लेखांक १५१ : धर्मपुरीचे महान तपस्वी श्री काशी मुनी उदासीन यांचा दुर्दैवी देहत्याग
पामाखेडी आश्रमात पहाटे लवकर जाग आली .इथे अर्थातच डोलडाल अथवा निस्तारासाठी बाहेर जायचे होते . परंतु हा वनाप्रदेश असल्यामुळे काही काळजी घ्यावी लागते . पहाटेची अंधारी वेळ ही हिंस्र श्वापदांची आवडती वेळ असते . रात्रभर ज्यांना शिकार मिळाली नसेल असे प्राणी सकाळी लवकर उठणाऱ्या शाकाहारी प्राण्यांची वाट पाहत असतात . आपल्या स्वस्थानी परतण्यापूर्वी एखादी शिकार हाताला लागली तर जाता जाता करावी असा त्यांचा प्रयत्न असतो .मनुष्यप्राणी हा काही त्यांच्या आहार साखळीतला घटक नाही . परंतु शौचाला खाली बसलेला मनुष्य दुरून पाहिल्यावर एखादी शेळी किंवा मेंढी किंवा अन्य जनावर वाटण्याची शक्यता फार असते . त्यामुळे असा एखादा भ्रमित प्राणी मागून अचानक हल्ला करण्याची शक्यता वाढते . अशावेळी हा मनुष्य आहे असे कळल्याबरोबर तो तुम्हाला टाकून पळून जातो . परंतु तोपर्यंत त्याने मान किंवा गळा पकडल्यावर त्या ताकदीमुळे मनुष्याचा प्राण सुटण्याची शक्यता असते . म्हणून पहाटे जंगलामध्ये जाताना गळ्याभोवती मफलर किंवा एखादा मोठा पंचा गुंडाळून जावा . जेणेकरून चुकून माकून एखाद्या प्राण्यानी गळा धरलाच तरी त्याच्या जिभेला कापडाचा स्पर्श होऊन त्याच्या लक्षात येते की हा आपला आहार नाही . आणि तो आपल्याला टाकून निघून जातो . त्याचबरोबर त्याचे दात देखील मानेमध्ये सहजासहजी घुसू शकत नाहीत . ऐकायला हे थोडेसे भयानक वाटते परंतु विदारक वास्तव आहे . आजही भाबरी आश्रमामध्ये सेवेसाठी राहिलेले असताना पहाटे बाहेर पडल्यावर माझ्या गळ्याभोवती रुमाल किंवा गमछा गुंडाळलेला असतो .
वाघ किंवा अन्य मांसाहारी प्राण्यांच्या जबड्यामध्ये इतकी भयानक ताकद असते की त्यांच्या एकाच चाव्यामध्ये आपला मज्जा रज्जू तुटू शकतो . किंवा श्वासनलिका बंद पडून गुदमरून मृत्यू होतो . इथे जर गळ्याभोवती जाड आवरण गुंडाळलेले असेल , तर मात्र या प्राण्यांना आपल्या जबड्यामध्ये काहीतरी वेगळे आहे हे जाणवते आणि ते चटकन सावज सोडून पळून जातात . सुदैवाने आजपर्यंत नर्मदा परिक्रमा वासी अशा प्रकारच्या हल्ल्याला बळी पडलेले नाहीत . कारण प्रक्रियेचा पांढरा पारंपारिक वेश हिंस्र श्वापदांना देखील माहिती झालेला आहे .ज्याप्रमाणे व्याघ्र प्रकल्पामध्ये फिरणाऱ्या जिप्सी गाड्यांना वाघ काही करत नाही तसे परिक्रमावासींचे झालेले आहे . परंतु तरीदेखील काळजी घेणे हे निश्चितपणे आपल्या हातात आहे कारण भारतातील सर्वाधिक वाघ नर्मदा खंडाच्या आसपासच विचरण करत असतात हे आपण विसरून चालणार नाही .
असो . इथून बहुतांश परिक्रमावासी महामार्गाने धर्मेश्वर या तीर्थक्षेत्रावर जातात . डावीकडे हाच रस्ता पुनासा धरणाच्या इंदिरासागर जलाशयाकडे जातो . इंदिरा सागर जलाशयाची भिंत इथून २१ किलोमीटर अंतरावर आहे . हा मार्ग नवीन झालेला आहे असे कळाले . परंतु मला नर्मदा माईच्या काठाने चालायचे होते म्हणून मी थोडा लांबचा मार्ग निवडला . नंदकुमार कुंभार यांना प्रेमपूर्वक नर्मदे हर केले आणि पहाटे साडेपाचच्या सुमाराला एकटाच पुढे निघालो . चांगल्यापैकी उजाडलेले होते . नर्मदा मातेच्या काठावर असलेली गावे पार करू लागलो . डांग गावातून पुढे गेल्यावर डंठा गाव पार केले . मला या नावांची मोठी मौज वाटली . इथे पामाखेडी खंडवा जिल्ह्यामध्ये येत होते आणि मध्ये एक नदी पार केली की देवास जिल्हा सुरू होत असे . नंदाणा गाव पार करून पोखर गावामध्ये असलेल्या धर्मेश्वर आश्रमामध्ये पोहोचायचे अशी माझी साधारण पुढची यात्रा होती . धर्मेश्वर महादेवाचे मूळ मंदिर धर्मराज युधिष्ठिर यांनी स्थापन केले असून ते आता डूब क्षेत्रामध्ये येते . त्यामुळे या नवीन क्षेत्राचा विकास एका साधू महाराजांनी केला होता . त्यांचे नाव काशीमुनी उदासीन महाराज . यांना अवश्य भेट असे काही लोकांनी मला वेळोवेळी सांगितले होते . त्यामुळे महाराजांना भेटण्याची मनामध्ये तीव्र ओढ होती . यांना देखील अनेक भाषा येत असत . हे पूर्वाश्रमी मोठे न्यायाधीश होते . तसेच त्यांनी नर्मदे काठी घोर तपश्चर्या केली आहे . त्यांचे वय ९० च्या पुढे आहे . त्यांच्या जटा फार लांब आहेत . अशा एक ना अनेक गोष्टी मला लोकांकडून त्यांच्याबद्दल कळाल्या होत्या . इथे नर्मदा मातेचा काठ अतिशय निर्मनुष्य आणि भकास होता . पाणी साठ्यातले पाणी उतरल्यामुळे वाळलेल्या जंगलाचा पट्टा तयार झालेला होता . जंगल मात्र खूप चांगले होते . गेले काही दिवस अंगातली उष्णता खूप भडकली होती . त्यामुळे आहार सुधारावा लागणार नाही तर पोटाची वाट लागणार अशी अवस्था होती . परंतु त्या दिवशी सुदैवाने मला वाटेमध्ये दोन मोठे पेले लस्सी , तांब्याभर दूध आणि यथेच्छ ताक प्यायला मिळाले !त्यामुळे पोटातला दाह शांत झाला . याही वेळेस मला ताक पाजणारा मनुष्य गाडीवरून आला आणि त्याने देखील मी आज विनाकारण मार्ग बदलून आल्यामुळे तुमची भेट झाली असे मला सांगितले . मला किशन गोपाल यादव ची आठवण याप्रसंगी आवर्जून झाली . देवास जिल्ह्याच्या सीमेवरच या माणसाने मला ताक पाजले .
पामाखेडी , डांग आणि डंठा ही गावे नर्मदा मातेच्या किती काठावर आहेत हे आपल्याला या उपग्रह चित्रातून लक्षात येईल . या मार्गाने दुर्दैवाने एकही परिक्रमाची जात नाही परंतु हा अतिशय सुंदर परिक्रमा मार्ग आहे . शेती वगळता वरती असलेले घनदाट जंगल आपलं लक्ष वेधून घेईल .
इथे जाट लोकांची प्रामुख्याने वस्ती आहे . डंठा गावामध्ये अजून एक गोष्ट आढळली . इथे एक मोठे चर्च उभे राहिले आहे . स्थानिक आदिवासी महिलांना विविध माध्यमातून धर्म परिवर्तित करण्याचा प्रयत्न इथे मोठ्या प्रमाणात चालू आहे . महिलांना देखील आर्थिक प्रलोभनांचे आकर्षण स्वभावतः अधिक असल्यामुळे त्या चटकन अशा भूलथापांना बळी पडतात असे प्रस्तुत लेखकाचे निरीक्षण आहे .
डंठा गावात उभे राहिलेले मोठे चर्चगरीब भोळ्या अशिक्षित स्थानिक महिलांना इथे मोठ्या प्रमाणात भुलवले जाते .
याच गावातील ह्या हनुमान मंदिराची अवस्था पाहिल्यावर आपल्याला स्थानिक हिंदूंची अनास्था लक्षात येईल .
डांग इथे एका नर्मदेश्वर मंदिरामध्ये काही काळ थांबलो . आणि पुढे निघालो . टिटवास रोहान्या आदि गावांच्या हद्दी पार करत थेट पोखर खुर्द गावात पोहोचलो . इथेच नूतन धर्मेश्वर मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती .या ठिकाणी नर्मदा मातेने माझ्या साक्षीभावाची मोठीच परीक्षा घेतली .मंदिराच्या जसा जवळ जाऊ लागलो तशी मंदिरामध्ये खूप गर्दी आहे असे जाणवू लागले . बाहेरच्या शेतामध्ये शेकडो गाड्या लागलेल्या होत्या . मंदिरामध्ये गेल्यावर जे काही मला कळले ते ऐकून मी हा हबकलोच . या मंदिराचे महंत श्री काशीमुनी उदासीन यांनी तीन मे रोजी हर्दा येथे रेल्वेखाली जीव देऊन आत्महत्या केल्याचे मला सांगण्यात आले .आज त्यांच्या सतराव्याचा भंडारा आयोजित करण्यात आला होता . त्यासाठी ही सर्व गर्दी जमली होती . यात दोन प्रकारची गर्दी होती .एका बाजूला हजारो ग्रामस्थ जमले होते . दुसऱ्या बाजूला शेकडो संत महंत साधू संन्यासी जमले होते . माझ्यासारखे मोजके एक-दोन परिक्रमावासी होते . मी अर्थातच संतांच्या सोबत आसन लावले . संतांनी मला बोलावून घेतले आणि सांगितले की तिकडे जाऊ नकोस . या सगळ्या प्रकारामुळे एकंदरीत मला फारच वाईट आणि विचित्र वाटू लागले . ज्यांच्या दर्शनाची आस मनामध्ये घेऊन आलो होतो त्यांच्या तिथीचे भोजन करावे लागणे यापेक्षा वाईट काय असू शकते . इथे दुपारपर्यंत थांबावे आणि तीन वाजता भंडारा घेऊन पुढे निघावे असे मी मनात ठरवले . हा दिवस होता शुक्रवार दिनांक २० मे २०२२ . इथले वातावरण खूपच नकारात्मक होते . प्रत्यक्षामध्ये काशी मुनी उदासीन महाराजांनी येथे स्वर्ग उभा केला आहे हे उघड्या डोळ्यांनी दिसत होते . अतिशय सुंदर अशा बागा मोठमोठे वृक्ष सर्वत्र लावले होते . अन्य कुठल्याही आश्रमात नसलेले सुंदर असे रेवा कुंड स्नानासाठी तयार केले होते . यामध्ये फक्त साधू संतांना स्नान करण्याची परवानगी होती . मंदिराचे बांधकाम अतिशय भव्य दिव्य होते . सर्वच परिसर अतिशय सुसज्ज पद्धतीने उभा करण्यात आला होता . हजारो लोकांचा समुदाय सहज सामावेल असा मंदिराचा परिसर होता . संत मंडळी आणि परिक्रमावासी यांच्या मुक्कामाची उत्तम सोय करण्यात आली होती . इथे मात्र दोन तट पडलेले स्पष्टपणे दिसत होते . ग्रामस्थ एका बाजूला घोळका करून बसले होते . आणि संत मंडळी एका बाजूला चर्चा करत बसली होती . भक्तमंडळी मात्र अतिशय दुःखावेगाने रडताना दिसत होती . काहीतरी गडबड आहे हे कोणाच्याही लक्षात येईल असे वातावरण होते .
आम्ही सर्वजण बसलो होतो ती निवासाची जागा .धर्मराज युधिष्ठिर यांनी स्थापन केलेले धर्मेश्वर महादेवाचे शिवलिंग
हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि अन्नक्षेत्र आहे .
ब्रह्मलीन श्री काशीमुनी जी महाराज उदासीन .
मंदिराचे सुरेख आवार . याच ठिकाणी ग्रामस्थ बसले होते आणि भजन ही याच ठिकाणी झाले
हेच ते पवित्र रेवाकुंड
धर्मराज युधिष्ठिर महादेवाची स्थापना करत आहेत असे चित्र मंदिरात लावलेले आहे .
महाराजांची एक भाव मुद्रा
महाराजांचे आधार कार्ड . अर्थातच यावरील जन्म तिथि काल्पनिक आहे .महाराजांचे वय याहून खूप अधिक होते असे कळते .
इथे एक नागा साधू माझ्याकडे आला . त्याने मला सांगितले , " तू परिक्रमा मे है।मतलब संत है । तू यहाँ का भंडारा नही खाएगा । " "जी महाराज " मी म्हणालो . संतांची चर्चा चालली होती तिथे मी जाऊन बसलो . नर्मदा खंडातील सर्व प्रमुख मठपती महंत येथे आलेले होते .या सर्वांचे एकत्र दर्शन झाले हे आपले किती मोठे भाग्य असे मला वाटले ! मी सर्वांना नमस्कार देखील केला . परंतु सर्वांची चर्चा वेगळीच चालली होती . नागा साधू उठून उभा राहिला आणि सर्वांना सांगू लागला , " महाराज जी बहुत बडे तपस्वी थी । वे आत्महत्या नही कर सकते । यह बहुत बडी साजिश है । मंदिर की जमीन के लिये यह कांड कराया गया है । हम साधुसंत यहा भोजन नही पायेंगे । अगर पायेंगे तो महाराज हमे माफ नही करेंगे । वे मुझे बता रहे है की उनका खून हुआ है । " सर्वच साधुसंतांनी एकमुखाने या गोष्टीला अनुमोदन दिले . इकडे गावकऱ्यांचे वेगळेच चालू होते . आलेल्या साधुसंतांची यथेच्छ चेष्टा करण्याचा कार्यक्रम चालला होता . जायचे तर जा उपाशी . आम्हाला काही फरक पडत नाही ! अशी चर्चा या बाजूला चालू होती . एकंदरीत वातावरण फारच गढूळ झाले होते . साठीच्या पुढे गेलेले केस काळे केलेले ,तुळतुळीत दाढी केलेले , दिसतील अशा पद्धतीने सोन्याचे दागिने घातलेले काही गावकरी घोळका करून बसले होते . दिसण्यावरून मोठे जमीनदार वाटत होते . या गटाचा साधू संतांना विशेष विरोध चालू होता . मी परिक्रमावासी असल्यामुळे सर्वत्र मुक्त संचार करत होतो . त्यांच्यामध्ये देखील जाऊन मी बसलो . त्यांची बाजू ऐकून घेतली . त्यांचे म्हणणे होते की आम्ही फक्त काशी मुनी महाराजांचं ऐकायचो . हे कोण आम्हाला ज्ञान शिकवणारे ? आता महाराज देहामध्ये राहिलेले नाहीत . त्यामुळे आम्ही अन्य कुणाचे ऐकणार नाही . आमचे गाव आहे . आम्ही काहीही करू . बाहेरच्या लोकांनी आमच्या गावात ढवळाढवळ करू नये . एकंदर असा सूर ग्रामस्थांकडून ऐकायला मिळाला . यानंतर मी माझा मोर्चा भक्तमंडळींकडे वळवला . त्या सर्वांना मात्र आतोनात दुःख झाले होते . आधीच महाराज देहामध्ये नाहीत आणि त्यात त्यांच्या समोर ही अशी भांडणे लागणे हे किती दुर्दैवी आहे असे भक्तांचे मत होते . त्यांच्या मते ही भांडण करण्याची वेळ नव्हती . महाराजांच्या आत्म्याला किती क्लेश होत असतील असे सर्व भक्त एकमुखाने म्हणत होते . महाराज देहामध्ये नाहीत ही कल्पना केल्याबरोबर त्यांना गहिवरून यायचे आणि अश्रूंचा बांध फुटायचा . विशेषतः स्वामीं सोबत अनेक दशके घालवलेले काही लोक मला भेटले . या सर्वांचे एकच मत होते . ते महाराजांना जितपत ओळखत होते त्यावरून महाराज कधी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतील अशी पुसटशी देखील शक्यता त्यांना वाटत नव्हती . एकंदरीत सगळेच गोंधळाचे वातावरण होते . बरं इथून पुढे जावे तर परिक्रमेच्या नियमांचा भंग होणार होता . समोर आलेल्या कुठल्याही अन्नाला नाही म्हणायचं नाही असा तो नियम होता . आता काय करावे अशा द्विधा मनस्थितीमध्ये मी पडलो होतो . कारण नागा साधू तर मला जेऊ नको म्हणाला होता . तो इतका क्रोधायमान झालेला होता ती कदाचित त्याने मला जेवताना बघून सोट्याने बडवले सुद्धा असते ! इतक्यात पंगत की हरिहर झालीच ! काय करावे असा प्रश्न मला पडलेला असताना अचानक एक सज्जन सद्भक्त मनुष्य माझ्या जवळ आला . ते मला म्हणाले महाराज तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही . मी त्यांना नागा साधूचा निरोप सांगितला . ते म्हणाले माझे नाव मोहन शेठ पाटीदार . ही संपूर्ण जागा मीच मंदिरासाठी दान केलेली आहे . या जागेवर येणाऱ्या प्रत्येक उपाशी जीवाला अन्नाचा कण मिळावा अशी महाराजांची इच्छा असायची . त्यासाठी मी जागा महाराजांना दान केली होती . आज तुम्ही जर उपाशी गेलात तर महाराजांना आवडणार नाही . साधू काय करतील हा त्यांचा प्रश्न आहे . मी तुम्हाला काशीमुनी महाराजांच्या वतीने विनंती करतो की तुम्ही भोजन प्रसादी घ्यावी . इतके सारे बोलल्यावर माझा नाईलाज झाला आणि मी शांतपणे जेवणाच्या पंगतीत जाऊन बसलो . नावापुरता प्रसाद ग्रहण गेला . नकारात्मक वातावरणामुळे भूक लागलीच नव्हती . सुदैवाने मला जेवताना कुठल्या साधूने पाहिले नाही . इथे अनेक तऱ्हेचे अनेक क्षेत्राचे आणि अनेक आखाड्यांचे साधू आले होते . कोणीही अन्नाचा कणही ग्रहण केला नाही . पाणी देखील प्यायले नाहीत . मी सवयीप्रमाणे भोजनाचा नैवेद्य दाखवून तो ग्रहण केला त्यामुळे त्या अन्नातील गुणदोष आपल्याला लागू होत नाहीत . आधीच उकडा वाढत चालला होता . त्यात हे आजूबाजूचे वातावरण देखील तापत चालले होते . यावर एकच उपाय आहे हे जाणून मी रेवा कुंडामध्ये उतरलो ! शांतपणे स्नान करू लागलो . कुंडामध्ये अनेक बेडूक होते . त्यांच्या लीला पाहत राहिलो . माझे पाहून अजून काही साधू पाण्यामध्ये उतरले . इथे भोपाळचे एक मोठे महंत आले होते . यांच्यासोबत अंगरक्षक होते . त्यांना मी पोहायला शिकवले . पोहायला शिकवण्याच्या काही चुकीच्या पद्धती प्रचलित आहेत . ज्यामध्ये पोहायला न येणाऱ्या माणसाला पाण्याची कायमची भीती बसेल अशा पद्धतीने शिकवले जाते . माझी पद्धती याच्या बिलकुल उलटी आहे . हसत खेळत माणूस पोहायला शिकला पाहिजे आणि पाण्याचे भय देखील निघून गेले पाहिजे असे माझे मत आहे . महाराजांना त्या पद्धतीने पोहायला शिकवले आणि त्यांना चटकन पोहायला येऊ देखील लागले ! साधू किती हुशार असतात हे मला त्यादिवशी पुन्हा एकदा कळाले . सर्वसामान्य माणसाला जी गोष्ट शिकायला अधिक काळ लागतो ती साधू तुलनेने लवकरात आत्मसात करतात . मी पोहायला शिकवतो आहे हे कळल्यावर आज रात्री इथेच रहा उद्या आम्हाला देखील शिकव असे काही साधूंनी सांगितले आणि मी अर्थातच त्याला अनुमोदन दिले . साधूंनी विनंती केल्यावर नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही . संध्याकाळी देखील पुन्हा एकदा स्नान केले . रेवा कुंड अतिशय पवित्र आहे . त्यामध्ये नर्मदा मातेचे पाणी मोटरने आणून ओतले जाते . मी परिक्रमेमध्ये असल्यामुळे स्वतः हात पाय झाडून पोहलो नाही . परंतु अन्य साधूंना पोहायला शिकवले . मला जे काही स्वतःला येते ते इतरांना शिकवायला खूप आवडते .
जे जे आपणासी ठावे । ते ते हळूहळू सिकवावे ।
शहाणे करून सोडावे । अवघे जन ।
असे रामदास स्वामी सांगतात . मी प्रथम नोकरी निमित्त इन्फोसिस या कंपनीमध्ये मैसूर या ठिकाणी कामाला होतो . ते कॅम्पस फार मोठे असून तिथे स्वतंत्र क्रिकेट स्टेडियम तसेच अप्रतिम असा जलतरण तलाव किंवा स्विमिंग पूल आहे . भारतीय महिला क्रिकेट संघ त्या काळामध्ये खूप चांगला खेळत असे . त्यामुळे नारायण मूर्ती यांनी त्या सर्व मुलींना बक्षीस म्हणून इन्फोसिस मध्ये राहून त्या मैदानावर सराव करण्याची अनुमती दिली होती . माझी बहीण त्या काळात पुणे संघाकडून क्रिकेट खेळायची . तिची एक मैत्रीण भारताच्या संघामध्ये होती . तिच्यामुळे संपूर्ण भारतीय क्रिकेट संघाशी माझी चांगली ओळख झाली . मी रोज न चुकता चार तास पोहायचो .सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास. क्रिकेटचा संघ देखील जलक्रीडा करण्यासाठी तिथे यायचा . मी चांगले पोहायला शिकवतो आहे हे लक्षात आल्यावर एक एक करत संपूर्ण भारतीय महिला क्रिकेट संघ अतिशय शिस्तबद्धपणे माझ्याकडे पोहायला शिकू लागला . त्यातील अजिबात पोहता न येणाऱ्या सात मुलींना मी पोहायला शिकवले . या काळात झुलन गोस्वामी या आघाडीच्या गोलंदाजासमवेत मी टेनिस खेळायचो . मिताली राज देखील रोज भेटायची ! जिला महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर मानतात ! जवागल श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद हे देखील याच काळात मी जवळून पाहिले होते आणि माझी त्यांच्याशी ओळख करून देताना हा आपल्या मुलींचा स्विमिंग कोच आहे अशी करून दिली होती तेव्हा मला कोण अभिमान वाटला होता ! कोणालाही पोहायला शिकवताना मला हा प्रसंग आवर्जून आठवतो . मनुष्य कितीही मोठा झाला तरी पोहायला येत नसेल तर पाण्यापुढे किती अगतीक असतो हे मी स्वतः पाहिलेले आहे . त्यामुळे सर्वांनी आवर्जून वेळात वेळ काढून पोहायला शिकावे असा माझा आग्रह आहे . पोहण्यासारखा आनंद अन्य कुठल्याही व्यायामात नाही ! आमचे गाव वारणेच्या काठावर आहे त्यामुळे माझे वडील उत्तम पोहायचे . परंतु मला पोहायला शिकवणारे माझे गुरु माझे चित्रकलेचे शिक्षक होते . त्यांचे नाव गणपती मारुती माळी गुरुजी (सांगली ) . एसटी जोशी सर नावाचे चित्रकलेचे शिक्षक देखील आमच्या सोबत पोहायचे. कृष्णा नदीमध्ये या शिक्षकांनी मला पोहायला शिकवले . नंतर पुण्यात टिळक तलावावर आंतरराष्ट्रीय पद्धतीने पोहायला मला विकास शिंदे ,कृष्णा वाकचौरे ,लागू काका इत्यादी लोकांनी शिकवले .मी देखील माझ्या मुलाला उत्तम पोहायला शिकवले आहे . आणि ते देखील तमिळनाडूच्या नैसर्गिक तलावांमध्ये ! एकदा नैसर्गिक पाण्यात पोहण्याची भीती मोडली की माणूस कुठेही पोहू शकतो !असो . तर अशा रीतीने साधूंना पोहायला शिकवल्यानंतर मी पुन्हा एकदा त्यांच्या चर्चा ऐकू लागलो . इथे रात्री आठ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत गुरुजींच्या स्मरणार्थ भजन होते . ते संपूर्ण भजन मी पूर्णवेळ ऐकले आणि आनंद घेतला . भजनामध्ये ग्रामस्थ नाचत होते . भजनानंदामध्ये तल्लीन झालो . त्या रात्री केवळ दोन तास झोपलो . पहाटे रेवा कुंडामध्ये स्नान करून महादेवांची आराधना केली . सकाळ संध्याकाळ आरती चुकवली नाही . इथे नाशिकचे एक परिक्रमावासी होते ज्यांच्या दोन परिक्रमा झाल्या होत्या . नंदू शेठ कुंभार देखील सडक मार्गे चालत आले होते .केरळचे संन्यासी महाराज आले होते . अन्य काही परिक्रमावासी होते . आज भंडाऱ्याचा मुख्य दिवस होता .भंडाऱ्यासाठी साधारण वीस हजार लोक जमणे अपेक्षित होते . मी बसल्या बसल्या साधूंचे निरीक्षण करत होतो . आजच्या दिवशी देखील अनेक नवीन साधू आले . हळूहळू बरेच साधू जमले . सकाळी मी पुन्हा एकदा भोपाळच्या अंगरक्षक वाल्या साधूंना त्यांच्या विनंतीवरून पोहायचे धडे दिले .या स्वामींचे नाव स्वामी अनिलानंद असे होते . ते संत समितीचे राज्य अध्यक्ष आहेत असे कळते .
स्वामी अनिलानंद जी भोपाळनुकतीच यांची नियुक्ती संत समितीच्या अध्यक्षपदी झालेली आहे .
असो . यानंतर मात्र एक मोठे नाट्य तिथे घडले . ज्याचे आम्ही सर्व परिक्रमा वासी साक्षी ठरलो . इथे काही उदासीन आखाड्याचे साधू आले . ग्रामस्थांनी परस्पर कन्याभोजन सुरू केले . नंतर मग साधूंची पंगत बसवली . या एका प्रसंगावरून मोठा गदारोळ माजला . साधूंना न विचारता सर्व परस्पर चालू आहे याचा साधू समाजाने एक मुखाने निषेध केला . सर्वच साधूनी भोजन न घेता एकत्रितपणे स्थलत्याग केला . जाता जाता ते एक बॉण्ड पेपर पंडिता जवळ देऊन गेले . मी स्वतः तो कागद पाहिला . त्यामध्ये असे लिहिले होते की सर्व साधू समाजाच्या वतीने अमुक अमुक साधू महाराज हे या मठाचे उत्तराधिकारी राहतील .आणि याला कायदेशीर आव्हान देता येणार नाही . हा आखाड्याचा अंतिम निर्णय आहे . गावातील जाट समाजाचे गावकरी जमले होते . त्यांनी सर्वानुमते हा कागद नाकारला .त्यांनी लालजी बाबा नामक उत्तराधिकारी आधीच नेमलेला होता . अत्यंत बाका प्रसंग उभा राहिला . नर्मदा मैया असे काही दाखवेल असे स्वप्नातही वाटले नव्हते . मी साक्षी भावाने दोन्ही पक्षांकडे पाहत होतो . तोपर्यंत इकडे परिक्रमावासींची भोजनाची पंगत बसवली गेली आणि मला बोलवायला पुन्हा एकदा पाटीदार स्वतः आले .साधूंना रुद्राक्षाच्या माळा वाटण्यात आल्या होत्या . परिक्रमावासींना शाल आणि दक्षिणा देण्यात आली .भोजन प्रसादी आटोपून मी लगेच तिथून काढता पाय घेतला . पुढे घडणाऱ्या कुठल्याही नकारात्मक प्रसंगाला सामोरे जाण्याची माझी इच्छा नव्हती . मी पुन्हा एकदा महामार्ग नाकारला आणि मैयाचा काठ स्वीकारला .राहून राहून माझ्या मनामध्ये काशीमुनी उदासीन महाराजांबद्दल विचार येत होते . एखाद्या थोर तपस्वी माणसाची देखील किती वाईट अवस्था अंत समयी होऊ शकते हेच मैया मला जणू दाखवत होती . धासड बनासा किटीगाव पिपलिया मार्गे मी जंगलचा रस्ता पकडला . वाटेमध्ये मला अनेक ग्रामस्थ भेटत गेले . स्थानिक ग्रामस्थ कोणीही भंडाऱ्याला गेलेले नव्हते . ते मला मोठ्या आतुरतेने तिकडे काय चालू आहे हे विचारत होते . आणि मी तिकडे जाऊन आलो आहे हे कळल्यावर घोळक्याने माझ्याभोवती जमा होत होते . त्यांच्या चर्चा ऐकल्यावर मला बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होऊ लागला .सर्वांचे एकच मत होते की काशीमुनी महाराज असे काही स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करूच शकत नाहीत . इथे दोनच प्रकारचे लोक मी पाहिले . एक तर अत्यंत आनंदी आणि एक अत्यंत दुःखी . वाटेमध्ये ओम आनंद बाबा नावाच्या साधूच्या कुटीमध्ये काही काळ थांबलो . तिथे राधेश्याम गवळी नावाचा एक बाबांचा सेवक भेटला . त्याची विनोद आणि भरत नावाची दोन्ही मुले देखील तिथे होते . सर्वांनी मोठ्या प्रेमाने मला चहा पाजला . इथे देखील काय घडले ते जाणून घ्यायला बरेच ग्रामस्थ जमले . एकंदरीत सर्वच गावातील वातावरण तणावाचे होते . महाराज असे अचानक निघून गेले यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता . आणि महाराज रेल्वे खाली आत्महत्या करतील हे तर कोणालाच पटत नव्हते . अजून एके ठिकाणी भेटलेल्या ग्रामस्थांपैकी एक जण तर महाराजांनी देह ठेवल्याबरोबर तिथे तो स्वतः गेला होता . त्याने दाखवलेले महाराजांच्या देहाचे फोटो बघवणार नाहीत इतके वाईट होते . संपूर्ण देहाचे असंख्य तुकडे झालेले होते . सकाळी दहा वाजता गाडी क्रमांक १२१४१ लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेने त्यांना पिलियाखाल गावानजीक उडवले होते . आणि हा तिथे पोहोचला दुपारी दोन वाजता .चारच तासांच्या अंतरामध्ये महाराजांच्या देहाच्या तुकड्यांना सडल्याचा वास येऊ लागला होता .याबाबत सर्व लोक संशय व्यक्त करू लागले होते . कदाचित महाराजांचा आधीच घातपात झाला होता व केवळ देह रुळावर टाकण्यात आला होता असा सर्वांचा कयास होता . लोको पायलटने मात्र महाराज रुळावर उभे होते अशी साक्ष दिली होती असे देखील कळाले . परंतु महाराजांच्या सोबत नेहमी असणारी झोळी त्यावेळी त्यांच्यासोबत नव्हती हा अजून एक महत्त्वाचा कच्चा दुवा लोकांना वाटत होता . अशा अनेक संशयास्पद गोष्टी लोकांना खुपत होत्या . यावर उपाय म्हणून राईट टू पीएमओ चा अधिकार वापरावा असे त्यांना "एक परिक्रमावासी " सांगून गेला असे कळाले . त्यानंतर तपास देखील सुरू झाला आणि भोपाळचा एक अधिकारी चौकशीसाठी नेमण्यात आला असे लोकांनी मला सांगितले . साधूंच्या या विचित्र पद्धतीने जाण्याबद्दल लोकांना दुःख होते . मी त्यांना दासबोधामध्ये रामदास स्वामींनी काय सांगितले आहे ते सांगितले . रामदास स्वामी म्हणतात ,
म्हणोन साधूनें आपलें । जीत अस्तांच सार्थक केलें। शरीर कारणी लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥ जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचे शरीर पडो रानी। अथवा पडो स्मशानीं । तरी धन्य जालें ॥ २५ ॥ साधूचा देह खितपला । अथवा श्वानादिकी भक्षिला। हे प्रशस्त न वाटे जनाला । मंदबुद्धीस्तव ॥ २६ ॥ अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन । परी बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७ ॥ जो जन्मलाच नाहीं ठाईचा । त्यास मृत्य येईल कैंचा। विवेकबळें जन्ममृत्याचा । घोट भरिला जेणें ॥ २८ ॥ स्वरूपानुसंधानबळें । सगळी मायाच नाडळे। तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९ ॥ तो जीतचि असतां मेला । मरणास मारून ज्याला । जन्ममृत्य न स्मरे त्याला। विवेकबळें ॥३०॥
साधू हा मुळात जीवन्मुक्त आहे . त्याच्या देहाला जन्म मरण लागूच नाही . आपल्या विवेकाच्या बळाने तो कधीच्या काळचा मुक्त झालेला आहे . हे विचार ऐकून सर्वांना जरा बरे वाटले . सर्वांचे सांत्वन करून मी पुढे निघालो . एक प्रकारे या स्थानिक ग्रामस्थ लोकांनी या विरोधात काहीतरी कृती केली हे बरे झाले . अन्यथा नर्मदा खंडामध्ये कुठल्याही साधूला उचल आणि संपव अशी मोडस ऑपरेंडी इथून पुढे निर्माण झाली असती . पुढे किट्टी गावामध्ये गेल्यावर पुढे जंगलातून जावे की रस्त्याने जावे असा विचार मी करत असताना मला एक मनुष्य भेटला . त्याचे नाव होते प्रकाशनाथ जी . याने मला बिनधास्त जंगलातून जा असे सांगितले . या जंगलात हिंस्र प्राणी आहेत का असे मी विचारल्यावर त्याच्या आयुष्यात अनुभवलेला एक प्रसंग त्याने मला सांगितला . चालत चालत तो माझ्यासोबत एक किलोमीटर अंतर आला . या पठ्ठ्याने काही वर्षांपूर्वी याच ठिकाणी स्वसंरक्षणासाठी एका भाल्याने बिबट्या मारला होता ! त्याचे असे झाले . हा या मार्गाने जात असताना दोन पिले असलेली मादी बिबट्या त्याच्यासमोर आली . तिला वाटले हा आपल्या पिलांवर हल्ला करण्यासाठी आला आहे म्हणून तिने मागचा पुढचा विचार न करता याच्यावर झेप टाकली . याने आपला डावा हात तिच्या तोंडात दिला . आणि उजव्या हातातील भाल्याने तिला भोसकले . या झटापटीत मादीचा मृत्यू झाला . मादीला याने नर्मदा मातेमध्ये फेकून दिले . पुढे ती पिले देखील मेली . त्यांना गाडून टाकले . गावातील कोणीतरी वन खात्याला खबर दिल्यामुळे वन अधिकाऱ्यांनी तपास करून याला अटक केली आणि गुन्हा कबूल केल्यावर तुरुंगात डांबले . बराच काळ तुरुंगात व्यतीत केल्यावर हा नुकताच बाहेर आला होता . त्याच्या हातावरच्या जखमा खोल आणि स्पष्ट होत्या . अशाच रीतीने वाघाने हल्ला केलेला एक मनुष्य मला शूल पाणीच्या झाडीमध्ये भेटला होता . त्याच्या नाकाजवळ वाघाच्या दातांच्या खुणा होत्या . नशिबाने तो वाचला होता . एकंदरीत या भागामध्ये जंगली प्राणी आहेत हे या प्रसंगावरून मला कळले . इथे पुढे डूब क्षेत्रातील पाणी कमी झाल्यामुळे जाण्याचा एक खतरनाक चटकट त्याने मला दाखवला . तो म्हणाला या मार्गाने तुम्ही खूप लवकर पुढे जाल . सुरुवातीला थोडेफार लोक भेटतील नंतर जंगल लागेल . आणि तो निघून गेला . थोडे अंतर गेल्यावर चोर पिपलिया नावाचे गाव लागले .
धासड बनासा किटीगाव आणि चोर पिपलिया ही सर्वच गावे किती घनदाट अरण्यामध्ये वसलेली आहेत हे आपल्याला या नकाशामध्ये पाहायला मिळेल !
चोर पिपलिया हे तर उभे गावच पाण्यामध्ये बुडालेले होते . परंतु पाणी उतरल्यावर लोक आपल्या जुन्या जमिनी काही काळ कसण्यासाठी इथे येऊन राहत असत . जमिनी हलक्या झाल्यामुळे त्यावर मूग लावला जाई. सर्वत्र मूग लावण्याची लगबग सुरू होती . सरकारी बाजारभाव सात हजार दोनशे रुपये मिळतो आहे असे कळाले . खाजगी व्यापारी ६५०० रु देत असत त्यामुळे लोक सरकारला मूग विकायचे . इथे एक मनुष्य अचानक माझ्यापुढे आला आणि त्याच्या झोपडी मध्ये चला म्हणून मागे लागला . मी त्याच्याबरोबर झोपडीकडे निघालो . वाटेमध्ये त्याचे जुने घर त्याने मला दाखवले आणि बाहेर असलेला ओटा पाहून तो रडू लागला . रडायला काय झाले विचारल्यावर त्याने सांगितले की आमच्या लहानपणी सर्व परिक्रमावासी इथूनच जायचे . माझे आई-वडील त्यांची सेवा करायचे . या ओट्यावर परिक्रमावासी नेहमी बसलेले असायचे . आता इथून कोणीच जात नाही म्हणून मला वाईट वाटते . मी धावतच जाऊन त्या ओट्यावर बसलो आणि त्याला खूप आनंद झाला ! तो म्हणाला गेल्या काही वर्षात इथून गेलेला तू पहिला परिक्रमावासी आहेस ! मला देखील खूप जास्त जनसंपर्क झालेला होता तो टाळण्यासाठी पुन्हा एकदा विजनवास किंवा अरण्यवास पत्करणे आवश्यक वाटत होते . म्हणून मी हा माईच्या काठावरचा मार्ग निवडला होता .धरणाचा प्रचंड जलसाठा उजवीकडे दिसत होता आणि पाणी अतिशय उथळ होते . कित्येक मीटर चालले तरी कंबरे एवढे पाणी असायचे . अशा ठिकाणी धरण का बांधले असेल हा आजही संशोधनाचा विषय होऊ शकतो ! शेतकऱ्याने मला उत्तम चहा पाजला आणि मी पुढे निघालो . राहण्याचा आग्रह होत होता परंतु पुढे जंगलातून चालायचे होते त्यामुळे लवकर निघणे आवश्यक आहे असे त्याला समजावून सांगितले . हा रस्ता फारच सुंदर होता . डावीकडे घनदाट जंगल आणि उजवीकडे नर्मदा मातेचा विस्तीर्ण जलाशय ! या जलाशयामध्ये एक बेट होते . त्यावर काशीमुनी महाराजांनी पन्नास वर्षाचे होईपर्यंत तपश्चर्या केली होती असे मला वाटेत एकाने सांगितले . त्याचे वडील महाराजांना दूध द्यायला नावेने जायचे . पावसाळ्यामध्ये महापूर आला की नाव देखील चालत नसे तेव्हा महाराज उपाशी राहायचे . अनेक तपे महाराजांनी ते बेट सोडले नाही . इतकी कठीण आणि खडतर तपश्चर्या करणारा मनुष्य किरकोळ कारणांसाठी रेल्वेखाली जीव देईल हे कोणालाच पटणारे नव्हते . संतो करम की गती न्यारी ! गहना कर्मणो गतिः हेच खरे .
वरील लेख दृक्श्राव्य स्वरूपात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
लेखांक एकशे एक्कावन्न समाप्त (क्रमशः )
नर्मदे हर 🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवानर्मदे हर,
उत्तर द्याहटवाकिटी गावांमध्ये वर्षानुवर्षेपासून जात आहे अजूनही जाणे होते. डूब क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी किटी घाट फार सुंदर होता रम्य अशी ती जागा होती या किटी घाटावर सुनहरी भान नावाचा आश्रम श्री विष्णू तीर्थ जी यांचे शिष्य व आता त्यांचे शिष्य श्री माधव चालवतात आता आश्रम डूब क्षेत्राच्या बाहेर नवीन बनवला आहे. रम्य असे हे वनक्षेत्र आहे जुन्या किटी घाटापुढे दोन ते अडीच किलोमीटर अंतराचा मोठा पाट होता नर्मदे माईचा.
अरे वा ! खूपच छान ! आपले नाव कळू शकेल काय ? तसेच जुन्या किटी घाटाचे ,आश्रमाचे ,महाराजांचेकाही फोटो आपल्याकडे असतील काय ?
हटवाकृपया खालील ई-मेल आयडीवर संपर्क करणे ही प्रार्थना . mazinarmadaparikrama@gmail.com
नर्मदे हर !