भेटायला भक्त मंडळी आलेली असल्यामुळे साधू महाराजांनी भोजन बनवायला उशीर केला परंतु खूप सुंदर भोजन प्रसादी खाऊ घातली .क्षणभर थांबून भर दुपारी झोझी घाटावरून पुढे निघालो . सगळीकडे बेलाची छोटी छोटी रोपे दिसत होती .सितलपुर गाव ऐन उन्हामध्ये गाठले ! शीतलता केवळ गावाच्या नावातच होती ! विनोदाचा भाग सोडून द्या परंतु शीतलपुर गावातील आश्रम खूप सुंदर आहे . सिताराम साधू आश्रम चालवितात . यानंतर जलहरी किंवा जलेरी घाट लागला . अचानक मोठाले प्रस्तर खडक इथून सुरू झाले ! मैयाचा कित्येक मीटर रुंद प्रवाह इथे अचानक वीस फूट अंतरातून वाहू लागतो ! आश्चर्य म्हणजे तरी देखील पाण्याची गती तेवढीच राहते ! याचा अर्थ प्रवाहाची जेवढी रुंदी आहे किमान तेवढी खोली येथे निश्चित आहे ! कारण पाण्याची पातळी सर्वत्र समान राहते ! इथे एक कोळी मासे धरत बसला होता .त्याला मी खोलीचा अंदाज आहे का असे विचारले . त्याने सांगितले की बऱ्याच लोकांनी कित्येकशे मीटर दोरीला वजन बांधून खाली सोडून पाहिले आहे परंतु आजपर्यंत या भागाचा तळ कधी सापडलेला नाही ! अगम्य लीला रेवा !मी हा घाट मला कसा वाटला त्याची वहीमध्ये कच्चे रेखा चित्र काढले आहे .

शिवलिंगाच्या जलहरीसारखा हा आकार असल्यामुळे याला जलहरी किंवा जलेरी घाट नाव पडले आहे .
इथे घाटावर लुंकेश्वर महादेवाचे शिवलिंग आहे .
शितलपुर येथील सिताराम आश्रमातून दिसणारा जलेरी घाट
हा सर्व कठोर पाषाण आहे . त्यामुळे नर्मदामाई किती कमी जागेतून वाहते पहा !
जवळच सितलपुरचा सिताराम आश्रम दिसतो आहे . इथे आत मध्ये गेला तर परिक्रमा खंडित होते असे तुम्हाला कोणी सांगितले तरी काळजी करू नये कारण आपण नर्मदा मातेचा प्रवाह काही ओलांडत नाही ! आणि सर्वत्र कडक खडक असल्यामुळे तुमच्या खालून देखील नर्मदा जल वाहत नाही . त्यामुळे तुम्ही रीतसर मध्यभागी जाऊन प्रवाह बघू शकता असे माझे स्पष्ट मत आहे ! नर्मदा मातेचे हे रूप नाही पाहिले तर मग काय पाहिले !
श्री लंकेश्वर महादेव आणि मागे दिसणारा जलेरी घाट
जलहरी घाटाचे दर्शन ! इथे महादेवांनी खरोखरीच नर्मदा मातेचे बहुतांश जल हरण केलेले आहे !
इथे आत मध्ये जाऊन जलेरी घाटाचे दर्शन घ्यावे . नर्मदा मातेच्या इतक्या उदरामध्ये आणि तेही परिक्रमे मध्ये असताना , अन्य कुठल्याही घाटावर जाता येत नाही ! इथेच तो कोळी मासे धरत बसला होता .
कितीही खोल जा या जागेचा अंत लागत नाही !
इथून पुढे परिक्रमामार्ग रीतसर पूर्व दिशेला वळतो .

पुढे सिद्ध घाट लागतो जिथे सिद्ध कुंड ऋषी कुंड अशी कुंडे आहेत .इथे देखील मोठे पात्र अचानक एका छोट्या भूभागातून वाहू लागते परंतु इथे निदान पातळी मधला फरक लक्षात येतो ! जलहरी घाटावर मैय्याच्या पातळीत फरक पडत नाही हा मोठा फरक आहे !
इथे पुन्हा खडकाळ भूभाग आहे आणि त्यानंतर मैया एक झोकदार वळण घेते .
इथून पुढे भेडाघाट पर्यंत मैय्याचा काठ कसा आहे ते आपल्याला हे चित्र पाहिल्यावर लक्षात येईल .
इथे अनेक ठिकाणी मैय्यामध्ये झालेला असा पातळी बदल आपल्याला दिसतो .
हे ठिकाण खूप रम्य आहे . अखंड रेवामाई चा रव कानी पडतो !
इथून हलूच नाही असे वाटते .
सर्व भूभाग असा खडकाळ आहे .
आपण उगमाच्या दिशेने जाऊ तसा तसा नावांचा आकार हळूहळू लहान होत जातो .
माई मध्ये उतरून असे पाणी पिणारे श्वान अनेक ठिकाणी पाहिले ! शिकार करून मासे धरणारे श्वान देखील पाहिले ! कदाचित काही लाख वर्षांनी नर्मदा नदीमध्ये मासे धरणारी कुत्र्याची एखादी प्रजाती निर्माण व्हायची इतक्या संख्येने श्वान कुळ मैयाकाठी आढळते !
नावा या भागात साधारण अशा आहेत . आणि पूल कमी असल्यामुळे गाड्या नावेतून नेल्या जातात . पूल कमी असण्याचे कारण इथले पाणी इतके खोल आहे की पुलाला पाया सापडत नाही .
मालकछार गावात असलेला पूल हा या भागातला शेवटचा पूल आहे . जलेरी घाटाच्या आधी हा पूल येतो .
या भागात माती आहे त्यामुळे शेती आहे आणि माती असल्यामुळे पूल बांधणे शक्य आहे इथून पुढे थेट तिलवारा घाटापर्यंत कुठे पूल नाही . मध्ये हिरापूर बांदा येथे वर्तुळाकार मार्ग अर्थात रिंग रोडच्या पुलाचे काम सध्या सुरू आहे परंतु तो अजून पूर्णत्वाला गेलेला नाही .
छोटे डोंगे हेच दैनिक दळणवळणाचे साधन आहे .
अशाच एका नावेतून दिसणारे नर्मदा मातेचे रम्य रूप !
फार लहान वयापासून केवट आपल्या मुलांना प्रशिक्षण देतात ! या भागामध्ये आपल्या ना तोंडाला नाव शिकवणारा केवट आजोबा !
हे सर्व खडक मी पायाने ओलांडले असल्यामुळे मला आजही आठवतात ! स्वच्छ रेवाजल ! आणि तप्त पाषाण खंड !
हा भाग अतिशय निसर्ग संपन्न आहे .
जागोजागी नर्मदामाई अशी पातळी सोडून खाली खाली येते आहे याचाच अर्थ आपण प्रत्येक पावलाला वर वर चढत जातो आहोत .
अखंड मैया खाली उतरते आहे !
न कंटाळता न थकता !आपण फक्त तिचे रूप न्याहाळायचे आणि घनघोर आवाज ऐकायचा !
या भागाचे नावच बीजनाघाट आहे . बिजना म्हणजे विजना: .
विगताः जनाः यस्मात् सः विजन: । अर्थात जिथून लोक निघून गेले आहेत असा परिसर ! नावाप्रमाणे हा परिसर विजन आहे !मराठीमध्ये विजनवास हा शब्द त्यातूनच आलेला आहे .
इथे मध्येच मला एक बन्सी केवट नामक मनुष्य भेटला ज्याने पायी परिक्रमा केलेली होती . वाळू काढताना पायाला जंतू संसर्ग किंवा गँगरीन झाल्यामुळे त्याच्या पायाची सर्व बोटे कापलेली होती . याने मला चहा पाजला . एक मोठा तुंबा तो माझ्यासोबत देत होता परंतु मी नम्रपणे नकार दिला कारण त्याला वाटत होते तेवढे मला चालावे लागणार नव्हते . अखेरीस पिपरिया गावातील राम घाटावर थांबण्याचा निर्णय घेतला .या नावाची गावे मोजणे आता मी सोडून दिले आहे ! या ठिकाणी उजव्या हाताला एक गुरुद्वारा देखील होता . छोटासाच होता .डाव्या हाताला डोंगरावर राम मंदिर आश्रम होता . साधूंचा आवडता आश्रम ! इथे अनेक लुळे पांगळे अपंग साधू आश्रयासाठी आलेले होते . जन्मजात अपंगत्व असलेल्या माणसाने याचक बनण्यापेक्षा साधू बनणे कधीही उत्तम आहे ! भजन केल्याशिवाय या नरदेहातून मुक्ती मिळणे कठीण आहे ! तुम्ही काहीही करा परंतु शेवटी तुम्हाला काही काळ का होईना भजन करावेच लागणार आहे ! भजन म्हणजे आपले मराठी भाषेतले तालासुरातले भजन नव्हे. परमेश्वराला भजणे , त्याची अव्यभिचारिणी भक्ती करणे याला भारतात सर्वत्र भजन म्हणण्याची पद्धत आहे . असो .

आश्रमातील श्री राम प्रभूंचे विग्रह
आश्रमातील एक मंदिर
श्री गुरु महाराज पादुका स्थळ
गुरुपरंपरेतील विविध सद्गुरूंच्या चरणपादुका
रामघाटावर हनुमानजी तर हवेतच !
सुंदर असे पिंपळाचे झाड . याच्या पारावर महादेव आहेत .
पिंपळाच्या पारावरील महादेव .
आश्रमातील दुर्गा मातेला दाखविलेले छप्पन भोग
इथले भंडारी स्वामी स्वभावाने थोडे कडक होते परंतु साधुववृत्तीचे होते .रात्री दोन टिक्कड आणि दोन ग्लास गरम दूध प्यायलो . आश्रमामध्ये बहुतेक भाजी संपलेली होती . मला बरेचदा साधू लोक सिताराम साधू समजायचे त्यामुळे साधूप्रमाणे माझ्याशी व्यवहार व्हायचा . इथे देखील त्यांनी मला साधूच्या रांगेत बसायला सांगितले . मी जेव्हा हात जोडून मी गृहस्थी आहे असे सांगितले तेव्हा भंडारी स्वामींच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले ! अगली बार आना तो साधूओके पंक्ती मे बैठने की तैयारी से आना ! या त्यांच्या वाक्याने अंगावर मुठभर मास चढले ! नर्मदा मातेच्या काठावर मिळालेला आशीर्वादच की जणू ! रात्री मी गच्चीमध्ये झोपलो . मला खुल्या आकाशाखाली झोपायला खूप आनंद वाटतो ! शक्य असेल तेव्हा मी बंदिस्त वातावरणात न झोपता खुल्या हवेत झोपतो ! या ठिकाणी एक जबरदस्त घटना घडली . रात्री अडीच वाजताच मला जाग आली . आणि झोपच येईना . गेले काही दिवस माझे सगळे ताळतंत्र असेच बिघडले होते ! विरहाच्या वेदना विविध रूपाने प्रकट व्हायच्या . झोप उडणे हा त्यातलाच एक प्रकार . मी असा विचार केला की जाग आलीच आहे तर डोलडालला जाऊन यावे . मंदिराच्या मागे एक खोल खोल ओढा होता . तिथे प्रचंड झाडी होती .नित्याप्रमाणे मी उद्या सकाळी डोलडालला कुठे जायचे ते आदल्या दिवशी दिवसा उजेडी बघून ठेवत असायचो . योग्य जागेची अचानक शोधा शोध धोकादायक ! त्यामुळे हा ओढा मी कालच हेरून ठेवला होता .पावसाळी वातावरण होते . दोन-तीन दिवस झालेल्या पावसामुळे झाडे माती ओली होती . ओढ्यामध्ये धोकादायक पद्धतीने निस्तार कार्य आटोपले .या कामासाठी अर्थातच मी त्या विजेरीची मदत घेत असे . ही तीच एवरेडी कंपनीची बॅटरी होती जी रामदास बाबांच्या इथे मी विसरलो होतो परंतु तरीदेखील दमगडच्या समोर मुक्काम असताना मला ती सामानामध्ये चमत्कारिक रित्या सापडली होती . या विजेरीने मला सुमारे दीडशे दिवस अखंड साथ दिली होती ! आणि कुणाला सांगून पटणार नाही परंतु मी तिथे सेल एकदाही बदलले नव्हते ! तरी देखील ती उत्तम प्रकाश देत होती ! माझ्या मनामध्ये असा विचार येत होता की कदाचित आपला हा परिक्रमेतला शेवट चा मुक्काम तर नसेल ? काय माहिती ! तसे असेल तर उद्यापासून ही विजेरी आपल्याला लागणार नाही . मी त्या विजेरी कडे पाहिले आणि मनातल्या मनात म्हणालो की ही विजेरी आपल्याला साक्षात नर्मदा माईने दिलेली आहे . त्यामुळे आपण घरी गेल्यावर हिला फ्रेम करून ठेवून देऊ ! असे म्हणेपर्यंत माझ्या हातातली ती विजेरी कुणीतरी झटका मारून काढून घेतल्यासारखे झाले ! ओढ्यातून काहीतरी आले आणि माझी विजेरी काढून घेतली गेली ! त्या स्पर्शाने संपूर्ण अंगावर काटा आला ! विजेरी पेटलेली होती . परंतु खाली जाता जाता ती बंद पडली ! कुठे गेली कशी गेली किती खोल गेली कोणी नेली मला काहीही कळले नाही ! एक मात्र खरे . ती जिथून आली तिथेच गेली !

आता या क्षणी झालेला चमत्कार सांगतो ! या विजेच्या लेखाचा दुवा अथवा फोटो शोधावा असा विचार मी करत असताना युट्युब उघडले आणि समोर पहिला तोच लेख आला ! किती वेळ वाचतेस माझा नर्मदा माई ! हीच ती विजेरी ! जिथून आली तिथे गेली !
आपल्या आयुष्यामध्ये मिळालेली प्रत्येक गोष्ट अशीच असते नाही का ! या शरीरापासून ते तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीपर्यंत एक आणि एक पदार्थ एक आणि एक वस्तू तुम्हाला कुणीतरी दिलेली असते ! तुम्ही जन्मत:च काहीही घेऊन येत नाही ! परंतु अधिक सहवास लाभल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या आहेत असे वाटू लागते ! शरीराचेच उदाहरण घ्या ! ते आपल्या सर्वाधिक सहवासात असल्यामुळे आपल्याला वाटते की आपले शरीर आपलेच असून आपल्याला हवे तसे वागेल . परंतु शीर्यमाण असलेले शरीर जेव्हा थकू लागते तेव्हा लक्षात येते की हे आपले नव्हतेच ! म्हणून तर आपले शरीर ऐकत आहे तोपर्यंत नर्मदा परिक्रमा करून घ्यावी ! नंतरचे कोणी पाहिले आहे ! अहो आपले स्वतःचे शरीर आपले नाही तर मुले बाळे पत्नी पोरे आई-वडील नातेवाईक मित्र नोकरी चाकरी व्यवसाय धंदा यांचे काय घेऊन बसलात ! ते ज्याने दिले आहे तो योग्य वेळ झाल्यावर काढून घेईल ! आता सुद्धा अशीच अजून एक गोष्ट माझ्या हातातून निसटून चालली होती जी माझी स्वतःची नव्हती किंवा मी कमवली नव्हती .जी मला कोणीतरी दिली होती !ती गोष्ट म्हणजे नर्मदा मातेच्या काठाकाठाने चालण्याची संधी ! तिची परिक्रमा करण्याची इच्छा ! तिचा सहवास ! तिचे प्रेम ! तिची सुगणभक्ती ! आणि हीच जाणीव मनाला या क्षणापर्यंत व्यथित करत होती . परंतु विजेरी अदृश्य झाली आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला ! अरे जे आपले नाहीच ते गेल्याचे दुःख कशाला करायचे ! नर्मदा मातेची इच्छा म्हणून आपण परिक्रमेला आलो आहोत . तिचा आशीर्वाद आहे कृपा आहे म्हणून चालू शकत आहोत . परिक्रमा पूर्ण करायची का नाही करायची पूर्ण झाल्यावर काय करायचे हा सर्वस्वी तिच्या आखत्यारीतला विषय आहे ! त्यावर मी डोके लावायचे काहीच कारण नाही ! मैया मध्ये स्नान केले . पूजापाठ आटोपला . आणि आज पहाटे पाच वाजताच प्रस्थान ठेवले . पुन्हा एकदा मैयाचा काठ धरला . मला कळतच नव्हते की मी मैया च्या काठाला पकडून चालतो आहे की मैयाने मला पकडले आहे ! कारण सत्ता तर तिची आहे ! आपण किस झाड का पत्ता ?
पुढील लेखांक
लेखांक एकशे बाहत्तर समाप्त (क्रमशः )
1) कृपया आपल्या परिक्रमा मार्गाचे गुगल मॅप ट्रॅक किंवा मॅप आधारित मार्किंग केलेल्या 2D + 3D गुगल मॅप इमेजेस ऍड करणे जमेल काय ? उत्तम मार्गदर्शन होईल .
उत्तर द्याहटवा2)सामान्यत: ज्या मार्गांचे परिक्रमावासी अवलंबन करतात, त्याचेही गुगल मॅप मार्किंग किंवा इमेजेस केल्यास फारच उपकार होतील.
पहा वेळ मिळाला आणि जमले तर .
नेटववर काही सोर्सेस आहेत पण ते अपूर्ण वाटतात.
prashantji,please make map of your parikrama
हटवानर्मदे हर 🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवाuttam sarvottam suruy, deep lihitaay Narmde Har !!!!!!!!!!!!!!!!!!!!
उत्तर द्याहटवापुढचा भाग कधी?
उत्तर द्याहटवातुमचा धनुष्य बाण नर्मदा परिक्रमेच्या शेवट पर्यंत तुमच्यासोबत होता का?