सीता वनामध्ये रेवा कुंडाचे दर्शन घेऊन वर गेलो . जाताना मोहनदास साधूंना साष्टांग नमस्कार केला . इतक्या घनघोर जंगलामध्ये वर्षानुवर्षे राहून तपस्या करणे आणि परिक्रमा वासींची सेवा करणे ही काही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही . अलीकडे इकडे विकास दिसू लागला आहे . खाली असलेले रेवा कुंड म्हणजे प्रत्यक्षात सीतामाता अदृश्य झाली त्या दरीतून आलेल्या झऱ्याच्या पाण्याच्या मार्गात आहे . इथून वर जाण्यासाठी पक्का जिना आता बांधण्यात आलेला आहे . मी परिक्रमेमध्ये गेलो होतो तेव्हा कच्चा दगडी जिना होता . वरच्या बाजूला अतिशय पुरातन मंदिर आहे .मंदिराकडे बघताच त्यातील पुरातन अवशेष दिसू लागतात .अनेक छोट्या मोठ्या मूर्ती इथे पाहायला मिळतात . लवकुश जन्मस्थळी मंदिर असे नाव याला देण्यात आले आहे . परंतु प्रत्यक्षात लवकुशाचे जन्मस्थान खाली असलेल्या एका गुहेमध्ये दाखवले जाते .मंदिरामध्ये राम लक्ष्मण सीता अशा मूर्ती आहेत . सीतामातेचे डोळे फारच भयानक दाखवले आहेत ! तिला खोटे केस देखील लावले जातात . त्यामुळे तिचा विग्रह गमतीशीर दिसतो . इथे एक अत्यंत गंभीर आणि न हसणारा पुजारी बसलेला असतो . त्याला विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर तो देत नाही असे अनेकांनी सांगितले आणि मी देखील तो अनुभव घेतला ! इथून पुढे पुन्हा एकदा जंगलातला मार्ग असल्यामुळे त्याने व्यवस्थित मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे .कारण देव न करो परंतु यदा कदाचित एखादा परिक्रमावासी भटकला तर त्याच्या जीवावर ते बेतू शकते इतके भयानक जंगल आहे . इथूनच सीतामाई धरणी मध्ये प्रवेश करती झाली अशी मान्यता आहे .एखादी उल्का पडावी त्याप्रमाणे डोंगराला इथे चीर पडली आहे आणि दगड विस्कटले गेले आहेत . इथल्या दगड मुळातच चौकोनी कापल्यासारखे दिसतात . स्तरित खडकांचा हा प्रकार आहे .

हीच ती दरी जिथे सीतामाता भूमातेच्या पोटात प्रवेश करती झाली .
या भागातील दगड निश्चितपणे अनैसर्गिकपणे हललेले दिसतात
हेच ते कुंड आहे जिथे सीतामाता अदृश्य झाली असे स्थानिकांनी सांगितले . कुंडाचे पाणी अतिशय गोड आहे . आणि बारा महिने टिकत नाही .दिवाळीपर्यंतच असते .
वरच्या बाजूला एक वडाच्या झाडाचा मोठा पार बांधलेला असून समोरच सीतामाता मंदिर आहे .
प्राचीन सीतामाता मंदिर आणि लवकुश जन्मस्थळ अशी पाटी बाहेर लावलेली आहे .
लवकुश यांचा जन्म झालेली गुहा खाली आहे . तिथपर्यंत जाण्यासाठी दगडाच्या पायऱ्या करण्यात आलेल्या आहेत
हे सीतामातेचे पुजारी आहेत .अत्यंत गंभीर चेहरा करून बसलेले असतात . इथे परिक्रमावासी शक्यतो खालीच थांबतात .
मी ज्या दिवशी या मंदिरामध्ये पोहोचलो त्याच दिवशी माझ्या नंतर काही वेळाने आलेल्या एका परिक्रमावासींनी काढलेला त्याच पुजाऱ्याचा फोटो ! याचा हसरा फोटो दाखवला तर म्हणाल ते हरायला तयार आहे ! :)
वाल्मीकी आश्रम ही सर्वांची थांबण्यासाठी आवडती जागा आहे
सीता मातेच्या मंदिरामध्ये वाघ आणि बिबट्या यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत आणि लोक त्याला हार वगैरे घालतात !
सीता माता मंदिरामध्ये अनेक पुरातन मूर्ती आहेत . हे मंदिर अतिशय पुरातन असणार याची साक्ष इथे आजूबाजूला पडलेले सर्वच अवशेष देतात .
राम लक्ष्मण सीता यांचे विग्रह
इथे असलेली हनुमंताची मूर्ती देखील खूप सुंदर आहे .
सर्वांना प्रेमाने खाऊ घालणारे मोहनदास साधू मात्र सर्वांच्या लक्षात राहतात !
किमान यांच्या दर्शनासाठी अवश्य जावे अशी ही जागा आहे !
माझ्या काही तासच मागे चालणाऱ्या या परिक्रमावासिनी मोहनदास महाराजांची अजून काही चित्रे काढून ठेवली होती जी मला त्यांनी नंतर पाठविली .
साधूचा चेहरा झाकला तर केवळ शरीर आणि कांती पाहून वयाचा अंदाज लावता येत नाही हे आपल्याला हे चित्र पाहिल्यावर लक्षात येईल !
या स्वर्गीय जागेचा निरोप घेतला आणि जंगलातली पुढची वाट पकडली . हे सर्व स्थान व्यवस्थित पाहून मी साधारण चार वाजता इथून पुढे निघालो . अंधार पडायच्या आत पुढे मुक्कामी पोहोचणे आवश्यक होते . कारण हे खरोखरीच चांगले अरण्य होते . जंगलातील रस्त्याने निघालो . सोबत कोणी परिक्रमा वासी नव्हते .
जंगलामध्ये ३ छोटी मोठी गावे लागली . तंतूखेडी , मालीपुरा गावांच्या वनक्षेत्राच्या हद्दी पार करत रतनपुर या तुलनेने मोठ्या गावात आलो . सर्वत्र रस्त्याची कामे सुरू होती त्यामुळे धूळ फुफाटा सर्वत्र माजलेला होता .या गावातील वन जमिनी खडकाळ आहेत . सुपीक नाहीत .त्यामुळे ठराविकच प्रकारचे वृक्ष मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसतात .रतनपुर हे छोटेसेच परंतु टुमदार गाव आहे १३०० मतदान असलेले गाव आहे . गावातून जाताना काँग्रेसचा मोठा हात रंगवलेले एक मोठे घर होते व दारामध्ये एक आजोबा खाटेवर बसलेले होते .मी आजोबांकडे बघून हात जोडून नर्मदे हर असा पुकारा केला . परंतु त्यांनी ऐकून न ऐकल्यासारखे केले .त्यांच्या मांडीवर एक छोटीशी दीड वर्षाची चिमुरडी बसलेली होती .तिने मात्र दोन्ही हात वर करून मनापासून "नम्मे हा " असा आवाज दिला !आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने हे चित्र अतिशय आश्वासक होते ! जुने जाऊ द्या मरणा लागुनी । जाळूनी किंवा पुरूनि टाका । ही शाळेत शिकलेली कविता मला आठवली !रतनपुर गावात एक मारुतीचे मंदिर होते जिथे परिक्रमा वासींची सर्व व्यवस्था उत्तम होती .गावचे तरुण रात्री उशिरापर्यंत माझ्याशी गप्पा मारत होते .सर्वच जण कट्टर काँग्रेसी होते . या गावामध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आधारस्तंभ दिग्विजय सिंग परिक्रमेमध्ये आवर्जून राहिले होते .त्या वेळच्या आठवणी सर्वजण मला सांगत होते .देश काल परिस्थितीबद्दल आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीं बद्दल या लोकांचे घोर अज्ञान होते . मी मला त्यांना जी माहिती चुकीची आहे असे वाटले की पुराव्यांसकट योग्य माहिती पुरवली . एकंदरीत आपला देश कुठून कुठे चालला आहे हे लक्षात आल्यावर त्यांचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला . रात्री गांधी गांधी करणारे सर्व कार्यकर्ते सकाळी मोदी मोदी करत निघून गेले ! अर्थात मी काही कुणाचा अंधभक्त नाही . परंतु प्रत्यक्षामध्ये जे अनुभव येत होते ते नाकारण्या इतका कृतघ्न आणि आत्ममग्न देखील नाही . यातील एका तरुणाचा सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये चांगला संपर्क होता .त्याला बैलगाडा शर्यतींचा नाद होता . तिरंगा नावाचा त्याचा एक अप्रतिम बैल त्याने नुकताच एक लाख एक्कावन्न हजाराला सांगली भागात विकला होता .पुढच्याच महिन्यात तो बैल तीन लाख एक्कावन्न हजाराला महाराष्ट्रातच विकला गेला . यामुळे त्याचे सांगलीतील लोकांबद्दल विपरीत मत झाले होते . मी हीच घटना केंद्रस्थानी मांडून त्याने सांगली जिल्ह्यात संपर्क कशाच्या बळावर वाढवला याचा शोध घेतला असता काँग्रेसचा कार्यकर्ता किंवा काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले घराणे हा त्यांच्यातील संपर्कसूत्राचा मुख्य गाभा असल्याचे त्याच्याच लक्षात आणून दिले ! आणि त्यानंतर त्याला विश्वासघात किंवा विश्वास म्हणजे काय हे काही वेगळे सांगायची गरज उरली नाही ! अतिशय जातीवंत असा हा बैल केवळ समोरच्या व्यक्तीने फसवल्यामुळे निम्म्या किमतीत त्याला विकावा लागला . खरे तर या बैलाने याला एकदा शिंगावर घेतले होते म्हणून हा त्याला घाबरत होता . अखेरीस माझे म्हणणे त्याला पटले . जी व्यक्ती विचारधारेचा आधार घेत समोरच्या विश्वासातल्या माणसाला फसवू शकते ती व्यक्ती देश पातळीवर देखील वैचारिक व्यभिचार नक्कीच करू शकते हे सर्वांना पटले .इथून धाराजी अर्थात धावडीकुंड जवळच होते हे आपण पाहिले .माझ्या मनात अशी तीव्र इच्छा होती की इथे शिवलिंगे काढणारी व्यक्ती कोण असेल व कशी असेल ? तिच्याबद्दल काही माहिती मिळाली तर बरे होईल . अगदी समोरच्या तटावर असल्यापासून हा विचार डोक्यात रुंजी घालत होता .इथे बसून मला राजकारणाच्या गप्पा करायच्या नव्हत्या. त्यामुळे विषय बदलून मी धावडीकुंडाचा विषय तरुणांच्या पुढे मांडला . त्याबरोबर सर्वजण हिरीरीने मला धावडीकुंडाचे त्यांच्याकडे असलेले फोटो व्हिडिओ दाखवू लागले ! या धावडीकुंडातील रांजणखळग्यामध्ये पडणारे पाणी इतके भयानक गतीने पडायचे की त्याकडे पाहताना देखील डोळे गरगरायचे . मात्र एकाच कुटुंबाला या कुंडामध्ये उतरण्याचे वरदान नर्मदा मातेकडून प्राप्त झाले होते असे मला या तरुणांनी सांगितले .त्या कुटुंबातील लोकच आत मध्ये उडी मारून आपल्याला हवी ती शिवलिंगे काढून बाहेर आणत असत . कधी कधी पाच ते सहा तास पाण्याखाली राहून हवे ते शिवलिंग काढून देणारा एक मनुष्य इथे प्रसिद्ध होता . याचे नाव होते गेनसिंग दावरा . या महामानवाच्या अनेक आख्यायिका मी दोन्ही तटावर ऐकल्या होत्या . याचा पुत्र मानसिंग दावरा याला देखील ही सिद्धी प्राप्त होती .मानसिंग इसवी सन २००७ पर्यंत शिवलिंगे काढत असे .तो धावडीकुंडाच्या पाण्यामध्ये उडी घ्यायचा . आठ ते दहा शिवलिंगे घेऊन बाहेर यायचा . त्यातील जे एखादे पसंत पडेल ते ठेवून बाकीची पुन्हा मैयाला अर्पण करायचा . एका कुंडामध्ये तर फक्त जनेउधारी शिवलिंगे निघायची ! असे प्रत्येक कुंडाचे काही ना काही वैशिष्ट्य होते . शिवलिंग दिल्यावर हा पैसे मागत नसे . शिवलिंग घेणारा भक्त जो काही ऐच्छिक दान देईल ते तो घ्यायचा . कधी कधी काही दुष्ट लोक त्याला अवघा एक रुपया देऊन सुद्धा निघून गेले आहेत .परंतु याने कधीच तक्रार केली नाही . त्यामुळेच नर्मदा माई त्याला प्रसन्न होती . हा २४ तास दारूच्या नशे मध्ये असायचा .बाकी काहीच काम धंदा करत नसे . संध्याकाळी घरी परतताना तो एक शेवटचा सूर मारायचा आणि नर्मदा मैया त्याला रोज एक मासा देत असे . तो घेऊन हा घरी यायचा . त्यामुळे घरचे देखील काही बोलत नसत . मागे दक्षिण तटावर गंगा ओटल्यापाशी एका साधूने मला एक कथा सांगितली होती . या धावडी .कुंडामध्ये एक गाय रोज उडी मारायची आणि अदृश्य व्हायची .संध्याकाळी पुन्हा तिथूनच बाहेर पडायची . हे बघून एका माणसाने गाईच्या पाठोपाठ धावडीकुंडामध्ये उडी मारली .आणि तिची शेपटी धरून तिच्या मागे जात राहिला . थोड्याच वेळात गाईने नर्मदा मातेच्या पोटात असलेल्या एका गुहेमध्ये प्रवेश केला . इथे एक साधू तपस्येला बसले होते . त्यांना तिने दूध दिले . साधने हा नवीन पाहुणा ओळखला आणि त्याला प्रसाद म्हणून काही कोळसे दिले . त्यांचे वजन जास्त झाले म्हणून याने सगळे कोळसे फेकून दिले आणि एकच ठेवला . गाय पुन्हा त्याला बाहेर घेऊन आली . घरी जाऊन बघतो तर त्या कोळशाचे सोने झाले होते ! आणि मग याला बाकीचे कोळसे फेकून दिलाचा पश्चाताप झाला ! अशी ती कथा होती . इतका वेळ मला मानसिंग ची कथा सांगणारा आलोक नावाचा जो मनुष्य होता त्यांनी अखेरीस त्याची ओळख प्रकट केली . तो या मानसिंगचा सख्खा भाचा होता . आणि वरील कथेतील पात्र म्हणजे मानसिंगच होता हे त्याने खात्रीपूर्वक सांगितले . तो रतनपूरला राहायचा परंतु रात्री बारा वाजता घरी गेला इतक्या गप्पा आम्ही मारल्या .काँग्रेस शासनाने धावडी कुंड मुद्दाम होऊन बुडवले असे सर्व स्थानिक ग्रामस्थांचे स्पष्ट मत होते . कारण असे रांजणखळगे तयार व्हायला करोडो वर्षे जावी लागतात . हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात खोल रांजणखळगे होते असे म्हणतात . आलोक चा एक भाऊ देखील होता परंतु त्याचा खून झाला होता असे त्याने मला सहजच सांगितले. थोडक्यात मृत्यूला न भिणारे हे घराणे होते . या रांजण खळग्यांच्या परिसरात निवांत ध्यानाला बसता येईल अशा अनेक गुफा होत्या . या जलप्रपातामध्ये उडी मारण्यासाठी प्रचंड हिम्मत लागायची . ती केवळ मानसिंग आणि त्याच्या परिवारामध्येच होती . कारण ते मैयाचे नाव घेऊन जे काय होईल ते होईल असा विचार करून उडी मारायचे ! त्यांच्या डोक्यात एकदाही मरण्याचा विचार आला नाही ! मानसिंग इतका हुशार होता की त्याला हवे ते दगड तो रांजण खळग्यांमध्ये नेऊन टाकायचा आणि ठराविक कालावधीनंतर त्याची तयार झालेली शिवलिंगे घेऊन बाहेर यायचा .समोरच्या माणसाला हवे तसे शिवलिंग तो आणून देतो अशी सिद्धी त्याला प्राप्त आहे अशी मान्यता होती .परंतु मला असे जाणवले की त्याने अभ्यासपूर्वक या रांजण खळग्यांचा वापर करून घेतला होता . इंदोर परिसरातील आपले एक सदानंद काळे नामक वाचक आहेत . गेली अनेक वर्ष ट्रेकिंगचा छंद असल्यामुळे ते ओंकारेश्वर पासून ते नेमावर पर्यंतचा नर्मदा मातेचा अतिशय सुंदर असा परिसर फिरलेले आहेत .पूर्वी ओंकारेश्वर पासून धाराजी पर्यंत नावेतून जाता येत असे .तेव्हा भेडाघाट प्रमाणे दोन्ही बाजूच्या खडकाळ किनाऱ्यांचा आनंद घेता यायचा .फक्त भेडाघाट पांढऱ्या पाषाणामध्ये आहे आणि इथले कातळ कडे काळया रंगाचे होते .धाराजीचे जे मूळ स्थान आहे तिथे पुनासा धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे अनेक लोक वाहून गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत .धाराजी जवळच कावड्या पहाड नावाची फत्थराचे लांबच लांब शिळा खंड ठेवलेली जागा आहे . या शिळा कोणी आणि कधी इथे आणून ठेवल्या याची माहिती मिळत नाही !





कावडिया पहाड येथील लांबच लांब शिलाखंड !
सदानंद काळे सांगतात की त्यामुळेच इंदुरकर अभिमानाने म्हणतात की जसा महाराष्ट्राला सह्याद्री आहे तशी इंदुरकरांना नर्मदा माई आहे ! असो .
भोजन प्रसादी घेतल्यावर गप्पा मारत मारत झोपी गेलो . अंगणातच उघड्यावरती मस्तपैकी झोपलो . इथे दिग्विजय सिंग यांच्या बद्दल खूप काही ऐकल्यामुळे कधीतरी या माणसाला भेटले पाहिजे अशी सूक्ष्म इच्छा मनामध्ये येऊन गेली .आणि पुढे परिक्रमा संपल्या संपल्या पुण्यामध्ये अनपेक्षितपणे त्यांची विमानतळावर भेट झाली .पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ते आले होते .नुकतीच नर्मदा परिक्रमा झाली आहे असे सांगितल्यावर त्यांनी सर्वांच्या समोर मला वाकून नमस्कार केला .
पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री श्री दिग्विजय सिंह प्रस्तुत लेखकासोबत
त्यांनी लिहिलेले नर्मदा के पथिक हे त्यांच्या तिसऱ्या पत्नीसोबत त्यांनी केलेल्या पहिल्या परिक्रमेचे पुस्तक त्यांनी मला स्वीय सहायक ओम प्रकाश शर्मा यांना सांगून सातच दिवसात घरी पाठवले .

तात्पर्य चांगली वाईट मध्यम कुठलीही इच्छा नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर लगेच पूर्ण होते .त्यामुळे जपून इच्छा व्यक्त करावी किंवा इच्छा व्यक्त करूच नये हे सर्वात उत्तम. असो . पहाटे सर्व आन्हिके आटोपून पुढे निघालो . आता बावडीखेडा चार किलोमीटर दूर होते . वाटेमध्ये जंगल होते पण तेंदूपत्ता तोडणाऱ्यांची लगबग सुरू असल्यामुळे जंगल भयानक वाटत नव्हते .इथून पुढे मात्र जयंती मातेचे मंदिर येईपर्यंत घनदाट अरण्य लागले .मध्ये कनाडी किंवा हिरानिया नावाची नदी पार केली . अतिशय सुंदर आणि नितळ पाणी होते . नदीच्या पात्रावर छोटा लाकडी पूल बनवला होता .ही नदी शुद्ध जंगली नदी आहे हे पाहताक्षणीच लक्षात येत होते . इथे शंभर टक्के पाणी पिण्यासाठी जंगली जनावरे येत असणार .काही काळ या नदीच्या काठावर बसलो . ही नदी फारच आवडली ! तिचे जल प्राशन केले आणि पुढे निघालो . पुढे थोडासा चढ चढल्यावर लगेचच जयंती मातेचे मंदिर आहे . या संपूर्ण भागामध्ये केवळ या मंदिरापाशी तुम्हाला मानवी वावर आढळतो . बाकी सर्वत्र घनदाट जंगल आहे . या मंदिर परिसरामध्ये आजही वाघ आणि बिबटे फिरतात त्यामुळे इथे जागोजागी जाळ्या बांधलेल्या आहेत . संतोष सोलंकी नावाचा रतनपुर गावातला एक रंगारी मला इथे भेटला . यांनी येथे स्वतः वाघ पाहिलेला आहे . जयंती मातेचे मंदिर रंगविण्याचे काम चालले असताना तो गच्चीवर झोपला होता . आणि रात्री अचानक त्याला जाग आली म्हणून त्याने खाली पाहिले तर त्याच्या समोर एक भला मोठा पट्टेरी वाघ चालत चालला होता .तो वाघ इतका मोठा होता की त्याला पाहून याची बोबडीच वळली . इथल्या परिसराचा मानवी पद्धतीने विकास करणारे एक बाबाजी होते . त्यांनाच या मंदिराचे जनक मानतात . त्यांनी या मंदिरात रात्री घुसलेले दोन चोरटे ठार केले होते . व त्यांना तुरुंगवास देखील झाला होता . दक्षिण तटावर बाबर नावाचे गाव आहे इथे यांच्या गुरुदेवांचा आश्रम होता . या ठिकाणी मी राहिलो होतो .जयंती माता मंदिर पुनासा तहसील आणि खंडवा जिल्ह्यामध्ये येते . या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे . इथे परिक्रमावासी सकाळी येवो किंवा संध्याकाळी येवो . दिवसभरात कुठल्याही वेळी तुम्ही येथे पोहोचलात तरी तुम्हाला इथे मुक्काम करावाच लागतो . कारण इथून पुढे पामाखेडी नावाचे गाव आहे तिथपर्यंत सलग बावीस किलोमीटर लांबीचे जंगल आहे . या संपूर्ण मार्गावरती मी ज्या काळात चाललो त्या काळात पाण्याचा थेंब देखील उपलब्ध नव्हता . अलीकडच्या काळामध्ये तिथे दोन हात पंप झालेले आहेत . मी चाललो त्या काळामध्ये त्या हातपंपांची तयारी सुरू होती . आता हे हात पंप चालू झालेले आहेत . त्यामुळे कोणालाही दुपारी किंवा संध्याकाळी इथून पुढे सोडले जात नाही . मुक्काम करून विश्रांती घेऊन सकाळी ताज्या दमाने निघावे असा इथला परिपाठ आहे . संपूर्ण नर्मदा परिक्रमा मार्गावरील हे असे एकमेव ठिकाण आहे की जिथे सलग २२ किलोमीटर चालावेच लागते . मध्ये कुठलाही आश्रम नाही . एक छोटेसे मारुतीचे बिन भिंतीचे मंदिर आहे . परंतु तिथे देखील थांबण्यासाठी सुरक्षित वाटावे असे काही नाही . मी तर मंदिरात लवकर पोहोचलो होतो त्यामुळे दिवसभर इथे थांबून या परिसराचा आनंद घ्यायचा असे ठरवले . मंदिराच्या बाहेर काही दुकाने नावाला होती . मंदिराचा परिसर मोठा आहे . वनक्षेत्रामध्ये असलेल्या मंदिरांमध्ये शक्यतो धांगडधिंगा केला जाऊ नये अशी अपेक्षा आहे . परंतु दुर्दैवाने भारतातील ज्या काही वनक्षेत्रातील मंदिरांना मी भेट दिली आहे त्या प्रत्येक मंदिराने रीतसर कर्णे स्पीकर वगैरे लावून आपले अस्तित्व वन्य प्राण्यांना दाखवून दिलेले आहे असे जाणवते .हे दुर्दैवी चित्र आहे . इथले पक्षी जीवन खूप समृद्ध होते .खूप मोठ्या संख्येने पक्षी इथे दिसत होते . विशेषतः टकाचोर ज्याला पावरा आदिवासी लोक खुसकडो म्हणतात ,ते पक्षी इथे अक्षरशः शेकड्याने होते . इथे पाणी पिण्याचे काही नळ होते तिथे पाणी पिण्यासाठी या पक्षांची झुंबड उडालेली होती . मी या भागाला पक्षी तीर्थ असे नाव दिले ! शेकड्याच्या संख्येने टकाचोर , ब्राह्मणी मैना , भोरड्या ( सातभाई ) , जंगली साळुंख्या , चीरक , धोबी ,पोपट , छोटे पक्षी , होले आदी पक्षी मी येथे पाहिले .सर्वात महत्त्वाचे आश्चर्य म्हणजे परिक्रमेत प्रथमच कावळा पाहिला ! तू देखील कनाडी नदीमध्ये पाहिला . नर्मदे काठी कावळे जवळपास नाहीतच !खारी देखील मोठ्या प्रमाणात पळताना दिसल्या .लाल डोके आणि पिवळे पंख असलेले सुतार पक्षी देखील खूप होते . मोर मात्र या जंगलामध्ये दिसले नाहीत . पूर्वी जसे चिमण्यांचे थवे असायचे त्या पद्धतीने टकाचोर पक्षांचे थवे इथे पाहायला मिळाले !त्यांचा घुमणारा विशिष्ट आवाज संपूर्ण परिसरामध्ये निनादत होता . अतिशय सुंदर दिसणारा हा पक्षी धीट आणि आक्रमक असतो . आदिवासी लोक याला अशुभ मानतात . हा कोंबड्यांची पिले पळवतो म्हणून त्याला दिसताच पळवून लावतात . इथे भोजनासाठी बसलो तेव्हा एक गंमतच झाली ! या निमाड प्रांतातील तिखट जाळ जेवण पोटाची आग आग व्हायची .त्यामुळे क्षणभरच मनामध्ये असा विचार आला की मैय्या ! आपल्याला जेवताना तूप मिळाले असते तर किती बरे झाले असते ! असा विचार करून पंधरा सेकंद होतात तोपर्यंत एक सेवादार आला आणि म्हणाला बाबाजी आपको घी दूँ क्या ? आणि खरोखरच तो चांगले पातेलं भर तूप घेऊन आला !मनसोक्त तूप खाल्ले ! पोटाला खूप आराम वाटला ! नर्मदे काठी सर्व काही चमत्कारिक गतीने पूर्णत्वाला जाते ! मनात विचार येता क्षणीच पंधराच सेकंदात आचार ! अशी आहे नर्मदा मातेची गती ! त्यामुळे तिला स्थिती मागूच नये ! ती मुळातच गती देणारी आहे !
जीवाला उर्ध्वगती देणारी शक्ती !
भरपेट जेवण झाले मात्र उन्हाचा तडाखा देखील वाढू लागला . जयंती माता मंदिर परिसरात सर्वत्र काँक्रीट ओतलेले असल्यामुळे परिसर चांगला भाजून निघत होता .प्रचंड उष्मा सगळीकडे साठला होता . वारे देखील पडले होते . इथे परिक्रमा वासींसाठी एक मोठा सभागृह वजा स्लॅब टाकलेला असून चारी बाजूंनी मजबूत जाळ्या लावलेल्या आहेत . रात्री अपरात्री वाघ किंवा अन्य हिंस्र श्वापदे आत शिरू नयेत असा स्पष्ट हेतू त्यामागे आहे . या सभागृहाला काही दारे आहेत . त्यातील एका दाराच्या बाहेर पाणी पिण्याचे नळ होते . त्यातील गळणाऱ्या नळाचे पाणी प्यायला पक्षांची झुंबड उडाली होती . मला पक्षी निरीक्षण करायला खूप आवडते . माझ्या डोक्यात एक सुपीक कल्पना आली ! मी माझी भोजनाची थाळी काढली . त्याच्यामध्ये पिण्याचे पाणी भरले . आणि गळणारे सर्व नळ बंद करून टाकले . हे ताट मी सभागृहात प्रवेश करण्याच्या पायरीवर ठेवून दिले . आणि भिंतीच्या जवळ माझे आसन लावून मी पडून राहिलो . तोंडावर पांढरे धोतर पांघरले व फक्त डोळे उघडे ठेवले . थोड्याच वेळात पाणी पिणाऱ्या पक्षांची झुंबड तिथे उडाली ! इतके सारे पक्षी इतक्या जवळून मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो ! बरं तिथे माझ्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते ! त्यामुळे पक्षांचा वावर अतिशय निर्धास्त होता ! टकाचोर हा पक्षी फार जवळून पाहिला ! बंगाली मध्ये पैशाला टका म्हणतात . नाणी चोरणारा यातून हा शब्द आला असावा ! पक्षी माझ्या इतके जवळ होते की ते उडाले की मला त्यांच्या पंखाचे वारे लागायचे ! किती म्हणून पक्षी सांगावेत ! ग्रे टीट , बुलबुल ,जांभळा सूर्य पक्षी ,शिंपी ,धोबी , चिरक , तांबट , सुतार , शेकडो सातभाई , शेकडो मैना ,ब्राह्मणी मैना , शेकडो टकाचोर ,साधे पोपट ,राखी डोक्याचे पोपट , पिवळे सुतार ,खारुताई ,उंदीर ,घुशी , इतकेच काय माकडे देखील पाणी प्यायला आली ! थोड्यावेळाने एक मोठा बैल पाणी प्यायला आला मग मात्र मी ती थाळी उचलून ठेवली ! न जाणो अजून थोड्या वेळाने एखादा वाघोबा यायचा ! विनोदाचा भाग सोडून द्या परंतु या एका प्रसंगावरून मला त्या अरण्याचे पशुपक्षी जीवन कधी समृद्ध आहे याचा अंदाज आला . तसेच पक्षी एकमेकांना पाणी कुठे आहे याचा संदेश देतात हे देखील लक्षात आले . जयंती माता मंदिराचा परिसर फिरून पाहिला . इथे राहणाऱ्या माणसांनी एक अप्रतिम कल्पना लढवली होती ! इथे आलेले लोक प्लास्टिकचा कचरा टाकतात .फुलवातींच्या पिशव्या ,हाराच्या पिशव्या ,उदबत्तीच्या पिशव्या असे प्लास्टिक जंगलामध्ये फेकून निघून जातात .यावर त्या महाराजांनी अशी शक्कल लढवली की एका मोकळ्या मंदिराला जर प्लास्टिक बांधून नवस बोलला तर तो पूर्ण होतो ! आणि बघता बघता शोधून शोधून प्लास्टिक आणून लोक तिथे बांधू लागले ! मला त्या महंतांच्या कल्पनेचे कौतुक वाटले ! ही कल्पना प्रत्येक मंदिरातआणि प्रत्येक घाटावर राबवता येणे शक्य आहे ! प्रत्येक धर्मक्षेत्रावर एक नवस मंडप असावा . जिथे प्लास्टिकच्या चिंध्या बांधल्या की नवस पूर्ण होईल ! एखादी गोष्ट साध्या शब्दात पुन्हा पुन्हा सांगून कळत नसेल तर असला उपाय करणे याशिवाय गत्यंतर उरतच नाही .असो . चला तुम्हाला जयंती माता मंदिराचा परिसर फिरवून दाखवतो .

हा नकाशा पाहिल्यावर आपल्याला नर्मदा मातेपासून जयंती माता मंदिराचे स्थान किती दूर आहे ते लक्षात येईल तसेच या संपूर्ण परिसरात किती घनदाट आणि अखंड अरण्य आहे ते देखील डोळ्यांना दिसेलच !
या जयंती माता मंदिराच्या जवळच भैरव गुफा आहे . ते देखील अतिशय अद्भुत स्थान आहे .त्याची माहिती पुढे पाहूच . परंतु भैरव गुफेवरुन आलेली कनेरी नदी खाडी अथवा खारी नदीला कुठे मिळते आणि खाडी नदी पासून जयंती माता मंदिर किती जवळ आहे ते आपल्याला या नकाशात लक्षात येईल .
हीच ती खाडी / खारी नदी .ही पुढे नर्मदा मातेला मिळते . तिचे पाणी अतिशय नितळ आणि स्वच्छ सुंदर आहे .
नदी पार करण्यासाठी असा एक मजबूत लाकडी पूल बनवलेला आहे .या पुलावरून दुचाकी देखील जातात .
नदीच्या काठाने घनदाट अरण्य आहे . काठ सोडल्यावर विरळ परंतु पुरेसे जंगल आहे
मी हा पूल पार केला तेव्हा तो साधारण असा होता . किंवा याहूनही वाईट अवस्थेत होता . प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागले होते .
पूल पार करून थोडासा चढ चढून वर आले की जयंती मातेच्या मंदिराचे हे प्रवेशद्वार दिसते .
हेच जयंती मातेचे मंदिर आहे . याच्याच गच्चीवरून रंगारी संतोष सोलंकीने वाघ पाहिला होता !
हीच ती जयंती माता !हिला मानणारा मोठा वर्ग निमाड प्रांतात आहे .
परिसरात भरपूर वन्य प्राणी आहेत . माकडांचा तर सुळसुळाट आहे
पहावे तिकडे माकडे दिसतात .
मला अतिशय आनंद झाला होता . मला अरण्य वाचनाची आवड असल्यामुळे आणि अरण्य वाचन हे एकट्यानेच करायचे असते हे शास्त्र माहिती असल्यामुळे मी अतिशय खुश होतो .कारण उद्या सकाळी मला एकट्यालाच हा सगळा प्रवास पूर्ण करायचा होता .आपल्याला नक्की विविध प्रकारचे प्राणी दर्शन घेणार याची मला खात्री होती .परंतु लवकरच माझ्या या आनंदावर विरजण पडले .
दुपारी इथे नंदकुमार कुंभार नावाचे एक परिक्रमा वासी आले . सिद्धेश्वर कुरोली हे त्यांचे गाव . गोल मटोल देह यष्टी आणि अत्यंत हसरा चेहरा ! त्यांनी मला विनंती केली की इथून पुढच्या पामाखेडी आश्रमा पर्यंत जंगलातील मार्गामध्ये मी त्यांना साथ द्यावी .ते देखील एकट्यानेच चालत होते . परंतु इथे आलेले परिक्रमावासी जोडीनेच पाठवले जातात असे स्थानिकांनी देखील सांगितले . एकट्या परिक्रमा वाशीला पाठवणे थोडेसे धोक्याचे असते . त्याचे काही बरे वाईट झालेच तर कळायला दुसरा कुठला मार्गच नाही इतके हे जंगल बेकार आहे . इथून जवळच एक छोटी माताजी नावाचे स्थान होते . तो अजूनच घनदाट जंगलाचा भाग होता . तिथे एकच साधू मुक्कामाला असतो असे मला कळले . परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणाचे दर्शन करता आले नाही कारण परत येईपर्यंत अंधार झाला असता .
श्री नंदकुमार उर्फ नंदू शेठ कुंभार सिद्धेश्वर कुरोली सांगली
नंदू शेठ कुंभार यांनी प्लास्टिकच्या नवस मंडपाचा काढलेला फोटो !
जयंती माता मंदिराचा नंदू शेठ यांनी काढलेला फोटो . या चित्रात दिसणाऱ्या श्लोकात देवीच्या किंवा शक्तीच्या अकरा प्रकट स्वरूपांना वंदन केलेले आहे . या मंत्राच्या उच्चारणाने वरील सर्व देवींच्या कृपा प्रसादाचा लाभ होतो अशी मान्यता आहे . यातील पहिली देवी जयंती माता आहे आणि तिचे हे मूळ स्थान होय !
ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते ।
यातील स्वाहा आणि स्वधा या अग्नीच्या पत्नी मानल्या जातात . असो .
नंदू शेठ ना फोटोग्राफीची मोठी आवड होती . संपूर्ण परिक्रमेचे त्यांनी खूप सुंदर फोटो काढले होते .ते फोटो पाहिले . मी सुरुवातीला एकट्याने चालायचा विचार पुन्हा पुन्हा मांडत राहिलो . परंतु शेवटी त्यांनी , "आता माझे वय झाले आहे .तू मला मुलासारखा आहेस : कृपा करून माझ्यासोबत चाल रे बाळा ! "अशी विनंती केल्यामुळे माझा निरुपाय झाला . परंतु या ठिकाणी मी त्यांना एक अट घातली .वन्य प्राणी हमखास दिसण्याच्या काही वेळा असतात . पहाटे रात्रभर फिरणारे शिकारी प्राणी आपापल्या निवाऱ्याकडे परतू लागतात . त्यामुळे अशावेळी ते दिसण्याची शक्यता जास्त असते .त्यामुळे उद्या आपण भल्या पहाटे निघायचे अशी कठीण अट मी घातली आणि नंदू शेठ ने ती लगेच मान्य केली ! संध्याकाळी मंदिरातली आरती केली . तत्पूर्वी समोरच असलेल्या भैरव गुफेमध्ये जाऊन आलो . या गुहेमध्ये एक अद्भुत अनुभव मला आला .त्याचे असे झाले . . .
लेखांक एकशे एकोणपन्नास समाप्त ( क्रमशः )
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाGood.I was waiting.
उत्तर द्याहटवानर्मदे हर,
उत्तर द्याहटवाया ठिकाणी फोटोत दाखवलेली कनेरी नदी आहे आपण ज्या दोन नद्यांची वर्णन केले आहेत त्यातली एक खारी दुसरी कनेरी असे स्थानिक नाव असलेल्या नद्या आहेत. यातल्या कनेरी नदीच्या काठावर कन्हेराची झाड आहेत व त्याची पान नदीच्या पात्रामध्ये काही ठिकाणी बुडालेली आहेत. अत्यंत सुंदर असं हे वनक्षेत्र आहे आता मंदिराचा खूपच विकास झालेला दिसतोय.
सदानंद काळे
खूप छान,सिद्धेश्वर कुरोलीत एक शंकराचे "सिद्धेश्वर"मंदिर सुप्रसिद्ध आहे आपण गोंदवल्याला जेव्हा yal त्याचवेळी कळवा ९४२३८६७४०० नंबरवर,तेथून सिद्धेश्वर कुरोली जवळ आहे,ही साताराजिळ्यातील वडूज च्या पुढे (औंध यमाई देवीचे स्थान) आहे , नर्मदे हर
उत्तर द्याहटवा