लेखांक ११ : पहिला मुक्काम

पहिलेच भोजन घेऊन तनमन तृप्त झाले ,तिथेच मुक्काम करा असा आग्रह घरातील लोक करत होते परंतु मी मनोमन असे ठरविले होते की या परिक्रमे दरम्यान आपल्या देहाचे कमीत कमी चोचले पुरवायचे , तसेही मी सात आठ किलोमीटरच चाललो होतो सकाळपासून. अजून चालता येईल असे वाटले आणि मी भर उन्हामध्ये सामान उचलले . पुढे बरेला नावाचे गाव लागले . तिथे जमुना पटेल नावाचा एकाच डोळ्याने डोळस असलेला एक चहावाला भेटला . हा गावामध्ये संघाची शाखा लावत असे . त्याच्या आग्रहाखातर सुंदर असा चहा पिऊन पुढे चालू लागलो 
 जमुना पटेलने एक सेल्फी काढला व मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . तो क्षण
परिक्रमेच्या अगदी सुरुवातीला प्रस्तुत लेखकाचा स्वच्छ आणि वजनदार अवतार . सौजन्य जमुना पटेल .
माझे कपडे नवे कोरे होते आणि क्षौर केलेले होते त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना कळत होते की हा नवीन परिक्रमा वाशी आहे .लोक कुतूहलाने थांबवत , नर्मदे हर चा पुकारा देत आणि चौकशी करत . कहा से हो बाबाजी ? क्या करते हो ? क्यू उठाई परिक्रमा ? वगैरे वगैरे .नर्मदा खंडातील लोकांनी गेल्या अनेक वर्षात इतके परिक्रमावासी पाहिले आहेत की समोरचा मनुष्य पाहिला पाहिला ते त्याच्याबद्दलची बरीचशी माहिती ओळखून जातात . हा शिकलेला आहे का अशिक्षित आहे , शहरातला आहे का गावातला आहे ,नोकरी करतो की व्यवसाय करतो ,विवाहित आहे की अविवाहित आहे की ब्रह्मचारी आहे , स्वखुशीने आला आहे की परिस्थितीमुळे आला आहे , अशा बऱ्याचशा गोष्टींचे ज्ञान त्यांना तुम्हाला पाहता क्षणी आधीच झालेले असते . बरेचदा काही लोक तुमची फिरकी सुद्धा घेत राहतात .आपण फक्त नाकापुढे बघून चालत राहायचे .असेच चालता चालता दुपारच्या मावळतीकडे एक मोठी बाजारपेठ लागली.हे बरेला नावाचे गाव होते . चांगलीच गजबज होती तिथे ठणठणपाल दादांच्या आश्रमामध्ये मुक्काम करा असे मला कोणीतरी सुचवले . 

अगदी रस्त्याला लागूनच आश्रम आणि मंदिर होते .दोन-तीन सत्तरी च्या पुढचे सेवेकरी आश्रमाचे काम बघत होते . मला त्यांनी आसन लावायची सूचना केली . तुम्ही जिथे मुक्काम करता त्या ठिकाणी एखादी जागा घेऊन तिथे आपला बोरिया बिस्तारा ठेवायचा असतो त्याला आसन लावणे असे म्हणतात .
 आसन लावण्यापूर्वी मी आतील मंदिरांची दर्शने करून घेतली आणि मग पाच मिनिटे बसून राहिलो . ठणठणपाल बाबांची मूर्ती आत मध्ये होती . तसेच एक सुंदर शिवलिंग देखील होते .देवीची मूर्ती होती . 

 माझ्या असे लक्षात आले की मंदिरामध्ये खूपच गोंगाट ऐकू येत होता . रस्त्यावरचा जरा सुद्धा शांतता नव्हती त्यामुळे मी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि सामान घेऊन चालायला लागलो . सेवेकरी काही अंतर माझ्यामागे धावत आला परंतु त्याला मी सांगितले की मला पुढे जायचे आहे मग तो म्हणाला जैसी तुम्हारी इच्छा । वैसे इधर भी रहे सकते थे । मला थोडेसे वाईट वाटले परंतु माझा नाईलाज होता .इतक्या घोंगाटामध्ये राहण्यात काहीच हशील नव्हता .पुढे चालू लागलो इथून पुढे रिछाई नावाचे गाव होते . तिथे शारदा मातेची एक टेकडी होती . 
रिछाई गावातील टेकडीवरील शारदा माता मंदिर समूह
टेकडी वरून दिसणारे परिक्रमा मार्गाचे विहंगम दृश्य

तिथे देखील मुक्कामाची सोय होती आणि गावामध्ये एका कुटुंबामध्ये परिक्रमावासी उतरायचे असे मला कळले . मी चालत असताना काही मुले सायकलवरून जाता जाता रील्स बनवत होती . त्यांना मला पाहून मौज वाटू लागली व ते माझ्याबरोबर चालू लागले .त्यांच्याकडे मोबाईल होते .मला म्हणाले बाबाजी आपकी फोटो लेते है । मी म्हणालो लेकिन मेरे पास तो कॅमेरा नही है । ते म्हणाले हरकत नही । किसी और का नंबर बता देना | हम भेज देंगे । मग त्यांनी माझा एक फोटो काढला . 
   बरेला व रिछाई दरम्यान मुलांनी काढलेले प्रकाशचित्र
मी झपाझप पुढे चालू लागलो आणि रिछाई गावांमध्ये पोहोचलो .इथे कटारे नावाचा परिवार परिक्रमावासींची अतिशय मनापासून सेवा करत असे . मोठे औरस चौरस असे त्यांचे घर होते . चार भाऊ , त्यांची चार घरे व या चारही घरांना जोडणारा एक लांबुळका वरांडे वजा भाग त्यांनी बनविला होता ज्याच्यामध्ये एकावेळी शंभर लोक सुद्धा झोपू शकले असते . अतिशय आगत्याने त्यांनी मला आत मध्ये नेले .तिथे मी एकटाच परिक्रमावासी होतो .परिक्रमावासींना झोपण्यासाठी फोमच्या गाद्या त्यांनी बनवून ठेवल्या होत्या . त्यांची चवड एका बाजूला  जिन्याखाली लावलेली होती .तिथून एक गादी घेऊन मी माझे आसन लावले . माझ्या परिक्रमेतली नर्मदा मातेची पहिली पूजा आणि आरती मी तिथे बसून केली .आरती मला पाठ नव्हती . चाल देखील आपल्या महाराष्ट्रातील चाली पेक्षा वेगळी होती .परंतु संगीताचे थोडेसे अंग असल्यामुळे ती आरती माझ्या लगेच लक्षात येऊन गेली .
 प्रीतम कटारे हे तिथले कुटुंब प्रमुख होते .सत्यम ,चंद्रशेखर आणि वेदांत नावाची या चौघा भावंडांची मुले होती आणि चार मुली देखील होत्या . खरे तर हजारो परिक्रमावासी यांच्या घरी रोज ये जा करत असतील . परंतु तरी देखील त्यांनी मला फारच आदर दिला असे मला जाणवले .कारण रात्रीच्या भोजनाला काय करू असे मला सर्व भावजयी विचारायला आल्या . मी , जो आपकी इच्छा । असे म्हणाल्यावर त्यांनी त्या भागातील वैशिष्ट्य असलेला गक्कड भरता माझ्यासाठी केला . माझ्यासाठी गक्कड हा प्रकार नवीन होता . दाल भाटी मध्ये जी भाटी असते त्यालाच इकडे गक्कड असे म्हणतात . तो कसा फोडतात कसा खातात हे सर्व त्यांना विचारून घेतले . भरता म्हणजे आपले वांग्याचे भरीत .मी जेवायला बसलेलो असताना घरातील सर्व कुटुंबीय माझ्यासमोर उपस्थित होते . आजी , आजोबा जे अत्यंत सुदृढ आणि ठणठणीत होते , चारही मुले , त्यांच्या पत्नी आणि सर्व नातवंडे असा गोतावळा माझ्या भोवती उभा होता .जेवण झाल्यावरती आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो . नातवंडांना चित्रपट सृष्टीचे आकर्षण आहे असे लक्षात आल्यावर त्यांना बॉलीवूड विषयी माहिती दिली .त्यांनी देखील त्यांच्या अनेक शंका विचारून घेतल्या .काही काळ बॉलिवूडमध्ये जवळून काम केलेले असल्यामुळे त्याचे सर्व अंतरंग मला पक्के ठाऊक होते ते त्यांना सांगितले . अन्य बऱ्याच राष्ट्रीय विषयांवर देखील चांगली चर्चा झाली . सातही नातवंडे अतिशय उत्सुकतेने माझे बोलणे ऐकत आहेत हे पाहून मला आश्चर्य वाटले . आताच्या काळामध्ये या वयाची मुले शक्यतो मोबाईल मध्ये गुंतलेली दिसतात . हा फारच मोठा फरक मला तिथे जाणवला . त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्तीकरण चालू आहे त्याची देखील त्यांनी मला माहिती दिली .नातवंडे रात्री उशिरापर्यंत मला चिकटून होती .अखेर आजी-आजोबांनी दरडावून त्यांना सांगितले .बाबाजी को विश्राम करने दो । मग सगळी मुले पळाली .
हा दिवस होता पौष शुद्ध द्वितीया शके १९४३ मंगळवार ३ जाने २२ .
पहाटे चार वाजता मला जाग आली . कडाक्याची थंडी पडलेली होती . साधारण सात आठ तापमान असावे .घराच्या समोरून मागे जायला सोय होती . वाटेत सवत्स धेनुमाई बांधलेली होती .मागे जाऊन मी आता गार पाण्याने अंघोळ करणार इतक्यात आजोबा माझ्यासाठी गरम पाणी घेऊन आले . एकट्या परिक्रमा वासीला मिळणारे हे काही फायदे असतात . लोक तुम्हाला शक्यतो घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे वागवतात .गटाने येणाऱ्या लोकांना मात्र शक्यतो इतक्या सुविधा मिळत नाहीत बरेचदा त्यांना भोजन ऐवजी शिधा दिला जातो आणि करून खायला सांगितले जाते . नर्मदा खंडामध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे . एक निरंजन ।दो सुखी ।तीन मे खटपट और चार दुखी ।
 अर्थात मला माहिती नव्हते की हा माझा परिक्रमेतील पहिला दिवस असल्यामुळे नर्मदा माता मला गरम पाणी वगैरे गोड कौतुक पुरवीत आहे . पुढे मात्र असे गरम पाणी कुठे मिळाले नाही .सकाळची पूजा आरती आटोपून घेतली . माताजी नी आणून दिलेला गरम गरम चहा पिऊन नर्मदे हर केले .अशा पद्धतीने आयुष्यातील पहिल्या वहिल्या नर्मदा परिक्रमेचा पहिला मुक्काम यथा सांग पार पडला !
लेखांक अकरा समाप्त ( क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर