लेखांक १७ : कोल्ह्याने शिकविलेला धडा

गेले तीन दिवस मी सरासरी १८ ते २२ किलोमीटर चालत होतो .डॉक्टर प्रल्हाद पटेल म्हणाले त्याप्रमाणे हळूहळू माझे पाय बोलू लागले . सुरुवातीचे काही दिवस केवळ पाच ते दहा किलोमीटर चालण्याचा सल्ला मी मनावर घेतलेला नव्हता . त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे निघालो खरा परंतु माझे पाय खूपच दुखू लागले .पाय दुखू लागले की मी थोडासा एका कडेला उभा राहून थांबायचो आणि थंडी भरून आली की पुन्हा चालायला लागायचो . असा थांबत थांबत मी निघालो होतो . माझ्या मागचे सर्व परिक्रमावासी झपाझप पुढे निघून गेले . ते कसे काय इतक्या गतीने चालत आहेत हेच मला कळत नव्हते . आपल्याकडून काही परिक्रमा पूर्ण होणार नाही असे वाटू लागले . एक क्षणभर असाही विचार मनात आला की आता आपण नर्मदेचे दर्शन घेतलेले आहे . नर्मदेच्या काठी चार पावले चाललो सुद्धा आहे तरी चला घरी परत जाऊया ! अशा सर्व नकारात्मक विचारांनी मनामध्ये गर्दी केलेली असताना अचानक उजवीकडून धावतच एक सुंदर असा कोल्हा माझ्यासमोर आला .आणि माझ्याबरोबर समोर येऊन दचकून थांबला .

याची पूर्ण वाढ झालेली नव्हती हे कदाचित कोल्ह्याचे पिल्लू असावे व ती मादी असावी .अतिशय सुंदर असा तो कोल्हा पाहून मी क्षणभर जागेवर उभा राहिलो ! आमच्या दोघांची नजरा नजर झाली ! त्याचे सुंदर चमकदार पाणीदार भुरे डोळे लक्षात राहिले ! आणि त्याने धूम ठोकली . मी चालत होतो तो एक विस्तृत माळरान प्रदेश होता .पाच-सहा किलोमीटर पर्यंतचा परिसर दिसत होता व या संपूर्ण परिसरात एकही झाड नव्हते . कोल्हा माझ्यासमोरून डाव्या बाजूला असलेल्या माळावर पळाला . मी बघत होतो .एकाच गतीने तो पळत होता .पळत पळत तो लांब गेला .जसजसा लांब जाऊ लागला तसा एक केवळ काळा ठिपका मला पळताना दिसू लागला .माळावरच छोटी टेकडी होती त्या टेकडीवर तो पळत पळत गेला . तिथून खाली उतरला आणि परत उलटा पळत आला .हे सर्व अंतर सुमारे दोन किलोमीटर आरामात असावे .तो दोन किलोमीटर पळत गेला आणि परत उलटे दोन किलोमीटर पळत आला आणि माझ्यासमोरच पुन्हा रस्ता ओलांडून उजवीकडे पळून गेला . आता मात्र तो अदृश्य झाला .कुठे गेला काहीच कळले  नाही .मी विचार करू लागलो . दहा-बारा किलो वजन असलेला तो फुट दीड फुटाचा छोटासा जीव , जर न थकता न थांबता इतकी मोठी धाव सहज घेऊ शकतो आहे! तर माझ्यासारख्या धडधाकट माणसाला पाच पाच मिनिटाला का थांबावे लागत आहे ? आणि मी मनाचा निश्चय केला , की ते काही नाही आपण न थांबता चालत राहायचे .त्यादिवशी मी सलग अठरा किलोमीटर अथक चालून कटंगी गावामध्ये तेजी बाबा नावाच्या एका आदिवासी नागा साधूच्या कुटीमध्ये जाऊनच थांबलो ! परिक्रमेमध्ये तुम्हाला कधी कोण काय शिकवून जाईल याचा नेम नाही !त्या एवढ्या छोट्या कोल्ह्याने मला खूप मोठा धडा शिकविला !पुढे देखील परिक्रमेमध्ये मी अक्षरशः शेकडोंनी कोल्हे पाहिले परंतु हा पहिलाच कोल्होबा चांगला लक्षात राहिला !जेव्हा जेव्हा माझ्या पायाची गती कमी व्हायची तेव्हा तेव्हा मला हा कोल्हा आठवायचा ! दत्तगुरूंनी २४ गुरु केले होते आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकले होते . तसे हा कोल्हा माझा गुरु झाला ! 
आमगाव , भानपूर बिसौरा , माणिकपुर, देव्हारा , देवरी कलाँ , छपरा रयत ही गावे पार करत कटंगी गाठले . 
हा सर्व मार्ग अतिशय सुंदर होता .भरपूर थंडी ,मस्त धुकं , पक्षांचा किलबिलाट ,छोटे मोठे तलाव , त्यात विहार करणारी सुंदर बदके ,कमळे सगळेच स्वर्गीय दृश्य होते .
पक्षीमित्र डॉक्टर सलीम अली यांनी लिहिलेले बुक ऑफ इंडियन बर्ड्स मी लहानपणापासून वाचत आलो आहे .त्यातील चित्रे पाहणे किंवा ती पाहून पुन्हा काढणे हा माझा आवडता छंद शाळेमध्ये असताना होता .त्यामुळे त्या पुस्तकातील बहुतांश पक्षी मला चांगले माहिती आहेत .परिक्रमेमध्ये मी त्यातील जवळपास सर्व पक्ष पाहिले .माणिकपूर गावाजवळ लागलेले २ तलाव तर खूप सुंदर होते . या माणिकपूर गावामध्ये आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह देखील होते .सर्व मुलींची चिव चिव लगबग सुरू होती . वाटेमध्ये छोटी छोटी गावे लागत .वाड्या वस्त्या लागत .ज्याला नुकतेच बोलता येऊ लागले आहे अशा मुलापासून ते साधारण दहा अकरा बारा वर्षापर्यंतची मुले पळत बाहेर येत आणि नर्मदे हर करत ! जोपर्यंत तुम्ही दिसत आहात तोपर्यंत ती न थकता नर्मदे हर चा पुकारा देत ! त्यांनी नर्मदे हर म्हटल्यावर आपण नर्मदे हर म्हटलेच पाहिजे ! तुम्ही आवाज देत नाही तोपर्यंत ते पुकारा देत राहतात .
दरम्यान एक गमतीशीर परंतु विचित्र घटना घडली .दुचाकी वरून एक माणूस रागाने माझ्या दिशेने ओरडत आला , " रुक ! साले रुक ! " . त्याच्या ओरडण्यामुळे मी जागेवर उभा राहिलो . तो मला म्हणाला तुम रात को कहा पर रुक थे? मी सांगितले दुर्गा मंदिरामध्ये उतरलो होतो आणि मी एकटाच होतो .माझी बोलण्याची पद्धत आणि एकंदर वेश पाहून त्याच्या लक्षात आले की त्याची काहीतरी चूक झाली आहे आणि मला म्हणाला बाबाजी मुझे क्षमा करना । लेकिन नगरार नदी के किनारे कोई हग के गया है ।आपके साथ कोई नही है यह मुझे पता नही था ।जॅक वेल के बाजू मे चार पाच लोक लाईन मे नक्काशी डाल के गये है । यहा हम कपडे धोते है । नहाते है।पीने का पानी तक भरते है ।शरम आनी चाहिये इन लोगो को । 
मी सुद्धा तिथेच आंघोळ केली होती ना !
मला साधारण हे कृत्य कोणी केले असेल याचा अंदाज आला . परंतु मी त्याला काही फारशी माहिती देत नाही बसलो की ती माणसे कोण आहेत आणि कुठे आहेत . कारण तो चांगलाच चिडलेला होता . तो म्हणाला हे नेहमीचे झालेले आहे . आम्ही खूप वेळा सांगितले मंदिर वाल्या लोकांना की एक संडास बांधा परंतु ते बांधत नाहीत . आणि परिक्रमावासी काही ऐकत नाहीत .दिसले पाणी की बसले शौचाला .तो मनुष्य जे सांगत होता ती गोष्ट अगदी तंतोतंत खरी  होती. विशेषतः मध्य प्रदेशातील काही ठराविक जिल्ह्यामधून येणारे भौतिक मागण्या असणारे परिक्रमावासी अशा गंभीर चुका करत असे माझे निरीक्षण आहे .वृद्ध माणसे ,अपंग माणसे, महिला , पूर्ण शहरी जीवन जगलेली माणसे आणि काही ठराविक जिल्ह्यातील मध्य प्रदेशातील माणसे यांच्याकडूनच नेहमी हा अपराध होत असे .या लोकांना फारसे लांब चालत जाणे जमत नसे .मग भल्या पहाटे अंधारामध्ये उठून जवळपास कुठेतरी पटकन ते आटोपून घेत . परंतु त्यांना हे माहिती नसे की उजाडल्यावर ते सर्व जगाला दिसणार आहे . हा लेख वाचणार्‍या प्रत्येकाला मी विनंती करू इच्छितो की कृपया उघड्यावरतीच शौच विसर्जन करा ,परंतु ते पूर्णपणे झाकण्याची काळजी घ्या . हिमालयामध्ये किंवा अन्यत्र नियमित ट्रेकिंग करणारी माणसे ही काळजी घेतात . सोबत भुसा किंवा मातीची पिशवी ठेवून शेवटी शौच विसर्जन झाल्यावर ते आवर्जून झाकून टाकतात .अगदी इतके नाही केले तरी पायाने एक खड्डा मातीत काढून जाताना तो त्याच मातीने बुजविणे सहज शक्य असते .अशा उघड्या पडलेल्या घाणीवरील माशा खूप मोठ्या प्रमाणात रोगप्रसार करतात . .पाण्याचा स्त्रोत, घरे ,रस्ता , येण्या-जाण्याच्या पायवाटा , शेत अशा कुठल्याही ठिकाणी कृपा करून जात जाऊ नका . त्या माणसाचा त्रागा अतिशय समजून घेण्यासारखाच होता .अशा काही मुठभर लोकांमुळे संपूर्ण परिक्रमा बदनाम होते . तो गाडीवर पुढे निघून गेला आणि काही वेळाने पुन्हा उलटा वळून आला .जाता जाता त्याने पुन्हा एकदा माझी क्षमा मागितली . तो म्हणाला बाबाजी आप यह नही कर सकते यह मै जान चुका हूँ।फिर भी मै आपको बोला । मुझे क्षमा करना ।
मी त्याला सांगितले की माझ्या मनात कुठलेही वाईट भाव त्याच्याबद्दल नाहीत उलट तो करतो आहे ते चांगले काम आहे .अधिकाधिक लोकांचे प्रबोधन याविषयी करणे आवश्यक आहे .तो त्याच्या मार्गाने निघून गेला आणि मी पुढे मार्गस्थ झालो .  असो.
दुपारी भोजनासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आश्रमातून एका माणसाने आवाज दिला . हे देवरी नावाचे गाव होते आणि मला हाक मारणाऱ्या माणसाचे नाव होते चम्मूलाल तीरथलाल झरिया .
 माँ नर्मदा यज ( यज्ञ ) पीठ असे आश्रमाचे नाव होते .खरे म्हणजे ही झरिया यांची खाजगी शेती होती आणि शेतामधील ते घर होते .परंतु पती-पत्नी दोघेच राहत असत व दोघांना मूलबाळ काही नसल्यामुळे त्या दोघांनी असा निर्णय घेतला की या शेतातून येणारे संपूर्ण उत्पन्न परिक्रमावासींची पुत्रवत सेवा करण्यात खर्च करायचे ! किती मोठा त्याग ! ते दोघे आपले नाव सुद्धा कोणाला सांगत नसत .मीच चौकस वृत्तीने त्यांचे नाव शोधून काढले . यांनी येथे नर्मदा मातेचे , महादेवाचे अतिशय सुंदर मंदिर ,एक छोटीशी यज्ञशाळा आणि गोशाळा बांधली होती . परिक्रमावासींना जे लागेल ते सर्व हे स्वतः पुरवत . आल्या आल्या माझे मळलेले कपडे पाहून त्यांनी मला सांगितले की आमच्या इकडे कपडे लगेच वाळतात . तरी पाणी भरपूर आहे स्वच्छ कपडे धुऊन टाका ! 
                               नर्मदा मंदीर
        यज्ञशाळा व गौशाळा
मी कपडे धुवून टाकले . शेताच्या कुंपणाच्या तारेवर वाळत घातलेले धोतर पाचच मिनिटात वाळून निघाले .
झपाझप चालत आल्यामुळे मी एकटाच आश्रमामध्ये होतो . थोड्या वेळातच पंधरा-वीस परिक्रमावासी तिथे पोहोचले . दरम्यान झरिया काकूंनी माझ्यासाठी स्वयंपाक करून मला वाढले होते . या लोकांसाठी त्या पुन्हा कंबर कसून स्वयंपाकाला लागल्या . मी मदत करू का विचारल्यावर स्पष्टपणे आणि नम्रपणे नकार दिला .त्यांनी सांगितले की आमच्या आश्रमामध्ये परिक्रमा वासींना कुठल्याही प्रकारचे काम करू दिले जात नाही . चम्मूलाल झरिया माझ्या शेजारी येऊन बसले आणि उन्हामध्ये सुमारे एक तास त्यांनी माझ्याशी गप्पा मारल्या .मी परिक्रमा का उचलली ?आतापर्यंत मला काय काय अनुभव आले ?असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले .कोल्ह्याचा अनुभव त्यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले आप खुली आखो से परिक्रमा कर रहे है ।आपको बहुत सुंदर अनुभूती आगे आती जायेगी । 
दरम्यान इथे सायकलवरून परिक्रमा करणारे एक परिक्रमावासी मला भेटले .गंगाधर चंद्रभान कदम असे त्यांचे नाव होते मुक्काम सोन्ना तालुका पूर्णा जिल्हा परभणी . यांनी सायकलवर संपूर्ण भारतभ्रमण केले होते बारा ज्योतिर्लिंगे चारधाम अष्टविनायक सर्व केले होते . अगदी कैलास मानसरोवर ला सुद्धा सायकल वर जाऊन आलो असे त्यांनी मला सांगितले . सीमेवरती यांना कोणी अडविले नाही असे ते मला म्हणाले . यात कितपत तथ्य आहे माहिती नाही परंतु त्यांची प्रकृती आणि वेग पाहता ते आरामात संपूर्ण भारत फिरले आहेत हे कळत होते .विशेष गंमत म्हणजे हे सायकल मधील चाकाची हवा कधी तपासत नसत . तर ती आपोआप देव भरून देतो असा त्यांचा विश्वास होता .इथून पुढे मी मुक्काम कुठे करावा हे मला बाबांनी सांगितले आणि त्याप्रमाणे मी मजल दरमजल करत कटंगी गावामध्ये पोहोचलो .डाव्या हाताला एक बस थांबा होता आणि त्याच्यासमोर दोन मोठ्या विहिरी होत्या .विहिरीवर बायका पाणी भरत होत्या . त्यांना विचारले गावामध्ये आश्रम कुठे आहे .आश्रम मुख्य रस्त्यापासून थोडासा आत मध्ये होता .आश्रम कसला एका गरीब गोंड आदिवासी गृहस्थाचे घरच ते .तेजी बाबा किंवा तेजा बाबा या गोंड आदिवासी गृहस्थाने जुन्या आखाड्याचा अनुग्रह घेतलेला होता व घरातच धुनी लावून तो संन्यस्त जीवन जगत होता .दिसायला याचा वेश साधू सारखा होता परंतु संसारामध्ये राहत होता . घर दगड मातीचे आणि शेणाने सारवलेले कौलारू होते .मातीने दगडाने अंगण तयार करून ते चांगले धोपटून त्यावर शेणाचा सुंदर सडा घालून कलाकुसर केली जाते याला इथे लिपाई पुताई असे म्हणतात .हे आदिवासी लोक इतकी सुंदर रिपाई पुताई करतात की विचारू नका . जरा देखील पाणी पडले किंवा पाऊस आला तरी ही सर्व मेहनत पाण्यामध्ये जाणार असते हे माहिती असून देखील लिपाई पुताई आवर्जून केली जाते . एका बाजूला घर ,मध्ये अंगण , एका बाजूला धुना आणि देवघर , एका बाजूला मोठे झाड , त्याचा पार आणि त्याच्या खाली गोठा अशी घराची रचना होती .चार-पाच शेळ्या मेंढ्या बांधलेल्या होत्या आणि एक म्हैस होती .इतकी बारीक आणि दुबळी म्हैस मी पहिल्यांदा पाहत होतो .ही अस्सल देशी जात होती म्हशीची . पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण ज्या गलेलठ्ठ म्हशी पाहतो त्या वेगळ्या आणि ही जात वेगळी . ही म्हैस आणि तिचे दूध हे एकमेव उत्पन्नाचे साधन होते बाबाला . शेती फारशी नव्हती एक छोटासा प्लॉट त्याच्याकडे होता .त्याच्यामध्ये हरभरा लावून त्यावर उदरनिर्वाह चालवायचा . खाण्यापिण्याची इतकी भ्रांत असलेली माणसे आपल्या घासातला घास दुसऱ्या कोणाला तरी देण्याची इच्छा कशी काय करू शकतात हे माझ्या शहरी तर्क बुद्धीच्या पलीकडचे होते . बराच वेळ बाबा आणि मी अंगणामध्ये बसून गप्पा मारत होतो .त्यादिवशी मी एकटाच मुक्कामी होतो . माझ्या मागचे सर्व लोक आधीच पुढे निघून गेले होते . मुळात मी असे ठरविले होते की मुक्काम कुठे करायचा हे आपण ठरवायचं नाही ! सूर्यास्त होता होता ज्या गावामध्ये असू तिथे जी मिळेल ती सोय पत्करायची . बाबाने ओसरी मध्ये हातपाय पसरायला जागा दिली . प्रचंड थंडी होती त्यामुळे त्याने सुंदर शेकोटी माझ्यासाठी करून ठेवली .या भागामध्ये लाकडाचे देखील दुर्भिक्ष्य आहे .म्हणजे तसे आहे सर्व जंगलच, परंतु वनखात्याची लोक लाकडे तोडू देत नसल्यामुळे लाकडे आणायला खूप दूरवर जावे लागते .आपोआप वाळून पडलेली लाकडे गोळा करायला परवानगी असते .परंतु गावातील सर्वच लोक लाकूड वापरत असल्यामुळे जवळची लाकडे लवकर संपतात .पाच-सहा किलोमीटर पर्यंत सहज जाऊन मोठे मोठे ओंडके डोक्यावर वाहून आणले जातात .कष्टाच्या बाबतीत पुरुष आणि महिला असा भेदभाव खेडोपाडी केला जात नाही . स्त्रिया या पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना कदाचित थोडेसे अधिकच कष्ट घेत असतात . शेकोटी पेटवण्याची या लोकांची पद्धत मला फार आवडली . एक मोठे लाकूड ठेवले जाते .परंतु ते भसाभसा पेटणार नाही याची काळजी घेतली जाते .छोट्या काडेपेटीतील काडीच्या मापाच्या काड्या काटक्या पेटवून छोटीशी शेकोटी केली जाते .त्या छोट्या शेकोटीच्या उष्णतेमुळे मोठ्या लाकडाला थोडेसे निखारे निर्माण होतात . आणि त्या निखाऱ्यांच्या मदतीने छोटी छोटी लाकडे टाकून शेकोटी प्रज्वलित ठेवली जाते . या पद्धतीमध्ये तुमचा वेळही जातो , थंडी देखील भागते आणि लाकूड देखील फारसे लागत नाही .हे सर्व करत असताना अतिशय एकाग्र चित्त असावे लागते .त्यामुळे धुनी पुढे किंवा शेकोटीपुढे बसून तिला प्रज्वलित ठेवणे हे एक प्रकारचे ध्यानच आहे . विशेषतः तेजी बाबाच्या देवघरामध्ये जो अखंड धुना चालू होता त्यासाठी बरीच लाकडे लागायची . ती एक तर विकत आणावी लागत किंवा खूप दूरवर जाऊन डोक्यावरून वाहून आणावी लागत . बहुतेक वेळा बाबा किंवा त्याची बायको डोक्यावरून लाकडे आणत असत . आता सुद्धा त्याच्या बायकोने लाकडाची एक मोठी मोळी आणून माझ्यासमोर ठेवली . बाबा ने मला एक विनंती केली .तुमची हरकत नसेल तर म्हशीला आणि शेळ्यांना आत मध्ये बांधू का ? त्या मुक्या जीवांना देखील खूप थंडी वाजत होती .आणि आम्ही केलेल्या शेकोटीची ऊब वाया जात होती म्हणून त्याने मला विचारले .मी त्याला म्हणालो काहीच हरकत नाही . तुमचे घर आहे . तुमची गुरे  आहेत. बाबा म्हणाला परंतु तुम्ही अतिथी आहात आणि अतिथी परमेश्वर असतो . छोट्या छोट्या घटनांमधून ही साधी भोळी दिसणारी माणसे किती मोठे तत्त्वज्ञान मला शिकवून जात होती ! सर्व भूतांवर दया करा !अतिथी देवो भव ! हे सर्व पुस्तकांमध्ये वाचण्यापेक्षा असे सहज जगण्यातून शिकणे किती छान आहे ! म्हैस आणि शेळ्यांना शेकोटी आवडत होती .शरीराच्या सर्व बाजू ही जनावरे शेकून घेत होती . बाबाच्या बायकोने रात्री भात आणि हरभऱ्याच्या पातीची आंबट भाजी आणून दिली .कितीही विनंती केली तरी इथले लोक तुमच्यासोबत भोजन घ्यायला बसत नाहीत . कारण त्यांना अशी भीती वाटते की भोजन संपून जाऊ नये .जोपर्यंत अतिथी तृप्त होऊन उठत नाही तोपर्यंत घरातील कोणीही जेवणाला स्पर्श करत नाही . माझे जेवण झाल्यावर बाबा जेवायला बसला . बाबा बरेच गमतीशीर अनुभव सांगत होता . त्याला नर्मदा मातेचे आलेले अनेक अनुभव त्याने मला सांगितले .बाबाने परिक्रमा केली होती त्यामुळे त्याला परिक्रमावासींविषयी सहानुभूती होती . या भागातील बहुतांश आदिवासी किंवा वनवासी समाजामध्ये नर्मदा परिक्रमे बाबत थोडेसे अज्ञानच आहे . मला असे लक्षात आले की बऱ्याच लोकांना परिक्रमा नक्की काय आहे हे खरोखरच माहिती नाही . त्यामुळे बरेचदा परिक्रमावासींना काही अप्रिय अनुभवांना सामोरे जावे लागते . तेजी बाबा सारखा एखादा मनुष्य असतो ज्याने स्वतः नर्मदा परिक्रमा केल्यामुळे त्याला त्यातील सुख आणि दुःख याची चांगली जाणीव असते .
आपल्या झोपडी बाहेर बसलेले तेजी बाबा
आदिवासी लोकांचे छोटे छोटे दगडाचे देव !याच अंगणामध्ये बाबा परिक्रमा वासींना यथाशक्ती सेवा देतात .
बाबाने अजून एक वाईट गोष्ट सांगितली . तो म्हणाला शहरातील खूप लोक इथे येतात . राहून जातात .जाताना मला सांगतात की आत्ता आमच्या जवळ पैसे नाहीत ,परंतु गावी गेल्यावर तुला नक्की पैसे पाठवितो .परंतु आजपर्यंत केवळ एका माणसाने पाच हजार रुपये मला मनी ऑर्डरने पाठवून दिले बाकी कोणीही एक रुपया सुद्धा दिलेला नाही .
( वाचकांपैकी कोणाला तेजी बाबा यांना आर्थिक मदत करायची असेल तर त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे .
त्याचा मुलगा मनोज याच्या क्रमांकावर जी पे आहे .
6266690357.
बाबांशी बोलण्यासाठी हा क्रमांक आहे हा क्रमांक आहे ९१११३०६०११ /  91 11 30 60 11 . 

तेजी बाबांचा खाते क्रमांक आणि आयएफएससी क्रमांक खालील प्रमाणे आहे . 
Name of the account Holder : Teji Singh Sothiya
Account Number : 2989340266
Name of the Bank : CENTRAL BANK OF INDIA
Name of the Branch : BICHHIYA NIWAS
IFCI Code : CBIN0282015
आपले एक वाचक श्री श्याम भागवत यांनी वरील माहिती तपासून ती योग्य असल्याचे कळविलेले आहे .

मला खरोखरीच जी स्थाने मदत करण्या योग्य वाटतील त्यांचेच क्रमांक मी इथे शेअर करणार आहे .असो.)
रात्री शेकोटी शेजारीच झोपी गेलो .सकाळी उठायला थोडासा उशीरच झाला उजाडले होते .बाबा मला त्याच्या देवघरामध्ये घेऊन गेला आणि एक छोटी शंखिणी त्याने मला दिली . आणि म्हणाला हिच्यावरती तुमचाच अधिकार होता . ही तुम्ही ठेवा . अतिशय उच्च स्वरामध्ये ती वाजत होती आणि तिचा आवाज खूपच खणखणीत होता .
 शंख म्हणजे गुळगुळीत असतो तो आणि शंखिणीला काटे असतात .शंखिणी पूजेमध्ये शक्यतो वापरत नाहीत परंतु वाजवण्यासाठी वापर केला जातो . खरे तर पाठीवरील ओझे कमीत कमी असावे असा माझा प्रयत्न होता परंतु अशा एक एक छोट्या छोट्या गोष्टींनी वजनामध्ये भरच पडत होती . 
इथून निघालो . वाटेमध्ये एक मंदिर होते .बाहेरूनच दर्शन घेतले . वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक स्थान देवतेला नमस्कार करीत करीत परिक्रमा करावी .टेंबे स्वामी सांगत की वाटेत येणाऱ्या प्रत्येक नदीला वंदन करून मगच ती ओलांडावी . रस्त्याला लागलो आणि विहिरी वरती पाणी भरून घेतले .यातील एक विहीर कपडे धुण्याची होती आणि एक विहीर पिण्याच्या पाण्याची होती .पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत अतिशय स्वच्छ राखले जातात . त्याच्या आजूबाजूला कोणी देखील कचरा केलेला खपवून घेतले जात नाही .नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान चालू केले खरे परंतु याची गरज छोट्या छोट्या खेड्यापाड्यांना अजिबात नाही कारण ती मुळातच स्वच्छ असतात . दिवसातील अर्धा वेळ स्वच्छता राखण्यातच जातो अशीच दिनचर्या या लोकांची असते . डोळ्यांना अतिशय सुंदर दिसेल अशा पद्धतीने घर , गोठा , अंगण , शेती , विहिरी , तलाव , बगीचे , रस्ते ठेवलेले असतात . 
इथून पुढे आजवरचे सर्वाधिक अंतर मी कापले . पहिले पंधरा दिवस पंधरा किलोमीटर पेक्षा जास्त चालू नये हा परिक्रमावासींचा नियम पाडळी तुडवत चांगले सत्तावीस किलोमीटर अंतर चाललो आणि संघ संचलित जनजाती कल्याण केंद्र आश्रम बरगांव येथे पोहोचलो .मध्ये अनेक छोटे-मोठे घाट रस्ते लागले .अतिशय उत्कृष्ट असे हे जंगल  आहे. साग , ऐन , खैर, बांबू , मोह , निलगिरी याची घनदाट झाडी सर्वत्र दिसते . असे सांगितले जाते की पूर्वी हा प्रदेश जगातील सर्वाधिक घनदाट वनांपैकी एक होता .याची पुष्टी करणारे अनेक पुरावे येथे सापडलेले असून भारतातील एकमेव असे राष्ट्रीय जीवाश्म संग्रहालय कटंगीच्या लगेच पुढे असलेल्या घुघुवा या गावामध्ये बांधलेले आहे . प्रत्येकाने आवर्जून जाऊन पहावे असे हे संग्रहालय आहे . इथे सुमारे साडेसहा करोड वर्ष जुन्या झाडांचे जीवाश्म जतन करून ठेवलेले आहेत . ताडवर्गीय वनस्पती व नारळाच्या विविध प्रजाती ,तसेच केवळ ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सापडणाऱ्या निलगिरीच्या काही जाती ,खाऱ्या पाण्यामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि समुद्रातील शंख शिंपले याचे जीवाश्मदेखील इथे करोडो वर्षांपूर्वी चे आढळलेले असल्यामुळे जंबुद्वीप आशिया खंडाला नंतर येऊन चिकटले या दाव्याला पुष्टी करणारे हे जीवाश्म आहेत .
          राष्ट्रीय जीवाश्म संग्रहालय घुघुवा

भारतीय भूप्रदेशाचे प्राचीनत्व सिद्ध करणारा हा मंडला आणि दिंडोरी जिल्ह्याचा प्रदेश आहे . इथे परिक्रमे खेरीज सुद्धा तुम्ही पर्यटक म्हणून येऊन गेले पाहिजे .
याच्यापुढे बरगांव मध्ये अनेक गमती जमती झाल्या त्या पुढच्या भागात सांगतो .


लेखांक सतरा समाप्त (क्रमशः)
मागील लेखांक
पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर