लेखांक ३३ : अमेरिकन प्राध्यापक परिक्रमावासी आणि शैला आदिवासी नृत्यकार

गरमागरम काळा चहा पिऊन थोडीशी तरतरी आली होती ती जराही न दवडता वेगाने चालायला लागावे म्हणजे शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल असा विचार मी केला . आणि पटापट पूजा अर्चा आटोपून झोळी उचलली . म्हातारीने दिलेला झाडपाला देखील सोबत घ्यावा लागला . आश्रमाच्या बाहेर आल्यावर मी विचार केला आता हे ओझे घेऊन कुठे चालावे ? आणि तिने सांगितलेला उपाय तरी कोण मला करून देणार ?त्यापेक्षा नर्मदा मातेला प्रार्थना केली की तू मला क्षमा कर आणि या म्हातारीने दिलेले औषध मी तुला समर्पित करतो त्याच्या बदल्यात तू माझ्या पायाचे दुखणे जमल्यास बरे कर ! आणि त्या छोट्याशा पुलावरून मी सर्व झाडपाला नर्मदार्पण करून टाकला ! तिथून पुढे खरोखरीच माझ्या पायांना भरपूर आराम मिळाला . सुरुवातीच्या पंधरा दिवसांमध्ये जसे पाय दुखायचे तसे पुन्हा कधीही दुखले नाहीत . मी पुन्हा नदीच्या काठावरचा शेतांच्या बांधावरील मार्ग पकडला . अशा मार्गावर मऊसर चिखल असतो . ज्याच्यामुळे पायाला चांगली पकड येते ,असा माझा यापूर्वीचा अनुभव होता .  त्यामुळे बांधांमधील मोठी फट व पलीकडे मऊ चिखल दिसताच मी मोठी ढांग मारून पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला , परंतु झाले भलतेच ! रात्रभर पडलेल्या थंडीमुळे चिखलातील पाण्याचा गोठून बर्फ झाला होता ! त्याच्यावरून सरररर करून पाय घसरून मी पार्श्वभागावरती राप्पकन् जोरात आपटलो ! गोठलेला चिखल इतका कडक झाला होता की त्याने कुठलीही दया माया न दाखवता छाटी फाडून माझ्या पार्श्वभागावर नक्षीकाम केले . 
गोठलेला चिखल काहीसा असा दिसतो ( संग्रहित चित्र )
दिसताना तरी हा चिखल ओला आहे असे वाटत होते परंतु प्रत्यक्षामध्ये त्याचा कडक असा दगड झालेला होता . एक क्षणभर वाटले की पुन्हा माघारी फिरावे आणि आश्रमामध्ये विश्रांती घ्यावी . परंतु आश्रमातून शिक्का घेऊन बाहेर पडलो होतो त्यामुळे पुन्हा माघारी फिरण्याचा प्रश्नच नव्हता .
 १९ जानेवारी २२ रोजी हनुमान मंदिर रामघाट येथे मुक्काम केल्याचा माझ्या वहीमध्ये घेतलेला शिक्का

अशा प्रकारे चिखलाचा बर्फ होऊन त्यावरून पाय सटकण्याचा हा काही माझा पहिला अनुभव नव्हता . यापूर्वी हिमालयामध्ये गिरी भ्रमण करताना असे अनुभव आलेले होते . परंतु त्यावेळी तुमच्या बुटाला गेटर्स नावाचे एक विशेष प्रकारचे तळवे किंवा काटेदार तळवे लावण्यात येतात . त्यामुळे बर्फातून पाय सटकत नाहीत . इथे मात्र आधीच झिजून पार गुळगुळीत झालेले माझ्या बुटाचे संपलेले सोल होते .त्यामुळे साराच आनंदी आनंद होता . जवळपास प्रत्येक पाऊल बांधावरून सटकत होते . सर्वत्र गोठलेले दवबिंदू दिसत होते . अखेरीस सूर्यदेव उगवले . जरी सूर्य उगवला असला तरी त्याच्या प्रकाशाची जरा देखील उष्णता जाणवत नव्हती इतका दाट थंडीचा थर त्या परिसरामध्ये होता .मुळात नर्मदा मातेच्या काठावरील रस्ता निवडल्यामुळे तिथे एकंदरीतच पाण्याचे प्रमाण जास्ती असलेली जमीन होती . परंतु काहीही झाले तरी हा किनारा न सोडण्याचा माझा निश्चय होता त्यामुळे तसाच चालत राहिलो . नदी वळणे घेत वाहत असल्यामुळे या प्रकारे चालताना सुमारे दहा-बारा किलोमीटर अंतर वाढले परंतु पावला पावलाला नर्मदा मातेचे दर्शन होत होते त्यामुळे त्याचे काहीही शल्य वाटले नाही . आता सर्वत्र शेती सुरू झाली होती . वाटाणा , हरभरा , गहू अशी शेती तुडवत मार्ग शोधावा लागत होता . या शेतामध्ये आलेली फुले मोठी सुंदर दिसत होती . छोटी छोटी शेते , बांधावरील अति अरुंद पायवाटा , कापलेले पाय फाडणारे गवत ,अंगाला चिकटणाऱ्या काटेरी व गवताच्या बिया हे सर्व सहन करत मार्गक्रमण सुरू होते . विशेषतः घातक पद्धतीने छाटलेले तुरीचे टोकदार देठ फारच भयानक ! तोल गेला की विषय संपला ! शंभर टक्के कुठेतरी घुसणार .अशी एकंदरीत सर्व परिस्थिती . वाटेमध्ये काही मोठ्या नद्या पार कराव्या लागल्या अगदी धोकादायक गतीने वाहणाऱ्या अशा या नद्या होत्या . इथे एका शेतामध्ये मला एक गुजराती माणूस भेटला . याचा एकंदरीत अवतार बघून हा परदेशी पर्यटक आहे असे मला वाटले परंतु त्याने नर्मदा परिक्रमा सुरू केलेली होती . त्याच्याकडे मोठा ट्रायपॉड ,चांगल्यापैकी 4 K व्हिडिओ कॅमेरा , लाईटचे सामान , तंबूचे सामान असे बरेच काही होते . त्यात भर म्हणून त्याने एका मोठ्या ट्रेकिंग सॅक मध्ये हे सर्व भरून आणले होते . त्याच्या त्या झोळीचे वजन सुमारे ४० किलो आसावे . त्याच्याशी बोलताना लक्षात आले की हा अमेरीकेतील मिशिगन विद्यापीठामध्ये फिल्म मेकिंग चा प्रोफेसर होता .आणि नर्मदा परिक्रमा करायची इतकेच डोक्यात ठेवून दोन महिन्याची रजा टाकून आला होता . बाकी त्याला परिक्रमेविषयी फारसे काहीच माहिती नव्हते . गडी वजनदार होता आणि त्याने सोबत रोज नवीन कपडे घालायचे अशा हिशोबाने बरेच कपडे आणले होते .त्याच्या सोबत असलेल्या सामानामुळे तो रोज फक्त पाचच किलोमीटर चालू शकत होता . मला त्याने एके ठिकाणी उभे राहून पोझ द्यायला सांगितली आणि त्याने माझे काही फोटो काढले . परंतु माझ्याकडे फोन नाही मग ते फोटो मला पाठवणार कसे असे म्हटल्यावर त्यांनी माझा ईमेल आयडी लिहून घेतला .प्राध्यापक अनल शाह असे त्याचे नाव होते. बिचारा चालून चांगलाच वैतागला होता . 
 हाच तो इंडो अमेरिकन परिक्रमावासी

माझे इंग्रजी बरे आहे कळल्यावर तो मला म्हणाला आता आपण एकत्र परिक्रमा करूयात . याच्या गतीने चालता येणे मला खरोखरीच शक्य नव्हते . शिवाय अमरकंटक वरून सडक मार्गाने आल्यावर त्याने नेमका हा कठीण किनारा पकडला होता . मी काही तास त्याच्यासोबत अनुकंपा तत्वावर चाललो . त्याचे हाल खरोखरीच मला बघवत नव्हते . शिवाय तो क्षणाक्षणाला व्हिडिओ घेत होता आणि फोटो देखील काढत होता . या पद्धतीने परिक्रमा पूर्ण करायला त्याला चार-पाच वर्षे तरी लागली असती आणि याच्याकडे रजा होती दोन महिने .हा मनुष्य मोठा मजेशीर होता . उत्तम गुजराती येत असून देखील शक्यतो इंग्रजीमध्ये बोलत होता . मूळचा हा बडोद्याचा . याने वाटेमध्ये एक मोठीच मजा केली . मजा कुठली कदाचित आमचा जीव गेला असता अशी क्रूर चेष्टा त्याच्या हातून चुकून घडली !इथे नर्मदा नदीचे पात्र वळणावळणाचे असल्यामुळे वाळू साठायला सुरुवात झालेली होती झालेली .आणि छोट्या छोट्या नावांमधून अवैध पद्धतीने वाळू उपसण्याचे काम जोरात सुरू होते .या वाळू माफिया लोकांवर सरकारच काय कोणाचेही बंधन नसते . त्यांना हवी तेवढी वाळू ते नदीपात्रातून गोळा करतात म्हणजे करतातच . त्याला विरोध करणाऱ्या जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा पोलिसांवर प्राणघातक हल्ले झाल्याची अनेक उदाहरणे आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो . अशा पद्धतीने आमच्या समोरच पलीकडच्या तटावर वाळू उपसा चालू होता . आणि अनल भाऊने आपला ट्रायपॉड लावून त्यांचे शूटिंग चालू केले . काठावर काही स्त्रिया स्नान करीत बसल्या होत्या . त्यादेखील याच्या चित्रणामध्ये येऊ लागल्या . समोरच्या एका माणसाने आम्हाला बघताच इशारा केला आणि एका क्षणात नावेतील सर्वांनी पाण्यामध्ये उड्या मारून सर्वांनी पाण्याखाली दडी मारली ! हे लोक उत्तम पाणबुडे असतात . पाण्याखाली दहा पंधरा वीस फुटापर्यंत जाऊन वाळू उपसून वर आणतात . काठावरील स्त्रियांनी देखील पाण्यामध्ये उड्या मारल्या . हा संपूर्ण आदिवासी वनवासी परिसर असून इथले लोक अतिशय संवेदनशील आहेत याची त्या महाविद्वान प्राध्यापकाला काहीच कल्पना नव्हती . शिवाय हा कोणीतरी सरकारचा एजंट आला आहे (आपले अवैध धंदे टिपायला ) असा गैरसमज होऊन त्याच्यावरती कदाचित हल्ला झाला असता . परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मी सर्वांना आरडाओरडा करून बाहेर बोलावले . आणि मोठ्या आवाजात ओरडून सांगितले की हा कोणीही सरकारचा मनुष्य नसून अमेरिकेवरून आलेला एक परिक्रमावासी आहे . मग त्या सर्वांचा जीव भांड्यात पडला . तरीदेखील त्यांनी स्नान करीत असलेल्या स्त्रियांचे चित्रीकरण करण्यास तीव्र आक्षेप नोंदविला . मी ते अनल शाह याला समजावून सांगितले . इथून पुढे त्याने कुठल्याही प्रकारचे चित्रीकरण करताना काय काय काळजी घेतली पाहिजे याच्या सूचनाच त्याला मी ऐकवल्या . तो इतक्या दुर्गम भागामध्ये आला होता आणि इतका "माल" घेऊन सोबत बाळगून होता की त्याला कधी कुठे काय झाले असते याचा काहीही नेम नव्हता . याचे बऱ्यापैकी शिक्षण अमेरिकेतच झालेले होते . शिक्षणाने तुम्हाला माहिती भरपूर मिळते परंतु ज्ञान मिळेलच याची खात्री नसते . असो .
जीवावरचा हा प्रसंग टळल्यावर आम्ही अजून थोडे पुढे चालू लागलो असता समोर असे काही दृश्य दिसले की मला प्रश्न पडला की नर्मदा अचानक उलटी कशी काय वाहू लागली ? गप्पा मारत चालताना चुकून माझ्याकडून नर्मदा नदी पार तर नाही ना झाली ? माझी परिक्रमा खंडित झाली की काय ? असे अनेक प्रश्न मला भेडसावू लागले . खरे तर ही मला आडवी आलेली पहिली मोठी उपनदी होती . हिचा आकार ,प्रकार हुबेहूब नर्मदे सारखाच होता फक्त पाण्याचा प्रवाह डावीकडून उजवीकडे वाहत होता . मला एक क्षणभर काहीच कळेना . इतक्यात अनल शहा ने गुगल मॅप वर पाहिले की ती नर्मदा नाही .
लाल रंगाने दाखविलेली हीच ती नदी जिने  क्षणभर माझ्या तोंडचे पाणी पळविले
 परंतु तिचे तट इतके उंच होते की पात्रामध्ये उतरायला जागाच नव्हती . साधारण चार-पाचशे मीटर उलटे चालत गेल्यावर एक छोटीशी ढलान सापडली जिथून मी अनल ला त्याच्या सामानासकट सावकाश खाली उतरवला . आता ही नदी पार करायची होती . साधारण गुडघाभर पाणी असावे . परंतु पाण्याला अतिशय वेग होता आणि त्यातून चालताना तोल जाण्याची खूप शक्यता होती . अनल शहा म्हणाला मी ही नदी पारच करणार नाही ! आता आली का पंचायत ! मी त्याला खूप सांगून पाहिले की इतके काही अवघड नाही परंतु तो तयार होत नव्हता . अखेरीस मी त्याला खूप जास्ती विनवण्या केल्यावर तो कसाबसा तयार झाला . बरे तो त्याचे सामान देखील माझ्याकडे द्यायला तयार नव्हता . कदाचित त्याला मनोमन असे वाटत असावे की मी त्याची बॅग घेऊन पळून जाईन ! सारीच मज्जा ! त्या नदीचे पाणी कोमट होते इतके मला पक्के स्मरणात आहे . कशीबशी ती नदी पार केल्यावर मात्र मी अनल भाऊ शाह यांना एक प्रदीर्घ नमस्कार करून तिथून नर्मदे हर केले ! आज माझे पाय अजिबात दुखत नव्हते . त्यामुळे आज भरपूर चालायचे मी ठरवले . वाटेमध्ये छोटे छोटे आदिवासी टोले लागत होते . तिरंगी गावातून निघाल्यावर मी भीम कुंड पंचधारा पार करून नर्मदा टोला , बंजर टोला , तेलीटोला ,रहंगी , लाल खाटी अशी गावे पार केली . ही गावे इतकी लहान आहेत की गुगल नकाशावर सुद्धा त्यांची नावे कोणी टाकलेली नाहीत . प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन जो फिरणार त्यालाच ही नावे माहिती होणार . नकाशावरीलच गावे सांगायचे तर मी आज पकरी रयत , रहंगी रयत , पाटण रयत , गोरखपूर रयत अशी मोठी गावे पार केली . जेव्हा मी गावे पार केली असे म्हणतो तेव्हा कदाचित वाचकांना असे वाटू शकते की मी गावांमधून चाललो की काय परंतु त्या त्या गावाच्या हद्दी मधून जाणारी नर्मदा नदी पार केली असा त्याचा अर्थ समजून घेणे . इथे मैयाचे पात्र फार सुंदर होते . कधी दहा-पंधरा फूट अरुंद तर कधी तीस चाळीस फूट रुंद . पाणी अतिशय स्वच्छ होते . वाटेत एका गावामध्ये शैला / सैला नृत्यकार भेटले . डोक्यात रंगीबेरंगी पिसांचे , फुलांचे तुरे खोचून ,रंगीत पिवळे धोतर व कपडे घालून ,पायात चाळ बांधून ,पखवाज आणि खोळ यांच्या मधले असलेले मांदर नावाचे एक ताल वाद्य आणि टिमकी याच्या तालावर पौष पौर्णिमेच्या आसपास या भागातील आदिवासी मंडळी नृत्य करत गावोगाव फिरतात .असाच एक आदिवासी समूह एका घराच्या बाहेर बसला होता त्यांनी मला चहा प्यायला बोलावले . मला संगीताची आवड असल्यामुळे उत्सुकतेने मी त्यांना त्यांच्या वाद्याबद्दल अधिक माहिती विचारून घेऊ लागलो . त्यांनी लगेच ते वाद्य माझ्या गळ्यात अडकवले . मग मीही त्यांच्या आग्रहास्तव मांदर वाजवायला घेतले . ते मला जमते आहे असे कळल्यावर त्यांनी बरेच ताल बदलून बदलून वाजविले व आम्ही सर्वांनी एकत्रित खूप आनंद लुटला ! आधी फक्त माझे वादन बघणारे आदिवासी हळूहळू एक एक करून आमच्या भोवती फेर धरून नाचू लागले आणि एक वेगळाच सोहळा अनुभवायला मिळाला ! 

शैला आदिवासींसोबत मांदर / मांदल नावाचे वाद्य वाजविणारा प्रस्तुत लेखक व सभोवती नाचणारे आदिवासी
हे सर्व करीत असताना एक आदिवासी तरुण या सर्वांचे चित्रीकरण करीत होता . त्याने ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . वाचकांना देखील आनंद घेता यावा म्हणून ते व्हिडिओ सोबत जोडत आहे . ज्यांना संगीताची आवड आहे किंवा तालाचे ज्ञान आहे त्यांनी आवर्जून हे व्हिडिओ पहावेत . 



वरील व्हिडिओमध्ये पांढरे कपडे , काळपट रंगाचा थर्मल आणि डोक्याला फेटा बांधून पायात पांढरे कॅनव्हास बूट घालून जो मनुष्य तुम्हाला दिसत आहे तोच प्रस्तुत लेखक होय . या तालामध्ये एक अतिशय धीर गंभीर गूढरम्यता आहे . सांगितिक परिभाषेमध्ये बोलायचं झाले तर या वादनामध्ये फारशी अदाकारी किंवा वादन वैचित्र्य नाही आहे परंतु तरी देखील मनाला शांत एकाग्र करणारा असा हा ताल आहे . विशेषतः सर्वजण मिळून नाचू लागल्यावरती जो एकत्रित सामूहिक आविष्कार तयार होतो तो फारच मंत्रमुग्ध करणारा आहे . हे वादन सुरू असताना प्रचंड थंडी पडल्यामुळे माझ्या हाताची बोटे गारठत होती परंतु त्या सामूहिक सांगितिक आविष्कारामुळे त्याचा विसर पडत होता . या सर्वांचा निरोप घेऊन पुढे चालू लागलो . नर्मदेच्या काठावरती मध्ये एक सिताराम बाबांचा आश्रम लागला .दुपारचा एक वाजला होता तरीदेखील थंडी प्रचंड जाणवत होती . या आश्रमामध्ये बहुतांश महिला सेवेकरी दिसत होत्या .एक नाथपंथीय बाबा तिथे आला होता त्याच्याभोवती सर्वजणी बसल्या होत्या . नाथपंथी बाबाचे वय फार नसावे . त्या स्त्रियांच्या वागण्यामुळे बाबा अस्वस्थ होत आहे हे मला जाणवत होते . परंतु वयाने लहान असल्यामुळे तो त्यांना काही बोलू शकत नव्हता . स्त्रियांची चेष्टा मस्करी जोरात सुरू होती . मी अंगणातच दरवाजासमोर उन्हामध्ये भोजन प्रसाद घेण्यासाठी बसलो . एका तरुण सेवेकरी मुलीने माझे भोजनाचे ताट आणून समोर ठेवले . त्या आश्रमाची काही चित्रे गूगल वर मिळाली ती सोबत जोडत आहे .या आश्रमामध्ये एक आलिशान गाडी उभी होती . एक छोटेसे मारुती मंदिर देखील होते .
याच आश्रमात मी भोजन प्रसाद घेतला
आश्रमातील मारुती मंदिर
आश्रमातील अखंड धुनी
आश्रमातील गुरुपरंपरा
आश्रमाच्या शेजारून वाहणारी सुंदर नर्मदा माता
त्या बाबाला माझ्यासमोर बसून काही महिलांनी भोजन भरविले . मी बर्फासारख्या थंडगार पाण्याने ताटली स्वच्छ धुऊन घेतली आणि तिथून काढता पाय घेतला . तिथले वातावरण मला फारसे आवडले नाही . परंतु परिक्रमेमध्ये या व अशा भावनांना काही थारा नसतो .तुमच्यासमोर जे काही घडते आहे ते तटस्थपणे पाहणे व पुढे चालू लागणे हा परिक्रमेचा मूलभूत नियम आहे . मुळात सर्वच माया असल्यामुळे तुमच्या समोर जे काही घडताना दिसते आहे ते प्रत्यक्षात तिथे घडत असेलच असे नाही , तर तो केवळ तुम्हाला दिलेला अनुभव आहे , इतपत अनुभवांचे वैविध्य ह्या परिक्रमेमध्ये नर्मदा मैया विविध परिक्रमावाश्यांना देते असे अनेक साधूंचे मत आहे . तिथे काय घडते आहे यापेक्षा तुमची प्रतिक्रिया काय आहे हे अधिक महत्त्वाचे आहे . आणि नर्मदा परिक्रमा ही एक साधना असल्यामुळे आपली प्रतिक्रिया साधकाचीच असली पाहिजे सिद्धाची नव्हे ! असो . भोजनानंतर मी बरीच गावे मागे टाकली . नर्मदा टोला , बंजर टोला , तेली टोला , रहंगी , लाल रयत अशी गावे पार करत चालताना शिवनी नामक नदीचे एक भव्य पात्र समोर आडवे आले आणि मी थबकलो. मला खरोखरीच कल्पना नव्हती की ह्याच्या पुढची माझी रात्र किती अविस्मरणीय ठरणार होती ...

अनुक्रमणिका


लेखांक तेहेतीस समाप्त ( क्रमशः)

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर