लेखांक १६७ : घेरा नदीवर रेवामाईने वाचवला यमलोकाचा फेरा !

छोटी धुंवाधारच्या शेजारी असलेल्या परमहंस आश्रमामध्ये मी सकाळी जेव्हा उठलो आणि सर्व आन्हिके आटोपून पुढे निघण्यासाठी मोजा हातात घेतला तेव्हा उगाचच तो उलटा करून घालावा असे वाटले . उलटा करून पाहतो तो काय आत मध्ये मोठा विंचू ! इंगळी ! चटकन तिला बाहेर टाकली . मगच बूट पायात चढवले . परिक्रमे मध्ये ही काळजी प्रत्येकाने घ्यावी . परिक्रमे मध्ये कशाला एरव्ही सुद्धा पादत्राणे घालताना झटकूनच घालावीत . शहरामध्ये साप किंवा विंचू काटा आत मध्ये जाऊ नाही शकला तरी झुरळ , पाली , कोळी यातील काहीतरी नक्की जाऊ शकते . त्यामुळे पादत्राणे तपासून घातलेली उत्तम ! परिक्रमेच्या संपूर्ण कालावधीमध्ये मी रोज बूट झटकून घालायचो . ५०० ते १००० वेळा तो झटकताना काही ही सापडले नसले तरी ते झटकणे आज सार्थक झाले ! विंचवाच्या दंशाने मृत्यू नक्कीच आला नसता परंतु माझे सर्व लक्ष नर्मदा मातेकडून उडून वेदनेकडे आकृष्ट झाले असते .विंचू लोकांनी मारून टाकला असता तो अजूनच वेगळा भाग . हे सर्व टाळण्यासाठी अखंड सावधानता बाळगणे हाच उत्तम उपाय ! असो . इथून पुढे निघालो . आता जंगल संपून शेती सुरू झाली होती . मध्ये गुरशी गावात एका लाल बाबांचा आश्रम आहे . आश्रम ही लाल रंगाचा आहे ,आतील सर्व वस्तू लाल आहेत . बाबांचे कपडे देखील लाल असतात . मी इथे आत मध्ये गेलो नाही . परंतु वाटेत भेटलेल्या गुराख्याकडून आश्रमाची माहिती घेऊन पुढे निघालो . इथे बरेच परिक्रमा वासी थांबतात .

या ठिकाणी असा पक्का घाट बांधलेला आहे .
आपल्या कुटीमध्ये बसलेले लाल बाबा .
लाल बाबांची कुटिया
आश्रमाचा रंग देखील लाल आहे .

 काठाने चालत होतो . इथून छोटी धुंवाधार चे खूप सुंदर दर्शन होत होते . पूर्वी कुणीतरी ब्लास्टिंग करून हे खडक फोडले असावेत असे वाटेल असा त्याचा आकार होता . मला अजूनही असे स्पष्टपणे वाटते की महादेवांनी नर्मदा मातेच्या प्रवाहाला दिशा देण्यासाठी जागजागी असे पर्वत फोडून जागा तयार केलेल्या असाव्यात . 

मागे वळून पाहिल्यावर छोटी धुंवाधार अशी दिसे .

आता हा सर्व भाग धरणामध्ये बुडणार आहे . त्यामुळे पुन्हा याचे दर्शन होईल का नाही माहिती नाही . काठाने चालण्यासारखा रस्ता जवळपास नव्हताच . गुरांच्या पायवाटा धुंडाळीत निघालो . गुरसी घाट सोडला व पुन्हा अतिकठण काठाने गोकला गावाकडे निघालो . आजचा दिवस मोठा संस्मरणीय ठरणार आहे याची मला तेव्हा काहीच कल्पना नव्हती . आज नर्मदा माईने माझ्यासाठी पुढे काय काय कठीण परीक्षा मांडून ठेवलेल्या आहेत याची मला जरा देखील जाणीव नव्हती .वर्षाच्या सुरुवातीला ज्या घटक चाचण्या असतात त्या फार सोप्या असतात पहा ! परंतु वार्षिक परीक्षा हे नेहमी कठीण असते .कारण तुम्ही संपूर्ण वर्षभर केलेल्या अभ्यासाचा कस तिथे लागत असतो ! तसेच काहीसे सध्या सुरू होते ! चालून चालून प्रचंड तहान लागली होती . परंतु नर्मदा मातेचे पाणी खूप खोल होते . आणि उतरण्यासारखी जागाच नव्हती .इतक्यात वाटेमध्ये एक केवट भेटला .भेटला म्हणजे मला पाहून तोच काठावर आला.त्याच्याकडे एक छोटासा डोंगा होता . काल नर्मदा मातेचे भव्य कुंड प्रदूषित झालेले असल्यामुळे पाणी पिता आलेले नव्हते . त्याने मला नर्मदा मातेच्या प्रवाहात आतमध्ये जाऊन शुद्ध पाणी आणून दिले . त्याच्याकडून उगाचच काहीही कारण नसताना मी डोंग्यामध्ये कसे चढावे ?कुठे बसावे ? सर्व प्रात्यक्षिका सह शिकून घेतले ! त्याने देखील मला सर्व काही शिकवले . तुम्ही जर पाण्यात पडलात तर डोंग्यात कसे चढता ? असे विचारलल्या बरोबर त्याने पाण्यात उडी मारून डोंग्यामध्ये चढून दाखवले ! कोण इतके करते अनोळखी माणसासाठी ? तुम्हाला हे ऐकायला सोपे वाटेल परंतु पाण्यात असताना नावे मध्ये चढता येणे फार कठीण असते . माझा एक मित्र राहुल पाटील आणि मी एकदा तोरणा किल्ल्याकडून शिवथर घळीत पायी निघालो होतो . वाटेमध्ये कुंबळे गावाजवळ गुंजवणी नदीचे धरण लागते . ते पोहून पार करावे लागते . राहुल ला कपडे ओले करायचे नव्हते त्यामुळे मी पोहत जाऊन नाव आणली होती ! त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा मला नावेत बाहेरून चढणे किती अवघड आहे ते कळाले होते ! नंतर ही अनेक वेळा तसा प्रसंग आला . आणि मला कधीच ते तंत्र सापडले नव्हते म्हणून मी या केवटा कडून ते शिकून घेतले ! गुरु कधी कुठे कसा भेटेल आणि कशासाठी भेटेल सांगता येत नाही !कालच एक दोन असेच प्रसंग घडलेले होते . सांगायचं राहूनच गेलं ! मी नर्मदा मातेच्या काठाने चालत होतो . सुंदर असा किनारा होता .खडकाचाही नाही आणि वाळूचाही नाही , घट्ट मातीचा किनारा होता . पाणी सुरुवातीला उथळ आणि नंतर अचानक खोल असे होते . दिवसभर प्रचंड उकाडा असला तरीदेखील ज्येष्ठ महिन्यामध्ये जोराचे वारे वाहतात ते वारे सुटले होते . हेच मान्सूनचे वारे . आणि हेच हिंदी महासागरातून पावसाला भारतामध्ये खेचून आणतात ! चालता चालता माझे लक्ष नर्मदा मातेकडे गेले . एक छोटासा तीन चार वर्षाचा मुलगा एका माणसाचा छोटा डोंगा असतो तो ढकलत ढकलत प्रवाहामध्ये घेऊन चालला होता . शेवटी त्याने उडी मारून डोंगा प्रवाहामध्ये घातलाच ! त्याच्या हातामध्ये वल्हे वगैरे काही नव्हते ! एकटाच डोंगा घेऊन प्रवाहाला लागला ! बरे हा पठ्ठया हात मारत मारत डोंगा मध्यभागी घेऊन जाऊ लागला ! मी अतिशय घाबरलो ! मला वाटले की आता हा १००% डोंग्यातून खाली तरी पडणार किंवा डोंगा माईच्या धारेला लागला तर वाहून तरी जाणार ! इतक्यात माझे लक्ष तिथे जवळच काठावरती धुणे धूत बसलेल्या एका बाईकडे गेले .मी तिला चटकन आवाज दिला आणि विचारले ये किसका बच्चा है ? ती म्हणाली , " अपणा ही है बाबाजी । " मी तिला म्हणालो , "अगं मग त्याला अडव की ! डोंगा प्रवाहाला लागतो आहे ! वाहून जाईल ना ! किती जोराचा वारा सुटला आहे ! मैया मध्ये लाटा किती मोठ्या उठत आहेत !त्याच्याकडे वल्हे सुद्धा नाही ! "  मला असे वाटले की त्या बाईचे मुलाकडे लक्ष नव्हते . म्हणून मी पोट तिडकीने तिला सांगत होतो .तिचे लक्ष वेधून घेत होतो . मी त्या मुलाला वाचवू शकलो असतो परंतु त्यासाठी मला नर्मदा मातेमध्ये उडी मारावी लागली असती आणि माझी परिक्रमा खंडित झाली असती . म्हणून मी त्या बाईला सांगत होतो . मला वाटलं की आता ती उठेल आणि मुलाला रागवेल आणि काठावर घेऊन येईल . परंतु झाले उलटेच ! त्या बाईच्या चेहऱ्यावरची रेषा देखील हलली नाही . अतिशय निर्विकारपणे ती तिची धुणी धुवत राहिली . आणि मला म्हणाली , " वो केवट का बच्चा है बाबाजी ! लेहरो से डरेगा तो जिंदगी में क्या करेगा ! " तिचे हे उत्तर ऐकून मी अवाक झालो ! मी तिला विचारले , "याला पोहता येते का ? " बाईचे पुन्हा निरुत्तर करणारे उत्तर ! मला म्हणाली , " पाणी मे डुबेगा ,थोडा पाणी नाक मुह मे जायेगा तभी तो तैरना सीखेगा ! " म्हणजे त्या बालकाला पोहायला देखील येत नव्हते ! "चिंता मत करना बाबाजी । मैया उसको बराबर तारेगी ! सिख रहा है बच्चा । सीखने दो । " मी हतबद्धपणे उभा राहिलो ! कल्पना करून पहा . एखादी शहरातली सुशिक्षित तरुण माता नदीच्या काठावर बसलेली आहे . आणि तिचे तीन वर्षाचे पोहायला न येणारे मुल त्याच्यासाठी खूप मोठ्या भासणार्‍या डोंग्यामधे बसून वेगाने वाहणाऱ्या प्रवाहाला लागले आहे ! तर तिची प्रतिक्रिया काय असती? कल्पना तरी करून पहा ! इथेच तुम्हाला नर्मदा खंडातील लोकांचे वेगळेपण लक्षात येते ! नर्मदा खंड वेगळा का आहे ? याचे कारण इथल्या लोकांची मानसिकता आहे ! त्यांचा नर्मदा मातेवर असलेला विश्वास आहे ! स्वतःच्या अवगुणांपेक्षा किंवा कमतरतेपेक्षा मैयाच्या गुणांवर आणि क्षमतेवर त्यांचा अधिक विश्वास आहे ! मी थोडावेळ थांबून त्या मुलाच्या लीला पाहत राहिलो . तो खरोखरीच एक दोन वेळा पाण्यामध्ये पडला . गटांगळ्या खाल्ल्या पण त्याने नाव सोडली नाही . पुन्हा नावेत चढला . सुदैवाने त्याला वाऱ्याची साथ होती . त्यामुळे नाव पाण्याच्या गतीने पुढे जात नव्हती . अखेरीस त्याने बरोबर नाव काठाला लावलीच ! केवळ हाताने पाणी मागे सारत त्याने डोंगा काठावर आणला !  बाईने डोंगा मातीपर्यंत ओढून ठेवला . धुण्याची बादली एका हातात घेतली आणि ते दमलेले नागडे मूल कडेवर घेतले .मला नर्मदे हर केले आणि शांतपणे गावाकडे निघून गेली !तिच्या त्या आत्मविश्वासपूर्ण पाठमोऱ्या आकृतीकडे मी पाहतच राहिलो ! माझे दोन्ही हात आपोआप जोडले गेले ! तिने एकदाही आपल्या मुलाला " अरे बाळा तू असे करू नकोस " असे ऐकवले नाही . आपण नेमके इथेच चुकतो .  आपण आपल्या मुलांना नातवंडांना "अमुक अमुक करू नको " असे न म्हणता "असे करून पाहूयात का ? " असे बोललो , तर आपल्या बोलण्यातली " करू नको " यातून  ध्वनीत होणारी नकारात्मकता निघून जाऊन "करून पाहूयात " अशी सकारात्मकता येते . आणि हीच मुलांना आत्मविश्वास देते . हे सर्व वाचकांनी कृपया कायम लक्षात ठेवावे . मी बाल संगोपनामध्ये हा प्रयोग यशस्वीपणे वापरला आहे .म्हणून खात्रीशीरपणे सांगतो आहे . त्या केवटाच्या बालकाला आपली आई काहीही बोलत नाही हे पाहिल्यावर स्वतःवर , स्वतःच्या इवल्या क्षमतेवर आणि नर्मदा मातेवर किती दृढ विश्वास निर्माण झाला असेल कल्पना करून पहा ! हा आत्मविश्वास पुढे त्याला जगण्याची उभारी देतो ! मी तसाच उभा असताना तिथे एक गुराखी आला . त्याला मी झालेला प्रसंग सांगितला .त्याने मला घडलेल्या घटनेचा संपूर्ण अन्वयार्थ सांगितला . तो मला म्हणाला , "बाबाजी तुम्ही चिंता करू नका . केवटाची बाई वर्षभर असे बिनधास्त वागत नाही !  नौतापा संपल्यावर नर्मदा मातेच्या प्रवाहाच्या विरोधात वाहणारे वारे महिनाभर वाहतात . त्यातले पहिले एक दोन आठवडे पाऊस देखील पडलेला नसतो . त्यामुळे पाण्याची पातळी खाली गेलेली असते . आणि डोंगा वाऱ्यामुळे प्रवाहात वाहून जात नाही . याच दहा-पंधरा दिवसांमध्ये केवट आपल्या मुलांना नावा घेऊन एकट्याने पाण्यात सोडतात ! त्यांचा निसर्गचक्राचा चांगला अभ्यास असतो . त्यांच्या आई-वडिलांनी देखील त्यांना याच पंधरवड्यामध्ये नाव चालवायला शिकवलेले असते ! विशेषतः नाव प्रवाहामध्ये वाहून जात नाही ! असा आत्मविश्वास त्या बालकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचे काम ही भौगोलिक परिस्थिती करते . बाकी  मैय्याच्या महापुरामध्ये पट्टीचा केवट देखील नाव टाकणार नाही ! " त्याचे हे बोलणे मला पटले . मी स्वतः निरीक्षण केले होते की वाऱ्यामुळे त्याची नाव पुढे जात नव्हती ! आता हे सर्व शास्त्र या माणसाने सांगितले म्हणून मला कळाले . ते त्या बाईला देखील माहिती होतेच . परंतु आपल्याकडे ग्रामस्थ किंवा खेडूत लोक बोलण्यामध्ये फारसे हुशार नसतात . सुशिक्षित लोक लहानपणापासून शाळेमध्ये पोपटपंची शिकलेले असतात . त्यामुळे बोलायला तयार असतात ! परंतु बोलता येत नाही म्हणजे तो मनुष्य अज्ञानी आहे असे अजिबात समजू नये ! इथेच पहा ! ती केवटाची पत्नी मला एका छोट्या प्रसंगातून बालसंगोपनाचा किती मोठा धडा शिकवून गेली !भले तिला तिच्या वर्तनामागची कारणपरंपरा सांगता आली नसेल . परंतु म्हणजे ती अज्ञानी आहे असे अजिबात नाही ! इंग्रजांनी जाता जाता आपल्याला शिक्षण व्यवस्था ,पदव्या ,प्रशस्तीपत्रके ,परीक्षांमधले गुण ,पदे यांची चटक लावून दिल्यामुळे आपला समाज गुणग्राहकते कडून "गुण" ग्राहकतेकडे  अर्थात मार्कग्राहकते कडे वळला . तुम्हाला आयुष्यात एखाद्या माणसाला ओळखायचे असेल तर कधी त्याचे शिक्षण बघू नका . म्हणजे शिक्षण असेल तर उत्तमच आहे . परंतु त्या शिक्षणाची अभिव्यक्ती त्या व्यक्तीकडून कशी होते आहे ते प्रामुख्याने पहा . ( एप्लीकेशन कसे आहे ते पहा ) . आणि मगच आपले मत बनवा ! त्या गुराख्याचे आभार मानून मी पुढे चालू लागलो . मातीचा किनारा खूप सुंदर होता म्हणून मी अनवाणी चालू लागलो . म्हणजे पायात तसे नावाला मोजे होते परंतु ते खालून पूर्ण फाटलेले होते . त्यामुळे पायाला मातीचा थेट स्पर्श मिळत होता ! आणि तो अतिशय सुखद होता ! जरा पुढे गेलो आणि मला पुन्हा एकदा केवटाची पाण्यामध्ये खेळणारी मुले भेटली ! इथे एक केवट होता . त्याला मी विचारले की तू मुलांना नाव शिकवायला घेऊन आला आहेस का ? त्याला आश्चर्य वाटले ! तो म्हणाला , " हे तुम्हाला कसे काय माहिती बाबाजी ! " आहे की नाही गंमत ! ज्ञानाची गंमतच अशी आहे ! तुम्ही ते जितके मिळवाल तितके तुम्हाला ते प्रगल्भ करत जाते आणि तितके तुम्हाला लोक मानतात ! बरं तुम्ही लोकांकडून मिळवलेले हे ज्ञान फक्त स्वतः जवळ ठेवले स्वतःपुरतेच वापरले तर मात्र त्या ज्ञानाचे डबके होते ! तुमच्या ज्ञानाचा प्रवाह खळाळता शुद्ध निर्मळ ठेवायचा असेल तर तो ज्ञानाचा झरा सतत वाहिला पाहिजे ! ग्यान बाटो . कॉम !  म्हणून तर रामदास स्वामी दासबोधामध्ये सांगतात 

जे जे आपणासी ठावे । 

ते ते हळूहळू शिकवावे । 

शहाणे करून सोडावे । 

अवघे जन ॥ 

या केवटाने माझे काही फोटो काढले . आणि माझ्या विनंतीवरून ते माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले . ते आपल्यासाठी सोबत जोडत आहे .

खोल पाण्यामध्ये पोहणारा केवटाचा मुलगा , आणि फाटके मोजे घालून काठावर उभा असलेला प्रस्तुत लेखक !
तब्बल सात मुले मिळून एका डोंग्यावर खेळत आहेत . त्यांचे कपडे काठावर पडलेले आहेत . यांपैकी कोणाचेही आई-वडील तिथे उपस्थित नाहीत ! तरी देखील मला "दंडाने नाव पाण्यामध्ये ढकला " असे ती मुले सांगत आहेत ! 
केवटासह सर्वांनी चप्पल बाजूला काढून ठेवल्या आहेत हे लक्षात ठेवावे ! नावे मध्ये बसताना हे लोक चप्पल घालत नाहीत . सध्या इंडोनेशिया मधल्या बोट रेस मधील ऑरा फार्मिंग करणारा एक मुलगा रील्स मध्ये प्रसिद्ध होतो आहे पहा ! त्याच्यापेक्षा माझ्या दंडापाशी उभा असलेला हा छोटा केवट बालक काही कमी शूर नाही !अतिशय अस्थिर अशा डोंग्यावर किती आरामात उभा आहे पहा ! ना डर ना फिकर ! मात्र नर्मदे हर ! 
या मुलांकडून मी विविध गोष्टी समजून घेत आहे ! नर्मदा माता प्रशालेमध्ये शिक्षण चालू आहे !
या मुलांचा आत्मविश्वास पाहून खूप बरे वाटले ! किमान ही मुले तरी आयुष्यात आपल्या देशाचे नाव नक्की उज्वल करतील ! 
या मुलांचा नावेतील पाणी काढण्यासाठी खटाटोप चालला होता .
सातही जण आलटून पालटून ही नाव चालवत होते . मी माझा दंड फार क्वचित जमिनीला टेकवत असे . शक्यतो अशा पद्धतीने हातात धरून चालत असे . वेताचे एक वैशिष्ट्य असते . उष्णता लागली की तो आकार बदलतो . त्यामुळे माझ्या हाताची उष्णता लागून त्याच्या आकाराला गोलवा आला होता ! तो या चित्रामध्ये स्पष्टपणे दिसतो आहे !तळपत्या उन्हामुळे भाजलेली रापलेली त्वचा देखील दिसते आहे . 
शेवटी त्यांनी नाव पाण्यामध्ये घातलीच ! ज्यांना संधी मिळाली नाही ती मुले पोहू लागली .या मुलांकडून मी डोंगा वापरण्याच्या बऱ्याच गोष्टी शिकलो . डोंग्यामध्ये न बसता बाहेरून तो कसा ढकलतात ते देखील शिकलो .
हा प्रसंग कायमचा लक्षात राहिला ! आणि त्या अज्ञात केवटाने काढलेल्या फोटोमुळे अजरामर देखील झाला ! असे कित्येक प्रसंग  निर्बुद्ध असलेल्या प्रस्तुत लेखकाच्या अल्पमतीमुळे विस्मृतीच्या खोल गर्तेत कायमचे निघून गेले !परंतु त्यांचा निकाल मात्र कायम लक्षात राहिला ! ना चिंता ना भय ! नर्मदा मैया की जय ! जय हो माई की ! तो चिंता काहे की ! ना डर ना फिकर ! मात्र नर्मदे हर !

इतके सर्व डोंगा पुराण मी का सांगतो आहे हे लवकरच तुमच्या लक्षात येईल ! सध्या आपण पुढे चालायला लागूया ! पुढे अति कठीण परंतु अतिसुंदर असा मार्ग लागला . पुन्हा वाळूमध्ये शिवलिंगे सापडायला सुरुवात झाली .  ती मी उचलून पाहायचो त्याचा आनंद घ्यायचो आणि पुढे निघून यायचो ! उन्हाचा तडाखा जाणवत होता . मैयाच्या काठावर एक डेरेदार सावली देणारा वृक्ष दिसला . खाली सर्वत्र हिरवीगार गवताची चादर पसरलेली होती . इथे थोडासा बसलो . मान्सूनचा वारा सुटला होता ! 
हाच तो वृक्ष ! त्यावेळी पाण्याची पातळी थोडी अधिक होती .कारण
मैय्याच्या लाटा माझ्यापर्यंत येत होत्या ! नर्मदा मातेवरून तिच्या प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहत येताना वारा तिचा सुगंध घेऊन यायचा ! अक्षरशः स्वर्गीय अनुभव ! माझा प्रवास ईशान्य - पश्चिम दिशेला सुरू होता .आणि वारा नैऋत्येचा होता ! त्यामुळे हा वारा मला चालायला मदतच करायचा ! चल पुढे चल पुढे असे म्हणत ढकलायचा ! आणि मला मात्र चालण्याची इच्छाच नसायची ! अलीकडे झालं असं होतं की आता परिक्रमा लवकरच पूर्णत्वाकडे जाईल आणि तसे होऊ नये असे मला वाटू लागले होते . त्यामुळे मी पूर्वीपेक्षा अधिक काळ मैयाच्या काठावर बसू लागलो होतो . तिचा विरह फार काळ सहन होण्यासारखा नव्हता . मिळेल ती संधी साधून मी मटकन खाली बसायचो आणि तिचे रूप न्याहाळत रहायचो . आता देखील तिचा माझा संवाद सुरू होता . आमची भाषा फक्त आम्हालाच कळायची ! जलसंवादाची ! एखाद्या लाटेने ती अंगावर पाणी उडवायची ! आणि मग मोबदल्यामध्ये थोडे पाणी मी ही तिला अर्पण करायचो . असा सुमारे अर्धा तास गेला . पुढे कुठे जायचे आहे कुठले गाव आहे काहीच माहिती नव्हते . माहिती नसायचेच ! आता मारे मी तुम्हाला माझ्या वहीतल्या नोंदी आणि नकाशे बघू बघू गावांची नावे सांगतो आहे ! तेव्हा काही माहिती नसायचे ! फक्त पुढे पुढे चालत राहायचे आहे एवढेच माहिती होते . थोडेसेच पुढे आलो आणि लक्षात आले की इथे एक नदी नर्मदा मातेला येऊन मिळते आहे ! नदी खोल होती ! आणि परिसरात कोणीच नव्हते . मला वाटले इथे बसलो असतो तर अजून मजा आली असती ! हरकत नाही ! नेमके मैय्याने ते ऐकले असावे !आणि खरोखरच पुन्हा अर्धा तास मला इथे बसावे लागले ! कोणीच रस्ता सांगायला येईना . एखादा केवट येईल आणि पलीकडे सोडेल अशी वाट मी पाहत होतो . परंतु ते देखील कोणीही फिरकले नाही . मी त्या नदीच्या काठाने फेरफटका मारून आलो . नदीचा आकार मोठा विचित्र होता . एक मोठे वळण घेऊन ती पुन्हा एकदा स्वतःच्याच जवळ आलेली होती ! अशा नद्या फार धोकादायक असतात ! महापुर आला की त्या स्वतःचाच किनारा तोडून स्वतःचे मार्ग बदलतात ! आणि मग तिचंच जुनं वळण इतिहास जमा होतं . ही नदी इथून तिथून सगळीकडून खोल होती त्यामुळे नावे शिवाय पर्याय नव्हता . इथे तीन नावा मला दिसत होत्या परंतु त्या ह्याच नदीच्या समोरच्या तटावर होत्या . नदीच्या पाण्याला गती होती . आणि वेगाने तिचे पाणी नर्मदा मातेमध्ये मिसळत होते . नर्मदा मातेच्या प्रवाहाला तर गती होतीच .
हीच ती नदी ! नर्मदा मातेला मिळण्या अगोदर तिने एक बदामाकृती घेरा मारलेला आहे . त्यामुळे हेच नाव घेरा नदी पडले असावे .ह्याच नदीला काही लोक घोर नदी असे म्हणायचे .
हिचा बदामा सारखा आकार फार काळ टिकणार नाही . एखाद्या महापुरामध्ये मधली भिंत तुटून ही पुन्हा सरळ वाहू लागेल .
याच ठिकाणी माझा सगळा पुढचा घटनाक्रम घडला .
मला दिसलेले तीन डोंगे या चित्रामध्ये स्पष्ट दिसत आहेत फक्त ते या तटावर आहेत . माझ्या वेळी समोरच्या तटावर होते .
नर्मदा मातेचे पात्र किती खोल आणि भव्य आहे हे आपल्या लक्षात येईल . इथून पाण्याला चांगली ओढ होती .
डोंग किती लहान दिसत आहेत ते पाहून ठेवा . म्हणजे मी पुढे काय म्हणतो आहे ते तुमच्या लक्षात येईल .इथे दिसते आहे त्यापेक्षा पाणी पातळी थोडी जास्त होती .

आता काय करावे असा विचार करत मी तिथे बसून राहिलो . चालत नदी पार करायचा एकदा प्रयत्न केला . परंतु इतका तीव्र उतार होता आणि खाली इतका बेकार गाळ होता की आतापर्यंतच्या अनुभवाचा वापर करत मी चटकन तो निर्णय बदलला . काही केल्या कोणी येत नाही असे पाहिल्यावर शेवटी मी नर्मदा मातेला नमस्कार केला आणि सांगितले , "माई मला पलीकडे जायचे आहे . आणि तुझा किनारा देखील सोडायचा नाही . समोर नाव दिसते आहे . ती नाव मी इकडे आणतो आणि त्यात सामान ठेवून पलीकडे जातो . मी झोळी उतरवली . अंगावरील सर्व वस्त्रे उतरवली . आणि केवळ लंगोटी वर त्या अज्ञात नदीमध्ये उडी मारली . अर्थात तिला नमस्कार केला आणि मग उडी मारली . सोबत दंड घेतला . बुडत्याला काडीचा आधार ! मला लहानपणी असे वाटायचे की केवळ एक छोटीशी काडी बुडणाऱ्या माणसाला कसे काय वाचवू शकेल ? परंतु नंतर असे लक्षात आले की विदर्भामध्ये काठीला काडी म्हणतात . त्यामुळे बुडत्याला काठीचा आधार अशी देखील ती म्हण असू शकते ! आणि काठीचा आधार वेळोवेळी नक्कीच मिळतो हा माझा अनुभव आहे ! त्यामुळे बुडत्याला दंडाचा आधार !या न्यायाने मी दंड सोबत नेला . नदी काही फार मोठी नव्हती . आणि वेगाने वाहणाऱ्या नद्यांमध्ये पोहायचा मला अनुभव आहे .सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये सरकारी घाट , माई घाट , विष्णू घाट , अमरधाम घाट ,नरसोबाची वाडी ,औदुंबर अशा अनेक ठिकाणी पोहलेलो आहे . आमच्या गावामध्ये देखील वारणेचे वेगवान पात्र आहे . तिथेही पोहण्याचा अनुभव आहे . कृष्णा , गोदावरी ,वारणा ,कोयना ,वेळवंडी ,निरा ,कानंदी ,गुंजवणी ,भीमा ,तापी , वैगै , मांडवी , कावेरी ,  काळनदी ,शिवथर ,सावित्री , उल्हास ,पवना ,इंद्रायणी , कुकडी , कुंडलिका , उरमोडी ,  तारळी , गंगा , यमुना अशा अनेक नद्यांमध्ये विविध प्रकारच्या भूगोलामध्ये पोहायचा अनुभव गाठीशी आहे .  त्यामुळे मी हे वेडे साहस केले याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी .जलतरण तलावामध्ये दिवसाला ४५ मिनिटांची बॅच पोहणाऱ्या लोकांनी कृपया हे साहस करू नये.अन्यथा ते दु:साहस ठरण्याची शक्यता जास्त आहे !क्षमा करावी परंतु हे लिखाण वाचून परिक्रमा करणारे काही परिक्रमा वासी मला यावर्षी भेटले . म्हणून हे आवर्जून सांगत आहे की कृपया नद्या पोहत पार करण्याचे धाडस करू नये . त्यासाठी वेगळ्या प्रकारचा अनुभव गाठीशी लागतो . आणि  कृपा तर निश्चितच लागते ! नद्यांमध्ये पोहण्याचा इतका अनुभव असून देखील मी कधीही नवीन ठिकाणी अचानक पोहायला डुंबायला किंवा उडी मारायला जात नाही . जाऊ ही नये ! नाहीतर काय होते ? ऐकायचं आहे का ? ऐका तर मग ! दंड घेऊन मी पोहत पोहत पलीकडच्या काठावर पोहोचलो .इथे तीन डोंगे होते . एक जुना पुराणा डोंगा अर्धा पाण्याबाहेर आणि अर्धा पाण्यात बुडलेला होता .अशा स्थितीमध्ये तो बराच काळ असावा. कारण बुडलेल्या भागाला शेवाळे लागले होते . दोन हिरव्या रंगाचे डोंगे मात्र तरंगत होते . मी काठावर बसून थोडासा दम घेतला . आणि यातील एक डोंगा घेऊन जायचा असे ठरवले .  इथे काठ म्हणजे उभा कडा होता . त्यामुळे बसण्यासाठी जागा जवळपास नव्हतीच . कसाबसा मी काठावर बसलेलो होतो . मी असे ठरवले की आता डोंग्यामध्ये बसावे आणि दंडाने वल्हवत पलीकडे जावे . म्हणून मी तो डोंगा  पाण्यामध्ये ढकलू लागलो . परंतु तो तिरका झाला आणि पाण्यात बुडू लागला . मी मोठ्या ताकतीने त्याला बाहेर खेचून काढले . परंतु त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी भरून गेले . ते काढण्यासाठी डोंगा तिरका करणे आवश्यक होते .परंतु तसे केले की आतले पाणी बाहेर जायच्या ऐवजी बाहेरचेच पाणी आत शिरायचे ! आता झाली का पंचायत ! बरं एरव्ही लहान दिसणारा तो डोंगा इतका जड असतो हे मला माहितीच नव्हते ! कसलं भयानक वजन ! शेवटी मी हाताने उडवत उडवत आतले पाणी कमी केले .परंतु इतक्यात तो डोंगा पलटी झाला .आणि पालथा पाण्यावर तरंगू लागला.त्याला सरळ करताना माझा घाम निघाला !मी कसा बसा तो डोंगा सरळ केला आणि शेवटी वैतागून निर्णय घेतला की दुसरा डोंगा घ्यावा. मी त्या दुसऱ्या हिरव्या डोंग्यामध्ये बसायला सुरुवात केली तर पुन्हा तो माझ्या वजनामुळे बुडू लागला !आता मात्र माझ्या लक्षात आले की या डोंग्याच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही . मला काहीतरी करून माझे सामान इकडे , या तीरावर कोरडे आणायचे होते बास ! तसाही मी भिजलेला होतोच ! त्यामुळे मी असा निर्णय घेतला की हा डोंगा पाण्यामध्ये ढकलत ढकलत पलीकडे न्यायचा ! मी डोंगा पाण्यामध्ये हळुवारपणे ढकलला आणि मी देखील पाण्यात उडी मारली . परंतु आतून स्वच्छ सुंदर असणारा हा डोंगा खालून पूर्णपणे शेवाळे आणि बुळबुळीत गोगलगायी शंख आणि तऱ्हतऱ्हेचे पाणकिडे यांनी भरलेला होता ! ढकलताना हाताला शेवाळे लागत होते . आणि त्याचा स्पर्श अतिशय किळसवाणा होता ! कुजलेले लाकूडच ते ! जीव जंतूंसाठी नंदनवनच ! तिथे त्या डोंग्याच्या तळाशी जणू काही एक स्वतंत्र जीवयंत्रणा / इकोसिस्टीम तयार झाली होती !नदीच्या पाण्याला गती होती आणि शिवाय वारा सुटला होता ! तो माझ्या दिशेला डोंग्याला पुन्हा उलटे ढकलायचा ! मला तीन चार बलांच्या विरुद्ध अखंड काम करावे लागत होते! पहिले म्हणजे मला खाली खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणापासून बचाव करण्यासाठी अखंड लाथा झाडत होतो . दुसरे बल नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्याचे होते त्याच्या विरोधात मला डोंगा ढकलून त्याच दिशेला न्यायचा होता . तिसरे बल या नदीचे होते . जी या डोंग्याला सतत नर्मदा मातेकडे ढकलत होती . आणि चौथा विरोध माझ्या स्वतःच्या मनाचा होता !ते सारखे मला सांगू पाहत होते . कशाला नाही ती भानगड ! चल रस्त्याने जाऊ ! त्याच्याही विरोधात मी अंतर्विरोधी मनोबल लावलेले होते ! हे सर्व करताना मी जरा जरी जोर लावला तर डोंगा पलटी व्हायचा .  त्यामुळे मला पलीकडे पोहत जायला जरी पाच च मिनिटे लागली तरी डोंगा इकडे आणायला मात्र मला चांगली पंधरा मिनिटे लागली ! दमलो ! आणि काठावरती जाऊन बसलो . बर काठावर प्रचंड गाळ होता . त्यामुळे पाय टाकता येत नव्हते . हाताने रांगत काठावर आलो ! डोंगा ओढून अर्धा काठावर ठेवला . सामान डोंग्यामध्ये भरलं . आणि ढकलत ढकलत पलीकडे न्यायला सुरुवात केली . पलीकडचा काठ आला .दमलो होतो . इकडचा काठ खोल होता . नावेतील सामान  बाहेर काढले . आता पुढे जायचे . परंतु माझ्या मनात विचार आला की डोंग्यामध्ये साठलेले पाणी आपण बाहेर काढले पाहिजे . आपण वापरण्यापूर्वी डोंगा ज्या स्थितीमध्ये होता त्या स्थितीमध्ये राहिला पाहिजे . शिवाय काल डोंग्यामध्ये कसं चढायचं याचा प्रशिक्षण मी घेतलेलं होतंच ! म्हणजे किमान मला तसं वाटलं तरी होतं . म्हणून मी त्या डोंग्यामध्ये चढायचा प्रयत्न केला . आणि मला काही कळायच्या आत तो डोंगा पलटी झाला ! बघता बघता तळाशी गेला ! नशिबाने त्याची दोरी खाली चालली होती ती मी पकडली . वरती एका दगडाला बांधून ठेवली . आणि मी एक मोठा श्वास घेत डोंगा वर काढण्यासाठी खाली नदीच्या तळाशी गेलो . हे डोंगे म्हणजे एखाद्या कुटुंबाचा आधार असतो ! एका डोंग्यावरच इथली अनेक माणसे मुलाबाळांची शिक्षणे , लग्ने व सर्व व्यवहार करतात . त्यामुळे ,आपल्या चुकीमुळे कोणाचे नुकसान नको असा शुद्ध भाव त्यामागे होता . मी पाण्याच्या तळाशी गेलो आणि डोंगा माझ्या हाताला लागला . मी साधारण दहा फूट खाली गेलो असेन . खाली जमीन लागली . म्हणजे असे मला वाटले होते . डोंगा नदीच्या प्रवाहामुळे आत आत वहात चालला होता . आणि नर्मदा मातेचा प्रवाह देखील इथे जोरात येऊन मिळत होता . त्यामुळे त्या दिशेला डोंगा वाहू पाहत होता . मी डोंगा खेचू लागलो परंतु तो काही  हाताला येईना . मी पुन्हा वर आलो . श्वास घेतला . आणि पुन्हा खाली डुबकी मारली .तेवढ्यात तो डोंगा अजून चार-पाच फूट पुढे वाहत गेला होता ! मी दोरी खेचू लागलो . परंतु डोंगा जड वाटू लागला . कारण तो आता मधल्या धारेच्या जवळ आला होता . पाण्याची धार नेहेमी मध्यभागी वेगात असते . कडेला हळू असते . तसेच पृष्ठभागावर जोरात असते . तळाशी हळू असते .याला भूगोलामध्ये helicoidal flow आणि laminar flow असे म्हणतात .

नदीच्या याच दोन वेगवेगळ्या गतींमुळे एका बाजूचा किनारा ती कापत जाते तर एका बाजूला वाळू साठवत जाते .

संगमावरील पाण्याची गती मोजण्याचे देखील गणितीय शास्त्र उपलब्ध आहे .परंतु या सर्वांचे सार एकच आहे की पाण्याची गती मध्यभागी जास्त असते आणि तळाशी कमी असते .

या चित्रामध्ये आपल्याला जो फिकट रंग दिसतो आहे तो कमी गतीचा प्रवाह आहे . गडद रंग म्हणजे अधिक गती आहे .नदी ही नेहमी अशीच वाहते . असो .

 इकडे माझ्या असे लक्षात आले की माझ्या पायात शेवाळे अडकले आहे . Turbulent flow नावाचा एक प्रकार काठावर तयार होत असतो . ज्यामुळे वाहून आलेले शेवाळे, मेलेली जनावरे किंवा कोळ्याची जाळी वगैरे संगमावर मिलनाच्या विरुद्ध दिशेला साठत असतात . त्यातलेच एक शेवाळे माझ्या पायात अडकले होते . ते मी बरीच खटपट करून काढून फेकून दिले आणि पुन्हा खाली डुबकी मारली . आता मात्र नाव वाचवली नाही तर ती कायमची नर्मदा मातेच्या पोटात सामावली असती . म्हणून मी ठरवलं की काही झाले तरी नाव वाचवायचीच .त्यामुळे मी पाण्याच्या खाली उभा राहून जोर लावू लागलो . हातातल्या दोरीने जोर लावून घेतल्याबरोबर नाव थोडी माझ्या जवळ आली . आता वर जाऊन दोरी खेचून नाव काढावी असा विचार करून मी खाली तळाला लाथ मारली जेणेकरून मी वर जाईन . तळ म्हणजे हा तळ नव्हता तर या काठाचा तिरका किनारा होता . आणि माझ्या लक्षात आलं की घात झाला आहे ! माझा पाय खाली वाहत आलेल्या एका कोळ्याच्या जाळ्यामध्ये सापडला होता ! मला वाटले एक दोन झटके मारले की पाय निघेल पण मी जितकी हालचाल करू लागलो तितका माझा पाय अधिकच फसू लागला ! बरं ते नुसते जाळे नव्हते . त्यात शेवाळे देखील होते . आपण वरती पाहिले त्याप्रमाणे टरब्यूलेंट फ्लो मुळे खराब झालेली जाळी अशा रितीने वाहत येतात आणि तळाशी कुठेतरी जाऊन बसतात . ती मासे पकडण्याच्या कामाची नसतात . परंतु त्यांची ताकद काही कमी झालेली नसते . माझा पाय अधिक अधिक गुंतत चालला आहे हे पाहिल्यावर मी चटकन निर्णय घेतला . की नाव सोडून द्यायची आणि जीव वाचवायचा ! मी शांतपणे खाली बसलो आणि पायातले जाळे सोडवू लागलो . माझा श्वास हळूहळू कमी पडू लागला . मला असे वाटले की आता एक क्षण असा येईल की आपण मरणार ! साक्षात नर्मदा मातेच्या उदरामध्ये मृत्यू येण्यासारखे भाग्य ते कुठले ! असा विचार करून मी हसू लागलो ! बरेचदा पाण्याखाली कानांवर अतिरिक्त दबाव आला की मनुष्य वेड्यासारखा हसू लागतो . याचे कारण मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागतो . त्यातून शरीर ही प्रतिक्रिया देते . याला वैद्यकीय भाषेमध्ये inappropriate laughter as a symptom of cerebral hypoxia or narcosis असं म्हणतात . मी स्कुबा डाईविंग शिकलो होतो त्याच्यामध्ये हे शिकवतात .  इकडे मी जेवढी अधिक धडपड करेन तेवढा माझा पाय अधिकाधिक फसत चालला होता . अखेरीस मी विचार केला की आता शेवटचा उपाय म्हणून एखादा झटका मारू ! नाहीतर इथेच परिक्रमेचा अंत करू ! मी मनापासून आणि मनातल्या मनात नर्मदे हरचा पुकारा केला ! माझ्या असे लक्षात आले की पायातील मोजे काढतात त्याप्रमाणे आपण जाळे काढू शकतो . परंतु त्यासाठी जोर लावायला माझ्याजवळ काहीच नव्हते . इतक्यात माझ्या उजव्या हाताला एक मोठा चार इंची बांबू लागला . तो कुणीतरी जमिनीमध्ये ठोकलेला होता . बहुतेक नाव बांधण्यासाठी नावाडी ठोकतात तसा तो बांबू होता . तो भक्कम बांबू हाताला लागल्यावर मला एकदम उभारी आली ! मी पटकन डाव्या पायातली जाळी सोडवली . बांबूच्या साह्याने उभा राहिलो आणि डाव्या पायानेच उजव्या पायाची जाळी सोडवली ! आपण एका पायाने दुसरा पायाचा मोजा काढतो तसे ! माझा श्वास संपल्यामुळे मी वर जाऊ शकत नव्हतो . जमिनीला लाथ मारून वर जाण्या एवढी शक्ती पण नव्हती . हा सगळा खेळ नदीच्या पातळीच्या दहा ते बारा फूट खाली चालू होता . बांबू मुळे मात्र हाताने धरत धरत मी वरती आलो . नशिबाने हे सगळे करताना नावेची दोरी मी पुन्हा पकडली होती . बांबू पाण्याच्या खाली चार फुटावर संपत होता . परंतु चार इंचाचा असल्यामुळे त्याच्यावर उभे राहता येईल अशी जागा होती . मी सगळी शक्ती पणाला लावून पाण्याच्या बाहेर माझे डोके काढले .एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या बांबू वर उभा राहिलो . आता मात्र माझ्या पायाखाली भक्कम आधार होता . तिथे उभे राहून मी नाव खेचायला सुरुवात केली . आश्चर्य म्हणजे अगदी खेळण्यातल्या नावे सारखी ती नाव खेचली गेली ! इतका वेळ ती प्रवाहाच्या मध्ये असावी . आता तळाशी गेल्यामुळे तिची गती कमी झाली असावी . 

काठावर बसल्या बसल्या मी या प्रकाराचे रेखाचित्र काढून ठेवले . कारण मापे ताजी ताजी डोक्यामध्ये होती ! या चित्रामध्ये आपल्याला डावीकडे किनारा आहे त्यावर बसलेला प्रस्तुत लेखक दिसेल . मागे झोळी आहे . समोर डोंगे आहेत . बांबू खाली कुठे व किती खोल होता हे देखील एका बाणाने दाखवले आहे .  दोन्ही तटावर शेवाळे वाढलेले दिसत आहे . हे चांगले चार चार पाच पाच फूट लांबीचे शेवाळे होते . आणि मजबूत असते . नदीच्या तळाशी साचलेला गाळ दिसतो आहे . हा फार धोकादायक असतो . एकंदरीत आता तुम्हाला पाण्याखाली काय घडले असेल ते लक्षात येईल !

पाण्याखाली नक्की काय झाले असेल त्याचा अंदाज यावा म्हणून काढलेले कच्चे रेखाचित्र . डावीकडे वाहून चाललेला डोंगा दिसतो आहे . खाली गाळ आहे . लेखकाच्या पायामध्ये जाळे अडकले आहे . बांबू चा आधार सापडलेला आहे . वरती मी वाळत घातलेला डोंगा दिसतो आहे . बांबू वर मी उभा कसा राहिलो ते देखील दाखवले आहे . एकंदरीत सर्व असे होते ! 

मग मी बांबू वरून परत एकदा पाण्यात उतरलो . काठावर चढलो . दोरीने नाव ओढून बाहेर काढली . तिला उभी करून ठेवली . आणि काठावरती धापा टाकत पाच-दहा मिनिटे पडून राहिलो . लंगोटी वरच होतो ! नशिबाने माझी मैया आणि सामान कोरडे राहिले . ते सर्व मी भरले .कपडे घातले . आणि तो चढ चढून सपाटीवर आलो . एक शेत होते . शेताच्या शेवटी एक बोराचे झाड होते त्याच्या खाली एक माणूस निवांत बसला होता . त्याच्याकडे त्वरेने गेलो . आणि त्याला झालेला प्रसंग सांगितला . तो म्हणाला , " कमाल आहे बाबाजी ! मला आवाज द्यायचा ना ! दोन तास झाले मी इथेच बसलो आहे ! आपल्याच नावा आहेत त्या ! मी तुम्हाला सोडले असते ! " मी कपाळावर हात मारून घेतला . मग मी त्याला त्याचा डोंगा मी कसा वाचवला ते सांगितले ! यावर तो जे बोलला ते ऐकून तर मला जणु पुन्हा नदीत जाऊन उडी मारण्याची इच्छा झाली ! तो म्हणाला ते दोन्ही डोंगे कामातून गेलेले आहेत . त्यामुळे वाहून गेला असता एखादा तरी काही फरक पडला नसता ! मी आपले आठवण म्हणून ठेवले आहेत ! ही पहा माझी नाव असे म्हणून त्याने नर्मदा मातेमध्ये लावलेली त्याची नवी नाव दाखवली ! 
मला काय बोलावे हेच कळेना ! मी हसू लागलो ! मैय्या देखील हसू लागली ! परिक्रमेचे इतके दिवस झाले तरीदेखील मी समोरच्या ताटावरून मैयाला हाक मारली नव्हती ! त्यामुळे माझी अशी अवस्था झाली होती ! मी एकदा जरी नर्मदे हर चा पुकारा केला असता तर नक्की या माणसाने मला नावेने सोडले असते ! अशी आहे नर्मदा माई ! ती पावते ! पण जो मनापासून आठवण करेल त्यालाच पावते ! बाकीच्यांना बुडवणे हा तर तिचा निसर्गदत्त धर्मच आहे ! नव्हे नव्हे अधिकार आहे !हे ज्याला कळले तोच तरला ! ज्याला नाही कळाले त्याचा डोंगा बुडाला !नर्मदे हर !





लेखांक समाप्त (क्रमशः )

ता क : आपले एक वाचक परिक्रमा वासी विजय राव ढाणे सातारा नुकतेच याच ठिकाणी जाऊन आले .आता घेरा नदीवर तात्पुरता पूल झाला आहे असे त्यांनी कळवले ! त्याचे नकाशा चित्र देखील पाठवले आहे !संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी !नर्मदे हर !



टिप्पण्या

  1. माईची केवढी ही कृपा 🙏
    नर्मदे हर 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. बाप रे ! अक्षरक्ष: श्वास रोखून वाचलं गेलं हे सर्व... नर्मदे हर !!!

    उत्तर द्याहटवा
  3. कमाल आहे तुमची धन्य आहे तुमची धन्य ती मैया नर्मदे हर

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !