सांगितले . 
यानंतर घोडा घाटावरील घोड्याचे दर्शन होते
दगडावर चुन्याने लिहिलेली घोडा घाट ही अक्षरे
घोडाघाट अतिशय उत्कृष्ट आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने बांधलेला असून त्याच्या पायऱ्या सुबक आखीवरेखीव आणि मजबूत आहेत .
नर्मदा मातेला घोडा घाट असा दिसतो !
आणि घोडा घाटावरून दिसणारे नर्मदेचे रुपडे देखील नितांत सुंदर असेच आहे !
तासनतास या सुंदर रूपाकडे पाहत बसले तरी मन भरत नाही . . .
इथे शेजारीच एक प्राचीन आणि भव्य दिव्य वटवृक्ष दिमाखात उभा असलेला दिसतो . हा देखील इथल्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहे . नर्मदे काठी अशी प्राचीन झाडे अनेक ठिकाणी आहेत . 
स्थानिक तरुणांनी एडिट केलेली वटवृक्षाची प्रतिमा


घाटावरती बसून मी स्नान केले . पाणी अक्षरशः बर्फासारखे गार होते . परंतु आता हळूहळू अशा थंडगार पाण्याने स्नान करण्याची शरीराला सवय लागून गेली होती . पहिला कमंडलू घेताना अंगाला झटका लागायचा . नंतर मात्र शरीराला सवय होऊन जायची . या घाटावर शांत बसायला खूप भारी वाटते . इथे फारसा मानवी वावर देखील नव्हता . एका दमात सर्व पाऱ्या चढत आश्रमामध्ये पोहोचलो . एरवी खरोखरीच असे काही करू शकण्याची शारीरिक क्षमता माझ्यामध्ये आहे का नाही याबाबत मी साशंक आहे . परंतु परिक्रमेमध्ये मात्र एक वेगळीच शक्ती प्राप्त झाली होती असा अनुभव मी वेळोवेळी घेतला .  असो . आधी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो . मंदिरामध्ये काही साधू लोक धूना पेटवून बसले होते . त्यांच्या इथे मी देखील जाऊन बसलो . कोणीही नवीन परिक्रमावासी आला की त्याची संपूर्ण सीआयडी चौकशी काही साधू लोकांकडून बरेचदा केली जाते तशी माझी देखील झाली ! भोले बाबा का प्रसाद चाहिए ? एकाने मला विचारले . माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून दुसरा गरजला , गांजा पियोगे ? नही महाराज | मै नही पिता । मी शांतपणे सांगितले . कोई बात नही चाय प्रशादी पालो । असे म्हणत त्यांनी आतील एका नवख्या साधूला चहा बनवण्याचे फर्मान सोडले . साधूचे  साधू जीवनातील वय किती आहे हे ओळखण्यासाठी त्याच्या जटांची लांबी शक्यतो बघितली जाते . नव्या साधूंच्या दाढी मिशा व जटा लहान असतात तर अनुभवी लोकांच्या जटांचा भार त्यांना झालेला असतो इतक्या त्या मोठ्या असतात . मुळात डोक्यावर असलेला हा भार सतत त्यांना त्यांच्या साधू म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देत असतो असे मला एका साधूनेच सांगितले . या जटा खाजतात , दुखतात ,ओढल्या जातात ,ओल्या राहतात , डोक्यावर वजन टाकीत राहतात , मान अवघडवतात , झोपताना त्रास होतो ,कुस बदलताना त्रास होतो , स्नान करताना त्रास होतो , प्रवासामध्ये जंगलातून जाताना त्रास होतो . परंतु तरीदेखील त्या बाळगल्या जातात . कारण तेच एका खऱ्या साधूचे वैभव असते असे साधू मानतात . साधू डोक्याला फारसा ताण करून घेत नसल्यामुळे त्यांचे केस काळे असण्याचे प्रमाण जास्त असते . संपूर्ण केस पांढरे झालेला साधू फारच दुर्मिळ असतो . याउलट संन्यासी मात्र दर काही दिवसांनी संपूर्ण दाढी मिशा केस काढून टाकत असतात . व ते एकत्र वाढले की पुन्हा काढून टाकतात . असो .
सांगायचे तात्पर्य इतकेच की त्या नव्या साधूने चहा आणून दिला व तो प्राशन करून मी आपल्या हनुमान मंदिरामध्ये आलो . इथे देखील सर्व लोक शेकोटी करून बसले होते . मी देखील त्यांच्यामध्ये हळूच सामील झालो . शक्यतो अशा शेकोटीच्या ठिकाणी अध्यात्मिक चर्चा किंवा राजकीय चर्चा जोरजोरात सुरू असतात . काही अनुभव सांगणारे लोक त्यांना आलेले मैयाचे अनुभव बेंबीच्या देठापासून आर्ततेने सांगत असतात .अशा ठिकाणी शांत बसून लोकांचे निरीक्षण करणे आणि बोलणे ऐकणे हा अतिशय मजेशीर आणि समृद्ध करणारा अनुभव बरेचदा असतो . थोड्यावेळाने मी माझी पूजा अर्चा आटोपून घेतली . आणि रामायण वाचायला गेलो . इथे रामचरितमानस वाचण्याची एक विवक्षित पद्धत रूढ आहे . काही ठराविक ओव्या वाचून झाल्या की संपूट मंत्र म्हणायचा असतो .  संपुट म्हणजे झाकण . आपण एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू देताना ती जशी छान वेष्टित करून देतो त्या पद्धतीने देवाला मंत्र अर्पण करताना संपुट मंत्राचे झाकण लावून दिला जातो म्हणजे त्या मंत्राचे सामर्थ्य वाढते अशी मान्यता आहे . रामचरितमानस गाताना असे अनेक संपुट मंत्र सांगितलेले आहेत . त्यातील एक मंत्र इथे समोर भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिला होता . 
कवन सो काज कठिन जग माहीं। जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं॥
काही ठराविक वेळाने त्याचा उच्चार अनिवार्य पणे करावा लागत असे . 
तसे पाहायला गेले तर भारतातील सर्वात प्रसिद्ध संपुट चौपाई ही आहे . V

मंगल भवन अमंगल हारी,
द्रबहु सु दसरथ अजिर बिहारी ।

द्रबहु याचा अर्थ द्रवू देत ! कोण ? दशरथाच्या अजीर म्हणजे अंगणामध्ये बिहार म्हणजे विहार करणारा श्रीराम , जो मंगलाचे निवासस्थान आणि अमंगळाचा विनाशक आहे तो अथवा त्याचे हृदय माझ्याकरिता द्रवू देत !

रामचरितमानस हे एक वेगळेच विश्व आहे ! यातील रचना इतकी सरळ , इतकी सुलभ , इतकी सुंदर , इतकी प्रासादिक आणि इतकी रसाळ आहे की विचारूच नका ! याच्या तोडीचा दुसरा कुठलाही ग्रंथ हिंदी भाषेमध्ये सापडणे अशक्य आहे . याचा प्रचार व प्रसार देखील भरपूर झालेला आहे . आणि अखंड रामचरितमानस वाचन करणारे अनेक लोक आपल्या देशामध्ये आहेत . याच्यामध्ये केवळ रामाची कथा येत नाही तर त्या अनुषंगाने आयुष्यामध्ये कुठल्या प्रसंगाला आपण कसे सामोरे गेले पाहिजे याचे विवेचनच तुलसीदासांनी करून ठेवलेले आहे त्यामुळे प्रत्येकाने रामचरितमानस अवश्य वाचावे . मी रामायण वाचायला बसलो आणि माइक वरून तो आवाज संध्याकाळच्या निरव शांततेमध्ये सुमारे चार किलोमीटर परिसरामध्ये घुमू लागला . इथे ठराविक चार लोक सोडले तर अजून कोणी रामायण फारसे वाचत नसावे . कारण माझा आवाज ऐकल्या ऐकल्या गावातील बरीचशी मंडळी नक्की कोण नवीन बुवा आला आहे हे पाहण्याकरता आळीपाळीने मंदिरात येऊन गेली . मी शांत गतीने आणि सुंदर चाली मध्ये रामचरितमानस गात राहिलो . इथे बसणारे लोक थोडेसे गडबड करत वाचन करायचे . मी मात्र संथ लय मध्ये लताबाई मंगेशकर यांनी गायलेल्या चालीमध्ये रामचरितमानस गात राहिलो . या पद्धतीने दोन तास वाचन झाले .तिथे येऊन भेट देणाऱ्या माणसांमध्ये काल जिने मला रामनगर येथे चणे दिले त्या बाईचा भाऊ देखील आला होता . माझा कमंडलू तिच्याकडे विसरला आहे ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचली होती ! गावामध्ये छोट्या छोट्या बातम्या देखील कशा सर्वतोमुखी होतात हे पाहून आश्चर्य वाटते. इथे बातमी प्रसारित होण्यासाठी कुठल्याही वृत्तवाहिनीची किंवा व्हाट्सअप समुहाची गरज नसते ! लोकच आपापसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले असतात . तो मला ताबडतोब गाडी घेऊन रामनगर ला जाऊन कमंडलू आणून देण्यासाठी तयार झाला होता . परंतु मी त्याला सांगितले की तो कमंडलू मी तुझ्या ताईला देऊन टाकला आहे असे तिला सांग व घरातील स्वयंपाकासाठी तो तिने वापरावा अशी माझी इच्छा आहे असे तिला कळव ! विचार करून पहा एक रुपयाचे दोन रुपयाचे शेंगदाणे विकणारी ती बाई दिवसभरात अशी कशी किती कमाई करत असेल ? तरीदेखील तिला एका परिक्रमावासीला भरभरून खायला द्यावे अशी इच्छा झाली हीच खूप मोठी गोष्ट होती . तिने शक्य त्या पद्धतीने मला काहीतरी दिले व आज ती संधी मला नर्मदा मातेने दिलेली असताना ती दवडू नये असे मला मनापासून वाटले आणि मी त्या कमंडलूचा विषय तिथे कायमचा संपविला .
तोपर्यंत भोजनाची वेळ झाली . या आश्रमामध्ये खरे तर परिक्रमावासींना सदावर्त / सदाव्रत दिले जाते . अर्थात शिधा दिला जातो व त्यांनी स्वयंपाक करून खाणे अपेक्षित असते . परंतु मी दोन तास रामायण वाचल्यामुळे मला भोजन प्रसाद तयार वाढण्यात आला . सर्वांनी गरमागरम भोजनप्रसादाचा आनंद लुटला ! लोधी अपंग असून देखील सर्व कामे मोठ्या चपळाईने आणि हिरीरीने करत होता . मला त्याचे खरंच खूप कौतुक वाटले . विशेषतः तो ज्या प्रेमाने आग्रह करून सर्वांना वाढत होता ते पाहून कोणीही दुप्पट जेवले असते ! परंतु मला रात्री पुन्हा रामायण सेवा करायची होती त्यामुळे मी मर्यादित जेवलो . आणि लगेचच रामायण वाचायला निघून गेलो . इथे अजून एक तरुण तेजस्वी साधू आला होता व तो देखील सुंदर रामायण वाचत होता . हा सुशिक्षित मुलगा वाटत होता व त्याने जाणीवपूर्वक संन्यास घेतला आहे हे त्याच्याकडे पाहून लक्षात येत होते . हा उत्तर प्रदेशचा असावा असे त्याच्या भाषेवरून वाटत होते . याने आणि मी आलटून पालटून बसत रात्रीचा बराच वेळ रामायण वाचले . इथे कुठल्याही वयोगटातील माणसाला चष्म्याशिवाय रामचरितमानस वाचता यावे अशा आकाराची एक अजस्त्र प्रत मिळते .
रामायणाची मोठी प्रत (संग्रहित छायाचित्र )
अखेरीस खूप झोप येऊ लागल्यावर मात्र मी शांतपणे आत जाऊन पाठ टेकली .
मोठ्या आवाजात वैखरीमध्ये रामायण पाठ केल्यामुळे मेंदूला परम शांतता लाभली होती ! त्यामुळे क्षणात डोळा लागला . गोस्वामी तुलसीदासांनी अतिशय सुंदर आणि डोळ्यासमोर चित्र उभे करणारे करणारे वर्णन केलेले असल्यामुळे ती सर्व चित्रे ते सर्व प्रसंग रात्री झोपेमध्ये डोळ्यासमोर तरळू लागले ! ती रात्र खूपच संस्मरणीय अशी ठरली . रामाचे चरित्र किती महान आहे हे जर कोणाला अनुभवायचे असेल तर वाल्मिकी रामायण तर वाचावेच पण  त्याहूनही सुंदर असे तुलसी रामायण अवश्य वाचावे ! 
रामायणाचा विषय निघालाच आहे म्हणून अभ्यासकांसाठी थोडेसे विस्तृत सांगतो . प्रभू रामचंद्रांचे अधिकृत चरित्र म्हणून वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाकडे पाहिले जाते . याच्यामध्ये सात कांडे असून पाचशे सर्ग आणि २४००० श्लोक आहेत . 
तुलसीदासांनी लिहिलेल्या रामचरितमानस या रामायणामध्ये चौपाई आणि दोहा ही वृत्ते सर्वाधिक आढळतात . हनुमान चालीसा म्हणताना आपण श्री गुरु चरण सरोज रज असे जे कवन म्हणतो तो दोहा आहे . आणि जय हनुमान ज्ञान गुण सागर इथपासून पुढे सुरू होणाऱ्या चौपाया आहेत . अगदी त्याच पद्धतीने रामचरितमानस गान करताना ४६०८ चौपाया , १०७४ दोहे , २०७ सोरठे आणि ८६ छंद आहेत .
चौपाई मध्ये चार पदे व चारही पदांमध्ये १६ I १६ मात्रा असतात .
दोह्यामध्ये  १३ । ११ । १३ । ११अशा मात्रांची चार पदे असतात . 
सोरठ्या मध्ये ११ । १३ । ११ । १३  अशा मात्रांची चार पदे असतात .
हे प्रत्येक अक्षरगण वृत्त वेगवेगळ्या पद्धतीने गायले जाते व त्याचा सूक्ष्म अभ्यास केला असेल तर आपल्याला लक्षात येते की रामचरितमानसमध्ये या वृत्ताचा भंग झाला आहे असे उदाहरण कुठेच सापडत नाही !यावरून कवीची प्रतिभा काय दर्जाची आहे ते पहा ! त्या ग्रंथाला आणि ग्रंथकर्त्याला साष्टांग नमस्कार ! खरे म्हणजे मी आयुष्यात पहिल्यांदा रामचरितमानस पाहत होतो परंतु गाताना तसे वाटत नव्हते हे कवीचे यशच म्हटले पाहिजे !
सकाळी उठल्यावर त्या आश्रमातील सर्वच जण मला अजून काही दिवस तिथे राहून रामायण पाठ करण्याचा आग्रह करू लागले . परंतु मला अशा कुठल्याही बंधनामध्ये अडकायचे नव्हते . मी आणि त्या तरुण साधूने रात्री काही काळ पाठ केल्यामुळे खूप दिवसांनी या पाठकांना रात्री झोपायला मिळाले होते .त्यामुळे ते आमच्या मागे लागले होते की इथेच रहा ! तो साधू तिथेच राहिला आणि मी मात्र पुढे निघालो . इथून अखंड चालत सूर्यकुंड गाठले . नर्मदे मध्ये असलेले सूर्यकुंड अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते . हे सकवाह नावाचे गाव आहे आणि इथल्या आश्रमामध्ये देखील श्रावण महिन्यापासून अखंड रामायण सुरू होते . या घाटावरती स्नानाचे विशेष महत्त्व असल्यामुळे सकाळीच घोडा घाटावर स्नान केलेले असून देखील इथे पुन्हा एकदा स्नान केले . इथे चिखलमय उतार होता आणि अतिशय धोकादायक चिखलामध्ये उभे राहून स्नान करावे लागले . घाटावरती स्नान करण्याकरता लोकांची गर्दी झालेली होती . स्नान करून वरती धर्म शाळेमध्ये गेलो . हा संपूर्ण परिसर अतिशय मोठा औरत चौरस पसरलेला आणि उत्तम पैकी बांधकामे केलेला होता . गावापासून थोडेसे बाहेर असलेले सूर्यकुंड एका मोठ्या कमानी द्वारे आपले स्वागत करते . कमानी मधून आज प्रवेश केल्या केल्या उजव्या हाताला अतिशय मोठ्या हॉलची रचना केलेली असून इथे परिक्रमा वासी शेकड्याने राहू शकतील अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत . थोडेसे पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक पिंपळाचा पार असून डाव्या हाताला भव्य मारुती मंदिर आहे आणि इथेच अखंड रामायण सेवा सुरू आहे . तिथून पुढे गेल्यावर छोटी मोठी अनेक मंदिरे असून उजव्या हाताने चिखलाचा उतार थेट नर्मदेमध्ये घेऊन जातो . आपल्या माहितीकरता या परिसराची काही छायाचित्रे सोबत जोडत आहे .
सूर्यकुंड परिसराची स्वागत कमान .उजव्या हाताला भगवी भिंत दिसत आहे ती परिक्रमा वाशांची निवास व्यवस्था आहे .
श्री भारती महाराज यांनी हा आश्रम उभा केला आहे .
अखंड रामायण सेवा सुरू असणारे भव्य हनुमान मंदिर
सूर्यकुंड येथील हनुमंताची मूर्ती
इथे बनकर काका आणि अजून काही ओळखीचे परिक्रमा वासी भेटले . सर्वजण फोमच्या गाद्या टाकून विश्रांती घेत होते . कडाक्याची थंडी पडलेली होती . मी थेट रामायण सेवा गाठली . आणि जणूकाही माझी वाटच पाहत बसला होता अशा पद्धतीने माझ्या आधी बसलेला युवक जो पळून गेला तो पुन्हा आलाच नाही ! मग पुन्हा एकदा चांगले तासभर मी अतिशय शांतचित्ताने रामायण गायले ! प्रचंड थंडी असल्यामुळे पाठकांसाठी तिथे डाव्या हाताला हिटर ची व्यवस्था केलेली होती . मंदिरावर लावलेल्या मोठ्या मोठ्या ध्वनी क्षेपणावरून हे संपूर्ण रामायण आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप लांब पर्यंत ऐकू जात होते ! महाराष्ट्रामध्ये धार्मिक क्षेत्रांवरील ध्वनीक्षेपकांना जसा विरोध केला जातो तसा मध्य प्रदेश मध्ये किंवा एकूणच नर्मदा खंडामध्ये कुठेही केला जात नाही . मी रामचरितमानस गातो आहे आणि नर्मदा मैया ते ऐकते आहे ही कल्पनाच माझ्यासाठी फार सुखावह होती ! तिथे आलेल्या एका परिक्रमा वासी काकांनी माझा रामचरित मानस गाताना चा व्हिडिओ रेकॉर्ड केला . कालांतराने त्यांनी तो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठविला . तो आपल्याकरिता सोबत जोडत आहे .


काल रात्री सुंदर कांड वाचायला मिळाले तर आज माझ्यासमोर बालकांडातील सुंदर अशा चौपाया येत होत्या ! 
भूप बचन सुनि सहज सुहाए। जरित कनक मनि पलँग डसाए।।
सुभग सुरभि पय फेन समाना। कोमल कलित सुपेतीं नाना।।
उपबरहन बर बरनि न जाहीं। स्त्रग सुगंध मनिमंदिर माहीं।।
रतनदीप सुठि चारु चँदोवा। कहत न बनइ जान जेहिं जोवा।।

रामाच्या बालपणीचे हे सुंदर वर्णन डोळ्यासमोर चित्र उभे करत होते . विशेषतः कालपासून मी हनुमंताची विशेष कृपा अनुभवत होतो ! हनुमंताने सांगून ठेवलेले आहे की जिथे जिथे माझ्या प्रभू रामचंद्राची कथा सुरू असेल तिथे तिथे मी कायम उपस्थित राहीन आणि त्याची अनुभूती जाणीवे च्या स्वरूपात येत होती ! संपुट मंत्र म्हणताना आपोआप भरून यायचे . एकंदरीत नर्मदा मैयाने रामायण पाठाची सुंदर अशी सेवा दोन दिवस माझ्याकडून करून घेतली ! एखाद्या माणसाला निवृत्तीनंतर काय करावे असा प्रश्न पडला असेल तर त्याने रामचरितमानस पाठ आवश्यक करावा ! त्याच्यासारखा आनंद त्याला अन्य कुठल्याच ग्रंथात मिळणे शक्य नाही ! ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये जशी प्रासादिकता आहे अगदी तशीच प्रसादिकता याही ग्रंथामध्ये आढळते ! सियावर रामचंद्र की जय !पवनसुत हनुमान की जय ! नर्मदे हर !मातुगंगे हर ! जटाशंकरी हर ! ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव !
रामायणाचे वाचन झाल्यावर श्री सूर्यकुंड हनुमान महाआरती भंडारा समितीचे कार्यकर्ते मला बोलवायला आले आणि पिंपळाच्या झाडाखाली मस्तपैकी सर्व परिक्रमावासी जेवायला बसले . मध्यप्रदेश मधीलच एक दांपत्य परिक्रमेमध्ये होते ते माझ्यासमोर बसले होते .साधारण ज्यांच्या मुलांची नुकतीच लग्न झालेली आहेत अशा वयाचे लोक परिक्रमेमध्ये अधिक येतात असे एक निरीक्षण मी केले . कदाचित ज्या मुलांकरिता सर्वस्व पणाला लावले ती मुले लग्न झाल्या झाल्या आपण नक्की कोणासाठी जगत आहोत याची झलक आपल्या आई बापाला देतात त्यामुळे आई बापांना वैराग्य उत्पन्न होऊन ते परिक्रमेला निघत असावेत ! किंवा कदाचित कृतांत कटकामळध्वजजरा दिसो लागली अशी देखील त्यांची अवस्था असू शकते .म्हणजे काळाची साक्षात ध्वजा असलेले वार्धक्य आता जवळ येत असल्याचे लक्षात आल्यामुळे या वयात अधिक परिक्रमा वासी बाहेर पडत असावेत . असो . भोजन प्रसादी झाल्यावर कार्यकर्त्यांनी माझ्या वहीमध्ये शिक्का दिला . 
सूर्यकुंडपाशी मिळालेला शिक्का
इथे भोजन झाल्या झाल्या विश्रांती वगैरे न घेता मी पुढे चालायला लागण्याचा निर्णय घेतला . मुळात हा सर्व व्याघ्रमय परिसर होता त्यामुळे अधिक अंधाराकडे न चालण्याचा सूज्ञ विचार मी केला होता.सामान उचलले आणि पावलांना गती दिली . नर्मदे हर !



लेखांक एकोणचाळीस समाप्त (क्रमशः )





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर