लेखांक ३७ : घनदाट जंगलातली चाल आणि नर्मदा बुढी माय संगम
दिंडोरी शहरांमध्ये फारसे काही पाहण्यासारखे नव्हते . आणि इथला एकूण बकालपणा अस्वस्थ करत होता त्यामुळे लवकरात लवकर तिथून पुढे निघालो . इथे संघसंचलित इमलय कुटी नावाचा एक आश्रम आहे . बळीराम जाधव ला तो आश्रम बघायचाच होता . परंतु बाहेरून आश्रमाला कुलूप होते आणि आत मध्ये वनवासी मुले खेळत बसली होती . मी दारापाशी जाऊन चौकशी केली परंतु लॉकडाऊनमुळे आश्रम उघडणार नाही असे सांगण्यात आले . त्यामुळे त्या आश्रमाबाबत अधिक माहिती घेण्याची आमची संधी हुकली .
इथून पुढे काठा काठा ने चालण्याचा मार्ग बंद झाला . दिंडोरी गावानंतर नर्मदा मैया चक्क ९० अंशाचे वळण घेत काटकोणात वळते .या भागातून कोणीच परिक्रमावासी जात नाही असे आम्हाला जागोजागी सांगण्यात आले .पुढचा मुक्काम देखील जवळपास कुठे नव्हता .त्यामुळे भरपूर चालायची तरी ठेवा असे सर्वजण सांगत होते . त्यामुळे पायांनी गती घेत निघालो . मध्ये एका पेट्रोल पंपाजवळ एका ब्राह्मणाचा धरम काटा अर्थात वे ब्रिज होता . त्याच्यावरती भरलेल्या ट्रकचे वजन केले जात असल्यामुळे याची अचूकता साधारण पाच किलोपर्यंत असते . दहाच दिवसांपूर्वी मी उत्तर तटावर धरम काट्यावर वजन केले होते तेव्हा झोळी सकट माझे वजन १०० किलो भरले होते आज माझे वजन झोळी सकट ९० किलो भरले ! म्हणजे सुमारे पाच दहा किलो मेद नर्मदेने जाळला होता ! त्याने त्याच्या कार्यालयामध्ये बसवून आम्हाला चहा पाजला .त्याने छापलेली नर्मदा परिक्रमेची पत्रके दिली तसेच पुढील सर्व गावांची माहिती वगैरे व्यवस्थित आम्हाला सांगितली . या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण समाजाला ठरवून कसे टार्गेट केले जाते हे देखील त्याने सांगितले . त्याला हा व्यवसाय उभा करताना किती अडचणी आल्या हे त्याने सांगितले . समोरच्या तटावर साहूच्या काट्यावर मी वजन केले होते हे सांगितल्यावर त्याने तो त्याचा मित्रच असल्याचे सांगितले . तसेच साहू लोक फार धार्मिक असतात अशी पुस्ती देखील त्याने जोडली . तुम्हाला प्रश्न पडेल की मी हे सर्व का लिहितो आहे . इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला काही महत्त्वाच्या गोष्टी कळलेल्या आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे प्रत्यक्षदर्शी माणसाने केलेल्या लिखित कागदोपत्री नोंदीचे महत्त्व ! मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे मला त्या त्या काळात जे जे प्रत्यक्ष बघायला अनुभवायला मिळाले किंवा सांगण्यात आले त्याची लेखी नोंद मी त्याच दिवशी डायरीत करून ठेवलेली होती . ती कुठे हरवू नये म्हणून इथे देखील करून ठेवत आहे इतकेच . कदाचित काही लोकांसाठी हे सर्व मुद्दे संदर्भहीन वाटू शकतात .तसे ते आहेत देखील . परंतु माझ्या लेखक म्हणून असलेल्या अधिकाराचा गैरवापर करत मी हे सर्व मुद्दे डायरीमधून ब्लॉगमध्ये उतरवून ठेवत आहे तरी वाचकांनी उदार अंतःकरणाने पामराला क्षमा करावी ! या मनुष्याने आम्हाला पुढे जाण्याचा एक मार्ग सांगितला जो अतिशय निर्मनुष्य आणि निवांत रस्ता होता . मध्ये फक्त एक गाव होते आणि मोठी महाविद्यालयं तिथे होती .परंतु शिक्षणाचे एक वातावरण जाणवते तसे तिथे बघून काही जाणवत नव्हते कारण मनुष्य वस्ती फारच विरळ होती .
दिंडोरी शहरानंतर नर्मदा मैया असे ९० अंशाचे वळण घेते
आम्ही मात्र बऱ्यापैकी या काटकोनाच्या वळणाच्या जवळूनच चाललो . लोक हे वळण सोडून सरळ निघून जातात तसे आम्ही केले नाही . त्यामुळे आमचे चालणे वाढले परंतु ते एका दृष्टीने बरे झाले . कारण सरळ गेल्यावर आम्ही अशा ठिकाणी पोहोचलो असतो तिथे फारसे आश्रम नव्हतेच . शिवाय बळीराम आणि मी दोघांनीही एकटे चालायचे ठरवले असल्यामुळे आम्ही म्हटले तर एकत्र चालत होतो परंतु दोघांमध्ये शंभर दोनशे मीटर अंतर ठेवून न बोलता आमची वाटचाल सुरू होती . त्यामुळे दोघांचा सहवास एकमेकांसाठी सह्य होता . लोक दिंडोरी वरून निघून थेट शासकीय आदर्श महाविद्यालयापाशी पोहोचतात .तसे न करता आम्ही खालील प्रमाणे मार्ग निवडला .
या वाटेने परिक्रमावासी फारसे जात नसल्यामुळे येथे आश्रम किंवा भोजन पाण्याची कुठलीही सुविधा नाही . दिंडोरी जबलपूर राज्य महामार्ग सोडल्यावर आम्ही थेट एका माळावरती आलो .या संपूर्ण रस्त्यावरती आम्हाला एकही मनुष्य भेटला नाही . परंतु या भागामध्ये बोराची एवढी झाडे होती की विचारूच नका . आणि प्रत्येक झाड फळांनी अक्षरशः लगडलेले होते .
परंतु परिक्रमेमध्ये कुठल्याही झाडावरची फळे तोडून खायची परवानगी नाही .त्यामुळे खाली पडलेली बोरे खात खात आम्ही पुढे निघालो . समोरासमोर जरी झाडे असली तरी त्यांची फळे आकार रंग आणि चव यात खूप फरक होता . मला खूप मजा वाटली . एकाही फळाची चव दुसऱ्या फळासारखी नव्हती ! काय चमत्कार आहे निसर्गाचा ! हे अंतर तासा दोन तासांमध्ये आम्ही तोडले आणि एक मोठा रस्ता लागला . थोडेसे चालल्यावर शासकीय आदर्श महाविद्यालय आले आणि त्याच्या शेजारी मध्य प्रदेश पर्यटन विभागाने बांधलेली एक कुटी आहे तिथे परिक्रमावासींची मुक्कामाची सोय होते असे आम्हाला सांगण्यात आले .
इथे नर्मदा पुन्हा एकदा वळण घेऊन सरळ वाहू लागते . इथे नर्मदा दक्षिणवाहिनी असल्यामुळे एकूणच संपूर्ण परिसर बकाल होता आणि आश्रमाची देखील वाट लागलेली होती . आश्रम कुठला ती फक्त एक बांधलेली खोली होती आणि आत मध्ये नुसता सावळा गोंधळ होता ! पुढे एका साधूने मला सांगितले की नदी उत्तर वाहिनी असेल तर शुभ मानतात आणि दक्षिण वाहिनी अशुभ मानली जाते . परंतु हे माहिती नसताना देखील त्या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड नकारात्मकता भरली आहे हे मी स्वतः अनुभवले होते आणि तसे वहीत लिहून देखील ठेवले होते . असो . हे एक छोटेसे टेकाड होते आणि त्या टेकडाच्या वरती सरकारने एक मोठीच्या मोठी खोली बांधली होती व त्याला पत्रे वगैरे लावले होते . टेकडी उतरल्यावर शिवघाट नावाचा एक अतिशय छोटासा घाट नर्मदेवर काँक्रीट मध्ये बांधला होता . खरे तर इथून नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे दर्शन होत होते . परंतु त्या संपूर्ण वातावरणात भरलेल्या नकारात्मकतेमुळे तिथून निघून जावे असे सारखे वाटत होते ! त्या खोलीमध्ये आधीच दहा-बारा वयोवृद्ध माणसे राहत होती . एक म्हातारा मनुष्य आणि त्याचा गांजाडा तरुण मुलगा असे दोघे मिळून येथे परिक्रमावस्यांची सेवा करत होते . सेवा म्हणजे काय तर तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुम्हाला जेवायला घालतो अशा मोडवर त्यांचे काम चालले होते . ते काही साधू नव्हते त्यामुळे त्यांना कुठूनही शिधा वगैरे मिळत नव्हता . त्यांना स्वतःला राहायला जागा मिळाली होती इतकेच ! कुटी आतून अतिशय गलिच्छ अस्वच्छ आणि विस्कटलेली होती .बऱ्याच दिवसात तिथे कोणी झाडू देखील मारलेला दिसत नव्हता . मी गेल्या गेल्या स्वच्छता मोहीम हातात घेतली आणि संपूर्ण कुटी चकाचक केली . बाहेर अंगण देखील उखडलेल्या अवस्थेमध्ये होते . ते देखील स्वच्छ केले . घाटावरती स्नानासाठी गेलो .
या संग्रहित चित्रामध्ये नर्मदा मैया , वरती डाव्या हाताला आश्रम आणि उजवी कडे उतरणारा घाट असे सर्व दिसत आहे . याच घाटावर मी बसलो होतो
. (सर्व चित्रे गुगल नकाशा वरून साभार )
थंडी असल्यामुळे बळीराम स्नान करणार नव्हता परंतु मी जमेल तितक्या वेळा नर्मदेमध्ये स्नान करून घेत असे . ही संधी काही रोज रोज मिळणारी नव्हती ! आणि मुख्य म्हणजे त्या स्नानाने दिवसभर चालून आलेला थकवा एका क्षणात नाहीसा व्हायचा ! मी घाट उतरून खाली गेलो तर तिथे एक मच्छीमार मासे पकडत बसला होता . त्याचे डोळे घारे होते . मी बराच वेळ त्याचे निरीक्षण करत होतो . त्याने मासेमारी मधल्या बऱ्याच गमती जमती मला सांगितल्या . गळ टाकून मासेमारी करणे हा केवळ एक व्यवसाय नसून तपस्या आहे . कारण कधी कधी तीन चार तास झाले तरी तुमच्या गळाला काहीच लागत नाही . एखादा दिवस असा येतो की दिवसभरात एकही मासा मिळत नाही आणि एखाद्या दिवशी एकदम ३० - ४० मासे देखील मिळतात . गरीब मच्छीमारांसाठी दोन्हीही अवस्था वाईटच . कारण मासे मिळाले नाहीत त्या दिवशी त्यांना उपाशी झोपावे लागते आणि ज्या दिवशी इतके मासे मिळतात तेवढे विकत घेणारे गिऱ्हाईक कोणी नसते आणि मासे टिकवण्याची व्यवस्था त्यांच्याकडे नसते त्यामुळे ते मासे वाया जातात . त्यामुळे हे लोक पोटापुरते मासे मिळाले की लगेच घरी जातात . मी त्याला विचारले की तुझे आजचे टार्गेट काय आहे ? त्याने सांगितले मला दोन मध्यम मासे मिळाले की मी घरी जाणार . तेवढ्या मध्ये चार जणांचे पोट भरते . मी पाण्यामध्ये हळूहळू उतरलो . इथे पाण्यामध्ये मोठे मोठे खडक आडवे तिडवे पडले होते त्यामुळे खूप धोकादायक पात्र होते . परंतु पाणी स्वच्छ असल्यामुळे तळ दिसत होता तो एक फायदा . मी तीन डुबक्या मारून वर येतो तोपर्यंत याला खूप मोठा मासा सापडला . तो माझ्यामुळेच सापडला , अन्यथा गेले सहा तास त्याला काहीच मिळाले नव्हते ,असे श्रेय मला देऊन तो मनुष्य घरी निघून गेला .मी बाहेर येऊन अंग पुसले आणि बसल्या बसल्या चिंतन करू लागलो की समजा माझ्यामुळे याला मासा मिळाला तर मी पुण्य केले की पाप केले ? कारण याचे जरी पोट भरले तरी एक जीव जीवानिशी गेला त्याचे काय ! त्यामुळे मुळात कुठल्याही गोष्टीचे कर्तुत्व स्वतःकडे न घेणे हे एक फार सोयीचे ठरणारे कृत्य आहे . याचा अर्थ किंकर्तव्यमूढता नव्हे . परंतु कुठलेही कर्म केले तरी त्याच्या फळाची अपेक्षा न ठेवणे हे फार म्हणजे फार सोयीचे ठरते . जीवो जीवस्य जीवनम् हेच खरे असा विचार करत मी पुन्हा कुटीमध्ये आलो . बघतो तो समोर काही जिवांनी धुडगूस घातलेला होता ! जिकडे बघावे तिकडे उंदीरच उंदीर दिसत होते ! त्या उंदरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता . कुटीमध्ये इतकी माणसे असून देखील त्यांना त्याचा काहीही फरक पडताना दिसत नव्हता . आपापले सामान जपून ठेवणे याला पर्याय नव्हता . विशेषतः पूजा साहित्यामध्ये असलेल्या तुपाच्या वाती हे या उंदरांचे आवडते खाद्य होते . इथे वीज देखील नव्हती पाणी देखील नव्हते त्यामुळे ती रात्र फार मजेशीर गेली . शेजारी वाहणारी थंडगार नर्मदा मैया , वरती गारठलेले पत्रे , गार पडलेली फरशी आणि जोरदार वारे ! मला त्या ब्लॅंकेटचा तिथे फारच फायदा झाला . इथे बळीराम आणि मी दोघांनी भजने म्हटली . त्याने काही पुस्तके आणली होती ती तो उजेड आहे तोपर्यंत वाचत होता . अंधार पडल्यावर दोघांनी पूजा करून घेतली आणि भजन सेवा झाली त्यानंतर त्या म्हाताऱ्या माणसाच्या मुलाने आम्हाला नुसता भात खाऊ घातला . कोपऱ्यात केलेल्या एका चुलीवर मातीच्या मडक्यामध्ये केलेला सुंदर असा भात ! त्या भाताला अमृताची चव लागत होती ! भातावरती घालायला मसाला किंवा मीठ नसले तरी म्हाताऱ्याने डोळे मोठे मोठे करून सांगितलेल्या गोष्टींमुळे खूपच मिर्चमसाला आम्हाला मिळाला ! गेल्या आठवड्यात या ठिकाणी रात्री एक मोठी पट्टेरी वाघीण आणि तिचे दोन बछडे आले होते , ते कसे आले आणि म्हातार्याला कसे काय दिसले याचे रसभरीत वर्णन त्याने आम्हाला करून सांगितले ! वाघीण कशी गुरगुरत होती हे सांगताना त्याचे डोळे बघून मला फार हसू येऊ लागले ! त्याने नर्मदा मातेचा धावा केल्यावर वाघिणी शांतपणे निघून गेली हे सांगायला देखील तो विसरला नाही .
वाघिणीने म्हातार्याला नेले असते तर किती बरे झाले असते वगैरे बोलून त्याचा मुलगा मध्येच फोडणीला तडका देत होता ! तर बापा पेक्षा तूच गेला असतास तर बरे झाले असते असे आजूबाजूला बसलेले म्हातारे त्याला डिवचत होते . तिथल्या भेसुर गरिबीला ही विनोदाची श्रीमंती लाजवत होती ! यातला गमतीचा भाग सोडला तर एकंदरीत वनवासी क्षेत्रातील लोकांनी वाघाचे सह अस्तित्व किती सहजपणे स्वीकारले आहे हेच या गप्पांमधून माझ्या लक्षात येत होते . वाघाने कोणाला मारले तर त्याचा फारसा बाऊ इथले लोक करत नाहीत . मला आधी वाटले की हा मनुष्य बाता मारतो आहे म्हणून मी हसण्यावारी नेले परंतु मी फार हसतो आहे पाहिल्यावर त्याने मला सांगितले की उद्या सकाळी तुला मी वाघाचे ठसे दाखवतो . मी त्याला आत्ताच दाखव असे सांगितले त्यावर त्याने मला सांगितले की साधारण याच वेळी त्याला वाघ दिसला होता त्यामुळे आता आपण बाहेर जाणार नाही तर उद्या सकाळी उजाडल्यावर नक्की ठसे दाखवितो . ती रात्र छान झोपेत गेली . दोन ब्लॅंकेट असल्यामुळे थेट सकाळी जाग आली . रात्रभर माझ्या डोक्यात वाघाचे पंजे राहिले होते त्यामुळे उठल्या उठल्या मी म्हाताऱ्या जवळ गेलो आणि मला पंजे दाखवायची विनंती केली . त्याने मागच्या बाजूला चिखलामध्ये नेऊन मला तिथे उठलेले पंजे दाखवले . हे एखाद्या मोठ्या मांजराचे किंवा कुत्र्याचे पंजे असावेत असे मला वाटले . तसे मी म्हाताऱ्याला म्हणालो देखील परंतु नंतर त्याने मला वाघिणीच्या पायाचे ठसे दाखवले आणि मग मात्र माझी खात्री पटली की हे पंजे खरोखरच वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचे होते .
इथून बांधवगड आणि कान्हा हे दोन्ही राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प तसे जवळ आहेत त्यामुळे तिथले वाघ येथे येत राहतात .
बांधवगड आणि कान्हा व्याघ्र प्रकल्पांना दिंडोरी मध्यवर्ती पडते . उजव्या बाजूला अमरकंटक आणि अचानकमार व्याघ्र प्रकल्प दिसतो आहे .
सकाळी मी पुन्हा एकदा स्नान करून आलो आणि पिता पुत्राने चांगली सेवा दिली म्हणून माझ्याजवळ असलेले पन्नास रुपये त्यांना दिले . दोघांना खूप आनंद झाला . सकाळी बाहेर पडल्या पडल्या धुक्यामध्ये हरवलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४ ब लागला . ( NH 54 B ) . इथून पुढचा संपूर्ण रस्ता डोंगर आणि जंगल असा होता त्यामुळे नर्मदे काठी चालण्यासाठी मार्ग नाही तसेच वन्य श्वापदे असल्यामुळे इथून कोणालाही जाऊ दिले जात नाही . तसेच हा हमरस्ता नर्मदेला समांतर जात असल्यामुळे परिक्रमावासी हाच मार्ग निवडतात . या रस्त्यावरती एका मागोमाग एक अनेक चढ-उतार आणि घाट होते . सोबत अतिशय घनघोर असे आरण्य ! वातावरण थंड होते त्यामुळे भरपूरच चालणे त्या दिवशी झाले . सुमारे ३० किलोमीटर सलग चालत हर्रा टोला नावाचे गाव गाठले . इथे वाटेमध्ये एक पुण्याचे बनकर म्हणून काका आणि अजून एक वयोवृद्ध आजोबा अशी दोन माणसे ओळखीची झाली . दोघे प्रचंड वेगाने चालत होते . मध्ये शंभर दोनशे मीटर अंतर ठेवून मी पायाच्या तालावर जप करत झपाझप चालत होतो . आज खूप दिवसांनी चालण्याला लय सापडल्यासारखे वाटत होते . घाट वळणावळणाचा असला तरी परिक्रमावासिनी मधले जंगलातले शॉर्टकट रस्ते निर्माण केलेले आहेत त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला . तसेच पंच्याहत्तरी गाठलेले म्हातारे लोक ज्या चपळाईने चालताना मला दिसत होते त्यामुळे मी देखील मोठ्या हिकमतीने चालू लागलो !
यातले पांढरे शुभ्र दाढी झालेले काका चालायला सर्वात जास्त तयार होते . ते रोज पहाटे तीन साडेतीनला उठून चालायला सुरुवात करायचे . आणि कधी कधी तर दिवस मावळेपर्यंत कमीत कमी ६० - ६५ किलोमीटर अंतर तोडायचे . त्यांच्यासोबत पुण्याचे अवधूत बनकर म्हणून परिक्रमावासी होते . यांना साखरेचा त्रास होता . त्यांनी माझ्यासमोर एकदा शुगर मोजली . आणि रागाने शुगर मोजायचे ते यंत्र आणि पट्ट्या सर्व त्यांनी दरीमध्ये फेकून दिले ! आणि म्हणाले आता जे काय व्हायचे ते होवो ! नर्मदा मैया ची इच्छा ! पुढे काही दिवस थोड्याफार अंतराने ते मला मुक्कामावर भेटायचे परंतु त्यांना कुठलाही त्रास झाला नाही . चालताना मधेच एक मोठा आडवा ओंडका पडलेला बळीराम ला दिसला त्याच्यावर तो बसला . त्याचे पाहून बनकर काका व आजोबा देखील बसले . मी शक्यतो एकदा चालायला सुरुवात केली की मध्ये फारसा थांबत किंवा बसत नसे . परंतु त्यांच्या आग्रहाखातर तिथे झोळी खाली ठेवली आणि त्यांच्यापैकी एकाच्या मोबाईलवर त्या तिघांचा फोटो मी घेतला . तो फोटो आपल्या करिता खाली देत आहे .
डावीकडे प्रस्तुत लेखकाची झोळी ,त्यानंतर आजोबा ,श्री बनकर काका आणि बळीराम जाधव हे परिक्रमावासी ओंडक्यावर निवांत बसलेले.
बळीराम फार वेगाने चालायचा त्यामुळे तो पुढे निघून गेला . एका वळणावर एक गाडी थांबली होती त्याच्यामध्ये चार-पाच तरुण मुले गांजा पीत बसली होती . त्यांनी बळीराम ला थांबविले व गांजा प्यायला दिला . हा बाबाजी देखील मस्त झुरका घेऊन पुढे निघाला ! तसा वैयक्तिक आयुष्यामध्ये हा तरुण निर्व्यसनी होता . किमान असे त्याने मला सांगितले होते . परंतु हा प्रकार पाहिल्यावर त्याने मला सांगितले की मी हा नर्मदेचा प्रसाद म्हणून एक झुरका घेतला . असो ज्याची त्याची श्रद्धा . मला खूप ठिकाणी असा प्रसाद मिळून देखील मी तो नम्रपणे नाकारला . बाकी बळीराम हा मुलगा एका छोट्या खेडेगावात राहत असून देखील संपूर्ण भारताचा एक राष्ट्र म्हणून अतिशय मनापासून निष्ठेने सखोल विचार करीत होता ही गोष्टच फार आशादायक होती . त्याचा विवेक अतिशय जागृत होता असे मला वेळोवेळी जाणवले त्यामुळे मी त्याला काहीही बोललो नाही . हर्रा टोला गाव गाठेपर्यंत अंधारून आले होते .इथे गावामध्ये बाजार भरलेला होता . रस्त्याच्या उजव्या हाताला एक सुंदर असा शेणाने सारवलेला आश्रम होता . आश्रमाच्या मधोमध एक पांढऱ्याशुभ्र रंगाचे छोटेसे पण मजबूत मंदिर बांधले होते . एका बाजूला उंचावर साधू राहत होते आणि खाली परिक्रमावासींसाठी झोपड्या तयार केल्या होत्या .
आश्रम एका ओढ्याच्या काठावरती होता . त्यामुळे प्रचंड थंडी होती . आत मध्ये एक धुनी होती .परंतु या आश्रमामध्ये आधीच २५ - ३० परिक्रमावासी येऊन उतरलेले होते . इतके परिक्रमा वासी एकत्र पाहण्याची मला तरी सवय नव्हती कारण मी इतके दिवस एकटाच चालत होतो . हा महामार्ग असल्यामुळे बहुतांश परिक्रमावासी अमरकंटक वरून हाच रस्ता पकडून चालायचे . मी अमरकंटक वरून जंगलाच्या मार्गाने येथे आलो आहे हे कळल्यावर त्यातील काही लोकांनी हे कसे शक्य नाही वगैरे सांगायला सुरुवात केली . माझ्या पाच परिक्रमा झाल्या आहेत माझ्या दहा परिक्रमा झाल्या आहेत अशी दर्पोक्ती करणारे हे परिक्रमा वासी होते . पुन्हा एकदा अनुमान विरुद्ध अनुभव असे द्वंद्व इथे दिसून आले . अमरकंटक मार्गे येथे येण्यासाठी जंगलातील मार्ग असूच शकत नाही असे त्या सर्व तथाकथित अनुभवी परिक्रमावासींचे अनुमान होते . आणि त्या पद्धतीने मी येथवर पोहोचलो आहे हा माझा स्वानुभव होता . अशा प्रसंगी मौनम् सर्वार्थ साधनम् हे किती श्रेष्ठ धोरण आहे याची कल्पना मला आधीच मोहन साधूने दिलेली असल्यामुळे मी शांतपणे सर्वांची मते ऐकत राहिलो व अजिबात व्यक्त झालो नाही . एकट्याने परिक्रमा करण्याचे महत्त्व मला त्या रात्री कळले . एकापेक्षा एक भयानक परिक्रमा वासी परिक्रमे मध्ये होते ! दुर्दैवाने असे नमूद करावेसे वाटते की त्यातील बहुतांश लोक हे त्यांच्या आयुष्यामध्ये सुखी असावेत असे वाटत नव्हते किंवा अत्यंत असमाधानी दिसत होते . परिक्रमेमुळे एक तर तुम्हाला टोकाचा अहंकार येऊ शकतो किंवा मग तुमचे सारे मी पण गळून पडू शकते . तुम्हाला यातील काय हवे आहे हे ज्याचे त्याने निवडायचे असते . काठाने चालणे किती भाग्याचे आहे हे मला त्या दिवशी कळले . एकतर बहुतांश लोकांना वयानुसार आलेला अनुभवाचा अहंकार होता . काही जणांना परिक्रमा किती वेळा केली त्या संख्येमुळे आलेला अभिमान होता . काही जणांना आम्ही एका दिवसात किती अंतर तोडतो हे दाखविण्याची खुमखुमी होती . काही जणांना त्यांना सर्व कसे कळले आहे हे सांगायची घाई होती . मोठमोठ्या आवाजामध्ये बोलून आपापसामध्ये वाद विवाद चर्चा संवाद असे सर्व सुरू होते . इतका गोंगाट ऐकायची सवयच मला राहिलेली नव्हती . त्यामुळे मी आपले स्नान पूजा अर्चा वगैरे आटपून घेण्याचा निर्णय घेतला . बाजार म्हणजे रस्त्यावर बसलेले काही विक्रेते होते . सुमारे शंभर एक माणसे विविध गोष्टी खरेदी करत होती . आश्रमामध्ये पाण्याची सोय नव्हती व मागे असलेला ओढा मी पाहून आलो तो फारच धोकादायक होता . त्यामुळे समोर असलेल्या हातपंपावर स्नान करायचे असे मी ठरविले . थंडीचा कडाका वाढला होता .सुमारे सात डिग्री सेल्सिअस तापमान असावे . मी पटापट वस्त्रे काढली आणि त्या हातपंपावर थंडगार पाण्यामध्ये सर्वांसमोर स्नान करू लागलो . कान टोपी मफलर स्वेटर घातलेले आणि जागोजागी शेकोट्या करून बसलेले लोक आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते . माझी थंडी पाचच मिनिटात पळून गेली .
स्वच्छ अंग पुसून धूत वस्त्र नेसून मी पूजेला बसलो . या सर्व लोकांशी चर्चा करायची नसेल तर काहीतरी साधना आपण करतो आहोत असे दाखवणे अत्यावश्यक होते . त्यामुळे मी बराच वेळ पूजाअर्चा करण्यात घालविला !
मी एक कोपरा पकडला होता . त्या कोपऱ्यामध्ये ओढ्याच्या बाजूने भरपूर वारं येत असल्यामुळे कोणी तिथे आसन लावत नव्हते . माझ्या जवळचे एक ब्लॅंकेट लावून मी तो वारा पहिला बंद करून टाकला . इथे कुटीला भिंती न बांधता झाडांचे तट्टे लावले होते त्यातून वारे आत शिरायचे .
असे तट्टे लावले किंवा वारे इकडून तिकडे सहज जाते
एवढ्या सार्या लोकांचे भोजन कोण बनविणार असा प्रश्न मला पडला त्यामुळे मी बाहेर पाहणी करायला गेलो . तिथे राहणारा साधू आधीच अतिशय वैतागला होता . कारण संसारी परिक्रमावासी साधूंना फार त्रास देतात . त्यातील बहुतांश लोकांचा असा मूढ भाव असतो की जणू काही त्यांना सर्व सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार असून त्या त्यांना ताबडतोब जिथल्या तिथे मिळाल्याच पाहिजेत ! हे अत्यंत चुकीचे आहे . असो .
परंतु तिथे आदिनाथ नावाचा एक अतिशय चाणाक्ष तरुण मुलगा होता .विशेष म्हणजे त्याचा आज २४ वा वाढदिवस होता . त्या प्रीत्यर्थ त्याने आज सर्वांचा स्वयंपाक स्वतः केला आणि स्वतः सर्वांना जेवायला वाढले .गरमागरम जेवण वाढून त्याने सर्वांना खुश केले . मी सोबत असलेल्या दक्षिणेच्या पैशातून बाजारातून मिठाई खरेदी करून आणली आणि त्याला भरविली . मिठाई म्हणजे गुडदाणी रेवडी वगैरे मालाचा ढीग ! सारेच पौष्टिक . मुलगा अतिशय गुणी होता .गुटगुटीत दिसणारा आदिनाथ दुसरी परिक्रमा करत होता . तो बसल्या बसल्या तुळशीच्या लाकडापासून सुंदर माळा बनवायचा आणि लोकांना द्यायचा . परंतु तो संपूर्ण परिक्रमा रस्ता मार्गाने करत होता त्यामुळे त्याने सांगितले की परिक्रमा २८०० किलोमीटर आहे . सडक मार्गाने तेवढी ती असेल देखील .परंतु काठाकाठाने चालल्यावर परिक्रमेचे अंतर मोठ्या प्रमाणात वाढते याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी . नर्मदेचे प्रत्येक वळण आत आणि बाहेर तुम्ही चालता त्यामुळे अंतर वाढत जाते . असो .
सोबत एक घारे डोळे असलेले बडोद्याचे तेजस्वी काका होते . त्यांच्या घरी दत्तोपासना होती . दत्ताच्या प्रकट पादुका होत्या . त्यांनी त्यांचा बडोद्याचा पत्ता मला लिहून दिला .
संजय वासुदेव देहाडराय .
दत्तप्रसाद , रेड क्रॉस बिल्डिंग मार्ग ,
खारे वाव रोड
पोस्ट ऑफिस रावपुरा
वडोदरा
रात्री साधूने आश्रमाचा सही शिक्का दिला .
माझ्या वहीतील आश्रमाचा शिक्का . हा माझा २३ वा मुक्काम होता . शिक्यातील शब्द असे :
प्रेरणामूर्ती भारती श्रीजी
प्रभू मै तेरा नर्मदा अन्नक्षेत्र दक्षिण तट
ग्राम हर्रा टोला जिला डिण्डौरी ( मध्य प्रदेश )
फोन क्रमांक दिसत नाही
मी आसन लावले होते तिथे समोर मारुतीची मूर्ती होती . त्यामुळे मारुतीची उपासना करून त्या रात्री मी झोपी गेलो .पहाटे तीन वाजता ते आजोबा उठले आणि आवरून चालायला लागले . ते दुपारी अकरा वाजेपर्यंत पुढचा मुक्काम गाठत आणि तिथून पुढे पूर्ण वेळ विश्रांती घेत . त्यांच्यापाठोपाठ बनकर काका देखील निघाले . परिक्रमेच्या नियमानुसार सूर्योदय झाल्याशिवाय चालायला सुरुवात करायची नसते हे मला माहिती होते . परंतु आज खूप अंतर चालायचे आहे असे सर्व अनुभवी परिक्रमावासी रात्रीच सांगत होते . आणि संपूर्ण सडक मार्ग होता त्यामुळे पहाटे पाच वाजता निघण्याचा निर्णय मी देखील घेतला . बाहेर प्रचंड अंधार होता . घनदाट अरण्यातून जाणारा हा सर्व मार्ग होता . प्रचंड चढ उतार होते . दमवणारे चढ आणि पळविणारे उतार होते . हे संपूर्ण सागवानाचे जंगल होते . रातकिड्यांच्या आवाजाने आसमंत दुमदुमून निघाला होता . ही खरे तर वन्य श्वापदांची परतण्याची वेळ असते . त्यामुळे मी शक्य तितक्या सावधपणे चालत होतो . इतक्यात खूप भयंकर आवाज जंगलामध्ये झाला . काहीतरी धप्पकन पडल्याचा तो आवाज होता . थोड्यावेळाने हा आवाज सारखाच यायला लागला . मग माझ्या लक्षात आले कि ती सागवानाची पाने पडत आहेत ! त्याचा आवाज त्या शांततेत फारच भीतीदायक वाटत होता . दीडदोन फुटी आकाराची अजस्र पाने पडत होती . सर्वत्र दमट ओलसर गारवा पसरला होता . हाडे गोठवणारी थंडी सर्वत्र साचली होती . फक्त एखादे मोठे झाड आले की त्याच्याखाली रात्री त्याने सोडलेल्या कार्बन डायऑक्साइडमुळे गरम वाटायचे पुढे पुन्हा गार वाटू लागायचे .
हळूहळू उजाडायला लागले तसे पक्षी विविध दिशांनी ओरडायला लागले . इतका वेळ एकटे भासणारे ते जंगल प्रत्यक्षात किती गजबजलेले आहे याचीच ती साक्ष होती . मी आज एका विशिष्ट गतिमान चालीने चालायला सुरुवात केली . आणि सर्वांना मागे टाकत आज मी विक्रमी ५० किलोमीटर अंतर चाललो !
घनदाट अरण्यातून एकटे चालताना थोडीफार भीती वाटायची परंतु भीती हारी नर्मदेचे स्मरण केले की सर्व सुरळीत व्हायचे . चालता चालता दोन घाट उतरलो . नर्मदा उगमापासून समुद्रापर्यंत उतारानेच वाहते आहे त्यामुळे या दक्षिण ताटावर संपूर्ण उतार अनुभवायला मिळतो . अखंड चालत देवगाव संगम गाठला .इथे बुढी माय नावाची नदी नर्मदा मातेला काटकोनामध्ये येऊन मिळते .
दोन्हीही नद्या अतिशय जुन्या आणि भव्य पात्रे असणाऱ्या आहेत . पैकी बुढीमाय पसरट पात्रातून शांतपणे वाहते आणि नर्मदा मात्र प्रचंड वेगाने उतारावरून वाहत येते .त्यामुळे अक्षरशः उड्या मारत , उसळत , खळाळत ,फेसाळत खाली येताना दिसते . तिचे हे अतिशय भयानक आणि रौद्ररूप आहे . खालील चित्रात दिसतो आहे तसा अंधार पडू लागला होता त्यामुळे तत्काळ स्नान करण्याचा निर्णय घेतला . परंतु पाण्याचा प्रवाह इतका भयंकर होता की त्यात उतरणे शक्यच नव्हते . इथे एक गमतीशीर प्रकार घडला . माझ्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे नर्मदा मैया इतक्या वेगाने वाहत होती की मी ज्या दगडी घाटावर बसलो होतो त्या घाटाच्या वर दोन ते अडीच फूट तिच्या लाटा उसळत होत्या . परंतु हे पाणी घाटावर सांडायच्या आधीच पुढे निघून जात होते . त्यामुळे मी त्या घाटाच्या अगदी कडेला गेलो आणि उसळणाऱ्या लाटांमधून कमंडलू ने वरचेवरच पाणी घेऊन आंघोळ केली ! या पाण्याला भयंकर गती आणि प्रवाह होता . त्याच्या खळखळाटांमध्ये आजूबाजूचे काहीही ऐकू येत नव्हते . जे दोन घाट मी उतरत आलो होतो साधारण त्याच उंचीवरून नर्मदा खाली येत होती . मला मुक्काम करण्याची गरज असल्यामुळे माझी गती मंदावली होती परंतु तिला कुठल्याही मर्यादा नव्हत्या त्यामुळे ती बेफाम सुटली होती !
संगमावर भर थंडीमध्ये आंघोळ करून झाल्यावर माझ्या अंकात एक वेगळे चैतन्य संचारले . आणि त्याच्या बळावर तो प्रचंड मोठा उताराचा घाट मी अतिशय वेगाने एका दमात चढत वरपर्यंत गेलो ! विशेष म्हणजे मला जराही दम लागला नाही ! नर्मदा जलामध्ये फार मोठी ताकद सामावलेली आहे याची प्रचिती तुम्हाला वेळोवेळी येत राहते . असेच स्नान तुम्ही अन्य कुठल्या नदीमध्ये केल्यावर तुम्हाला इतकी शक्ती प्राप्त होईलच असे सांगता येत नाही . नर्मदा जल की बात ही कुछ और है !
इतिहासातील प्रसिद्ध जमदग्नी ऋषी यांची तपोभूमी म्हणून हा संगम प्रसिद्ध आहे . यांचे इथे एक मंदिर बांधलेले असून अन्य देखील छोटी मोठी एक दोन मंदिरे आहेत . नर्मदेच्या काठावर शंकराची मंदिरे आहेतच आहेत . आणि त्यातील सर्व शिवलिंगे नर्मदेश्वरच असतात . अर्थात नर्मदेमध्ये सापडलेले बाणच शिवलिंग म्हणून वापरले जातात .
अन्यही काही मंदिरे येथे दिसतात
धर्मशाळेमध्ये परिक्रमावासी अशा पद्धतीने मुक्काम करतात
देवगाव संगम आश्रमामध्ये काही मराठी परिक्रमावासी भेटले .एक नाशिक भागातले दांपत्य होते ज्यांची ही दुसरी परिक्रमा सुरू होती . हे दोघेही जनार्दन स्वामी ( जटाधारी ) यांचे शिष्य होते . अजून एक हिंदी भाषिक परिक्रमावासी माझ्या शेजारी होता त्याला प्रचंड ताप आणि खोकला येत होता .
मी ठीक याच कोपऱ्यामध्ये मुक्काम केला होता व आता मनुष्य झोपलेला दिसतो आहे तिथे एक तापाने फणफणलेला परिक्रमा वासी होता .
साधू मात्र संसारी परिक्रमा वासींसोबत शक्यतो मुक्काम करत नाहीत तर बाहेर उघड्यावर एखादे तखत लावून त्यांचा डेरा पडतो
सीमा भिंतीच्या आत मध्ये कपडे धुण्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती तिथे जाऊन मी माझे सर्व कपडे धुऊन वाळत टाकले . गावातील काही सेवेकरी इथे येऊन सेवा करून जात . तसा एक मनुष्य आला आणि त्याने उत्तम पैकी स्वयंपाक करून सर्वांना जेवायला वाढले . नर्मदेचा जयजयकार करत भोजन प्रसाद घेतला आणि निद्रादेवीच्या आधीन झालो .
धर्मशाळेमधील नर्मदा मातेची मोहक मगरारूढ मूर्ती
सकाळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खळाळत्या पाण्यामध्ये बाहेरून कमंडलू घालत स्नान केले .
आश्रमातील एका सेवेकर्याने येऊन सही शिक्का दिला .
मा रेवा प्रसादी प्रकल्प देवगाव संगम जिल्हा मंडला यांचा माझ्या वहीतील शिक्का . हा माझा २४ वा मुक्काम ठरला .
आता मी निघणार इतक्यात अनुभव झारिया आणि सत्यम झारिया नावाची दोन छोटीशीच परंतु गुंड प्रवृत्तीची मुले माझ्याशी येऊन गप्पा मारू लागली . त्यांनी आम्ही तुम्हाला बुढी माई नदी पार करून देण्यासाठी आलो आहोत असे सांगितले . खरे म्हणजे ही नदी पार करणे काही फारसे अवघड नाही परंतु काही ठिकाणी खड्डे आहेत आणि काही ठिकाणी प्रचंड शेवाळे आहे . नेमका तिथेच तुमचा पाय पडला की वाटचाल अवघड होणार हे निश्चित .
बुढी माय नदी ओलांडण्यासाठी अत्यंत कठीण , निसरडी आणि धोकादायक आहे . लाल रंगाच्या मार्कर च्या इथून तिला पार करावी लागते .
बुढीमाय नदीचे उबड खाबड पात्र (सर्व चित्रे साभार गुगल नकाशा )
या नदीच्या पात्रामध्ये अनेक वर आलेले जमिनीचे भाग असून त्यामुळे ती पार करणे अजूनच क्लिष्ट बनून जाते . या दोन मुलांनी नाशिकच्या दांपत्याला आणि मला व्यवस्थित बुढी माय नदी पार करविली . जाताना वाटेतील अनेक धोकादायक ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखविली . मला या मुलांबद्दल थोडीशी शंका वाटत होती . यांचा हेतू काही सरळ नाही हे मला लगेच लक्षात आले होते . पैल तटावर गेल्यावर दोन्ही मुले पैसे मागू लागली . बुढी माय नदीची शपथ घेऊन सांग या पैशाचे तुम्ही काय करणार असे विचारल्यावर मुले म्हणाली की आम्ही या पैशाने अभ्यासाचे साहित्य खरेदी करणार आहोत . मुलांचा एकंदरीत स्वभाव पाहता हे काही खरे नाही हे कोणीही ओळखले असते . मग मी त्यांना म्हणालो नर्मदा मातेची शपथ घेऊन सांगा तुम्ही या पैशाचे काय करणार आहात . मग मात्र त्यांच्यातील एक जण म्हणाला की बाबाजी आम्ही या पैशाने राजश्री गुटखा विकत घेऊन खाणार आहोत . आम्ही रोज इथे लोकांना नदी पार करवतो आणि त्या पैशातून राजश्री गुटखा विकत घेऊन खातो !
दोघे सातवी आठवीच्या वयाची होती . मग मात्र मी त्यांना माझ्यासमोर खाली बसविले आणि त्यांना या वयात योग्य ते खाण्याचे महत्त्व पटवून सांगितले . गुटखा तंबाखू खाऊन त्यांच्या शरीरावर काय विपरीत परिणाम होऊ शकतात हे सर्व त्यांना समजावून सांगितले . आणि आपले हित करणाऱ्या व्यक्तीशी कधीही खोटे न बोलण्याची शपथ त्यांच्याकडून घेतली . त्यांनी दुसऱ्या नदीची शपथ खाऊन खोटे खपविले परंतु नर्मदेची शपथ खाल्ल्यावर मात्र ते खरे बोलले यातच नर्मदा मातेची शक्ती किती आहे व त्याचा तटावरील लोकांना अनुभव कसा येतो हे आपल्याला सहज कळू शकते ! त्यांना पैसे देण्यामध्ये काहीही हित नाही हे जाणून मी त्या दोघांना बिस्किटाचे दोन पुडे दिले व ते देखील माझ्यासमोर खायला लावून प्लास्टिकची विल्हेवाट कशी लावायची हे त्यांना समजावून सांगितले . एकंदरीतच परिक्रमेमध्ये आपल्याकडून प्लास्टिकचा एक कण देखील भूमीवर पडणार नाही याची काळजी मी घेतच होतो परंतु इतरांनी फेकलेले शक्य तेवढे प्लास्टिक वेळोवेळी उचलून ते मी ठराविक अंतराने नष्ट करीत असे . दोन्ही मुले जाताना पाया पडली . बहुतेक खूप दिवसांनी आपल्याला कोणीतरी मनापासून चांगला सल्ला दिला आहे हे त्यांना आतून कळत होते . जाताना मुले अतिशय सोप्या आणि वेगळ्या मार्गाने गेली याचा अर्थ त्यांनी आम्हाला इकडे आणताना मुद्दाम फिरवून कठीण आणि लांबच्या मार्गाने आणले होते हे सुस्पष्ट होते ! मला पैसे कमवण्यासाठी त्यांनी लावलेल्या या बुद्धीचातुर्याचे अप्रूप वाटले . त्यांनी जे केले ते योग्य की अयोग्य हा भाग वेगळा . परंतु हे सुचण्यासाठी लागणारी प्रज्ञा या वयामध्ये नर्मदे काठी राहणाऱ्या लहान मुलांच्या मेंदूमध्ये सहज उत्पन्न होते ही गोष्ट विशेष लक्षात घेण्यात सारखी आहे . नर्मदे काठची सर्वच लहान मुले अतिशय हुशार , चाणाक्ष , चुणचुणित आणि धीट आहेत याची प्रचिती मला वेळोवेळी येत गेली . धन्य ती नर्मदा माऊली आणि धन्य तिच्या काठावरील मुले मुली !
लेखांक सदतीस समाप्त (क्रमशः )
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा