लेखांक १६६ : कुंडीचा बाबा केवट व कृष्णकुमार अन् आता जलमग्न होणारी छोटी धुवांधार
बरमान घाटावर भल्या पहाटे पुन्हा एकदा स्नान केले . नर्मदा मातेची पवित्रता पुन्हा एकवार अनुभवली . परिक्रमे मध्ये बऱ्याच आश्रमांमध्ये स्नानाची सोय असते . परंतु शक्य असेल तिथे नर्मदा मातेमध्येच स्नान करावे . कारण नळाला जरी नर्मदा मातेचे जल येत असले तरी तिच्या कुशीत जाऊन स्नान करण्याचा आनंदच वेगळा आहे . भांडारी साधूने भल्या पहाटे माझ्यासाठी चहा बनवला . तो घेतला आणि पुन्हा एकदा किनारा पकडला . या भागातून कोणीही किनाऱ्याने जात नाही . परंतु मला त्याच्याशी काही देणे घेणेच नव्हते . मी आलो होतो नर्मदा मातेच्या दर्शनासाठी . तिला न पाहता परिक्रमाच मला मंजूर नव्हती . काठाकाठाने चालत सप्तधारेच्या अगदी आतील दगडातून विलक्षण धोकादायक पद्धतीने चाललो . पुन्हा तिथून चालू शकेन का नाही माहिती नाही . परंतु त्यावेळेस माई शक्ती द्यायची . आणि आतून प्रेरणा द्यायची की जा बाळा ! मी आहे ! काही होणार नाही ! आणि चुकून पाय बीय सटकला तर अलगद झेलायला ती खरोखरच खाली वाहत होती !हा मार्ग धोकादायक होता खरा परंतु त्यामुळे मला नर्मदा मातेच्या एका अनोख्या व अद्भुत रूपाचे दर्शन झाले ! इथे कठीण पाषाणाच्या केवळ बारा-पंधरा फुटातून अवघी नर्मदा माई झेपावते ! काळजाचा थरकाप उडवणारे दृश्य आहे ! प्रचंड आवाज करत झेपावणारे रेवाजल पाहून पाय थरथर कापू लागतात ! काही क्षणापूर्वी शांत धीरोदात्तपणे वाहणारी हीच का नर्मदा मैया असा प्रश्न पडतो ! इथे अति प्रचंड रांजणखळगे आहेत ! मोठे म्हणजे किती मोठे ? एखादी कार त्याच्यामध्ये गरागरा गोल फिरेल इतके मोठे ! या भागातील प्रस्तर पूर्णपणे तिरका झालेला आहे ! साधारण ३०⁰ (अंशाचे ) खडक आपल्याला सगळीकडे दिसतात .इथे काहीतरी मोठी भौगोलिक उलथापालथ झाल्यामुळे हा परिसर असा झालेला आहे हे लगेच लक्षात येते . हा खडक दगडाच्या प्रस्तारांपासून तयार झालेला असल्यामुळे इथे शिवलिंगे कमी आणि गुळगुळीत चिपा किंवा आयताकृती खडक जास्त सापडतात . परंतु संपूर्ण नर्मदा मातेच्या पात्रामध्ये रांजणखळगे इथेच काय ते शिल्लक राहिले आहेत . इथल्या दगडांमध्ये धातूचे प्रमाण अधिक आहे . त्यामुळे जेव्हा रांजणखळग्यामध्ये पडून शिवलिंगाचा आकार किंवा गुळगुळीतपणा दगडाला येतो तेव्हा त्यात चमकणारे कण दिसतात . परंतु या चकाकणाऱ्या दगडांना जवळच असलेल्या सूर्यकुंडातील दूषित पाणी काळीमा आणते . सूर्यकुंडातले साठलेले पाणी अतिशय दूषित झालेले आहे हे आपण मागच्या वेळी पाहिले . ते हिरवेगार पाणी या प्रवाहामध्ये मिसळते . आणि त्यामुळे पाणी थोडेसे फेसाळ होते . इथले दोन प्रसिद्ध पूल खालून पार केले आणि पुढे मार्गस्थ झालो . हे पुल खरोखरच बघण्यासारखे आहेत .
हे बेट कासवाच्या आकाराचे आहे . त्यानंतर मात्र नेहमीप्रमाणे सुंदर वाळू आणि उभे कडे यांचा किनारा लागतो .
इथून पुढे धर्मपुरी अथवा धरमपुरी , बीर कटंगी (पुन्हा एकाच नावाचे दुसरे गाव ) , बिकौर , सगुन घाट पार करत कुडी अथवा कुंडीच्या पथरकुचा गावाच्या जवळ आलो . इथे बीर कटंगी गावामध्ये मधोमध कालिकामातेचे मंदिर होते . अखंड चालल्यामुळे थकलो . एका भव्य झाडाच्या सावलीमध्ये फुटाणे खात बसलो . दुर्वादास वाले बाबाजींच्या आश्रमामध्ये बंसीदास महाराजांनी मला हे फुटाणे दिले होते . समोर सदाशिव नित्यानंद गिरी महाराजांचा आश्रम होता . आश्रमामध्ये काय काय कामे सुरू करायची आहेत हे महाराजांनी मला त्यावेळी दाखवले होते ती कामे आता सुरू झालेली दिसत होती !आश्रमाच्या वरील मजल्यावर तीन खोल्यांचे स्लॅब टाकून झाले होते आणि काम जोरात सुरू होते . इथे एका कृष्णकुमार साहू साहू नावाच्या इसमाने माझ्याजवळ येऊन आस्थेने विचारपूस केली आणि विनंती करून मला त्याच्या घरी नेले . हे कुंडी गावाच्या आधीचे पथर कुरा नावाचे गाव होते . गेल्या वेळेस दक्षिण तटावर मी श्री नर्मदा जयंतीच्या दिवशी इथे होतो . त्यावेळेस लोकांनी वाहिलेले नारळ गोळा करणारा एक केवट ओळखीचा झाला होता . तो मला तेव्हाच म्हणाला होता की समोरच्या तटावर तुम्ही आलात की आपली भेट होईल ! फक्त किनारा सोडू नका . आणि तसेच झाले !रामकिशन केवट नावाचा हा मनुष्य मला इथे त्याचवेळी भेटला ! दोघांनाही खूप आनंद झाला ! याचे टोपण नाव बाबा होते . याच्या एका भावाचे सगुण घाटावर दुकान होते तर एकाच एक कुंडी गावामध्ये दुकान होते . हा स्वतः शेती करायचा व बर्मानला राहायचा . परंतु जातीचा केवट असल्यामुळे नाव मात्र आजही आवर्जून चालवायचा .
साहू ने आग्रहाने घरी नेऊन मला गुळ , बाठी आणि पन्हे खाऊ घातले .दुपारी त्याचे वडील आणि अन्य ग्रामस्थ यांच्याशी गप्पा मारल्या .केवट देखील माझ्यासोबत होताच . रामकिशन केवट उर्फ बाबा ने शेतामध्ये सत्यनारायण ठेवला होता . मोची समाजाचे सुमारे २०० लोक सागर वरून या कथे करता आलेले होते .तिथे मला रामकिशन घेऊन गेला .परतीच्या वाटेवरच हा कार्यक्रम चाललेला होता त्यामुळे मी नकार दिला नाही .इथे एक गंमत पाहायला मिळाली .बरेच लोक जमलेले होते.आश्चर्य म्हणजे सर्वच स्त्रियांचे डोळे घारे होते !लहान मुली देखील घाऱ्या डोळ्यांच्या होत्या ! पुरुष मात्र बहुतांश काळ्या डोळ्यांचे होते .
या लोकांनी इतकी मुले आणली होती की विचारू नका ! मुलांनी नुसता गोंधळ माजवला होता ! एका मोठ्या शेतामध्ये प्रचंड वृक्षाच्या सावलीमध्ये सगळे लोक बसलेले होते . मी अक्षरशः मोजून पाहिली , त्या गर्दीमध्ये २५ तान्ही बाळे होती ! एक प्रकारे मनाला खूप समाधान वाटले !एकीकडे शहरातील सुशिक्षित लोक ठरवून लोकसंख्या कमी करत असताना असे काही ठराविक समाज आहेत की ज्यांनी लोकसंख्यावाढीचा बागुलबुवा आपल्या डोक्यात घालून घेतलेला नाही ! लोकसंख्या वाढीला आमचा विरोधच आहे ! संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढ ही कधीही श्रेष्ठ हे देखील मान्य आहे !परंतु दुर्दैवाने लोकशाहीमध्ये लोकसंख्येलाच महत्त्व आहे ! ज्या दिवशी या देशात गुणात्मक लोकशाही येईल त्यादिवशी "हम दो हमारा एक " धोरणाचा मी सर्वप्रथम पुरस्कर्ता असेन ! तोपर्यंत चालू द्या चालू आहे तसे ! मी तिथे गेल्याबरोबर सर्वचजण माझ्या पाया पडू लागले . सुरुवातीला या प्रकाराचा संकोच वाटायचा .परंतु नंतर जेव्हा लक्षात आले की हा नमस्कार नर्मदा मातेला असतो तेव्हा त्यातला अहंभाव निघून गेला . परंतु यांची पायावर तीन वेळा डोके आपटून नमस्कार करायची पद्धत थोडीशी त्रासदायक वाटली ! प्रत्येक जण सांगायचा की आमच्या डोक्यावर हा ठेवून आशीर्वाद द्या ! हा एक नवीनच प्रकार ! मग मी वाटेमध्ये भेटणाऱ्या कुमारिकांच्या पाया पडल्यावर त्या जो आशीर्वाद द्यायच्या तोच द्यायला सुरुवात केली ! खुश रहो ! सुखी रहो । निरोगी रहो । फलो फुलो । नर्मदे हर ! शेवटचे पालुपद महत्त्वाचे होते . मी फक्त पोस्ट बॉक्स होतो . नमस्कार घेणारी शेजारी वाहत होती ! तिच्यापर्यंत तो पोहोचवणे आवश्यक होते ! लोक पाया पडले की हातावर दक्षिणा टेकवत . दोनशे तीनशे रुपये दक्षिणा जमली असावी . मी लगेचच तिथे खेळणाऱ्या सर्व मुलींना ओळीने खाली बसवले . आणि एकेकीच्या पाया पडून त्यांना ती दक्षिणा वाटून टाकली .या लोकांनी मला सरबत पाजले . कलिंगड खायला दिले . मग थोड्यावेळाने सत्यनारायणाची कथा सुरू झाली . यातले तीन अध्याय पूर्ण ऐकले . आणि मग सर्वांची रजा घेतली . ही कथाच मुळात नर्मदा पुराणात आलेली आहे !
याच झाडाखाली सर्व मंडळी बसलेली होती . मुले परिसरात सर्वत्र मुक्त संचार करीत धांगडधिंगा करत होती .
इथून पुढे एका वळणावर मैय्या अचानक आपले रूप बदलते . त्या ठिकाणी मैय्या अतिशय शांत परंतु गतिमान वाहते . पुढे मात्र अचानक उजवीकडे वळते . म्हणजे उजवीकडून आपल्याकडे येते ! आता मैया आपल्या समोरून मागे वाहत आहे लक्षात ठेवावे ! आपण उत्तर तटावर आहोत .कुडी किंवा कुंडी गावातील शेती इथे संपते . आणि अचानक खडकाळ भूभाग चालू होतो . इथे मला मैयाच्या अगदी काठावर मल्खान सिंग नावाचा एक माणूस भेटला .हा गेली ५८ वर्षे एक छंद बाळगून बसलेला आहे . हा दुसरे तिसरे काहीही करत नाही . शेतातली कामे झाली की नर्मदा मातेच्या काठावर येऊन बसतो .आणि येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडतो . आणि त्यातून त्यांची परीक्षा करतो ! लाखो परिक्रमावासी पाहिल्यामुळे त्याला आता काही उत्तरांमध्येच समोरचा परिक्रमावासी कच्चा आहे का पक्का आहे याचा अंदाज येतो !त्याने मला देखील एका दगडावर बसवले आणि प्रश्नांची माझ्यावर सरबत्ती केली .त्याचे प्रश्न कमालीचे उलटे पालटे होते . परंतु मी शांतपणे सगळ्या प्रश्नांची मला जी योग्य वाटली ती उत्तरे दिली . त्याला काय वाटते आहे याचा विचार केला नाही . माणूस चलाख होता . काही अप्रिय प्रश्न देखील त्यांने विचारले . त्या सर्वांची मी यथामती उत्तरे दिली . मला धर्मराजाच्या यक्ष प्रकरणाची आठवण त्यावेळी झाली ! अगदी प्रकर्षाने झाली ! सगळी चर्चा झाल्यावर यक्ष प्रकरण संपले आणि त्याने मला सांगितले की तो मुद्दामहून उलटे पालटे प्रश्न विचारत होता . त्यातून समोरच्या परिक्रमावासीची परीक्षा तो करायचा . मी त्याला विचारले , मग काय निकाल लागला तुझ्या परीक्षेचा ? तो म्हणाला की तू क्रमांक एकचा परिक्रमावासी आहेस ! हे ऐकल्याबरोबर मी मोठमोठ्याने हसायला लागलो ! आणि त्याला म्हणालो , "अरे बाबा मी शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी आहे . ना पूजा अर्चा , ना स्नान संध्या , ना जपजाप्य , ना गंधमाळा ! उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस ! परिक्रमा अजून पूर्ण झालेली नाही ! त्याच्या आधीच नर्मदामाता माझी अजून एक परीक्षा तुझ्या रूपाने घेते आहे ! असे नका रे करू . " हे बोलताना माझ्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या . कारण परिक्रमा आता लवकरच आरंभबिंदूपाशी पोहोचणार ही जाणीव मनाला डाचत होती . मल्खान सिंहने त्याचा क्रमांक मला दिला .आणि परत या भागात आल्यावर नक्की भेटण्याचे आमंत्रण दिले . या भागामध्ये हळूहळू राखाडी रंगाचे खडक सुरू झाले . तांडूर किंवा कोटा फरशी ज्या रंगाची असते त्या रंगाचे हे खडक होते . काठाने चालताना हळूहळू एक , नंतर दोन असे करता करता दहा-पंधरा मृत गोवंशाची मुंडकी आणि सांगाडे मला आढळले . दिंडोरी पासून जागोजागी मैया मध्ये फेकलेली जनावरे इथे मोठे वळण असल्यामुळे काठाला लागायची आणि खडकच खडक असल्यामुळे एका कोपऱ्यामध्ये येऊन थांबायची . तरस कोल्हे कुत्रे ही जनावरे बाहेर ओढून आणायचे आणि त्यांचा फडशा पाडायचे .त्यांच्यामुळे हाडे इकडे तिकडे विखुरली जायची . हे दृश्य फारच भयानक होते . पावला पावलाला हाडे पडलेली होती . समोर पिपरहा किंवा पिपरिया नावाचे गाव होते . या भागापासून मात्र पुन्हा शिवलिंगे सापडायला सुरुवात झाली . कारण इथून जवळच छोटी धुवांधार नावाचा मोठा जलप्रपात होता !याच्या तीन मोठमोठ्या धारा होत्या .त्यात अनेक रांजणखळगे होते जिथे ही शिवलिंगे तयार व्हायची .परंतु त्याच्या अलीकडे असलेल्या या राखाडी खडकां पाशी मैया एकदम चार ते पाच फूट खाली येत प्रचंड आवाज करत वाहत होती . जणू काही मोठा डोंगर उतरत होती . इथून थोडे पुढे चालत गेले की ५०० - ६०० मीटर चे भव्य स्थिर कुंड बनलेले आहे .मी या कुंडामध्ये स्नान केले खरे परंतु या कुंडाची एक शोकांतिका आहे . मोठ्या खळखळाटातून वाहत आलेली मैया इथे काही काळासाठी शांत होत असल्यामुळे आणि पुढे पुन्हा खळखळाट असल्यामुळे या कुंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मासे थांबतात . आणि त्याचा गैरफायदा स्थानिक लोक घेतात . गळा ने किंवा जाळी टाकून मासे न मारता पाण्यामध्ये बॉम्ब फोडून मासे मारण्याची नवीन पद्धत या लोकांनी शोधून काढली आहे . पाण्यामध्ये स्फोटाकाचा प्रचंड मोठा स्फोट केला जातो . या स्फोटाचा हादरा इतका भयानक असतो की दहा-बारा किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज जातो . आणि जिथे स्फोटक फोडलेले आहे तिथे तर कित्येक फूट उंचीचा पाण्याचा मोठा लोट हवेमध्ये उडतो . आणि एक त्सुनामी तयार होते . वर उडलेले पाणी खाली पडेपर्यंत हजारो मृत मासे पाण्यावर तरंगू लागतात . हे मासे पटापट गोळा केले जातात . मासे धरण्याची ही अतिशय विकृत अनैसर्गिक आणि बेकायदेशीर पद्धत आहे . परंतु सर्रासपणे चोरून असे मासे पकडले जातात . यातील सर्वच मासे काही यांच्या हाताला लागत नाहीत . जेवढे सापडले तेवढे मासे घेऊन चोर पळून जातात . आणि उरलेले मृत मासे याच कुंडामध्ये सडून जातात .आणि कुंडाचे पाणी प्रदूषित करतात . त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये एक अतिशय घाणेरडा वास साठून राहिलेला होता . या भागातून नाकाला डोक्यावरचे फडके बांधून कसा बसा पार झालो . इतका कुबट घाणेरडा वास इथे साठला होता .
विशेषतः प्रचंड वेगाने आवाज करत फेसाळत येणारे नर्मदा जल अचानक उंची कमी करायचे ते पाहून डोळे गरगरायचे !
चालत शांत कुंड पार केले आणि आता मला समोरच छोटी धुंवाधार धबधबा दिसू लागला . इथून पक्ष्यांना देखील काठाने उडत जाता येणे अवघड आहे इतका कठीण प्रदेश आहे ! त्यामुळे चालत जायच्या भानगडीत न पडता अगदी धबधब्याच्या मुखाशी जाऊन वरील चित्रात दिसते आहे तेच दर्शन घेतले आणि शांतपणे शेजारी असलेल्या डोंगरावर चढलो . पुढे काय आहे नाही काहीही माहिती नव्हते . मी फक्त चालत होतो . इथे भर जंगलामध्ये एक छोटासा आश्रम होता .एक तरुण परंतु थोडासा तापट आणि अबोल माणूसघाणा संन्यासी अतिशय तत्परतेने हा आश्रम चालवीत होता . सेवेमध्ये काही कसूर नव्हती . फक्त परिक्रमावासींशी हा अजिबात बोलत नसे .मी त्याला बरेच प्रश्न विचारले .याने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही .त्यामुळे माझे असे मत झाले . अर्थात हे माझे प्रथमदर्शनी (त्याला पहिल्यांदा पहिल्यावर झालेले ) मत होते . पुढे ते कसे बदलले आपल्याला कळेलच . या आश्रमामध्ये एक खूपच भव्य नैसर्गिक शिवलिंग स्थापित केलेले होते . खुल्या आकाशाखाली एका कट्ट्यावर होते .जबरदस्त होते . विशेषतः नैसर्गिक शिवलिंगे फार मोठ्या आकाराची मिळत नाहीत . त्याचा आकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे असे मला सांगण्यात आले . आणि हे शक्य आहे . अशी अजूनही काही शिवलिंगे नर्मदा खंडामध्ये आहेत . इथे अजूनही काही शिवलिंगे ठेवलेली होती . यातील बकावांमध्ये बनवलेले एक शिवलिंग खूप छान होते त्याच्यावर सुंदर असा तिसऱ्या नेत्राचा किंवा सूर्यमालेचा आकार उठलेला होता . मी त्याचे चित्र देखील वहीत काढून घेतले .इथे सोलापूरचे एक निवृत्त कामगार नेते चातुर्मासासाठी थांबले होते . हाडाचे शिवसैनिक होते . अजून एक मूळ दादर चे परंतु बडोद्याला स्थायिक झालेले आर आर तथा रोहित रवींद्र प्रधान म्हणून गणित शिक्षक येथे थांबलेले होते . अतिशय हुशार आणि विद्वान मनुष्य होता . प्रचंड सात्विकता . बोलण्यामध्ये मार्दव आणि चेहऱ्यावर तेज होते . कोरोना पासून वाचण्यासाठी विविध समूहांवर नर्मदे हर या मंत्राचा ते जप करून घ्यायचे आणि तो रोज नर्मदा म यामध्ये अर्पित करायचे .भाषा अतिशय स्वच्छ शुद्ध होती . यांचा फोटो मला सापडला नाही परंतु यांचे स्वतःचे youtube चॅनल आहे त्याचा दुवा खालील प्रमाणे आहे .
https://youtube.com/@rohitpradhan1984
संध्याकाळी अंधार पडल्यावर अजून एक फक्कड साधू जो भ्रमंतीमध्ये होता तो भटकत भटकत आला आणि भल्या पहाटे निघूनही गेला ! साधूचे कामच असे असते ! कोणाला थांग लागू शकत नाही की आता याची पुढची कारवाई काय असणार आहे !
याच कुटीमध्ये आम्ही परिक्रमावासी राहिलो होतो . आणि इथे आमच्या रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरू होत्या . आश्रमामध्ये वीज नसल्यामुळे अंधारातच सर्व चालू होते .
समोरच ती कुटी दिसते आहे . आश्रमातील भव्य शिवलिंग उजव्या बाजूला कट्ट्यावर दिसते आहे . हे पूर्णपणे नैसर्गिक आहे . यंत्रावर बनवलेले नाही . ही सपाटी वगळता सर्वत्र घनदाट जंगल आहे . डोल डालला जाताना सावध राहावे लागते .सुरक्षेच्या दृष्टीने गळ्याभोवती कापड गुंडाळून मगच जावे . असो .
रात्री पालेभाजी आणि पोळी खाल्ली . आम्ही सर्वजण परिक्रमावासी चर्चा करत बराच वेळ जागलो . गेली पाच दशके हाडाचे शिवसैनिक राहिलेले ते काका तत्कालीन शिवसेना नेतृत्वाला खूप शिव्या घालत होते . हे मी वहीत लिहून ठेवले आहे म्हणून येथे नोंदलेले आहे .बाकी हे सांगण्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही याची कृपया नोंद घ्यावी .या मुद्द्यावर त्या काकांशी मी खूप गहन चर्चा केली . त्यांच्याकडून अनेक विस्मयकारक गोष्टी कळल्या .बरेचदा आपण छापील किंवा प्रकाशित बातम्यांवर विश्वास ठेवतो . अर्थात त्याशिवाय आपल्याकडे पर्याय देखील नसतो . परंतु प्रत्यक्षात तळागाळामध्ये परिस्थिती वेगळी असू शकते .नव्हे नव्हे असतेच !डाव्या लोकांनी आपल्या देशातील पत्रकारितेची पुरती वाट लावून टाकली आहे . अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर एका अतिशय कुलीन सालस निरागस हुशार व सुंदर मुलीला पळवून नेऊन त्यांनी देहविक्रय करायला बाजारात बसवले आहे .अशी काहीशी भारतीय पत्रकारितेची अवस्था डाव्यांनी करून टाकलेली आहे . शब्द कठोर आहेत परंतु अर्थ सुस्पष्ट आहे . ज्यांनी पैशासाठी आपला आत्मा विकला आहे अशा लोकांच्या हातात माध्यमे राहणे फारसे हिताचे नाही . असो . आमची रात्रीची चर्चा चांगलीच तप्त झाली . बडोद्याबद्दल मला कायम आत्मीयता राहिलेली आहे .माझे गुरु महाराज बडोद्याचे असल्यामुळे आणि दर गुरुपौर्णिमेला तिथे जाणे होत असल्यामुळे त्या शहराची एक वेगळे भावनिक नाते जुळलेले आहे . त्यामुळे प्रधान यांच्याशी पण त्याबद्दल भरपूर बोलणे झाले . सकाळी साधूने चहा हातात आणून दिला . आणि मी काल आश्रमात आल्यापासूनचे पहिले वाक्य तो माझ्याशी बोलला ! साधू म्हणाला , "तू आदमी बहुत अच्छा है ।इसलिये तुझे एक बात बताता हु । हमेशा याद रखना । कम बोलना । कल से देख रहा हू । बहुत बोलता है । " साधू ने जणू काही माझी दुखरी नसच दाबली ! तो सांगत होता त्यात तथ्य होते . मी एकटा असताना बोलण्याचा प्रश्नच नसायचा . परंतु काल आमची तीन मे खटपट अवश्य झाली होती ! आणि त्या भयाण जंगलाच्या शांततेमध्ये साधूला ते प्रकर्षाने जाणवले असणार . मी साधूला साष्टांग नमस्कार केला . आणि म्हणालो , "इसके आगे याद रखुंगा महाराज । यह गलती वापस नही होगी । " साधू मला सांगू लागला की काल तू आल्यावर माझ्याशी बोलायचा बराच प्रयत्न केलास .परंतु मी तुझ्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही . याचे कारण मी तुला माझ्या कृतीतून संदेश देत होतो की बोलू नकोस . परंतु तरीदेखील तू प्रश्न विचारत राहिलास . असे करू नये . परिक्रमेमध्ये जास्ती प्रश्न विचारू नयेत . पुढचा आश्रम कुठे आहे किती किलोमीटर आहे असे कुठलेही उत्तर मी तुला देऊ शकत नाही . कारण मैयाची इच्छा असेल तर ती एक किलोमीटर अंतर शंभर किलोमीटर सारखे कठीण करू शकते .आणि तिची मर्जी असेल तर शंभर किलोमीटर अंतर सुद्धा तू तासाभरात तोडशील ! अरे अंतरच मोजायचे तर मैया पासून तू किती दूर आहेस ते अंतर मोज ! ते अंतर कमीत कमी ठेवले म्हणजे झाले !
हेच ते तरुण संन्यासी महाराज ! या स्वामींचे नाव स्वामी निजानंदजी महाराज असे होते . कर्तव्य कठोर असूनही नावाप्रमाणेच हा संन्यासी निजानंदामध्ये निमग्न होता !
आपण परिक्रमेमध्ये काय काय प्रमाद करतो ते असे कठोर नैष्ठिक साधू संन्यासी आपल्याला लगेच समजावून सांगतात .आणि आपले पाय जमिनीवरच रहातील याची काळजी घेतात ! पहाटे लवकर उठून छोटी धुवांधार वर जाऊन धोकादायक पद्धतीने स्नान करून आलो होतो. डोक्यात सतत साधूचे शब्द घुमू लागले . मला साधू चे विचार मनोमन पटले . आणि त्यावर चिंतन करत मी चालायला सुरुवात केली . शेजारी खळाळत वाहणाऱ्या रेवा मातेचा प्रचंड रव होता . त्या आवाजामध्ये माझ्या वैखरीचेच काय मध्यमेचे पश्यंतीचे परेचे व मनाचे ही सर्व आवाज बंद झाले . ऐकू येईनासे झाले . जेव्हा तुमचा स्वतःचा आवाज थांबतो तेव्हा फक्त तिचा आवाज आसमंतामध्ये भरून उरतो . ती देखील महादेवांचा जप करत असते .खळाळणाऱ्या जळातून दिवस रात्र हुंकारत असते . हर हर नर्मदे ! नर्मदे हर हर !
वरील लेख दृकश्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
लेखांक एकशे सहासष्ठ समाप्त (क्रमशः)
नर्मदे हर 🙏
उत्तर द्याहटवा