लेखांक ३६: नर्मदेला प्रदुषित होताना पाहणारे पहिले शहर 'दिंडोरी '

चिमटा सोबत घेऊन निघालो आणि मैयाचा किनारा पकडून सुसाट वेगाने चालत सुटलो . आज मी मैयाच्या इतक्या कडेकडेने चालत राहिलो की माझी सावली सतत मैयाच्या पाण्यामध्ये पडत राहिली . सुमारे पंचवीस तीस किलोमीटर सलग मैया च्या काठाने चालत राहिलो . असंख्य सुंदर सुंदर रूपांमध्ये नर्मदा नटून थटून वाहत होती . तिचे हे रूप चांगले की ते रूप चांगले हे ठरविता येणे खरोखरीच कठीण ! कधी शांत धीर गंभीर प्रवाह तर कधी अवघड खळखळ तर कधी मोठा गडगडाट करत धावणारा शक्तिमान प्रवाह !
 वाटेमध्ये मनुष्य वस्ती अशी कुठे दिसलीच नाही . त्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये पशुपक्षी , कीटक ,वनस्पती दिसत होते . माणसे कमी त्यामुळे वाटेमध्ये लागणारे घाट देखील फारसे नव्हतेच .नर्मदे काठी गावे जरी अनेक असली तरी पक्के बांधलेले घाट फार कमी गावांमध्ये आहेत .मध्ये चंदन घाट नावाचा एक घाट लागला जिथे नर्मदेवर पूल बांधलेला आहे . हा घाट येण्यापूर्वी चकरार अथवा तुचीदिः या नदीचा आणि नर्मदेचा सुंदर संगम होतो . ही नदी मी पाण्यात उतरून पार केली . मधोमध गेल्यावर प्रथेप्रमाणे आचमन केले .इथून जवळच असलेल्या एका घनदाट अरण्य युक्त पहाडातून या नदीचा उगम झालेला आहे .
नर्मदा आणि चकरार नदीचा संगम
नितांत सुंदर चंदन घाट
चंदन घाट पुलावरून दिसणारी नर्मदा माता आणि सभोवती घनदाट अरण्य
चंदन घाटावरील शिव मंदिर आणि भव्य शिवलिंग

चंदन घाट लागला आणि त्यानंतर थेट चरकुटिया गाव लागल्यावरच थाबलो. मध्ये अनेक छोटी मोठी गावे लागत गेली . मी शक्यतो एखादा नावाडी ,कोळी ,शेतकरी , गुराखी किंवा ग्रामस्थ भेटला की त्याच्याकडून पुढील सर्व गावांची नावे विचारून घेत असे . तसेच मागील नावे देखील विचारून तो क्रम बरोबर होता का तपासून पाहत असे . शक्यतो या लोकांना आपापल्या परिसरातील भूगोलाचे अत्यंत चांगले आणि सखोल ज्ञान असते . शाळेत जरी फारसे कोणी शिकलेले नसले तरी प्रत्यक्ष निसर्गाच्या शाळेमध्ये हे विद्यार्थी चांगलेच तयार झालेले असतात .
शुकलपुरा रयत , सुन्हा दादर , कौंदिया , खरगना माळ , करोपानी ही गावे पार करत चरकुटिया गावातील आश्रमामध्ये पोहोचलो . 
या भागातील नर्मदा मातेची रूपे अत्यंत सुंदर आहेत .
आपल्याकरिता त्यातील काही निवडक रूपे गुगल नकाशावर मिळाली , ती टाकत आहे .

चरकुटिया इथे जिंतूर वरून आलेले संतोष जोशी आणि आनंद नामक दोन युवक अन्नछत्र चालवीत होते . त्यांच्यासोबत गोविंद कुलकर्णी म्हणून चिंचवडचे एक परिक्रमावासी होते . यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे सहकुटुंब परिक्रमेला आलेले होते . त्यांच्या सुविद्य पत्नी आणि अमृता आणि नम्रता नावाच्या दोन मुली असे सर्वजण मिळून नर्मदा परिक्रमा करत होते व इथे काही काळ राहत होते . मुलींशी बोलताना मला असे पुसटसे कळाले की काही कारणामुळे त्यांची परिक्रमा खंडित झाल्यामुळे ते इथेच थांबलेले आहेत . ही त्यांच्यासाठी दुःखदायक बाब असल्यामुळे त्याविषयी अधिक चौकशी न करता मी तो विषय तिथेच सोडून दिला . कुलकर्णींच्या दोन्ही मुली छोट्याशा परंतु अतिशय हुशार व चुणचुणीत होत्या .
हाच तो चरकुटिया आश्रम ( संग्रहित छायाचित्रे )
आश्रमाकडे जाणारा रस्ता
समोरच्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर शेष घाटाचे दर्शन होत होते . या सर्वांसोबत चहापान केले आणि पुन्हा एकदा चालायला सुरुवात केली . 
मध्ये कमाल बाबा नावाच्या एका आदिवासी सत्पुरुषाचा आश्रम लागला परंतु तिथे कोणी नसल्यामुळे मी थांबलो नाही . इथे नर्मदा मातेचे एक छोटेसे मंदिर होते आणि आत नर्मदेची छोटीशी मूर्ती होती .नकाशावर या आश्रमाची काही चित्रे सापडली ती आपल्या दर्शनासाठी देत आहे .

नर्मदा मंदिर व आतील मूर्ती
आदिवासी सत्पुरुष कमाल बाबा

इथून जरा पुढे गेल्यावर मध्ये गोमती नावाची नदी नर्मदेला येऊन मिळते . एका ग्रामस्थानी सांगितले की ही नदी ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या चरणाजवळून येते त्यामुळे हिच्यामध्ये स्नान केल्यावर कर्जातून माणूस मुक्त होतो . माझ्यावर सध्या तरी कुठले कर्ज नव्हते परंतु त्याचा भाव पाहून मी नदी फार करताना मध्ये डुबक्या मारून घेतल्या .
 नर्मदा गोमती संगम ( पावसाळ्यातील चित्र )
शेष घाटासमोरचा छोटासा पूल या बाजूने पाहिला . समोर दिसणाऱ्या त्रिवेणी संगमाला नमस्कार केला .अजून उजेड आहे तोवर चालत राहायचे असे ठरविले होते . शेती , दगड गोटे ,खडक असे सर्व पार करत करत काठाने चालत राहिलो .सूर्यास्त होण्याच्या आत पुढचा आश्रम सापडणे आवश्यक होते .
साधारण अशावेळी आश्रम सापडणे अत्यावश्यक असते . हे संग्रहित चित्र शेष घाट पुला नंतरचेच आहे .
साधारण अंधार पडू लागल्यावर हनुमान घाट नावाच्या एका घाटावर मी पोहोचलो .
 हनुमान घाट व झोकदार वळण घेणारी नितळ निर्मळ नर्मदा
इथे नर्मदेचे अत्यंत सुंदर स्वरूप पाहायला मिळते !
एक अतिशय पल्लेदार वळण घेत नर्मदा येथे वाहते .
इथे एका ठाकूराने करोडो रुपये खर्च करून सुंदर असा पक्का बांधिव घाट आणि आश्रम उभा केला आहे . 
हनुमान घाट समोरच्या तटावरून असा दिसतो
हनुमान घाटावर स्नान करणाऱ्या स्थानिक भाविकांचे संग्रहित छायाचित्र .
कोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून निवृत्त झालेले एक अधिकारी येथे साधू बाबा बनून हा सर्व पसारा सांभाळत होते . मला त्यांच्याशी पहिले वाक्य बोलता क्षणी लक्षात आले की हा मनुष्य केवळ साधू नाही आहे . कारण मी आश्रमामध्ये आल्या आल्या त्यांनी बेफिकीर साधू सारखे निवांत संभाषण न करता एखाद्या व्यवस्थापकाला शोभेल अशा पद्धतीने मला आश्रमाचे नियम समजावून सांगितले व मी कुठे राहावे हे देखील उत्तम पद्धतीने सुचविले . मी त्यांना लगेच विचारले की आपण पूर्वाश्रमी कोण होतात ? त्यावर ते खुश झाले आणि त्यांच्या पूर्वाश्रमीच्या जीवना बद्दल सर्व माहिती त्यांनी मला सांगितली .त्यांचा स्वतःच्या गावी फार मोठा व्यवसाय होता . त्यांच्याकडे अनेक जेसीबी , ट्रक , बस व अन्य वाहने होती . ती सर्व स्थावर जंगम संपत्ती आपल्या मुलांच्या नावावर करून त्यांनी केवळ एक बोलेरो जीप आणि एक मोटरसायकल घरातून घेतली आणि हा आश्रम गाठला . यांची उंची सहा फुटाच्या वर होती . गोरापान वर्ण ,पांढरी शुभ्र दाढी आणि धिप्पाड देहयष्टीचे हे साधू बुवा "बाबा लालदास " असे नाव लावत असत .  हे दिवसभर मौनामध्ये राहायचे आणि फक्त संध्याकाळी बोलायचे . यांना ऐकायला कमी येत असे . परंतु यांना गप्पा मारायची खूप हौस होती . माझ्यासारखा ऐकणारा भेटल्यावर त्यांची कळी फारच खुलली ! इथे अजून एक मरतुकडा गरीब बिचारा म्हातारा त्यांना मदतनीस म्हणून राहत होता . हा बाबांचे हातपाय चेपण्यापासून पडेल ते काम सांगताक्षणी करायचा . आयुष्यभर ऑफिसर राहिलेल्या लोकांना असा एखादा मनुष्य हाताखाली लागतोच ! त्या दोघांमधील नात्याचे मी निरीक्षण केले असता मला मौज वाटली ! ते गुरु शिष्य असे नाते नव्हते तर गुलाम आणि मालक असे नाते मला वाटले ! आमच्याशी प्रेमाने बोलणारा बाबा त्याच्यावरती मात्र एकदम गुरगुरून आणि भडकून बोलायचा ! तो देखील सर्व अपमान निमूटपणे सहन करत हसतमुखाने येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींची सेवा करत होता . मला त्या जीवाची खूप कीव वाटली . इथे मला अजून एक तरुण परिक्रमावासी भेटला . याचे नाम बळीराम रमेश जाधव असे होते आणि हा सावळा तरुण अतिशय तेजस्वी होता . याचे गाव बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी .  याने सोबत एक रिलायन्सचा छोटासा फोन आणला होता .त्याच्याशी अधिक बोलल्यावर असे लक्षात आले की हा संघाचा कट्टर स्वयंसेवक होता . आम्हाला दोघांना त्या बाबाने बाहेर अंगणात आसन लावायला सांगितले होते . इथे आश्रमाच्या बाहेर मोठे पटांगण गच्चीसारखे बांधलेले होते . इथे आत्ताच हाडे गोठविणारी थंडी जाणवू लागली होती . परंतु मी चांगला ऐकणारा आहे हे पाहिल्यावर बाबा खुश झाले आणि त्यांनी त्यांची रामायण वाचण्याची एक अतिशय उबदार खोली होती तिथे आम्हाला दोघांना हलविले . इथे मोठ्या अक्षरातील तुलसीरामायणाची अजस्त्र पोथी पडलेली होती ती त्याने आम्हाला वाचून दाखवली . खोली इतकी लहान होती की तिथे फक्त ते रामायण मी आणि बळीराम असे तिघेच कसे बसे मावू शकत होतो .बाबाने आम्हाला स्वच्छ हातपाय धुवून पूजा आटोपून घ्यायला सांगितले व खाली घाटावर आरतीला यायची आज्ञा केली . मी आधी संपूर्ण आश्रमाचा परिसर झाडून घेतला . त्यानंतर खाली स्नानासाठी गेलो . झाडू मारणे वगैरे कामे केले की थंडी कुठल्या कुठे पळून जाते . असो . घाटावर अतिशय मोठ्या मोठ्या पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या . आज बरेच चालल्यामुळे पाय बोलत होते आणि उतरताना पायांची वाट लागत होती . इथे घाटावर जलप्रवाह वळत असल्यामुळे पाणी अतिशय वेगाने वाहत होते . परंतु ते इतके स्वच्छ आणि सुंदर होते की विचारू नका ! त्या पाण्यामध्ये मनसोक्त स्नान केले . आता चांगलेच अंधारून आले होते . नेहमीप्रमाणे स्नान केल्यावर थंडी पळून गेली . आजूबाजूला हळूहळू आरतीसाठी ग्रामस्थ मंडळी जमू लागली . सर्वांनी स्वेटर , मफलर , कान टोप्या , हातमोजे इत्यादी घातलेले होते . आणि मी उघडा ओल्या अंगाने वरती पळत जाताना बघून सर्वांना आश्चर्य वाटत होते . उतरताना ज्या पायऱ्या मला अतिशय कठीण भासत होत्या त्याच पायऱ्या मी अक्षरशः एकादमात चढून वरती पोहोचलो . नर्मदेच्या पाण्याचा नुसता शरीराला स्पर्श जरी झाला तरी आपली क्षमता अशी कित्येक पटीने वाढते हा अनुभव मी अनेक वेळा घेतला . बंदिस्त खोलीमध्ये बसून मस्तपैकी पूजा अर्चा आटोपून घेतली . परिक्रमे मध्ये सकाळ-संध्याकाळ तुमच्यासोबत असलेल्या नर्मदा मातेच्या कुपीचे पूजन हे अनिवार्य सांगितलेले आहे . आणि बहुतेक परिक्रमावासी मोठ्या मनोभावाने हा उपक्रम करतात . काही परिक्रमावासी तर हाच मुख्य उपक्रम आहे असा जणू भाव ठेऊन परिक्रमा करीत असतात . परंतु माझी पूजाअर्चा मात्र अतिशय विक्रमी आणि कमीत कमी वेळात पूर्ण व्हायची . कारण माझे प्राधान्य हे तिथे असलेले नर्मदेचे रूप पाहणे व आजूबाजूला फिरणे व सर्व परिसर अभ्यासणे या गोष्टींना अधिक राहायचे . खाली आरतीसाठी मी आणि बळीराम गेलो . तिथे एक जुना शंख ठेवला होता . संपूर्ण आरती होईपर्यंत मी बेंबीच्या देठापासून तो शंख वाजवत राहिलो . त्या शांत आणि स्तब्ध परिसरामध्ये त्या शंखा चा आवाज फार जोरात घुमत होता . मी शंख चांगला वाजवतो आहे हे पाहून ग्रामस्थ मला प्रोत्साहन देऊ लागले . संपूर्ण आरती सुरू असताना मी शंख वाजवीत राहिलो . त्या शंखनादामुळे मन पूर्णपणे निर्विचार होऊन गेले . ज्या क्षणी आरती संपली आणि सर्व लोक वरती निघून गेले त्या क्षणी मी तिथेच असलेल्या एका छोट्या मंदिरापाशी बसून राहिलो . त्या मंदिराचे चित्र मला गुगल नकाशावर सापडले .ते आपल्यासाठी देत आहे .
रात्री बाबाजींनी गरमागरम जेवण करून वाढले आणि सर्वजण झोपी गेलो . खोलीमध्ये पडल्या पडल्या बळीरामची आणि माझी बऱ्याच विषयांवर चर्चा झाली . बऱ्याच गोष्टींबद्दल त्याचा खूप अभ्यास होता असे माझ्या लक्षात आले . त्याचा स्वभाव आणि अभ्यासू वृत्ती मला आवडली . हा देखील एकटाच परिक्रमेला निघाला होता . डोक्याला भगव्या रंगाची एक शाल बांधून तो चालायचा . शेतकरी असल्यामुळे याची पावले मोठी होती आणि मोठ्या मोठ्या ढांगा टाकत चालायचा . परिक्रमा परिसरातील जनजीवनाचा अतिशय डोळसपणे त्याचा अभ्यास सुरु होता . त्याची आणि माझी काही निरीक्षणे जुळू लागली . मला असे प्रकर्षाने जाणवले होते की या परिसरातील सर्वच लोकांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय आहे याबाबत माहिती आहे असे नाही . बऱ्याच लोकांना काठावरून जाणारी ही माणसे कोण आहेत हे देखील माहिती नसते व माहीत करून घेण्याची इच्छा देखील नसते . विशेषतः नवीन पिढीतील तरुणांना काहीच कल्पना नसते असे मला या भागात विशेषत्वाने जाणवले . इथे ९०% आदिवासी वस्ती असल्यामुळे आणि सध्या या आदिवासी लोकांची डोके भडकवण्याचे काम काही संघटना पद्धतशीरपणे करत असल्यामुळे त्याचा परिणाम परिक्रमेवर होत आहे असे आम्हाला दोघांना निश्चितपणे जाणवले . स्थानिक आदिवासी लोकांना हिंदू धर्मा विरोधात भडकवण्याचे काम अविरतपणे काही लोक इथे करत आहेत . हे सर्व आदिवासी जरी स्वतः हिंदू असले तरी तुम्ही हिंदू लोकांपेक्षा वेगळे आहात आणि तुम्हीच इथले मूळनिवासी आहात वगैरे विपरीत ज्ञान त्यांना शिकवून समोर असलेल्या लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये द्वेष कसा उत्पन्न केला जाईल असे पाहिले जाते . विशेषतः "जय सेवा " किंवा  "जय बडा देव " वगैरे पाट्या लावलेल्या घरातील आणि हेच स्टिकर लावलेल्या गाड्यांवरील लोक हे अधिक विद्रोही वृत्तीचे असतात असे जाणवले. असे लोक तुम्हाला नर्मदे हर म्हणत नाहीत किंवा तुम्ही नर्मदे हर म्हणल्यावर देखील ते प्रत्युत्तर देत नाहीत . बसक्या नाकाचे आणि जाड ओठांचे टिपिकल चेहरे इथे तुम्हाला आढळून येतात .हे सर्व गोंड जमातीतील आदिवासी लोक आहेत .
साधारण या भागातील आदिवासी युवकांची चेहरेपट्टी अशी असते (संग्रहित चित्र )
 आम्ही या विषयावर बराच खल केला .बळीराम ने मला या सर्व संघटना आणि महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या काही विद्रोही संघटना यांच्या मोडसऑपरेंडी मधील साम्य स्थळे नेमकी शोधून दाखविली . तो स्वतः याच क्षेत्रात काम करणारा हाडाचा कार्यकर्ता असल्यामुळे त्याचा ह्या विषयावर खूप सखोल अभ्यास होता . गप्पा मारता मारता मध्यरात्री उलटून गेली असावी . अखेरीस देहाला विश्रांती आवश्यक आहे हे माहिती असल्यामुळे ठरवून दोघेजण झोपी गेलो . महात्मा जी नेहमीप्रमाणे सकाळी मौनामध्ये गेले परंतु तशा मौन अवस्थेमध्ये देखील ते आम्हाला दोघांना इथे राहाच म्हणून खूप आग्रह करू लागले .त्यांना आमच्या वाचून करमणार नाही असे ते खुणेने सांगू लागले . परंतु मी नम्रपणे आणि सुस्पष्ट असा नकार दिल्यावर मात्र त्यांचा चेहरा हिरमुसला झाला . आणि ते त्या मौन अवस्थेतच आम्हाला काही अंतर सोडायला म्हणून चालत आले . बरेच अंतर चालल्यावर आम्ही त्यांना परत फिरण्याची विनंती केली तरीदेखील सुमारे दोन किलोमीटर ते आमच्याबरोबर चालले असावेत . त्यांच्या इशाऱ्यांवरून त्यांचा मॉर्निंग वॉक सुरू आहे असे काहीतरी मला कळले . परत फिरल्यावर मात्र आम्ही मागे वळून पाहिले नाही आणि नर्मदेचा किनारा पकडला . या व्यक्तीने सर्वसंग परित्याग केल्याचा भाव जरी आणला असला तरी अजून संपूर्ण साधू अवस्था त्यांना प्राप्त झाली होती किंवा नव्हती याबाबत मी साशंक आहे . अजूनही त्यांना माणसाची सोबत आनंददायी वाटत होती . अजूनही त्यांना गप्पा मारणाऱ्या किंवा मारलेल्या गप्पा ऐकणाऱ्या माणसाची गरज भासत होती . अजूनही ते सर्व कामे स्वतः एकट्याने करत नव्हते तर त्यांना मदतनीस लागत होता . परंतु त्यांचा सेवाभाव आणि शिस्त मात्र वाखाणण्याजोगी होती आणि संसारामध्ये अडकून पडलेल्या भोगी माणसांपेक्षा ते अनेक पायऱ्या वरती होते हे मात्र अतिशय निश्चितपणे सत्य आहे . अशाप्रकारे करोडो रुपयांच्या संपत्तीला लाथ मारणे हे काही सोपे काम नाही . जाताना त्यांनी न विसरता आश्रमाचा शिक्का आणि त्यांची सही माझ्या वहीमध्ये दिली त्याचे चित्र खालील प्रमाणे. 
लिहिलेले शब्द येणेप्रमाणे
बाबा लाल दाष मडियाराष डिन्डौरी
हनुमान घाट नर्मदा आश्रम ग्राम मडियारास
तहसील व जिल्हा डिन्डौरी
२२ । १ । २२
( मध्यप्रदेश मधील लोकांच्या सवयीनुसार  "स" चा "ष" केलेला आहे)
पायांनी आता गती घेतली होती .मी बळीराम ला आधीच सांगितले की मला एकट्याला चालायला आवडते त्यामुळे तू पुढे किंवा मागे एकटा चालत राहा . आपण सोबत चालत राहिलो तर फार गप्पा मारू . त्याची चाल तशी ही माझ्यापेक्षा वेगवान होती त्यामुळे तो पुढे निघून गेला . परंतु तो सतत माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये मात्र होता .तसेच चालताना तो मी येईपर्यंत थांबायचा आणि पुन्हा चालायला लागायचा .
पुढे बुधगाँव रयत , माडियारास माळ,  दांड बिछिया , कोहका माळ , घानाघाट माळ , ही गावे तुडवीत दिंडोरी नगर गाठायचे होते . परंतु इथे आजूबाजूला असलेली शेती आता गायब झाली आणि अचानक सर्वत्र खडकच खडक दिसू लागले . हा प्रवास अतिशय खडतर असा होता . काठाने रस्ता असा नव्हताच तर मार्ग स्वतः बनवून चालावे लागत होते . मोठ्या मोठ्या खडकांना चिरत नर्मदा माई इथून वाहते आहे . त्या खडकामध्ये एक मोठा फणा काढलेला साप मी पाहिला . हा नाग नव्हता परंतु नाग असल्याचे भासवत होता .बहुतेक तो धूळ नागिण जातीचा साप असावा असे मला वाटले . आम्ही स्तब्ध उभे राहिल्यावर तो सळसळत निघून गेला .
हीच भारताची नाभी असावी असे मला वाटले ! इथे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे प्रस्तर सुस्पष्ट वेगळे वेगळे दिसतात आणि या भागात मैया तीन ते चार ठिकाणी आठ आठ फुटाच्या मोठ्या उड्या मारते ! हे दृश्य पाहण्यासाठी अतिशय रम्य आहे . इथे कुठेही माणसाचा वावर आढळला नाही . या भागाला रामघाट किंवा लछमन मांडवा / लक्ष्मण मंडप असे म्हणतात . या भागाची नकाशावर सापडलेली चित्रे आपल्या माहिती करता जोडत आहे .
शांत निवांत नर्मदा किनारा
नर्मदेने मारलेली उडी झूम करून पहावी
नर्मदेची अजून एक उडी
नीट पाहिले असता दोन खडकाच्या स्तरांमधील फरक लगेच जाणवतो .

नर्मदा जरी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते तरी ही खचदरी दक्षिण उत्तर आहे हे विशेष उल्लेखनीय आहे .
इथे नर्मदेचा अतिशय सुंदर धीर गंभीर असा आवाज गरजत राहतो .इथे काही काळ शांतपणे बसून नर्मदेचा आवाज ऐकला की अजून काही ऐकण्याची इच्छाच शिल्लक राहत नाही . त्या दोन भूपट्ट्या वर खाली झाल्यामुळे नर्मदा मातेला इच्छा नसताना इथे मोठ्या उड्या माराव्या लागतात असे वाटते . उडी मारल्यावर ती पुन्हा शांतपणे वाहू लागते .  या भागामध्ये अनेक छोटे-मोठे ओढे नाले नद्या नर्मदेला येऊन मिळतात .खालील चित्रामध्ये त्या दाखविलेल्या आहेत .
निळ्या बाणाने दर्शविलेले जलस्त्रोत नर्मदार्पण होतात
इथून पुढे चालत असताना मध्ये राज घाट नावाचा एक छोटासा घाट लागला . इथे काही स्थानिक क्षत्रिय लोक एकत्र येऊन भोजनाची तयारी करत होते . एकाच कुटुंबातील लोक असले तरी एक बस भरून लोक आलेले होते . बायका स्वयंपाकाची तयारी करत होत्या मुले इकडे तिकडे खेळत होती तर पुरुष गप्पा मारत बसले होते . त्या आश्रमाच्या मधोमध एक यज्ञाचा कट्टा होता त्यावर आम्ही दोघे बसलो आणि त्यांनी आम्हाला गरमागरम चहा आणून पाजला . घाट अतिशय सुंदर होता आणि तिथून नर्मदेचे शांत स्वरूप पाहायला मिळत होते . मुलांशी गप्पा मारत दोघांनी चहा घेतला आणि सर्वांना नर्मदे हर केले .
सुंदर असा छोटासा रेखीव राजघाट
याच ओट्यावर माता-भगिनींची स्वयंपाकाची लगबग सुरू होती
या कट्ट्यावर बसून आम्ही गरमागरम चहाचा आस्वाद घेतला
ते लोक खरे तर जेवून जा म्हणून आमच्या मागे आग्रह करत होते .परंतु पुढे दिंडोरी मोठे शहर आहे तिथे नक्की जेवायला मिळेल असे वाटल्यामुळे आम्ही मार्गक्रमणा सुरु ठेवण्याचे ठरविले .तशीही अजून जेवायची वेळ झालेली नव्हती .

इथून पुढे मात्र पुन्हा शेती सुरू झाली आणि नर्मदेच्या पात्रामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी खूपच अतिक्रमण केलेले आहे असे जाणवले . इतके दिवस कुठेही बंधन म्हणून न पाहिलेल्या मार्गाने चालून इथवर आल्यावर आता मात्र विविध प्रकारची काटे कुटे टाकलेली कुंपणे दिसू लागली आणि परिक्रमेचा मार्ग चक्क बंद केलेला आहे असे जाणवू लागले . परिक्रमा वासी ला जाताच येऊ नये अशा पद्धतीने सर्व कुंपणांची रचना केलेली मला स्पष्टपणे जाणवली . मध्ये एक मोठीच्या मोठी नदी आडवी आली . एका ठिकाणी नदीमध्ये उतरावे आणि ती पार करावी असे आम्ही दोघे ठरवू लागलो .आता काय करावे असा प्रश्न दोघांना पडलेला असताना नदीच्या पलीकडे एक माणूस आम्हाला आवाज देतो आहे असे लक्षात आले .त्याच्या दिशेला या असे त्याने खुणावले व आम्ही तिकडे गेल्यावर तिथे एक नदी ओलांडण्याचा तुलनेने सोपा मार्ग त्याने आम्हाला दाखविला .
नकाशातील लाल खुणेच्या जागी त्या माणसाने आम्हाला नदी पार करविली

आम्ही जिथून नदी पार करण्याचा प्रयत्न करत होतो तिथे अतिशय खोल डोह होता आणि आम्ही कदाचित त्यात बुडू देखील शकलो असतो असे त्या माणसाने आम्हाला सांगितले . . 
या नदीचे नाव देखील गोमती आहे असे त्याने सांगितले . पूर्वी एक गोमती नदी लागली होती असे सांगितल्यावर ती हीच नदी आहे असे तो म्हणाला ! कदाचित ती गोमली नावाची नदी असावी असे वाटते . नर्मदेमध्ये एकाच नावाच्या अनेक नद्या येऊन मिळतात ! सगळा घोळच आहे , असो ! इथून पुढे शेतातून जाण्याचा एक मार्ग त्याने आम्हाला दाखविला . त्याचे आभार व्यक्त करण्याकरता आम्ही दोघांनी मागे वळून पाहिले तर तो मनुष्य दिसला नाही . कदाचित लघुशंका वगैरे करण्यासाठी कुठे बसला असेल असे वाटल्यामुळे आम्ही काही वेळ त्याची वाट पाहिली परंतु तो मनुष्य गायबच झाला .आजूबाजूला सर्वत्र मोकळी शेती असल्यामुळे लपण्यासारखी जागा कुठे नव्हती त्यामुळे आम्हाला दोघांना या गोष्टीची मौज वाटली ! नर्मदा मातेचा जयजयकार करत आम्ही पुढे चालू लागलो .आता खाजगी जागा मालकांच्या मोठ्या मोठ्या जमिनी लागू लागल्या व त्याला तारांचे किंवा जाळीचे कुंपण केलेले दिसू लागले . असे प्लॉट दिसले की मोठे शहर जवळ आले ओळखायचे .
बळीराम आणि मी दोघेही जण एकाच कुंपणापाशी येऊन अडलो . दोघांनी देखील ठरविले की काय वाटेल ते होऊ दे आपण या कुंपणावरूनच जायचे . आम्ही कसेबसे पुढे गेलो आणि असे लक्षात आले की पुढे खोल दरी वजा भाग असून मध्ये एका शेताला लोखंडी जाळीचे कुंपण लावलेले आहे . आम्ही त्या जाळीला धरून माकडासारखे आडवे आडवे पुढे जाऊ लागलो . आणि अखेरीस ती जाळी देखील संपली आणि खाली दरी मात्र तशीच राहिली साधारण ४० फूट खोल दरी असावी . आता मात्र आम्ही मध्ये अध्ये लटकलो होतो ! पुढे जायची सोय नाही मागे जाण्याची सोय नाही आणि खाली उतरायचे तर उडी मारणे देखील शक्य नाही ! नर्मदे हर असा धावा दोघांनी सुरू केला ! इतक्यात माझे लक्ष एका झाडाच्या मुळाकडे गेले . ते साधारण सात आठ फूट खाली होते . उडी मारून ते मूळ पकडले तर खाली उतरायला मार्ग होता .मुळाला पकडून ती खडकाळ दरी उतरण्याची शक्यता वाटत होती . मी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता नर्मदे हर असे ओरडत वरची जाळी सोडून दिली आणि खाली उडी मारून ते मूळ पकडले ! माझ्या मागोमाग बळीराम देखील उडी मारून आला . आता बळीराम पुढे उड्या मारत खाली उतरू लागला . दगडांना शेवाळे असल्यामुळे तो सटकत होता ते पाहून मी अतिशय बेताबेताने खाली उतरलो . अखेरीस दोघेही किनाऱ्याला लागलो आणि समोर पाहतो तो काय एक अतिशय घाणेरडा नाला आम्हाला आडवा गेला होता .तो नाला इतका घाणेरडा होता की कल्पनाच करता येत नाही . त्याच्यामध्ये मानवी व्यक्तीच्या लेंड्या वाहत येत आहेत असे मला दिसले . त्या पाण्याला अतिशय दुर्गंध येत असून काळाकुट्ट रंग होता . आणि हा नाना चक्क नर्मदेमध्ये मिसळत होता . परिक्रमा सुरू केल्यापासून इतके घाण पाणी नर्मदेमध्ये थेट मिसळताना मी कुठेच पाहिले नव्हते . नर्मदेच्या उगमापासून नर्मदेला प्रदूषित करणारा हा पहिलाच जलस्त्रोत आहे असे मला आढळले . बर हा नाला पार करण्याकरिता आमच्या समोर दुसरा कुठला पर्याय नव्हता . त्यामुळे अखेरीस गुडघाभर पाण्यामध्ये पाय बुडवत तो नाला आम्ही अनिच्छेनेच पार केला . नाल्याच्या दुतर्फा देखील लोकांनी विष्ठेच्या रांगोळ्या काढून ठेवल्या होत्या . इतका गलिच्छ घाणेरडा आणि घृणास्पद प्रकार मी पहिल्यांदाच बघत होतो . छोट्या छोट्या गावांमध्ये देखील सांडपाण्याचा निचरा करण्याची उत्तम व्यवस्था असताना या नगरपालिका असलेल्या शहराला साधे घाणेरड्या पाण्याचे नियोजन करता येऊ नये याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते . इतके दिवस अतिशय स्वच्छ निर्मळ आणि शुद्ध असलेल्या नर्मदा जलामध्ये किती घाणेरडे पाणी मिसळू शकते हे मी सर्वप्रथम या ठिकाणी पाहिले म्हणून त्याबाबत इतके सविस्तर लिहीत आहे . पुढे असे लक्षात आले की प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये सर्व सांडपाणी थेट नर्मदेमध्ये सोडले जाते . अशाप्रकारे नर्मदा नदीचे प्रदूषण करण्याचा कुठलाही अधिकार कोणालाही नाही . मी पूर्वी एके ठिकाणी नमूद केले आहे त्याप्रमाणे अशा प्रकारचे सांडपाणी एका ठिकाणी साठवून त्याच्यामध्ये कमळाची झाडे जर लावली तर त्याच्या सांडव्यावरून शुद्ध पाणी बाहेर पडते . कमळाच्या झाडाला वाढीसाठी सांडपाण्यातील घटकांची आवश्यकता असते त्यामुळे ते सर्व घटक तिथे वापरले जातात आणि शुद्ध पाणी मात्र बाहेर पडते . आंबील ओढे नदीमध्ये सोडण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने दहा-बारा ठिकाणी अशी कमळ उद्याने केल्यास बाहेर पडणारे पाणी अतिशय स्वच्छ राहील याची खात्री वाटते . त्यासाठी फार मोठे काही करण्याची गरज नसून मध्ये फक्त धरणवजा भिंती बांधाव्या लागतील . असो . हा पहिला ओढा असे अजून काही घाणेरडे ओढेनाले ओलांडत अखेरीस दिंडोरी शहरामध्ये प्रवेश केला . जे परिक्रमावासी रस्त्याने प्रवास करतात त्यांना असे ओढे ओलांडायची वेळ कधी येत नाही .कारण त्यावर बांधलेल्या पुलावरून ते पुढे जातात . परंतु नर्मदेचा काठ न सोडण्याचा माझा अट्टाहास असल्यामुळे मला जागोजागी असे अनेक ओढे पुढे पार करावे लागले . राजघाटावर भोजन नाकारल्याची शिक्षा देण्याचे बहुतेक नर्मदा मातेने ठरविले . आणि इतके मोठे शहर असून आणि इतकी मनुष्य वस्ती असून देखील इथे भोजन प्रसाद देणारा एकही आश्रम नाही असे आमच्या लक्षात आले . भर दुपारची वेळ झाली होती आणि पोटामध्ये प्रचंड आग पडली होती . परंतु संपूर्ण दिंडोरी शहराचा घाट फिरल्यावर देखील आम्हाला एकही आश्रम सापडला नाही . दिंडोरी शहरातील नर्मदा मातेची काही स्वरूपे आपल्या दर्शनासाठी देत आहे .
समोरच्या उत्तर तटावरून दिसणारा दिंडोरी घाट
इथे नर्मदेला एक मोठा बांध घातलेला असून त्यावरून नर्मदेचे पाणी खळाळत वाहत असते
घाट औरस चौरस पसरलेला व मोठा असून येथे कायम भाविकांची गर्दी असते
नमामि देवी नर्मदे अशी चमकती अक्षरे पालिकेने लावलेली असून ती फार छान दिसतात
एक मोठा पूल बांधाच्या शेजारून गेलेला दिसतो
इतके मोठे शहर असून परिक्रमावासींची सोय मात्र फारशी कुठेच होत नाही
आम्ही दोघे चौकशी करत घाटावर फिरू लागलो तेव्हा कोणीतरी शेजारच्या रस्त्यावरील एका आश्रमात प्रसाद सुरू आहे असे सांगितले . ती एक गुजराती धर्मशाळा होती . परंतु तिथे भोजन प्रसाद संपला आहे असे सांगण्यात आले . म्हणजे तसे परिक्रमावासी येथे उतरतात वगैरे परंतु नर्मदा मातेला बहुतेक आम्हाला शासन करायचे होते त्यामुळे आम्हाला तिथे भोजन प्रसाद मिळाला नाही इतकेच .
हीच ती गुजराती धर्मशाळा जिथे परिक्रमावस्यांची सेवा होते
भुकेने कासावीस झालेले आम्ही दोघेजण पुढे मिळेल त्या माणसाला इथे कुठला आश्रम आहे का असे विचारत चालू लागलो . अखेरीस एका निनावी आश्रमाकडे एका माणसाने आम्हाला पाठविले . इथे अत्यंत अंधाऱ्या खोलीमध्ये एक पांढरी साडी नेसलेली म्हातारी स्त्री सर्व आवराआवरी करायला लागली होती . आम्ही दोघांनी जाऊन नर्मदे हर केल्याबरोबर तिने बसण्यासाठी आसन टाकले आणि ताटल्या काढण्याची सूचना केली . त्या अंधाऱ्या खोलीतच आम्ही टिक्कड आणि उरलासुरला आमटी भात चेपला आणि ताटवाट्या धुवून तिथून प्रस्थान ठेवले . हे करेपर्यंत दुपारचे दोन तीन वाजले असावेत . सकाळी एके ठिकाणी अन्नाला नाही म्हणाल्यामुळे त्यादिवशी आम्हाला अन्न मिळायला उशीर झाला अशी आमची धारणा आहे . पुढे देखील अशी अनुभूती अनेक वेळा आली . नर्मदा मातेची लीला अगम्य आहे हेच खरे ! नर्मदे हर !



लेखांक छत्तीस समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर