लेखांक २८ : अमरकंटकचे गीता स्वाध्याय मंदिर

सोनमूढा सोडल्यावर वाटेत एकाने सांगितले की पुढे पुष्कर बंधाऱ्या पाशी यशोधन नावाचे पुण्याचे कोणीतरी अन्नछत्र चालवितात तिथे जावे . चालता चालता हळूहळू अमरकंटक गाव दिसू लागले . लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच . पुष्कर बंधाऱ्यावरील या आश्रमाची कोणाला माहिती आहे का हे विचारण्याकरता मी जागा शोधत होतो . एका छोट्याशा आश्रमाचे लोखंडी दार मला दिसले .दारावरती श्री गीता स्वाध्याय मंदिर अशी अक्षरे लोखंडामध्येच घडवलेली होती . 



तिथून आत उन्हामध्ये खुर्ची टाकून एक वयस्कर संन्यासी बसल्याचे माझ्या लक्षात आले . त्यांची समाधी अवस्था लागलेली दिसत होती . मी बराच वेळ त्या लोखंडी दाराच्या बाहेर हात जोडून उभा राहिलो . संन्यासी महाराजांची मूर्ती अतिशय छोटीशी होती . त्या वामनमूर्तीचे वजन जेमतेम ३० ते ३५ किलोच असावे ! नुकतेच क्षौर केलेले होते . इतक्यात आतून कुणीतरी सेवेकरी आला आणि त्याने मला विचारले क्या चाहिये बाबा जी? सेवेकऱ्याच्या त्या आवाजामुळे संन्यासी महाराजांची समाधी भंग पावली .आणि माझ्याकडे पाहत त्यांनी अतिशय दमदार भरदार आणि खर्जातल्या आवाजात विचारले , " नर्मदे हर ! क्या है ?" मी म्हणालो "नर्मदे हर महाराज ! यहा यशोधन नाम के पुनावाले आदमी का आश्रम किधर है ? हमने सुना पुष्कर बाँध के बाजू मे कही है । " क्षणाचा ही विलंब न लावता स्वामी जी म्हणाले , " क्यू ? यहा रहे तो नही चलेगा ? " " वैसी बात नही है स्वामीजी । लेकिन अमरकंटक शहर मे लॉकडाऊन चल रहा है । " " तो ? " " तो आपको मेरे कारन परेशानी ना झेलनी पडे इसलिये शहर से बाहर निकलने की सोच रहे है । " "नर्मदा मैया की परिक्रमा कर रहे हो और खुद सोच रहे हो ? " " पुलीस ने परिक्रमावासीयोंको अमरकंटक के ऊस तट पर रोका था .स्वामीजी । और बताया था जल्दी से जल्द इस शहर को खाली करे । इसलिये . . . " "यह गीता स्वाध्याय आश्रम है । यहा श्रीकृष्ण परमात्मा के कायदे कानून चलते है । आ जाओ अंदर । आसन लगाव और चाय पाओ । " स्वामीजींचे हे शब्द ऐकून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही .कारण पहाटेपासून मी अखंड चालत होतो .अमरकंटक चा संपूर्ण डोंगर मी चढून आलो होतो . पाय बोलू लागले होते .थंडी तर इतकी भयंकर होती की चालताना सुद्धा थंडी वाजत होती . चालताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचा काहीही फरक थंडीला पडत नव्हता . मी आत गेलो आणि स्वामीजींना साष्टांग नमस्कार केला . "ओम नमो नारायणाय ! " 
थोडेसे धर्मज्ञान घेऊयात.
आपल्या धर्मामध्ये भगवे किंवा काषाय वस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त चतुर्थाश्रमाला अर्थात संन्यासी लोकांना आहे . ( आपल्या धर्मामध्ये धर्म ,अर्थ ,काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत .तसेच ब्रह्मचर्याश्रम , गृहस्थाश्रम ,वानप्रस्थाश्रम आणि संन्यास आश्रम असे चार आश्रम सांगितलेले आहेत. यातील चौथा असल्यामुळे संन्यासाला चतुर्थाश्रम म्हणतात) 
संन्यासी वेश असा काहीसा असतो . आद्य शंकराचार्यांनी संन्यास आश्रमाचे पुनरुज्जीवन केल्यामुळे त्यांचे चित्र जोडले आहे .दंड कमंडलू आणि काषाय वस्त्र ही प्रमुख अंगे आहेत .

केवळ साधू म्हणून फिरणाऱ्या साधकांनी पांढरे वस्त्र परिधान करणे अपेक्षित आहे . अशा लोकांना शक्यतो भारतामध्ये सीताराम बाबा असे म्हणतात . हे सीताराम बाबा बहुतांश करून वैष्णव असतात . 
 सीताराम बाबा वेषभूषा ( वैष्णव साधू )
काही शाक्त व गाणपत्य ,पिवळे ,तांबडे ,निळे , हिरवे ,काळे असे वस्त्र देखील घालतात .परंतु भगवे वस्त्र मात्र केवळ संन्यासीच घालू शकतो . वरीलपैकी सर्व प्रकारच्या साधूंना अभिवादन करताना सीताराम किंवा रामराम असे म्हटले की पुरेसे असते . परंतु संन्यासी हा साक्षात नारायण स्वरूप मानला जातो . त्यामुळे त्याला अभिवादन करताना मात्र ओम नमो नारायणाय किंवा ओम नमो नारायणा असे म्हणण्याची पद्धत आहे .
तुम्हाला या सर्व गोष्टींचे कितपत ज्ञान आहे हे साधू पहिल्या भेटीतच ओळखतात .आणि त्यानुसार तुमच्याशी कसे वागायचे ते ढोबळ मानाने ठरविले जाते असा माझा अनुभव आहे . मुरलेला साधक भेटला तर साधू त्याच्याशी फार प्रेमाने , आस्थेने आणि आनंदाने वागतात . एखादा घोर संसारी भेटला तर त्याची हाड हुड देखील केली जाते . एकंदरीत साधू कधी कसे वागतील याचा काही नेम नसतो त्यामुळे आपण नेहमी सावध राहिलेले बरे असते . असो . 
 मी तसे अभिवादन करून महाराजांच्या पायाशी मांडी घालून उन्हामध्येच बसलो . महाराज मला म्हणाले , अरे खाली बसू नकोस .काहीतरी आसन बसायला घे . इतक्यात एका सेवेकऱ्याने आतून बसकर आणून दिले .मी स्वामीजींच्या तेजस्वी रूपाकडे अनिमिश नेत्राने पाहू लागलो ! इतके छोटे रूप असून देखील स्वामींच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते ! त्यांचा चेहरा अतिशय  , निर्मळ , तेजस्वी आणि निरागस होता . डोळ्यावरचा चष्मा नाकाकडे ढकलत ते माझ्याकडे पाहू लागले . "कहा से आये हो ? " "पुना से स्वामीजी । " "आज तुम यहा रुको यह नर्मदा मैया की इच्छा थी। वैसे हम स्वयम किसी को आग्रह नही करते । आश्रम सब का है ।जिसको आना है आये । जिसको जाना है जाये । परंतु तुमने जब पूछा तो मुझे लगा इस परिक्रमावासी को रोक लेते है । " त्यांचा धीर गंभीर खर्जातला आवाज ऐकून मला खूपच भारी वाटत होते ! पूर्वी टीव्हीवर ओम नमः शिवाय किंवा रामायण महाभारत अशा पौराणिक मालिका लागायच्या . त्यात निवेदकाचा जो आवाज असायचा " मै काल हूँ। " तसा हा आवाज वाटत होता .
स्वामी नर्मदानंद गिरी असे या संन्यासी महाराजांचे नाव होते व त्यांचे वय सहज नव्वदीच्या आसपास असावे हे त्यांच्या त्वचेकडे पाहून कळत होते . परंतु त्यांची तब्येत अतिशय उत्तम होती व ते सर्व कामे स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने करत होते . 
स्वामी नर्मदानंद गिरी यांचे तरुणपणीचे छायाचित्र
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे स्वामी नर्मदानंदगिरी

त्यांच्या त्या वामन रूपाशी तो आवाज अजिबात जुळत नव्हता ! परंतु साधनेमुळे माणसांमध्ये काय काय बदल होऊ शकतात हे कोणीच जाणू शकत नाही . जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरु या आधुनिक गुरूंच्या एका भाषणात देखील साधुत्व स्वीकारल्यावर त्यांचा आवाज बदलल्याचे त्यांनी सांगितले होते . स्वामीजींचा चांगला तासभर सत्संग मला लाभला . मी परिक्रमा कशासाठी करतो आहे वगैरे सर्व त्यांनी मला व्यवस्थित विचारून घेतले . मी दिलेल्या उत्तरामुळे त्यांचे समाधान झाले आहे असे मला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणवले . त्यांनी आतून सेवेकऱ्याला हाक मारली . तो धावतच चहा घेऊन आला . त्याने माझ्यापुढे चहाचा एक कप ठेवला आणि महाराजांच्या हातात दुसरा कप दिला . इतक्यात स्वामीजींना काय वाटले कोणास ठाऊक त्याला म्हणाले , इनको भी मेरी वाली चाय पिलाओ । मग माझ्या लक्षात आले की स्वामीजी एक काढा पीत होते आणि मला मात्र चहा देण्यात आला होता . सेवक लगेच माझ्या पुढील चहाचा कप घेऊन गेला आणि मला देखील त्याने काढा आणून दिला . माझे पुण्यातील मित्र श्री बाळासाहेब वाल्हेकर यांनी बरेच संशोधन करून एक आयुर्वेदिक काढा बनविला आहे त्याची आणि या काढ्याची चव हुबेहूब सारखी होती . त्यामुळे मी पटापट त्याच्यामध्ये काय काय टाकले आहे ते स्वामीजींना सांगितले आणि स्वामीजी अजूनच खुश झाले ! साधू संतांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याचे समाधान काही निराळेच आहे ! स्वामीजी म्हणाले मी कधीच चहा पीत नाही . हा काढा शोधून काढला आहे . त्या कडकडीत उन्हामध्ये ही अंगात भरलेल्या थंडीमध्ये काढा खरोखरीच अमृताप्रमाणे वाटत होता . महाराजांशी खूप चांगला सत्संग घडला . 

 प.पू . स्वामी नर्मदानंदगिरीजी
त्या आश्रमामध्ये आत गेल्या गेल्या मधोमध फरसबंदी केलेले अंगण होते . उजव्या हाताला महादेवाची पिंड स्थापित केली होती आणि डाव्या हाताला स्वामीजींची बसण्याची व त्यामागेच राहण्याची खोली होती .  या आश्रमाची स्थापना १९७५ साली गीता जयंतीच्या पवित्र दिवशी स्वामी ब्रह्मेंद्रानंद गिरी  यांनी केली होती . या स्वामिनी १९३२ साली नर्मदा परिक्रमा केली होती व त्या काळामध्ये धुनी वाले दादाजी यांना ते भगवद्गीता ऐकवत असत .  दादाजींनी देह ठेवल्यावर भ्रमण करत करत स्वामीजी काशी येथील प्रखर विद्वान नृसिंह गिरी महाराज यांच्या दक्षिणामूर्ती आश्रमामध्ये काही काळ राहिले .तिथून गुरु आज्ञेनुसार प्रयागच्या परमानंद आश्रमात राहून नंतर पुष्कर संन्यास आश्रमाचे महंत पद सांभाळत असताना सर्व सोडून पुन्हा एकदा नर्मदेचे उगमस्थान गाठले आणि नर्मदा मातेच्या प्रेरणेने केवळ ब्राह्मणच नव्हे तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना , मुलांना भगवद्गीता व वेद विज्ञान शिकवण्यासाठी या आश्रमाची स्थापना केली . इथे आजही विविध गोष्टी शिकण्याकरता दुरून लोक येत असतात . माझ्यासमोर देखील अनेक लोक येऊन बऱ्याच गोष्टी महाराजांकडून शिकून गेले . कोणीही आले की महाराज शांतपणे त्या व्यक्तीला समोर बसवत आणि धीर गंभीर आवाजामध्ये शुद्ध उच्चारणासह संथा देत . महाराजांनी मला वस्ती करण्याची सूचना केली . एक सेवेकरी मला खोली दाखवण्याकरता घेऊन गेला . माडीवर एका खोलीमध्ये तीन-चार साधू आधीच उतरले होते . तिथे एका कोपऱ्यामध्ये मी माझे आसन लावले . कुठेही गेल्यावर थोडेसे आजूबाजूला फिरून अवलोकन करण्याची माझी सवय आहे . त्याप्रमाणे मी त्या खोलीचे मागच्या बाजूचे दार उघडले आणि छोट्या सज्जा मध्ये गेलो आणि पाहतो तर काय ! ज्या ठिकाणी नर्मदा मातेचा उगम झाला अशी मान्यता आहे , आणि ज्या ठिकाणाचे दर्शन न घेताच मला पोलिसांनी हाकलून दिले होते , ते नर्मदा कुंड साक्षात माझ्यासमोर मला दिसत होते ! त्या खोलीपासून केवळ शंभर मिटर अंतरावरती नर्मदा मातेचे उगमस्थान होते ! आपल्याला आश्रमाचे नक्की स्थान कळावे म्हणून नकाशा सोबत जोडत आहे . त्यात आपण पाहू शकता की नर्मदा मातेचे उगम स्थान मानले गेलेले कुंड आश्रमापासून किती जवळ आहे ! आश्रमाच्या मागे सरस्वती / सावित्री आणि गायत्री या नद्यांचा उगम होत होता व त्या लगेच नर्मदेला जाऊन मिळत होत्या .

आता माझ्या लक्षात आले की स्वामीजींनी मला का थांबवून घेतले होते . त्या खोलीमध्ये एक तरुण तमिळ परिक्रमावासी होता . मला तमिळ बोलता येते आहे हे पाहून त्याला खूप आनंद झाला . आणि त्याने मला सांगितले की त्याचे गुरुदेव देखील परिक्रमेमध्ये आहेत आणि नुकतेच या आश्रमामध्ये ते आलेले आहेत . ते देखील एक मोठे संन्यासी होते व त्यांनी पायी परिक्रमा सुरू केली होती . मला गुरु देवांची भेट नक्की घालून देईन असा शब्द देऊन तो त्याच्या कामाला निघून गेला . मी आसन लावून शांत बसून राहिलो . प्रचंड थंडी पडलेली होती . त्यामुळे गुरफटून बसले की बरे वाटायचे . चालून चालून खूप थकल्यामुळे स्नान करावे अशी इच्छा मला होत होती . त्यामुळे मी खाली गेलो आणि पक्क्या बांधकाम केलेल्या बाथरूम मध्ये बर्फासारख्या थंडगार पाण्याने स्नान आटोपले . सोबतचे कपडे धुवून पिळून वाळत टाकले . थंडगार पाण्याने स्नान केल्यामुळे माझी थंडी पळून गेली . बघता बघता संध्याकाळच्या उपासनेची वेळ झाली . मी कमरेला लुंगी गुंडाळून उघडा फिरतो आहे हे पाहून महाराज मला म्हणाले इथे थंडी खूप आहे अंग झाकून घेणे . परंतु दुपारीच स्वामीजींनी मला "अयं न इदं शरीरम् "  मंत्राचा बोध केला होता .त्याप्रमाणे मी वागत होतो . उघड्या अंगानेच उपासना करून घेतली . आणि शिव मंदिरामध्ये होणाऱ्या सामुदायिक उपासने करता जाऊन वाट बघत बसलो .मठातील सर्व सेवेकरी जमा झाले आणि सर्वांनी मिळून शिवमहिम्नस्तोत्र म्हणायला सुरुवात केली . सर्वच जण अंगावर दोन दोन शाली गुंडाळून आलेले होते . कमरेला लुंगी गुंडाळून उघडा बसलेला परिक्रमा वासी पाहून सर्वांना आश्चर्य वाटत आहे हे मला त्यांच्या नजरे कडे पाहून कळत होते . परंतु मला खरोखरच थंडी वाजत नव्हती . किंवा असे म्हणता येईल की थंडी आहे किंवा नाही याच्या पलीकडे माझे शरीर आणि शारीर जाणीवा  गेलेल्या होत्या . स्वतः स्वामीजी देखील संपूर्ण उपासना बसून म्हणून गेले . अतिशय शांत स्वरामध्ये चाललेली ती उपासना खरोखरीच ऐकण्यासारखी होती . आश्रमामध्ये इतके साधक आहेत हे मला उपासनेची संख्या पाहून कळले अन्यथा सर्वजण आपापल्या साधनांमध्ये आणि सेवेमध्ये गुंतलेले होते .आश्रमामध्ये वेदपाठ शाळा होती शिवाय गोसेवा देखील चालत असे त्यामुळे बरेच कर्मचारी होते . ही उपासना झाल्यावर तमिळ संन्यासी महाराजांनी मला भेटण्यासाठी वर बोलावले . यांचे नाव प्रणव स्वरूपानंद सरस्वती महाराज असे होते . त्यांच्या शिष्याचे नाव रंगनाथन असे होते . स्वामीजी अतिशय नम्र साधे व विद्वान होते . त्यांच्या शेजारी जमिनीवर त्यांनी मला बसवून घेतले आणि उपदेश करायला सुरुवात केली . आधी त्यांनी माझा परिक्रमेचा हेतू समजावून घेतला . त्यांनी मला विद्या ,दान आणि तप या तीन गोष्टींचे महत्त्व समजावून सांगितले आणि परिक्रमा निश्चितपणे पूर्ण होईल असा शुभाशीर्वाद दिला . मला तमिळ भाषा लिहिता वाचता बोलता येते आहे हे पाहून स्वामीजींना खूप आनंद वाटला . स्वामी म्हणाले सर्व भाषा एकच भावना व्यक्त करतात . भाषेपेक्षा भाव महत्त्वाचा ! ज्याला भाव कळला त्यालाच देव कळला ! भाषा हे केवळ माध्यम आहे . माझ्या मनामध्ये दान या विषयाबाबत थोडासा किंतु परंतु शिल्लक राहिला होता .वाटेमध्ये आपल्याला मिळालेले पैसे हे लोकांनी दान म्हणून दिलेले आहेत त्याचे पुन्हा दान कसे काय करायचे असे मला क्षणभर वाटले होते .परंतु स्वामीजींनी सांगितल्यामुळे इथून पुढे आलेला प्रत्येक रुपया मी शक्य तितक्या लवकर दान करून मोकळा होत असे ! स्वामीजी तीन वर्षे ,तीन महिने ,तेरा दिवसांची परिक्रमा करीत होते . मी ज्या काठावरील मार्गाने जाणार होतो तोच मार्ग त्यांनी देखील निवडला होता . स्वामीजींचे युट्युब वर चॅनल आहे असे त्यांनी मला सांगितले व ते नेहमी बघत जा असे देखील सांगितले . Tamil Kathopanishad असे YouTube वर शोधले असता स्वामी परमहंसनंद सरस्वती यांची कठोपनिषद या विषयावरील सव्वा ते दीड तास लांबीची शंभर तमीळ प्रवचने आपल्याला आढळतात , हे यांचे गुरुबंधू होत ! ऋषी परंपरा नावाने युट्युब वरती ते क्लासेस घेतात असे देखील त्यांनी मला सांगितले . वाचकांच्या माहिती करता त्यांच्या चॅनल लिंक खाली देत आहे.

https://youtube.com/@parampararishividyabyswami514?si=wUr9b3mktIkushQK

त्यांच्या गुरुपरंपरेचे संकेतस्थळ खालील प्रमाणे .

https://www.parampararishividya.in/

प्रणव स्वरूपानंद सरस्वती स्वामींचे गुरुबंधू स्वामी परमहंसानंद सरस्वती आणि त्यांच्या संपर्काची माहिती
असो .एकंदरीत स्वामींचा संप्रदाय अतिशय विद्वत्ता प्रचूर आणि अभ्यासू होता हे लक्षात येत होते . स्वामींचे वागणे व्रतस्थ होते . आफ्रिकन भोपळ्याचा एक साधा वाडगा त्यांच्याकडे होता . त्यातूनच ते पाणी पीत आणि त्यातच जे काही अन्न मिळेल ते सर्व एकत्र कालवून खात .
स्वामीजी अनवाणी चालत असत . आणि कुठलीही विशेष व्यवस्था मिळेल याची अपेक्षा न करता मिळेल त्या परिस्थितीमध्ये अत्यंत समाधानाने राहत असत. गंमत पाहायला गेले तर आजच्या एका दिवसामध्ये मला रामकुटीच्या महाराजांपासून सोमनाथ गिरी बाबा ,मीरा माई ,नर्मदानंद महाराज आणि आताचे हे संन्यासी महाराज इतक्या थोर महापुरुषांची दर्शने झाली होती ! याचे वर्णन शब्दांमध्ये मी पामर काय करणार ! शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांनी या आनंदाचे वर्णन आधीच करून ठेवलेले आहे !

धन्य आजी दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मीचा शीण गेला ॥
मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे । कदा न सोडावे चरण त्यांचे ॥
त्रिविध तापाची झाली बोळवण । देखिले चरण वैष्णवांचे ॥
एका जनार्दनी घडो त्यांचा संग । न व्हावा वियोग जन्मोजन्मी ॥

रात्री पाठ टेकता क्षणी कधी झोप लागली कळालेच नाही. पहाटे उठून प्रचंड थंडीमध्ये गार पाण्याने अंघोळ करून , उपासना करून निघालो. इतक्यात स्वतः नर्मदानंद स्वामीजी मला आडवे आले आणि म्हणाले , "किधर जा रहे हो ? आज अपने आश्रम मे कन्या भोजन है । उसका भंडारा लेके फिर निकल जाना । " एका तरुण उडिया साधूची परिक्रमा पूर्ण झाली होती आणि त्या निमित्ताने तो कन्या भोजन घालत होता . स्वामीजींनी थांबवल्यावर मग काय !लगेचच मी माझी जोडी एका कोपऱ्यात ठेवून दिली आणि महाराजांच्या पायाशी बसलो . त्या दिवशी त्यांचा खूप अनिर्वचनीय सत्संग मला लाभला .इतक्या त्यांचा एक शहरी शिष्य तिथे आला आणि महाराजांच्या समोर येऊन बसला .महाराज मला म्हणाले , " क्षमा कीजिए । इन को पहले से समय दे चुका हु । लेकिन आप यहा बैठके इनकी संथा सुन सकते है । या आप स्वयं भी इनके साथ संथा बोलेंगे तो मुझे खुशी होगी । "असे म्हणून स्वामींनी त्याला गणपती अथर्वशीर्ष , सप्तशती आणि भगवद्गीतेची संथा दिली . त्यानंतर स्वामीजी भगवद्गीतेवरील काही श्लोकांवर अत्यंत सखोल बोलले . गीता सुगीता कर्तव्या या वाक्यावर त्यांचा पुन्हा पुन्हा भर असे . याचा अर्थ भगवद्गीता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये उतरवली पाहिजे असा होय. महाराजांची काढा पिण्याची वेळ झाली . त्यांनी पुन्हा एकदा आपल्या शिष्याला एका ऐवजी दोन काढे करायला सांगितले . अगदी हुबेहूब योगविहार काढा ! तीच चव !तोच प्रभाव !मला गंमत वाटली . यानंतर महाराज आपल्या आतल्या खोलीमध्ये निघून गेले आणि मला नर्मदा मातेचे अर्थात नर्मदा मातेचे उगमस्थान असलेल्या नर्मदा कुंडाचे दर्शन घेऊन यायला सांगितले . तिथे दर्शन घेताना परिक्रमा खंडित होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची ते देखील महाराजांनी मला सांगितले . काल माझे दर्शन प्रशासनाच्या आगाऊपणामुळे हुकलेले होतेच .त्यामुळे मी धावतच नर्मदा कुंडाकडे निघालो . वरील नकाशात पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की नर्मदा कुंड आश्रमाला अक्षरशः खेटूनच होते . तिथे असलेले पोलीस आणि स्वयंसेवक परिक्रमावासी दिसला की त्याच्या अंगावर धावून जात आणि बाहेर काढत परंतु पर्यटकांना मात्र सर्वत्र मुक्त संचार ठेवला होता . हे माहिती असल्यामुळे जिथून सर्व भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतात ती रांग तोडून मी धावतच कुंडाकडे गेलो आणि पाण्यामध्ये उतरून दर्शन व त्या पुण्य जलाचे आचमन करून घेतले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेमध्ये असलेले सेवेकरी भांबावले परंतु तोपर्यंत माझे नर्मदा कुंडाचे सुरेख दर्शन झालेले होते ! दोघेजण पळतच माझ्या दिशेने आले ,आणि आरडा ओरडा करू लागले . परंतु तोपर्यंत मी माझा कार्यभाग आटोपून घेतलेला होता . ज्या नर्मदा मातेची आजवर मी नाव ऐकलेल्या व न ऐकलेल्या सुद्धा प्रत्येक महापुरुषांनी परिक्रमा केलेली आहे ,तिचे प्रकट उगमस्थान माझ्यासमोर होते ! पांढरा शुभ्र रंग दिलेली ही टुमदार मंदिरे फार सुंदर दिसतात .इथे वर्षभर भाविकांचा राबता असतो . हा संपूर्ण परिसर अतिशय पवित्र , स्वच्छ आणि सुंदर आहे . इथली स्पंदने जगावेगळी आहेत . या मंदिर परिसराची काही छायाचित्रे आपल्या दर्शनाकरिता खाली टाकत आहे .
यातील चार खांबांचा मंडप दिसतो आहे त्याच्या शेजारील मंदिर हे उगम स्थान मानले जाते .
माई की बगिया येथे जरी नर्मदा मातेचा उगम झालेला असला तरी जगाच्या कल्याणा करता भगवान महादेवांनी तिचा प्रवाह वळवून तिला पश्चिम वाहिनी केली ते ठिकाण म्हणजे अमरकंटक येथील हे नर्मदा कुंड होय .
हा संपूर्ण परिसर अतिशय रमणीय आहे आणि इथून हलूच नाही असे इथे आलेल्या प्रत्येक माणसाला वाटते .
साधू संतांचे तर हे माहेरघर आहे . त्यामुळे नर्मदा परिक्रमेमध्ये नसलेले देखील हजारो साधू येथे कायम येत असतात . तिथले पाणी अतिशय स्वच्छ ,शुद्ध व निखळ निवळशंख आहे .
मध्यप्रदेशच्या पाठ्यक्रमामध्ये या उगम स्थानाची माहिती देणारा धडाच शिवराज सिंह चौहान सरकारने समाविष्ट केलेला आहे .
या संपूर्ण परिसराचे विहंगावलोकन केले असता आपल्याला खालील प्रमाणे त्याचा आकार असल्याचे लक्षात येते . या चित्राच्या डाव्या बाजूला दिसणाऱ्या मंदिरांच्या बाजूने परिक्रमावासी येतात आणि दुरूनच कुंडाचे दर्शन घेऊन पुढे माहिती बघूया या स्थानाकडे मार्गस्थ होतात . तिथून वळसा मारून आल्यावर पुन्हा निळ्या रंगाचा पत्रा दिसतो आहे तेथून आत येतात आणि कुंडाचे दर्शन घेऊन पुन्हा खालच्या दिशेने मार्गस्थ होतात .वरील चित्रामध्ये संपूर्ण दर्शन या शब्दातील "र्ण" हे अक्षर ज्या वास्तूला टेकले आहे , तोच गीता स्वाध्याय आश्रम आणि अगदी त्याच खोलीमध्ये माझा मुक्काम होता ! 
या संपूर्ण परिसरामध्ये छोटी मोठी सुमारे २४मंदिरे आहेत परंतु त्या सर्वांचे दर्शन परिक्रमावासी घेऊ शकत नाहीत . इथे चुकून परिक्रमा खंडित झाल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे पदोपदी स्थानक लोक तुम्हाला सावध करताना दिसतात .तिथे तशा पाट्या देखील लावलेल्या आहेत . विशेषतः नर्मदेचा दक्षिण तट आणि उत्तर तट स्पष्टपणे दाखवणारी एक रेखाच इथे जमिनीवर आखलेली आहे . 

नर्मदा मातेचे येथील मूळ उगम स्थान वरील प्रमाणे आहे .
इथे असलेल्या एका हत्तीच्या शिल्पा खालून निघण्याची चढाओढ भाविकांमध्ये नेहमी पाहायला मिळते . माझ्या दिशेने धावत आलेल्या दोन्ही पुजाऱ्यांना मी गीता स्वाध्याय मंदिरामध्ये उतरलेला असून महाराजांनी मला पाठवले आहेत असे सांगितल्यावर त्यांचे समाधान झाले .मग ते म्हणाले पहिले बताया होता तो हम स्वयं आपको दर्शन करा के लाते । त्यांच्या धावत येण्यामागचा हेतू त्यांनी सांगितला . बरेच लोक अमरकंटक येथे परिक्रमा उचलतात . त्यांचा फारसा प्रश्न नाही परंतु ओंकारेश्वर येथे परिक्रमा उचलून लांब वर चालत आलेल्या लोकांना मात्र अमरकंटक येथे परिक्रमा सहज खंडित होते याची कल्पना येत नाही . नर्मदेचे भव्य दिव्य स्वरूप पहात ते उलटे वरती आलेले असतात .आपण पाहिलेली नर्मदा माता इतक्या बाल स्वरूपामध्ये असेल अशी स्वप्नात देखील कल्पना ते करू शकत नाहीत आणि त्यामुळे कळत नकळत त्यांच्याकडून दक्षिण आणि उत्तर तट वेगळा करणारी रेखा पार होते . ती होऊ नये म्हणून परिक्रमावासींना या परिसरामध्ये जवळपास बंदीच केली आहे असे म्हटले तरी चालेल ! पदोपदी तुम्हाला लोक आठवण करून देतात की बाबाजी इसके आगे मत जाओ ! हे दर्शन झाल्यावर समोरच असलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह मी पाहून आलो . हा मात्र दक्षिण तटावर असल्यामुळे आपण बघू शकतो . खरे म्हणजे यवन आक्रमकानी तोडफोड केलेली ही पुरातन मंदिरे आहेत .
भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली हा मंदिर समूह अतिशय सुंदर पद्धतीने जतन करण्यात आलेला आहे . कलचुरी वंशातील शासक राजा कर्णदेव याने अकरावे शतकामध्ये ही मंदिरे बांधली अशी मान्यता आहे .
या परिसरातील प्रत्येक कुंडावर नर्मदा मातेचे मूळ उगमस्थान अशी पाटी लावलेली आपल्याला आढळते आणि याच कारणासाठी आपले पूर्वज सांगत असतात की ऋषीचे कूळ आणि नदीचे मूळ शोधायला जाऊ नये .शहाण्या माणसाला त्यातून काहीही हाती लागत नाही . आणि तसेही मुळात भौगोलिक दृष्ट्या पाहायला गेले तर नदीचा उगम ज्या ठिकाणी होतो ते पठार मुळातच पाण्याने संपृक्त असते त्यामुळे अनेक ठिकाणावरून पाण्याचे स्त्रोत बाहेर पडत असतात आणि ते एकत्र होऊन नदीचे स्वरूप घेत असतात त्यामुळे अनेक कुंडे असणे स्वाभाविक आहे .

इथे शासनाने सुरेख बगीचा उभा केला असून तिथे अनेक लोक येत असतात .या संपूर्ण परिसराला पाहण्यासाठी तिकीट लावलेले असून परिक्रमावासींना मात्र मोफत प्रवेश देतात .संपूर्ण परिक्रमे दरम्यान परिक्रमावासींकडून कुठेही तिकीट आकारले जात नाही .
या अतिशय सुरेख मंदिरांचा आणि त्यातील मूर्तींचा मुसलमानी शासकांनी प्रचंड विध्वंस केलेला स्पष्टपणे दिसत होता .ते पाहून मन विषण्ण होत होते . वर्षानुवर्षे उघडपणे काही ठराविक लोकांनी हिंदू धर्मातील व्यक्त प्रतिकांची विटंबना केलेली स्पष्टपणे आपल्याला दिसते तरी देखील आपला समाज उघड्या डोळ्यांनी सत्य स्वीकारायला तयार होत नाही याचे वाईट वाटते . निदान जे घडलेले आहे ते स्वीकारायला काय हरकत आहे . त्या उपर तुम्ही प्रतिक्रिया काय द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे .ज्याच्या त्याच्या संस्काराप्रमाणे जडणघडणीप्रमाणे तो वागेलच. असो . मी गीता स्वाध्याय आश्रमामध्ये परत आलो . प्रचंड थंडी पडलेली होती . सर्वत्र धुके दाटलेले होते . किती वाजले आहेत याचा अंदाज येणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती . इकडे ओडिया साधूची कन्या भोजनाची लगबग सुरू होती .त्याने स्वतःच्या हाताने सर्व स्वयंपाक सिद्ध केला होता .शिरापुरीचा बेत होता .तो मला म्हणाला बाबाजी चलिये नर्मदा मैया को नैवेद्य चढा कर आते है ।मग काय मी पुन्हा त्याच्यासोबत नर्मदा कुंडा मध्ये गेलो . याला तिथे राहून काही दिवस झालेले असल्यामुळे पुजारी लोक ओळखत होते .त्यामुळे यावेळेस आम्हाला कोणी अडवले नाही आणि आम्ही थेट नर्मदा कुंडा पर्यंत गेलो . त्याने अतिशय प्रेमाने नर्मदा मातेला नैवेद्य दाखविला आणि आपल्या हाताने एक एक घास पाण्यामध्ये भरवू लागला . जणु काही ती आ वासून खाते आहे ! नंतर त्याने मला देखील नर्मदा मातेला घास भरवण्याची विनंती केली . मला एक क्षणभर ते या कुंडाचे प्रदूषण वाटले . कारण या कुंडामध्ये कुठलाही जीव जंतू अजून मला दिसलेला नव्हता . इतक्यात एक मोठा मासा मला पाण्यामध्ये दिसला ! किती मोठा असावा ? त्याची लांबी चार ते पाच फूट आणि रुंदी अर्धा फूट होती ! रंगाने मासा काळा कुळकुळीत होता . त्याचा भव्य आकार पाहून क्षणभर मला भीती वाटली .आणि इतक्या छोट्याशा कुंडामध्ये इतका मोठा मासा कसा काय राहतो आहे याचे देखील मला आश्चर्य वाटले . ओडिया साधुला मात्र तो मासा दाखवून देखील दिसला नाही . त्यानंतर आम्ही आश्रमामध्ये परत आल्यावर मी स्वामींना सांगितले की मी असा असा मासा पाहिला . स्वामीजी म्हणाले , "बहुत बढीया । देख लिया तुमने उस मछली को ? बहुत से लोग है जिनकी पूरी उमर अमरकंटक मे बीत गई , लेकिन उन्हे वह मछली आज तक दिखी नही है । " मला मौजच वाटली . इतक्या छोट्या कुंडामध्ये इतका मोठा मासा आणि लोकांना दिसत नाही यामध्ये त्या माशाचे कौशल्य किती भन्नाट आहे पहा !असो . अशा गमती जमती परिक्रमेमध्ये घडतच असतात . त्यांत परिक्रमावासी साधकांनी फारसे अडकायचे नसते .
कन्या भोजनाची वेळ झाल्यावर अचानक कुठून तरी २५ -३० कुमारिका गोळा झाल्या . मला पंगत वाढायची इच्छा होती परंतु महाराजांनी प्रसाद घ्यायला सांगितले . ओडिया साधूने अक्षरशः आपल्या हाताने प्रत्येक मुलीला एक एक घास भरवला . नर्मदा खंडातील छोट्या मुली तशा लाजाळू असतात परंतु कन्या भोजनाच्या दिवशी मात्र अतिशय धिटाईने वागतात !  जणू काही साक्षात नर्मदा माता त्यांच्या अंगामध्ये संचारलेली असते !  ते प्रेमळ कन्याभोजन पाहिले आणि तृप्त होऊन मी सर्वांची रजा घेतली . निघताना आश्रमाचा सही शिक्का एका साधूने मारून दिला .
माझ्या वहीमध्ये गीता स्वाध्याय मंदिराचा मारलेला शिक्का
 अशा पद्धतीने माझ्या नर्मदा परिक्रमेचा पंधरावा मुक्काम आनंदाचा घडला .  माझे वेळेचे गणित आधीच फार पुढे गेलेले होते ! आणि पुढे काय काय वाढून ठेवले आहे याची मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती !

लेखांक अठ्ठावीस समाप्त (क्रमशः )





टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर