लेखांक ३४ : मध्यरात्री ऐकले दिवंगत पुण्यात्म्याचे भजन

समोर आडवी आलेली शिवनी नदी कितपत खोल आहे याची मला काहीच कल्पना नव्हती . शक्यतो उथळ नद्यांचा तळ वरून लगेच दिसत असतो किंवा त्यांच्यामध्ये दगड वाळूची बेटे तयार झालेली असतात . परंतु इथे मात्र असे काहीच दिसत नव्हते याचा अर्थ पाणी खोल असणार असा अंदाज मी लावला . नदीचे पात्र अतिशय खोल वाहत होते . मी उंच शेताच्या बांधावर उभा राहून खाली उतरण्याचा मार्ग शोधत होतो . नदी नर्मदा मातेला जिथे मिळते त्या संगमावर पाणबुड्यांची वाळू काढण्याची लगबग सुरू होती . इतक्यात मला दूरवरून नर्मदे हर असा आवाज आला . समोरच्या तटावर एक गुराखी निवांत बसला होता त्याने मला हाताने इशारे करायला सुरुवात केली . त्याने दाखवलेल्या मार्गाने मी प्रथम खाली उतरलो . पाण्याचा रंग काळपट होता आणि पाण्याला बऱ्यापैकी जोरदार प्रवाह होता . नदी अतिशय खोल असणार असे माझे मन मला सांगत होते परंतु तो मनुष्य मला म्हणाला की मी सांगतो त्या मार्गाने तुम्ही चालत रहा . त्याने काठीच्या टोकाने मला रस्ता दाखवायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे मी नदीमध्ये पावले टाकायला लागलो . बूट व पिशवी मी डोक्यावर घेतली . साधारण बेंबीच्या थोडेसे वर इतकेच खोल पाणी मला लागले आणि हळूहळू मी नदी पार झालो ! पाण्याला चांगलीच ओढ होती ! नंतर माझ्या लक्षात आले की अशा मोठ्या नद्या जेव्हा आडव्या येतात तेव्हा त्या पार करण्याकरता पूल उपलब्ध नसेल तर लोक वाळूचे जलांतर्गत रस्ते तयार करून ठेवतात . म्हणजे वाळूचा एक असा आडवा ढिगारा तयार करून ठेवतात की ज्यावरून चालत नदी पार करता येते . परंतु हा मार्ग सुरू कुठे होतो आणि संपतो कुठे याचे ज्ञान असल्याखेरीज अशा मार्गावर चालण्याचे धाडस करणे म्हणजे कपाळमोक्षच होय . कारण हे मार्ग प्रवाहानुसार हळूहळू बदलत राहतात .मला नशिबाने तो गुराखी भेटला म्हणून माझी नैया पार झाली ! पलीकडच्या तटावर गेल्यानंतर मी तो गुराखी कुठे दिसतो आहे का पाहिले परंतु मला काही पुन्हा तो दिसला नाही . असे अनुभव तुम्हाला नर्मदा परिक्रमेमध्ये वारंवार येतात . नेमकी तुम्हाला ज्या क्षणी व जी मदत हवी आहे त्या क्षणी ती मदत देणारी एखादी व्यक्ती तुमच्यासमोर उपस्थित होते . मदत करते आणि क्षणात निघून जाते . हे एकदा दोनदा घडणे योगायोगाचे म्हणता येऊ शकेल परंतु प्रत्येक वेळी असे घडत असल्यामुळे त्याच्यामागे एखादी सूत्रबद्ध दैवी रचना कार्य करीत आहे की काय अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे ! मदत करणारी व्यक्ती म्हणजे कोणी साक्षात देवता आहे असे माझे म्हणणे बिलकुल नाही परंतु त्या व्यक्तीला देखील त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची बुद्धी कुठलीतरी सामाजिक जाणीव तिला देत असते . या जाणीवेवर आपले नियंत्रण निश्चितपणे नाही . ही जाणीव व्यापक समाज मन ठरवीत असते . असो . सिवनी अथवा शिवनी नदीचे पाणी काळे कुट्ट होते आणि नर्मदा मातेचे पाणी तुलनेने शुभ्र पांढरे भासत होते . परंतु संगम झाल्या झाल्या काळा रंग लुप्त होऊन फक्त नर्मदेचा रंग शिल्लक राहत होता ! इथे समोरच्या तटावर एक गोरख चिंच जातीचा वृक्ष आहे ज्याला परिसरातील सर्व लोक कल्पवृक्ष म्हणून ओळखतात . हे मूळचे आफ्रिकन झाड असून भारतामध्ये चांगले रुजलेले आहेत . पुढे मांडवगड किल्ल्यावर मी या झाडांचे अक्षरशः जंगल पाहिले . आपल्या महाराष्ट्रात देखील नानासाहेब फडणवीस यांच्या वाईजवळच्या मेणवली गावामध्ये हे झाड आहे व ते हत्तीचा पाय म्हणून प्रसिद्ध आहे . 
नर्मदे काठचा हाच तो कल्पवृक्ष . मी समोरील तटावरून चालत होतो . 
या संपूर्ण परिसरामध्ये अवैध पद्धतीने वाळू उपसून तिची विक्री करणाऱ्या दलालांचा अक्षरशः सुळसुळाट मी पाहिला . विशेषतः वर्षातील काही ठराविक दिवसच वाळू काढता येते कारण नंतर नर्मदेची जलपातळी वाढलेली असते त्यामुळे त्यांचे सुगीचे दिवस सुरू होते . मोठ्या मोठ्या नावांमध्ये आधी पाणबुड्यांच्या मदतीने वाळू भरली जाते आणि नंतर ती काठावर आणून उतरवली जाते . काठावरती एका ट्रॅक्टरमध्ये ती वाळू भरली जाते आणि हे ट्रॅक्टर नर्मदेचा कठीण किनारा चढत ही वाळू बाहेर घेऊन जातात . नर्मदेच्या पातळीपासून किनारा उंच असल्यामुळे प्रचंड चढ असतो आणि या चढावर चढताना ट्रॅक्टरची पुढची चाके उचलली जातात . ती उचलली जाऊ नये म्हणून ट्रॅक्टरच्या पुढे अक्षरशः चार चार पाच पाच मजूर बसविले जातात आणि ट्रॅक्टर जोरात पळवला जातो . हे सर्व करण्यासाठी तयार झालेला रस्ता हा ट्रॅक्टरच्या अतिरिक्त वजनामुळे खचून गेलेला असतो व दोन्ही चाकांचे दीड दीड फूट खोल खड्डे त्या रस्त्यावर पडलेले असतात . त्यातून फक्त आणि फक्त ट्रॅक्टर जाऊ शकेल अशी त्या रस्त्याची रचना असते . 
अतिरिक्त वजन घेऊन जाणारा ट्रॅक्टर जाऊन तयार झालेले रस्त्यावरील खड्डे उपग्रहातील प्रतिमेमध्ये देखील दिसतात यावरून त्यांच्या आकाराचा अंदाज घ्यावा

ट्रॅक्टर वेगाने पळवताना चुकून एखादा मजूर खाली पडला तर त्याचा चिरडून मृत्यू निश्चित आहे इतके हे सर्व भयानक प्रकार आहेत . परंतु तरीदेखील राजरोसपणे हा खेळ इथे चालू आहे .
क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरल्यामुळे ट्रॅक्टर असा उचलला जातो
ते टाळण्यासाठी मजुरांना असे ट्रॅक्टरच्या पुढे बसविले जाते ( संग्रहित छायाचित्रे )
 या लोकांना नर्मदे विषयी फारशी आस्था नाही असे मला त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले . तिच्याकडे ते जीवनदायीनी म्हणून न बघता वालुकादायिनी इतक्या मर्यादित रूपात पाहत आहेत . आणि नर्मदे कडे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला ती मुबलक देते त्यामुळे या सर्वांचे धंदे अतिशय उत्तम सुरू आहेत . यांच्यामध्येही नर्मदेचे भक्त निश्चित पणे असतील परंतु पोटामुळे त्यांना नर्मदेची वाळू काढून विकणे हे काम केल्याशिवाय पर्याय राहत नाही . अशाच एका ट्रॅक्टरने तयार केलेल्या खड्ड्याच्या रस्त्यातून चिखल तुडवत मी वरच्या दिशेला पळू लागलो कारण मागून एक ट्रॅक्टर जोरात येत होता ! समोरून परिक्रमावासी जात आहे तर आपण थोडेसे थांबावे असा विचार त्या ट्रॅक्टर चालकाने केला नव्हता कारण त्यांचे वेळेचे गणित असते . ठराविक वेळेमध्ये ठराविक फेऱ्या झाल्या तरच त्यांचे आर्थिक गणित जुळते . त्यामुळे अतिशय निर्दयपणे यांचे उपसण्याचे काम चालू असते . धावत धावत धापा टाकत मी तो चढत चढलो . पुढे एक भव्य पिंपळाचा वृक्ष होता आणि त्याच्या खाली एक गोपाळ कृष्ण मंदिर आहे असे माझ्या लक्षात आले . इथे परिक्रमावासींची सेवा केली जाते असे मला दिसले . इथे एका ओट्यावर काही देवता होत्या त्यांचे दर्शन घेतले आणि एका कट्ट्यावर मी विश्रांती घेत बसलो . इतक्यात मंदिराच्या मागे असलेल्या घरातून एक वयस्कर काकू बाहेर आल्या आणि त्यांनी मोठ्या आस्थेने माझे विचारपूस केली . "नर्मदे हर महाराज ! कितने मूर्ती है ? " काकूंनी विचारले . नर्मदा खंडामध्ये आणि एकंदरीतच साधू जीवनामध्ये साधूला किंवा परिक्रमा वासीला मूर्ती असे संबोधले जाते . "हम दो मूर्ती है माताजी । " मी म्हणालो . माझ्या आजूबाजूला कोणी दिसत नाही असे पाहून त्या म्हणाल्या "दुसरा कौन है? " " नर्मदा मैया " मी लगेच उत्तरलो . काकू आनंदी झाल्या आणि म्हणाल्या " मैया तो हर जगह है ! अच्छा है । आप और मैया श्रीकृष्ण भगवान के मंदिर मे आसन लगा सकते है ।" मंदिरामध्ये आसन लावण्याची सूचना त्यांनी मला केली . अजूनही प्रचंड थंडी जाणवत होती . इथे थंडी कधी कमीच होत नाही की काय असे मला वाटत होते . मंदिरामध्ये गेलो आणि गोपाळ कृष्णाला साष्टांग नमस्कार केला . फरशी अत्यंत गार होती त्यामुळे तो नमस्कार लक्षात राहिला !छोटेसेच परंतु सुंदर मंदिर होते . या मंदिराचे काही फोटो इंटरनेटवर मिळाले ते आपल्या दर्शनासाठी टाकत आहे .
उजवीकडून डावीकडे वाहणारी वरची नदी नर्मदा आहे आणि खालून तिला येऊन मिळालेली शिवनी नदी आहे . समोरच्या तटावरील कल्पवृक्ष आणि मी मुक्काम केला ते राधाकृष्ण मंदिर येथे दिसत आहे .समोर पात्रात वाळूच वाळू दिसत आहे . 
शिवनी संगम आश्रमाचा परिसर
काठावरील भव्य पिंपळाचा वृक्ष
आश्रमातील देवदेवता ,स्थानदेवता
ह्याच कट्ट्यावर जाऊन मी बसलो होतो आणि मागच्या घरातून काकूंनी येऊन विचारपूस केली .या चित्रात देखील थकले भागलेले परिक्रमा वासी विश्रांती घेताना दिसत आहेत . 
गोपाळ कृष्णाचे मंदिर . (श्रीक्षेत्र शिवनी संगम )
मंदिराला मोठे जाळीचे दार होते ( कोलॅप्सीबल डोअर ). आत मध्ये संगमरवराची गारेगार फरशी लावलेली होती . डावीकडच्या एका कोपऱ्यामध्ये मी माझे आसन लावले . कुठेही आसन लावून झाले की माझा सर्वात पहिला कार्यक्रम हाच असायचा की तिथून बाहेर जाणे आणि नर्मदा मातेचे दर्शन घेणे . तिचे त्या घाटावरील रूप नेत्रामध्ये साठवून ठेवणे . मी बाहेर आलो आणि उतार उतरून नर्मदेच्या पात्रामध्ये गेलो . इथे समोर एक मोठी निळसर रंगाची जॅक वेल ( उपसा कूप ) होती ज्याद्वारे पाणी उपसून जवळच्या गावांना पुरविले जात होते . जवळच एक छोटेसे मंदिर होते .इथे त्या विहिरी शेजारूनच जाणाऱ्या एका पुलाचे काम देखील सुरू झाले होते . तशा खाणा खुणा आजूबाजूला दिसत होत्या . इथे वाळूमुळे नर्मदा मातेचे पात्र रुंद झालेले होते व केवळ एका कोपऱ्यातून पाणी वाहत होते . हा प्रवाह देखील अतिशय उथळ असा होता . त्यामुळे छोटी छोटी मुले या प्रवाहामध्ये बिनधास्त पळापळी करून खेळत होती . घरातील कुठली तरी जुनी चादर आणून त्याच्या साह्याने मासे पकडणे हा इथल्या मुलांचा आवडीचा खेळ आहे . काठावरती बरेच दगड गोटे होते . त्यावर पूर्वी पुरामध्ये येऊन गेलेल्या शेवाळ्याचे वाळलेले थर होते . एक छोटासा घाट बांधण्यात आला होता .
शिवनी संगमावरील नर्मदेचा घाट (समोर जॅकवेल )
मी सकाळ संध्याकाळ नर्मदेमध्ये आवर्जून स्नान करायचो . परिक्रमेमध्ये सर्वाधिक महत्त्व जर कशाला असेल तर ते या स्नानाला आहे . हजारो किलोमीटर वाहणारी नर्मदा तिच्या पाण्यामध्ये कुठल्या कुठल्या औषधी वनस्पतींचे गुण आणि जमिनीतून सापडणाऱ्या मूलद्रव्यांचे कण आणि क्षार घेऊन वाहत असते याची कल्पना करता येणे कठीण आहे . या सर्व रसायनांच्या अभ्यंगाचा लाभ आपल्याला या स्नानाने होत असतो . शरीरातील अनेक व्याधी विकार रोग दूर करणारे असे हे औषधी जल आहे . इथे देखील थंडगार पाण्यामध्ये मांडी घालून बसून आंघोळ करता येईल इतपतच पाणी होते . मी हळूहळू अंदाज घेत थोडेसे आत जाऊन बसलो . परंतु थंडगार पाणी अंगावर घेण्याची हिंमत होईना इतक्यात लहान मुलांनी माझ्याजवळ येऊन चहूबाजूंनी माझ्या अंगावर पाणी उडविले ! त्यामुळे माझी थंडगार पाण्याची भीड चेपली आणि मी यथेच्छ स्नान करून घेतले ! 
शिवनी संगम येथे स्नान करणारा एक अन्य परिक्रमावासी (संग्रहित छायाचित्र )
थंडगार पाण्यातून बाहेर आल्याबरोबर सर्व थंडी पळून गेली ! आणि तसाच उघड्या अंगाने मी गोपाळ कृष्ण मंदिरामध्ये गेलो . अंगात जाडजूड स्वेटर जॅकेट इत्यादी घालून वाळू वाहतूक करणारे लोक माझ्या त्या अवताराकडे पाहत राहिले . " जय हो माई की चिंता काहे की ! " इथून वरती जाताना तिथे थोडीशी दुर्दैवी माहिती मला वाचायला मिळाली . या घाटा संदर्भात ती माहिती होती . इथून जवळच गोरखपूर नावाचे मोठे गाव आहे . या नावाची अजून काही गावे नर्मदे काठी आहेत . त्या गावातील सलुजा नावाचा एक मोठा व्यापारी आहे ज्याने हा घाट आणि धर्मशाळा बांधलेली आहे . आपल्या दिवंगत पुत्राच्या स्मरणार्थ त्याने हे सर्व केलेले आहे . ऋषी सलुजा असे त्याच्या दिवंगत पुत्राचे नाव होते . इथे महाशिवरात्रीचा मोठा मेळा भरतो तसा मेळा एक वर्ष भरलेला होता . मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे लहान मुले इथे आवडीने पाण्यामध्ये खेळत असतात . त्याप्रमाणे या सलुजा व्यापाऱ्याची दोन्ही मुले पाण्यामध्ये खेळत होती . इतक्यात वरती अमरकंटक भागामध्ये मोठी ढगफुटी झाली आणि एक महापूर अचानक तिथे नर्मदेला आला . इंग्रजीमध्ये या प्रकाराला flash flood असे म्हणतात . व हा प्रकार अतिशय भयानक असतो . याच्यामध्ये सुरुवातीला चिखलगाळ ,दगड माती लाकडे इत्यादी वाहत येत असतात . आणि त्यानंतर गढूळ पाण्याचा मोठा प्रवाह असतो . याच्यामध्ये पट्टीचा पोहणारा देखील मरू शकतो इतके हे पाणी बेकार असते . आणि तसेच झाले . व्यापाऱ्याचा धाकटा मुलगा वाहून जायला लागला .हे पाहून उत्तम पोहणाऱ्या थोरल्या ऋषी सलुजा याने त्या प्रवाहामध्ये उडी मारली आणि धाकट्या भावाचा प्राण वाचविला .परंतु हे सर्व करत असताना तो प्रवाहाला लागला आणि वाहून गेला आणि पुन्हा कधीच सापडला नाही .त्यामुळे त्याच्या स्मरणासाठी त्याच्या वडिलांनी हे सर्व सेवा कार्य उभे केलेले आहे . तिथे ऋषी सलूजा याची जन्मपत्रिका देखील लावलेली आहे . त्याच्या मृत्यू स्थानामध्ये राहू शुक्र आणि सूर्य असे ग्रह होते . असो . ज्योतीष शास्त्रातील जाणकारांकरिता ग्रहस्थिती सांगून ठेवली . मगाशी मला भेटलेल्या काकू व त्यांचे पती आणि तीन मुले एक मुलगी हे तिवारी नामक एक ब्राह्मण कुटुंब असून त्यांची नेमणूक या सर्व परिसराची देखरेख करण्याकरता केलेली आहे . पैकी थोरले पंडित जी कृष्णाची सेवा करून निवर्तले . आता त्यांचा पुत्र देवेंद्र कुमार तिवारी सर्व व्यवस्था बघत आहे . देवेंद्र कुमार तिवारी माझ्याकरता गरमागरम चहा घेऊन आला ! तो साधारण माझा समवयस्कच होता . मी माझे पूजन आटोपून घेतले . इतक्यात देवेंद्र कुमार तिवारी ने आरतीची तयारी सुरू केली . मंदिरामध्ये आम्ही दोघेच होतो . तिथे एक सुंदर शंख पडलेला मला दिसला . मी त्याला शंख वाजवू का असे विचारले . तो म्हणाला हा माझ्या पिताजींचा शंख आहे व तो बंद पडलेला आहे . आता तो वाजत नाही . मला याचा अर्थ कळेना . मी त्याला एकदा फक्त काय झाले आहे पाहू का असे विचारले आणि शंख ताब्यात घेतला .अतिशय जुना मोठा आणि जड शंख होता . मुख्य म्हणजे त्याचे मुख अतिशय छोटे होते . छोटे मुख असले की कमी हवा सोडून मोठा आवाज काढता येतो . त्यामुळे हवा अधिक काळ टिकते आणि शंख वादनाचा कालावधी वाढतो . मी नर्मदा मातेचे नाव घेतले आणि शंख फुंकायला सुरुवात केली . आज पर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये मी इतका प्रदीर्घ काळ शंख कधीच वाजवला नव्हता इतका दीर्घकाळ तो वाजला ! त्या शंखाचा नाद अतिशय धीर गंभीर आणि सुस्वर होता ! इतका सुंदर शंख मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये पाहिलेला नव्हता ! माझे शंख वादन ऐकून देवेंद्र खुश झाला आणि त्याने पुन्हा एकदा शंख वाजवायला मला सांगितले ! त्याचे वडील गेल्यापासून हा शंख वाजलाच नव्हता . मुळात त्याचे छिद्र लहान असल्यामुळे अतिशय कमी शक्ती लावून तो वाजविता येत होता व बहुतेक लोक अधिक शक्ती लावून वाजवायचा प्रयत्न करत असल्यामुळे तो वाजत नव्हता . देवेंद्र कुमारला मी तो शंख वाजवण्याची युक्ती शिकविली . देवेंद्र तिवारी ने आरती चालू केली . त्याने आरती चालू केली आणि मी चकित होऊन त्याच्याकडे पाहत राहिलो ! त्याचा आवाज इतका सुरेल होता व तो आरती इतकी सुंदर म्हणत होता की मी मंत्रमुग्ध होऊन गेलो ! आजवर कोणाला इतक्या सुराने आणि आर्ततेने आरती गाताना मी पाहिलेले नव्हते .मुळात आरती या शब्दातच आर्तता आहे आणि ती आर्तता जर येत नसेल तर ती आरती व्यर्थ आहे असे माझे मत आहे. त्याच्या आरत्या मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिलो . एका मागोमाग एक सुरामध्ये आणि तालामध्ये तो आरत्या म्हणत होता . त्याची निरंजन ओवाळण्याची पद्धत देखील खूप सुंदर आणि पाहण्यासारखी होती . इतक्या भावपूर्ण पणाने कोणी आरती करत असेल तर देव आपण होऊन प्रगट व्हावा ! 
त्याची आरती संपताच मी आरती घेतली आणि अतिशय तोंड भरून त्याच्या गायनाचे कौतुक करू लागलो . माझे बोलणे ऐकल्यावर तो म्हणाला मी तर काहीच गात नाही इतके सुंदर माझे पिताजी गायचे . ते याच मंदिरामध्ये एकदा भजनाला बसले की रात्रभर देवाची भजने म्हणायचे आणि सकाळीच उठायचे ! तसेच त्यांचे गायन आणि भजन ऐकण्यासाठी दूरवरून लोक यायचे इतके ते सुंदर गात असत ! त्यांनी आयुष्यभर या गोपाळ कृष्णाची गायन सेवा केलेली होती . त्या अनाम पुण्यात्म्याला मनोमन नमस्कार करून मी माझे आसन ग्रहण केले . तिवारी घरून गरम गरम जेवण घेऊन आला . पोळी भाजी भात आमटी असे सर्व सुग्रास जेवण पोटभर जेवलो आणि मन तृप्त झाले ! माझे संपूर्ण भोजन होईपर्यंत तो शेजारी उभा राहिला बस म्हणल्यानंतर देखील बसला नाही . त्याच्या बोलण्यातले मार्दव नम्रता आणि स्वरातील गोडवा खरोखरीच कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहिला . त्याला भेटल्यानंतर निश्चितपणे माझे आरती म्हणणे बदलले आहे . एखादे नैमित्तिक कर्म उरकून टाकायचे म्हणून पटापट आरती म्हणणे आणि तिवारी म्हणतो त्या पद्धतीने आरती म्हणणे यातील फरक खरोखरीच अनुभवण्यासारखाच आहे .  जाताना तिवारीने मला सांगितले की रात्री खूप थंडी पडते त्यामुळे जाळीच्या दाराला एक मोठा फ्लेक्स चा फलक लावला आहे तो बांधून टाका म्हणजे हवा आत येणार नाही . तसेच आतून कुलूप लावून घ्यायला त्याने मला सांगितले . त्याप्रमाणे मी सर्व बंदोबस्त केला आणि दिवे मालवून समयीच्या मंद उजेडा मध्ये दिसणारे गोपाळ कृष्ण आणि राधिकेचे रुपडे पहात बसून राहिलो . माझ्या देखील डोळ्यावर झापड येऊ लागली म्हणून मी पाठ टेकवली आणि मला डोळा लागला . परिक्रमा सुरू केल्यापासून हा माझा एकोणिसावा मुक्काम होता . अशीच रात्र पुढे सरू लागली . आता यापुढे मला जो अनुभव आला तो मी जसा आला तसाच लिहीत आहे . त्यावरून कोणाला काय अनुमान काढायचे ते काढू देत . परंतु मला अनुभव आला हे मात्र खरे आहे . रात्री बाराच्या सुमाराला मला मंदिरातून कोणीतरी चालत आहे असा भास झाला . कुणीतरी घसा खाकरत आहे असे देखील आवाज मला येऊ लागले . मला वाटले रात्री अन्य कोणी परिक्रमावासी आलेले असतील म्हणून मी दुर्लक्ष केले आणि पुन्हा झोपी गेलो . थोड्यावेळाने मला पुन्हा खोकल्याचा आवाज येऊ लागला . आवाज अतिशय नाजूक होता परंतु पुरुषाचा होता . मी उठून बसलो आणि हातामध्ये विजेरी घेऊन आजूबाजूला पाहू लागलो . आजूबाजूला कोणीही नव्हते . मी पुन्हा भिंतीकडे तोंड करून झोपलो आणि आता मात्र माझी झोप उडाली होती आणि माझे सर्व लक्ष त्या आवाजाकडे लागलेले होते . इतक्यात पुन्हा इकडून तिकडे चालल्याचा आवाज मला येऊ लागला . पुन्हा घसा खाकरण्याचा आवाज ऐकू आला . मी धैर्य एकवटत विजेरी घेऊन प्रदक्षिणामार्गाच्या मागे धावलो कारण तेवढी एकच जागा माझी बघायची राहून गेली होती . तिथे देखील कोणी नाही हे पाहिल्यावर मात्र मी पुन्हा पळत येऊन भिंतीकडे तोंड करून डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपी गेलो . झोपतोय कुठला ! माझे पंचप्राण त्या आवाजाकडे लागून राहिले होते ! मी विचार करू लागलो की हा आवाज कोणाचा असावा ? इतक्यात पुन्हा चालण्याचे आवाज मला येऊ लागले . मात्र आता माझी भीती हळूहळू कमी होऊ लागली आणि डोक्यात विचारांची चक्रे सुरू झाली की यातून सुटण्याचा उपाय काय करावा ! कारण दार तर मी स्वतः आतून कुलूप लावून बंद केले होते आणि त्यावर फ्लेक्स बोर्ड इतका घट्ट बांधला होता की तो सोडवून बाहेर जाण्या इतका वेळ माझ्याकडे नव्हता . त्यापेक्षा नर्मदेचे स्मरण करीत शांतपणे पडून राहायचे आणि काय काय होते तो अनुभव घ्यायचा असे मी ठरविले . सर्वप्रथम मी स्वतः जागा आहे की झोपेत आहे याची खात्री चिमटा काढून करून घेतली . नाहीतर स्वप्न देखील पडू शकते या प्रकारचे . तो आवाज मी ऐकत होतो , त्या आवाजातील नाजूकपणा पाहून मला असे वाटले की कदाचित हा आवाज दिवंगत पंडितजींचा तर नसावा ? मी सर्व धैर्य एकवटून मोठ्या आवाजात म्हणालो "पंडित जी ! ?? " मला स्पष्ट आवाज ऐकू आला " ह्म " आता मात्र माझ्या जीवात थोडासा जीव आला . कारण तिथे खरोखरीच काहीतरी दैवी शक्तीचे अस्तित्व आहे याची खात्री मला या प्रकारातून पटली . मी म्हणालो "निंद नही आ रही क्या ? " " हां " धीर गंभीर आवाज मंदिरात घुमला . इकडे माझी पाचावर धारण बसलेली होती . परंतु हिम्मत हरून चालणार नव्हते कारण मला इथे अख्खी रात्र घालवायची होती . मी पुन्हा विचारले "आपको खासी की तकलीफ थी क्या ? " " ह्म .. " इतकाच आवाज आला आणि पुन्हा खोकला सुरू झाला . आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते आहे हे पाहून माझा आत्मविश्वास थोडासा वाढला आणि मी म्हणालो , " पंडित जी हमने सुना है आप गाना बहुत अच्छा गाते थे । कृपा करके हमे कुछ भगवान के गीत , भजन सुनाए । " मी  म्हणालो मात्र अन् त्या संपूर्ण आसमंतामध्ये एक स्वर्गीय स्वर घुमू लागला ! अतिशय नाजूक गोड आणि मंत्रमुग्ध करणारा तो आवाज होता ! त्या आवाजामध्ये परमेश्वराची विविध भजने आणि कवने मला ऐकू येऊ लागली . अंगाची मुटकुळी करून भिंतीकडे तोंड करून मी झोपलेला होतो .आधीच बाहेरची थंडी आणि त्यात हा प्रकार त्यामुळे वळून इकडे पाण्याची हिंमत माझ्या मध्ये होत नव्हती . परंतु पडल्या पडल्या तो स्वर्गीय आवाज मी ऐकू लागलो आणि माझी भाव समाधी लागली ! इतके सुंदर गायन यापूर्वी मी ऐकले नव्हते ! माझ्या मनातील भय भीती शंका या सर्व भावना कुठल्या कुठे पळून गेल्या आणि केवळ भाव भक्ती शिल्लक राहिली इतके त्या स्वरामध्ये सामर्थ्य होते . त्यांनी बरीच गाणी एका मागोमाग एक म्हटली, परंतु त्यातील एक हनुमंताची आरती मात्र माझ्या पक्की लक्षात राहिली ! आरती की जै हनुमान लला की । दुष्ट दलन रघुनाथ कला की ॥ असे त्या आरतीचे शब्द होते आणि स्वर केवळ स्वर्गीय होते ! मला मुळात संगीत श्रवणाची आवड असल्यामुळे ती गाणी ऐकता ऐकता माझा कधी डोळा लागला हे माझे मलाच कळले नाही ! सकाळी दार वाजल्याचा आवाज आला म्हणून मी जागा झालो तर तांबडे फुटू लागले होते आणि बाहेर एक मनुष्य उभा होता . मी जाऊन दार उघडले तर मला कळाले की तो मनुष्य मलाच भेटायला आलेला आहे . मी वरती जो ऋषी सलुजा याचा प्रसंग सांगितला त्यातील बुडणारा धाकटा भाऊ , तोच हा मनुष्य मला भेटायला आला होता . साधारण पस्तीस ते चाळीस वय असावे . तो रोज नर्मदा मातेचे दर्शन घ्यायला यायचा आणि येणाऱ्या परिक्रमावासींची विचारपूस करून जायचा . आज त्याला काय झाले होते माहिती नाही परंतु तो खूप दुःखी वाटत होता आणि मला आल्या आल्या त्याने विचारले की तुम्हाला ज्योतिषशास्त्र कळते का ? मी नम्रपणे परंतु स्पष्टपणे नकार दिला आणि त्याला कारण विचारले की असे तो का विचारत आहे यावर तो उत्तरला , " मेरी हर बिझनेस मे वाट लग चुकी है बाबा । सर के उपर बहुत कर्जा है और घर से साथ नही मिल रहा । " लॉक डाऊन मुळे त्याच्या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे हे माझ्या लक्षात आले . तसेच त्याची पत्नी ऐनवेळेला त्याची साथ सोडून निघून गेली होती त्यामुळे देखील तो दुःखी होता .  मला हस्तरेषांमधले थोडे कळते अशी लोण कढी थाप मारून मी त्याचा हात हातात घेतला आणि त्याला सांगेन गोष्टी युक्तीच्या चार या उक्तीप्रमाणे सर्वसामान्य व्यावसायिक कौटुंबिक आणि सामाजिक सल्ले दिले .  त्यावेळी काहीतरी करून त्याला आत्मविश्वास देणे हे मला अधिक महत्त्वाचे वाटत होते .एकंदरीत त्याचा आत्मविश्वास कमी पडत होता हे माझ्या लक्षात आले होते आणि त्यामुळे त्याला त्या अनुरूप काही सल्ले दिले . विशेषतः त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत असे त्याने मला सांगितले त्यानंतर मात्र मी त्याला त्याच्या भावाची आठवण करून दिली आणि भावाने तुला याच कारणासाठी जिवंत ठेवले आणि स्वतः मृत्यू पत्करला काय ? असे विचारल्याबरोबर तो भानावर आला आणि काही झाले तरी मी आत्महत्या करणार नाही असे वचन त्याने मला दिले . एकंदरीतच नर्मदा मातेची साक्ष देत त्याला चार सोप्या सरळ साध्या युक्त्या सांगून जीवन जगण्याच्या कलेतील काही पैलू उलगडून सांगितले आणि तिथून ताबडतोब काढता पाय घेण्याचे ठरविले कारण हे करण्यामध्ये मला काहीही रस नव्हता . खरे तर मला रात्री आलेला अनुभव तिवारी कुटुंबीयांना सांगायचा होता परंतु हे नसते लटांबर गळ्यात पडू नये म्हणून मी माझे सामान उचलले आणि नर्मदे हर केले ! अजून पूर्ण उजाडले नव्हते अशा अंधुक वेळीच मी नर्मदेच्या अगदी काठावरील रस्ता पकडला आणि झपाझप चालायला सुरुवात केली . छुरीया मठ्ठा , तुलसीघाट , बैसाख टोला , शिवाटोला , भुर्री टोला , करबे मठ्ठा , पत्थरकुचा , लिखनी इत्यादी गावे एका दमात एका चालीत अथकपणे पार करत माझिया खार नावाचे गांव गाठले . 
मध्ये एका टेकडावर शेतामध्ये काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने माझा फोटो काढला
 हा संपूर्ण प्रवास नर्मदा मातेच्या काठाकाठाने केला व अतिशय अविस्मरणीय असा होता ! विशेषतः तुलसी घाट अतिशय दुर्गम , रमणीय आणि सुंदर होता . 
 तुलसी घाट
पंडितजींचे स्वर्गीय स्वर अखंड माझ्या कानामध्ये घुमत होते व तेच गुणगुणत मी पुढे पुढे मार्गस्थ होत होतो . काहीही डोक्यात नसताना अनपेक्षित पणे हा सुंदर अनुभव तिथे मला आला . आयुष्यभर एखाद्या देवतेची भक्ती केल्यावर मृत्यू पश्चात देखील तुमची स्पंदने , तुमच्या फ्रिक्वेन्सी तिथे कशा शिल्लक राहतात आणि तरल झालेल्या तुमच्या मनामध्ये त्याचे तरंग किती सहजतेने उमटू शकतात याचाच अनुभव मी येथे घेतला असा माझा दृढ विश्वास आहे . नर्मदा खंड अशा वैविध्यपूर्ण अनुभूतींनी समृद्ध राहिलेला आहे . फक्त आपली ग्रहण क्षमता किती व कशी आहे त्यानुसार येणाऱ्या अनुभूती आणि त्यांची तीव्रता बदलत जाते . आता हे लिखाण करताना देखील माझ्या कानामध्ये तेच स्वर्गीय स्वर घुमत आहेत . . .
आरती की जै हनुमान लला की । दृष्ट दलन रघुनाथ कला की । ...



लेखांक चौतीस समाप्त ( क्रमशः)

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर