जयंती मातेच्या जवळच एक भैरव गुफा नावाचे एक गूढरम्य स्थान आहे असे मला सांगण्यात आले होते . ते पाहावे असा विचार करून मी मंदिरातून बाहेर पडलो . मंदिरातून बाहेर पडल्यावर डावीकडे गेले की पामाखेडी गावाकडे जाणारा रस्ता येतो . उजवीकडे वळले की सीतावन लागते . आणि सरळ गेले की भैरव गुफा सापडते . कच्चा रस्त्यावरून उतरत मी भैरव गुफेचा मार्ग चालू लागलो . थोड्याच वेळात समोर एक अतिरम्य दृश्य दिसू लागले . ते दृश्य इतके सुंदर होते की मी जागेवरती स्तिमित पणे उभा राहून ते पाहू लागलो ! एक अतिशय सुंदर नदी डावीकडून उजवीकडे वाहत होती . तिच्या दोन्ही बाजूने गर्द झाडी होती . आणि मुख्य म्हणजे नदीच्या प्रवाहामध्ये देखील भले प्रचंड महावृक्ष उगवलेले होते . अर्जुन सालीची ही झाडे तुकतुकीत परंतु तितकीच गूढ दिसत होती . वाहणारे पाणी अतिशय शुद्ध आणि स्वच्छ होते . नदीचा तळ स्पष्टपणे दिसत होता . तिथे एका झाडाचे खोड नदीच्या दिशेला झुकले होते आणि तुटले होते . त्यावर मी बराच काळ बसून राहिलो . इथे समोरच्या बाजूने वाघ पाणी प्यायला येतो असे मला एकाने सांगितले होते . त्या खोडावरती बसून मी वाघाची भेट होते काय हे पहात राहिलो . साधारण वीसेक मिनिटे तिथे कोणीच आले नाही . तपाचरणासाठी याहून सुंदर जगा मिळूच शकत नाही अशी माझी खात्री पटली होती इतक्यात अचानक मुलांचा गलका ऐकू येऊ लागला . उठून उभा राहिलो आणि मागे वळून पाहिलं तर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांचा एक समूह तिथे पार्टी करण्यासाठी आला होता . त्यांच्यातल्या एका मुलाने माझा फोटो काढला . मी त्याला तो फोटो मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगितले . आणि पुन्हा तिथे बसून राहिलो परंतु यांच्या दंग्यामुळे त्या परिसरातील शांतता कायमची भंग पावली . मुलांनी प्लास्टिकच्या रॅपर मधील गोष्टी बाहेर काढून प्लास्टिक इकडे तिकडे फेकायला सुरुवात केली . मग मात्र मी दहा मिनिटे त्यांचे चांगलेच प्रबोधन केले . मुले मला सॉरी बाबाजी म्हणाली आणि पुन्हा एकदा दारू पिण्यामध्ये आणि सिगरेट ओढण्या मध्ये गुंग होऊन गेली . आपल्या तरुणांना चित्रपट मालिका ओटीटी प्लॅटफॉर्म नाटके इत्यादी गोष्टींचा सतत भडीमार करून पद्धतशीरपणे कम्युनिस्ट चळवळीतल्या काही लोकांनी व्यसनाधीन बनवले आहे अशी माझी प्रामाणिक धारणा आहे . हा त्यांच्या गृहयुद्धाचा एक पूर्व तयारीचा भाग आहे हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे . आणि या युद्धामध्ये आपला पराभव व्हावा अशी इच्छा नसेल तर आपण स्वतः दारू सिगरेट ड्रग्स इत्यादी व्यसनातून ताबडतोब मुक्त झाले पाहिजे . आमचा बंड्या तसला नाही किंवा आमची पिंकी तसले काही करत नाही असे भोळे आशावाद न बाळगता आपल्या मुलांची कसून चौकशी करून ते अशी काही व्यसने करत असतील असे लक्षात आले तर ताबडतोब त्यांच्या या सवयी साम दाम दंड भेद वापरून सोडविल्या पाहिजेत .त्यातच समाजाचे व पर्यायाने राष्ट्राचे व्यापक हित आहे .असो.

भैरव गुफेचाप्रतिम परिसर आणि अवर्णनीय अरण्य
अर्जुनाच्या झाडांची नदीमध्ये पडलेली सुंदर प्रतिबिंबे
झाडांच्या मुळांवरून वाहणारी नदी
अविस्मरणीय भैरव गुफा आणि जलप्रपात
त्या मुलांचा गोंगाट टाळून मी पुढे निघालो . नदीच्या पात्रातून चालत राहिलो . या नदीच्या पात्रामध्ये प्रचंड वृक्षांची मुळे आणि खोडे आहेत . त्यामुळे त्या मुलांवरून चालताना पाणी टाळता येते . परंतु पाय सटकला की आपटणे निश्चित ! एकंदरीत ही नदी अतिशय सुंदर असे पर्यावरण निर्माण करून वाहत आहे . इथे वाघांचा वावर असल्यामुळे मानवी वावर मर्यादित आहे . त्यामुळे हे जंगल टिकले आहे . एखाद्या भयपटाच्या चित्रीकरणासाठी उत्तम असे हे स्थान आहे ! सर्वत्र दाट झाडी असल्यामुळे अंधार दाटलेला असतो . इथे भैरव गुफा कुठे आहे हे चटकन लक्षातच येत नाही . कारण ती नदीपात्राच्या खालच्या बाजूला आहे . म्हणजे गुहेच्या वरून नदी वाहते . गुहेच्या मुखावर एक मोठा जलप्रपात अखंड बरसतो आहे . पूर्वी गुहेमध्ये उतरण्यासाठी काही सोय नव्हती . आता एक लोखंडी शिडी तिथे बसवली आहे . या शिडी वरून खाली उतरले की आपण गुहे पाशी येतो . शिडी एका खोल डोहा मध्ये उतरते !सर्वत्र मोठे मोठे दगड आहेत .पाणी अत्यंत खोल आहे . त्यामुळे ज्यांना पोहता येत नाही त्यांनी या ठिकाणी न गेलेलेच बरे !इथे कोणीही येत नाही . कारण इथे अशी गुफा आहे हेच बऱ्याच लोकांना माहिती नाही . शिडीवरून मी खाली उतरलो . खाली कोणीच नव्हते . डाव्या हाताला एक मोठा डोह होता . उजव्या हाताला छोटा डोह होता . आणि शिडीच्या खाली उजव्या हाताला गुहेचे तोंड होते . शिडीवरून खाली कुठे उतरावे कळेना कारण शिडी पाण्यामध्ये शिरली होती . आणि खालचे दगड तिरके होते . दगडांमध्ये पाय सटकला आणि फटीमध्ये अडकला तर फार विचित्र अपघात होऊ शकतो हे पाण्यामध्ये नेहमी लक्षात ठेवावे . कितीही पट्टीचा पोहणारा असला तरी दगडात पाय अडकल्यावर काहीच करू शकत नाही .त्यामुळे मी दोन मिनिट तिथे उभा राहून आढावा घेऊ लागलो . अखेरीस मला थोडासा पाय टेकवता येईल असा भाग सापडला .तिथे उतरून मी गुहेकडे गेलो . गुहेच्या मुखावर सुंदर धबधबा चालू होता . इथे स्नान करावे अशी अनिवार इच्छा होणे स्वाभाविक आहे . त्यामुळे मी माझी वस्त्रे काढून लोखंडी जिन्या वर ठेवून दिली . आणि पुन्हा एकदा स्नानासाठी खाली आलो . तिथे कोणीच नव्हते त्यामुळे लंगोटीवर अतिशय मनसोक्त स्नान केले ! गुहेमध्ये जाऊन आलो . गुहा खूप खोल होते असे लक्षात आले . आत मध्ये दगडांनाच देवकरून त्यांची पूजा केली होती . असंख्य देव होते . बहुतेक भैरवाचे स्थान देखील इथेच होते . काळभैरवांना नमस्कार केला . त्यांची प्रार्थना केली . आणि पुन्हा एकदा मनसोक्त स्नान करू लागलो . काही काळ डोहामध्ये पोहायचे आणि पुन्हा धबधब्याखाली जाऊन उभे राहायचे असा खेळ चालू केला ! बराच वेळ मी हे करत होतो . तिथे कोणीच नव्हते . मला हे स्थान फारच आवडले ! इतक्यात लोखंडी जिन्या चा आवाज येऊ लागला म्हणून मी वर पाहिले .एक तरुण धावतच खाली आला . तो देखील उडी मारून समोरच्या दगडांवर गेला . हा तिथला स्थानिक असावा कारण तो न घाबरता या दगडावरून त्या दगडावर उड्या मारत होता . स्वतः कोरडा राहून तो डोहाच्या समोर पोहोचला देखील ! आणि इथे उतरण्यासाठी मी मात्र दोन मिनिटे विचार करत बसलो होतो ! अनुभवाचा हा असा फायदा असतो ! मी त्या मुलाला नर्मदे हर केले . मुलानेही मला नर्मदे हर केले . मला म्हणाला बाबाजी आपके फोटो ले सकता हूं क्या ? मी म्हणालो का नाही ! अवश्य फोटो घे ! आणि त्याने माझे दोन-चार फोटो काढले . मी त्याला मित्राचा क्रमांक सांगितला आणि हे फोटो पाठवून द्यायची विनंती केली . मी पुन्हा एकदा गुहेच्या मुखावर गेलो आणि स्नान करू लागलो . इतक्यात मला एक दोन मधमाशा माझ्या आजूबाजूला उडत आहेत असे दिसले . तो मुलगा धावतच जिन्यावर चढला ! आणि म्हणाला बाबाजी भागो ! मधुमक्खी का समय हो गया ! आणि वेगाने पळत तो अदृश्य झाला ! मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा स्नान करू लागलो . इतक्यात मला पुन्हा एकदा दहा-बारा मधमाशा गुहेमध्ये प्रवेश करण्यासाठी थांबल्या आहेत असे जाणवले . माझ्या लक्षात आले की आपण निसर्गाच्या कुशीमध्ये आहोत आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असताना त्याचे नियम तोडून चालत नाही . मधमाशांना आत मध्ये जाण्यामध्ये माझा धोका वाटत असेल तर त्यांना मार्ग करून देणे हे माझे कर्तव्य आहे असे वाटून मी शांतपणे बाजूला झालो . मला मुळातच पाण्याची खूप आवड असल्यामुळे पुन्हा एकदा डोहामध्ये उडी मारायची अनिवार इच्छा झाली . हे नर्मदा मातेचे थेट पाणी नसल्यामुळे इथे पोहण्याचा आनंद घेता येत होता ! परंतु पुन्हा एकदा मधमाशांचा आवाज मला येऊ लागला आणि मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला . हळूहळू लोखंडी जिना चढून मी निम्म्यापर्यंत आलो आणि माझे वस्त्र उचलले . इथेच अंग पुसावे असा विचार करत असेपर्यंत माझे लक्ष गुहेकडे गेले . शंभर दीडशे मधमाश्या गुहेमध्ये प्रवेश करत आहेत असे दिसले . म्हणून मी धावतच जिन्याच्या वरच्या टोकावर गेलो . आणि पुन्हा मागे वळून पाहिले तर हजारो मधमाशा आत मध्ये शिरत आहेत असे दृश्य मला दिसले . आता मात्र माझ्या पायातली शक्ती जाते की काय असे मला वाटू लागले ! इतक्या मोठ्या संख्येने मधमाशा तिथे असतील असे मला वाटले नव्हते . म्हणून मी मुळांवरून उड्या मारत नदीच्या प्रवाहाच्या मधोमध असलेल्या अर्जुनाच्या झाडाखाली गेलो . आणि पुन्हा एकदा मागे वळून पाहिले . त्या ठिकाणी मी जे दृश्य पाहिले ते पाहून अक्षरशः साक्षात मृत्यूने मला चकवा दिला आहे हे माझ्या लक्षात आले ! कारण समोर जे काही दृश्य मी पाहिले ते इतके भयानक होते की शब्दांमध्ये वर्णन करता येणे अवघड आहे . संपूर्ण भैरव गुफेचा परिसर आणि त्या पलीकडचे जंगल यातील काहीही मला दिसणार नाही इतक्या मोठ्या संख्येने लाखो किंवा शब्दशः करोडो मधमाशा अतिशय वेगाने थव्या थव्याने भैरव गुफेमध्ये शिरत आहेत असे दृश्य मला दिसले ! आणि या छोट्या मधमाशा नसून मोठ्या , चावणाऱ्या आगी गांधीण प्रजातीच्या मधमाशा होत्या ! त्यांचे थवेच्या थवे आत मध्ये शिरत होते आणि त्याचा मोठा आवाज त्या जंगलामध्ये घुमत होता . मी ओल्या अंगाने केवळ लंगोटीवर तसाच पळत सुटलो . मुखामध्ये नर्मदे हर असा आर्त धावा सुरू झाला .अतिशय वेगाने मी नदी ओलांडली आणि मग अंग पुसून वस्त्र धारण केले .एका मोठ्याच प्रसंगातून त्या तरुणाने मला वाचवले होते .मी त्याला शोधायचा प्रयत्न केला परंतु तो मला कुठेच दिसला नाही . तो कोण होता कुठून आला आणि कुठे गेला काहीच कळले नाही !परंतु त्याने माझे प्राण वाचवले होते हे निश्चित .त्या मधमाशांची संख्या पाहता त्यातील केवळ एक टक्के मधमाशा जरी चावल्या असत्या तरी माझे सहज प्राणोत्क्रमण झाले असते .अशा भयानक परिस्थितीतून मला बाहेर काढण्याचे मोलाचे काम त्या युवकाने केले . अर्थातच त्याला तसे काम करण्याची प्रेरणा नर्मदा मातेने दिली .आज कदाचित हा प्रसंग लोकांना काल्पनिक वाटू शकतो . त्यामुळे त्या मुलाने त्याच ठिकाणी काढलेले फोटो आपल्या माहिती करता खाली जोडत आहे . नंतर मी माझ्या मित्राला त्या मुलाचा क्रमांक विचारला परंतु तो त्याला काही सापडला नाही . मित्रा तू जिथे कुठे असशील तिथे तुझे मनापासून आभार !
.png)
या चित्रामध्ये आपल्याला लोखंडी जिना आणि भैरव गुफा तसेच तिच्यावरून पडणारा जलप्रपात दिसतो आहे . जिन्यावर मी काढून ठेवलेली छाटी देखील दिसते आहे .वरती अर्जुनाच्या वृक्षांची दाटी दिसते आहे . पाणी प्रचंड थंड आहे .
भैरव गुफेची उंची साधारण एक पुरुष आहे . आणि आत जाण्याचा मार्ग अत्यंत खडतर आहे . आत मध्ये गेल्यावर खाली बसून रांगावे लागते .
वरून पडणारा पाण्याचा जोर इतका भयानक आहे की त्यामुळे सर्व अंग सडकून निघते आणि थकून भागून आलेल्या परिक्रमावासीला खूप आनंद मिळतो !
ही ती नदी आहे . आणि हे तेच तुटलेले लाकूड आहेत ज्यावर बसून मी समोर पाणी पिण्यासाठी वाघ येतो ती जागा पाहत बसलो होतो . वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी काढलेले हे छायाचित्र आहे . योगायोगाने दोघांचा कॅमेरा एकाच कंपनीचा आहे . मला खाली येऊन भेटलेला मुलगा वेगळा होता . हे जंगल किती सुंदर आहे हे तुम्हाला या छायाचित्रातून लक्षात येईल . पाणी देखील अत्यंत स्वच्छ निर्मळ आहे . परंतु इथे पार्टी करून प्लास्टिकच्या पत्रावळ्या बाटल्या आणि अन्य कचरा फेकण्याचे प्रमाण फार अधिक आहे त्याचे मला फार वाईट वाटले . हे सर्वसामान्य ज्ञान आहे की सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवली तर आणि तरच आपला देश सुंदर दिसेल . केवळ आपले घर स्वच्छ ठेवायचे आणि बाहेर कसेही वागायचे यासारखा व्यभिचार दुसरा असू शकत नाही . असो .

भैरव गुफेच्या डोहामध्ये बसून स्नान करत असतानाचे अजून एक छायाचित्र प्रस्तुत युवकाने काढलेले होते . त्या छायाचित्रांमध्ये आपल्याला सतत जड समान उचलून प्रस्तुत लेखकाच्या पाठीवर उठलेले वळ दिसतील . तसेच त्या भागातील स्नायूंना आलेली बळकटी देखील दिसेल . या छायाचित्राचे सूक्ष्म निरीक्षण करत असताना आमच्या चिरंजीवांना अजून एक शोध लागला . इथे मागे कोणीतरी माझ्याकडे लक्ष ठेवून आहे असा शोध त्याने लावला . आणि स्वतःचे संपूर्ण ज्ञान पणाला लावून महावतार बाबाजींचे कृपांकित परमहंस योगानंद भैरव गुफेमध्ये दिसत आहेत असे त्याने मला सांगितले . मला तसे काही दिसले नाही तेव्हा त्याने खालील चित्र तयार करून मला दिले . ते आपल्या माहितीकरता सोबत जोडत आहे .
आधी त्याने वरील चित्र मला असे झूम करून दाखवले . तरी देखील मला काही दिसले नाही .
मग असे झूम करून दाखवले तरी मला काही सापडले नाही .
मग त्याने मला या ठिकाणी लक्ष देण्यास सांगितले .
इथे एखाद्या मानवी आकृती सरकार चेहरा दिसत होता खरा परंतु कोणाचा आहे ते माझ्या लक्षात येत नव्हते .

मग चिरंजीवांनी मला तो चेहरा अशा प्रकारे परमहंस योगानंद यांचा आहे असे सांगितले . दगडामध्ये किंवा पाण्यामध्ये असे विविध आकार दिसतात त्यामुळे इथे खरोखर महावतार बाबाजींचा वास होता का नाही हा मुद्दा माझ्यासाठी गौण असून असा कुठलातरी साधर्म्य असलेला आकार मुलाला सापडला याचे कौतुक आहे बाकी काही नाही . महावतार बाबाजींचा किंवा कुठल्याही गुरुतत्त्वाचा आपल्यावर वरदहस्त आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे ! त्यासाठी त्यांनी असे चित्रात दिसण्याची गरज नाही ! परंतु योगी कथामृत हे परमहंस योगानंद यांचे चरित्र मी वाचले असून क्रियायोग परंपरेमध्ये माझे अनेक मित्र आहेत . विशेषतः क्रियानंद महाराजांचा परम शिष्य अमोल पारखी म्हणून आहे जो इंग्लंडचा नागरिक असून माझा खूप चांगला अंतरंगी मित्र आहे . त्याच्यासोबत मी हिमालयामध्ये देखील फिरलो आहे . आपले एक वाचक आहेत ज्यांनी श्री एम यांची दीक्षा घेतली आहे . आनंद मुळे असे त्यांचे नाव असून नावातच मुळे असल्यामुळे की काय परंतु त्यांना झाडे लावण्यात प्रचंड आनंद मिळतो! आणि आपल्या वृक्षारोपणाच्या सर्व कार्यक्रमांमध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग आणि मार्गदर्शन असते ! अजून एक मयुरेश कुलकर्णी नावाचा मित्र आहे जो क्रियायोगी आहे . तात्पर्य क्रियायोग परंपरेशी अशा रीतीने माझा जवळचा संपर्क आहे ! असो .
अशा रीतीने त्या जीवघेण्या प्रसंगातून नर्मदा मातेने मला वाचवले आणि मी पुन्हा एकदा सुखरूप जयंती मातेच्या मंदिरामध्ये परतलो . बाहेर असलेली दुकाने बंद झाली होती . मी झालेला प्रसंग कोणाला सांगावा की न सांगावा अशा द्विधा मनस्थितीमध्ये होतो .कारण विनाकारण मी तिकडे कशाला गेलो म्हणून ओरडा पडण्याची शक्यता होती . परंतु अखेर धैर्य एकवटून तिथल्या एका सेवकाला मी हा प्रसंग सांगितला . त्याने मला तिथे मधमाश्या चावून पूर्वी झालेल्या दुर्घटनांची माहिती दिली . आणि मला खरोखरीच कुठल्यातरी अज्ञात शक्तीने वाचविले आहे याची मला खात्री दिली . विषय निघालाच आहे म्हणून सांगतो . मधमाशा या कीटकापासून घाबरण्याची स्वाभाविक मानवी प्रवृत्ती असते . परंतु मधमाशा या सरसकट हल्ला करत नाहीत . जेव्हा त्यांना जीवाला धोका वाटतो तेव्हाच त्या हल्ला करतात . मधमाशांना जलद हालचाली , मोठा आवाज किंवा विशिष्ट प्रकारचे सुगंध अथवा गंध यांची एलर्जी असते . यातील काहीही दिसले तरी त्या हल्ला करण्याची शक्यता वाढते . त्यामुळे तुमच्या आजूबाजूला मधमाशी आलीच तर सर्वप्रथम शांतपणे उभे रहा . श्वासाची गती कमी करा . आणि हळूहळू त्या भागातून निघून जाण्याचा प्रयत्न करा . जंगलामध्ये फिरायला जाताना शक्यतो भडक वासाचे परफ्युम अथवा डीओडरेन्ट मारू नका . या वासामुळे मधमाशा चाळवतात आणि मागे लागतात अशी अनेक उदाहरणे इतिहासात घडलेली आहेत . मधमाशांच्या पोळ्या जवळ आपण असाल तर विक्षिप्त हालचाली टाळाव्यात . मधमाशांचे सर्व लक्ष मध गोळा करण्याकडे असते . परंतु त्यांच्या मधुकोशाला धोका आहे असे लक्षात आले तर मात्र त्या आक्रमक होतात . नुकतेच भाबरी येथे विहिरीचे काम चालले होते . तेव्हा देखील आत मध्ये खूप वेळा उतरावे लागत होते . आणि विविध प्रकारच्या शेकडो मधमाशा पाणी पिण्यासाठी आणि गारव्यासाठी विहिरीमध्ये येत होत्या . परंतु मला एकही मधमाशी चावली नाही कारण मी अतिशय शांतपणे त्यांच्या समोरून वर खाली करत होतो . मधमाशी हा एक अत्यंत उपयुक्त कीटक असून मधुमक्षिकापालन केल्यास शेतीचे उत्पन्न कित्येक पटीने वाढते हे सिद्ध झालेले आहे . कारण फुलांचे परागीभवन करण्याचे महत्त्वाचे कार्य मधमाशा मोफत करतात आणि त्याशिवाय फलधारणा होऊ शकत नाही . भारतामध्ये प्रामुख्याने चार पाच प्रकारच्या मधमाशा आढळतात . त्यातील इंडियन जायंट रॉक बी ( शास्त्रीय नाव : एपिस डोर्साटा ) या नावाची मधमाशी शक्यतो डोंगर कपाऱ्यांमध्ये घर करते . आणि आकाराने अतिशय मोठी असते . मला दिसलेल्या मधमाशा याच प्रकारच्या होत्या . जंगलेच्या जंगले उभी करण्याचे काम या मधमाशा करतात . त्यामुळे त्यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे . याखेरीज अन्य प्रजाती आहेत परंतु त्या आकाराने खूप लहान असतात . फुलवाल्यांच्या हारांवर उडणाऱ्या मधमाशा दिसतात त्या तर अतिशय निरूपद्रवी आणि न चावणाऱ्या असतात . त्यामुळेच त्यांना स्टिंगलेस बी असे म्हणतात .

इंडियन जायंट हनी बी किंवा एपिस डोर्साटा
मधमाशांची एक राणी असते आणि तिच्याभोवती सर्व मधमाश्या राहतात हे तर आता सर्वांना माहिती असेलच . राणी हलवली की सर्व मधमाश्या तिच्या मागे आपले बस्तान हलवतात . तसेच राणीशी समागम करणाऱ्या नराला ती मारून टाकते हे देखील आपल्याला माहिती असेल . मधमाशांच्या याच प्रवृत्तीवर आधारित एक नाटक आम्ही सर परशुरामभाऊ महाविद्यालयातर्फे फिरोदिया करंडक स्पर्धेसाठी बसवले होते . अर्थात मी तेव्हा महाविद्यालयातून पास आऊट झालो होतो परंतु माजी विद्यार्थी म्हणून मी कला मंडळातर्फे ते नाटक बसवायला जायचो . चित्रपटाच्या संहितेपासून , संगीतापासून ते थेट नेपथ्यापर्यंत यथेच्छ ढवळाढवळ करण्याची संधी मला तेव्हा मिळाली होती . याच काळात पहिल्यांदा मी मधमाशांचा आणि त्यांच्या जीवनमानाचा बारकाईने अभ्यास केला होता , त्यामुळे मला आजही मधमाशा म्हटल्या की हे नाटक आठवते . सध्या मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे दोन कलाकार त्यावेळी या नाटकामध्ये काम करत होते . (जे अर्थातच माझे ज्युनियर होते ) . मृण्मयी देशपांडे आणि सुव्रत जोशी हे ते कलाकार होत . नाट्य क्षेत्र ,संगीत क्षेत्र आणि अभिनय क्षेत्र ही क्षेत्रे अतिशय अभ्यासपूर्वक ,जाणीवपूर्वक आणि स्वेच्छेने मी नाकारलेली आहेत . असो .

मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलाकार सुव्रत जोशी आणि मृण्मयी देशपांडे यांचे सेट वरील संग्रहित छायाचित्र .
एकंदरीत तात्पर्य काय तर मधमाशांच्या संग्रहावर हल्ला झाला तरच त्या आक्रमक होतात .केवळ मधमाशाच नव्हे तर अन्य देखील संग्रहशील प्राणी त्यांच्या संपत्तीवर टाच येऊ लागली की आक्रमक होतात ! याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मुंग्या किंवा अजून जवळचे उदाहरण म्हणजे मनुष्य प्राणी ! असो ! नर्मदा परिक्रमेमध्ये तुमच्या मन:पटलावर अशा अनेक पूर्वस्मृती घोंगावून जातात . आपण तिथून आपल्या मनासह आणि विचारांसह शांतपणे निघून जायचे असते . अन्यथा विखारी डंख निश्चित असतो ! इकडे जयंती माता मंदिरामध्ये अंधार पडू लागला . त्याबरोबर जंगलाने आपले रंग बदलायला सुरुवात केली . रात्रीचे जंगल खूप वेगळे भासते . त्यामध्ये एक गूढरम्य शांतता असते . आपले मन उगाचच आपल्याला काहीतरी भास दाखवीत राहते . विशेषतः इथे वाघांचा वावर आहे हे कळल्यामुळे जयंती मातेची आरती होईपर्यंत मला कधीही वाघ घेऊन हल्ला करेल असे उगाचच वाटत राहायचे . त्यामुळे मी सतत आजूबाजूला पाहायचो . हे एक प्रकारे चांगले लक्षण आहे कारण वाघ देखील बेसावध सावजावर हल्ला करतो हे आपण टीव्हीवर पाहिले असेलच . पश्चिम बंगालमधील सुंदरबनचे मासेमार आणि शेतकरी तर त्यांच्या डोक्याला मागच्या बाजूने मानवी चेहऱ्याचा मुखवटा लावतात ज्यामुळे वाघाला मनुष्य आपल्याकडे पाहतो आहे असे वाटून तो हल्ला करत नाही .

सुंदरबनच्या खारफुटीच्या जंगलामध्ये वाघ पाण्यातून येऊन हल्ला करतात त्यामुळे तिथले केवट आणि मासेमार अशा रीतीने मुखवटे घालून प्रवास करतात . त्यामुळे वाघाला माणूस आपल्याकडे पाहतो आहे असा भास होतो आणि तो हल्ला करत नाही .
वाघांचा आणि मनुष्य प्राण्याचा संघर्ष कमी करण्याचा हा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आहे .

इथले शेतकरी जंगलात जाताना आवर्जून डोक्याला मुखवटा लावून बाहेर पडतात . माझ्याकडे मुखवटा नव्हता परंतु माझा चेहरा सतत सर्व दिशांना फिरून कुठून वाघ तर येत नाही ना याचा आढावा घेत होता हे मात्र खरे . कारण नुकताच मी वाघाचा आवाज ऐकलेला असल्यामुळे त्याच्याबद्दलचे आदर युक्त भय मनामध्ये ताजे होते .त्यात आश्रमामध्ये विज नाही . परंतु वाघाचे दर्शन व्हावे अशी इच्छा असल्यामुळे मी त्या पिंजऱ्यामध्ये न झोपता गच्चीवर झोपायचा निर्णय घेतला . रात्री बरेचदा उठून मी वाघ दिसतो आहे का त्याचा आढावा घेत होतो . आश्रमामध्ये असलेली कुत्री रात्री दोन वेळा जीवाच्या आकांताने भुंकली . कदाचित त्यांना काहीतरी दिसले असावे . मला मात्र काहीही दिसले नाही किंवा जाणवले देखील नाही . जाणिवांच्या पातळीवर आपण निसर्गातील अन्य प्राण्यांपेक्षा किती तोकडे आहोत हे पाहून स्वतःची कीव येते . इथे असलेल्या संतोष सोलंकी याने वाघ पाहिला होता व अन्य अनेकांनी देखील पाहिला होता परंतु आमच्या नशिबात त्याचे दर्शन नव्हते . रात्रभर सावध झोप लागली . पहाटे चारलाच पूर्ण जाग आली .अंधारातच सर्व आन्हिके आटोपून घेतली . सेवकांनी ठेवलेला चहा घेऊन ठीक साडेपाच वाजता नर्मदे हर केले आणि जंगलाच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू केली .माझ्याबरोबर अर्थातच नंदू शेठ होते . परंतु मी त्यांना आधीच सांगितले होते त्याप्रमाणे ते काही अंतर ठेवून माझ्या मागे चालत राहिले . मी देखील सतत ते दिसत आहेत का हे पाहून दोघांमधील अंतर सारखे राहील याचे भान ठेवून चालत राहिलो . सकाळची शांत वेळ , हिंस्र श्वापदांची रेल चेल आणि तेंदुपत्ता संकलन पूर्ण झालेले त्यामुळे संपूर्ण जंगलामध्ये कोणीच नव्हते . दहा किलोमीटर सलग एकांतामध्ये चाललो ! हा अनुभव केवळ अविस्मरणीय होता ! आपल्याच पावलांचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो . शांत उभे राहिले की आपल्याच हृदयाची धडधड आपल्याला ऐकू येते . अजून थोडे शांत बसले की आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्ताचा आवाज आपल्याला येऊ लागतो ! ही अवस्था फारच सुंदर असते . तुकाराम महाराजांनी याच अवस्थेचे वर्णन केले आहे . ते म्हणतात तुका म्हणे होय मनाशी संवाद । आपलाची वाद आपणाशी । वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षी ही सुस्वरे आळविते । येणे सुखे रुचे एकांताचा वास । नाही गुणदोष अंगा येत । चालताना वाटेमध्ये मातीच्या रस्त्यावर उमटलेले वन्य श्वापदांचे ठसे स्पष्ट दिसत होते . बिबट्याचे ठसे आणि विष्ठा तर जागोजागी दिसत होती .हरणांच्या पायाचे आणि रानडुकराच्या पायाचे ठसे देखील जागोजागी होते . तरस चालताना मागचे पाय ओढत चालते त्यामुळे त्याचे विशिष्ट ठसे उमटतात ते देखील दिसत होते . हे सर्व समृद्ध वन्य जीवन पाहिल्यावर मला असे राहून राहून वाटू लागले की जयंती माता मंदिरामध्ये परिक्रमावासींचे प्रबोधन करण्याची व्यवस्था उभी राहिली पाहिजे . कारण इथून बरेचदा परिक्रमावासी घोळक्याने जातात आणि हास्य विनोद आरडाओरडा दंगा करत जाताना दिसतात .मानवी वावर वाढला की वन्य प्राणी तिथून शांतपणे काढता पाय घेतात . त्यामुळे लक्कड कोटच्या जंगलातून जाताना परिक्रमावासिनी शांतपणे कुठलाही आवाज न करता केवळ खाणाखुणांची भाषा वापरतच पुढे गेले पाहिजे असे सांप्रत प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट मत झालेले आहे . कोणाला या संदर्भात काही कार्य करायचे असेल तर जयंती माता मंदिरामध्ये राहून परिक्रमेच्या सुरुवातीच्या काळात येणारे लोंढे असतात त्यांचे प्रबोधन करण्याचे कार्य अतिशय उत्तम रीतीने करता येईल . त्यामुळे वन्यजीवांच्या संदर्भात लोकांचे प्रबोधन देखील होईल आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने देखील हे फार मोठे कार्य ठरेल . वनामध्ये असताना आपला वावर कसा असावा याबाबत दुर्दैवाने आपल्या लोकांमध्ये कमालीची अनास्था आणि अज्ञान असल्याचे प्रस्तुत लेखकाचे स्पष्ट निरीक्षण आहे . माझ्यासोबत चालणाऱ्या नंदू काकांनी मात्र या संदर्भात मला खूप चांगली साथ दिली हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते . संपूर्ण वाटेत ते माझ्याशी जरा देखील बोलले नाहीत . मी त्यांना वन्य प्राण्यांचे वर्तन कसे असते याबाबत आधीच सांगितले असल्यामुळे त्यांनी देखील अतिशय शांततापूर्वक या संपूर्ण प्रवासाचा यथेच्छ आनंद घेतला .इथे एक गमतीशीर घटना घडली . कुठून तरी अचानक चार कुत्री आमच्या दिशेने चालत आली . काल मंदिरामध्ये जी कुत्री होती ती ही नव्हती . हे श्वान कुठून आले ते काही लक्षात आले नाही . परंतु पूर्ण वेळ एखाद्या अंगरक्षकासारखी ही कुत्री आमच्यासोबत चालत राहिली . ती मध्येच अचानक झाडीमध्ये अदृश्य व्हायची . आणि पुन्हा काही झालेच नाही असे दाखवत मूळ मार्गावर यायची . आपल्या आजूबाजूला श्वान चालत आहेत हे लक्षात आल्यावर मी थोडासा निश्चिंत झालो आणि निसर्गाचा अधिक आनंद घेत चालू लागलो . चुकून मागून काही आलेच तर कुत्र्यांना लगेच कळणार होते . त्यामुळे मी अंमळ बेसावध झालो ! बेसावध अवस्थेमध्ये मनुष्य परिस्थितीचा जास्त आनंद घेतो ! तसेच माझे झाले . इथे निम्मे अंतर चालू झाल्यावर एक हनुमानजीचे मंदिर येते . गुगल नकाशावर जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की नर्मदा मातेतून पाण्याची एक मोठी उपसा जलसिंचन योजना इथून गेलेली आहे . मोठमोठ्या 12 फूट व्यासाच्या दुहेरी नळ्यांद्वारे हे पाणी थेट देवास जिल्ह्यात नेण्यात आले आहे . हे नळे इतके मोठे आहेत की ही योजना उपग्रहातून देखील दिसते . मी चालत असताना या योजनेचे काम अपूर्ण होते . त्यामुळे या योजनेसाठी लागणारी मोठी यंत्रसामग्री इथे दिसत होती . दुर्दैवाने ही सर्व योजना काम करत हनुमानजीच्या मंदिरापर्यंत पोहोचली होती . त्यामुळे इथे मोठमोठी पोकलेन यंत्रे आणि ती चालवणारी माणसे यांची थोडीशी लगबग मला जाणवली . त्यामुळे इथला एकांत थोडासा हरपला होता . या मारुतीला बेडी का हनुमान असे देखील म्हणतात . वन खात्याच्या धोरणामुळे इथे मंदिर बांधायला परवानगी मिळालेली नाही . त्यामुळे एका छोट्याशा लाकडी मांडवामध्ये हनुमान जी ची सुंदर मूर्ती स्थापन केलेली आहे . या भागामध्ये मारुतीचा शृंगार करण्याची एक पद्धत आहे . चांदीचा वर्ख लावून हनुमानजी सजवला जातो . अशाप्रकारे हा देखील मारुती सजवला होता . तिथे अजूनही वर्खाचे पुडे पडलेले होते .ते वापरून मी देखील मारुतीची सुंदर सजावट केली . सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही साडेनऊ वाजताच इथे पोहोचलो . या जंगलाचा पुरेपूर आनंद घेण्याची मला इच्छा होती . तसेच कडक ऊन वाढले होते . आमच्या दोघांच्या गतीचा अंदाज आम्हाला आला होता . त्यामुळे जास्तीत जास्त वेळ इथे व्यतित करावा असा निर्णय आम्ही दोघांनी घेतला . नंदू शेठ ने देखील त्याला परवानगी दिली . साडेनऊ ते दुपारी साडेतीन असा भरपूर वेळ आम्ही या मारुतीच्या मंदिरामध्ये घालवला ! आणि तो केवळ अविस्मरणीय होता ! इथे शेजारीच एक हातपंप खोदण्याची तयारी सुरू केली होती . आता हा हातपंप तयार झालेला आहे . इथे आल्यावर झोळी उतरवली आणि अंगावरील सर्व वस्त्रे देखील उतरवली . प्रचंड उकाडा होता . त्यामुळे उघड्यानेच या परिसरात फिरू लागलो . मारुतीच्या समोरच एक छोटीशी नदी होती . तिचे पात्र मी पाहून आलो . इथे खूप वानरे होती . त्यांच्या मर्कट लीला पाहताना मजा आली . मारुतीच्या उजवीकडे थोडेसे चालत गेल्यावर जेसीबीच्या साह्याने एक कुंड खोदल्याचे लक्षात आले . यातील पाणी अतिशय थंडगार आणि शुद्ध होते . त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला ! हे कुंड सहजासहजी कोणाला सापडणार नाही अशा खड्ड्यात होते . परंतु सुदैवाने मला सापडले . इथून पुढे असलेल्या पामाखेडी नावाच्या गावात असलेल्या आश्रमातून एक गाडी दर दुपारी इथे येते आणि परिक्रमावासींना चहा बिस्किटे व अन्य काही वस्तू पुरवते असे आम्हाला सांगण्यात आले होते . परंतु आमच्या नशिबात ती गाडी नव्हती . काहीतरी बिघाड झाल्यामुळे त्यादिवशी ती गाडी जंगलामध्ये आलीच नाही . मला ही गाडी आणणाऱ्या सेवकांचा हेवा वाटला ! त्यांना रोज या सुंदर जंगलामध्ये वन्य श्वापदे पाहायला मिळत असणार ! एखादे अरण्य खरोखरीच अभयारण्य कसे असू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे . इथे मानवी वावर असून देखील बऱ्यापैकी श्वापदे आजही पाहायला मिळतात . खरे म्हणजे ही त्या वन्यशापदांची अगतिकता आहे . आजूबाजूला त्यांना विस्तारासाठी जागाच शिल्लक न राहिल्यामुळे उरल्यासुरल्या जंगलामध्ये दाटीवाटीने राहण्याची पाळी त्यांच्यावर आलेली आहे . नंदू शेठ बहिर्दिशेला जातो असे सांगून समोरच्या नदीकडे निघून गेले . आणि मला हवा तो एकांत पुन्हा एकदा मिळाला ! त्या मारुतीच्या मंदिरामध्ये मी फेऱ्या घालू लागलो . आजूबाजूला विस्तारलेले सुंदर जंगल आणि हवाहवासा एकांत ! हीच अवस्था अनुभवण्यासाठी तर नर्मदा परिक्रमा उचलावी ! आपण स्वतःला वेळ फार कमी वेळा देत असतो . नर्मदा माता मात्र तुम्हाला भरपूर एकांत पुरवते आणि स्वतःला जाणून घेण्याची एक संधी उपलब्ध करून देते ! मी इथे फेऱ्या मारत असताना नंदू शेठ ने दुरूनच माझा फोटो काढला . आणि नंतर तो माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला . नंदू शेठ यांना फोटोग्राफीची खूप आवड असल्यामुळे या प्रवासामध्ये त्यांनी भरपूर फोटो काढले . या फोटोमुळेच आज मला पुन्हा एकदा ते जंगल जसे आहे तसे आठवते ! संपूर्ण नर्मदा परिक्रमे मध्ये मला आवडलेली जी जंगले वने किंवा अरण्ये होती त्यातील हे सर्वोत्तम अरण्य म्हणावे लागेल .कारण हे अमरकंटकच्या जंगलाप्रमाणे दुर्गम्य नव्हते . शूलपाणीच्या झाडीप्रमाणे भकास नव्हते . तर सर्वसामान्य माणसाला चालता येईल किंवा किमान पळून जाता येईल इतपत जागा त्यामध्ये होती .
इथे एक अनुभव आला . नंदूशेठ ना खूप भूक लागलीच होती . आणि पुढचा आश्रम तर बारा पंधरा किलोमीटर दूर होता . मला देखील भूक लागली होतीच . सोबतचे खाण्याचे सामान दोघांनी काढले परंतु त्यामुळे भूक कमी व्हायच्या ऐवजी अजूनच चाळवली ! इथे खूप पक्षी आले होते . निम्मे खाद्य तर पक्ष्यांनाच टाकले ! मोठ्या संख्येने पक्षी झुंबड उडवू लागले . इथले समृद्ध पक्षी जीवन पाहून मन अत्यंत सुखावले .जिथे पक्षी शिल्लक आहेत तिथले अरण्य सुरक्षित आहे . दोघांनाही भूक लागलेली असताना अचानक तिथे एक मोटरसायकल आली . त्यावर तिघेजण बसलेले होते . इथून जवळच भेंडी फड नावाचा तेंदू पत्ता गोळा करणाऱ्या लोकांचा एक फड होता . या प्रत्येक फडाचा एक फड मिस्त्री असतो . याचे काम म्हणजे त्या फडावर होणारे एकूण तेंदू पत्ता संकलन सांभाळणे व त्याची देखरेख ठेवणे .हितेश सोलंकी असे या फड मिस्त्रीचे नाव होते . फड सांभाळणे हा त्याचा हंगामी व्यवसाय होता . पूर्णवेळ उपजीविका पाहायची तर हा भटखेडा नावाच्या गावामध्ये शिक्षक होता . तिथे पटदरा नावाचा भाग आहे जिथे हा शाळा चालवायचा . त्याचे मूळ गाव पीपलकोटा होते . आम्हाला पाहून तो थांबला . आणि नर्मदे हर करून गप्पा मारत बसला . गप्पा मारता मारता त्याला असे लक्षात आले की आम्हाला भूक लागलेली आहे आणि आमच्या जवळ खाण्याचे काहीच नाही . आम्ही येणाऱ्या गाडीची वाट पाहत आहोत हे पाहिल्यावर त्याने ती गाडी बंद पडल्याचे आम्हाला सांगितले . त्याने ताबडतोब त्याची यंत्रणा कामाला लावली आणि त्याच्या सोबत असलेल्या मुलाला मोटरसायकलवर जयंती माता मंदिरात पाठवले आणि तिकडून तयार भोजन बांधून आमच्यासाठी आणायला सांगितले . याच्यासोबत असलेला तरुण मुलगा म्हणजे याचा नातेवाईक होता . आणि दुसरा मनुष्य हा चंद्रपूरचा होता .हा ठेकेदार होता .तेन्दुपत्ता उचलण्यासाठी आला होता . त्याला येता येता हा घेऊन आला होता . सोलंकीने आमच्यासाठी जेवण मागवले . इतक्यामध्ये पाईपलाईनचे काम करणाऱ्या एकूण सहा टोळ्या तिथे आल्या व त्यांनी आम्हाला ६ रोट्या आणि डाळ आणून दिली !जवळच पाण्याची व्यवस्था केलेली असल्यामुळे ते देखील इथेच वनभोजन घ्यायचे . इतक्यात सोलंकीचा नातेवाईक देखील गरम गरम दाल भाटी घेऊन आला !सर्वजण एकत्र जेवायला बसलो ! भरपूर जेवण आणलेले असल्यामुळे दुप्पट जेवलो !
दुपारी त्या ठेकेदाराची मजा घेत ,त्याला चिडवत आणि हितेश सोलंकी कडून परिसराचे ज्ञान घेत दुपार व्यतीत केली . ठेकेदार फारच गमतीशीर होता . त्याचे एक एक अनुभव तो असे सांगायचा की हसून हसून आम्ही सर्वजण लोळायचो . सुदैवाने नंदू शेठ यांच्याकडे कॅमेरा असल्यामुळे इथले काही फोटो काढले गेले .
नंदू शेठ यांनी काढलेले काही फोटो आपण आता पाहुयात .
या चित्रामध्ये आपल्याला डावीकडून उघडे बंब नंदू शेठ ,हितेश सोलंकीचा तरुण भाचा ज्याने आम्हाला जेवण आणून दिले , त्यानंतर चंद्रपूरचा ठेकेदार ,मागे उभा प्रस्तुत लेखक आणि हितेश सोलंकी हा शिक्षक दिसेल . हितेश अतिशय स्मार्ट मनुष्य होता . त्याला परिसराचे आणि लोकजीवनाचे खूप चांगले ज्ञान होते . असा शिक्षक विद्यार्थ्यांना लाभणे हे विद्यार्थ्यांचे भाग्य होय .
मारुतीरायासोबत प्रस्तुत लेखक आणि नंदू शेठ यांचा सेल्फी !
वाटेमध्ये आम्हाला खूप मोठी मोठी वारुळे दिसली . दक्षिण भारतामध्ये याहून मोठी वारुळे मी पाहिलेली होती . नागरहोळे वन किंवा बंदीपूर अभयारण्य इथे याहून मोठी वारुळे दिसतात . परंतु नंदू शेठ ना या वारुळांचे खूप अप्रूप वाटत होते . म्हणून त्यांनी काही फोटो काढले .
नंदू शेठ यांच्याही डोक्यावर जाणारे वारूळ !नंदू शेठ खाण्याचे पदार्थ पुढे बांधून ठेवत त्यामुळे जाता जाता अखंड चरता येत असे ! त्यांची ही युक्ती मला खूप आवडली !
महाकाय वारुळासोबत प्रस्तुत लेखक !
भर दुपारी शौचाला गेलेले असताना नंदू शेठ यांनी काढलेले प्रस्तुत लेखकाचे छायाचित्र . एकांतामध्ये येर झाऱ्या घालताना खूप आनंद मिळतो . तुमच्या जन्मोजन्मीच्या येर झारा कमी करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये निश्चितपणे आहे !
मध्ये एके ठिकाणी प्रस्तुत लेखकाला दिसलेला छोट्या वाघाचा किंवा बिबट्याचा पंजा ! असे खूप प्रकारचे ठसे जागोजागी आम्हाला दिसले .
आमच्या सोबत असलेल्या चार श्वानांपैकी दोन श्वान नंदू शेठ यांनी या चित्राद्वारे अमर करून टाकले ! या मंदिरापर्यंत आलेले हे श्वान नंतर मात्र भोजन प्रसादी घेऊन अदृश्य झाले . कदाचित त्यांचा हेतूच उदरभरणाचा असावा .
या नकाशामध्ये आपल्याला पुनासा धरणाचा जलाशय तसेच नर्मदा अभयारण्याचे अद्भुत दृश्य दिसते आहे आणि जलाशयातून उचललेली पाणीपुरवठा योजना एका सरळ रेषेमध्ये कशी देवासकडे जाते आहे ते देखील पाहायला मिळते आहे .वाटेमध्ये आपले हनुमंताचे मंदिर आहे .
जयंती माता मंदिरापासून हनुमंताचे मंदिर आणि ही पाणीपुरवठा योजना किती अंतरावर आहे ते आपल्याला या नकाशा चित्रामध्ये लक्षात येईल .
हनुमंताच्या मंदिराचे हे एक संग्रहित छायाचित्र आहे
या उपग्रह छायाचित्रामध्ये आपल्याला हनुमंताच्या मंदिराच्या मागूनच दुहेरी बारा फुटी नळे कसे गेलेले आहेत ते लक्षात येईल . समोरच्या बाजूला दिसणारी अंधारी रेषा म्हणजे नदी आहे .
पोटभर जेवण करून काही काळ मारुतीच्या मंदिरात विश्रांती घेतल्यावर पुढे निघण्याचा निर्णय घेतला . दुपारचे तीन साडेतीन वाजले होते . संध्याकाळी अंधार पडेपर्यंत पामाखेडी आश्रमात पोहोचायचे होते . चालताना वाटेमध्ये अनेक नद्या आडव्या आल्या . सर्व नद्यांना बऱ्यापैकी पाणी होते हे पाहून बरे वाटले . झाडे तर जमिनीतले पाणी शोषून घेतात . मग झाडे अधिक असल्यावर नद्यांना पाणी कसे काय वाढते हा संशोधनाचा विषय आहे ! परस्परावलंबी जीवन हे त्याचे उत्तर आहे . ज्याप्रमाणे आप्पा बळवंत चौकात सर्वच जण पुस्तके विकत असले तरी सर्वांचे पोट भरते तसे हे आहे . कारण इथे मोठ्या संख्येने पुस्तके विकत घेणारे येतात . या भागातील खडक हत्तीच्या कातडीप्रमाणे होते असे मला जाणवले . अगदी स्पष्टपणे हत्तीची कातडी आपण पाहत आहोत असा भास व्हायचा . इथे जवळच काला देव गुफा नावाची एक गुफा आहे परंतु तिथे जायचा मार्ग कुठे लिहिलेला नसल्यामुळे आम्ही तिकडे गेलो नाही . परंतु नंतर मला या गुहे बद्दल कळाले.
आम्हाला न सापडलेली काला देव गुफेची पाटी
हीच ती निसर्गरम्य काला देव गुफा
काला देव गुफेतून दिसणारे लक्कड-कोटचे जंगल
इथे वाटेमध्ये चालताना मला एका वेगळ्याच प्राण्याचे ठसे दिसू लागले . गंमत म्हणजे एक मोठा ठसा आणि त्या शेजारी एक छोटासा ठसा दिसत होता . माणसाच्या पायासारखा आकार म्हणावा तर गोलवा जास्त होता . हा कुठला प्राणी आहे हे लक्षातच येत नव्हते . ठसे बघत चालताना अचानक समोर लक्ष दिले आणि जागेवर स्तब्ध उभा राहिलो ! एक सुंदर काळ्या रंगाची अस्वली आपल्या पिलाला घेऊन माझ्या समोरून रस्त्याने चालली होती ! ती जागेवर थांबली . दोन पायांवर उभी राहिली . आणि तिने एक क्षणभर मागे वळून पाहिले . मी जागेवर स्तब्ध उभा होतो . नंदकुमार कुंभार माझ्या बरेच मागे होते . ती शांतपणे डावीकडे वळली आणि जंगलामध्ये निघून गेली . तिने मला कुठलाही उपद्रव दिला नाही .
अस्वलीण आणि तिच्या पिलाचे संग्रहित छायाचित्र
मदारी अस्वल घेऊन यायचे तशी अस्वले मी लहानपणी खूप वेळा पाहिली होती . अस्वल गुदगुल्या करून मारते वगैरे दंतकथांवर माझा ही लहानपणी विश्वास बसायचा . परंतु प्रत्यक्ष अस्वल समोर पहिल्यांदाच पाहत होतो . शूलपणीच्या झाडीमध्ये रामश्या गारद्या पावरा यांच्यावर झरकल नदीमध्ये अस्वलाने केलेला हल्ला आणि त्यांची सोलून काढलेली पाठ हा प्रसंग त्यांच्या मुखातून खूप वेळा ऐकला आहे . त्यानंतर त्यांनी एकाच बुक्कीत अस्वलाला लोळवले होते असे देखील ते सांगतात . तसेच केशुभाई पावरा त्याने देखील अस्वलाची एक रंजक कथा मला सांगितली होती . त्याच्या ओळखीचा एक माणूस अस्वली सोबत काही वर्ष जंगलामध्ये संसार थाटून राहिला होता . आणि त्या दोघांना झालेला मुलगा अजूनही जिवंत आहे असे केशुभाई सांगतो ! अशा मजेशीर कथा अस्वलाच्या बाबतीत सर्वत्र ऐकायला मिळतात . परंतु अस्वलांची संख्या भारतामधून झपाट्याने कमी होत आहे हे दुर्दैवी वास्तव आहे . रतन महल अस्वल अभयारण्य नर्मदा मातेच्या काठापासून जवळ आहे . तिथून हे अभयारण्य जंगलांच्या मार्गाने जोडलेले आहे . पूर्वी सर्वत्र मुक्त संचार असलेली अस्वले आता मात्र दिसत नाहीत . सज्जनगडाच्या पुढे असलेले वाघापूरचे पठार किंवा सडा वाघापूर येथे देखील पूर्वी खूप अस्वले होते जी आता कमी झाली आहेत . वाघाची जशी दहशत असते तशीच अस्वलाची देखील दहशत माणसांना असते . त्यामुळे जिथे अस्वलांचा वावर आहे त्या जंगलात मनुष्य लाकडे तोडायला किंवा गुरे चारायला सहसा जात नाही . त्यामुळे अस्वले एक प्रकारे वनसंरक्षणाचे काम करतात . दात नखे कातडी यासाठी या गरीब बिचाऱ्या प्राण्याची मोठ्या प्रमाणात हत्या झाली . आज भारतामध्ये अस्वलांची संख्या कमालीची रोडावलेली आहे . यावर सर्वांनी मिळून वेळीच गंभीर चिंतन आणि सकारात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे असे वाटते . असो . नंदकुमार कुंभार यांना अस्वल पाहता आले नाही परंतु त्यांना मी अस्वलाचे ठसे मात्र दाखवले . इथून पुढे अनेक डोंगरदर्या चढाव्या उतराव्या लागल्या . जंगलामध्ये छोटीशी पायवाट होती आणि चुकून-माकून मार्ग भटकला तर खूप मोठ्या जंगलामध्ये मनुष्य हरवण्याची शक्यता स्पष्टपणे जाणवत होती त्यामुळे प्रयत्नपूर्वक मळलेल्या वाटेवरून चालत राहिलो . काही अंतर गेल्यावर हातपंपासाठी अजून एक जागा निवडली गेल्याची पाहायला मिळाली . इथे देखील आता हात पंप झाला आहे असे कळते . या जंगलातून चालताना नर्मदा मातेकडून येणारा वारा तिचा सुगंध स्पष्टपणे जाणवून देत होता . इथून नर्मदा माता खूप जवळ आहे परंतु जंगलामुळे तिकडे जाता येत नाही . बरेचसे डोंगर उतरल्यावर सपाटीचे घनदाट जंगल लागले . आणि अचानक एका मोठ्या महामार्गावर येऊन आम्ही पोहोचलो . उजवीकडे हा रस्ता पुनासा धरणाकडे जात होता तर डावीकडे पामाखेडी गावामध्ये जात होता . इथून मात्र र २१ किमी अंतरावर असणारे पुनासा धरण बांधताना खूप मोठ्या प्रमाणात अरण्य बुडवले गेले आहे हे आपण पूर्वी पाहिलेच त्याची पुन्हा एकदा खात्री पटली आणि वाईट वाटले . इथे जवळच असलेल्या गावामध्ये आम्ही पोहोचलो . एका दुकानदाराने चहा पाजला . पूर्वी गावामध्ये सेवा व्हायची परंतु आता एका साधूने आश्रम उघडला आहे तिथे सर्वजण जातात आणि तुम्ही देखील तिथे जा असे आम्हाला सांगण्यात आले . रस्ता डावीकडे वळला व पुन्हा उजवीकडे वळला त्यानंतर डाव्या हाताला घनघोर अरण्य मध्ये तारेचे कुंपण आणि उजव्या बाजूला शेती आणि गाव असे चित्र दिसू लागले . या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना निश्चितपणे वन्य पशुपक्षी दर्शन देत असणार याची खात्री पटली . उजवीकडे खाली एक अतिशय सुंदर आश्रम दिसला . संध्याकाळ होता होता या आश्रमामध्ये पोहोचलो . आश्रमाचे वातावरण अतिशय सकारात्मक आणि हवेहवेसे वाटणारे होते . एक तरुण साधू हा आश्रम चालवीत असे . हा कधी कोणाला नाव सांगत नसे परंतु फार खोदून विचारल्यावर त्यांनी त्यांचे नाव रामदास असे मला सांगितले . या तरुण रामदास बाबांची कथा मोठी रंजक होती . त्यांनी त्यांची परिक्रमा ज्योती बेन आणि शशी बेन यांच्या घरातून उचलली होती . आणि त्यांच्या सांगण्यावरूनच इथे आश्रम उभा केला होता असे ते म्हणाले . हा आखाड्याचा साधू असल्यामुळे दाढी जटा वगैरे सर्व ठेवत असे . परंतु इथे काही वर्षे राहिल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की ग्रामस्थांना जटा आणि दाढीची "एलर्जी " आहे . मग मात्र त्यांनी चकाचक दाढी करून एखाद्या सर्वसामान्य युवकाप्रमाणे राहायला सुरुवात केली आणि त्यानंतर ग्रामस्थांची मदत वाढू लागली . तरी देखील या साधूच्या आगमनामुळे ग्रामस्थांच्या जुन्या सेवा बंद पडल्या त्याचे शल्य मनामध्ये राखत काही ग्रामस्थ या बिचार्या साधूशी धुसपूस करायचे असे मला चर्चेअंती लक्षात आले .प्रत्यक्षामध्ये या साधूने ज्या पद्धतीचे वातावरण निर्माण केले होते आणि ज्या दर्जाची सेवा तो देत होता त्याच्या जवळपास देखील जाणे गृहस्थी आश्रमांना शक्य नसते हे मी अनुभवांती आता सांगू शकतो . अतिशय सुंदर अशी एक गवताची कुटी परिक्रमावासीयांसाठी तयार केली होती जिथे कुलरची व्यवस्था होती . तसेच हे साधू महाराज स्वतः जीप किंवा दुचाकी गाडी घेऊन रोज २२ किलोमीटर लक्कड कोटच्या झाडीमध्ये जाऊन वाटेत भेटणाऱ्या सर्व परिक्रमावासींना चहा बिस्किटे ताक आणि नाष्टा दररोज पुरवायचे ! ही फारच अनमोल आणि अद्भुत सेवा होती . आश्रमातील सर्व सुविधा देखील विचारपूर्वक निर्माण केल्या होत्या . स्वतः परिक्रमा केलेली असल्यामुळे साधूला परिक्रमावासींना काय द्यायला हवे याची चांगली कल्पना होती .

आश्रमातील सेवकांसमवेत भोजनासाठी रामदास महाराज बसले आहेत असे दुर्मिळ चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे .
मा नर्मदा सेवा कुटीर चालवणारे तरुण परिक्रमावासी संत श्री रामदास महाराज
लक्कड कोटच्या जंगलामध्ये परिक्रमा वासींना बालभोग सेवा देताना आश्रमाचे सेवेकरी .
रामदास महाराजांनी स्वतः पोस्ट केलेला हा फोटो त्यांची संपूर्ण मानसिकता सांगून जाणारा आहे .
या आश्रमाच्या भिंतीवर जागजागी विविध सुविचार लिहिलेले असून ते अतिशय खुमासदार आणि प्रसंगी विचार करायला लावणारे आहेत .
एकंदरीत पामाखेडी गावातील मा नर्मदा सेवा कुटीर हा आश्रम सर्व परिक्रमावासींना लक्षात राहणारा असाच आहे .
वहीमध्ये घेतलेला आश्रमाचा शिक्का . हा परिक्रमेतील १३६ वा मुक्काम होता .
इथे जमलेल्या भक्तांशी गप्पा मारल्या . साधू महाराजांसोबत देखील खूप चांगला सत्संग झाला . साधूने अतिशय सुंदर असे ताक , मऊसूत पोळ्या , सात्विक भाजी आणि गुळ भोजनामध्ये दिला . भोजनाने तृप्त झालो . ही जागा साधूने विकत घेतली होती . हा आश्रम नव्हता तेव्हा लक्कडकोट ची झाडी पार केलेल्या परिक्रमा वासींना फार अडचणी यायच्या . डांग डंठा अशा काही गावात मर्यादित सेवा पूर्वी मिळायची परंतु सेवा मिळेल याची शाश्वती नसायची . कारण सेवादार गृहस्थी असल्यामुळे त्यांना सेवा देण्यामध्ये अनेक मर्यादा येतात जे स्वाभाविक आहे . त्यामुळे अभ्यासपूर्वक ही जागा निवडली असे साधूने मला सांगितले . इतरांना इतके सुग्रास भोजन स्वहस्ते करून वाढणारा हा साधू स्वतः मात्र उपाशी झोपायचा . आश्रमामध्ये टेंबे स्वामी आणि रामकृष्ण परमहंस यांच्या मूर्ती होत्या . कुटीमध्ये आल्यावर सिद्धेश्वर कुरोली चे नंदकुमार कुंभार यांच्या आग्रहाखातर त्यांचे मित्र प्रकाश देशमुख आणि काटकर साहेब यांच्याशी फोनवर बोललो आणि मग पाठ टेकली . रामदास साधू महाराजांनी सुरू केलेली सेवा मनामध्ये घर करून राहिली ' . नर्मदा परिक्रमा आपल्याला खूप काही देते . प्रश्न असा उरतो की आपण परिक्रमेला काय देतो आहोत ? हाच प्रश्न स्वतःला विचारत निद्रादेवीच्या आधीन झालो .
लेखांक एकशे पन्नास समाप्त ( क्रमशः )
दादा पुढच्या लिखाणाची वाट पाहतोय
उत्तर द्याहटवागुरुदेव
उत्तर द्याहटवापुढील भाग कधी?
ते तुम्ही धोतर नेसालात ते कसे नेसतात हे सांगावे
त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकला आहे पहा युट्युब वर
हटवापुढचा भाग कधी?
उत्तर द्याहटवामी लेख माला परत वाचायला सुरू केली आहे, अन् आता लेख 115 वर आलो आहे.. पुढचे लेख लिहायचे मनावर घ्या अन् सुरू केलेले कार्य पूर्ण करा
पुढचा भाग कधी?
उत्तर द्याहटवानर्मदे हर.
उत्तर द्याहटवामध माश्यांचा हा प्रसंग आधी कुठे लिहला होता का ? कारण तो वाचलेला स्पष्ट आठवत आहे.
विक्रांत तिकोणे
नाही . हा प्रसंग आधी कुठेच प्रकाशित केलेला नाही . कदाचित ऐस पैस गप्पा या कार्यक्रमात सांगितला असावा .
हटवानर्मदे हर बाबाजी🙏पुढील भागाची आतुरता आहे तुमच्या ब्लॉग मुळे आता मनामध्ये खूप इच्छा झालीय नर्मदा परिक्रमा करण्याची . आता नर्मदा मातेची इच्छा कधी तो योग येतोय.
उत्तर द्याहटवातुम्ही परिक्रमा अक्षरशः जगला आहात तुमच्या अनुभवातून आमची परिक्रमा घडतेय नर्मदे हर 🙏
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा