लेखांक ३२ : रामघाटावरची हाडे गोठवणारी थंडी
कडाक्याच्या थंडीमुळे आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे सकाळी डोळे उघडले तर मी अजूनही साष्टांग नमस्कार घातलेल्या अवस्थेतच होतो . समोरची शेकोटी पूर्णपणे विझून गेली होती . काल मी नर्मदेतून आणलेला भला मोठा ओंडका पूर्णपणे भस्मसात झाला होता .मी चटकन उठून कुटीच्या बाहेर आलो . त्या झोपड्यातून माझा दंड तेवढा सोडवून घेतला . आणि बाकीची कुटी तशाच अवस्थेत ठेवून झोळी उचलली . मागून कोणी गावकरी किंवा परिक्रमावासी आले तर त्यांना इथे कोणीतरी राहून गेले होते हे कळावे हाच हेतू .
सकाळचे सहा वाजले असावेत . अंधुक अंधुक दिसू लागले होते . सर्वत्र घनदाट धुके पसरले होते . थंडी हाडांपर्यंत शिरत होती . मला रामघाट गाठण्यासाठी अजून किमान १२ किलोमीटर चालायचे होते . आणि अजूनही मी वनराजाच्या अर्थात वाघाच्या टप्प्यामध्येच होतो . त्यामुळे मी नर्मदा मातेला वंदन केले आणि ताबडतोब तिथून धूम ठोकली . रात्री पोटभर जेवल्यामुळे आता पायांना चांगली गती आली होती . मुख्य म्हणजे रोज सकाळी जाणवते तशी शौच विसर्जनाची गतीच पोटाला जाणवत नव्हती . इतके पोटभर जेवून देखील पोट अगदी हलके हलके वाटत होते . नर्मद सिंगने रात्री सांगितले त्याप्रमाणे समोर एक पायवाट दिसत होती . ती पकडून मी अक्षरशः धावायला सुरुवात केली . नर्मदा पुन्हा हळूहळू लांब निघून गेली परंतु पायवाट सोडायची नसल्यामुळे सरळ रेषेत चालत राहिलो . झपाझप पावले टाकत जाताना शेवटी व्हायचे तेच झाले . एक रुंदसर ओढा ओलांडताना मूळ रस्ता सुटला आणि सुमारे दोन तास त्या घनदाट जंगलामध्ये बेकार भटकलो . गेले दोन दिवस अशा पद्धतीने जंगलामध्ये भटकण्याचा माझा चांगला सराव झाला होता त्यामुळे यावेळी फार काही भीती वाटली नाही . सर्वत्र दाट झाडी आणि भरपूर पालापाचोळा होता . या संपूर्ण कालावधी मध्ये मी चार ते पाच मोठे ओढे पार केले . यातील काही ओढे तर अत्यंत खोल होते . मी असा विचार केला की यातीलच एखादा नाला पकडावा आणि नर्मदा मातेचे पात्र गाठावे . असा विचार करून चालत असताना समोर एक मोठा औरस चौरस ओढा आडवा आला . हा चांगला वीस-बावीस फूट खोल खड्ड्यातून वाहत होता . मी त्याच्या काठावर उभा राहून विचार करू लागलो की आता याला पार कसे करायचे ? इतक्यात मला काही कळायच्या आत सर्व जंगल हलते आहे असा भास झाला ! आणि माझ्या पायाखालची वाळूयुक्त जमीन सरकून , तुटून मी थेट त्या ओढ्याच्या पात्रामध्ये अलगदपणे पडलो ! ते भूस्खलन खरोखरीच सुखदायक होते ! पुन्हा वर जावे आणि पुन्हा तसेच खाली पडावे असा एक मजेशीर विचार डोक्यात येऊन गेला ! परंतु प्रयत्नपूर्वक सुद्धा वरती जाता येणे आता शक्य नव्हते . कारण दोन्ही बाजूला वाळूच वाळू होती .वाळूच्या त्या उभ्या भिंती पहात पहात मी ओढ्यातूनच चालायला सुरुवात केली . मध्ये मोठे मोठे वृक्ष उन्मळून पडले होते . त्यातील एका खोडावर चढून मी वरती जायचा प्रयत्न केला परंतु प्रचंड कडकडून चावा घेणाऱ्या मोठ्या डोंगरी मुंग्यांनी ते झाड भरलेले आहे असे पाहिल्यावर पुन्हा ओढ्यात उडी मारली . आता हा ओढा सोडायचा नाही असा विचार करून मी त्या पत्रातून चालत राहिलो . त्याचे पाणी कधी घोटाभर , कधी गुडघाभर तर कधी कमरे एवढे होत होते . त्या ओढ्याने दोन्ही बाजूला केलेला विध्वंस बघता पावसाळ्यामध्ये हा किती भरून वाहत असेल याचा मी अंदाज लावला . पावसाळ्यामध्ये हा ओढा ओलांडणे सोडा त्याच्या जवळपास उभे राहणे देखील अशक्य होत असेल . ओढ्यातूनन चालता चालता अचानक मला समोर ओळखीचा तो रंग दिसू लागला ! रेवारंग ! नर्मदा मातेच्या पाण्याचा तो रंग पाहता क्षणी खूप आनंद झाला ! अशा पद्धतीने त्या ओढ्याने मला सुखरूप नर्मदेच्या पात्रात आणून सोडले . काल मुक्काम केला तिथे पाच दहा फूट लांबीची असलेली नर्मदा इथे मात्र चांगली तीस-पस्तीस फूट रुंदी ने वाहत होती वाहात होती . मध्ये तिला येऊन मिळणारे ओढे नाले तिची जलसंपदा वाढवीत होते . आता पुन्हा मी किनारा पकडला . इथे अजूनही घनदाट जंगल असल्यामुळे काठाने चालता येणे कठीणच नव्हे तर अशक्यच होते .मी नर्मदा मातेकडे पहात हतबल उभा राहीलो आणि मनोमन प्रार्थना केली की माते मला मार्ग दाखव . इतक्यात एक छोटीशी गुरांची पायवाट मला सापडली . याच वाटेने वरती जंगलामध्ये चालणारी गुरे खाली पाणी प्यायला येत असणार असा अंदाज बांधत मी त्या वाटेने वरती उलटे चालायला सुरुवात केली . आणि पाचच मिनिटांमध्ये मी त्या मोठ्या पायवाटेला पुन्हा येऊन मिळालो . नर्मदा माता अशा पद्धतीने पदोपदी आपल्याला अंतःप्रेरणेच्या रुपाने मार्गदर्शन करत असते .इथून वेगाने चालत असताना अचानक जंगल विरळ होते आहे असे मला जाणवले . आजूबाजूला तोडलेली लाकडे वगैरे दिसू लागली .थोड्यावेळाने तर उजव्या हाताला मोठे तार कुंपण लागले . आणि समोरून एक डांबरी रस्ता आडवा गेला होता व त्याच्या पलीकडे शेती चालू होत होती .
मी वरती वर्णन केलेला मार्ग या नकाशा मध्ये पहावा . उजवीकडून वाहते आहे ती नर्मदा नदी आहे . डावीकडे पिवळ्या बाणाने दर्शविलेला पायवाटेचा मार्ग आहे आणि मी भटकलेला मार्ग हिरव्या रंगाने दाखवलेला आहे .वरच्या डावीकडच्या टोकाला डांबरी रस्ता राखाडी रंगात दिसत आहे .
आजूबाजूला कोणीच नव्हते . इतक्यात शेतामधून कोणीतरी मला हात करते आहे असे दिसले .नर्मदे हर असा पुकारा करत मी त्या माणसाच्या दिशेने धावलो .आता आपल्याला वाघाचे काहीही भय नाही या विचाराने मन सुखावले ! तो शेतकरी माझ्याकडे पाहून अतिशय आश्चर्यचकित झाला आहे असे माझ्या लक्षात आले . इतक्यात आजूबाजूच्या चार-पाच शेतामध्ये काम करणारे सर्वच शेतकरी हळूहळू तिथे गोळा झाले . "नर्मदे हर बाबाजी ! " एक जण म्हणाला . "आप यहां से कहां से आए भगवन् ? " " अमरकंटक से आया प्रभु । "
"हां । वह तो हम जान गए , कि आप अमरकंटक से ही आए होंगे । लेकिन यहां से कैसे आए ? " "मैं कुछ समझा नहीं । " मी म्हणालो . "मतलब अमरकंटक से अगर सुबह निकलते हैं तो हमारे पकरीसोढा गांव में पहुंचते पहुंचते अंधेरा हो जाता है । आप तो सुबह १० - ११ बजे ही पहुंच गए ।यानी आप अमरकंटक से नहीं आए । " शेतकरी म्हणाला . मला त्याचा मुद्दा लक्षात आला . मी म्हणालो , " वैसे तो आप सही बोल रहे हैं । हम अमरकंटक से परसो ही निकले थे । " "अरे बाप रे ! तो रास्ते मे आपने मुकाम कहां कहां पर किया ? " एक शेतकरी चिंतातूर चेहऱ्याने विचारू लागला . "कल मैं रामदास बाबा के इधर रुका था । उसके बाद ...उसके बादमें जंगल में ही रुका रहा और सुबह उठकर चला आया । " " बाप रे ! क्यों मैया को परेशान करते हो बाबा जी ? " चिडून एक जण म्हणाला .
" मतलब ? "
"अरे मतलब क्या मतलब? आप परिकम्मावासी ऐसे कांड करते हो और मैया को चौकन्ना रहना पड़ता है रात भर । और खाने-पीने का क्या इंतजाम किया था ? "
मी म्हणालो , " खाना ? वह तो रात को १० बजे के करीब दमगढ़ से एक आदमी ले आया था । एकदम गरमागरम ! " माझा चेहरा आनंदाने फुलाला होता .
आता मात्र सर्व शेतकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले . त्यातला एक वयस्कर शेतकरी म्हणाला , " देखिए बाबा जी हमारी उम्र बीत गई इस जंगल में । आप जिस रास्ते से आए वहां से दमगढ़ तकरीबन दो ढाई किलोमीटर दूर है । वह भी सामने के तट पर । और हमारे यहां जब जंगल में कोई बडा जानवर ( वाघ ) निकलता है तो शाम को ४ बजे के बाद कोई भी घर से बाहर नहीं निकलता । पेशाब टट्टी के लिए तक बाहर कोई नहीं निकलता । और आप बोल रहे हैं की रात को १० बजे , वह भी ढाई किलोमीटर दूर दमगढ़ से कोई आपके लिए ,उस तटसे इस तटपर ,गरमा गरम खाना ले आया था , तो वह केवल असंभव है । "
"नर्मदा मैया की कसम बाबा ,सच में वह आया था । " "इसीलिए तो हम कह रहे थे क्यों मैया को परेशान करते हो ! अब आइंदा ऐसी हरकत मत करना । " "ठीक है बाबा ।हमें माफ करना । " पडेल स्वरामध्ये मी त्या सर्वांची क्षमा मागितली . "पहिली परिक्रमा है क्या ? " एकाने विचारले . मी होकारार्थी मान हलवली . " तो फिर इतना खतरनाक आयडिया आपके दिमाग मे आया कैसे ? इस जंगल रास्ते से तो जादा तर नागा साधू निकलते है । " मी म्हणालो , " देखो भैय्या ,जब से हमने परिक्रमा उठाई है हमने खुद का दिमाग लगाना बंद कर दिया है । हम कल सुबह जल्दी निकलने वाले थे ।लेकिन रामदास बाबा ने हमें रोक के रखा । और दोपहर को ३ बजे के करीब बोला कि अब आगे चले जाना । " "ऐसा ! तो फिर बहुत अच्छे ! अगर रामदास बाबा ने बोला है तो वही करना है ! वैसे उनकी तबीयत कैसी है ? चल फिर पा रहे है के नही ?" "अच्छा खासा चल लेते हैं । कल हमें छोड़ने के लिए एखाद दूई किलोमीटर आगे आए थे । " मी म्हणालो . रामदास बाबा स्वतः दोन किलोमीटर चालत आले हे ऐकल्यावर त्या सर्वांनाच खूप आनंद झाला ! या आनंदवार्तेने तिथले तंग वातावरण एकदम बदलूनच गेले .आणि सर्वांनी मोठ्या आनंदाने मला निरोप दिला . जाताना पुन्हा एकदा मी काठानेच चालणार आहे हा माझा निश्चय ऐकल्यावर त्यांनी मला काठा काठाने जाण्याचा मार्ग देखील सांगितला . नर्मदा खंडातील लोक खरोखरीच खूप चांगले आहेत . पकरी सोंढा गावामध्ये बेलघाट नावाचा छोटासा घाट आहे तो पाहून मैयाच्या काठाकाठाने पुढे निघालो . पूर्ण वेळ नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालत होतो . हा एक अतिशय विलक्षण आणि अद्भुत अनुभव होता . काल जंगलाला बाजूला सारत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू पाहणारी बाल नर्मदा आता एखाद्या जाणकार दशवर्षीय मुलीप्रमाणे भासत होती . अजूनही डोंगर चढ-उतार असा प्रदेश असल्यामुळे नर्मदा माता प्रचंड वळणे वळणे घेत वाहात होती . तिला मध्येच येऊन मिळणारे ओढ़े नाले देखील असंख्य होते . या सर्वच जलप्रवाहातील पाणी इतके स्वच्छ व शुद्ध होते की ते निःशंकपणे कोणीही कितीही प्यावे . नर्मदेचे पात्र पूर्णपणे निर्मनुष्य होते . फक्त ती आणि मी ! किनाऱ्यावर वाळू खडक चढ-उतार असे सर्व मिश्रण होते . तिथे मानवी वावर असेल असे सुचविणारी एकही खूण दिसत नव्हती . आजूबाजूला अजूनही झाडी होतीच फक्त आता ती विरळ झालेली होती . इतक्यात मला समोर ओळखीची जागा दिसू लागली ! पाहिल्यावर लक्षात आले की हा तर निळकंठ आश्रम आहे ! इथे पात्र इतके छोटे झाले होते की पलीकडे दोन उड्या मध्ये जाता यावे . मी या तटावरून गौतम गिरी बाबांना आवाज देऊ लागलो . आतून एक दुसरा तरुण साधू पळत बाहेर आला आणि त्याने मला गौतम गिरी बाबा गावाला गेले असल्याचे सांगितले . त्यादिवशी निळकंठ आश्रमातून निघताना मी सुरक्षित जाईन का नाही याची काळजी गौतमगिरी बाबांना वाटत होती असे मला लक्षात आले होते आणि नेमका त्याच संध्याकाळी भयंकर पाऊस देखील मला लागला होता . त्यामुळे मी सुखरूप पुढे गेलो आणि पुढे परिक्रमेला मार्गस्थ देखील झालो हे त्यांना कळविणे आवश्यक होते .तसा निरोप त्या साधू जवळ दिला आणि पुढे निघालो . दोन दिवस अतिशय कठीण जंगलातून केलेल्या प्रवास डोक्यात ताजा होता त्यामुळे की काय परंतु हा नर्मदा मातेचा टापू मला अतिशय म्हणजे अतिशय आवडला ! इथे नर्मदा मातेचे स्वच्छ शुद्ध निखळ नितळ स्फटिका सारखे पाणी इतक्या सुंदर आणि विविध रूपांमध्ये वाहत होते की त्याचे वर्णन करण्यापेक्षा जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे अधिक आनंददायी ठरावे ! इथे नदीकाठी अतिशय विरळ गावे आहेत . जी काही गावे आहेत ती नुसती नावाला गाव म्हणण्यासारखी आहेत . ना इथे रस्ते ,ना इथे पक्की घरे ,ना इथे दुकाने वगैरे . काहीही नाही . काठाने चालण्याचा मार्ग आहे एवढे मात्र खरे . नर्मदा मातेच्या काठाने चालण्यासाठी मार्गच उपलब्ध नाही असे लोक कसे काय सांगतात हा मला अजूनही पडलेला अनुत्तरित प्रश्न आहे . असो . नर्मदा टोला नावाचे गाव लागले . गाव कसले ४ -२ घरांची वस्तीच . इथला किनारा सोडलाच नाही आणि पुढे खाटी या गावातील बेलघाट म्हणून जो प्रसिद्ध घाट आहे त्याचे समोरील तटावर दर्शन घेतले . हे करेपर्यंत मध्यान्ह उजाडली होती . पोटामध्ये कावळे ओरडू लागले होते . हा सर्व प्रांत किती सुंदर आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून त्या भागाचा एक नकाशा आपल्या माहितीकरता जोडत आहे .
नर्मदे काठची विरळ झाडी आणि त्यातून वाहणारी वाहणारी निर्मनुष्य नर्मदा बाला
यातील डाव्या बाजूच्या तटाने मी चालत होतो . इथे एका टेकाडावर छोटीशी कुटीया दिसली . राजेंद्र गिरी नावाचा एक तरुण साधू इथे रहात होता . तो जुना आखाड्याचा होता . त्याने मला एका झाडाच्या सावलीमध्ये बसायला आसन लावले . त्याच्या या छोटेखानी आश्रमाच्या समोर चार-पाच लोक शेकोटी करून उन्हामध्ये शेकत बसले होते . होय भर दुपारी हे लोक शेकोटी करून बसले होते कारण थंडीच तशी पडलेली होती . मी देखील माझे आसन उन्हामध्ये आणून ठेवले आणि बसलो .मगच बरे वाटू लागले . अंगावरचे वस्त्र घामाने भिजले होते ते काढून मी एका दोरीवर वाळत टाकले . कारण त्याची देखील थंडी वाजू लागली होती . या भागामध्ये मी ज्या प्रकारच्या थंडीचा अनुभव घेतला तशी थंडी आपल्या महाराष्ट्रामध्ये फारशी पडत नाही . साधू कुटीमध्ये छान गोमातेची सेवा देखील करत होता . त्याच्या कुटीकडे येण्यासाठी एक छोटीशी पायवाट होती . आणि त्या पठारावरून वाहत येणाऱ्या पाण्याला छोट्याशा झऱ्याचे स्वरूप देऊन त्याने त्या वाटेमध्ये सुंदर पाणी पिण्याचे स्थान तयार केले होते . साधू स्वयंपाकाला लागला आणि त्याचे सर्व शिष्य मनसोक्त गांजा पीत बसले होते . मला विचारू लागले की तुम्ही गांजा पिणार का ? मी नम्रपणे नकार दिला . इथे तुम्ही कुठल्याही गोष्टीला नाही म्हटल्यावर लोक फारसा आग्रह करत नाहीत . हे सर्व शेतकरी लोक होते . नर्मदेच्या काठावर आता हळूहळू छोटी मोठी शेती दिसू लागली होती . साधूने आतून गरमागरम टिक्कड आणि हरभरा पातीची भाजी करून आणली . माझी थाळी घेऊन मी तयारच बसलो होतो . त्याने मला भरपेट जेऊ घातले . माझे जेवण होईपर्यंत तो समोरच उभा होता . काय हवे काय नको ते पहात होता . इथपर्यंत येण्याकरिता मलाच इतके कष्ट पडले होते तर याने हा सर्व शिधा , ती सामुग्री इथपर्यंत कशी आणली असेल याचा वाचकांनी फक्त विचार करून पहावा . अत्यंत गरिबी असून देखील नर्मदे काठी राहणारे लोक नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी काय वाटेल ते करायला तयार होतात .या आश्रमाच्या टेकड्यावरून नर्मदा मातेचे खूप सुंदर दर्शन होत होते . या भागात ही मोठी मोठी वळणे घेत येते तो सर्व परिसर इथून मोठा रम्य दिसत होता . आता परतल्यावर मी तो गुगल नकाशावर शोधून काढला आणि त्या कुटीची जागा मला सापडली त्याचे चित्र आपल्यासाठी खाली देत आहे .
भोजन झाल्यावर मी थोडीशी पाठ टेकली परंतु तो गांजाचा वास मला त्रासदायक ठरू लागला . त्यामुळे मी ते "पॅसिव्ह स्मोकींग " टाळून पुढे निघण्याचा निर्णय घेतला . साधूने राहण्याचा आग्रह करून पाहिला परंतु मला पुढे जायचे आहे हे लक्षात आल्यावर त्याने मला प्रेमाने निरोप देखील दिला . ही व्यक्ती पुन्हा आपल्याकडे येणार नाही आहे आणि आपल्याला काहीही लाभ देणार नाही आहे हे माहिती असून देखील त्या व्यक्तीसाठी इतके सारे करणे हीच आपली थोर भारतीय संस्कृती आणि परंपरा आहे .हिचा प्रत्येकाने अभिमान बाळगलाच पाहिजे . कुटीच्या दुसऱ्या बाजूला देखील भरपूर उतार होता . तो उतरून मी चालायला सुरुवात केली . आता पुन्हा मी काठाकाठाने निघालो होतो परंतु आता मात्र झाडी कमी होऊन शेती सुरू झाली होती . इथली शेतं छोटी छोटी होती . अगदी नर्मदेच्या काठापर्यंत लोक शेती करत होते . कागदो पत्री बोलायचे तर मी खन्नतमाळ आणि किरंगी माळ अशा दोन गावांच्या हद्दी आता पार केल्या होत्या . माळ हा शब्द आपण मराठीमध्ये वापरतो त्याच अर्थी मध्य प्रदेशात देखील वापरला जातो . तसेच आपल्याकडे वाडी किंवा वस्ती म्हणतात तशा अर्थी इथे टोला अर्थात टोळी असा शब्द वापरतात . म्हणजे मला वाटेत लागलेला नर्मदा टोला हा कुठल्यातरी एका गावाचा टोला अर्थात फुटकळ छोटीशी मानवी वसती होती . इथे मला राम घाट नावाचे एक स्थान लागले . साडेतीन-चार चा सुमार होता परंतु फारच थंडी वाजू लागली होती . आता पुढे जवळ कुठला आश्रम नाही असे लोकांनी सांगितल्यामुळे मी रामघाट आश्रमामध्ये मुक्काम करण्याचा निर्णय घेतला . सुदैवाने गुगलवर राम घाटाची काही चित्रे मिळतात त्याच्या साह्याने तुम्हाला रामघाट कसा होतो कसा होता ते सांगायचा प्रयत्न करतो .
नर्मदा काठावरील रामघाट , मोठी आडवी खोली आणि शेजारील पूलच्या
राम घाट हा आश्रम नर्मदेच्या अगदी काठावर आहे आणि इथे नर्मदा मैया एका बाजूने कातळ खडकाला कापून अतिशय खोल खोल वाहते आहे आणि पुढे एक तीव्र वळण ती घेते.
इथे आरसीसी मध्ये छोटेसे बैठे मंदिर बांधलेले असून समोर चांगली मोठी जुन्या पद्धतीने शेणाने सारवलेली आडवी लाकडी खोली आहे व तिचे दोन भाग करण्यात आलेले आहेत . आत मध्ये बजरंग बली आणि महादेव अशी मंदिरे आहेत परंतु त्यांना भिंती नाहीत फक्त खांब तेवढे बांधलेले आहेत . आश्रमाला छोटेसे दार आहे .
नर्मदे हर ! असा आवाज दिल्याबरोबर एक वयस्कर पुजारी बाहेर आले आणि त्यांनी मला आत मध्ये येऊन आसन ग्रहण करण्याची विनंती केली . समोर एक लाकडी खाट पडली होती त्याच्यावर माझे सर्वसामान मी ठेवले आणि खाली बसलो . आशा खाटे ला इथे तखत असे म्हणतात आणि त्यावर शक्यतो फक्त संन्यासी व साधू लोकच बसतात असा संकेत आहे . इथे बंजारा समाजाचे दोन बंधू आणि एक रामचरण तिवारी नावाचे पंडित असे तिघे मिळून सेवा करण्याकरता राहत होते .
इथे मला भेटलेले वृद्ध सेवेकरी . मी गेलो तेव्हा आता चालू असलेले बांधकाम अस्तिवात नव्हते .
मागे तिघांच्या रहाण्याच्या खोल्या दिसताहेत .
तिघांची वये सत्तरीच्या पुढची होती त्यामुळे तिघेही बऱ्यापैकी थकलेले दिसत होते परंतु तरीदेखील सेवा करण्याचा त्यांचा उत्साह व इच्छाशक्ती खूपच दांडगी होती त्यामुळे त्यांचे हे सेवा कार्य अविरत सुरू आहे . वरती मी सांगितली ती आडवी खोली त्यातील डाव्या भागात दोघे भाऊ राहायचे आणि उजवीकडे पंडितजी राहायचे . पंडितजींनी बाहेर बसण्याकरता मोठा कट्टा करून घेतला होता . बहुतेक लोक त्यांना भेटायला तिकडे येत असत .
आश्रमाच्या कुंपणा शेजारी महादेवाची एक पिंड स्थापन केलेली होती .
आश्रमाच्या बाहेर पडले की लगेच नर्मदा मातेचे असे विलोभनीय दर्शन व्हायचे . मुख्य गंमत म्हणजे नर्मदा मातेचे इतके मोठे पात्र उगमापासून यापूर्वी कुठेही दिसलेले नव्हते . इतका वेळ अवखळ खळखळाट करत वाहणाऱ्या नर्मदा बालेला आता एका खोल धीर गंभीर नदीचे स्वरूप प्राप्त झाल्यासारखे वाटत होते .
मी देवदर्शन करून पुन्हा खाटेपाशी येऊन बसलो . आपण ज्या कुठल्या आश्रमामध्ये किंवा मठ मंदिरामध्ये उतरतो तेथील आराध्य दैवतांचे दर्शन आणि जी काही पडेल ती सेवा करणे हे परिक्रमावासीने आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे हे मला मोहन साधूने शिकविलेले होतेच त्याप्रमाणे सारी दर्शने करून येऊन बसलो . पंडित जी माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले , "तखत पे बिराजिये । " मी त्यांना म्हणालो , " पंडित जी मै गृहस्थी हू ।नीचे ही ठीक हू। " पंडित जी बोलले , " वह बात नहीं है । लेकिन यहां जमीन पर आसन लगाओगे तो यहां की ठंड सह नहीं पाओगे । आप चाहो तो कमरे के अंदर भी अपना आसन लगा सकते हो । " परंतु मी विचार केला उगाच कशाला यांना त्रास द्यायचा म्हणून मी बाहेरच झोपायचा निर्णय घेतला . तो निर्णय किती चुकीचा होता हे लवकरच त्या रात्री मला उमगले ! असो .
मग त्या मजबूत लाकडी खाटेवर बसूनच मी माझी पूजा अर्चा उपासना आटोपली आणि बसून राहिलो . आता मला फारच थंडी वाजू लागली . माझी एक शाल त्या तंबूमध्ये राहिली होती आणि माझ्याकडे एकच शाल उरलेली होती . ती गुंडाळून माझी थंडी काही भागेना . पंडितजींनी मला दोन गोधड्या आणून दिल्या . इकडे छोट्या गावांमध्ये कुठेही कोणीही आले तरी त्याची बातमी लगेच गावभर पसरते तसेच काहीसे झाले आणि समोरच्या तटावर असलेल्या आश्रमातील एक महाराज मला भेटायला म्हणून मुद्दाम आले . थंडीमुळे आणि भरपूर चालल्यामुळे आणि मुख्य म्हणजे इतके चालण्याची पायांना सवय नसल्यामुळे माझे पाय प्रचंड दुखत होते . या महाराजांसोबत बराच वेळ गप्पा मारत बसलो . इथे आश्रमा शेजारी असलेला छोटासा पूल ओलांडला की समोरच्या काठावर भूलकाहा टोला अथवा परडिया नावाच्या गावामध्ये यांचा 'माँ रेवा सुभग कुटी ' नावाचा आश्रम होता . बेलघाटाच्या आधी हा आश्रम उत्तर तटावर चालताना लागतो . लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेल्या या गोऱ्यापान महाराजांचे नाव विवेक कुमार मिश्रा असे होते व त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक देखील मला वहीत लिहून वहीत लिहून दिले .ते असे ८० ८५ ४१ ८५ २२| ७५ ८० ९९ १४ २२ .
मी पुण्याचा आहे म्हटल्यावर त्यांनी मला सलील पालकर नावाच्या एका परिक्रमा वासी ला फोन जोडून दिला जे स्वतः पुण्याचे आहेत व वडगाव बुद्रुक येथे राहतात . मी त्यांना फोन केला तेव्हा ते त्यांच्या आजवर झालेल्या एकूण तीन नर्मदा परिक्रमांपैकी दुसरी नर्मदा परिक्रमा करत होते आणि संपूर्ण सामानासकट नर्मदा मैया मध्ये पडून पूर्णपणे भिजलेले होते . एका दगडावरून दुसऱ्या दगडावर उडी मारताना त्यांचा तोल गेला व नर्मदा मैया मध्ये ते पडले आणि तितक्यात आम्ही त्यांना फोन केला असे ते झाले होते ! त्यांचा भारदस्त आवाज आणि मैया मध्ये ते कसे पडले याचे वर्णन ऐकून आम्ही सर्वचजण हसू लागलो !
अति उच्च रक्तदाबा सारख्या गंभीर व्याधीवर मात करत तीन नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे वडगाव बुद्रुक पुणे येथील श्री सलील पालकर
श्री सलील पालकर यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल वर नर्मदा परिक्रमेचा एकमेव व्हिडिओ टाकलेला आहे जो छोटासा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला एकत्र चालणाऱ्या परिक्रमा वाशींची परिक्रमा कशा स्वरूपाची असते त्याचा लगेच अंदाज येईल .त्या व्हिडिओचा दुवा खालील प्रमाणे .
परिक्रमा पूर्ण झाल्यावर सलीलजी यांना विनंती केल्यावर त्यांनी त्यांच्या परिक्रमेचे काही फोटो पाठवले . ते आपल्याकरता इथे देत आहे .
नर्मदा पूजन करताना अशा प्रकारे सूर्यास्तापूर्वी दंड कमंडलू समोर ठेवून नर्मदेच्या प्रतिमेचे आणि बाटलीचे पूजन केले जाते . पूजा करण्याचे स्थान नर्मदा मातेच्या जितके जवळ तितका आनंद अधिक मिळतो !
नंतर देखील त्यांना कधीतरी भाष केल्यावर नर्मदा मैया या विषयावर ते तासंतास बोलतात ! असो .थोड्याच वेळात पांढरे कपडे घातलेली एक अतिशय सुंदर वृद्ध महिला त्या आश्रमाच्या दारातून सारखी जाते आहे व आत डोकावून पाहते आहे असे माझ्या लक्षात आले . मी तिला हाताने आत मध्ये बोलवले . तिच्या हातामध्ये ती काही झाडे घेऊन आली होती . आल्या आल्या ती तिवारी पंडित जी मिश्रा पंडित जी आणि माझ्या पाया पडली . अगदी पायाला स्पर्श करून तिने नमस्कार केला . मी देखील तिला फिरून नमस्कार केला असता ती म्हणाले की आप मेरे पाव मत पडना । मै हरिजन हू । मी म्हणालो मग तर फारच चांगली गोष्ट आहे ! तुम्ही हरिजन म्हणजे हरीचे लोक !आम्ही अजून तेवढी पात्रता प्राप्त केलेली नाही , प्रयत्न करतो आहोत . म्हणूनच परिक्रमा वगैरे करतो आहोत . परंतु एक गोष्ट नमूद करतो की इथे उपस्थित असलेल्या दोनही ब्राह्मण पुजाऱ्यांनी तिला स्पर्श करण्यापासून परावृत्त केले नाही किंवा आत येऊ नको बाहेर जा वगैरे असे देखील काही बोलले नाहीत . तर ती तिथेच अगदी आमच्या समक्ष आमच्या समोरच बसून बोलत होती . हे मुद्दाम सांगतो आहे कारण आजकाल शक्यतो आपण आपले ज्ञान माध्यमांमधून मिळवायचा प्रयत्न करतो व त्यामध्ये नेहमी उलट्या-सुलट्या व नकारात्मक बातम्या छापलेल्या असतात किंवा दाखविल्या जातात . प्रत्यक्ष समाजामध्ये फिरून तुम्ही जो अनुभव घेता तो मात्र अगदी विपरीत असतो त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण होते . ती बाई नेहमी त्या आश्रमामध्ये येऊन तिवारी पंडितजींना भेटत असे परंतु आज नवीन कोणीतरी समोर बसलेले आहे म्हणून ती आत यायला कचरत होती इतकेच . तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि चमक होती .तिने माझ्यासाठी झाडपाला आणला होता . मला तिने आश्रमामध्ये चालत येताना पाहिले होते . आणि तेव्हा तिच्या लक्षात आले होते की माझे पाय चांगलेच दुखत आहेत . कारण चालताना देखील माझ्या चालीमध्ये या दुखण्यामुळे फरक पडला होता . त्यामुळे तिने जंगलामध्ये जाऊन दोन झाडे शोधून आणली होती व ती गरम पाण्यामध्ये खळाखळा उकळून त्यामध्ये पाय सोडून बसले की पायाचे दुखणे जाते असे तिने मला सांगितले . यातील एक झाड रुईचे होते ते मी लगेच ओळखले दुसरे जे झाड होते त्याला सरळ सोट दांडा आणि त्यावर गोल गोल काटेरी फळे होती . मी त्या झाडाविषयी भरपूर शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु अजून तरी मला त्याचे नाव सापडलेले नाही . सुदैवाने त्याचे एक स्केच मी काढून ठेवले होते ते आपल्या माहिती करता देत आहे . कोणाला माहिती असेल तर कृपया मला त्या झाडाचे नाव सांगावे . अशा काड्या शक्यतो सुशोभीकरणाकरता घरामध्ये वापरलेल्या मी पाहिलेल्या आहेत . साधारण कदंबाच्या फुलाच्या आकाराचे ते गट्ठू होते .
पायदुखी साठी मला तेजस्वी हरिजन म्हातारीने आणून दिलेली औषधे
( दरम्यान वरील चित्र पाहून आपल्या या ब्लॉगचे एक वाचक वैद्यराज श्री त्रिलोक विश्वास धोपेश्वरकर यांनी खालील माहीती पुरविली ती येथे वाचकांच्या माहितीकरिता जोडत आहे . काही अन्य वैद्यांशी चर्चा केल्यावर सर्वानुमते या वनस्पती विषयी माहिती मिळाली ती अशी . ही दीपमाळ अथवा ग्रंथीपर्ण (ग्रंथी म्हणजे गाठ ) नामक वनस्पती आहे . हिच्या विषयी आयुर्वेदात खालील माहिती मिळते . )
म्हातारीने मला औषधे आणून दिली खरी परंतु ते उकळणार कोण आणि त्यात पाय सोडून बसणार कोण हा सर्व त्रास त्या तिवारी पंडितजींना देण्याची माझी इच्छा नव्हती . तरी देखील तिचा मान म्हणून मी ती सर्व औषधे सोबत ठेवली . अंधार पडू लागल्यावर पंडितजी झोपी गेले ते रात्री भोजन करत नसत . शेजारच्या खोलीतील बंजारा भावाने मला आत मध्ये बोलावले . बाहेर पेक्षा आत मध्ये किमान १० ते १५डिग्री अधिक उष्णता होती ! मी तर त्यांची परवानगी घेऊन चुलीजवळ जाऊन बसून राहिलो . शेकल्यावर जरा बरे वाटले . या महाराजांच्या तीन परिक्रमा करून झाल्या होत्या . त्यातील अनुभव ऐकत ऐकत भोजन प्रसाद ग्रहण केला . नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्ही तुमचा "लिसनिंग मोड " "ऑन " केला की खूप काही नवनवीन ऐकायला शिकायला मिळते . भोजन झाल्यावर त्यांनी सौजन्य म्हणून मला विचारले की त्यांचे बंधू कुठेतरी गावाला गेलेले असल्यामुळे आत मध्ये एक जागा आहे . त्यावर मी इच्छा असल्यास झोपू शकतो . परंतु खरोखर सांगतो मनापासून संकोच वाटल्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि बाहेर तख्तावर जाऊन पडलो . आणि ती माझी घोडचूक ठरली ! त्या रात्री नर्मदा मातेने मला शिकविले की निस्पृहाने कधीही संकोच करायचा नाही ! अन्यथा परिणाम गंभीर होतात ! म्हाताऱ्याने दार लावून घेतले आणि आता मात्र त्या उघड्या जागेवरती फक्त मी आणि माझ्या दोन गोधड्या इतकेच काय ते उरले . खरे तर मला पंडितजी अजून दोन ब्लॅंकेट देत होते ती मी पुन्हा एकदा संकोच म्हणूनच नाकारलेली होती . त्या दोघांना त्या भागाची चांगली कल्पना असल्यामुळे त्यांनी मला हे सर्व देऊ केले होते . परंतु मी संकोच म्हणून या सर्व सुविधा नाकारल्या आणि मला नर्मदा मातेने आयुष्यभराची अद्दल घडवली ! त्या रात्री इतकी भयंकर थंडी पडली की विचारु नका ! पांघरलेल्या दोन्हीही गोधड्या काहीही कामाच्या नव्हत्या. मला असे लक्षात आले की माझ्या अंगाखाली तख्तावर अजून दोन गोधड्या आंथरलेल्या आहेत . त्या काढून खाली मी शाल अंथरली आणि चारही गोधड्या पांघरून झोपलो . तरी देखील माझी दातखिळ बसलेली होती . अंगातून भयंकर वेगाने रक्त प्रवाह जात आहे असे जाणवत होते . थंडीने मी अक्षरशः कुडकडून गेलो . त्यात उघड्यावरती झोपल्यामुळे भरपूर वारे लागत होते आणि ते अंगाला बोचत होते . नदीकाठी थंडी पडते हे माहिती होते परंतु इतकी बेकार थंडी पडते याची कल्पना नव्हती . पिण्याचे पाणी तोंड देखील लावता येणार नाही इतके गार झाले होते . ती संपूर्ण रात्र मी तळमळत तळमळत जागाच राहिलो कारण थंडीमुळे झोपच येईना . यापूर्वी अशा स्वरूपाच्या थंडीचा अनुभव एकदाच मी बद्रीनाथ इथे घेतला होता . परंतु तेव्हा मी हॉटेलच्या सुखरूप खोलीमध्ये होतो आणि त्यावेळी वजा सात इतके तापमान खाली उतरले होते . इथे ती शक्यता नव्हती . तरी देखील तितकीच भयानक थंडी मात्र जाणवत होती .
क्षणभर वाटायचे पळत जाऊन म्हाताऱ्यांचे दार वाजवावे परंतु तिथपर्यंत पळण्याची देखील ताकद अंगात नव्हती . अखेरीस उजाडण्याची वाट पाहत पडून राहणे याखेरीज माझ्याकडे काहीच उरले नव्हते . तसाच रात्रभर पडून राहिलो . पहाटे बहिर्दिशेला म्हणून मागच्या बाजूला बांधलेल्या पत्र्याच्या संडासामध्ये गेलो . ते तर अक्षरशः कोल्ड स्टोरेज होते ! कारण सगळ्या बाजूने बर्फासारखा गारेगार पत्रा होता . कधी एकदा इथून बाहेर पडतो असे मला झाले . जेव्हा मी पाण्याचा वापर केला तेव्हा तर माझे अक्षरशः हात दुखायला लागले इतके ते पाणी गार होते आणि हजारो सुया हाताला टोचल्यासारख्या वेदना होऊ लागल्या . असा अनुभव मी यापूर्वी कधीही घेतलेला नव्हता . मी ठरवले की आता यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नर्मदा मातेला शरण जाणे आणि मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी थेट नर्मदे कडे गेलो . गार पाण्याने आंघोळ केली असता थंडी पळून जाते असे मी अनुभवले होते . त्यामुळे त्या तसल्या बोचऱ्या थंडीमध्ये नर्मदा मातेमध्ये आंघोळ करायचा निर्णय मी घेतला . इथे उतरण्यासाठी छोट्या पायऱ्या केल्या होत्या ज्या डाव्या हाताला असलेल्या नैसर्गिक दगडी भिंतीला समांतर होत्या . दंड बुडवून मी पाहिले असता माझ्या लक्षात आलं की इथे पाणी चांगलेच खोल आहे . नदीचा तो एक खोल डोह होता . मी अंगावरची सारी वस्त्रे काढल्यामुळे आता मला थंडी असह्य झाली होती . सर्व बाजूंनी दशदिशांनी मला हजारो सुया टोचल्या जात आहेत अशी अनुभूती येत होती . कुठलाही मागचा पुढचा विचार न करता मी दोन्ही हात छाती जवळ घेतले आणि त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये जोरदार उडी मारली !नर्मदे हर !
पाण्यात पडताक्षणी माझे दोन्ही पाय आखडून छातीजवळ आले आणि हात तर छातीजवळ तसेच राहीले होते आणि अशा पद्धतीने माझ्या शरीराचे झालेले मुटकुळे थंड थंड अति थंड बर्फाच्या सारख्या गार पाण्यामध्ये हळूहळू तळाशी जाऊ लागले . माझा यापूर्वीचा अनुभव असा होता की बाहेर कितीही थंडी असली तरी नदीचे पाणी मात्र थोडेसे कोमट असते . आमच्या कृष्णा नदीमध्ये तर हा अनुभव मी नेहमी घेतला आहे . परंतु नर्मदेने माझी कुठली कठीण परीक्षा मांडली होती मला माहिती नाही . शक्यतो पाण्यात उडी मारताक्षणी हात पाय बाजूला घेऊन मारायला सुरुवात केली की तुम्ही तरंगता . परंतु इथे त्या बर्फासारख्या गार पाण्यामुळे माझ्या अंगाची जी आकडी वळली आणि स्नायूंना जे काठीण्य आले त्यामुळे मला काही केल्या माझे हात पाय बाजूलाच घेता येईनात ! आणि तशात त्या पाण्याला बऱ्यापैकी गतिमान प्रवाह होता ! तसेच मी जो बुडून खाली गेलो होतो तो वरतीच आलो नव्हतो ! शिवाय बाहेर अजून फारसे उजाडले नव्हते त्यामुळे पाण्याखाली सर्वत्र खोल अंधाराचे साम्राज्य होते .सुदैवाने मी पट्टीचा पोहणारा असल्यामुळे ( असे आमचे तीर्थरूप म्हणतात जे स्वतः खरोखरीच महापुरात पोहणारे आहेत ) श्वास चांगला रोखून धरला होता व आजूबाजूला काय घडते आहे हे पाण्याखाली बुडलेला असून देखील मला सर्व कळत होते . माझे मुटकुळे काही केल्या वर येत नव्हते व हळूहळू प्रवाहाबरोबर वाहून चालले होते . परंतु अधिक काळ श्वास रोखून धरणे मला देखील शक्य होणार नव्हते . खरे सांगायचे तर थंडीमुळे आपोआप श्वास रोधला गेला होता . पुन्हा वर येण्यासाठी मला हातपाय मारण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता . आता नर्मदा मातेच्या उदरामध्ये आपण शांतपणे मृत्यूला सामोरे जाऊया असा विचार माझ्या मनामध्ये येऊ लागला . मृत्यू समयी काहीतरी चांगले चिंतन करावे म्हणून मी नर्मदा मातेचा गजर मनोमन आरंभिला . इतक्यात मला असे लक्षात आले की मी कडेच्या दगडी भिंतीला आपटला असून एका झाडाच्या मुळामध्ये मी अडकत आहे . माझ्या हाताची बोटे तेवढी हलत होती त्या बोटांनी मी मूळ घट्ट पकडले आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून हळूहळू हळू हळू बोटांनी त्या मुळाला धरत वरती यायला लागलो . सुदैवाने पाण्याच्या पातळी बाहेर माझे डोके आले आणि मी श्वास घेतला . माझे शरीराचे गाठोडे अजूनही सुटलेले नव्हते . वरून एक कोळी मला आवाज देत होता आणि बाबाजी बाहर आओ ! बाबाजी बाहर आओ असे ओरडत होता . मी माझे कपडे वरती काढून ठेवले होते त्यातील एक धोतर त्याने घेतले व एक टोक खाली टाकले आणि मला ते पकडायला सांगितले . ते मी पकडल्यावर त्याने ओढत ओढत मला पायऱ्यांच्या दिशेला खेचले आणि मग पायऱ्यांवर चढून मी बाहेर आलो . त्याने ताबडतोब त्याच धोतराने मला स्वच्छ कोरडे पुसले आणि माझे अंग चोळून त्याने थोडीशी गर्मी उत्पन्न केली . मला थोडेसे बरे वाटू लागले . आता थंडी बऱ्यापैकी कमी जाणवू लागली . वाचकांना नक्की काय प्रकार झाला होता हे लक्षात यावे म्हणून मी स्वतःच एक छोटेसे चित्र काढले आहे ते पाहिल्यावर तुम्हाला अंदाज यावा .
आपुले मरण पाहिले म्या डोळा । रम्य तो सोहळा दिसतसे ॥
खरे तर हा अनुभव ब्लॉगमध्ये लिहावा की नाही अशी माझ्या मनात शंका होती . परंतु पुन्हा कोणी असली चूक करू नये म्हणून मुद्दाम काहीही न दडविता आलेला अनुभव जशाच्या जसा सांगितला . माझे परममित्र आणि मार्गदर्शक श्री सचिन गाडगीळ जे या ब्लॉगचे नित्य वाचक देखील आहेत त्यांनी देखील मला अशीच सूचना केली की असे अनुभव आवर्जुन लिही जेणेकरून तसे पुन्हा कोणी न करो .ज्यांना परिक्रमा करायची आहे त्यांनी अशा चुका निश्चितपणे टाळाव्यात . अशाने नर्मदा मातेला त्रास होतो हे खरे आहे . तो मनुष्य कुठून कसा काय धावून आला माहिती नाही परंतु तो जर तिथे आला नसता तर माझे काय झाले असते याची मी कल्पना ही करू शकत नाही . त्याने देखील मला सौम्य शब्दांमध्ये झापले . त्याच्याकडून मला कळाले की त्या रात्री तापमान शून्याच्या देखील खाली उतरले होते . असे फार क्वचित होते परंतु त्या दिवशी ते झालेले होते . त्याने मला त्याच धोतरामध्ये गुंडाळून आश्रमा पर्यंत आणून सोडले . आता मात्र मी थेट म्हाताऱ्या सेवेकर्यांच्या उबदार खोलीमध्ये जाऊन चुली पाशी बसलो . मग माझ्या जीवात जीव आला . मी नर्मदेवर स्नान करून आलो आहे इतकेच त्याला सांगितले . आणि त्यांनी केलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेत नर्मदा मातेचे मनोमन आभार मानू लागलो . जीवन के इस भागदौड मे , जब जब डोर कतरती है । पता नही किस रूप मे आ के , रेवा संकट हरती है !
लेखांक बत्तीस समाप्त ( क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा