लेखांक १४८ : जंगलाच्या मधोमध वसलेले कुंडी गाव व सीतावनातील रेवाकुंडाचे महंत श्री मोहनदास त्यागी जी
कोठावा गावातील करंजेश्वर महादेव अथवा कश्यप ऋषी आश्रम आणि च्यवन ऋषी आश्रम मागे टाकून मी पुन्हा एकदा जंगलात शिरलो . दुपारचे साधारण दोन वाजले होते . च्यवन ऋषी आश्रमामध्ये येण्याचा मार्ग वेगळा आहे आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगळा आहे .म्हणजे आलो त्या मार्गाने जाता येते परंतु जंगलातून एक चटकट आहे असे मला एका साधूने सांगितले होते. तो मी विचारून घेतला आणि जंगलामध्ये शिरलो .का कोणास ठाऊक परंतु आता जंगलाची भीती वाटायची बंद झाली होती. कारण जंगलचा राजा आपल्या बाजूने आहे असा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला होता .एक प्रकारे मला भेटलेल्या वाघाने मला अभय दिले होते .मला आता थेट कुंडी नावाचे गाव गाठायचे होते. मध्ये थेंब भर सुद्धा पाणी मिळत नाही त्यामुळे सोबत भरपूर पाणी ठेवणे असा सल्ला सर्वच साधूंनी दिलेला होता .त्यामुळे मी आश्रमातच भरपूर पाणी पिऊन घेतले आणि सोबत चार लिटर पाणी ठेवले . सियाराम बाबांनी दिलेल्या रिकाम्या बाटल्या माझ्याकडे होत्या त्या या कामी आल्या . डोलडालच्या बाटलीमध्ये देखील पाणी भरून घेतले .इथून पुढे चालताना मध्ये कुठेही थांबू नये असे सर्वांनी सांगितले होते .इथून पुढे जंगलाला खरी सुरुवात होते असाच सर्वांचा सूर होता .उन्हाचा तडाका एवढा जबरदस्त होता की केवळ दहा पावले चालल्याबरोबरच घामाने संपूर्ण अंग भिजून गेले . अंगावरून येणारा घाम आणि वरून असलेला सूर्याचा ताप यामुळे अंगातून चांगल्या वाफा निघत होत्या . खाली तापलेला फुफाटा , वर आग ओकणारा सूर्य आणि पोटात धगधगणारा जठराग्नी , यावर कडी म्हणून आजूबाजूला सर्व पानगळ झालेले रुक्ष जंगल ! एकंदरीत भट्टी चांगलीच जमली होती ! यालाच तापणे म्हणतात . तापणे म्हणजे तप ! तप म्हणजे तापणे ! त त प प न करता तळपत्या तेजोनिधीच्या तेजपूर्ण तपात तारतम्याने तुफान तापणे हेच खरे तप ! मी असे मनोमन ठरविले की मध्ये कुठेही बसायचे नाही किंवा थांबायचे नाही . आणि तो निर्णय योग्य ठरला कारण न थांबता सलग आठ ते दहा किलोमीटर मी चाललो . थोडासा जंगलातील रस्ता पार केल्यावर पूर्वी मला लागलेला मुख्य जयंती माता रस्ता लागला आणि त्यावर अर्धा किलोमीटर चालल्या नंतर पुन्हा एकदा डावीकडे जंगलामध्ये जाणारा कच्चा रस्ता लागला .इथे मुख्य डांबरी रस्ता सोडताना एक चमत्कार घडला . मी मनातल्या मनात असा विचार केला की आपण कालच शहरामध्ये असताना बिस्कीटचे पुढे सोबत घ्यायला पाहिजे होते .म्हणजे आत्ता जंगलामध्ये भूक लागल्यावर ते खाता आले असते . आता जंगलामध्ये शिरल्यावर काही मिळणार नाही . मी असा विचार करतो न करतो तोच रस्त्याने भरधाव वेगाने एक गाडी आली आणि माझ्या शेजारी थांबली . १५ वर्षाचा पोरसवदा मुलगा गाडी चालवत होता .त्याने माझ्या हातात दोन पारले जी बिस्किटांचे पुडे टेकवले आणि पुन्हा भरधाव वेगाने निघून गेला ! मी मनोमन नर्मदा मातेचे आभार मानले ! आता मातीचा रस्ता सुरू झाला . माती म्हणजे बारीक मुरूम देखील होते . त्यामुळे पायाला थोडेसे कष्टदायकच प्रकरण होते . झाडे विरळ होती आणि पानगळ झालेली होती . परंतु सलग झाडी मात्र होती .कडक उन्हामुळे सर्वच प्राणी पक्षी गायब होते .परंतु धुळीने माखलेल्या रस्त्यावर त्यांच्या पाऊलखुणा मात्र स्पष्टपणे दिसत होत्या . तरस ,बिबट्या , लांडगा ,नीलगाय ,सांबर , मोर इत्यादी अनेक प्राण्यांच्या पक्ष्यांच्या पाऊलखुणा मला वेळोवेळी जागोजागी दिसल्या .या मातीच्या आणि जंगलातल्या वाटेमध्ये मला एकही मनुष्यप्राणी किंवा गाडी आडवी गेली नाही . थोड्यावेळाने रस्ता वळला . आता जंगल अधिकच दाट झाले . इथे मला अचानक उजव्या बाजूला काहीतरी हालचाल जाणवली . एक मोठे तरस अचानक रस्त्यावर आले . आणि माझ्याकडे एकदा बघून उजवीकडे वळून रस्त्याने चालू लागले . मी क्षणभर थांबलो परंतु माझ्या असे लक्षात आले की ते त्याच्या वाटेने जात आहे . आणि मी जर थांबलो तर त्याला मी काहीतरी हल्ला करतो आहे अशी शंका येईल . त्यामुळे मी देखील त्याच्या मागे चालत राहिलो . साधारण २०० ते ३०० मीटर ते माझ्यासोबत माझ्यासमोरून चालले आणि नंतर एकदा मागे वळून पहात डावीकडच्या जंगलामध्ये पसार झाले . मी जणू काही झालेच नाही असे दाखवत चालत राहिलो . यापूर्वी देखील मी जंगलामध्ये समोरासमोर तरस पाहिलेले आहेत . परंतु दोघेही जमिनीवर उभे आहोत असा हा पहिलाच प्रसंग होता .
तरसाचे प्रातिनिधिक चित्र
अंगावरचे पट्टे स्पष्टपणे दिसणारा तो एक नर होता . त्याचा तो जबडा आणि चालण्याची विशिष्ट लकब लक्षात राहिली .तरसाचे पुढचे पाय मोठे असतात आणि मागचे पाय ओढत चालायची त्याला सवय असते . अंगावर असलेल्या पट्ट्यांमुळे बरेचदा दुरून त्याला लोक वाघ समजतात . शूलपाणी झाडीतील आदिवासी तरसाला झरखडो म्हणतात . आणि खोटा वाघ किंवा लांब तोंडाचा वाघ असे देखील म्हणतात . कारण तो वाघासारखा दिसतो . हा प्राणी अतिशय निर्भय असतो परंतु तितकाच निरुपद्रवी देखील असतो . शिकार करून खाण्यापेक्षा दुसऱ्याने केलेली शिकार पळवून खायला त्याला आवडते . याच्या जबड्यामध्ये खूप ताकद असते . असो .माझ्यासोबत पाण्याचा साठा मर्यादित असल्यामुळे मी असे ठरवले होते की दर अर्ध्या तासाने दहा घोट पाणी प्यायचे .चढ उतार असलेले रस्ते देखील लागले . मोठमोठे जंगलातील मार्ग देखील दिसले . परंतु साधूंनी मला आधीच सांगितले होते की कुठेही डावीकडे उजवीकडे वळायचे नाही .नर्मदा परिक्रमे मध्ये अनुभवी लोकांचे ऐकणे हा फार महत्त्वाचा भाग असतो . पूर्वी अनेक प्रकारचे अनुभव घेऊन त्यांनी आपल्याला जे ज्ञान मोफत दिलेले असते त्याला हलक्यात घेऊ नये . इथे कोणीतरी मध्येच एका झाडा खाली एक माठ आणून ठेवला होता .परंतु दुर्दैवाने तो रिकामा होता . जाईल तिथे २० रुपयाची बिसलेरी बाटली सहज मिळण्याची सवय लागलेल्या आपल्या शहरी जीवनाला पाण्याचे महत्व अशा दुर्गम ठिकाणी आल्याशिवाय कळायचे नाही .
च्यवन ऋषी आश्रमा नंतर थोडासा डांबरी रस्ता लागतो आणि मग संपूर्ण जंगलातून वाटचाल आहे !अतिशय अविस्मरणीय असा हा प्रवास आहे .
अखेरीस हळूहळू लोकांचे आवाज येऊ लागले . आठ किलोमीटर पर्यंत निर्मनुष्य जंगल हा अनुभव अतिशय आनंददायक आणि लक्षात राहणार होता !इथे जंगलामध्येच झाडाखाली एक हनुमान जी विराजमान होते आणि आजूबाजूला जंगलात सर्व आदिवासी लोक तेंदू पत्ता तोडण्यासाठी जमलेले होते .
हेच ते जंगलातील हनुमान जी
प्रत्येकाची पाने तोडण्याची लगबग सुरू होती . कोणी पाने वाळत घालत होते .जंगलामध्ये फिरत ठरलेले सात दिवस तेंदु पत्त्याला आलेली चैत्रपालवीची हिरवीगार पाने तोडून ५०-५० पानांचे गठ्ठे बांधून फॉरेस्ट रेंजरच्या समोर शिस्तीने लावले जात .असे दहा x दहा चे गठ्ठे लावले किती ते तीनशे रुपयाला विकले जात . तीन रुपये ५० पैसे असा तेंदु पत्त्याचा सरकारी दर होता .इंदूरचे शेठ लोक यायचे . चार-पाच दिवस तिथे थांबून वरून खालून सगळी पाने वाळवून घ्यायचे . चांगली दिसणारी पाने गठ्ठ्याच्या वरच्या बाजूला बांधली जायची . तांबूस दिसणारी किंवा छोटी किंवा किडकी पाने खाली टाकली जायची . या संपूर्ण भागामध्ये आदिवासी लोकांचे उत्पन्नाचे हे एक महत्त्वाचे साधन होते . त्या निमित्ताने त्यांना जंगलामध्ये फिरायला परवानगी मिळायची . परंतु फॉरेस्ट रेंजर त्यांच्यावर लक्ष ठेवून असायचे त्यामुळे लाकडे तोडायला परवानगी नव्हती . तरी देखील पाने तोडण्याच्या निमित्ताने जंगलात कुठे लाकडे पडलेली आहेत हे आदिवासी हेरून ठेवायचे . आणि नंतर गुपचूप ती लाकडे गायब केली जायची ! ही सर्व माहिती अर्थातच मला तिथे बसून लोकांशी गप्पा मारल्यावर कळाली. मी देखील त्यांच्याबरोबर तेंदूपत्ता तोडून पाहिला . या पानांचा उपयोग पुढे अनेक प्रकारे केला जातो . पत्रावळी बनवणे असेल किंवा बिड्या बनवणे असेल या प्रत्येक ठिकाणी तेंदुपत्त्याचे पान लागते .याच झाडाला आदिवासी टेमरं असे देखील म्हणतात . सातारा पाटण जवळ हेळवाकची घळ आहे . त्या भागातील वनवासी लोक याला अळू असे म्हणतात .
- मराठी: तेंदू, टेंभुर्णी , अळु
- शास्त्रीय नाव : Diospyros melonoxylon
- हिंदी: तेंदू , कोरोमंडल
- संस्कृत: तिन्दुक
- इंग्रजी: Tendu leaf
- आंध्र प्रदेश: अब्नस
- ओडिशा आणि पश्चिम बंगाल: केंदू
- गुजरात: टेंबू
- केरळ: कारी
- तामिळनाडू: बाली तुपरा
भारतामध्ये लाखो लोकांचा हा हंगामी रोजगार आहे . त्यात ९०% महिलांचा समावेश आहे .
सरकार निविदा मागवते . आणि ही पाने खरेदी करण्यासाठी विविध कंत्राटदार निविदा भरतात .एकदा निविदा मंजूर झाली की मग वन रक्षकांच्या समक्ष पानांची तोडणी आणि वाळवणी केली जाते .
कित्येक एकर परिसरामध्ये अशी पाने वाळत घातलेली आपल्याला पाहायला मिळतात . या पानांचे दर ठरवण्याचा अधिकार कंत्राटदाराला असतो .नंतर तो ती पाने स्वखर्चाने वाहतूक करीत बिडी कंपन्यांना विकतो . आदिवासींकडे लक्ष दिले नाही तर आदिवासी तेंदुपत्त्याचे अख्खे झाड तोडून टाकतात त्यामुळे आम्हाला इथे डोळ्यात तेल घालून उभे राहावे लागते असे एका वनरक्षकाने मला सांगितले . परंतु अलीकडच्या काळात पूर्वीपेक्षा तेंदूपत्त्याची झाडे कमी झालेली आहेत त्यामुळे उत्पन्न देखील कमी होत आहे . जी झाडे शिल्लक आहेत त्यांची उंची कमी झाली आहे .सरकार प्रतिवर्षी प्रयत्नपूर्वक तेंदुपत्त्याची नवीन झाडे लावायचा उद्योग करत असते .तेंदुपत्त्याचे जे फळ आहे ज्याला पावरा आदिवासी टेम्भरु किंवा टेम्णे म्हणतात . याची चव थोडीशी चिक्कू सारखी असते .चवीला तुरट असते आणि शरीराला अत्यंत आवश्यक अशा जीवनद्रव्यांचा अतिशय उत्तम असा हा स्रोत आहे .त्यामुळे आदिवासी मुले हे फळ आवडीने खातात . याच्या बिया देखील गोळा करता येतात .हुबेहूब चिकूच्या बियांसारख्या या बिया दिसतात . तेंदुपत्ता गोळा करणे या व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे हे खालील आकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल . २०२१ - २२ या वर्षांमध्ये संपूर्ण भारतभरातून गोळा झालेल्या तेंदुपत्त्याच्या गठ्ठ्यांची संख्या होती तीन लाख वीस हजार .यातून सुमारे ४००० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती . मध्य प्रदेश आजही सर्व राज्यांमध्ये अग्रणी तेंदू पत्ता उत्पादक राज्य आहे .जोपर्यंत बिड्या सिगार आदि पिणारे लोक आहेत तोपर्यंत या व्यवसायाला मरण नाही . असो . हळूहळू कुंडी गावामध्ये पोहोचलो . इथे सिंगाजी महाराजांचा भक्त असलेला एक पटेल नावाचा गवळी होता . त्याच्या घराजवळ एक मंदिर होते तिथे तो उतरायची सोय करायचा आणि स्वतः जेवण बनवून आणून द्यायचा .त्याच्याकडे आज देव बसणार होते . भिलट बाबा आणि ख्वाजा बाबाच्या मंदिरातून वाजत गाजत देवांना आणले जाई आणि सकाळी पाच वाजता कढाई असे .कढाई म्हणजे गाव जेवण ! याच्या घराजवळ शंभर एक लोक जमलेले होते . मी थकून भागून आल्यामुळे आंघोळ करावी असा विचार केला . इथे एक हातपंप होता . परंतु त्याचे पाणी प्रचंड खोल गेले होते . पाच एक मिनिटे सलग हापसल्यावर पाणी यायचे . तसे करून आंघोळ केली . बिड्या आणि गांजा ओढून गांजलेला बंगाली बाबा इथे आधीच आलेला होता . प्रचंड खोकत होता . मला त्याची खूप दया आली . परंतु तो काही बिडी सोडायला तयार नव्हता . असे लोक खोकला येऊ लागल्यावर अधिकच बिड्या ओढतात .जणू काही बिडी हे खोकल्यावरचे औषध च असावे असा त्यांचा आविर्भाव असतो .हेच ते कुंडी गावातील मंदिर . याच्या आवारामध्ये झोपलो होतो .
मंदिरात श्रीरामाच्या मूर्ती आहेत .
हनुमान जी देखील आहेत .
कनाड नदीच्या काठावरील घनदाट जंगल .
धाराजी ही आता नर्मदा मातेच्या या प्रचंड जलाशयामध्ये जलमग्न झालेली आहे .
जलाशयाच्या मधोमध ध्वज दिसतो आहे तिथे धावडीकुंड आहे
या तुझ्यापासून सुमारे १०० फूट खाली हे धावडी कुंड आहे .
आजही लोक नावेने जाऊन या भागाचे दर्शन घेऊन येतात .
इथपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता उपलब्ध आहे . पायी परिक्रमेदरम्यान धारा जी यांचे दर्शन घेऊ न शकल्यामुळे मध्यंतरी पुन्हा एकदा खास दर्शनासाठी गेलो असताना काढलेले हे फोटो आहेत .
धारा माई कशी दिसायची याचे चित्र येथे लावलेले आहे . धावडीकुंडाचे मूळ चित्र
हीच ती नर्मदा मातेची परमपवित्र धाराजी
हे रांजणखळगे फार प्रचंड होते
हा संपूर्ण प्रस्तर असल्यामुळे इथे खाली देखील घळी गुफा वगैरे होत्या .
या भागात अनेक गुफा असून त्याबाबत अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत .त्यापुढे वेळोवेळी पाहूच .
आश्रमाच्या दोन्ही बाजूंनी वर मंदिराकडे जाणारा जिना असून त्यावर धाराजीचे सुंदर चित्र काढले आहे .
गच्चीवर नर्मदा मातेचे सुंदर मंदिर आहे
मंदिराचा कळस असा दिसतो
नर्मदा मातेची सुंदर मूर्ती
धाराजी किंवा धावडीकुंडाचे जुने दृश्य जिन्यावर काढलेले आहे .
श्री श्री १००८ मोहनदास त्यागी जी यांच्यासोबत प्रस्तुत लेखक
बडेल गावामध्ये शिकवणारे शिक्षक महाराज आणि प्रस्तुत लेखक .आणि होय हीच ती बाटली !
नेल पॉलिश ने सिताराम अक्षरे रंगवताना प्रस्तुत लेखक
अलीकडेच वाहन परिभ्रमणात पुन्हा एकदा महाराजांच्या दर्शनाचा योग आला होता . त्याप्रसंगी प्रस्तुत लेखक .
महाराजांचा जटाभार खरोखरीच "भार " अर्थात जड आहे .
महाराजांच्या जटांची लांबी
ठीक १२ फूट लांब अशा या जटा आहेत .
दाढीच्याही जटा झालेल्या आहेत .
महाराजांनी प्रस्तुत लेखकाकडून लिहून घेतलेली चौपाई व सीताराम
रोटला केला ती धुनी व मागे सीता गुंफा मार्ग
चौपाई व आश्रम परिसर
इतक्या जटांचा त्रास होत नाही का विचारल्यावर महाराज सांगतात की प्रचंड त्रास होतो . परंतु प्रत्येक क्षणाला त्या जटा " तू साधू आहेस " अशी जाणीव जटाधारीला करून देतात ! आणि स्थान भ्रष्ट होण्यापासून वाचवतात !
मागे दिसणारी सीता गुफा
संत मिलन को चालिये । तज माया अभिमान । ज्यो ज्यो पग आगे धरे । कोटीन यज्ञ समान ॥
श्री श्री १००८ मोहनदास त्यागीजी महाराज फोन व फोन पे वापरतात . त्यांचा क्रमांक खालील प्रमाणे आहे .
स्वामीजींनी अलीकडेच प्रस्तुत लेखकाकडून लिहून घेतलेली अजून एक चौपाई
बडेल गावातील शिक्षकांनी काढलेली महाराजांची छायाचित्रे
(अपूर्ण )
वेळ मिळाला की मागील लेखांक चा दुवा जोडावा. नर्मदे हर!
उत्तर द्याहटवाजोडला आहे !
हटवानमस्कार,
उत्तर द्याहटवापाठच्या व या लेखांका मध्ये आलेलं वर्णनात्मक जंगलाचा भाग वर्षानुवर्षापासून ट्रेकिंगच्या छंदामुळे फिरत असतो ओंकारेश्वर पासून वर नेमावरपर्यंतचा नर्मदेचा अतिसुंदर प्रदेश आहे दुर्दैवाने दोन धरणांमुळे सर्व भाग जलमग्न आहे.
ओंकारेश्वर ते धाराजी असे नावेतून ट्रेकिंग आयोजित करत असताना दोन्हीकडच्या काठावरील सुंदर जंगल दृष्टीपत्तात येत असे.
तसेच धाराजीच्या मूळ स्थानी लोक अचानक पाणी सोडल्यामुळे वाहून गेलेली आहेत. या धाराजीच्या परिसरामध्ये दोन्हीकडे किनाऱ्यावर रॉक्स ची कटिंग जबलपूर जवळच्या भेडाघाट सारखे सुंदर होते ते आता जलमग्न झालेले आहेत फक्त ते काळ्या पाषाणात होते.
च्यवंन ऋषी,कोठावा हे दरवर्षी ट्रेकिंग स्पॉट आहेत.
धाराजी जवळच कावड्या पहाड नावाची फत्रांच्या लांब शिळा खंड ठेवलेली जागा आहे. या शिळा कुणी व केव्हा इथे आणून ठेवले याचा पत्ता नाही.
आम्ही अभिमानाने म्हणतो की जसा महाराष्ट्राला सह्याद्री आहे , तशीच इंदूरकरांना नर्मदामाई आहे.
सदानंद काळे
धन्यवाद सदानंद जी ! पुढील लेखामध्ये आपण दिलेल्या महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहितीचा समावेश आपल्या नामोल्लेखासह केलेला आहे .
हटवा