लेखांक १० : या स्वामी जेवायला !

पोटात अन्न सरकले आणि पायांनी चांगली गती घेतली .
महामार्गाने जाताना दुचाकीवरून एकाने थांबून दक्षिणा दिली आणि माझा फोटो काढला . तो हा फोटो .


नवे कोरे बूट होते ,स्वच्छ डांबरी रस्ता होता , पहिलाच दिवस होता त्यामुळे कुठली इजा वगैरे पायाला झाली नव्हती अथवा वेदनाही नव्हती , झपाझप चालण्यासाठी अनुकूल अशीच ही परिस्थिती होती . त्यामुळे गतीने चालू लागलो . परंतु अजून सुद्धा मला नक्की चालावे कुठल्या गतीने हे कळत नव्हते .फार वेगाने चालले तर पुढे कधीतरी पाय दुखण्याची शक्यता होती .पायाला एखादी इजा झाली एखादा स्नायू ओढला गेला किंवा लिगामेंट वगैरे दुखावले तर सगळाच खेळ थांबणार होता .तेच जर हळूहळू चाललो तर वेळ वाढणार होता आणि पायांवर अधिक भार पडणार होता .मनात हा प्रश्न पडताक्षणी नर्मदा मातेचे स्मरण केले आणि तिला म्हणालो की मला मार्गदर्शन कर की माझे पाऊल किती लांबीचे असावे .ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्राइड असे म्हणतात . एका पावलाची झेप .ऐकून तुम्हाला हे सर्व मजेशीर वाटू शकते परंतु तीन हजार सहाशे किलोमीटर चालायचे असेल तर तुम्ही तुमच्या चालण्याच्या सवयी मध्ये केलेला एक छोटासा बदल सुद्धा शेकडो किलोमीटर चा फरक पाडू शकतो . त्यात हाडाचा अभियंता असल्यामुळे असल्या किरकोळ गोष्टींमध्ये काथ्याकुट करायची सवय मला मुळातच आहे . मला असा प्रश्न पडला आणि इतक्यात माझ्यासमोरून एक गाय चालते आहे असे माझ्या लक्षात आले . गोमाता छान डुलत डुलत चालली होती . तिच्या पावलांचे मी निरीक्षण करू लागलो . गाय एका संथ आणि सुंदर लयी मध्ये चालत होती .मी ठरविले की हिच्या पावलांवर पाऊल टाकून चालूया . तिचे मागचे पाऊल बरोबर पुढच्या पावलावर पडत असे . तिच्या चालण्याची अजून एक गंमत होती . 

तिला गती वाढवावीशी वाटली की ती चाल तशीच ठेवायची फक्त पाऊल टेकता टेकता एक इंच पुढे टेकवायची . गती कमी करताना देखील तीच युक्ती करायची पाऊल टेकता टेकता एक इंच अलीकडे ठेवायचे . या छोट्याशा गोष्टीमुळे देखील मला खूप मोठी शिकवण मिळाली . मी शक्यतो गती वाढविण्यासाठी वारंवारिता अर्थात फ्रिक्वेन्सी वाढवायचो त्यांनी पाय लवकर अवघडून जायचे .परंतु या युक्ती मध्ये वारंवारिता तीच होती आणि फक्त वेवलेंग्थ वाढवली जात होती . फारशी शक्ती लागतच नव्हती. त्या गोमातेचे मी मनोमन आभार मानले आणि पुढे चालू लागलो . महामार्गावरून गाड्या सुसाट वेगाने जात होत्या . परंतु जाता जाता बहुतेक लोक हात उंचावून नर्मदे हर म्हणत होते किंवा नुसता हात तरी दाखवत होते . काही लोक गाडी थांबवून पाच रुपये , दहा रुपये ,पन्नास रुपये यथाशक्ती दक्षिणा हातावर टेकवत होते . ही सर्व माणसे अत्यंत साधी व गरीब घरातील आहेत हे लगेच लक्षात येत होते परंतु त्यांची मैय्यावरील निष्ठा अतिशय वाखाणण्याजोगी होती . 
कोण कुठला परिक्रमावासी ?कुठून आला माहिती नाही . कुठे चालला ते देखील माहिती नाही . परंतु केवळ तो नर्मदेच्या काठावरून निघाला आहे , नर्मदेचे नाव घेत निघाला आहे , हे पाहून लोक तुम्हाला मदत करतात ! हे किती अद्भुत व हृद्य नाते आहे ! रक्ताच्या नात्याच्या फार पलीकडचे व घट्ट!  अजून एक गमतीशीर गोष्ट मी पाहिली . हा पहिलाच कालखंड असल्यामुळे मी रस्त्याने चाललो होतो . पुढे नर्मदा मातेच्या कृपेने रस्त्यावर कधी आलोच नाही ! परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या परिक्रमावासींना गाडीवाले ललकारा तर देतच . परंतु थंडीमुळे नाका तोंडाला घट्ट रुमाल गुंडाळला असेल तर केवळ हॉर्न दाबून परिक्रमावासीला नर्मदे हर म्हटले जाई ! इथे बहुतांश लोक आपल्या गळ्यामध्ये एखादा पंचा किंवा टॉवेल लटकवूनच चालतात . तो इथल्या पेहरावाचाच भाग आहे जणू . पुढे चालता चालता गौर नावाची नदी आडवी आली त्याच्याच पुढे गौर नावाचे गाव आहे असे मला सांगण्यात आले . 
                    गौर नदी / परयात नदी
रस्ता सोडून थोडेसे गौर नदीच्या काठाने चालत गेले की जसा नर्मदा नदीला धुवाधार नावाचा धबधबा भेडाघाट येथे आहे त्याची छोटीशी प्रतिकृती इथे भदभदा धबधबा नावाने पाहायला मिळते . 
उन्हाळ्यामध्ये एकच धार चालू असणारा हा धबधबा पावसाळ्यामध्ये मात्र अदृश्य होऊन जातो इतका महापूर या नदीला येतो . 
              भदभदा जलप्रपात ( गौर नदी )

सध्या ही नदी अत्यंत प्रदूषित देखील झालेली आहे त्यामुळे तिचे पाणी काळे पडत चालले आहे .
नदीच्या काठावर एक भली मोठी गाय मरून पडली होती . मी प्रथमच नर्मदेकाठी मृत गोमाता पाहत होतो . तिने नुकताच प्राण सोडला असावा कारण अजून तिच्या देहाचा वास येत नव्हता .
                     (प्रतिनिधिक प्रतिमा)
बहुतेक एखाद्या मोठ्या ट्रकने वगैरे तिला उडवले असावे .मला तेव्हा खरोखरच कल्पना नव्हती की येत्या काही महिन्यांमध्ये अशा शेकडो गायी म्हशी मला पहाव्या लागणार आहेत ! तिला नमस्कार करून मी पुढे चालू लागलो .नदीवर बऱ्यापैकी मोठा पूल होता आणि नदीचे पात्र ओलांडता येणे केवळ अशक्य होते इतकी ती लांब रुंद व खोल नदी वाटत होती . अर्थात ही मला आडवी आलेली पहिली नदी ! नर्मदा नदीला ९९९ लहान मोठ्या नद्या येऊन मिळतात .काही नद्या तर तिच्या पेक्षाही मोठ्या असतात ! (उदा . बांद्राभान इथली तवा नदी ) काही नद्यांची नावे पुन्हा पुन्हा तीच ठेवली गेलेली आहेत .अर्थात एका नावाच्या अनेक नद्या आहेत . तवा नावाच्याच दोन नद्या आहेत . छोटे छोटे ओढे आणि नाले तर किती येऊन मिळाले याची गणतीच करू शकत नाही . या सर्व गमती पुढे तुम्हाला वेळोवेळी सांगेनच . सध्या आपण भोजनाची सोय कुठे होते ते पाहूयात !सरळ रस्त्याने भरपूर चालल्यावर एका बस थांब्यावर काही क्षण बसलो . माझ्या लक्षात आले की माझ्या पायाला मोठे मोठे फोड येऊ लागले आहेत . (ब्लिस्टर्स ) हे एकदा वाढले की फार तापदायक असतात हा माझा पूर्वानुभव होता . त्यामुळे समोरच असलेल्या बाभळीच्या काट्याने मी सर्व फोड फोडून टाकले .पुढे एक छोटेसे टपरीवजा दुकान होते . तिथे दिनेश महोविया नावाचा एक सज्जन दुकानदार होता .त्याने मला बोलावून घेतले व गरम गरम कॉफी पाजली तसेच अजून काय सेवा करू विचारू लागला व परिक्रमेचा पहिलाच दिवस आहे हे लक्षात आल्यावर त्याने मला सोबत एक छोटी डायरी आणि पेन दिले . आणि यात रोज काही महत्वाचे वाटले तर लिहीत जा म्हणून सुचविले . या माणसामुळेच आज हा ब्लॉग लिहीला जातो आहे ! दिनेशजी तुमचे आभार !
ते पुढे खूपच सोयीचे ठरले .कारण मी सोबत मोबाईल आणला नव्हता त्यामुळे वाटेत भेटलेल्या सर्व लोकांचे क्रमांक मी याच डायरीमध्ये नोंदवून घेत असे .

त्याने सांगितले की पुढे राजा बाबू नावाचा पेट्रोल पंप आहे तिथे भोजनाची व्यवस्था होईल . मी पुन्हा एकदा भर उन्हामध्ये चालू लागलो . दुपारचा एक वाजला असावा . राजा बाबू पंपावर गेलो .तिथल्या कामगारांनी अतिशय आदबीने मला आत मध्ये नेऊन बसविले . 
            राजा बाबू सोनकर पेट्रोल पंप व अन्नक्षेत्र

पेट्रोल पंपाचे कार्यालय संपूर्ण काचेचे होते व पूर्ण वातानुकूलित होते . आत मध्ये मोठे मोठे सोफे आणि गाद्या अंथरून ठेवल्या होत्या . एक जुनी प्रिया स्कूटर अतिशय सुंदर पद्धतीने आत मध्ये ठेवण्यात आली होती ! मला आत गेल्यावर फारच हायसे वाटले कारण पहिलाच दिवस असल्यामुळे उन्हाचा दाह चांगलाच जाणवला होता मला . दिग्विजय सिंग यांचे कार्यकर्ते असलेल्या सोनकर बंधूंची ही मालमत्ता आहे .पंप मालक संजय सोनकर , राजू भैय्या सोनकर , संजू भैय्या सोनकर आणि हेमंत सोनकर असे चार भाऊ आहेत . ते येणाऱ्या प्रत्येक परिक्रमावासीला घरगुती जेवण बनवून देतात .परिक्रमावासींना होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणून भगवती होमिओ क्लिनिकच्या डॉक्टर राजदीप यांची होमिओपॅथिक औषधे इथे मोफत उपलब्ध आहेत .डोकेदुखी ,अंगदुखी , पाठ दुखी ,जुलाब वगैरे विविध रोगांवरची औषधे इथे परिक्रमावासींसाठी मोफत ठेवलेली होती . माझी चौकशी करण्यासाठी स्वतः मालक आले व त्यांनी आपल्या पत्नीच्या हस्ते अप्रतिम मेथी मलई ,चार गरमागरम रोटी ,गरम वाफाळलेला भात , आणि चविष्ट आमटी असा पहिलाच भोजन प्रसाद मला आणून दिला ! परिक्रमेमध्ये इतके सुग्रास भोजन मिळेल याची मला कल्पनाच नव्हती ! मी अतिशय आनंदाने भोजन प्रसाद ग्रहण केला ! नित्याच्या सवयीप्रमाणे भोजनापूर्वी परमेश्वराचे स्मरण केले .शिवछत्रपतींचे स्मरण केले . प्रत्येक भोजनापूर्वी मी श्लोक म्हणायचो ते असे .

मुखी घास घेता करावा विचार ।
कशासाठी हे अन्न मी सेवणार ।
घडो माझीया हातुनी देशसेवा ।
घडो माझिया हातुनी धर्मसेवा ।
म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा ॥

महामंत्र आहे नवे शब्द साधा ।
जयांच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा ।
नुरे देश अवघा जयांचे अभावी ।
शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी ॥

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ।
ॐ शांतिः शांतिः शांतिः ।

पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय !
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय !
भारत माता की जय !
हिंदूधर्म की जय ! नर्मदा मैय्या की जय ! नर्मदे हर ! मातु गंगे हर ! जटाशंकरी हर ! नमः पार्वती पते हरहर महादेव ! 
या स्वामी जेवायला !


लेखांक दहा समाप्त ( क्रमशः )
मागील लेखांक
पुढील लेखांक

टिप्पण्या

  1. लेखमाला अतिशय उत्तम. या लेखात तुम्ही " रक्ताचा अभियंता " असा शब्द प्रयोग केलाय. रक्ताचा असं म्हंटल जात नाही " हाडाचा "असं म्हंटल जातं. " हाडाचा अभियंता ", "हाडाचा शिक्षक " इत्यादी

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर