लेखांक ७३ : तेली भट्याण चे महातपस्वी परमपूज्य सियाराम बाबा


दुपारच्या वेळी बकावा गाव सोडले आणि नर्मदा मातेचा किनारा पुन्हा एकदा पकडला . काठाने चालताना खूप आनंद मिळत होता . इथे पावला पावलाला दगडांचा खच पडला होता . परंतु इथे कोणी त्याला दगड म्हणत नाहीत . तर शंकर स्वरूप म्हणून या दगडांकडे पाहिले जाते . बरेच अंतर चालल्यावर मर्दाना नावाचे गाव आले . त्या गावामध्ये मी काठाने चालत असताना एक मनुष्य नावेतून उतरला आणि माझ्याशी बोलू लागला . मी कुठून आलो कुठे चाललो आहे वगैरे चौकशी करू लागला . त्याने सांगितले की वरती लक्ष्मणदास महाराजांचा आश्रम आहे तिथे थोडी विश्रांती घेऊन मग पुढे जावे . 
हरिहर कुटी आश्रम मर्दाना
तो नर्मदेचा आदेश मानून मी त्याच्याबरोबर आश्रमामध्ये गेलो . आश्रम अतिशय सुंदर होता . भरपूर झाडी होती . अनेक मंदिरे होती . निवासाची उत्तम व्यवस्था होती .तिथे आधीच अवधूत फरले आणि छोटा बंगाली वगैरे येऊन बसलेले होते . सर्वजण झोपायच्या तयारीत होते . इतक्या तिथे कुठून तरी दहा-बारा छोट्या मुली प्रकट झाल्या ! मी त्या सर्वांना ओळीने नमस्कार केला ! प्रत्येकीने माझ्या डोक्यावर हा ठेवून मला आशीर्वाद दिला ! नंतर त्या मुली माझ्याशी खेळू लागल्या ! आश्रमात एक जिना होता . या जिन्याच्या कुठल्या पायरीवरून खाली उडी मारता येते पाहूया असा खेळा आम्ही सुरू केला . आमच्या दंग्यामुळे अवधूत वैतागला आणि मला रागवून गेला ! मग मी मुलींना शांतपणे खेळायची सूचना केली . मुली देखील अतिशय 'सायलेंट मोड ' मध्ये खेळू लागल्या ! मला मी स्वतः चार-पाच वर्षाचा मुलगा झाला आहे असे वाटत होते ! हा खेळ थांबू नये असे वाटत असतानाच पुढे भटियाण तेली गाव गाठायचे आहे हे लक्षात आले . तिथे असलेल्या एका माणसाने मुलींसोबत माझा फोटो काढला . आणि मी सांगितलेल्या क्रमांकावर पाठवून दिला .
मर्दाना गावातील दशकन्यांसोबत प्रस्तुत लेखक
माझ्यासोबत आलेला मनुष्य मला म्हणाला की आता इथून पुढे काठाने रस्ता नाही तर मी तुम्हाला रस्ता दाखवतो . परंतु मला काठाने जायचे आहे असा निर्धार मी त्याला सांगितल्यावर त्याने सांगितले की इथे अतिशय अवघड असा एक ओढा लागतो जो कोणालाही पार करता येणार नाही असा आहे . वनस्पती आणि शेवाळे माजल्यामुळे त्या ओढ्यात उतरून देखील तो पार करता येत नाही . आणि नाव देखील तिथे चालत नाही . 
हरिहर कुटी आश्रमाला लागून असलेला हाच तो कठीण ओढा . वरती नर्मदा मैय्या दिसते आहे .
त्याच्यासोबत मी चालू लागलो . अचानक त्याने परिक्रमेला लक्ष्मणदास साधूंना वगैरे शिव्या घालायला सुरुवात केली . मला कळेना की याला अचानक काय झाले . त्याने मला इस्लाम हाच धर्म कसा सर्वश्रेष्ठ आहे आणि इस्लाम शिवाय जगाचा उद्धार कसा होऊ शकत नाही हे समजावून सांगायला सुरुवात केली . मी त्याला नाव विचारले असता त्याने सांगितले की त्याचे नाव सय्यद होते आणि तो इथला इमाम होता . मी त्याला विचारले की तुझ्या पूर्वीच्या सात पिढ्यांची नावे तुला माहिती आहेत का ? माझ्याकडे माझ्या पूर्वीच्या २१ पिढ्यांची नावे आहेत हे त्याला सांगितले . आणि सर्व २१ च्या २१ पिढ्या माझे आजचे कुलनाम आहे तेच लावत होते हे देखील सांगितले . याचा अर्थ आमचा वंश जो काही धर्म पाळत आला होता त्याचे पालन करूनही टिकत होता . परंतु त्याचे मात्र तसे नव्हते तीन-चार पिढ्यापूर्वी त्याच्या हिंदू पूर्वजांनी इस्लाम भीतीपोटी स्वीकारलेला होता . भारतातील बहुतेक मुसलमान हे भीतीपोटी हिंदू धर्म त्यागून मुसलमान झालेले लोक आहेत . त्यांच्या पूर्वजांनी कदाचित धैर्य दाखवले असते तर आज ते देखील हिंदू असते . तो काळ भीतीचा होता म्हणून धर्मांतरण केले इथपर्यंत ठीक आहे परंतु आता परधर्मियांची भीती नसल्यामुळे पुन्हा आपल्या मूळ पदाकडे यायला काय हरकत असावी ? असे उलटे मीच त्याला विचारले . चालता चालता आमची चर्चा तापू लागली . त्याने नर्मदा परिक्रमा परंपरेला उलट सुलट बोलायला सुरुवात केली . माझा पारा चढला . मी त्याला सांगितले की तू शेवटचा अपराध केलेला आहेस त्यामुळे मी एक दोन साडे माडे तीन असे म्हणेपर्यंत तुला जितक्या लांब पळता येईल तितके पळून जा . त्याच्यानंतर जे काही होईल त्याला मी जबाबदार असणार नाही . एकंदरीत माझा रुद्र अवतार पाहून सय्यद टिंब टिंब ला पाय लावून वेगाने पळून गेला . अशा पद्धतीने इस्लामची दावत नर्मदा परिक्रमामध्ये अनेकांना मिळाल्याचे मला नंतर कळाले . सुग्रास पंचपक्वान्नांचे भोजन चालू असताना मध्ये एखादे हाडूक त्यात येऊन पडावे असे मला झाले . परंतु तो दिसायला अगदी हिंदू वाटत होता . इमाम असून देखील त्याने दाढी वगैरे राखली नव्हती तर अगदी एखाद्या हिंदू सारखा राहायचा . असे आपले खरे स्वरूप लपवणारे लोकच इथून पुढे आपल्या राष्ट्रासाठी धोकादायक ठरणार आहेत . अशा व्यक्तीचे नाव गाव कुळ दिसणे शिक्षण यापैकी कुठल्याही गोष्टीवरून त्याच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज लावता येणे केवळ अशक्य असते . मनामध्ये विष घेऊन त्या विषाची पेरणी सर्वत्र करणारे हे लोक वेळीच ओळखता आले पाहिजेत . सय्यद पळून गेल्यावर मी पुन्हा एकदा काठाकडे वळलो . इथे काठाकडे जाणारा रस्ताच नव्हता तर सर्वत्र झाडी दिसू लागली . मोठ्या कष्टाने काटेरी झाडीपार केल्यावर मला एक दोन पुरुष खोल ओढा लागला . नर्मदे काठचे सर्व ओढे तुम्हाला नर्मदे कडेच घेऊन जातात हे माहिती असल्यामुळे मी ओढ्यामधून चालायला सुरुवात केली . ओढा जवळपास कोरडा पडत आला होता . परंतु या ओढ्यामध्ये प्रचंड काटेरी झाडे होती . ती सर्व मी लीलया पार केली . जणूकाही ते काटे नसून गुलाबाच्या पाकळ्या आहेत असा त्यांचा स्पर्श मला होत होता . मी जेव्हा त्या ओढ्यातून बाहेर पडलो आणि समोर नर्मदेचे पात्र दिसले तेव्हा एक शेतकरी तिथे बसलेला होता . माझ्याकडे पाहून तो एकदम आश्चर्यचकित झाला ! तो म्हणाला बाबाजी इथून कुठून आलात ? मी त्याला सांगितले की असा असा ओढ्याच्या मार्ग पकडून मी आलेलो आहे . तो म्हणाला परंतु तिथे तर इतके काटे आहेत . तुम्ही कसे काय बाहेर पडलात ? मी त्याला मला आलेला अनुभव सांगितला आणि आम्ही दोघांनी मिळून नर्मदा मातेचा जयजयकार केला ! वाचकांना कल्पना यावी म्हणून मी तो ओढा आणि ते शेत गुगलवर शोधून काढले आहे त्याचा नकाशा खाली टाकत आहे .
लाल मार्कर दिसतो आहे तिथे शेतकरी मला भेटला व तेच हिरवेगार शेत त्याच्या मालकीचे आहे . तिथवर झाडांचा जो हिरवागार पट्टा येतो आहे तोच ओढा होता .बाकी सर्वत्र वाळू काटेरी झुडपे यांचेच साम्राज्य आहे .
शेतकरी मला म्हणाला की गेल्या वर्षा दोन वर्षात या मार्गाने कोणीच गेलेले नाही . याचे कारण असे आहे की नर्मदा मैया येथे डावीकडे वळण घेते आणि रस्त्याने चालत गेल्यावर अंतर कमी पडते . तसेच नर्मदेच्या काठाने चालताना प्रचंड काटेरी झुडपे आणि घनदाट अरण्य आहे त्याच्यामध्ये वन्यपशूंचा वास देखील आहे . रानडुकरे, कोल्हे, लांडगे ,बिबटे , साळींदर यांचा वावर या भागामध्ये असतो . परंतु या सर्वांखेरीज अजून एका गोष्टीचा वास तिथे आहे .तो म्हणजे नर्मदेचा वास ! आणि त्या वासाचाच सहवास मला हवा होता त्यामुळे मला दुसरा कुठला मार्ग आवडणे किंवा सूचणे शक्यच नव्हते . काठावरचा मार्ग अतिशय सुंदर होता . पुढे असलेल्या लेपा धरणामुळे पाण्याचा प्रवाह थांबला होता आणि पाणी शांत होते . इथे फारशी वळणे नसून एका सरळ रेषेमध्ये नर्मदा मैया वाहताना दिसते . डाव्या हाताला संपूर्ण दाट झाडी असून तिथे तुम्ही एकदा आत शिरला तर बाहेर येऊ शकणार नाहीत इतकी ती घनदाट आहे . पायाखाली मऊशार गाळमाती आहे . हा संपूर्ण परिसर निर्मनुष्य असून अगदी मासे पकडणारे लोक सुद्धा फार क्वचित दिसतात . आतापर्यंत मी जे काही अंतर चाललो होतो त्यातील अतिशय सुंदर असा हा पाय मार्ग होता . संपूर्ण सहा किलोमीटरचे अंतर तोडताना फक्त नर्मदा मैया आणि मी असे आम्ही दोघे जण होतो ! इथे पात्रात फारसे दगड देखील नसल्यामुळे बगळे , पाणपक्षी देखील कमी होते . पाणी चांगलेच खोल होते . हा परिसर कसा होता हे आपल्या लक्षात यावे म्हणून नकाशे जोडत आहे .
पथराड गावातील बेट सोडले की पुन्हा नर्मदेमध्ये एक सुद्धा दगड दिसत नाही . नर्मदा उजवीकडून डावीकडे वाहते आहे . प्रचंड झाडी जरी असली तरी धरणातील पाण्याची पातळी वाढते आणि कमी होते त्यामुळे काठावरती साधारण चार-पाच फुटाचा वनस्पती विरहित मातीचा पट्टा तयार झालेला आहे .  त्याच्यावरून चालत राहिलो .
नर्मदेने डावीकडे घेतलेले वळण आपल्याला येथे दिसते आहे . उजवीकडून डावीकडे वाहणारी नर्मदा नदी आपण पाहतो आहोत . सर्वात उजवीकडे मर्दाना गाव असून किनारा पकडून मी श्री सियाराम बाबा आश्रम (तेली भट्याण ) काठाकाठाने गाठला .
धरणातील पाण्याच्या चढउतारामुळे प्रचंड चिखल सर्वत्र सुरू झाला होता . हा चिखल कधी कधी गुडघाभर देखील होता . परंतु याच्यामध्ये पाय पूर्णपणे बुडणार नाही याची काळजी घेणारा एक दुर्दैवी घटक तिथे सर्वत्र आढळत होता . या संपूर्ण हिरव्यागार चित्राला गालबोट लावण्याचे काम नर्मदेच्या दुतर्फा साठलेले प्लास्टिकचे थर करत होते ! मी तिथे काय काय वस्तू पडल्या आहेत याचा हिशोब लावला . शाम्पू च्या पुड्या , शाम्पू च्या बाटल्या, उदबत्तीच्या पुड्या , रबरी चपला ,बूट ,अंगातील कपडे , प्लास्टिकच्या पिशव्या , थर्माकोलच्या पत्रावळ्या , प्लास्टिकचे ग्लास आणि चमचे ,प्लास्टिकचे कागद , पीव्हीसी पाईपचे तुकडे , प्लास्टिकची खेळणी , नर्मदेला वाहिलेल्या टेरिकॉटच्या साड्या , वाहून आलेली नायलॉनची कोळ्यांची जाळी अशा वस्तूंचा अक्षरशः खच तिथे पडला होता . काही ठिकाणी हा थर साधारण चार फूट जाडीचा झाला होता . म्हणजे संपूर्ण पाय आत मध्ये घातला तरी प्लास्टिकच प्लास्टिक लागत होते . थोड्या अंतरावर असलेल्या लेपा धरणामुळे पाणी संथ होऊन हा सगळा कचरा इथे साठला होता . या सर्व प्लास्टिक सोबत आलेल्या रसायनांमुळे या भागातील पाणी अतिशय दूषित झालेले असणार हे उघड होते . या प्लास्टिकचा एकमेव फायदा असा होत होता की त्यामुळे चिखलामध्ये माझा पाय फसत नव्हता तर प्लास्टिक वर पाय ठेवून चालता येत होते . तसेच हा प्लास्टिकचा थर जेवढ्या भागत होता तिथे एक गवताची काडी सुद्धा उगवू शकत नव्हती .  मी मनोमन असा निश्चय केला की भविष्यात कधी काळी नर्मदे काठी प्लास्टिक निर्मूलनाची कुठली चळवळ उभी केली तर ती सर्वप्रथम या भागात राबवावी . इतके प्लास्टिक इथेच पडले होते .  बाकीचे काय करतात माहिती नाही परंतु आपण स्वतःपुरता जरी असा निर्णय घेतला की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये प्लास्टिकचा एक कण देखील नर्मदा मातेमध्ये किंवा अन्य कुठल्याही जलस्त्रोतांमध्ये टाकणार नाही तरी हा प्रश्न खूप सहज गत्या सुटणारा आहे . प्लास्टिकच्या क्षेत्रामध्ये काम करणारे कोणी तज्ञ असतील तर त्यांनी कृपया या मध्ये लक्ष घालावे . प्लास्टिक मॅन ऑफ इंडिया या नावाने ज्यांना ओळखले जाते ते पद्मश्री डॉक्टर आर वासुदेवन यांना व्यक्तिशः भेटून मी हा संपूर्ण विषय समजावून सांगितलेला आहे . त्यांनी रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचे तंत्र शोधून काढलेले आहे परंतु त्यासाठी काही ठराविक प्रकारचे प्लास्टिक लागते .अशा प्रकारचे रबर अधिक प्लास्टिक अधिक पॉलिथिन  अधिक पोलियुरेथिन अधिक पॉलिस्टर त्यांना चालत नाही . हे सर्व प्लास्टिक आहे असे उचलून याला उष्णता युक्त दबाव देऊन त्याचे चौकोनी ब्लॉक तयार केले ,तर त्याचा वापर धरण किंवा बंधारे बांधताना करता येऊ शकतो . कालांतराने याचे रूपांतर एका अभेद्य खडकामध्ये होऊ शकते . कृपया तज्ञांनी अधिक प्रकाश टाकावा . असो . माझे लक्ष सतत डावीकडच्या झाडीकडे होते . एखादे वन्य श्वापद अचानक अंगावर येऊ नये इतकी माफक अपेक्षा होती . हळूहळू पायाखाली असलेल्या चिखलाचे प्रमाण वाढू लागले . आणि आता तर अखंड गुडघाभर चिखलातून मी चालत होतो . मला पुन्हा एकदा इंद्रावती नदीतील चिखल आठवायला लागला . ज्या अर्थी या मार्गाने कोणी जात नाही त्याअर्थी इथे देखील असेच काहीतरी होऊ शकते याची मनाची तयारी मी करून ठेवली होती . अचानक समोर एक ओढा आडवा आला . प्रचंड जंगलातून हा बाहेर आला होता . त्यामुळे त्याला काठ वगैरे प्रकार नव्हता . आता हा ओढा ओलांडणे क्रमप्राप्त होते . हा ओढा किती भयानक आहे याची वाचकांना कल्पना यावी म्हणून त्या ओढ्याचा गुगल नकाशा सोबत जोडत आहे . 
सियाराम बाबांचा आश्रम जवळ आलेला असताना मला आडवा आलेला ओढा लाल मार्कर ने दाखवलेला आहे . 
हे चित्र पाहिल्यावर तुम्हाला गुडघाभर चिखल कसा होता आणि ओढा कसा होता हे लक्षात यावे ! लाल मार्कर दाखविला आहे त्याच ठिकाणावरून मी ओढा पार केला .
मी ओढा पार करण्याकरता थांबलेलो आहे हे बघताक्षणी दूरवर नावेतून मासे पकडणारा एक केवट ओरडला चलते रहो चलते रहो ! त्याचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचला नाही परंतु हात वारे लक्षात आले . मी नर्मदा मातेचे स्मरण करून ओढ्या मध्ये पाऊल ठेवले . इंद्रावती नदी बरी म्हणायची कारण तिथे पाय स्थिर तरी राहत होता . इथे प्रत्येक पाऊल चिखलात जात होते ! गुडघाभर पाण्यात गेल्यावर मी पुन्हा नावाड्याकडे पाहिले . अजूनही तो मला पुढे जा पुढे जा अशी खूण करत होता . मी कमरे एवढ्या पाण्यात गेलो . पुन्हा नावाड्याकडे पाहिले . त्याचे पुढे जा पुढे जा सुरूच होते . बकावा गावामध्ये रमेश जाधव ने मला सांगितले होते की सियाराम बाबा ,हे त्यांना कितीही पैसे , कोणीही अर्पण केले , तरी त्यातले फक्त दहा रुपये काढून घेतात . उदाहरणार्थ कोणी त्यांना दोन हजार रुपयाची नोट दिली तर ते १९९० रुपये परत करतात .वीस रुपये दिले तर दहा रुपये परत करतात . म्हणून मी मला दक्षिणा मिळालेली एक दहा रुपयाची नोट माझ्या छाटीच्या पोटाच्या कप्प्यामध्ये ठेवून दिली होती . पाठीवरचे दप्तर काढून मी डोक्यावर घेतले आणि साधारण छाती एवढ्या पाण्यात उतरलो . नशिबाने नर्मदेचे पाणी स्थिर असल्यामुळे ओढ्याच्या पाण्याला ओढ नव्हती . परंतु त्यामुळेच इथे खूप सारा गाळ देखील माजला होता . अखेरीस पाण्याची पातळी पुन्हा कमी कमी होऊ लागली आणि मी ओढा पार झालो . ज्या नावाने मला हात केला होता त्याचे आभार व्यक्त करावेत म्हणून मी वळून मागे पाहिले . परंतु नावाडी काही दिसेना . कदाचित तो अतिशय वेगाने उलट दिशेला गेला असावा . परंतु इथे उभे राहिल्यावर मला साधारण तीन चार किलोमीटरचा नदीचा परिसर दिसत होता . नावाडी कुठेच दिसत नाही हे पाहून मला आश्चर्य वाटले आणि मी नर्मदा मातेचा जयजयकार केला . त्याने अतिशय आश्वासक पद्धतीने पुढे जा असा जो एक इशारा केला होता त्याच्या बळावर मी इथपर्यंत आलो होतो . आयुष्यामध्ये गुरूचा सहभाग इतकाच असतो . एखादी गोष्ट करावी की न करावी याचा फक्त हो किंवा नाही इतका सल्ला गुरुने दिला तरी पुरेसा असतो . त्याने या मार्गाने आधी प्रवास केलेला असल्यामुळे त्याचा सल्ला हा विशेष महत्त्वाचा ठरत असतो . आता पुन्हा एकदा छोटे-मोठे नाले नर्मदार्पण होताना दिसू लागले .यातील पाणी घाणेरडे होते याचा अर्थ गाव जवळ आले होते . थोड्याच वेळात एक शेवटचा आंबील ओढा लागला . साधारण गुडघाभर खोलीचा थोडा मी धावतच पार केला आणि भटियाण तेली गावाचा घाट लागला . मुख्य भटियाण बुजुर्ग गाव इथून लांब आहे . त्याची एक छोटी वस्ती म्हणजे तेली भटियाण. या घाटावर वर्षभर प्रचंड गर्दी असते . रविवारी तर इथे पाऊल ठेवायला जागा नसते असे लोकांनी मला सांगितले . 

सियाराम बाबांचा घाट
या घाटावर बरेचदा अशी गर्दी असते
हे सर्व लोक फक्त आणि फक्त सियाराम बाबा यांच्या दर्शनासाठी येत असतात . इथे समोरच्या तटावर
गोगवाँ नावाचे गाव आहे . या गावातील नावाडी उत्तर तटावरून दक्षिण तटावर लोकांना आणून सोडतात . माणशी दहा रुपये किंवा वीस रुपये घेतले जातात . उत्सवाच्या काळामध्ये यातला प्रत्येक नावाडी किमान एक लाख रुपये कमवतो याच्यावरून आपण किती लोक येत असतील याचा अंदाज बांधावा ! दक्षिण तटावर जे लोक सडक मार्गाने दर्शनासाठी येतात त्यांना पाच किलोमीटर दूर गाडी लावून चालत यावे लागते . कारण पाच किलोमीटर लांबीची गाड्यांची रांग कधी कधी इथे लागलेली असते . सियाराम बाबांचे प्रस्थ हे असे आहे ! परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण त्यांना पाहिले तर इतका विरक्त मनुष्य तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात पाहिलेला नसेल ! केवळ एक लंगोटी हेच त्यांचे बारा महिने ठरलेले वस्त्र आहे . नर्मदा खंडातील सर्वात जास्त चर्चिल्या जाणाऱ्या या महान तेजस्वी तपस्वी संतांच्या दर्शनाची ओढ मला लागली होती त्यामुळे मैयामध्ये प्रतिकात्मक स्नान करून थेट आश्रम गाठला . आश्रमामध्ये बाबा बसलेले होते ! सियाराम बाबांचे वय किती आहे यावरून अनेक मतप्रवाह आहेत . मी थेट बाबांना त्यांचे वय विचारले असता त्यांनी ८९ असे वय सांगितले . या घटनेला आता दोन वर्षे झाल्यामुळे त्यांचे सध्याचे वय ९१ वर्षे आहे ( आंग्ल वर्ष 2024 रोजी ) . १०० , ११० ,१२० ,१३० वगैरे वयाचे आकडे अतिरंजीत आहेत . बाबांच्या रूपाचे वर्णन काय करावे ! अतिशय तेजस्वी अशी छोटीशी मूर्ती . शरीरामध्ये अत्यंत किमान आवश्यक इतकाच अस्थि मज्जा मांस याचा भाग शिल्लक राहिलेला . मेद तर नावाला सुद्धा नाही . परंतु या सर्वांवर मात करणारे प्रचंड तेज संपूर्ण अंगावरती विलसणारे ! पाठीमध्ये अलीकडच्या काळात आलेला बाक . गोरापान वर्ण ! अंगाला भस्म लावलेले . निळसर घारे डोळे ! डोक्यावर अर्धे टक्कल आणि अर्धा जटाभार ! वितभर दाढी . एका पायाला उंदीर चावल्यामुळे झालेली जखम . त्यावर पट्टी बांधलेली . यांच्या तीन मजली आश्रमामध्ये कुत्री मांजरे उंदीर साप बेडूक सर्वांना मुक्त प्रवेश आहे . कोणीही त्यांना हाकलत नाही .  
रामायण वाचत बसलेले सियाराम बाबा .समोर कोण आले गेले याकडे त्यांचे फारसे लक्ष नसते .किमान ते तसे दाखवत तरी नाहीत .
बाबा एका सिंहासनावर कायम बसलेले असतात . इथेच रात्री झोपतात . समोर रामायणाची मोठी पोथी उघडून ठेवलेली असते व तिचे अखंड वाचन चालू असते . समोर एक जुना टीव्ही लावला असून त्याच्यावरती आलटून पालटून रामायण आणि महाभारत लावले जाते . हे रामायण महाभारत चालू असताना आवाज प्रचंड मोठा ठेवला जातो त्यामुळे बाबांना ऐकायला कमी येते की काय असे तुम्हाला वाटू शकते ! परंतु प्रत्यक्षामध्ये लोकांनी बाबांशी फार काही बोलू नये म्हणून बाबांनी च केलेली ही युक्ती आहे , हे मला त्यांच्या शिष्यांनीच सांगितले !
कोणीही येऊन दर्शन घेऊ दे , बाबांचे वाचन थांबत नाही
 लोक रांगेत उभे राहून बाबांचे दुरून दर्शन घेत होते . हातात दिलेले दहा रुपये बाबा एका बाजूला टाकून द्यायचे . त्यांचे समोर कोण येते आहे वगैरे गोष्टींकडे अजिबात लक्ष नव्हते . गावातीलच काही ग्रामस्थ इथे सेवेसाठी दिवस-रात्र येत राहतात . त्यांच्याशी मात्र बाबा मोठ्या आवाजात बोलताना दिसतात . बाबांना एक चष्मा पण आहे परंतु ते त्याचा वापर क्वचित प्रसंगी करतात . रांगेनुसार माझा देखील क्रमांक आला आणि मी तसाच पोटाच्या कप्प्यात हात घालून दहा रुपयाची ती ओली नोट काढली आणि बाबांच्या हातात ठेवली . बाबा नोट हातात घेऊन न बघता पलीकडे फेकत होते . परंतु माझी नोट त्यांना ओली लागल्यावर त्यांनी खालपासून वरपर्यंत माझ्याकडे पाहिले .  "अच्छा परिक्रमावासी है " बाबा म्हणाले . त्यांचा आवाज ऐकून धन्य धन्य झाल्यासारखे वाटले ! मला म्हणाले "गीले कैसे हो गये ? " मी बाबांना म्हणालो , "बाबा मै मैय्या के किनारे किनारे चल के आया । रास्ते मे एक नाला पडा । उसमे भीग गया । " बाबांनी खात्री पटवून घेण्यासाठी बाजूला उभ्या असलेल्या ग्रामस्थांकडे पाहिले . ग्रामस्थ म्हणाले होय बाबा बरोबर आहे . काठाने येताना ओढे ओलांडत यावे लागते . मी ग्रामस्थांना म्हणालो , " त्यांनाही हे माहिती असणार आहे ! " सगळ्यांनी आनंदाने बाबांचा जयजयकार केला ! सियाराम बाबा अजूनही मी दिलेल्या दहा रुपयाच्या त्या नोटेकडे उलटी पालटी करून पहात होते आणि त्यांच्या आजूबाजूला काहीतरी ते शोधत आहेत असे मला जाणवले . अखेर त्यांनी एका कोपऱ्यात ठेवलेला हिटर काढला . त्याच प्लग स्वतः सॉकेटमध्ये घातला . आणि तो चालू करून पुढून मागून ती दहा रुपयाची नोट वाळवत बसले . जसजसे त्या नोटेवरील पाणी उडून जात होते तसतसे माझ्या शरीराला चिकटलेले अनावश्यक विचार ,विकार नष्ट होत आहेत असा भास मला झाला . ती नोट जसजशी कडक होऊ लागली तसतसा मी देखील वैराग्याने कर्तव्य कठोर बनतो आहे असे मला वाटू लागले . एक क्षण असा आला की ती नोट संपूर्णपणे कोरडी दिसू लागली . जणू काही तिला कधी पाण्याचा स्पर्शच झाला नव्हता ! बाबांनी ती नोट फडकवली आणि हसू लागले ! इकडे मला देखील असे वाटू लागले की मला मायारूपी संसाराचा स्पर्श मुळात कधी झालेला नाहीच आहे !मी जन्मतःच परब्रम्ह स्वरूप आहे ! अहं ब्रह्मास्मि । सर्वम् खल्विदं ब्रह्म । चिदानंद रूपः शिवोsहम् शिवोsहम् । " अब सुखा हो गया ! अब हमारे पास रख सकते है । " बाबा टाळी वाजवत आनंदाने म्हणाले . हा संपूर्ण प्रकार होईपर्यंत मी बाबांच्या समोर हात जोडून उभा होतो . बाबांनी मला हाताने प्रसाद दिला . मी बाजूला झालो आणि ग्रामस्थ माझ्याशी बोलू लागले . ते म्हणाले बाबाजी तुम्ही खूप भाग्यवान आहात ! तुमची नोट सियाराम बाबांनी इतका वेळ हाताळली ! ते जेव्हा नोट उलटी पालटी करून पाहत होते तेव्हा तुमच्या आयुष्याकडे पाहत होते , भूत वर्तमान भविष्याकडे पाहत होते , हे लक्षात ठेवा ! त्यांनी तुमची आतापर्यंतची सर्व पापे जाळून टाकली ! तुम्हाला पुन्हा एकदा कोरडे केलेले आहे ! तुमची परिक्रमा सफल झाली !  हे ऐकून मला खूप बरे वाटले ! मी अजूनही ओला आहे हे पाहिल्यावर एका युवकाने मला मागे असलेल्या धर्म शाळेमध्ये नेऊन आसन लावण्यासाठी जागा दाखविली . इथे आधीपासून २५ ते ३० परिक्रमावासी येऊन उतरलेले होते . मी ओले कपडे पिळून वाळत टाकले .  आणि पुन्हा एकदा बाबांच्या समोर जाऊन बसलो . बाबांची ऊर्जा इतकी सकारात्मक होती की तिथून हलावे असे वाटतच नव्हते . सियाराम बाबा हे पूर्वाश्रमीचे उच्च विद्या विभूषित असून त्यांनी बारा वर्षे एका पायावर उभे राहून तप केलेले आहे आणि बारा वर्षे मौन साधना केलेली आहे . त्यामुळे पूर्वी त्यांना खडेश्वर बाबा आणि मौनी बाबा देखील म्हणायचे . बाबांच्या अनेक रंजक कथा भक्तमंडळी मला सांगत होती . एकदा सर्व भक्तांनी मिळून असे ठरवले की सियाराम बाबांना मारुती कार घ्यायची .त्यासाठी निळ्या रंगाची मारुती अल्टो गाडी सर्व भक्तांनी विकत घेतली आणि बाबांना भेट द्यायची ठरवली .बाबा थेट मारुतीच्या शोरूम मध्ये गेले . भक्तांना म्हणाले मी गाडी वापरावी असे तुम्हाला वाटते ना ?  घ्या ! सियाराम बाबा स्वतः गाडीमध्ये बसले आणि ती गाडी स्वतः चालवत भटियाण तेली घाटापर्यंत घेऊन आले आणि एका गॅरेजमध्ये जी लावून टाकली ती कायमचीच !पुन्हा कधीच बाहेर काढली नाही ! त्यावेळी बाबा गाडी चालवताना चा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे !
भक्तांनी दिलेली मारुती अल्टो गाडी चालवताना सियाराम बाबा.
बाबांच्या पायाला भक्तांनी स्पर्श करू नये म्हणून असा एक छोटासा पिंजरा तयार करण्यात आलेला आहे . रोज लाखो भक्तांनी पायावर डोके ठेवले तर त्यांच्या पायाची जखम कधीच बरी होणार नाही .
 रोज परिसरातील एक डॉक्टर येऊन त्यांच्या पायाला मलमपट्टी करतात .
परंतु सियाराम बाबा हे पुरते विदेही सत्पुरुष असल्यामुळे ते पायाची काळजी अजिबात न घेता कुठेही अनवाणी पायाने फिरतात .वरील चित्रामध्ये महापुराच्या पाण्यात अनवाणी पायाने चालताना सियाराम बाबा आपल्याला दिसत आहेत .
इथे थोड्याच वेळामध्ये वापीचा अवधूत फरले आणि त्याच्यासोबत चे सर्व परिक्रमा वासी देखील दाखल झाले . इथे नाशिक मध्ये निफाड तालुक्यात रुई देवगाव येथील ज्ञानेश्वर माऊली शिंदे हे कीर्तनकार देखील परिक्रमा संपवून ओंकारेश्वर पासून पायी आले होते . त्यांच्यासोबत एक माताराम होत्या . हे दोघे पुन्हा चालत नाशिकला निघाले होते . यांनी मला सियाराम बाबांविषयी भरपूर माहिती सांगितली . बाबांनी आता जिथे आश्रम आहे तिथे साधना केलेली आहे . एकदा नर्मदा मातेला महापूर आला . परंतु बाबांनी त्यांचे स्थान सोडले नाही . बाबांच्या पायाला स्पर्श करून मैया पुन्हा खाली निघून गेली . त्या पातळीच्या वर पुन्हा कधीच पाणी आले नाही . खाली बाबांनी एक मारुतीचे मंदिर बांधलेले आहे . एकदा यांचे आणि मारुतीचे काहीतरी भांडण झाले . त्यांनी चिडून मारुतीला त्या मंदिरामध्ये चिणून टाकला आहे ! रोज रात्री बाराच्या सुमाराला बाबा या मारुतीची नर्मदा मातेची तुळशीची पूजा करून मगच झोपतात असे मला माऊलींनी सांगितले . मला हे सर्व नवल वाटत होते ! आपल्याला हा सर्व प्रसंग स्वतः डोळ्यांनी पाहायला मिळावा अशी एक सूप्त इच्छा मनामध्ये येऊन गेली .  बाबांना लोक कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या आणून देत होते ! आता हा विदेही महापुरुष थोडीच शीतपेय पिणार आहे ! परंतु बाबा ती बाटली घ्यायचे आणि एका बाजूला टाकून द्यायचे . त्यांचे शिष्य मग त्या सगळ्या बाटल्या गोळा करून एका बादलीमध्ये सर्व शीतपेये एकत्र करायचे . मग त्यात माझाचा आंब्याचा रस पण आला आणि सोड्यावाले थम्स अप पण आले ! आणि स्थानिक बाजारात मिळणारा जीरा सोडा सुद्धा आला ! हे सगळे एकत्र कालवले की बादली बाहेर ठेवायचे आणि परिसरातील कुत्री त्याच्यावर ताव मारायची ! सतत अति शर्करायुक्त पेयं पिल्यामुळे इथल्या सर्वच कुत्र्यांच्या अंगावर भरपूर त्वचारोग दिसत होते . परंतु तरीदेखील कुत्र्यांना आत मध्ये आल्यावर कोणी बाहेर काढत नव्हते . आपल्याला कोणी काही बोलत नाही ही माहिती असल्यामुळे इथल्या श्वानवर्गाच्या अंगात एक वेगळीच मस्ती संचारलेली दिसत होती ! 
परमपूज्य सियाराम बाबा यांचा छोटासा तीन मजली आश्रम . 
रामायण वाचत बसलेले  . शेजारी बाबांच्या डाव्या हाताला त्यांनी नोट वाळवली तो हिटर दिसतो आहे .नर्मदा स्नान केल्यावर वर बघितले असता घाट असा दिसतो . भव्य पिंपळाचा वृक्ष संपूर्ण परिसरावर छाया धरून आहे . 
या झाडाखालीच बाबांनी स्थापन केलेला मारुती आहे
आश्रमातील शिवलिंग
मारुतीरायाला प्रदक्षिणा घालताना सियाराम बाबा
नर्मदा मातेला कितीही मोठा महापूर आला तरी देखील बाबांची नित्य पूजा थांबत नाही
प्रदक्षिणा घालताना सियाराम बाबा
मागे असलेल्या कठड्यापाशी राहून बाबा नर्मदा मैया ची देखील पूजा करतात .
नंतर जवळच टांगलेल्या तुळशीच्या कुंडीकडे जातात .
आणि तुळशीची देखील पूजा करतात . 
हे सर्व करताना बाबा सोबत काडीपेटी न ठेवता केवळ आपल्या हाताने ज्योत  प्रज्वलित करतात हे अनेक लोकांनी अनेक वेळा पाहिलेले आहे . याचे अनेक व्हिडिओ देखील तुम्हाला युट्युब वर सापडतील . इतके सियाराम बाबांचे तप:सामर्थ्य आहे असे म्हणतात !
बाबांच्या तपोबलाचे तेज त्यांच्याजवळ गेल्यावर कोणालाही जाणवते . त्यांची वाणी अतिशय धारदार आहे . त्यांची नजर तीक्ष्ण आहे . त्यांची स्मृती तल्लख आहे .  मी त्यांच्यासमोर खाली बसून राहिलो . हजारो लोक दर्शन घेऊन जात होते . बाबा फारसे कोणाकडे पाहत नव्हते . अचानक एखाद्या माणसाशी मात्र बोलायचे . एका नवाड्याने नवीन नाव घेतली होती . त्यांना दर्शन घेतल्याबरोबर बाबांनी विचारले काय घेतली का रे नाव ! केवट ढसा ढसा रडू लागला . तुमचे पाय नावेला लागावेत इतकीच इच्छा आहे असे म्हणाला . "बघुया ! जशी मैयाची इच्छा ! "  महाराज म्हणाले .
बाबांचे अखंड रामायण वाचन चालू होते . हळूहळू अंधार पडला आणि गर्दी कमी होऊ लागली . आता सर्व स्थानिक ग्रामस्थ तिथे येऊन बसले . बाबा हळूहळू रंगात आले आणि सगळ्यांशी गप्पा मारू लागले ! प्रत्येकाला ते नावाने ओळखत होते . इतक्यात एक गावकरी त्यांचे पाय दाबायला बसला . माझ्या मनात विचार आला की आपल्याला सुद्धा बाबांचे पाय दाबायला मिळाले तर किती बरे होईल ! इकडे रामायण जोरात सुरू होते ! त्याच्या आवाजात कोण कोणाला काय बोलतो याचा काही पायपोस कोणाला लागत नव्हता ! मी हळूच त्या पाय दाबणाऱ्या माणसाला खूण केली की मी सुद्धा पाय दाबू का ? तो मला म्हणाला की बाबा परिक्रमावासींकडून जरा सुद्धा सेवा घेत नाहीत . त्यांचा जन्म परिक्रमावासींच्या सेवेसाठी आहे असे ते सांगतात . त्यामुळे तुम्हाला ते पायाला हात तर लावू देणार नाहीतच पण मला सुद्धा पाय दाबू देणार नाहीत . मला असे फार जाणवले की हे जर तर चे याचे स्वतःचे अनुमान आहे . अजून थोडा वेळ गेला आणि माझ्या मनात तीव्र इच्छा होऊ लागली . पाय दाबण्याची पहिली पायरी म्हणून मी सर्वप्रथम पायाजवळ येऊन बसलो . बाबांचा एक पाय हा मनुष्य दाबत होता . एक पाय हलवत बाबा बसले होते . आपल्याकडे या गेम मधले ट्रम्प कार्ड होते ! हुकुमी एक्का! तो काढायचा मी ठरवले . मी हात जोडले आणि नर्मदा मातेची प्रार्थना केली , " मैया मला सियाराम बाबांचे पाय दाबायची इच्छा आहे . " मी डोळे उघडून बाबांकडे बघत बसलो . कोणीतरी अचानक काहीतरी सांगितल्यासारखे बाबांनी इकडे तिकडे पाहिले आणि माझ्याकडे डोळ्यात डोळे रोखून पाहू लागले . मला काही कळायच्या आत त्यांनी त्यांचा दुसरा पाय माझ्या दिशेला केला आणि म्हणाले , " दबाव " .माझ्या आनंदाला पारावार उरला नाही !  मला बाबा स्वतः पाय दाब म्हणाले आहेत हे शेजारच्या ग्रामस्थांच्या लक्षात आले ! ते खाणा खुणा करून एकमेकांना सांगू लागले ! त्यांच्यासाठी हा चमत्कार होता . कारण सियाराम बाबा कधीच कुठल्या परिक्रमावासीकडून कणभर सुद्धा सेवा करून घेत नाहीत .  माझे पाय दाबणे बहुदा बाबांना आवडले असावे . त्यांनी थोड्यावेळाने त्यांचा दुसरा पाय देखील माझ्या मांडीवर ठेवला ! हा त्या ग्रामस्थाला इशारा होता की आता तू पाय दाबू नको . तो मागे सरकला आणि मी बाबांच्या समोर येऊन बसलो . आता बाबांचे दोन्ही पाय माझ्या दोन्ही मांड्यांवर टेकलेले होते . आणि मी दोन्ही पाय एकाच वेळी दाबत होतो .बाबांचा एक पाय दगडासारखा कडक होता आणि एक पाय लोण्यासारखा मऊ होता .त्यांनी ज्या पायावर उभे राहून खडेश्वर तपस्या केली तो पाय दगडासारखा कडक झाला होता . दुसरा पाय अतिशय मऊ मृदू मुलायम होता .वरती बाबांचा टीव्ही बघण्याचा कार्यक्रम चालू होता . मध्येच ग्रामस्थांशी बोलत होते . मध्येच रामायण वाचत होते . असा सुमारे तीन तास मला त्यांचा सत्संग लाभला ! त्यानंतर परिक्रमावासींची भोजनाची वेळ झाल्यामुळे मला आत बोलावण्यात आले . भोजन झाल्यावर पुन्हा काही काळ बाबांजवळ बसलो . त्यांची प्रत्येक कृती बघताना अतिशय आनंद वाटत होता ! शुद्ध परमात्म स्वरूप असा त्यांचा देह होता . त्यांची त्वचा इतकी नितळ आणि इतकी पातळ होती की विचारू नका ! अंगातील शीर आणि शीर दिसायची . रात्री बाबा बाहेर येऊन मारुतीशी कसे बोलतात ते मला ऐकायचे होते . त्यासाठी मी आश्रमामध्ये आसन न लावता बाबा जिथून बाहेर पडतात त्या दरवाजाच्या समोरच आसन लावले . माझ्यासोबत ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आसन लावले . बाबांच्या खोलीमध्ये प्रचंड उंदीर होते . उंदीर त्यांचे पाय कुरतडून टाकायचे . म्हणून भक्तांनी बाबांसाठी एक पिंजरा केला होता . बाबा दिवसभर ज्या आसनावर बसतात रात्री त्याचे रूपांतर पिंजऱ्यामध्ये केले जायचे . जेणेकरून उंदीर आत येऊन चावू नयेत . माऊली आणि मी बाहेर झोपलेलो होतोच . प्रचंड थंडी पडली होती . आणि अशातच बाबांच्या कुटीचे दार उघडले . माऊलींनी मला सूचना केली होती की त्यांच्या पाया वगैरे पडायचे नाही .  झोपून राहायचे . परंतु आपोआप आम्ही दोघे उठून बसलो . बाबा हातामध्ये तीन पेटवलेल्या उदबत्या घेऊन शांतपणे बाहेर आले . हळूहळू चालत पायऱ्या उतरत मारुती मंदिरापाशी गेले . मारुतीला त्यांनी उदबत्ती ओवाळली . आणि दिवसभर काम करून संध्याकाळी भेटणारे मित्र कसे गप्पा मारतात तसे भिंतीवर ते एक हात ठेवून मारुतीशी गप्पा मारू लागले . त्यांचा संवाद असा होता की जणूकाही मध्ये मारुती देखील त्यांच्याशी बोलत होता . अशा चार-पाच मिनिटे गप्पा मारून झाल्यावर ते पिंपळाला प्रदक्षिणा घालत मागच्या बाजूला गेले . तिथे असलेल्या कठड्यावर हात ठेवून त्यांनी नर्मदा मातेला ओवाळले . तिच्याशी देखील दोन पाच मिनिटे त्यांनी संवाद साधला . त्यानंतर टांगलेल्या तुळशीच्या कुंडी पाशी गेले आणि तुळशीला ओवाळले . त्यानंतर हळूहळू आपल्या खोलीमध्ये गेले आणि पिंजऱ्यामध्ये शिरले . भक्तांनी पिंजरा आणि दार लावून घेतले . यानंतर मात्र ते रात्रभर खोलीमध्ये एकटेच असतात . त्यांच्याजवळ सेवेकरी म्हणून देखील कोणाला झोपायची परवानगी नाही . त्यांच्या काही भक्तांनी सांगितले की बाबा स्वतः हनुमंताचा अवतार असल्यामुळे रात्री हनुमंताच्या स्वरूपामध्ये झोपतात . तसे दर्शन देखील काही लोकांना झालेले आहे . परंतु प्रचंड थंडीमध्ये देखील बाबा कायम एकाच लंगोटीवर कसे काय राहू शकतात हे खरोखरच एक आश्चर्य आहे . त्यासाठी प्रचंड मनोनिग्रह पाहिजे . आणि देह बुद्धीचा संपूर्ण नाश झाल्याशिवाय हे शक्य नाही . माऊलींमुळे मला सियाराम बाबांच्या या अप्रतिम रूपाचे अप्रतिम असे दर्शन झाले त्यामुळे मी त्यांचे आभार मानले . अवधूत ने बाबांच्या सोबत मी बसलेलो असताना बरेच फोटो आणि व्हिडिओ काढले होते . परंतु परिक्रमा संपण्याच्यापूर्वीच त्याचा तो फोन पूर्णपणे फॉरमॅट झाला , असे नुकतेच त्याच्याशी बोलल्यावर कळाले . अन्यथा त्याच्या फोनवर त्याने काही अतिशय मौलिक क्षणांचे फोटो काढलेले होते . काही व्हिडिओ मात्र तो तिथूनच त्याच्या यूट्यूब चैनल वर अपलोड करत होता ते अजूनही उपलब्ध आहेत . सकाळी उठल्यावर सियाराम बाबा वरती स्नानासाठी जातात . त्यांच्या आश्रमाचे तीन मजले आहेत . अतिशय अरुंद अशा जिन्याने वर जावे लागते . सर्वप्रथम ते सर्वात वरच्या मजल्यावर जाऊन पक्षांना वगैरे खायला घालतात . मला तिथल्या सर्व ग्रामस्थांनी हे आधीच सांगून ठेवलेले असल्यामुळे मी आधीच वरती जाऊन बसलो होतो . ठरल्याप्रमाणे बाबा आले त्यांनी पक्षांना धान्य आणि माकडांसाठी बिस्किट वगैरे काढून ठेवली . तिथून खालच्या मजल्यावर आल्यावर अतिशय थंडगार अशा पाण्याचा एक हौद त्यांनी तयार केलेला आहे . त्यातल्या पाण्याने ते आंघोळ करतात . हे पाणी साचून राहिल्यामुळे अजूनच गार झालेले असते . बाबा चुकूनही गरम पाणी स्नानासाठी वापरत नाहीत . गावकऱ्यांनी खूप प्रयत्न करून पाहिले परंतु बाबा त्यांच्या कठोर तपाचरणामध्ये कुठलाही बदल करत नाहीत . यावर गावकऱ्यांनी जो उपाय शोधून काढला आहे तो ऐकल्यावर तुम्हाला लोकांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे ते लक्षात येईल ! बाबा पहिल्या मजल्यावर उघड्यावरती थंडगार पाण्याने अंघोळ करतात . त्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून काही तरुण गुपचूप एक प्रकार करतात . जसे बाबा वरती आंघोळीला गेले तसे खाली काही तरुणांनी लोखंडाच्या बादल्यांमध्ये भरपूर लाकडे पेटवून इमारतीच्या चारी बाजूने ठेवून दिली . त्याच्यामुळे त्या इमारतीच्या भोवतीची संपूर्ण हवा गरम झाली ! जरी बाबा गरम पाणी वापरत नसले तरी किमान गार हवा त्यांना बाधू नये इतकाच त्यामागचा हेतू ! गुरूभक्तीचे इतके अप्रतिम उदाहरण मी अन्यत्र कोठे पाहिले नाही ! बाबांचे स्नान झाल्यावर बाबांनी एका विशिष्ट पद्धतीने लंगोटी नेसली जी पद्धत मला कायमची स्मरणात राहिली . मी वेगळ्या पद्धतीने लंगोट नेसायचो . बाबांची पद्धत अधिक योग्य होती आणि त्यामध्ये त्यांनी मोकळ्या सोडलेल्या एका पदरा मुळे अधिक चांगल्या पद्धतीने लज्जा रक्षण होत असे . बाबांना भक्त किती मानतात हे इथे मला पाहायला मिळाले . बाबा जसजसे पुढे चालत निघाले तसेच अशी त्यांची ओली पावली मागे उठू लागली . काही तरुण भक्त त्या पावलांचे तीर्थ घेऊन चाटू लागले ! असे बाबा खाली उतरेपर्यंत अखंड चालू होते ! या प्रसंगाचा अवधूतने घेतलेला व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चैनल वर मला सापडला . अवधूत हा व्हिडिओ घेत असताना मी त्याच्या सोबतच चालत होतो . खाली आल्यावर बाबा जमलेल्या सर्व भक्तांसाठी स्वतः चहा बनवतात . तो प्रसंग देखील मी माझ्या डोळ्यांनी पाहिला ! कितीही भक्त आले तरी तो चहा बरोबर पुरतो असा सर्वांचा अनुभव आहे ! आणि तसेच झाले ! आता हा चहा पुरणार नाही असे वाटत असताना चहा पुरून उरला ! इतका उरला की आम्ही सर्वजण तीन तीन कप चहा पिलो ! बाबा शक्यतो एकदाच दहा रुपये कोणाकडून ही घेतात . परंतु मी मात्र पाच-सहा वेळा दर्शन घेतले आणि प्रत्येक वेळी त्यांना दहा दहा रुपये दिले . बाबांनी देखील ते घेतले . स्थानिक ग्रामस्थांनी मला सांगितले की हे अजून एक आश्चर्य आहे . कारण बाबा कधीच एका माणसाकडून पुन्हा दहा रुपये घेत नाहीत . या सर्व पैशाचे बाबा काय करतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल . तर बाबा प्रचंड दानधर्म करतात . इथे येणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद चहा नाश्ता वगैरे देण्याची व्यवस्था बाबां तर्फे असते . बर बाबा माणसी १० रुपयेच घेत असल्यामुळे जेवढे धन आले तेवढे संपूर्ण किंवा त्याहून जास्तीचा परतावा ते देतात . नुकत्याच बांधून झालेल्या राम मंदिरासाठी बाबांनी साडेचार कोटी रुपये दिले . या परिसरातील अन्य काही मंदिरांच्या बांधकामासाठी जेव्हा लोक देणगी मागायला येतात तेव्हा बाबा कोट्यावधीमध्ये दानधर्म करतात . 


दुर्दैवाने या युट्युब चॅनेल चा एक्सेस आता त्याच्याकडे नाही . परंतु तरीदेखील हे व्हिडिओ कायमचे अजरामर झालेले आहेत .



एकंदरीत श्री सियाराम बाबा यांच्या कृपेचा वर्षाव मला अनुभवता आला ही नर्मदा मातेची माझ्यावरील कृपा आहे . साधू बनून साधना करण्याची इच्छा बाळगणाऱ्या सर्व तरुणांना माझी नम्र विनंती आहे की एकदा श्री सियाराम बाबा यांच्या आश्रमामध्ये राहून त्यांचे जगणे , वागणे , चालणे ,बोलणे , खाणे , पिणे , वावरणे याचा अभ्यास करावा . आणि मग आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा . कारण साधू म्हणून जगणे ही सोपी गोष्ट नाही . प्रसिद्ध संत श्री गोंदवलेकर महाराज असे नेहमी सांगायचे की आयुष्यात काय वाटेल ते करा ,फक्त साधू बनू नका ! 
आता मी बाबांचे दर्शन घेऊन निघणार इतक्यात बाबांनी त्यांच्या शिष्यांना सूचना केली आणि माझाच्या दोन लिटरच्या तीन बाटल्या मला द्यायला सांगितले ! माझ्या अंगावर काटाच आला ! दोन लिटरच्या तीन बाटल्या म्हणजे सहा किलो वजन कोण बाळगणार ! परंतु बाबा सेवेदराला म्हणाले की अरे रिकाम्या तीन बाटल्या दे ! त्याने तीन बाटल्या बाबांच्या पुढे धरल्या बाबांनी त्या बाटल्यांना हात लावला आणि मग त्या बाटल्या त्याने मला दिल्या ! कल्पना करून पहा ! तीन प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या मला देऊन बाबांनी काय साध्य केले असेल !  त्याचे उत्तर मला लवकरच मिळाले ! संतांची कुठलीही कृती निरर्थक नसते . त्या बाटल्यांचा काय उपयोग झाला , त्यांनी काय पराक्रम गाजवला , ते पुढच्या लेखात पाहूया !  बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि दंड उचलला . नर्मदे हर ! परमहंस सच्चिदानंद श्री सियाराम बाबा महाराज की जय ! नर्मदे हर !



लेखांक त्र्याहत्तर समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर