लेखांक ३० : नर्मदा खंडातील एक अतुलनीय संत श्री रामदास बाबा
रामदास बाबांनी पुन्हा काही त्या साधूचा विषय काढला नाही . यावरून त्यांच्यासाठी असे चमत्कार नित्याचेच होते हे लक्षात आले ,किंवा अशा चमत्कारांना साधकाने फारसे महत्त्व देऊ नये असा त्यांचा भाव असावा . तो मी पक्का आत्मसात करण्याचा निश्चय केला . आता या रामदास महाराजांविषयी तुम्हाला थोडेसे सांगावेच लागेल . संपूर्ण परिक्रमेमध्ये मला जे कोणी सर्वाधिक तपस्वी अद्भुत आणि अलौकिक महात्मे भेटले त्यातील सर्वोच्च क्रमांक रामदास महाराजांचा असायला हरकत नाही . ( ती माझी योग्यता किंवा लायकी खचितच नाही ,परंतु भौतिक पातळीवर हा प्रश्न अनेकांनी मला विचारला आहे म्हणून सांगतो आहे की किमान मला आलेल्या अनुभूतींच्या पातळीवर मला जाणवलेली क्रमवारी अशी आहे ) परमपूज्य श्री सियाराम बाबा तर सर्वांना ज्ञात आहेतच व त्यांचे मला आलेले अनुभव पुढे ओघाने सांगेनच . परंतु त्यांचा आश्रम तुलनेने सहजगम्य आहे .रामदास बाबांना भेटण्यासाठी तुम्हाला तुमचा जीव धोक्यात घालून प्रवास केल्याशिवाय दर्शन शक्य नाही . इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असून देखील रामदास बाबांनी आपले तपोसामर्थ्य असे काही वाढविलेले आहे की त्याच्या अनुभूती तुम्हाला पदोपदी येऊ लागतात . मूळच्या नागपूर प्रांतातील छिंदवाडा गावातील हा एका पाटलाचा मुलगा . शिवराम पाटील असे त्यांचे मूळ नाव .शिक्षण इयत्ता नववी पास . ग्राम सावजपाणी पोस्ट कोंढार तहसील पांडुरना जिल्हा छिंदवाडा राज्य मध्य प्रदेश . ही माहिती स्वतः बाबांनी मला दिलेली आहे व मी लगेचच माझ्या वहीत उतरवून घेतलेली आहे त्यामुळे अतिशय विश्वसनीय मानावी .
आत्ता थोडा तपास केल्यावर असे लक्षात आले की नागपूर पासून अतिशय जवळ असे हे गाव आहे . आधुनिक भारतीय सीमारेषा नुसार हे मध्य प्रदेश मध्ये मोडते परंतु याचा जास्त संपर्क महाराष्ट्राशीच आहे . महाराष्ट्रातील नारखेड किंवा वरुड किंवा सावनेर इथून ते जवळ पडणारे गाव आहे . शालेय शिक्षणामध्ये महाराजांना उत्तम गती होती परंतु गावामध्ये एक हनुमान मंदिर आहे ( जे समर्थ रामदास स्वामी स्थापित असण्याची शक्यता आहे असा माझा कयास आहे कारण रामदास बाबांच्या जीवनावर समर्थ रामदासांच्या जीवनाचा खूप प्रभाव दिसतो ) तिथे बसून बाल शिवराम तासंतास साधना करीत असे . ज्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी बालवयामध्येच रामरायाला भेटण्याकरता आपले सर्वस्व सोडून तीर्थयात्रेला निघाले तसेच आपणही निघून जावे असा विचार करून एक दिवस शिवरामने सर्व काही सोडून दिले आणि तीर्थयात्रेला प्रारंभ केला . समर्थांनी नारायण हे नाव त्यागले आणि रामदास हे नाव धारण केले त्याप्रमाणे यांनी देखील शिवराम या नावाचा त्याग करून रामदास हेच नाव धारण केले . दोघांच्या जीवनामध्ये अनेक साम्य स्थळे आढळतात . १९८० साली महाराजांनी नर्मदा परिक्रमा चालू केली . या परिक्रमेदरम्यान फिरत फिरत ते अमरकंटक क्षेत्रामध्ये आले . आणि या क्षेत्राने त्यांना मोहिनी घातली . तसे भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर महाराजांचे गाव साधारण याच टापूमधील जंगलामध्ये आहे . परंतु मध्ये इतके घनदाट अरण्य आहे की जाण्यासाठी मार्ग नाही . परंतु हवामान ,जीवनमान , तापमान ,वातावरण वगैरे सर्वसाधारण सारखेच आहे .इथे जंगलामध्ये कुठेतरी कुटी करून राहावे असे त्यांनी ठरविले . तब्बल १२० दिवस महाराज या जंगलामध्ये केवळ नर्मदेचे जल पिऊन व्रतस्थ पणे राहिले . या दरम्यान त्यांना एक आदिवासी तरुण भेटला . रयतवाड किंवा रैतवाड या गावातील हा आदिवासी तरुण या भागातील अरण्याचा जाणकार होता . त्याने महाराजांची महती ओळखली आणि त्यांना नर्मदेच्या काठी राहण्यायोग्य एक जागा त्याने सुचवली व तिथे तो त्यांना घेऊन आला . महाराजांना देखील ते रम्य स्थान पसंत पडले व इथेच त्यांनी छोटीशी कुटी बांधली . ही जागा होती पंचधारा . आणि या माणसाचे नाव होते प्रेमसिंह परस्ते ! होय बरोबर ओळखलेत ! माझ्यावरती खेकसणारा परस्ते तो हा प्रेम सिंह परस्तेच ! लॉक डाऊन मुळे सुमारे दोन-तीन वर्षे महाराजांचे दर्शन झाले नाही म्हणून तो त्यांना खास भेटण्याकरता जंगलातील वाटा तुडवत चालत आला होता. आणि माझे भाग्य किती थोर पहा नेमका त्याच दिवशी मी तिथे पोहोचलो ! त्यामुळे गेल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सहवासातील त्या दोघांच्या अद्भुतरम्य भयचकीत करणाऱ्या आठवणींच्या गप्पा ऐकणे इतकेच काम मला उरले ! मी मनोमन ठरविले की आपण फक्त ऐकायचे ! मध्ये काहीही बोलायचं नाही ! आणि अक्षरशः माझे कान तृप्त झाले इतक्या अद्भुत आठवणी मला त्या दोघांच्या संवादातून पुढे ऐकायला मिळाल्या ! असो .
महाराजांनी इथे जी छोटीशी कुटी बांधली होती तिचे नाव ज्ञानेश्वरी कुटी असे ठेवले . पुढे वन खात्याने आदेश काढला की अमरकंटकच्या जंगलात कोणीही कुटी बनवू शकणार नाही जो आजही लागू आहे , तेव्हापासून महाराज उघड्यावरतीच राहतात ,उघड्यावरतीच झोपतात , उघड्यावरतीच बसतात आणि सर्व काही उघड्यावरतीच सुरू आहे .त्यांची बसण्याची जागा नर्मदेच्या इतक्या काठावर आहे की चुकून ही तोल गेलाच तर ते थेट नर्मदा जलामध्येच पडतील :आजही या मार्गाने फारसे कोणी जात नाही . पूर्वी तर या मार्गाने जाणाऱ्या परिक्रमा वाशींची संख्या अक्षरशः नगण्य होती . त्यामुळे इथे महाराजांना अपेक्षित असलेला एकांत आणि नर्मदा मातेचा संग पुरेपूर लाभला . धिप्पाड देह ,खणखणीत आवाज , सुस्पष्ट वाणी ,गोड हसरा चेहरा ,गोरा वर्ण ,अस्ताव्यस्त पसरलेले केस आणि संपूर्ण जंगलात घुमणारे गडगडाटी निखळ शुद्ध हास्य ! महाराजांबद्दल किती सांगू आणि किती नाही असे मला झालेले आहे !
महाराज साधनेच्या काळामध्ये अगदी १२० दिवसांपर्यंत नर्मदा जलावर जगलेले आहेत . एरव्ही ते सहा सहा लिटर दूध आरामात फस्त करत असत ! परिक्रमा मार्गातील सर्वच लोक आणि संत त्यांना खूप मानतात कारण ते ज्या घनदाट अरण्यात ज्या पद्धतीने एकटेच उघड्यावर राहतात हे काही सोपे काम नाही .
इथे राहू लागल्यावर महाराजांना नर्मदेचे अनेक अनुभव येऊ लागले . महाराज सांगतात की नर्मदा मातेनेच मला सर्व काही शिकवले . आता हे वाक्य ऐकायला फार साधे सोपी सरळ वाटते . परंतु नर्मदा मातेने महाराजांना काय काय शिकवले आहे याचे पुरावे तुम्ही पाहिलेत तर आपली मती गुंग होऊन जाते ! मुळात मला स्वतःला भाषा या विषयाची अत्यंत आवड आहे त्यामुळे महाराजांनी सांगितलेल्या एका मुद्द्याचा मी चांगलाच काथ्याकूट त्यांचे समक्षच करून घेतला ! नर्मदा मातेने महाराजांना ५६ भाषा शिकविली ! ५६ भाषा शिकविल्या नाही ५६ भाषा शिकविली ! आता याचा अर्थ नक्की काय ? मराठी संस्कृत हिंदी इंग्रजी तमिळ तेलगू अशा भाषा ? महाराजांनी मला सांगितले की ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी या भाषेचा वापर केलेला आहे . आणि याचा उल्लेख संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी माऊलींवर केलेल्या एका अभंगामध्ये केलेला आहे . नामदेव महाराज म्हणतात
ज्ञानराज माझी योग्याची माउली ।
जेणें निगमवल्ली प्रगट केली. ॥१॥
अध्यात्मविद्येचें दाखविलें रूप ।
चैतन्याचा दीप उजळीला. ॥२॥
गीता आळंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंद लहरी हेलावली. ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवीं नाव उभारिली. ॥४॥
श्रवणाचे मिसें बैसावें येवोनी ।
साम्राज्य भोगोनी सुखी असा. ॥५॥
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ।
येक तरी वोवी अनुभवावी ॥६॥
जेणें निगमवल्ली प्रगट केली. ॥१॥
अध्यात्मविद्येचें दाखविलें रूप ।
चैतन्याचा दीप उजळीला. ॥२॥
गीता आळंकार नाम ज्ञानेश्वरी ।
ब्रह्मानंद लहरी हेलावली. ॥३॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव ।
भवार्णवीं नाव उभारिली. ॥४॥
श्रवणाचे मिसें बैसावें येवोनी ।
साम्राज्य भोगोनी सुखी असा. ॥५॥
नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी ।
येक तरी वोवी अनुभवावी ॥६॥
५६ भाषेचा केलासे गौरव । भवार्णवी नाव उभारली ॥
या ओळीच्या संदर्भात बोलताना काही विद्वानांचे असे मत आहे की ज्ञानेश्वरी मध्ये ५६ विविध भाषांमधील शब्द आलेले आहेत . त्याची एक मोठी यादी देखील विद्वानांकडून सादर केली जाते . ती देखील आपल्या माहिती करता सोबत देत आहे .
1) अंग
2) वंग 3) कलिंग 4) कांबोज 5) काश्मिरी 6) सौबीर 7) सौराष्ट्र 8 ) मागध 9) मालव 10) महाराष्ट्र 11) नेपाळ 12) केरळ 13) चोळ14) पांचाळ 15) गौड 16) मल्लाळ 17)सिंह 18) वड्य 19) द्रविड 20) कर्नाटक 21) मरहट 22) पानाट 23) पांडित्य 24) पुलिंद 25) आंध्र 26) कनोज 27) यावन 28) जलांध 29) शलभ 30) सिंधू 31) अवंती 32) कन्नड 33) हूण 34) दाशार्ण 35) भोजकोट 36) गांधार 37) विदर्भ 38) बाल्हिक 39) गज्जर 40) बर्बर 41) कैकेय 42) कोशल 43) कुंतल 44) शूरसेन 45) टंकण 46) कोंकण 47) मत्स्य 48) मद्र 49) रौंधव 50) पाराशर्य 51) गुर्जर 52) खरच 53) भूवक्र 54) झल्लक 55) प्राग्जोतिष 56)कराहट.
परंतु महाराजांना या ५६ भाषा येतात असा त्याचा अर्थ आहे का ? महाराजांना या सर्व शंका मी उघडपणे विचारून घेतल्या . ज्या व्यक्तीला ज्ञान मिळवायचे आहे त्यांनी मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता सर्व प्रश्न एखाद्या लहान बालकाच्या सरलतेने , सहजतेने विचारले पाहिजेत . महाराज माझ्या या प्रश्नाने खूप खुश झाले आणि मला सांगू लागले की त्यांनी देखील हाच प्रश्न नर्मदा मातेला विचारला होता .हे नर्मदे या जगामध्ये एकूण भाषा तरी किती आहेत ते मला कृपा करून सांग . नर्मदा माता त्यांना म्हणाली मी तुला केवळ त्या भाषांची नावे च सांगत नाही तर त्या सर्व भाषा मी तुला शिकवते ! आणि साक्षात नर्मदा मातेने रामदास बाबांना ५००० भाषा शिकविल्या ! हा आकडा ऐकून मी अवाकच झालो ! माझी अवस्था महाराजांनी ओळखली आणि मला म्हणाले जा त्या कुटीमध्ये जा आणि अमुक अमुक वह्या घेऊन ये .मी जाड जूड वह्यांची बाडे घेऊन महाराजांच्या पुढे येऊन हात जोडून बसलो . महाराजांनी मला एक एक पान उलटायला सांगितले . रामदास बाबांनी या वह्यांमध्ये ज्ञानेश्वरी हा शब्द ५००० विविध भाषांमध्ये लिहिलेला होता . मला यातील ज्या भाषा येत आहेत त्या तपासून पहाव्यात असे मी ठरविले . संस्कृत , मराठी , हिंदी , इंग्रजी , फ्रेंच , तमिळ , तेलगू, कन्नड , बंगाली ,गुजराती इतक्या भाषांमध्ये तरी महाराजांनी अतिशय अचूक ज्ञानेश्वरी हा शब्द लिहिला होता ! तसेच सुरुवातीला त्या भाषेचे नाव देखील महाराजांनी लिहिलेले होते . समजा एखाद्याने या गोष्टीवर अविश्वास दाखवायचे ठरविले आणि अशी कल्पना केली की महाराजांना त्या त्या भाषा बोलणारे परिक्रमावासी आल्यावर त्यांनी त्यांच्याकडून हा शब्द शिकून घेतला , तर मग चायनीज , जापनीज , स्वाहिली ,अरेबिक , पर्शियन , नॉर्डीक , जर्मन , डच इत्यादी भाषांचे काय करायचे ? कारण महाराजांनी जगभरातील सर्व च भाषांमध्ये ज्ञानेश्वरी हा शब्द लिहिला होता ! त्यांनी नर्मदे हर हा शब्द देखील अनेक भाषांमध्ये लिहून काढला होता . याचा अर्थ त्यांना हे ज्ञान थेट नर्मदा मातेकडून प्राप्त झाले होते हे स्पष्टपणे दिसत होते ! मी उत्कंठा म्हणून सर्व भाषांची नावे वाचून काढली . याच्यामध्ये पृथ्वीची भाषा ,नदीची भाषा , वाऱ्याची भाषा , पक्षांची भाषा अशा भाषा देखील होत्या ! याबाबतीत माझे कुतूहल जागृत झाल्यामुळे मी महाराजांना अधिक शंका विचारू लागलो ! मी त्यांना विचारले मग नर्मदा माता तुमच्याशी कुठल्या भाषेमध्ये बोलते ? त्यांनी सांगितले की नदीची एक स्वतःची भाषा असते . आपण जर शांत चित्ताने बसून तिच्याशी एकरूप झालो तर ती काय बोलते आहे हे आपल्याला कळू लागते . आता तू अमरकंटक वरून निघाला आहेस आणि जंगलातून येतो आहेस हे मला नर्मदेने आधीच सांगून ठेवले होते ! मध्ये तू वाट देखील भटकलास ! तू तिला चार दोन शिव्या देखील हासडल्यास असे तिने मला सांगितले . आता मात्र माझ्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या . कारण मी नर्मदेला खरोखरीच दोन-चार ठेवणीतल्या हासडल्या होत्या .आणि हे माझ्या खेरीज कोणाला माहिती असण्याची शक्यताच नव्हती .जरी कुणी भेटले असते तरी मी आपण होऊन थोडी सांगणार होतो की मी काय काय म्हणालो नर्मदेला ते ! जंगलामध्ये भटकताना जेव्हा मला मार्ग सापडेनासा झाला आणि नर्मदेचा आर्त धावा करून देखील कुठलाच मार्ग दिसेना तेव्हा मी मोठ्या त्वेषाने म्हणालो होतो , " *****, ****** तुझ्या किनाऱ्यावरचा सोपा मार्ग दाखवत नाहीस तर मग बोलवतेस कशाला परिक्रमेला !" आणि त्यानंतरच मला शंकर साधू भेटला होता . महाराजांनी मला जवळ घेत डोळे पुसले . म्हणाले ," आपल्या आईशी असे कधी बोलू नये . ती आपली आई आहे . आई जशी मुलाला घडवण्यासाठी कधी कधी मुद्दाम संकटात टाकते आणि दुरून गंमत पाहत राहते तसे नर्मदामाता करत राहते .वेळ आल्यावर बरोबर ती संकटातून मुलाला बाहेर काढत असते . आपण यासाठी तिला बोल नाही लावू ! मला माहिती आहे पुन्हा तुम्ही असे काही करणार नाही ! " आपल्या दुष्कृत्याचा मला अतोनात पश्चात्ताप झाला . पूर्व संस्कार काही केल्या जात नाहीत हेच खरे .पुढे महाराज सांगू लागले , " मला वाऱ्याची भाषा देखील कळते . वारा देखील जाता जाता आपल्याला बरेच काही सांगून जातो . पशु पक्षांना या सर्व भाषा कळत असतात . वाऱ्याची , पाण्याची , ढगांची ,आभाळाची अशा सर्व गोष्टी मिळून एक भाषा तयार होते जिचे नाव आहे ५६ भाषा . " मी मन लावून ऐकत होतो . महाराज एका वेगळ्या भावा विश्वामध्ये पोहोचल्यासारखे वाटत होते . " वारा मला सांगतो आहे की वाघाने नुकतेच दोन गाई आणि एक बैल मारून खाल्ले आहेत . " बापरे ! हे देखील विश्वासार्ह होते कारण दोनच दिवसांपूर्वी मी समोरच्या किनाऱ्यावर रामकुटी मध्ये असताना वाटेत लोक या घटनेची चर्चा करत होते . "इतके बारकावे समजतात का बाबा या भाषेतले ? " महाराज पुन्हा सांगू लागले , "आपल्या बोलीभाषेला मर्यादा आहेत परंतु ५६ भाषा ही अमर्याद आहे ! तुम्ही मला सांगा समोरासमोर दोन मोठे सेनासागर उभे आहेत युद्धाला तोंड फुटलेले आहे आणि अशावेळी श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करत आहेत . इतका वेळ तरी असेल का त्या दोघांजवळ ? त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला जो बोध केला तो एका क्षणात त्याला प्राप्त झाला आहे आणि तोच या ५६ भाषेचा गौरव आहे ! तुमच्या आधुनिक कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये अपलोड डाऊनलोड असे काहीतरी म्हणतात बघा तशी ही भाषा आहे ! ती या हृदयातून त्या हृदयामध्ये थेट अपलोड होते ! तुम्ही उपदेश ऐकायला बसलात की तो थेट डाऊनलोड होतो ! " आधुनिक शब्द वापरून सांगितल्यामुळे मला चटकन महाराजांना काय म्हणायचे आहे ते लक्षात आले . महाराज पुढे सांगू लागले , " अहो ज्ञानेश्वर माऊली साक्षात ज्ञानाचा सागर आहे ! त्यांचे वर्णन करण्याचा ज्यांच्या वाणीचा अधिकार ते नामदेव महाराज , त्यांच्याकडून लिखाणामध्ये कधी चूक होईल का ? छपन्न भाषेचा केला से गौरव असे म्हणायचे ऐवजी त्यांनी छपन्न भाषांचा केलासे गौरव असे म्हणायला पाहिजे होते ना ! परंतु त्यांना ५६ वेगळ्या वेगळ्या भाषा अपेक्षितच नाहीत तर ५६ भाषा नावाच्या या एका भाषेबद्दल ते बोलत आहेत . ती एकदा ज्याला आली त्याला जगातील सर्व भाषा कळू लागतात . समोरचा काय बोलला त्याचा आशय आपोआप मनामध्ये उतरतो . आणि नामदेव महाराज म्हणतात की भवसागरातून ,भावार्णवातून तरुन जाण्यासाठी तुमची नाव म्हणजे ही छप्पन भाषा आहे ! जिचा वापर करून श्रीकृष्णाने तिला धन्य करून टाकले व तीच भाषा ओळखून माऊलींनी आम्हाला धन्य केले . " महाराजांचे हे सर्व ज्ञान मी तहानलेल्या चातकासारखे टिपून घेत होतो . त्यांचे प्रत्येक वाक्य ब्रह्म वाक्य होते !
वाचकांना त्यांचा आश्रम कसा होता याची कल्पना यावी म्हणून आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे करतो आहे . कृपया मी जसा तिथे रमलो तसे आपण सर्वांनी ही रममाण होऊन जावे ! न जाणो कोणे एके क्षणी अचानक ५६ भाषा आपल्यालाही प्राप्त होऊन जाईल !
उभी वाहणारी काळसर रेषा म्हणजे नर्मदा आहे .
मी स्वतः गुगल स्थानीय मार्गदर्शक अर्थात लोकल गाईड लेवल १० पार केलेली असून देखील हा आश्रम येथे ( गूगल मॅपवर ) जोडण्याचे धाडस करत नाही कारण त्याची जागा प्रत्यक्षातच काय उपग्रह छायाचित्रांमधून शोधता येणे देखील अशक्य आहे . (मी हे वाक्य लिहीत असताना जगामध्ये ही पातळी पार केलेले फक्त एक हजार पंचवीस लोक आहेत आणि भारतामध्ये पन्नास लोकल गाईड . असो ) चुकून जरी एखादा मनुष्य गुगल मॅप लावून तिथे पोहोचायचा प्रयत्न करेल आणि जंगलामध्ये भटकेल तर त्याला परत जिवंत शोधता येणे अवघड आहे ! वाचकांना नम्र विनंती कृपा करून नर्मदे काठी गुगल मॅपचा वापर करू नका !आणि आपल्याला अचूक माहिती असल्याशिवाय एखादे स्थान देखील तिथे जोडायचा प्रयत्न करू नका . नर्मदेचे एक स्वतःचे नेवीगेशन आहे ! त्याचा अवश्य वापर करा ! असो.
दूधधारेवरून नर्मदा हलकी उजवीकडे वळण घेते आणि अतिशय सुंदर स्वरूपात वाहत राहते . इथे पात्राची रुंदी केवळ पाच फूट ते दहा फूट आहे . खोली म्हणाल तर कधी कमरे एवढी आणि कधी घोट्या एवढी . संपूर्ण वनमार्ग असल्यामुळे नर्मदेच्या पाण्यामध्ये भरपूर लाकडे पालापाचोळा पडलेला दिसतो . रामदास बाबांच्या आश्रम जवळ येताना मात्र नर्मदा पाच धारांचे स्वरूप घेते .त्यामुळे तिला पंचधारा असे नाव पडले आहे . या पाचही धारा बऱ्यापैकी विस्तृत आहेत . आणि त्यांच्यामध्ये मध्ये बेटे तयार झालेली आहेत . मुख्य धारा पाच आहेत आणि छोट्या धारा अगणित आहेत . यातील जी सर्वात मोठी धारा आहे तिच्या काठावर एका मोठ्या खडकावर रामदास बाबा यांचा निवास आहे . तिथे एका मोठ्या वृक्षाच्या सावलीमध्ये बाबा बसलेले असतात . कुण्या परिक्रमावाश्याने जाता जाता त्यांना मच्छरदाणी लावून दिलेली आहे . कोणीतरी खाली गादी अंथरून दिलेली आहे . इथे बसण्यासारखा औरस चौरस कट्टा तयार झाला आहे . इथून मागे बाबांनी पत्र्यामध्ये बांधलेली ज्ञानेश्वरी कुटी आहे . त्याच्यामध्ये त्यांच्या सर्व वह्या सुरक्षित आहेत . या कुटी पाशी खरे तर पंचधारा संपते . त्यामुळे समोरचा किनारा अगदी जवळ दिसतो . ज्यांना माहिती आहे अशी माणसे समोरून जाता जाता बाबांचे दर्शन घेतात . किंवा बाबांना जोरात आवाज देतात की बाबा कट्ट्यावर येऊन बसतात . इथून एक छोटासा ओढा ओलांडून पलीकडे गेले की चढावर वनखात्याकडून खास परवानगी घेऊन बाबांनी एक खोली बांधलेली आहे . आलेल्या परिक्रमावासींना वन्य श्वापदांनी त्रास देऊ नये म्हणून ही खोली आहे . खोली अत्यंत जुनी व साधी असल्यामुळे मोडकळीला आलेली आहे . तिथेच आत मध्ये चूल आणि एक मोठा पेटारा आहे . जाणारे येणारे यात्रेकरू या पेटार्यामध्ये शिधा भरत असतात . इथून मागे घनदाट जंगल सुरू होते . इथपर्यंत देखील सर्वत्र जंगलच आहे . मोकळी जागा अशी फारशी कुठे नावालाही नाही . याच खोलीमध्ये स्वयंपाक करून रामदास बाबा येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासींना भोजन प्रसाद देत असत . (मी येणाऱ्या व जाणाऱ्या असे शब्द विचारपूर्वक वापरले आहेत कारण जलहरी परिक्रमा करणारे लोक समुद्र ओलांडत नाहीत ते समुद्रापर्यंत जाऊन पुन्हा उलटे त्याच मार्गाने येतात ) . परंतु काही वर्षांपूर्वी ( सुमारे तीन ते चार वर्षे ) एक दुर्दैवी घटना घडली . महाराज एक दिवस असेच आपल्या स्वस्थानी ध्यानस्थ बसलेले असताना त्यांना अचानक अर्धांगवायूचा झटका आला .ज्याला इंग्रजी मध्ये पॅरालिसिसचा अटॅक असे म्हणतात . आणि महाराज नर्मदेच्या पात्रामध्ये पडले . दोन-तीन दिवस महाराज त्याच अवस्थेमध्ये पडून होते . त्यांना हालचाल करता येत नव्हती .मैया च्या कृपेने एक परिक्रमा वासी त्या बाजूने निघाला होता त्याने महाराजांची अवस्था पाहिली . आणि ताबडतोब गावकऱ्यांना कळवून महाराजांना तिथून हलविण्यात आले आणि आधी जबलपूरला आणि मग नागपूरला उपचारांकरता ठेवण्यात आले . उपचारा दरम्यान डॉक्टरांनी आता हे कधीच बरे होणार नाहीत वगैरे सांगायला सुरुवात केली . परंतु जरा बरे वाटू लागताच महाराज हॉस्पिटल मधून थेट निघाले ते पुन्हा आपल्या पंचधारा स्थानावर येऊन बसले . आता मात्र ते पहिल्यासारखा स्वयंपाक करू शकत नाहीत किंवा वेगाने झपझप चालत देखील नाहीत . त्यांची उजवी बाजू पूर्णपणे शिथिल पडलेली आहे . उजवा हात उजवा पाय त्यांना अजिबात वापरता येत नाही . मैया च्या कृपेने जीभ मात्र पूर्ण सुस्थितीत आहे . त्यामुळे संवाद उत्तम साधता येतो . अमरकंटकच्या आरण्यातील प्रचंड थंडी धुवाधार पाऊस आणि कडक उष्मा हे सर्व सहन करत ते तिथेच राहिलेले आहेत . त्यामुळे ज्या ज्या संतांना रामदास बाबांची ही अवस्था माहिती आहे ते ते संत परिक्रमावासींना विनंती करतात की तुम्ही मुद्दाम होऊन रामदास बाबांच्या आश्रमावरून जा आणि त्यांना चार घास बनवून जेवू खाऊ घाला . न्हाऊ माखू घाला . त्यांची सेवा करा आणि मगच पुढे जा .जर कोणी येथून गेले नाही तर मात्र बाबा नर्मदा जलावरती गुजराण करतात ! किती जबरदस्त त्याग आणि तपस्या आहे विचार करून पहा ! मला धन्य वाटत होते की अशा संतांचा सहवास मला सदेह लाभतो आहे ! महाराजांच्या उशाशी दोन मोठे ठोकळे ग्रंथ दिसले . कुतुहल म्हणून पाहिले असता त्यातील एक ज्ञानेश्वरी होती आणि एक ग्रंथराज दासबोध होता . हे दोन्ही ग्रंथ वाचून वाचून चाळून चाळून अगदी गाळण झाल्यासारखे झाले होते . महाराजांना ज्ञानेश्वरी आणि दासबोध अक्षरशः तोंडपाठ होता . विशेषतः दासबोधाची वचने तर ते घडा घडा घडा बोलून दाखवत ! समासच्या समास त्यांना मुखोद्गत होते . आपले रामदास हे नाव त्यांनी जणु सार्थ केले होते ! मी महाराजांना विनंती केली आणि काही करुणाष्टके आणि सवाया त्यांना म्हणून दाखविल्या . सवाई हा प्रकार गाताना बेंबीच्या देठापासून ओरडावे लागते व तो आवाज खूप लांब पर्यंत ऐकू जातो .पूर्वी राजदरबारामध्ये राजाचे भाट अथवा स्तुती पाठक राजाच्या नावाने सवाया गायचे .समर्थ रामदासांनी अशा सवाया मारुतीच्या रामाच्या देवीच्या वगैरे लिहून ठेवलेल्या आहे त्या सर्व मी म्हणालो . महाराजांना खूप आनंद झाला .
महाराजांचे काही व्हिडिओ युट्युब वर मला सापडले ते आपल्या माहिती करता खाली देत आहे . ते पाहून साधारण तुम्हाला रामदास बाबा कसे आहेत त्याची कल्पना यावी !
https://youtu.be/bQ7zaOnhFs8?si=I-Llbm1ptZsOALEU
https://youtu.be/6sVWsTKZ3t8?si=B7qpwIEWl1qJZAnS
https://youtu.be/4uGoQodfFYo?si=ZdUtCMNM64eDgb8N
https://youtu.be/FbqoIGs_eno?si=TUG-1ZF0YGKoF49P
https://youtu.be/7IGZpZnJ5HQ?si=ABpUNkmWrv1OP6RY
महाराजांना मला काय सांगू आणि काय नको असे झाले होते . आणि मलाही महाराजांकडून काय ऐकू आणि काय नको असे झाले होते ! मी आयुष्यात अनेक संतांना भेटलो परंतु यांच्या विषयी जेवढा जिव्हाळा आणि आपुलकी वाटत होती तेवढी फार कमी वेळा वाटली . "चातुर्मासाचे चार महिने या भागात कोणीच फिरकत नाही " महाराज सांगू लागले . "नाही म्हणायला आमचे मित्र वाघोबा मात्र येऊन जाऊन असतात ! " मला नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहरा आला ! रामदास बाबा उघड्यावर झोपतात आणि वाघ येऊन त्यांना फक्त दुरूनच नमस्कार करून निघून जातो हे दृश्य अनेक स्थानिक लोकांनी देखील पाहिलेले आहे . परस्ते हा या क्षेत्रातला अतिशय जाणकार मनुष्य ! त्या दोघांच्या गप्पा तर मुलखावेगळ्या होत्या ! एकदा एक साधू रामदास बाबांकडे आला आणि म्हणाला की मला या अरण्यामध्ये साधना करण्यासाठी राहायचे आहे .बाबांनी त्याला सांगितले की नर्मदा मातेची परवानगी घे . मी कोण तुला सांगणारा . परंतु साधुनी ऐकले नाही आणि बाबांच्या कुटीपासून जवळच त्याने एक कुटी बांधली .पुढे भुकेल्या वाघाने त्याचा बरोबर कार्यक्रम केला आणि त्याचा अर्धा मुर्दा देह शोधण्याकरता परस्ते आणि बाबा दोन-तीन दिवस भटकत होते . त्याचा देह अतिशय वाईट अवस्थेत सापडला . शक्यतो वाघ माणसाला खात नाही कारण माणसाच्या अंगामध्ये स्नायू कमी असतात . आणि तावडीत सापडले तर तो फक्त स्नायूंचा भाग खाऊन टाकतो . त्यामुळे त्या साधूची छाती दंड आणि मांड्या तेवढ्या खाल्ल्या होत्या बाकी सर्व तसेच पडले होते .परस्तेला हे सर्व सांगताना जराही काही वाटत नव्हते . आणि मला मात्र नुसत्या कल्पनेने देखील अंगावर काटा येत होता . दोघांनी असे बरेच किस्से मला ऐकवले ! आता सुद्धा ज्या गुराख्याची तीन गुरे वाघाने मारून खाल्ली त्याला परस्ते ओळखत होता . वाघाचे हल्ले ,अस्वलाचे हल्ले , रानडुकराचे हल्ले असे बरेच प्रकार त्यांनी मला ऐकवले . त्याला हे पक्के माहिती होते की याला काहीही सांगू शकतो .कारण मुळात या स्थानापर्यंत येण्यासाठीच कसे अरण्य पार करावे लागते हे त्याला माहिती आहे . इथपर्यंत आला आहे म्हणजे तो ऐकण्याचा अधिकार आहे असा त्याचा भाव होता . परस्तेला जंगलाचे फार सखोल ज्ञान होते . वासावरून प्राणी कुठे आहे ओळखणे वगैरे कला त्याला अवगत होत्या . काळा सावळा किडकिडीत देह ,पांढरे शुभ्र केस ,कमरेला गुंडाळलेली भगवी लुंगी आणि वर एक मळकट भगवा सदरा . बाबा भेटल्यापासून हा जरी गृहस्थी असला तरी एखाद्या साधूचेच जीवन जगत होता . "अभी आगे हमारा प्लॅन बहुत जबरदस्त है । " महाराज सांगू लागले . "मी लवकरच मैया च्या कृपेने दूर गमन सिद्धी प्राप्त करून विविध देशांमध्ये जाऊन ज्ञानेश्वरीचा प्रचार करणार आहे !त्यावेळी तुम्हाला बरोबर कळेल की बाबा आता इथून निघाले ! " बाबांना हे करता येणे सहज शक्य आहे याची मला खात्री पटलेली होती . बोलता बोलता रात्र कधी झाली आम्हाला कळलेच नाही . थंडी वाजू लागली . महाराजांना मी पायामध्ये मोजे चढवून दिले . आणि हाताला धरून हळूहळू आतल्या स्वयंपाकाच्या खोलीमध्ये नेले . महाराज म्हणाले आज आपल्याकडे करण्यासारखे फार काही नाही . एक मोठा कांदा आहे .दोन-तीन लसणाच्या पाकळ्या आहेत . दोन मिरच्या आहेत आणि वाटीभर पीठ आहे . मग सर्वानुमते असे ठरले की टिक्कड आणि मस्त कांद्या लसणाची चटणी करायची ! मी कणिक मळायला बसलो . माझी गती आणि पद्धती बघून प्रेमसिंग परस्ते माझ्यावर पुन्हा भडकला . " लाव इधर ! तुम भोसड़ी के शहर वाले कुछ काम के नहीं ! " परस्तेने इरसाल शिवी हासडून माझे काम सोपे केले ! त्या खोलीमध्ये वर खाली अशा दोन पातळ्या होत्या . त्या पायरीवर बाबा बसले होते . आणि आमची मजा बघत होते . मी बसल्या बसल्या कांद्या लसणाची उत्तम पैकी चटणी तयार केली . मुठभर शेंगदाणे सुद्धा त्यात कुटून घातले . आणि मग त्या चुलीजवळ बसूनच तिघांनी भोजन प्रसाद घेतला ! पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटाला देखील या प्रसादाची सर येणे शक्य नव्हते ! रामदास महाराज तर ती साधीसुधी चटणी इतके कौतुक करून खाऊ लागले की मला देखील ती चटणी भारी वाटायला लागली ! मी परस्ते ला सांगितले होते की तू टिक्कड कर परंतु शेवटचा एक गोळा माझ्यासाठी ठेव . त्याच्या मी दोन मऊशार महाराष्ट्रीयन पद्धतीच्या पोळ्या करून महाराजांना खाऊ घातल्या . नाहीतर इथले टिक्कड म्हणजे आपल्या भाकरी पेक्षा दुप्पट जाड असतात ! महाराजांना त्या फारच आवडल्या ! म्हणाले आधी कळाले असते तर तुम्हालाच सगळ्या पोळ्या करायला लावल्या असत्या . महाराज महाराष्ट्राकडचे असल्यामुळे त्यांना लहानपणी आईच्या हातच्या खालेल्या पोळ्यांची आठवण नक्की आली असणार . त्यानंतर मी सर्व भांडी घासून ठेवली . विशेषतः चुलीवरची भांडी घासायला थोडीशी तापदायक असतात . त्यात थंडीमध्ये बर्फासारखे गार पाणी असताना अजूनच त्रास होतो . परंतु रामदास बाबांची सेवा करतो आहे हा भाव असल्यामुळे मला काहीच त्रास वाटला नाही ! शिवाय हुशार परस्तेने थोडेसे गरम पाणी चुलीवर ठेवून दिले होते तेही शेवटी वापरले . आता मी बाबांना हाताला धरून पुन्हा त्यांच्या स्थानावरती सोडायला गेलो . मी बाबांना विचारले की आपल्या शेजारी मी आसन लावले तर चालेल का ? बाबा म्हणाले इथे रात्री थंडी खूप पडते . दव इतके पडते की संपूर्ण अंथरूण पांघरूण भिजून जाते . आणि मुख्य म्हणजे इथे झोपायची आज्ञा नर्मदा मातेने फक्त मला दिलेली असल्यामुळे इतर जीवांची शाश्वती मी देऊ शकत नाही . एखादा वन्य हिंस्र प्राणी आलाच तर तो मला काही करणार नाही परंतु शेजारच्याला काय करेल याचा नेम नाही . एकदा तर एक भला मोठा अजगरच रात्रभर बाबांना विळखा मारून बसला होता . बाबा देखील त्याला ऊब मिळते आहे तर घेऊ दे अशा भावामध्ये पडून राहिले होते . सकाळी तो आपोआप निघून गेला . असे सर्व प्रकार होत असल्यामुळे मी आतच झोपणे श्रेयस्कर आहे हे बाबांनी मला पटवून सांगितले . परंतु माझ्या चेहऱ्यावर बाबांची चिंता आहे हे त्यांनी लगेच ओळखले आणि ते मला म्हणाले , "मेरी चिंता मत करना । मेरा चिंतन करना । "
महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून मी तिथून झोपडी मध्ये परतलो . परस्ते झोपी गेला होता . मी देखील आसन लावले . सर्व पूजा पाठ करून घेतले आणि पाठ टेकणार इतक्यात सगळीकडून आवाज येऊ लागले . पाहतो तो काय सुमारे ३० ते ४० भले मोठे उंदीर त्या कुटीमध्ये सर्वत्र संचार करत होते ! ते आम्हाला अजिबात घाबरत नव्हते जणू काही त्यांचेच राज्य असल्यासारखे वर्तन सुरू होते ! खरे पाहायला गेले तर ते राज्य त्यांचेच होते . मीच तिथे पाहुणा होतो . त्यातील दोन-तीन उंदीर माझ्या झोळीवर देखील फिरत आहेत असे माझ्या लक्षात आले . मग मात्र मी ती उचलली आणि बाबांनी मोठा पेटारा जो ठेवला होता , धान्यासाठी , त्यात टाकून दिली . मग मात्र मला निश्चिंत झोप लागली . रात्री एक दोन वेळा जाग आली . अरण्य रात्री अजिबातच झोपत नाही . ते दिवसा झोपलेले असते . त्यामुळे बाहेरून अनेक प्रकारचे आवाज येत होते . माझ्या मनात रामदास बाबांचा विचार येऊन गेला की ते आता काय करत असतील ? कसे असतील ? परंतु तिथपर्यंत जाण्याची हिंमत माझ्या मध्ये नव्हती इतका गुडुप्प अंधार सर्वत्र पसरला होता . मी पुन्हा झोपी गेलो . पहाटे जाग आल्यावर उठलो . प्रेमसिंग परस्तेने एक खूप मोठे काम केले होते ते म्हणजे त्याने रात्रभर चुलीवर गरम पाण्याचे आधण ठेवून दिले होते . त्यातीलच लोटाभर पाणी घेऊन मागच्या जंगलामध्ये बहिर्दिशेला गेलो . माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्वात भयप्रद असे ते विसर्जन होते ! जंगलातून इतके तऱ्हे तर्हे चे आवाज येत होते की विचारू नका ! गरम पाणी कोमट होऊन बघता बघता गार होऊन गेले . नशीबाचा भाग इतकाच की ते बर्फासारखे गार होण्याच्या आत वापरले गेले . तशीच आंघोळ करून घेतली . आणि महाराजांच्या दर्शनाला निघालो . महाराज ध्यानस्थ बसलेले होते . बराच वेळ ते तसे बसून होते . सुमारे तासाभराने त्यांची समाधी भंग पावली . मला आता पुढे निघणे आवश्यक होते . मी केवळ महाराजांची परवानगी घेण्याकरता म्हणून थांबलो होतो . महाराजांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे पाहून मंद स्मितहास्य करून म्हणाले "रात्री दोन वेळेस तुम्ही जागे झाला होतात आणि दोन्ही वेळेला तुम्हाला माझी काळजी वाटली होती . " "होय महाराज अगदी बरोबर " मी उत्तरलो . " मी तुम्हाला म्हणालो ना की माझी काळजी नर्मदा मैया करते .तिला सर्वांचीच काळजी आहे .तुमची ,माझी त्या परस्ते ची , या पशु पक्ष्यांची , वाघांची , अस्वलांची , सर्वांची काळजी आहे . मला तुम्ही कधीही कुठेही माझ्या स्मरण केले की कळते . इथून पुढे सुद्धा तुम्ही जेव्हा घरी परत जाल तेव्हा माझी फक्त आठवण काढा मला लगेच तुमची आठवण येईल ! "
हे लिहिताना माझ्या अंगावर आता सुद्धा शहरा येतो आहे कारण हा लेख लिहिताना बाबांची अखंड आठवण येते आहे आणि बाबांना देखील आपली आठवण येत असणार आहे ! मी याची साक्षात प्रचिती घेतलेली आहे . "बाबा , आता पुढे जायला आज्ञा द्या " मी म्हणालो . "अरे अजून आले नाहीत अन् इतक्यात निघाले सुद्धा ? इतकी काय घाई आहे ? रहा दोन चार दिवस निवांत ! " महाराज म्हणाले . मी माझ्या आज वरच्या चालण्याच्या गतीवरून जो काही हिशोब काढला होता तो पाहता मला चातुर्मास लागण्याच्या आत परिक्रमा संपविणे आवश्यक वाटत होते .म्हणून जमेल तितके चालत राहावे असे माझे नियोजन होते . परंतु नर्मदे काठी तुमचे काही चालत नाही हे मात्र खरे आहे . बाबा म्हणाले आम्हाला छान काहीतरी म्हणून दाखवा . मग मी दासबोधातील सद्गुरु स्तवन समास म्हणून दाखविला . त्यानंतर महाराज त्यावर बोलू लागले .बोलता बोलता त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला . लेखन क्रिया निरूपण या समासावर देखील ते फार विस्तृत बोलले . महाराजांचा लेखन क्रियेवर फार भर होता आणि त्यांचे अक्षर अतिशय मोत्यासारखे सुंदर होते . फक्त देवनागरीच नव्हे तर प्रत्येक भाषेतील त्यांचे अक्षर अतिशय वळणदार आणि मोत्यासारखे टपोरे होते . नर्मदा मातेने त्यांना भाषा शिकविताना ठिपक्यांच्या स्वरूपात भाषा शिकविली असे ते म्हणाले . त्यामुळे ते सर्वसामान्य लिहिताना देखील ठिपके ठिपके काढून लिहीत आणि नंतर ती अक्षरे जोडत . त्यांचा उजवा हात आता लकवा मारल्यामुळे चालत नव्हता तरीदेखील ते म्हणले तुझ्याकरता मी प्रयत्न करून बघतो आणि त्यांनी माझ्या वहीमध्ये शिक्का मारून स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तीन लिप्यांमध्ये स्वतःचे नाव लिहून दिले . पैकी पहिले मोडी अक्षर आहे दुसरी देवनागरी लिपी आहे आणि तिसरी रोमन लिपी आहे . त्याचा फोटो आपणा सर्वांसाठी जोडत आहे .
ब्रह्मनिष्ठ संत श्री रामदास महाराज यांनी माझ्या वहीमध्ये केलेल्या तीन स्वाक्षरी (अनुक्रमे मोडी , देवनागरी आणि रोमन लिपीत ) शिक्यातील अक्षरे येणेप्रमाणे : ब्रह्मनिष्ठ संत श्रीरामदास महाराज मुक्काम पंचधारा रेवा आश्रम ,कपिलधारा के पास , पोस्ट अमरकंटक ,जिल्हा अनुपपूर मध्य प्रदेश
हात पहिल्यासारखा चालत नसल्यामुळे त्यांना हे लिहायला देखील खूप वेळ लागत होता . परंतु तरी त्यांनी नेटाने आणि हट्टाने जे हवे ते लिहिलेच . त्यांनी मला पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी कुटीमध्ये जायला सांगितले आणि आतील काही वह्या आणायची आज्ञा केली . इथे येणाऱ्या परिक्रमावासींची ती यादी होती . बाकी रस्त्यालगत असणाऱ्या आश्रमांत शेकड्याने परिक्रमावासी येत असतात त्यामुळे त्यांची पानेच्या पाने भरतात परंतु बाबांकडे मात्र अतिशय मोजकेच परिक्रमावासी येत आहेत हे ती वही पाहिल्यावर माझ्या लक्षात आले . अशा अनेक वर्षांच्या वह्या महाराजांकडे पडल्या होत्या . त्यांच्या बाबतीत एक गमतीदार गोष्ट होती . लोक आपली इच्छा या वहीमध्ये लिहून ठेवत आणि ती पूर्ण होते अशी त्यांची धारणा होती . शिवाय काही लोक आपला फोटो देखील तिथे चिकटवून ठेवत ! रामदास महाराजांनी मला गंमत म्हणून लोकांच्या इच्छा काय काय असतात ते वाचायला सांगितले आणि हसून हसून आमची पुरेवाट झाली ! शिवाय लोकांचे फोटो पहायला देखील मजा येत होती . महाराज म्हणाले थांब तुला अजून एक पुढची गंमत सांगतो . ते जिथे बसले होते तिथे झाडाला इकडे तिकडे मिळेल त्या खांबाला लोकांनी चिंध्या बांधल्या होत्या . रंगीबिरंगी चुनरी चे कापड असते त्याच्या चिंध्या. ते लोकांनी महाराजांच्या पुढे बोललेले नवस होते . मला त्यांनी त्या चिंध्या मोजायला लावल्या तर त्या सुमारे ५०० पेक्षा अधिक भरल्या ! महाराजांचा स्वभाव मोठा गमतीशीर होता . हसून हसून माझे पोट दुखायला लागले ! मला खरे म्हणजे इथून पुढे पंधरा-वीस किलोमीटरचे घनदाट जंगल पार करायचे होते . परंतु महाराज काही सोडेनात. मग मला म्हणाले चल आपण स्वयंपाकाची तयारी करू आणि त्यांचा हात धरून हळूहळू मी त्यांना खोलीमध्ये घेऊन आलो . माझ्याकडे एक अप्रतिम दर्जाचा चमचा होता तो मी त्यांना दिला आणि त्यांना तो फार आवडला . इतका आवडला की तो चमचा मी असेपर्यंत त्यांनी हातामध्ये धरून ठेवला होता .मला म्हणाले हा चमचा पाहिला की मला तुमची आठवण येत राहील . आता खायला काय करायचे ? बाबा मला म्हणाले त्या पेटार्यामध्ये काय काय आहे बघ . मी तो पेटारा उघडला परंतु तो प्रचंड जड होता आणि आत मध्ये बुडुख अंधार होता . मी पुन्हा झाकण लावले आणि माझ्या झोळीतील बॅटरी काढून एका हाताने पेटारा उघडला आणि दुसऱ्या हाताने आत काय काय आहे ते फ्लॅश मारून पाहू लागलो . हा प्रसंग नीट लक्षात ठेवा ! इथे मी केलेल्या एका चुकीमुळे मला खूप जबरदस्त अनुभव आला होता . पेटारा खूपच जड होता त्यामुळे तांदूळ एका हाताने काढता येणे अवघड होते . म्हणून मी बॅटरी पेटार्याच्या आत मध्ये ठेवली आणि डोक्याने पेटारा धरून दोन्ही हाताने हवे तेवढे तांदूळ आणि डाळ काढून घेतले . त्यानंतर मी झाकण लावले आणि विचार केला की बॅटरी नंतर घेऊ काढून . परंतु कामाच्या गडबडीत मी पेटार्यामध्ये चालू बॅटरी ठेवली आहे हे विसरून गेलो . इकडे चुलीवर आधण ठेवून मी मस्तपैकी आमटी भात शिजविला . महाराजांना भात फार आवडत असे . त्यांनी मोठ्या आवडीने आणि मोठ्या प्रमाणात भाताचे सेवन केले . विशेषतः त्यांचा उजवा हात निकामी झाल्यामुळे चमच्याने खायला त्यांना फार बरे वाटत होते . हा चमचा फारच जाडजूड आणि खणखणीत होता त्यामुळे खाण्यासाठी सोयीचा होता . नंतर आम्ही उन्हामध्ये येऊन बसलो . इथे देखील बाबांचा खूप सत्संग लाभला . परिक्रमावासींच्या आणि परिक्रमेतील अनेक गमती जमती बाबा सांगत होते . लोक काय काय प्रकारचे भेटतात हे देखील त्यांनी खुमासदार शैलीमध्ये सांगितले .आता आजचा मुक्काम निश्चित आहे असे डोक्यात ठेवून मी निर्धास्त गप्पा मारत होतो .दुपारचे साधारण तीन वाजले असावेत . आणि अचानक मला रामदास बाबा म्हणाले की आता तुम्ही जाऊ शकता ! पंधरा किलोमीटर तीन तासात ?साधे अंकगणित करणाऱ्या माझ्या मनाने हे शक्य आहे असा निर्वाळा दिला .परंतु मला हेच माहिती नव्हते की जंगलातील कठीण मार्गावरून तासाला एक दीड किलोमीटर चालता आले तरी खूप झाले ! परंतु महाराजांनी आज्ञा दिल्यामुळे आता मला निघणे भाग होते . महाराजांनी परस्ते ला देखील माझ्यासोबत निघायला सांगितले .त्याला समोरच्या तटावर काहीतरी काम होते ते करून तो घरी जाणार होता . आम्ही दोघे निघणार इतक्यात स्वतः बाबा माझा हात धरून माझ्यासोबत चालू लागले . मला काही कळेना की बाबा काय करत आहेत ? बाबा म्हणाले मी तुला सोडायला येतो आहे काही अंतर . परंतु याची खरच गरज नाही असे मी निक्षून सांगितले . रामदास बाबा मला म्हणाले की हे पहा मी सर्वांना काही स्वतः सोडायला जात नाही . आतापर्यंत दोन-तीन लोकांनाच असे मी सोडलेले आहे . "अहो बाबा परंतु तेव्हा तुम्ही धड धाकट होतात .आता तुम्हाला उभे देखील राहता येत नाही आधाराशिवाय . तुमचा तोल गेला तर तुम्हाला कोण सावरणार आणि उठवून कोण बसवणार ? " बाबांचे वजन किमान शंभर किलो तरी असावे . परंतु माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करते चालत राहिले . त्यांची बोलण्याची एक विवक्षित पद्धत होती . " ऐस्सा ! " " ज्जे ब्बात ! " असे ते जेव्हा जोरात म्हणत तेव्हा पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटे ! सुमारे दोन किलोमीटर बाबा माझ्यासोबत चालले . परस्ते मध्येच कुठेतरी गायब झाला होता तो एका गुराख्याला घेऊन पुन्हा हजर झाला ! परस्ते ला कोण कुठे किती वाजता गुरे घेऊन फिरत असतो याचा अंदाज होता .आणि बाबांना सोबत एकटे जावे लागू नये म्हणून याला तो सोबत घेऊन आला . मी त्या गुराख्याला म्हणालो , " बरे झाले तुम्ही आलात . आता रामदास बाबांना कृपा करून कुटीपर्यंत सोडा " गुराख्याने मला सांगितले की त्याला बाबांचा आवाज ऐकू येत होता . त्यामुळे तो इकडे यायलाच निघाला होता . दरम्यान त्याने खुणेचा काहीतरी आवाज काढला जो परस्तेने ओळखला . आणि तोही खाणाखुणा करत त्याच्या मागावर गेला आणि त्याला घेऊन आला . वनवासी लोकांचे हे सर्व जगणे कळायला किमान एक जन्म तिथे राहणे आवश्यक आहे . मी त्या गुराख्याला म्हणालो की अरे इथे सध्या वाघ फिरतो आहे तरी स्वतःची सांभाळणे . यावर तो उत्तरला की " तुम्ही दोन गाई आणि एक बैल पळविण्याची जी बातमी ऐकली होती ती माझीच गुरे होती आणि माझ्यासमोर वाघाने या शिकारी केल्या " म्हणजे ऐकलेली बातमी सत्य होती हे इथे सिद्ध झाले . मग त्याने बाबांना आणि परस्तेला वाघाने कशी झडप घातली वगैरे संपूर्ण प्रसंग वर्णन करून सांगितला .तुम्ही कल्पना करून पहा .जर तुमची गुरे अशा पद्धतीने वाघाने पळवून नेली तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच भागात तुम्ही गुरे वळायला याल का ? परंतु इथल्या लोकांचे वन्य श्वापदांसह सहजीवन किती सुंदर आहे याचे हे उदाहरण आहे . वाघाला गुरे पळविण्याचा अधिकार आहे हे त्यांनी आधीच मान्य केलेले आहे . वाघ आपल्या दारात येत नसून आपण वाघाच्या घरात फिरत आहोत याची त्यांना जाणीव आहे . त्यामुळे वन खात्याकडे मोबदला मागणी वगैरे असले काहीही त्याने केले नाही व करणारही नाही म्हणाला . कारण वाघाने गुरे पळवून नेली तर त्याचे पुरावे दाखवावे लागतात आणि ते कोण शोधणार आणि कोणाला दाखवणार आणि कसे दाखविणार ? वाघाच्या गुहेत जाऊन असले नसते धंदे करण्यापेक्षा गेलेली गुरे नर्मदार्पणमस्तु म्हणणे या लोकांना सोपे वाटे . परंतु सरकारने यावर विचार करून अशा लोकांना मदत दिली पाहिजे असे प्रामाणिकपणे वाटते . असो . रामदास बाबांच्या चरणावर पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो . बाबा म्हणाले काळजी करू नकोस फक्त आठवण काढत राहा . गुराखी आणि बाबा चालू लागले . त्यांचा आवाज पुढे बराच काळ मला ऐकू येत होता इतका स्पष्ट जंगलामध्ये घुमत होता . दुपारचे चार वाजले होते आणि मला अजून सुमारे १२ किलोमीटर अंतर कापायचे होते . मध्येच मला सोमनाथ बाबांची कुटी दिसू लागली . मागील प्रकरणांमध्ये त्यांच्याविषयी मी सांगितले आहे . मी त्यांना आवाज दिल्याबरोबर कुटीतून बाहेर आले आणि नर्मदा मैया पार करून मला भेटायला इकडे आले . गेल्या दोन दिवसांमध्ये नऊ अधिक तीन अशा बारा परिक्रमावासींची परिक्रमा एका विशिष्ट ठिकाणी खंडित झाली होती . सोमनाथ बाबा ने मला नेऊन ती जागा दाखविली . मीदेखील समोरच्या तटावर असताना अगदी याच ठिकाणी येऊन माझा गोंधळ उडाला होता परंतु झाडांवर बांधलेल्या चिन्ध्यानी मला योग्य मार्ग दाखविला होता . सध्या सोमनाथ बाबा स्वतः सायकल घेऊन परिक्रमेला निघालेले आहेत असे मला आढळून आले . असो . परस्ते त्याच्या कामाकरिता इथून उत्तर तटावर निघून गेले .जाण्यापूर्वी त्याने मला काही मौलिक सूचना केल्या . परस्ते म्हणाला , " देखो बाबा जी यह बड़ा खतरनाक जंगल है । अभी शाम के चार बजे है । कुछ भी करके तुम इस जंगल को पार नहीं कर पाओगे । यहां हम जहां खड़े हैं वहां से दो ढाई किलोमीटर उत्तर तट पर दमगढ नाम का गांव है । अगर तुम्हें कुछ होता है और तुम चिल्लाते हो तो हमें आवाज सुनाई दे सकती है । लेकिन इसके आगे निकल गए तो ९ -१० किलोमीटर तक कोई गांव नहीं है । इसलिए यही कहीं खुली आसमान देखकर आसन लगाओ । रात भर जलाने के लिए पर्याप्त लकड़ी इकट्ठा करो ।बड़ी आग जलाओ और बैठे रहो । ध्यान रहे आप आग से आजू-बाजू ५ फुट के बाहर नहीं निकलना । बैटरी तो तुम्हारे पास है ही । " आणि एकदम मला आठवले की बॅटरी कुठे आहे तेच मला आठवत नाही आहे . त्याने मला शांतपणे सर्व सामान काढायला सांगितले . त्याच्यासमोर तीन वेळा मी संपूर्ण सामान रिकामे केले आणि पुन्हा भरले परंतु बॅटरी तिथे कुठेच नव्हती . मग मला अचानक आठवले की स्वयंपाक करताना मी ती बॅटरी पेटार्यामध्ये टाकली होती . नेमकी ज्या क्षणी तिची मला गरज होती त्याच क्षणी माझ्या स्मरण शक्तीने मला दगा दिला होता . मला वाईट वाटू लागले . परस्ते म्हणाला काळजी करू नकोस . तसाही तुझ्या या बॅटरीचा आमच्या जंगलात काहीच उपयोग नाही . फार वाटले तर एखादे जळते लाकूड हातात घेऊन फिर . इतक्या सूचना करून परस्तेने धावतच नर्मदा पार केली ! आणि माझ्यापुढे उरला जंगलाचा भयानक आवाज ! इतका वेळ अनेकांच्या सहवासात असलेला मी क्षणात एकटा पडलो ! एकट्या माणसासाठी जंगल किती भयानक असू शकते हे अनुभव घेतलेला मनुष्यच सांगेल ! त्यामुळे मी ठरविले की आता समोर दिसणारी नर्मदा माता सोडायचीच नाही ! आणि पुन्हा एकदा भयंकर जंगलातून माझी वाटचाल सुरू झाली . थोड्याच वेळात माझ्या जीवनामध्ये अविस्मरणीय ठरणारी एक रात्र उगवणार होती ... ती रात्र मी मरेपर्यंत विसरू शकत नाही . . .
अनुक्रमणिका
लेखांक तीस समाप्त (क्रमशः )
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा