लेखांक ४९ : कचरा प्रज्वलित करून केलेली मैय्याची आरती अन् कोठीया घाट चे फलाहारी जगजीवनदास महाराज

लिंगा घाट येथील आश्रम अगदी नर्मदेच्या किनारी आहे . सुख चैन नावाची नदी पार केली . नदी बऱ्यापैकी आटत आलेली होती . आश्रमाच्या सुबक ठेंगण्या महाद्वारापाशी आलो
 लिंगा घाटापूर्वीची चाल

लिंगा घाट मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर आहे .
लिंगा घाट आश्रमाचा परिसर
इथे एक विदेही बाबा अन्नक्षेत्र चालवितात . त्यांच्या शिष्याने आस्थेने मला बसवून घेतले आणि स्वयंपाकाला लागला . इतक्यात तिथे चार-पाच परिक्रमा वासी आले .याच्यामध्ये वापी इथला अवधूत फरले होता .ज्याने मगाशी माझा व्हिडिओ घेतला होता . त्याच्यासोबत बापू दादा आणि बंगाली बाबू असे तिघेजण होते . बापू म्हणजे गुजरात मधला एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता . दादा म्हणून एक आजोबा होते . आणि सात्यकी रॉय नावाचा एक गोड बंगाली मुलगा होता . हा वर वर पाहता अतिशय नम्र आणि गुणवान वाटायचा ! परंतु त्याच्यासोबत थोडा वेळ घालवल्यावर तो काय प्रकार आहे ते लक्षात यायचे . बंगालमध्ये सर्वत्र मुबलक आढळणाऱ्या डाव्या चळवळीचा प्रभाव याच्या मेंदूवर स्वाभाविकपणे होता . त्यामुळे तो परिक्रमेमध्ये असून देखील परिक्रमेमध्ये नव्हता . म्हणजे तो सर्व ठिकाणी जात होता . सर्व मार्ग चालत होता . परंतु परिक्रमेचे कुठलेही नियम पाळण्याची इच्छा त्याला नव्हती . त्यामुळे जिथे जाईल तिथे तो सर्वप्रथम त्याच्या वेशभूषेवरून साधूंच्या शिव्या खायचा ! त्यामुळे त्याच्या डाव्या मनावर अजूनच विपरीत परिणाम होत चालला होता . आणि तो अधिक कठोर वामपंथी बनत चालला होता ! अवधूची गोष्ट अजूनच निराळी होती . तो सरकारी नोकर होता . काही कारणामुळे नोकरीपासून त्याला थोड्या कालावधीसाठी दूर राहावे लागणार होते .स्पष्टच सांगायचे तर कारण नसताना त्याला बडतर्फ केले गेले होते . त्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तो परिक्रमेमध्ये आला होता . सुरुवातीला त्याला बडतर्फीचे थोडेसे वैषम्य वाटायचे . परंतु नंतर तो आपण होऊन म्हणायला लागला की जे होते ते चांगल्यासाठीच होते ! बापू अतिशय निष्ठावंत स्वयंसेवक होता . तो इतका भेळा भाबडा होता की त्याच्यासोबत दोन-तीन वामपंथी चालत आहेत हे देखील त्याला कळत नव्हते ! 
नोकरीवर असताना अवधूत फरले
याला मराठी , हिंदी , गुजराती , इंग्रजी या सर्व भाषा उत्तम येत होत्या .
अवधूत फरले हा रंगावधूत महाराजांच्या प्रसादाने झाला होता म्हणून याचे नाव अवधूत ठेवले होते . याच्या घरी नारेश्वर येथील रंग अवधूत महाराजांची भक्ती होती . 
शेर नदी पार करण्यासाठी नावेची वाट पाहत उभे असलेले डावीकडून बापू त्याच्यापुढे मागे कमंडलू लटकवलेले दादा आणि पुढे उभा असलेला अवधूत . अलिकडे ठेवलेली ,पावसापासून संरक्षण देणारे कवच घातलेली सात्यकीची चंदेरी झोळी . मी हीच नदी त्याच दिवशी गुडघाभर पाण्यातून पार गेली होती .
आपादमस्तक आधुनिक वेशातला परिक्रमावासी सात्यकी रॉय नॉडिया जिल्हा प. बंगाल.
पूर्ण परिक्रमा मार्गामध्ये कुठेही याच्या अंगाला माती लागायची नाही याचे मला आश्चर्यच वाटायचे !
साधू सोबत पोळ्या लाटताना सात्यकी . परिक्रमेमध्ये असे रंगीबेरंगी कपडे घालायला परवानगी नसते . शिलाई नसलेले कुठलेही पांढरे कापड गुंडाळायचे असते . 
आपल्या नम्रतेने आणि सुहास्य वदनाने सात्यकी रॉय सर्वांची मने जिंकून घ्यायचा ! तो कधीच कुठल्या गोष्टीला उघडपणे विरोध करायचा नाही !
 वापीचा परिक्रमा वासी अवधूत फरले . याने पुढे हांसोट , गुजराथ येथे अन्नक्षेत्र सुरू केले .
एका साधू कडून ज्ञान घेत बसलेले सात्यकी आणि अवधूत .

सात्यकी सुंदर बंगाली शाल होती . आणि काही अप्रतिम ढाका मलमलचे झब्बे होते . विदर्भात तर झब्ब्याला बंगाली असेच म्हणतात ,ते त्यामुळेच .
चांगल्या दर्जाची ट्रेकिंग सॅक ,उत्तम पैकी स्लीपिंग बॅग ,तिच्या खाली अंथरायला चांगल्या दर्जाचे स्लीपिंग मॅट ,हातामध्ये ट्रेकिंग स्टिक ,डोक्यावर तऱ्हे तऱ्हेच्या हॅट ,पाठीवरच्या सॅकला रेन कव्हर , अंगात उंची ढाका मलमल चे झब्बे , खांद्यावर टाकलेली उत्तम दर्जाची बंगाली शाल ,पायात सँडल्स असा त्याचा एकंदर वेश होता . त्यामुळे हा परिक्रमावासी अजिबात वाटत नसे . आणि मनाने तसा तो नव्हता देखील . त्याचे वर्णन त्याने असे केले होते . तो एक वाँडर्लस्ट अर्थात विमुक्त भटका होता ! तो जे करायचा त्याला इंग्रजीमध्ये हीच 
हायकिंग असा शब्द आहे . याचा अर्थ सोबत पैसे वगैरे न घेता , राहण्याची कुठे सोय होईल याची चिंता न करता , मिळेल त्या व्यक्तीला गाडीला लिफ्ट मागत पुढे पुढे प्रवास करायचा . थोडक्यात एक प्रकारची परिक्रमाच . परंतु या लोकांना कुठले बंधन नको असते . अगदी नैतिकतेची बंधने देखील हीच हायकर पाळताना दिसत नाहीत . उलट पक्षी असे म्हणायला वाव आहे की नैतिकतेच्या बंधनांची आवड नसलेली माणसेच या क्षेत्राकडे हळूहळू वळतात . त्यामुळे याच्यासोबत नर्मदा मैया याने घेतली नव्हती . त्यामुळे पूजा वगैरे करण्याचा प्रश्नच नव्हता . त्याने एक टोळी पकडली होती याचे एकमेव कारण , या टोळी सोबत राहिल्यावर भोजनाची व निवासाची सोय होते हे त्याच्या लक्षात आले होते ! तसाही तो एकटा फिरला असता तर उभ्या भारतात कधी उपाशी मरणार नाही ! कारण हे हिंदू राष्ट्र आहे ! परंतु हेच तो मान्य करत नव्हता . त्याचे असे म्हणणे होते की भारत सेक्युलर असल्यामुळेच आपल्याला सगळीकडे जेवण मिळते . त्याच्याशी मी यापैकी कुठल्याही मुद्द्यावर कधी जास्त चर्चा करायला गेलो नाही . कारण मी स्वतः कधीकाळी याच डाव्या विचारांचा पाईक असल्यामुळे त्यातल्या सर्व खाचाखोचा , बारकावे मला माहिती आहेत ! परंतु इतक्या कोवळ्या वयातील एका तरुणाचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून जे काही योग्य वाटायचे ते मात्र त्याला अवश्य सांगायचो . म्हणजे मी ठरवून असे काही केले नाही परंतु इथून पुढे काही दिवस अधून मधून हा मला सतत भेटत राहिला . आणि त्याला परिक्रमेविषयी बरेच काही मी सांगू शकलो .त्याचा काही उपयोग होणार नाही हे मला माहिती होते . परंतु मला इतकेच समाधान की मी मला जे योग्य माहिती होते ते त्याला सांगितले .  वेळोवेळी सांगितले . याच्याकडे असलेल्या मोबाईल वरून हा अतिशय सुंदर फोटो काढायचा . आणि त्याच्या फेसबुक वर टाकत राहायचा . तो साधू जीवनाचे बारकावे , धर्मक्षेत्रातील वातावरण याचा बारकाईने अभ्यास करत होता . नियम पाळण्याच्या बाबतीत मात्र याचा शिल्लक राहिलेला अहं आडवा यायचा ! असो . तर मी झाड लोट करून जेवायला बसलो तेव्हा हे सर्वजण आले . परंतु साधूने आधीच अंदाजाने जास्तीचा स्वयंपाक करून ठेवला होता . ही बुद्धी , प्रेरणा त्यांना मैया देत असते . इथे खूप छान भोजन मिळाले . गुळ , मुळा, बुंदी ,शेव , पुरी ,भाजी ,खिचडी असा सुंदर बेत होता . जेवताना माझी आणि सात्यकीची चांगली गट्टी जमली . मला बंगाली येते आहे हे कळल्यामुळे तो खूपच खुश झाला . विशेषतः रवींद्र संगीता मधली गाणी मी त्याला म्हणून दाखवल्यावर तर तो वेडाच झाला ! मी त्यांच्या कळपामध्ये सामील व्हावे अशी त्याची इच्छा होती . परंतु मी एकटा शिकारीवर निघालो आहे हे त्याला सांगितले ! मला खरोखरच शिकार करायची होती ! माझी स्वतःची शिकार ! सतत मध्ये येणाऱ्या मी मी या कधी बृहद तर कधी सूक्ष्म अहंकाराची शिकार !  माझ्या षडविकारांची शिकार ! आणि ही शिकार करताना मला मध्ये कोणाचा अडथळा नको होता ! परंतु पुढे अनेक वेळा आमची भेट मात्र होत राहिली . त्याचे या तिघा चौघांपैकी कोणाशी वैचारिक जुळण्याचे तसे काही कारणच नव्हते . कारण अवधूत हा भक्ती संप्रदायात होता . बापू तर पूर्णवेळ स्वयंसेवकच ! आणि दादा सर्वातून निवृत्त ! अवधूत च्या पायाची अवस्था अतिशय वाईट झाली होती . चप्पल चावल्यामुळे त्याच्या पायाला मोठ्या जखमा झाल्या होत्या . तो बिचारा तसाच चालत होता . त्याने कुबेर भंडारी इथून परिक्रमा उचलली होती . मध्ये अध्ये त्याला ही माणसे भेटत गेली . बऱ्याच परिक्रमावासींचे अगदी असेच होते . त्यांना माणसांचा आधार फार सोयीचा आणि अत्यावश्यक वाटत असतो . त्यामुळे आपल्या वैचारिक किंवा भावनिक पातळीवर नसलेल्या अशा कुठल्याही , केवळ तुमच्या समान गतीने चालणाऱ्या माणसांबरोबर ते गट करून चालू लागतात . चालण्याची समान गती हे एकमेव सूत्र अशा गटांना बांधून ठेवत असते . मी बरेचदा पाहिले की एका उंचीचे , एकसारखी चण असणारे परिक्रमा वासी एकत्र चालतात . कारण पायाची लांबी जितकी अधिक तितकी चालण्याला गती अधिक असते . त्यामुळे असे अधिक गती वाले पुढे निघून जातात . हा गट साधारण माझ्या शारीरिक उंचीचा असल्यामुळे मला बरेचदा भेटत राहिला . परंतु मी सुरुवातीलाच सर्वांना सांगत असे की मी एकटा चालतो आहे आणि एकटाच चालणार आहे . आणि या विनंतीचा मान सर्वजण परिक्रमेमध्ये राखतात . मी आलो तेव्हा विदेही बाबा झोपलेले होते . परंतु निघताना मात्र ते जागे झाले होते आणि बाहेरच्या कट्ट्यावर उन्हात येऊन बसले होते . तेजस्वी सावळा वर्ण , अस्ताव्यस्त विस्कटलेले केस आणि अवधूत अवस्था . जाताना सर्वांना बाबा मला काहीतरी द्या ! मला काहीतरी देऊन जा ! असे मागू लागले . चौघांनी तिथून हळूहळू काढता पाय घेतला . वरवर पाहता बाबा वेडसर आहे असे कोणालाही वाटू शकते . परंतु हे विदेही अवस्थेतील संतांचे मुख्य लक्षण असते . विदेही म्हणजे देहाचे भान न उरलेला संत . अक्कलकोट स्वामी ,गजानन महाराज , शंकर महाराज , येहळेगावचे तुकामाई हे सर्व विदेही संत होत .मी माझे सामान काढून त्यात किती पैसे आहेत पाहून ते सर्व गोळा केले आणि बाबांना दिले . इतक्यात मागच्या गावामध्ये कोणीतरी मला चांदीचे कोटिंग असलेले खजूर इथे पाकिटात मिळतात त्याचे पाकीट दिले होते . ते पाकीटही त्यांनी मागितले ! मी लगेच त्यांना देऊन टाकले . न रहावून लहान मुले जसे लगेच खाऊन बघतात तसे त्यांनी खजूर खाल्ले आणि त्यांना ते खूप आवडले ! बाबा माझ्यावर खूप खुश झाले ! आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिला .
( ता . क . : या आश्रमातील काही छायाचित्रे नुकतीच मला प्राप्त झाली . ती वाचकांच्या अवलोकनासाठी खाली जोडत आहे . )
मेकलसुता धाम लिंगा घाट येथील विदेही महात्मा साधूं सोबत प्रस्तुत लेखक
जाताना सर्वांना आशीर्वाद देणारे विदेही साधू महाराज
लिंगाघाट आश्रमामध्ये भोजन प्रसादीचा आस्वाद घेताना प्रस्तुत लेखक . सात्यकी रॉय ने काढलेले चित्र . मागे पाठमोरे साधु महाराज प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत जाताना दिसत आहेत .

आश्रमातून बाहेर पडताना बाबांच्या शिष्याने माझ्या वहीत हा शिक्का दिला . 
इथून बाहेर आलो तर हे चौघे अजून एका शेतामध्ये उभे राहून समोरचे दृश्य चित्रित करत होते . 
मी आलो तेव्हा हाच फोटो काढण्याचे काम सात्यकी करत होता .
साधारण या शेताचा हा फोटो आहे . तुम्हाला सतत उपग्रह छायाचित्र यासाठी दाखवत आहे ज्यामुळे तुम्हाला नक्की परिक्रमा मार्ग कसा आहे याची अचूक माहिती मिळावी . तसेच सर्वसामान्य छायाचित्रातून प्रत्यक्षात मार्ग कसा आहे त्याचे आकलन होते आहेच .
इथून पुढे काही काळ हे चौघे माझ्या मागेपुढे होते . त्या काळात ते सतत थांबून फोटो काढायचे . खूप वेगाने चालायचे आणि पुढे सावली बघून खाली बसायचे . चौघांपैकी एकालाही बसायची इच्छा झाली की बाकीच्या चौघांनाही बसावे लागायचे . मी एका संथ परंतु नियमित गतीने चालत राहिलो . त्यामुळे मला बरेचदा वाटेत हे लोक भेटत राहिले .
परंतु यांनी काढलेली चित्रे खरोखरच खूप सुंदर होती . त्यातील काही खास आपल्यासाठी देत आहे ज्यामुळे मी कुठल्या मार्गाने चाललो तुमच्या लक्षात यावे . 
याच्याही खाली अगदी काठावरून जाणारी एक कोळ्यांची पायवाट असते ती मी शक्यतो वापरायचो . त्यामुळे बूट चिखलाने माखून लवकर खराब व्हायचे . आत्ताही माझे बूट पार फाटले होते . तसाच खरडत खरडत मी चालत होतो . पादत्राणे  तुटली की त्याचा चालण्याच्या गतीवर निश्चित परिणाम होतो .
घगरोला , पिठेरा कापत कोठीया गावात आलो . आणि समोरचे दृश्य पाहून हबकलोच ! इथे वाळूचा प्रचंड मोठा किनारा नर्मदेला लाभलेला होता .
वाळूच्या वीस फुटी ढिगावर एक भव्य यज्ञ मंडप होता आणि जिथवर नजर जाईल तिथवर कचराच कचरा पसरलेला होता ! प्लास्टिकचे कप ,प्लास्टिकचे ग्लास , प्लास्टिकचे द्रोण , प्लास्टीकच्या पत्रावळ्या , थर्माकोलची ताटे सर्वत्र वाऱ्याने उडत होती . आज बिछुआ घाटापर्यंत पोहोचावे असा माझा मानस होता . परंतु हा कचरा पाहून इथेच थांबायचा निर्णय मी तत्काळ घेतला . माझ्या परीने जमेल तितका कचरा गोळा करून टाकावा असे मी ठरवले . सुदैवाने या अतिशय लांबरुंद वाळूच्या किनाऱ्याला लागूनच अखेरीस एक मारुती मंदिर होते . मी ताबडतोब तिथे गेलो आणि साधूची परवानगी घेऊन आसन लावले . चित्रकूट मधील एक साधू या आश्रमाची व्यवस्था बघत असे . 
कोठीया गावाला लाभलेला वाळूचा भव्य किनारा . आणि राम जानकी मंदिरासमोरील हनुमान मंदिरात आमचा मुक्काम होता .इथून एक दीड किलोमीटर अंतरावर ब्रह्मदेव आश्रम होता .
मी लगेच उठलो आजूबाजूला पडलेल्या काड्या काटक्यांचा एक झाडू बनवला आणि दिसेल तो कचरा झाडून एकत्र करायला सुरुवात केली . इथे पुढे एक आश्रम होता ज्याला ब्रह्मदेव आश्रम असे नाव होते . तिथे आज मोठ्या यज्ञाचे आयोजन केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चालत येत होते . नर्मदा जयंतीच्या निमित्ताने झालेला हा कचरा सर्वजण पाहत  . परंतु त्यांना याची सवय असावी . त्यांना सवय नव्हती ती झाडू मारणाऱ्या परिक्रमा वाशिला पाहण्याची . त्यामुळे जाता येता सर्व ग्रामस्थ माझ्याकडे पाहून हसत होते . मी मात्र अतिशय शांतचित्ताने माझे कार्य चालू ठेवले . माझ्या डोक्यामध्ये संताप संताप झाला होता . आपण ज्या नदीला आईचा दर्जा देतो तिच्या कुशीमध्ये आपण इतकी घाण कशी काय करू शकतो ? आपण खरोखरच तिला आई मानतो का ? जर आई म्हणत असू तर इतकी घाण खरोखर करू का ? 
मी कचऱ्याचे साधारण ३० - ३० फुटावर एक याप्रमाणे ढीग लावायला सुरुवात केली .  वाऱ्यामुळे कचरा उडून नर्मदेमध्ये जात होता त्यामुळे मला त्वरा करणे आवश्यक होते . इतक्यात माझ्या या कामाचे चित्रीकरण करत अवधूत तिथे आला . तो यूट्युबर व्हीलॉगर या नात्याने मला प्रश्न वगैरे विचारू लागला . "इस कच रे को हटाने के लिए क्या करना चाहिए ? " मी सांगितले तो मोबाईल ताबडतोब पेटवून टाकून प्रथम मदत केली पाहिजे ! त्यालाही लक्षात आले आणि ताबडतोब तोही माझ्या कार्यामध्ये सामील झाला . आमचे बघून एकदोन ग्रामस्थ कचरा झाडू लागले .  बंगाली आणि बापू या दोघांना अवधूत ने खूप वेळा आवाज दिला पण ते काही आले नाहीत . बघता बघता कचऱ्याचे साधारण २०० ते २५० ढीग तयार झाले . अवधूतने एकीकडून ते पेटवून देण्यास सुरुवात केली . मगाशी मला झाडू मारताना बघून हसणारे गावकरी यज्ञातील प्रसाद घेऊन पुन्हा आपल्या गावी निघाले होते . मी अजूनही झाडू मारतो आहे हे पाहिल्यावर त्यांना काय लाज वाटली कोणास ठाऊक ! त्यांनी देखील मोठ्या संख्येने आमच्या सोबत झाडू मारायला सुरुवात केली . बघता बघता त्या सफाई कार्याला एका जन चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले . आणि बघता बघता संपूर्ण घाट स्वच्छ होऊन गेला .
समर्थ रामदास स्वामी म्हणतात
वन्ही तो चेतवावा रे । चेतविताची चेततो ।
प्रयत्नु जाणिजे तैसा । वाढविताची वाढतो ।।
त्याची अनुभूती इथे मला आली . त्यांच्यातील एक जण माझ्याकडे आला आणि माझी क्षमा मागितली . म्हणाला बाबाजी आम्हाला माफ करा . आज तुम्ही विश्रांती घ्या उद्या आम्ही उरलेली स्वच्छता पूर्ण करतो . आता अंधार पडत आहे . तुम्हाला नर्मदेची आरती करायची असेल .ब्रह्मदेव आश्रमातील हवन देखील बघायचे असेल . मी त्याला म्हणालो , " हे पहा देवा , नर्मदेची आरती करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचे आहे नर्मदेला स्वच्छ राखणे ! ज्या आराध्य दैवताची आरती आपण करतो ,आधी त्याला ताम्हणामध्ये घेऊन स्वच्छ करतो ना ! आणि आरती करण्याकरता काय पाहिजे ? नर्मदा माता पाहिजे आणि कोटी रतन ज्योती पाहिजेत ! मग आज हे सर्व ढिगारे ह्याच माझ्या वाती ! आणि माझ्या मनात नर्मदेला स्वच्छ करण्यासाठी निर्माण झालेली तळमळ , आर्तता हीच माझी आरती ! आणि हेच आपले हवन ! आज या हवनामध्ये आपण कचऱ्याची आहुती देऊन टाकू ! चला आपण सर्वजण आज अशी वेगळी आरती करूया ! जगावेगळे हवन करूया ! " आणि मी खरोखरीच कचरा पेटवता पेटवता नर्मदेची आरती म्हणून घेतली . कारण आजच्या आज हा कचरा पेटवणे आवश्यक होते . नाहीतर उद्या तो पुन्हा सर्वत्र पसरला असता . इतके वारे रात्रभर वाहते .ते दृश्य मोठे अद्भुत होते . सुमारे अडीचशे कचऱ्याचे ढिगारे एकाच वेळी पेटलेले आहेत आणि समोर नर्मदा माता वाहते आहे . आणि आम्ही सर्वजण मोठ्या आवाजात तिची आरती करत आहोत ! 
या निमित्ताने मी सर्वच वाचकांना एक गोष्ट सांगू इच्छितो . आपण पर्यावरणापासून जितके दूर जात आहोत तितकी आपल्या आयुष्यातली दुःखे आपण वाढवून घेत आहोत . याचा प्रत्यक्ष परिणाम दिसला नाही तरी अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनावर हे सर्व घटक परिणाम करत असतात . प्लास्टिक मुळे सर्वच घटकांचे प्रदूषण होते . कृपा करून सिंगल युज प्लास्टिक पासून स्वतःला परावृत्त करा . नर्मदे काठी मी प्रत्येक गावामध्ये हा संदेश देत देतच पुढे गेलो . थर्माकोल आणि प्लास्टिक पासून बनविलेल्या ताटल्या , वाट्या , पेले इत्यादी पर्यावरणाचे शत्रू आहेत . पुढील हजारो वर्षे प्लास्टिक जमिनीमध्ये पाण्यामध्ये चिखलामध्ये जिथे कुठे असेल तिथे आहे तसेच राहते . आपल्याला वाटते नदीने कचरा वाहून नेला . परंतु जिथे जिथे नदीचा प्रवाह अडवला जातो उदाहरणार्थ धरणे , तिथे कित्येक किलोमीटर या प्लास्टिकचा अतिप्रचंड ढिगारा साठलेला आहे . मी माझ्या ह्याच डोळ्यांनी हे दृश्य पाहिलेले आहे .  हे दृश्य मोठे हृदयद्रावक आणि विदारक आहे . 
हे आहेत नर्मदेचे ,पर्यावरणाचे शत्रू .
हे आहेत पर्यावरणाचे मित्र . यासाठी केरळ पर्यंत जाण्याची गरज नाही . 
आजकाल सर्वत्र सुपारीच्या पानाच्या पत्रावळ्या किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मिळतात त्या तेंदुपत्त्याच्या पत्रावळ्या किंवा पळसाच्या द्रोण ,पत्रावळ्या हे अप्रतिम पर्याय उपलब्ध आहेत . त्यांचा वापर आवर्जून करा .
अशा पद्धतीच्या पत्रावळींचे निसर्गामध्ये काही आठवड्यातच विघटन होऊन जाते आणि पुन्हा खतात रूपांतर होते . जनावरे या पत्रावळी खाऊन टाकतात . व त्याचे पचन होते . प्लास्टिकच्या पत्रावळी खाऊन अनेक गाई गुरे प्राणाला मुकतात .
या पापात आपण भागीदार होऊ नका .
चार पैसे अधिक गेले तर जाऊ देत . परंतु पर्यावरण पूरक साहित्याचाच वापर करा . आपल्या उत्सवाचा भुर्दंड धरणीमातेला आणि नदीला देऊ नका .
पूर्णपणे अंधार पडल्यावर मी पुन्हा आश्रमामध्ये आलो . साधु महाराज निवांत बसले होते . त्यांनी स्वयंपाकाची काही तयारी केलेली दिसत नव्हती . ते मला म्हणाले , " इथे पुढे ब्रह्मदेव आश्रम म्हणून एक आश्रम आहे . तिथे यज्ञ सुरू आहे त्याचे दर्शन घेऊन या . निवांत रात्री उशिरा आलात तरी चालणार आहे . काही गडबड नाही ." त्यांचा इशारा माझ्या लक्षात आला . याचा अर्थ आज भोजन प्रसाद तिकडेच घ्यावा लागणार असा होता . मी विचारले बाबाजी तुमच्यासाठी भोजनप्रसाद घेऊन येऊ का ? ते म्हणाले की  नको . दुपारचे थोडे अन्न शिल्लक आहे . ते खाऊन मी झोपतो . " ठीक आहे . जशी तुमची इच्छा ." असे म्हणून मी सर्वांना निरोप सांगितला आणि आम्ही सर्वचजण तिकडे निघालो . जाता जाता आकाश खूप सुंदर दिसत होते . त्यातील माझ्या ओळखीचे आकाश सर्वांना सांगत आश्रमा पर्यंत आलो . डावीकडे एका टेकाडवर हा आश्रम आहे .  आश्रमामध्ये बरीच गर्दी होती . गेल्या गेल्या आम्हाला शेणाने सारवलेल्या सुंदर मांडवामध्ये बसवले गेले . लगेच भोजन प्रसाद वाढला गेला . भोजन प्रसादी झाल्यावर आम्ही आश्रमामध्ये गेलो . इथे परिक्रमेमध्ये असताना एक साधू आले ज्यांनी या क्षेत्राचा कायापालट केला . फलाहारी जगजीवनदास महाराज असे त्यांचे नाव . या टेकडी वजा आश्रमामध्ये त्यांनी २७ फूट खोल खाली ध्यान गुंफा बांधलेली आहे व त्यात साधना केली आहे . वरती अनेक मंदिरे बांधलेली आहेत . गेली २५ वर्षे यज्ञ सुरू आहे . बाबांना भेटण्यासाठी बरीच मंडळी येऊन बसली होती . बाबा एका छोट्याशा मंदिरासमोर धुनी पेटवत बसले होते . बाबा तेजस्वी आणि लाघवी स्वभावाचे होते . त्यांच्याकडे एक दुर्लभ सौंदर्यदृष्टी होती . शक्यतो साधू त्यांच्या जटा कुठेही कशाही टाकतात परंतु हे मात्र अतिशय व्यवस्थित डोक्यावर गुंडाळून ठेवत होते . यांच्या दाढीच्या देखील कित्येक फोटो लांब जटा झाल्या होत्या त्या देखील त्यांनी सुंदर पद्धतीने गाठ मारून ठेवल्या होत्या . रात्री उशिरापर्यंत स्वामीजी आमच्याशी गप्पा मारत बसले . ते अतिशय तेजस्वी आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे होते . दुर्दैवाने त्यांचे सध्या जे फोटो मला इंटरनेटवर मिळाले त्याच्यामध्ये त्यांची प्रकृती बरीच खालावलेली दिसते आहे . याचा अर्थ दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृती ठीक नसणार असे दिसते . 
वाचकांना महाराजांचे दर्शन घडावे म्हणून काही चित्रे सोबत देत आहे .
ब्रह्मदेव आश्रमाच्या दारात उभी कपिला गाय आणि स्वामी जगजीवन दास महाराज
महाराजांना टोपी खूप आवडते आणि ते स्वतः अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित राहतात . 
त्यांच्याभोवती सतत भक्तांचा विशेषतः तरुणांचा गराडा पडलेला असतो .
आश्रमातील एक सेवेकरी परिक्रमेसाठी निघाला तेव्हा त्याच्या हस्ते कन्या पूजन झाले .त्यानंतर आशीर्वाद देणाऱ्या कन्या . (सर्व चित्रे संग्रहित आहेत )
महाराजांच्या जटा खूप मोठ्या आहेत . त्यांना अन्य साधू खूप मानतात . त्यांच्या वाणीचा अधिकार मोठा आहे .
साधना काळामध्ये ते केवळ फळे खाऊन राहायचे म्हणून त्यांचे नाव फलाहारी बाबा पडले . त्या काळामध्ये महापूर येऊन  आश्रमाच्या चहुबाजूने नर्मदा वाहू लागली आणि हे बेट ही बुडणार अशी परिस्थिती निर्माण झाली तरी त्यांनी बेट काही सोडले नाही व त्यामुळे तो महापूर ओसरला अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे .
महाराजांचे अनेक चमत्कार भक्तमंडळी आम्हाला सांगत होती . एकदा त्यांनी डिझेलच नसलेली बोलेरो गाडी शेकडो किलोमीटर चालवत आणली होती . 

मी निघताना त्यांना नमस्कार केला आणि म्हणालो की माझी नर्मदा परिक्रमा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद द्या स्वामी . त्यावर त्यांनी मला सांगितले , " एक बात हमेशा याद रखना प्रभु । नर्मदा परिक्रमा कभी पूर्ण नही होती । यह अविरत परिक्रमा है । पूर्ण होनीही नही चाहिये । पुरा ब्रम्हांड परिक्रमा कर रहा है । अविरत परिक्रमा कर रहा है । इलेक्ट्रॉन अणु केंद्र की परिक्रमा कर रहा है । नदी का जल समुद्र में ,समुद्र का जल बादल में और बादल का जल वापस नदी मे ,ऐसी जल की भी परीक्रमा चल रही है । हम उस नदी की परिक्रमा कर रहे है । चंद्रमा पृथ्वी की परिक्रमा कर रहा है । पृथ्वी सूर्य की परिक्रमा कर रही है । सूर्य भगवान आकाशगंगा की परिक्रमा कर रहे है । पुरा विश्व किसी ना किसी बात की परिक्रमा मे व्यग्र है । परिक्रमा ही इस विश्व का सार है । परिक्रमा है तो सबकुछ है । परिक्रमा नही तो कुछ भी नही । " 
त्यांच्या या उद्बोधनाने माझे डोळे कायमचे उघडले . तिथून पुढे मी कधी कोणाला माझी परिक्रमा पूर्ण होऊ दे असा आशीर्वाद मागितला नाही . अविरत परिक्रमा हेच जीवनाचे सार आहे ! बाबांचा आश्रम सोडायची इच्छा होत नव्हती . बाबा म्हणाले तुम्हाला आवडले तर आमच्या आश्रमात येऊन राहा . तिकडे तशी पण फारशी सेवा होणार नाही . परंतु हे योग्य ठरले नसते त्यामुळे मी पुन्हा हनुमान मंदिराकडे निघालो . जवळजवळ असलेल्या आश्रमांमध्ये समन्वय असणे फार गरजेचे आहे . त्यांचे वर्तन स्वतंत्र साम्राज्यांसारखे असू नये .ते धर्माच्या वाढीसाठी फारसे हिताचे नाही . असो .
रात्री जगजीवन दास महाराजांनी सांगितलेल्या गोष्टींचे चिंतन करत झोपी गेलो . जागृती आणि निद्रा ही देखील एक अविरत परिक्रमा आपण आयुष्यभर करतो . सकाळी उठल्यावर चित्रकूट वाल्या बाबांनी चहाला बोलावले . त्यांनी देखील खूप छान उपदेश केला . हे बाबा कट्टर मोदी भक्त होते . साधूं मध्ये देखील मोदी भक्त आणि मोदीविरोधी असे प्रवाह मला आढळले . विशेषतः मध्य प्रदेश मध्ये आणि गुजरात मध्ये काँग्रेसचे शासन बराच काळ राहिले होते . त्या काळात ज्यांच्या आश्रमांना देणग्या वगैरे मिळाल्या ते लोक शक्यतो उघडपणे मोदींचा प्रचार प्रसार करत नाहीत असे मला जाणवले .  बाबांनी जाताना माझे फाटलेले बूट पाहिले . आणि त्यांच्याकडे पडून असलेला नवीन बुटाचा जोड त्यांनी मला दिला . माझे जुने बूट ज्या स्थानिक कंपनीचे होते त्याच स्थानिक कंपनीचा हा नवीन बूट होता . हा "वॉकिंग बूट " असल्यामुळे मऊ व पायासाठी फारच आरामदायक होता . साधूचे आभार मानून मी पुढे निघालो . अशा पद्धतीने दुसरा बूट माझी साथ पंधराच दिवस देऊ शकला . त्याचे आभार मानून तिसरा बूट स्वीकारला . आज परिक्रमेच्या चाळीसाव्या दिवशी माझ्या पायात तिसरा बूट होता . या नवीन बुटामुळे माझ्या पायांना पुन्हा गती आली . 
चित्रकूट वाल्या बाबांनी कोठीया या गावात दिलेला हाच तो तिसरा बूट . 
आज पुन्हा नर्मदा मातेचा काठ धरून चालत राहिलो . इथे नर्मदेचे पात्र दोन्ही बाजूने समान शेती असलेले आहे . इथे मी एक विचित्र घटना अनुभवली . कदाचित नर्मदा माता माझी परीक्षा घेत असावी . बिछुआ घाटासमोरुन मी चाललो असताना पलीकडच्या ताटावर एक माणूस त्याच्यासोबत एक स्त्री आणि लहान मुलगी असे चाललेले मला दिसले . माणूस त्या स्त्रीला आणि लहान मुलीला काठीने बेदम चोपत घेऊन निघाला होता .ती छोटी मुलगी अतिशय उच्चारवाने बचाव बचाव असे ओरडत होती . ती घटना पाहून माझे डोके पुन्हा एकदा फिरले . मी या बाजूने त्या माणसाला आवाज देऊ लागलो . अरे नालायका ! हिम्मत असेल तर मला मारून दाखव ! स्त्रियांवर काय हात उचलतोस ! माझा आवाज ऐकून तो माझ्याशी तिकडून बोलू लागला . मला शिव्या घालू लागला . आणि म्हणू लागला जा जा ! आपल्या वाटेने निघून जा ! आणि पुन्हा त्या दोघींना बेदम चोपू लागला . तो काठीने इतक्या निर्दयपणे मारत होता की या काठावर देखील त्या मारण्याचा आवाज येत होता . त्या दोघींचे आक्रोश मला सहन होईनात . मी त्याला शेवटची चेतावणी दिली . आणि त्याला सांगितले की आता जर तू थांबला नाहीस तर तू गेलास ! त्याने पुन्हा एकदा मला आई वरून शिव्या घातल्या . आणि मारहाण चालू ठेवली .मी त्याला म्हणालो तुला नर्मदा मातेची शपथ आहे .तर त्याने नर्मदा मातेला देखील शिव्या घातल्या . हळूहळू तो पुढे निघून गेला .नर्मदा मातेला शिव्या घातलेल्या ऐकल्यावर माझा संयम संपला.आता मात्र मी ठरवले की परिक्रमा पुन्हा कधीतरी पूर्ण करू . आज याला चांगला धडा शिकवायचा ! मी माझा दंड ,कमंडलु , दप्तर फेकून दिले आणि नर्मदे हर अशी आर्त आरोळी देत पळतच नर्मदेमध्ये उडी मारू लागलो . पोहत पलीकडे जायचे आणि त्याला त्याच्याच काठीने बेदम मारायचे असे मी ठरवले होते . इतक्यात मला पलीकडून आवाज आला नर्मदे हर ! समोरच्या तटावरच मागून पाच परिक्रमावासी येत आहेत असे मला दिसले .मी लगेच ओरडून त्यांना सांगितले की पुढे असा असा एक मनुष्य मारहाण करत आहे .त्याला चांगला धडा शिकवा . चार तरुण आणि एक म्हातारा असे पाच जण होते . तरुणांनी पळतच जाऊन त्या माणसाला धरला . आणि त्याला नुसती समज देऊ लागले . मी इकडून ओरडून सांगितले . त्याला नुसती समज देऊ नका .बेदम चोप द्या . कारण तो नर्मदा मातेला शिव्या घालतो आहे . हे ऐकल्यावर मात्र मागून पळत येऊन म्हाताऱ्याने त्याच्या डोक्यातच काठी घातली ! पाचही जणांनी त्यांच्या काठ्यानी त्याला मरेस्तोवर चोप दिला . तो इतका रगेल होता की मार खाताना देखील शिव्या घालत होता . त्या बाईने आणि मुलीने समोरच्या तटावरूनच मला हात जोडून नमस्कार केला . शेवटी तो माणूस गयावया करू लागला . त्याला नर्मदा मातेची क्षमा मागायला लावा असे मी ओरडून सांगितले . आणि मग मी पुढे निघून गेलो . अशाप्रकारे माझी परिक्रमा खंडित होता होता वाचली .ते पाच परिक्रमावासी आले नसते तर मी नक्की पलीकडच्या तटावर पोहत जायचे ठरवले होते . कृष्णा नदी एका दमात पोहत पार करून पुन्हा माई घाटावर परत पोहत यायचा सराव मला लहानपणापासून आहे . हे पात्र तेवढ्याच मापाचे होते . त्यामुळे कदाचित जमले असते . 
माझ्या नित्य सरावातील कृष्णामातेच्या पात्राची रुंदी
साधारण तेवढयाच रुंदीचे बिछुवा येथील नर्मदा पात्र
जरा पुढे गेल्यावर मला एक नावाडी दिसला . त्याला देखील मी सांगितले की जाऊन त्या माणसाला चोप द्यायची व्यवस्था करा . त्याने फोनवरून त्या गावातील नावाडी लोकांना काठावर बोलावले . मी त्या नावाड्याला सांगितले की पुढे तो ज्या गावात जाईल तिथे त्याला शिक्षा मिळेल अशी व्यवस्था करा . त्याला देखील हा विचार पटला . नर्मदे हर !  करून मी पुढे निघालो . इथे नर्मदा मातेच्या कृपेने मला एक सूत्र लक्षात आले . की समविचारी लोक सगळीकडे उपस्थित असतील तर प्रत्येक ठिकाणीअन्यायाचा प्रतिकार करायला तुम्हाला जायची गरज नाही . तुमच्यासारखाच विचार करणारे लोक सर्वत्र असले की तो प्रतिकार तुम्ही केल्यासारखेच आहे . त्यामुळे आपण स्वतः सर्वत्र पोहोचून कार्य करण्यापेक्षा आपले विचार सर्वत्र पोहोचवणे तितकेच महत्त्वाचे आहे . मी एक परिक्रमावासी असल्यामुळे मला त्या अमुक अमुक घटनेचा राग आला . परंतु समोर देखील परिक्रमावासी उपस्थित असल्यामुळे त्याला प्रत्युत्तर लगेच देता आले . तिथे अन्य कोणी असते तर कदाचित माझ्यासारखी प्रतिक्रिया त्यांनी दिली नसती . किंवा माझे ऐकले सुद्धा नसते . केवळ एक परिक्रमावासी सांगतो आहे ,एवढेच लक्षात घेऊन , माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांनी पुढील कार्यवाही केली . ही किती मोठी गोष्ट आहे पहा ! संघटनेचे हे फार मोठे सूत्र आहे . समर्थ रामदास स्वामी म्हणतात , 
महंते महंत करावे । युक्ती बुद्धीने भरावे । जाणते करून विखरावे ।नाना देशी विदेशी ॥
आपण अवचिते मरोनी जावे । मग भजन कोणी करावे ।या कारणे भजनास लावावे । कित्येक लोक ॥
आपल्या समविचारी लोकांची संख्या वाढविणे हे फार महत्त्वाचे आहे . आणि आपल्या विचारांना एक प्रतिष्ठा असणे देखील आवश्यक आहे .एक परिक्रमावासी आपल्याला सांगत आहे हे तो नावाडी पाहत होता . त्यामुळेच त्या कोळी बांधवाने देखील माझ्या शब्दाखातर त्याच्या बांधवांना फोन करून पुढे त्या नराधमाला पकडण्याची फिल्डिंग लावली . असो . पुढे मी कीरखेडा गावामध्ये गौ घाटावर स्नान करून गुजराती बाबाच्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी साठी गेलो . येथे सर्वत्र सुंदर खडे ,खोटे मिळतात . ते पहात पहात चालताना भान हरपून जाते . इथे मला एक हिरव्या रंगाचे स्फटिका सारखे पारदर्शक शिवलिंग मिळाले . गंमत म्हणजे याला डोळे नाक तोंड असे स्पष्ट दिसत होते ! बॅटरीच्या उजेडा मध्ये खूप अद्भुत चमकायचे ते!
पिठोरा गावानजिक एक सुंदर झरा होता . त्याचे पाणी आकंठ प्यायलो . ते इतके गोड होते की पोट भरले तरी मन भरत नव्हते ! पोट फुगेपर्यंत पाणी प्यायलो आणि एका लाकडी ओंडक्या वरून तो ओहोळ पार केला . एक स्थानिक ग्रामस्थ इथे भेटला त्याने माझा फोटो काढला . मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
 पिठोरा गावां नजिक स्वच्छ पाण्याचा ओढा ,लाकडी ओंडक्यावरून पार करताना प्रस्तुत लेखक . असे लाकडी पुल नर्मदे काठी शेकडोंनी आहेत .
नर्मदे काठी असे स्वच्छ पाण्याचे झरे देखील अक्षरशः हजारोनी आहेत . ते जलस्रोत तसेच स्वच्छ ठेवणे हे आपले फार मोठे राष्ट्रीय कर्तव्य आहे .
नर्मदेमध्ये गाड्या धुणे वगैरे गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत . नर्मदा म्हणजे कुठलीही नदी . कुठलाही जलस्त्रोत . 
 नदी , नाले , झरे यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते याचे भान आपण ठेवले पाहिजे . इथे गाड्या धुणे अत्यंत चुकीचे आहे . त्यातून तेलाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तवंग नदीमध्ये पसरतो . जो मासे व अन्य जलसजीवांसाठी अत्यंत घातक आहे . शिवाय थेट नदीचे पाणी पिणाऱ्या माझ्यासारख्या लोकांच्या पोटात ही त्याचा अंश जातो . असो .
टिटव्यांची पिले आता अंड्यातून बाहेर पडू लागली होती . त्यांची तुरुतुरु हालचाल बघताना फार मजा यायची ! ती चालताना फार मजेशीर आवाज काढतात . त्यांच्याजवळ आपण गेलो की टिटवी हमखास आपल्या अंगावर हल्ला करते . उलट मी माझ्या मार्गाने शांतपणे चाललेलो असताना अचानक टिटवीने हल्ला केला रे केला की मी लगेच आजूबाजूला कुठे त्यांचे घरटे किंवा अंडी किंवा पिले आहेत काय हे शोधायला लागायचो . आणि हमखास पिले सापडायची ! 
 टिटवीची गोंडस पिले
यांची आणि गहू खाणाऱ्या छोट्या पक्ष्यांची मजा पाहत चालताना आनंद मिळत होता . सुगरण ,चंडोल, चिमण्या, धान वटवटे , मुनिया इत्यादी जातींचे पक्षी धान्यासोबतच पिकावरील छोट्या आळ्या , किडे आणि गवताच्या बिया प्रामुख्याने खातात . त्यामुळे तण व कीड  देखील नियंत्रित राहते .ते शेतकऱ्याचे एक प्रकारे मित्रच आहेत .  आज विविध जातींची बदके देखील दिसू लागली होती . पक्षी निरीक्षण ,निसर्ग वाचन या माझ्या आवडत्या गोष्टी असल्यामुळे त्याच्या नोंदी देखील वहीमध्ये येतात .सर्वसामान्य वाचकांना कदाचित त्यातून काही लाभ होणार नाही , परंतु पक्षी अभ्यासकांसाठी या नोंदी महत्त्वाच्या आहेत .असो .
थरैरी नावाच्या गावामध्ये नर्मदा आणि लेंडी या नद्यांचा संगम होतो . ही नदी मी चालतच पार केली .इथून पुढे हळूहळू नद्यांचे पाणी आटत जाते . 
नर्मदा लेंडी संगम . हिलाच लेहरा किंवा एरंडी अशी सुद्धा नावे आहेत .स्थानिक लोक मात्र लेंडी म्हणतात .
इथे काठावर एक राज राजेश्वरी मंदिर होते . वाटेतील सर्व मंदिरांमधील देवतांचे दर्शन घेऊन पुढे जाणे हे परिक्रमेतील विहित कर्तव्य आहे .बरेचदा शहरातून आलेले परिक्रमावासी यात टाळाटाळ करतात . त्यांना पुढे जाण्याची मरणाची घाई असते ! त्यांचे सतत चला पुढे !चला पुढे !  सुरू असते . पुढे जायचे म्हणजे कुठे जायचे हे लक्षात आले पाहिजे . पुढे कुठे जायचे आणि कशासाठी जायचे हे ज्याला कळले तो खरा ! जग पुढे जात आहे म्हणून आपणही पुढे जाणे असेच काहीसे सर्वत्र सुरू आहे . 
श्री राजराजेश्वरी मंदिर आणि मंदिरातील विग्रह
 थरैरी गावातील एक मंदिर
 थोडेसे पुढे आल्यावर गुजराती बाबांचा आश्रम होता . तिथे भोजन प्रसाद मिळेल असे मला काठावर सांगण्यात आले होते .
 इकडे आश्रमामध्ये गुजराती बाबा गुजरातला गेले होते . गावातील तरुणांनी येऊन स्वयंपाक करण्यात तीन तास लावले . त्यामध्ये बराच वेळ गेला . तीन तास म्हणजे सुमारे १५ किलोमीटर ते बारा किलोमीटर अंतर . परंतु जे भोजन केले ते इतके अप्रतिम होते व एवढ्या प्रेमाने वाढले की बस !   उत्कृष्ट बासमती भात होता .नेहमीपेक्षा तिप्पट जेवलो इतका आग्रह करून वाढले जात होते .
गुजराती बाबांना या भागातील लोक खूप मानतात
गुजराती बाबांचा आश्रम
आश्रमामध्ये वाढणारे गुजराती बाबा (संग्रहित छायाचित्र ) मागे आश्रमातील तरुण सेवेकरी .
 येथे एक बिहारी ब्रह्मचारी आपल्या सतरा वर्षीय कस्तुरी नामक चेहऱ्याला सोबत घेऊन परिक्रमेला आला होता .  याचे एक वैशिष्ट्य होते . हा फार मोठ्या मोठ्या गप्पा करायचा . वेद , वेदांत ,अद्वैत सिद्धांत यावर मोठ्या मोठ्या लंब्या चौड्या बाता मारायचा . एक प्रकारे तो खरोखर साधू जीवन जगत देखील होता . पायात चप्पल नव्हत्या. अनवाणी चालायचा . अगदी माझ्यासारखेच छाटी हे वस्त्र गुंडाळून घालायचा . पण हे सर्व ज्ञान गांजा मिळेपर्यंत ! एकदा का गांजा मिळाला की हा भाऊ वितळला ! याने मला माझ्या कपड्यांवरून फार सुनावले . मी सुद्धा वेडा बनून पेढा खाण्यात तज्ञ आहे . त्याला वाटले मी चिडून काहीतरी उलट बोलेन . परंतु मी त्याला शरण गेलो आहे असे दाखवल्यावर मग तो फुल सुटला ! काय वाटेल ते ज्ञान मला देऊ लागला ! त्याला असे वाटले की चला आपल्याला एक नवीन शिष्य मिळाला . याला किती ज्ञान देऊ आणि किती नाही ! थोड्याच वेळापूर्वी साधूचे कपडे गृहस्थी माणसाने घालू नयेत वगैरे सांगणारा हा मनुष्य आता मात्र माझ्या अवताराचे कौतुक करू लागला ! मुळात परिक्रमेचा नियम , माझी सोय आणि माझी सवय या तीन गोष्टींमुळे मी हा वेश धारण केलेला होता ,हे मागे एका स्वतंत्र प्रकरणात सांगितलेले आहेच . मला अधिक चिंता लागली होती ती त्या साधूसोबत असलेल्या छोट्या मुलाची . इतरांशी बोलताना अवाजवी कृत्रिम आर्जवी भाषेमध्ये बोलणारा हा बाबा त्या चेल्यावर मात्र वसा वसा खेकसायचा . त्याने थोडक्यात स्वतःचे सामान उचलण्यासाठी आणि हरकाम्या म्हणून या कस्तुरी नामक मुलाला सोबत घेतले होते .तो त्याच्याकडून हात पाय डोकं चेपून घेत असे .
अखेरीस न राहवून मी त्याला तंबाखू आणि गांजा वरून फुल झापला . त्याला लागलेल्या व्यसनांना तो आध्यात्मिक मुलामा देऊ पहात होता . व्यसनाधीन माणसाचे एक वैशिष्ट्य असते .त्याचे म्हणणे योग्य आहे हे सांगण्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊन प्रतिवाद करू शकतात . तो म्हणायचा हे सर्व केल्याशिवाय परिक्रमा करता येणे शक्य नाही . मग मी त्याला म्हणायचो अरे मग माझे काय सुरू आहे ? मी सुद्धा परिक्रमा करतोच आहे ना ? मी करतो आहे म्हणजे नर्मदा मैया आपल्याला करवते आहे ! मग मला कसे बरे चालता येते व्यसन केल्याशिवाय ? तुला असे काय वेगळे दिलेले आहे की ज्यामुळे तुला व्यसन करणे आवश्यक आहे ? उलट मी तर अशा काही भयानक मार्गानी आलो आहे की जिथून व्यसनी माणूस जाऊ पण शकत नाही ! परंतु हा बाबा काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता . त्याला सुधारणे अशक्यच होते . माझा प्रयत्न चालला होता त्या सतरा वर्षाच्या मुलाला याच्या तावडीतून सोडविण्यासाठी . याच्या सततच्या आरड्या ओरड्यामुळे आणि धाक दपटशाहीमुळे तो बिचारा कोमेजून गेला होता . त्या मुलाची या बाबाच्या तावडीतून लवकरात लवकर सुटका करणे अतिशय आवश्यक होते . असल्या दांभिक गुरूकडून लाभ होण्याऐवजी नुकसानच अधिक ! असो . आज चालण्यातली मजाच निघून गेली होती . एकतर इथे तीन तास थांबलो होतो आणि पोटाला तडस लागेपर्यंत जेवलो होतो ! त्यामुळे रिछावर पर्यंत पोहोचता येणे अशक्य होते . इथे ककरा घाट नावाचा एक घाट आणि पूल लागतो .  
ककरा घाट पूल .ओशो रजनीश यांची जन्मभूमी गाडरवाडा इथे हा पुल जातो .
 ककरा घाट
इथून पुढे गेल्यावर एक मोठा जल उपसा प्रकल्प आहे . एनटीपीसी पंप हाऊस ककरा घाट
नर्मदेवर या काठापासून त्या काठापर्यंत एक जाडजूड मोठी काँक्रीटची भिंत बांधलेली असून त्याच्यावरून वाहणारे नर्मदा जल खूपच सुंदर दिसते . 
या प्रकल्पामुळे तुम्हाला नर्मदेचा किनारा काही काळ सोडावा लागतो . इथे पंप हाऊसला लागून मागे , एका तरुण देवी उपासक साधकाने स्वतःचा मोठा ती मजली आश्रम उभा केलेला आहे .
 पितांबरी देवी आश्रम ककरा  घाट .
रात्री आश्रम असा दिसतो .
ककरा घाटावरील दीपोत्सव
लाल वस्त्रे परिधान करून बसलेला देवी उपासक तरुण साधू
या साधूची अनेक तरुण शिष्य मंडळी सतत त्याच्या आजूबाजूला असायची . मी याच्या आश्रमासमोरून निघालो होतो इतक्यात मला एका शिष्याने आवाज देऊन आत मध्ये बोलवले . खरंतर आवाज मला दिला होता परंतु माझ्या मागून येणारा बिहारी आणि त्याचा चेला हे दोघे देखील आत येऊन बसले . बिहारी थेट आत मध्ये निघाला होता . मी अंगणामध्ये बसलो .साधू बिहाऱ्याला बाहेर घेऊन आला . इथे त्यांनी अतिशय सुंदर असा फळांचा रस , भरपूर फळे आणि अल्पोपाहार आम्हाला दिला .  गरम गरम मसाला दूध देखील दिले . साधू तेजस्वी होता . मितभाषी होता . आणि शिष्यांवर त्याचा चांगला पगडा होता . तुम्हाला अजून काय हवे वगैरे त्याने मला विचारले . मला काहीच नको होते .
उलट मीच त्याला मला सापडलेली काही शिवलिंगं दिली . तो म्हणाला मी देवी उपासक आहे . मला या शिवलिंगांचा काय उपयोग आणि त्याने ती शिष्यांना माझ्यासमोर वाटून टाकली . इतक्यात मला आठवले की मला एक वेगळेच स्फटिकाचे शिवलिंग सापडलेले आहे .  ते मी त्याला दाखवले .ते पाहता क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि त्याचा आनंद गगनात मावेना ! तो म्हणाला अरे हा तर माझ्या पितांबरी देवीचा तांदळा आहे ! हा अतिशय दुर्मिळ असतो ! तुला कसा काय मिळाला ?  मी म्हणालो , कदाचित तुला देण्याकरता नर्मदेने मला दिला असेल .ठेव तुलाच ! साधूला फार आनंद झाला . तो अजून बऱ्याच गोष्टी देऊ करत होता परंतु मी काहीही न घेता तिथून निघालो . बिहारी आणि चेला तिथेच मुक्काम करायच्या तयारीला लागले होते . परंतु त्यांना त्या साधूने अक्षरशः घालवून दिले . मी स्वतः पाहिले . साधूंना माणसाची खूप चांगली पारख असते हे मी वेळोवेळी अनुभवले आहे . निघताना एका शिष्याने आमचे एकत्र फोटो काढले आणि माझा क्रमांक मागू लागला . माझ्याकडे फोन नाही सांगितल्यावर त्याने मी सांगितलेल्या मित्राच्या क्रमांकावर सारे फोटो पाठवून दिले .
राकेश शर्मा या पितांबरी देवी उपासक साधू सोबत प्रस्तुत लेखक 
या साधू मुळे मला पितांबरी देवी विषयी अधिक माहिती कळली . पितांबरी या प्रसिद्ध पावडर ब्राण्डचे नाव देखील याच देवीवरून ठेवलेले आहे .  त्यामुळे आजपासून मी नवीन घोषवाक्य डोक्यात ठेवले !
नर्मदेच्या किनारी , कृपा करी पितांबरी !



लेखांक एकोणपन्नास समाप्त (क्रमशः )

मागील लेखांक

पुढील लेखांक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर