लेखांक ८ : जो तेरा संकल्प वही मेरा संकल्प

क्षौर करून मी निघालो आणि सदानंद गिरी बाबांकडून पुढील आदेश येण्याची वाट पाहू लागलो . 
क्षौर केल्यावरचे प्रस्तुत लेखकाचे रुप काहीसे असे होते 
वाटेमध्ये मला शिवशंकर तिवारी नावाचा एक अत्यंत तेजस्वी आणि सज्जन पुजारी भेटला . जो मोटरसायकल वरून जाता जाता वाटेत जमलेल्या माकडांना केळी खाऊ घालत होता .त्याच्याशी बोलल्यावर असे लक्षात आले की तो रोज हे काम करतो .मारुतीरायाची सेवा समजून माकडांना केळी खाऊ घालतो . लोक देखील त्याला सहकार्य करतात , कारण त्यांनी केळी खाऊ घातल्यामुळे पोट भरलेली माकडे दिवसभर गावांमध्ये फिरून कोणाला त्रास देत नाहीत . 

त्याच्याकडून संकल्प सोडावा अशी माझ्या मनात इच्छा होती परंतु नर्मदेच्या काठी आपण आपल्या इच्छा गुंडाळून ठेवायचे असतात हे मला अजून माहिती नव्हते . मी शिवशंकर तिवारी पुजारी यांच्याशी बोलत असताना एक हुशार तरुण मुलगा तिथे आला व माझी आणि पंडितजींची परीक्षा घेऊ लागला . त्याचे प्रश्न देखील मजेशीर होते परंतु मूलगामी होते . सुमारे तास दीड तास आमच्या तिघांचा शास्त्रार्थ चालला होता .त्यांची विद्वत्ता , साधेपणा आणि नम्रता माझ्या मनाला खूपच भावली .मी पुढे चालू लागलो आणि माझ्या डोक्यात सतत राम लखन सेनचा विचार येऊ लागला ,की आपण त्याला किमान पन्नास रुपये तरी द्यायला पाहिजे होते . मी आता घाटापासून दोन किलोमीटर दूर आलो होतो आणि अचानक मला एका माणसाने पन्नास रुपये हातात आणून दिले , इतक्यात समोरून मोटरसायकल वरून राम लखन सेन स्वतः आला आणि मला बघून गाडी थांबवली ! बाबाजी कैसे हो ! असे तो म्हणताक्षणी मी पन्नास रुपये त्याच्या हातावर टेकवले .तो नकार देऊ लागला परंतु मी त्याला सांगितलं , " मेरे नही है । मैय्या ने अभी अभी दिये है आपके लिये । आपको लेने ही पडेंगे । " मग मात्र त्यानी निमूटपणे पन्नास रुपये घेतले .अशा पद्धतीने माझी ती इच्छा माईने पूर्ण करून घेतली . आपल्या आजूबाजूला येणारे सर्व लोक हे तिच्याच इच्छेने काम करत आहेत याचा अनुभव हळूहळू येऊ लागला . त्या रात्री खूप प्रचंड थंडी पडली होती .

 पहाटे तीन साडेतीनला उठून मैयावर जाऊन स्नान करून आलो . आश्रमाच्या बरोबर समोर एक अंध तरुण शेकोटी करून बसला होता .थोडेसे अंग शेकावे आणि त्याच्याशी गप्पा माराव्यात असा विचार करून तिथे जाऊन बसलो . हा समीर शाह नावाचा मुसलमान अंध तरुण होता .तो काही काळ मुंबईला राहिला होता त्यामुळे थोडेफार मराठी त्याला येत होते .तो इथे काय करतो आहे असे विचारल्यावर त्याने मला सांगितले की तो एक फूट रिफ्लक्सॉलॉजिस्ट आहे आणि त्याच्या मित्राला भेटायला म्हणून तो आला आहे .परंतु मित्राचा संपर्क न झाल्यामुळे नर्मदेच्या काठी घेऊन बसला होता . त्याला थंडी वाजू लागली अचानक खूप ऊब जाणवली म्हणून खाली बसला तर समोर शेकोटी होती .नेमकी ती शेकोटी झुलेलाल आश्रमा समोर असल्यामुळे याची माझी भेट झाली .

त्याला जोराची शौचाला लागली होती आणि जवळपास काय आहे त्याला काहीच माहिती नव्हते , त्यात हा मुस्लिम असल्यामुळे नर्मदेच्या काठी कुठे बसायला घाबरत होता . मी चौकशी केल्यावर कळले की जवळच एक सरकारी संडास कॉम्प्लेक्स आहे .मी तिथपर्यंत त्याला घेऊन गेलो . हे कॉम्प्लेक्स चांगलेच उंच पायऱ्या चढून होते .याला एकट्याला जाता येणे अशक्य होते .संपूर्ण पायऱ्या त्याला हाताला धरून मी वर चढवून नेले आणि त्याचे पैसे देखील भरले .दारावर उभ्या असलेल्या माणसाने माझ्या अवतारकडे पाहून पैसे मला परत दिले .आणि म्हणाला परिक्रमा वासी से पैसे नही लेते । मी दक्षिण भारतामध्ये वास्तव्यास होतो त्या काळात माझा एक चांगला मित्र नरेंद्र कुमार फूट रिफ्रॅक्सॉलॉजी शिकायचा आणि लोक रांगा लावून उपचारार्थ त्याच्याकडे यायचे . त्यामुळे त्यातील काही प्रारंभिक जुजबी ज्ञान मला होते .
        नरेंद्र कुमार आणि कुटुंबीय कीलपट्टी मदुरै

 ते प्रश्न विचारून मी हा खरोखर त्यातला तज्ञ आहे का ते तपासून घेतले .बाहेर आल्यावर समीरला फार हायसे वाटले आणि तो मनापासून माझे आभार मानू लागला .त्याने मला चहा सुद्धा पाजला . त्याला परिक्रमे बद्दल काहीच माहिती नव्हती . त्यामुळे त्याला नर्मदा परिक्रमा व हिंदू धर्म याविषयी पुरेशी माहिती दिली . त्याने देखील मनोमन मान्य केले की ज्या क्षणी त्याच्या मनामध्ये नर्मदा नदीचा विषय आला त्या क्षणी त्याला मी भेटलो आणि माझी त्याला मदत झाली म्हणजे ही मैय्याचीच इच्छा असणार हे त्याने मान्य केले ! मी देखील भल्या पहाटे विनाकारण बाहेर आलो होतो ! सकाळी सहाला आंघोळ करायचे माझे नियोजन होते !असो नर्मदे काठी नियोजन करायचे नसते हेच खरे ! खरे तर संपूर्ण आयुष्यात हे सूत्र पाळले तर त्यातील आनंद काय विचारता ! 

बाहेर फिरले की लोक पैसे दक्षिणा देतात हे कळल्यामुळे आज मी दिवसभर आश्रमातच एका जागी शांतपणे बसून राहिलो . एक एक माणसे भेटत होती .परिक्रमावासी आत मध्ये यायचे आणि काही काळ थांबून पुढे जायचे . प्रेम नारायण शुक्ल नावाचा ,खपटिया गाव , चित्रकूट धाम , उत्तर प्रदेश येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक परिक्रमेमध्ये होता तो आश्रमात भेटला . धिप्पाड देह आणि उत्तम तब्येत . एक वेळ जेवण करायचा . त्याचे ३० किलो वजन कमी झाले होते ! संध्याकाळी अनेक परिक्रमावासी धर्म शाळेमध्ये येऊ लागले . राजू डोईफोडे नावाचा दिघी आळंदी येथील एक विद्यार्थी होता ,तसेच सौ. सुनिता राजू पाचरणे नावाच्या पुण्याजवळील वाघोलीच्या काकू देखील भेटल्या . यांनी मला सांगितले की आता नर्मदा मातेची आरती आहे ती बघायला आपण घाटावर जाऊया . मला वाटले एखादे छोटेसे निरंजन घेऊन काकू स्वतः आरती करतील परंतु प्रत्यक्षात घाटावर जाऊन पाहतो तो चालता येणे देखील अवघड इतकी तुफान गर्दी झालेली होती आणि भव्य दिव्य आरतीचे आयोजन केलेले होते !
रविवारचा दिवस होता तो . मोठ्या मोठ्या स्पीकर वरून आवाहन केले जात होते लोकांना बसवून घेतले जात होते . एक कार्यकर्ता पळतच आला आणि आम्हाला पुढे घेऊन गेला . बॅरिकेट ओलांडून आम्ही "व्हीआयपी लॉन्ज " मध्ये जाऊन बसलो ! कुणाची ओळख ना पाळख परंतु केवळ परमेश्वराचा ध्यास घेऊन त्याचे वस्त्र अंगावर घातले की सगळीकडे अशीच सुलभता प्राप्त होऊन जाते ! आम्ही तिथे बसलो तसे अजून काही परिक्रमावासी येऊन बसले . जळगाव पुणे आळंदीचे काही परिक्रमावासी होते याच्यामध्ये तरुण मुली देखील होत्या . जोग पाठशाळेतील काही युवक होते आणि एक दहा वर्षाचा मुलगा देखील होता . नर्मदे काठी अगदी गंगेची वाराणसी मध्ये आरती होते त्या पद्धतीची किंबहुना त्याहूनही काकणभर सुंदर पद्धतीने आरती केली जाते  ती ग्वारी घाटावरच ! अजून काही ठिकाणी देखील आरती होते .परंतु ग्वारी घाट इतकी गर्दी कुठेच नसते .
 ग्वारी घाटावरील आरती संपल्यावर आळंदीचा तरुण परिक्रमा वासी , प्रस्तुत लेखक आणि पवार काका .
 प्रस्तुत लेखक व पवार काका ग्वारी घाटावर आरती नंतर
 हे वजन पुढे मैय्याने सुमारे २७ किलो उतरवले !
 आजचा माझा मुक्कामाचा शेवटचा दिवस होता त्यामुळे मला आता परिक्रमेसाठी निघण्याचे वेध लागले होते . माझी सर्व सिद्धता झालेली होती फक्त कुपीमध्ये मैया भरून घ्यावी लागते ते काम राहिले होते . त्यासाठी कुठलीही कचऱ्यातली बाटली उचलण्याची माझी इच्छा नव्हती त्यामुळे मी एका दुकानात गेलो आणि छोटे अँपी फीज घेतले .परिक्रमावासी बाहेरून विकत घेऊन काही खात नाहीत .त्यामुळे मी ते त्यालाच प्यायला लावले आणि त्याच्याकडून ती रिकामी बाटली घेतली आणि स्वच्छ धुतली . त्याने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत हे वेगळे सांगायची गरज नाही . 

 हीच ती कुपी ज्यात पूजेसाठी मैय्या भरून घेतली

सकाळी लवकर उठून स्नान आदि कर्मे उरकून घेतली . सदानंद गिरी बाबांनी एक लोटेवाला पंड्या ठरविला होता व आदल्या दिवशी त्याला बोलावून माझी भेट घालून दिली होतीच .
इथे ग्रामीण भागातील लोक दर्शनाला खूप येत असतात आणि त्यांना पुजाऱ्याचे नाव लक्षात राहत नाही .म्हणून पुजारी लोकांनी मार्केटिंगची ही पद्धत शोधून काढली आहे . पिढ्यानपिढ्या ती सुरू आहे . पंडिताचे नाव लक्षात राहिले नाही तरी त्याची खूण लक्षात राहते . लोटी वाला पंड्या , छत्री वाला पंड्या , तलवार वाला पंड्या , पाच नारळवाला पंड्या ,अशा खुणा असतात आणि उंच काठीला चक्क लोटी , छत्री ,पाच नारळ वगैरे गोष्टी लटकून ठेवलेल्या असतात .असो . त्यामुळे मी बाबांना नमस्कार करून प्रस्थान ठेवले . झुलेलाल आश्रमाने मला जाता जाता एक थाळी , एक पेला , एक नारळ , वस्त्र ,फुलवाती , काडेपेटी इत्यादी सर्वसामान दिले .नर्मदा मातेची एक छोटीशी प्रतिमा देखील मी वीस रुपयाला विकत घेतली . मी प्रसादासाठी पन्नास रुपयाचा पेठा रात्री विकत घेऊन ठेवला होता . घाटावर पंड्याने सर्व पूजा सांगितली . त्याची मंत्रोच्चार करण्याची पद्धत मोठी मजेशीर होती ! भरधाव गाडीला अचानक ब्रेक लागावा तसा तो उगाचच मध्ये थांबायचा व पुन्हा पिकअप घ्यायचा ! असो . संकल्प सोडताना देखील काही मजा मजा घडल्याच !पंड्या मला म्हणाला की तुमचा काय संकल्प आहे तो सांगा . मी म्हणालो माझा असा काही विशेष वेगळा संकल्प नाही . तो थोडासा वैतागला आणि म्हणाला संकल्प नाही तर मग परिक्रमा कशाला करता ? काहीतरी संकल्प घेतल्याशिवाय परिक्रमा करायची नसते . नाहीतर ते नुसतेच भ्रमण होते . नर्मदेच्या काठावरती मी बसलो होतो आणि नर्मदे काठी पिढ्यानु-पिढ्या पूजा सांगणारा एक ब्राह्मण मला हे सांगत होता त्यामुळे मला ऐकणे भाग होते ! परंतु माझा खरोखरच काही संकल्पना नव्हता त्यामुळे मी त्याला असे म्हणालो की नर्मदा मातेचा जो काही संकल्प माझ्यासाठी असेल तोच माझा संकल्प !असा संकल्प सोडा . तो चक्रावून गेला आणि मला म्हणाला असा कुठे संकल्प असतो का ! काहीतरी संकल्प सोडा जसे की माझे लग्न होऊ दे ,मला मूळ बाळ होऊ दे ,माझे घरदार होऊ दे ,माझा अमुक अमुक प्रश्न सुटू दे , मला कोर्टकचेरी मध्ये यश येऊ दे ,माझा जमिनीचा प्रश्न सुटू दे ,मला पैसा मिळू दे ,इत्यादी . माझा खरोखरच असा कुठलाही प्रश्न नव्हता त्यामुळे मी त्याला ठामपणे सांगितले की नर्मदा मातेचा जो संकल्प आहे तोच माझा संकल्प असा संकल्प कृपा करून तुम्ही सोडा . हे वाक्य संस्कृत मध्ये बसवणे त्याच्याकरता थोडेसे अवघडच होते , त्यामुळे मी त्याला म्हणालो की हिंदीमध्ये बोला . नर्मदा मैया ला हिंदी चांगली कळते ! आणि त्याने ब्रेक मारत मारत खरोखरीच चक्क हिंदीमध्ये संकल्प सोडला ! " हे नरब्दा मैया , जो तेरा संकल्प होगा , वही इनका संकल्प हो जाये । आप ही इनके लिये संकल्प करना । और इनकी परिक्रमा , पूर्ण कराना । नरब्दे हर ! " . आम्ही दोघे अगदी नर्मदा नदीच्या काठावर ओल्या फरशीवर बसकरे टाकून बसलो होतो .मी संपूर्णपणे भिजलो होतो . नर्मदा मैयाला मी तशा ओल्यातच साष्टांग नमस्कार केला . कुपीमध्ये तिचे जल भरून घेतले . पंडिताने मला परिक्रमेचे सर्व नियम समजावून सांगितले . आणि मला म्हणाला यथाशक्ती दक्षिणा तुम्ही देऊ शकता . दिली नाही तरी चालेल . इतक्यात एक माणूस माझ्या हातामध्ये शंभर रुपये ठेवून निघून गेला . तेच शंभर रुपये मी पंडिताला दिले . आता कन्या पूजन करायचे असते , परंतु जागेवरून मी बूड देखील उचलले नाही इतक्यात पाच छोट्या कन्या ओळीने माझ्या शेजारी येऊन बसल्या . मी सर्वांचे चरण स्वच्छ धुऊन घेतले . त्यांचे चरण तीर्थ घेतले आणि त्या सर्वांना सोबत आणलेला पेठा हाताने भरविला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले ! पंडित देखील खुश झाला . तो म्हणाला , " आपकी परिक्रमा सफल हो जाये ! शुरुवात तो बहुत अच्छी हुई है ।कन्या स्वयं आपके पास चली आई । यह अच्छा संकेत है । " मला यातले काहीच माहिती नव्हते आणि त्याचे आयुष्यच नर्मदे काठी जात असल्यामुळे तो म्हणतो ते खरेच असणार हे लक्षात घेऊन मी उठलो .काठी हातात घेतली . झोळी पाठीला अडकवली . नर्मदा मातेला नमस्कार केला , सूर्य नारायणाला नमस्कार केला , पाचही कन्यांना नमस्कार केला ,मनोमन सद्गुरूंचे चरण आठवले आणि माझ्या या जन्मातील पहिल्या नर्मदा परिक्रमे करिता मी सिद्ध झालो .गुरुद्वाराच्या दिशेला तोंड करून दोन्ही हात वर केले आणि जोरात आरोळी ठोकली ! नर्मदे हर ! अनवाणी पायांनी परिक्रमा सुरू झाली !तो दिवस होता पौष शुद्ध प्रतिपदा , सोमवार , शालिवाहन शके १९४३ शिवशक ३४८ , आंग्ल दिनांक ३ जानेवारी २०२२ , सकाळी ११ : ११ वाजता !
 मी परिक्रमा सुरू करणारा कोण ? नर्मदा मातेनेच माझे पाऊल टाकून घेतले ! 


मागील लेखांक
लेखांक आठ समाप्त (क्रमशः)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर