(अपूर्ण ) अपूर्ण असे लिहिलेले लेख कृपया वाचू नयेत कारण ते सर्वर्थाने अपूर्ण असतात . पूर्ण झाल्यावर मगच वाचावेत ही विनंती .
पहाटे पाचलाच उठून चालायला लागलो ! मध्ये एक गमतीशीर घटना घडली . मी किनारा पकडून चालायचो . म्हणजे एक पाय ठेवायला जागा मिळेल अशा कुठल्याही जागी पाय ठेवायचा आणि चालत राहायचे . दंड मैय्यामध्ये बऱ्यापैकी बुडलेला असायचा . तिचा दंड बुडवल्यावर येणारा आवाज म्हणजे ती माझ्याशी संवाद साधते आहे असा माझा भाव असायचा . असाच एक अतिशय धोकादायक तिरका किनारा मी चालत असताना अचानक समोर एक कोळी आला ! म्हणजे तो या कठीण जागी बसून मासे धरत होता . आणि मोबाईल ने शूटिंग करत होता किंवा फोटो काढत होता . अचानक मी आलेला पाहून तो दचकला आणि पटकन कॅमेरा माझ्याकडे करून त्याने माझा फोटो काढला ! मला म्हणाला बाबाजी यहा कहा भटक गये? मी त्याला म्हणालो , "भटक कहा गये प्रभू ! यही तो असली रास्ता है ! " "यह रस्ता थोडी ना है ! " "यही रास्ता है बंधू ! माईका किनारा छोडना नही है बस ! " कोळी खुश झाला . मला म्हणाला या रस्त्याने जाताना कोणाला पाहिले नाही . मी त्याला म्हणालो या जगात बऱ्याच गोष्टी पहिल्यांदा होतात ! आणि नर्मदा मातेने प्रत्येकाचा रस्ता आखून दिलेला आहे ! माझ्यासाठी हा मार्ग ठेवलाय ! म्हणून मी या मार्गाने जातो ! त्याने काढलेला फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवण्याची विनंती मी त्याला केली . मी काठाने चालतो म्हणजे नक्की कसा चालतो हे बऱ्याच लोकांना "विजूअलाईज " करता येत नाही असे माझ्या लक्षात आले . जेव्हा जेव्हा मी किनारा पकडला , काठ पकडला किंवा काठाकाठाने निघालो असे म्हणतो तेव्हा मी असेच चालायचो !

पायाखाली काळी भोर गाळ माती आहे . डाव्या हाताला उभा चढ आहे . त्यावर प्रचंड गवत आणि काटेरी झाडे झुडपे वाढलेली आहेत . एक पाय कसा बसा ठेवता येईल अशी जागा आहे . उजवीकडे म मैय्या खोल आहे . पाण्यामध्ये बुडवलेल्या दंडाने आणि डाव्या हाताने तोल सांभाळत दोरीवरून डोंबारी चालतात तसेच चालत राहायचे ! फार तोल गेला च तर मैया झेलतेच ! परंतु तिच्यावर विश्वास असेल तर तोल जात नाही !ती बरोबर पार करवते . माझ्या चेहऱ्यावर जसे आश्चर्यमिश्रित भाव आहेत तसेच त्याच्याही चेहऱ्यावर होते ! या मार्गाने जाण्याचा सल्ला मी कोणालाच देणार नाही . ही माझी व्यक्तिगत निवड होती . परंतु इथेच खूप मजा यायची हे मात्र खरे ! परिक्रमे मध्ये माईचा सहवास मिळत असेल तर अजून दुसरे काही नको ! तू अशी जवळी रहा !
भेडाघाट गाठला .सर्वत्र शिवलिंगांचा खच ! नर्मदेश्वर शिवलिंगांना बाण लिंग किंवा नुसते बाण म्हणण्याची पद्धत आहे . याचे कारण नर्मदा मातेला येऊन मिळणारी बाण नावाची नदी ! या नदीमध्ये सर्वात जास्त शिवलिंगे सापडतात ! म्हणून बाणलिंग हा शब्द आला . बाण नदी म्हणजे जर बाणांची खाणच ! पावला पावलाला उत्कृष्ट शिवलिंगे सापडतात !हे सर्व भृगु क्षेत्र आहे आणि भेडाघाट ची वस्ती बेटावर असल्यामुळे तिथून परिक्रमावासींना जाता येत नाही . आधी सरस्वती घाट लागतो . समोर सिद्धन बाईचे ग्वारी गावातले स्थान आहे . इथे एक त्यागी महात्मा पुस्तके विकत बसला होता . त्याने मला चहा पाजला . बाण अथवा बुटी माई ला वळसा मारून जावे लागे .इथे इस्कॉनचे एक परदेशी साधू राहतात . त्यांनी हरे कृष्णा आश्रम स्थापन केला असून भरपूर अन्नदान चालते . बाण नदीच्या पुलाजवळच हा आश्रम आहे . महाराजांचा थोडा सत्संग घडला . आणि मग भोजन प्रसादी घेऊन पुढे निघालो . बाण नदी देखील काठाने पार करायचे मी ठरवले . रस्त्याने मला चालायचेच नव्हते . सुंदर अशी तिची रूपे पाहत पाहत एका झऱ्या पाशी आलो . समोर भव्य रुद्र कुंड होते . इथून नर्मदा मातेची एक जुनी शाखा वाहते अशी धारणा असल्यामुळे तो पूल पार करता येत नाही . आणि ते सहज शक्य आहे . भेडाघाटाचे पर्वत झिजत चालले आहेत त्यामुळे नर्मदा माई दरवर्षी खोल खोल जाते आहे .पूर्वी ती उथळ असताना इकडून वाहत असणे शक्य आहे . रुद्र कुंडाच्या पुढे जायला जागा नव्हती त्यामुळे जंगलातील कठीण प्रस्तरारोहण करत वरती असलेल्या जंगलाला लागलो . जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर एक आश्रम दिसला . हरे कृष्णा आश्रमापासून इथेपर्यंत वाटेमध्ये मला एकही मनुष्य , पक्षी ,जनावर काही दिसले नाही ! आश्रम म्हणजे एक मोठा हॉल होता . एक वयोवृद्ध साधू तिथे बसलेले होते . मी जंगलातून आलो हे पाहून त्यांना खूप आनंद झाला . ते मला म्हणाले या मार्गाने कोणीच येत नाही . खरे तर हाच परिक्रमा मार्ग आहे . तुला कोणी सांगितला ? मी म्हणालो माईचा किनारा सोडायचाच नाही ! म्हणजे मार्ग आपोआप सापडतात ! त्यांना खूप आनंद झाला . खूप चांगला सत्संग घडला . यांनी चांगले तांब्याभर लिंबू पाणी बनवून मला पाजले . त्यामुळे खूपच तरतरी आली . महाराजांना रामपूर किल्ल्याबाहेर पिंपळाच्या पानावर बसलेल्या बाळकृष्णाने सगुण दर्शन दिले होते ! यांनी तरुण असताना झाडपाला खाऊन परिक्रमा केली होती ! अन्नपाणी चहा काही नाही ! फक्त झाडपाला ! महाराजांचे नाव शर्मनपुरी जी महाराज होते . त्यांचा फोन नंबर खालील प्रमाणे आहे .
शर्मनपुरी जी महाराज
भेडाघाट भृगृक्षेत्र
रुद्र कुंड त
तहसील जिल्हा जबलपूर
९१७४६५६५७७
यांचे एक संतोष कुलकर्णी नावाचे शिष्य होते . त्यांच्याशी महाराजांनी मला फोनवर बोलायला दिले .हे कोल्हापूरचे होते व सध्या बावधनला राहत होते . महाराजांनी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले . महाराजांना दंडवत प्रणाम करून पुढे निघालो . जंगलातील मार्गाने धुवांधार गाठली . हे मोठेच पर्यटन स्थळ आहे . वर्षाचे बाराही महिने येथे गर्दी असते . गर्दीतील ९० टक्के लोक नर्मदा मातेला देवता न मानता नदी मानणारे असतात . ते पाहून वाईट वाटते . सेल्फी काढणाऱ्या लोकांची झुंबड उडालेली असते . आता तर गोल गोल फिरणारे प्लॅटफॉर्म घेऊन सेल्फी कॅमेरावाले इथे उभे असतात . एकंदरीत या अप्रतिम स्थानाचा मोठाच रसभंग आपण पर्यटक बनून करत असतो . माझे मात्र या कशा कडे लक्षच नव्हते . समोरच्या तटावरून माझा झालेला प्रवास मला आठवू लागला . नर्मदा मातेचे सुंदर असे दर्शन या भागात होते .इथे प्रेक्षकांसाठी एक गॅलरी केलेली आहे तिथे परिक्रमा वासी जाऊ शकत नाहीत . कारण तिथे जाण्यासाठी मैया ची एक शाखा पार करावी लागते . या भागातील नरम संगमरवरात आपले नाव टाकून देणारे लोक इथे बसलेले असतात . अक्षरशः दहा रुपयापासून आपले नाव टाकून मिळते ! इथल्या संगमरवरी दगडाच्या मऊ फरशा किंवा चिपा काढून त्यावर नाव टाकून देतात . अधिक पैसे दिले तर चित्र वगैरे काढून देतात . खाण्यापिण्याचे स्टॉल इथे लागलेले आहेत . हॉटेल्स आहेत . पर्यटक प्रचंड कचरा करतात . नर्मदा मातेचे जगातील सर्वात सुंदर रूप इथून वाहते आहे याचे त्यांना काहीही भान नसते . सर्वत्र प्लास्टिकच प्लास्टिक दिसते . पर्यटकांकडून शंभर रुपये घेऊन प्रवाहामध्ये जीवघेणी उडी मारणारी मुले इथे पहायला मिळतात . या जागेला बंदर कुदनी असे म्हणतात . या काठावरून त्या काठावर उडन खटोला जातो .रस्त्यावर गाड्यांची भली मोठी रांग लागलेली असते . इथून जवळच ६४ योगिनी मंदिर आहे . परंतु ते भेडाघाट बेटावर असल्यामुळे परिक्रमा वासी तिथे जाऊ शकत नाहीत .परंपरेनुसार परिक्रमा करणारे परिक्रमावासी अशा ठिकाणी जात नाहीत . परंतु आजकाल काही लोक पर्यटक म्हणून परिक्रमा करतात ते मात्र आवर्जून जातात . मी अशी राहून गेलेली ठिकाणे नंतर पुन्हा जाऊन पाहून आलो . परंतु परिक्रमेमध्ये मात्र माझ्या हातून मैयाने पारंपारिक नियमांचे पालन करवले . आता सुद्धा मी मैया च्या काठावर आलो आणि पुढचा मार्ग शोधू लागलो . इथे काही महाविद्यालयीन युवकांचा समूह आला होता . माझा वेश बघून त्यांना मौज वाटू लागली .त्यांना नर्मदा परिक्रमा काय असते हे माहिती नव्हते . मी थोडक्यात माहिती सांगितली . एकाने माझा फोटो काढला . तुम्ही मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितला आणि पुढे निघालो .

स्वच्छ निळेशार रेवाजल पहा ! माझ्या दंडाचे टोक समोरच्या तटावर जिथे टेकले आहे असा भास होतो त्याच ठिकाणी साधारण मी धोकादायक पद्धतीचे स्नान केले होते . इथून पुढे परिक्रमावासी जाऊ शकत नाहीत .
काठाने मार्ग जवळपास नव्हताच . परंतु मला पुन्हा एकदा आतून प्रेरणा झाली की काठ सोडायचा नाही . इथे नर्मदा माई मोठे वळण घेते . उभा किनारा चालायचा होता .कुठलीही चिंता न करता , फिकीर न करता काठाकाठाने चालत राहिलो .हा मार्ग खतरनाक आहे असे मी वहीत लिहून ठेवले आहे ! पडला की गेलातच ! पाण्याला इतकी भयानक गती आहे की तुम्हाला सावरायला वेळच मिळणार नाही ! थेट भेडाघाट ! परंतु चालण्याचा मार्ग मात्र मला खूप आवडला . झाडातून , झाडीतून ,दगडातून ,अंधारातून असा संमिश्र किनारा मार्ग होता . चढ-उतार होतेच . कारण मुळात हा मोठा डोंगर आहे . त्याला फोडून नर्मदा माई वाहते आहे .या भागात एकही कोळी किंवा केवट मला दिसला नाही . पाण्याला गतीच इतकी भयानक आहे ही नर्मदा माता पूर्णपणे निर्मनुष्य आहे . या भागातील नर्मदा मातेला लोक घाबरतात . इतके तिचे रूप अक्राळ विक्राळ आहे . तत्पूर्वी थोडासा चढ चढल्यावर जंगलामध्ये घनदाट झाडीच्या मधोमध एका ब्रह्मचारी बाबांची रेवा कुटी लागते .एका हाताने लुळा असलेला बाबा माझ्याशी काही काळ गप्पा मारत बसला . त्याला इथे मंदिर बांधायचे आहे म्हणाला . माझ्या मंदिर बांधणाऱ्या मित्रांचा क्रमांक त्याला दिला . बाबाने बाल भोग आणून दिला .त्याला भेटायला आलेल्या काही माणसांशी गप्पा मारल्या इथपर्यंत सर्व ठीक होते . परंतु इथे दोन लहान नेपाळी मुले अभ्यास करत बसली होती . तुझ्या इथे कामाला असलेल्या माणसाची मुले असावीत . हा बाबा अचानक उठून आत मध्ये गेला आणि मुले आपापसात हास्यविनोद करत आहेत हे बघताक्षणी त्याचा पारा चढला . त्याने बसलेल्या मुलांच्या पाठीमध्ये उभ्या उभ्या लाथा घातल्या . पाच-सहा वर्षाची कोवळी मुले ती . हा प्रकार पाहून माझे मस्तक सणकले . निरागस निष्पाप असहाय नाजूक कोमल आणि लाघवी अशा लहान मुलांवर अत्याचार करणारा कुठलाही माणूस पाहिला की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते . परमेश्वराने निर्माण केलेले सर्वात सुंदर असे कुठले रूप असेल तर ते लहान बालकांचे आहे ! त्यांच्या रूपाने साक्षात परमेश्वर आपल्याशी बोलत असतो असा माझा शुद्ध भाव नेहमी राहतो . लहान मुलांच्या सोबत काम करायला ज्याला मिळते त्यासारखा भाग्यवान या जगामध्ये कोणी नाही असे माझे स्पष्ट मत आहे . परंतु इथे मात्र विपरीत दृश्य पाहायला मिळाले . इथे अजून काही काळ थांबलो असतो तर लहान मुलांच्या जागी साधू आणि साधूच्या जागी मी असे चित्र उभे रहायला वेळ लागला नसता इतका मी त्याला तुडवला असता . परिक्रमे मध्ये असल्यामुळे कुठल्याही घटनेवर प्रतिक्रिया द्यायची नाही हे मोहन साधूने सांगितलेले डोक्यात आले आणि एकही शब्द न बोलता तिथून उठून चालू लागलो . या निमित्ताने इतकेच सांगावेसे वाटते की बाल संगोपन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे . आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरातील वयस्कर माणसे तीरसटपणे वागणारे असतील ,भांडखोर असतील ,विक्षिप्त असतील ,बाय पोलर अर्थात दुहेरी व्यक्तिमत्व असणारी असतील ,माणूस घाणी असतील ,आक्रमक वृत्तीची असतील तर शंभर टक्के त्यांच्या या वागण्याचे मूळ त्यांच्या चुकीच्या पद्धतीने झालेल्या बालसंगोपणामध्ये आपल्याला सापडेल ! लहान मुलांना काहीही कळत नसते . त्यामुळे त्यांना कधीच मारून शिकवू नये . त्यांच्या मनामध्ये भय बसते . मुले मोठी झाल्यावर ते भय कुठल्या रूपाने बाहेर येईल सांगता येत नाही . जगावर विचित्र पद्धतीने अत्याचार करणारे जे जे मोठे क्रूर शासक होऊन गेले त्या सर्वांचे बालपण असेच अत्याचारांचे राहिलेले आहे असा इतिहास आहे .एक ज्ञानेश्वर माऊलींचे उदाहरण वगळले तर दुसरे कुठलेही उदाहरण आपल्याला सापडत नाही जिथे बालपणी समाजाने केलेल्या अत्याचारांचा बदला त्या बालकाकडून लोक कल्याणकारी कार्य उभे करून घेण्यात आला ! लहानपणी आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांचा बदला आपण मोठे झाल्यावर समाजाकडून घेऊ अशीच एक मानसिकता त्यांची स्वाभाविकपणे तयार झालेली असते . त्यामुळे हे अजिबात करू नये . लहान मुलांशी नेहेमी प्रेमानेच वागावे बोलावे आणि त्यांच्या पातळीला खाली जाऊन मगच त्यांना सर्व समजावून सांगावे . भले कितीही वेळा हे कष्ट करावे लागोत . बालपण जपणे हे फार महत्त्वाचे आहे . अकाली प्रौढत्व येणे फार चांगले नसते .मी तर अजूनही शक्य असेल तेव्हा बालसुलभ वृत्तीने राहतो .त्यातला आनंदच वेगळा आहे ! परमेश्वराने आधीच त्या साधूला लुळा बनवला होता तरी बिचारा आपलीच कर्मे आपल्या हाताने किंबहुना आपल्या पायाने वाढवत होता . नर्मदा मातेने त्याला संधी दिली होती खरी परंतु याने तिची माती केली होती असे माझे मत झाले .
असो . पुढे चालत राहिलो . पुढे गोपाळपूर नावाचे गाव लागते . इथे बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिर आहे . त्या सर्वांचे दर्शन घेतले .इथेच लक्ष्मी नारायणाचे मंदिर देखील आहे . पशुपतिनाथाचे मंदिर आहे . शिवलिंग नैसर्गिक आहे व फार सुंदर आहे . बुर्ज खलिफा चा आकार या शिवलिंगावरून बेतल्या सारखा वाटतो . सर्वच मंदिरे सुंदर आहेत . इथे श्री पीठम् ध्यान मंदिर नावाची अतिशय सुंदर वास्तू आहे .सर्व काही गोलाकार असलेली ही वास्तू म्हणजे उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे . ज्यांना वेळ असेल त्यांनी अवश्य पहावे असे स्थान आहे . फक्त इथे परिक्रमावासी राहू शकत नाहीत . हा शांतता परिसर आहे . या परिसरात अन्य अनेक छोटे मोठे आश्रम आहेत . एक बौद्ध मंदिर आहे .यानंतर मोठाच खडक लागतो . तो पार करत काही शेते ओलांडत लम्हेटा घाटावर आलो .इथे नर्मदा मातेचे पात्र कल्पनेच्याही पलीकडे खोल आहे असे मानले जाते . त्यामुळे येथे पुलाचे काम सुरू आहे परंतु पात्राच्या मध्यभागी त्याचा पाया घातलेला नाही . हा टांगता पूल राहणार आहे . लम्हेटाघाटापासून काही काळ नर्मदा माई उत्तर वाहिनी वाहते . परंतु हा भाग अतिशय थोडासा आहे त्यामुळे फारसा कोणाला माहिती नाही .लम्हेटाघाटाच्या अलीकडे एक मोठे डोहकूप आहे .इथून पुढे बरीच डोह कूपे लागली . लम्हेटा घाटावर वर्षभर पिंडदानाचे विधी चालू असतात . त्यामुळे येथे सदैव पंडे न्हावी व अन्य विक्रेत्यांची तसेच नातेवाईकांची गर्दी असते . या भागातील नर्मदा मातेचे शांत ,धीर गंभीर रूप पाहायला मजा येते ! पाणी प्रचंड खोल आहे . परंतु इथे गर्दी फार असल्यामुळे पुढे निघालो . पुढे एक संत घाट नावाचा घाट लागतो . अतिशय सुंदर रमणीय असे नर्मदा मातेचे पात्र इथे आहे . तिथून खडका खडकातून पुढे निघालो . अचानक काही खडकांवर एक ताडपत्री अंथरली आहे असे मला दिसले . ती ओलांडून पुढे जाताना आतून नर्मदेहर असा आवाज आला ! ताडपत्रीच्या आतून आवाज कसा काय येतो आहे म्हणून मी वाकून पाहिले तर या ताडपत्रीच्या खाली एक साधू राहतो आहे असे दिसले ! एक तरुण पंजाबी साधू इथे मस्तपैकी ट्रकवर अंथरतात तशी ताडपत्री टाकून सावलीमध्ये राहत होता .खडकावरतीच झोपायचा . मला पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला . मला म्हणाला बाबाजी इथे बरेच दिवस राहतो आहे . परंतु काठाने जाणारा कोणी परिक्रमावासी भेटत नाही . आता तुम्ही इथे निवांत रहा . कितीही दिवस राहू शकता . मी त्याला सांगितले की माझी परिक्रमा आरंभबिंदूच्या अगदी नजीक आलेली आहे . त्यामुळे पुढे चालणे श्रेयस्कर आहे . याने मला बालभोग म्हणून पेढे ,बर्फी , शेव ,गाठी शेव ,वेफर्स आणि केळी खायला घातली ! हा फलाहारी होता . त्यामुळे त्याला काही स्थानिक गावकरी भक्त मंडळी रोज असे काही ना काही खायला आणून द्यायचे ! हा येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना ते वाटून टाकायचा . हा बाल भोग म्हणजे साक्षात जेवण झाले !साधू अतिशय ब्रह्मनिष्ठ होता . नर्मदा मातेच्या आईने पात्रात राहत होता .लवकरच चातुर्मास सुरु होणार होता आणि त्याला त्याचा गाशा गुंडाळावा लागणार होता . परंतु तोपर्यंत तो आरामात इथे राहू शकत होता . मला त्या साधूचे खूप कौतुक वाटले . याने तुडुंब खायला घातलेच शिवाय नको नको म्हणताना सोबत थोडे बांधून दिले . इथून थोडेसे पुढे आल्यावर नर्मदा मातीमध्ये एक अतिशय सुंदर नैसर्गिक जलप्रपात आहे . याला घुघरा जलप्रपात असं म्हणतात . इथे एक खडक होता . त्यावर मी बसलो . खडकाच्या समोरच नर्मदा माई अचानक दहा-पंधरा फूट पातळी सोडून खाली उतरते ! शांतपणे वाहणारा प्रवाह शांतपणे खाली उतरतो ! आणि खाली उतरता क्षणी खळबळ सुरू करतो ! हे दृश्य अतिशय मनमोहक आहे ! सुमारे तासभर मी त्या प्रवाहाकडे पहात बसून राहिलो . मोठे पात्र अचानक लहान झाल्यामुळे प्रवाहाची गती शतपटीने वाढलेली असते . इतका भयानक वेग पाहिला की डोके गरगरायला होते . परंतु इथे मात्र मला तसे काही झाले नाही . माझे वडील सांगली नगरपालिकेमध्ये वॉटर वर्क्स अर्थात पाणी विभागात नोकरीला होते .इथे जलशुद्धीकरणाचा मोठा प्रकल्प होता . त्यातील खळाळणारे पाणी पाहिल्यावर देखील मला भीती वाटायची इतके ते भयंकर असायचे . इथे मात्र त्याहून भयानक पाणी पाहूनही जराही भीती वाटत नव्हती . त्या दगडावर बसून पाण्याच्या प्रवाहाकडे पाहताना मन निर्विचार होऊन गेले . डोळ्यासमोरचे दृश्य प्रत्येक क्षणाला बदलले की मन निर्विचार होऊन जाते . चांचरीमुद्रा त्याच साठी योगी लोक करतात . इथे डोळे न हलवता चांचरी मुद्रा सिद्ध झाली !तासाभराने तिथे काही तरुण मुले मस्ती करण्यासाठी आली .फोटो काढण्यासाठी त्यातला एक तरुण माझ्या शेजारी येऊन बसला . मी उठून उभा राहिलो आणि पुढे चालू लागलो. इतक्यात एकाने फोटो काढले . मी त्याला ते मित्राला पाठवायला सांगितले आणि पुढे निघून गेलो . नंतर फोटो पाहिल्यावर लक्षात आले की त्यातला एक फोटो आजवरच्या सर्व चित्रांमध्ये अतिशय सुंदर आणि उजवा आलेला आहे ! नर्मदा मातेची कृपा !

हाच तो घुगरा जलप्रपात ! किती वेगाने नर्मदा माई खाली झेपावते आहे पहा ! अद्भुत दृश्य आहे!

हाच तो
युवक जो माझ्या शेजारी येऊन बसला .त्यामुळे मी उठून शांतपणे पुढे चालू लागलो . नर्मदा मातेचे किती मोठे पात्र इथे अडवले गेले असून एकाच भागातून वाहते आहे हे आपल्या लक्षात येईल ! माझ्या दिशेने येणाऱ्या युवकाच्या वरती देखील नर्मदा मातेच्या पात्राचाच भाग दिसतो आहे .
कृपया हा लेखांक पूर्ण करा.. उत्सुकता लागून राहिली आहे..
उत्तर द्याहटवानर्मदे हर
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा