लेखांक २४ : दमगढची रामकुटी

आता फक्त थोडेसे अंतर चालल्यावर नर्मदा मातेचे उगमस्थान अर्थात अमरकंटक चे अद्भुत दर्शन होणार होते ! फेरी सेमल आणि दमगड गावे ओलांडून रामकुटी मध्ये जावे , तिथे सदाव्रत घेऊन पुढे मैयाच्या काठाकाठाचा मार्ग पकडत पुढे अमरकंटकला पोहोचावे असे नियोजन मनात सुरु होते . 
 दमगढ पूर्वीचे आरण्य
 मार्गातील खुणेच्या चिंध्या
परंतु राम कुटी आश्रमामध्ये तेथील महंत श्रीराम महाराज आलेले आहेत असे कळाले आणि त्यांचे दर्शन अवश्य घ्यावे असे देखील गावातील लोकांनी सांगितले . त्यामुळे रामकुटीचा मार्ग पकडला . 
मार्गदर्शक फलक
मार्ग म्हणजे कच्ची पायवाटच होती आणि पावसामुळे तिचा पुरेपूर चिखलदरा झाला होता ! वाटेमध्ये बाबांना भेटायला आलेल्या शहरी भक्तांच्या चिखलात रुतलेल्या एकेक गाड्या दिसू लागल्या ! जिथे गाडी रुतेल तिथेच ती सोडून चालत जाण्याशिवाय भक्तांकडे दुसरा पर्याय नव्हता ! आधी अल्टो मारुती अशा छोट्या गाड्या चिखलात फसल्या होत्या . पुढे इंडिका , वगैरे गाड्या रुतल्या होत्या . सर्वात शेवटी इनोवा , एण्डेवर अशा मोठ्या ताकदवान गाड्या चिखलात परिपूर्ण रुतल्या होत्या ! निसर्गापुढे मानवाची ताकद किती तोकडी आहे याचे उत्तम उदाहरण होते .
प्रातिनिधीक चित्र
इतक्या साऱ्या गाड्या बघता आश्रमामध्ये गर्दी असणार याचा मला अंदाज आला . थोडे अंतर चालल्यावर आश्रमामध्ये पोहोचलो आणि तो अतिशय नितांत सुंदर परिसर पाहून मनातील सर्व थकवा क्षणात निघून गेला !
 दमगढची रामकुटी
रामकुटीतील समोर राम महाराजांची कुटी आणि उजवीकडे परिक्रमावासांची गोलाकार कुटी (निवास व्यवस्था )

 अतिशय सूक्ष्म रूपाने वाहणारी नर्मदा मैया ,तिचा सतत कानावर पडणारा खळखळ आवाज आणि महाराजांनी उभ्या केलेल्या दोन-तीन छोट्याशा कुटी इतकाच आश्रमाचा पसारा होता . 
दमगढ मधून वाहणारी छोटीशी नर्मदा मैया

आश्रमाला छोटेसे कुंपण केलेले होते . आत प्रवेश करता क्षणी सुंदर मातीने चोपून ,बडवून तयार केलेले सुंदर सपाट व प्रशस्त अंगण व त्या शेजारी मधोमध मोठे लाकूड लावून त्याच्या आधारे बांधलेली गोलाकार सुंदर अशी कुटी होती . 
गोलाकार झोपडीचा आतील भाग
महाराजांची एक कुटी
बाबांची सर्व भक्त मंडळी कुटीमध्ये बसली होती . सर्व मोठ्या मोठ्या शहरातील माणसे होती . भोपाळ ,इंदोर , देवास ,बडोदा ,जबलपूर अशा विविध ठिकाणची माणसे तिथे आली होती . मी आलो आहे हे पाहताच सर्व मंडळी उठून उभी राहिली व सर्वांनी मला बसायला आसन दिले . आपल्या मराठी भाषेत म्हण आहे शितावरून भाताची परीक्षा , अगदी त्याच पद्धतीने शिष्यावरून गुरुची परीक्षा करता येत असते . या सर्व शिष्यांचे नम्रपणे वागणे बोलणे व सेवाभाव पाहून माझ्या लक्षात आले की यांचे गुरु देखील खूप चांगली व्यक्ती असणार . श्रीराम महाराज कुठे आहेत अशी पृच्छा मी केल्यावर सर्वांनी मला सांगितले की महाराज त्यांच्या कुटीमध्ये ध्यानस्थ बसलेले असून थोड्याच वेळामध्ये ते बाहेर येतील आणि सर्वांना दर्शन देतील . 
तोपर्यंत मला पिण्यासाठी थंडगार पाणी आणि गरम गरम चहा आणून दिला गेला .सोबत बिस्किटे देखील दिली . एरव्ही मी बेकरी उत्पादने फारशी खात नाही . माझी १९१४ साली जन्मलेली आजी तर पाव ,ब्रेड ,बिस्किटे या सर्वांचा कुत्र्याचे खाणे अशा शेलक्या शब्दांमध्ये उद्धार करायची . परंतु नर्मदा परिक्रमेदरम्यान मात्र बिस्किटे खाण्याला पर्यायच उरत नाही , इतकी ती तुम्हाला योग्य वेळी योग्य तेवढी ऊर्जा देणारी ठरतात . 
ध्यानस्थ बसलेले श्रीराम महाराज (संग्राहित चित्र )
शिष्य मंडळींनी मला महाराजांविषयी अधिक माहिती देण्यास सुरुवात केली . जबलपूर आणि कटनी यांच्या मधोमध घनदाट जंगलातील एका पहाडावर महाराजांचा सिद्धन धाम नावाचा आश्रम आहे .ह्याच डोंगराला लोढा पहाड असे सुद्धा म्हणतात . इथे महाराज बहुतांश वेळ वास्तव्याला असतात .सिताराम शरण महाराज नावाचा त्यांचा एक शिष्य तिथे त्यांच्यासोबत राहतो .महाराजांना काही नाव नाही . काही लोक त्यांना राम महाराज म्हणतात . काही श्रीराम महाराज म्हणतात . काही सिताराम महाराज म्हणतात . महाराज स्वतः विषयी फारसे बोलत नाहीत . इथे फार मोठ्या प्रमाणावर लोकांची ये जा असते .या स्थानाची काही छायाचित्रे गुगल नकाशावरून मिळाली ती सोबत टाकत आहे . 
लोढा पहाड चा खडा चढ
लोढा पहाड
आश्रमाचे प्रवेशद्वार
पहाडावरील सिद्ध गुफा ,अशा अनेक गुफा आहेत
पहाडावरून दिसणारे खालचे दृश्य
श्री सिताराम शरण महाराज (श्रीराम महाराजांचे शिष्य )

आम्ही परिक्रमेविषयी गप्पा मारत बसलो होतो इतक्यात अतिशय तार सप्तकात एक गूढरम्य अद्भुत शंखनाद सुरू झाला ! सर्वजण ताडकन उठून उभे राहिले ! श्रीराम महाराजांचे ध्यान संपल्याची ही सूचनात्मक खूण होती . महाराजांनी तीन वेळा शंखानाद केला .
शंखनाद करतानाची राम महाराजांची मुद्रा
आपण एरवी ऐकतो तसा हा शंखनाद नव्हता तर शंखनाद संपवताना महाराज एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढत होते ,जो वरून ऐकताना एखाद्या वन्य श्वापदाच्या ओरडण्याप्रमाणे वाटत असे . खरे म्हणजे हा शंख नसून छोट्या आकाराची एक शंखिणी होती .हिला फुंकण्यासाठी अधिक दमसास लागत असतो .एखाद्या योग्यालाच जमणारे हे काम आहे .सर्वांना जमणारे नाही .मी धावतच कुटीच्या दारामध्ये गेलो . इतक्यात महाराज कुटीतून बाहेर आले ! अतिशय तेजस्वी मूर्ती .पक्के योगी असावेत हे लक्षात येत होते .
राम महाराज /श्रीराम महाराज /सिताराम महाराज / लोढा पहाडी वाले बाबा / रामकुटी वाले बाबा
उंची जेमतेम पाच फूट पाच इंच असावी . वजन ४० किलोच्या वर नसावे परंतु चेहऱ्यावर आणि सर्वांगावर खूपच तेज विलसत होते . महाराजांनी पिवळ्या रंगाची छाटी घातली होती .आणि जटा भार व दाढी वाढविली होती .पायात लाकडी खडावा होत्या . महाराजांचे वय फारसे नसावे .तरुणच वाटत होते .परंतु परिक्रमेमध्ये जसजसा अनेक साधूंना भेटू लागलो तसतसे हळूहळू माझ्या लक्षात आले होते की नैष्ठिक ब्रह्मचर्याचे पालन केल्यामुळे पन्नास वर्षाचा साधू देखील वीस-बावीस वर्षाच्या मुलासारखा दिसायचा .त्यामुळे साधूचे वय शोधण्याच्या भानगडीत शहाण्या माणसाने कधीच पडू नये . नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ न शोधलेलेच उत्तम ! महाराज कुटीतून बाहेर आले ते थेट नर्मदेच्या काठी गेले आणि त्यांनी नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार केला . सकाळीच महाराजांनी नर्मदा मातेला साडी चोळी नेसून शृंगार केला होता .महाजनो येन गताः स पंथः । असे शास्त्र वचन आहे त्यामुळे मी देखील नर्मदा मातेला मनापासून नमस्कार केला . दरम्यान महाराजांच्या एका शिष्याने हा प्रसंग त्याच्या कॅमेऱ्यामध्ये टिपला आणि माझ्याकडून मित्राचा क्रमांक घेऊन त्याला पाठवून दिला .



राम कुटी बाहेर प्रस्तुत लेखक

इथे एक मोठा खडक होता . या खडकावर बराच वेळ बसून राहिलो . अमरकंटक कडून वहात येणारी बाल नर्मदा इतकी सुंदर ,लोभस आणि गोजिरवाणी होती की तिचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे खरोखरीच शब्द नाहीत . अगदी इथे सुद्धा नर्मदेच्या जलाचा तो विवक्षित रंग स्पष्टपणे दिसत होता .इतर नद्यांसारखे नर्मदेचे पाणी संपूर्ण पारदर्शक अजिबात नाही . त्यात निळसर हिरवट राखाडी छटा आहे . तोच रंग ,तीच चव , तेच प्रेम आणि तेवढीच कृपा ! दुपारची वेळ असून देखील सर्वत्र भरपूर धुके दाटलेले होते . कुठल्यातरी अदृश्य स्वर्गातून नर्मदा प्रकट होत आहे असे ते दृश्य वाटे .आपण सोबत जोडलेली चित्रे पुन्हा पुन्हा नीट पहा आपल्याला नर्मदा मातेचे सौंदर्य लक्षात येईल !
महाराजांच्या कुटीमध्ये कोणाला सहजासहजी प्रवेश नव्हता असे तिथले वातावरण पाहून लक्षात आले . परंतु महाराजांनी मला आवाज दिला आणि आत मध्ये बोलावून घेतले . माझ्याशी अर्धा पाऊण तास चर्चा महाराजांनी केली . या भागामध्ये वेगाने होत असलेल्या ख्रिस्तीकरणाबाबत आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो याबाबत आमची साधक-बाधक चर्चा झाली . महाराजांनी मोठ्या आस्थेने परिक्रमेची आणि वैयक्तिक विचारपूस केली . मी बाहेर आल्याबरोबर महाराजांचे सर्व शिष्य माझ्या भोवती गोळा झाले आणि म्हणाले तुम्हाला महाराजांनी आपणहून आत बोलावले याचा अर्थ तुमची परिक्रमा सफल झाली ! कारण ते सहजासहजी कोणाशी असे बोलत नाहीत आणि आत मध्ये तर कोणालाच येऊ देत नाहीत . शिष्यांचा आपल्या गुरुप्रति असलेला तो भाव पाहून मला थोडीशी मौज वाटली आणि बरे देखील वाटले . गुरु चरणी ठेविता भाव । आपोआप भेटे देव ।ही उक्ती सार्थच आहे . महाराज मला म्हणाले चला आपण आता हवन करू या ! आणि बाहेर येऊन त्यांनी सर्व शिष्यांना गोळा केले आणि आश्रमाच्या समोरच जमिनीवर सर्वांना गोलाकार बसविले .एक शिष्य म्हणाला इथे यज्ञकुंड कुठे आहे ? गुरुदेव म्हणाले अरे साक्षात भुमी माता अग्नीला धारण करू शकत असेल तर वेगळया यज्ञकुंडाची गरज ती काय ? त्यांनी लगेच एक गोवरी आणि काही समिधा आणविल्या . त्याच गावातील एक तरुण युवक  आश्रमामध्ये परिक्रमावासींच्या सेवेसाठी दिवसभर राहत असे .त्याने पळत येऊन सर्व तयारी करून दिली .गुरुजी म्हणाले प्रत्येकाने आपापल्या गुरु मंत्राचे स्मरण करून १०८ वेळा हवन करावे . आम्ही नर्मदा मातेच्या काठावर तिच्यापासून अगदी पाच-सहा फुटावर बसून हे अलौकिक हवन केले .शेजारीच एक छोटेसे शिवमंदिर बांधलेले होते त्याला लागूनच मी बसलो होतो .
हवनाची जागा व मंदिरामागे वाहणारी नर्मदा माता .
राम महाराजांना संस्कृत मंत्र उच्चारण्याची भारी हौस होती असे माझ्या लक्षात आले .त्यांचे पाठांतर काही विशेष नसावे परंतु तरीदेखील चुकीचा मंत्र सुद्धा ते अतिशय रेटून आणि मोठ्याने म्हणत त्यामुळे ऐकणाऱ्याला बरोबर आहे असं वाटे ! त्याशिवाय स चा श आणि श चा स करण्याची सवय त्यांना देखील होती त्यामुळे मंत्राचा अर्थच बदलून जायचा ! सर्व चा शर्व होऊन जायचा ! शरणाचे सरण होऊन जाई ! परंतु त्यांचा भाव श्रेष्ठ असल्यामुळे  आणि साधुत्वाच्या अधिकारामुळे हे सर्व निश्चितच क्षम्य आहे . मी आपले एक जाता जाता निरीक्षण नोंदवून ठेवले इतकेच ! 
महाराजांनी नर्मदा मातेला नैवेद्य दाखविला . एक एक घास हाताने त्यांनी मैय्याला प्रेमाने भरविला . अगदी संपूर्ण ताट रिकामे केले . 
हळूहळू या परिसरामध्ये अनेक ग्रामस्थ जमू लागले .सर्व वनवासी बांधव होते . माता-भगिनींची संख्या देखील लक्षणीय होती . आज इथे या सर्वांसाठी भंडारा ठेवला होता . गंमत म्हणजे यातील काही लोक समोरच्या दक्षिण तटावरून इकडे आरामात नर्मदा मैया ओलांडून चालत येत होते . हातामध्ये पादत्राणे घेऊन येताना कुठे गुडघाभर तर कुठे कंबरभर इतकेच पाणी होते .ते देखील दोन-तीन दिवस सलग झालेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली होती नाहीतर पाणी याहून कमी असते असे स्थानिकांनी मला सांगितले . बाकी कुठे पाऊस पडो न पडो , या भागामध्ये मात्र घनदाट झाडी असल्यामुळे आणि डोंगराळ प्रदेश असल्यामुळे नेहमी पाऊस पडतो असे निरीक्षण स्थानिकांनी नोंदविले .
महाराजांनी मला भंडारा घेऊन , आजचा दिवस विश्रांती घेऊन उद्या प्रस्थान ठेवण्याची आज्ञा केली . "आज दिनभर आप भोजन प्रशादी पा करके भ lजन करिये और कल सुबह निकल जाना । " त्यांच्या करारी आवाजातील ही आज्ञा मोडण्याची शक्यता नव्हतीच . गोल झोपडी मध्ये भक्त मंडळी गोल फेर धरून रामनामाचा जप करू लागली . त्यांच्या चालण्यांमध्ये आणि नृत्या मध्ये एक प्रकारची संथ , मंद अशी गती व अतिशय नयन मनोहर लय होती . तिथे बंगाली खोळ हे वाद्य ठेवलेले होते .मी ते घेऊन वाजवायला सुरुवात केली . खरे म्हणजे ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे घोड्यावरून पडून माझ्या उजव्या हाताचे मोठेच फ्रॅक्चर झाले होते . आणि ते अजून पुरेसे भरूनच आले नव्हते कारण ते भरून येण्यापूर्वीच मी पुन्हा ड्रायव्हिंग व इतर कामे सुरू केली होती . 
आपल्यामुळे प्रस्तुत लेखकाल झालेला अस्थिभंग बघताना रियाझ अश्व
त्यात परिक्रमा सुरू झाल्यावर उजव्या हातामध्ये दंड आणि कमंडलु धरल्यामुळे त्या हाताच्या हाडाला कायमचा बाक आला . 
 अस्थिभंग व दंडधारणा मुळे वक्राकार झालेली करांगुली
त्यामुळे मला वाद्य वाजवता येईल का नाही याची शंका होती .परंतु नर्मदा मातेचे स्मरण करून वाजवायला सुरुवात केली आणि हात सुरळीत चालू लागला . तिथे अजूनही काही वाद्ये होती . मला वाद्य वादनाची आणि संगीताची उपजत आवड आहे . त्यामुळे मी तबला , पेटी ,खोळ इतकेच काय माझे तोंडही पुरेसे वाजवून घेतले . एक परिक्रमावासी आपल्याला साथ देतो आहे हे पाहून ग्रामस्थांना अजून चेव ,अजून हुरूप चढत होता . थोड्यावेळाने तिथे अजून तीन चार परिक्रमावासी आले . एक अतिशय म्हातारे आजोबा ज्यांच्या तोंडामध्ये एकही दात नव्हता ,त्यांच्यासोबत रमेश जाधव नावाचा बकावा मध्य प्रदेश इथला रहिवासी , नामदेवराव भोळे नावाचे जळगाव असोदा इथले रहिवासी , आणि पवन श्रीकांत नाईक नावाचे नगर येथील एक परिक्रमावासी असे हे सर्व लोक होते . नाईक बुवांनी आल्यावर एक गाणे म्हणू का असे लोकांना विचारले . मी आपला तबला सरसावून बसलो . त्यांनी मला खुणेनेच तबला वाजवू नको असे सांगितले . मला काही कळेना . असे का सांगत असावेत . इतक्यात त्यांनी मोबाईलवर तानपुरा लावला आणि अतिशय सुंदर असा षड्ज आसमंतात घुमू लागला . अतिशय धीर गंभीर आवाजात त्यांनी घेतलेले आरोह आणि आरोह ऐकून माझ्या लक्षात आले की हे कोणी सामान्य गायक नसून एक महान गान तपस्वी आहेत . मी शास्त्रीय संगीताला अनेकदा साथ केलेली असल्यामुळे त्यांची चीज सुरू होताच आपसूकच माझा हात समेवर पडला आणि बुवांच्या लक्षात आले की समोरचा मनुष्य देखील थोडाफार जाणकार दिसतो आहे ! मग मात्र त्यांनी अत्यंत आनंदाने मानेनेच मला वाजवण्याचे अनुमोदन दिले . त्यांच्या अपेक्षेपेक्षा माझी साथ बरी निघाली असे नंतर ते मला म्हणाले ! त्यांचेही बरोबर होते .इतक्या दूर जंगलामध्ये एखाद्या वनक्षेत्रामध्ये एखादा शास्त्रीय संगीताला साथ करू शकणारा वादक मिळणे कठीणच होते. न पेक्षा चालू असलेले गाणे बिघडवणारा एखादा धांगडधिंगा तबलजी समोर बसला असावा असा कोणाचाही समज , माझ्या अवताराकडे पाहून होणे स्वाभाविक होते . त्यात बुवा पडले पट्टीचे शास्त्रीय गायक ! पंडित विकास कशाळकर यांच्याकडे त्यांची तालीम झालेली होती आणि पुणे विद्यापीठातील ललित कला क्रीडा केंद्राचे ते विद्यार्थी राहिले होते . दोघांचे अनेक मित्र संगीत क्षेत्रामुळे सामायिक निघाले ! मग मात्र नाईक बुवा परिक्रमेबद्दल भरभरून बोलले ! त्यांची परिक्रमा अतिशय गतिमान पद्धतीने सुरू होती . नाईक बुवा सुफी संगीत देखील गातात त्यामुळे त्यांचा वरवर पाहता वेश एखाद्या मुसलमान फकिरा सारखा वाटायचा . परंतु मनाने ते अत्यंत निर्मळ आणि अतिशय टोकाचे आध्यात्मिक होते . त्यांच्या प्रत्येक वाक्यातून शब्दातून समोरच्याला काही ना काही शिकायला मिळत होते . त्यांच्यासोबत असलेले असोद्याचे नामदेवराव यांना परिक्रमेत पाहून तर कोणी सांगूही शकले नसते की हे केवळ कोट्याधीशच नव्हेत तर अब्जाधीश आहेत ! पुण्यामध्ये त्यांचे स्वतःचे हॉटेल होते शिवाय जळगावला व्यवस्थित घरदार होते . परंतु तेही अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने परिक्रमा करत होते . रमेश जाधव यांचे गाव बकावा . मला आधी जाधव आडनावामुळे ते मराठी आहेत असे वाटले . परंतु ते शुद्ध हिंदी भाषिक होते . उत्तर भारतामध्ये य चा ज करण्याची पद्धत आहे . ( यशोदा > जशोदा । यादव > जाधव ) . व चा ब करण्याची पद्धत आहे (विहार > बिहार । व्रज > बिरज ) त्यामुळे त्यांचे आडनाव जाधव होते . त्यांनी मला मोबाईल क्रमांक विचारला .परंतु माझ्याकडे फोन नाही हे कळल्यावर ते मला म्हणाले अरे मग तू आमच्या गावी जेव्हा येशील तेव्हा मला कसा काय भेटणार ? कारण त्यांचे गाव नर्मदेच्या काठावर असून इथे शिवलिंगे बनवण्याची लाखो वर्षांची परंपरा आहे . तो व्यवसाय मी पहावा अशी त्यांची इच्छा होती . मी त्यांना म्हणालो जैसी मैया की इच्छा ! आणि आम्ही पाचही जण पुन्हा एकदा नर्मदेच्या काठावरती गेलो ! आत मध्ये भजन सुरूच होते . आम्ही त्या भजनाच्या तालावर नर्मदा मातेच्या पात्रामध्ये उभे राहून अक्षरशः लहान बाळाप्रमाणे नाचत होतो . अतिशय धुंद तल्लीन अशी ती अवस्था होती . इतक्यात रमेश जाधव थरथरत्या हाताने नर्मदेचा एक व्हिडिओ घेऊ लागले . मी त्यांना म्हणालो तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला स्थिर हाताने एक बरा व्हिडिओ घेऊन देतो . आणि तिथे आम्ही काही व्हिडिओ फोटो इत्यादी काढले . पुढे परिक्रमा संपल्यावर मला श्रीक्षेत्र गोंदविले येथे नाईक बुवा अचानक भेटले आणि मग त्यांनी मला सगळे व्हिडिओ फोटो दिले ! ते आपल्या सर्वांसाठी सोबत जोडत आहे . या व्हिडिओमध्ये आपल्याला नर्मदा माता उगमाच्या जवळपास किती बाल स्वरूपात आहे त्याचे दर्शन होते . तिचा आवाज देखील ऐकायला मिळतो . आणि दुपारी बाराच्या सुमाराला देखील अमरकंटकचे जंगलात किती घनदाट अंधार असतो ते पाहायला मिळते . नर्मदेला नेसलेल्या ५वार साडीच्या मापा इतकीच तिची रुंदी आहे ! व्हिडिओ आवर्जून पहा .
राम कुटी येथे मी बनविलेला छोटासा व्हिडिओ
व्हिडिओमध्ये मागे बसलेले रमेश जाधव , डावीकडून उभे नामदेवराव , नाईक बुवा , आजोबा आणि नर्मदा मैया !
आम्ही घेतलेला सेल्फी व्हिडिओ !
आता मात्र हळूहळू ग्रामस्थांची संख्या चांगलीच वाढली सुमारे दोनशे अडीचशे लोक तिथे जमा झाले . भोजनाच्या पंगती बसल्या . मला मोठ्या पंक्तीमध्ये वाढण्याची आवड आहे परंतु परिक्रमा वासींना नर्मदा खंडामध्ये कुठलेही काम करू दिले जात नाही . एका कोपऱ्यामध्ये बसून आम्ही भोजन प्रसाद घेतला . महाराजांनी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जीवाला वीस रुपये दक्षिणा दिली ! नंतर माझ्या असे लक्षात आले की बरीचशी गरीब आदिवासी मंडळी केवळ दक्षिणा पदरात पडेल या हेतूने घरातील सर्वांना घेऊन आली होती ! आणि त्या निमित्ताने भजन पूजनामध्ये सहभागी झाली होती . अतिशय दारिद्र्य असलेला हा भाग होता . आणि महाराजांचे कार्य तिथे लोकांना आवडत होते . जेवण झाल्यावर लोकांनी थर्माकोलच्या पत्रावळी आणि प्लास्टिकचे ग्लास इतस्ततः फेकायला सुरुवात केली . आणि मला परिक्रमेच्या संपूर्ण प्रवासादरम्यान पहिल्यांदाच प्लास्टिक प्रदूषण काय दर्जाचे होते आहे याची झलक पाहायला मिळाली ! मी ताबडतोब सर्व पत्रावळी आणि पेले उचलायला सुरुवात केली . मी सोबतच्या तरुण आणि लहान आदिवासी मुलांना देखील माझ्यासोबत पत्रावळी आणि ग्लास उचलण्याची विनंती केली . परंतु त्यांच्यापैकी कोणीही पुढे आले नाही कदाचित त्यांना लाजरेपणा बुजरेपणा आड येत असावा . मी मात्र साधारणतः तासभर खपून संपूर्ण परिसर प्लास्टिक मुक्त करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला . महाराजांच्या शिष्यांपैकी एका शहरी शिष्याने मला नर्मदा मातेच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेले प्लास्टिक गोळा करण्यासाठी अमूल्य मदत केली .कारण मला ते करता येणे शक्य नव्हते . इथे मैयाचे पात्र इतके लहान आहे की चुकून सुद्धा ते पार होऊ शकते . दरम्यान नाईक बुवा आणि मंडळी अतिशय वेगाने पुढे निघून गेली .कारण त्यांना आज कुठल्याही परिस्थितीमध्ये अमरकंटकला पोहोचायचे होते . आणि अमरकंटक इथून कागदोपत्री दहा किलोमीटर दिसत असले तरी संपूर्ण मार्ग जंगलातला असल्यामुळे दुप्पट वेळ लागायचा . मला मात्र मध्ये असलेल्या दुधधारा , पंचधारा ,कपिलधारा इत्यादी अवस्था पाहत पाहत निवांत जायचे होते . त्यामुळे मी आश्रमातच मुक्काम करण्याचे निश्चित केले ! त्या रात्री एक भयंकर घटना घडली !



मागील लेखांक

पुढील लेखांक



लेखांक चोवीस समाप्त (क्रमश:)

टिप्पण्या

  1. राम कुटी येथे मी बनविलेला छोटासा व्हिडिओ
    व्हिडिओमध्ये मागे बसलेले रमेश जाधव , डावीकडून उभे नामदेवराव , नाईक बुवा , आजोबा आणि नर्मदा मैया !
    आम्ही घेतलेला सेल्फी व्हिडिओ !

    Yethe video missing ahe....
    khup sundar ahe likhan, kal pasun vachayala ghetale ani bajul thevavat nahi

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर