लेखांक २७ : नर्मदेचे उगमस्थान श्री क्षेत्र अमरकंटक
मीरा माईंचे दर्शन घेतल्यानंतर मी सोबतच्या सर्वांना सांगितले की त्यांनी कृपया पुढे निघून जावे कारण मला एकट्याने चालायचे आहे .माझ्या विनंतीला मान देत सर्वजण पुढे निघून गेले आणि मी थोडा वेळ नर्मदा मातेचे ते बालरूप न्याहाळत बसलो . माझा अजूनही डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण इतकी लहान नर्मदा माता मी कधी पाहिलीच नव्हती ! काही ठिकाणी तर तिचे पात्र केवळ एक ते दीड फूट रुंदीचे होते .काठावरून जाताना तोल गेला तरी मनुष्य पलीकडे जाईल इतके सहज सोपे !
नर्मदा पुराण मध्ये असा उल्लेख आहे की इथे एका बांबूच्या झाडाच्या मुळापासून नर्मदा मातेचा उगम झालेला आहे . आता ते झाड शिल्लक नाही परंतु उगम स्थान शिल्लक आहे . एका छोट्याशा कुंडामध्ये करंगळी भर धारेतून नर्मदा मातेचा उगम होतो . परंतु हे स्थान थोडेसे मागच्या बाजूला आणि लपलेले राहते . शक्यतो तिथले पुजारी लोक या स्थानाचे दर्शन घेऊ देत नाहीत .
माई की बगिया कडून पक्क्या रस्त्याने घनदाट अरण्यातून चालताना आपण नर्मदेला डोक्याच्या बाजूने परिक्रमा पूर्ण करतो .आणि तो रस्ता हळूहळू वळत आपल्याला सोनमुडा या गावामध्ये घेऊन येतो .
होय ,हा छोटासा झरा म्हणजे नर्मदा नदीच आहे !
इथे घनदाट अरण्य होते आणि झाडी खूप उंच व सदाहरित वाटत होती . इथे मला रस्त्याच्या कडेला टाकळा या झुडुपाची खूप सारी झाडे दिसली व भरपूर बिया देखील मिळाल्या .
नर्मदा नदीला समांतर असा एक रस्ता अमरकंटक पर्यंत गेलेला आहे . तो रस्ता धरून मी अमरकंटकची दिशा पकडली . मध्ये स्वामी विवेकानंदांचे एक केंद्र लागले . श्री रामकृष्ण कुटीर असे त्याचे नाव आहे .
इथे आत रामकृष्णांचे मंदिर आहे . स्वामी विवेकानंदांची एक मूर्ती आहे . काही खोल्या देखील आहेत .या संस्थेचा रामकृष्ण मठाशी काही संबंध नाही असो . मी बाहेरून आवाज दिला परंतु आतील साधूने केंद्र बंद असल्याचे खुणेनेच सांगितले . मग मी पुढे चालण्यास सुरुवात केली .इथून अमरकंटक साधारण एक किलोमीटर उरते .
अतिशय लघुरूपत वाहणारी नर्मदा बांध घातल्यामुळे येथे एकदम शंभर दोनशे पट रुंद होते .
अचानक रुंदावलेले नर्मदेचे पात्र
कपिलधारा ते अमरकंटक हे सहा किलोमीटरचे अंतर चालण्यासाठी अतिशय रम्य व सुंदर आहे . घनदाट झाडांच्या सावलीतून चालताना उजव्या हाताला वाहणाऱ्या नर्मदा मातेचा अवखळ खळखळाट सतत कानावर पडत राहतो . घरात असलेली एखादी खोडकर कन्या सतत खदाखदा हसत असते तसा काहीसा तो आवाज वाटतो ! इकडे अमरकंटक मध्ये मात्र रस्त्यावरती सर्व शुकशुकाट दिसू लागला . चौकशी अंती असे लक्षात आले की अमरकंटक प्रशासनाने अमरकंटक पुरता लॉकडाऊन जाहीर केला आहे . मी माझी चालण्याची गती वाढवली .मला मध्येच कोणीतरी पोलिसांनी वगैरे उचलावे आणि घरी पाठवून द्यावे असे होऊ देण्याची इच्छा अजिबात नव्हती . अमरकंटक गावामध्ये अनेक छोटे मोठे आश्रम आहेत .दक्षिण भारतीय पद्धतीने बनविलेला कल्याण सेवाश्रम ,मृत्युंजय आश्रम ,बर्फानी बाबा यांचा आश्रम ,राम मंदिर , फलाहरी बाबांचा आश्रम , गुरुद्वारा ,गीता स्वाध्याय आश्रम असे अनेक प्रसिद्ध आश्रम आहेत . अमरकंटक हे अतिशय प्राचीन शहर आहे हे तेथील मंदिरे पाहताना आपल्याला जाणवते . या शहरामध्ये एक जबरदस्त ऊर्जा तुम्हाला पदोपदी जाणवते . ही खरोखरीच पुण्यभूमी आहे हे कोणालाही चटकन लक्षात येते . नर्मदा पुराणा मध्ये देखील अमरकंटक या क्षेत्राचे खूप वर्णन केलेले आहे. असो .पोलीस सर्वत्र रविवारचा बाजार हटवत आणि लोकांना मास्क घालण्याची सक्ती करत हाकलून लावत होते . त्यांच्या नजरा चुकवत मी कसा बसा मृत्युंजय आश्रम गाठला . आश्रमाचे प्रवेशद्वार भव्यदिव्य होते . तिथे एका यात्रेकरू ने द्वारपालाच्या शिल्पा शेजारी उभे करून माझा फोटो काढला आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिला .
आत मध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला व्यवस्थापकांचा कक्ष होता आणि उजव्या हाताला मोठ्या लांबोळक्या खोल्या बांधून परिक्रमावासींची उतरण्याची उत्तम सोय केलेली होती . परिसर अतिशय औरस चौरस होता आणि सुंदर असा बगीचा देखील तिथे निर्माण केला होता .
मी वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये गेलो . आत मध्ये भरपूर फोमच्या गाद्या ठेवलेल्या होत्या . थंडीमुळे आणि डोंगर चढून आल्यामुळे पाय दुखत होते . मला आनंद झाला की चला आता आपल्याला पाठ टेकायला हक्काची जागा मिळाली . परंतु तो फार काळ काही टिकला नाही . कारण भोजन प्रसाद घेण्यासाठी आम्हाला सर्वांना खालून आवाज दिला गेला .
आश्रमाचा परिसर खूप मोठा होता .साधारण त्याच्यामध्य भागी एक मोठे सभागृह उजव्या हाताला होते जिथे भोजन व्यवस्था केली होती . तत्पूर्वी हात धुण्याची आणि पिण्याच्या पाण्याची खूप मोठी व्यवस्था तिथे केलेली होती . भोजन अतिशय अप्रतिम होते . तरुण मुले वाढत होती . रोटीराम (चपाती ) ,सब्जी राम (भाजी) , दालराम (आमटी ) ,लंका (मिर्ची ) ,राम रस (मीठ ) , महाप्रशाद (भात ) इत्यादी सर्व शब्द आता मला माहिती झाले होते . आज अजून एक नवीन शब्द कळाला . महापूरण . अर्थात यानंतर पुन्हा काही वाढले जाणार नाही आणि भोजन पूर्ण झाले असे मानले जाईल याची सूचना . मेरा भोजन हो गया असे न म्हणता हम महापुरण हो गये असे म्हणायचे . इथे भोजन प्रसाद घ्यायला भरपूर लोक उपस्थित होते . एक अतिशय तेजस्वी गोरेपान आणि धिप्पाड संन्यासी माझ्यासमोर भोजन प्रसाद घेण्यासाठी बसले होते . ते त्या आश्रमाचे प्रमुख होते . भोजन प्रसाद घेऊन झाल्यावर मी सवयीप्रमाणे ताटामध्येच हात धुवून ते पाणी ताट स्वच्छ करून पिऊन घेतले . याच्यामुळे फायदा असा व्हायचा की ताट देखील स्वच्छ व्हायचे , पाणी कमी लागायचे आणि अन्न वाया जायचे नाही .
बाहेर काही म्हातारे परिक्रमा वासी उन्हामध्ये बसले होते . परंतु थंडी एवढी भयानक होते की ते ऊन देखील पुरेसे वाटत नव्हते त्यामुळे आश्रमाच्या मुख्य दरवाज्यापाशी केलेल्या एका मोठ्या ओंडक्याच्या शेकोटी जवळ जाऊन मी शेकत बसलो . आयुष्यात प्रथमच मी भर दुपारी इतकी थंडी अनुभवत होतो . इतक्यात ते तेजस्वी साधू आले आणि मला म्हणाले बाबाजी आप आगे निकल जाना क्योंकि अमरकंटक मे लॉकडाऊन लग चुका है । पुलीस कभी भी आ सकती है और सब को अपने अपने घर भेज सकती है । जितना जल्दी हो सके जंगल के रस्ते लग जाना । जहा पे कोई आपको सताने के लिए नही आ सकता । त्यांचे हे शब्द ऐकले मात्र माझी झोपच उडाली आणि धावतच वरती जाऊन मी सर्व सामान उचलले काठी उचलली आणि नर्मदे हर करून मृत्युंजय आश्रमाची रजा घेतली . इथून थोडेसे चालल्यावरच नर्मदा मातेचे अतिशय सुंदर असे मंदिर अमरकंटकच्या मधोमध आहे . संपूर्ण अमरकंटक शहरामध्ये हजारो मंदिरे असून त्यांचे कळस मनोरे अतिशय मनोहर दिसतात . मी त्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न केला असता मला बाहेरच पोलिसांनी अडविले . आणि या मंदिरामध्ये सध्या कोणालाही प्रवेश नसल्याचे त्यांनी सांगितले . मला थोडेसे वाईट वाटले कारण नर्मदा मातेचे जे उगम स्थान आहे ,त्याचेच दर्शन जर होणार नसेल तर परिक्रमेचा उपयोग तरी काय असे मला वाटू लागले . परंतु देश काल परिस्थिती पुढे निरुपाय होता त्यामुळे मी पुढे चालायला लागलो . तसेच याच मंदिराला समोरच्या तटावरून देखील जाता येते असे मला एका दुकानदाराने सांगितले .ती आशा मनामध्ये जागी ठेवून पुढे निघालो .इथे मोठी बाजारपेठ आहे परंतु पोलीस येऊन सर्व दुकाने बंद करत होते . त्यामुळे मी अत्यंत गतीने पुढे निघालो . इतक्यात मला कोणीतरी सांगितले की इथे नर्मदा ओलांडायची नसते तर इथून दोन किलोमीटर पुढे जंगलामध्ये माई की बगिया नावाचे स्थान आहे इथे जाऊन वळसा मारावा लागतो . मी ताबडतोब पाय उचलला आणि माई की बगिया च्या दिशेने चालू लागलो .
मध्ये एक छोटेसे तलाव वजा पाणी साठलेले होते तिथे मला कालचा रात्री भांडण करून निघून गेलेला साधू बसलेला दिसला ! मी त्याला जोरात ओरडून आवाज दिला बाबाजी कैसे हो ? माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल कुठलाही राग द्वेष कुठलीही भावना नव्हती . परंतु मला पाहताच तलावाच्या काठावर बसलेल्या त्या साधून आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये मुंडके घालून घेतले आणि माझ्याकडे पाठ फिरवली . त्याची ही देहबोली पाहता त्याला माझ्याशी बोलण्यात काही रस नाही हे माझ्या लक्षात आले आणि मी पुढे जंगलातील मार्ग पकडला .काल मला मारून टाकण्याची धमकी देणारा माणूस आज अशा पद्धतीने भयभीत होऊन बसलेला पाहिला आणि मौज वाटली . माझ्यासोबत अजूनही काही परिक्रमावासी तिकडे निघाले होते .त्यातील एक तेजस्वी तरुण मुलगा होता ज्याने पायामध्ये पादत्राणे न घालता परिक्रमा सुरू ठेवली होती . त्याच्याशी थोडेफार बोलत मी चालत राहिलो . या संपूर्ण परिसरामध्ये एका ठरलेल्या मार्गाने चालावे लागते . कारण इथे नर्मदा मैया भूमिगत रूपामध्ये आहे आणि ओलांडली जाऊ नये याकरता मार्ग आखून ठेवलेला आहे .हळूहळू आजूबाजूचे अरण्य घनदाट होत गेले . एका मोठ्या झाडाखाली एक आदिवासी मनुष्य बसला होता त्याने सांगितले इथे तुमच्या जवळच्या सगळ्या उदबत्त्या पेटवून टाका . त्याप्रमाणे केले . आज परिक्रमा सुरू करून केवळ १४ दिवस झाले होते आणि साक्षात नर्मदा मातेचे उगमस्थान माझ्यासमोर दिसू लागले होते या नुसत्या कल्पनेने डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रु वाहू लागले . उजव्या हाताला एक छोटेसे हनुमान कुंड होते त्याला वंदन करून धावतच थोडेसे चढावर असलेले नर्मदा मातेचे मूळ उगमस्थान गाठले .
नर्मदा पुराण मध्ये असा उल्लेख आहे की इथे एका बांबूच्या झाडाच्या मुळापासून नर्मदा मातेचा उगम झालेला आहे . आता ते झाड शिल्लक नाही परंतु उगम स्थान शिल्लक आहे . एका छोट्याशा कुंडामध्ये करंगळी भर धारेतून नर्मदा मातेचा उगम होतो . परंतु हे स्थान थोडेसे मागच्या बाजूला आणि लपलेले राहते . शक्यतो तिथले पुजारी लोक या स्थानाचे दर्शन घेऊ देत नाहीत .
केवळ अमरकंटक क्षेत्रातच नर्मदा मातेचे उगमस्थान आहे असे सांगितले जाणारी पाच सात कुंडे आहेत ,आणि ते स्वाभाविक आहे कारण बरेचदा नदीचा उगम एका धारेचा नसतो तर अनेक उमाळे त्या भागामध्ये असतात परंतु तरीदेखील पौराणिक मान्यता पाहता त्यातील सर्वात महत्त्वाचे आणि पहिले कुंड खालील छायाचित्रामध्ये दिसते आहे .
इथून तेच नर्मदा जल एका छोट्याशा भूमीगत नाळीद्वारे आधी एका तीन चार फूट आकाराच्या मध्यम कुंडामध्ये आणले आहे आणि मग तिथून पुढे पुन्हा खालच्या खाली एका पाच फूट बाय पाच फूट मापाच्या साडेतीन-चार फूट खोल हौदवजा कुंडा मध्ये आणलेले दिसते. परिक्रमा वसींना फक्त या कुंडाचे दर्शन घडवले जाते .मला सुदैवाने मोहन साधूने आधीच सर्व सांगितले असल्यामुळे मी विनंती करून सर्व कुंडांचे दर्शन घेतले .
इथे देखील साधारण अंगठ्याएवढी जाड धारा आपल्याला दिसते आणि बाहेर पडताना मात्र चांगली सहा इंच धारा बाहेर पडते .या कुंडामध्ये एक शिवलिंग स्थापित केलेले आहे . लोक या कुंडामध्ये दक्षिणा टाकत राहतात .
इथे आपण स्पष्टपणे पाहू शकतो की नर्मदा मातेचा उगम झाल्यानंतर ती भारतातील सर्व नद्यांप्रमाणेच पूर्व दिशेला प्रवाहित होत आहे . परंतु या नर्मदा कुंडातून खाली ते जल हनुमान कुंडामध्ये नेले आहे आणि हनुमान कुंडामध्ये मात्र ती लुप्त होते . माझे असे स्पष्ट मत आहे की या हनुमान कुंडातून भगवान महादेवांनी नर्मदा मातेचे जल पश्चिम दिशेला नेले आणि अमरकंटक क्षेत्रातील नर्मदा कुंडा मध्ये प्रवाहित केले . माई की बगिया येथील अन्य कुंडांपेक्षा हनुमान कुंडाची पातळी खाली आहे .
या दोन्ही स्थानांचा नकाशा आपल्याला अवलोकनासाठी सोबत जोडत आहे म्हणजे आपल्याला नक्की काय प्रकार आहे ते लगेच लक्षात येईल .
सोबतच्या चित्रामध्ये लाल चौकटीमध्ये माई की बगिया आणि अमरकंटक येथील नर्मदा कुंड दाखवलेले आहे . तसेच निळ्या बाणांनी नर्मदा मातेचा प्रवाह दाखविला आहे . केशरी बाण परिक्रमेचा मार्ग दाखवितात .इथे आपल्याला स्पष्टपणे दिसते की माई की बगिया इथे अदृश्य झालेली नर्मदा थेट अमरकंटक मध्ये प्रकट होते .
महादेवांनी आपल्या अभियांत्रिकी सामर्थ्याने प्रयत्नपूर्वक पूर्ववाहिनी नर्मदा मातेला पश्चिम वाहिनी केले आणि पश्चिम भारताचा उद्धार केला असे म्हणायला पुरेसा वाव आहे . अन्यथा गुजरात , मध्य प्रदेश या भागामध्ये अशी कुठलीही मोठी नदी मुळीच नाही . वाटेत येणारे विंध्य पर्वत , सातपुडा पर्वत आणि सह्याद्री पर्वत , या पश्चिम वाहिनी नर्मदा मातेला वाहण्यासाठी जागोजागी फोडल्यासारखे वाटतात . ही देखील कामगिरी महादेवांचीच असावी असा माझा कयास आहे . पुढे खचदऱ्या या नर्मदा मातेने खोल केल्या हे जरी मान्य केले तरी पहिला प्रवाह वाहण्यासाठी ज्या कोणी , जे काही कष्ट घेतले आहेत , ते निःसंशयपणे महादेवांचेच आहेत म्हणूनच महादेवांची कन्या हे नाव नर्मदा मातेला पुरेपूर शोभते ! आज कच्छ , संपूर्ण गुजरात , बहुतांश मध्य प्रदेश ,इंदोर, भोपाळ , उज्जैन सारखी मोठी शहरे , महाराष्ट्रातील धुळे , नंदुरबार ते अगदी राजस्थानातील जयपूर पर्यंत नर्मदेचे पाणी गेलेले आहे . महादेवांची दूरदृष्टी येथे आपल्याला दिसून येते . असो . तर अशा या नर्मदा मातेच्या मूळ उगम स्थानी गेल्यावर तिथल्या पुजाऱ्यांना नमस्कार केला . त्यांनी नर्मदा मातेची बाटली मागितली . बाटली त्यांना दिल्यावर त्यातील अर्धे जल त्यांनी नर्मदेच्या उगम कुंडामध्ये प्रवाहित केले व उगमकुंडातील जल काढून बाटली संपूर्ण भरून दिली . तिथे त्यांनी मंत्र उच्चारण करीत थोडीशी पूजा करविली मी देखील स्वखुशीने काही दक्षिणा त्यांच्या हातावर टेकवली .बहुतेक १०१ रुपये दिले असे मला आठवते . त्यानंतर मी जेव्हा बांबूच्या बेटात उगम पावलेल्या नर्मदा माते बद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी मागे असलेल्या कुंडाचे दर्शन घ्यायला सांगितले . इथे नर्मदेचे पाणी अतिशय नितळ निर्मळ स्वच्छ सुंदर आणि अद्भुत होते ! या संपूर्ण परिसरामध्ये एक अद्भुत ऊर्जा भरून उरली होती ! करोडो लोकांची तहान भागवणारी , करोडो लोकांची जीवनदायीनी , लाखो साधकांची आधारभूत नर्मदा माता येथे उगम पावत होती ! हे स्थान काही साधारण नव्हे ! या स्थानाचे महात्म्य केवळ अद्भुत आहे !
नंतर पुजारी पुन्हा माझ्याकडे आले आणि इथे कन्याभोजन करण्याचे त्यांनी मला सुचवले .परंतु लॉकडाऊन सुरू असल्यामुळे तुम्ही पुढे निघून जा मी तुमच्या नावे कन्या भोजन करतो असे त्यांनी मला सांगितल्यामुळे तिथेच केलेल्या एका छोट्याशा ऑफिस वजा टपरी मध्ये जाऊन मी दक्षिणेची पावती फाडली आणि पुढे मार्गस्थ झालो .
कन्या भोजन करविण्यासाठी पावती फाडली ती जागा
कन्या भोजन करविण्यासाठी पावती फाडली ती जागा
खरे तर इथे मुक्कामच करायला हवा ! तशी सोय देखील इथे आहे . परंतु अमरकंटक पोलिसांनी सगळा खेळ बिघडवून टाकला होता . त्यामुळे पंडिताने देखील आम्हाला लवकरात लवकर अमरकंटक सोडून पुढे जाण्याची विनंती केली . नर्मदा परिक्रमे साठी निघालेले परिक्रमावासी हातचे न राखता दान धर्म करतात हे माहिती असल्यामुळे क्षेत्र पंडे त्याचा व्यवस्थित लाभ उठवितात असे माझ्या लक्षात आले . इथे पुणे मुंबई भागातून आलेले काही परिक्रमा वाशी भेटले . हे सर्वजण गाडीने आलेले होते . दरम्यान एका पंडिताने माझ्या वहीमध्ये आश्रमाचा शिक्का मारून दिला .
वरच्या बाजूला एक जुना आश्रम आहे . या आश्रमाचे नाव तुरिया आश्रम असे आहे . परंतु हा देखील पूर्णपणे बंद होता आणि इथून देखील पुढे जाण्यासाठी मला सांगण्यात आले .
या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी असते .इथे कायम उत्सवाचे वातावरण असते . हा भाग उंच सखल असल्यामुळे मोठ्या मोठ्या पायऱ्या येथे केलेल्या आहेत त्यावर बसलेले लोक तुम्हाला दिसतात . आत्तासुद्धा लॉकडाऊन असून देखील बऱ्यापैकी गर्दी दिसत होती . या क्षेत्राची काही छायाचित्रे आपल्या माहितीकरता इंटरनेटवरून डाऊनलोड करून टाकत आहे .
इथून पुढे निघून जाण्याचा निर्णय घेऊन मी जंगलातील मार्ग पुन्हा एकदा पकडला .इथले जंगल फारच घनदाट असून अतिशय उंच उंच झाडे आहेत .या बाजूने मात्र माहिती बघूया कडे येणारा रस्त्याचा मार्ग मला लागला . पर्यटकांचे विचित्र चाळे पहात चालत राहिलो . सध्या मोबाईल मुळे आणि सोशल मीडियामुळे रिल्स वगैरे बनविण्याचे आणि सेल्फी काढण्याचे प्रमाण फार वाढले आहे त्याचा इतरांना उपद्रव होतो आहे याचे देखील भान लोकांना राहिलेले नाही . नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार भारतामध्ये जगातील सर्वात जास्त रिल्स पाहणारे लोक आहेत . इथे दर मिनिटाला ६६ लाख नवे रील्स अपलोड केले जातात अशी बातमी आज तक वर नुकतीच लागली होती ! असो . मी सोबत मोबाईल नावाचे चेटूक आणले नव्हते याचा मला आनंदच वाटला . इथून पुढे सोनमुडा या गावांमध्ये शोण नदीचे उगम स्थान बघायचे होते . या शोण नदीबद्दल आणि सोनभद्र राजा बद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत . हा खरे तर या देशाचा राजा होता आणि त्याला नर्मदेशी विवाह करायचा होता परंतु महादेवामुळे दोघांचा विवाह काही होऊ शकला नाही त्यामुळे त्याने दरीमध्ये उडी मारली . अशी कथा नर्मदा पुराणा मध्ये येते . इथे आपण एक गोष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे . जगातील प्रत्येक भागामध्ये इतिहासाची नोंद करून ठेवण्याची पद्धत आहे . ब्रिटिश किंवा पाश्चात्य इतिहासकार ही नोंद लेखी स्वरुपात करून ठेवतात . भारतीय परंपरांमध्ये इतिहासाची नोंद ही कथा पुराणे अथवा शिल्पकृती मधून करून ठेवण्याची प्रथा आहे . भारतीय लिखाण हे प्रतीकात्मक असते आणि त्याचा अर्थ कळायला फार तीव्र बुद्धिमत्ता लागते . आता हेच उदाहरण पाहूया म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल . सोन नदी आणि नर्मदा नदी यांचे मिलन होऊन एक मोठी नदी पूर्ववाहिनी होण्याची शक्यता होती .परंतु अशी भेट होण्यापूर्वीच महादेवांनी नर्मदेचा प्रवाह पश्चिमेकडे वळविल्यामुळे त्यांचा विरह झाला आणि दोन वेगळ्या नद्या निर्माण झाल्या . शोण नदी उगमा नंतर लगेच खोल दरीमध्ये धबधब्याच्या स्वरूपात पडते .हे दृश्य फार सुंदर असून ते नीट दिसावे म्हणून तेथे एका सेल्फी पॉइंटची निर्मिती मध्य प्रदेश पर्यटन विभागाने केलेली आहे . हेच भौगोलिक वास्तव कथेच्या स्वरूपात गुंफलेले आपल्याला आढळते . याच परिसरामध्ये पार्वतीचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे. सोनाक्षी अथवा शोणाक्षी माता असे तिचे नाव असून सती रूपामध्ये तिचे उजवे नितंब येथे पडले अशी आख्यायिका आहे . हा संपूर्ण परिसर अतिशय ऊर्जा युक्त जाणवतो .
शोण उगम स्थान ( भद्रसेन राजा )
माई की बगिया कडून पक्क्या रस्त्याने घनदाट अरण्यातून चालताना आपण नर्मदेला डोक्याच्या बाजूने परिक्रमा पूर्ण करतो .आणि तो रस्ता हळूहळू वळत आपल्याला सोनमुडा या गावामध्ये घेऊन येतो .
इथे बाहेर थोडाफार बाजार भरलेला . खाण्यापिण्याची वगैरे छोटी मोठी दुकाने येथे आहेत .इथून डावीकडे खालच्या बाजूला भरपूर पायऱ्या उतरून गेल्यावर आपल्याला सोनाक्षी मातेचे मंदिर आणि सोन नदीचा उगम लागतो .
इथेच एक भव्य मारुतीचे मंदिर असून तिथे एक तेजस्वी जटाधारी साधू बसलेले दिसले .
इथून अजून खाली गेल्यावर आपल्या उजव्या हाताने शोण नदी छोट्या झर्याच्या स्वरूपात वाहताना दिसते . आणि बघता बघता ती समोरच्या अथांग जंगलामध्ये खोल दरीत झेप घेते .
इथून समोर दिसणारे दृश्य अतिशय विहंगम असे आहे . आपली जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत घनदाट झाडी आपल्याला दिसते .
ही झाडी इतकी घनदाट आहे की इथे वन्य श्वापदांना सुद्धा फिरताना त्रास होत असेल .
इथून नदी खाली झेपावते ते नीट पाहता यावे म्हणून मध्य प्रदेश पर्यटन विकास मंडळाने येथे एका सेल्फी पॉइंट गॅलरी ची निर्मिती केलेली आहे .
आजकाल प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल असल्यामुळे इथे सतत गर्दी असते . जो तो इथे जाऊन सेल्फी काढण्यामध्ये रममाण झालेला आपल्याला दिसतो .
इथे मोठ्या प्रमाणामध्ये माकडे आणि वानरे दिसून येतात . पर्यटकांची या माकडांशी , माकड चाळ्यांची स्पर्धाच जणू सुरू असते ! इथे मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळेच आर्द्रता देखील भरपूर असते आणि त्यामुळे भिंतीवर ,मंदिराच्या कळसावर , सर्वत्र शेवाळे साठलेले दिसते .
इथल्या सर्व मंदिरांची शांतचित्ताने दर्शने घेत मी हळूहळू पायऱ्या चढत पुन्हा वरच्या रस्त्याला आलो. आणि अमरकंटकच्या दिशेने चालू लागलो . मुखाने नर्मदा मातेचे नामस्मरण सुरूच होते . परंतु या टप्प्यामध्ये ती भूमिगत वाहत असल्यामुळे तिचे दर्शन मात्र होत नव्हते . आजूबाजूचे घनदाट अरण्य पहात चालताना अमरकंटक कधी आले कळलेच नाही !
लेखांक सत्तावीस समाप्त (क्रमशः)
पुढच्या भागावर जा
उत्तर द्याहटवा