लेखांक ८६ : परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर (बडोदा) यांचे समाधी स्थान श्रीक्षेत्र टाकरखेडा

राजू टेलर यांचे घरून सर्व आवरून ठीक सहा वाजता धडगाव एसटी स्टँड गाठले . लाल परी गाडी पकडून सकाळी सात वाजता निघालो आणि नऊ वाजता शहाद्याला पोहोचलो . ७५ दिवसांनी प्रथमच गाडीत बसल्यावर कसे तरीच वाटत होते .माझी नर्मदा मैया आणि झोळी राजू टेलर यांच्या देवघरामध्ये स्थिर ठेवली होती . परिक्रमेच्या या पद्धतीला खंडित परिक्रमा असे म्हणतात . आणि ती शास्त्र संमत आहे . विशेषतः मी माझ्या मोक्षदात्या सद्गुरूंच्या समाधीच्या दर्शनासाठी जात असल्यामुळे हे करणे अधिकच आनंददायक होते .
परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज
 शहादा गावातून नाशिकला जाणाऱ्या एसटी बसने सारंगखेडा गावामध्ये उतरलो . या एसटीमध्ये बसायला जागा नसल्यामुळे ड्रायव्हरच्या मागे उभा राहिलो .त्याच्याकडून योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्याचे कळले नाही तर परिक्रमेमध्ये देशातील व जागतिक घडामोडींची काहीही माहिती कळत नाही. सारंगखेडा आणि टाकरखेडा या दोन गावांच्या मधून तापी नदीचे भव्य पात्र वाहते . सारंगखेडा नंदुरबार जिल्ह्यात आहे तर टाकरखेडा धुळे जिल्ह्यामध्ये येते . परंतु एसटी वाले टाकरखेड ला थांबत नाहीत . त्यामुळे तिथून पाय गाडीने टाकरखेडा गाठले .महाराष्ट्रामध्ये टाकरखेडा नावाची अनेक गावे आहेत . मध्यप्रदेश मध्ये देखील या नावाची गावे सापडतात . विदर्भातील एक थोर संत श्री लहानोजी महाराज यांची समाधी देखील अमरावती जवळ असलेल्या टाकरखेडा नावाच्या गावातच आहे . परंतु ते टाकरखेडा वेगळे आणि हे गाव वेगळे . हे टाकरखेडा गाव सारंगखेडा या गावामुळे ओळखले जाते . सारंगखेडा येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार भरतो . इथे दत्ताचे एक भव्य मंदिर असून या गावांमध्ये बहुतांश राजपूत किंवा सिसोदिया लोकांची वस्ती आहे . तापी नदीचे दर्शन घेतले ! पूर्वी तापी नदी देखील नर्मदेला येऊन मिळत असे , असे सांगतात . पुढे काही भौगोलिक घडामोडी झाल्या आणि दोघींचे मार्ग वेगळे झाले . परंतु संपूर्ण भारतातील या दोनच प्रमुख नद्या आहेत ज्या पश्चिम वाहिनी आहेत . 
तापी नदीच्या उत्तर तटावर सारंगखेडा तर दक्षिण तटावर टाकरखेडा गाव दिसते आहे . मध्ये दोघांना जोडणारा पूल दिसत आहे . तापी नदीचे पात्र इथे मोठे विस्तृत आहे . 
आश्रमामध्ये प्रवेश केल्याबरोबर कोणीतरी साधू आला आहे असे आश्रमातील सेविका कमलबाईने आश्रमातील व्यवस्थापिका असलेल्या कीर्ती बेनला सांगितले आणि तिने पटापट दारे खिडक्या लावून घेतली ! 
टाकरखेडा आश्रमाचे नवीन प्रवेशद्वार
याच आश्रमाचे जुने प्रवेशद्वार असे होते
कीर्ती बेन ही गुजराती माताराम गेली अनेक वर्षे हा संपूर्ण आश्रम सेवाभावी वृत्तीने सांभाळत आहे . तिच्या वडिलांपासून घरामध्ये स्वामींची भक्ती आहे . तिच्या वडिलांनीच परमपूज्य जनार्दन स्वामींना या गावामध्ये आणले . परमपूज्य जनार्दन स्वामी खेर हे मूळचे बडोद्याचे . त्यांचे वडील शंकरराव खेर हे बडोदा संस्थान मध्ये मोठ्या अधिकारी पदावर होते . त्यामुळे स्वामींच्या लहानपणी घरामध्ये फार मोठ्या प्रमाणात नोकर चाकर होते . रात्रीची अंथरुणे घालायला वेगळे नोकर आणि सकाळी ती काढायला वेगळे नोकर अशी अवस्था होती . पुढे काही कारणाने संस्थान खालसा झाले आणि कुटुंबीयांवर अतिशय गरिबीची परिस्थिती आली . घरामध्ये पाच वेडी माणसे होती . तशाही परिस्थितीमध्ये स्वामींची मनस्थिती स्थिर राहिली . 
संपत्तौ च विपत्तौ च साधूनाम् एकरूपता ।
स्वामी स्वतः इंग्रजी मॅजिस्ट्रेट सोबत काम करत असल्यामुळे त्यांचे इंग्रजी अतिशय उत्तम होते . या नोकरीच्या बळावर त्यांनी संपूर्ण कुटुंब अनेक वर्ष सांभाळले . पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब असायचे . त्यात घरात पाच माणसे ठार वेडी झाली होती . 
आपल्या शिष्यमंडळीन समवेत बसलेले पूज्य जनार्दन स्वामी महाराज
त्यांचे वडील शंकरराव हे स्वतः ॲनी बेझंट यांच्या मार्गदर्शनाखाली थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाचे काम करायचे . तेथील भुताटकी वातावरणामुळे त्यांना देखील वेडाचे झटके यायचे . अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जो काही असामान्य स्थितप्रज्ञपणा दाखवला त्याच्या परिणाम स्वरूप दत्तप्रभूंची त्यांच्यावर कृपा झाली . आणि टेंबे स्वामी , अक्कलकोट स्वामी यांची विशेष कृपा अनुभूती त्यांना लाभली .

बडोदा येथील सुरसागर तलावाजवळ असलेल्या स्वामींच्या घरातील अक्कलकोट स्वामींची तसबीर

 पुढे पू . अम्मू मैया या संतांच्या सूचनेनुसार इंदोरचे नाना महाराज तराणेकर यांच्याकडे स्वामींना नेले गेले आणि त्यांनी स्वामींना अनुग्रहित केले . अक्कलकोट स्वामींनी एक दिवस अचानक येऊन जनार्दन स्वामींना आदेश दिला की तू आता घरा बाहेर पडायचे . आणि संन्याशाप्रमाणे तीन दिवसापेक्षा जास्त एका ठिकाणी राहायचे नाही . हा नियम जनार्दन स्वामींनी ५६ वर्षे अहोरात्र पाळला . अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पाळला .
श्री क्षेत्र नासिक येथे संपन्न झालेल्या परमपूज्य जनार्दन स्वामी महाराजांच्या पंचाहत्तरी च्या कार्यक्रमातील त्यांची एक प्रसन्न भाव मुद्रा

नागपूर येथे संपन्न झालेल्या परमपूज्य सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यातील त्यांच्या पालखी चा भोई होण्याचा मान लाभलेला प्रस्तुत लेखक (तपकिरी वस्त्रात )
 .स्वामींनी प्रवासामध्ये असतानाच शिर्डी मध्ये आल्यावर आपले प्राण पंचत्वात विलीन केले . त्यावेळी मी पुण्याला होतो . त्यांच्या चालकाने सर्वप्रथम फोन करून ही वार्ता मला कळविली आणि मी ताबडतोब मोटरसायकलवर टाकरखेड्या ला जायला निघालो . कारण स्वामी देखील टाकरखेडा लाच निघाले होतेकारण स्वामी देखील टाकरखेड्यालाच निघाले होते . पुणे ते टाकरखेडा हे अंतर त्यावेळी मी केवळ पाच तासांमध्ये पार केले होते . मी जेव्हा टाकरखेड्याला पोहोचलो तेव्हा स्वामींचे पार्थिव नुकतेच तिथे आणण्यात आले होते . आणि त्यांचे सोबत प्रवास करणारे फैजपूर येथील भंगाळे सर आणि चालक वगळता अन्य कोणीही तिथे नव्हते . कालांतराने लाखोंचा जनसमुदाय तिथे गोळा झाला . आणि स्वामींच्या पांच भौतिक देहाला आश्रमातच मंत्राग्नी देण्यात आला . माझ्या डोळ्यासमोर हे सर्व चित्र अखंड उभे राहत होते . त्या क्षणानंतर मी पुन्हा त्या आश्रमात गेलोच नव्हतो . आज परिक्रमेमध्ये मात्र स्वामींना नर्मदा जलाने स्नान घालावे अशी तीव्र इच्छा मनात आल्यामुळे मी इथे आलो होतो . स्वामींच्या आदेशाचे पालन म्हणूनच तर माझे संपूर्ण जीवन आहे ! मी पूर्वीच सांगितले आहे त्याप्रमाणे महाविद्यालयीन जीवनात अतिशय विचित्र नास्तिक जीवन जगत होतो . नर्मदा बचाव आंदोलनाचा कार्यकर्ता असलेला , डाव्या विचारांनी प्रभावित असा मी , या स्वामींच्या दर्शनासाठी , माझ्या मावशीच्या आग्रहाखातर जेव्हा पहिल्यांदा गेलो , तेव्हा त्यांच्या पाया देखील पडलो नव्हतो . तब्बल दोन वर्ष मी त्यांची परीक्षा पाहत होतो ! मी केवळ दर्शनाला म्हणून जायचो आणि गोडधोड प्रसाद खायचो ! परंतु ज्या क्षणी स्वामींनी मला एक एक अनुभव द्यायला सुरुवात केली त्या क्षणी माझ्यातला विवेक मला सांगू लागला की हे योग्य ठिकाण आहे ! माझ्या अनुमानापेक्षा माझे अनुभव वरचढ ठरू लागले ! आणि तिथून पुढे संपूर्ण जीवन त्यांच्या आदेशानुसारच मी जगत आलो आहे . त्यापुढे मी अक्षरशः कोणाचीही पर्वा केलेली नाही ! 
गुरुर्वाक्यम् सदा सत्यम् । सत्यमेव तत्पदम् ।
माझ्या आयुष्यातील दोन अविस्मरणीय व्यक्तिमत्वे
! परमपूज्य जनार्दन स्वामी खेर , (बडोदा ) आणि माझी शतायुषी आजी . उजवीकडे खाली प्रस्तुत लेखक बसलेला दिसतो आहे . 
नर्मदा परिक्रम विषयी स्वामीं शी माझे अनेक वेळा बोलणे झाले होते. त्यांचा सदेह सहवास मला योग्य वयात पुरेपूर लाभला . सत्पुरुषांकडे गेल्यावर लोक एक फार मोठी चूक करतात असे माझे मत आहे . लोक त्यांना काहीतरी विचारत बसतात . आपण त्यांना काही विचारण्यापेक्षा आपण शांत रहावे आणि ते जे काय बोलतात ते ऐकत रहावे हे अधिक उत्तम आहे असे माझे मत आहे . त्यामुळे आजवर मी त्यांना कधीही कुठलाही प्रश्न विचाराच्या भानगडीत पडलो नाही . परंतु ते जे काही बोलतात ते कानामध्ये प्राण आणून ऐकत मात्र राहिलो . त्याचीच परिणती म्हणजे प्रस्तुत लेखकाचे संपूर्ण आयुष्य आहे . असो .
शालेय जीवनातच सद्गुरु कृपेचा वरदहस्त माथ्यावर पडल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला प्रस्तुत लेखक . . .सोबत आजी व मावशी .
अगदी तरुण वयातच स्वामींनी प्रस्तुत लेखकाला ध्यानाची गोडी लावली . नामाची आवड उत्पन्न केली . भजनातील प्रेम शिकवले . स्वामींनी घेतलेल्या ध्यान शिबीरात बसलेला प्रस्तुत लेखक . "अरे बाळ हे तुझे ध्यान करण्याचे वय नाही " असे सांगणाऱ्या सर्व वयोवृद्ध साधकांना मी सांगायचो की मला आधीच उशीर झालेला आहे ! आणि हे ऐकल्यावर स्वामी अनुमोदनपूर्वक हसायचे !
स्वामींनी ध्यानाचा खोल संस्कार केला आहे .त्यामुळे कुठे निसर्गात फिरायला गेल्यावर पोज देऊन फोटो काढताना सुद्धा ध्यानच आठवायचे !
 तेव्हाही . . .
 आणि आजही . . . 

ध्याने ध्याने तद्रूपता

वयाच्या दहाव्या वर्षी पहिले कीर्तन झाल्यावर प्रस्तुत लेखक .
स्वामींनी बाल वयात व तरुण वयातच प्रस्तुत लेखकाकडून अनेक कीर्तने करून घेतली .
सातारा येथील परमपूज्य जनार्दन स्वामी यांच्या आश्रमातील कीर्तनानंतर वैद्य दांपत्याकडून प्रसाद घेताना प्रस्तुत लेखक . मागे परमपूज्य जनार्दन स्वामी यांची पंचधातूची मूर्ती . ही मूर्ती साताऱ्यातून टाकरखेडा आश्रमात नेण्याचे भाग्य देखील प्रस्तुत लेखकाला लाभले . पुढे मात्र आपण जे बोलतो आहोत तसे वागावे लागते किंबहुना जसे वागतो आहोत तितकेच बोलता येते हे लक्षात आल्यावर मी कीर्तन करणे बंद केले ! कारण कोरडे कीर्तन काय कामाचे !
 महाजनो येन गतः स पंथः ।
भजनाचा आनंद वेगळाच आहे ! 
मला एक जुळी बहीण आहे . 
हिने देखील स्वामींचा अनुग्रह घेतलेला आहे .
ही मात्र बालवयापासून आजतागायत उत्कृष्ट कीर्तने करत आहे .पुण्यातील नारद मंदिरामध्ये आणि हरिभक्तिपरायण आफळे बुवांकडे हीचे शिक्षण झाले आहे .
 आपल्यापैकी बरेच जण टीव्ही अँकर म्हणून तिला ओळखत असाल !  हिच्यावर देखील स्वामींची अपरंपार कृपा राहिलेली आहे . 
टीव्हीच्या माध्यमातून वारी किंवा नवरात्रीला देवीची शक्तीपीठे अशा अनेक यात्रा हिने स्वतः केल्या आहेत व संपूर्ण महाराष्ट्राला घडविल्या आहेत .
 ( प्रस्तुत लेखक टीव्हीच बाळगत व पाहात नाही ! व पाहण्याचे समर्थकही नाहीत याची कृपया नोंद घ्यावी ! विषयोघात सांगितले इतकेच .)
मी तिच्याशी फोनवरून बोलावे असा आग्रह कीर्ती दीदी मला करत होती . परंतु असे संभाषण केले नाही तरी आम्हाला दोघांना काही फरक पडत नाही हे तिला मी समजावून सांगितले . जुळे असल्यामुळे आमची पत्रिका एकसारखी आहे ! असो .
मी मंदिरामध्ये जाऊन दत्तप्रभूंचे दर्शन घेतले . अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे . या मूर्ती पुढे स्वामींनी माझ्याकडून बरीच अनुष्ठाने ,पारायणे , कीर्तने इत्यादी करून घेतलेली आहेत . त्यामुळे नुसते ते रूप पाहताच डोळ्यातून अश्रूधारांना वाट मोकळी झाली . ते जल वाया न घालविता पादुकांना त्याचा अभिषेक करून घेतला ! कारण संपूर्ण देहच नर्मदामय झालेला असल्यामुळे डोळ्यातील अश्रुधारा देखील नर्मदा जलाच्याच होत्या हे निश्चित ! 
टाकरखेड्याचे श्री दत्तप्रभू
आश्रम अतिशय सुंदर झाला होता ! मी शेवटचे आलो तेव्हाचे आश्रमाचे रूप आणि आताचे रूप यात जमीन आसमानाचा फरक होता ! अतिशय भव्य दिव्य बांधकामे सुंदर अशा मूर्ती स्वामींचे नवीन मंदिर आणि स्वामींचे समाधी स्थान अशी सर्व ठिकाणी नव्याने बांधण्यात आली होती . एक अतिशय भव्य असा सभामंडप किंवा सभागृह नव्याने उभारण्यात आले होते . आश्रमाला जोडून स्वामींची पाच एकर शेती आहे त्यामुळे विस्ताराला फारशी बंधने नाहीत .इथे बुवाजी बाबा / बुवादादा नावाचे साधू तप करीत राहत असत त्यांना अक्कलकोट स्वामींनी दृष्टांत दिला की माझा मनुष्य इथे येईल त्याच्या ताब्यात तुझा आश्रम दे आणि इकडे जनार्दन स्वामींना दृष्टांत देऊन सांगितले की अमुक अमुक ठिकाणी जा आणि तिथे तुझा आश्रम स्थापन कर . त्यामुळे जनार्दन स्वामी इथे आले तेव्हा बुवाजी बाबा त्यांची वाट पाहतच बसलेले होते ! स्वामींनी देखील त्यांचे देहावसन झाल्यावर त्यांची सुंदर अशी समाधी बांधलेली आहे . त्यांच्या समाधीचे देखील दर्शन घेतले . स्वामींची अतिशय सुंदर मूर्ती इथे नव्याने स्थापन करण्यात आली आहे .
आश्रमात स्थापन केलेली जनार्दन स्वामींची मूर्ती
मूर्ती सुंदर आहे .
 तिचे दर्शन घेऊन मागच्या बाजूला स्वामींची समाधी अर्थात शक्ती स्थळ इथे पोहोचलो . पुन्हा एकदा अंगभूत नर्मदा जलाने शक्तिस्थळाला अभिषेक झाला ! इथे औदुंबराची तीन झाडे आपोआप उगवलेली आहेत . इथे काही काळ बसलो .
परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी स्थळ अथवा शक्ती स्थळ
शक्ती स्थळावर आपोआप उगविलेली औदुंबराची तीन झाडे
 इथे नेहमी फुलांची सजावट केली जाते
इथेच याच ठिकाणी परमपूज्य स्वामींच्या देहाला मंत्राग्नी देण्यात आला होता

 आश्रमाच्या मागच्या दाराने कीर्ती बेन जिथे राहते त्या मुख्य भागामध्ये सवयीप्रमाणे घुसू लागलो . आश्रमाची संपूर्ण शेती पाहणारा नारायण नावाचा सेवेकरी आहे तो धावतच आला आणि त्याने मला अडवले ! साधू समाजाशी आपला समाज कसे वागतो याचाच हा वस्तूपाठ होता ! शेवटी न राहून मी कीर्ती बेन ला हाक मारली ! माझा आवाज ऐकताच ती धावतच बाहेर आली ! मला या साधुरूपामध्ये पाहून तिला काय बोलावे तेच कळेना ! सुमारे वीस-बावीस वर्षांनी आम्ही असे निवांत भेटत होतो ! कीर्ती बेन मला मुलगा मानते . ती माझ्या आईच्या वयाचीच आहे . परंतु गुजराती पद्धतीने नुसार तिला सर्वजण बेन म्हणजे बहिण म्हणतात किंवा दीदी म्हणतात . दोघांच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या !
टाकरखेडा आश्रमातील सेवाधारी कीर्ती बेन
 नारायण च्या लक्षात आले की हा वेगळा प्रकार आहे . आणि मग त्याने मला आत मध्ये सोडले ! मी नर्मदा परिक्रमा करतो आहे हे कळल्यावर कीर्ती बेनला प्रचंड आनंद झाला ! आमच्या गुरु परिवारातील देखील काही लोकांनी पूर्वी गाडीने वगैरे नर्मदा परिक्रमा केलेली आहे . ते ती मला सांगू लागली . दोन-चार लोकांनी पायी परिक्रमा देखील केलेली आहे ,आणि ते सर्वजण आश्रमामध्ये येऊन गेले आहेत हे देखील तिने सांगितले . रश्मी गंभिरे , अरुण खोंडे,  स्मिता धर्माधिकारी, रमेश पोद्दार, मंगेश कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी असे काही परिक्रमावासी आमच्या गुरुपरिवारातील आहेत .
 आता मस्तपैकी भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जायचे नाही असे निक्षून सांगून ती स्वयंपाकाच्या तयारीला लागली . माझ्यासाठी काय करू आणि काय नको असे तिला झाले होते ! माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारी ती माझी आईच आहे . त्यामुळे तिने अतिशय साग्रसंगीत स्वयंपाक केला . आम्ही दोघांनी खूप गप्पा मारल्या . स्वामींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ! हिच्या जन्मापासून हिला जनार्दन स्वामींचा सहवास लाभला होता . 
स्वामींचा खूप जुना फोटो
गावात राहणारे भगवान पाटील काका म्हणून एक आहेत त्यांना देखील मी आल्याची खबर लागली ! ते देखील आले . त्यांच्याशी भरपूर गप्पा झाल्या . काल संपर्क झाल्यानुसार माझे काही मित्र नर्मदेच्या दर्शनासाठी येथे येणार होते . त्याची कल्पना मी कीर्ति बेनला दिली . ते वाटेमध्ये जेवून येणार होते त्यामुळे मी भोजन प्रसाद घ्यायला बसलो . 
इथे मैयाने एक गमतीदार चमत्कार केला ! मला गोड आवडते हे माहिती असल्यामुळे कीर्ती बेनने तिला आवडणारे हल्दीराम चे गुलाबजाम , त्याचा एक डबा तिच्याकडे होता तो फोडला . आणि मला गुलाबजाम वाढताना सांगितले की हे पहा हे गुलाबजाम खरे तर मला आवडतात . आणि मी माझ्यासाठी आणलेले आहेत . परंतु तू देखील माझा आवडता आहेस म्हणून तुला हे गुलाबजाम देते आहे ! यावर मी तिला म्हणालो की हे पहा मी आता केवळ तुझा गुरुबंधू नाही तर एक परिक्रमावासी सुद्धा आहे . त्यामुळे परिक्रमा वासीला तू हे गुलाबजाम देते आहेस . आणि परिक्रमा वासी ला तुम्ही जे काही द्याल त्याच्या चौपट नर्मदा मैया तुम्हाला देते असा अनुभव लोक सांगतात ! 
हसत खेळत गप्पा मारत माझे भोजन संपन्न झाले . खूप आग्रहपूर्वक तिने मला वाढले . हळूहळू गावामध्ये मी आल्याची वार्ता पोहोचली आणि अजूनही काही लोक मला भेटायला आले . कीर्ती बेन च्या फोनवरून मी मित्रांना फोन केला आणि कुठपर्यंत आले आहेत ते विचारले . माझा फोन उचलला तेव्हा हे लोक गाडीच लावत होते !  माझे अनेक मित्र आहेत . किंबहुना मला अजातशत्रू राहायला आवडते . माझ्याशी वैर पत्करू पाहणारे लोक देखील माझे मित्र होऊन जातात . यात माझी काही थोरवी नसून समर्थ रामदास स्वामी तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली या संतांनी सांगितल्याप्रमाणे वागले की आपोआप मनुष्य जगन्मित्र होतो . 
जगापाशी जगन्मित्र । जिव्हेपाशी आहे सूत्र । असे समर्थ रामदास स्वामी सांगतात . त्यामुळे आयुष्यात बरी संगती सज्जनाची धरावी ।  याप्रमाणे वागत आलो आहे . त्यातही ज्या मित्रांशी आध्यात्मिक संवाद होतात असे मित्र खूप अधिक आहेत . त्यातीलच हे चौघेजण मला भेटण्याकरता आतुरतेने निघाले होते . यातील बाळासाहेब वाल्हेकर हे निवृत्त लष्करी अधिकारी असून आता पूर्ण वेळ भजन कीर्तन आणि गुरु सेवेमध्ये घालवितात . दर गुरुवारी त्यांच्या गुरूंच्या दर्शनासाठी ते अमरावतीला पुण्यावरून जातात . गेल्या १४ वर्षांमध्ये एकाही गुरुवारचा खंड पडलेला नाही . गुरु भक्तीचे असे उदाहरण आजच्या काळामध्ये दुर्मिळ आहे कारण दर आठवड्याला तेराशे चौदाशे किलोमीटरचा प्रवास करणे हे सोपे काम नाही . यांच्या विषयी अधिक माहिती सुरुवातीच्या प्रकरणात आलेली आहे त्यामुळे द्विरुक्ती टाळतो . 
मंदिर बांधणीच्या क्षेत्रातले माझे गुरु श्री बाळासाहेब वाल्हेकर . विदर्भातील मंगरूळ दस्तगीर गावातील आम्ही बांधत असलेल्या लहानुजी बाबा जन्मस्थान मंदिराच्या गर्भगृहात आम्ही दोघे .
दुसरे मित्र श्री प्रशांत चन्ने हे खरे तर मी आयटी कंपनीमध्ये नोकरी करत असताना माझे बॉस होते . परंतु आमचे नाते नेहमी मामा भाच्याचे राहिले आहे ! कारण मी त्यांचे मामा असे नामकरण केलेले होते ! आज त्यांना ओळखणारा प्रत्येक मनुष्य चन्ने मामा याच नावाने हाक मारतो ! यांचे पलूस गाव सांगली जिल्ह्यातच आहे . त्याच कंपनीमध्ये काम करणारा आणि आमच्याच गावचा हुशार आणि कष्टाळू मित्र म्हणजे अनिल पावटे . याचे मूळ गाव सावळज आमच्या सांगली जिल्ह्यातीलच .
प्रस्तुत लेखक , अनिल पावटे आणि प्रशांत चन्ने यांचे संग्रहित चित्र
 चौथा मित्र हा थोर इतिहासकार ! शिवाजी महाराजांची सही शिक्का असलेली अस्सल पत्रे ज्यांना सापडली आहेत असे इतिहासकार फार कमी आहेत ,त्यातील हा एक ! इतिहासकार घनश्याम ढाणे यांचे मूळ गाव तारळे . तारळी खोऱ्यातील या सुपुत्राला आम्ही प्रेमाने शामराव म्हणतो . रायगड किल्ला आणि महाराजांचे अनेक किल्ले कोळून पिलेला हा मनुष्य आग्रा ते राजगड पायी चालत आलेला आहे ! 
 इतिहासकार घनश्यामराव ढाणे
असे चार एकापेक्षा एक वल्ली भेटायला येणार असल्यामुळे त्याची आधीच कल्पना मी दीदीला देऊन ठेवली ! हे आले तेव्हा मी स्वामींच्या शेतामध्ये बसून चिकू खात होतो . चौघांनी धावतच येऊन माझी घट्ट गळाभेट घेतली ! बाळासाहेब वाल्हेकर वगळता मी नर्मदा परिक्रमेला निघालो आहे हे कोणाला सांगितले नव्हते . त्यामुळे माझी प्रत्यक्ष भेट झाल्यावर सर्वांनाच खूप आनंद झाला ! आता तुम्हाला मैयाने केलेला चमत्कार सांगतो ! साधारण तासाभरापूर्वी यांच्या लक्षात आले की आपण आश्रमात चाललो आहोत तर स्वामींच्या पुढे ठेवण्यासाठी काहीतरी सोबत घ्यावे . म्हणून यांनी हार फळे वगैरे विकत घेतली . परंतु मी व्यवस्थापिकेच्या फोनवरून बोललो आहे हे लक्षात आल्यावर तिच्यासाठी देखील काहीतरी खाऊ घ्यावा म्हणून यांनी एका पिशवीमध्ये खाऊ घेतला होता . तो त्यांनी कीर्ती बेनच्या हातात दिला आणि सांगितले की हा तुमच्यासाठी आम्ही खाऊ आणला आहे ! तिने पिशवी उघडून पाहिली तर त्यात बराच खाऊ होता परंतु त्यासोबत हल्दीरामच्या गुलाबजामचे चार हवाबंद डबे होते ! होय हे तेच गुलाबजाम होते जे तिने तिला आवडत असूनही मला वाढले होते आणि मी देखील भुकेपोटी सर्व संपविले होते ! मैया ने तिला जागेवर चार गुलाबजाम चे डबे दिले ! 
तिला इतका आनंद झाला की डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ! मी भोजन प्रसाद घेताना नर्मदा परिक्रमेचे अनुभव तिला सांगत होतो त्यावेळी तिच्या मनामध्ये असे आले होते की नर्मदा मैया मला कधी अनुभव देणार ! आणि ताबडतोब तिला अनुभूती मिळाली होती . त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेना ! पुढे हा अनुभव सर्वांना कळाला आणि आता आश्रमात जाताना काही लोक तिच्यासाठी हल्दीराम चा गुलाबजामचा डबा घेऊन जातात त्यामुळे नर्मदा मातेने तिला हल्दीरामच्या गुलाबजामचा लाईफ टाईम सप्लाय सुरू केला आहे असे म्हणावयास हरकत नाही ! परिक्रमा वाशीला एक दिले की मैया त्याच्या बदल्यात इतके भरभरून देते हे इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले ! सर्वांना मी आश्रम फिरवून दाखविला . नर्मदा जलाचा अभिषेक मी केला नव्हता कारण माझ्या सर्व मित्रांना सोबत घेऊन तो करावा अशी त्यांची व माझी इच्छा होती . त्याप्रमाणे शक्ती स्थळावर आणि स्वामींच्या पादुकांवर आम्ही नर्मदा जलाचा अभिषेक केला ! मला भेटून माझ्या मित्रांचा आनंद गगनात मावत नव्हता ! माझ्याकडे फोन नसल्यामुळे त्यांना माझ्याशी संपर्क साधताना अडचणी येत होत्या . परंतु जर मनापासून इच्छा असेल तर मात्र कोणाचाही कोठेही संपर्क होऊ शकतो हेच माझ्या मित्रांनी सिद्ध केले !  सर्वांना आश्रम फार आवडला . कीर्ती दीदी ने आम्हाला आश्रमातील उसाचा भरपेट रस पाजला . तो रस आकंठ प्यालो . आश्रमातील साखरेपेक्षा गोड चिकू सर्वांनी भरपूर खाल्ले आणि सोबत विकतही घेतले . यावेळी आश्रमात काढलेले काही फोटो माझ्या मित्रांकडून प्राप्त झाले ते आपल्यासाठी सोबत जोडत आहे.
टाकरखेडा येथील दत्तप्रभू मंदिरामध्ये उभे डावीकडून श्री प्रशांत चन्ने, श्री बाळासाहेब वाल्हेकर , दत्तप्रभू ,प्रस्तुत लेखक आणि श्री घनश्याम ढाणे . उजवीकडे व्यासपीठावर परमपूज्य जनार्दन स्वामी विराजमान आहेत .
श्री अनिल पावटे ( सावळज ) सेल्फी घेताना
परमपूज्य सद्गुरू श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीवर नर्मदा जलाचा अभिषेक करताना आम्ही सर्वजण .
दासबोधातील सद्गुरु स्तवन म्हणत अभिषेक केला गेला .
टाकरखेडा आश्रमामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहामध्ये अभंग गायन करताना श्री बाळासाहेब वाल्हेकर आणि प्रस्तुत लेखक .
आश्रमामध्ये पदोपदी फिरताना स्वामींची आठवण येत होती .माझे मन आठवणींच्या भूतकाळामध्ये फेरफटका मारू लागले .
वाचकांना कदाचित प्रश्न पडू शकेल की परिक्रमा थांबून स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्या एवढे काय आहे त्याच्यात ? थोडेसे सविस्तर सांगतो .माझी आध्यात्मिक जडणघडण पूर्णपणे स्वामींच्या देखरेखीखाली झालेली आहे आणि अजूनही होत आहे . त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाची प्रचीति मला आजवर आलेली आहे . त्यामुळे स्वामींनी सांगावे आणि आपण ऐकावे इतके सोपे गणित आहे . स्वामीजी देहामध्ये नसले तरी देखील त्यांनी केलेले उपदेश आजही जसेच्या तसे स्मरतात ही त्यांची कृपाच आहे .मी लहान असताना स्वामी जमलेल्या शिष्यमंडळींना माझ्याकडे हात करून सांगत असत , " ईश्वरी कृपा म्हणजे काय असते हे पाहायचे असेल तर या मुलाकडे पहा " मला तेव्हा त्याचा अर्थ अजिबात कळत नसे .त्या काळामध्ये लौकिक अर्थाने माझे काहीच चांगले चालू नव्हते . भौतिक दृष्ट्या संपन्नता वगैरे मी कधी फारशी अनुभवलेली नाही . परंतु पूर्वीच्या अनेक जन्मामध्ये आपले हे सर्व करून झालेले आहे हे निश्चितपणे जाणवते त्यामुळे त्याची जरादेखील ओढ सुद्धा शिल्लक नाही .तरी देखील माझे लौकिक आयुष्य उघड्यावर येऊ नये याची काळजी सद्गुरूंनी रीतसर घेतलेली आहे . मी आजवर आयुष्यात दोनच इंटरव्यू दिलेले आहेत . आणि दोनच नोकऱ्या देखील केलेल्या आहेत . इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला अनेक विषय पास होण्याचे बाकी असताना स्वामींच्याच आशीर्वादाने आणि शब्दानुसार मला भारतातील क्रमांक एक असलेल्या आयटी कंपनीमध्ये सहज नोकरी लागली होती . पुढे त्यांनीच सहज दिलेल्या आदेशानुसार मी ती नोकरी एका वर्षाच्या आतच सोडून ही दिली होती ! त्यानंतर स्वामींनी काही काळ मला त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक म्हणून ठेवले होते . आणि माझा तो कालावधी संपल्या बरोबर त्याच दिवशी मला अडीच पट पगाराची नोकरी देखील त्यांच्याच आशीर्वादाने लागून गेली . नोकरी किंवा पगार हा कृपेचा भाग नसून त्यासाठी मरमर करावी न लागणे ही कृपा आहे . दहा वर्षात लग्न मुले घरदार उभे करून दहा वर्षे झाल्यावर नोकरी सोडून देणे या त्यांच्या आदेशाचे पालन करत मी संपूर्ण जगाचा रोष पत्करत पुण्यात स्वतःची घरे घेऊन कर्जमुक्त होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली .समर्थ कृपेने माझा अखेरचा दिवस दास नवमी हाच आला हा समर्थांचा संकेतच जणु. त्यानंतर गेली दहा वर्षे मी एकही रुपया नोकरी चाकरी करून कमावलेला नाही . काही व्यवसाय यशस्वीपणे केले खरे परंतु त्यातील कमाई अधिकांश व्यवसाय विस्तारातच खर्ची पडली . तरीदेखील केवळ गुरुकृपेचे पालन केल्यामुळे माझे सर्व जीवन अतिशय सुरळीतपणे चालू आहे ! कधीही कुठेही कसलीही अडचण येत नाही ! स्वामींच्याच आदेशानुसार आज पर्यंत कधीच कोणापुढे हात पसरलेले नाहीत ! अगदी घरच्यांच्या पुढे देखील नाहीत !
 देवाच्या सख्यत्वासाठी । पडाव्या जिवलगांशी तुटी ।
सर्व अर्पावे शेवटी । प्राण तोही वेचावा ॥
देवाचे जे मनोगत । तेची मानावे आपले उचित ।
आपले इच्छेसाठी भगवंत । अंतरू नये की ॥
हे समर्थ रामदासांचे बोल हृदयात कोरलेले आहेत . या काळामध्ये स्वामींच्या कृपेने या सुंदर अशा देशाचे भरपूर अवलोकन करता आले ! ते करण्यासाठी खिशामध्ये दमडी असलीच पाहिजे असे नाही हे देखील स्वामींनी सिद्ध करून दाखवले ! 
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।चालविसी हाती धरोनिया ॥ 
या उक्तीची प्रचिती प्रत्येक पावलाला येत गेली . स्वतः स्वामींचे शिष्य अनेक राज्यांमध्ये असल्यामुळे त्यांच्यासोबत ही सर्व राज्ये फिरण्याचे भाग्य मला लाभले . त्यानंतरही देश काल परिस्थितीचे अवलोकन करण्याकरिता या सुंदर अशा भारत वर्षाचे विविध दौरे स्वामींनी माझ्याकडून करून घेतले . स्मार्टफोन हा प्रकार मी लॉकडाऊन सुरू झाल्यावर पहिल्यांदाच वापरला . त्यानंतर झालेला माझा प्रवास गुगल मॅप या ॲपवर काहीसा असा दिसतो . अर्थात सोबत फोन घेऊन केलेला प्रवास तेवढाच इथे दिसतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे . याशिवाय जिथे फोन नेला नव्हता ती ठिकाणे दिसत नाहीत .
गेल्या चार वर्षातील प्रस्तुत लेखकाचा प्रवास
हे सर्व करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये खचितच नाही . ही केवळ गुरुकृपा आहे .याशिवाय दुसरे काय असू शकते ? खिशामध्ये दमडी नसताना इतका प्रवास शक्य आहे काय ? होय ! शक्य आहे ! गुरुकृपा असेल तर या जगात काहीही शक्य आहे ! स्वामींच्या केवळ एका आशीर्वादामुळे हे सर्व घडले आहे . नर्मदा परिक्रमा देखील याच सर्व यात्रांचा परमोच्च बिंदू आहे ! 
अलीकडच्या काळामध्ये मानवी जीवनातील दुःखे जर तुम्ही पाहिलीत तर प्रत्येक दुःखाचे मूळ कुठल्या ना कुठल्या रूपाने पैसा हेच आहे . 
लक्ष्मीचा धरी भरवसा । तो एक मूर्ख ॥ असे रामदास स्वामी सांगतात . त्यामुळे त्या लक्ष्मीचा पती जो परम परमेश्वर परमात्मा त्याला आपलेसे केले म्हणजे झाले . मग लक्ष्मी कुठेही जात नाही . परंतु फक्त लक्ष्मीचाच ध्यास धरला तर मात्र ती फार चंचल आहे . त्यामुळे नर्मदा परिक्रमा करताना देखील लक्ष्मी वर फारसा भरवसा ठेवणे काहीच उपयोगाचे ठरत नाही . कुठलेही कार्य उभे करायला पैसा लागतो हे मान्य आहे .परंतु तुम्ही कार्य करत राहिलात तर त्यासाठी लागणारा पैसा देखील आपोआप उभा राहतो हे देखील सत्य आहे . आपण गोळा केलेल्या नोटा नाणी ही संपत्ती नसून कागदाचे चिठोरे आहेत . म्हणून आपल्याकडे पैशाला अर्थ असा शब्द वापरला जातो . अर्थकारण अर्थशास्त्र अर्थशास्त्रज्ञ या शब्दातील अर्थ म्हणजेच त्या कागदाच्या चीठोऱ्यांनी विकत घेता येणारा अर्थ आहे . सर्वसाधारण गोष्टींसाठी अर्थ आवश्यक आहे . परंतु पारलौकिक सुख मिळवण्यासाठी परमार्थ आवश्यक आहे . एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जाता तेव्हा जितका चांगला व्ह्यू असेल तितके त्या खोलीचे भाडे अधिक असते . याचा अर्थ ते दृश्य पाहण्यासाठी तुम्ही काही पैसा मोजता . आणि त्या दृश्यातला अर्थ विकत घेता . असे लक्षावधी देखावे , साधे-सुधे नव्हे , सुंदर आणि अर्थपूर्ण देखावे नर्मदा मैया तुम्हाला परिक्रमे मध्ये फुकट दाखवते ! ती एक प्रकारे तुमची आर्थिक कमाईच असते ! आणि ते दृश्य बघत असताना जर तुम्ही परमात्म चिंतन केले तर तुमची पारमार्थिक कमाई देखील होऊन जाते ! आपण जेव्हा पाण्याची बाटली विकत घेतो तेव्हा नोट देऊन त्या बदल्यात जीवनाचा अर्थ विकत घेतो . तेच शुद्ध स्वच्छ नितळ पाणी नर्मदा मैया तुम्हाला संपूर्ण परिक्रमे मध्ये फुकट देत राहते ! त्यामुळे साधू संत सज्जन नदी वृक्ष गोमाता यांनी आपल्याला कधी कुठे किती व काय दिले याचा हिशोब शहाण्या माणसाने कधीच लावू नये ! कारण त्याचा ताळेबंद नेहमी आपल्यासाठी तोट्याचाच असतो ! इतके भरभरून दान यांनी दिलेले असते आणि त्याबदलत कुठलाही मोबदला आपल्याकडून घेतलेला नसतो ! नद्या ना जळाचे कधी मोल घेती ।
सद्गुरूंच्या आणि नर्मदा मातेच्या या ऋणामध्ये आजन्म राहणे हेच खूप आनंददायी आहे ! 
त्यांच्या चरणांची सेवा घडणे हाच परमार्थ !





लेखांक शहाऐंशी समाप्त (क्रमशः )

टिप्पण्या

  1. नोकरी किंवा पगार हा कृपेचा भाग नसून त्यासाठी मरमर करावी न लागणे ही कृपा आहे .
    खरंय.

    संत सांगतात
    धंदा म्हणजे आत्मसाधनाच होई ।
    मजूरी चित्ती समाधान देई ।
    संतोष वाढवूनी बुडवी आनंदडोही ।
    आपले कृपेकरोनिया ॥

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम लेख.
    नोकरी किंवा पगार हा कृपेचा भाग नसून त्यासाठी मरमर करावी न लागणे ही कृपा आहे.
    सर्व सुरळित चालू असताना देवाचं नाव घेणे यासारखं सुख नाही

    उत्तर द्याहटवा
  3. संतांचिया गांवी प्रेमाचा सुकाळ। नाही तळमळ दूःखलेश।।
    अप्रतिम. आपले गुरूमय निष्पृह जीवन दूर्मिळच आहे. वाचकांसाठी वंदनीय तसेच प्रेरणादायी।

    उत्तर द्याहटवा
  4. नर्मदे हर!!! तुमच्या ब्लॉग ची लिंक मिळाल्यापासून ६ दिवसात सगळे लेख वाचले , मानस परिक्रमा घडली. मी सध्या हेलसिंकी फिनलॅंड मधे कामानिमित्त राहतोय. इथे आपल्या भारतीय वस्तू मुबलक प्रमाणात नाही मिळत. ह्या लेखात तुम्ही कीर्ती बेनला गुलाबजाम खाताना सांगितले की मैया सर्व इच्छा पूर्ण करते. काल सकाळी हा लेख वाचत होतो आणि मी पण जवळ जवळ ८ महिने गुलाबजाम खाल्ले नावते आणि खायची इच्छा झाली तर काल १० तास पूर्ण होण्याच्या आत गुलाबजाम घरी आले होते आले होते, बायकोच्या मैत्रिणीने चांगले १०-१२ गुलाबजाम पाठवले. डोळ्यात पाणी आले. तुमच्या सारख्या परिक्रमा वासीचे मैया लाड करतेच पण माझ्या सारख्या मानस परिक्रमा करणाऱ्याची पण इच्छा एवडे दूर असून पण पूर्ण करते. मैया महान आहे , स्वामींप्रमाणे स्मार्तुगामी आहे याची प्रचिती आली. तुमचे मैयाने किती लाड केले असतील कल्पनाच करवत नाही. चरण स्पर्श. तुमच्या मुळे परिक्रमा घडत आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. लक्ष्मीचा भर्वसा धरी |तो एक मूर्ख ||दासबोध द2-1-39

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर