लेखांक १८ : मुंडा महारण्यामध्ये प्रवेश

शहापूरा पासूनच्या पुढच्या वन प्रदेशाला मुंडा महारण्य असे नाव आहे . फार पूर्वी इथे अतिशय घनदाट अरण्य होते आता विरळ झाडी शिल्लक आहे . जंगलातून चालता चालता एक छोटासा घाट लागला .मला हळूहळू आता भुकेची जाणीव होऊ लागली . घाटामध्ये डाव्या हाताला खाली एक छोटीशी कुटी दिसली .आतून एका बाबांनी आवाज दिला .
                      बंजरकुटी आश्रम
 छीहार बाबांची शिष्य चेतराम बाबाजी म्हणून इथे राहत होते . या आश्रमाला बंजर कुटी (वनचर कुटी) म्हणत .
काळ्या रंगाचा गॉगल आणि काळे कपडे घातलेले बाबांचे फोटो आश्रमात लावलेले होते .
इथे खाली एक छोटासा झरा होता . एक-दोन छोटी मंदिरे  होती. सकाळचे नऊ वाजले असावेत . बाबा मला म्हणाले भोजन प्रसाद घेऊन पुढे जा .मी म्हणालो मला अजून बरेच चालायचे आहे तरी काही बालभोग असेल तर घेतो .अल्पोपाहार किंवा नाश्ता याला परिक्रमेच्या अथवा साधूंच्या भाषेमध्ये बालभोग असे म्हणतात .याने जंगलामध्ये उगवणाऱ्या कुदै नावाच्या धान्याची अप्रतिम खिचडी मला बालभोग म्हणून चारली .ही खिचडी इतकी चविष्ट होती आणि इतकी अप्रतिम ताकद त्याच्यामध्ये होते की पुढे दिवसभर मला भूकच लागली नाही .
     अत्यंत कमी पाण्यावर जगणारे कुदैचे रोपटे
 कुदै  Paspalum scrobiculatum, commonly called Kodo millet or Koda millet तमिळ मध्ये வரகு वरग , मराठीत वरई (एक प्रकारची )
भारत सरकारच्या विनंतीनुसार २०२३ हे वर्ष युनायटेड नेशन्स ने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे . ज्वारी ,बाजरी , वरई , नाचणी ,कुदै ,राळे , कांगणी राजगिरा अशी ग्लुटेनमुक्त भरडधान्यं भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेतच .परंतु ती पुन्हा एकदा प्रचारामध्ये यावीत आणि शेतकरी जे भरड धान्याच्या उत्पादनापासून दूर गेले आहेत आणि केवळ गहू तांदूळ ऊस याचे उत्पादन करत आहेत त्यांनी पुन्हा भरडधान्याचे उत्पादन सुरू करावे यासाठी मोदी सरकारने अनेक उपक्रम आयोजित केले आहेत .
भरड धान्याचे अनेक प्रकार असून अंदाजे सोळा प्रमुख प्रकारची भरड धान्ये ही भारतात पिकवली आणि निर्यात केली जातात. ज्यात ज्वारी(सोर्घम), बाजरी(पर्ल मिलेट), नाचणी किंवा नागली (फिंगर मिलेट), कांगणी किंवा राळे (फॉक्स टेल मिलेट/ मायनर मिलेट), भगर किंवा वरी किंवा वरई (बार्नयार्ड मिलेट), चेना/पुनर्वा (प्रोसो मिलेट), कोद्रा (कोदा/कोदो मिलेट), सावा/साणवा/झांगोरा (लिटल मिलेट), कुटकी (कोराळे/पॅनिकम मिलेट), बकव्हीट/कुट्टू (टू स्युडो मिलेट), राजगिरा (अमेरॅन्थस) आणि ब्राऊन टॉप मिलेट आदी भरड धान्यांचा समावेश आहे
नवीन हॉटेल सुरू करताना भरड धान्याचे पदार्थ देणाऱ्या हॉटेलला १८ लाखाचे अनुदान भारत सरकार देते आहे . म्हणून मुद्दाम या धान्य विषयी थोडी अधिक माहिती आपल्याला दिली . तेवढाच या अभियानामध्ये आपला एक खारीचा वाटा ! 

बजरंग कुटी आश्रमाचा शिक्का

 इथून पुढे तीन वाजेपर्यंत मला काहीही खाण्यापिण्याचे स्थान दिसले नाही . इथली भोजनाची वेळ साधारण साडेअकरा ते दीड दरम्यान असते .त्यानंतर जर तुम्ही एखाद्या स्थानावर पोहोचलात तर तुम्हाला भोजन प्रसाद मिळणे जवळपास अशक्य असते .इथे शिळे अन्न ठेवण्याची पद्धत नसते . प्रत्येक पदार्थ ताजा करून खाल्ला जातो व उरलेला पदार्थ लगेच गाईंना व भैरव अर्थात कुत्र्यांना खायला घातला जातो .तीन वाजेपर्यंत मी उन्हात चालत होतो . मध्ये एक गमतीशीर मंदिर लागले त्याच्यावर कळसा ऐवजी अर्जुना चा रथ होता .
 शहापुरा शहर  लागले. इथे दोन मार्ग होते एक शहरातून जात होता आणि एक गावाबाहेरून बायपास सारखा मार्ग होता . मी गावाबाहेरून जायचे असे ठरविले . जाता जाता एकाने सांगितले डावीकडे वळा .तलावाशेजारी दुर्गा माता मंदिरामध्ये भागवत कथा सुरू आहे .भागवत कथा सुरू असेल तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते म्हणून वळलो आणि भागवत कथेच्या ठिकाणी पोहोचलो .आज कथेचा समारोप झाला होता आणि समारोप झाल्यानंतर महाप्रसादाची लगबग सगळीकडे चालू होती . मंदिराचे पुजारी मला घेऊन आले आणि मागे नेऊन सर्वांच्या आधी त्यांनी मला भोजन प्रसाद घेण्यासाठी बसविले . इतक्यात भागवतकार स्वतः भोजनासाठी आले व ते देखील माझ्या शेजारी बसले .हा एक तिशीतील तरुण होता व त्याने असा संकल्प केला होता की मी नर्मदा मातेची भागवत परिक्रमा करेन . अर्थात नर्मदा मातेच्या काठावरील महत्त्वाच्या गावांमध्ये भागवत कथा करत करत तो पुढे जाणार होता .या अद्भुत संकल्पाला मनापासून शुभेच्छा देऊन मंदिरातून निघालो . हा संपूर्ण प्रवास अत्यंत दमविणारा होता कारण बहुतांश वेळ मी डांबरी रस्त्यावरून चालत होतो आणि पायाला बुटाचा त्रास होत असल्याकारणाने बराच काळ मी बूट हातामध्ये धरून अनवाणी चालत होतो .थंडीमुळे सकाळी दहा-साडेदहापर्यंत रस्ते अतिशय गार राहत होते .तो गारवा अनवाणी पायांना सुखद वाटायचा म्हणून मी अनवाणी चालत होतो . पोटभर जेवून मी पुढे निघालो आणि थोडेसे अंतर चाललो नसेल इतक्यात एक मुलगा पळत माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या हातामध्ये जेवणाचा एक डबा छान पार्सल बांधून आणलेला , दिला आणि म्हणाला बाबाजी भोजन पाइये।मी हो नाही काही म्हणायच्या आत तो घरी पळून सुद्धा गेला .या जेवणाचे काय करावे मला काही कळेना .पिशवी उघडून पाहिली तर अतिशय छान पद्धतीने पनीर बटर मसाला , रोटी , जीरा भात ,आमटी असे सर्व पदार्थ , सॅलड ,चटणी , कोशिंबीर , असे सर्व त्या डब्यामध्ये दिलेले होते . नर्मदा मातेची इच्छा असे म्हणून मी चालू लागलो .चालताना प्रत्येक पावलाला आपले आपोआप नामस्मरण घडते .
त्वदीय पादपंकजम् नमामि देवी नर्मदे ।असा जप करत पाऊले टाकायची . या एका ओळीमध्ये आठ पावले होतात . आणि चालण्याला एक छान गती सुद्धा येते . हातामध्ये तो भोजन प्रसाद घेऊन मी चालत होतो वाटेमध्ये एका धरम काटा वाल्याने मला हाक मारली .हा महामार्ग सुरू झाला होता आणि इथे ट्रकची वर्दळ असायची .धरम काटा म्हणजे ट्रकचा वजन काटा . साहू नावाच्या मालकाचा हा काटा होता आणि तिथे तिवारी नावाचा एक संघ स्वयंसेवक कामाला होता .त्याने मला उगाचच खुर्ची लावून दिली आणि बसायला सांगितले .खरे तर माझ्या पायांना चांगली गती आली होती आणि चालायची इच्छा होती परंतु नर्मदा परिक्रमेमध्ये कोणीही काहीही सांगितले तर ते निमुटपणे करायचे असते त्याप्रमाणे मी बसलो . त्या भागातील संघाच्या कामाविषयी तो मला सांगू लागला . सहज गंमत म्हणून मी पाठीवरील झोळी सकट माझे वजन धर्म काट्यावर केले तर ते १०० किलो भरले ! झोळी शिवाय वजन ९० किलो होते . या वजन काट्या मध्ये अधिक उणे पाच ते दहा किलोग्रामचा फरक पडतो परंतु मला माझे वजन ९० किलो च्या पुढेच आहे हे माहिती होते .पुढे माझी किती चरबी नर्मदा माता जाळणार आहे हेच ती जणू मला वजन करून सांगत होती ! इतक्यात तीन परिक्रमावासी मोठ्या वेगाने चालत जाताना दिसले .मी आवाज दिला असता तिघे थांबले . तिघेही आळंदीचे होते .पैकी दोघांचे पोटभर जेवण झाले होते आणि तिसरा भुकेने कासावीस झाला होता ! ते मला विचारू लागले इथे जवळपास भोजन कुठे मिळेल ? इथेच मिळेल ! असे म्हणून मी माझ्या हातातली पिशवी त्याच्या हातात दिली आणि तो परिक्रमावासी अक्षरशः आनंदाने नाचू लागला ! तिवारीने लगेच त्याला बसायला जागा करून दिली आणि तिथेच बसून तो गरमागरम भोजन प्रसाद घेऊ लागला ! नर्मदा मातेला सर्वांच्या पोटाची कशी चिंता असते याचा मला आलेला हा एक अद्भुत अनुभव ! कोण मला भोजन आणून देणारा मुलगा,कोण मला रस्त्यामध्ये अडविणारा दुकानदार आणि कोण हा उपाशी परिक्रमावासी ! इथून पुढे चालायला लागल्यावर बरगाव गावातील नावाप्रमाणे उत्कृष्ट काशी धर्मशाळा आहे .
इथे गावातील सेवेकरी सेवा करतात . आणि हे सर्व लोक थांबण्यासाठी खूपच आग्रह करू लागले . परंतु मला कुठल्याही परिस्थितीमध्ये बरगाव मध्ये असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित वनवासी मुलांसाठीचा आश्रम बघण्याची ओढ लागली होती . त्यामुळे मी तिथे फक्त चहा घेतला आणि जनजाती कल्याण आश्रम पाहण्यासाठी बोजा उचलला . खरे तर माझे पाय चालून चालून खूप थकले होते . गेले दोन-तीन दिवस मी डांबरी सडके वरून अनवाणी चालल्यामुळे पायाची आग देखील होत होती . परंतु आश्रमात जायचे असा मनाचा हिय्या करून अजून थोडेसे अंतर जाण्याचा निर्धार केला आणि पुढील दहा किलोमीटर अंतर चालण्याचा माझा निर्णय खरोखरी सार्थ ठरला ! इतका सुंदर हा आश्रम होता ! सुमारे ३६ एकर विस्तीर्ण परिसर , गोंड आदिवासी समाजातील साठ मुलांचे वसतीगृह , साठ गाईंची गोशाळा ,ड्रायव्हिंग स्कूल , मंदिर , शेती , उद्योग काय नव्हते इथे ! मुख्य म्हणजे अंघोळीसाठी गरम पाणी आणि बांधलेला संडास प्रथमच परिक्रमेमध्ये पाहायला मिळाला !
 रात्री मुलांना भेटायला काही अधिकारी आले होते . त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन मी मुलांमध्ये खाली बसलो . तर मला सर्वांहून उंच अशा एका उच्चासनावर बसविले गेले .  परिक्रमावाशांचा इथे खूप मान राखला जातो . नंतर मुलांसोबत तासभर संवाद साधला .इथली मुले फारच गोड होती . वय वर्ष आठ ते १८ असा वयोगट होता . आचार्य मन्नू जी महंत नावाचा छत्तीसगड मधला एक पूर्णवेळ शिक्षक त्यांची सर्व जबाबदारी सांभाळत होता . बिलासपूर जवळचे पाली हे त्याचे गाव . आचार्य अतिशय तरुण होता .आणि मुलांसाठी त्याच्या मनामध्ये अत्यंत कळवळा होता हे त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवत असे .

 गंमत म्हणजे या वस्तीगृहामध्ये प्रयागराज शारदा प्रसाद चंडेल नावाचा एक पुण्याचा मुलगा होता जो केवळ तिसरीमध्ये होता पुण्याजवळ कात्रज चा मी आहे असे तो म्हणाला .अधिक चौकशी केल्यावर कळाले की तो भूकम येथील होता . वय वर्ष आठ आणि घरापासून पंधराशे किलोमीटर दूर शिक्षणासाठी त्याला ठेवले होते किती मोठा निर्णय होता आई वडिलांच्या दृष्टीने विचार करून पहा !त्या मुलाला आदिवासींची स्थानिक भाषा अजून येत नव्हती परंतु बाकीची मुले त्याला छान सांभाळून घेत होती हे पाहून मला खूप बरे वाटले .खूप दिवसांनी मराठीमध्ये बोलायला मिळाल्यामुळे तो देखील खुश झाला .त्या रात्री मुले आपल्या खोलीमध्ये झोपायला जाईचनात !
 पूर्णवेळ माझ्याच खोलीमध्ये बसून राहिली! मला एक मोठी खोली दिली होती ज्याच्यामध्ये २५-३० खाटा होत्या. आणि झोपणारा मात्र मी एकटाच होतो .बघता बघता सर्व मुले माझ्या खोलीमध्ये येऊन त्या खाटा जोडून त्यावर बसून राहिली .माझ्याशी गप्पा मारू  लागली ! इथली आडनावे मोठी मजेशीर असतात .मार्को , मरावी , गोंडी , गोंड, मरकाम , परस्ते ,विखे ,उके  ,उरेती ,करपेती ,धुरवे ,ओमाम , उमाम ,पुसाम , कुसराम , पठ्ठा ,नेतान , तेकाम , कुलस्ते , पुलस्ते ,परस्ते , पेंद्रे , पेद्राम , शेंद्राम ,सेंद्राम , संयाम अशी आडनावे होती .सचिन परस्ते नावाचा एक माजी विद्यार्थी येथे राहून मुलांची सर्व व्यवस्था पाहत असे . 
रात्री माझ्या खोलीमध्ये येऊन बसलेली आदिवासी मुले
इथे स्वयंपाक मुलेच करतात आणि मुलेच जेवायला वाढतात . रात्री मुलांनी सुंदर असा स्वयंपाक करून मला जेवायला बोलावले . जेवणापूर्वी अतिशय सुंदर असे श्लोक ही मुले म्हणत होती .एका सुरात आणि खणखणीत आवाजामध्ये त्यांनी म्हटलेले श्लोक ऐकत बसावे असे वाटत होते . वाढणारी मुले सुद्धा अतिशय हुशार होती आणि अलटून- पालटून प्रत्येकाला स्वयंपाक आणि वाढण्याची पाळी यायची .मी स्वतः याच वयापासून वस्तीगृहामध्ये राहून शिकलेला असल्यामुळे त्या मुलांचा मला फारच लळा लागला ! 
वसतीगृहातील वनवासी मुलांसोबत भोजन घेताना
रात्री पुन्हा मुले माझ्या खोलीमध्ये गप्पा मारायला आली .गंमत म्हणजे आचार्य मन्नुजी महंत याने देखील त्यांना परवानगी दिली होती . अखेरीस माझ्या लक्षात आले की मुलांना झोप मिळणे आवश्यक आहे म्हणून मीच सर्वांना घेऊन त्यांच्या झोपण्याच्या खोल्यांमध्ये घेऊन गेलो .आणि तुम्ही कसे झोपता मला दाखवा वगैरे सांगत गाणी म्हणत त्या सर्वांना झोपवून मग खाली आलो ! रात्री प्रचंड थंडी पडली होती .मुले माझ्या खोलीमध्ये होती तेव्हा मायेची ऊब जाणवत होती . मुले गेल्यामुळे खोली चांगलीच थंड पडली .पहाटे लवकर जागा झालो आणि बाहेर बघतो तो काय !मुसळधार म्हणता येईल अशा पद्धतीचा पाऊस सुरू होता ! काही केल्या पाऊस थांबण्याची लक्षणे दिसेनात ! आचार्य मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की हा पाऊस आजचा दिवस काही उघडेल असे वाटत नाही तरी तुम्ही आज इथे कृपा करून मुक्काम करावा कारण पुढे खूप मोठे जंगल आहे . आणि पावसामध्ये ते पार करता येणे शक्य नाही . झाले ! मुलांना हेच तर हवे होते ! हा दिवस तर मुलांसोबत इतकी धमाल केली की विचारू नका ! सकाळी सर्व मुलांसोबत उपासना केली .मग व्यायाम केला .सूर्यनमस्कार घातले . पुन्हा एकदा सर्व मुलांसमोर तास दीड तास बोलायला आचार्यजी यांनी सांगितले .मग त्यांना राष्ट्र म्हणजे काय , आपली राष्ट्र कर्तव्ये काय आहेत , नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, संघटन म्हणजे काय , एकता म्हणजे काय, अनुशासन म्हणजे काय, राष्ट्रभक्ती म्हणजे काय , अशा विविध त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांना उत्तर येते देत चर्चात्मक उदबोधन पार पडले . पाऊस उघडण्याची वाट मी पाहत होतो .परंतु पाऊस काही थांबायचे नाव घेईना .वस्तीगृहामध्ये थांबलेला तो दिवस सत्कारणी लागला .आम्ही गाणी म्हटली ,व्यायाम केला ,चित्रे काढली , फिरलो , धारा काढल्या , झाडे लावली ,आश्रम पाहिला , जेवलो , नाचलो , बागडलो ,खेळलो .मुले काही केल्या मला सोडेचनात ! 

एका मुलाने माझ्याकडून शिवाजी महाराजांचे चित्र काढून नेले .ते त्याने सर्वांना दाखवल्याबरोबर माझ्यासमोर चित्र काढून घेण्यासाठी रांग लागली ! शिवाजी महाराज ,महादेव ,गणपती , सरस्वती , लक्ष्मी माता ,भारत माता , नर्मदा माता , नरसिंह , अफजल खान वध असे शेकडो प्रसंग मुलांनी माझ्याकडून मोठ्या कागदावर काढून घेतले !काही हुशार मुलांनी तर चटकन ते रंगवून देखील आणले ! इथली मुले उंचीने जरी कमी असली तरी अत्यंत चिवट काटक आणि हुशार असतात . थोडेसे बसके आणि पसरट नाक , स्वच्छ पांढरे दात आणि पाणीदार डोळे ही त्यांची ओळख .आपल्या महाराष्ट्रातील अमरावती ,अकोले , नागपूर , गोंदिया ,भंडारा ,चंद्रपूर या भागापासूनच अशा पद्धतीची चेहरेपट्टी चालू होते .हा भाग त्याच भागाशी जोडला गेलेला आहे . त्या रात्री जेवताना संघाचे अजून काही पूर्णवेळ प्रचारक आणि स्वयंसेवक भेटले .त्या भागामध्ये काम उभे करण्यासाठी त्यांना कसे व किती कष्ट पडले ते त्यांनी विस्तृत सांगितले . आपल्या दैनंदिन जीवनातील सुख सोई लाथाडून ,अशा एखाद्या दुर्गम वनक्षेत्रामध्ये जाऊन ,तिथल्या अनोळखी आणि परक्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण करणारी ही माणसे खरोखरीच प्रातःस्मरणीय आहेत ! रात्री मुलांनी मला पुढच्या आश्रमामध्ये कशी भयंकर भूते आहेत आणि त्यामुळे मी इथेच राहणे कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले !भुताच्या गोष्टी सांगताना त्यांचे हातवारे डोळे आणि चेहरे पाहून माझी हसून हसून पुरेवाट झाली !मी हसतो आहे हे कळल्यावर त्यांनी अजूनच भुताच्या गोष्टी मला सांगायला सुरुवात केली ! आदिवासी लोकांच्या मनामध्ये भुताच्या काय काय कल्पना असतात ते त्यामुळे मला कळाले ! खरे तर आपण शहरी माणसे हीच या वनक्षेत्रासाठी शाप ठरणारी भूते आहोत हे मात्र अगदी खरे ! मुलांच्या मायेमध्ये अडकणे फारसे बरे नव्हते . त्यामुळे भल्या पहाटे तीन वाजता उठून मी स्नान वगैरे आटोपले आणि पहाटे चारलाच धूम ठोकली .
आश्रमाचा शिक्का आणि मनुदास महंत यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून दिलेला संपर्क क्रमांक 
(इच्छुकांनी त्यांना संपर्क करून आश्रमाला मदत करावी . आश्रमाचा खाते क्रमांक व अन्य माहिती खालील प्रमाणे)
 (आचार्य किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधून मदत करावी ही नम्र प्रार्थना )

 आचार्यजींनी माझ्यासाठी एक निळ्या रंगाची छत्री तिथे दाराबाहेर ठेवली होती . त्यांच्या इच्छेचा मान म्हणून मी ती सोबत घेतली .परिक्रमेमध्ये टोपी छत्री वगैरे वापरायचे नसते .पुढे ती कोणाला तरी देऊन टाकू असा विचार करून मी ती झोळीच्या तळाशी टाकून दिली .हा संपूर्ण प्रकल्प सिलगी नावाच्या नदीच्या काठावर आहे . ती नदी ओलांडून रात्रीच्या अंधारात जंगलचा रस्ता झपाझप तुडवू लागलो .बारीक पाऊस अजूनही सुरू होता .परंतु झपाझप चालल्यामुळे शरीर गरम झालेले होते आणि हा शिडकावा सुखद होता . घनघोर अंधारामध्ये कीर्र जंगलातून अनवाणी चालताना सोबत फक्त एकाच गोष्टीची भक्कम साथ होती .नर्मदा मातेला भेटण्याची ओढ आणि तिचे स्मरण !

लेखांक अठरा समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर