लेखांक १७४ : उपसंहार

सर्व नर्मदा भक्तांना माझा साष्टांग नमस्कार ! सर्वप्रथम आपणा सर्वांची क्षमा मागतो . आपल्या सहनशक्तीचा अंत पहात हे लेखन केले गेले . सलग एकटाक बसून न लिहिता मध्ये मध्ये भूमिगत झाल्यासारखे लिखाण झाले . भाबरी आश्रमातले सेवाकार्य याच काळात समांतर सुरू असल्यामुळे आणि तिथे वीज तसेच इंटरनेटची सुविधा अजून देखील पोहोचलेली नसल्यामुळे हे झाले . संपूर्ण लिखाण एका वाचकांनी दिलेल्या मोबाईलवर केले गेले आहे . तसेच लेखनासाठी चांगल्या गतीच्या इंटरनेटची आवश्यकता असल्यामुळे लिखाण खूपच मागे पडत गेले . त्यामुळे त्यातील सलगता व उत्सुकता निघून गेली याबद्दल आपली मनापासून क्षमा मागतो . आपणास नम्र विनंती आहे की शक्य झाल्यास आपण पुन्हा एकदा पहिल्या भागापासून सलग वाचन करावे . तसेच आपल्याला वाचणे शक्य नसल्यास आपल्या youtube चैनल वर जाऊन अभिवाचन नावाच्या प्लेलिस्टचे श्रवण करावे . (YouTube.com/@नर्मदा )

लेखनाच्या काळामध्ये ज्या ज्या वाचकांनी प्रस्तुत लेखकाला सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार ! इथे कोणाचाच नामोल्लेख केलेला त्यांना आवडणार नाही हे मला माहिती आहे . परंतु मी आपल्याबद्दलच बोलतो आहे हे वाचताना आपल्या लक्षात येईलच ! डायरी लिहिताना शेवटची ओळ लिहिली आणि पेन संपले हे आपण पाहिलेच असेल ! याचा अर्थ आता अधिक काही लिहू नकोस असे नर्मदा माता सुचवत असावी ! 


तरीदेखील पुढे काय काय झाले हे थोडक्यात आपल्याला माहिती असावे म्हणून इथे नमूद करून ठेवतो . ग्वारी घाटावर तत्काळ फोटो काढून देणारे काही फोटोग्राफर असतात . त्यातील एक जण धावतच माझ्याजवळ आला आणि त्याने तिथे माझे एक चित्र काढले . त्याची छापील प्रत माझ्याजवळ दिली .  पैसे देखील घेतले नाहीत . शिवाय त्याने एक पासपोर्ट साईज फोटो देखील काढून दिला . हा तोच फोटो आहे जो आपण लेखाच्या पहिल्या पानावर पाहिला असेल !

ग्वारी घाटावरच काढलेली दोन छायाचित्रे . एक पहिल्या दिवशीचे तर एक अखेरच्या दिवशीचे !


त्या छायाचित्रकाराने पासपोर्ट साईज फोटोचा एक शीट च मला छापून दिला !

परिक्रमा संपली तो क्षण ! हा क्षण टिपणाऱ्या अज्ञात छायाचित्रकाराचे आभार . . .

 इथून थेट मी राम लखन सेन ला भेटायला गेलो . हा तोच न्हावी ज्याने माझे क्षौर केले होते . त्याला अतिशय आनंद झाला ! त्याने सर्वांना पुन्हा एकदा बोलावले ! पुन्हा तोच प्रकार घडला . यानंतर मी संतोष गुरुजी उर्फ लोटावले पंडा यांना भेटलो . त्यांना देखील परम संतोष वाटला ! इथून थेट झुलेलाल आश्रमात गेलो . आश्रमातील सर्वांना मला भेटून खूप आनंद झाला . इथले प्रमुख सिंधी महाराज आहेत शिव बाबा म्हणून त्यांना भेटलो . त्यांना देखील खूप आनंद वाटला . आश्रमातून घेतलेल्या सर्व वस्तू पुन्हा दुसऱ्या कुठल्यातरी परिक्रमावासीला देता येतील म्हणून परत केल्या . यानंतर सदानंद गिरी महाराजांचे दर्शन घेतले ! महाराजांना फार आनंद झाला ! महाराजांनी भरभरून आशीर्वाद दिले ! पोटभर जेवण केले . परिक्रमावासियांना खोल्या देणे इथे आता बंद झाले होते . त्यामुळे इथून झोळी उचलली आणि आणि ऐन उन्हामध्ये निघालो . माकडांना रोज भोजन करवणारा शिवा पंडा परिक्रमा झाल्यावर आपण कन्याभोजन घालू असे मला म्हणाला होता .म्हणून त्याच्या घरी गेलो . परंतु तो गावाला गेला होता . तसाच अनवाणी चालू लागलो . एका रिक्षावाल्याने कुठे जाणार विचारले . माहिती नाही म्हणाल्यावर बसवून घेतले . प्रथमच वाहनाचा स्पर्श अतिशय विचित्र वाटू लागला ! सर्वप्रथम अश्विनी पटेल ला भेटावे असे वाटले . रिक्षावाल्याला खूप आनंद झालेला होता . त्याने मला पटेल च्या घरापाशी तर सोडलेच परंतु वर शंभर रुपये दक्षिणा दिली . अश्विनी पटेल च्या घरापाशी आलो . घरातील सर्वांनाच खूप आनंद झाला ! सर्वांनी मोठ्या प्रेमाने माझे स्वागत केले . अभिनंदन केले . आणि मी पुढे निघालो . ज्याने मला झोपण्यासाठी मॅट दिले होते त्या दुकानदाराला त्याचे मॅट परत दिले ! हे कुठल्यातरी रिक्षामध्ये वापर असे त्याला सांगितले . तो म्हणाला हे मी घरी पूजेत ठेवणार आहे . जशी तुझी इच्छा असे म्हणून पुढे चालू लागलो . इतक्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले ! तुफान पावसाने हजेरी लावली ! एका दुकानदाराने मला दोनशे रुपयांच्या बैराटी ब्रांडच्या चपला दिल्या . नर्मदा खंडात ही चप्पल प्रसिद्ध आहे . हा दुकानदार तरुण गुरुधाम नावाचा आश्रम चालवायचा . इथून चालत कमलताई रामदासी यांच्याकडे गेलो . त्यांचा आनंद गगनात मावेना ! त्यांनी मला आग्रहाने ठेवून घेतले . मी निघून गेल्यावर त्यांनी माझा खूप शोध घेतला होता . परंतु तपास लागला नव्हता . या भागातील मराठी लोक उपासना करत . तिकडे त्या निघाल्या होत्या .त्यांनी मला देखील सोबत नेले . सप्रे नावाच्या सदगृहस्थांच्या घरी उपासना आणि प्रवचन सेवा होती . आम्हाला घेण्यासाठी सर्वटे काका आले होते . ट्राफिक जाम कापत गेलो . उपासना झाली . महापौर पदाच्या निवडणुका जबलपूर शहरामध्ये सुरू होत्या . त्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉक्टर जामदार निवडणूक लढवत होते . ते सपत्नीक तेथे आले . यांचा माझा सज्जनगडावरील जुना परिचय होता . त्यांनी आग्रहाने मला थांबवून घेतले . यथाशक्ती यथामती त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या विनंतीवरून काही लिखाण करून दिले जे त्यांनी प्रचारामध्ये वापरले . 



सप्रेंकडे चपला विसरलो आणि आश्रमात आलो .आपले नक्की आहे काय हेच कळायचे बंद झाले होते !रात्री उशिरापर्यंत अम्मा , सतीश देशपांडे आणि डॉ चैतन्य ओक यांच्याशी गप्पा मारत बसलो . सतीश देशपांडे आणि चैतन्य ओक यांनी आपले आयुष्य अम्मांच्या अर्थात कमलताई रामदासी यांच्या सेवेसाठी वाहिलेले आहे .


माझे कन्यापूजन साग्रसंगीतपणे पार पाडणारे डॉक्टर चैतन्य ओक रामदासी जबलपूर

शर्मा नावाच्या त्यांच्या एका शिष्याने त्याचा राहता बंगला अम्मांच्या नावे करून दिला व इहलोक सोडला . शर्मा हा अतिशय बलदंड शरीरयष्टीचा एक ब्रह्मचारी तरुण होता व माझा खूप चांगला मित्र , मार्गदर्शक होता . सज्जनगडावर आम्ही खूप सत्संग केलेला आहे . जबलपूरच्या आश्रमाच्या गच्चीवर एक खोली बांधलेली आहे तिथे मी मुक्काम केला होता . दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून डॉक्टर चैतन्य दादाने स्वतः स्नान करून सोवळ्यामध्ये कढाई ची तयारी केली . दोघांनी घाटावर जाऊन संतोष पंडाकडूनच पूजन करवले आणि कढाई केली . एक गोड सावळी कन्या अचानक आली . ही एकाक्ष होती अर्थात हिला एकच डोळा होता . तिला घाटावर बसवून पूजन केले . तिचे चरण तीर्थ घेतले . चैतन्य दादाने कन्यांसाठी सुंदर पाकिटे बनवून आणली होती . थोड्याच वेळात बऱ्याच कन्या जमल्या . जमलेल्या सर्व कन्यांना त्याने दक्षिणा व पाकिटे वाटली . संतोष गुरुजींना देखील दक्षिणा दिली . सोबत काहीही सामग्री नसताना अशा रीतीने पामराचे कन्या पूजन मोठ्या दिमाखात पार पडले ! मला काय चालू आहे काही कळत नव्हते . ते कळण्याच्या पलीकडे माझी अवस्था होती . मी शांतपणे काय काय सुरू आहे पाहत होतो . घरी गेल्यावर अम्मांचा सत्संग लाभला . त्यांच्या दोन्ही परिक्रमांचे अनुभव त्यांनी सांगितले . आणि ग्वारी घाटावरून परिक्रमा उचलण्यासाठी त्यांनी संतोष पंडालाच बोलावले असते असे देखील मला सांगितले . त्यामुळे जे काही झाले ते योग्यच झाले असे त्या म्हणाल्या . इथून पुढे ओंकारेश्वर चे तिकीट मला काढून देण्यात आले . ओंकारेश्वर अमलेश्वर या दोन्ही तीर्थांवर परिक्रमेचे जल अर्पण केले . तत्पूर्वी ओंकार मांधात पर्वताची परिक्रमा केली .नर्मदा माता कावेरी माता संगमावरील ऋणमुक्तेश्वर महादेवांना संगमातील जलाने भिजलेल्या डाळीची मूठ अर्पण करून संपूर्ण परिक्रमे दरम्यान ज्या ज्या लोकांनी पामराला खायला प्यायला देऊन निवारा देऊन व अन्य प्रकारे मदत करून उपकृत केले त्या सर्वांच्या ऋणातून मुक्त करण्याची प्रार्थना केली . 

कावेरी संगमापाशी एका युवकाने काढलेले छायाचित्र . मागे कश्यप ऋषींचा आश्रम दिसतो आहे

मांधात पर्वताच्या मध्यभागी महादेवांची भव्य मूर्ती आहे . तिचे दर्शन घेतले . इथे एका दुकानदाराने माझे फोटो काढले . ते मित्राला पाठवायला सांगितले .

ओंकार मांधात परिक्रमा मार्गावरील महादेव

दुकानदार तरुण होता . त्याने दोन-तीन प्रकारे फोटो काढले .

ते सर्वच इथे जोडत आहे . जबलपूर मुक्कामी मिळालेली नवीन वस्त्रे धारण केलेली आहेत . ओम नमः शिवाय ! 
महादेवांची मूर्ती खरोखरच भव्य आहे . आता याहून भव्य शंकराचार्यांची मूर्ती या पर्वतावर उभी करण्यात आली आहे .

मांधाता परिक्रमा मार्गावरच  एका गुहेमध्ये बसून असलेल्या विदेही महात्मा शुकमुनींचे दर्शन घेत असतानाच एक तेजस्वी ब्राह्मण युवक स्नान करून बाहेर आला आणि मला म्हणाला की तुझी समापन पूजा मी सांगणार . हा युवक मला ओंकारेश्वरी घेऊन गेला .हा इथला मुख्य पुजारी आहे असे त्याने मला सांगितले .परंतु रोज इथे पूजा सांगणारे जे पंडे असतात तसा हा पूजा सांगत नाही तर केवळ कोणी विशेष अतिथी आले तरच पूजा सांगतो असे मला म्हणाला. संपूर्ण परिक्रमेचे जल महादेवांना अर्पण केले . याच एका क्षणासाठी ही परिक्रमा करावयाची असते ! ॐ सांब सदाशिवार्पणमस्तु ! 

ओंकारेश्वर महादेवांना जल अर्पण करताना पंडाने त्याच्या मोबाईलवर हा फोटो काढला . अन्यथा असे चित्र काढायला आत मध्ये परवानगी नाही . परिक्रमा वासींना जल अर्पण करण्यासाठी इथे एक चांदीची पेटी करण्यात आलेली आहे व त्यातून एका नळीने जल पिंडीवर जाते . . परंतु सोबत हा पंडा असल्यामुळे मला थेट पिंडीवर जल अर्पण करता आले . पायी परिक्रमावासींना रांगेत थांबून जावे लागत नाही .विनंती केल्यास थेट आत सोडतात .

गुरुजी पूजा सांगत असताना एक फोटोग्राफर फोटो काढून गेला व त्याची छापील प्रत त्याने मला आणून दिली . पैसे घेतले नाहीत . गुरुजी देखील दक्षिणा घेत नव्हते . परंतु यथाशक्ती दक्षिणा दिली . हे सर्व आटोपून झुलत्या पुलावरून परत येत असताना एका युवकाने फोटो काढला . तो मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितले . 

ओंकारेश्वराच्या पुलावर काढलेला हाच तो फोटो . मागे ओंकारेश्वरांचे मंदिर दिसत आहे

पुढे गजानन महाराज आश्रमात काही काळ शांतपणे घालवला . इथे पुन्हा नवीन वस्त्र मिळाले . परतीचा प्रवास कसा असणार माहिती नव्हते . इथे एक मीटर गेज रेल्वे असून ती लवकरच बंद होणार आहे असे कळाले . ओंकारेश्वर ते महू असा प्रवास ही रेल्वे करायची . अतिशय संस्मरणीय असा हा प्रवास ठरला . ही रेल्वे खरोखरच खूप छोटी होती . अतिशय हळू गतीने प्रवास करायची . आता ही रेल्वे बंद झाली . तिचे लोहमार्ग व पूल देखील उखडला गेला . परंतु नर्मदा मातेच्या कृपेने मला तिचा प्रवास करता आला . संपूर्ण रेल्वे रिकामी होती . माझ्यासमोर एक साधू बसला होता . तो सतत हाताने एक झोळी विणत बसला होता . आजूबाजूला प्रचंड झाडी आणि निसर्ग सौंदर्य होते ! स्वर्गीय अनुभव ! मी त्या प्रवासाचा पुरेपूर आनंद लुटला ! प्रवास संपता संपता साधूची पिशवी शिवून झाली . हा एक शबनम म्हणतात तसला बटवा होता . साधूने तो मला देऊन टाकला . तुझ्यासाठीच शिवत बसलो होतो म्हणाला . मी माझ्याजवळ असलेले सर्व पैसे त्याला देऊन टाकले ! तुझ्यासाठीच गोळा झाले होते म्हणालो !  अम्माने इंदोर पुणे रेल्वेचे तिकीट काढून दिलेले होतेच .त्यामुळे पैशाची गरज नव्हती . इंदोर पुणे प्रवास सुखाचा झाला असावा . मला फक्त पुणे आल्याचे आठवते . शिवाजीनगर स्थानकावर उतरलो . परंतु आतून आवाज आला पुन्हा रेल्वेत चढ . त्यामुळे पुन्हा चढलो आणि पुणे स्थानकावर उतरलो . माझ्याकडे पैसे उरलेले नव्हते . त्यामुळे चालत घरी जायचे होते . परंतु रेल्वेतून बाहेर पडल्या पडल्या माझा परममित्र गुरुचरण सिंग समोर उभा दिसला ! त्याने मला सर्वांसमोर साष्टांग नमस्कार घातला ! गळ्यात पडून ढसाढसा रडला ! याचे ऑफिस पुणे स्टेशन जवळ होते .गेले काही दिवस आतून आवाज आल्यामुळे हा रोज इंदोर कडून येणाऱ्या रेल्वेच्या वेळी फलटावर येऊन मी आलो तर नाही नाही ना हे पाहून जायचा ! काय म्हणावे याला ! 

 याप्रसंगी गुरुचरण ने एक सेल्फी काढला . मी ज्या रेल्वेने आलो ती इंदोर दौण्ड रेल्वे मागे दिसते आहे . 

गुरु मला घेऊन घरी गेला ! आधी त्याच्या घरी गेलो . याची पत्नी डॉक्टर शशिकला सिंग नुकतीच कर्करोगाशी झुंज देत बरी झाली होती . हिने मला भाऊ मानले आहे .तिने मोठ्या प्रेमाने माझे स्वागत केले आणि औक्षण केले .तिच्या हातची भोजन प्रसादी घेतली .

धनकवडी येथे प्रस्तुत लेखकाचे औक्षण करताना डॉ सौ शशिकला गुरु चरण सिंह ठाकूर

 यानंतर गुरुने आंबेगावच्या घरी सोडले . घराला कुलूप दिसले . शेजाऱ्यांनी सांगितले तुम्ही परिक्रमेला गेल्यावर घरातील सर्वांनी संगनमत करून नवीन घर घेतले आहे ! माझे आई-बाबा बहीण मावशी व पत्नी या सर्वांनी मिळून नवीन घर घेतले होते . जुन्या इमारतीमध्ये माझी तीन घरे होती. तरी पुन्हा हे अजून एक घर घरच्यांनी घेतले ! या नव्या घराच्या अगदी जवळच धनकवडीच्या शंकर महाराजांची समाधी होती ! जुन्या घरी मावशी राहत होती . तिने मोठ्या प्रेमाने स्वागत केले .

मावशीच्या घरी स्वामींचे दर्शन घेताना प्रस्तुत लेखक . पायापाशी ठेवलेली लाल पिशवी साधूने ओंकारेश्वर वरून महुला जाताना मीटर गेज रेल्वेमध्ये दिली !

घरात प्रवेश केल्या क्षणी मावशीला शिवलिंगे दाखवताना प्रस्तुत लेखक 


इथे त्याच दिवशी काहीही कारण नसताना माझा एक राहुल गायधनी नावाचा मित्र मावशीला भेटायला म्हणून आला ! याच्या मुलीचे नाव मी रेवा ठेवले होते ! तिला देखील सोबत घेऊन आला ! त्यामुळे घरी गेल्याबरोबर रेवा चे कन्या पूजन करता आले !

त्या दिवशी घरी अचानक प्रकट झालेली बाल रेवा आणि तिची आई व प्रसिद्ध चित्रकार सौ अनुजा राहुल गायधनी .

राहुल राजेंद्र गायधनी उर्फ आप्पा आणि प्रस्तुत लेखक

बाल रेवाचे कन्या पूजन करताना

 भेटायला खूप लोक येऊ लागले . सोबत आणलेली शिवलिंगे सर्वांना वाटून टाकली !  .

घरी आल्या आल्या घेतलेला शिवलिंगांच्या पिशवीचा पहिला फोटो .परिक्रमा झाल्यावर ही शिवलिंगे  मी कुडाकला आश्रमात जाऊन पुन्हा घेऊन आलो होतो .

नवीन घरी पत्ता शोधत गेलो . वॉचमनने बाहेरच अडवले . त्याला सांगितले की इथे एका घरामध्ये मला बोलावले आहे . आणि घरात गेलो . सर्वांना आनंद झाला . 

नवीन घरामध्ये ओंकारेश्वर हून आणलेल्या नर्मदा पुराणाचे वाचन केले व टिपणे काढली . रसभंग टाळण्यासाठी त्यांचा समावेश या लेखनामध्ये केलेला नाही . भविष्यात त्यावर स्वतंत्र लिखाण करता येईल . 
समोर पूजेमध्ये ठेवलेली नर्मदा मैय्या व नर्मदेश्वर !

माझा मामा श्री सुरेशचंद्र मुरलीधर अवचट याने बेटाचे केडगांव येथील आपल्या शेतामध्ये नवीन घर बांधण्यासाठी माझ्या हस्ते भूमिपूजन करून घेतले .

पहिली कुदळ माझ्या हस्ते मारून घेतली ! लष्करातील निवृत्त राजपत्रित अधिकारी असलेला मामा आपल्या नालायक भाच्यावर पहिल्यांदाच इतका कृपावंत झाला ही नर्मदा मातेचीच लीला! 

मी पूजापाठ सांगत नाही . परंतु मामाच्या आग्रहास्तव पुस्तकात पाहून भूमिपूजन पूजा केली . 


परिक्रमेचे सर्व फोटो ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले ते माझे मित्र 
श्री प्रशांत चन्ने ,मातोश्री आणि चिरंजीव उत्सुकतेने फोटो बघताना . मी बाळासाहेब वाल्हेकर यांचा क्रमांक सगळ्यांना सांगायचो . कारण तो पिशवीवर लिहिलेला होता . बाळासाहेबांनी चन्ने मामांना पाठवलेले फोटो चन्ने मामांनी संगतवार लावून ठेवल्यामुळे आज आपल्याला मिळाले . नाहीतर ते बाळासाहेबांनी अज्ञानापोटी डिलीट केलेल्या फोटोंसारखे नष्ट झाले असते .

परिक्रमेचे सर्व फोटो ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले ते माझे मित्र बाळासाहेब वाल्हेकर . यांच्याच क्रमांकावर सर्व फोटो प्रथम पाठवले जायचे .
बाळासाहेब वाल्हेकर यांनी स्वतः साधू वृत्ती ने राहण्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळे मला या संपूर्ण उपक्रमासाठी खंबीर पाठिंबा दिला होता . 
या दोघांनीही परिक्रमे दरम्यान येऊन प्रस्तुत लेखकाची भेट घेतली होती

नर्मदा मातेचे आकर्षण व प्रेम दोघांनाही आहे .

नंतर लवकरच चिरंजीवांची मुंज आटोपली . गायत्री मंत्राचा अनुग्रह मला झालेला होताच . सव्वा लक्ष गायत्रीचा जप सिद्ध करून चिरंजीवांना सस्वर मंत्र उपदेश दिला . 

मुलाच्या कानामध्ये गुरुमंत्र देताना प्रस्तुतलेखक

सर्व सोहळा उत्तम पार पडला . 

पुढे उत्तम शाळेमध्ये त्याला प्रवेश मिळाला . पाचवीची प्रवेश प्रक्रिया हुकली होती . परंतु सहावी मध्ये एक जागा निर्माण झाली आणि त्यात अनेक मुलांसोबत परीक्षा देऊन पठ्ठयाची निवड झाली . ही नर्मदा मातेची कृपाच .

 ज्या शाळेत लेखक घडला तीच ज्ञान प्रबोधिनी प्रशाला आता चिरंजीवांना घडवत असल्यामुळे सांप्रत आम्ही निश्चिंत आहोत !


परिक्रमे नंतर तुमच्याशी जनावरांचे वर्तन देखील बदलते असा अनुभव मला आला ! ती फार प्रेमाने तुम्हाला जवळ करतात याउलट दांभीक आणि धनलोभी माणसे तुमच्यापासून विनासायास दूर जातात तर शुद्ध अंतःकरणाची व खरी पारमार्थिक माणसे तुमच्या आजूबाजूला आपसूकच जमा होऊ लागतात !
एकंदरीत राहणीमान पेहेराव आचार विचार देहबोली यात अमुलाग्र बदल कायमचे होतात!
परिक्रमा झाल्यावर आवर्जून सांगलीला विष्णू घाटावर जाऊन गुरुवर्य परमपूज्य संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांचे दर्शन घेतले . त्याप्रसंगी कुणीतरी गुरुजींचे हे चित्र काढले आहे .परिक्रमेचे इतिवृत्त सांगितल्यावर गुरुजींना अतिशय आनंद झाला ! 

"आयुष्यातली एक फार मोठी आणि महत्त्वाची कामगिरी पार पाडलीत " असे भिडे गुरुजी प्रस्तुत लेखकाला म्हणाले . धन्यता वाटली . 
समर्थ रामदास स्वामींनी लिहीलेल्या वाल्मिकी रामायणाचे लोकार्पण पुण्यामध्ये सरसंघचालकांच्या हस्ते पार पडले . या कार्यक्रमात श्री समर्थ वाग्देवता मंदिर धुळे या संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले .
जांब समर्थ येथे समर्थांच्या घराण्यातून चोरीला गेलेल्या मूर्ती ताब्यात घेऊन त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्याच्या सोहळ्यामध्ये सक्रीय सहभाग मला घेता आला .रामरायाची मूर्ती माझ्या हस्ते स्थापन झाली . 
काँग्रेसचे प्रमुख नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांची अचानक विमानतळावर भेट झाली . परिक्रमा झाली आहे कळल्यावर त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी परिक्रमेवर लिहीलेले पुस्तक मला घरी पाठवून दिले . 
अमरावतीचे प्रसिद्ध संत आणि प्रस्तुत लेखकाला परिक्रमेचे सुतोवाच करणारे महान तपस्वी श्री शंकर बाबा यांची पिंपळखुटा आश्रमात दर्शनार्थ भेट घेतली . मैय्याने दिलेला एक अर्धनारी नटेश्वर त्यांना दिला .त्यांनी लागलीच तो चांदीमध्ये करून घेतला ! आणि परिक्रमा घडल्याबद्दल खूप कौतुक केले . 
भांड्याचे अमळनेर येथील मठपती श्री नागनाथ बुवा रामदासी आणि त्यांच्या शतायुषी मातोश्री यांच्यासोबत जांब समर्थ व अन्य अनेक प्रसिद्ध तीर्थस्थानांची दर्शने मला घडली .

अगणित देवस्थानांची , साधू सत्पुरुषांची दर्शने घडतच राहिली !माझ्या आजोळी महादेवांची मी स्वहस्ते बांधलेली खव्याची पूजा !
गिरनार पर्वताची परिक्रमा देखील त्याच वर्षी (२०२२ ) घडली .
रोज नऊ लाख लोक चालत असताना परिक्रमेत मला भेटलेला आणि परममित्र झालेला पेणचा गुरुत्तम दत्ताराम पाटीलही फोन शिवाय गिरनार परिक्रमेत अचानक भेटला ! 


मी  हे सर्व ज्या गतीने लिहितो आहे त्याच गतीने सर्व घडत गेले आणि मागे पडत गेले ! यातील कुठल्याही गोष्टीबद्दल मला ममत्वच वाटत नव्हते ! "आपल्या वाचून कोणाचे अडत तर नाही ना ? " या प्रश्नाचे उत्तर "अजिबात अडत नाही ! "  असे नर्मदा मातेने देऊन टाकले होते ! त्यामुळे खूप आनंद वाटला ! पुढचा मार्ग सुकर झाला ! 


तात्पर्य परिक्रमेने प्रस्तुत लेखकाचे उभे आयुष्यच पालटून टाकले . 

परिक्रमेने मला काय दिले याचा हिशोब लावण्यापेक्षा काय काढून घेतले ते फार महत्त्वाचे आहे ! मी जन्माला येताना ज्या निर्मळ , निरामय , निस्वार्थ ,आनंदी आणि प्रशांत अवस्थेमध्ये होतो ती अवस्था नर्मदा मातेने मला पुन्हा एकदा प्रदान केली !

॥ नर्मदे हर ॥

संपूर्ण लिखाण इथे वाचा

॥ श्री नर्मदार्पणमस्तु ॥

॥ नर्मदे हर ॥















टिप्पण्या

  1. बाबाजी, अतिव समाधानाचे अश्रू थांबतच नाहीत.
    आई नर्मदे हर 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. Kai bolu. Nishabda zale ahe. Khup khup Dhanyavaad. Itka sundar anubhav lihun kadhlyabaddal. Narmade Har. Ho mi blog dusaryanda vachayla suruvaat kelich ahe :D

    उत्तर द्याहटवा
  3. आपले स्वप्न कुणीतरी समोर जगतांना पाहून किती आनंद होतो.तशी तुमची परिक्रमा वाचत ती जगलो.
    पुन्हा तर वाचणारच आहे.
    हे पुस्तक रूपाने छापले गेले तर परिक्रमेवरील पुस्तकामधील एक मैलाचा दगड ठरेल.
    तुम्ही खरोखर नितांत सुंदर परिक्रमा घडवली
    खूप खूप धन्यवाद
    नर्मदे हर.
    विक्रांत .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. पुस्तक रुपाने या अनुभवांचे दस्तऐवजीकरण होते अगदी आवश्यक आहे. कृपया लवकरच पुस्तक प्रकाशित करावे, बाबाजी.

      हटवा
  4. पुस्तक रुपाने अवश्य प्रसिद्ध करावे. या क्षेत्रातले कुणी वाचक नक्कीच मदद करतील. नर्मदा परिक्रमे बरोबरच सर्वच परिक्रमा संदर्भात अतिशय उपयुक्त मार्गदर्शक Handbook ठरू शकते.

    उत्तर द्याहटवा
  5. बरोबर आहे. १०० टक्के सहमत. पुस्तक प्रसिद्ध व्हायला हवे. नर्मदे हर.

    उत्तर द्याहटवा
  6. इ बुक करायचे असेल तर esahity ला संपर्क साधावा ते फ्री मध्ये उत्तम पुस्तके वाचकांना देतात सर्वाँना तुमच्या अनुभवाचा फायदा होईल व नर्मदा मातेचे दर्शन आशीर्वाद मिळतील ❤️🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Esahity ची टीम बहुतांश कम्युनिस्ट आणि LGBTQ सपोर्टर आहेत .

      अशोक कोठारे च्या महाभारत प्रस्तावनेत बुद्ध आधी झाला नंतर रामायण महाभारत झाले एवढेच नव्हे तर रामायण महाभारत बौद्ध विचारांनी प्रभावित झालेले आहे , असे प्रतिपादन आहे .

      बाबाजीला असल्या प्रकाशकांची गरज नाही.

      हटवा
    2. खरंय.हे LGBT प्रकरण भारतीयांवर पाश्चात्यांनी केलंल २१ व्या शतकातलं आक्रमण आहे...नवीन पिढी त्या मार्केटींगला बळी पडतेय....

      हटवा
    3. इथे अर्थहीन कमेंट टाकून वेळ वाया घालवण्यापेक्षा जेरुसलेमलां निघुन जा..

      हटवा
  7. atishay sundar anubhav kathan. kityek vela angavar kate ale. shbdat sangu shakat nahi itaka nirmal anand dila lekhmalene.

    उत्तर द्याहटवा
  8. नर्मदे हर🙏 डोळ्यातून पाणी आलं बाबाजी . एकदा आपल्या चरणांवर डोकं ठेवावं असं वाटतं . नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे . माईने लवकरात लवकर ही ईच्छा पूर्ण करावी . आपले आशीर्वाद असू द्यात .

    उत्तर द्याहटवा
  9. नर्मदे हर🙏 डोळ्यातून पाणी आलं बाबाजी . एकदा आपल्या चरणांवर डोकं ठेवावं असं वाटतं . नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे . माईने लवकरात लवकर ही ईच्छा पूर्ण करावी . आपले आशीर्वाद असू द्यात .

    उत्तर द्याहटवा
  10. रोचक अनुभवांची मालिका... सत्य, आभास, मिथ्या, वास्तव यांचे बेमालुम मिश्रण म्हणजे आयुष्याचा प्रवास.

    त्यातला एक तुकडा मागे वळून निरखुन पहात शब्दात मांडण्याची आपली जिद्द पूर्ण केलीत.

    सुंदर !!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. यातील सत्य आणि वास्तव मांडण्याची मैयाची इच्छा पूर्ण झाली .माझी अशी काही जिद्द नव्हती .परिस्थितीच अशी आली की ब्लॉग लिहिला गेला .आभास आणि मिथ्या म्हणता येईल अशी एकही गोष्ट या लिखाणामध्ये नाही याची कृपया नोंद घ्यावी .

      हटवा
  11. नर्मदे हर, अतिशय सुंदर आणि अद्भुत शब्दरचना. खूप छान वाटले वाचून. खूप खूप धन्यवाद दादा या लिखाणाबद्दल. नर्मदे हर.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

• लेखांक १ : नर्मदे हर !

• लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

• लेखांक ३ : चोराची धन

• लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !