लेखांक १५५ : छिपानेरचा निम्बार्क आश्रम अन् अद्भुत सातदेव पाताळेश्वर

नर्मदा मातेचे नाभीस्थान नेमावर येथे दक्षिणेस निघालेल्या विठ्ठलदास महाराजांनी सुंदर असे उपवस्त्र पामराच्या गळ्यात घातले होते ! तो साक्षात नर्मदा मातेचा प्रसाद आहे हे जाणून ते वस्त्र गळ्यामध्ये तसेच ठेवून पुढे निघालो . मठाच्या पुढून निघाले तर रस्त्याचा मार्ग लागतो . आणि मागच्या दरवाजातून निघाले तर मैयाचा किनारा लागतो . त्यामुळे मागून निघालो आणि परिसरातील सर्व मंदिरांची दर्शने करत करत अत्यंत कठीण आणि खडतर मार्गाने किनारा पकडला .या भागामध्ये खूप साऱ्या नद्या नर्मदा मातेला येऊन मिळतात . जामनेर , गौनी , ककेडी , सीप , कोलार किंवा कौसल्या  अशा अनेक नद्या नर्मदा मातेला इथे येऊनच बिलगतात . त्यामुळे हा सर्व प्रदेश बऱ्यापैकी दलदल युक्त आहे . ही परम पवित्र भूमी आहे . नर्मदा खंडातील प्रत्येक जागेचे काहीतरी स्थान महात्म्य आहेच ! आपले दुर्दैव की आपण ते स्थान महात्म्य किंवा तो स्थान गौरव लक्षात घेत नाही आणि त्याचा  उदो उदो करत नाही . परम आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना भेटायला जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा दरवेळी ते ही खंत बोलून दाखवायचे . ते म्हणायचे की राजगड सारखा किल्ला जर युरोपात असता तर लोकांनी ते युरोपातील प्रमुख पर्यटन केंद्र बनविले असते . त्याच्या भोवती मोठे अर्थकारण उभे राहिले असते . हा तर ऐतिहासिक वारसा आहे . परंतु त्याहून पुराणकाळातील ज्या काही वास्तू किंवा जागा आहेत त्यांचे पौराणिक महात्म्य असल्यामुळे त्यांचे जतन संवर्धन आद्य कर्तव्य समजून प्रत्येक भारतीयाने केलेच पाहिजे ! आता इथेच पहा . इथे गौनी नदीच्या काठावर परशुरामाने पिंडदान केलेले आहे . परशुराम , दाशरथी राम , श्रीकृष्ण ही काही काल्पनिक पात्रं नसून आपल्या राष्ट्राच्या इतिहासात ती होऊन गेलेली महान पर्वे आहेत याचाच मुळी विसर आपल्याला पडलेला दिसतो . जे राष्ट्र आपला इतिहास विसरते त्या राष्ट्राचा भूगोल बदलतो हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आधीच सांगून ठेवलेले आहे . उद्या एखादा शिकलेला मुलगा म्हणू शकेल की परशुरामाने पिंडदान केले त्याचा आमचा काय संबंध ? परंतु इथे त्याला दोन गोष्टी कळतात . एक म्हणजे परशुराम हा त्याचा पूर्वज होता . दुसरी गोष्ट म्हणजे पिंडदान नावाची प्रक्रिया तो करत होता . तिसरी गोष्ट कळेल ती म्हणजे आपल्या परंपरेमध्ये राम वगैरे नावे असतात जॉन किंवा महंमद नाही . त्यामुळे उद्या चुकून माकून असा एखादा धर्माप्रती उदासीन हिंदू धर्म बदलून ख्रिश्चन किंवा मुसलमान वगैरे झालाच तर किमान त्याला त्या जागेकडे पाहून आपले पूर्वज कोण होते आणि काय करत होते हे तरी कळेल ! आज केरळ राज्यामध्ये इतके लोक धर्म बदलून मुसलमान आणि ख्रिश्चन झाले असले तरी तिथली मंदिरे पाहिल्यावर त्यांना त्यांचे पूर्वज कोण होते हे मनातल्या मनात तरी का होईना , आठवतेच ना ! यदा कदाचित तिथे कोणी मंदिरे बांधलीच नसती तर त्यांना त्यांच्या या परमपवित्र वारशाचे स्मरण झालेच नसते !आजही जेव्हा ते पद्मनाभस्वामी मंदिर पाहतात तेव्हा त्यांना कळते की अरे आपल्यापेक्षा जुनी , प्रगत आणि पुरातन अशी ही संस्कृती असून आपले पूर्वज कधीकाळी याच संस्कृतीचा भाग असणार!त्यातूनच मग पुढच्या पिढीतील कोणाला अनुताप उत्पन्न झाला तर ते घर वापसी करू शकतात ! विचार करून पहा ! या कारणासाठी तरी का होईना परंतु आपल्या पुरातन वारशांचे जतन आणि संवर्धन करणे अत्यंत अत्यावश्यक आहे . पुरातत्व विद्येशी किंवा पुरातत्व खात्याशी संबंधित लोकांनी तर याचे विशेष भान बाळगणे आवश्यक आहे . हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे . इंग्रजांनी विचारपूर्वक आपला पुरातत्त्व वारसा उध्वस्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे . इस्लामने तर धर्माच्या स्थापनेपासून आजपर्यंत ज्या भूमीमध्ये जातील त्या भागातील पुरातन वारसा उध्वस्त करण्याचा विडाच उचललेला आहे . हे जगभर सर्वत्र आपल्याला दिसते .हे उघड सत्य असल्यामुळे ते लपवून बोलण्याची देखील गरज नाही इतके ते धगधगीत वास्तव आहे . इस्लामचा प्रसार आणि प्रचार सुकर होण्याचे महत्त्वाचे कारण त्यांनी नष्ट केलेला त्यांच्या शत्रूंच्या पूर्वजांचा वारसा हेच आहे .  किमान भारतातील धर्मांतर केलेल्या लोकांनी एकदा भारतभर फिरून आपल्या पुरातन वारशाचा अभ्यास करावा आणि लवकरात लवकर शहाणे होऊन घर वापसी करावी हे उत्तम आहे .कारण येणारा काळ हा जगातील अन्य राष्ट्रांसाठी युद्धमानतेचा परंतु भारत मातेसाठी मोठाच सुवर्णकाळ असणार आहे ! तसे संकेत सर्वच स्तरांवर विविध लोक देत आहेत . ज्याप्रमाणे राजकीय लोक सत्तेचे बदलणारे समीकरण वेळीच अभ्यासून चटकन पक्ष बदलतात आणि सत्तेचा अमर्याद उपभोग घेतात त्याप्रमाणे आपणही सूज्ञपणाने अभ्यासपूर्वक आणि निश्चयपूर्वक आपले शुद्धीकरण करून घ्यावे आणि भारतीयत्वाचा अभिमान बाळगत मानवतेच्या कल्याणाचा मार्ग स्वीकारत आमरण पवित्र सात्विकतायुक्त आनंद घ्यावा हे उत्तम ! असो .

नर्मदा मातेच्या प्रवाहाला इथे थोडीशी शांतता प्राप्त झाल्यासारखी वाटते .कारण इथल्या जमिनीला उतार कमी आहे . त्यामुळेच नर्मदा माता इथे वाहताना प्रचंड प्रमाणात वाळू साठवत जाते . पाण्याची गती कमी झाली की प्रवाहातून वेगाने वाहणारे वाळूचे कण खाली बसतात . आणि मोठाच वाळू साठा तयार होतो . या भागातील शेती देखील खूप सुंदर आहे . वाटेमध्ये अनेक गावे लागली . जिथे शेती सुपीक असते तिथे गावांची दाटी आणि घनता जास्त असते . याउलट दुष्काळग्रस्त भागातील गावे विस्तारलेली आणि मोठी असतात . कारण इतक्या मोठ्या भागातून सुद्धा पुरेसा महसूल गोळा होत नसतो त्यामुळे गावांचा आकार मोठा होत जातो . उदाहरणार्थ शूल पाणीच्या झाडीतील गावे सहा सहा किलोमीटर विस्ताराची आहेत . काही गावे तर बारा ते चौदा किलोमीटर पसरलेली आहेत . नर्मदा मातेच्या काठावर मात्र दर दोन किलोमीटर ला गाव बदलतेच बदलते ! तिची कृपाच तशी आहे ! नेमावरच्या पुढे काठा काठाने चालताना कुंडगांव खुर्द , तुरनाल , दैह्यात , चिचली , करोंद माफी , बिजलगाव , पिपलनेरिया , खेडी , खिडकिया , छिपानेर , राणीपूरा , चोरसाखेडी , सातदेव , गोंदागांव , तिगली , सीलकंठ , मंडी , नीलकंठ ही सगळी गावे लागतात . नेमावर पासून मागे सरळ रेषेत प्रवाहित होणारी नर्मदा माता छिपानेर ते नीलकंठ आणि नीलकंठ ते बाबरी अशी दोन चांगली पंधरा पंधरा किलोमीटर विस्ताराची झोकदार वळणे घेते . बहुतांश परिक्रमावासी ही वळणे टाळून सरळ जातात . परंतु तसे करू नये . इथे प्रत्येक वळणाला तुमचे पाच दहा किलोमीटर चालणे वाचत असले तरी नर्मदा मातेचे अतिशय दुर्मिळ आणि दुर्लभ असे दर्शन मात्र मुकते . नेमावरच्या पुढे जामनेर गौनी आणि ककडी या तीनही नद्या मी उतरून पार केल्या . काही ठिकाणी मातीचे तात्पुरते पूल बांधण्यात आले होते . परंतु तरीदेखील थोडे अंतर पाण्यातून जावेच लागायचे . सर्व नद्यांचे पाणी प्यायलो . थोडे अंतर चाललो आणि भूक लागली . नद्यांच्या काठाने लोक कलिंगड टरबूज वगैरे ची शेती करतात . अशाच एका शेतकऱ्याने मला आवाज दिला आणि सुंदर असे कलिंगड खायला दिले . ते घेऊन मी चालू लागलो . भूक लागली असूनही खायची इच्छा होईना . थोडे पुढे गेलो आणि समोर वाळूचा मोठा ढीग दिसला . एक दहाबारा फूट लांबीचा नाग सळसळत वरती चढत होता . त्याला जाऊ द्यावे म्हणून मी थांबलो . इतक्यात मला समोरून एक साधू येताना दिसला . साधूला साप दिसत नव्हता कारण तो उतारावर होता . मी जोरात ओरडून बाबाजी रुको बाबाजी रुको असे म्हणू लागलो . परंतु बाबाजी क्या ? क्या ?असे विचारत अजून पुढे येऊ लागले . मी त्या वाळूच्या ढिगावर धावतच जाऊन बाबाजींना थांबवले . माझ्या पळण्यामुळे नागाने अतिशय चपळ पणे नर्मदा मातेकडे धाव घेतली . कदाचित उलटा फिरून मला चावू शकला असता . परंतु त्याने तसे केले नाही . बाबाजींना काय झाले काहीच कळेना . मी त्यांचे खांदे का धरले आहेत असा प्रश्न त्यांना पडला . ते थोडेसे रागावले आहेत असे वाटले . मग मी त्यांना खाली जात असलेला मोठा नाग दाखवला . वयस्कर असल्यामुळे त्यांना तो दिसेना . बघता बघता नाग दिसेनासा झाला . मी त्यांना विचारले की तुम्ही उलटे कुठे चालले आहात ? ते म्हणाले माझी जलहरी परिक्रमा चालू आहे . त्यांचे नाव टाट वाले बाबा असे होते .वय ७० च्या पुढे असावे.पाया चप्पल नव्हत्या. सोबत असलेली झोळी देखील पोत्याची होती . आम्ही दोघे वाळूत बसलो . मी त्यांना विचारले की आपने बालभोग पाय है क्या ? बाबा म्हणाले मी दोन दिवस उपाशी आहे . मग मी लगेचच कलिंगड काढले . बुक्की मारून फोडले . दोघांनी अर्धे-अर्धे कलिंगड खाल्ले . बाबांना खूप भूक लागली होती . त्यांना ते मोठे कलिंगड खाताना पाहून मला खूप बरे वाटले . मी त्यांना पुढे नेमावर मध्ये मुक्काम करायला सांगितले . आणि पायावर डोके ठेवून नमस्कार केला . साधू संतांचे शहरांमध्ये दर्शन घेणे आणि असे रानावनात दर्शन घेणे यात खूपच मूलभूत अंतर असते . वाघाला प्राणी संग्रहालयात पाहण्यापेक्षा जंगलात पहावे ! आपल्याला रोजच्या जीवनामध्ये साधुसंत तपाचरण करताना कधीच भेटत नाहीत . किंबहुना खरी साधक कधीच आपल्या साधनेचे प्रदर्शन करत नाहीत . उलट पक्षी त्यांच्याकडे पाहून हा मनुष्य काही साधना तरी करत असेल का असेच वाटत राहते असे वर्तन ते मुद्दाम ठेवतात . साधन हे गुप्तच असावे . आपल्या मानवी जीवनामध्ये काही गोष्टी आपण अतिशय सहज पद्धतीने गुप्ततेने करतो . मग ते शौचसंमार्जन असेल किंवा शैय्यासुख असेल . याबद्दल जाहीर भाष्य कोणी करत नाही .तसा अलिखित नियम आपल्या समाजात पडून गेलेला आहे . तोच नियम साधनालाही लागू होतो . आपल्या साधने बद्दल उघडपणे कधीच चर्चा करू नये . त्यातून साध्य काहीच होत नाही . केवळ समोरच्याला तुम्ही फार मोठे साधक आहात असा भ्रम उत्पन्न होऊ शकतो . अलीकडे साधने बद्दल उघडपणे चर्चा करण्याची एक नवीन प्रवृत्ती समाजामध्ये उत्पन्न झालेली दिसते . मी अमुक अमुक साधना करतो वगैरे वगैरे तावातावाने सांगणारे लोक दिसतात तेव्हा मौज वाटते . दासबोधातील साधक लक्षणे सर्वांनी अवश्य वाचावीत . समर्थ म्हणतात 

जे बोलताची वाचा धरी। जे पाहताची अंध करी ।
ते साधी नाना परी । या नाव साधक ॥
जे साधू जाता साधवेना । जे लक्षू जाता लक्षवेना । 
तेंची अनुभवें आणि मना । या नाव साधक ॥ 
जेथे मनची मावळे । जेथे तर्कची पांगुळे ।
तेची अनुभवा आणी  बळे । या नाव साधक ॥ 

मुळात परब्रह्म हे अनुर्वाच्य आहे अर्थात त्याचे वाचेने वर्णन करता येत नाही . ते वर्णन करण्यासाठी जो कोणी पुढे सरसावतो तो तेच होऊन बसतो आणि लोप पावतो . ते स्वरूप दृश्य डोळ्यांना दिसू शकत नाही . जो कोणी ते स्वरूप पाहायला जातो तो तेच होऊन बसतो . ही अवस्था जो साधतो तो खरा साधक . मुळात यातील साध्य असे आहे की ते साधकाला साधले आहे हे कळतच नाही . कारण ते साध्य झाले आहे असे कळायला साधक वेगळा उरतच नाही . देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो अशी ती अवस्था आहे . तिथे तुमचे मन मावळते तर्कबुद्धी पांगळी होते . ही साधनेची खरी स्थिती आहे . त्यामुळे साधकाने ती वर्णन करावी अशी परिस्थितीच नाही . याचाच गणितीय पद्धतीने काढलेला व्यत्यास असा आहे की जो कोणी स्वतःच्या साधने बद्दल सतत बोलतो आहे तो खरा साधक असूच शकत नाही ! हे ऐकायला थोडेसे कटू वाटेल परंतु गंभीर आहे . वेळीच ही वृत्ती अंगी बाणवली पाहिजे . समर्थ पुढे म्हणतात

विवेकबळे गुप्त जाला । आपोआप मावळला ।
दिसतो, परी देखिला । नाहीच कोणीं ॥
ही साधकाची खरी अवस्था आहे ! सतत जागृत असलेल्या विवेकाच्या बळाने तो अक्षरशः गुप्त होऊन जातो . याचा अर्थ सर्वत्र असूनही कुठेच दिसत नाही . पश्याम्यहं जगत्सर्वं न माम् पश्यति कश्चन अशी स्वतःची अवस्था तो मुद्दामहून करून घेतो . असे उच्च कोटीचे साधक त्यांच्या साधनामस्तीमध्ये असताना आपल्याला नर्मदे काठी भेटतात !हे किती मोठे भाग्याचे लक्षण आहे ! आता सुद्धा मला भेटलेले ताट वाले बाबा देह भावाच्या पलीकडे गेलेले होते . समोर इतका मोठा विषारी सर्प असताना देखील त्यांचे त्याकडे जराही लक्ष नव्हते . ते आपल्याच मस्तीमध्ये आपल्याच आनंदामध्ये चालले होते . तहानभूक लागणे हे स्वाभाविक भाव देखील यांच्या अवस्थेत पुढे मागे पडले होते . कलिंगडाचा प्रत्येक घास हाताने खाताना ते नर्मदा मातेचा जयजयकार करत होते . ही आहे खरी साधना ! कठोर तपस्या ! अशा साधुसंतांचा सत्संग लाभला तरी आपल्याला तो लाभदायक असतो . कधीतरी गाईच्या अंगावरून हात फिरवून बघा . किंवा नुसते गोठ्यामध्ये आत जाऊन बाहेर येऊन बघा . काही काळ तुमच्या अंगाला शेणाचा गोमूत्राचा वास येत राहतो . अगदी त्याच पद्धतीने थोडा काळ का होईना खरी सत्संगती लाभली की त्या साधनाचा सुगंध आपल्या जीवनाला काही काळासाठी तरी का होईना परंतु व्यापून उरतो .हे फार सोपे सूत्र आहे . आपल्याला खरोखरच सत्संग लाभला आहे का नाही हे कसे ओळखायचे ? आजूबाजूला कोणाकडेच बघायचं नाही . सत्संग अर्थात चांगल्या व्यक्तीचा संग , भेट पूर्ण झाल्यावर आपल्या मनाची अवस्था पहायची . ती पहिल्यापेक्षा अधिक आनंदी ,अधिक चांगली , अधिक शांत असेल तर तो सत्संग होता . परंतु एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्या मनाची अवस्था अधिक चंचल ,अधिक दुःखी , अधिक कष्टी झाली असेल तर तो कुसंग मानावा . अर्थात याला आपल्या मनाची अवस्था ,बुद्धीचे विचार करणे देखील तेवढेच कारणीभूत असते . परंतु खऱ्या सत्संगामध्ये तेवढी ताकद असते . ज्याप्रमाणे एकच ज्योत अंधाराला पूर्णपणे नष्ट करते त्याच पद्धतीने सत्संगाची अशी अपरंपार ताकद असते की केवळ एका क्षणात तुमच्या मनाचे बुद्धीचे चित्ताचे सर्व विकार सत्संग दूर करतो . काही काळच लाभलेला टाट वाल्या बाबांचा सत्संग लक्षात राहिला . ते तोंडाने काही बोलत नव्हते . परंतु तरीदेखील त्यांना काय अवस्था प्राप्त झाली आहे हे पाहताक्षणी कळत होते . ते माझ्यासमोर बसले होते परंतु माझ्याकडे बघत नव्हते . ते माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते परंतु त्यात त्यांना माझे चर्मचक्षू दिसत नव्हते तर साक्षात परब्रह्म दिसत होते .जिकडे पहावे तिकडे भगवंत अशी त्यांची अवस्था होती ! अंगावर घातलेल्या वस्त्रांचे त्यांना भान नव्हते . पोटात पडलेल्या आगीची त्यांना जाणीव नव्हती . पायाखाली येणाऱ्या काट्याकुट्यांचे भान नव्हते . फक्त नर्मदा मातेचा किनारा सोडायचा नाही आणि तिचा संग अखंड घेत राहायचा इतकीच तीव्र इच्छा दिसत होती . मला तर वाटू लागले की त्या नागदेवतेला सुद्धा महाराजांचा चरण स्पर्श हवा असेल की काय कोण जाणे ! असो .
जामनेर नदीच्या अलीकडे एक पूल होता जो हंडीया हरदा या गावांकडे नेमावरचा किनारा जोडत असे . 



हा आहे जामनेर आणि नर्मदा मातेचा संगम .
या संगमावर एक असा छोटासा पूल आहे .परंतु तो मध्ये तुटलेला असल्यामुळे कमरे एवढ्या पाण्यातून जावेच लागले .
या चित्रामध्ये आपल्याला कुंदगावचा घाट आणि नेमावर हरदा पूल दिसतो आहे .
काठानेच चालत कुंदगावच्या थोडेसे पुढे गेल्यावर तुरनाल या गावाच्या अलीकडे समोर भमोरी घाट दिसतो तिथे हंडीया बॅरेज किंवा उपसा जलसिंचन योजना बांधण्याचे काम जोरात सुरू होते .इथे नर्मदा मातेचा प्रवाह अडवून त्यातील वाळू व पिण्यायोग्य पाणी काढून त्याचा पुरवठा हरदा जिल्ह्याला करण्यासाठीचा हा प्रकल्प होता
या प्रकल्पातील काँक्रीटच्या भिंती इतक्या मोठ्या होत्या की त्यामुळे नर्मदा मातेचे अर्धे अधिक पात्र व्यापले गेले होते आणि अत्यंत कमी जागेतून वेगाने पाणी वाहत होते . इथून चालताना खूप मजा आली .
हा तुरनाल गावाचा घाट आहे . इथे परशुरामाने आपल्या आई वडिलांचे पिंडदान केले अशी कथा सांगतात . 
गावामध्ये महादेवांचे मंदिर असून परशुरामांची मूर्ती इथे आहे .
परशुरामाने पिंडदान केले त्याजागी कुण्या भक्ताने दगडामध्ये पिंड खोदून ठेवलेले आहेत . याचे दर्शन अवश्य घेतात .
भगवान परशुरामांनीच पुजलेले शिवलिंग देखील इथे दाखवले जाते . या दोन्ही स्मारकांची अवस्था वाईट आहे .
गावामध्ये अन्य काही स्थाने आहेत जिथे परशुरामांचे स्थान म्हणून पूजा केली जाते . एकंदरीत परशुरामांच्या चरित्रामध्ये या गावाला महत्त्व आहे . इथून पुढे बेसुमार वाळू उपसा चालू होतो .

इथे एक जबरदस्त अनुभव घेतला . मला वेळोवेळी भेटणारे जे केरळी संन्यासी होते त्यांचे नाव स्वामी शिवदासानंद भारती . यांना दास स्वामी म्हणायचे . मी मागेच सांगितले त्याप्रमाणे ते फक्त  सकाळी लवकर उठून दुपारपर्यंत चालायचे . दुपारी जिथे कुठे मुक्काम पडेल तिथेच थांबायचे . आज वाटेमध्ये ते मला भेटले . ते पहाटे चार वाजता मिर्झापूरहून निघाले होते आणि नऊ वाजता इथे मला भेटले याचा अर्थ केवळ पाच तासांमध्ये त्यांनी तब्बल ३१ किमी अंतर कापले होते ! ही चालण्याची फारच भयानक गती झाली ! हे असले अचाट काहीतरी संन्यासीच करु जाणोत . मी त्यांच्या पायाच पडलो ! ते मध्ये अक्षरशः पाणी पिण्यासाठी सुद्धा थांबायचे नाहीत . आता सुद्धा त्यांना मी दिसलो म्हणून ते थांबले . नाहीतर अजून वीस पंचवीस किलोमीटर सहज चालले असते . बसल्यावर त्यांची गती निघून गेली . त्यामुळे त्यांनी त्याच गावात मुक्काम करायचा निर्णय घेतला . मी त्यांचा सत्संग काही काळ केला आणि पुढे निघालो . पुढे निघालो खरा परंतु उन्हाचा दाह चांगला जाणवू लागला . मध्ये कुठेच काही सेवा मिळत नाही . कुठलेही मंदिर आश्रम काहीही नाही . करोंदा माफी नामक गाव मला गाठायचे होते परंतु ते काही केल्या येईचना . मध्ये एक ठिकाणी मातेने परीक्षा बघितली . येथे शेती खूप हिरवीगार होती परंतु शेतांना भयंकर काटेरी कुंपणे लावलेली होती . 
हे त्याच भागातील एका हिरव्यागार शेताचे चित्र आहे . परंतु ही शेती अशीच हिरवीगार राहावीत म्हणून कुंपण देखील विशेष काटेरी असायचे .
त्याच भागातील एका शेताच्या कुंपणाचे प्रातिनिधिक चित्र .
वाळू माफियांचा हैदोस असल्यामुळे जिथे मानवी वावर कमी आहे अशा ठिकाणी पक्षांच्या झुंडीच्या झुंडी मासेमारी करताना दिसायच्या . 
एका शेताचे काटेरी कुंपण चुकवायच्या नादात मी चांगला दोन फूट खोल गाळामध्ये रुतलो . तसाच शक्ती लावून २०० मीटर दलदल पार करून गेलो . शेवटचा टप्पा इतका थकवणारा होता की मला पाऊल उचलता येईना . इतक्यात मला मध्ये एका शेतकऱ्याने दिलेले खरबूज आपल्या पिशवीत आहे हे आठवले . दलदलीत फसल्या फसल्याच उभा राहून मी ते खरबूज फस्त केले ! दलदली नंतर मैयाचे जे पाणी होते ते देखील स्वच्छ नव्हते . प्रचंड वाळू उपसा सुरू असल्यामुळे हे पाणी गढुळलेले असायचे . ते पिण्यायोग्य नसायचे . अखेरीस कसा बसा त्या चिखलातून बाहेर पडलो . पाय धुण्यासारखी जागाच नव्हती . समोर एका लिंबाच्या झाडाला टांगलेला लता वेलींनी तयार केलेला १००% नैसर्गिक झुला दिसला !त्यावर जाऊन आडवा पडलो . पडल्या पडल्या डोळा लागला . चिखलामध्ये कष्ट खूप झाले होते . पायाचा चिखल तसाच वाळून गेला . वाळणाऱ्या चिखलामुळे पाय दाबले जात होते .जणू काही माझे पाय दाबायला कोणीतरी सेवक बसला आहे असा भास मला होत होता ! मला चांगलीच गाढ झोप लागली . डोळे उघडले तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता . बारा वाजून गेले असावेत . आता तर कुठल्याच आश्रमात भोजन मिळणार नाही ! उठून पटापट चालू लागलो . तशा नावांच्या गर्दीमध्ये सुद्धा दोन सारस पक्षी बिचारे कुठे मासे मिळतात का ते शोधताना दिसले . त्यांचे हे अनुकूलन किंवा ॲडॅप्टेशन पाहून मला आश्चर्य वाटले . कारण सारस पक्षी सहसा मानवी वावर असतो तिथे फिरकत नाही . एक पक्षी निरीक्षक म्हणून मात्र मला खूप आनंद झाला कारण नर्मदा मातेमध्ये पुन्हा एकदा सरस पक्षी दिसायला सुरुवात झाली !

कवींचा लाडका असलेला हा पक्षी प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो . परंतु हा आपल्या लक्षात राहतो ते याचे सुंदर रूप ,आकर्षक नृत्य , डौलदार चाल , झोकदार उडणे ,अजस्त्र पंख विस्तार आणि भव्य दिव्य आकारामुळे !
बराच वेळ माईमध्ये गढूळ पाणी असल्यामुळे कमण्डलु रिकामा झाला होता .कुठे पिण्याचे पाणी मिळते का ते पाहावे असा विचार करून वरती एका शेतामध्ये शिरलो . शेत नांगरले होते . थोडे अंतर गेल्यावर कुणीतरी मला आवाज देतो आहे असा भास झाला . मला वाटले शेतकरी रागवत असेल . कारण नांगरलेल्या शेतामध्ये कधी कधी पेरणी केलेली असते जी लक्षात येत नाही . एक छोटी कुटी शेताच्या कोपऱ्यात होती . तिथून कोणीतरी आवाज देत आहे असे वाटले . म्हणून मी कुटीच्या दिशेला गेलो . कुटीच्या आत मध्ये एक छोटासा साधू बसला होता . म्हणजे वय तसे ३०-३५ असेल .परंतु उंची पाच फूट होती . डोक्यावर टक्कल होते . दाढी अस्ताव्यस्त वाढली होती . तोंडामध्ये मावा होता . हातामध्ये चांदीचे कडे होते . नागा साधू आहे असे सांगत होता . बोलायला अतिशय हुशार होता . अंदर और बैठो असा आदेश त्याने मला दिला . मी आत मध्ये जाऊन बसलो . साधूच्या गप्पा सुरू झाल्या .मी काठाने आलो आहे कळल्यावर त्याने मला शिव्या घातल्या . चांगला रस्ता सोडून कशाला काठाने चालतो ? वगैरे वगैरे सुरू झाले .चप्पल तुटली तर पाचशे रुपये वाया जातील .हे ऐकून मला हसू आले ! त्याच्या बोलण्यामध्ये सतत पैशाचा उल्लेख यायचा . त्याच्याकडे १५ लाखाची गाडी आहे आणि तीन करोड बँक बॅलन्स आहे असे त्याने मला पुन्हा पुन्हा सांगितले . हा मूळचा नाशिकचा चौधरी घराण्यातला मनुष्य होता . जातीने जाट होता . पूर्वाश्रमीची माहिती आपण होऊन त्याने सांगितली . आता मात्र साधू बनला होता . ही एक बिघा जमीन साडेतीन लाख रुपये त्यांनी विकत घेतली होती आणि आता इथे तो आश्रम बांधणार होता . आता मी बसलो होतो ती छोटीशी कुटी तात्पुरती बांधली होती . याच्या लाख करोडोंच्या गप्पा ऐकून गावातील काही गरीब बिचारे भक्त त्याच्या सेवेसाठी थांबले होते . थोडेफार पैसे आपल्यालाही मिळतील असा भाव त्यात स्पष्ट दिसत होता ! या साधूने मोठ्या प्रेमाने मला दोन टिक्कड , भेंडीची भाजी ,चहा , दूध ,काकडी आणि भरपूर तूप चारले ! त्याच्याकडे एक खूप सुंदर देशी गाय होती . तिला तो फार लळा लावायचा . ती सकाळ संध्याकाळ २०-२० लिटर दूध द्यायची असे त्याने मला सांगितले ! मग हा साधू ते दूध गावकऱ्यांना वाटून उरलेल्या दुधाचे तूप बनवायचा . त्यामुळे याच्याकडे तूपच तूप होते ! त्याने मला तुपाच्या भरलेल्या बरण्या दाखवल्या ! माझ्यापुढे एक बरणी ठेवली आणि किती पाहिजे तेवढे तूप खा म्हणून सांगितले !  काही वेळापूर्वी आता आपल्याला अन्नाचा कण तरी मिळेल का अशा विवंचनेमध्ये असलेल्या माझ्यासमोर आता तुपाची भरलेली बरणी ठेवलेली होती ! नर्मदा मातेची लीला अगम्य आहे . साधू मनाने खूप चांगला होता . परंतु शिक्षणामुळे मार खाल्ला होता ! परंतु आपण कुठे कमी आहोत असे कळू द्यायचे नाही असा निर्धार तो स्वतःशी करून बसलेला होता !त्यामुळे तो प्रचंड बोल बच्चन टाकायचा ! त्याने मला सांगितले की या जगामध्ये केवळ सातच देश आहेत ! तो हे सर्व देश स्वतः फिरला होता . म्हणजे असा त्याचा दावा होता . मी देखील अज्ञानाचा बुरखा पांघरून त्याला वेड्यासारखे प्रश्न विचारू लागलो . एकदा पोटात अन्न गेले की माणसाला असले काहीतरी सुचते बघा ! मी त्याला सात देशांची नावे विचारली .त्याने मला सांगितले की पाकिस्तान अफगाणिस्तान आणि चीन ! बाकीच्या देशांना नावे नाहीत म्हणाला ! चीनमध्ये जाऊन मी सापांची शेती कशी करतात ते पाहून आलो आहे असे तो म्हणाला !त्याचे हे सर्व बोलणे त्याची एक-दोन भगत मंडळी कानात प्राण आणून ऐकत बसली होती ! बरेचदा आपल्याला समोरचा माणूस पाहून त्याला देखील आपल्यासारखेच ज्ञान असेल असा भ्रम उत्पन्न होतो . परंतु अनुभवाअंती आता माझ्या असे लक्षात आले आहे की समोरचा मनुष्य कितीही हुशार वाटला तरी त्याला झालेले देश काल परिस्थितीचे आकलन तुमच्यासारखे असेलच याची खात्री देता येत नाही किंबहुना ते तुमच्या आकलनासारखे नसतेच याची खात्री देता येते ! चीनला हा जीन देश म्हणायचा . याला मुसलमान धर्माची फार आवड होती . पाकिस्तान हा भारताचा मित्र आहे असे हा सर्वांना सांगायचा . जेवण केल्यावर त्याने मला एक खाट दिली आणि त्यावर पडायला सांगितले . मी झोपडीच्या बाहेर जाऊन जमिनीवर पडलो . झोपडी मध्ये याच्या मोठ्या मोठ्या बाता सुरू होत्या . कोणालाही फोन करायचा . आणि एक करोड , दीड करोड ४० लाख , ५० लाख वगैरे वगैरे मोठ्या मोठ्या बाता मारायचा !मला या साधूची खूप मौज वाटली . याला देशकाल परिस्थितीचे भान करून द्यावे असे वाटले . परंतु मोहन साधू आठवला आणि नाद सोडून दिला .दुपारी याने सुंदर असे कलिंगड कापून खायला दिले . हा साधू सेवा नक्कीच चांगली करणार याची खात्री पटली . बाकीचे बोलणे सोडून दिले तर बाकी सेवेमध्ये याचा हात कोणी धरू शकत नव्हते . अतिशय प्रेमाने त्याने मला चार वाजता निरोप दिला . इथून पुढे जवळच करोंद माफी गावामध्ये मोठा आश्रम होता . करुणाधाम आश्रम असे या आश्रमाचे नाव होते आणि इथे नुकतेच म्हणजे ४ एप्रिल २०२२ रोजी मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वतःच्या हाताने मूर्ती स्थापन केली होती . त्याचा मोठा सोहळा झाला होता . मी या आश्रमामध्ये जाऊन चहा घेतला . 

नागा बाबाच्या करोंदा गावातील कुटीमध्ये केलेल्या भोजनाची मी वहीमध्ये केलेली नोंद आणि करुणाधाम आश्रमाने माझ्या वहीमध्ये दिलेला शिक्का .सुदेश बालगोविंद शांडिल्य नावाचे एक कथा वाचक आहेत ज्यांनी हा आश्रम किंबहुना या नावाचे अनेक आश्रम नर्मदा खंडामध्ये सुरू केलेले आहेत .

या भागातील नर्मदा मातेचा किनारा असा आहे .
करोंद माफी येथील करुणा धाम आश्रमामध्ये अर्चन करताना मध्यप्रदेश चे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान .
याच काठावर नर्मदा मातेला दाखवला गेलेला सुंदर नैवेद्य !
पुढे काठाने चालत चालत बीजलगाव येथील नर्मदा मंदिरामध्ये जाऊन नर्मदा मातेचे दर्शन घेतले . गावकऱ्यांनी मंदिरामध्येच सुंदर असा चहा पाजला . 
हे बीजलगावचे मंदिर आहे . मंदिर खूप सुंदर आहे .
याच पायऱ्यांवर बसून मी चहा घेतला .

पिपलनेरीच्या जवळ आलो आणि एक अतिशय सुंदर नर तरस माझ्यासमोर दिसला . बराच वेळ याचे निरीक्षण केले . अतिशय शांतपणे त्याने माझ्याकडे पाहिले आणि कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही . हेच एखादा शेतकरी किंवा दिसला असता तर कदाचित तरस घाबरला असता . परिक्रमावासींना मात्र वन्य श्वापदे घाबरत नाहीत हे मी अनेक वेळा पाहिले . हातामध्ये काठी असून घाबरत नाहीत हे विशेष आहे . 
चितळे मैया यांची लछोरा येथील रेवा कुटी आता समोर दिसू लागली . या ठिकाणी भरपूर वाळूचे संचयन झालेले दिसते .
इथे ककडी नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते . ती मी पाण्यात उतरून पार केली .आता कच्चा पूल झालेला दिसतो आहे .नर्मदा खंडातील भौगोलिक परिस्थिती दिसामासाने बदलत राहते .
या भागातील नर्मदा मातेचे अद्भुत दर्शन !
या भागातील नौका अतिशय सुंदर आहेत .या भागातून काठाने चालण्याचा रस्ता कसा आहे ते या चित्रामध्ये छान दिसते आहे पहा !
जसजसे छिपानेर गाव जवळ येऊ लागले तसतसा अंधार पडू लागला . इथे मी देवास जिल्हा ओलांडून सिहोर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला होता .या ठिकाणी सिप नावाची नदी नर्मदा मातेला येऊन मिळते . ती नदी मी ओलांडली . छिपानेर मध्ये निंबार्क आश्रम नावाचा आश्रम आहे असे मला कळाले होते . मकवाना नावाचे एक भाजप कार्यकर्ते भेटले होते . त्यांच्या मुलांची लग्नं व्हावीत म्हणून आशीर्वाद मागत होते .मी मुलांना बोलवून घेतले आणि लग्न होण्यासाठी काय काय करणे आवश्यक आहे हे समजावून सांगितले .केवळ आशीर्वादाने लग्न जुळत नसतात .त्यासाठी लग्न करणाऱ्या व्यक्तीला लग्न करण्याची तीव्र इच्छा लागते . तसेच आपण हे लग्न निभावून मिळू शकतो हा आत्मविश्वास समोरच्या व्यक्तीमध्ये जागृत करावा लागतो . मुलांना मुद्दे पटले . या मकवाना यांनीच मला निंबार्क आश्रमात रहा असे सांगितले .  इथे दूरवर एका पुलाचे बांधकाम चालू होते . त्याच्या थोडासा अलीकडेच आश्रम होता .तिन्ही सांजा होता होता आश्रमात प्रवेश केला . आश्रमामध्ये एका बाजूला परिक्रमावासींसाठी निवासाची उत्तम सोय केलेली होती . या खोल्यांमधून पुलाचे बांधकाम दिसायचे . एका बाजूला छोट्याशा कुटीमध्ये सुंदर आश्रम होता . एक बंगाली साधू हा आश्रम चालवायचे परंतु ते बाहेर कुठेतरी गेले होते . एक वयस्कर सेवादार साधू किंवा परिक्रमावासी तिथे राहिलेले होते . त्यांनी माझी सर्व विचारपूस केली आणि वरती आसन लावायला सांगितले . आपल्याकडे साधारण या काळामध्ये वादळी पाऊस पडतो तसा त्यादिवशी पडला . आडवे तिडवे वारे आणि तुफान पाऊस ! असा पाऊस पडला की नर्मदा मातेच्या काठाने चालण्याचा मार्ग सगळा चिखलमय होऊन जातो . आणि चालताना कष्ट होतात . परंतु ती देखील नर्मदा मातेची इच्छा असे म्हणावे आणि चालत राहावे ! यापेक्षा दुसरे काही करणे आपल्या हातातच नसते !आश्रमाचा परिसर फिरून आलो . खूप सुंदर बाग बगीचा केलेला होता . आश्रमामध्ये सर्व गुरुपरंपरेचे फोटो लावलेले होते . साधकांसाठी उत्तम वातावरण महाराजांनी निर्माण केलेले होते . थोड्यावेळाने बंगाली बाबा आले . मला तोडकेमोडके बंगाली येते आहे हे पाहून त्यांना आनंद वाटला . रात्री त्यांनी उत्तम पैकी भोजन प्रसादी बनविली . इथे मी एकटाच मुक्कामाला होतो . एकटा परिक्रमावासी मुक्कामाला असला की आश्रम धारक देखील अतिशय निवांत असतात . छान गप्पा मारतात . ब्रह्मदेवाने लिंबाच्या झाडावर बसून अर्क म्हणजे सूर्य दाखवल्यामुळे या आश्रमाचे नाव लिम्बार्क आश्रम पडले असे मला कळाले . डॉक्टर अमित नावाचे एक कलकत्ता येथे राहणारे बंगाली बीएचएमएस डॉक्टर इथे साधनेसाठी येऊन राहिले होते . साधू महाराज तर पक्के बंगाली होतेच . ते दोघे काय बोलतात ते सेवादाराला कळायचे नाही .मला मात्र सर्व कळत होते .
हाच तो पूल त्याचे बांधकाम तेव्हा सुरू होते . आता ते पूर्णत्वाला गेले असावे .
निंबार्क आश्रमाचा सुंदर परिसर . इथे निंबार्काचार्यांनी तपश्चर्य केली असे देखील सांगतात .
आश्रमातील एक कुटी
परिक्रमावासी निवास व्यवस्था असलेल्या खोलीतून दिसणारा पुलाचा भाग .
आश्रमातील या भागामध्ये साधू राहत होते . त्यांच्या गुरुपरंपरेचे फोटो दिसत आहेत पहा .
अलीकडे हा पूल पूर्ण झाला आहे असे दिसते .
पुलाच्या पलीकडे एक डोहकूप असून ही एक उपसा जलसिंचन योजना आहे .इथेच जलशुद्धीकरण करून छिपानेरला पेयजलपुरवठा केला जातो .

 रात्री दिवे गेले . उशिरापर्यंत तुफान पावसाने झोडपून काढले . दिवे गेल्यामुळे आणि पावसाच्या आवाजामुळे विजांच्या कडकडाटामुळे रात्र भयानक वाटत होती . परंतु मला मुळातच अंधाराची भीती लहानपणापासून वाटत नाही ! त्यामुळे मी त्याचा देखील आनंद घेतला ! निसर्ग खूप सुंदर आहे ! त्याची विविध रूपे पाहायला मजा येते ! सकाळी लवकर उठून आश्रमाचा निरोप घेतला . आणि पुन्हा एकदा काठाने पुढे निघालो . चिखल माजलेला होताच . परंतु पर्याय नव्हता . आमच्या घोड्याच्या भाषेमध्ये एक लंबी छान असते . ती पकडली की वेगाने चालता येते . पहाटे पहाटे तशी लंबी चाल पकडली . वाटेमध्ये एक सुंदर स्थान लागले . सातदेव नावाच्या गावामध्ये पाताळेश्वराचे मंदिर आहे . हे मंदिर अतिशय अद्भुत स्थान आहे . कारण हे शिवलिंग वर दिसते तेवढे नसून खाली पातळापर्यंत पोहोचलेले आहे ! आता हे कसे काय कळणार ? तर बारकाईने पाहिले तर या शिवलिंगाची जलहरी आणि शिवलिंग याच्यामध्ये बारीक फट दिसते . या फटी मधून एक रुपयाचे नाणे आत जाते . एक रुपयाचे नाणे आत टाकून पटकन फटीला कान लावला तर नाणे खाली पडल्याचा आवाज येतो . हा आवाज बराच वेळ ऐकू येतो . मला आश्चर्य वाटले . अर्थात आवाज येण्यासाठी खूप शांतता लागते . त्यामुळे मी नर्मदा मातेची प्रार्थना केली की कोणाला पाठवू नकोस आणि एक रुपयाचे नाणे मी आत टाकले .अक्षरशः तीन मिनिटांपर्यंत मला ते नाणे पडण्याचा स्पष्ट आवाज ऐकू येत होता ! याचा अर्थ तिथून खाली असलेली पोकळी कित्येक किलोमीटर खोल होती ! कारण खाली पडणाऱ्या वस्तूवर काम करणारे गुरुत्वीय बल ९ .८०६६५ मी प्रति सेकंद² एवढ्या ताकतीने काम करत असते !अर्थात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने पडलेली कुठलीही वस्तू प्रत्येक सेकंदाला सुमारे दहा मीटर एवढ्या गतीने खाली खेचली जाते . आणि ही गती दर सेकंदाला वाढत जाते .हे फारच अद्भुत आहे ! कारण तुम्हाला कदाचित वाटू शकेल की केवळ तीन मिनिटांनी असे काय होणार आहे ,तर तुम्हाला त्याचे गणितीय सूत्र सोडवून दाखवतो . एखादी गोष्ट जर तीन मिनिटे पृथ्वीवर खाली पडत राहिली तर तीन मिनिटानंतर तिने पार केलेले अंतर हे १५८ .८६ किमी असेल व तीन मिनिटांच्या नंतर तिची गती 
१.७६ किमी प्रति सेकंद असेल ! कल्पना करून बघा ! बरं मला तीन मिनिटे आवाज येतो आहे याचा अर्थ तिथे आजूबाजूला कुठेही आवाजाला जाण्यासाठी जागा शिल्लक नव्हती ! शिवाय ध्वनीचा वेग पाहता मला ऐकू येणारा आवाज हा खूप नंतर ऐकू येत होता !
अर्थात हे गणित मुक्त पतनाचे अर्थात फ्री फॉल चे आहे . परंतु हे नाणे आपटत आपटत खाली चालले आहे अशी कल्पना केली तरी सुद्धा ते अंतर काही कमी भरत नाही ! एकंदरीत सर्वच अद्भुत होते ! ज्यांना मी काय म्हणतो आहे याचा अनुभव घ्यायचा असेल त्यांनी आपल्या घराजवळ असलेल्या कुपनलिकेपाशी किंवा बोरवेलपाशी जावे आणि एक छोटासा खडा आत मध्ये टाकून कान लावून ऐकावे! तुम्हाला खाली पडणाऱ्या वस्तूचा कसा आवाज ऐकू येतो ते लक्षात येईल . अगदी तसाच हा आवाज होता .पाताळेश्वर महादेवांच्या खाली निश्चितपणे पातळ लोकाकडे जाणारा मार्ग आहे ! नर्मदा पुराणा मध्ये देखील या स्थानाचे खूप महात्म्य वर्णन केलेले आहे . 
विशेषतः हा भूगर्भाची अंतर्गत संरचना पाहिली तर आपल्या लक्षात येते की हे किती खोल छिद्र आहे ! आपण शुद्ध भारतीय आहोत त्यामुळे आपल्याला पाताळ लोक वगैरे म्हटले की थोतांड वाटते परंतु अपर क्रेस्ट ,लोवर क्रेस्ट , मँटल असे इंग्रजी शब्द वापरले की खूप भारी वाटते ! म्हणून दोन्ही भाषांमध्ये आकृती खाली दिल्या आहेत . विषय निघालाच आहे म्हणून सांगतो . आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सात पाताळ लोक किंवा सप्त पाताल मानले जातात .
अतल , वितल , सुतल , तलातल , महातल , रसातल , पाताल . रसातळाला जाणे अशी मराठी मध्ये म्हण आहे पहा .आजही पृथ्वीवरील सर्व उंच शिखरे पदाक्रांत झाली आहेत परंतु पृथ्वीवरील खोल गुहांपर्यंत कोणीही पोहोचू शकलेले नाही आणि कित्येक दिवस प्रवास केला तरी गुहांची खोली संपत नाही अशा अनेक गुहा पृथ्वीमध्ये असल्याचे आता सर्वच लोकांना माहिती आहे .  अशा साहसी मोहिमा करताना अनेकांनी आपले प्राण देखील गमावले आहेत किंवा अनेक जण अशा गुहांमध्ये अडकून देखील पडलेले आहेत .
जगामध्ये अनेक पाताळ लोक सदृश्य गुहा आहेत .
अज्ञातवाटांचा शोध घेणे ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे त्यामुळे गुहा त्याला आकर्षित करतात .
एकापेक्षा एक खोल गुहा आहेत .
अशा अनेक गुहा जगात सर्वत्र आहेत .यालाच आपले पूर्वज पातळ लोक म्हणत असावेत .
जॉर्जिया देशातील कॉकेशियस पर्वत रांगेतील क्रुबेरा गुहा ही अशीच जगातील सर्वात खोल गुहा मानली जाते .जिथे पर्यंत मनुष्य पोहोचू शकला आहे . अशा अनेक गुहा आहेत .





हेच श्री पाताळेश्वर महादेवांचे शिवलिंग आहे . याच्याखाली १००% खोल गुहा आहे .

इथे अजून एक महत्त्वाची घटना घडते . इथे तपस्या करत असलेले सात देव म्हणजे प्रत्यक्षामध्ये सप्तऋषी असून त्यांचा इथे कायम वास आहे अशी लोकांची मान्यता आहे . बंगलोर मध्ये राहणारा शिवानंद भारती नावाचा माझा एक मित्र होता .त्याच्याशी सप्तर्षी संवाद साधतात असे तो मला सांगायचा . आता तो आपल्यामध्ये नाही परंतु तो अतिशय उच्च कोटीचा साधक निश्चितपणे होता . या शिवलिंग वरती एक तोडफोड केल्यासारखी खूण दिसते . त्याची कथा अशी सांगतात की इथे असलेला एक केवट नाव बांधण्यासाठी दगड शोधत होता . त्याला वाटले हे शिवलिंग बरे आहे म्हणून त्याने ते फोडून खाली नेण्याचा प्रयत्न केला त्याच्या त्या खुणा आहेत . त्यालाच शोध लागला की हे शिवलिंग खूप खोल आहे . सातदेव या ठिकाणी संपूर्ण परिक्रमा करताना सात रात्री राहण्याचा प्रघात आहे .तरच देव साथ देऊ म्हणतात !जेव्हा पृथ्वीवर प्रलय येतो तेव्हा विष्णू भगवंत मत्स्यरूपाने येऊन सप्तर्षींना उचलून नावेमध्ये बसवून त्यांचे प्राण वाचवतात . व नंतर पुन्हा नवीन सृष्टी निर्माण करताना सप्तर्षी त्यांना हवी तशी ती उभी करतात असे येथे असलेल्या साधूने मला सांगितले . या साधू महाराजांना बहुतेक भरपूर भाजले होते किंवा महारोग झाला होता . परंतु तरी देखील साधू तो साधूच ! अतिशय प्रेमाने ज्यांनी मला चहा आणि बालभोग करवला . इथे शेजारीच परिक्रमावासींची राहण्याची सोय करण्यात आलेली होती . इथे काही परिक्रमा वासी बसले होते त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या . मला हे ठिकाण फार म्हणजे फार आवडले ! विशेषतः तीन मिनिटापर्यंत नाण्याचा कानामध्ये होणारा खण खण खण खण आवाज मला या पृथ्वीवर आपण किती तोकडे आहोत याची जाणीव करून देऊन गेला ! आजही मला तो आवाज स्पष्टपणे आठवतो .
पाताळेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार .
श्री पाताळेश्वर महादेव .
मंदिराचे प्रवेशद्वार
बऱ्याच लोकांना या शिवलिंगाचा महिमा माहीत नाही तेच बरे आहे ! नाहीतर लोकांनी नाणी टाकून पाताळ लोक बुजवून टाकला असता !
सिपनदीचा आणि नर्मदा मातेचा संगम खूप सुंदर आहे .
या भागामध्ये अशा वाळू उपसणाऱ्या खूप नौका आहेत .
छिपानेर गावामध्ये धुनीवाले दादाजी यांचा देखील आश्रम आहे . परंतु मी इथे थांबलो नाही .
आश्रमामध्ये लावलेले झेंडे लक्षवेधी आहेत .  

इथे चालताना एक गमतीशीर गोष्ट पाहायला मिळाली होती . नर्मदा मातेच्या पाण्यासाठी एक मार्गीका करण्यात आली होती . याच्या शेजारून चालल्याचे मला आठवते ! तेव्हा त्यात एवढे पाणी नव्हते जितके आता दिसते आहे . बहुतेक तेव्हा त्याचे बांधकाम सुरू होते . ही मार्गिका कशासाठी काढली आहे ते सांगणारे कुणी मला भेटले नाही . परंतु तो कालवा अथवा जल मार्गिका लक्षात राहिली .
असे म्हणतात की संपूर्ण जगबुडी झाली तरी नर्मदाखंड मात्र बुडत नाही . त्यातील सर्वात महत्त्वाचे स्थान हेच सातदेव पाताळेश्वर आहे . इथेच नर्मदा मातेच्या कृपेने पुन्हा एकदा नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी लागणारी यंत्रणा कार्यरत केली जाते .अशी मान्यता आहे . या ठिकाणी काही काळ बसलो .इथे जबरदस्त ऊर्जा आहे हे कोणालाही जाणवते . महाराजांचा सत्संग घडला . आणि पुढे निघालो . नर्मदा मातेचा किनारा पकडला . या नर्मदा मातेच्या काठावर अशी किती गुपिते दडलेली आहेत याचा थांगपत्ता लागणे कठीण आहे . अशा अनेक गुपितांना कवेमध्ये घेत ती मात्र शांतपणे ,अखंडितपणे ,सदोदितपणे वाहतेच आहे . काठावरील जनजीवन पाहतेच आहे . सर्व दुःखे कष्ट त्रास साहतेच आहे . कुठल्याही नदीचे जीवन आपल्याला खूप काही शिकवून जाते . ती कधीच कोणामध्ये भेदभाव करत नाही . डावा किनारा उजवा किनारा दोन्ही तिच्यासाठी सारखेच . विषारी सापाला देखील ती पाणी पाजणार आणि गोमातेला देखील पाणीच पाजणार . तिला कुठलीही माया नाही . तिला स्वतःची काया नाही . जसा भूप्रदेश येणार तसा आकार ती घेणार . कधी संथ ,शांत , शीतल तर कधी तप्त , कृद्ध , खळाळती ! कधी प्रेमळ , नितळ ,निर्मळ तर कधी घातक ,गढूळ , मचूळ ! कधी जीवनदायीनी तर कधी मोक्षदायीनी ! आपण फक्त एकच करायचे ! तिचा किनारा सोडायचा नाही ! पुढचे सगळे ती बरोबर करते ! आईच ना ती ! तुमची आमची साऱ्या विश्वाची आई !नर्मदा माई ! नर्मदे हर !


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका (Index)

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !