लेखांक १६२ : वाळूमाफियांची दांडगाई आणि बोरासच्या साध्वी सुमित्रादास बाई

मांगरोल ,कोटपार महंत , अलीगंज , सिवनी , बरहाकलां , कुनिया / खुनिया बड, अशी गावे पार केल्यावर केतूधान गाव येते .मांगरोल चा आश्रम सोडल्यावर पुन्हा एकदा शेते , कुंपणे ओलांडत ओलांडत काठाने चालत राहिलो . इथे कुंपण पार करण्यासाठी विचित्र इंग्रजी वाय Y आकाराचे लाकूड लावले जाते . यातून रिकामा मनुष्य सहज जाऊ शकतो परंतु पाठीवर झोळी असलेला मनुष्य यातून पलीकडे जाऊ शकत नाही .गुरांनी शेतात घुसू नये म्हणून अशी योजना केलेली असते. मग अशा लाकडाला मी दोन्ही बाजूंनी हाताने धरायचो आणि थेट पलीकडे उडी मारायचो किंवा Y च्या मधल्या रेषेवर पाय ठेवून पलीकडे उडी मारायचो . त्याच्यामध्ये एक धोका असायचा . कधीतरी उडी मारताना पाय अडकला की तोंडावर आपटणे निश्चित असायचे ! एक दोन वेळा तसे झाले देखील ! परंतु परिक्रमा तुम्हाला पडण्यातला आनंद शिकवते ! आनंदाने पडता सुद्धा येते ! धडपडता येते ! गटांगळ्या खाता येतात ! आपटता येते ! घसरता येते ! बुडता येते ! एकदा आनंदच लुटायचा ठरवला आणि आनंद लुटायचाच हे ठरवले की तो कशातूनही लुटता येतो हेच नर्मदा परिक्रमात तुम्हाला शिकवते . एकंदरीत ही कुंपणे वेळ खाऊ असायची . पायाखाली मुगाच्या पिकाला घातलेल्या पाण्याचा प्रचंड चिखल होताच . फवारे / स्प्रिंकलर देखील सर्वत्र सुरू झालेले होते . इथल्या वीटभट्ट्या गोलाकार आकाराच्या होत्या . आपल्याकडे जश्या आयताकृती वीटभट्ट्या असतात तश्या इथे नव्हत्या. नावेने किंवा जाळे टाकून मासे धरणाऱ्यांपेक्षा आता हाताने मासे धरणारे लोक अधिक भेटू लागले होते . दिवसभर गळ टाकून बसणारे मच्छीमार खूप भेटायचे . आवर्जून नर्मदे हर करायचे ! प्रत्येक घाट कडक उन्हामुळे पोरा लेकरांनी गजबजलेला असायचा . मुले जाताना बाबाजी ची चेष्टा करायची ! समूहाची मानसिकताच वेगळी असते ! एकटे दुकटे मूल कधी असे करणार नाही .परंतु एकदा का झुंडीची मानसिकता आली की संपले ! मॉब मेंटॅलिटी हे एक गहन शास्त्र निश्चितपणे आहे !मध्ये अनेक गावे पार गेली . सिवनी नावाच्या गावाचा घाट ओलांडला . मी आता या नावाची किती गावे नर्मदा मातेच्या काठावर आहेत हे मोजणे बंद केले आहे !

सिवनी घाटावरून दिसणारे नर्मदा मातेचे मनोहर रूप

सिवनी घाटावर सुरू असलेली नर्मदा भक्तांची मोठी पूजा ! त्यांचा भाव खूप चांगला आहे परंतु दिव्यासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या वाट्या नर्मदा मातेचे प्रदूषण करतात हे यांना कोणीच महात्मा का सांगत नाही हे लक्षात येत नाही ! बुद्धी दे रघुनायका !

पुढे सांडीया गावाचा पूल पार केला .हा तोच पूल आहे ज्याच्याखाली मी मुक्काम केला होता ! आणि पुलाखाली जो आश्रम आहे त्याची एक छोटीशी शाखा या ताटावर देखील आहे हे सांगण्यात आल्यामुळे तो आश्रम मी शोधू लागलो . इथे तो आश्रम आणि अन्य दोन मंदिरे होती . परंतु सर्वच बंद होते . इथे पुलाला लागून काही लोकांची दुकाने होते . यामध्ये मला एक असा दुकानदार भेटला जो दहा वर्षे पुण्यामध्ये वाघोली येथे राहिलेला होता आणि त्याला पुण्याची चांगली माहिती होती . त्यामुळे मला भेटल्यावर त्याला आनंद झाला . या ठिकाणी एका व्यक्तीने मला चहा पाजला .समोरच्या आश्रमामध्ये सेवा करणारा जो अपंग सेवादार होता त्याची जमल्यास भेट घ्यावी अशी मला आशा होती. परंतु तो योग काही आला नाही . तो मुलगा किंवा इकडचा आश्रम पाहणारी तरुण साध्वी हे दोघेही तिथे उपस्थित नव्हते . 

सांडिया पूल आणि त्या खालचा घाट नेहमी लोकांनी , भाविकांनी गजबजलेला असतो .
पुण्याला राहून गेलेला हाच माँ नर्मदा किराणा वाला !
मागे दिसणाऱ्या राम मंदिरातील पाट्या खूप प्रसिद्ध आहेत .
अप्रतिम असे नर्मदेश्वर महादेव
अशा संतवाचनांनी भरलेल्या भिंती नर्मदा खंडात अनेक आश्रमामध्ये दिसतात
आश्रमातील कृष्ण यशोदेची मूर्ती खूप सुंदर आहे
माहितीपर पाट्या लावल्यामुळे भाविकांचे प्रबोधन होते


दुर्दैवाने हे मंदिर बंद होते परंतु त्याचे काही फोटो मुद्दाम टाकले कारण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे मंदिर अवश्य पहावे हा हेतू .

दुकानदार आणि चहा पाजणारा सद्गहस्थ यांचा निरोप घेऊन पुन्हा एकदा किनारा पकडला .या भागामध्ये भरपूर दगड गोटे मिळतात . चांगली शिवलिंगे भरपूर शोध घेतला तर सापडू शकतात . इथे वाळू भरण्यासाठी प्रति ट्रॉली दोन हजार रुपये दर चालू होता .वाळू भरणारे लोक दगड गोट्यांचे देखील ढिगारे लावून ठेवतात .बंगल्यांच्या बांधकामासाठी यांचा वापर केला जातो . आधुनिक प्रकारच्या बांधकामामध्ये वापर करणे किंवा ॲक्युबंक्चरच्या पायवाटा बनवणे किंवा भिंती बनवणे किंवा काहीतरी कलात्मक रचना बनवणे यासाठी हे दगड गोटे वापरले जातात .सुंदर शिवलिंगे पहात विविध रंगाचे तऱ्हेचे दगड पहात पुढे चालू लागलो . चिखल युक्त काठाने खडे कडे तुडवत सिवनी , खुनिया बड ,बरहा , बरहाकलां पार केले .मध्ये अनेक प्राणी दर्शन देत राहिले . अजूनही कोल्हे खूप दिसायचे . या भागातील गुरे परिक्रमा वासीला घाबरतात असे माझ्या लक्षात आले . कारण काठाने फारसे कोणी जातच नाही . त्यामुळे हा कुठला नवीन प्राणी आला असा भाव त्यांच्या
चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो ! विशेषतः म्हशी परिक्रमा वासींना फारच घाबरतात ! एरव्ही ढीम्म न हलणाऱ्या आळशी म्हशी आपल्याला पाहून अतिव चपळतेने पळून जाताना पाहायला मजा येते!सुमारे २७ किलोमीटर अंतर कापत केतोधान या गावामध्ये आलो . ही केतू या ग्रहाची तपोभूमी आहे . इथे एका स्थानिक बाबांचा आश्रम होता छोटासा होता व रेवा मंदिर होते . समोर भव्य दिव्य वाळूचा तट होता खूप साऱ्या गाड्या वाळू गोळा करीत होत्या . बरहा मध्ये चांगला आश्रम आहे . रहा रहा असे लोक सांगत असताना मी या केतोधान गावी आलो . 

बरहा गावातील घाट

स्नानासाठी मैय्या एक किलोमीटर दूर होती व घोटाभर पाणी सर्वत्र होते . स्नान करणे केवळ अशक्य होते . कसे बसे स्नान उरकले . बाबाजी म्हणाले सदाव्रत देतो .दमलो होतो ,परंतु हो म्हणालो . कारण पर्यायच नव्हता .बाबांनी मला चहा पाजला . कालवून ठेवलेल डाळ तांदूळ आणि दोन मिरच्या ! जाताना मला आश्रमाची व्यवस्थित काळजी घे असे सांगून बाबा गेले ! आश्रम म्हणजे नर्मदा मातेच्या वाळूवर उतरणारा उताराचा तीव्र रस्ता असतो त्याच्या एका बाजूला असलेले छोटेसे रेवा मंदिर होते . समोरच्या बाजूला मात्र अतिशय पुरातन आणि अप्रतिम असे गोपाळकृष्णाचे मंदिर होते . बाबांनी जाताना तीन मुले मागे ठेवली व हळूच यांच्यावर लक्ष ठेव असे मला सांगितले . मला वाटले हे आश्रमाचे सेवक असतील . परंतु नंतर माझ्या लक्षात आले की ही रात्रपाळीची वाळूमाफियांची गुंडांची टोळी होती . त्या तिघांशी खूप गप्पा मारल्या . त्यातून मला एकंदर वाळू व्यवसाय कसा चालतो त्याचा बऱ्यापैकी अंदाज आला . मुले गुंड होती परंतु प्रामाणिक होती . बरेचदा इंग्रजांनी केलेल्या कायद्यामध्ये न बसणाऱ्या माणसाला गुंड म्हणण्याची प्रवृत्ती आपल्याकडे प्रचलित आहे . थोडाफार कायद्याचा भाग बाजूला ठेवला तर बरेचदा एखादी व्यक्ती न्यायशास्त्रानुसार वागताना दिसत असते . परंतु इंडियन पिनल लॉ मध्ये बसत नसल्यामुळे आपण त्याला गुंड किंवा मवाली म्हणून जाहीर करतो ! इथे झालेले असे होते की वाळूचा ठेका हा सरकारतर्फे वाटला जायचा . त्याच्यामध्ये जो अधिक ची बोली लावेल त्याला ठेका मिळायचा . परंतु इथे गेली अनेक वर्षे पारंपारिक वाळू व्यावसायिक तयार झालेले होते . जे दशकांपासून वाळू उपसण्याचे काम करत होते . अशा लोकांना ठेके न मिळाल्यामुळे त्यांनी मग सरकारी ठेकेदारांकडून खंडणी वसूल करायला सुरुवात केली . त्यांचे दर ठरलेले होते . प्रत्येक गाडीमागे म्हणजे ट्रॉली मागे हजार रुपये द्यावे लागायचे . मोठा हायवा डंपर ट्रक असेल तर पंधरा हजार रुपये भरावे लागत . ते जर भरले नाहीत तर जीवावरचा खेळ असायचा . ही तरुण मुले काय वाटेल ते करून ती गाडी अडवायची . प्रसंगी गाड्या पेटवणे , टायर फोडणे किंवा चालकावर गोळीबार करणे यातील काहीही होऊ शकायचे . त्यामुळे वाळू भरणारे देखील नियमाने खंडणी भरून मगच पुढे जायचे ! या खंडणीतून जमलेल्या रकमेचे काही पैसे योग्य ठिकाणी पोहोचायचे त्यामुळे या लोकांना अभय होते .या मुलांना पंचवीस हजार रुपये पगार जेऊन खाऊन मिळायचे . बरेचदा अवैध हत्यारे या मुलांकडे असायची . मी सांगतो आहे हे चित्र संपूर्ण नर्मदा खंडातले आहे . सर्वत्र अशा प्रकारचे वाळूमाफिया आपल्याला पाहायला मिळतात . फक्त या ठिकाणी प्रथमच मला प्रत्यक्ष गुंड भेटले इतकेच . ही सर्व मुले गुंड असतीलही परंतु अतिशय मनापासून नर्मदा मातेची भक्ती करणारी होती असे मला त्यांच्याशी बोलल्यावर जाणवले .पवन ठाकूर (नाव बदलले आहे ) नावाच्या एका स्थानिक माणसासाठी हे लोक काम करत होते असे मला कळाले . मंदिराच्या बाहेर छोटासा कट्टा होता त्यावर मी आसन लावले होते . तिथेच ही मुले गप्पा मारत बसली होती . या ठिकाणी एखादी जरी गाडी खंडणी न देता गेली तर हे ताबडतोब त्याला शिट्टी मारून आवाज द्यायचे आणि थांबवायचे . हा संपूर्ण व्यवहार विश्वासावर चालणारा होता . कारण जमलेली सर्व रोख रक्कम ते माझ्यासमोर एका पिशवीमध्ये आणून ठेवत होते . त्यातील हजार पाचशे रुपये इकडे तिकडे गेले तर कोणालाही कळले नसते .परंतु ही मुले अतिशय प्रामाणिकपणे ते पैसे गोळा करताना मला दिसली . या मुलाकडे एक वही होती त्याच्यामध्ये तो गेलेल्या प्रत्येक गाडीची नोंद ठेवायचा . गाडी मालकाचे नाव , ट्रॅक्टरचे मॉडेल किंवा ट्रकचे मॉडेल , गाडी क्रमांक ,किती पैसे दिले व किती वाजता दिले हे सर्व तो व्यवस्थित नोंदवून ठेवायचा . त्याचे एक वाक्य मला फार विचार करायला प्रवृत्त करून गेले . मी त्याला म्हणालो की यातील थोडेफार पैसे तुम्ही तुमच्या कामासाठी वापरत नाही का ? लाखो रुपये जमतात . मला पाहायचे होते की या मुलांचे यावर काय उत्तर आहे .  तो मुलगा मला म्हणाला , " बाबाजी सौ पाचसौ हजार रुपये ले लिया तो किसी को पता नही चलेगा यह बात तो ठीक है । लेकिन नर्मदा मैया को तो पता चलेगा ना ! उससे पंगे कौन लेगा ! " काय दहशत आहे पहा आमच्या नर्मदा माईची ! २५ हजार रुपये पगारामध्ये ती मुले अतिशय खुश होती असे मला जाणवले . मला एका माणसाच्या खिचडी पुरते सामान देण्यात आले होते त्यामुळे मला या मुलांना जेऊ घालता आले नाही . परंतु उलट त्यांनीच रात्री कुठल्यातरी ढाब्यावर जाऊन मस्तपैकी पनीरची भाजी आणि तंदुरी रोटी आणल्या आणि मला देखील त्यांच्यासोबत जेवायला घेतले ! जेवण झाल्यावर मुलाने मला सांगितले की बाबाजी तुम्ही आता निर्धास्त झोपा . रात्री तुम्हाला कदाचित दंगा धोपा , गोळीबार वगैरे ऐकू येईल . परंतु घाबरायचं नाही . निवांत पडून राहायचे ! तुम्हाला काहीही होणार नाही ! मी आहे ना इथे ! 

आणि तसेच झाले ! मध्यरात्रीच्या सुमारास अजून एका स्थानिक गुंडाचे ट्रक वाळू घेऊन निघाले ! हा नेहमी खंडणी भरायला विरोध करायचा . त्याच्या चार-पाच गाड्या एकत्र निघाल्या व त्यातील एकाकडे हत्यार होते . मुले खंडणी मागू लागताच त्याने गोळीबार केला . इकडूनही त्याच्यावर गोळीबार झाला आणि त्या गाड्या अडवल्या गेल्या ! मी हे सगळे निर्विकार पणे पाहत पडून राहिलो ! भीतीहारी वर्मदे नर्मदे हर ! ! ! बाबाजी रात्री या आश्रमात का राहत नाही ते आता मला कळाले ! ही सर्व हत्यारे बेकायदेशीर पद्धतीने मध्य प्रदेशात सर्रास मिळतात . अर्थात त्यांचा फारसा काही उपयोग नसतो . गावठी कट्टा वगैरे नावाने ओळखले जाणारे हे हत्यार जुन्या जीपच्या स्टेरिंग रोड पासून बनवले जाते . त्याच्यामध्ये अचूकता कमी असते . गोळी समोरच्या निशाण्याला लागेलच याची खात्री नसते . बरेचदा हातामध्येच गोळ्या फुटल्याचे प्रकार देखील घडतात . ही सर्व माहिती मुलांनीच मला दिली ! परंतु हवेमध्ये गोळीबार करून दहशत निर्माण करण्यासाठी मात्र याचा निश्चितपणे वापर केला जातो . अशा अनेक बातम्या आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्या दिवशी मला ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले ! काही समूहाकडे मात्र विदेशी बनावटीची अचूक मारा असलेली शस्त्रे आजकाल मोठ्या प्रमाणात सापडतात ती कुठून येतात याचा मात्र कसन तपास झालाच पाहिजे .नक्षलवाद्यांकडे आणि भारताला मातृभूमी न मानणाऱ्या लोकांच्या हाती शस्त्र असणे देशहिताचे नाही . अशाच काही बातम्या आपण येथे पाहू शकता .




वाळू माफियांनी केलेल्या गोळीबाराच्या काही प्रातिनिधिक बातम्या.

या मुलांशी बोलताना अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली . सध्या वाळूचे ठेके कोणाकडे आहेत किंवा ठेके कोण देते आहे हे पाहण्यापेक्षा ही पद्धत कोणी चालू केली ते पाहणे फार महत्त्वाचे आहे . मुळात अशी पक्षपाती पद्धत सुरू करणारा मनुष्य इथे दोशी मानला पाहिजे . केवळ धन दांडग्या लोकांना सर्व परवाने द्यायचे आणि स्थानिक लोकांना डावलायचे हे राजकारण फार काळ टिकणारे नसते . स्थानिकांना प्रतिनिधित्व देऊन केलेले कार्य वाटप हे नेहमीच किफायतशीर ठरते . भारतातील अनेक ठिकाणी होणारा वर्ग संघर्ष पेटवण्यासाठी याच मुद्द्यांचा वापर काही चळवळी शिताफीने करतात आणि देश अस्थिर राहिल याची काळजी घेतात . यावर साकल्याने विचार करून कार्यवाही व्हावी अशी आशा आहे .
पहाटे लवकर उठून मी समोर असलेल्या गोपाळकृष्ण मंदिरात जाऊन आलो .मंदिर अतिशय प्राचीन आणि फार अप्रतिम आहे .याही ठिकाणी पुरातन मंदिराचे अवशेष होतेच . या पट्ट्यात सर्वत्र भव्य दिव्य पुरातन मंदिरांचे अवशेष अक्षरशः इतस्ततः विखुरलेले आढळतात . समोर फार मोठी व खोल विहीर होती फारच खोल होती . मंदिर अतिशय जागृत होते .या मंदिराचे कारागीर बांधकाम चालू असताना खाऊ पिऊ लागले . लोकांनी असे करू नका सुचवले होते परंतु त्यांनी ऐकले नाही तर ते एकेक करून ठार झाले अशी दंतकथा इथे ऐकायला मिळते .एक पंडित जी हे मंदिर सांभाळत असत इथे त्यांनी मला सुंदर असा चहा पाजला व मी पुढे निघालो . इथून काही क्षणातच खांड - दुधी - नर्मदा माता त्रिवेणी संगमाचे स्थान लागते .इथे मी मनसोक्त स्नान केले . 
हाच तो आश्रम जिथे मी मुक्काम केला होता .
आश्रमातून दिसणारे नर्मदा मातेच्या वाळूचे भव्य पात्र
या चित्रांमध्ये वाळू घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा रस्ता दिसत आहे तसेच मंदिराच्या बाहेर आम्ही झोपलो होतो तो व्हरांडा देखील दिसत आहे . या ठिकाणी गाडी लावून शांतपणे माणसे वर येत आणि पैसे जमा करून पुढे जातात . कारण जरा पुढे गेल्यावर चढ लागायचा तिथे गाडी थांबत नसे .
समोर असलेले पुरातन व सुंदर असे गोपाळकृष्णाचे मंदिर
मंदिराचे स्थापत्य अत्यंत सुंदर असून आवर्जून पाहण्यासारखे हे मंदिर आहे .
मंदिरातील गोपाळकृष्णांचा विग्रह .
हे मंदिर एका न्यासाद्वारे चालवले जाते
मंदिर अंतर्बाह्य सुंदर आहे
या नकाशामध्ये आपल्याला दोन्ही मंदिरे दिसतील तसेच नर्मदा मातेचे पात्र किती दूर आहे आणि उथळ आहे ते देखील कळेल .
खांड दुधी नर्मदा माता त्रिवेणी संगम
हे त्रिवेणी संगमाचे स्थान आहे .

समोर टाट वाले बाबाजी आश्रम होता . जिथे मागच्या वेळेस मला पंचकोशी यात्री भेटले होते . माघ वद्य सप्तमी (नर्मदा जयंती ) ते पुढील पाच दिवस अशी पंचकोशी यात्रा गेली १७ वर्षे झाली ,सुरू झालेली आहे . ती यात्रा देखील मी साधली होती आणि यज्ञ देखील पाहिला होता . इथे मला एक अद्भुत अनुभव आला . संगमावर एक नाव लावलेली होती .त्या नवे मध्ये एक तीन वर्षाची मुलगी बसलेली होती . तिने मला आवाज दिला आणि बोलावले . शक्यतो तीन वर्षाची एकटी मुले भित्री किंवा बुजरी असतात असा आपला अनुभव आहे . परंतु ही मुलगी एखाद्या मोठ्या महिलेप्रमाणे बिनधास्त होती . मला म्हणाली मेरे पैर छुए बिना आगे जायेगा क्या ? मी तत्काळ झोळी खाली ठेवली . नावेतच तिला साष्टांग नमस्कार घातला . आणि तिला विचारले की जर मी तिची पाद्यपूजा केली तर तिला चालणार आहे का ? चालेल म्हणाली ! मग मी ती नाव थोडीशी पाण्यामध्ये ढकलली आणि तिला पाय खाली सोडून बसायला सांगितले . नर्मदा जलानेच तिचे पाय धुतले ! हा किती मूर्खपणा आहे हे नंतर मला जाणवले !परंतु त्या क्षणी मला केवळ आनंदाचे भरते आलेले होते . मी अतिशय प्रेमाने तिची पाद्य पूजा केली . तिच्या पायावर डोके ठेवायला खाली नेले तर तिने माझ्या डोक्यावर पाय ठेवले ! अंगातून एक जबरदस्त लहर धावली . तिच्या पाया पडताना मी अर्धा नर्मदा मातेमध्ये बसलेला होतो . नंतर पुन्हा नाव मी काठावर लावली . आणि पुढे निघून गेलो . पुन्हा मागे वळून बघायची हिंमत मला झाली नाही . एक अतिशय कठीण कडा कापत मौनी बाई आश्रमात आलो .इथे एक पुजारी ,एक जाड जूड आजीबाई ,एक अग्निसाधना करणारा बाबा असे राहत होते . नेहरा का नैहरा असे काहीतरी त्या गावाचे नाव होते .छोटासा घाट बांधलेला होता . तळघरात भव्य शिवलिंग होते व वरती हनुमानजी होते .मध्ये मंडला / मांडीया गावे पार केली व राख गाव आले .वाळूच्या काठावर चार-पाच जण पाया पडले . गोंदियाचे होते .आमच्या गुरूंच्या दर्शनाला वर आश्रमामध्ये चला असे म्हणाले म्हणून त्यांच्या मागोमाग वर गेलो . पांढरे शुभ्र केस झालेले एक अतिशय चांगले बाबा तिथे बसलेले होते .यांचे नाव ओम नर्मदे हर बाबा आहे असे कळाले . टाटवाले बाबाजींचे ते शिष्य होते व यांनी इथली पंचकोशी परिक्रमा सुरू केलेली होती असे मला सांगण्यात आले . इथे खूप लोक दर्शनासाठी येत होते . सध्या खाटांच्या पट्ट्या धपाधप बडवून मैयामध्ये धुण्याचे काम सर्व लोक करत होते ते लोकही इथे दर्शनासाठी यायचे . वर्षातल्या ठराविक काळामध्ये ठराविक कामे करण्याची पद्धत भारतामध्ये आढळते . याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतामध्ये ठराविक ऋतु असून त्यांचे ठराविक वर्तन गेली अनेक वर्षे चालू आहे .बाबांनी मला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली ! माझ्यासोबत अखंड एक शिष्य होता . मला काय हवे काय नको ते पाहण्याचे काम त्याला देण्यात आले . बाल भोग आणि चहा दिला गेला . सुंदर अशी गरमागरम इडली चटणी आणि सांबार पोटभर खाल्ले . इथे आलेले बरेचसे लोक महाराष्ट्रातले होते . काही लोक छत्तीसगडच्या रायपूरचे होते . मन आणि मीत नावाची वेगवेगळी नाळ असलेली जुळी मुले इथे आलेली होती .ही मुले स्वमग्न होती. कनक नावाची एक गोड मुलगी आणि एक वकिलाचे कुटुंब होते .काही राजस्थानी लोक देखील आले होते .या सर्वांनी माझ्याभोवती गरडा घातला त्या सर्वांना नर्मदा परिक्रमा म्हणजे काय असते ते जाणून घ्यायची इच्छा होती त्यांना मी परिक्रमेविषयी सांगितले . मन आणि मित रायपुर चे होते .यांनी मला विश्रांतीसाठी एक खोली दिली परंतु इथे पाचच मिनिटे बसून मी सर्वांची रजा घेऊन पुढे निघालो . बाबाजींनी चालू केलेली पंचकोशी परिक्रमा चांगली प्रसिद्ध झाली होती व आश्रमावरती सेवेचा ताण यायचा असे त्यांनी मला सांगितले . हे बाबा मूळचे नागपूरचे होते आणि मराठी होते . परंतु हिंदी बोलायचे .
ओम नर्मदे हर बाबांच्या आश्रमाचे चित्र .याच खोलीमध्ये मी बाबांचे दर्शन घेतले . बाबांनी मला या पंचकोशी परिक्रमेची माहिती छापलेली पत्रके दिली . 

मोहाडकला , उडिया , नर्हेरा / नरैहरा गावे पार केल्यावर हा नागपूरच्या बाबांचा पंचवटी आश्रम होता . अर्थात ही सर्व गावे आपण किनाऱ्याने चालत आहोत नेहमी लक्षात ठेवावे . यानंतर सुलतानगंज नावाच्या गावामध्ये रामाचे मंदिर होते .  या भागातला राख घाट प्रसिद्ध आहे . सुलतानगंज हे गाव मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्याच्या उदयपूर तालुक्यामध्ये येते . पुढे चालत चालत मी धरमपुरी आश्रमामध्ये आलो . भव्य आश्रम आणि शून्य अगत्य असे काहीसे गणित जाणवले . एका मोठ्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने आपादमस्तक मला हुंगून माझे स्वागत केले .मी देखील जराही न हलता त्याला त्याची तपासणी करू दिली . थोड्याच वेळात माझ्या असे लक्षात आले की आश्रमामध्ये जमलेल्या वानरांनी या जर्मन शेफर्ड कुत्र्याचा सकाळपासून घाम काढलेला आहे ! त्यामुळे त्याच्या अंगातली सगळी शक्ती निघून गेलेली होती . नाहीतर त्याने माझ्यावरती काहीतरी प्रयोग नक्की केला असता ! एक प्रकारे तो जर्मन शेफर्ड कुत्रा मला त्याचा साथीदार समजू लागला होता व मी वानरांना पळवून लावण्यासाठी त्याला मदत करावी अशी त्याची अपेक्षा होती .आश्रमामध्ये फार काळ थांबलो नाही . एका भक्ताने दिलेली अगरबत्ती घेतली आणि पुढे निघालो . काठाने चालत चालत बोरास नावाच्या गावामध्ये आलो . समोरच्या तटावर झिकोली गावातील शुक कुटी मला दिसत होती ! ही तीच कुटी होती जिथे बसलेल्या साधूला नर्मदा मातेचा पन्नास फुटाचा परिसर फक्त माहिती होता ! झिकोली आणि बोरास यांना जोडणारा पूल देखील दिसत होता . हा पूल खालून ओलांडून पुढे जाणार होतो इतक्यात कानावरती रामनामाचा जप पडला आणि पावले आपोआप तिकडे वळली .काठावरती एक आश्रम होता बोरासचा आश्रम ! डोक्यामध्ये शुक कुटीची कल्पना घेऊन आत गेलो होतो परंतु हा आश्रम अतिशय वेगळा निघाला ! एक अतिशय तेजस्वी आणि तरुण साध्वी हा आश्रम चालवत होती ! या ठिकाणी खूप सारे परिक्रमावासी , निराधार ,निराश्रीत , वृद्ध ,अंध , अपंग , परित्यक्त राहत होते सर्वांना २४ तास गरम-गरम भोजन मिळायचे !  २४ तास अर्थात खरोखरीच २४ तास बरं का !  इतकेच नव्हे या ठिकाणी २४ तास सीताराम नामाचा जप चाले व २४ तास रामायण वाचन देखील चालायचे !हे सर्व २४ तासाचे उपक्रम गेली २३ वर्षे सुरू आहेत असे मला २२ साली कळाले ! या आश्रमाची कथा थोडी निराळी आहे . एक साधू इथे आले व राम मंदिराच्या जागेमध्ये राहिले . एक नऊ वर्षाची जात्याच हुशार व तेजस्वी , जातिवंत राजपूत मुलगी त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागली व त्यांचा सत्संग घडल्यामुळे त्यांना मनोमन गुरु म्हणून समर्पित होऊन त्यांच्यासोबतच राहिली . मुलीच्या आई वडिलांनी देखील मुलीचा शुद्ध भाव ओळखून तिला पाठिंबा दिला . तीच ही साध्वी ! तिचे नाव महाराजांनी साध्वी सुमित्रा दास असे ठेवले .साध्वी खूपच सरळ साधी भोळी प्रेमळ व निरागस होती . मला तिने आग्रहाने ठेवून घेतले . पुढे या साधू महाराजांचा त्यांच्याच चालकाने किरकोळ पैशाच्या लालसेपोटी खून केला . आणि तो पळून गेला . बारा वर्षे भक्त त्याला शोधत राहिले ! पुढे तो अचानक बाजारामध्ये फिरताना सापडला . एका अतिशय सभ्य सरळ सज्जन सात्विक आणि गर्भश्रीमंत भक्ताने भर बाजारात त्याचा तलवारीने शिरच्छेद केला असे मला कळाले . त्यांच्या विरोधात कोणीही साक्ष दिली नाही . कारण सर्वच जन मत त्या चालकाच्या विरोधात गेलेले होते .पोलिसांनी त्यांना अटक केली व पॅरोलवर त्यांची सुटका झाली होती . आणि मी आश्रमामध्ये आल्यावर काही तासातच ते स्वतः थेट आश्रमामध्ये दाखल झाले ! त्यांना भेटायला शेकडोंचा जनसमुदाय जमला !सर्वजण त्यांच्या पाया पडत होते .साध्वी सुमित्रा दास यांना सर्व लोक बाई म्हणायचे . बाई स्वभावाने अतिशय साधी आणि प्रेमळ होती . तिच्याकडे दोन फोन होते . एक साधा आणि एक स्मार्टफोन . साध्या फोनवर फक्त ६३ क्रमांक  साठवलेले होते . स्मार्टफोनवर तीन हजार क्रमाक होते . परंतु हिने फाल्गुन महिन्यामध्ये मोठा यज्ञ आयोजित केला होता त्याला मात्र ५००० पेक्षा जास्त महात्मे आले होते आणि त्यांच्या दक्षिणेवर ३५ लाख रुपये खर्च झाला होता ! वर वर्णन केलेल्या भक्ताने ११ लाख रुपये देणगी दिली होती .इथे झालेल्या भंडाराच्या वेळी ६ क्विंटल पिठाच्या पुऱ्या आणि टँकर भरून तेल लागले होते ! यज्ञाचा मोठा मंडप खाली बांधला होता त्याचा चबुतरा शिल्लक होता . बाईंच्या प्रेमळ स्वभावामुळे हजारे माणसं इथे या आश्रमाशी जोडली गेली होती . इथे कुठलेही बंधन नव्हते .त्यांचा स्वभाव खूप मनमोकळा होता .स्वतःची खोली अशी नव्हतीच . बाई सर्वांसोबत गच्चीवर झोपायच्या .त्यांचे पूर्वाश्रमीचे वडील रात्री गच्चीवर झोपायला म्हणून यायचे .शेवटी बापाचे हृदय ते ! यांच्यासोबत एक तरुण शिष्या होती .ती देखील त्यांच्या शेजारी झोपायची . आश्रम तीन मजली होता . प्रत्येक मजल्यावर लोक राहायचे . तळमजल्यावर स्वयंपाक घर आणि जेवणाची व्यवस्था होती . वरच्या मजल्यावर धान्याचा प्रचंड साठा आणि राहण्याची व्यवस्था होती .तसेच इथे रामायण आणि सीताराम जप चालायचा . मागच्या बाजूने थेट गाडी तळाची पातळी यायची . याच मजल्यावर रामरायाचा अतिशय सुंदर असा विग्रह सुमित्रादास बाईने अखंड पूजेमध्ये ठेवलेला होता . त्याची ती खूप सुंदर पूजा करायची . आलेल्या प्रत्येक परिक्रमावासीला ती भरपूर वेळ देऊन त्याच्याशी गप्पा मारायची . तिला एक सवय होती .कोणाशीही बोलायचे असेल तर त्याला जवळ घेऊन खाली बसायची आणि मग बोलायची . मध्येच उठून निघून जायची आणि दुसऱ्या व्यक्तीशी पुन्हा तेच , खाली बसून बोलायचे ! त्यांची ही पद्धत मला फार मजेशीर वाटली . त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे कोणीतरी पूर्ण लक्ष देते आहे असा भाव निर्माण व्हायचा .जाता येता किंवा उभ्या उभ्या बोलले की त्यात फारसे गांभीर्य वाटत नाही . या साध्वीची साधना इतकी कठोर होती की तिच्या आयुष्याला षडरिपूंचा तीळ मात्र देखील स्पर्श झालेला नव्हता हे लगेच जाणवत होते . तिच्याकडे वाईट दृष्टीने पाहणारा मनुष्य जरी तिच्याजवळ आला तरी तिच्या तपोबलामुळे तो सात्विक होऊन जायचा असे सामर्थ्य तिच्या ठायी होते ! बाईने मला खूप चांगला वेळ दिला आणि माझ्याशी भरपूर गप्पा मारल्या . तिला मी पंढरपूर दाखवले पाहिजे असे तिने मला सांगितले आणि मी देखील त्याला होकार दिला ! आता हा योग कधी येतो ते पांडुरंगालाच माहिती !यांच्याकडे पाहिले की साक्षात नर्मदा मातेचे दर्शन घेतो आहोत असा भास व्हायचा ! चेहरा सतत हसतमुख असायचा ! दिवस-रात्र स्वयंपाक चालायचा . स्वयंपाक घरातील सेवक देखील अतिशय निष्ठेने काम करायचे . गरज पडल्यास बाई स्वतः त्यांना मदत करायची . बाईच्या पायाला सतत भिंगरी लागलेली होती . एक क्षणभर देखील एका जागी थांबायची नाही ! इथे मला दोन छोट्या सात आठ वर्षाच्या मुली भेटल्या . एकीचे नाव नमामि राजपूत आणि दुसऱ्याचे नाव नर्मदा राजपूत होते ! आई बाबाजी पंगत पाईये ! असे म्हणून दोघी मला जेवायला घेऊन गेल्या .त्यानंतर त्या दोघी माझा पिच्छाच सोडेनात ! सतत माझ्या मांडीवर खेळू लागल्या .मला म्हणाल्या बाबाजी तुम्ही आमच्या घरी चला .सुमित्राबाई मला जा म्हणाल्यावर मी देखील हो म्हणालो . आणि मला त्या दोघी त्यांच्या घरी घेऊन गेल्या . गावातच अतिशय मोठे घर होते . प्रत्येक गोष्टीतून श्रीमंती झळकत होती . घरातून बाहेर पडणारे ड्रेनेज एका मोठ्या दाराने झाकले होते . अर्थात ड्रेनेज पाईपलाईन मध्ये जाण्यासाठी मोठे दार होते इतका मोठा वाडा होता !घरातल्यांनी मला मसाला दूध पाजले . इथे अजून एक पटेल काका मला भेटायला आले होते . तेही मला त्यांच्या घरी येऊन गेले . यांचा मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता . नंतर मला कळाले की नमामि आणि नर्मदा यांच्याच घरामधील सुमित्रा दास बाई आहेत !त्या त्यांच्या भाच्या होत्या ! त्यानंतर मात्र मी दिवसभर सिताराम जप केला . अतिशय आनंद लुटला ! कधी ढोलक वाजवला कधी पेटी वाजवली !कधी खंजिरी वाजवली तर कधी मंजिरी वाजवली ! दिवसभर रामनामाचा आनंद लुटला ! समोर वाहणारी नर्मदा मैया आणि मुखामध्ये रामाचे नाम ,शेजारी अखंड रामायणाचा पाठ चालू त्यामुळे तिथे हनुमान जी चा वास ! अजून काय पाहिजे ! इथे पेटी दुरुस्त करणारे दोघे बाप लेक भेटले छान ट्युनिंग करत होते . मला देखील पेटी ट्युनिंग करण्याचे ज्ञान आहे हे कळल्यावर त्यांना खूप आश्चर्य वाटले ! कारण हे ज्ञान खूप कमी लोकांना असते . परंतु मला हे शिकवणारा माझा दिवंगत संगीतकार मित्र गिरीश कुलकर्णी याचे हे उपकार आहेत ! मी नारद मंदिराच्या व्यास गुरुकुलामध्ये राहत असताना इथे गिरीश कुलकर्णी रोज किर्तनाला साथ द्यायला यायचा .त्यानेच मला ही कला शिकवली. हा उजव्या हाताने उत्तम पेटी वाजवायचा .परंतु याच्या अंगठ्याच्या रचनेमध्ये काही दोष असल्यामुळे त्याच्या गुरूंनी त्याला डाव्या हाताने पेटी वाजवायला सुरुवात कर असे सांगितले . त्याचे वडील हे उत्तम तबलावादक होते . आणि त्याचे गुरु हे भारतातील आजच्या घडीचे सर्वोत्तम गणितीय पेटीवादक आहेत . त्यांचे नाव मी इथे घेणार नाही . परंतु गुरूंनी सांगितलेल्या ऐकायचे म्हणून ह्याने डाव्या हाताने पेटी वाजवायला सुरुवात केली व त्यामध्ये त्याला गती येईना . घरी थोडीशी तणावाची परिस्थिती असल्यामुळे गिरीश मानसिक तणावा मध्ये गेला आणि त्याने कामशेत जवळ लोकल खाली उडी मारत आत्महत्या केली . त्या दिवशी तो रोजच्या प्रमाणे आमच्याशी गप्पा मारायला आला असता तर कदाचित त्याचे मन मोकळे झाले असते . परंतु तो अबोल स्वभावाचा असल्यामुळे मनातल्या मनात कुढत राहिला . आपल्याही आजूबाजूला कोणी अशी माणसे असतील की जी अचानक संवाद साधायची बंद झाली आहेत तर आपण त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या पाहिजेत अन्यथा त्याचे पर्यवसन कुठल्यातरी चुकीच्या घटनेमध्ये होऊ शकते आणि एक समाज म्हणून आपल्यासाठी हे नक्कीच हिताचे नाही . असो .
त्यांना पेटी ट्यून करायला थोडीशी मदत केली आणि त्यानंतर मी रामायण वाचायला बसलो . या आश्रमामध्ये सेवादारांची खूप गरज आहे असे मला जाणवले . सेवा देणाऱ्यांपेक्षा सेवा घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे .  म्हणजे धनधान्याची आश्रमाला अजिबात कमी नाही . उलट इथे जास्तीचे धान्य जमा होते त्यामुळे स्वतः बाई हे धान्य आणि आश्रमांना आणि गरिबांना वाटत असतात .परंतु स्वयंपाक करणारे वाढणारे व रामायण तसेच रामनामाची सेवा करणारे सेवादार कमी पडतात . नमामि आणि नर्मदा यांनी मला चित्रे काढण्यासाठी कागद आणून ठेवले होते . त्यावर त्यांनी सांगितलेली चित्रे काढून ठेवली . आणि ती बाईंजवळ ठेवून दिली .नर्मदा माते कडे पाहत झोपी गेलो .सकाळी लवकर उठून थोडा जप करून पुढे प्रस्थान ठेवले . 
बोरासाच्या आश्रमावर नेहमी अशी गर्दी राहते . कायमस्वरूपी जत्रा तिथे भरलेली असते . यातील बरेच लोक आश्रमामध्ये जेवायला येतात .आणि कोणालाही नाही म्हटले जात नाही .
सुमित्रा दास बाईंचा रामलला !
आश्रमाच्या मागच्या बाजूला भरपूर झाडे असून हा भव्य वटवृक्ष आहे .
आश्रमातील हनुमंताचा विग्रह
नर्मदा खंडातील एक असामान्य व्यक्तिमत्व परमपूज्य सुमित्रा दास साध्वी जी बोरास . यांचे दर्शन अवश्य घ्यावे अशी व्यक्ती आहे . गर्व नाही , ताठा नाही , अहंकार नाही , आळस नाही ,दांभिकपणा नाही , भपका नाही .फक्त आणि फक्त रामरायाची भक्ती आहे . आणि रामनामाची शक्ती आहे ! 
मध्यंतरी पुन्हा एकदा आश्रमात गेलो होतो . तिथे काढलेली ही चित्रं आहेत .माझ्या डाव्या हाताला बसलेले पटेल काका हे बाईंचे निःस्सिम भक्त आणि अप्रतिम साधक आहेत . आपली प्रचंड प्रॉपर्टी लाथाडून ते इथे पूर्ण वेळ सेवेसाठी येऊन राहिले आहेत .

सुमित्रा दास साधवींचा देव्हारा
बाईंचा रामलाला आणि खाली असलेले शाळीग्राम यावर त्या सुंदर नक्षीकाम करतात .
पुन्हा एकदा दर्शनासाठी गेल्यावर सुमित्रा दास साध्वीं सोबत प्रस्तुत लेखक
आपल्या देवघरासमोर साध्वी सुमित्रा दास बाई
साध्वी सुमित्रा दास जी

दोंडाईचा येथील इंदाणी परिवार साध्वी सुमित्रा दासजी यांच्या देवघराचे दर्शन घेताना . 
निघताना बाईंनी मला फोन नंबर विचारला . मी फोन सोबत बाळगत नाही कळल्यावर त्यांना आनंद वाटला .तुझ्या ओळखीच्या कोणाचातरी नंबर सेव करून दे असे म्हणाल्यावर मी त्यांच्या फोनवर माझ्या मित्राचा क्रमांक टाकून दिला . यांच्या फोनला कुठलेही लॉक नव्हते . फोन आश्रमातल्या कोणाच्याही हातात कधीही असायचा . इतक्या त्या विरक्त होत्या . नाहीतर आजकाल आपल्या फोनला आणि त्यावरील संभाषणांना सोन्यासारखे जपणारी माणसेच सर्वत्र अधिक पाहायला मिळतात !बाईंना मोबाईलवर मी गुगल वर टायपिंग चालू करून दिले . संपूर्ण परिक्रमेमध्ये ज्यांनी ज्यांनी मला होकार दिला त्या सर्वांना मी बोलून छापण्याची गुगल व्हाईस टायपिंग ची सुविधा चालू करून दिली .या सुविधेचे आपल्यावर मोठे उपकार आहेत कारण आपले संपूर्ण लिखाण याच प्रणालीवर चालू आहे ! हे सर्व लिखाण मोबाईल फोनवरून होते आहे . संगणकावरून नाही याची कृपया नोंद घ्यावी .कारण आपल्याकडे संगणकच नाही ! आणि जो फोन आहे तो देखील एका ब्लॉग वाचकांनी बळेच दिलेला आहे ! असो . एक
उत्तम आश्रम कसा चालवायचा ,त्याचा आदर्श वस्तू पाठ सुमित्रा दास साध्वींनी घालून दिलेला आहे .बरेचदा आपल्याला असे ऐकायला मिळते की साधू समाजामध्ये महिलांची संख्या कमी आहे . ते वास्तव देखील आहे . परंतु असे का आहे याचा विचार आपण कधी केला आहे का ?साधू बनण्यासाठी लागणारे जे काही अंगभूत गुण आहेत ते महिलांमध्ये देखील असतात .परंतु अति विचार करणे किंवा अति काळजी करणे किंवा अति घाबरणे अशा दुर्गुणांच्या अतिरेकामुळे त्यांना या मार्गामध्ये अडथळे येतात . उदाहरणार्थ एखादी झुरळ पाहिल्यावर त्याला टिचकीने उडवून लावणारा पुरुष असतो . परंतु त्याच जागी एखादी स्त्री त्या झुरळाला किंवा पालीला पाहिल्यावर जोरजोरात किंचाळून अख्खे घर डोक्यावर घेऊ शकते !
अशा काही अंगभूत अवगुणांमुळे साध्वी बनताना त्यांना अधिक कष्ट करावे लागतात . आपल्या प्रतिक्रिया नियंत्रित केल्या तरी स्वभावामध्ये बदल पडायला वेळ लागत नाही .एका साधूकडे जे गुण लागतात ते सर्व गुण बाईंच्या अंगी एकवटलेले होते . त्यामुळे मला परिक्रमेदरम्यान भेटलेल्या अशा काही मोजक्याच साध्वी चांगल्या लक्षात राहिल्या . मग त्या शामा दीदी असोत , ममता गिरी असोत , सिद्धनबाई असोत , कमलताई रामदासी असोत , किंवा ह्या सुमित्रादास जी असोत . मुळात स्त्री पुरुष समान नाहीतच . स्त्रिया या पुरुषांपेक्षा कैक पटीने श्रेष्ठ आहेत !एक जीव जन्माला घालणे पुरुषाच्या आवाक्या बाहेरचे आहे . ते सामर्थ्य केवळ मातेचे ! सहनशीलते मध्ये देखील स्त्रियांची बरोबरी कुठलाही पुरुष करू शकत नाही . त्यामुळे स्त्रियांनी जर मनात आणले तर साधू जगतावर त्या आपल्या वैराग्याने आणि सामर्थ्याने अक्षरशः राज्य करू शकतात ! नर्मदा मातेने या सर्व साध्वींना हेच तर शिकवले असेल! साध्वी बनू इच्छिणाऱ्या माझ्या माता भगिनींनो ! विचार करताय ना ! 
नर्मदे हर !





लेखांक एकशे बासष्ठ समाप्त (क्रमशः )



टिप्पण्या

  1. पूज्य साध्वीजींच्या चेहऱ्याचे आणि त्यांच्या पूजेमधल्या रामललाच्या सुमुखाचे साम्य अद्भुत आहे ..

    उत्तर द्याहटवा
  2. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !