लेखांक १९ : अखेर किनारा सापडला
आज कहरच झाला ! डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले होते त्याप्रमाणे पाय रुळले आणि तब्बल ३६ ते ३८ किलोमीटर अंतर चालले ! पहाटेच्या अल्हाददायक वातावरणात निघालो होतो .सुंदर गारवा , रात्रभर पडलेल्या पावसाने भिजलेली धरणी , घनदाट धुकं, त्यातून पांढुरका दिसणारा सूर्य , उडणारे रंगीबेरंगी पक्षी , वनचर ,नितांत सुंदर वातावरण ! हे जंगल अतिशय समृद्ध आहे . संपूर्ण जंगलामध्ये रस्त्यावरची वाहतूक सोडली तर अजिबात मानवी वावर आढळत नाही .त्यामुळे इथले वन्य जीवन देखील समृद्ध आहे . पनपता राष्ट्रीय अभयारण्य आणि संजय नॅशनल पार्क व व्याघ्र प्रकल्प या दोन्ही वनांना जोडले गेलेले हे वनक्षेत्र आहे . बरेचदा आपल्याला असे वाटते की इतके छान जंगल असून आपल्याला वन्य प्राणी का दिसत नाहीत .प्रत्यक्षामध्ये वन्य प्राणी आपल्याला दिसत नसले तरी वन्य प्राण्यांना आपण दिसत असतो !आपल्या येण्याची चाहूल आधीच लागल्यामुळे ते सुरक्षित जागी लपून आपण जाण्याची वाट पाहत असतात . विशेषतः वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहायचे असेल तर पायाचा आवाज करत किंवा काठीचा आवाज करत जाणे अतिशय श्रेयस्कर .त्यामुळे ते सावध होतात आणि लपून बसतात .बरेचदा माणसे आणि हिंस्र श्वापदे यांच्यामध्ये जी झटापट होते त्याचे कारण अचानक समोर येणे हेच आहे .श्वापदाला तुम्ही येणार आहात हे आधी माहिती असेल तर ते कधीच तुमच्या वाटेला जात नाही .ते लपून बसते आणि तुम्ही मार्ग मोकळा करण्याची वाट पाहत राहते .त्यांचा संयम आपल्यापेक्षा खूप मोठा आहे . तासंतास ते एका जागी बसू शकतात .जंगलाशी सात्मीकरण (कॅमाफ्लॉज ) करण्याची कला त्यांना साधलेली असते .परंतु तुमची नजर जर शोधक असेल तर मात्र तुम्हाला असे लपलेले प्राणी सुद्धा लगेच टिपता येतात .विशेषतः आजूबाजूला असलेली माकडे , वानरे आणि पक्षी हे नेहमी हिंस्र श्वापद जवळपास आल्यावर सूचना देत असतात . त्या सूचना तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत . बहुतांश वेळा कुठलेही मोठे प्राणी माणसाच्या वाटेला जात नाहीत , कारण माणूस हा त्यांचा मुख्य आहार नाही आहे .अगदी स्पष्टच बोलायचे तर वाघाने एखादा मनुष्य मारला तर त्याचे पोट देखील भरणार नाही इतके कमी मांस आपल्या शरीरामध्ये आहे . केवळ छातीचा थोडासा भाग आणि दोन मांड्या इतकेच वाघ खाऊ शकतो . मानवी पोट हे रोगांचे आगार असल्यामुळे त्याला स्पर्श देखील हे प्राणी करत नाहीत . आणि बाकी कुठे स्नायू फारसे नसतातच . आपले सरासरी वजन म्हणजे नुसती चरबी आणि हाडे यांचेच वजन आहे . हे ऐकायला थोडेसे घाण वाटेल परंतु कटू सत्य आहे . असे असून देखील मनुष्यप्राणी या जनावरांना खूप घाबरतो आणि त्यांनी काही करू अथवा न करू त्यांची शिकार करून मोकळा होतो , हे अत्यंत चुकीचे आहे . वनवासी लोकांना अनेक वेळा वाघ दिसतो परंतु ते दोघेही एकमेकांच्या वाटेला जात नाहीत . असो .
शहापूरा ते जोगी टिकरिया दरम्यान चालताना
मागील लेखांक
पुढील लेखांक
वनवासी कल्याण केंद्र सोडल्यावर अमेरापर्यंत दोन घाट चढावे उतरावे लागतात . अमठेडा , पिपरिया , कटहरा रयत ,अमेरा ,इशानपुरा रयत ,खमरिया ,आनाखेडा रयत , दियावर रयत अशी गावे पार करत सुमारे २२ किलोमीटर चालून विक्रमपूर गाव गाठले . आनाखेडा गावाच्या पुढे वदाहर नावाची नदी लागते ती देखील पार केली . विक्रमपूर येथे गुप्ता मेडिकल वाले यांच्या धर्म शाळेमध्ये भोजन प्रसाद घेतला . दोन छोट्या खोल्या बांधल्या होत्या आणि अस्वच्छता खूप होती . मी झाडू घेऊन दोन्ही खोल्या स्वच्छ झाडून ठेवल्या . रस्त्यावर गुप्ता यांचे मेडिकल होते तिथे जाऊन, मी आलो आहे हे सांगितल्यावर त्यांनी धर्म शाळेत डबा आणून दिला . मी जेवायला बसणार इतक्यात अजून एक परिक्रमावासी आला . दोघांनी मिळून एक डबा संपवला . पुरी भाजी आणि भात होता . या गावांमध्ये यवनांची मोठी संख्या होती . परिक्रमेत पहिल्यांदाच हे पाहायला मिळाले .यांच्यापैकी कोणी तुम्हाला विचारत नाही किंवा नर्मदे हर देखील म्हणत नाही .चेष्टापूर्वक तुमच्याकडे पाहिले जाते .परिक्रमा मार्गामध्ये प्रथमच त्यांचे धर्मस्थळ आणि चांद तारा असलेला झेंडा पाहिला . ( या सर्व नोंदी तटस्थपणे करत आहे याची कृपया नोंद घ्यावी .कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता जो प्रत्यक्ष अनुभव आला तो लिहीत आहे . कदाचित आज याची काही गरज नसेल , परंतु चार पाचशे वर्षांनी हा एक लिखित पुरावा मानला जाईल .)
मध्ये घाटात एक गाडी अचानक माझ्या शेजारी येऊन थांबली . तात्यासाहेब गुंजाळ म्हणून संगमनेरचे सज्जन गृहस्थ होते . जे विविध धर्मशाळांना शिधा पोहोचवण्यासाठी दोन महिने फिरायचे . त्यांनी मलाही खूप मौल्यवान माहिती आणि दक्षिणा दिली . विक्रमपूर नंतरचे १४ किलोमीटर मात्र खूपच लांबले आणि सायंकाळी साडेसातला धर्म शाळेमध्ये पोहोचलो . अरुणजी जयस्वाल का अन्नक्षेत्र ( अंकुर स्मृती ) असे याचे नाव होते . एक जण वाटेमध्ये लिफ्ट देऊ करत होता मी त्याला नम्रपणे नकार दिल्यावर मला म्हणाला यह जंगल का प्रदेश है । मै आपको अकेला नही छोड सकता । परंतु मी मात्र गाडीवर अजिबात बसत नसल्याचे त्याला निक्षून सांगितले . आश्चर्य म्हणजे यादव नावाचा हा मनुष्य चार किलोमीटर अंतर माझ्यासोबत चालत आला . आणि मला धर्म शाळेमध्ये सोडून पुन्हा उलटा चार किलोमीटर चालत गेला .वाटेमध्ये एका ठिकाणी त्याने मला चहा देखील पाजला . कोण कुठला परिक्रमावासी ? काही संबंध नाही . तरीदेखील त्यांनी आत्मीयतेने मला केलेली ही मदत माझ्या कायम स्मरणात राहिली . पूर्वी नक्की असे काही अप्रिय प्रसंग इथे घडलेले असणार ज्यामुळे संध्याकाळी अंधारच्या वेळी त्याला मला एकटे चालू द्यायचे नव्हते . परंतु त्याकरता स्वतः आठ किलोमीटर चालण्याची तयारी दाखविणे हे आताच्या काळामध्ये अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे . तो तर सामान देखील पाठीवर द्या म्हणून मागे लागला होता .परंतु त्याला देखील मी नम्रपणे नकार दिला .आल्या आल्या सामान धर्म शाळेमध्ये ठेवले .धर्मशाळा कुठली ! घरच होते ते !घराची एक खोली परिक्रमावासींसाठी कायमची राखीव ठेवली होती . बाहेर रस्त्याच्या समोर एक हापसा होता . हापशाला अक्षरशः गरम पाणी येत होते ! जाऊन मस्तपैकी आंघोळ केली ! कपडे धुऊन वाळत टाकले !जाणारे येणारे लोक थंडीने कुडकुडत होते आणि मला उघड्यावर आंघोळ करताना पाहून त्यांना आश्चर्य वाटत होते . परंतु सलग अडतीस किलोमीटर चालल्यामुळे शरीर चांगलेच गरम झाले होते .स्नान झाल्यावर नर्मदा मातेची पूजा केली . पूजा करताना आळंदीच्या मुलांनी फोटो काढला .
पोट पूजा देखील झाली . सोबत सहा बिश्नोई समाजाचे सालाबेडी परिसरातील परिक्रमा वासी होते आणि आळंदीची दोन वारकरी मुले होती .जोग पाठशाळेतील मुलांना नर्मदा परिक्रमा करावी असे सुचविले गेले असल्यामुळे आळंदीची अक्षरशः शेकड्याने मुले परिक्रमेमध्ये आजकाल भेटतात .हे दोन विद्यार्थी देखील त्यातलेच . हे मंडलामार्गे जंगलातून चालत आले होते आणि त्यांनी तो मार्ग किती सुंदर आहे ते मला सांगितले . परंतु हा मार्ग जर मी निवडला असता तर पुढे मला चातुर्मास करावा लागला असता हे परिक्रमा संपल्यावर लक्षात आले .त्यामुळे जे होते ते चांगल्यासाठीच होते . या दोन्ही मुलांचे वजन लक्षणीय रित्या कमी झाले होते . त्यांनी त्यांचे जुने फोटो आणि नवीन फोटो मला दाखविले .बिश्नोई समाजातील जे सहा लोक सोबत होते त्यांचे कपडे अतिशय पांढरे स्वच्छ आणि इस्त्री केलेले कडक होते ! मला आश्चर्य वाटले . त्यांच्यामध्ये ब्रिजेश बिश्नोई नावाचा एक तरुण होता . त्याची आणि माझी खूप चांगली मैत्री झाली .या सहा लोकांनी एक पंडित सोबत आणला होता .जो यांच्यासाठी पूजा पाठ तर करायचाच. परंतु त्याने एक मोटरसायकल आणली होती . जिच्या मागे मोठे कॅरिअर बनवून घेतले होते . त्यामध्ये या सहाही जणांची आसने बाडबिस्तारा आणि दप्तरे तो टाकायचा आणि पुढच्या मुक्कामी निघून जायचा . हे फक्त कमंडलू आणि काठी घेऊन झपाझप चालून पुढचा मुक्काम गाठायचे ! परिक्रमेचा हा नवीन प्रकार पाहून मला मौज वाटली . ब्रिजेशला घोड्यांचा नाद होता . त्याच्या घरी पाच घोडे होते तर त्याच्या मामाच्या गावामध्ये ५० एक घोडे होते . आमची ही आवड जुळली त्यामुळे आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो . त्याच्याजवळ कॅम्पस कंपनीचे नवे कोरे सॅंडल होते ते त्याने मला दिले .मला म्हणाला हे तुझ्या पुढच्या प्रवासाच्या कामाला येतील सोबत ठेवून दे .मला सॅंडल नको होते परंतु परिक्रमेच्या नियमानुसार काही बोललो नाही शांतपणे स्वीकार केला . धर्मशाळा ज्यांची आहे त्या काकू माजी शिक्षिका होत्या व अक्षरशः आईच्या मायेने प्रत्येक परिक्रमावाशींना काय हवे काय नको ते पाहत होत्या .आल्या आल्या त्यांनी गरमागरम चहा आणि बिस्किटे मला आणून दिली होती . फारच बरे वाटले होते ते खाऊन . रात्री अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली . मी बाहेर वाळत घातलेले कपडे चटकन आत मध्ये आणून वाळत घातले . आमचे नशीब बलवत्तर होते की आम्हाला बांधलेली खोली आज मिळाली होती .अन्यथा तो पाऊस किती भयानक होता हे दुसऱ्या दिवशी चालताना आमच्या लक्षात आले .अमरकंटक च्या पठारावरून अनेक नद्या उगम पावतात त्यातील बहुतांश नद्यांच्या पुलावरून रात्रभर पाणी वाहिले आणि सकाळी काही ठिकाणी तर फक्त पुलांचे सांगाडे शिल्लक राहिले . रस्तेच्या रस्ते वाहून गेले होते ! सकाळी बरोबर सात वाजता काकूंनी गरमागरम चहा बिस्किटे पुन्हा आणून दिली . आज मी असे ठरविले की आपल्याला किती वेगाने चालता येते याची परीक्षा करावी .कारण माझ्या मागून येणारे बिश्नोई लोक खूपच वेगात चालत होते . या संपूर्ण भागामध्ये सरकारने युकेलिप्टस अर्थात निलगिरीची झाडे ओळीने लावलेली आहेत . त्यामुळे कित्येक किलोमीटर तुम्हाला दुतर्फा अथवा एका बाजूने निलगिरीची झाडे लागतात . आळंदीची मुले देखील वेगात चालत होती परंतु मी झपाझप चालत त्यांच्या पुढे गेलो .परंतु बिश्नोई लोकांनी मात्र मला सहज गाठले आणि फार पुढे निघून गेले . चालता चालता ब्रिजेशने माझा एक व्हिडिओ बनवला ! पुढे योगायोगाने परिक्रमेमध्ये त्याच्या गावी जाणे झाले तेव्हा त्याने तो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठविला .
या लोकांसोबत चालता चालता एका दमात मी बारा किलोमीटर कधी चाललो हे मलाच कळले नाही ! जोगी टिकरिया जवळ आल्यावर नर्मदा मातेचे सुंदर असे दर्शन पहिल्यांदा झाले ! तिथून खाली जाऊन पुढे काठाने चालायचे असे मी ठरवत होतो परंतु ब्रिजेशने तिकडून जाऊ नका हा मार्ग योग्य आहे असे सांगितले .आणि सर्व लोक पुढे निघून गेले . त्यांच्यामध्ये मजेशीर भांडणे होती .सर्वजण नातेवाईक असले तरी दोघा तिघांचे आपापसात पटत नसे त्यामुळे एखादा पुढे निघाला की बाकीचे मागे पडत . ब्रिजेश सर्वात तरुण असल्यामुळे आणि त्याची चाल सर्वात वेगवान असल्यामुळे तो सर्वात मागे थांबायचा आणि मध्ये मनात आले की सहज त्या सर्वांना गाठायचा . त्याने मला चालण्याविषयी बऱ्याच महत्वपूर्ण गमतीजमती सांगितल्या .ज्या युक्त्या मी पुढे वेळोवेळी वापरल्या. जोगी टिकरिया नंतर मात्र पाय बोलू लागले . मग पुढचे १८ किलोमीटर अंतर मी माझ्या गतीने सावकाश पार केले . आज वाटेत भोजन प्रसाद कुठेच मिळाला नाही .सोबतची बिस्किटे खात खात देवरा माळ, मोडकी ,धुर्रा माळ, रुसा अशी गावे पार केली . आकाशामध्ये सूर्यनारायण एकदाही दिसला नाही . सात ते आठ डिग्री तापमान दुपारी बारा वाजता सुद्धा होते . हवेमध्ये आर्द्रता इतकी होती की अंगावरचे कपडे देखील भिजले होते . रुसा गावात एका ख्रिश्चन माणसाच्या घरापासून दुधी घाट अथवा शेष घाटामध्ये जायला शॉर्टकट मार्ग होता . तिथून निघालो असता वाटेत एक बुरखा घातलेली वयस्कर मुस्लिम स्त्री भेटली . तिने मला बराच लांबचा मार्ग सांगितला .परंतु मला साधारण अंदाज आला होता की बहुतेक हा मार्ग उलट्या दिशेला चालला आहे , त्यामुळे मी माझा विवेक वापरत योग्य वाटेल त्या मार्गाने चालत राहिलो . सर्वत्र ओसाड माळरान होते .कुठेही नदी किंवा पाणी असल्याच्या खुणा दिसत नव्हत्या. परंतु एका वळणानंतर अचानक आश्रम दिसू लागला आणि त्या आश्रमातील रम्य वातावरण पाहून मंत्रमुग्ध होऊन गेलो! हा नर्मदा नदीचा राधा आणि दुधी या दोन नद्यांसोबत त्रिवेणी संगम होता . निरव शांतता आणि कानावर सतत पडणारा नर्मदा मैया चा खळखळाट ! नर्मदा मातेचे खूप दिवसांनी दर्शन झाल्यामुळे मन भरून आले !
इथे नर्मदादास महाराज नामक साधारण पन्नास वर्षीय एक साधू सर्व व्यवस्था पाहतात . साधू तेजस्वी आणि परखड होते .लाल रंगाचे कपडे घालून ते बसत .
आल्या आल्या त्यांनी मला रागवायला सुरुवात केली . तुम्ही शहरी परिक्रमा वासी आणि विशेषतः पुण्याचे परिक्रमा वासी कशी परिक्रमेची वाट लावून टाकता हे सांगून ते मला झोपू लागले . मी शांतपणे आणि नम्रपणे त्यांच्या पायाशी बसून सर्व ऐकून घेत होतो . नर्मदे कडे तोंड करून एक बाकडे तिथे टाकलेले आहे त्या बाकड्यावर स्वामी बसले होते आणि समोर एका भिंतीवर खाली मी बसलो होतो .अजून एक दोन परिक्रमावासी आले आणि ते देखील तिथे बसले होते .थोड्या वेळाने माझा भाव त्यांनी ओळखला आणि मग मात्र ते अतिशय प्रेमाने माझ्याशी वागू लागले . एक सायकल वरून परिक्रमा करणारा मनुष्य वाटेत माझ्यापुढे गेला होता तो देखील तिथे पोहोचला होता .अजून एक साधू तिथे पोहोचला .हा चांगला उंचापुरा होता आणि दिवसाला ६० किलोमीटर अंतर सहज चालायचा . मी महाराजांना माझ्या मनातील सर्व शंका विचारू लागलो .मी त्यांना विचारले नर्मदा परिक्रमा अशी कशी काय आहे की जिच्यामध्ये नर्मदा मातेचे दर्शन देखील आम्हाला होत नाही ? महाराज लगेच चिडले आणि मला म्हणाले काठाने केली जाते तीच खरी नर्मदा परिक्रमा आहे .रस्त्याने आणि गावातून माणसे बघत चालणे म्हणजे नर्मदा परिक्रमा थोडीच आहे ? कोणी मला जेवायला देते का ?कोणी मला खायला देते का ? कोणी मला दक्षिणा देते का ? असा भाव मनात ठेवून चालणारी लोक परिक्रमा करत नाहीत .भीक मागतात . नर्मदा माता मला सर्व देईल असा भाव ठेवून चालतो तोच खरा परिक्रमावासी . आता हाच पहा .हा साधू दिवसाला ५० - ६० किलोमीटर सहज चालत असेल. साधूने देखील लगेच अनुमोदन दिले .तू गृहस्थी आहेस तू जास्तीत जास्त ४० किलोमीटर चालणार . मी गृहस्थी आहे हे महाराजांनी कसे ओळखले असा प्रश्न मला पडला. महाराजांनी माझी प्रश्नार्थक मुद्रा पाहून लगेच माझा तो देखील भाव ओळखला आणि म्हणाले अरे साधू झालो आहे तो उगाच नाही .समोरचा माणूस किती पाण्यात आहे , काय काय करतो हे सर्व आम्हाला लगेच कळते . आता हा साधूच पहा .याला आज खरे तर अजून वीस किलोमीटर पुढे जायचे होते पण पायाला जखम झाली म्हणून थांबला आहे . बरोबर ना रे ? साधू लगेच हो म्हणाला आणि त्याने पायाला झालेली जखम आम्हाला दाखवली . महाराज मला म्हणाले याच्यामध्ये विशेष सिद्धी वगैरे काही नाही .इथून जाणाऱ्या परिक्रमावासींचे आम्ही सूक्ष्म निरीक्षण करत असतो .त्यामुळे कुठला माणूस पुढे जाऊन आता काय करणार हे आम्हाला बऱ्यापैकी कळलेले आहे आता .आता हेच पहा . तुझ्याकडे तुला कोणीतरी दिलेली अनावश्यक वस्तू पडून आहे . परंतु ती दुसऱ्या कोणाला तू देणार नाहीस ! मला कळेना की माझ्याकडे अनावश्यक कुठली वस्तू पडून आहे ? इतक्यात मला आठवले की कालच एकाने आपल्याला नवे कोरे सॅंडल दिलेले आहेत ! मी लगेच पिशवीतून सॅंडल काढले आणि बाबांच्या पुढे ठेवले . महाराज त्या साधूला म्हणाले बाबाजी उठलो ये चप्पल और निकल पडो ! त्याने सॅंडल घालून पाहिले . साधारण अकराशे बाराशे रुपये किमतीचे चांगले ब्रांडेड कॅम्पसचे लाल काळे सँडल्स होते . साधू खुश झाला आणि नर्मदे हर म्हणून झपाझप निघून देखील गेला ! सहा फूट दोन इंच उंचीचा तो हडकुळा साधू झप झप झप झप काठाने कसा चालत गेला ते मी पाहतच राहिलो ! नर्मदा दास महाराजांनी मला पुन्हा एकदा सांगितले .हा साधू निघाला आहे तो परिक्रमेचा खरा मार्ग आहे . परंतु तुम्हा पुणे मुंबई वाल्या लोकांना हा मार्ग नको असतो . तुम्हाला सुख सुविधायुक्त डांबरी मार्ग बरा पडतो . मी म्हणालो महाराज परंतु मला खरी परिक्रमा करायची आहे . नर्मदा दास म्हणाले अरे बाबा कशाला नाही त्या भानगडी मध्ये पडतोस ! हा मार्ग गृहस्थी लोकांसाठी नाही .हा मार्ग केवळ साधूंसाठी आहे . इथे मध्ये पावला पावलाला मृत्यू आ वासून बसलेला असतो . ज्यांना काही आगापिछा नाही अशा लोकांनीच या मार्गाने चालावे . बाबा एक प्रकारे मला हिणवत आहेत की काय असे मला वाटले . इतक्यात चहा आला . मी अजून माझं आसन देखील लावले नव्हते .चहा पीत पीत नर्मदा मातेकडे पाहत राहिलो . काठाने चालणारा साधू आता दिसेनासा झाला होता .मनोमन मी नर्मदा मातेची प्रार्थना केली की माते मला याच मार्गाने घेऊन चल .मला दुसरा कुठला मार्ग नको आहे . कितीही कठीण मार्ग असू दे मला त्याची परवा नाही परंतु मला तुझे दर्शन ,स्पर्शन सतत मिळाले पाहिजे आणि तुझा नाद सतत ऐकू आला पाहिजे . मी साधूला नवे कोरे सॅंडल देऊन टाकले ही कृती नर्मदा दास महाराजांना खूप आवडली . आणि मला म्हणाले तुम्हारी परिक्रमा अच्छी होने वाली है ऐसे मैया मुझे बता रही है ! महाराजांनी बराच वेळ मला खूप चांगला उपदेश केला . मधेच गडबड करणारा एखादा परिक्रमा वाशी आला तर त्याच्यावरती ते चवताळून रागवत .पुन्हा शांत होऊन माझ्याशी बोलू लागत . माझे परिक्रमा विषयक बरेचसे प्रश्न त्यांनी कायमचे दूर केले .तिथे पक्के बांधकाम देखील होते आणि काही कच्च्या कुटी होत्या . त्यांनी एका कुटीकडे हात करून तिकडे राहण्याबाबत मला सूचना केली . मला म्हणाले तुझ्या नादामध्ये आज मी खूप जास्ती गप्पा मारल्या आणि माझे साधनेची वेळ देखील निघून गेली . आता तू आसन लाव .आपण रात्री बोलू किंवा उद्या बोलु . आत मध्ये जाऊन मी आसन लावले .थोड्यावेळाने अजून बरेच परिक्रमावासी तिथे गोळा झाले .
शेष घाटावरील मी निवास केलेली कुटी
थंडी खूप होती . परंतु कुटी उबदार होती . तशातच नदीवर जाऊन मी स्नान आटपून घेतले . नर्मदेचे पाणी अतिशय थंडगार होते . इथून पलीकडे जाण्यासाठी एक छोटासा पूल बांधला होता . कशीबशी एखादी दुचाकी जाईल इतकाच तो मोठा होता . नर्मदेचे पाणी अतिशय निर्मळ स्वच्छ आणि सुंदर होते . नदीचे पात्र विस्तीर्ण होते परंतु पाण्याला खूप गती होती . मध्ये मध्ये खूप सारे गवत आणि पाण वनस्पती उगवल्या होत्या . पाणी काही ठिकाणी खूप खोल तर काही ठिकाणी खूप उथळ होते . काठावर बसून कमंडलूने स्नान करता येत होते . मी स्नान करून वर येत असताना काही गाडीने परिक्रमा करणारे लोक भोजन प्रसाद घेऊन पुढे निघाले होते . त्यातील एक जण मला म्हणाला आप हमारे साथ दाल भाटी खाइये । मी जागेवर पोहोचेपर्यंत त्यांनी दाल भाटी माझ्या जागेवर पोहोचवली देखील . भूक तर लागलेली होतीच त्यामुळे मी ताबडतोब ती दालबाटी खाऊन घेतली . एकाच घरातील काही महिला आणि पुरुष असे मिळून गाडीने परिक्रमा करत होते . मुक्कामी पोहोचल्यावर महिला स्वयंपाक करत आणि मग सगळे भोजन घेऊन पुढे जात . माझ्या खोलीमध्ये एक मराठी बोलणाऱ्या खेडूत काकू , दोन-तीन अजून मराठी परिक्रमावासी ,एक सायकल वाले परिक्रमा वासी असे पाच-सहा जण जमले होते . भोजन प्रसाद संध्याकाळी सहा वाजता होतो असे सांगण्यात आले .इथे अंधार खूप लवकर पडत होता . रात्री भोजन प्रसाद घेताना कार ने आलेले अजून एक जोडपे आणि त्यांची मुलगी महाराजांसोबत विशेष प्रसाद घेताना दिसले . इथे एक आदिवासी समाजातील काळा कुळकुळीत परंतु तेजस्वी डोळ्यांचा सेवेकरी अखंड सेवा करताना मी पाहिला .जेवण झाल्यावर आमच्या कुटी शेजारी मोठी शेकोटी करून तो बसला .मी देखील तास दोन तास त्याच्यासोबत बसून गप्पा मारल्या आणि त्या भागातील जनजीवन समजून घेण्याचा प्रयत्न केला . हा संपूर्ण वनप्रदेश होता आणि इथले जीवन फार कठीण होते .इथे नर्मदा नदी वाहते खरी परंतु पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही .शेती आणि अन्य उद्योगधंदे यांना पुरेल इतके पाणी येथे नाही . रात्री छान झोप लागली आणि पहाटे उठल्यावर स्नानासाठी नर्मदा मातेवर गेलो असताना तिथले रम्य वातावरण पाहून अक्षरशः मी स्वर्गामध्ये आहे की काय असे वाटू लागले ! असे वाटू लागले की आता इथेच मुक्काम करावा !परंतु असा मोह मनात होता क्षणी ताबडतोब मी माझा बाड बिस्तारा उचलला आणि पुढे प्रस्थान ठेवले .हा अनुपपूर नावाचा जिल्हा सुरू झाला होता .आता मात्र मला माझ्या मनासारखी परिक्रमा सुरू झाली आहे असे वाटू लागले कारण बऱ्यापैकी काठाकाठाने रस्ता होता . अखेर नर्मदा मातेचा किनारा मला सापडला होता ..
लेखांक एकोणीस समाप्त ( क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा